पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा नियोजनाविना वा इच्छेविरुद्ध राहिलेल्या व नको असलेल्या गर्भधारणेत मुलाला जन्म न देण्याचा अधिकार स्त्रीला प्रत्यक्ष वापरता आला पाहिजे. कुटुंबामध्ये जर सामंजस्य व समता असेल तर हे निर्णय परस्परांशी चर्चा करून घेतले जाऊ शकतात. पण आपल्या कुटुंबरचनेत लोकशाहीचं तत्त्व नसल्यानं असंख्य स्त्रिया मातृत्वाच्या निर्णय प्रक्रियेत निष्क्रिय राहातात. त्यांच्यावर मातृत्व वा गर्भपाताचा निर्णय लादला जातो. 'इमोशनल अत्याचार' या कथेतही पहिल्या जुळ्या मुलींनंतर मुलाचा आग्रह धरणारा पती लिंगनिदान करून पत्नीला गर्भपात करण्यास भाग पाडतो. शिवाय यात स्वत:च्या मुलींचा वापर करतो. कुटुंबातील इतर नातेवाईक 'मुलगा हा वंशाचा दिवा' या पारंपरिक विचाराचं दडपण कसं आणतात हेही स्पष्टपणे दाखवलं आहे. 'धोकादायक आशावादी' या कथेतील एका प्रामाणिक व संवेदनशील बापाचा धंदेवाईक मुलगा पैशासाठी अनैतिक व बेकायदेशीर रीतीनं लिंगनिवडीवर आधारित गर्भपात करतो त्याचं चित्रण आहे. शेवटी स्वत:च्या मुलाविरुद्ध कृती करणारा आदर्शवादी शिक्षक ही व्यक्तिरेखा एक सकारात्मक भूमिका मांडते. 'पोलिटिकल हेअर' या कथेत पौगंडावस्थेतील मुलं कुटुंबातील सदस्यांच्या व्यवहाराकडे किती सूक्ष्म व सजगपणे पाहतात, ते स्पष्टपणे दिसते. गर्भपात व स्त्रीच्या शरीरावर त्याचा होणारा परिणाम याची माहिती इंटरनेटवरून मिळवून आईसाठी अस्वस्थ होणारी मुलगी मध्यमवर्गीय नव्या पिढीची प्रतिनिधी आहे. 'लंगडा बाळकृष्ण' या कथेत गर्भपातानंतर भ्रूणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी ते क्रूर कुत्र्यांना खायला देणाऱ्या डॉक्टरचं चित्रण आहे. अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या एका घृणास्पद वास्तव घटनेवर आधारित ही कथा मानवी विकृती किती टोकाला गेली आहे त्याचा शहारे आणणारा अनुभव देते.

 अलीकडेच पुण्याच्या गोखले इस्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या एक प्रतिनिधी एका अभ्यासाच्या निमित्तानं कोल्हापूरात आल्या होत्या. सर्वात अलीकडील पाहाणीत कोल्हापूरातील ० ते ६ वयोगटातील दर हजारी मुलांमागं मुलींच्या प्रमाणात काही अंशानं वाढ झाली असल्याची माहिती मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्याची सत्यासत्यता तपासणे आणि ही माहिती सत्य असल्यास त्यामागील कारणांचा वेध घेणे या उद्देशाने त्या स्त्री संघटनांच्या प्रतिनिधींना भेटत होत्या. त्यांच्याशी चर्चा करताना एकूणच गेल्या दहा वर्षातील कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्येची समस्या आणि संबंधित घटकांच्या उपक्रमांचा आढावा घेता आला. या समस्येचं गांभीर्य पाहाता समाज त्याबाबत अतिशय असंवेदनशील आहे, अशी खंत सतत स्त्री कार्यकर्त्यांना जाणवत होती. परंतु स्त्री चळवळीचे विविध उपक्रम व संघर्ष यातून काही ना काही मूल्ये समाजमानसात झिरपतात, याची जाणीव

अन्वयार्थ १३७