पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असते. उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थी गुण देण्याची कोठे थोडीफार तरी संधी देत आहे काय याकडे परीक्षक बारकाईने नजर ठेवून गुणांचे वाटप खिरापतीप्रमाणे करीत असतात. एवढे करूनही नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास कसे करावे, याचे आटोकाट प्रयत्न पर्यवेक्षक आणि प्राचार्य यांच्या पातळीवर होतात. शेवटी, सगळ्यांना सरसकट किती गुण दिले तर निदान निम्मे विद्यार्थी उत्तीर्ण होतील याचा हिशेब करून गुणांचा बोनस वाटला जातो. अशा परिस्थितीत, दहावीपर्यंतच्या साऱ्या परीक्षा शालांतर्गत ठेवणे म्हणजे पोस्टातल्या टपालाप्रमाणे प्रत्येक वर्षी शिक्का मारून विद्यार्थ्यांना वर ढकलणे एवढाच होईल. सारे विद्यार्थी दहावीपर्यंत पोचतील, पण 'बे'चा पाढासुद्धा न येणारे विद्यार्थी दहावीपर्यंत पोचले तर शैक्षणिक व्यवस्था संपुष्टात आली असा डांगोरा पिटणे कितपत योग्य होईल?
 परीक्षापद्धती गुणवत्ता ठरविण्याकरिता असते, घोकंपट्टीची कसोटी नसते; एक ठरावीक कसोटी लागणार आहे, त्यासाठी आवश्यक ती तयारी करावी लागते. कोणत्याही एका अडचणीला सामोरे जाऊन तिच्यावर मात करण्याची कुवत विद्यार्थ्यांत कितपत आहे याची, खरे तर, परीक्षेत चाचणी होत असते. अनुत्तीर्ण विद्यार्थी तेवढे सारे शैक्षणिक व्यय, असे एकदा मानले तर मग काही समस्या राहतच नाही. दहावीपर्यंत कशाला, सगळ्या मुलांना पदवी परीक्षेपर्यंत पोचवून का देऊ नये?
 शैक्षणिक व्यय मोजायचे मानदंड असे खुळे असून चालणार नाही. दहावीच्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांची कुवत काय असावी? याची अपेक्षा ठरली आणि त्या अपेक्षेच्या तुलनेने प्रत्यक्षातील दहावीच्या विद्यार्थ्याची कुवत कमी ठरली आणि प्रत्यक्ष व अपेक्षित कुवतीच्या तुलनेने शैक्षणिक व्ययाची टक्केवारी काढली तर त्यात काही अर्थ राहील.
 साऱ्या पास-नापास श्रेणी बाद केल्याचा काय फायदा होणार आहे? नव्या शालेय शिक्षण धोरणात राष्ट्रभक्ती व धार्मिक मूल्यांवर भर द्यावा अशी शिफारस आहे. अभ्यासक्रमाचा बोजा कमी करावा व सर्व स्तरांवरील शिक्षणात मुलांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रीयता आणि सर्व धर्मांतील मूल्यांचे धडे देण्यावर केंद्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे.

 देशातील शालेय शिक्षणात देशभक्तीविषयी उदासीनता निर्माण झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. धर्माची खरी शिकवण समजून घेण्यास एकूण समाजालाच वेळ मिळत नाही. त्यामुळे, अभ्यासक्रमात आधारभूत मूल्यांचा समावेश करण्याचे घाटते आहे. शासन भा.ज.पा.चे आहे. हिंदू धर्माच्या सर्वंकष

अन्वयार्थ – दोन / ११६