निराळं जग, निराळी माणसं

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf
निराळं जग, निराळी माणसं

डॉ. सुनीलकुमार लवटे


निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

निराळं जग, निराळी माणसं
(संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे

संपर्क
'निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ ०० ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in

दुसरी आवृत्ती २०१८

© डॉ. सुनीलकुमार लवटे

प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com

मुखपृष्ठ
गौरीश सोनार

अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर

मूल्य रु. २००/-

उसवलेलं आयुष्य सोसणाऱ्यांना

अन्

ते शिवणाऱ्या टाक्यांनाही !ऋणनिर्देश


 लेखनसंधी
 • दैनिक प्रहार, मुंबई • आल्हाद गोडबोले (संपादक)
 • राम जगताप, फीचर एडिटर, दैनिक प्रहार, मुंबई
 प्रथम प्रकाशन
 • लोकवाङ्मय गृह प्रा. लि. मुंबई
 • प्रकाश विश्वासराव • कवी सतीश काळसेकर
 • अनुवादक- जयप्रकाश सावंत
 प्रस्तावना
 डॉ. अशोक चौसाळकर
 पुनर्मुद्रण/प्रकाशन
 • अक्षर दालन, कोल्हापूर 

प्रस्तावना

 भारतीय समाज वा जगातील इतर कोणताही समाज त्या अर्थाने परिपूर्ण नाही. या समाजात समाजानेच निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे अनेक लोक अत्यंत दुर्दैवी जीवन जगत आहेत. रोज आपले चाकोरीतील जीवन जगणाच्या समाजापेक्षा या वंचित लोकांचे जग हे निराळे जग आहे. त्यात वेश्या आहेत, निराधार व अपंग आहेत. मनोरुग्ण व वेडे आहेत. समाजाने अनेक प्रकारे व अनेक रितीने झिडकारलेले हे लोक आहेत. ती माणसंच आहेत, पण त्यांना माणुसकीची वागणूक मिळत नाही. त्यामुळे उपेक्षितांचे जग निराळे व दुर्लक्षित आहे. या निराळ्या जगाला माणुसकीची वागणूक देणारी, त्यासाठी आपले तन, मन, धन अर्पण करणारी सेवाभावी माणसे व काही संस्था आहेत आणि या लोकसेवकांचेही स्वत:चे असे निराळे जग आहे. या निराळ्या जगावर व निराळ्या माणसांवर या दोन्ही जगांचे प्रतिनिधित्व करणारे थोर समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या समर्थ लेखणीद्वारा प्रकाशझोत टाकला आहे.
 प्रा. लवटे यांनी यातील अनेक लेख मुंबईच्या 'प्रहार' या दैनिकासाठी लिहिले. 'प्रहार' मध्ये प्रकाशित लेख आणि काही हस्तलिखित लेख एकत्र करून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. हे पुस्तक त्यांनी उसवलेले आयुष्य सोसणाऱ्यांना आणि ते शिवणाऱ्या टाक्यांना म्हणजेच ते टाके घालणाऱ्यांना अर्पण केले आहे. कारण उसवलेल्या आयुष्यास सोसणाऱ्यांचे जग निराळे आहे. तसेच कर्तव्यबुद्धीने ते उसवलेले आयुष्य मोठ्या जिकिरीने शिवणारी माणसे निराळी आहेत. आपल्या प्रारंभीच्या निवेदनात श्री. लवटे सांगतात की असे निराळे जग ते लहानपणापासून बघत होते. त्याचप्रमाणे ते हेही बघत होते की आपल्या भाळी आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रिमांड होममधील अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर पोहोचले आहेत. 'दैवायत्तं कुले जन्मः, मदायतं तु पौरुषम्' हे कर्णाचे 'वेणीसंहार' या नाटकातील वाक्य अनेकांनी खरे करून दाखविले आहे. प्रा. लवटे यांनी उसवलेले आयुष्य सोसले आहे आणि आयुष्यभर त्यांनी इतरांच्या उसवलेल्या जीवनास टाके घालून शिवण्याचे कामही केले आहे. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या लोकसेवेचा व त्यामध्ये त्यांच्या प्रकारेच काम करणाऱ्या 'दीनबंधू'चा खोल असा परिचय आहे. त्यांच्या कर्माची त्यांना माहिती आहे, त्यामुळे या पुस्तकातील त्यासंबंधीचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. त्या सर्व लोकांना त्यांनी दु:खितांचे दु:ख सरावे म्हणून प्रयत्न करणारे म्हटले.
 प्रा. लवटे यांनी मनोगतात तीन जगांची कल्पना मांडली आहे. त्यांच्या मते, पहिले जग म्हणजे प्रस्थापितांचे सुव्यवस्थित व सुखी जग, दुसरे जग हे अस्पृश्य समजल्या गेलेल्या, गावकुसाबाहेर राहिलेल्या दलितांचे जग आणि तिसरे जग हे अनाथ, परित्यक्ता, निराधार, बालगुन्हेगार, वेश्या, वृद्ध, बलात्कारिता स्त्रिया, अंध, अपंग, मतिमंद, मनोरुग्ण, तृतीयपंथी, आपदग्रस्त, बंदी व अपराधी अशा वंचितांचे जग. हे तिसरे जग आपोआप निर्माण झालेले नाही. पहिल्या जगानेच त्याची निर्मिती केली. त्या जगात असणारा स्वार्थ, हिंसा, लोभ व इतरांचे शोषण करण्याची इच्छा यातून हे जग निर्माण झाले. या वंचितांच्या जगात स्त्रियांची संख्या मोठी, कारण पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या व त्यातून निर्माण झालेल्या बुभुक्षेच्या त्या बळी. या तिस-या जगाचे दु:ख अनिवार आणि जगण्याची धडपड जबरदस्त. त्याकडे तथाकथित समाजाचे दुर्लक्षपण मोठे. पण या लोकांना मदत करणारे, त्यांचे अश्रू पुसणारे, त्यांना प्रगतीचा व नवजीवनाचा मार्ग दाखवणारे काही समाजसेवक व संस्था निर्माण झाल्या आणि त्यांच्या प्रयत्नांतून अनेकांचे जीवन तुलनात्मकदृष्ट्या सुखावह झाले. अनेकांना प्रगतीचा मार्ग खुला झाला. त्यांनी समाजसेवेचा जो मार्ग आहे तो जास्त व्यापक करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांची कहाणी प्रा. लवटे यांनी त्यांच्या विविध लेखांतून सांगितली आहे.
 या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात आठ लेख असून त्यात प्रा. लवटे यांनी वेश्या, मनोरुग्ण, अंध, अपंग, परित्यक्ता व स्त्रिया, बालक व बालगुन्हेगार व तुरुंग यांच्या बाबतची माहिती दिली असून त्याच्या कल्याणासाठी काम करणा-या संस्थांचे कार्य वर्णन करून सांगितले आहे. त्यात मुंबईच्या प्रार्थना समाजाने चालविलेल्या पंढरपूरच्या बालकाश्रमाचा समावेश होतो. या आश्रमाबद्दल प्रा. लवटे यांना खास ममत्व वाटते, कारण त्यांची तेथेच जडणघडण झाली. वेश्या व्यवसाय करणाच्या मुलीच्या न्यायालयातील खटल्याच्या संदर्भातील सर्वांना अस्वस्थ करणारी घटना या पुस्तकात वर्णन केली आहे. वेश्यागृहे, त्यात धंद्यासाठी आणलेल्या निराधार मुली, त्यांच्यावर राज्य करणाऱ्या मालकिणी, या काळ्या धंद्याची सूत्रे हलवणारे व्हाईट कॉलर सोशल वर्कर, पोलीस, दलाल, पंटर यांची त्यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या मते वेश्यांच्या या जगात काहीच निश्चित नसतं. या पुस्तकातील विविध संस्था दुर्दैवी माणसांच्या जीवनात कसा बदल घडवून आणतात याचे विवेचन प्रा. लवटे यांनी स्वयंसिद्धा, हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड, बालकाश्रम आणि बालकल्याण संकुल यांच्या कार्याच्या संदर्भात केले आहे.
 पुस्तकाच्या दुसऱ्या भागात या वर्गासाठी काम करणा-या १७ सेवाव्रतींच्या कार्याची थोडक्यात प्रा. लवटे यांनी माहिती करून दिली आहे. त्यामध्ये मातृमंदिरच्या इंदिराबाई हळबे, कुमुदताई रेगे, दादासाहेब ताटके, विजयाताई लवाटे, अजीजभाई भयाणी, रमाकांत तांबोळी, मंगला शहा, गिरीश कुलकर्णी, संगीता व भरत निकम, संजय हळदीकर व पवन खेबूडकर इत्यादींचा त्यांनी त्यात समावेश केला आहे. भारतातील समाज कल्याणाच्या कार्याचे सूत्रधार व थोर समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्यावरचा लेख मनोज्ञ आहे. डॉ. गोखले लोकमान्य टिळकांचे सहकारी दा. वि. गोखले यांचे चिरंजीव. १९८० च्या उत्तरार्धात ते 'केसरी' चे संपादकपण होते. परंतु त्यांचे मुख्य कार्य समाजकल्याण व बालकल्याण या क्षेत्रातच कसे होते, हे प्रा. लवटे यांनी त्यांच्या लेखात उत्तम प्रकारे दाखवले आहे. विजयाताई लवटे आणि अजीजभाई भयाणी यांच्या कार्याचेपण त्यांनी चांगले चित्र रेखाटले आहे. या सेवाव्रतींनी आपला वैयक्तिक लाभ बाजूला ठेवला. कुटुंब व समाज यांच्यात योग्य असा समतोल साधला आणि असंख्य लोकांच्या जीवनात आंतरसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना चांगले संस्कार दिले आणि धर्मनिरपेक्षता व वैश्विक बंधुभाव जागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून प्रा. लवटे म्हणतात की हे सेवाव्रती नसते तर आपला समाज जास्त ओंगळ व बीभत्स झाला असता. या सेवाव्रतींनी माणुसकीची कुंकर घालून जे काम केले ते समाजातील वंचितांना दिलासा देण्याचे काम आहे.
 ‘निराळं जग, निराळी माणसं' हे पुस्तक प्रा. लवटे यांच्या समाजसेवेच्या दीर्घ अनुभवाचे फळ आहे. निरनिराळ्या संस्था चालवताना, निरनिराळ्या महत्त्वाच्या सरकारी समित्यांवर काम करीत असताना त्यांना जे अनुभव आले, त्यांना जी माणसे भेटली, त्यांनी ज्या संस्था पाहिल्या त्याचे अनुभवसिद्ध वर्णन या पुस्तकात आहे. ते शेवटी असे म्हणतात की, या वंचितांच्या तिस-या जगाशी असलेली त्यांची स्वत:ची नाळ ते तोडू शकलेले नाहीत, कारण त्यानेच त्यांना संवेदनशील बनवले आहे.  वंचितांच्या व आपदग्रस्तांच्या तिसऱ्या जगाचे लवटे यांनी प्रत्ययकारी चित्रण करून त्यांचा प्रश्न समाजाच्या वेशीवर टांगला आहे. या वंचितांची संख्या मोठी आहे, कारण वरचेवर आत्मकेंद्रित बनत जाणाऱ्या समाजाच्या वर्तनामुळे त्यांच्या संख्येत भर पडते आहे. आज वाढत जाणारा वेश्याव्यवसाय, परित्यक्ता, निराधार व कुमारी माता समाजाच्या अन्याय्य वर्तनाच्या बळी आहेत. त्यामुळे वंचितांची संख्या मोठी, पण त्यामानाने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांची आणि सेवाव्रतींची संख्या कमी, अशी विषम परिस्थिती आहे. प्रा. लवटे म्हणतात त्याप्रमाणे समाजातील विकार दूर करण्याची जबाबदारी समाजाचीच आहे, पण समाजाला ही जबाबदारी कळली पाहिजे. समाजाची सद्सदविवेकबुद्धी जागी झाली पाहिजे व समाजाने त्यामागे आपली शक्ती उभी केली पाहिजे. प्रा. लवटे यांचे हे पुस्तक सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तीची विवेकबुद्धी नक्कीच जागी करील व त्यामुळे सेवा करणाऱ्या सामाजिक संस्था व सेवाव्रती कार्यकर्ते यांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणखी एक अत्यंत चांगले पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो.

अशोक चौसाळकर

नाळ...न तुटलेली...न सुकलेली!

 ...वेश्यावस्तीतलं जग आपल्या जगापासून वेगळं, निराळं असतं. इथल्या घड्याळाचे काटे आपल्या घड्याळाच्या बरोबर विरुद्ध दिशेनं फिरत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर जेव्हा आपला दिवस मावळत असतो तेव्हा इथला उजाडत असतो. इथं झोप लागण्यासाठी कूस बदलावी लागत नाही... पाठ टेकली की डोळा लागलाच समजा.
 ...वेड्याचं घर उन्हात असं आपण नुसतं म्हणत, ऐकतच आलोय. पण वेड्याचं घर पाहिलंय कुणी? तुम्ही गेलात का कधी वेड्यांच्या इस्पितळात? नाही पाहू शकणार तुम्ही त्याचं रौद्र रूप! पण मी तुम्हाला अनुभवानं सांगेन, ते रौद्र रूप समाजाच्या क्रौर्याचं प्रतिबिंब असतं!
 ...अंधशाळा माझ्या लेखी समाजातलं सर्वात संवेदनक्षम ठिकाण! नुसतं आवाजावरनं जग, माणसं ओळखणं, अनुभवणं सोपं नसतं! स्पर्शानं माणूस कोण, कसा तुम्ही ओळखाल? अंध बांधव हमखास ओळखतात. न दिसता समजणारं हे जग म्हणजे समाजाच्या वास्तवाचं थर्मामीटरच!
 ... कोण म्हणतं स्त्री अबला? ती तर स्वयंप्रेरिका, स्वयंसिद्धा असते हे समजून घ्यायचं तर आत्मभान आलेल्या प्रत्येक स्त्रीची जगण्याची झुंज एकदा उमजून घ्यायलाच हवी... 'एक तरी ओवी आठवावी'...तशी. शाप घेऊन भले तुम्ही जन्माला आला असाल... जगत असाल, पण आतला आवाज एकदा का गवसला ना? मग गगनाला गवसणी घातलीच समजा. स्त्रीला गृहीत धरून जगायचा काळ संपला, हे पुरुषांनी एकदा समजून घ्यायलाच हवं असं मला वाटतं.
 ...धडधाकट शरीर घेऊन जगण्यात तो कसला पुरुषार्थ? मला हात नाही तरी मी पायाचे हात करतो नि कॉलेजात प्रथम येतो! मला बोटं पण नाहीत... मी दोन पंजात पेन, पेन्सिल, सळी घेतो अन् संगणक चालवून अमेरिकेतलं आऊटसोर्सिंग वर्क भारतात माझ्या घरी बसून करतो नि तुमच्यापेक्षा जास्त कमाई करतो नि तीही हात, बोटं असणा-या माणसांपेक्षा सफाईने व गतीनेही!  ... मला समाजाच्या तथाकथित नैतिक कल्पनेपोटी अनौरस मानून टाकलं होतं कचरा कोंडाळ्यात. अनाथाश्रमाने मला कडेवर घेतलं, छातीला कवटाळलं अन् मी इतका मोठा झालो की महाराष्ट्रातल्या साऱ्या अनाथाश्रमांचाच अध्यक्ष झालो. असं तुमच्या घरी ज्याला तुम्ही संस्कार घर समजून, अनाथाश्रम रिमांडहोमची हेटाळणी करता, तिथं कधी घडलंय?
 ...घरी मुलानं दंगा केला की तुम्ही त्याला भीती घालता...'रिमांड होममध्ये ठेवू तुला?' त्याच रिमांड होमची मुलं-मुली डॉक्टर, नर्स, इंजिनिअर, सेनाधिकारी, साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, नगराध्यक्ष होतात. हे किती जणांना माहीत आहे? रिमांड होम तुरुंगात चोरी कधीच होत नाही. चोरी फक्त सज्जन माणसांच्या समाजातच होते.
 ... असं जगावेगळं निराळं जग मी जन्मापासूनच पाहात आलो होतो. या निराळ्या जगाविषयी लिहायचं बरेच दिवस डोक्यात होतं. शिवाय हे निराळे जग असतं दुःखालय, करुणालय! तिथलं दु:ख, दैन्य सरावं म्हणून अगस्ती ऋषीसारखं आयुष्य पणाला लावून या निराळ्या जगातल्या प्रत्येक वंचित, दुःखिताचं शल्य सरावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे भागिरथी नि भगीरथही मी पाहात आलोय. अशांना वर्तमानपत्रात एका कॉलमात बंदिस्त करणारा मध्यम व माध्यम समाजही मी पहात आलो होतो. हा सर्व पिंगा डोक्यात थैमान घालत असताना एकदा दैनिक 'प्रहार' चे फीचर एडिटर राम जगताप भेटले. गप्पांच्या ओघात 'निराळं जग, निराळी माणसं' याविषयी बराच वेळ बोलत राहिलो. उठताना ते सहज म्हणाले की, "हे सर्व तुम्ही लिहीत का नाही?" मी म्हटलं, "कोण छापणार?" म्हणाले, "अरे 'प्रहार' छापेल. त्यासाठी तर तो पेपर आहे...प्रहार करण्यासाठी...जे जे विघातक आहे त्यावर हल्लाबोल करण्यासाठी तर आम्ही आहोत!" मी मग प्रवेशाचा एक लेख...इंट्रो पाठवला. त्यांनी सदरच जाहीर करून टाकलं...'निराळं जग.' त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी वर्षभर काही ते चालवू शकलो नाही. कॉलेजचं प्राचार्यपद अन् हे स्तंभलेखन तारेवरची कसरत होत राहिली अन् मी ते सहा महिन्यांतच बंद केलं. पण डोक्यात उर्वरित लेखनाचा किडा वळवळत राहिला होता. निवृत्त होताच तो उसळून, उफाळून उडू लागला. या साऱ्यांची गोळाबेरीज म्हणजे हे पुस्तक ‘निराळं जग, निराळी माणसं.' यात जग, जीवन, माणसं सारं आहे. पण प्रामुख्यानं आहे वंचितांचे संगोपन, संरक्षण, संस्कार, शिक्षण, प्रशिक्षण, उपचार करणाच्या संस्था व तेथील सेवाव्रती कार्यकर्ते!
 वेश्यावस्तीतही माणसंच राहतात. कुणाला हौस असते आपली अब्रू वेशीवर टांगण्याची? पण काही स्त्रियांच्या जीवनात तो नरक येतो. तो आयुष्यभर पिच्छा पुरवत रहातो. या उपेक्षित, वंचित वस्ती विकासाची व तेथील माणसाचं जिणं माणूसपणाचं व्हावं म्हणून कधी कुठल्या नगरपालिकेस, महानगरपालिकेस वाटलं नाही. सरकारच्या दफ्तरी वेश्यांची माणूस म्हणून नोंद झालीच कुठे आहे? वेड्यांना ते काय करतात हे कळत नसल्यानं त्याचं सारं हवं, नको पहायची जबाबदारी तिथल्या डॉक्टर, कर्मचारी, सेवकांची. पण तिथली व्यवस्था, वागणूक पाहिली की सतत वाटत रहातं... इथे सुधारणेस भरपूर वाव आहे. अंधानी शिकावं म्हणणाऱ्या शिक्षण व्यवस्थेला सर्व इयत्तांची, सर्व विषयांची पुस्तकं ब्रेल लिपीत काढायचा डोळसपणा स्वातंत्र्याच्या ७० वर्षाच्या प्रवासात दाखवता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्त्रियांचं सबलीकरण सवलतींपेक्षा त्यांना स्वयंप्रेरिका बनवून लवकर होतं हे यातील ‘स्वयंसिद्धा' संस्थेवरील लेखातून समजेल. तसेच मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या नीलिमा मिश्रांच्या बहादरपूर (जळगाव) च्या भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेच्या कार्याचा अभ्यास केला तरी कळेल. दान, अनुदान, सवलत, कर्जमाफीने आपण समाजास निष्क्रिय करतो हे ज्या दिवशी शासनास उमजेल तो मनुष्य विकासाचा सुवर्ण दिन! हीच गोष्ट अपंगांचं कार्य करणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड'च्या नसीमा हुरजूक, रजनी करकरे, पी. डी. देशपांडे प्रभृतींची. त्यांची शौर्यगाथा वाचताना तुम्हाला तुमच्या अकर्मण्यतेची जाणीवही होईल. बालकाश्रम, रिमांड होमसारख्या संस्था ‘समाज हृदय' बनतील तेव्हा आपल्या नैतिकता, सदाचार, संस्कृतीविषयक भ्रामक कल्पना गळून पडायला मदत होईल. साधा तुरुंग घ्या ना! तिथं जी माणुसकी, आपलेपणा मी पाहतो ते समाजात नाही दिसत प्रकर्षाने. हा लेखन प्रपंच तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी खचितच नाही. पण ते तुम्हास खचितच अंतर्मुख करेल व भावसाक्षरही! ‘निराळं जग, निराळी माणसं' मधील वरील संस्थांचं कार्य, कर्तृत्व घरंदाज घरांना लाजवेल असं असल्यानं ही समाजघरं मला नेहमीच माणुसकी व मानवतेची खरी ऊर्जा केंद्रे वाटत आली आहेत.
 अशा संस्थांचं आयुष्यभर कार्य करणारे सेवाव्रती, त्यांची चरित्रं वाचली की आपण किती स्वार्थी व अप्पलपोटी आयुष्य जगतो हे जाणवतं. इंदिराबाई हळबे यांनी जात, पात, धर्माचा विचार न करता आडवस्तीत अडलेल्या सर्व मातांना प्रसूतीच्या वेळी हात दिला. कुमुदताई रेगेंनी स्वत: अविवाहित राहून आयुष्यभर गांधीवादी मूल्यांची पाठ राखण करत कोकणासारख्या दुर्गम भागात विधवा, परित्यक्त स्त्रिया व त्यांच्या मुलांचा सांभाळ केला. संस्थेतील सर्व वंचितांचं खाणं, पिणं, शिक्षण व्हावं म्हणून पोल्ट्री चालवणं, गिरणी काढणं, शेत कसणं, हे सारं त्यांनी केलेलं पाहिलं की वाटतं ही माणसं खरी समाज पोशिंदी! दादा ताटके स्वत:च्या उपजीविकेसाठी नोकरी करतात व नोकरी व्यतिरिक्त सारा वेळ माटुंग्याच्या श्रद्धानंद महिलाश्रमास देऊन ती संस्था 'घर' करतात. आज घरं अनाथाश्रम होत असल्याच्या काळात मला हे अधिक महत्त्वाचं वाटतं. आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले म्हणजे साऱ्या जगाची चिंता लागून राहिलेले अस्वस्थ अश्वत्थामाच! वेश्यांची मुलं हृदयाशी लावणाऱ्या विजयाताई लवाटे असो वा वेश्यांचं शल्य सांभाळणारे अहमदनगरचे आमचे मित्र डॉ. गिरीश कुलकर्णी असो, साऱ्यांत मला दुसऱ्यांसाठी वाहणारा अखंड पाझरच दिसला. रमाकांत तांबोळी म्हणजे क्षणोक्षणी समाजध्यासी गृहस्थ! अजीजभाई भयाणींना मी माझ्या कळत्या ५० वर्षांत एक शब्द न बोलता काम करतानाच पाहिलं! कुठून येतो हा संयम, सद्भाव, सभ्यता? अनुराधा भोसले प्रत्येक समाजातील दगड प्रश्नांवर डोकं आपटणारी फुलनदेवी कशी होते? काय रसायनाने तयार झालेत इव्हान लोमेक्स, शिवाजी पाटोळे, पवन खेबूडकर, अशोक रोकडे, संजय हळदीकर? मंगला शहांना का पडावा एड्सग्रस्त मुलांचा घोर! हे सारे अस्वस्थ प्रश्न या लेखनाचे खरे प्रेरणास्त्रोत होत. ही माणसं जागी आहेत म्हणून समाज निवांत झोपू शकतो. अशी कल्पना करून पहा ना... या संस्था नि हे सेवाव्रती नसते तर समाज कसा बीभत्स, ओंगळ झाला असता. समाजस्वास्थ्य डी. डी. टी. फवारून निर्माण होत नसतं. माणुसकीची फुंकर जे काम करते ते आयोडिन नाही करू शकत. 'निराळं जग, निराळी माणसं' समाज वंचनेचे हरण करणारं लेखन होय. ते माझ्या आयुष्यभराचं अस्वस्थपण होतं. या लेखनाने मी थोडा हलका झालो. समाजही तो वाचून हलेल तर वंचितांच्या व्यथा, वेदना हलक्या होतील.
 अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, वेश्या, कुमारीमाता, देवदासी, परित्यक्ता, बलात्कारित भगिनी, वृद्ध, अपंग, अंध, मतिमंद, मनोरुग्ण, तृतीयपंथी, आपादग्रस्त, बंदी, इ. साऱ्यांनी बनलेलं वंचितांचं विश्व म्हणजे समाजातलं तिसरं जगच. एक तुमचं गावकुसातलं, दुसरं गावकुसाबाहेरचं दलितांचं अन् हे तिसरं जग वंचित, उपेक्षितांचं. माणूस असून समाजलेखी माणूस म्हणूनही न नोंदलेलं हे जग आपोआप नाही निर्माण झालं. तुम्हीच त्याचे कर्ते - करविते. म्हणून खरं तर त्यास जबाबदार तुम्हीच व ती तुमचीच जबाबदारी. ती तुम्ही पार नाही पाडत म्हणून संस्था जन्मतात नि उभारतात हिमती, हिकमती समाज कार्यकर्ते! मी या साऱ्या संस्था, कार्यकर्त्यांसह काही लुडबुड करत असताना त्याचं मला जे आकलन झालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून मी 'निराळे जग, निराळी माणसं' लिहिलं. या साऱ्या संस्था व कार्यकर्त्यांसह सह माझं जीवन अधिक संवेदी व समाजबांधील झालं. आजही मी या विश्वाशी नाळ तोडू शकलो नाही, कारण या नाळेतलं रक्त अजून सुकलेलं नाही.

