पान:अभिव्यक्ती.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४/ अभिव्यक्ती

पुराणाच्या बाबतीत आकलन - अभ्यासातील फरक सतत जाणवत असतो. यानुसार पुराणकथा नव्या आकलनातून, अभ्यासातून पाहिली जाते. व्यक्तींच्या व्यक्तित्वावर, मनाच्या चित्रणावर कोणतीही कथा केंद्रित होते की नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे; कारण शेवटी रसिकांच्या लक्षात व्यक्तींची व्यक्तिमत्वेच राहातात. मनाच्या चित्रणा- तून घडविलेले अनुभवमंथनच शिल्लक राहाते. यातच खरी प्रतिभेची चमक दिसते.
पौराणिक कलाकृती : रूपवेध  पौराणिक साहित्याचे महत्त्वाचे पृथगात्म वैशिष्ट्य म्हणजे तीत नेहमीच असंभवनीयता आणि अद्भुतता असते. लेखकाने साहित्यकृती आणि कथा पटण्याजोगी (convincing) करण्याचा प्रयत्न इथे व्यर्थ आहे. तो करूही नये. पुराणांमध्ये इतिहास, संस्कृती, धर्मशास्त्र, दैवतकथा यांचाही समावेश झालेला आहे, हे त्याचे मुख्य कारण आहे. ही पुराणकथा बोधासाठी, प्रचारासाठी, रंजनासाठी वा कलात्मक आविष्कारांसाठी योजण्याचे कलावंताचे स्वातंत्र्य आपण नाकारू शकत नाही. निव्वळ बोध, प्रचार आणि रंजनासाठी पुराणकथेचा वापर केलेल्या कलाकृती कलात्मक ठरणार नाहीत. त्या प्रचाराच्या, रंजनाच्या मूल्यांना घेऊन अवतरतील, पण त्यांचे मोजमाप या दृष्टीने आपणास करता येईल. कलात्मक की अकलात्मक एवढेच सांगणे येथे इष्ट, साहित्यशास्त्रीय ठरू शकेल असे म्हणता येईल.
 ललित साहित्याचा विषय 'माणूस'! मग तो कोणत्याही काळातील असो. विभिन्न कालाला सामोऱ्या जाणाऱ्या या लेखकाची भूमिका कधीकधी गतकालाच्या प्रकाशात वर्तमान जाणण्याची किंवा निवडलेल्या इतिहास पुराणकाळाला जिवंत करण्याची असते. पुराणाकडे क्षीण प्रेरणेने न जाता गर्दीतील मुलाला आई ज्या उत्कट भावनेने शोधील त्या प्रेरणेने अद्भुत आणि असंभवनीय अशा या पुराणकथांतून व्यक्तित्वाचा वेध घ्यायला हवा. वास्तवाला पाठ फिरवायची वा सामाजिक कृतीचा पट कमी पडतो म्हणून पुराणकथांकडे वळणे म्हणजे वैचारिक संगतीला सोडून होईल
 वर्तमानकाळ घेऊन जेव्हा जेव्हा लेखक पुराणकथांकडे जातो त्या त्या वेळी ती कथा प्रतीक ( symbol:) रूप वा दृष्टांतरूप बनते. पण हीच पुराणकथा अशी प्रत्येक वेळी दृष्टांत वा प्रतीक बनविण्याची आवश्यकता नसते. नव्या त-हेनेही मानवी विश्व लक्ष्य ठेवून चित्रित करता येते. अशा चित्रणात पुराणकथेतील व्यक्तींचे व्यक्तित्वही सजीव होण्याची शक्यता असते. मनातील आशय मांडण्यासाठी मग निव्वळ ही पुराणकथा रूपक म्हणून स्वीकारली असे होत नाही. महत्त्वाचे म्हणजे पुराणकथेच्या निमित्ताने जेव्हा लेखकाची अनुभूती व्यक्त होते तेव्हा तो लेखक आपल्या लेखनाला न्याय देऊ शकला असे म्हणता येईल. यामुळे ही अनुभूती आपोआप जाणिवेच्या गंभीर, रंजक वा भावनिक अशा विविध पातळ्या व्यक्त करणारी होईल.