Jump to content

युगान्त/द्रौपदी

विकिस्रोत कडून
(पाच - द्रौपदी पासून पुनर्निर्देशित)




पाच



द्रौपदी




 द्रौपदी आणि सीता भारतातील दोन महाकाव्यांच्या नायिका. पण केवळ दोन आदिग्रंथांच्या नायिका ह्याच्याखेरीज इतरही साम्य खूप आहे. दोघीही एका प्रकारे भूमिकन्याच. एक यज्ञासाठी भूमी नांगरताना सापडली. तर दुसरी प्रत्यक्ष यज्ञकुंडातुन निपजली. दोघींचेही लग्न पण लावून झालेले. एकीचा वनवास चौदा वर्षे, तर एकीचा तेरा वर्षे. ह्या ना त्या कारणांमुळे दोघींचे आयुष्य विफल ठरलेले. पण ही साम्ये धरूनसुद्धा जितका जास्त विचार करावा, तितकी भिन्नताच अधिक प्रत्ययाला येते. ह्या भिन्नतेचे एक कारण म्हणजे ज्या ग्रंथांच्या त्या नायिका आहेत, त्या ग्रंथांच्या स्वरूपातील जमीन-अस्मानाचा फरक.

 आजकालच्या काळात विशेषतः इंग्रजी वाङ्मयातील मूल्यांना अनुसरून ह्या दोन्ही ग्रंथांना महाकाव्ये म्हणायचा प्रघात पडला आहे. आपल्या परंपरेप्रमाणे महाभारत हे काव्य नसून एक इतिहास आहे.


 

 ह्या लेखात फुल्यांपर्यंतचा भाग आहे, तो महाभारताच्या संशोधित आवृत्तीवर आधारलेला आहे. त्यानंतरची ‘नरोटी' माझी.


झालेल्या गोष्टींची नोंद इतिहास करतो. घडेल ते सांगायच्या अनुषंगाने महाभारतात राजधान्या, अरण्ये, नद्या यांचीही वर्णने येतात. पण ती तितक्यापुरतीच. ज्या प्रमाणावर एकंदर गोष्ट रंगवलेली आहे, ते प्रमाणही स्थल, काल आणि व्यक्ती ह्या सर्वांच्याच बाबतीत खूप मोठे आहे. इतिहास सांगण्याच्या ओघात शूर आणि भ्याड, दुष्ट आणि सज्जन, उतावळे आणि संथ, सुंदर आणि कुरूप अशा कितीतरी स्त्री-पुरुषांची चित्रे त्यात आली आहेत. ह्यांपैकी कोणतेही सर्वस्वी एकाच रंगात रंगवलेले नाही. सर्व सद्गुण एका बाजूला व सर्व दुर्गुण एका बाजूला, असे चित्रण जवळजवळ नाहीच. लोकांसमोर काहीतरी आदर्श ठेवायचा, ह्याही बुद्धीने ते लिहिले गेले नाही. ह्याउलट रामायण हे एका आदर्श पुरुषाचे चरित्रगायन आहे. जे जे काय म्हणून जगात चांगले असेल, त्यांचा पुतळाच असा एक पुरुष श्रीरामचंद्र होता, व त्याचे चरित्र जगाला कळावे, म्हणून वाल्मीकीने हे काव्य लिहिले. जसा राम हा पुरुषांचा आदर्श, तशी सीता ही स्त्रियांचा आदर्श. सगळे रामायण मुळी आदर्शांनीच भरलेले आहे. आदर्श भाऊ, आदर्श सेवक, आदर्श प्रजाजन आणि आदर्श खलपुरुषसुद्धा. महाभारतात असामान्य व्यक्तीचे चित्रण नाही असे नाही. असामान्य व्यक्तीचे चित्रण असूनसुद्धा त्या व्यक्तीच्या सामान्यत्वाचा कधी विसर पडत नाही. रामायण ही केवळ दोन, नव्हे, एकाच व्यक्तीची कथा मुख्यत्वेकरून आहे. बाकीच्या ज्या काही व्यक्ती आलेल्या आहेत, त्या ह्या व्यक्तीला पार्श्वभूमी म्हणून, उठाव मिळावा म्हणून. रामाशेजारी दुसरी व्यक्ती सीता. सीतेला माहेर होते, सासर होते. तिचे माहेर नावापुरतेच माहेर. सासरच्या व्यक्तींशी संबंध थोडे जास्त दाखविले आहेत, पण त्यांतही सासरच्या व्यक्तींना पुरेसा उठाव मिळालेला नाही. सीता वनवासाला गेली; सीतेला गर्भारपणात रामाने टाकून दिली; सीतेला पृथ्वीने गिळली; हे सर्व सीतेला होत असता तिच्या माहेरची नाववार्तासुद्धा ऐकू येत नाही. जणू काही सीता म्हणजे अनाथाश्रमातून आणलेली मुलगी. जनकाच्या मोठेपणाचे वर्णन आहे, पण प्रत्यक्षात रामाला किंवा सीतेला त्याचा उपयोग झाला नाही. अगदी ह्याउलट द्रौपदीची कथा. द्रुपदाला शूर मुलगा हवा होता, म्हणून त्याने यज्ञ केला व त्या यज्ञातून त्याला एक मुलगा व मुलगी अशी जाणती मुले मिळाली. त्यांतील मुलगा धृष्टद्युम्न व मुलगी द्रौपदी. ती माहेरची किती लाडकी होती, ते नावावरूनही समजते. सीतेला स्वतःचे नाव 'सीता', जनककुळाने स्वीकारली, म्हणून 'जानकी', विदेहाची राजकन्या म्हणून 'वैदेही', द्रौपदी वर्णाने सावळी, पण ज्या यज्ञकुंडातून निघाली, त्यातील ज्वालेसारखी तेजस्वी. तिचे स्वतःचे नाव 'कृष्णा', द्रुपदकुळातली, म्हणून 'द्रौपदी' पांचालांची राजकन्या, म्हणून 'पांचाली'. यज्ञसेन द्रुपदाची मुलगी, म्हणून 'याज्ञसेनी.' सीतेच्या बापाचे तर नावच माहीत नाही. द्रौपदी आणि द्रौपदीचा भाऊ मोठेपणी यज्ञातून आली, त्यांना आपल्याबद्दल काहीच वाटावयाचे नाही, अशा भीतीने द्रुपदाची राणी पृषती* हिने अग्निदेवाची प्रार्थना केली की, 'देवा, ह्या मुलांना आपल्या खऱ्या जन्माचा विसर पडून मीच त्यांची आई आहे, असे वाटावे.' म्हणून द्रौपदीला 'पार्षती' असेही आईवरून आणखी एक नाव आहे. द्रुपदाला शूर मुलगा हवा होता, त्याप्रमाणे मुलीच्या पणाच्या सौद्यात कुशल धनुर्धर जावई हवा होता. कृष्णेच्या माहेरामुळे पांडवांना प्रतिष्ठा मिळाली, दुर्योधनाशी लढावयाला सेना मिळाली व धृष्टद्युम्नासारखा सेनापतीही मिळाला.
 महाभारतकथेत एका मोठ्या थोरल्या कुटुंबाचे तीन-तीन पिढ्यांचे नातेवाईक आले आहेत. बळेच आंधळेपण स्वीकारलेल्या गांधारीचा भाऊ जे धृतराष्ट्राला मिळाले नाही, ते दुर्योधनासाठी मिळवायला पाहत होता. मुलांच्या लहानपणी त्यांच्यावर जागता पहारा ठेवणारी कुंती, तिच्या माहेरची माणसे; अर्जुनाची सून उत्तरा


 
  • यज्ञसेन द्रुपदाच्या आजोबांचे (की पणजोबांचे?) नाव 'पृषत' असे होते. म्हणून सर्व घराणे 'पार्षत'. म्हणजे द्रुपदाची बायको त्यांच्याच घराण्यातली होती. दशरथाची कौसल्याही अशीच त्याच्या घराण्यातील होती.
    

