पान:अकबर १९०८.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अकबर

.

 कांहीं अंतरावर जातांच सिद्धरामानें पाहिलें तों गगनचुंबीत वृक्षांच्या घनदाट छायेंत एक लहानशी पर्णकुटिका वेळू आणि बोरू यांनीं आछा- दिलेली परम स्वच्छ आणि सुंदर अशी त्यांच्या दृष्टीस पडली. त्या कुटीच्या चारी बाजूंवर सुगंधपुष्पांनी युक्त अशा वेली चढविल्या होत्या. त्यामुळे त्या स्थळास उपवनापेक्षां विहारस्थळाचेंच जास्त स्वरूप आलें होतें. कुटीच्या पाठीमागल्या बाजूस दाट जंगल आणि पुढल्याबाजूला परमसुंदर आणि प्रशस्त असें सरोवर होतें. त्या सरोवराचें कांठीं नाना- प्रकारचे पक्षीं क्रीडा करीत होते. जलाशयांत कमलिनी फुलल्या होत्या आणि भ्रमरसमूदाय पुष्पांतील मकरंद प्राशन करून मदालस होत्साते इतस्ततः भ्रमण करीत होते. अनेक जातींचीं कमलें स्वच्छ जलांत प्रति- बिंबीत झाल्यामुळें तें सरोवर स्वतः आपले नेत्र उघडून स्वतःची शोभा पहात आहे आणि अत्यंत आनंदित झालें आहेसें दिसत होतें. ती रमणीय निर्झरिणी एकीकडून सरोवरास मिळून पुन्हां दुसरी कडून बाहेर वहात होती. समीपस्थ पर्वत शिखरं इतकीं उत्तुंग होतीं कीं, तीं जणो आकाशस्थ गंधर्वगणांशीं संभाषणच करीत आहेत, असें वाटत होतें.
 ती अत्यंत मनोहर आणि रमणीय शोभा अवलोकन करीत असतां आमचे प्रवासी कांकाळपर्यंत थिजल्यासारखे होऊन गेले. परंतु, थोडक्याच वेळांत आपण आपल्या इच्छित जागीं आलों असें पाहून ते घोड्यांवरून खालीं उतरले आणि सेवकांच्या हातीं घोडे सोपवून आश्रमा- कडील मार्ग पायांनीच क्रमूं लागले. कुल्लुकाचे मनांत आपण पुढें होऊन गुरुपदांस आपल्या आगमनाची वर्दी द्यावी असें होतें. परंतु, कुल्लुक आश्रमाच्या द्वारापर्यंत पोचला नाहीं तोंच आंतून योगिराज- गुरुपद बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ एक सेवक बाहेर आला व त्यानें आपल्या स्वामींच्या इंगितानुसार पुढे जाऊन प्रवासी सेवकांच्या हातांतील घोड्यांच्या काढण्या धरून त्यांस मोकळे केलें.
 या अलौकिक एकांतवासी योगी पुरुषास अवलोकन करितांच सिद्ध- रामाच्या हृत्पटावर जो चमत्कारिक भाव दृढ झाला, तो खरोखर अवर्ण- नीय होता. त्यानें पूर्वी आपल्या देशांत असे अनेक योगी पाहिलें