डॉ. सुनीलकुमार लवटे

अनुक्रमणिका

निराळं जग
१. काहीच नक्की नसलेलं जग : वेश्यागृहे / १७
२. खुळ्यांची चावडी : मनोरुग्णालय / २२
३. अंधांचं एकलव्य विद्यापीठ : निवांत विकासालय / २७
४. अपंगांच्या स्वराज्याचं स्वप्न : हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड / ३२
५. स्त्री-विकासाचा स्वावलंबी प्रयोग : स्वयंसिद्धा / ३७
६. हरवलेलं माणूसपण बहाल करणारं घर : बालकाश्रम / ४२
७. बदललेलं जग : बालकल्याण संकुल / ४७
८. माणुसकीची मुक्तांगणं : तुरुंग / ५२

निराळी माणसं
१. मातृमंदिराच्या मावशी : इंदिराबाई हळबे / ६०
२. कोकणच्या कस्तुरबा : कुमुदताई रेगे / ६५
३. अनाथ महिलांचा आधारवड : दादासाहेब ताटके / ७१
४. महाराष्ट्राच्या बालकल्याणाचे भीष्माचार्य : डॉ.शरच्चंद्र गोखले / ७७
५. वेश्यांना माणूस बनवणारी आई : विजयाताई लवाटे / ८३
६. सार्वजनिक पप्पा : अजीजभाई भयाणी / ८८
७. वन मॅन आर्मी : रमाकांत तांबोळी / ९३
८. आय ऍम डुइंग माय जॉब : इव्हान लोमेक्स / ९७
९. निर्माल्य समाजाची निर्मला : मंगला शहा / १०१
१०. मतिमंदांना माणूस बनवणारा शिक्षक : पवन खेबूडकर / १०६
११. वेश्यांचं शल्य जपणारे : डॉ.गिरीश कुलकर्णी / १११
१२. वृद्ध सेवक : शिवाजी पाटोळे / ११७
१३. बाल्य जपणारी फुलनदेवी : अनुराधा भोसले / १२२
१४. घायलों का कायल : पी. डी. देशपांडे-करकरे / १२७
१५. शोकार्थ अगस्ती : अशोक रोकडे / १३२
१६. सर्वत्र आमुच्याच खुणा : संगीत आणि भारत निकम / १३७
१७. भयमुक्त बाल्याचा किमयागार : संजय हळदीकर / १४३
निराळं जग

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

काहीच नक्की नसलेलं जग : वेश्यागृहे

 ही गोष्ट १९९०-९२ ची असावी. मी त्या वेळी महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेचा सरकारनियुक्त अध्यक्ष होतो. ही संस्था म्हणजे सरकार व समाजाने मिळून समाजकार्य करण्याचे व्यासपीठ होतं. राज्यातल्या अनाथ, निराधार व बालगुन्हेगार, हरवलेली मुले, अल्पवयीन वेश्या, देवदासी, कुष्ठपीडित, दुभंगलेल्या कुटुंबातील मुले-मुली, कुमारीमाता, अनौरस बालके, परित्यक्ता, भिक्षेकरी असं संगोपन, संरक्षण, सुसंस्कार, शिक्षण, पुनर्वसनाची गरज असलेल्या हजारो मुले, मुली व महिलांचं हे राज्यभराचं मोठं कुटुंबच होतं. अनाथाश्रम, बालिकाश्रम, महिलाश्रम, रिमांड होम, बालगृह, अनुरक्षण गृह अशा संस्थांची ही मध्यवर्ती संघटना. तिथे सामाजिक कार्यकर्ते व शासकीय अधिकारी मिळून एकदिलाने काम करायचे. संस्थांचं एक रुटीन कार्य असायचं. ते चालायचं; पण कधी-कधी आणीबाणीचे प्रसंग उद्भवायचे.
 या काळात एका प्रसंगानं मात्र मला एका निराळ्याच जगात नेलं. त्या वेळी मुंबई उच्च न्यायालयापुढे एका अल्पवयीन मुलीचा प्रश्न होता. तिचं अपहरण करण्यात आलं होतं. छडा लागत नव्हता. पालक हवालदिल होते. पोलिसांची निष्क्रियता पालकांना अस्वस्थ करत होती. त्या प्रश्नी उच्च न्यायालयाने पोलिसांवर तीव्र ताशेरे मारले होते. त्याचे निमित्त करून रेस्क्यू फाऊंडेशन, प्रेरणा, अपनेआप, संलाप, तेरेदेस होम्स, प्रज्वला, मानव अधिकार आयोगासारख्या संस्थांनी अल्पवयीन वेश्यांसंदर्भात पोलीस आपले हितसंबंध जपण्यासाठी कारवाई करत नसल्याची हाकाटी सुरू केली होती. वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून छापून यायला लागले, तसे पोलीस खाते खडबडून जागे झाले. आपली सर्व यंत्रणा पणाला लावून व भरपूर होमवर्क करून त्यांनी कामाठीपुरा, फोरास रोड आदी वेश्यावस्त्यांवर छापे टाकले व एका दिवसात शेकडो अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली. त्यातून त्यांना सांभाळण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला. यापूर्वीही मोहिमा होत; पण जुजबी अटक व्हायची. निभावलं जायचं! पण, आता ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' अशी स्थिती निर्माण झाली!
 मला तो प्रसंग चांगला आठवतो. चिल्ड्रन एड सोसायटी, महाराष्ट्र परिवीक्षा, महिला बाल कल्याणचे सर्व संचालक, परिवीक्षा अधिकारी गांगरलेले होते, ते मुलींच रूप, अवतार बघून, त्यात पोलिसांनी 'सब घोडे बारा टक्के' समजून मुलींबरोबर प्रौढ महिलांनाही अटक केली होती. या शेकडो मुली, महिलांना आमच्या संस्थांतील मुलींबरोबर ठेवणं म्हणजे 'आ बैल मुझे मार' अशी स्थिती! मग आम्ही एक निर्णय घेतला की, या सर्वांवर नियंत्रण ठेवायचं, तर त्यांना एका स्वतंत्र संस्थेत ठेवायचं. या निर्णयालाही एक कारण घडलं. पोलीस जेव्हा अशी अटक करतात, तेव्हा जाबजबाब, पंचनामा, एफ.आय.आर. यात भरपूर वेळ जातो. अटक केल्यापासून चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर कागदपत्रं, कलम यासह हजर करणं बंधनकारक असतं. दरम्यान त्यांना कुठं तरी एकत्र ठेवावं लागतं. शेकडो मुलींना एकत्र ठेवणारी कस्टडी नव्हती. संडास, बाथरूम नव्हते. या मुली-महिलांना पोलिसांनी भत्त्यातून पुरीभाजी आणली, तर ती त्यांनी साफ नाकारली. 'बिर्याणी है तो बोलो! बियर कहाँ है? साला बर्गर तो देते! कोठे पे आते है, तो इंग्लिश फर्माते है (स्कॉच व्हिस्की) और यहाँ चाय पिलाते है पानी का. भाडखाऊ साले!' असे डायलॉग ऐकून पोलीस केव्हाच बाजूला झाले होते. आता कसोटी आमच्या परिवीक्षा अधिकाऱ्यांची नि आमची होती.
 दरम्यान, कोठीवाल्या मालकिणी, दलाल, पंटर, प्रियकर, गिऱ्हाईकं (कायमची) यांची गर्दी वाढत होती. काळ्या धंद्याची सूत्रे हलवणाऱ्या व्हाइट कॉलर सोशल वर्करांचे फोन घणघणत होते. क्षणाक्षणाला प्रेशर वाढत होतं. आम्ही हातातला वेळ लक्षात घेऊन स्ट्रॅटेजी तयार केली. या मुली, महिलांना मुंबईत ठेवणं धोक्याचं, कटकटीचं ठरणार, असा अंदाज घेऊन न्यायालयाचा आदेश होताच यांना मुंबईबाहेर काढायचं ठरलं. पुण्याजवळील मुंढवा येथे आमचं मुलींचं सर्टिफाईड स्कूल होतं. प्रशस्त व बंदिस्त. रात्रीत ते रिकामं केलं. तेथील मुली दुसऱ्या संस्थेत हलवल्या. तिथे अधिक स्टाफ आणला.
 दुसऱ्या दिवशी कोर्ट ऑर्डर होताच सगळ्या गाड्या सायंकाळी चार पाचपर्यंत पुण्यात दाखल झाल्या. काही रात्री आठपर्यंत येत होत्या. सलामीला गोंधळ नको म्हणून बिर्याणी खिलवली. बरॅकमध्ये विभागणी केली. तशी 'कॉट कहाँ है? गद्दी कहाँ है?' 'मच्छर बहुत है, म्युझिक नहीं?' हे सर्व प्रश्न आम्हाला नवे होते आणि बुचकळ्यात पाडणारे होते.
 केसेस सहा महिने चालत राहिल्या. कोर्ट व शासनाने त्यांना पुनर्वसनाचे पर्याय द्यायचे आदेश काढले. पण, या मुली प्रतिसाद द्यायला तयार नसायच्या. त्या रेड लाइट संस्कृतीत मोठ्या झाल्या होत्या. त्यातील अधिकांश बांगला देश, नेपाळ, आसामच्या; नंतर दक्षिणेतल्या अधिक, महाराष्ट्रीय कमी. त्या काळात आम्ही पत्ते मिळवून पालक, घरे शोधली. काही मुलींनी पालकांकडे जायचं नाकारलं. काहींना पालकांनी नाकारलं. अपवादात्मक मुली घरी गेल्या. त्यांची वयं ठरवणं मोठं दिव्य काम होतं. अधिकांश अशिक्षित. जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला नाही. वय ठरवणं आवश्यक होतं. एक्स-रे मशिननी मदत केली. ससूनमधून वयाचे दाखले मिळवले. बऱ्याच प्रौढ निघाल्या नि आम्ही आणि पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला. त्यांच्या केसेस निकाली निघाल्या. त्या परत कोठ्यांवर हजर झाल्या. ज्या अल्पवयीन होत्या, त्यांना सांभाळलं. त्यातल्या काही खरंच गरिबीमुळे वेश्या व्यवसायात आलेल्या. काहींना बापांनीच विकलेलं. काहींना कामाच्या आमिषानं फसवलेलं. काही स्वतः पळून आलेल्या. काही नट्या होण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या. यातल्या रंजना, सबीना, जमिला, मृगा, जॅकी, लैला, सकीनाबी, अर्जुना, स्टेला, रुख्माक्का, अकैय्या यांच्या कहाण्या आजही माझ्या मनात घर करून आहेत. नंतरही मी कधी कंडोम्सच्या प्रसार प्रचारासाठी, एड्स प्रतिबंध कार्यक्रमासाठी, कधी वेश्यांच्या मुलामुलींच वसतिगृह चालवायच्या निमित्तानं, वेश्यांच्या मुलांचं पाळणाघर, बालवाडी चालवायचं म्हणून अनेक वेश्यावस्त्यांना भेट देत राहिलो.
 मला आठवतो दिल्लीचा जी. बी. रोड-गार्टिन बॅशन रोड. ते एका ब्रिटिश कलेक्टरचं नाव. मध्ये या मार्गाचं नाव बदलून स्वामी श्रद्धानंद मार्ग केलं. चांगल्या हेतूने, पण गिऱ्हाईके, रिक्षावाले, टॅक्सीवाले, सर्वांच्या लेखी तो अजून जी.बी.रोडच आहे. गेल्या शतकात होता तसाच. तीच गोष्ट मुंबईच्या कामाठीपुरा नि फोरास रोडची. मी कळत्या वयात पहिल्यांदा दुरून, जिज्ञासेनं पाहिलेल्या या वस्त्या. आजही, बाहेरून आहेत तशा. आत मात्र कुठं कुठं स्पार्टेक्स, मार्बल आलाय. रेडिओची जागा टीव्हीनं घेतली. गल्ल्यांची व जिन्यांची रुंदी मात्र आधीचीच. पुण्यातली बुधवार पेठही याला अपवाद नाही. एक बदल झालाय अलीकडे. आयटीतलं गिऱ्हाईक वाढलं, तसा दर वधारलाय. पूर्वी आर्मीचं फुकट गिऱ्हाईक मोठं होतं. आषाढात गिऱ्हाईक वाढतं. हा नवा ट्रेंड आहे.  वेश्यावस्तीतलं जग आपल्या जगापासून वेगळं, निराळं असतं. याचं मुख्य कारण इथल्या घड्याळाचे काटे आपल्या घड्याळाच्या उलट दिशेने फिरत असतात. आपला दिवस मावळतो, तेव्हा त्यांचा दिवस उजडत असतो. आपल्या घरी उठायची लगबग असते, तेव्हा तिथलं जग साखरझोपेत असतं. कधी पाच दहा अन् मोसमात पंधरा वीस गि-हाईकं झेलत मलूल झालेल्या शरीराला झोपावं लागत नाही. कूस बदलावी लागत नाही. गिऱ्हाईक मंदावलं की शरीर, डोळे, इंद्रिय आपोआप मिटतात.
 संध्याकाळ ते पहाट हा त्यांचा दिवस असतो. ही वेळ आपल्या मंडई, बाजार, ऑफिसेस, बँकांच्या लगबगीसारखी इथं कशी फुलून येते. आपली पहाट ते दुपार म्हणजे त्यांची रात्र. आपली वामकुक्षी म्हणजे त्यांची सकाळ. तयार होण्याची वेळ. दात घासणं अर्धा तास, मशेरी लावणं, गप्पा, फिरक्या, कालच्या गिऱ्हाईकांच्या गंमती, कोठीवाली, दलालांचे हिशोब करत संध्याकाळ केव्हा होते कळत नाही. संडास, अंघोळीसाठी पाळी, भांडणं, झिंज्या उपटणं रोजचंच. शिव्या हा संवादाचा अविभाज्य भाग, वेश्या आणि पोलीस यांच्या भाषेत, उच्चारात बरंच साम्य असतं. इथं रजा नसते, खाडा नसतो; असलाच तर ओव्हर टाइम! तुमचा सुट्टीचा दिवस म्हणजे इथं हंगाम, वसंत ऋतू असतो! इथे कोठीवाली असते बॉस. ती दरडोई गिऱ्हाईकं मोजत हिशोब घालते. कोणी आपल्या खोलीच्या स्वत:च मालकीणी असतात. स्पेशल खोली मात्र क्वचित! तशी असेल तर ती राणी! त्यांचा मेहनताना अनिश्चित. तो गिऱ्हाईक, सवड, फर्माईशीवर ठरतो. कोठीतला, खोलीतला दर वेगळा, हॉटेलात रात्र घालवायची, तर दर वेगळा. विदेशी, आयटीमधलं बिझनेसमन गिऱ्हाईक म्हणजे मालामाल। आर्मी टोळधाड म्हणजे मारामारी! प्रत्येक रात्र जीवघेणी असते, प्रत्येक गिऱ्हाईकाची तऱ्हा वेगळी, ध्येय एकच, बक्कळ पैसा! प्रत्येक गिऱ्हाईक त्यांच्यासाठी वेगळं; पण प्रत्येक गिऱ्हाईकच्या लेखी त्या मात्र वेश्याच!
 त्यांचा मुख्य खर्च खोली भाडं, कपडे, नट्टापट्टा, चहापाणी, जेवण कधी फुकट, तर कधी पदरमोडीचं! ऑन कॉलही जावं लागतं. कधी घरी, ऑफिसात. लॉज, लॉन, बीचवर, कधी गिऱ्हाईक मिळवावं लागतं. तर कधी दलाल घेऊन येतात. कोण प्रामाणिक, कोण बेईमान. सर्व अनुभवानं ठरतं! दलाल असतात त्यांचे संरक्षक गार्ड!
 बऱ्याच जणी अगोदर अल्पवयीन वेश्या. प्रौढ होऊनही येतात; पण त्यांना डिमांड कमी! प्रौढ गिऱ्हाईकही अल्पवयीन वेश्येचीच डिमांड करतं.
 वेश्यावस्तीचं उदरभरण म्हणजे 'बी व्हिटॅमिन' - बिर्याणी, बर्गर, बियर, बीफ! फेअर अँड लव्हली, पँटीन, हेअर अँड शोल्डर, परफ्युम्स, डीओ, लिपस्टिक, पावडर, ब्रँडेड कपडे यांचा शौक; पण सारं नकली वापरण्यावर भर! महिन्यात १५ दिवस चांगला धंदा झाला, तर दिवाळी!
 काही वेश्यांना मुलं असतात. त्यांच्यात मातृत्वाचा झरा असतो. प्रत्येकीची ती आस असते; पण न परवडणारी. मुलं होणं म्हणजे डिमांड कमी होणं. मुलं असतात; पण त्यांना वडील नसतात. वडील कोण, हे ठरवणं अवघड असतं. आजचं गिऱ्हाईक उद्या येतंच असं नाही! मुलं असणं म्हणजे धंद्यात विघ्न. बाळ असलं, तर अफूची गोळी देऊन कॉटखाली, शेजारी निजवायचं. खेळत्या बाळाला धंद्याच्या वेळी पिटाळायचं. रोज मन मारून जगायचं. हेच इथलं जीवन, इथला क्रम!
 वेश्यावस्ती ज्या भागात असते, तिथल्या पोलीसचौक्या हप्त्यांनी बांधलेल्या. तक्रार झाली, केस झाली की, तोडपाणी ठरलेलं. काही साहेबांना मोफत सर्व्हिस द्यायला लागते. सारा मामला 'तेरी भी चूप और मेरी भी.' काही अधिकारी मदत करणारे; पण...
 सण, सुट्या, दिवाळी, ख्रिसमस, मे म्हणजे हंगाम. अलीकडे परिषदा, मेळावे, जत्रा, सभा, बरकत घेऊन येतात. सणासमारंभात ऍडव्हान्स बुकिंगही असतं. अलीकडे नोकरदार (सरकारी, निमसरकारी, खासगी) गिऱ्हाईकांत वाढ, दरही चढे! यांच्या कोठ्यात दिवाळीचा अर्थ रोषणाई, नवे कपडे, फटाके, अत्तर, मिष्टान्न, पण धंदा ठरलेला! रात्र जागी, रात्र बाकी!
 इथल्या जीवनाची सारी मदार कंठलेल्या, गेलेल्या दिवसावर असते. इथला उगवणारा उद्याचा दिवस अशाश्वत असतो. तो असतो अंधार, अंदाज आणि अगर मगरचा! काल आणि उद्याच्या मध्ये सँडवीच झालेलं इथलं जीवन. इथं काहीच नक्की असत नाही. गिऱ्हाईकं दर, मिळकत, दिवस रात्र, जगणं... काहीच नक्की नसलेलं जग.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

खुळ्यांची चावडी : मनोरुग्णालय

 मनोरुग्णांचं निराळं जग कोणत्याही संवेदनशील माणसाला व्यथित, चिंतित करणारं, शहाण्या माणसांचा सारा समाज खुळ्यांची चावडी ठरवणारं. लहानपणापासून अनाथाश्रमांच्या जगात वाढताना मनोरुग्ण पाहिले होते. पण त्यांच्याकडे डोळेझाकच सुरू होती. डोळे उघडले हळूहळू. पण, समाज मनोरुग्णांकडे उघड्या डोळ्यांनी कधी पाहणार?
 मी लहानपणी पंढरपूरच्या बा. बा. नवरंगे बालकाश्रमात होतो. संस्थेच नाव बालकाश्रम असलं, तरी तिथे एक दिवसाच्या बाळापासून ते शंभर वयाच्या आजीपर्यंत सुमारे ३०० जण होते. मुलं, मुली व महिला. अनाथ, कुमारीमाता, परित्यक्ता, विधवा, वृद्धा, वेश्या, मुक्या स्त्रिया! कोण नव्हतं तिथे असा प्रश्न पडेल, अशी स्थिती. इथले कोणीच कुणाचे नव्हते. म्हणजे तुम्ही घरात कसे रक्ताच्या नात्याने आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा असता, तसे आम्ही नसलो, तरी ही सारी नाती आमच्यात होती. अर्थात, मानलेली.
 मी ज्या खोलीत राहात होतो, तिथे एक खोली सोडून 'वेड्याची खोली' होती. तिला आम्ही शालिनीची खोली म्हणत असू. शालिनी आमच्या आश्रमातली अविवाहित प्रौढा. आश्रमात मुली उपवर झाल्या की, त्यांची लग्न व्हायची. लग्नापूर्वी केळवणं, ओटी भरणं सारं असायचं. कुणाचं लग्न ठरल्याची कुणकुण लागली की, शालिनीच्या अंगात यायचं. वेडाचाच झटका तो. एरवी शांत, अबोल असलेली शालिनी क्रुद्ध, आक्रमक, बडबडी बनायची. अंगात एक वेगळ्या तेजाचा संचार व्हायचा तिच्यात. मग तिला तिच्या खोलीत डांबलं ________________

जायचं. तिला खोलीत डांबायला दहा बायका लागायच्या. सर्वांना पुरून उरायची ती! आपलं लग्न नाही केलं. या रोजच्या अन्यायाच्या भावनेतून हे बळ तिच्यात येत असावं. खोलीत कोंडलं की, ती घाण्याच्या बैलासारखी घरभर गाणं म्हणत फिरायची. गाणी असंबद्ध असायची; पण आमच्या आकर्षणाचं केंद्र व्हायची. 'बाबा गेले पैठणाला', 'बापू याऽऽ या', 'ताई याऽऽ या', असं काही बाही बरळत, बडबडत राहायची. बालपणी आम्हा सर्व मुलांसाठी वेडी शालिनी, आंधळी लीला, लुळी मुन्नी, मुकी लोल्या, बोबडी उंदी, ढब्बी अव्वा, भाजलेली रांजी या सगळ्या जणी चेष्टा, मस्करी, चिमटे, मागं लागणं अशा बाललीलांचं साधन होत्या.
 वयानं थोडा मोठा झाल्यावर मी कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये आलो. तिथंही अधीमधी खुळी मुलं यायची. पोलिस त्यांना धरून आणायचे. रस्त्यावर दंगा केला, हल्ला केला, नागडा फिरतो म्हणून. त्याला लगेच रत्नागिरीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं जायचं. पण, बदलीपर्यंतच्या काळात तो मुलगा सर्व संस्था डोक्यावर घ्यायचा.
 या खुळ्या-वेड्यांकडे मीही डोळेझाकच करत असे. माझे बंद डोळे उघडले ते, जेव्हा मी आजारी पडलो आणि मला कोल्हापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तेव्हा. सी.पी.आर. हॉस्पिटलची मुख्य वास्तू म्हणजे जुनं किंग एडवर्ड हॉस्पिटल. त्यामागे पूर्वी पेशंट्सना ठेवलं जायचं, त्याला 'खुळ्याची चावडी' म्हणायचे. तिथंच रिमांड होम, जेलमधील मुलामाणसांना ठेवायचे. त्या हॉस्पिटलमध्ये घालवलेले ते तीन दिवस! माझा ताप उतरण्याऐवजी चढतच राहिला. डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ‘याला संस्थेतच ठेवा, लवकर बरा होईल', असे म्हटले अन् तसंच झालं. मी बिनऔषधाचा बरा झालो.
 मी प्रौढ झालो अन् या संस्थांचे काम करू लागलो. माझ्या लहानपणापासून वेड्यांचं जे जग मी पाहिलं, अनुभवलं होतं त्यानं मला विकल केलं होतं. विकल करण्याची अनेक कारणे होती. ती वेडी शालिनी जेव्हा चांगली, धडधाकट असायची, तेव्हा माझा सांभाळ करायची. मोठा झालो तसं तिच्या वेड्याचं कारण समजून विचार करत राहायचो. आश्रमानं तिचं लग्न केलं असतं तर? आश्रमानं तिच्यावर उपचार केले असते तर? पण, त्या तीनशे माणसांच्या घरात शालिनीचा एकटीचा विचार करायला सवड कुणाला होती?
 ज्योत्स्नाताई! शालिनीसारखीच माझ्या मानलेल्या आईची, म्हणजे मला जिने सांभाळलं त्या आईची पोटची मुलगी होती ज्योत्स्ना. आम्ही तिला ताई म्हणायचो. हात पाय वाकडे, फिट्स यायच्या. शी-शूचं भान नसायचं. कपड्यांविना राहणं, वेडवाकडं बोलणं, शिव्या देणं, अस्सल शिव्या मी पहिलीत जाण्यापूर्वीच शिकलो होतो.
 संस्थेच्या कामानिमित्त मी नागपूरचं मेंटल हॉस्पिटल पाहिलं. अनेक रुग्णांना भेटलो. तिथं आमच्या संस्थेतील एक मैत्रीण नर्स होती. तिचे मिस्टर मेल नर्स होते. 'स्किझोफ्रेनिया' लिहिणारे कवी गणेश श्रावण चौधरी यांना मी इथंच भेटलो होतो. ते तिथं शिक्षा भोगत उपचार घेत होते. त्या वेडाच्या भरातही ते कविता म्हणायचे, लिहायचे. ते मेंटल हॉस्पिटलमध्ये असतानाच बहुधा त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित झाला होता.
 आज या साऱ्यांना आपण ‘मनोविकारी' मानतो. मेंटल हॉस्पिटल आता 'मनोविकास संस्था' झाल्यात. हा केवळ नावातला बदल आहे. त्यात वृत्तिबदल अपेक्षित आहे. शहाण्यांनी तरी वेड्यांकडे शहाण्यासारखं पाहावं. त्यांच्याशी शहाण्यासारखं बोलावं, वागावं असं आता जगभर मानलं जातं. तुम्हाला माहीत आहे का? हे सारे मनोविकारी, वेडे असतात मुळात अतिसंवेदनशील, हळवे, विचारी, ते नको तेवढा विचार करतात, म्हणून वेडे होतात. त्यांच्यावर नको तितके असह्य अत्याचार होतात, मग त्यांचा संयम सुटतो. त्यांच्याकडे अधिक सहानुभूतीनं पाहण्याची गरज असते. आपण मात्र अक्षम्य दुर्लक्ष करतो.
 अनाथ, निराधारांचे संगोपन, पुनर्वसन कार्य करताना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा प्रतिनिधी म्हणून मी अनेक कारागृहे, मेंटल हॉस्पिटल्स पाहात आलोय. तिथलं आजचं चित्र नुसतं विदारकच नाही, तर विषण्ण, अस्वस्थ करणारं आहे. शासकीय मनोरुग्णालयांच्या सर्व इमारती जेल सारख्याच आहेत. उंच भिंती, संख्येच्या तुलनेने सुविधा सीमित. सर्व रुग्णालयं क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांनी भरलेली. दुर्गंधीनं भरलेले वॉर्डस. संडास व वॉर्ड्समध्ये फरक शोधावा लागेल, असं साम्य. पाण्याचा तुटवडा. गरजेपेक्षा कमी प्रकाश. दिवसा तसाच रात्रीही. बंदिस्त वॉर्ड्स, जेलसारख्या बरॅक्स. खोल्यात कॉट्स ढेकणांनी भरलेले. गाद्या गुवामुताने कुजलेल्या. त्यावर मळकट, फाटक्या चादरी, बंदिस्त दुर्गंधीमुळे वेड वाढायचीच शक्यता अधिक. त्यातही बंदिजनांचे वॉर्ड्स अधिक निष्कृष्ट. स्त्रियांच्या वॉर्ड्समध्ये कानाडोळा. मानसिक आरोग्य कायदा आहे, त्यात अशा संस्थांचा किमान दर्जा, मूलभूत सोयी, संख्या व सुविधा यांचे प्रमाण नोंदलं आहे; पण प्रत्यक्ष सर्वत्र त्याचे उल्लंघनच. एकदा उच्च न्यायालयात या दु:स्थितीबद्दल पुण्याच्या चंद्रकला सामंतांनी लोकहित याचिका दाखल केली होती. शासकीय आरोग्य विभागानं ही रुग्णालयं चांगली असल्याचा निर्वाळा दिला, तेव्हा याचिकाकर्त्याच अचंबित! मग जिल्हा सत्र न्यायाधीशांनी भेटी दिल्या. पुढे मानवाधिकार आयोगानंही एक अहवाल जाहीर केला अन् वास्तव जगासमोर आलं. जगासमोर आलेलं मनोरुग्णांचं निराळं जग कोणत्याही संवेदनशील माणसास व्यथित, चिंतित करणारं, शहाण्या माणसांचा सारा समाज खुळ्यांची चावडी ठरवणारं, सिद्ध करणारं!
 मी काम करत असतानाचे प्रसंग आठवतात. सिंधू कोल्हापूरच्या कपिलतीर्थ मंडईत भाजी विकून पोट भरायची. ती लहानाची मोठी कशी झाली. इथं कशी आली, भाजी केव्हापासून विकते; सारा इतिहास मठ्ठ अंधार! निराधारांना ना वंश, ना जन्म, ना नाव, ना नाती, ना रक्त, ना वंशावळ, ना इतिहास. आला क्षणच त्यांचं सत्य. वर्तमानच त्यांचे जीवन, ना घर, ना घाट! तिच्यावर झोपेत असताना कुणा नराधमाने बलात्कार केला. तशी ती पिसाट, मोकाट, वेडीपिशी झाली! पुरुष जातीची दिसताक्षणी ऍलर्जी झालेल्या सिंधूला आम्ही रत्नागिरीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करून नॉर्मल केलं. तिचं संस्थेमार्फत रीतसर बाळंतपण झालं. बाळ झालं. तशी ती थंड, शांत झाली; पण तरीही वेडीच. बाळाची तपासणी केली, ते रडवं होतं. सिंधू सांभाळू शकेल, असं वाटेना म्हणून बाळ अलगद काढून घेतलं. हळूहळू ती बाळाला विसरली. तिच्या बाळाला आम्ही दत्तक दिलं. ती सांभाळू शकत नव्हती. शिवाय तिला पाशमुक्त करायचे म्हणून. संस्थेत एकदा दोन मुलींची लग्नं एकाच वेळी होती. मी त्या गडबडीत होतो अन् सिंधू ऑफिसात आली. लाजत, मुरडत, लटकेच म्हणाली, "दादा माझं बी लगीन करा की." ती तिच्या नॉर्मल होण्याची मी खूण मानली. मनोविकार तज्ज्ञांशी, डॉक्टरांशी चर्चा केली. औषधोपचार सुरूच होता. तिला कोकणात दिली. तेथे ती रमली; पण मध्ये मध्ये वेड उचल खायचं. तरीही ती नांदत होती. तिचा शेवट मात्र चांगला झाला नाही. कुंपणानंच शेत खाल्लं.
 मनोविकारग्रस्त रुग्णांना, उपचारक्षम अपंगमतींना मानव अधिकार संकल्पनेनुसार जगण्यासंबंधीचे काही मूलभूत अधिकार दिलेत. त्यांना सन्मानानं जगण्याचा हक्क, उपचार हक्क, संपत्तीत समान वाटा, त्यांच्या मतांचा आदर अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. 'जाम'सारखी संस्था त्यांना मताधिकार, निवडणूक, भागीदारी इ. हक्कांपासून वंचित ठेवणाच्या शहाण्यांच्या कालबाह्य समाजाविरुद्ध लढत आहे. वेडा आहे, उपचार असह्य आहे म्हणून कुणाला मारता येत नाही. इच्छामरणही देता येत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचे निकालच सांगतात. जग आज प्रगल्भ झालंय. कुणाला आता वेडं, अपंग म्हणता येत नाही. जसा जातिवाचक शब्द उच्चारता येत नाही; तसाच हाही दंडनीय अपराध ठरतो. जगात स्थितीवाचक दूषण देता येत नाही. उपचारक्षम, विशेष सक्षम, असे सकारात्मक शब्द रूढ होत आहेत. त्यामागे एक तर्क आहे, कोणताही माणूस दुर्लक्षित, उपेक्षित राहता कामा नये. कुणासही एक अंगुल नीच नाही ठरवता येणार. जो जसा आहे तसा त्याला स्वीकारून त्याला अधिक सक्षम, सभ्य, प्रतिष्ठित करणं, त्यासाठी संधी, उपचार, सुविधा देणं हे आता प्रगल्भ समाजाचे कार्य आहे, असं समजलं जातं.
 अजित, मुन्नी, भारती, मंजुषा, रवींद्र अशा कितीतरी मुलामुलींना आम्ही नॉर्मल केलं, ते औषधोपचारांनी नव्हे, तर त्यांचं सामाजीकरण करून, त्यांना भिन्नमती विकास शाळेत घालून. आता अनुभवांती मी या निष्कर्षाला आलोय की मतिमंद असणं ही उपजत गोष्ट असते. संयमानं त्यांना सावरता, सांभाळता येतं. ती शहाणीसुरती होतात. पण, शहाणीसुरती माणसं वेड्यासारखी वागतात ही माझ्यापुढची खरी सामाजिक समस्या आहे. कारण, वेडं करणाऱ्या शहाण्या माणसांची संख्या, जागतिकीकरणात वाढते आहे. मनोविकार, मनोविकृती वाढत जाऊन समाज खुळ्यांची चावडी होतो आहे, हे अधिक चिंताजनक आहे.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