व तिच्या माहेरची माणसे; आज्याच्या पिढीतली माणसे, भीष्म, शंतनू ही सर्व येऊन गेली आहेत. सख्खे-सावत्र, लहान-मोठे, जावाजावा, भांवडे, चुलते-पुतणे-सर्व कौटुंबिक नाती व यांतील गुंतागुंतीचे संबंध, सर्व काही महाभारतात आहे. ह्यामुळे द्रौपदीचे चित्र अधिक भरीव व अनेकांगी झाले आहे. कौटुंबिक गुंतागुतीच्या मागे त्या वेळची सर्व राजकीय गुंतागुंतही उभी केलेली आहे. यादव, कौरव, द्रुपद, विराट, मगधाचा जरासंध, शल्य, शाल्व ह्या व इतर अनेक राजघराण्यांचे एकमेकांशी आलेले संबंध व त्यांमुळे कौटुंबिक व वैयक्तिक संघर्षाला चढलेली धार असे हे चित्र आहे.
महाभारतातील लढाई हा कौटुंबिक व राजकीय सत्ता-स्पर्धेचा परिपाक आहे. ह्याच्या उलट रामायणामध्ये जनकाचा काय, किंवा केकयांचा काय, नुसता उल्लेख आलेला आहे. आणि ज्या रावणाशी लढाई झाली, तो रावण तर रामाच्या जगाच्या बाहेरचाच म्हणावयाला हरकत नाही. अगदी आधुनिक प्रणयकथेप्रमाणे दोन व्यक्तींचे व त्यांच्या अंतर्मनांचे चित्रण; ज्यामुळे त्या व्यक्तींची अंतर्मने घडली, त्या कौटुंबिक व सामाजिक शक्तींचे दर्शन जवळजवळ नाहीच. द्रौपदीच्या लग्नाच्या दिवसापर्यंत पांडव बापुडवाणे व अनाथ होते. एका दुष्ट कारस्थानातून जे जिवानिशी कसेबसे बाहेर पडले होते. आपण जिवंत आहोत, हा सुगावाही शत्रूंना लागू नये म्हणून लपत-छपत आज ह्या गावी, तर उद्या त्या गावी असे हिंडत होते. द्रौपदी-स्वयंवराला ते आले, तेही ब्राह्मणांच्या वेषाने, आपण कोण हे इतरांना कळू न देण्याची खबरदारी घेऊन. द्रुपदाच्या राज्यामध्ये त्यांना द्रौपदीच मिळाली असे नव्हे, तर पराक्रमी, वैभवशाली मित्र, पाठीराखे मिळाले. बायकोचे माहेर द्रुपद व आईचे माहेर यादव यांच्या संयुक्त पाठबळाने त्यांना प्रकट होऊन बेधडकपणे हस्तिनापुराच्या राज्याचा वाटा मागता आला. द्रौपदीशी लग्न केल्यामुळे पांडवांना नुसती सुंदर बायकोच मिळाली असे नव्हे तर प्रतिष्ठा मिळाली व राज्य मिळाले.
 रामायणकथेतही पण जिंकणारा राजपुत्र ब्राह्मणांच्यामध्ये बसलेला दाखवला आहे; पण तो एक योगायोग होता, इतकेच. हा राजकुमार दशरथाचा मुलगा राम, हे सर्व सभेला माहीत होते. या लग्नाने प्रतिष्ठा मिळाली जानकीला. रामाला एक सुंदर व त्याच्यावर प्राणांपलीकडे प्रेम करणारी सहचरी मिळाली, यापलीकडे काही नाही. ज्या दृष्टीने रामायण लिहिले आहे, त्या दृष्टीने रामाला दुसऱ्या कशाची गरजही नव्हती.
 द्रौपदी पांडवांची झाली. तिच्या माहेरी राहूनच पांडवांनी राज्याच्या भागाची वाटणी मागितली. पांडवांचे पारडे इतके जड झाले होते की, धृतराष्ट्राला ही मागणी डावलता येईना. इंद्रप्रस्थाला धर्माबरोबर द्रौपदीलाही अभिषेक झाला व ते राज्य द्रौपदीमुळे मिळाले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. द्रौपदी पांडवांची प्रतिष्ठा होती; त्यांच्या एकत्चाची, अभेद्यतेची चालती-बोलती खूण होती.
 पांडव शूर होते, पण एकाला द्यूताचे व्यसन, एक आडदांड, एक लढाऊ पण राज्यावर मन नसलेला, धाकटे दोघे जुळे भाऊ, वडील भाऊ करतील त्याला साथ देणारे असे होते. पांडवांनी स्वतंत्रपणे काही राजकारण केले नाही. त्यांचे राजकारण श्रीकृष्णाने केले व त्यांची जपणूक दोन बायांनी केली. पांडू मेला, माद्री सती गेली व ही लहान लहान पाच मुले घेऊन कुंती हस्तिनापुराला आली. त्या दिवसापासून त्यांचे लग्न झाले त्या दिवसापर्यंत कुंतीने रात्रंदिवस मुलांवर पहारा केला. पांडवांना गंगेच्या काठी लांबच्या गावाला पाठविले, तेव्हा कुंतीला राजधानीत राहता आले असते पण ती त्यांच्याबरोबर गेली. लाक्षागृहातून सुटल्यावर त्यांच्याबरोबर राहिली. पांडवांचे आईवरचे प्रेम हेही एक कारण ह्या घटनेला देता येईल, पण तिचे जागृत मातृत्व हेच कारण ह्याच्या पाठीमागे मुख्यत्वे होते.

