पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुष्याचा आहार

त्यांची लागवड होऊ लागली. आतां धान्य हे मनुष्याचे नैसर्गिक अन्न नव्हे असे म्हृटले तर लोंकांना आश्चर्य वाटते.परंतु धान्य कच्चें असल्यास ते चांगले लागत नाही, एवढा पुरावा त्याला बस आहे. त्या वेळीं संततिनियमनाचे आधुनिक मार्गच काय, पण अशक्त मुले मरू देण्याचा ग्रीक लोकांचा मार्ग देखील त्यांना सुचला नसेल, कारण कृत्रिमरीतीने लोकसंख्येला आळा घालतां येईल ही कल्पनाच त्या वेळीं नसेल, आणि ज्या वेळीं ही क्ल्पना आली तेव्हा अन्नात इतका फरक अगोदरच झालेला होता,की त्याचा फेरविचार करणें जरूर आहे असे कोणास वाटले नाही यांत नवल नाही. निसर्गाच्या लाटेवर वहात न जातां मनुष्याला आपल्या जीवनाला अकलेचे सुकाणूं लावून, संततिनियमन करून लोकसंख्या नैसर्गिक अन्नाच्या मर्यादेत आणता येईल, ही कल्पना अजूनही फारच थोडयांस समजते.ही कल्पना पुढे केव्हातरी पुरी अंमलात येईल अशी आशा करण्यापलीकडे सध्या तरी काही करतां येत नाही. निदान निरनिराळी राजकीय वेडे जोपर्यंत लोकांच्या डोक्यातून गेली नाहीत तोपर्यंत तसें करण्याऐवजी राष्ट्रें एकमेकांशी जनावरासारखी भांडत राहणार असा रंग दिसतो.

 सध्याच्या स्थितीत मूळच्या फलाहारावर पुन्हा जाणें फारच थोड्यांस शक्य होईल, तेव्हा वरील सर्व विवेचनाचा काय फायदा, असे कदाचित् कोणास वाटण्याचा संभव आहे. सध्या काय शक्य आहे,याचाच विचार व्यावहारिक दृष्टया उपयुक्त होईल हे निर्विवाद आहे, आणि तो यापुढे येणारच आहे. परंतु तसा विचार करण्यापूर्वी या विषयाचा पाया काय असला पाहिजे हे ठरवणे जरूर होते. नैसर्गिक स्थितीत आहारशास्त्राचीच जरूर नव्हती, परंतु कृत्रिम आहारामुळे ती कशी उत्पन्न झाली, हे प्रथम पाहणे आवश्यक होते. आता पाया भक्कम झाल्यावर पुढील विचार करण्यास ठीक पडेल.

----------

१९

१९