पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिग्विजय



 रूसीची आणि माझी मैत्री कशी झाली, का झाली मला कधी कळलं नाही. अनाकलनीय घटना घडवून आणणारी एक वैश्विक यंत्रणा असली पाहिजे. मला आयुष्यात अनेकदा तिची प्रचीती आलेली आहे. तिच्या अखत्यारीत हे घडलं. मी रूसीचा भाऊ असतो तर बहुतेक मला चार लोकांसमोर हे भाऊपण कबूल करायला लाज वाटली असती. मला ज्यांबद्दल तुच्छता वाटे असे सगळे गुणधर्म त्याच्यात एकवटले होते. तो सडपातळ, गोरागोमटा, नाजूक होता. मुलगी असता तर सुंदर म्हटलं असतं. (म्हणून कदाचित पुढे तरुणपणात काही वर्तुळांतून आमच्या मैत्रीला एक वेगळाच रंग देण्याचा हास्यास्पद प्रयत्न झाला असावा). त्याला साहित्य, कला अशा विषयांत गोडी होती. खेळ किंवा ज्यांत थोडेफार कष्ट होतात असे गिर्यारोहण, ट्रेकिंगसारखे छंद ह्यांचं त्याला वावडं होतं. व्यावहारिक जगाच्या धकाधकीत त्याचा निभाव लागत नसे. शाळेतल्या गुंड पोरांनी सतावलं की, तो रडायला लागायचा. अशाच एका प्रसंगी त्याला कुणाच्या तरी तावडीतून सोडवताना आमची ओळख झाली.

दिग्विजय - ४५