अंधांचं एकलव्य विद्यापीठ : निवांत विकासालय

 मीरा कुर्तकोटी त्यांचं मूळ नाव. कुर्तकोटी हे भारतीय वेदान्त क्षेत्रातील अग्रणी नाव होतं. त्यामुळे त्यांच्या घराण्यात शंकराचार्य परंपरा आहे. नाशिक, कोल्हापूर (करवीर) पीठाचे शंकराचार्य होण्याचा मान मिळालेल्या घराण्यात मीराताईंचा जन्म झाला. त्यांचे वडील सेंट्रल एक्साइजमध्ये मोठे अधिकारी होते व त्यांच्या नेहमी बदल्या व्हायच्या. त्यामुळे मीराताईंचं शिक्षण त्रिस्थळी झालं. १९७४ मध्ये बी.ए. (इंग्रजी) त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून केल्यानंतर मुंबई विद्यापीठातूनच त्या १९७६ साली एम.ए. (इंग्रजी) झाल्या. पुढे बीएड. मग नोकरी आलीच. पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलमध्ये इंग्रजीच्या शिक्षिका झाल्या. दरम्यान १९७८ मध्ये त्यांचा विवाह आनंद बडवे यांच्याशी झाला. आनंद बडवे व्यवसायानं इंजिनिअर, घरात समाजकार्याची मोठी परंपरा. त्यांचे आईवडील- बाबूराव व कमळाबाई बडवे- स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसचे मोठे पुढारी. असं सारं असताना मीराताई व आनंद यांनी घरातून काही न घेता संसार करायचा निर्णय घेतला.
 मीराताई व आनंद स्वत:च्या पायावर उभे राहू पाहत होते, तेव्हा उभयतांकडे अवघे दहा हजार रुपये व दोन थैल्या कपडे इतकंच होतं, स्वत:चं म्हणून!
 आनंदने पुण्याच्या नवगिरे इंजिनिअरिंगमध्ये नोकरी धरली व मीराताईंनी ट्युशन्स सुरू केल्या. कन्येला जन्म दिला. नोकरी व घर बदलत बदलत, एक दिवस आनंदने स्वत:चा कारखाना सुरू केला. तो स्पेशल परपज मशीन (एस.पी.एम.) क्षेत्रातील नामवंत उत्पादक बनला. एकाचे तीन कारखाने झाले. कोट्यवधीचं उत्पादन असताना, ३२ वर्षं व्यवसायात अहोरात्र मेहनत करणाऱ्या आनंद बडवे यांनी एके दिवशी अचानक अकारण उत्पादन बंद केलं. मोठी माणसं वेडी असतात, त्याचा हा पुरावा.
 दुसरीकडे मीराताईंनीही मुलीसाठी नोकरी सोडलेली; पण मुलीचं लग्न झाल्यावर काय करायचं म्हणून पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील सरकारी निवासी अंधशाळेत नोकरी मिळते का, म्हणून पाहायला गेल्या. जिन्यातच एका लहान अंध मुलानं मीराताईंना मिठी मारली. त्यांनी त्याला कडेवर घेतलं, तर स्वारी उतरायचं नावच घेईना. मीराताईंना त्या अनाथ, अंध मुलानं त्या क्षणी जगण्याचा अर्थ समजावला. मीराताईंनी 'नोकरी' न करता 'सेवा' करायचं ठरवलं नि आपलंही वेडेपण सिद्ध केलं.
 दोन वेडे पतिपत्नी एकत्र आले. त्यांनी पाहिलं की, आपल्याकडे अंधांना औपचारिक शिक्षण मिळतं. पण त्यांच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, स्वप्नानुसार शिकण्याची सोय नाही. मग त्यांनी प्रत्येक अंध मुलामुलींच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात मदत करण्याचा निर्णय घेतला. कारण एकच होतं, आपल्याकडे असलेल्या साधनसंपत्तीचा असा उपयोग करायचा की, त्यातून आपणास दुसऱ्यासाठी काहीतरी निरपेक्ष केल्याचा आनंद मिळावा. हे सारं 'निवांतपणे' करायचं ठरवून ते दोघे करत राहिले व त्यातून 'निवांतपणे' एकदा कधीतरी 'निवांत अंध मुक्त विकासालय' सुरू झालं. निवांत शब्दाला आनंद आणि मीराताईंनी आपल्या कार्यातून एक नवा अर्थ दिला. 'निवांत' म्हणजे निरपेक्ष, अप्रसिद्ध, सहज! ही समाजसेवेची एक नवी, अनौपचारिक शैली आहे. जगण्याचा एक मार्ग आहे, ती अंधशिक्षण व पुनर्वसनाची नवी दृष्टी आहे!
 असं ठरलं की, मीराताईंनी शिकवायचं आणि आनंदानं सांभाळायचं! म्हणजे मीराताईंनी प्रत्यक्ष शिक्षण पाहायचं नि आनंदनी संस्था, प्रशासन, अर्थकारण, विकास इ. पाहायचं. काम दोघांचं; पण ते मीराताईंचं म्हणून ओळखलं जातं. या कामात आनंद भूमिगत कार्यकर्ता असतो. सर्व करतो; पण कुठेच नसतो. राजापूरची गुप्त गंगा होणं त्याला आवडतं. स्त्रीविकास व्हायचा, तर पुरुष दुय्यम व्हायला हवेत. प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एका भूमिगत पुरुषाचं बलिदान कार्यरत असतं!
 'निवांत अंध मुक्त विकासालय' हे कसलं नाव? असं कुणी विचारेल, तर त्याचं सरळ, सोपं उत्तर असं की, ते अंधांचं अभिनव सर्वशिक्षा अभियान आहे. ते आहे अंधांचं एकलव्य विद्यापीठ. इथे प्रवेश अर्ज नाही. मुलाखत नाही, शिक्षणाची पूर्व अट नाही, अभ्यासक्रम नाही, वेळापत्रक नाही, फी नाही, डिपॉझिट नाही, डोनेशन नाही, अट एकच. अंध असणं. मग मुक्त आणि मुफ्त प्रवेश! हे अंधांचं एक शिक्षकी शिक्षण केंद्र आहे. इथं अंधांना जे जे लागेल, ते पुरवलं जातं. शिक्षण, शिक्षक, मार्गदर्शन, ब्रेल नोट्स, साहित्य, ऑडिओ कॅसेट्स, जॉज (जे.ए.डब्ल्यू. एस- जॉब ऍक्सेस विथ स्पीच) कॉम्प्युटर्स, ब्रेल टंकलेखक- सर्व म्हणजे खरंच सर्व!
 ही संस्था नाही. हे अंधांचं स्वराज्य, साम्राज्य आणि 'घर' या घरात सर्व जण सर्व कार्य निवांतपणे करतात. मीराताई व आनंददादा यांचं हे घर अंधांना आंदण. मीराताई, आनंद व सर्व अंध मुले-मुली या विकासालयात कधी कधी त्यांनीच तयार केलेली प्रार्थना म्हणतात. ती प्रार्थना हेच त्यांचे कर्म, मर्म, धर्म, सर्व काही!
 मीराताईंनी हे काम सुरू करण्यापूर्वी अनेक अंधशाळा, अंध मुलामुलींच्या निवासी सरकारी शाळा, वसतिगृहं पाहिली. त्यांच्या असं लक्षात आलं की, या शाळा, वसतिगृहात मुलामुलींची संख्या अधिक असते. पण त्या प्रमाणात ना कर्मचारी असतात, ना सुविधा; परिणामी अंधांची उपेक्षा, हेळसांड होते. शिवाय, या शाळा, वसतिगृहांतून शिकून, सांभाळून मोठी झालेली मुलं-मुली १८ व्या वर्षानंतर परत एकदा अंध, अनाथ, निराधार होतात. कारण, त्यांचा सांभाळ, संरक्षण, पुनर्वसन, नोकरीचा काहीच कार्यक्रम, योजना नाही. परिणामी, दहावी शिकलेली अंध मुलंसुद्धा भिकारी होऊ शकतात आणि मुली कुणाच्या तरी वासनेची शिकार! हे सगळं बदलायचं, तर आपणास सार्थक, समर्थ पर्याय देता आला पाहिजे. म्हणून मग त्यांनी दहावी पास झालेल्या अंध मुलामुलींच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी हे विकासालय साकारलं. ते सुरू नाही केलं. कामातून तयार झालं. मीराताईंचं म्हणणं आहे की, अनाथपण, अंधत्व, अपंगत्व हा अपघात आहे, त्यावर प्रयत्नाने मात करता येते. मीराताई नि आनंद यांनी हे काम सुरू केलं. पंधरा वर्षांपूर्वी १९९६ पासून. त्यांनी हेही पाहिलं की, इयत्ता दहावीपर्यंत अंध एक तर स्वतंत्र वा नेहमीच्या शाळेत शिकून मॅट्रिक होतात. ज्युनिअर कॉलेज, डी.एड. बी.एड. कॉलेज, विद्यापीठ हे या मुलांचे अडथळे होतं. तिथं त्यांना एक तर प्रवेश मिळत नाही आणि मिळाला, तर लक्ष दिलं जात नाही, सुविधा पुरविल्या जात नाहीत. म्हणून त्यांनी अंध मुलामुलींसाठी दहावीनंतरच्या सर्व प्रकारच्या शिक्षण, शिकवणी, मार्गदर्शन, समुपदेशन, सुविधा, विकास, साधनपुरवठा असं काम सुरू केलं. हे सारं अंधांच्या गरजेतून उभारलं. आकारलं! पहिला मुलगा आला, त्याला इंग्रजी कळायचं नाही, दुसरी मुलगी आली तिला अकौंटन्सी जड जाई, असं करत मीराताईंनी इंग्रजीबरोबर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, जर्मन शिकवायला सुरुवात केली. हे सारं अकरावी ते एम.ए. बी.एड. डी.एड. बी.बी.ए. बी.सी.ए. बी.लिब., एम.एस.डब्ल्यू, लॉ. फूड क्राफ्ट, डान्स डिप्लोमा आदी अभ्यासक्रमांचं आणि यु.पी.एस.सी./एम.पी.एस.सी. सारख्या स्पर्धा परीक्षांचंसुद्धा! आहे की नाही एक शिक्षकी विद्यापीठ? मीराताईंचं हे निवांत विद्यापीठ सकाळी ५.३० वाजता सुरू होतं, ते रात्री १०.३० पर्यंत चालतं. त्याचं छोटं कारण आहे. प्रत्येक अंधाला त्याची गरज, उसंत असेल, तसं शिकवायचं. मीराताईंच्या वर्गात कधी एक, कधी पाच, कधी ३५ विद्यार्थी असतात. एकाच वेळी त्या इंग्रजी, मानसशास्त्र, अकौंटन्सी शिकवतात. इथं शिकवणं नसतं; समजावणं असतं. मुलं आपापल्या शाळा, कॉलेजात जातात. तिथं ऐकतात, प्रश्न निर्माण होतात. शंका येतात. 'निवांत' मध्ये त्या निवांतपणे सुटतात. सोडवल्या जातात. वर्गातला ‘पॅसिव्ह व्हॉइस' इथे 'ऍक्टिव्ह' होतो! सायन्स कॉलेजात न कळलेला फॉर्म्युला इथं समजतो. कॉलेजमधलं न सुटलेलं गणित इथं हमखास सुटतं. 'निवांत'चं तत्त्व आहे 'वर्क ऍकॉर्डिंगली; टीच इंडिव्हिज्युअली!'
 मीराताई गेली १५ वर्षे रोज १८ तास अविश्रांतपणे २० विषय सरासरी २५ विद्यार्थ्यांना विनासुट्टी शिकवतात. हे जेव्हा मी पाहिलं, तेव्हा उगीच चाळा म्हणून एक गणित केलं. कॉलेजमध्ये सध्या प्राध्यापक २५ ते ३५ हजार रुपये पगार घेतात. दिवसा चार तास शिकवतात. तोही एकच विषय. वर्षानुवर्षं. तिथं शिकवणं असतं; पण संवाद, समुपदेशन, शंका समाधान अपवाद! या पार्श्वभूमीवर मीराताईंच्या कामाचा पगार होतो रोज २० हजार रुपये!
 निवांत अंध मुक्त विकासालयात आज बेकरी, कॉम्प्युटर लॅब, ब्रेल प्रिंटर, ऑडिओ सिस्टीम, अंधांची सर्व सॉफ्टवेअर्स, ब्रेलबुक्स, ब्रेल नोट्स, सर्व आहे व हे सर्व प्रत्येकाच्या गरजेनुसार आहे. म्हणजे इथल्या कॉम्प्युटरवर जॉज, टॅली, ऑटोकॅड, ग्राफिक्स, म्युझिक सर्व आहे. ब्रेल व सर्वसाधारण प्रिंटींग सुविधा आहे. एखाद्या मुलाला अंशत: अंधत्व आहे, तर त्याला त्याच्या दृष्टिदोषानुसार मोठ्या वा मध्यम टाईपमध्ये त्याच्या सर्व नोट्स पुरवल्या जातात. पूर्वी हे काम एकट्या मीराताई करायच्या. आता तयार झालेली अंध मुलं-मुली हे सर्व करतात. आता इ. १२ वी पास अंध इ. ११ वी अंधांचा शिक्षक होतो. बी.एड. झालेली मुलगी डी.एड. झालेल्या मुलीला शिकवते. एम.सी.ए. झालेला अंध बी.सी.ए.ला शिकवतो.
 यामुळेच अंधांचं जगच बदललं. 'हम भी कुछ कम नही' म्हणत 'निवांत'च्या विद्यार्थ्यांनी एकदा तर सिलिकॉन व्हॅलीलाही चकित केलं. अमेरिकेतील एका कंपनीला एक प्रोग्राम हवा होता. निवांतला विचारणा झाली. आनंदच्या मार्गदर्शनाखाली पाच अंध मुलंमुली एकत्र आली. त्यांनी कंपनी स्थापन केली. त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं. या कंपनीतले अंध आता आय.टी.इंडस्ट्री, कॉल सेंटर, इन्फोसिससारखी कमाई करतात. आजही 'निवांत' मधली अनेक मुलं डोळस मुलांपेक्षा अधिक गुण मिळवून त्यांच्या कॉलेजात 'टॉपर' होतात.
 आज 'निवांत' मधील मुलांनी ब्रेल साहित्याचे मुद्रणालय विकसित केलंय. त्यातून मराठीतील साहित्य ब्रेलमध्ये प्रकाशित होतं आणि अंधांना मोफत पुरवलं जातं. सुधा मूर्ती, नसीमा हुरजूक, उत्तम कांबळे, विंदा करंदीकर, पु.ल.देशपांडे, साऱ्यांच्या मराठी पुस्तकांना ब्रेलमध्ये नेलं. कोल्हापूरच्या करवीर नगर वाचनालयानं ब्रेल ग्रंथालयही सुरू केलं. त्यासाठी 'निवांत' च्या मुलांनी एक नाही तब्बल ३५० मराठी ब्रेल पुस्तकं मोफत दिली! या मुलांनी एक संस्था स्थापन केली आहे. 'सो कॅन आय' (आम्हीसुद्धा पाहू, दाखवू शकतो) परवा त्यांनी २० हजार रुपयांची देणगी 'निवांत'ला दिली, स्वकमाईतून!
 निवांत अंध मुक्त विकासालय स्थापन झालं, तेव्हा तो मीराताई व आनंदचा भातुकलीचा संसार होता. आज ते अंधांचं अनभिषिक्त साम्राज्य झालंय. तरीही तिथे आजही एकही पगारी नोकर नाही. आनंद नि मीराताई यांचे डोळे इथल्या सुमारे १५० अंध मुलामुलींना रोज नवा प्रकाश देत राहतात. आजवर या दोघांनी सुमारे १०० मुलामुलींना डोळस, स्वावलंबी केलं आहे. त्यातील अनेक मुलामुलींची आपसात लग्नं झाली. कधी प्रेमविवाह, तर कधी ठरवूनही! त्यांना डोळस अपत्यं आहेत!
 मीराताईंचं या कामातून एक चिंतन तयार झालंय. अंधांचे दृष्टिदोष लहानपणीच लक्षात यायला हवेत. ते जितके लवकर लक्षात येऊन लवकर उपचार सुरू होतील, तितक्या लवकर हे दोष दूर करणं, कमी करणं शक्य असतं. केवळ अज्ञान, दारिद्रय, दुर्लक्षामुळे अंधत्व वाढतं. अंधांना स्वतंत्र शाळांऐवजी सामान्य शाळांतच शिकू, राहू द्यावं. फक्त गरजेनुसार सुविधा, साधन, सेवांचा सुकाळ हवा. 'इच वन, टीच वन' असं व्यक्तिकेंद्रित शिक्षण हा अंधांना स्वावलंबी करण्याचा रामबाण उपाय होय. अंधांना धीर द्या, संधी द्या. त्यांना दया, सहानुभूती नकोय, हवाय केवळ मदतीचा हात. त्यांना धक्के, ठेच बसू द्या. ते स्वतः मार्ग शोधतील. तुम्ही फक्त त्यांचे अडथळे बनू नका. बाकी सर्व ते पाहतील. विशेष वागणूकच एखाद्याला अपंग करते. त्यांना इतरांसारखे समजा नि वागा. त्यांच्याशी मैत्री करा. त्यांचे व्हा!

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

 अपंगांच्या स्वराज्याचं स्वप्न : 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड'

 ही गोष्ट १९६५-६६ ची असेल. तेव्हा नसीमा हरजूक यांचं वय अवघं १६ वर्षांचं होतं. त्यांचं आजवरचं जीवन सर्वसामान्य घरात वाढणाऱ्या एका सामान्य मुलीसारखं होतं. घरी आई, वडील, भाऊ, बहीण असं भरलेलं घर. खेळ, नृत्याची आवड असलेली नसीमा शाळेतील इतर सर्व मुला-मुलींप्रमाणे साऱ्या उपक्रमांत सहभागी होत, जीवनाची इंद्रधनुष्यं रंगवत होती. अन् या धोक्याच्या वयानं धक्का दिला. पाठीच्या मणक्यावरील आघाताने सोळाव्या वर्षी ती पॅराप्लेजिक झाली. कमरेखालची संवेदना हरवली. 'चाकाची खुर्ची'च तिचे पायच काय, साऱ्या जीवनाचा आधार बनली. 'चाकाची खुर्ची' ही त्यांची आत्मकथा वाचताना, हे सारं लक्षात येत असलं, तरी त्यांचं खरं जीवन कळायचं, तर त्यांचं काम समजून घ्यायला हवं.
 तशाही परिस्थितीत त्या अर्थशास्त्र घेऊन बी.ए. झाल्या. सीमाशुल्क विभागामध्ये (सेंट्रल इक्साइज) उपअधीक्षक पदापर्यंत पोहोचल्या. पण, त्यांना त्यांचा आत्मस्वर स्वस्थ बसू देत नव्हता. विशेषतः बेंगलोरच्या बाबूकाका दिवाणांचं जीवन व कार्य पाहिल्यानंतर तर त्यांनी ठरवूनच टाकलं की, एक अपंग दुसऱ्या अपंगांसाठी इतकं करतो, तर मी का नाही? विजयादेवी घाटगे, सुहासिनी घाटगे, विक्रमसिंह घाटगे, रजनी करकरे, मनोहर देशभ्रतार, पी.डी.देशपांडे, श्रीकांत केकडे, जगन्नाथ पाटील अशा अनेकांना जमवून त्यांनी अपंगांना मदतीचा हात द्यायचं ठरवलं. प्रारंभी अपंगांना एकत्र आणणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं, उपचार शिबिरं, शस्त्रक्रिया, उपकरणांचं (कुबड्या, चाकाची खुर्ची, कॅलिपर्स इ.) वितरण असं काम सुरू झालं. काम होत होतं; पण त्याला दया, उपकार, देणं अशी झालर असायची व ती नसीमाताईंना अस्वस्थ करायची.
 नसीमा हुरजूक यांना हवं होतं, 'अपंगांचं स्वराज्य'. अपंगांनी, अपंगांद्वारे आणि अपंगांसाठी निर्माण केलेलं. मग त्यातून काही नव्या समविचारी सहकाऱ्यांना घेऊन ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड' या स्वतंत्र संस्थेचा १९८४ ला उदय झाला. सुरुवातीला सीमाशुल्क कार्यालयाने दिलेल्या स्वत:साठीच्या क्वार्टर्समध्येच काम सुरू केलं; पण त्याला मर्यादा, नियमांचे कुंपण होतं. शिवाय, काम वाढू लागलं, अपंगांचा ओघ सुरू झाला, अपंगांच्या अपेक्षा वाढत गेल्या, तशी कामाची नवी क्षितिजं खुणावू लागली. 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड' संस्थेच्या गेल्या तीन दशकांचा आलेख म्हणजे प्रश्नांनी उभारलेली आव्हानं.
 मला आठवतं, आमच्या बालकल्याण संकुलात प्रकाश जोशी नावाचा एक अपंग मुलगा एका ट्रक ड्रायव्हरनं आणून दिला. त्याला त्याच्या अज्ञात आईवडिलांनी जाणीवपूर्वक रस्त्याच्या मध्यभागी ठेवलं होतं आणि ते पळून गेले होते. तो अपंग असल्यानं संस्थेत त्याच्याकडे जितकं पाहावं तितकं कमी पडायचं. सर्वस्वी परावलंबी, परस्वाधीन होता प्रकाश! म्हणून आम्ही नसीमादीदींना सांगितलं. शासकीय वसतिगृहांनी नकार दिला. त्यांची अटच होती, जो स्वत:चं स्वतः करू शकेल त्याला प्रवेश. मग तो अपंग राहतो कसा हे सरकारला कोण समजावणार? न्यायदेवता नुसती आंधळी असते; पण शासनदेवता मुकी, बहिरी आणि खरं तर संवेदनहीन असते, या निष्कर्षापर्यंत मी आणि नसीमदीदी आलेलो. मग आम्ही कोल्हापूरच्या मेरी वॉनलेस हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार, शस्त्रक्रिया करत राहिलो; पण प्रकाश काही हाती लागला नाही.
 म्हणून ‘हेल्पर्स'नी स्वत:चं वसतिगृह सुरू केलं. आज मुडशिंगीच्या माळावर ‘घरौंदा' हे अपंग विद्यार्थ्यांचं भारतातलं आदर्श वसतिगृह सुरू आहे. ते अपंगांसाठीच्या सुविधांनी युक्त आहे. सुलभ उतार (रँप), रेलिंग, ग्रिप्स, अपंगांसाठीच्या सुविधा लक्षात ठेवून उभारलेली प्रसाधनगृहं, फर्निचर, साधनं, सर्वांनी युक्त. प्राथमिक शाळेपासून सुरू झालेल्या अपंगांच्या शिक्षणाचा प्रवास आता मेडिकल आणि इंजिनिअरिंगपर्यंत पोहोचला आहे. 'हेल्पर्स'चे विद्यार्थी कॉलेजात जाते झाले. तेव्हा कोल्हापूरच्या अन्य महाविद्यालयांत त्यांना प्रवेश देत नव्हते; मी पुढाकार घेऊन आमच्या महावीर महाविद्यालयात प्रवेश सुरू केला. रँप बांधले. मुलांच्या सोयीनुसार वर्गाचं वेळापत्रक केलं. कॉलेजमधील अख्ख्या शिपायापासून ते प्राचार्यांपर्यंत सर्वांनी ‘हेल्पर्स' मुलांना तळहाताच्या फोडासारखं जपलं. मी प्राचार्य असतानाच्या काळात एक कोटी रुपये खर्चुन चार मजली बांधलेली इमारत म्हणजे 'अपंग फ्रेंडली' कॉलेजचा नमुनाच ठरली.
 महेश देशपांडे, अडकलेला पतंगाचा दोरा सोडवायला गेला नि स्वत:च अडकला. दोन्ही हातपाय गमावले त्यानं! महंमद शेखला तर दोन हात जन्मत:च नव्हते. तो सारं पायानंच करायचा. लिहिणं, आकृती काढणं, जेवण, कॉम्प्युटर चालवणं. तो बी.कॉम. झाला. आज एका गादी कारखान्यात अकौंटंट आहे. अश्विनी देसाई तर एम.डी. पॅथॉलॉजी होऊन लॅब इन्चार्ज, पेशंटची 'डॉक्टर' झाली. स्वप्नाहून सत्य निर्मिण्याचा हा चमत्कार म्हणजे हँडिकॅप्डच्या सर्व हेल्पर्सचं समर्पण, त्याग, धडपड, तळमळ आणि समाजाची समर्थ साथ. सरकारची मदत अनुदान म्हणून नसली, तरी जमीन, परवाने, रस्ते इ. तून होत असतेच; पण सारं सहज होत नसतं. इतरांना जो नियम तोच अपंगांना. 'सरकारी काम, सहा महिने थांब', असं असतंच. नसीमदीदी आपल्या प्रत्येक भाषणात यंत्रणेच्या अडथळ्यांबाबत त्वेषाने बोलतात; पण त्या अवलंबून मात्र राहात नाहीत.
 त्यामुळेच 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड', कोल्हापूर या संस्थेनं एकामागून एक प्रकल्प हाती घेतले नि तडीस नेले. वसतिगृहाच्या यशानंतर समर्थ विद्यालय, आनंद विद्यालय सुरू झालं. या विद्यालयात आज पाचवी ते दहावीपर्यंतची ५०० मुलं-मुली शिकताहेत. अलीकडे १२ विद्यार्थ्यांपैकी नऊ डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण! 'हम होंगे कामयाब एक दिन' गाणं म्हणत गाठलेलं यश म्हणजे हेल्पर्सच्या कष्टाचं चीज! संस्था प्रारंभीपासूनच अपंगांना कुबड्या, खुर्च्या, कृत्रिम हातपाय इ. साधनं पुरवायची; पण गरज भागत नसे. कारण, प्रत्येक अपंगांची गरज वेगळी असायची. कुणाचा हात खांद्यातून, कुणाचा हात कोपऱ्यातून तर कुणाचा मनगटापासून असायचा. कुणाला बोटंच नसायची, असलीच तर दोन किंवा तीन. तीच गोष्ट पायाची. मग संस्थेनं स्वत:च व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. तिथं अविनाश कुलकर्णी आले आणि त्या केंद्राचे रूपांतर 'अपंग उपकरण उत्पादन व संशोधन केंद्रा'त होऊन गेलं. ते स्वतः बी.ई., धडधाकट होते. फोटोग्राफीचा छंद. भान हरपले. कड्यावरून पडले, अपंग झाले. चाकाची खुर्ची आली. त्यांनी खुर्चीतून नवनव्या पंखांच्या, संशोधनाच्या भराऱ्या मारत प्रत्येक अपंगांच्या गरजेनुसार साधनं पुरवून अपंगत्व निर्मूलनाचा अघोषित कार्यक्रमच सुरू केला. प्रत्येक अपंगाला ते स्वाधार, स्वावलंबी, स्वतंत्र करतात. 'हेल्पर्स'नी पाहिलं की प्रत्येक स्वप्न पुरं करायला पैसे लागतात. अन् पैसे तर रोजच अपुरे; कारण अपंगांच्या गरजा व प्राप्त सुविधांची दरी इतकी मोठी आहे. तो सरकारनं अपंगांच्या गरजांनुसार योजना, सुविधा, यंत्रणा, तरतूद न केल्याचाच ढळढळीत पुरावा! देणगीदारांवर तर किती अवलंबून राहायचं! मग फिरतं उपहारगृह, केटरिंग ऑर्डर, साधन विक्री सर्व करून पण सारं 'ऊंट के मुँह में जीरा' गरज लाखातली. मिळकत शंभरातली. मग ‘हेल्पर्स' नी गॅस एजन्सी, पतसंस्था, वस्तुविक्रीचे प्रयोगही केले. धडपड एकच. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं! हे सोपं नव्हतं. पण 'असाध्य ते साध्य करिता सायास', 'स्काय इज द लिमिट' असं नसीमा हुरजूकांबरोबर रजनी करकरे, पी.डी.देशपांडे, मनोहर देशभ्रतार यांच्या बरोबर नसीमादीदींचे भाऊ बहिणी (अजीजभाई, आयाजभाई, कौसर दांपत्य) सर्व या अपंग स्वराज्य निर्मिती आंदोलनात तन, मन, धनासह सक्रिय झाले. प्रत्येकानं कामं वाटून घेतली. ध्येय एकच. अपंगांना काही कमी पडू द्यायचं नाही. आणि खरंच आज जो कोणी 'हेल्पर्स' नावाच्या या कल्पवृक्षाच्या छायेत येतो तो स्वाधार होतो.
 परवा याच 'हेल्पर्स'नं चालवलेली 'स्वप्ननगरी' मी पाहिली नि मला माझ्या धडधाकटपणाची लाजच नाही. तर शरमही वाटली. माझं ते वाटणं म्हणजे तुमच्या माझ्या सारख्यांचा साऱ्या धडधाकट माणसांचा उघडउघड पराभव होता. त्या दिवशी अपंगांना बक्षिसं द्यायची होती. ती मी दिली नाहीत. नसीमदीदींनी अपंगांपुढे बोलायला (मार्गदर्शन करायला) सांगितलं; पण मी बोललो नाही. त्यांच्या अभिप्रायवहीत मी अभिप्राय लिहायचं नाकारलं. हा उद्धटपणा नव्हता, ती होती माझ्या मध्यमवर्गीय निष्क्रियतेची कबुली! मी काय पाहिलं तिथे? एक माणगावकर नावाचं उदार कुटुंब. त्यांनी 'हेल्पर्स'चं काम पाहून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी बारा एकर जमीन, टाकाऊ नव्हे पिकाऊ भेट दिली. 'हेल्पर्स'नं पाहिलं, जायला पूल हवा, रस्ता हवा. बांधला. आज 'मोरे' नावाच्या गावची पंचक्रोशी 'हेल्पर्स'च्या धडपडीनं विकसित झाली. तिथं काय होतं बारा वर्षांपूर्वी? तपभरच्या 'हेल्पर्स' तपश्चर्येनं सारं उपलब्ध. इंटरनेटसुद्धा!
 शाळा, शेती, डेअरी, काजू कारखाना, काजू बाग, बांबू बेटं, आमराई, बायोगॅस, ट्रॅक्टर सारं सारं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दीडशे अपंगांचं स्वावलंबी घर, स्पेन, जपान, कॅनडा आणि भारतही या साऱ्यांच्या मदतीनं उभारलेली ‘स्वप्ननगरी' पाहा. स्वप्न पाहायला अक्कल लागते नि ती सत्यात उतरवायला हिंमत! हे येरागबाळ्याचं काम नाही. या संस्थेनं आतापर्यंत १५ कोटी रुपयांची यंत्रणा अपंग विकास कार्यासाठी उभारली असून, आजवर वीस हजार अपंगांना त्याचा लाभ झाला आहे.
 कातळावर फुललेली काजू बाग. टनांनी भरलेली काजू गोदामं. रोज हात, पाय, बोटं नसलेले अपंग प्रत्येकी क्विंटलभर काजू फोडतात. प्रतवारी, विक्री सर्व करतात. कोटींची उड्डाणं पार केलेल्या हेल्पर्सनी आता आपल्याला लागणाच्या गरजेच्या २५ टक्के उत्पन्न स्वकष्टातून मिळवण्याचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. अंतिम लक्ष्य आहे १०० टक्के स्वावलंबन, 'हात ना पसरू कधी', असा सुप्त संकल्प घेऊन नसीमा हरजूक यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी संस्था, तिचे विश्वस्त, लाभार्थी, कर्मचारी, देणगीदार या साऱ्याचं एक स्वप्न आहे. अपंगत्वाचं समूळ उच्चाटन, निर्मूलन! त्यासाठी जे लागेल ते करायची त्यांची तयारी आहे, यातच सारं आलं!
 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड' ही संस्था, नसीमा हुरजूक व त्यांचे सर्व समविचारी सहकारी यांनी सरकार व समाजापुढे स्वत:च्या धडपडीतून एक अपंग पुनर्वसनाचा कृतिशील (खरं तर अनुकरणीय) प्रकल्प समोर ठेवला आहे. तो आदर्श मानून प्रत्येक जिल्ह्यात असे प्रकल्प उभारले जातील, तर अपंगांचं पूर्ण पुनर्वसन शक्य आहे. गरज आहे सरकारच्या आणि समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची. 'हेल्पर्स' च्या आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यालयाला अद्याप मान्यता व अनुदान नसणं, 'स्वप्ननगरी'तील अपंगांच्या काजू उत्पादनांवर ४ टक्के व्हॅट असणं, अपंगांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसणं, अपंगांच्या रोजच्या जगण्यात त्यांच्या दृष्टीनं समाजानं उभारलेले अनेकविध अडथळे दूर करणं (रँप्स, ग्रिप्स, रेलिंग, प्रसाधनं इ.) हे जोवर समाज व शासन कर्तव्यबुद्धीने व अपंगांच्या मानवाधिकारांच्या हक्कांचे पालन म्हणून करणार नाही. तोवर एकट्या नसीमदीदी, एकटी ‘हेल्पर्स’ संस्था कुणाला पुरणार? या अपंगांविषयीचा आपला संवेदनासूचकांक वाढवू; प्रत्येक अपंगाला स्वाधार, स्वावलंबी बनवू!