  द्रौपदी पहिल्याने सासूकडे आली, तेव्हाचा प्रसंग विचार करण्यासारखा आहे. सासू म्हणाली, "काय आणलं आहे, ते पाचांनी वाटून घ्या." मग बघते, ती एक सुंदर मुलगी. ही कशी पाचांनी वाटून घ्यायची? धर्माने अर्जुनाला सांगितले, "बाबा, तू हिला जिंकलेस, तू हिच्याशी लग्न कर." अर्जुन म्हणाला, "तुम्ही व भीम वडील असता मी धाकट्या भावाने लग्न करण्याचे पाप कसे करू? तुम्हीच मोठेपणी हिच्याशी लग्न करा." कुंतीच्या मनात होते, ती सर्वांची व्हावी. ही गुंतागुंत सुटावी कशी?
 थोरल्या भावाआधी लहानाने लग्न करणे हे काही फक्त शिष्टाचाराविरुद्ध होते असे नव्हे, तर खरोखरी असे करणे पाप आहे, अशी फार जुनी समजूत होती. वेदांमध्ये व ब्राह्मण-ग्रंथांतही ह्याला स्पष्ट पुरावा सापडतो. थोरल्याच्या बायकोवर खालच्या भावांचा अधिकार असे; पण उलट मात्र होऊ शकत नसे. धाकटयाने लग्न आधी केले, तर तो धाकटा व थोरला भाऊ एवढेच नव्हे, तर अशा लग्नाला संमती देणारे आईबापही पापाचे धनी होत. पूर्वीच्या काळी थोरल्या मुलाला वंशपरंपरा अधिकाराचा व द्रव्यांचा वारसा मिळत असे. आई-वडिलांचे श्राद्ध व गृहस्थपणाची सर्व कर्तव्ये बजावण्यासाठी त्याला लग्न आवश्यक असे. खालच्या भावाने लग्न करणे म्हणजे थोरल्याचे सामाजिक, कौटुंबिक व धार्मिक अधिकार हिरावून घेण्यासारखे होते, म्हणून थोरल्याआधी लग्न करणे पाप होते. द्रौपदीच्या बाबतीत तर अर्जुनाने एकट्यानेच तिच्याशी लग्न केले असते, तर वरच्या भावांना इतक्या तोलाच्या राजघराण्यात मुलगी मिळणे जड झाले असते. अर्जुनाने जिंकलेल्या मुलीचे धर्माशी लग्न होणे शक्य होते. आजोबांच्या पिढीत भीष्माने आपल्या भावांकरिता मुली जिंकून आणल्या होत्या. द्रौपदीबद्दल बोलणी होत होती, तेव्हा सर्व भावांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या व सर्वांच्या मनात तिच्याबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली होती, असे महाभारतकारांनीच एका श्लोकात सांगून टाकले आहे. ही गोष्ट कुंतीच्या नजरेतून निसटलेली नसणार. तिच्या शहाणपणाने व
व्यासांच्या मखलाशीने सर्व पेच सुटून द्रौपदी पाचांची बायको झाली. एकाची झाली असती, तर जी कलहाची बीजे पेरली गेली असती, त्या सर्वांचा मुळातच नायनाट झाला व पांडवांची एकी अभेद्य राहिली. अगदी हीच गोष्ट कर्णाने दुर्योधनाला सांगितली. लाक्षागृहातून वाचून परत येऊन प्रकट झालेल्या पांडवांचे आता काय करावे, ह्या ऊहापोहात दुर्योधन म्हणाला, "कुंतीच्या मुलांना माद्रीच्या मुलांपासून फोडून वेगळे करावे, किंवा द्रुपदाला व त्याच्या मुलांना द्रव्याचा लोभ दाखवून पांडवांचा त्याग करायला लावावे किंवा त्यातल्या त्यात भीमाचा काटा काढावा." कर्णाने ह्या सर्व उपयांचा फोलपणा दाखवला; "इथे आपल्या राजधानीत पांडव अनाथ पोरे असताना जे साधले नाही, ते आता तर अशक्य आहे. आता त्यांना पक्षपाती मित्र आहेत, ते दुसऱ्या देशांत आहेत. द्रुपद आर्यवृत्त राजा आहे. धनाचा लोभी नाही, द्रुपदाच्या मुलाच्या बाबतीत म्हणशील तर तो पांडवांचा भक्त आहे. द्रौपदी सर्वांची मिळून बायको झाली आहे. आता त्यांच्यात फूट पाडणे कदापि शक्य नाही." आणि द्रौपदी जिवंत असेपर्यंत त्यांच्यात कधीही फूट पडलेली नाही. द्रौपदी मेल्यावर जी फूट पडली ती शरीराची.
 कुंतीने पांडवांचे जतन केले, ते त्यांच्या जिवाची काळजी घेऊन, द्रौपदीने त्यांना सर्वनाशापासून वाचवले. ह्या तिच्या कृत्याचा मोठेपणा महाभारतात परत कर्णाच्याच तोंडून वदवला आहे. धर्माने द्यूतामध्ये सर्वस्व गमावले. एवढेच नव्हे, तर आपल्या बायकोला पणाला लावली. कौरवांच्या सभेत होऊ नये, तशी तिची विटंबना झाली. त्या वेळी झाला एवढा दुष्टावा पुरे, गोष्टी पुढे जाऊ दिल्या तर परिणाम बरा होणार नाही, या भीतीने धृतराष्ट्राने द्रौपदीला तीन वर मागायला सांगितले. एका वराने तिने धर्माला दास्यातून मुक्त केले. दुसऱ्या वराने इतर चौघांना मुक्त केले. "नवरे शस्त्रास्त्रांसह मुक्त झाले, एवढे मला पुरेसे आहे," असे म्हणून तिने तिसरा वर मागितलाच नाही. वर मागण्याची तिची तऱ्हा, अभिषिक्त राजा म्हणून धर्माला आधी मुक्त करण्याची तिची तत्परता, बाकीच्यांना शस्त्रांसह मुक्त करणे एवढेच मागून बाकी कशाचाही लोभ न धरणे, यांनी तिने आपल्यालाच नव्हे, तर पांडवांनाही अप्रतिष्ठेतून बाहेर काढले. या प्रसंगाला उद्देशून कर्ण जे म्हणाला, ते लक्षात घेण्यासारखे आहे. "जगात सुंदर बायकांच्या बाबतीत आत्तापर्यंत ऐकले होते, पण हिने जे केले त्याला तोड नाही. इथे पांडव आणि कौरव रागाने जळत होते. ह्या आगीच्या डोंबात काय झाले असते, कोण जाणे! पण ह्या कृष्णेने शांती प्रस्थापित केली. खोल समुद्रात गटांगळ्या खाणाऱ्या, अप्रतिष्ठेमध्ये बुडून गेलेल्या पांडवांना पांचालीने एखाद्या नावेप्रमाणे तीराला आणून पोहोचवले." स्त्रीमुळे आपली प्रतिष्ठा वाचली, हे शब्द भीमाला झोंबले, पण पांडवांना राग यावा, हा जरी त्याचा एक उद्देश असला, तरी कर्ण, म्हणाला ते काही खोटे नव्हते. पांडवांचे लहानपणचे आयुष्य कुंतीने रक्षिले होते, मोठेपणचे द्रौपदीने. द्रौपदी उभी होती, तोपर्यंत पांडव उभे होते... द्रौपदी खाली पडली, तेव्हा धर्माखेरीज इतरही पडले.
 द्रौपदीचा आणि सीतेचा वनवास ह्या दोहोंत नावाखेरीज काही साम्य नाही. द्रौपदीला वनवास घडला. नवऱ्याच्या द्यूतावरील प्रेमामुळे. शत्रूच्या मसलतींचा जय, नवऱ्याची व्यसनाधीनता, ह्या सगळ्यांचे ते प्रतीक होते. पंचनद्यांचा प्रदेश शक्य झाल्यास मिळावा, अशा तऱ्हेचा धर्माचा डाव होता, असे एकदाच वनपर्वात आले आहे. हे बोलणे म्हणजे स्वतःच्या वचनार्थ दिलेली एक सबब ह्यापलीकडे काही वाटत नाही. द्यूताने कुरु-पांचालांच्या ताब्यात नसलेला पंचनद्यांचा प्रदेश तो कसा मिळवणार होता हे कळतच नाही. सीतेचा वनवास हा रामाच्या ध्येयजीवनातील परमोच्च बिंदू होता. त्यात वनवासामुळे मुलाला राजपद देण्याचा कैकेयीचा डाव फसला. खुंटा हलवून घट्ट करावा, तशी रामाचा राज्याभिषेक ही गोष्ट अटळ झाली. भरताच्या राज्यत्यागामुळे रामाला वनवासात राहण्याचे व्यावहारिक कारण उरलेच नव्हते. केवळ बापाने दिलेले एक वचन पुरे करण्यासाठी त्याने वनवास पत्करला. पांडवांचा वनवास मात्र अटळ होता. कौरवांच्या-शत्रूंंच्या-राजधानीत, वडीलधाऱ्या माणसांसमोर उघड-उघड पण झाला होता, त्याप्रमाणे वागण्याखेरीज गत्यंतर नव्हते. वनवासाच्या आरंभी द्रुपदाचा मुलगा व कृष्ण पांडवांना भेटण्यास आले होते. तेव्हाही झालेल्या गोष्टींबद्दल हळहळ व्यक्त करण्याखेरीज त्यांना काही करता येत नव्हते. त्या वेळी युद्धाला उभे राहणे म्हणजे यशाला कायमचा डाग लागला असता, व कदाचित मित्रही मिळाले नसते. सत्यप्रतिज्ञ राहणे हे वर्तन नुसते ध्येयपूर्णच नव्हे तर शंभर टक्के व्यावहारिकही होते.
