पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दूधखुळा आहेस ? ॲलिसनं सुनेसारखं वागावं ही अपेक्षा चुकीची आहेच, पण जरी समजा ती अगदी फ्रेनीच्या आज्ञेत राहिली तरी त्यामुळे फ्रेनीचं समाधान होणं शक्य नाही."
 "झालं तर. म्हणजे तूही माझ्याच निष्कर्षाला येऊन पोचलास."
 स्वतःच्या चुकीची शिक्षा जन्मभर ॲलिसनं भोगावी ही त्याची अपेक्षा भयंकर होती. पण त्याबद्दल आपण काही करू शकत नाही ह्या त्याच्या पवित्र्यावर तो अचल होता.
 सुदैवाने ह्यानंतर माझ्या कंपनीने मला स्वित्झर्लंडला पाठवलं. रिटायर होईपर्यंत कधीमधी घरी येण्याव्यतिरिक्त मी तिकडेच होतो. परत आल्यावरही रूसीची कधी गाठ पडली नाही. मित्रमंडळींच्यातल्या कुणाकुणाकडून त्याच्याबद्दल बातमी कळत असे पण तेवढंच. तो मेल्याची बातमी वाचल्यावर मात्र थोडे दिवस जाऊ देऊन मी ॲलिसला भेटायला गेलो. फ्रेनीनं दार उघडलं आणि नुसतंच माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. साहजिकच होतं.
 "तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. मी रूसीचा मित्र डिगी."
 तरीही तिच्या चेहऱ्यावर मला ओळखल्याची काही खूण दिसली नाही, पण ती मागे सरकून म्हणाली, "या आत."
 "रूसीबद्दल वाचलं. आजारी होता का तो ?" खरं म्हणज पिकलं पान गळायला आजाराची जरूर असते असं नाही, पण काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं.
 "त्याला हार्ट अटॅक आला होता काही वर्षांपूर्वी. तसा तो चांगला सावरला होता त्यातनं. पण शेवटी काय? देवाची इच्छा!"
 तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ती खूपच थकलेली, खचलेली दिसत होती. मला तिची दया आली. मग आम्ही जुन्या काळच्या आठवणी काढून गप्पा मारल्या. जाताना मी विचारलं, "ॲलिस दिसत नाही घरी ?"

५४ - ॲलिस