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

स्त्री विकासाचा स्वावलंबी प्रयोग : स्वयंसिद्धा

 * शीतल पाटील : मी मोरेवाडी, जि. कोल्हापूरच्या एका प्राथमिक शिक्षकाची बायको. बारावी पास. घरात बसून होते. 'स्वयंसिद्धा'कडून नवऱ्यानं गांडूळ खताची पेटी आणली. पहिल्यांदा तर मला गांडूळ बघून शिसारीच यायची. स्वप्नातबी ती वळवळायची. कर्ज फेडायचं म्हणून खत करू लागले, आता मीच कर्जाऊ खत देते. माझ्यामुळे गाव बदललं. आमच्या शेतातली गर्किन काकडी, बेबी कॉर्न फ्रान्सला जातात. महिला सामुदायिक शेती, बचत गट, दूध, भात, शेती इ. द्वारे आता माझं उत्पन्न वार्षिक दोन लाख रुपये झालंय.
 * संगीता कांबळे : मूल नसल्यानं मी निराश होते. रडत दिवस काढायचे. 'स्वयंसिद्धा'च्या संपर्कात आले. फार्मासिस्ट असून घरी होते. तरंगत्या मेणबत्त्या करायला शिकले. आज मी त्यात मास्टर आहे. प्रशिक्षण ते उत्पादन सर्व शिकले. कधी काळी 'अबोली' असलेली मी 'बडबडी' झाले. मला ऐकताना पुरुषांची बोबडी वळते.
 * दीपक कांबळे : मी ग्रामीण भागातला बेकार युवक होतो. फोटोग्राफीची आवड होती. 'स्वयंसिद्धा'नं मला कॅमेरा दिला. प्रशिक्षण दिलं. आज मी फोटोग्राफीचं प्रशिक्षण देतो. व्यवसाय उत्तम. माझी प्रदर्शन होतात. चित्रं हजारांना विकली जातात.
 * बिस्मिल्ला मुजावर : माझी मुलगी दहावी नापास होऊन घरी होती. 'स्वयंसिद्धा'च्या 'ज्योतीस्कूल' या नापासांच्या शाळेबद्दल कळलं. पोरीला घेऊन जायची. तिच्या काळजीनं तिथंच वाट बघत बसायची. नुसतंच कशाला बसायचं म्हणून पर्स करायला शिकले. आता सँक, कव्हर्स करते. मुलींची लग्नं मी माझ्या कमाईतून केली. घरभाडे मीच भरते. आता घर बांधीन.
 * अंजना घाटे : अडाणी होते. घरी भिशी चालवायचे. ती अंगावर आली म्हणून फेडायसाठी राजगिरा भाजायला जायचे. तीस रुपये रोज मिळायचे. 'स्वयंसिद्धा'नी मला लाडू शिकवले. आता माझे लाडू सगळ्या मॉल, बझारमध्ये असतात. पिठलं भाकरी, अनारसे पण माझी स्पेशालिटी. दिल्लीला जाऊन करून दाखवून आले. आता मी चाळीस हजार कमावते. सही करते. हिशेब ठेवते. टॅक्स भरते. हाताखालच्या बायकांना 'स्वयंसिद्ध' करते.
 या नि अशा हजारो महिलांना स्वावलंबी, स्वयंप्रेरिका, सबला बनविणारी एक चळवळ कोल्हापुरात कार्यरत आहे. कांचन परूळेकर त्या चालवतात. अवघ्या १८ वर्षात स्त्री-पुरुष सज्ञानी, स्वावलंबी होणं ही क्रमागत गोष्ट असते. पण एखादी संस्था, चळवळ, विचारानं १८ वर्षांत स्वावलंबी होणं केवळ बांधिलकीमुळेच शक्य असतं! एक महिला पेटून उठली तर काय करू शकते, याचा कुणाला शोध घ्यायचा असेल त्यांनी कांचन परूळेकर नावाच्या एका स्वयंसिद्ध महिलेचे कार्य, एका स्वयंसिद्ध ठरलेल्या संस्थेचा इतिहास आणि स्वयंप्रेरिका बनलेल्या महिला लोकआंदोलनाचा धांडोळा घ्यायला हवा. 'स्वयंसिद्धा' ही महिलांचे प्रबोधन करून, त्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर, स्वावलंबी करणारी संस्था आहे. सौ. सरोजनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळामार्फत ती चालविली जाते. स्त्री शक्ती विधायक व उत्पादक (खरं तर रचनात्मक) बनविणारी ही संस्था महिलांनी महिलांकरिता चालविलेलं सक्रिय सबलीकरण होय.
 कांचनताई परुळेकरांचा जन्म सन १९५० चा. वडील बाळकृष्ण परूळेकर हे ग्रामीण भागातील सक्रिय कार्यकर्ते. व्यवसायाने म्हणाल तर कोटमेकर; पण सारं लक्ष शेतकरी, धरणग्रस्तांच्या चळवळीकडे. त्यामुळे व्यवसायाकडे यथातथाच लक्ष. परिणामी पत्नीलाच दुकान सांभाळावं लागायचं. पदरात दोन मुलं, मुलगी कांचन मोठी व्हावी, असं बापाला वाटायचं. ती लहानपणीच प्रभावी भाषणं करायची. एकदा ते पाटगाव धरणग्रस्त परिषदेस आपल्या मुलीस घेऊन गेले. व्यासपीठावर तत्कालीन खासदार ऍड. व्ही.टी.पाटील, आमदार देशभक्त रत्नाप्पा कुंभारांसारखे दिग्गज, हजारो धरणग्रस्तांपुढे १३ वर्षाची चिमुरडी, कांचन असं प्रभावी भाषण करते की, महाराष्ट्रातील वरील नामांकित नेते चारीमुंड्या चीत. व्ही.टी.पाटील त्या मुलीला दत्तक घेतात. ही मानसकन्याच. पुढे त्यांच्या कार्य- कर्तृत्वाची वारसदार बनते. वडिलार्जित संपत्तीवर रक्त, नाळ, आतडं, पदर, जात, भावकीचा आधार, वारस बनण्यात पुरुषार्थ असत नाही. कर्तृत्वाची गादी चालवायला तुमच्यात जन्मतः हिंमत असावी लागते. ती कांचनताईंमध्ये होती.
 त्या एम.ए., डी.एड्., सी.ए., आई.आई.बी. झाल्या. हायस्कूल शिक्षिका, एन.सी.सी. ऑफिसर होत बँकेत गेल्या. असिस्टंट मॅनेजर असतानाच त्यांना वाटू लागलं की, आपण काकाजींचे (व्ही.टी.पाटील) वारस म्हणून मिरवतो. तर त्यांच्यासारखं कार्य करायला हवं. त्याची सुरुवात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रापासून केली. काकाजींनी गारगोटीचं श्री मौनी विद्यापीठ हे ग्रामीण शिक्षणाचे केंद्र 'शिक्षणातून विकास व विकासातून सामाजिक परिवर्तन' या ध्येयानं उभारलं होतं. कोल्हापूरचं ताराराणी विद्यापीठ उद्याची स्त्री रणरागिणी, कर्तृत्ववान, स्वावलंबी व्हावी म्हणून उभारलं होतं. कांचनताई तिथं औपचारिक शिक्षणाचं काम करायच्या. मुलींना शिष्यवृत्ती, महिला प्रबोधन हे त्यांना बंदिस्त व रुटिन वर्क वाटत होतं. त्यांनी काकाजींशी सल्लामसलत करून अनौपचारिक शिक्षणाचा मार्ग चोखाळायचा ठरवलं.
 त्यांनी ताराराणी विद्यापीठात एक महिला मेळावा भरवला. तो अनेक अंगांनी क्रांतिकारी ठरला. काकाजींनी स्थापन केलेलं दैनिक पुढारी जिल्ह्याचं मुखपत्र; पण तिथंच त्यांचे कार्य छापून येत नसे. कांचनताईंनी या मेळाव्यास त्या दैनिकाच्या संपादकासच प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं. त्यामुळे मेळाव्यापूर्वी प्रचाराचं निवेदन आलं. त्यात आवाहन होतं... ज्या महिला शिकून घरी बसलेल्या आहेत... ज्यांना फावला वेळ सत्कारणी लावायचा आहे... ज्या महिलांना स्वावलंबी बनायचं आहे, अशांसाठी मार्गदर्शन भाषणं नाहीत... प्रात्यक्षिकं...या, पाहा, शिका आणि मिळवत्या व्हा! मोठ्या संख्येनं महिला आल्या. त्यांच्यापुढे मिळवत्या महिलाच उभ्या केल्या. 'हे होऊ शकतं', 'आपण हे करू शकतो', 'ती अडाणी मिळवते मी तर सुशिक्षित'... असे संवाद सुरू झाले... घरोघरी मेळावा पोहोचला. वारुळात पाणी शिरलं की मुंग्या बाहेर पडतात. कानात हा वारा गेला अन् घरोघरीचे उंबरे महिलांनी ओलांडले.
 आज स्वयंसिद्धा संस्थेत पर्सेस, बॅग्ज, स्क्रीन प्रिंटिंग, वाखाच्या वस्तू, कुशन्स, ब्युटी कल्चर, वर्मी कल्चर (गांडूळ शेती), हस्तकला, मूर्तिकाम, भरतकाम, पेंटिंग, रांगोळी, मेंदी (आणि मेंढी पालन, शेळी पालन पण!) फोटोशॉप, संभाषण वर्ग, योगासन, जिम, हनिकोम व स्मॉकिंग, ड्रायक्लिनिंग काय नाही असा प्रश्न पडावा इतका पसारा. आज १५० कार्यकर्त्या प्रशिक्षक महाराष्ट्रभर प्रशिक्षण देत फिरतात. ते प्रशिक्षण शासकीय वांझ, वेळकाढू व पैशाचा अपव्यय करणारं नसतं. ते फुकट नसतं. महिला पर्सभर पैसे भरून प्रशिक्षण घेतात म्हणून पोतं भरून पैसे घरी आणतात. आज शहरात दहा हजार, तर खेड्यात ३० हजार महिला प्रशिक्षित होऊन स्वयंसिद्धा झाल्यात. या संस्थेचं, तिच्या कार्यपद्धतीचं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की, प्रशिक्षण म्हणजे भाषण नाही. प्रात्यक्षिक, कौशल्य, विकसन, अनुभव कथन, कार्यानुभव, बीज भांडवल पुरवठा, उत्पादनाची विक्री शाश्वती सर्व नियोजनबद्ध. कफल्लक म्हणून या आणि कोट्यधीश होण्याची उर्जा घेऊन चला.
 स्वयंसिद्धा संस्था शिबिरे, कार्यशाळा, तंत्रज्ञान विकास, अपारंपारिक शिक्षण, अपारंपरिक साधन विकास, शिकत कमवा, परिसर विकास, सांस्कृतिक संवर्धन, संघटन अशा अनेक अंगांनी कार्य करते. कार्याचं वेळापत्रक नाही. ते गरजू महिलेवर ठरतं. तिच्या कलाने व तिच्या गरजेनुसार ते आखलं जातं. अवघ्या पाच स्त्रिया एकत्र आल्या की प्रशिक्षण सुरू. प्रशिक्षणार्थी अधिक झाल्या की, फी कमी. तुम्ही संस्थेत यायचं नाही. संस्था तुमच्या दारी, संस्थेच्या या अभिनव कार्यपद्धतीमुळे एक झालं की मोठमोठे उद्योग, संस्था, विद्यापीठे, इतकंच काय शासनही आता स्वयंसिद्धाकडे येतं. एकच उदाहरण सांगतो, महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी ‘कृषिसप्तक' योजना सुरू केली. ती जिल्हा परिषदेकडे सोपविली. तिथले कृषी कर्मचारी, अधिकारी पुरुष, खेड्यातल्या स्त्रिया दाद देईनात. शासन स्वयंसिद्धाकडे आलं. स्वयंसिद्धाने पहिल्यांदा आपले कार्यकर्ते माती परीक्षण, पीक तंत्रज्ञान, पाणी नियोजन, अवजार वापर, पशुपालन, गांडूळ शेती, कीटकनाशक फवारणी, फळबाग, फुलबाग यात तयार केले. अर्थातच खेड्यातील. मग त्यांनाच आपापसांत महिलांना गोळा करायला लावून त्यांच्याच शेतीत कृषिसप्तक योजना राबवली आणि गावंच्या गावं बदलली. 'जिच्या हाती शेतीची जबाबदारी, ती गाव उद्धारी' असा नवा वाक्प्रचार नव्हे, लोकप्रचार रूढ झाला. वाक्प्रचार शाब्दिक असल्याने निष्फळ ठरतात. लोकप्रचाराला क्रियेची जोड असल्यानं ते सुफळ, संपूर्ण होतात. हे कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला दाखवून दिलं. ते स्वयंसिद्धा संस्थेमुळे. ही संस्था पैसा देत नाही. साधनं देते. शेळीचं कोकरू देते. ते शेळी झालं...वेत झाला की कोकरूनंच कोकरूची परतफेड करायची. ते कोकरू दुस-याला दिलं जातं. केल्याने होते, हा विश्वास हेच स्वयंसिद्धाचं तत्त्वज्ञान.
 कांचनताई या माझ्या समवयस्क... दोन एक वर्षांनी लहान असतील... मी त्यांना श्री मौनी विद्यापीठात शिकत असताना प्रथम पाहिलं. पुढे मी हिंदी शिक्षक, प्राध्यापक व त्या बँक लिपिक, अधिकारी, हिंदी कार्यक्रमातून भेट होत राहिली. पुढे मी बालकल्याण संकुलात कार्य करू लागलो अन् एक महिला आधारगृह सुरू केलं. तिथल्या महिलांना स्वयंसिद्धा करण्यासाठी टाटा ट्रस्टनं आम्हाला मोठं साहाय्य केलं होतं. त्यावेळी कांचनताई आमच्या मदतीला आल्या होत्या. तेव्हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, कार्यकौशल्याची जवळून प्रचिती आली. कांचनताई स्पष्टवक्त्या. शब्दांच्या पक्क्या. तंत्रावर 'कमांड' म्हणून समाजात 'डिमांड' त्या कुणाच्या याचक होत नाहीत. हक्काची लढाई व्यक्तिगत जीवनात पण लावून धरल्यानं त्यांच्या जीवनाला एक शिस्त आहे. ती शिस्त त्या एन.सी.सी. अधिकारी असल्यानं उतरली असावी. नेटकेपण हे त्यांचं वैशिष्ट्य. पसारा एवढा; पण त्या मोबाईल वापरत नाहीत, का तर बोलण्यात वेळ खूप जातो. (त्या राष्ट्रपती होतील तर मोबाईल कंपन्यांवर संक्रांत आल्याशिवाय राहणार नाही!) हे असतं त्यांच्या कर्मठशीलतेचं प्रतीक. त्या स्वत: एकही प्रशिक्षण देत नाहीत. रचना उभारणं, योजना करणं, तंत्र विकसित करणं यावर त्यांचा भर असतो. प्रशिक्षणं त्यांची दिवसाची असतात. पण खरं प्रशिक्षण असतं कांचनताईंचा त्यांच्याशी झालेला पहिला संवाद, पहिलं समुपदेशन. त्यात त्या महिला भगिनी न्यूनगंड कायमचा दूर करतात. बोला, वाचा, लिहा, करा, मिळवा अशी पंचसूत्री देऊन त्या महिलांचा कायाकल्प घडवून आणतात. कांचनताईंनी उभारलेल्या महिला उद्योजक झाल्या. अशा उद्योजक की आयकर खात्यासही त्यांची दखल घ्यावीशी वाटली (रेड टाकून किंवा असेसमेंटला केस काढून), हे असतं यश. युती शासनाच्या वेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. ते स्वयंसिद्धाच्या एका कार्यक्रमात आले होते. काम पाहून इतके प्रभावित झाले की, त्यांनी जाहीर भाषणात त्यांना शिवसेनेत यायचं आवाहन, आमदार, मंत्रिपदाचं आमिष दाखवलं होतं... कांचनताईंनी ते स्पष्ट व ठामपणे जाहीररित्या नाकारलं! कामानं त्या शेफारल्या नाहीत. आपणास अजून बरंच करायचं आहे. आपण एक शतांश महिलांपर्यंत पोहोचू शकलो नसल्याची त्यांना जाण, खंत आहे. पुढील वर्षीच त्यांची षष्ट्यब्दी होईल. आता त्यांनी आपले कार्यानुभव लिहायला हवेत. ते दूरवरच्या सर्व भगिनींना स्वयंसिद्धा बनवतील. माणूस प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचा तर अनुभव कथनास पर्याय नाही.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

हिरावलेलं माणूसपण बहाल करणारं घर : बालकाश्रम

 ही गोष्ट आहे १३६ वर्षांपूर्वीची. १८७५ सालची. लालशंकर उमियाशंकर त्रिवेदी नावाचे न्यायाधीश पंढरपूरच्या न्यायालयाचे उपन्यायाधीश (सब जज्ज) होते. ते अत्यंत कनवाळू व संवेदनशील असल्याने परिचित त्यांना 'देव मुन्सफ' म्हणत. अहमदाबादला जन्मलेले, प्रतिकूल परिस्थितीत शिकलेले लालशंकर त्रिवेदी न्यायाधीश होऊन पंढरपुरी गेले, तेव्हा रोज चंद्रभागेच्या वाळवंटी फिरायला जात. एके दिवशी सायंकाळी अंधारून आलेलं असताना फिरत पुढे जाताना ठेच लागली. पाहतात तो पायाशी कपड्यात गुंडाळलेलं बाळ होतं. प्रार्थना समाजाच्या समाजसेवेचा प्रभाव असलेल्या निपुत्रिक लालशंकर त्रिवेदींनी ते बाळ घरी आणलं. सोबत पत्नी देवकीबेन होत्याच. त्यांनी आपल्या घरी बाळाला सांभाळलं.
 त्यांच्या लक्षात आलं की, पंढरपुर तीर्थक्षेत्र असल्याने अनेक लोक येथे येऊन पापक्षालन करतात. म्हणजे अनाथ अर्भकांना देवाचरणी सोडतात; पण ते सोडायचे प्रकार अनेक व अघोरी होते. वाळवंट, नदी, देऊळ, रेल्वे, बस स्टॅण्ड, अन् कधी कधी तर गटार, संडासातही! हे सारं पाहून लालशंकर त्रिवेदींनी या मुलांच्या रक्षणासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. ते वर्ष होतं १८७५. तत्पूर्वी अशाच संवेदनेने महात्मा फुले यांनी १८६३ मध्ये पुण्याच्या गंज पेठेत असेल बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं होतं.
 पंढरपूरच्या बालहत्या प्रतिबंधक गृहाने आपल्या इमारतीसमोर एक पाळणा ठेवला होता. त्याला घंटा बांधली होती. ज्यांनी अशी अनाथ, अनौरस अर्भकं सोडायची आहेत त्यांनी ती वरीलप्रमाणे अन्यत्र न टाकता इथं द्यावी... संस्था ________________

त्यांचा सांभाळ करेल, असे आश्वासन त्यामागे होतं. पण लोक आपण टाकलेलं कळू नये म्हणून रात्री-अपरात्री यायचे...घंटाही नाही वाजवायचे...रात्रभर थंडीत कुडकुडलेलं बाळ सकाळी मेलेलं मिळायचं.
 मग ही प्रथा बंद करून कुमारी मातांनाच प्रवेश सुरू केला. दरम्यान १८७६-७७ मध्ये पंढरपूर भागात मोठा दुष्काळ पडला. अन्न पाण्याविना मोठी मनुष्यहानी झाली. अनेक मुलं पोरकी झाली. तत्कालीन ब्रिटिश सरकारने 'गोपाळपूर दुष्काळ निवारण समिती' स्थापून तिच्यामार्फत पोरकी मुलं संस्थेकडे सांभाळायला दिली. त्यांना धंदेशिक्षण देऊन स्वावलंबी करण्यासाठी ‘रॉबर्टसून स्कूल ऑफ इंडस्ट्री'ची स्थापना करण्यात आली. (ही शाळा उद्योगशाळा म्हणून प्रसिद्ध होती. नंतर ती नगरपरिषदेकडे चालवायला दिली. पंढरपूरचे आजचे लोकमान्य हायस्कूल ते हेच.)
 सन १८८१ ला लालशंकर त्रिवेदी यांची पंढरपूरहून बदली झाली. जाण्यापूर्वी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह, अनाथ बालकाश्रम व उद्योग शाळा या तिन्ही संस्था मुंबई प्रार्थना समाजाच्या हवाली केल्या आणि ते बदलीच्या जागी रुजू झाले. त्या क्षणापासून मुंबई प्रार्थना समाज आज अखेर त्या संस्थेचा सांभाळ करत आहे.
 स्थापनेपासूनच्या गेल्या १३६ वर्षांत या संस्थेनं ऊन-पावसाचे दिवस अनुभवले. प्रारंभीच्या १०० वर्षांच्या प्रवासात संस्थेस सर्वश्री रघुनाथराव करकरे, जी. व्ही. वीरकर, केरो रावजी भोसले (सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते), एल.बी.वैद्य, के. आर. शेवडे, व्ही. पी. आरोसकर, एस. एस. साळवी, बाबासाहेब जव्हेरी, रमाकांत तांबोळी यांच्यासारखे सेवाभावी अधीक्षक मिळाले व संस्था उत्कर्षापर्यंत पोहोचली. प्रारंभीच्या काळात संस्थेस सर्वश्री शेठ चतुर्भुज मोरारजी, तुकाराम तात्या, रमाबाई नवरंगे, रामचंद्र लालजी, भागोजी कीर प्रभृती मान्यवरांनी उदार हस्ते देणग्या दिल्या. त्या हजारो रुपयांच्या. त्यातून संस्थेस राजप्रासादसदृश वास्तू लाभली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुशिल्पी ज. ग. बोधेनी ती उभारली. संस्थेस लालशंकर उमियाशंकर त्रिवेदी या संस्थापकांप्रमाणेच वासुदेव बाबाजी नवरंगे (आज यांच्याच नावाने ही संस्था ओळखली जाते), सर नारायण चंदावरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, डॉ. काशिबाई नवरंगे, सर विठ्ठल नारायण चंदावरकर, द्वारकानाथ वैद्य प्रभृती मान्यवरांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे ही संस्था महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातील राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था बनली. ही संस्था पाहून लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, साहित्य सम्राट न. चिं. केळकर, जेम्स फर्ग्यूसन (तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर) राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, राज्यपाल श्रीप्रकाश, श्रीमती इंदिरा गांधी, आचार्य अत्रे, ज्ञानपीठ विजेते पद्मभूषण वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज (ज्यांनी इथं प्रेरणा घेऊन नटसम्राट लिहिलं) यांसारखे असंख्य मान्यवर सद्गदित झाले.
 अशा या संस्थेत मी १९५० ला जन्मलो. ही संस्था नसती तर हजारो (अक्षरशः) अनाथ, निराधार मुले, मुली, कुमारी माता, परित्यक्ता, वृद्धा, बंदी स्त्रीया यांचं काय झालं असतं, या विचारानं आजही मती गुंग होतेय. या संस्थेनं केवळ हजारो मुलं, मुली, महिलांना सांभाळलंच नाहीतर त्यांना 'माणूस' बनवून समाजाच्या मध्यप्रवाहात आणलं!
 दुस-या महायुद्धापासून ते आणीबाणीपर्यंतचा काळ हा संस्थेचा उत्कर्ष काळ होता. या काळात संस्थेत अर्भकालय, कुमारीमाता, परित्यक्ता आधारगृह, बालगृह, निरीक्षणगृह, रुग्णालय, प्राथमिक शाळा, बालमंदिर, ग्रंथालय, प्रसूतिगृह, प्रमाणित शाळा, उद्योगशाळा, कलानिकेतन, सारं... सारं होतं. त्या सर्वांपेक्षा या काळात ही संस्था 'घर' होती.
 अनाथ अर्भकं कितीही आली तरी त्यांचा सांभाळ डोळ्यांत तेल घालून व्हायचा. सांभाळासाठी कुमारी माता, परित्यक्ता व्यक्तिगत दु:खं विसरून जिवाचा दिवा करायच्या. नर्स, मेट्रन, डॉक्टरांची योजना होती. २४ तास निगराणी होती. बालमृत्युचं प्रमाण अल्प होतं. कुमारी माता, परित्यक्तांना त्यांचं दु:ख विसरावं, त्यांना नवं जग, माणसं, नाती मिळावी म्हणून त्यांना संस्थेत मुलं-मुली सांभाळायला दिल्या जायच्या. मग आई, मावशी, काका, ताई, दादाचा गोफ गुंफला जायचा. हवं नको, दुखलं-खुपलं बघितलं जायचं. न्हाण जपलं जायचं. मुलं बालवाडीत जाण्यापूर्वीच बडबड गीते एकमेकांचं ऐकून म्हणून लागायची. मोठ्या मुली... ताई, दीदी लहान मुलांना... 'चाल चाल मोते, पायात काटे' म्हणत रांगत्या पायांना चालतं करायच्या. मुलं मुली बालवाडीतून शिकली की, बाहेरच्या नगरपालिकेच्या शाळेत जात नि मग त्यांना आश्रमाबाहेरचं खरं जग दिसायचं... समजायचं. नवे मित्र-मैत्रिणी मिळत. समाजाचं ती अंग बनत. मुलं १० वर्षांची झाली की मुंबई, वाई, मालाड, जांभूळ, कोल्हापूर इ. ठिकाणच्या संस्थात जात. संस्थेत मुली राहात. त्या शिकत मोठ्या होत. मग दाखवणं, साखरपुडा, विवाह, डोहाळे, बारसं, मंगळागौर, दिवाळ सण, माहेरपण, बाळंतपण, नागपंचमी, रंगपंचमी सारं सारं व्हायचं. अगदी एकुलत्या मुलीच्या थाटात सर्वांचं तसंच पार पडायचं. संस्थेत दीर, भावोजी, मामंजी, मामी पण सासरहून भेटायला येत. इतर संस्थेत गेलेली मुलं सुट्टीत दिवाळी, मेमध्ये येत. त्यातून कधी अपघाताने भावा-बहिणी पलीकडचं ओढीचं नातंही तयार व्हायचं. नियम होते; पण त्यांचा काच नव्हता. चौकट होती ती माणूस घडणीची, माणूस जोडायची. त्यामुळे इथे कुणी-कुणाचे रक्ताचं नसलं तरी जिवाभावाचं मानलेलं सर्व सर्वांचे असायचे. या नात्याचं एक बरं असायचं. ते लादलेलं नसायचं...जन्मानं! जोडलेलं असायचं ...मनानं! त्यामुळे रक्त नि पाण्यापलीकडे जाऊन ‘ब्लड इज थिकर दॅन वॉटर'ला खोटं ठरवणारं. पराभूत करणारं ठरायचं! आज अशा हजारो मुलामुलींचं महाराष्ट्रात एक नवं गोकुळ तयार आहे. समाज परिघाबाहेरचं माणुसकीचं नातं!
 हे जग बघून स्वातंत्र्यवीर सावरकर गहिवरले होते. म्हणाले, '...ती ठेच लालशंकर त्रिवेदींना लागली नव्हती... समाजाला लागलेली ठेच होती ती!' वि. स. खांडेकर आश्रमासाठी न चुकता १० रुपये 'भाऊबीज' पाठवायचे. तेव्हा संपादक त्यांच्या दिवाळी अंकाच्या कथेस ५ रुपये मानधन देत असायचे. अशीच वार्षिक मदत खांडेकर अमरावतीच्या शिवाजीराव पटवर्धनांच्या कुष्ठधामास (दत्तपूर) पाठवत. कुसुमाग्रजांनी 'नटसम्राट' मध्ये बेलवलकरांच्या एका संवादात म्हटलंय... 'मुलांसाठी अनाथाश्रम काढलात तसा अनाथ आई बापांसाठी काढा माय बाप हो!' या आश्रमानं देशाच्या प्रधानमंत्र्यांपासून राज्यपालापर्यंत सर्वांना त्यांचे घरगुती प्रश्न सोडवायला, त्याची पोकळी भरून काढायला, कूस भरायला मदत केली आहे. अनेक 'विश्वामित्रां'ची प्रतिष्ठा याच आश्रमानं पोटात घेऊन त्यांना सामाजिक अभय दिले. तर किती तरी अप्सरा, शकुंतला, मेनका, कुंतींना त्यांचे भोग वाचवून त्यांना समाजात गर्त्या गृहिणी म्हणून उजवलं! यशोदा, देवकीचा खेळ, फेर... या आश्रमांनी वर्षानुवर्षे जपला. कृष्ण वाढला इथे... कंस नाही! या आश्रमांनी किती भूमिगत कुमार संभव पचवले! इथून कर्ण निर्माण झाले नि कर्नलही! इथून डॉक्टर, नर्स, प्राध्यापिका झालेल्या मुलींनी एके काळी मुंबई, महापालिकेचं शाळांचं, हॉस्पिटल्सचं प्रशासन सांभाळलं. अधिकारी होऊन! मुलं पत्रकार, लेखक, शिक्षक, संशोधक, इंजिनिअर, उद्योगपती, सेनाधिकारी झाले अन् टर्नर फिटर होऊन त्यांनी समाजाला 'टर्न' दिला नि 'फिट' ही केलं! सामाजिक संस्थेचे मोठेपण ती किती जणांचा सांभाळ करते यापेक्षा ती किती जणांना जबाबदार नागरिक बनवते या कसोटीवर जोखायचं झालं, तर पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमानं शेकडो... हजारो मुलं, मुली, महिलांना...ज्यांना समाजाने त्यांचं माणूसपण हिरावून घेतलं होतं ते बहाल करून त्यांना समाजभूषण बनवलं. या एकाच निकषावर या आश्रमाचा समाज कायमपणी देणेकरी ठरतो!