 पांडवांना राज्य मिळण्याला जशी द्रौपदी थोडीफार कारण झाली, त्याचप्रमाणे त्यांचे राज्य घालवण्यातही तिचा वाटा होता. त्यांचा वनवास तो तिचाही वनवास होता. केवळ त्यांची सावली म्हणून ती त्यांच्याबरोबर वनवासात गेली, असे नव्हे. नवऱ्यांचे वैभव व मोठेपणा भोगायचा तिचा अधिकार, तशीच त्यांच्या कष्टांची व अपमानाचीही तीच वाटेकरीण होती. पांडवांच्या इतर बायका आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेल्या. द्रौपदीने फक्त आपली मुले माहेरी पाठविली. त्यांचे सर्व शिक्षण व्हावयाचे होते. त्यांना रानात बरोबर ठेवून चालणार नव्हते. ती किती यातना भोगीत होती, ह्याचे वर्णन अधून-मधून येते. झाले गेले बिनबोलता भोगले, हा तिचा धर्मच नव्हता. तिने कडकड बोटे मोडली, शिव्याशाप दिले. ती संतापाने जळली. धृष्टद्युम्न व कृष्ण वनवासात भेटायला आले, तेव्हा अविरत वाहणारे अश्र पुशीत-पुशीत त्वेषाने ती म्हणाली, "मला मुळी नवरे, मुलगे, भाऊ, बाप नाहीतच. असते तर माझा असा अपमान त्यांनी सहन केला असता का?" एवढ्यावरच ती थांबली नाही. सर्व माणसे निघून गेल्यावर पुन्हा तोच विषय काढून कौरवांचे उट्टे फेडण्यास धर्मराजाचे मन वळविण्याचा तिने प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. बरे, वनवासात असल्यामुळे गृहिणीपदाच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या म्हणावे, तर तेही नाही. धर्मराजाचा पुरोहित त्यांच्याबरोबर होता. शेकडो लोक-बहुतेक ब्राह्मण-त्यांच्याकडे येऊन पाहुणचार घेऊन जात होते. द्रौपदी उठल्यापासून निजेपर्यंत काम करी, त्याचे वर्णन सत्यभामा-द्रौपदीसंवादात आले आहे.
 वनवासातही थोरा-मोठ्या राजाची लेक, सून व बायको ही तिन्ही नाती तिला सुटली नाहीत. जी माणसे पाहुणचारासाठी येत, त्यांचे सेवाधर्माने करायचे, हा झाला ध्येयाचा भाग; पण अशा करण्यामध्ये परत राजकारण व व्यवहार होताच. धर्म करीत असलेली अनुष्ठाने व ब्राह्मणशुश्रूषा आज आपल्याला भाकड वाटली, तरी त्या वेळच्या सर्वांचा त्यांवर अगदी दृढतम विश्वास होता, आणि ही सर्व अंगे द्रौपदीला संभाळावी लागत. त्यात कमी पडू देण्याची, दैन्य दाखवायची सोय नव्हती.
 ह्या वनवासात राजवाड्यात मिळेल तेवढाही एकांत नव्हता. तेवढे ऐश्वर्य नसूनही आल्या-गेल्यांची व आश्रितांची वर्दळ होतीच. त्याशिवाय येईल-जाईल त्या ऋषीने सांगितलेल्या कंटाळवाण्या कथा ऐकाव्या लागत. ती सारखी कष्टी होती, ह्याचे पुरावे तर जागोजागी आहेत. कृष्णाने निरोप घेताना सांगितले. "बाई, ह्या सर्व अपमानाचे उट्टे निघेल बरे." सत्यभामेने मिठी मारून निरोप घेतला, "कृष्णे, रडू नकोस. ज्या तुला हसल्या, त्या कौरव-स्त्रियांना तू रडताना पाहशील. अगदी निष्कंटक, निर्वैर राज्याचा उपभोग घेशील. थोडे सहन कर." तिला तिळभराची उसंत नव्हती, हे एका अर्थाने बरेच होते. नाही तर कृष्णा द्युताच्या दिवसाच्या आठवणी काढून-काढून झुरली असती.
 सीतेच्या वनवासात कुठच्याही तऱ्हेचे वैर, शल्य काही नव्हते. एका तपावरचा काल प्रणयाच्या वर्षावाचा होता. अयोध्यला ती युवराज्ञी होणार होती; दासदासींचा गजबजाट होता; सासरा, तीन सासवा अशी वडील मंडळी होती. अनिर्बध प्रणयाला मुळी वावच नव्हता. शहरवासीयांची रानाबद्दल जी रम्य कल्पना असते, तसल्या स्वप्नसृष्टीतला हा वनवास होता. तिथे हरणे होती, हंस होते, गोदावरीचा रम्य प्रवाह होता, लांबवर पसरलेले वाळवंट होते. ऋषींच्या तुरळक-तुरळक वसाहती होत्या. अधून-मधून गोड शहारे अंगावर येण्याइतपत क्रुर श्वापदे व राक्षस होते. अपमानाची शल्ये नव्हती. मुलांची ताटातूट नव्हती, पाहुण्यांची वर्दळ नव्हती. ह्या सुंदर पार्श्वभूमीवर एका मुग्धेचे प्रणयिनीत रूपांतर झाले. वाल्मीकीने आपली काव्यशक्ती ह्या कांडात ओतली आहे. हा काळ इतका रम्य होता की, पुढे सीतेला डोहाळे लागले, तेही वनात जाण्याचेच.
 वनवास संपल्यावर द्रौपदीला अज्ञातवास फारच दुःखाचा गेला. रानात ती पांडवांची बायको, एका वेळची राणी अशी होती, पण ज्या दासीपणातून तिने द्युताच्या वेळी स्वतःला मुक्त करून घेतले होते, तसले दासीपण तिला अज्ञातवासात आले व जवळ-जवळ तसलीच विटंबना व्हावयाची वेळ आली होती. सीतेला दु:खात दिवस काढावे लागले, पण रावणाच्या बलात्काराचे तिला भय नव्हते. तिच्या भोवती राक्षसिणी होत्या. त्या अक्राळविक्राळ होत्या. त्या तिला म्हणत, "सीते, आम्ही तुला खाऊन टाकू." रावण संपन्न, विद्वान राजा होता. त्याच्या पदरी माणसे खाणाऱ्या राक्षसी असाव्या, हे विचित्रच. राम-रावणांचा संबंध अद्भुताचा. वानरे, अस्वले ही त्यांची सेना.. त्यातच राक्षस, सर्व कथाच अद्भुत रम्य व लोकोत्तर. राम आदर्श पुरुष. सीता आदर्श स्त्री. राम पितृभक्त, सत्यपरायण, एकपत्नी. तो शूर होता, हे दाखवण्यासाठी लढाईची जरूरी होती. नायिकेवर संकटे यावी लागतात; त्यांतून नायकाला तिची सुटका करावयाची असते. धीरोदात्त नायक-साध्वी नायिका. प्रणयाचे सर्व प्रकार. प्रारंभीचा प्रणय, प्रौढेचा प्रणय, मग विरह व विरही प्रेमाचे वर्णन... सर्व कसे अगदी संस्कृताच्या 'काव्य' परंपरेत बसणारे! लढाईसुद्धा त्यातलीच. एवढी लढाई झाली, पण तिचा संबंध अयोध्येशी नाही. अयोध्या अलिप्त राहिली. रामाला राज्य देण्याच्या क्षणाची वाट पाहत पाहत बसलेली. तो क्षण आला, तसे राज्य रामाला मिळाले. भाऊ भावांना भेटले. मुलगे आयांना भेटले. सून सासवांना भेटली. युद्धाची झळ अयोध्येला लागली नाही. ते फक्त कथेत राहिले.
