पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खुर्चीबाहेरचा 'माणूस' मला हळूहळू लक्षात येऊ लागला. आत्मष्लाघेचा आरोप फार बळकट होऊ नये म्हणून अन्य संदर्भ गाळतो. तुलनाकार - सांस्कृतिक - उत्तर वासहतिक लेखक म्हणून त्यांच्या तीन कथासंग्रहांचे हे विवेचन करतो. एरवी एक लेखक व त्याचे एकच पुस्तक अशा एकारलेल्या उद्योगात पडायचेच नाही ही तुलनाकाराची भूमिका कायम आहे.
 मात्र लेखकाने साने गुरुजींच्या वळणाची सुबोध भूमिका नम्रपणे घेतली आहे. नंबर वन (२००८) च्या चार पानी प्रस्तावनेच्या प्रारंभीच ते लिहितात.
 'या पुस्तकातील सर्वच दहा कथा या खेळाडूंच्या क्रीडा जीवनाशी निगडित आहेत. अशा अर्थाने हा विशिष्ट अशा मानवी समूहाच्या जीवनावर 'थीम बेस्ड' कथासंग्रह आहे हे याचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. यापूर्वी माझे 'अंतरीच्या गूढ गर्मी' व 'पाणी! पाणी! हे दीन कथासंग्रह पण असेच थीम बेस्ड होते. “पाणी! पाणी!" शीर्षकच मुळी 'तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा' असे होते (लेखकाचे दोन शब्द).'
 नव समीक्षकांना व प्रयोगक्षमतेचा डांगोरा पिटणाऱ्यांना हे प्रांजळ कथन भोवळ आणणारं आहे. ते म्हणतील. आशयसूत्र आधी गुंफलं आणि प्रशासनात सापडलेले कथेचे मणी माळेत गुंफले! दुसरीकडे गुणाढ्याच्या 'कथा सरितसागर' वर देशीवादी संधिसाधू लेख लिहिणारे लेखकराव देखील कथेबद्दल अज्ञानाचे उत्पादन किती मोठ्या प्रमाणावर करतात याचा शोध घेतला पाहिजे. प्रत्येक माणूसच अनेक कथांचा बनलेला असतो. स्वत:च्या प्रबंध प्रकाशनाचे अनुदान घेऊनही तो बढतीसाठी 'स्वतंत्र ग्रंथ' असल्याचा बनाव रचतो. ही रहस्य कथाच असते. देशमुखांना प्रशासनात अशा बनावाच्या असंख्य कथा / कहाण्या / किस्से बघायला - ऐकायला मिळाल्या. त्या एकाच सूत्रात बांधण्यात एक साचेबद्धतेचा मोठा धोका होता. मात्र वरील लेखकरावाप्रमाणे कथा प्रकाराला नगण्य ठरवण्याच्या तुच्छतावादाला ते बळी पडले नाहीत. उलट खेळ, स्त्री भ्रूणहत्या, पाणी वगैरे आशय सूत्रांचे विविध धागे निवडून कथांचाच गोफ कष्टाने विणण्यात ते रमले. त्याचे महत्त्व वेगवेगळ्या अंगांनी स्पष्ट केले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रत्येक समाजसमूह सांस्कृतिक स्मृती व कथनांचा उपयोग करतो. त्याचे काव्यशास्त्रीय उपयोजन होत असते. कॅनडातील 'आदिवासी' मनोवैज्ञानिकाने आदिवासीच्या दृष्टिकोनातून कथांचे महत्त्व वेगळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे. तो लिहितो,
 Stories are a type of medicine and like medicine, can be healing or poisonous depending on the dosage or type.

अन्वयार्थ ७१