 मी इथं १९५० ला जन्मलो. लहानांचा मोठा झालो. लग्न इथंच...इथल्याच मुलीशी! आज निवृत्त. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मी साठी ओलांडली. माझं घर आश्रम झालाय! मुलं, सुना, नातवंडे, नातेवाईक... मी सनाथ...स्वाधार! माझ्यासारखे अनेक अनेक...मोजता नाही येणार...अन् माहीतही नाहीत इतके अज्ञान! परवा आषाढी वारी झाली...माझं हे घर जन्मघर, जनवास घर, कर्मघर, मर्मघर पाहायला गेलो. राम गणेश गडकरी बऱ्याच काळाने कुंडलला गेले तसे...त्यांना पूर्वीचे कुंडल भेटलं, दिसलं नाही तेव्हा ते म्हणाले होते... 'कृष्णाकाठी आता, पहिले कुंडल नाही' तसंच वाटलं...'चंद्रभागातीरी आता पहिले घर नाही.' एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक सरलं. मी माझ्याच काळाची साठ वर्षं उलटतो तेव्हा लक्षात येतं...त्याग, समर्पण, सेवाभाव, सचोटी, साऱ्याच शब्दांना आता बहिष्काराचा शाप लागलाय! नाही म्हणायला एक झालं. र. धो. कर्व्यांच स्वप्न साकारलं. लोक संततिनियमनाची साधनं वापरू लागले अन् कुमारीमातांचं होणं कमी झालं. त्यामुळे आपसूकच कर्णाचा वनवास संपुष्टात येतो आहे...ते अंगराज बनताहेत! पण जागतिकीकरण एक नवा फंडा घेऊन आलाय. ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत करतंय नि गरिबांना महागरीब! ज्यांना मुलं होतात ते सांभाळतात. ज्यांना मुली होतात ते टाकतात... सोडतात.! जत्रेत, रेल्वेत, महाकुंभात अन् महानगरात...वस्ती, झोपडपट्टीतील एक, दोन, तीन मुली...एका घरातल्या सोडल्या...टाकल्या जातात! कळतं...आई बाबांना सोडून गेली! कधी बाबा व्यसनी म्हणून तर कधी दुसरे बाबा आवडले म्हणून! काळ क्रूर असतो नि मनुष्य निष्ठर. त्यामुळे प्रश्न चेहरे बदलून येतात...प्रश्न संपत नाही...भय जसं संपत नसतं तसं! 'भय इथले संपत नाही'. संस्थांनी पण कात टाकली पाहिजे! नवे प्रश्न तर नवी उत्तरेही द्यायला हवीत...वृद्ध, परित्यक्ता, एड्सग्रस्त, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबे, स्थलांतरितांचे तांडे...समाजाचे नवे प्रश्न आहेत. ते जात, धर्मापलीकडे जाऊन माणूस, अर्थ, गरज, प्रश्न इ. निकषांवर सोडवायला हवेत. नाहीतर मग संस्थेच्या इमारती मोठ्या...संस्था छोटी...संस्था मोठी...माणसं छोटी...असं विषम चित्र नव्या समर्पणाला आवाहनच देत राहणार! संस्थेला 'घर' करायचं असेल, तर तिची घरघर संपवायला हवी. जिथं शापित अहिल्या असते तिथे राम जन्मतो खरा! पण इथं आधीच उशीर झालाय!

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

बदललेलं जग : बालकल्याण संकुल

 आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण पहिलं काय काम केलं असेल तर इथल्या सामाजिक कायद्यांचं भारतीयीकरण केलं. स्वातंत्र्यपूर्व काळात इथं ब्रिटिश कायदे होते. ते विसाव्या शतकाच्या आरंभी लागू झाले होते. अशातल्या एक कायदा होता, मुंबई मुलांचा कायदा १९२४. (त्या वेळचा मुंबई इलाखा भावनगरापासून धारवाडपर्यंत पसरलेला होता!) हा कायदा आपण १९४८ मध्ये सुधारला, दुरुस्त केला. त्यानुसार उनाड, भटक्या, बालगुन्हेगार, निराधार बालकांचा सांभाळ शक्य झाला. त्या वेळी समाजमन कसं होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. हा कायदा झाला तेव्हा मुलांच्या कल्याणापेक्षा या मुलांचा समाजाला उपद्रव होऊ नये, अशी भावना होती. त्यानुसार सरकार व समाजानं मिळून सामाजिक संस्था स्थापन करावी, असं ठरलं. या मुलांचं संरक्षण, संगोपन, शिक्षा, सुसंस्कार, पुनर्वसन करायचं काम या संस्थांवर सोपवण्यात आलं.
 प्रत्येक जिल्ह्यात 'डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन' अशा संस्था स्थापन केल्या गेल्या. या महाराष्ट्र स्टेट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन या मध्यवर्ती संस्थेशी संलग्न होत्या. अशी एक जिल्हा संस्था कोल्हापुरातही स्थापन झाली. कोल्हापूर त्या वेळी संस्थान होतं. संस्थानानं पुढाकार घेऊन ही संस्था सुरू केली व कोल्हापूरचं त्या वेळचं रिमांड होम सुरू झालं.
 त्यापूर्वी १९३७ मध्ये कोल्हापुरात 'करवीर हिंदू अनाथ महिलाश्रम' सुरू झाला होता. तिथं अनाथ, निराधार मुलं, मुली व कुमारीमाता, परित्यक्ता, वृद्ध अशा सर्वांचा सांभाळ होत असे. ती खासगी संस्था होती. त्यामुळे मुलांसाठी रिमांड होम सुरू झाल्यावरही ज्या उनाड, बालगुन्हेगार मुली यायच्या, अर्भकं यायची त्यांचा सांभाळ अनाथाश्रमातच होई.
 १९९० ला स्वतंत्रपणे एकाच प्रकारचं काम करणाऱ्या या दोन संस्थांचं विलीनीकरण झालं आणि त्यातून आजचं कोल्हापूरचं 'बालकल्याण संकुल' साकारलं. आज कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात वात्सल्य बालसदन (अर्भकालय), मुलांचं बालगृह, मुलींचं बालगृह, डॉ. राधाकृष्णन निरीक्षण गृह, डॉ. सौ. अहिल्याबाई दाभोळकर महिला आधारगृह, सुसंस्कार केंद्र, ज्ञानरंजन दत्तक केंद्र, उद्योग केंद्र, ग्रंथालय, दवाखाना, समुपदेशन केंद्र सारं काही आहे.
 या संकुलात आज एक दिवसाच्या अर्भकापासून ते १०० वर्षांच्या वृद्धेपर्यंत सुमारे ३०० मुलं, मुली व महिलांचा सांभाळ केला जातो. गेल्या ७४ वर्षात संस्थेनं सुमारे दहा हजार जणांचा केवळ सांभाळच केला नाही तर त्यांना समाजाच्या मध्यप्रवाहात आणून सन्मानित केलं.
 बालकल्याण संकुलाच्या समन्वित कार्याचा २०१२ मध्ये अमृत महोत्सव येतो आहे. या पंच्याहत्तर वर्षांत संस्थेनं अनेक बदल पाहिले. या काळातील इतिहासाची पानं पलटताना लक्षात येतं की, या संस्थेनं महाराष्ट्राच्या समाज जीवनात मोठं स्थित्यंतर आणलं. ज्या सामाजिक संस्थांना दूरदर्शी नेतृत्व लाभतं त्याच मूलभूत स्वरूपाचं कार्य करू शकतात. महात्मा फुले, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पंडिता रमाबाई ही नावं या संदर्भात आठवतात. मुळात कार्यकर्त्यांत शिक्षक असावा लागतो. अमृत महोत्सवी काळात कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलाचं प्रिन्सिपॉल शं. गो. दाभोळकर, प्रा. एन. जी. शिंदे, प्रा. डी. एम. चव्हाण, प्रा. सुरेश शिरोडकर यांनी वेळोवेळी नेतृत्व केलं म्हणून ही संस्था मातेचं कार्य करती झाली. ज्या संस्था काळाबरोबर कार्य, स्वरूप बदलतात त्या टिकतात. सामाजिक संस्थेचा इतिहास एका अर्थानं काळाचं कठोर प्रतिबिंब असतं.
 करवीर अनाथ हिंदू महिलाश्रम १९३७ मध्ये स्थापन झाला. तो करण्यात पुढाकार होता तत्कालीन हिंदू महासभेचा. प्रिन्सिपॉल दाभोळकर, चित्रपती भालजी पेंढारकर त्या सभेचे कार्यकर्ते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उपस्थितीत एका मुस्लीम महिलेच्या धर्मांतराने या संस्थेचा आरंभ झाला. सावरकर तेव्हा अंदमानमधून सुटून रत्नागिरी, कोल्हापूरमार्गे मुंबईस निघाले होते. जागोजागी त्यांचे सत्कार होत व सत्कार्याचा प्रारंभही. त्या काळात अशा संस्था जुन्या पडक्या जागेत सुरू होत्या. अनाथाश्रम व रिमांड होम योगायोगाने हुजूर पागा नि रेसकोर्स पागा अशा घोड्यांच्या तबेल्यात सुरू झाली. या संस्थेत त्या काळी हुजूर स्वारी, ब्रिटिश रेसिडेंट्स, नंतरच्या काळात रोटरी सदस्य असे तत्कालीन उच्चभ्रू प्रासंगिक भेटी, मदत देऊन आपण या वर्गाचे उपकारकर्ते कसे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत. सर्वसामान्यांच्या लेखी या संस्था अस्पृश्य होत्या. समाजातून तुटलेलं बेट, अशी त्यांची स्थिती असायची. हे चित्र सर्वत्र असायचं.
 अशा संस्थांत औपचारिक शिक्षणास अघोषित मज्जाव असायचा; कारण संस्थेतल्या मुलं, मुली, महिलांना बाहेर सोडलं जायचं नाही. समाज बहिष्काराचे बळी ते...काळ किती विचित्र पाहा. खरे अपराधी प्रतिष्ठित मुक्त...शिक्षा बळींना! त्यांना संस्थेतच शिवणकाम, विणकाम, शेती, कुक्कुटपालन, स्वयंपाक शिकवून स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला जायचा. दत्तक, विवाहाचे प्रयत्न व्हायचे; पण समाज प्रतिसाद थंडा असायचा. स्वातंत्र्यानंतर समाजजीवन शिक्षित झालं; पण संस्थांतली मुलं-मुली समाजात जायला, शिकायला लागल्या त्या देश स्वतंत्र झाल्यावरच. स्वातंत्र्यानंतर एक बरं झालं...अनाथ व बालगुन्हेगार जे पूर्वी एकत्र सांभाळले जायचे त्यांच्या स्वतंत्र संस्था झाल्या. सर्टिफाइड स्कूल सुरू झाली. अनाथ, निराधार मुलं शिकू लागली. अजून बालगुन्हेगारांना तुरुंगाप्रमाणेच डांबलं जातं. काही ठिकाणी मात्र शिकवलं जातं.
 आज अशा संस्थांनी कात टाकली आहे! कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलाचंच पाहा ना. पूर्वी अनाथ, अनौरस अर्भकं टाकली जायची. संस्थेने केलेल्या प्रबोधनामुळे हे बंद झालं. कुमारीमाता येते नि रीतसर, कायदेशीर बाळ देऊन जाते. पूर्वी अशी टाकलेली बाळं जगणं मुश्कील असायचं. आता अशा मुलांचे मृत्यू प्रमाण रोखण्यात संस्थेस चांगलं यश आलं आहे. ते सुविधा, विकास, यंत्रणा उभारणी व सेवाभावी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे. शिवाय अशी बाळं पूर्वी दत्तक पालकांच्या प्रतीक्षेत मोठी होत. आता लहानपणी, काही महिन्यांची असताना दत्तक जातात. घरी रुळतात. त्यांचा सांभाळ घरात होतो. नाती पण लवकर दृढ होतात. जी संस्थेत राहतात त्यांच्यासाठी भरपूर खेळणी, बालवाडी अशा गोष्टींची सोय असल्यानं ती आनंदी वातावरणात वाढतात.
 बाल संकुलानं संस्थेतच बालवाडी व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. पूर्वी कोवळ्या वयात या मुलांना समाजाच्या टक्क्याटोणप्यांना सामोरं जावं लागायचं. आज परिस्थिती बदलली आहे. समाजातील मुलं संकुलाच्या शाळेत येतात. हे समाज संक्रमण शक्य झालं ते तेथील कार्यकर्ते व शिक्षकांच्या दृष्टिकोनामुळे. इथलं सुसंस्कार विद्यालय शहराच्या अनेक स्पर्धात प्रथम येतं. हे मोठं सामाजिक स्थित्यंतर नव्हे का?
 पूर्वी संकुलातील सर्व मुलं-मुली शेजारच्या एकाच शाळेत जात. त्यामुळे त्या शाळेवर व मुलांवर एक प्रकारचा सामाजिक कलंक असायचा. आता मुला-मुलींना शहरातील विविध शाळांत त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. घर, समाजातील मुलं व संस्थेतील मुलं यांच्या केशरचना, कपडे यात पूर्वी प्रथमदर्शनी फरक असायचा. (कपडे एकाच प्रकारचे, दफ्तरासाठी एकाच प्रकारची पिशवी, मुलं अनवाणी, चेहरे मख्ख इ.) आता हा फरक दिसत नाही. मुली बॉबकट, बॉयकट, आयब्रो केलेल्या, बूट इ. युक्त गणवेश नसेल तेव्हा प्रत्येकाचे पोशाख वेगळे. यातून संस्था त्यांचं वेगळेपण जपते. त्यामुळे संस्थातली मुलं आता समाजातील एक बनली आहेत.
 प्रारंभी उद्योग शिक्षणच पुरेसं मानलं जायचं. आता उद्योगाबरोबर औपचारिक शिक्षण व तेही प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवड, कल यानुसार. संस्थेत ज्ञानरंजन केंद्र आहे. मुलं बालवाडीतच मल्टीमीडिया, व्हर्च्युअल गेम्स खेळू लागतात. शाळा संपली की, कॉलेजात जातात. 'जे घरी ते संस्थेत' असा प्रघात रूढ झालाय.
 मुलींची लग्नं पूर्वीही संस्थेत व्हायची. पण त्यांना समाजमान्यता नसायची. आज लग्नाला लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय उच्चाअधिकारी, हितचिंतक येतात. पोलीस बँड, हळद, मेंदी, गजरे, पटके, मिष्टान्न असं सारं असतं. ओटी भरणं, डोहाळे, माहेरपण, दिवाळी सणही! हे नवे बदलच अशा संस्थांना मातृमयी संस्था करते झाले.
 आज आपण एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक मागे सारून जागतिकीकरणाला सामोरं जात आहोत. जगात अनाथ, निराधार मुले, मुली व महिलांच्या संस्था हळूहळू बंद झाल्यात. आपण मात्र संस्थेला चिकटून आहोत. हे बदलायला हवं. आपल्याकडील सर्व संस्था इंग्रजांच्या अनुकरणाने आल्या. आज इंग्लंडमध्ये अनाथ, निराधारांच्या निवासी संस्था नाहीत. त्यांनी या कार्याचं नवं तत्त्वज्ञान, नवी यंत्रणाच विकसित केली आहे. प्रश्न समाजात निर्माण होतात. समाज ते निर्माण करतो. तर ते सोडवायची जागा समाजच असायची हवी. ते प्रश्न समाजानेच सोडवायला हवेत. तिथं प्रश्न आजही आहेतच. त्यांनी संस्थाबाह्य, समाजसहभाग असलेल्या सेवा विकसित केल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं, तर एक कुमारीमाता आहे नि तिचं बाळ आहे, तर तिच्यापुढे अनेक पर्यायी सेवा उपलब्ध असतात. पहिलं म्हणजे तिला स्वतंत्रपणे बाळासह राहण्याचा पर्याय असतो. इतक्या वर्षांत आपण त्याचा प्राथमिक विचारही केला नाही. तिथं सामाजिक सुरक्षा विभाग आहे. (सोशल सिक्युरिटी/सोशल डिफेन्स) तो अशा माता-बाळांना स्वीकारतो. त्यांची राहण्याची व्यवस्था करतो. बाळ दत्तक द्यायचं, न द्यायचं स्वातंत्र्य मातेचं. द्यायचे असेल, तर विभाग त्याची सर्व जबाबदारी घेतो. बाळ स्वीकारून ते आधी एखाद्या कुटुंबात सांभाळायला दिलं जातं. या कुटुंबाला सांभाळखर्च देऊन, दरम्यान दत्तक पालकांचा शोध घेतला जातो. तिकडे त्या आईला शिक्षण, नोकरी, व्यवसाय सगळ्यासाठी सरकार मदत करतं. हे करताना माता, बाळाचा सन्मान राखला जातो. अशा अनेक प्रकारच्या सेवांचं जाळं मी युरोप नि आशियातीलही अनेक देशांत विकसित झालेलं पाहिलं आहे.
 जगात सामाजिक कायद्यातच सुविधांची शाश्वती, योजना अंतर्भूत असतात. आपल्याकडे ‘मानव अधिकार अधिनियम - १९९३' आहे. तो फक्त यंत्रणा सांगतो. त्यात मानव अधिकार नाहीत. आयोगास काय संधी, सुविधा, यंत्रणा असेल त्याबद्दल ब्र नाही. त्यामुळे कायदा आहे; पण जनतेद्वारा त्याच्या वापराची व्यवस्थाच नाही. अशा देशात सामाजिक स्थितीशीलताच स्थायी राहते. आपल्या केंद्र व राज्य शासनाला वंचितांचं विश्व बदलायचं असेल, तर कायद्यातच यंत्रणा, योजना, नियम अंतर्भूत हवेत. समाज दबावामुळे कायदे होतात. नियमांअभावी (रुल्स) वर्षानुवर्षे पडून राहतात. सरकारची वंचित विश्वातली माघार म्हणजे घटनेतील 'वेलफेअर स्टेट' संकल्पनेस हरताळ फासण्यासारखेच आहे. अजून आपण सामाजिक सुरक्षा योजना, सार्वत्रिक निवृत्ती योजना, निर्वाह भत्ता आदींबाबत प्राथमिक विचार करत नाही. मतांवर डोळा ठेवून श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना राबवतो. त्यात वंचित आहेत, त्यांना तसंच ठेवण्यावर भर आहे. त्यांच्या विकास, उत्थानाचा विचार नाही. आपल्याकडे 'नगर उत्थान योजना' आहे. 'नागरिक उत्थान योजना' नाही. वृद्धांचे, असंघटित मजुरांचे, परित्यक्त्यांचे किती भीषण प्रश्न या देशात आहेत. महाराष्ट्रात आजमितीस पाच लाख बालमजूर आहेत. आपणास त्यांच्याशी काही देणं-घेणं नाही. निराळं जग बदलायचं तर विचार व कृतीही निराळीच हवी.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

माणुसकीची मुक्तांगणं : तुरुंग

 'तुरुंग' शब्दाची माझी ओळख १९५९-६० ची. मी पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमातून बदली होऊन कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये आलो होतो. या रिमांड होमच्या शेजारी पद्माळा रेसकोर्सचा परिसर होता. पूर्वी तिथे रेसेस चालत. त्या रेसचा ट्रेक एका तळ्याभोवती होता. ते तळे पद्माळा तळे नावाने ओळखले जायचे. ते कालपरत्वे आटले होते. तिथं कळंबा कारागृहाचे, जेलचे कैदी शेती करीत. म्हणून त्याला कैद्यांचे तळेही म्हटले जायचे. रिमांड होममधून ते कैदी, वॉर्डन, पोलीस मी नेहमी शेती करताना पाहात असे. शिवाय शाळेला जायचा रस्ता म्हणजे रेसकोर्स, रेसराऊंड. तिथून जाता-येता कैदी दिसत. सकाळी ८ वाजता ते येत सायंकाळी ६ वाजता परत जात. त्यांचं नि आमचं जाणं-येणं, गणवेश बरंच साम्य असणारं. ते ओळीत येत-जात, आम्हीपण. त्यांच्यापुढे मागे पोलीस, आपल्यापण पुढे-मागे संस्थेचे हवालदार, खाकी वर्दीतलेच. ते अनवाणी, आम्हीही. त्यांचा गणवेश हातमागाचा, आमचाही. त्यांचं चम्मन, आमचेही. ते मोठे भाऊ, आम्ही धाकटे. त्यामुळे उगीचच त्यांच्याबद्दल माझ्या मनात बंधुभाव होता.
 एकदा कात्यायनीला रिमांड होमची सहल गेली होती, तेव्हा कळंबा जेल बाहेरून पाहिलं. रिमांड होमसारखंच होतं. पुढे मोठा दरवाजा. त्याला छोटं विकेट गेट. चारी भोवताली उंच भिंती. खोल्यांना कुलूप. सारा मामला कळंबा जेलसारखाच रिमांड होममध्येही होता. त्या वेळी बेल, ध्वज, पहारेकरी, बाग सारं साम्य असणारं अधिक.  सुट्टीत मी पंढरपूरला जात असे. तिथे आश्रमात तुरुंगातल्या बायकांचा विभाग होता. त्या काळात तुरुंगात स्त्रियांना ठेवायची स्वतंत्र सोय, कर्मचारी असा आजच्यासारखा मामला नव्हता. त्यामुळे शिक्षा झालेल्या बायका आश्रमात ठेवलेल्या असायच्या. पोलिसांनी पकडले, या कल्पनेने त्या पुरत्या गारद असायच्या. पळून जाणे दूरच. जीव मुठीत घेऊन राहायच्या. अबोल असायच्या इतर बायकांत त्या फारशा मिसळतही नसत.
 पण मी तुरुंग पहिल्यांदा आतून पाहिला ते मोठा झाल्यावरच. सन १९८० ला मी रिमांड होमचं काम पाहू लागलो तेव्हा तुरुंगातील बंदिजनांची मुले (काही शिक्षा झालेली, काही आई-वडील तुरुंगात असल्याने निराधार असलेली) आमच्या रिमांड होममध्ये असत. त्यांच्या काही प्रश्नांसंदर्भात मी पदाधिकारी म्हणून पहिल्यांदा बैठकीच्या निमित्ताने गेलो असताना तुरुंग आतून पाहिला अन् लक्षात आलं की, हे प्रकरण रिमांड होमपेक्षा भयंकर आहे. तिथलं प्रशासन, शिस्त, नियम, परंपरा साऱ्याच गोष्टी प्रथमदर्शनी 'माणूस' जीवनास हादरवणाऱ्या वाटल्या होत्या. मग जेलमध्ये येणं-जाणं नित्याचं झालं अन् मी जेलशी एकरूप होऊन गेलो.
 शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. सभ्य माणसास पोलीस ठाण्यात जावं लागू नये, तद्वतच कोणासच कारागृहात जायची वेळ येऊ नये, असं राष्ट्रीय आयोगाच्या जिल्हा प्रतिनिधी पदाच्या गेल्या पंधरा वर्षांच्या अनुभवावरून माझं मत बनलं आहे. कारण हे जग आपण रोज जगतो त्या जगापासून सर्वस्वी निराळे, तुटलेलं, माणुसकी नसलेलं असं जग आहे. न्यायाधीश, पोलिस, डॉक्टर, जेलर यांना भावनावश न होता आपल्या, अंगीकृत कार्यास बांधील राहून काम करायचं असतं. ती त्या पदाच्या अधिकार व कर्तव्याची पूर्व अटच असते म्हणा ना.
 कारागृह मला समाजातलं तुटलेलं बेट वाटत आलंय. जगातले अनेक तुरुंग बेटांवरच आहेत. उदाहरणार्थ, आपलं अंदमान कारागृह, म्हणजे तुम्ही रोज सहज जगता त्या अधिकार, विचार, भावनांचा तिथे संकोच असतो. ते जग तुम्ही जगता त्या जगापेक्षा कितीतरी भिन्न असतं. म्हणून तर ते उंच तटबंदीत बंदिस्त असतं. काही कारागृहांच्या बाहेर खंदकही असतात. कालपरत्वे ते मुजलेत इतकेच. पहिली गोष्ट अशी की, कारागृहात अधिकृततेशिवाय प्रवेश नसतो व बहिर्गमनही! कोणीही येवो, जावो याची नोंद होणारच! कोण, कुठला, कशाला आला, किती वेळ होता, कुणाला भेटला, परत केव्हा गेला, जाताना काय घेऊन गेला, याची बारीक तपासणी, नजर हे इथलं वैशिष्ट्य. मी गेलो तरी याला अपवाद नाही. तुम्ही अधिकारी म्हणून गार्ड ऑफ ऑनर, सॅल्युट, यस सर सारं असेल पण ते या सोपस्कारांसह! अधिकारी, पोलीस, कर्मचारी, बंदी, वाहनं साऱ्यांची नोंद होणार म्हणजे होणार. यातून एक गोष्ट नोंदवली जाते... तुम्ही नियम, बंधनाच्या जगात येत आहात. तुमचं स्वातंत्र्य, लोकशाही, भावना, विवेक साऱ्याला प्रवेशच विराम देतो.
 इथलं बंदिजनांचे जीवन म्हणजे दोन वॉरंटमधलं जगणं. इथे कुणालाही कोर्ट वॉरंटशिवाय ना प्रवेश, ना सुटका. कोर्टाची तारीख, दवाखाना, बदली, रजा, पॅरोल, जामिनावर सुटका सारं चालतं न्यायालयाच्या आदेशावर व तुरुंग नियमावली (जेल मॅन्युअल) च्या आधारे. बंदी दोन प्रकारचे असतात. शिक्षा होण्यापूर्वीचे संशयित, गुन्हा दाखल, न्यायप्रविष्ट रिमांड वरील इ. ते उपतुरुंगात प्रतीक्षा कालावधीसाठी ठेवलेले असतात. सबजेल, सेंट्रल व रिजनल जेल सर्वत्र नियम, अनुशासन, कार्यपद्धती एकच. बदल असतो. निवासकाळ, निवास स्वरुप यांचा. शिक्षेचं गांभीर्य, अपराधाचं स्वरुप, अपराध्याची वृत्ती या साऱ्यांवर अंतर्गत विभाजन अवलंबून असतं.
 आतल्या कोठड्याही वेगवेगळ्या असतात. कठोर, अपराधी, दहशतवादी, क्रूर वृत्तीचे गुन्हेगार यांच्यासाठी असते ‘अंडा बरॅक' तिथं तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीच दिसत नसतं. जे दिसतात ते तुमच्यासारखेच पण अपवाद! इन मीन तीन! जेवणं, झोपणं, फिरणं छोट्या बरॅकच्या फेऱ्यात. घाण्याच्या बैलासारखं! फिरून तिथेच. सूर्यप्रकाश दिसला तरी ब्रह्मानंद व्हावा, अशी स्थिती! माणसास सर्वांत मोठी शिक्षा फाशी नाही... एकटं ठेवणं. असं माझं अनुभवांती मत झालं आहे. यापेक्षा कमी; परंतु जन्मठेप आजीवन कारावास, खून, दरोडे असे भयंकर गुन्हे केलेले बंदी असतात त्यांनाही एकेकटंच ठेवलेलं असतं. पण जग दिसतं. थोडा वेळ अंगणात, व्हरांड्यात रोज पहाऱ्यात असली तरी फिरण्यास मोकळीक असते. काही सामूहिक गुन्हेगार असतात. टोळीतलं, टोळी करून गुन्हे करणारे. त्यांना सर्वांना एका बरॅकमध्ये ठेवलं जातं. ते एकमेकांचे मित्र, सहकारी असतात. गुण्यागोविंदाने राहतात. वेगवेगळ्या टोळ्यांत वैर, ईर्षा, द्वेष, स्पर्धा, बदला सारं असतं. त्यातून सुटायचा, वाचायचा हाच रामबाण उपाय असतो. बगळे, पोपट, कावळे, चिमण्या असोत वा वाघ, सिंह, हत्ती, हरीण साऱ्यांचे थवे झुंडी, कळप असतात. निसर्ग नियम इथे श्रेष्ठ व सोयीस्कर ठरतो. तुरुंगाच्या साऱ्या प्रशासन, नियम, शिस्त इ. मागे मानसशास्त्र, व्यवहार, मनुष्यवर्तन, तर्क, खबरदारी सारं सारासार विचार करून ठरवलेलं असतं. मग शिवाय सर्वसाधारण बंदी बांधवांच्या बराकी असतात. बराकीचे पण सेल असतात. सारे बंदी कधीच एकत्र येत नसतात. कार्यक्रम इत्यादी अपवाद; पण त्यातही दक्षता, आपत्कालीन व्यवस्थापन असतंच. त्यातूनही प्रसंगपरत्वे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतोच; पण तो अपवाद असतो. अगदी बळाचा वापर करण्याचेही प्रसंगही उद्भवतात.
 तुरुंगातील बंदिजनांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून मानवाधिकार आयोग, ऍम्नेस्टी इंटरनॅशनल, प्रयासासारख्या संस्था भरपूर प्रयत्न करत असतात. न्यायालयेही लवकर न्याय मिळावा म्हणून भरपूर प्रयत्न करतात. बंदिजनांना आपल्या खटल्याचा निकाल लागावा म्हणून किती ओढ असते म्हणून सांगू? नुसती खटल्याची तारीख लागली तरी त्यांची आशा पालवते. कधी पोलीस बंदोबस्त आला नाही, कधी साक्षीदार आला नाही, कधी पुराव्याचं साहित्य आलं नाही, कधी वकिलांनी पुढची तारीख घेतली म्हणून तारीख होत नाही; पण तारखेला जायला मिळणं यातही पण किती समाधान असतं ते अनुभवायचं तर जावे त्याच्या वंशा...तेव्हाच कळे!
 तुरुंगातलं बंदिजनांचं जीवन सुखकर व्हावं, असा तुरुंग प्रशासनाचा प्रयत्न असतो. मुखमार्जन, प्रात:र्विधी, स्नान, योगा, न्याहारी, उद्योग, शिक्षण, प्रशिक्षण, उत्पादन, पारिश्रमिक (बंदी पैसे मिळवतात) कँटीन, बेकरी, दवाखाना, खेळ, टी.व्ही., वर्तमानपत्रं, मासिकं, ग्रंथालय, विश्रांती, झोप सारं कसं नियमित; पण नियंत्रित असतं. अनेक जणांचे विकार शमतात, तर अनेकांना नवे उद्भवतात (विशेषतः मानसिक, भावनिक) अनेकांचं वजन वाढतं तर काहीजण खंगतात, झुरतात. सारं एका चक्रात सुरू असलं तरी आपण तुरुंगात आहोत, या जाणिवा मात्र पुसल्या जात नाहीत. त्या व्यवस्थेचं ते काम पण असतं. गिनती, बंदी, परिपाठ यातून ते आपसूक जाणवत राहतं.
 बंदिजनांसाठी तुरुंग प्रशासन सण, उत्सव, क्रीडामहोत्सव, व्याख्याने, आरास सारं करत राहतं. पण त्याला बंधनांची चौकट असतेच असते. त्यातूनही तुम्हास रमण्यास वाव असतो. तुरुंगात राहून तुम्हाला शिकता येतं. परीक्षा देता येतात. तुरुंगातून पदवीधर, एम.ए., पीएच्.डी. झाल्याची उदाहरणं आहेत. तुम्ही लिहीत असाल तर पुस्तकं प्रकाशित होतात. उदा. 'गजाआडच्या कविता' तुम्ही शिक्षक असाल तर तुरुंगात शिकवता येतं. डॉक्टर असाल, तर उपचार करता येतात. छंद जोपासता येतात. विदेशांच्या तुलनेने आपले तुरुंग अजून बंदिस्त, पारंपरिक आहेत. अमेरिका, नॉर्वेसारखे तुरुंग व्हायला आपल्याला अजून बराच प्रवास करावा लागेल. त्यासाठी अपराध्याकडे 'माणूस' म्हणून पाहण्याचं समाजमन आपणास प्रयत्नपूर्वक तयार करायला हवं. त्यासाठी समाजात भावसाक्षरता उंचवायला हवी. त्यासाठी समाजाचा संवेदनासूचकांक वाढायला, वधारायला हवा.
 तुरुंगात स्त्री-पुरुषांचे स्वतंत्र विभाग असतात. अलीकडे स्त्री कर्मचारी नियुक्त होत आहेत. किरण बेदी, मीरा बोरवणकर, यांच्यासारख्या स्त्री अधिकारी तुरुंग महानिरीक्षक झाल्यापासून पुरुषसत्ताक तुरुंग मातृसत्ताकतेकडे झुकत आहेत. हे सारं मानवाधिकार जागृती, जबाबदारी, लोकशिक्षण यातून घडत आहे. हे आपणास विसरून चालणार नाही. तुरुंगातील विद्यमान सर्व सुविधा या मानवाधिकार संकल्पनेचा विकास आहे. पूर्वी ग्रॅमवर आहार मिळायचा. त्याचे रूपांतर आता कॅलरीत झालं आहे. पूर्वी पोट भरण्यावर भर होता 'आता चवीचे खाणार त्याला तुरुंग देणार' अशी स्थिती. स्वयंपाकगृह किती आधुनिक होत आहेत. ते गॅस, जनरेटरवरून लक्षात येतं नि तिथल्या पीठ चाळायचं, दळायचं, मळायचं यंत्र, मोठाले कुकर्स, ग्रील्स पाहिलं, डायनिंग हॉल पाहिले की, लक्षात येतं. पूर्वी वाढलं जायचं. आता भोजन दिलं जातं हा फरक. तरी विदेशी तुरुंगासारखं अजून आपणाकडे "Living, Eating, Drinking by choice" आलेलं नाही. ते येईल तो मानवाधिकाराचा विजयदिन असेल.
 तुरुंगात राहणारी व काम करणारी दोन्ही माणसंच असतात. दोघांच्या भूमिका भिन्न असतात. जबाबदाऱ्या निश्चित असतात. तुरुंगाचं सारं साम्राज्य नियंत्रणाच्या होकायंत्रावर पेललेलं असतं. एक साधी गोष्ट मी निरीक्षणातून नोंदलेली सांगतो. तुरुंगाची सारी मदार असते ती कुलूप किल्लीवर, तुरुंगाचे अधिकारी, पोलीस सर्वाधिक काळजी घेतात, ती कुलूप-किल्लीची. घड्याळाची किल्लीही इथं महत्त्वाची. आता घड्याळाची किल्ली गेली अन् सेल आले. सेल व बेल म्हणजे इथलं नियंत्रण. तुरुंगात तासा-अर्ध्या तासाला टोले का? तर ते यंत्रणा जागी व कार्यरत असण्याचं प्रतीक! किल्ल्यांचा जुडगाच तुम्हाला तुरुंगात दिसणार! एकेरी किल्लीची रिंग तुम्हाला शोधून सापडणार नाही. प्रत्येक जुडग्यात एकच किल्ली चालणारी असते हे का? तर कैद्यांनी किल्ली पळवली तरी चालविण्याच्या खटाटोपीत तो पकडलाच जातो. या एकट्या एका युक्तीवर तुरुंग चालतो, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कोणतंही कुलूप उघडणारा अट्टल घरफोड्याही इथे गारद होतो. अशा अनेक ग्यानबाच्या मेखीत तुरुंग अभेद्य असतो.
 कायद्याचे राज्य न्याय, पोलीस व तुरुंग यांच्या समन्वयातून चालतं, हे जरी खरं असलं तरी आपलं तुरुंग प्रशासन मनुष्य बळ, प्रशिक्षण, साधनं, उपकरणं यांच्या दृष्टीनं अजून मागासच म्हणावं लागेल. सिंगापूर, हाँगकाँग, नॉर्वे, फिनलंड असे छोटे बेटसदृश देश अभ्यासले तरी ते लक्षात येतं. आज आपण एकविसाव्या शतकात आहोत. या शतकाचं वर्णन सूचना व संपर्क क्रांतीचं शतक म्हणून केलं जातं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, इंटरनेट, सायबर कल्चरचा विकास करून न्यायदानात गती, तपासात तेजी, संपर्कात क्रांती आणणं शक्य आहे. तुरुंगाचीच यंत्रणा साधनसंपन्न होईल तर तारखा, पुरावे, खटले, निकाल यात समन्वयाने गती आणणे शक्य आहे. तुरुंगात न दिसणारी भावनिक, मानसिक ताणतणावांची शिक्षा, तिचा विचार, तिची भरपाई तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुरुंग प्रशासनाच्या रडारवर प्रत्येक बंदी रोज असेल. हे अवघड असलं तरी अशक्य नाही. गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची व भक्कम आर्थिक तरतुदीची. तुम्ही देशातील प्रत्येकाचा विचार 'माणूस' म्हणून जेव्हा करू लागता तेव्हा प्रश्न निष्प्रश्न होतात व बंदिजन माणसं!