 द्रौपदीवरची संकटे मानवी, ह्या जगातल्या माणसांनी आणलेली व नवऱ्यांनी स्वतःवर ओढवून घेलेल्या निष्क्रियतेमुळे आलेली. आदिपर्वात धृतराष्ट्राचे भाषण दिले आहे. त्यात व तिथपासून जवळजवळ प्रत्येक पर्वात द्रौपदीची विटंबना वर्णिताना दोन शब्द वारंवार येतात. 'नाथवती अनाथवत्' पाचांची असून अनाथासारखी. माहेर श्रीमंत असून अनाथासारखी. शूर पाठीराखे असताना अनाथासारखी. तिच्या दैन्याची खरी जखम हीच आहे. तिची विटंबना दर वेळी तिचे नवरे व सासरे मुकाट्याने पाहत होते. काही प्रतिकार करणे त्यांना शक्य नव्हते. एका विटंबनेतून दैवी चमत्काराने ती वाचली; दुसरीतून भीमाने गुप्तपणे तिला सोडविली; वनपर्वात जयद्रथाने तिला पळविली. तो प्रकार मात्र काव्यतंत्राला थोडासा धरून होता. धर्म-भीमार्जुन घरी नव्हते, अशा वेळी ती पकडली गेली. त्यांनी पाठलाग करून तिला सोडवली. सीतेच्या बाबतीत मात्र काव्याचा आदर्श प्रत्येक वेळी पाळला गेला आहे. रानावनात तिघे हिंडत असताना सीतेला पळवून नेणे शक्य नव्हते. नुसता रामच नाही, तर एकटा लक्ष्मणसुद्धा तिचे संरक्षण करण्यास पुरेसा होता. दोघेही नव्हते, व तेही सीतेच्या हट्टामुळे दूर गेले असताच सीताहरण झाले. सीतेच्या हरणाचा दोष सीतेकडे, रामलक्ष्मणांकडे नव्हे. सीतेच्या दुःखांचे स्वरूपच निराळे. तिच्यावर आपत्ती कोसळतात, पण त्यांचे निवारण होते. प्रत्येक आपत्तीतून ती, राम व त्यांची माणसे सुखरूप बाहेर पडतात. आपत्तीमुळे जास्तच थोर, जास्तच दैवी होऊन बाहेर पडतात. त्या आपत्तींची योजनाच मुळी त्यासाठी झालेली आहे.
 द्रौपदीला दुखावणारी माणसे होती. जवळची माणसे होती. प्रत्येक प्रसंगाने दुःखात अपमानाची भर दोन्ही बाजूंनी पडत होती. द्वेषाग्नीला सारखे इंधन मिळत राहिले. युद्ध खरोखरीच्या युद्धासारखे झाले. युद्धात जित व जेते दोघेही दुःखी झाले. द्रौपदीची कर्ती मुले गेली, माहेर धुऊन निघाले. दुर्योधनाने मरता-मरता म्हटल्याप्रमाणे धर्मराज व त्याच्याबरोबर ती ह्यांनी विधवांवर राज्य केले. पूर्वी हस्तिनापूरचे राजकुल वृद्ध राजपुरुष, अवखळ तरणेबांड राजपुत्र, लहान मुले, नातवंडे, आज्या, आया, सुना, मुली ह्यांनी गजबलेले असायचे. धर्म राज्यावर आला, तेव्हा ते वैराण झालेले होते. मुलांची लग्ने झालेली नव्हती, म्हणून सती जाणाऱ्या सुना नव्हत्या. पण विधवा उत्तरा व तिचा एकुलता-एक बापामागून जन्मलेला मुलगा, एवढीच तरुण मंडळी होती. कुल पुरते निर्वैर झाले होते, पण राज्य जोडताना जोडलेली वैरे शमली नव्हती, हे आपल्याला महाभारतात दिसते. इंद्रप्रस्थ वसवताना खांडववन जाळले. त्या वेळी दुखावलेला तक्षक अर्जुनाचा सूड घेण्यासाठी टपून बसला होता. हे वैर अर्जुनावरती उगवता आले नाही, पण पांडवांमागून परीक्षितावर-अर्जुनाच्या नातवावर ते उगवले गेले. विजयाचा आनंद तर नाहीच, पण राख मात्र तोंडात भरून राहिली. श्रीकृष्णासारख्या युगपुरुषाचा जो जन्मभर आधार होता, तोही अगदी दुःसह रीतीने गेला. कृष्णाचा व त्याच्या सबंध मातब्बर कुलाचा हृदयद्रावक अंत झाला. महाभारताचा शेवट एकट्या द्रौपदीच्या आयुष्याचा किंवा पांडवांच्या आयुष्याचा किंवा कुळाचाही नव्हता. हा युगान्त होता. ह्या युगान्ताची प्रत्येक यातना द्रौपदीने भोगली. मुले मारली गेली, तेव्हा ती शेवटचे रडली; तिने शेवटचा तळतळाट केला. त्यानंतर तिचे शब्द ऐकायला येत नाहीत.
 द्रौपदीमुळे युद्ध झाले, अशी एक निराधार कल्पना कित्येकांच्या मनात आहे. महाभारतानंतर पुराणांतही, विशेषतः जैन महाभारतात ही कल्पना विशेषेकरून दिसते. एका आचरट पुराणात तर असा श्लोक आहे की, "कृतयुगात रेणुका कृत्या, सत्ययुगात सीता कृत्या, द्वापारात द्रौपदी व कलियुगात घरोघर कृत्या आहेत." ज्या बायकांमुळे मोठी युद्धे झाली किंवा रक्तपात झाला, त्यांची नावे ह्यात दिली आहेत. हैहयाने गाय व रेणुका दोघींना पळविले होते. परशुरामाने हैहयाशी युद्ध केले. ते हैहयाच्या दांडगाईबद्दल होते, जे जमदग्नीच्या हक्काचे होते, गाय व रेणूका- ते हिसकावून घेतल्याबद्दल. केवळ रेणुकेवरून नव्हे. रावणाशी युद्ध झाले, ते केवळ सीतेमुळे, सीता परत मिळाली असती, तर युद्ध झाले नसते. राम-रावणांच्या युद्धाचे सीता हे एकमेव कारण होते. द्रौपदी युद्धाचे कारण- निदान मुख्य कारण तर खासच नव्हते. ज्या दिवशी आंधळ्या धृतराष्ट्राला तो थोरला मुलगा असतानाही वगळून पांडूला गादीवर बसवले, त्याच दिवशी युद्धाची बीजे पेरली गेली. अगदी लहानपणापासून धृतराष्ट्राच्या मुलांचे आणि पांडूच्या मुलांचे वैर होते. द्रौपदीचे लग्न होण्याआधीच पांडवांना नाहीसे करण्याचे प्रयत्न झाले होते. उद्योगपर्वातील मसलतीवरूनही प्रामुख्याने हीच गोष्ट मनात ठसते. पांडव कौरवांजवळ आपला वाटा मागत होते. द्रौपदीच्या अपमानाची त्यात भाषा नव्हती. पांडवांनी आपला पुरेपूर वाटा मागितला असता किंवा कौरवांना चिडवण्यासाठी, अवास्तव मागणी केली असती, तरी पांडवांना अपमानाचा सूड उगवायचा होता; काही झाले तरी लढाई करायची होती, असे म्हणता आले असते. पण धर्मादिकांची भाषणे वाचून तर खात्री पटते की, सर्व भाषा आहे, युद्ध टाळून वाटा मिळवावयाची. जो भीम द्रौपदीसारखाच अपमानाने जळत असे तोही सांगतो की, "त्यांना म्हणावे, बाबांनो, सर्वनाश करून घेऊ नका. जे काय थोडेसे धर्म मागतो आहे ते देऊन टाका." कृष्णालासुद्धा ह्या बोलण्याने हसू आले. "अरे, नेहमीचा भीमच ना तू?" असे त्याला म्हणावे लागले. द्रौपदी काय- ती सांगत होती, "कृष्णा, माझे केस ज्याने ओढले, ज्यांचे पापी हात माझ्या केसांना लागले, त्यांची गय करू नका." कुंतीने असाच निरोप धर्माला सांगितला, पण पांडवांनी व त्यांच्या वतीने कृष्णाने युद्ध टाळण्याची शिकस्त केली. केविलवाणेपणाने भीक मागावी, तशी पाच गावे मागितली, "सुईच्या अग्राखाली मावेल एवढीही भूमी मी देणार नाही," असे दुर्योधन म्हणाला, तेव्हा युद्ध करावेच लागले. युद्ध होता-होता जुनी उट्टी फेडली गेली. त्यातच द्रौपदीची उट्टी फेडली फक्त भीमाने. कर्णार्जुनांचे वैर व स्पर्धा जुनी होती. त्यांच्या युद्धाला कोणी दुसरे निमित्त नव्हते. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरून एकत्र कुटुंबात जी भांडणे भारतात अतिप्राचीन कालापासून चालत आली, त्यांतले हे एक मोठे भांडण झाले, द्रौपदीमुळे ते नव्हे. द्रौपदीला युद्ध हवे होते पण पांडव पितृप्रधान भारतीय संस्कृतीचे सच्चे वारस होते; ते काही बायकोच्या इच्छेप्रमाणे झुलणारे नव्हते!
