पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मधील संस्कृतिसंघर्ष

डॉ. सदानंद मोरे

 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांची 'इन्किलाब विरूद्ध जिहाद' ही कादंबरी मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग मानावा लागतो. मराठी लेखक सहसा महाराष्ट्राबाहेरील पार्श्वभूमीवर लेखन करीत नाहीत. ही वस्तुस्थिती आणि त्यातही अशा प्रयोगासाठी अभ्यास आणि व्यासंग यांची आवश्यकता असेल तर त्या वाटेला जायची त्यांची तयारीच नसते. अशा परिस्थितीत देशमुखांनी आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या समस्येला केंद्रस्थानी ठेवून तिच्यातील वास्तवाची कोर न सोडता तिच्यावर आधारित कादंबरी लिहावी ही गोष्ट केवळ लेखकालाच नव्हे तर एकूणच मराठी साहित्याविश्वाला अभिमानस्पद वाटायला हवी. खरे तर ही कादंबरी देशमुखांनी इंग्रजी भाषेत लिहिली असती तर तिला जागतिक ख्याती मिळाली असली असे माझे मत आहे.
 अफगाणिस्तान या देशातील शे-पाऊणशे वर्षांमधील घडामोडींवर देशमुखांची कादंबरी आधारित आहे. जवळपास निम्मी पात्रे प्रत्यक्ष होऊन गेलेली आहेत. पण देशमुखांना या पात्रांची ऐतिहासिक हकिगत सांगायची नव्हती. त्यांच्या माध्यमातून त्यांना अफगाणिस्तानातील सर्वसामान्य स्त्री पुरुष ज्या दिव्यातून भरडून निघाले त्याचे दर्शन घडवायचे आहे. त्यामुळे त्यांना कादंबरीतील उर्वरित पात्रे कल्पनेने निर्मावी लागली. म्हणून तर या प्रसंगात ते स्वत: 'ते Fact आणि Fiction यांचे मिश्रण पसल्याने Faction' असे म्हणतात. वाङ्मयाच हाच 'फॉर्म' निवडणे देशमुखांसाठी अपरिहार्यच होते. इतिहासाचे कर्ते कर्तबगार नेते मंडळी असतात हे खरे असले तरी इतिहासाचे 'धर्ते' सामान्य माणसेच असतात हे लक्षात घ्यायला हवे. कार्यकर्त्या मान्यवरांची नावे इतिहासात नोंदवली जातात. पण धा जनसामान्यांची नावे केव्हाच गहाळ होतात. त्यामुळे त्यांची कल्पनाच करावी लागते. मात्र ही काल्पनिक पात्रे खऱ्याखुऱ्या पात्रांप्रमाणे विशिष्ट व्यक्तीच असल्या तर त्याच प्रतिनिधिक असतात. वास्तवातील विशिष्ट व्यक्ती आणि कल्पनेतील प्रातिनिधिक व्यक्ती यांचे

१९२ □ अन्वयार्थ