•••

निराळी माणसं

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

मातृमंदिरच्या मावशी : इंदिराबाई हळबे

 माणूस सामाजिक काम का करतो? याचं उत्तर व्यक्तिपरत्वे भिन्न असलं, तरी एक नक्की असतं की, उपजत तिच्यात आपल्या पलीकडे पाहण्याची, विचार करण्याची, कार्य करण्याची वृत्ती असते. ती व्यक्ती समाजकार्य करू लागायला एखादी घटना कारणीभूत होते इतकंच. देवरूख (ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) इथं असलेल्या अनाथ निराधार मुले, मुलींचे संगोपन, समाजातील गरजूची शुश्रूषा व परिसरातील शेती, विहिरी, बंडिंग, फळबाग इ. स्वरूपाचं पर्यावरण व शेती विकासाचे काम ज्या 'मातृमंदिर' संस्थेमार्फत सध्या चालतं, त्याचा प्रारंभ मात्र इंदिराबाई हळबे नामक एका सामान्य स्त्रीच्या व्यक्तिगत पोकळीतून झाला खरा; पण 'कोकणच्या मावशी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असामान्य कर्तृत्व, सेवा, समर्पण, शुश्रूषा करणाऱ्या या समाजसेविकेनं कोकणचा दुर्गम प्रदेश गरजू व अडलेल्यांसाठी सुगम केला खरा!
 रत्नागिरीजवळ असलेलं एक छोटं खेडं. केळ्ये-माजगाव त्याचं नाव. या दुर्गम खेड्यात इंदिराबाई हळबे तथा मावशींचा जन्म सन १९१४ ला झाला. तिसरीपर्यंतचं त्यांचं शिक्षण केळ्ये-माजगावला झालं. त्या मामा-मामींकडे असताना त्यांचं वयाच्या १४ व्या वर्षी सन १९२८ ला लग्न झालं. सन १९२८ ते १९३९ पर्यंतचा त्यांचा सांसारिक काळ सुखाचाच म्हणायचा. दोन मुलं झालेली; पण ती दगावली. पुढे पतीही गेले तेव्हा पदरी मीना होती. त्या मुंबईहून देवरूखला आल्या तेव्हा १९४२ चे युद्ध सुरू होतं. मुलीला शिकून डॉक्टर व्हायचं होतं. पण तीही दगावली तशी इंदिराबाईंनी हाय खाल्ली. पण मग हिय्या केला. आपणच नर्स व्हायचं. भास्कर आठल्ये म्हणून राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते होते. त्यांनी त्यांना मन रमावं म्हणून सेवा दलाच्या शिबिरात येण्यास सुचवलं. मुंबईच्या वडाळा कॅम्पमध्ये शिबिर होतं. तिथे त्यांनी साने गुरुजींचे विचार ऐकले. गीता प्रवचनं होती ती. त्यांनी समाजकार्य करण्याचं ठरवलं.
{{gap}सांगलीजवळ हरिपूरला कृष्णाताई केतकर निसर्गोपचार शिकवत. तिथे त्यांनी प्राथमिक धडे घेतले. इथे त्यांची चंद्राताई किर्लोस्करांशी ओळख झाली. त्या त्यांना कोल्हापूरच्या विनयकुमार छात्रालयातील कार्यकर्ता आश्रमात घेऊन गेल्या. तिथं त्यांची सर्वोदय कार्यकर्ते मामा क्षीरसागर, बाबा रेडीकर यांच्याशी भेट झाली. त्यांच्या ओळखीनं त्या नागपूरला कमलाताई होस्पेटांच्याकडे गेल्या. दोन वर्षांचे नर्सिंग करून परतल्या. कारण त्यांनी जातानाच परत येऊन कोकणात सेवाकार्य करण्याचं ठरवून टाकलं होतं. ते १९५१ चं वर्ष होतं. रत्नागिरीच्या मूर येथे राष्ट्र सेवादल शिबिर होतं. तिथं त्या सहभागी होत्या. शिबिर सुरू असताना गावात एक बाई अडल्याचं कळताच त्या गेल्या व तिला मोकळं केलं. त्यांना सूर सापडला. अशा घटनेनंच त्या नर्सिंगकडे वळल्या होत्या.
 सन १९५४ मध्ये त्यांनी देवरूखला दोन कॉटचं छोटं प्रसुतिगृह सुरू केलं. मामा क्षीरसागरांनी त्याला नाव दिलं 'मातृमंदिर'. तो काळ पांढरपेशा बाईंनी एकटं रानावनात, दऱ्या खोऱ्यात जाऊन सेवा करायचा नक्कीच नव्हता. तेही जात, धर्म, गरीब, श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य भेद न मानता; पण इंदिराबाई हळबे बोलावणं आलं की काळ, वेळ न पाहता वाडी, वस्तीत पोहोचत. १०-१० मैल ऊन, पाऊस, थंडी न पाहता त्या पायपीट करायच्या. काम वाढलं तशी गरजही वाढली. म्हणून मावशींनी काही सहकाऱ्यांना घेऊन संस्थेची स्थापना, नोंदणी सोपस्कार केले. सन १९५६ ला हा उपचार पूर्ण होताच त्यांनी रिंगण रुंद करायला सुरुवात केली. सुतिकागृह, दवाखाना, माहेर, साम्यकुल, दुग्धशाळा, प्रसाद, बालवाडी, गोकुळ, बालवाचनालय, शेती विभाग, दुकान (औषध, वस्तू इ.) 'गरज तिथे काम' या तत्त्वानुसार ओणी, हिंदळे, मुणगे, ताम्हाणे, वडवली इ. ठिकाणी शेती, वनीकरण, जलस्वराज्य, गावतळी, नाला बंडिग काय नाही केलं? शिवाय मातृमंदिर, गोकुळमध्ये अनाथ मलं, मुलींचा सांभाळही. बाळ-बाळंतिणींची शुश्रुषा, वेळ मिळाला की आंबा, फणस पोळ्या, गरे तळणे, आमसूल वाळवण एक ना दोन, हजार कामं न थकता करताना पाहून लोक थक्क व्हायचे ...पाहूनच थकायचे.
 त्यांच्या कामाची माहिती समाजास होईल तशी लोकांनी सढळ हातानं मदत देऊ केली. भावना एकच असायची. एक बाई इतकं काम करते तर आपण हातभार लावला पाहिजे. कोरगावकर ट्रस्ट, वालावलकर ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, शासन सर्वांनी त्यांना सहाय्य केलं. त्या नेहमी म्हणायच्या. 'माणसांनी आपल्या पलीकडे जाऊन एक तरी काम केलं, तर समाजात प्रश्न राहणार नाही'. या साध्या ध्येयावर त्या आयुष्यभर अविचल उभ्या राहिल्या. त्यांना 'दलितमित्र', 'सावित्रीबाई फुले पुरस्कार', 'चतुरंग', मुंबईचा 'जीवन गौरव' लाभला; पण त्यांच्या कृतीकार्यात कधी कुणाला फरक दिसला नाही. संस्थेतील मुलींची लग्नं, मुलांच्या पुनर्वसनासाठी शेती सारं त्या रोज नवं करत राहायच्या. ४० खाटांचं हॉस्पिटल, ऍम्ब्युलन्स, डॉक्टर, नर्स, मेडिकल शॉप इ. द्वारे त्यांनी दुर्गम भागातील स्त्रियांच्या आरोग्य, प्रसूती, उपचाराची काळजी सतत वाहिली. शिवाय संस्थेत कार्यकर्त्यांचं येणे-जाणं, भाषणे, कार्यक्रम नित्य असायचे. मावशी चूल व मूल सांभाळत घरासारखी संस्था सांभाळायच्या. त्या कधी स्टेजवर चढल्याचं कुणी पाहिले नाही. अशी निरपेक्षता, निरिच्छता हेच त्यांच्या कार्याचं समवायी साधेपण होतं.
 माझा मातृमंदिर नि मावशींचा संबंध सन १९८५-८६ दरम्यान झाला. मी त्या वेळी वालावलकर ट्रस्टचे काम पाहात होतो. डॉ. महेंद्र, भाऊ नारकर, शांताबाई नारकर इ. मातृमंदिरात सक्रिय होते. संस्थेच्या अनुदान, मान्यतेचा प्रश्न होता. मी मध्यवर्ती संस्थेचंही काम पाहात होतो. तेव्हा प्रथम एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मातृमंदिर पाहिलं. तेव्हा मावशी थकलेल्या असल्या तरी सारं पाहात राहायच्या. मग एकदा त्यांच्या संस्थेतील दहा-एक मुली दहावी पास झालेल्या एकदम. संस्थेतील मुदत संपलेली... मग आम्ही त्यांना आमच्या कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलाच्या आधारगृहात प्रवेश देऊन शिकवलं. काहींची नंतर लग्नही केली...झाली. विजय सराटे नावाच्या मुलाला एम.एस.डब्ल्यू. केलं. आनंदी, मेघा, मीना अशा कितीतरी मुली मला आजही आठवतात. विजय तर संस्थेचा संचालक होऊन अनाथाश्रम, वर्किंग वुमन्स हॉस्टेल चालवताना पाहतो तेव्हा मावशी आठवल्याशिवाय राहात नाहीत. या सर्वांना मजकडे पाठवताना म्हणाल्या होत्या, 'सर, तुम्हाला मी काही सांगायला नको...तुम्ही असेच मोठे झालात'. मावशी मितभाषी; पण मार्मिकता होती त्यांच्या बोलण्यात, संयम असायचा. पाठीवर घालून पुढे न्यायचं धोरण असायचं. कोणी मुलांबद्दल तक्रार करू लागलं तर म्हणायच्या, "मुलंच ती. मुलांसारखीच राहणार. मनावर नका घेऊ."
 संस्थेत शिकून, नोकरी करून मोठ्या झालेल्या किती तरी मुलींचं राजेवाड्यातलं हे मावशींचं साम्यकुल खरं मातृमंदिर नि माहेर होतं. मुली घरी, पंचक्रोशीत आल्या की, मावशींचं दर्शन हा सर्वांचा ठरलेला एककलमी कार्यक्रम. मुलं, मुली हा मावशीच्या आयुष्याचा हळवा कोपरा असायचा. व्यक्तिगत आयुष्याची पोकळी हे त्याचं मूळ असलं, तरी ते त्यांनी कधी दाखवलं नाही की उच्चारलं नाही. संस्थेत बाळ आलं की, त्यांचं शी - शू, अंगडे- टोपडे, दूध सारं व्यक्तिशः करताना मातृत्वाचा झरा अखंड वाहात राहायचा. या कामातून त्यांना एक उपजत शहाणपण आलं होतं. झालं असं की देवरूखात एकदा मोठी डोळ्यांची साथ आली. ड्रॉप्स, ऍम्प्युल्सचा सर्वत्र तुटवडा होता. आश्रमात मुलींचे डोळे आलेले. बाळंतिणी धास्तावलेल्या. मावशी बाळंतिणींना म्हणाल्या, "घाबरू नका. अंगावरचे थेंबभर दूध बाळांच्या डोळ्यांत दोन-तीनदा थेंब थेंब घाला. डोळे येणार नाही.' अन् साथ आलीच नाही दवाखान्यात. स्वयंपाकात तीच हुशारी. अन्न वाढवायला लागलं तरी चव बदलू न द्यायचं कौशल्य मावशींकडून शिकावं. त्यांच्या हाताची चव मायेची असायची खरी!
 मावशींना रेडिओ ऐकायचा नाद होता. त्या बातम्याही न चुकता ऐकत. इकडे सकाळचा चहा-नाश्ता होत राहायचा. तिकडे साडेआठच्या बातम्या ऐकून त्या उठल्या की सर्वांची न्याहरी संपली समजायचं. कुणी आलं नाही ते लक्षातही असायचं. त्याच्या वाटणीचं झाकून ठेवून निरोप देऊन रिकाम्या. ही असायची घार काळजी. पिल्लं उपाशी राहू नये. वाचायची आवड त्यांना नवऱ्यानं लावली. मालक पुरोगामी विचारांचे होते. रघुनाथ हळबे कंपनीत अधिकारी होते. होते मोठे हौशी. बालगंधर्वांची नाटके दाखवायला इंदिराबाईंना घेऊन जात. नवी पुस्तके आणत, वाचत, वाचून दाखवत. मावशींनी पुढे हा छंद नवऱ्याची आठवण म्हणून जपला. संस्थेतल्या मुला-मुलींना वाचन संस्कार देण्यासाठी त्यांनी ग्रंथालय विकसित केलं होतं. अशोक लोटणकर म्हणून एक मुलगा वसतिगृहात होता. त्याला लिहायचा छंद. मावशींनी वाचलं अन् पेपरात पाठवायला सुचवलं. आलं छापून. तो पुढे लेखक झाला. अधिकारी झाला; पण श्रेय सारं मावशींचं! उपजत गुण हेरून प्रोत्साहन देण्याचा उदारपणा नि द्रष्टेपण मावशींमध्ये होता. अन्य संस्थांनाही त्यांचा मदतीचा हात सतत पुढे नि सढळ असायचा. सावंतवाडीत शासकीय महिला स्वीकारगृह होतं. काही अडचणींमुळे सन १९६४ ला शासनास काही काळ बंद करावं लागलं. मावशींनी तिथली १०-१२ मुलं, महिला आणल्या आणि सांभाळल्या. अनुदान, खर्च असला व्यवहारी हिशेब कधी त्यांच्या डोक्यातच आला नाही.
 मावशींकडे वेगवेगळे रुग्ण यायचे. संस्थेचे डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला द्यायचे. मावशींचे तीन प्रश्न ठरलेले असायचे गरज आहे का? का केलं पाहिजे? नाही केलं तर काय होईल? रुग्ण गरीब असायचे. खर्च झेपायचा नाही. शस्त्रक्रिया टाळण्यावर त्यांचा भर असायचा; पण रुग्णाच्या प्राणापुढे त्यांनी कशाचीच पर्वा केली नाही. हेही तितकंच खरं! एकच व्यक्ती नाहीतर आख्खं घर, कुटुंब दत्तक घ्यायचं नि उभारायचं, असे अचाट प्रयोग मावशींनी अनेकदा बिनबोभाट पार पाडलेत. कधी कधी पदरमोड करून त्या टोकाचं करत राहायच्या. केलेलं या कानाचं त्या कानाला कळायचं नाही. करून नामानिराळे राहण्यातलं त्यांचं संतपण उपजत होतं. संगीत, तत्त्वज्ञान, नाटक, पाककला, शेती कुटुंब, अध्यात्म, हिशेब, प्रशासन; सर्वांत मावशींची हुकमत चकित करायला लावणारी. आतिथ्य व शुश्रूषा हे तिचं हुकमी क्षेत्र, त्यात तिची मास्टरी. कुणालाच त्याची सर यायची नाही. ८ ऑक्टोबर १९९८ ला मावशींनी जगाचा कायमचा निरोप घेतला तेव्हा आश्रमच नाहीतर कोकणची पंचक्रोशी मौनपणे हमसत राहिली. तो हंबरडा अजून त्या पंचक्रोशीतील वाड्या, वस्तीत घुमतो आहे... स्मरण म्हणून! पोकळी होऊन!

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

कोकणच्या कस्तुरबा : कुमुदताई रेगे

 ध्येयवादी माणसं जन्मत:च तशी असतात की घडतात याची उकल ज्यांना करून घ्यायची आहे, त्यांनी गांधी विचारांच्या सेवाभावी कार्यकर्त्या कुमुदताई रेगे यांचं जीवन समजून घेतलं पाहिजे. त्यांना मी सन १९८५ च्या दरम्यान ओळखू लागलो असलो तरी प्रत्यक्ष संपर्क सन १९९० चा. आमच्याकडे तेरेदेस होम्स संस्थेचं कार्यकर्त्यांचं निवासी शिबिर होतं. दोन दिवस त्या आमच्या कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात राहिल्या होत्या. त्या दोन दिवसात माझ्यात लक्षात आलं की, सत्तरीतल्या या कार्यकर्त्या...मोठ्या चौकस, तळमळीच्या, स्पष्ट विचारांच्या, पण त्याचं भांडवल न करता त्या आपले मूल्य, विचार जपायच्या...जगायच्या. पावलापुरता प्रकाश असा त्यांचा व्यवहार होता. इतरही अनेक कार्यकर्ते असेच. ज्यांनी मला समर्पित कार्यकर्ता बनवल त्यात कुमुदताईंचा सिंहाचा वाटा.