 शिष्टाईच्या वेळी कर्णाला फोडण्यासाठी कृष्णाने त्याला राज्याची व द्रौपदीचीसुद्धा लालूच दाखविली. ह्या हीन सौद्याची वार्ताही द्रौपदीला नव्हती. महाभारताने कुठचीच भूमिका आदर्श रंगवलेली नाही. वास्तव चित्रणात प्रत्येकासंबंधी बऱ्यावाईट गोष्टी आल्या आहेत. द्रौपदीच्या मनात पाच पांडवांव्यतिरिक्त इतर कोणाबद्दल विचार आला असता, तर त्याचे दर्शन महाभारतात खात्रीने आले असते. कर्णाकडे तिने कधी ढुंकूनही पाहिले नव्हते. तिच्या स्वयंवराच्या वेळी कशामुळे ते कोण जाणे... दुर्योधनाच्या प्रीतीमुळे असेल, कर्णाने पण जिंकण्याचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता, असे संशोधित आवृत्तीवरून दिसते. सबंध महाभारतात तिचा व कर्णाचा संबंधच आलेला नाही. कर्णावर तिचे मन जडले, ही अती मागाहून आलेल्या जैन पुराणातील कथा आहे, महाभारतातील नव्हे. महाभारतातील द्रौपदी चडफडली, जळली, पण शेवटच्या क्षणापर्यंत पतिपरायण राहिली. तिच्या सबंध आयुष्यात आळ येण्यासारखी परिस्थिती कधी उत्पन्नच झाली नाही.
 तशा तऱ्हेची परिस्थिती यावी व आळही यावा, हे सीतेचे खरेखुरे दुःख. महाभारतात जी रामकथा सांगितली आहे, ती राम अयोध्येला परत आला व सर्वजण एकमेकांना भेटून, राज्याभिषेक झाल्यावर सुखाने राहिले, रामाने पुष्कळ यज्ञ केले, एवढ्यावरच थांबते. सीता-त्यागाची गोष्टच त्यात नाही. महाभारतातील ही व सावित्रीची, नळाची वगैरे गोष्टी द्रौपदीवर कोसळलेल्या आपत्तीच्या अनुषंगाने आलेल्या आहेत. सीतेवरची खरी आपत्ती नवऱ्याने तिला टाकली ही. ती खरोखर यावयास पाहिजे होती, पण आली नाही. त्यावरून मूळ रामायणात ही कथा नव्हतीच असे वाटते. ते कसेही असो, सीता-त्यागाचा प्रसंग धरून चालले, तर सीतेला खरेखुरे दु:ख शेवटी भोगावे लागले असे दिसते. त्या दु:खाची तऱ्हाही थोडीशी संस्कृत काव्याच्या धर्तीची आहे. खोटा आळ येणे, त्याचे परिमार्जन होणे व शेवटी मीलन, अशी कथानकाची शाकुन्तलात दाखविल्याप्रमाणे बांधणी असायची. पण सीता-त्यागाचा शेवट सीतेच्या आत्मनाशात झाला. लोकांची खात्री पटावी असे दुसरे एखादे दिव्य करून तिला आनंदात राहता आले असते. पण तिने तसे केले नाही, का? ह्या प्रश्नाची उत्तरे अनेक आहेत. त्यात शिरण्याचे कारण नाही. पण ती नष्ट झाली आणि तिच्या कृत्याचा चटका सर्व भारतीय माणसांना लागून राहिला. ही आपत्ती तिच्यावर ओढवून आणण्यात ग्रंथकर्त्यांचा एक हेतू असावासे वाटते. रामायणकथाच अशी आहे की, नायक सर्वांगीण उत्तम पुरुष होता, त्याचे वर्णन 'मर्यादा पुरुषोत्तम' असे करायचे; नायक सर्व प्रसंगांतून तावून-सुलाखून निघालेला. पण अजून एक दिव्य राहिले होते. स्वतःचे प्रेम का प्रजेची इच्छा, असा झगडा करून राजा म्हटला की प्रजेसाठी वाटेल तो 'स्वार्थ' त्याग करायची त्याची तयारी पाहिजे आणि तशा तऱ्हेचा राजा राम होता, हे ह्या प्रसंगाने सिद्ध करायचे. पण दुर्दैवाने रामाने अंगिकारलेला मार्ग उत्तम होता, हे निरपवाद ठरले नाही.
'स्वार्थ'त्याग म्हणजे एका निरपराध जीवावार अन्याय का? रामाला राज्य सोडता नसते का आले? सीतेचा त्याग ही गोष्ट काही चांगली झाली नाही, असे कालिदास, भवभूती वगैरे महान कवींनाही वाटले. म्हणजे त्या एका प्रसंगाने रामाच्या यशाला गालबोट लागले आणि जी सीता केवळ रामाची छाया होती, तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व, स्वतंत्र दु:खे, अपमान व त्यांचे स्वतंत्रपणे निराकरण करण्याचा संधी लाभली.
 ह्या प्रसंगाला द्रौपदीच्या आयुष्यात तोड नाही, द्रौपदीची सर्व दुःखे व अपमान वास्तव व त्यांचे निराकरण व त्यात पडलेली भर ही सर्व व्यवहाराच्या पायरीवरील, ओढूनताणून आणलेली नव्हेत. काव्य रंगविण्यासाठी घातलेली नव्हेत. सीता भूमिकन्या, कारण पृथ्वीतून निघालेली; पण द्रौपदी खरीखुरी भूमिकन्या, कारण तिचे पाय भूमीवर, तिचे हृदय संसारात, माहेरात, सासरी, राजवाड्यात असे होते. तिचा बाणेदारपणा, तिचा स्वार्थत्याग, तिची पतिपरायणता- सर्वच वर्तन ती ज्या देशात, ज्या काळात व ज्या कुळात जन्मली, वावरली, त्यांना योग्य असे होते. ती असामान्य होती; पण ही असामान्यता सामान्यांच्या मूल्यांतूनच जन्माला आलेली होती.
 द्रौपदी आणि सीता या दोघांच्याहीकडून होऊ नये, त्या गोष्टी घडल्या आणि त्यांचे प्रायश्चितही दोघींना भरपूर मिळाले. सीतेला संभाळायला भावाला सांगून राम हरणापाठीमागे गेला. रामाची हाक ऐकून सीतेने लक्ष्मणाला त्याच्या मदतीस जाण्यास सांगितले. लक्ष्मण तिला सोडून जाईना, तेव्हा अती वाईट संशय घेऊन ती त्याला बोलली. ह्याचा परिणाम म्हणजे रावण तिला पळवू शकला. कांचनमृगाचा सबंध कटच तिला पळविण्यासाठी रचलेला. पाठीमागे गेले, तर शूर्पणखेला हसून तिची चेष्टा तिने केली होती, त्याचाही हा परिणाम म्हणता येईल. द्रौपदी दुर्योधनाला चारचौघांत हसली होती. पाणी तिथे कोरडी जमीन, जमीन तिथे पाणी, असे वाटून दुर्योधन मयाने बनवलेल्या अद्भुत राजवाड्यात फजीत झाला होता. सर्वांत जास्त अपमान झाला, तो द्रौपदीच्या असंस्कृत हसण्याचा!
 कीचकवधानंतर द्रौपदीनेच त्याच्या वधाची बातमी मोठ्या दिमाखाने रक्षकांना सांगितली. गुपचूप लोकांच्या दृष्टीआड बसून असायचे; ते सोडून ती कीचकाची प्रेतयात्रा पाहत उभी राहिली; त्याच्या भावांच्या दृष्टीस पडली व त्यांनी तिला बांधून कीचकाबरोबर जाळण्यासाठी स्मशानात चालवले. हा अनर्थ द्रौपदीने स्वतः आपल्यावर ओढवून घेतलेला होता आणि तोही वागू नये तसे वागून. आपला शत्रू गेला, त्याच्या प्रेताकडे पाहून डोळ्यांचे पारणे फिटू दे, असे वाटणारी द्रौपदी भूमिकन्याच.
 सुभद्रेवर व अर्जुनावर जळणारी द्रौपदीही अगदी मानवी. असले दुःख तर सीतेला भोगावेच लागले नाही. तो असामान्यपणा. द्रौपदीचे हे दुःख त्या जमान्यात फारच सामान्य, पण एकत्र वागण्यात दाखवलेला संयम असामान्य. रोजच्या आयुष्यात द्रौपदीने सवतीमत्सर दाखविला, असे कुठेच दिसत नाही.
 सगळ्यांत द्रौपदीचे चुकले कुठे? धर्म द्यूतात हरला, त्यावेळी एका क्षुद्र दासाकडून दुर्योधनाने तिला सभेत बोलावणे पाठवले. त्यावेळी द्रौपदीने त्याच्याबरोबर निरोप पाठवला, "जा, सभेत विचारून ये. माझा पण लावायच्या आधी धर्मराज स्वतः पण लावून दास झाले होते का नाही ते." दुर्योधनाने सांगितले, “सभेत ये, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल." ती सभेत आली नाही. तेव्हा दु:शासनाने तिला ओढीत आणली. सभेत तिने रडत पण त्वेषाने तोच प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर चर्वितचर्वण झाले. भीष्मालासुद्धा उत्तर देता आले नाही. कदाचित द्रौपदीच्या विरुद्ध गेले असते, म्हणून त्याने उत्तर द्यायचे टाळले असेल. कारण पांडवांची बाजू घेऊन त्याने कित्येकदा धृतराष्ट्राशी व दुर्योधनाशी भांडण केले होते. ह्या वेळी तो गप्प बसला, तो मिंधेपणाने नसून ह्या वादात शिरण्यात अर्थ नाही म्हणून, असेच वाटते. द्रौपदीचे म्हणणे होते की, एकदा धर्मराज दास झाला, स्वातंत्र्य गमावून बसला, म्हणजे ज्यावर त्याने स्वामित्व गाजवावे, असे काही राहिलेलेच नव्हते. कारण दास ‘अ-स्व', स्वत:चे काही नसलेला असा असतो. ह्या पायरीवर आलेल्या मनुष्याला पणाला लावायला काही उरलेले नसते. मग तो मला पणाला लावणार कसा?' एका बाजूने हे बोलणे संयुक्तिक दिसले, तरी दासालासुद्धा बायको असते व तो दास म्हणून त्याचा बायकोवरचा अधिकार नाहीसा झालेला नसतो हेही खरे. एखाद्याचा दास म्हणून राहूनही दासाचा स्वतंत्र धनार्जन करण्याचा थोडासा हक्क फार प्राचीन काळापासून मान्य झालेला होता. मालकाचा दासावर हक्क व दासाचा बायकोवर हक्क, असा गुंतागुंतीचा प्रश्न होता.
