पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यामुळे सार्वजनिक दृष्टिकोनातून प्रशासन व्यवहार करत असते. सार्वजनिक व्यवहार हा व्यापक अर्थाने घटनात्मक चौकट आणि स्थानिक अर्थाने कायद्यांच्या चौकटीमध्ये घडतो. त्यामुळे व्यक्तिगत आणि सार्वजनिक हा वादविषय प्रशासनामध्ये कळीचा आणि मध्यवर्ती आहे. लक्ष्मीकांत देशमुखांची प्रशासननामा आणि बखर भारतीय प्रशासनाची अशी दोन पुस्तके व्यक्तिगत आणि सार्वजनिक वादविषयाची सूक्ष्मपणे परिचर्चा करणारी आहेत. भारत सरकारचा पंधरावा अहवाल - दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचा २००९ मध्ये आला आहे. त्या अहवालातील वस्तुस्थिती देखील लक्ष्मीकांत देशमुखांच्या पुस्तकांतील सत्यस्थितीशी मिळतीजुळती आहे. खरे तर प्रशासननामा आणि बखर भारतीय प्रशासनाची ह्या दोन्ही पुस्तकामधील लेखन हा भारत सरकारच्या पंधराव्या अहवालाचा अनुभवनिष्ठ पुरावा ठरतो. मथितार्थ, ही केवळ पुस्तके नाहीत, तर त्या पुस्तकांमध्ये भारतीय समाजाची वस्तुस्थिती सुस्पष्टपणे आली आहे. यामुळे भारतीय समाजाचा व्यवहार या अर्थाने समाजशास्त्र, भारतीय समाजातील व्यक्तीचे मानसशास्त्र, सत्तासंबंध, भारतीय समाजातील विकासाचा प्रयत्न या अर्थाने अर्थशास्त्र- अशा विविध समाजशास्त्राच्या उपशाखांच्या चौकटीमध्ये ही पुस्तके लिहिली आहेत. त्यामुळे या पुस्तकांचे स्वरूप खरे तर अंतरविद्याशाखीय या प्रकारचे आहे. त्यांची लेखनशैली अर्थातच अंतरविद्याशाखीय प्रकारची आहे. त्यांचा वाचक त्यामुळे शैक्षणिक या क्षेत्राच्या खेरीजचा देखील आहे. शैक्षणिक हा शब्दप्रयोग पांडित्यदर्शक (अकादमिक) या अर्थाचा आहे. ही पुस्तके अध्ययनात रुची असलेल्या शैक्षणिक पंडिताना उपयुक्त ठरणारी आहेत याबद्दल दुमत नाही. परंतु या खेरीज ही पुस्तके प्रत्यक्ष लोकप्रशासनाचा व्यवहार करणाऱ्या प्रशासनाला मार्गदर्शक ठरणारी आहेत. त्यामुळे या पुस्तकांचे महत्त्व शैक्षणिक आणि व्यावहारिक अशा दुहेरी स्वरूपाचे आहे.

 लक्ष्मीकांत देशमुखांनी लोकशाही संस्था ही एक संकल्पना आणि दुसरी त्या संस्थामधील प्रत्यक्ष व्यवहार ही संकल्पना- यांची तुलना केली गेली आहे. या चौकटीमध्ये स्पष्टीकरणे त्यांनी दिली आहेत. लोकशाही संस्थांमध्ये सार्वजनिक धोरणनिश्चितीबरोबर सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी हा व्यवहार आहे. या व्यवहारांची चिकित्सा देशमुखांनी केली आहे. एव्हाना त्यांनी लोकशाही चौकटीमधील प्रशासन वेस्ट मिन्स्टर प्रारूप म्हणून भारतात आले तरी त्यास भारतीय पद्धतीचा आकार कशा पद्धतीने मिळाला आहे यांची लक्षवेधक चिकित्सा केली आहे. वेस्ट मिन्स्टर प्रारूपाचे भारतीयकरण झाल्याची ही चिकित्सा आहे. वेस्ट मिन्स्टर प्रारूपाचे भारतीयकरण घडण्याची चतुःसूत्री या पुस्तकामध्ये दिसते. एक, प्रशासनाच्या

२६८ □ अन्वयार्थ