पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/168

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेगावांत बाबासाहेबांचेच नव्हे तर त्याबरोबर जोतिबा फुले आणि गौतम बुद्ध यांचे निळे, तांबडे-निळे आणि पिवळे पुतळे उभे आहेत. शहरातील अशा मूर्तीनी तर झोपडपट्टीच्या वस्तीतही जमिनीचे वाद उभे केलेले आहेत. रामाच्या मंदिराच्या निमित्ताने सारा देश उभा चिरण्याचे काम हिंदुत्वावाद्यांनी केले, त्याच प्रकाराने सत्ता हस्तगत करण्याचा काही हिशेब आणि मोर्चेबांधणी दलित नेत्यांनी केलेली दिसते.
 राम काय, बाबासाहेब आंबेडकर काय, त्यांचे चारित्र्य काय, ऐतिहासिक कार्य काय याच्याशी त्यांच्या अनुयायांचे काही देणेघेणे नाही. या उदारचरितांचा व्यापार राजकारणाची दुकाने थाटून बसलेल्या मंडळीनी मांडला आहे. महापुरुषांच्या नावाने आणि प्रतिकांच्या आधाराने आपापल्या समाजाला बांधून घेण्याच्या हव्यासापोटी देश फुटतो आहे याचे त्यांना सोयरसुतक नाही. या प्रकारच्या राजकारणातून देशाची एक फाळणी झाली. देशाच्या दुसऱ्या फाळणीची सुरुवात मुंबईच्या पंतनगरमधील रमाबाई वस्तीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेने आपल्या डोळ्यादेखत झाली असेल!
 आपल्या देशात जातीवादी व्यवस्था हजारो वर्षे चालली. कमी समजल्या जाणाऱ्या जमातींना जनावरांपेक्षा अधिक वाईट वागणूक मिळाली. साधे माणूस म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे बघितले गेले नाही. पोटाला खायला नाही, नेसायला वस्त्र नाही, आसऱ्याला छप्पर नाही, भोवताली नुसता गलिच्छ नकर, विद्या नाही, भोवताली नुसता गलिच्छ नरक, विद्या नाही, माणूस म्हणून वर येण्याची काही आशा स्थितीत बहुसंख्य जमातींना जगावे लागले. या अमानुष व्यवस्थेचे समर्थन एखादा शंकराचार्य सोडल्यास आज कोणीही करू पाहत नाही: हा अन्याय संपवण्याचा मार्ग कोणता एवढाच काय तो प्रश्न आहे.
 घटनेने जाती संपवल्या, सर्वांना समान हक्क दिले. अगदी अॅट्रासिटी अॅक्टसुद्धा झाला; पण कागदाच्या कपट्यांनी जातीवाद संपला नाही आणि दलितांच्या दुःखाचे कड शांत झाले नाहीत.

 जातीच्या आधारे जातीजातीत संघर्ष तयार करून दलितातील म्होरक्यांना अधिकारपदे देऊन हा प्रश्न सुटणार आहे. असा मंडलवाद मांडणाऱ्यांची आज चलती आहे. ब्राह्मणी नीतिमत्ता, तत्त्वज्ञान आणि पांडित्य नाकारण्याऐवजी नैतिकता, अभ्यास आणि परिश्रम यांचीच हेटाळणी करणारे दलितांचे म्होरके बनले आहेत. बाबासाहेबांचा अभ्यास, तपस्या, व्यासंग, सुसंस्कृतता, नीतिमत्ता यांचा लवलेशही ज्यांच्यापाशी नाही अशी मंडळी बाबासाहेबांचे नाव घेत देश फोडायला निघाली

भारतासाठी । १६८