 द्रौपदीचा प्रश्न वेडगळ होता. नव्हे, भयानक होता. त्याचे काहीही उत्तर आले असते, तरी तिला ते उपकारक ठरणारे नव्हते. "तुझ्या नवऱ्याचा हक्क नाहीसा होत नाही. तो दास झाला, तरी तू त्याची बायको म्हणून तुझ्यावर त्याची सत्ता राहते. तो तुला पणाला लावू शकतो," असे भीष्म बोलला असता, तर तिचे दासीपण पक्के झाले असते. "दासपणामुळे तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावरचा हक्क नाहीसा होत नाही," असे भीष्म बोलता, तर तिचे हाल कुत्रा खाता ना! द्रौपदी 'नाथवती अनाथवत्' अशी होती. तिची नाथवत्ताच मग नाहीशी झाली असती. म्हणजे ती सर्व बाजूंनी अनाथ झाली असती. पतीने टाकले, म्हणजे दीनपणे पितृगृही राहणाऱ्या स्त्रियांचा ऋग्वेदातही उल्लेख आहे (भार्यापत्त्यानुत्तेव ज्योक् पितृषु आस्ताम्). पण जिने आपणहून नवऱ्याचे नवरेपण झिडकारले, अशी बाईच तेव्हा माहीत नव्हती. अशा बाईला अशा मानाचे राहोच, पण दीनवाणे स्थानही माहेरी मिळणे शक्य नव्हते. ह्या प्रश्नाने तिने सर्वांना पेचात टाकले होते. भीष्माला मान खाली घालावी लागली. धर्मही शरमेने मेला. ह्या प्रश्नात पांडित्य नव्हतेच, पण पांडित्यापेक्षाही श्रेष्ठ असा शहाणपणा, प्रज्ञा नव्हतीच नव्हती. जे चालले होते, ते इतके हिडीस होते की, सासऱ्यांनी व दिरांनी भरलेल्या सभेमध्ये वधू म्हणून द्रौपदीने हंबरडा फोडला असता, तर गोष्टी या थराला कदाचित जात्या ना! स्वतःची सून भर सभेत ओढून आणीत असता प्रतिकार न करणे, पुरुषांच्या सभेत स्वतःच्या कुळातील वधूचा अपमान करणे ही कृत्ये मानवाच्या व अलिखित सर्वमान्य नीति-नियमांच्या इतकी विरूद्ध होती की, त्या प्रसंगी कायदेबाजपणा हा अतिशहाणपणाच ठरता. शेवटी दुर्योधनाने सांगितले, "तुझ्या नवऱ्याला हा प्रश्न विचार. धर्मराजाच्या शहाणपणावर व न्यायबुद्धीवर आमचा इतका विश्वास आहे की, त्याने दिलेला निवाडा आम्ही मान्य करू".
 द्रौपदीचा प्रश्न, दुर्योधनाचे हे मानभावी उत्तर ह्यांनी बिचाऱ्या धर्माचा जेवढा मर्मच्छेद झाला, तेवढा दुसऱ्या कशानेही झाला नसता. प्रश्नाचे उत्तर देणे शक्यच नव्हते. द्रौपदीचे वस्त्र फेडले गेले व नवी वस्त्रे मिळत गेली. महाभारताच्या संशोधित आवृत्तीत कृष्णाचा धावा नाही. जे होत होते, ते इतके वाईट होते की, विश्वातील शक्ती जागी होऊन तिने एका बाईचे रक्षण केले, असेच म्हणावे लागते. दुःशासन थकून, लाजून बाजूला झाला. सभागृह अशुभ, अपशकुनी आवाजांनी भरून राहिले. विदुर कळवळून उठला. आंधळ्या धृतराष्ट्राला म्हणाला, "ह्या दुष्कृत्याने भयंकर उत्पात होत आहेत, मध्ये पड, व कुळाला वाचव." धृतराष्ट्रही झाल्या प्रकाराने घाबरला. त्याने द्रौपदीला मोकळी करून वर दिले. तिने दोन वरांनी आपल्या नवऱ्यांची सुटका केली. पण शहाणपणाचा दिमाख दाखवून तिने जो प्रश्न विचारला, तो सभेत कोणालाच विशेष आवडला नाही. धर्मराजाला तर हे शल्य जन्मात विसरणे शक्य नव्हते. अरण्यात असतानाही धर्मापुढे आपले शहाणपण दाखवण्याचा तिने प्रयत्न केला. पण पांडित्यात धर्म तिच्यापुढे हार जाणे शक्य नव्हते. त्याने तिला गप्प बसवलेच. आपल्या आयुष्यात तिने लहान-मोठ्या चुका केल्या होत्या, त्या क्षम्य होत्या. पण भर सभेत पांडित्याचा आव आणून धर्माला तिने पेचात आणले होते, त्याचा अजाणता अपमान केला होता. अजाणताच, कारण तिला ज्या वेळी घालून-पाडून बोलायचे होते, त्या वेळी ती सरळसरळ बोलायची. पण अजाणता म्हणून तो क्षम्य नव्हता. आधी सभेमध्ये तरुण वधूने बोलू नये, हे तिला समजायला पाहिजे होते. ते करून वर शहाण्या-शहाण्याना जे कळले नाही ते मला कळले, हा पंडिती थाट! ह्या दोन्ही गोष्टी धर्मराजाला झोंबल्या. त्यामुळे तिच्या यशात भर पडली नाही. पण ह्या सर्व प्रसंगाने तिच्या पार्थिवतेची, आडदांड निरागसतेची जाणीव होते. अरण्यपर्वात तिला 'पंडिता' हे विशेषण लावलेले आढळते. स्त्रियांनी पंडिता असावे हे महाभारतकालीन क्षत्रियांना मोठेसे रूचत असावे असे दिसत नाही. गांधारी, कुंती पुत्रांना उपदेश करतात. त्या वृद्ध, केल्या-सवरल्या स्त्रिया होत्या. त्यांनी मुलांना चार गोष्टी सांगणे अपेक्षित होते. तरण्या-ताठ्या बाईने वडीलमाणसांपुढे शहाणपण दाखवणे हे अगदीच चुकले. आपल्या हातून चूक झाली, हे द्रोपदीला उमगलेच नसावेसे दिसते. राजाने त्या चुकीमुळे आपल्याला झालेली जखम तिला कधी उघडी करून दाखवली नाही, राजाने तिला जाणीव दिली, ती दुसऱ्याच एका जखमेची व ती इतकी उघड होती की, इतर सर्वांनाच नव्हे, तर खुद्द प्रांजळ बुद्धीच्या द्रौपदीलाही ती पटावी.
 यादवांच्या, विशेषत... श्रीकृष्णाच्या अंतानंतर पांडवांना पृथ्वीवर राहणे शक्य नव्हते. सर्व आवरासावर करून पांडव शेवटच्या यात्रेला निघाले. अर्थात द्रौपदीही त्यांच्याबरोबर होतीच. गंगेचे खोरे ओलांडले, हिमालयाचा प्रदेश ओलांडला व एक निर्वृक्ष माळावर ती पोहोचली. इतस्ततः दगड पसरलेले होते. दुसरे काही नाही. महिने-न-महिने एकामागून एक सहा जणे चालली होती. एकाएकी द्रौपदी खाली पडली. भीम थांबला. त्याने वेड्यासारखा प्रश्न विचारला, "ही का बरे पडली?"
 इतके चालल्यावर तिने का पडू नये? सहा जण जिथे चालली होती, तिथपर्यंत सर्वजणे पोहोचणार, अशी भीमाची कल्पना होती का?
"बघ रे... ही पडली रे!" भीम म्हणाला, "का बरे ती अशी पडली?"
 "भीमा, पुढे चल. ती पडली, कारण तिने सर्वात जास्त प्रेम अर्जुनावर केले." धर्माने पुढे जाता-जाता, मागे न पाहता उत्तर दिले व आयुष्यभर मनात बाळगलेली खोल जखम उघडी करून दाखवली.
 द्रौपदी पडली. तिच्या पाठोपाठ दहा-पाच पावलांत इतर पडले. एकटा धर्म कुत्र्याबरोबर पुढे गेला.