 कुमुदताईंचे वडील अनंतराव रेगे सच्चे गांधीवादी कार्यकर्ते. आचारविचारांचं अद्वैत म्हणजे त्यांचं जीवन व कार्य. आपले संस्कार मुलांना त्यांनी जाणीवपूर्वक दिले; पण विचारस्वातंत्र्यही राखलं. बालपणी चांगली पुस्तकं हाती दिली. थोरामोठ्यांना दाखवलं-ऐकवलं. देशी कपडे घातले की प्रशंसा, विदेशी घातले की तुच्छता व्यक्त करणं. यातून त्यांनी आपली कन्या कुमुदला विधिनिषेध समजावला. कुमुदताई शिकत असतानाच ध्येयवादी बनत गेल्या. वक्तृत्वाची कला त्यांनी शालेय वयात जोपासली. त्या कौशल्यानं त्यांना शिक्षक होण्याचं स्वप्न दिलं. वाचन अंगात मुरलं याच वयात. ते आयुष्यभर टिकलं. मॅट्रिक होऊन त्या सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकल्या. इथं प्रिन्सिपॉल गोकाकांची दीक्षा अन् दिशा त्यांना लाभली. 'चले जाव', 'भारत छोडो' आंदोलनात त्या सहभागी झाल्या नि त्यांच्यात समूह कार्याचं महत्त्व विकसित झालं. डॉ. व्ही. के. गोकाकांनी कुमुदताईंच्या वडिलांना आंदोलनातील सहभाग कळवला. वडिलांनी उत्तरास मुलीस आशीर्वाद देत उत्तर लिहिलं, 'May God bless you and keep you to the right path' प्राचार्यांनाही कुमुदताईंच्या वडिलांचा अभिमान वाटला. कुमुदताईंनी कॉलेजचं शिक्षण करत राष्ट्र सेवादल, शिबिरं, व्याख्यानं, थोरा-मोठ्यांच्या सहवासात राहणं, शिकणं सुरू ठेवलं. सन १९४४ ला त्या बी.ए. झाल्या नि कोल्हापूरच्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये इंग्रजीच्या शिक्षिका झाल्या. इथं मन लावून अध्यापन केलं; पण त्यांची आंतरिक ऊर्मी समाज कार्याकडे असल्यानं त्यांनी कस्तुरबा ट्रस्टमार्फत चालणाच्या ग्रामसेविका विद्यालयातून समाजसेवेचे धडे गिरवायचं ठरवलं नि त्या सासवडला प्रेमाताई कटकांच्या आश्रमात दाखल झाल्या. इथे त्यांना शंकरराव देव, आचार्य स. ज. भागवत, आचार्य शं. द. जावडेकर यांचा सहवास व संस्कार लाभला नि त्यांची गांधीवादी ग्रामीण कार्यकर्त्यांची मूस तयार झाली. इथलं प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी लांजे जि. रत्नागिरी येथे कस्तुरबा ग्रामसेवा केंद्र सुरू केलं. या माध्यमातून ग्रामीण स्त्रियांचे आरोग्यविषयक प्रश्न, व समस्यांची उकल करायला हात घातला. आहार, उपचार, आरोग्य, प्रसूती, शेती अशी अनेक कामं या काळात केली. पुढे स्त्रियांसाठी लोकल बोर्डमार्फत कताई प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. या सर्वांतून कुमुदताईंच्या लक्षात आलं की, ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारणार नाही. हा काळ १९४६-४८ चा होता. त्यासाठी गांधीजींच्या जीवन शिक्षण पद्धतीचा अभ्यास करावा, असं त्यांच्या मनानं घेतलं. त्या अभ्यासक्रमास म्हणजे 'डिप्लोमा इन बेसिक एज्युकेशन'ला त्यांना प्रवेश घ्यायचा होता. चौकशी करता कुमुदताईंच्या लक्षात आलं की, हा डिप्लोमा बी.टी. झाल्यावरच करता येतो. म्हणून मग त्यांनी पुण्याच्या 'टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन'ची वाट धरली. सतत गांधीवाद हाच एक त्यांचा ध्यास होऊन राहिला. बी.टी. होताच त्या सन १९५० ला बॅग, बिस्तरा, बादली घेऊन बोर्डीला दाखल झाल्या. तो झपाटणारा काळ होता खरा! प्राचार्य सुलभा पाणंदीकर, ग. ह. पाटील यांचं सान्निध्य व मार्गदर्शन त्यांना इथं लाभलं. याच काळात ताराबाई मोडक, अनुताई वाघ त्यांना भेटल्या. कोसबाडचं त्यांचं कार्य पाहिलं व आपणही असं समर्पित वृत्तीनं कार्य केलं पाहिजे, असं त्यांना मनस्वी वाटू लागलं. कुमुदताई सारं शिकत, मिळवत स्वत:ला कार्यकर्ती म्हणून घडवत होत्या. 'कोकणची कस्तुरबा' होण्याच्या मनीषेने त्या कोकणात परतल्या नि कणकवलीच्या गोपुरी आश्रमात राहू लागल्या. 'कोकणचे गांधी' म्हणून ओळखले जाणारे अच्युतराव पटवर्धन त्या वेळी गोपुरी आश्रम चालवत.
 कुमुदताई रेगे यांनी एव्हाना गांधी विचारार्थ आपलं जीवन वाहण्याचा निर्णय घेतला होता. घरी लग्नाच्या गोष्टी निघत. त्यास साफ नकार देत. पुढे त्यांनी घरच नाकारायला सुरुवात केली. गोपुरी आश्रम त्या वेळी गांधीवादी कार्यकर्त्यांचं केंद्र होतं. तिथं दुभत्या गाईची पैदास प्रचार, गोशाळा, मृत जनावरांची कातडी कमावणं, शेती प्रयोग, संशोधन चालायचं. सर्व पुरुष कार्यकर्त्यांत कुमुदताई एकट्या स्त्री. हे सारं निष्ठा नि ध्येयवादामुळे शक्य होतं. इथं रुळल्या असतानाच सासवडहून तिथल्या कस्तुरबा ग्रामसेविका विद्यालयाच्या गांधीवादी संचालिका प्रेमाताई कंटकांचा निरोप आला. तिथं ग्रामसेविकांना प्रशिक्षण देणारं केंद्र सुरू करायचं होतं. त्यासाठी कुमुदताई प्रशिक्षक म्हणून त्यांना हव्या होत्या. कुमुदताईंनी तिथं राहून तीन तुकड्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं. या ग्रामसेविकांना कुमुदताई आरोग्य सेवा, स्वच्छता, साथीच्या रोगांचे उपचार, बालशिक्षण, प्रौढ साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती इ. विषयांचे प्रबोधन, प्रशिक्षण देत.
 सन १९५३ ते ५८ मध्ये सासवडला ग्रामसेविका प्रशिक्षण कार्य पाच वर्षांपर्यंत कुमुदताई करत राहिल्या आणि त्यामुळे त्यांना ग्रामीण शिक्षणासंबंधी संशोधनाची संधी मिळाली. त्या वेळी भारत सरकारच्या वतीने ग्रामीण शिक्षण संशोधन शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली होती. कुमुदताईंचा स्वभाव नित्य नवं शिकण्याचा असल्यानं त्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. डॉ. जे. पी. नाईक व डॉ. चित्रा नाईक त्या वेळी गारगोटीच्या मौनी विद्यापीठात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'ग्रामीण प्राथमिक शाळा व ग्रामीण सामाजिक संस्था यांचे परस्परसंबंध' विषयावरील संशोधनासाठी कुमुदताई रेगेंची निवड झाली व त्या गारगोटीच्या मौनी विद्यापीठात डेरेदाखल झाल्या. सन १९५८ ते १९६१ असं तीन वर्षे हे संशोधन होत राहिलं. मौनी विद्यापीठाच्या 'शिक्षणातून समाज परिवर्तन' या सूत्राचं अनुभवजन्य प्रात्यक्षिक कार्य त्या इथल्या वास्तव्यात रोज अनुभवत होत्या. विद्यापीठात संस्था, वैद्यकीय तज्ज्ञांची रेलचेल, समृद्ध ग्रंथालय, ग्रामीण परिसर सर्व अनुकूल वातावरण लाभल्यानं निर्धारित वेळेत त्या संशोधन पूर्ण करू शकल्या. शिवाय त्यांची चिकाटी, प्रयत्न जोडीला होतेच.  हे संशोधन पूर्ण होत आलं असतानाच त्यांना रत्नागिरीच्या महात्मा फुले विद्या प्रसारक सोसायटीची प्राचार्य पदाची ऑफर आली. त्या संस्थेमार्फत 'स. रा. देसाई अध्यापक विद्यालय' सुरू व्हायचं होतं. त्यांना डी.बी.एड., बी.टी. झालेला उमेदवार हवा होता. कुमुदताईंना रत्नागिरीचे सर्व ओळखत होतेच. एव्हाना गांधीवादी कार्यकर्त्या म्हणून त्यांचा जिल्ह्यात लौकिक होता. नामदार पी. के. सावंत यांनी डॉ. चित्राताई नाईक यांच्यामार्फत गळ घातली व कुमुदताई तयार झाल्या; पण एका अटीवर 'संस्थेच्या कार्यकारी मंडळात कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता शैक्षणिक दृष्टी व विचार असलेले सभासद असावेत. ही संस्था राजकारण विरहित असावी.' विशेष म्हणजे संस्थेनं ही विनंती शिरसावंद्य मानून कुमुदताईंची नियुक्ती केली. सुमारे दोन दशके (१९६१ ते १९८०) त्या प्राचार्य होत्या. प्रारंभी हे महिला अध्यापक महाविद्यालय होतं. पुढे १९७२ ला विद्यार्थीही प्रवेश घेते झाले. या काळात नियमित प्रशिक्षण, पाठ्यक्रमाबरोबर प्राचार्य कुमुदताई रेगे यांनी आपल्या संस्थेमार्फत महात्मा गांधी जन्मशताब्दी, रवींद्र शतकोत्सव, वीर सावरकर संवत्सर इ. निमित्ताने साहित्य, शिक्षण आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, कुष्ठ सेवा इ. उपक्रम राबवून आपल्या संस्थेस उपक्रमशील प्रशिक्षण केंद्र बनवले. चांगले विद्यार्थी कुमुदताईंच्या विद्यालयात प्राधान्याने प्रवेश व प्रशिक्षण घेत. आज सारा कोकण त्यांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण देताना दिसतो.
 कुमुदताई प्राचार्य म्हणून रत्नागिरीस येण्याची अनेक कारणं होती, घर, शेत, वडील सांभाळणं आवश्यक झालं होतं. लांजाला काम करताना सुरू झालेले महिलाश्रम...तेथील आक्काताई तेंडुलकर, नाना वंजारेंसारखे कार्यकर्ते वडिलांप्रमाणेच थकलेले होते. साऱ्यांचा लकडा होता, भागात ये नि काम कर. कोकणच्या अनेक संस्था-कारागृह, मनोरुग्णालय, रिमांड होम, कस्तुरबा केंद्र, खारेपाटण, दापोली, जैतापूर, कसाल येथील शिक्षण संस्था, गोपुरी, कणकवली, मालवण, वेंगुर्ला येथील छोटी-मोठी कामं हाका देत राहायची. नोकरी करत हा गोफ गुंफता येईल असं वाटून, त्या रत्नागिरीत आल्या. मग त्यांनी मात्र मागे वळून पाहिलं नाही.
 प्राचार्य झाल्यावर कुमुदताईंनी स्वत:ला रत्नागिरीच्या दोन शासकीय संस्थांशी जोडून घेतलं. एक शासकीय मनोरुग्णालय. तिथं त्या समुपदेशनाचं कार्य करत. दुसरं होतं रत्नागिरीचं बाल सुधार गृह. सन १९६२ ला त्या या संस्थेच्या 'ऑनररी मॅजिस्ट्रेट' म्हणून नेमल्या गेल्या होत्या. मी विविध निमित्ताने रत्नागिरी, लांज्यास जात राही. कुमुदताईंशी भेटणं, बोलणं, चर्चा, देवाणघेवाण, कधी त्यांच्या घरी राहणं, लांज्याच्या अनेक कार्यक्रमांना पाहुणा, वक्ता असं नित्याचं, जिवाभावाचं नातं निर्माण व्हायला आम्हा दोघांचं एक कार्यक्षेत्र व ध्येय, शिवाय वृत्ती साधर्म्य हेही एक महत्त्वाचं कारण होतं. माझ्या नियंत्रणावरून कुमुदताई अनेकदा कोल्हापुरी येत राहिल्या. देईल ते पुरस्कार, सन्मान त्यांनी अत्यंत नम्रपणे स्वीकारल्याचं आठवतं.
 रत्नागिरी रिमांड होमचे सेक्रेटरी डॉ. सावंत, डॉ. पानवलकर यांच्या माध्यमातून कुमुदताई भेटायच्या. शासन अनाथ, निराधार मुलं, त्यांच्या संस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष करत याबद्दल त्यांच्या मनात सतत अस्वस्थता जाणवायची. शासनाशी मतभेदपूर्ण संवाद ठेवत त्या संघर्ष करत राहायच्या. पण टोकाची भूमिका न घेता त्या आपलं मत लावून धरायच्या. शासकीय अधिकारी व यंत्रणेचा आदर ठेवत स्वत:ची स्वायत्तता व स्वातंत्र्य जपण्याचं कुमुदताईंचं कौशल्य अनुकरणीय होतं. बैठका, चर्चासत्रे इत्यादींतून व्यक्त केलेल्या विचारांत स्पष्टता असायची. क्रोध, असंतोष पण त्यांनी नेहमी गांधीवादी संयम व सभ्यतेनं व्यक्त केला. त्यांना शासनाने पुरस्कारांनी गौरवलं. पण त्यासाठी त्यांनी कधी आर्जव, अनुनय केल्याचं आठवत नाही. त्यांच्या नैतिकतेचा धाक होता व सभ्यतेची सावलीपण तितकीच आश्वासक होती.
 महिलाश्रम, लांज्याच्या कितीतरी उपक्रमात मी कुमुदताईंच्या बरोबर होतो. स्वातंत्र्यसैनिक नाना वंजारे यांच्या बहुधा अमृत महोत्सवानिमित्ताने महिलाश्रमात वृद्धाश्रम सुरू करताना की इमारत विस्तार कार्यक्रम होता. त्यांनी मला आवर्जून बोलावलं होतं. म्हणाल्या होत्या, 'मला कर्ते सुधारक हवेत. तुम्ही आलं पाहिजे.' नंतर बहुधा महिलाश्रमाचा सुवर्ण महोत्सव होता (२००७-०८)... संस्थाश्रयींचे प्रश्न मांडायला मला बोलावलं होतं. 'वेगळ्या वाटेनं जाताना...' हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित होणार होतं... तुम्ही बोलावं म्हटल्यावर मी आनंदानं गेलो होतो. कधी मुलीचं लग्न, कधी शासकीय अधिकाऱ्यांकडे संस्थेचा प्रश्न मांडायचा असायचा... त्यांचा फोन, निरोप, पत्र मला पुरेसं होतं... या सर्व काळात म्हणजे सन १९८० पासून ते रत्नागिरीचा निरोप घेऊन पुण्यास स्थायिक होण्यासाठी परवा वर्षा-दोन वर्षांपूर्वी जाईपर्यंत... त्या समारंभाचा पाहुणा परत मीच होतो... पण कुमुदताईंना आता बोलणं, स्मरण करणं सर्वच हरवलेल्या कुमुदताईंना त्या दिवशी निरोप देणं जिवावर आलं होतं...मला...सर्वांनाच!
 मला आठवतं, कुमुदताईंनी लांज्याला मुला-मुलींचं बालगृह, निरीक्षण गृह, वर्किंग वुमन हॉस्टेल, वृद्धाश्रम, होम फॉर डेस्टिट्यूट अशा संस्थांची दालनं सामाजिक गरज म्हणून सुरू केली; पण त्या समाज गरज म्हणून...अनुदान मिळतं म्हणून नव्हे. या संस्थांना त्यांनी गांधीवाद जीवन शिक्षणाची जोड दिली. अनुदान, देणगीशिवाय संस्थेची कमाई हवी म्हणून त्यांनी शेती केली. पिठाची गिरणी सुरू केली. पोल्ट्री चालवली, नर्सरी जोडली. म्हणजे तिथेही त्यांनी स्वत:ला व संस्थेस सतत समाजाशी जोडलं. गारगोटीस समवायी शिक्षणाचं केलेलं संशोधन आयुष्यभर कृतीत उतरवलं. त्यांच्या साधेपणा नि सभ्यतेचा दरारा साऱ्या जिल्ह्यालाच नाहीतर राज्याला होता. आदर्श अध्यापक, दलित मित्र, सावित्रीबाई फुले पुरस्कार, 'लर्नेड एशिया' मध्ये समावेश, आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता यादीत अंतर्भावाने सन्मानित होऊन त्या सदैव नम्र राहिल्या. नोकरी इमानेइतबारे करत त्यांनी आपलं समाजभान जपलं. आयुष्यभर खादी वापरली. गांधीवादी मूल्य व व्यवहारांनी त्यांचं सारं आयुष्य भारलेलं राहिलं. आजच्या आत्मकेंद्रित जगात कुमुदताई रेगेंचं जीवन कार्य, विचार, व्यवहार एखाद्या आख्यायिकेसारखे वाटतात खरे. पण ते आहे अविश्वसनीय प्रखर वास्तव! त्या तेजात पुढील अनेक पिढ्या आपला मार्ग शोधतील, तर जागतिकीकरणातही त्यांचं मनुष्यपण हरवणार नाही, हरणारही नाही.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

अनाथ महिलांचा आधारवड : दादासाहेब ताटके

 मी पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात विद्यार्थी असल्यापासून मुंबईतील माटुंगा उपनगरात असलेल्या श्रद्धानंद महिलाश्रमाबद्दल ऐकून होतो. त्या वेळी या दोन्ही आश्रमातील, मुलं-मुली प्रसंगपरत्वे या संस्थेतून त्या संस्थेत येत-जात असायची. नंतर या संस्थेचा माझा परिचय झाला तो मी पीएच.डी. होऊन अनाथ मुले, मुली, महिलांच्या संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, पुनर्वसन कार्य करायला लागल्यावर. त्या काळी संस्थेत अनाथ अर्भकं येत असायची. मुंबई, पुणे वगळता अशा मुलांचा सांभाळ व पुनर्वसन (दत्तक) कार्याबद्दल फार जाणीव-जागृती ना समाजात होती ना शासन यंत्रणेत. त्या वेळी भारतीय पालक गुप्तपणे मुलं दत्तक घेत तेही मुलंच. मुली विदेशी दत्तक जात. मुले विदेशी दत्तक जातात. त्यांचे धर्मांतर होते, संस्था मुले विकतात अशी ओरड वृत्तपत्रांतून अधी-मधी होत राहायची. त्या वेळी श्रद्धानंद महिलाश्रमातून, तर दरवर्षी शंभरच्या घरात मुलं विदेशी दत्तक जायची. 'एल.के. पांडे विरुद्ध भारत सरकार' या दत्तकसंबंधी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 'सर्वप्रथम सर्व मुलं भारतातच द्यायला हवीत, काही कारणाने देणे शक्य नसेल, तर तीनदा नाकारल्यावर परदेशी दत्तक द्यावे' असा निर्णय दिला. यानुसार 'कारा' (Central Adoption Resource Agency) अस्तित्वात आली. सन १९६७ पासून श्रद्धानंद महिलाश्रमातील मुलं परदेशी दत्तक जायची. त्यामुळे या प्रश्नी होणाऱ्या वाद-विवादात श्रद्धानंद महिलाश्रमाचे सर्वेसर्वा असलेले रा. शं. तथा दादासाहेब ताटके यांचं म्हणणं, विचार, अनुभव सर्व संस्थांना मार्गदर्शक होता. अशाच एका संस्था कार्यकर्ता मेळाव्यात जो आम्ही महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या हीरक महोत्सवानिमित्त सांगलीस योजला होता, त्यास दादा आल्याचे व तत्पूर्वी सांगलीतच तेरेदेस होम्सच्या कार्यकर्ता शिबिरातही वेलणकर मंगल कार्यालयात ते आल्याचं आठवतं. या संपर्कातून दादांना मी ओळखू लागलो. एकदा आवर्जून मी दादांची वेळ घेऊन श्रद्धानंद महिलाश्रमाचं कार्य पाहिलं होतं. ते कार्य व माझ्या बालपणी बाबासाहेब जव्हेरी ज्या प्रकारे कार्य पंढरपुरी करायचे ते कार्य या दोहोंत विलक्षण 'घरपण' भरलेलं होतं. पण हे घरपण अगोदर पंढरपूरच्या आश्रमानं निर्माण केलेलं होतं.
 दादा ताटके यांचं श्रद्धानंदच्या माध्यमातून झालेले कार्य हा महाराष्ट्रातील अनाथांच्या कार्याचा एक नवा वस्तुपाठ होता. ख्रिश्चन मिशनरी व ब्रिटिश समाजसुधारक अधिकारी यांनी सुरू केलेल्या कार्यापासून प्रेरणा घेऊन महात्मा फुले, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, प्रार्थना समाज, आर्य समाज यांनी केलेलं अनाथांचे कार्य व दादा ताटके यांनी केलेले कार्य यात अनेक अंगांनी फरक होता. दादा ताटके श्रद्धानंद महिलाश्रमाशी जोडले गेले ते आश्रमाच्या शेजारी राहात असल्यानं आणि एका अडचणीच्या प्रसंगातून. पुढे आश्रमाचा सन १९५३ साली रजत महोत्सव साजरा झाला. त्यात दादा ताटके स्वयंसेवक बनून दिसेल ते काम करत राहिले; पण त्यांची निष्ठा, समर्पण सर्वांच्या लक्षात आली. पुढे ते आश्रमाचे सभासद झाले. त्या काळात सन १९५६ ला 'महिला व मुलींच्या अनैतिक व्यापाराला बंदी घालणारा' कायदा आला. त्या कायद्यानुसार मुली व महिलांचा सांभाळ करणा-या संस्थांना परवाना घेणं बंधनकारक झालं. श्रद्धानंद महिलाश्रम, तर त्या अगोदरपासूनच हे कार्य करत असल्यानं त्यांना कायद्यातील त्रुटी जाणवत होत्या. हे शासनाच्या लक्षात आणून देणं आश्रमास गरजेचं वाटलं; पण तर्कशुद्ध व कायदेशीर प्रतिवाद करतच हे काम करणं गरजेचं होतं. दादा ताटके तेव्हा विमा इ. कार्य करायचे. कार्यालयीन कामाचा त्यांचा अनुभव मोठा होता म्हणून आश्रमांनी दादांची मदत घ्यायचं ठरवलं. दादांनी तेही काम मनापासून केलं. यातून दादा आश्रमाशी जोडले गेले ते ऑगस्ट १९९० पर्यंत. म्हणजे स्वेच्छानिवृत्त होईतो.,br> सन १९५७ च्या वार्षिक सभेत दादा ताटके सर्वाधिक मतांनी निवडून आले व कार्यकारी मंडळाचे सदस्य बनले. त्या वेळी त्यांचं वय ४२ वर्षांचं होतं. दादा सकाळी सातला आश्रमात नियमित येत. घरी धोतर-सदरा, सोवळे असा वेश असला तरी उंबऱ्याबाहेर त्यांचा पोषाख सूट, बूट, टाय, हॅट असा असायचा. व्ही.जे.टी.आय. मधील नोकरी त्यांनी बर्ले या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हाताखाली केली होती. त्याचा हा प्रभाव होता. दादांचे इंग्रजी चांगलं असणं, कामाची शिस्त, वक्तशीरपणा सारा ब्रिटिशांना लाजवेल असा. समर्पण, सद्भाव, प्रेम, मातृत्व सारे गुण घरातील परंपरा, संस्कारातून आलेले. दादांनी काम सुरू केल्यावर सर्वांत मोठे नि क्रांतिकारी कार्य केले ते म्हणजे संस्थेच्या 'श्रद्धानंद अनाथ महिलाश्रम' नावातील 'अनाथ' शब्द काढून टाकला. त्यांचं म्हणणं होतं की, "आश्रम कन्यांना आपल्या अनाथपणाचा विसर पडावा, ही आश्रमाची धडपड. त्याच्याशी हा शब्द विसंगत वाटतो." अन् ते कालसंगतही होतं. दादांनी सरकार दफ्तरी सारे सोपस्कार, पत्रव्यवहार करून संस्थेचे अनाथपण दूर केलं.
 दादांचं मोठेपण नुसतं नाव विसर्जित करण्यात नव्हतं. त्यांनी आश्रमास आर्थिक अभय पण मिळवून दिलं. समाजातील प्रतिष्ठित, धनिकांना ते विविध समारंभाच्या निमित्ताने बोलवत. त्यांना स्वतः संस्था फिरवून दाखवत. कोणी मोठा पाहुणा येणार असेल, तर आपल्या विमा कंपनीतील नोकरीतून रजा घेत. त्यांच्या साऱ्या रजा आताशा आश्रमासाठीच खर्च होऊ लागलेल्या. दादांच्या संस्था दाखविण्यात, माहिती सांगण्यात समोरच्या माणसाच्या हृदयात दयाबुद्धी जागवून त्यास साहाय्य करायची भावना निर्माण करण्याचे विलक्षण कौशल्य होतं. आलेला प्रत्येक जण भारावून जाऊन ओंजळ भरभरून मदत करायचा, दादा पाठपुरावा करत राहायचे. ओघ सतत वाहत राहायचा.
 यातून आश्रमातील परित्यक्ता स्त्रियांना स्वावलंबी करणारं 'परिश्रमालय' उभारलं. दादांनी त्यासाठी प्रिमियर, क्रॉम्प्टन सारख्या मोठ्या कंपनीची कंत्राट मिळवली. या केंद्रास फॅक्टरी ऍक्टमधून 'कल्याणकारी कार्य' म्हणून सूट मिळविली. पुढे कामगार संघटनेने संप, युनियन केल्यानंतर कोर्ट-बाजी झाली. त्यात संस्थेच्या बाजूनं निकाल लागण्यात व निकालात संस्थेच्या कार्यासाठी प्रशंसा मिळविण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता.
 आश्रमातील मुलं दत्तक जावीत म्हणून दादांनी भाषणे, निवेदने इ. द्वारे वृत्तपत्र, रेडिओमधून समाजप्रबोधन केलं. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. तरी सर्व मुले दत्तक जात नसत. मग एका विदेशी जोडप्यास बाळ दत्तक दिलं. त्यातून विदेशी दत्तक देणं सुरू झालं. मग दादांनी मागं पाहिलं नाही. याचा एक फायदा झाला. संस्थेचे कार्य जगभर पसरलं. संस्थेस परदेशातून मदत मिळू लागली. संस्थेस आर्थिक स्थैर्य लाभलं. परिश्रमालयाचा फायदा, विदेशी साहाय्य, देणगी इ. तून संस्थेच्या विकास योजनांना मूर्त रूप आलं. दाटीवाटीनं राहणारी मुलं, मुली, महिला त्यांना प्रशस्त जागा मिळाली. अर्भकालय, मुली, महिला, वृद्ध असे स्वतंत्र विभाग करणे शक्य झालं. यातून सुविधा, संस्कार, वळण, अभ्यास अशी चौफेर प्रगती संस्थेतील कार्यात दिसू लागली. संस्थेस राष्ट्रपती, मुख्यमंत्री इ. मान्यवरांच्या भेटी नियमित झाल्या व त्यातून संस्थेस दलित मित्र, राष्ट्रपती पुरस्कार मिळून राज्यमान्यता लाभली.
 कार्य विस्तारातून काम करणाऱ्या महिलांचे वसतिगृह, महिला वृद्धाश्रम इ. संस्था सुरू झाल्या. सर्वांवर दादांची नजर असायची. आर्थिक स्थैर्याबरोबर परिपाठावरही दादा लक्ष देत. सर्व संस्थांना भेटी देत. आहार, आरोग्य, स्वच्छता, उपचार, शिक्षण, कपडे, खेळणी, साधनं सर्वांवर घरासारखं त्यांचं लक्ष असायचं. पावसाळा आल्या की छत्र्या, हिवाळा आला की स्वेटर्स, उन्हाळा आला की चप्पल्स संस्थेस येत. सणावारी गोडधोड असायचंच. दादांना घेणं कळायचं तसं देणंही. चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. देशभर संरक्षण निधी गोळा करणं सुरू होतं. दादांनी आश्रमातर्फे १५१/- रुपये शुभेच्छा कार्ड विक्रीतून उभे करून पाठवले. त्याची वृत्तपत्रांनी दखल घेतली. युद्धजन्य परिस्थितीत विकास कामांवरील अनुदानात कपात होती. केंद्र शासनाने अपवाद करून संस्थेच्या वर्किंग वुमन्स हॉस्टेलला अनुदान मंजूर केलं. याला दादांची दूरदृष्टीच कारणीभूत ठरली.
 दादा ताटके म्हणजे नुसते संस्थाचालक नव्हते. त्यांच्यात एक प्रेमळ आई व जबाबदार बाप दडलेला होता. आलेल्या प्रत्येक मुला-मुली, महिलांचा प्रश्न त्यांना माहीत असायचा. त्या प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्न सोडविण्याची योजना असायची. 'Stich in time' हे त्यांचं तत्त्व अनुकरणीय होतं. मुलांचं दत्तकीकरण शाळा प्रवेश, उपचार, शस्त्रक्रिया, मुलींची लग्न, परित्यक्तांचे तंटे, वृद्धांचं सुख, मुलींच्या नोकऱ्या सर्व एकाच वेळी करत राहून दादांनी आपलं अष्टावधान सिद्ध केले. व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वही. कोर्ट, शासन, देणगी, विकास योजना, संस्था बैठका सारं कसं नियमित असायचं नि त्याचा सर्वांना अचंबा अशासाठी वाटायचा की दादा हे सर्व आपली नोकरी सांभाळून करत असायचे व त्यात त्यांची सचोटी, पारदर्शिता वादातीत असायची. त्यांचा नैतिक धाक प्रचंड होता. संस्था व दादांच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकाच वेळी दोन अर्ज होते. पैकी एक स्वीकारणार म्हटल्यावर दादांनी संस्थेस, प्राधान्य दिलं ते संस्थेस साहाय्य अधिक मिळावं म्हणून. पुरस्कार घ्यायला पण ते दुसऱ्याच्या नावाची शिफारस करत. यावरून त्यांचं निरपेक्षपण अनेकदा सिद्ध झालं.  संस्था म्हटली की असंतुष्ट असतातच. काही न करता उणीदुणी काढत राहण्यातून महर्षी कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील वाचले नाहीत, तिथे दादा कसे अपवाद असतील? संस्थेस सर्वोच्च पदावर पोहोचवून निवृत्त होऊ इच्छिणारे दादा; पण त्यांच्या निरिच्छपणावर शंका घेणारे अस्तनीतले निखारे होतेच. एकदा तर अशा महाभागांनी त्यांना निनावी पत्र लिहून (नावानं लिहायला नैतिक अधिष्ठान व कार्यपरंपरा लागते!) त्यांना संस्था सोडायला सुचवलं. दादांनी ते पत्र शिरसावंद्य मानून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. आपल्यावर होणाऱ्या साऱ्या आरोपांचा निरास करून निष्कलंक निवृत्ती नैतिक अधिष्ठान असल्याशिवाय लाभत नसते. हा समाजापुढे कृतीतून उभारलेला दादांचा अनुकरणीय आदर्श!
 दादांची कर्तृत्वशक्ती, सकारात्मकता व मेहनती वृत्ती यामुळे केवळ माटुंग्यातच नाही तर वसईत उभारलेल्या संस्थेच्या इमारती. कार्यविस्तारामुळे तेथील ख्रिश्चनांची दृष्टी व विचार बदलले. तिथे उभारलेला संस्थेचा महिला वृद्धाश्रम म्हणजे दादांच्या कर्तृत्वाचा आणखी एक पुरावा म्हणावा लागेल. सन १९६७ च्या १ जूनला तो वसईला सुरू झाला. पुढे स्थलांतरितही झाला.
 दत्तक योजना यशस्वी झाल्यानंतर नि खरं म्हणजे संस्थेचा पूर्ण अंतर्गत विकास, विस्तार झाल्यावर, स्थैर्य आल्यावर दादांना संस्थेनं समाज विस्तार कार्यात लक्ष घालावं असं वाटू लागलं. एक योजना, स्वप्न पूर्ण झालं की, दादा नव्या स्वप्न, योजनेत गुंग व्हायचे. त्यातून 'विद्यार्थी दत्तक पालक योजना' त्यांनी सुरू केली. 'सहस्त्र विद्याभोजन' ही कल्पना दादांची. एक मुलाच्या संगोपन शिक्षणाचा खर्च दात्यांनी प्रायोजित करायचा. समाजातील अनाथ, निराधार, दारिद्र्यरेषेखालील मुलं, मुली निवडायची. त्यांना अर्थसाहाय्य करायचं अशी ती योजना, अशी योजना 'कास्प प्लॅन' मार्फत डॉ. शरच्चंद्र गोखले यांनी सुरू केली होती. ते मॉडेल दादांच्या समोर होतं. संस्थेनं ते मनावर न घेतल्यानं दादांनी स्वतः अन्य प्रकारे 'रामकृष्ण चॅरिटीज' तर्फेही राबवली. त्यातूनही संस्थेत समज-गैरसमज होत राहिले. संस्था विकास व विस्ताराबरोबर सहकाऱ्यांचा दृष्टिकोन विस्तारत नसल्याने संघर्षाचे प्रसंग उभारतात. सहकाऱ्यांचा कामातील काठावरचा नाममात्र सहभाग हेही त्याच एक कारण असतं. निवृत्तीनंतर दादांनी तीही योजना स्वबळावर पूर्ण करून दाखविली.<बर> दादा ताटके संस्थेच्या कार्यातून विदेशात जाऊन आले. त्यांना अनेक पुरस्कार, मान-सन्मान लाभले. दादांना संस्थेमुळे जे मिळालं त्यापेक्षा संस्थेस दादांच्या त्याग, परिश्रम, समर्पणातून अधिक मिळालं हे सांगायला ना कोणी ज्योतिषी हवा की न्यायाधीश! संस्थेतून शिकून मोठी झालेली मुलं, मुली, महिला संस्थेइतकंच आपल्या सनाथ होण्याचे श्रेय दादांना देतात, यात सर्व आलं, दादांचं सर्व आयुष्य खरंतर आश्रममय झालं होतं. दादांचं खरं योगदान आश्रमाचं 'घर' करणं. अलीकडेच अचला जोशी यांनी 'आश्रम नावाचं घर' असं पुस्तक लिहिलंय. तत्पूर्वी 'आधारवड' हे दादांचं अविनाश टिळकांनी लिहिलेलं चरित्रही प्रकाशित झालंय. या सर्वातून प्रतिबिंबित होणारं दादासाहेब ताटके यांचं जीवन व कार्य म्हणजे महाराष्ट्रातील अनाथ मुले, मुली, महिलांच्या संगोपन व पुनर्वसन कार्याचा आदर्श दीपस्तंभ! दादा ताटके यांच्यासारखा एक माणूस समाजाचे सहस्त्र दैन्य, दु:ख पेलत सहन करत राहतो. म्हणून समाजाचं अनाथपण सरत राहतं. दादा ताटके म्हणजे अनाथ महिलांचा आधारवडच!

