पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसाधना


अविनाश सप्रे

 श्री. लक्ष्मीकांत देशमुख हे महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेतील एक कर्तव्यदक्ष, कर्तबगार, कल्पक व यशस्वी प्रशासक आहेत आणि मराठी साहित्यातले प्रतिभावान व प्रथितयश सर्जनशील लेखकही आहेत. प्रशासक आणि लेखक या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील परस्परभिन्न भूमिका नसून त्या परस्परपूरक आहेत, हे या दोन्ही क्षेत्रांतले त्यांचे वेगळेपण आहे. लेखक असल्यामुळे त्यांच्या प्रशासकीय शैलीचा चेहरा मानवी राहिला आहे आणि प्रशासक या नात्याने त्यांना जनजीवनाचा अगदी थेट व आतून बाहेरून विविध अंगाने, विविध वैविध्याने आणि वैशिष्ट्यांनी जो साक्षात अनुभव घेता आला आहे त्यामुळे त्यांच्यातला लेखक समृद्ध आणि संपन्न झाला आहे. एक माणूस म्हणूनही त्यांची जीवनदृष्टी उदारमतवादी, परिवर्तनशील, पुरोगामी आणि मानवतावादी मूल्यांच्या संस्कारांतून आणि स्वीकारातून तयार झाली आहे. बदलत्या व गतिमान विश्वाचे त्यांना भान आहे. होत असलेल्या बदलाबरोबर वाहत न जाता त्यातले बरेवाईटपण जोखण्याची चिकित्सक वृत्ती त्यांच्यात आहे. मुख्य म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत आपण अंगीकारलेली नैतिकता आणि निष्ठा यावरची श्रद्धा ते अढळपणे जपत आले आहेत. त्यांचे साहित्य म्हणूनच वाचतीय तर आहेच, पण वाचकांना अंतर्मुख करणारेही आहे. सर्जनशील लेखन 'सेडेटीव्हज' सारखे गुंगी आणणारे असून नये, तर वाचकामध्ये 'प्रक्षोभ' निर्माण करणारे (इरेटिव्ह) असायला हवे, असे प्रख्यात फ्रेंच लेखक ज्याँ पॉल सार्चने म्हटले आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांचे लेखन अशा स्वरूपाचे आहे. एक लेखक म्हणून देशमुख यांना The insulted and the injured ...... The poor folk (डोस्तोव्हस्कीचे शब्द) बद्दल मनापासून कळवळा आहे आणि त्यांच्या भल्यासाठी साऱ्या प्रतिकूल परिस्थितीतही झगडणाऱ्यांबद्दल आदर आणि आस्था आहे.

२० □ अन्वयार्थ