पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मराठीतील पहिल्या वर्तमानपत्राचे नाव होते दर्पण. वर्तमानपत्राचे काम आरशाप्रमाणे तटस्थपणे प्रतिबिंब दाखविण्याचे आहे. कुरूपाला सुरूप कर, लठ्ठ माणसाचे सडपातळ प्रतिबिंब दाखव किंवा विरुद्ध पक्षाच्या रुबाबदार माणसालाही कुरूप बनव असले उद्योग सच्च्या पत्रकाराने करायचे नसतात. प्रत्यक्षात आता, सरळ प्रामाणिक प्रतिबिंब दाखविणारे वर्तमानपत्र अपवादानेच सापडेल. जत्रेत एखादा तंबू हरहमेश लागतो. आतून प्रचंड हास्याचे कल्लोळ जत्रेच्या गलबलाटातही ऐकू येत असतात. लोक गर्दी करून तिकीट काढतात आणि आत जातात. आत ओळीने तऱ्हेतऱ्हेचे विकृत आरसे लावलेले असतात. कोणा आरशापुढे उभे राहिले तर रबर ताणून लांबविल्यासारखा माणूस दिसतो; दुसऱ्या एखाद्या आरशासमोर हवा भरून फुगविल्यासारखा दिसतो. आपलेच हे अदृष्टपूर्व विभूतिदर्शन पाहून साऱ्या कुचेष्टेचे विषय झालेली माणसेच खदखदा हसत असतात. आद्य दर्पणाचे वारसदार जत्रेच्या तंबूतील या आरशांप्रमाणे जगाचे प्रतिबिंब दाखवतात.
 गेल्या दोनतीन महिन्यांत शेतकरी संघटना, शरद जोशी आणि देशातील यच्चयावत् राजकीय पक्ष यांच्यातील संबंध याबद्दल इतके काही लिहून आले आहे आणि ते इतके परस्परांना छेद देणारे आहे, की पत्रकारितेबद्दल कीव किंवा घृणा तयार व्हावी.
 चाटे-देशमुख संघर्षातील सत्य काय? कोर्टापुढील प्रकरणांचा निकाल होईपर्यन्त थांबावे लागेल. 'अ'ला शिक्षा झाली काय किंवा तो निर्दोष सुटला काय, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्यात कुणालाही यत्किंचितही स्वारस्य राहणार नाही. या वादाच्या निमित्ताने एक चर्चा सुरू झाली आहे, त्या चर्चेचा मात्र दूरगामी परिणाम संभवतो.

 शालांत परीक्षांचे निकाल लागले, की हल्ली शिकवणीच्या वर्गांच्या मोठमोठ्या जाहिराती झळकतात. गुणवत्तायादीत आलेल्या शंभर विद्यार्थ्यांपैकी पंचवीसतीस आपल्या शिकवणीवर्गाचे होते असा फोटोसहित दावा करणाऱ्या जाहिराती निदान दहावीस शिकवणीवर्गांचे चालक करतात. गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांच्या मुख्य विद्यालयांविषयी दूरदर्शनवर वृत्तांत येतात; वर्तमानपत्रांतही फोटो झळकतात. गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय शिकवणीमहर्षि जाहीररीत्या दवंडी पिटून घेतात, त्याचा इन्कार किंवा विरोध कोणीच करीत नाही. शिकवणीवर्ग फोफावतात. काही वर्षांपूर्वी शहरोशहरी एखादा कष्टाळू शिक्षक फावल्या वेळात शिकवणीचा वर्ग चालवे, विद्यार्थ्यांकडून कसून मेहनत करून घेई. त्यांचे

अन्वयार्थ – दोन / ४९