पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवस्था आणि पर्यावरण
 नोकरशाहीच्या पर्यावरणाची संकल्पना त्यांनी विश्लेषणात्मक पद्धतीने मांडली आहे. सांस्कृतिक हा घटक प्रशासकीय पर्यावरणाचा एक भाग आहे, अशी देशमुखांची संकल्पना आहे. या भारतीय संस्कृतीची तीन वैशिष्ट्ये प्रशासकीय पर्यावरणाचा भाग म्हणून त्यांनी मांडली आहेत. धर्म, सहिष्णुता, विश्वासात्मकता ही तीन वैशिष्ट्य त्यांनी सांस्कृतिक पर्यावरण म्हणून नोंदविली आहेत. सांस्कृतिक पर्यावरणाचा संबंध त्यांनी सामाजिक पर्यावरणाशी जोडला आहे. म्हणजेच, प्रशासकीय पर्यावरणाचा सामाजिक मुद्दा त्यांनी नोंदविला आहे. जात, जमातवाद, हिंसा, दहशतवाद हे घटक त्यांनी प्रशासनाच्या सामाजिक पर्यावरणाचे मांडले आहेत. याखेरीज त्यांनी राजकीय पर्यावरणाची संकल्पनादेखील मांडली आहे. भारतीय लोकशाहीचे स्वरूप, वाढता राजकीय हस्तक्षेप, वाढता भ्रष्टाचार, शासकीय नोकरशाहीतील आरक्षण हे घटक त्यांनी राजकीय पर्यावरणाचे घटक म्हणून नोंदविले आहेत. तसेच त्यांनी आर्थिक पर्यावरण व प्रशासन यांचा संबंध जोडला आहे. प्रशासनाचे घटनात्मक पर्यावरण ही संकल्पना स्पष्ट केली आहे. भारतीय घटनेचा उद्देश, घटनात्मक पर्यावरणाचे स्वरूप, घटनात्मक स्वरूप, भारतीय राज्यघटनेतील प्रशासकीय मूल्य या गोष्टींचा समावेश त्यांनी घटनात्मक पर्यावरणात केला आहे. थोडक्यात, रॉबर्ट डाल यांनी राजकीय व्यवस्थेची संकल्पना मांडली होती, त्या पद्धतीने देशमुखांनी प्रशासनाच्या व्यवस्थेची संकल्पना मांडली आहे. वर नोंदविलेले पर्यावरण परस्पर संलग्न आहे. तसेच ते परस्परांवर प्रक्रियादेखील करते हा सिद्धान्त मांडला आहे. थोडक्यात- त्यांच्या पुस्तकामधून व्यवस्था विश्लेषणाचा आग्रह दिसून येतो. व्यवस्था विश्लेषण करण्यामुळे त्याचे पुस्तक हे भारतातील एका मोठ्या समस्येला भिडते. प्रशासन ही गोष्ट बदनाम आहे- या गोष्टीचे देखील चित्र त्यांनी उभे केले आहे. प्रशासनाच्या बदनामीचा प्रशासनावर पडलेला बोजा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मात्र प्रशासनाच्या बदनामीकरणाची लेखकाने कुठेही री ओढली नाही.
विकासलक्षी प्रशासन

 त्यांनी सरदार पटेल व लालबहादूर शास्त्रींच्या प्रशासनविषयक दृष्टिकोनाचे समर्थन केले आहे. तर याबरोबरच त्यांनी प्रशासन हे ब्रिटिश प्रशासनापेक्षा वेगळे असावे या पंडित नेहरूंच्या मतापेक्षा सरदार पटेलांच्या मताशी सहमती दर्शविली आहे. प्रशासनाने गेल्या ७० वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचे समर्थन केलेले आहे. या समर्थनास लेखकाचा विकासवादी दृष्टिकोन कारणीभूत ठरला आहे. विकासलक्षी

२७० □ अन्वयार्थ