  

 द्रौपदी पडली खरी, पण कोसळून मरून पडली नाही. तिला भयंकर ग्लानी आली होती. पाऊल पुढे उचलेना. पडल्यावर तिने भीमाची व धर्माची प्रश्नोत्तरे ऐकली. हे महाप्रयाण होते. या प्रवासात कोणी कोणासाठी थांबायचे नसते. आयुष्याची संगत संपलेली होती, डोक्यावर हात ठेवून ती मरण्याची वाट पाहत होती. पण तिला शुद्ध होती. धर्माच्या शब्दांनी विचारांची चक्रे फिरू लागली. वर्षानुवर्ष जगलेल्या आयुष्याचा चित्रपट शेवटच्या काही क्षणांत तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
 धर्माच्या वाक्यातील जखम तिला जाणवली. धिक्कारही जाणवला. आयुष्यात प्रथमच मनापासून तिला राजाची कीव आली. पुष्कळदा, विशेषतः अरण्यवासात, तिने राजाच्या दैन्यावस्थेबद्दल हळहळ बोलून दाखवली होती. त्या हळहळीच्या शब्दांत काहीतरी नव्या वादाची सुरवात होती. दैन्याकडे बोट दाखवून राजाच्या लढाऊ वृत्ती जागृत करण्याचा तो प्रयत्न होता. एक प्रकारचे डिवचणेच होते ते. राजाने त्या प्रयत्नांना कधीही दाद दिली नव्हती. शक्य तितक्या सौम्य शब्दांनी तो तिचे बोलणे खोडून काढी. आज मात्र एका वाक्यात त्याच्या आयुष्यातील वेदनेला वाचा फुटली होती. कधीही शब्दाने न दुखवणाऱ्या राजाने तिच्या मरणाच्या क्षणी त्याच्या मताने तिच्या वर्तनातील उणीव दाखवली. राजाच्या वैफल्याची जाणीव होऊन द्रौपदीला क्षणभर वाईट वाटले, पण क्षणभरच. राजाच्या धिक्काराची जाणीव होऊन ती चमकली, पण तेही क्षणभरच. ती मनात हसली. तिला स्वयंवराच्या दिवसाची आठवण झाली. अर्जुनाने पण जिंकल्यावर एकापाठोपाठ एक ह्याप्रमाणे पाच जणांशी तिचे लग्न लागले, तेव्हा आपल्याला काही वेदना झाल्या हे राजाला कळले नसेल, असे थोडेच? आपण मन मारले. कृतीत तरी पाचांत कधीही भेदभाव केला नाही. मन कधीच पूर्ण मारता येत नाही. कृती समतोल ठेवता येते. पण मनातून पाचांवर अगदी मापून सारखे प्रेम करणे शक्य होते का? अर्जुनावर जास्त प्रेम केले, तर त्यात नवल काय?
 मन क्षणभर थांबले... प्रेम केले, म्हणजे काय? जन्मभर त्याच्यासाठी झुरले हेच ना? पण माझ्या प्रेमाला कधी प्रतिसाद मिळाला होता का? उलुपी, चित्रांगदा, सुभद्रा-अर्जुनाने किती स्त्रियांवर प्रेम केले!... हे तरी खरे का? अर्जनाने कोणा तरी स्त्रीला आपले हृदय दिले होते का? स्त्रियांनी अर्जुनावर प्रेम केले, पण अर्जुनाचे हृदय कृष्णाला दिलेले होते. अगदी पूर्वीपासून. इंद्रप्रस्थ वसवण्याच्या आधीपासून तिला माहीत होते की, अर्जुन आणि कृष्ण घटका घटका बोलत बसायचे. त्यांच्या बोलण्यात कधी एखादी नवीन कल्पना-शहर वसवण्याची-असेलही, पण ते बोलत ते मित्र ह्या नात्याने. एकमेकांचे हृद्गत एकमेकांना सांगण्यासाठी, एकमेकांचे शब्द ऐकण्यासाठी. अर्जुनाचे मन कोणीही बाई जिंकू शकली नाही. प्रतिसाद न मिळताही मी कुणासाठी तरी झुरावे, कोणीतरी माझ्यासाठी जीव टाकावा... एकदम धक्का बसल्यासारखे मन थांबले. ज्याने जन्मभर द्रौपदीसाठी जीव टाकला. त्याच्या प्रेमाची जाणीव वीज लखलखावी, तशी अंत:करणात घुसली. द्रौपदीने नव्या जाणिवेचा निःश्वास टाकला. निराळीच चित्रे डोळ्यांपुढे आली. स्वयंवर मंडपाच्या बाहेर अर्जुनाच्या बरोबरीने शत्रूशी लढाई करणारा भीम, सभेमध्ये द्रौपदीला आणली, तेव्हा थोरल्या भावाचे हात जाळायला निघालेला भीम, संताप आवरेनासा झाल्यामुळे अर्जुनाने हात धरून ठेवलेला भीम, द्रौपदी दमली की कळवळणारा भीम, द्रौपदीसाठी सुवासिक कमळे आणायला धावलेला भीम, दुःशासनाचे रक्त पिणारा भीम, रक्ताने माखलेल्या हातांनी द्रौपदीची वेणी घालणारा भीम, कीचकाचा वध करणे अर्जुनालाही शक्य होते, पण ते काम करणारा भीमच. एक-ना-दोन किती गोष्टी आठवाव्या? खादाड भीम, दांडगा भीम, संतापी भीम, धृतराष्ट्राला आणि गांधारीला सारा वेळ घालून पाडून बोलणारा भीम. द्रौपदी ज्या अर्थाने पार्थिव होती, त्या अर्थाने तोही पार्थिव होता. ती भूमिकन्या होती तसा तो भूमिपुत्र होता...
 द्रौपदीला काहीतरी फरफटल्याचा, मोठ्याने श्वासोच्छ्वास घेतल्याचा आवाज आला. तिचे सर्वांग भीतीने शहारले. ती स्वस्थपणे मरणाची वाट पाहत होती... कोठचे क्रूर जनावर येत असेल बरे? तरस का? इतके दिवस चालताना ह्या माळावर जनावरे दिसली नव्हती. अंगाचे लचके न तोडता ते जनावर नरडीचा घोट एकदम घेईल, तर बरे. तिने डोळे घट्ट मिटले. नवे अनामिक संकट कोसळण्याच्या क्षणाची वाट पाहताना एकदम तिच्या डोळ्यांवर छाया आली. सूर्यामध्ये नि तिच्यामध्ये काहीतरी पडदा आला होता. मंद खोल आवाजात हाक आली, "द्रौपदी!" तो भीमाचा आवाज होता. द्रौपदीने आश्चर्याने पण कष्टाने हात बाजूला केले व डोळे उघडले. भीम तिच्या तोंडावर आपल्या शरीराची सावली करून होता. तोच फरफटत, धापा टाकीत, कष्टाने मधली दहा-पंधरा पावले ओलांडून तिच्यापर्यंत आला होता. वाटेत अर्जुन, नकुल, सहदेव मेलेले दिसले तेव्हा द्रौपदीही त्याच अवस्थेत दिसणार, असे त्याला वाटले होते. पण डोळे मिटून स्वस्थ पडलेली द्रौपदी त्याच्या येण्याने घाबरली, शहारली. ही तिच्या जिवंतपणाची निशाणी त्याने आपल्या डोळ्यात टिपली. "काय करू तुझ्यासाठी ?" त्याने अडखळत विचारले. नेहमीचाच आयुष्यभर विचारलेला, पण ह्या परिस्थितीत अगदी निरर्थक, गैरवाजवी प्रश्न होता तो, द्रौपदी प्रसन्न हसली. भीमाचे तोंड आपल्या तोंडाजवळ आणून आपल्या शेवटच्या श्वासाने ती म्हणाली, "पुढल्या जन्मी पाचांतला थोरला भाऊ हो, भीमा! तुझ्या आसऱ्याखाली आम्ही सारी निर्भयपणे आनंदात राहू."

 ऑक्टोबर, १९६३