पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकटेपणाच्या पातळीवर येऊन त्याच्यामधील एकट्यातील विजिगीषू वृत्तीचे दर्शन घडवितात. सुंदर संस्कारांनी समृद्ध नि संपन्न झालेला माणूस एकाकी होताना या अवनीवरच्या मानव्यसरोवरापासून लांब जाऊ शकत नाही. त्याच्यामधील खेळाडूमध्ये हिणकस समाजकारण कसे भिनत जात आहे याचे स्वाभाविक दर्शन घडवितात.
 'रन बेबी रन', 'बंद लिफ्ट' या देशमुखांच्या कथा म्हणजे त्यांचे केवळ मानवतेवरील प्रेमदर्शक होय. बेबी ग्रामीण भागातील धावपटू आणि तिचे दलित कोच - गुरू यांच्या प्रांजळ गुरू-शिष्य नात्याची दुर्दैवी शोकात्मिका आहे. तिच्या नवऱ्याला गुरू - शिष्य नात्यातील पावित्र्य कळत नाही. तो संशय घ्यायला लागतो. दिसायला देखणा, हॉटेल व्यवसाय घराण्यानं खानदानी असलेला बेबीचा नवरा मनानं किडलेला, विचारानं बुरसटलेला आहे. राष्ट्रीय क्रीडापटू - धावपटू असलेली बेबी ऑलिंपिक स्पर्धेच्या निवड चाचणीची तयारी करीत असताना लग्न होते आणि ती क्रीडाजीवनाला मुकते. तिची सारी स्वप्ने धुळीस मिळतात. सर्वोकृष्ट परफॉर्मन्स करायला तयार असलेली एक मुलगी संशयाला बळी पडते. आणि पोटात मुलीचा गर्भ आहे, म्हणून तो पाडला. या सर्व गोष्टींनी बेबी वैतागलेली, पिचलेली, मनानं खचून गेलेली दिसते. 'तुला गर्भार केली तरच गुंतून राहशील' म्हणून तपासणी केली तर कळते - ती पुन्हा आई होणार नसल्याचे. बेबीचे उद्गार आहेत. “एकाच वेळी त्याचा विषाद वाटत होता आणि हायसंही. सैतानाचा गर्भ तसाच पुढं सैतान निपजला तर!" (नंबर वन : ११७) धावण्याच्या स्पर्धेत अखेर बेबी जगाच्याही पुढे जाते.
 बेबीचा गुरू मागासवर्गीय, पण बेबीच्या मनात कळत नकळत तिचा गुरूच रुतलेला आहे, पण याचा उलगडा तिला होत नाही. तिला कोच, गुरू, फादर, फिलॉसॉफर असेच त्याचे प्रकट रूप दिसते. कोणतं पाप मनात उत्पन्न न होताही बेबीच्या नवऱ्याच्या - बालाजीच्या - मनात पाप पक्कं बसलेले होते. या साऱ्याला वैतागून बेबी स्वत:ला पेटवून घेते. तिचा गुरूविषयीचा आदरभाव एवढा, की तिच्या चितेला भडानी आपल्या कोचनेच द्यावा, अशी तिची शेवटी इच्छा असते! या कथेला राष्ट्रीय धावपटू नंदा जाधव हिच्या करुण शोकांतिकेची पार्श्वभूमी आहे. शोकांतिका देशमुखांनी घेतली असलेली तरी रिपोर्टवजा असे काही यात नाही. मन गदगदणाऱ्या प्रसंगांना त्यांनी योग्य कलात्मक न्याय दिला आहे.
 'प्रयासे जिंकी मना' - जलक्रीडापटू असलेल्या दीप्तीचा नवरा दिलीप, मोठा मुलगा अजित हे दोघे पाण्यातच मृत्यू पावतात. दीप्ती राष्ट्रीय जलक्रीडापटू असूनही तिच्या मनात पाण्याची भीती घर करते. परंतु धाकटा मुलगा जयंत लपून जलक्रीडापटू होतो. आणि राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल येतो. पाण्याची भीती पाण्यानेच काढली जाते. या

अन्वयार्थ ३९