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

महाराष्ट्राच्या बालकल्याणाचं भीष्माचार्य : डॉ. शरच्चंद्र गोखले

 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजशास्त्रज्ञ म्हणून लौकिक असलेले डॉ. शरच्चंद्र गोखले यांचा महाराष्ट्राच्या बालकल्याणात सिंहाचा वाटा आहे. सन १९५० चा काळ असेल, डॉ. गोखले मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून अडीच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून तत्कालीन मुंबई इलाख्याच्या 'ज्युव्हेनाइल अँड बेगर्स डिपार्टमेंट' मध्ये 'ऑडिट ऑफिसर' म्हणून रुजू झाले होते. बालकल्याणाच्या दृष्टीने तो काळ संक्रमणाचा होता. मुंबई इलाख्यात अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांच्या कल्याणाचे, संस्थात्मक कार्य सुरू झाले ते सन १८५७ साली. हे वर्ष भारतीय राजकीय स्वातंत्र्याच्या इतिहासात जसे बंडाचे वर्ष मानले जाते, तसे बालकल्याण क्षेत्रात क्रांतीचे. या वर्षी उन्मार्गी मुलांच्या संगोपन, प्रशिक्षण, संरक्षण व पुनर्वसनाच्या हेतूने मुंबईच्या माटुंगा उपनगरात 'डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी' नावाची पहिली बालकल्याण संस्था मुंबई इलाख्यात सुरू झाली. या संस्थेत राहून प्रशिक्षित व मोठ्या झालेल्या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवायच्या हेतूने सन १९१५ ला कर्नल लॉईड यांच्या पुढाकारातून माटुंग्याच्याच किंग्ज सर्कल (आत्ताचे माहेश्वरी उद्यान) जवळील बी.आय.टी. ब्लॉक्समध्ये 'शेपर्ड आफ्टर केअर होस्टेल' च्या रूपात सुधारगृहातून मुक्त झालेल्या उन्मार्गी प्रौढ युवकांच्या प्रशिक्षण व पुनर्वसनाच्या दृष्टींनी संस्था सुरू करण्यात आली. सन १९२४ मध्ये ब्रिटिशांनी इंग्लंडच्या 'चिल्ड्रन ऍक्ट'च्या धर्तीवर 'मुंबई मुलांचा कायदा अमलात आणला'; पण तो कागदावरच होता. मिस. के. डेव्हिस या सामाजिक कार्यकर्तीच्या 'लीग ऑफ मर्सी' संस्थेच्या पुढाकाराने दोन अल्पवयीन स्कॉटिश मुलींना वेश्या व्यवसायात गुंतवण्यास विरोध करण्याच्या प्रकरणात न्यायालयाने ताशेरे झोडले. मग ब्रिटिश शासनाने सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करून या कामात आणले. तेव्हा कानजी द्वारकादास यांच्या पुढाकाराने १ मे, १९२७ रोजी 'चिल्ड्रन्स एड सोसायटी' स्थापन केली. डेव्हिड ससून रिफॉर्मेटरीचे रूपांतर 'डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल' मध्ये करण्यात येऊन त्याला, 'रिमांड होम'चा दर्जा देण्यात आला. ते महाराष्ट्रातले पहिले रिमांड होम होय. अशा संस्थांचे जाळे विकसित करण्यासाठी १० एप्रिल, १९३१ रोजी 'बाँबे प्रेसिडेन्सी बोर्स्टल असोसिएशन'ची स्थापना करण्यात आली. त्या संस्थेच्या पुढाकाराने पुढे पुणे, सोलापूर, अहमदनगर, अहमदाबाद, बेळगाव, विजापूर येथे रिमांड होम्स सुरू करण्यात आली. भारत स्वतंत्र होईपर्यंत या संस्था तत्कालीन 'बॅकवर्ड क्लास वेल्फेअर'मार्फत कार्यरत होत्या. हा विभाग गृह खात्याच्या अखत्यारीत असायचा. स्वातंत्र्यानंतर या विभागाचे विभाजन होऊन 'ज्युव्हेनाइल अँड बेगर्स डिपार्टमेंट' स्वतंत्रपणे सुरू झाले व डॉक्टर गोखले त्याच दरम्यान विभागात दाखल झाले.
 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून शिकून प्रशिक्षित झालेल्या द. वि. कुलकर्णी, गोविंदराव हर्षे, राम बेलवडी, शं. वि. जोशीराव, शरच्चंद्र गोखले हे पंचायतन त्या वेळी मुंबई इलाख्याचं बालकल्याण कार्य पाहायचे. डॉ. गोखले पुण्याच्या रिमांड होमचे चीफ ऑफिसर म्हणून नेमले गेले व त्यांचा बालकल्याणाशी प्रत्यक्ष संपर्क आला. पुण्याच्या डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशनच्या वतीने त्या वेळी शिवाजीनगरचं मुलांचं रिमांड होम, नव्या पेठेतलं मुलींचं रिमांड होम, एक आफ्टर केअर हॉस्टेल व किवळे येथे एक प्रमाणित शाळा (सर्टिफाईड स्कूल) चालविली जायची. डॉ. गोखले यांच्या अखत्यारीत या संस्था कार्यरत होत्या. गोखले यांनी आपल्या पूर्वसुरींच्या परंपरा सांभाळत बालसप्ताह, बालकल्याण प्रदर्शन, बाल न्यायालय, बाल मार्गदर्शन केंद्र, असे उपक्रम सुरू करून या संस्थांत समाज सहभाग वाढविला.
 याच काळात डॉक्टर गोखले, दैनिक केसरी, दैनिक सकाळ, साधना साप्ताहिकांत किर्लोस्कर मासिके यातून मुलांविषयी लिहीत. वसंत व्याख्यानमालेत भाषणे देऊन मुलांच्या प्रश्नांविषयी समाज प्रबोधन कार्य करत. मग त्यांनी 'समाजसेवा' हे त्रैमासिक सुरू केले. आरंभी त्यात इंग्रजी व मराठी लेख असत. ते चक्रमुद्रित त्रैमासिक होते. पुढे ते केसरी प्रेसमध्ये छापलं जायचं. त्या वेळी १२०० प्रती छापल्या जायच्या. हे त्रैमासिक गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र अशा तिन्ही प्रांतांतल्या समाजकल्याण संस्था व कार्यकर्त्यांचं मुखपत्र बनलं. या मासिकाच्या निमित्ताने डॉ. गोखलेंच्या अंध व मूक बधिरांचे कार्य करणाऱ्या हेलन केलर, 'बॉइज टाऊन' चे कार्य करणाऱ्या फादर फ्लॅनॅगानशी संपर्क आाल. यातून डॉ. गोखले यांनी मुलांचे हक्क, बाल मार्गदर्शन, उन्मार्गी मुलांचे प्रश्न, मुलांचे बुद्धिमापन इ. विषयी लिहिले. यातून 'नावडती मुले' सारखे पुस्तक आकाराला आले.
 ज्युव्हेनाइल डिपार्टमेंटचे कार्य सुधार प्रशासन विभागाचा भाग असल्याने त्याचे कार्य तुरुंग, गृह, भिक्षेकरी प्रतिबंध विभागासारखे चालायचे. डॉ. गोखलेंना ते खटकायचे. मुलांकडे दयेने न पाहता शास्त्रोक्त पद्धतीने पाहिले गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. मुलगा उन्मार्गी होतो, चोऱ्या करतो, शाळेस जात नाही, खोटे बोलतो ही झाली लक्षणे वा प्रतिक्रिया. त्याचे मूळ समाज व घरात असते. व्यसनी आई-वडील, अडाणीपण, दुभंगलेली कुटुंबे, ताणलेली नाती, प्रेमाचा अभाव, दुर्लक्ष, वाईट संगत, आर्थिक ओढाताण, सामाजिक अस्पृश्यता अनेक कारणे असतात मुलांच्या बिघाडाची. डॉ. गोखले यांनी ही जाण विभाग, शासन व समाजास दिली. हे डॉ. गोखले यांचे मोठे सामाजिक योगदान होय. मुलांचे दोष दूर करायचे, तर त्यांच्या मन, भावना, बुद्धी, वृत्ती इ. चा. शास्त्रोक्त अभ्यास व्हावा म्हणून त्यांनी बाल मार्गदर्शन केंद्र (Child Guidance Clinic) रिमांड होम्समध्ये सुरू केले. त्यासाठी बालमानसशास्त्राची नियुक्ती, उपकरणे, खेळ इ. ची रचना केली. 'हसतखेळत क्रीडोपचार' सुरू केला. त्यातून मुलांवरील संस्काराचे महत्त्व डॉ. गोखलेंनी अधोरेखित केले.
 पुढे सन १९५९ मध्ये डॉ. गोखलेंना 'उन्मार्गी मुले व त्यांचे पुनर्वसन' विषयक अभ्यासासाठी युनोची शिष्यवृत्ती मिळाली. त्यात त्यांनी इंग्लंड, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, इस्त्रायलमधील बालकल्याणाचा अभ्यास केला. नॉर्वेत त्यांनी बालकल्याण मंडळाचा अभ्यास केला. डॉ. निकवाल यांचे मनोव्यथित व उन्मार्गी बालकांचे कार्य पाहिले. फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे विविध संस्थांना भेटी दिल्या. उत्तर ध्रुवाकडील रोवोनियामीच्या लॅप लोकांचे समाज विकास कार्य पाहिले. इस्त्रायलमध्ये त्यांनी किबुत्झ (समूह जीवन) चा अनुभव घेतला व अभ्यास केला. इंग्लंडमध्ये संस्था, तुरुंग, होम डिपार्टमेंटचा अभ्यास केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या चर्चासत्रात भाग घेतला. या कार्यानुभवाने त्यांना बालकल्याणाची शास्त्रीय दृष्टी दिली.
 डॉ. गोखले पुढे भारतीय समाजकल्याण संस्थेचे कार्यकारी सचिव झाले. त्या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलांच्या दत्तक प्रक्रियेची कार्यपद्धती विकसित करून दिली. पुढे पुलोद सरकारच्या काळात मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांची नियुक्ती महाराष्ट्र स्टेट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी (१९८९) केली. या काळातच 'बाल न्याय अधिनियम - १९८६' च्या अंमलबजावणीचे कार्य त्यांना करता आले.
 डॉ. शरच्चंद्र गोखले यांचे शासकीय व स्वयंसेवी संस्था व यंत्रणा अशा स्तरांवरचे हे बालकल्याणकारी संस्थापक कार्य असले, तरी बालकल्याणाच्याच क्षेत्रात त्यांनी संस्थाबाह्य स्वरूपाचे जे कार्य 'कास्प' व 'कास्प प्लॅन' या दोन संस्थांच्या माध्यमातून केले ते महाराष्ट्रातील बालकल्याणकारी कार्यास नवी दिशा व मार्ग दाखविणारे ठरले. बालकल्याणाच्या क्षेत्रात डॉ. गोखले यांनी अनेक भूमिका बजावल्या. शासकीय अधिकारी, नीती निर्धारक, स्वयंसेवी संस्था प्रमुख, बालकल्याणाचे सिद्धांत व उपयोजन, पत्रकार, संपादक, आंतरराष्ट्रीय संघटक अशा भूमिका बजावत त्यांनी आयुष्यभर बालकल्याण धोरण, बालकल्याण योजना, बालकल्याण कायदे, बालकल्याण संस्था, स्वयंसेवी संस्थांचे जाळे विकसित करणे, समाजप्रबोधन, कार्यकर्ता प्रशिक्षण अशा विविध पैलूंवर ते विचार, लेखन इ. माध्यमांतून समाज प्रबोधन करत राहिले. एखादे क्षेत्र आयुष्यभर वाहून घेऊन त्यात मूलभूत स्वरूपाचे जे योगदान देता येईल ते देत राहिल्याने 'महाराष्ट्रातील बालकल्याणाचे भीष्माचार्य' ही उपाधी त्यांच्यासाठी सार्थ ठरते. हे सर्व करून ते ज्या स्थितप्रज्ञ वृत्तीने उत्तरायुष्यात राहिले ते केवळ अनुकरणीय होय!
 डॉ. शरच्चंद्र गोखले यांचा मला सहवास लाभला तो सन १९८० पासून ते त्यांचे दु:खद निधन होईपर्यंत. मी त्यांच्याबद्दल प्रथम ऐकलं तेव्हा मी कोल्हापूरच्या रिमांड होमचा विद्यार्थी होतो. ते ज्या काळात पुणे रिमांड होमचे अधिकारी होते त्या काळातील काही मुले रिमांड होमचे काळजीवाहक अधिकारी झाली. त्यांच्या मतानुसार, डॉ. गोखले म्हणजे माणुसकीचा पाझर. रिमांड होम, अनाथाश्रमामधील लाभार्थी, कर्मचारी, अधिकारी, कार्यकर्ते यांच्याबद्दल त्यांच्या मनात अकृत्रिम जिव्हाळा, प्रेम, आपलेपणा भरलेला असायचा. महाराष्ट्रातील बालकल्याण संस्था हे त्यांचं विस्तारित सामाजिक कुटुंब होतं. कुणाचाही निरोप समारंभ असो, डॉ. गोखले दत्त! फक्त कळणं एवढंच त्यांना पुरं असायचं.
 संस्थेतील मुला-मुलींविषयी त्यांना अपार माया असायची. आपली मुलं मोठी झाल्याचा अभिमान असायचा. डॉ. गोखले यांच्याकडे मनुष्यसंग्रहाची मोठी विलक्षण कला असायची. 'हो जायेगा बेटा' असा एक उमदेपणा सतत त्यांच्या बोलण्यातून झरत असायचा. माणसाच्या संकटांच्या काळात भूमिगत राहून कार्य करण्याची त्यांची हातोटी दुर्लभ अशीच होती. मी आमच्या कॉलेजच्या विरोधात एकदा आमरण उपोषणास बसलो होतो. तेव्हा ते दै. केसरीचे संपादक होते. बातमीतून त्यांना समजलं. त्यांनी आपली सारी कोल्हापूरची टीम माझं उपोषण सुटावं म्हणून दिवसरात्र कामी लावली होती. हे मला नंतर कळलं. सहकाऱ्यांना जामीन राहण्यात, रदबदली करण्यात डॉ. गोखलेंचा हात कुणासही धरता येणार नाही.
 शासकीय यंत्रणा हालत नाही. अधिकारी संवेदनशील राहात नाही, याचा त्यांना मोठा राग असायचा. 'पोत्यात सरकी भरल्यासारखे अधिकारी असतात' असे ते नेहमी म्हणत. कायद्याचा अंमल होत नाही त्यानंही ते अस्वस्थ असत. म्हणायचे 'कायदा कधी चालत नसतो. त्याला चालवायला लागतं. आपण जेवढा चालवू तेवढाच तो चालतो' हे त्यांचं सूत्र वाक्य भारताच्या स्थितिशीलतेवरचं जळजळीत भाष्यच होय. बालकल्याण कार्यात शासन, समाज, संस्था, कार्यकर्ते यांना एकत्र आणायचा त्यांचा सतत खटाटोप असायचा. आपल्यासमोर दिलेलं आश्वासन मंत्री पाळत नाही, यांचे प्रायश्चित्त डॉ. गोखले व्यक्तिशः घेत. ते महाराष्ट्र परिवीक्षा व अनुरक्षण संघटना, पुणेचे अध्यक्ष होते. महिला व बालकल्याण संचालनालयाचा शुभारंभ समारंभ होता. श्री. रामदास आठवले समाजकल्याण मंत्री होते. त्या समारंभात आम्ही 'समाजसेवा' त्रैमासिकाचे पुनर्प्रकाशन सुरू केलं. मंत्रिमहोदयांनी त्रैमासिकासाठी पंचवीस हजार रुपयांचे साहाय्य घोषित केलं. पण प्रत्यक्षात दिलं नाही. डॉ. गोखले यांनी व्यक्तिशः २५,००० रु. ची देणगी देऊन आश्वासन पूर्ण केलं. मी संपादक म्हणून पाच वर्षांनी 'समाजसेवा' मासिक चालवून ते दामदुपटीनं संस्थेच्या हवाली केले. अशी सकारात्मक उदाहरणं म्हणजे डॉ. गोखले यांच्या समाजशील वृत्तीचा ठळक पुरावाच ना?
 महाराष्ट्रात संस्थाबाह्य बालकल्याण सेवेचे जनक म्हणून डॉ. गोखलेंचे कार्य ऐतिहासिक म्हणावे लागेल. 'कास्प प्लॅन'च्या माध्यमातून त्यांनी झोपडपट्टीतील मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, समाजकार्य इ. रूपाने जे कार्य केले त्यातून हजारो मुलांचं उपेक्षित बाल्य शिक्षित व संस्कारित झालं. त्यांनी बालकल्याण क्षेत्रात विदेशी पैसा आणून इथं समृद्ध बालपण बहाल केलं. मला ते लेखन, व्याख्यानापेक्षा अधिक सर्जनात्मक वाटत आलंय! 'युनिसेफ'सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने त्यांनी रिमांड होम्समध्ये 'बाल संगोपन योजना' सुरू करून संस्थेचा समर्थ पर्याय उभा केला. त्यांचं हे कार्य पण लाखमोलाचं मानावं लागेल.
 बालकल्याणाबरोबरच डॉ. गोखले यांनी वृद्ध कल्याण, कुष्ठरोग निवारण या क्षेत्रात केलेलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य अधिक व्यापक व दीर्घ पल्ल्याचं म्हणून महत्त्वाचं ठरतं. 'युनो'च्या माध्यमातून त्यांनी समाज कल्याणाच्या विविध प्रश्नांवर जनमत तयार करून विकसनशील देशांच्या कल्याणकारी कार्यात विकसित देशांचा जो सहभाग घडवून आणला त्याची नोंद आंतरराष्ट्रीय मान्यतेने होणे गरजेचे होते. युनोपुढे भाषण, काही सन्मान त्यांना लाभले. तरी त्यांचे कार्य त्यापेक्षा अधिक तोलामोलाचं होतं. हे कुणी नाकारू शकणार नाही.
 एखादा मनुष्य वैयक्तिक आयुष्यात सुलभ स्वास्थ्याच्या शक्यता नाकारून मळलेली वाट न चोखळता त्या वेळी उपेक्षित असलेलं समाजकल्याणाचं क्षेत्र निवडतो, यातच डॉ. शरच्चंद्र गोखले यांचं दूरदर्शीपण दिसून येतं. या वाटेवर त्या काळी काही पायघड्या नव्हत्या. त्या घातल्या जाण्याचीही सुतराम शक्यता नव्हती. पण डॉ. गोखले यांनी आपल्या कार्य-कर्तृत्वाने ती निर्माण केली. यामागं एक ध्यासपर्व त्यांनी कारणी लावलं. खर्ची घातलं. ज्या काळात विदेशी जाणं दुर्मीळ होतं. अशा काळात ते लीलया विदेशी जात राहिले. जग पादाक्रांत करून हा जगज्जेता सेवक सतत कार्यकर्ता राहिला. हे त्यांना लाभलेल्या वडिलांच्या संस्कार व वारसामुळे शक्य झाले, असं त्यांच्या आयुष्याचा धांडोळा घेतल्यावर लक्षात येतं.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

वेश्यांना 'माणूस' बनवणारी आई : विजयाताई लवाटे

 वेश्या व त्यांची मुले यांच्या संबंधातील प्रश्नांची जाणीव मला सन १९८५-८६ च्या दरम्यान झाली. कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलामार्फत आम्ही अर्भकालय व अनाथ विद्यार्थी वसतिगृह सुरू केलं होतं. त्या वेळी काही वेश्यांची मुलं आमच्या संस्थेत होती. त्या वेळी संस्थेत असलेल्या ज्या मुलांचे पालक आहेत, त्यांनी संगोपन खर्चात आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे साहाय्य करावं म्हणून आम्ही एक पालक सभा योजली होती. सभेत पालकांनी महिन्याला एक रुपया द्यावा, असे आवाहन केलं होतं. पालकांचं हे साहाय्य 'संगोपनात पालक सहभाग' या तात्त्विक भूमिकेची प्रतीकात्मक कृती होती. दुसऱ्या दिवशी गफूरची आई शंभर रुपये घेऊन आली. म्हणाली, "हे या महिन्याचे माझे पैसे." मी म्हटलं, "एका मुलामागे एक रुपया द्यायचं ठरलंय ना?" तशी गफूरची आई म्हटली, "संस्थेतील सर्व मुलं माझीच हाय. म्हणून शंभर दिलंत." "नको, एकच रुपया द्या" म्हटल्यावर म्हटली, "आख्खी रात्र जागून मिळवलंय...मुलांसाठी." मी सर्द झालो. "माझ्या घामाचा पैसा हाय...नाय नाही म्हणायचं." मी निरुत्तर होतो. पण त्या क्षणी शासनाच्या सांगण्यावरून केलेलं हे मदतीचं आवाहन मी मागं घेतलं.
 या माझ्या जाणिवेपेक्षा अधिक गंभीर केलं ते विजयताई लवाटे यांच्या जीवन व कार्याने. सन १९९० च्या दरम्यान आमच्या 'वात्सल्य बालसदन' अर्भकालयाला जर्मनीच्या तेरेदेस होम्स या संस्थेकडून अर्थसाहाय्य मिळू लागलं होतं. ही संस्था महाराष्ट्रातल्या अनेक अनाथ, निराधार मुले, मुली, महिलांच्या संगोपन व पुनर्वसन कार्याला मदत देत होती. अशा संस्थांच्या कार्यकर्त्यांचं वार्षिक शिबिर, चर्चासत्रे, मेळावे असे कार्यक्रम होत. त्या कार्यक्रमात एकदा विजयाताई लवाटे भेटल्या. त्यांचे कार्य प्रथम ऐकून पुढे पाहून मी प्रभावित झालो, थक्क झालो. हे कार्य महाराष्ट्रातलं सर्वस्वी वेगळे नि साहसाचं समाजकार्य होतं. अशी माझी धारणा नि खात्री झाली. स्वत:पलीकडे पाहण्याचं उपजत शहाणपण विजयाताईंना खरंतर त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीनं दिलं. त्या सधन नसल्या, तरी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या होत्या. वडील लोकल बोर्डात डॉक्टर होते. एल.सी.पी.एस. झालेला तत्कालीन डॉक्टर कंपौंडरसारखाच असायचा. घरी आई नि विजयाताईंसह पाच भावंडं. विजयाताई कशाबशा १९४८ च्या दरम्यान मॅट्रिक झाल्या. सन १९५४ ला प्रभाकर लवाटे यांच्याशी त्यांचं वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजे त्या काळात उशिरानंच लग्न झालं. उशिराचं कारण होतं वडिलांची तत्त्वनिष्ठा व ध्येयवाद. 'हुंडा मिळणार नाही, सोनं मिळणार नाही, लग्न साधं करावं लागेल. नारळ व मुलगी देऊ.' अशा अटी असायच्या. त्या अटींसह प्रभाकर लवाटे यांनी लग्न केलं. ते नेव्हीमध्ये होते. संसारात फार रस नव्हता त्यांना. म्हणून मग विजयाताईंनाच घर चालवावं लागायचं.
 सासर अमरावतीचं. सासरची माणसं तुटक वागायची म्हणून विजयाताईंनी मुंबईला संसार थाटला. कुटुंब नियोजनाचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेताच त्यांना मुंबईच्या एस.के. पाटील आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन प्रचार कार्यकर्त्यांची नोकरी मिळाली. त्या कामाचे स्वरूप सन १९६० च्या दरम्यान धाडसाचं होतं. वेश्यावस्तीत जाणं, त्यांना आरोग्य, मुलं सांभाळणं, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस उद्युक्त करणं असं काम होतं. वेश्या वस्तीत कुलीन बाईनं एकटं जाणं जीव धोक्यात घालणं होतं; पण विजयाताईंमध्ये उपजव मातृत्व होतं. त्यांनी वेश्या, घरवाली, दलाल, गुंड, पोलीस सर्वांचा विश्वास संपादन करून नेटानं काम सुरू ठेवलं. काही दिवसांतच त्या त्यांच्या झाल्या. हळद-कुंकू, संक्रांत, उपचार, संवाद, चहापान, मदत असा फेर धरत त्या त्यांच्या ताई, आई, आक्का झाल्या. इथं त्यांना वेश्यांच्या दुरवस्थेची कल्पना आली. 'जोवरी पैसा, तोवरी बैसा' असं इथलं जीवन. इथल्या स्त्रिया कोणीही राजीखुशीने या धंद्यात आलेल्या नव्हत्या. गरिबी, दारिद्र्यामुळे विकलेल्या मुली, नोकरीच्या आमिषानं परराज्यातून आणलेल्या, फसगत झालेल्या मुली, नव-यानंच धंद्याला लावलेल्या, पाय घसरल्याने या गर्तेत पडलेल्या. प्रत्येकाची स्वतंत्र शोकगाथा असायची. इथं नरक बरा अशी स्थिती! मिळकतीतले निम्मे पैसे घरवाली म्हणजे जिच्या घरी, खोलीत राहून धंदा करते तिला, घरी पैसे पाठवायची जबाबदारी, स्वत:चा खर्च, आजारपण, नट्टापट्टा सारा खर्च करावा लागायचा. आजार, बाळंतपणामुळे मिळकत बंद झाली तरी खर्च ठरलेला...या चक्रव्यूहात येणं माहीत असतं, बाहेर जाणं मरणानंतरच! ठेवलेला नवरा, भाऊ, 'आमचा माणूस' त्यांच्या जीवनाचा आधार असतो. पण त्यांच्याकडून फसवलं जाण्यानं त्यांचे हादरणं न भरून येणारं! पण तरी धंदा सुटत नसतो. पदरी पोर असेल तरी आशेनं जगायचं. नाहीतर सारी जिंदगी रामभरोसे!
 कौटुंबिक कारणामुळे विजयाताईंना मुंबई सोडून पुण्यास यावं लागलं. इथं पुनश्च हरिओम. घर, नोकरी, संसार साऱ्याचा शोध...नवा बोध! सन १९६३ ला त्यांना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात पूर्वानुभवावर नोकरी मिळाली. फोरास रोड, कामाठीपुराऐवजी बुधवार पेठ इतकाच काय तो फरक; पण इथं त्यांनी वेश्यांबरोबरच्या मुला-मुलींसाठी काही करता येईल का म्हणून प्रयत्न सुरू केले. सुरुवातीस त्यांनी वेश्यांची मुलं-मुली त्या वस्तीच्या वातावरणातून मुक्त व्हावीत, शिकावीत, त्यांच्या कोवळ्या मनावर तेथील वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून ती मुलं अनाथाश्रम, रिमांड होम, महिलाश्रमामध्ये ठेवण्याचे प्रयत्न केले; पण दाताच्या कण्या करूनही त्यांना वाटाण्याच्या अक्षताच मिळत. जी मुलं, मुली ठेवली ती तिथं रुळेनात. पळून येत. घरी आली की, संस्थेत जाण्यास नाखूश असत. कारण तिथं त्यांना कोणी समजून घेत नसे. मग 'सर्वेषा सेवा संघ' संस्थेच्या मदतीनं गाडीखान्याजवळील एका धर्मशाळेची जागा घेऊन बालवाडी सुरू केली. मुलं शिकू लागली. मग स्वतंत्र वसतिगृहाची गरज भासू लागली. म्हणून आकुर्डी इथं वसतिगृह सुरू केलं. ती तारीख होती १३ जुलै १९७९. चंद्रकांत काळभोर यांची बखळ म्हणून परिचित असलेली आकुर्डीची खंडोबाच्या माळावरील ही जागा म्हणे जनावरांचा गोठा होता. पुढे वसतिगृह विंचवाच्या बिऱ्हाडाप्रमाणे अडचणीमुळे, अधिक सुविधा मिळाव्यात म्हणून उरळी, पौंडजवळ भुमूक, केडगाव बेट अशा ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं. सन १९८४ ला 'सह्याद्री' मासिकातून विजयाताईंच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचली व काही समाजकंटकांच्या मनात ही संस्था बळकवायची दु:स्वप्नं निर्माण झाली व त्यांनी या संस्थेचे धाकदपटशाने अपहरण केले. विजयाताई या साऱ्या अनपेक्षित प्रकारांनी हादरणं स्वाभाविक होतं. ते सारं केडगाव बेटला पाहताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला नि त्या कोसळल्या.
 पण काही काळच. 'बचेंगे तो और लडेंगे' म्हणत त्यांनी 'वंचित विकास' संस्थेच्या मदतीनं 'निहार' सुरू केलं. पण यश त्यांची नेहमी शिकार करत राहिलं. इथं मतभेद झाले. गैर पटेना. त्यांनी संस्था सोडणं पसंत केलं. त्या सन १९९६ ला 'निहार' मधून बाहेर पडल्या. सन १९९७ ला त्यांनी एड्सग्रस्त बालकांसाठी 'मानव्य' संस्था सुरू केली. फेब्रुवारी २००५ ला निधन होईपर्यंत त्या कार्यरत राहिल्या.
 त्यांच्या जीवन व कार्याकडे पाहत असताना लक्षात येतं की, समाजाच्या दृष्टीनं उपेक्षित, किळस, पाप समजणाच्या व्यवसाय व स्त्रियांत त्यांनी माणूसपण शोधलं. निर्माण केलं. त्यांची दु:खं त्यांनी आपली मानून ती पराकोटीच्या निरपेक्षपणे दूर केली. त्यांची मुलं आपली मानून त्यांचे संगोपन, शिक्षण व पुनर्वसन केलं. ते करताना सतत त्या अस्वस्थ, असमाधानी राहिल्या. रोज आणखी काही अधिकची गुणात्मक भर घालत राहायचा त्यांचा प्रयत्न अनुकरणीय होता. त्या संघर्षास कधी हार गेल्या नाहीत. कष्टाने थकल्या नाहीत. 'जो देगा उसका भला, न देगा उसका भी भला' अशा फकिरी वृत्तीने त्या सतत करत राहिल्या. वेश्या व त्यांची मुलं यांना त्यांनी 'माणूस' बनवलं ही त्यांची सामाजिक देणगी! स्वकियांच्या सदिच्छा व सामाजिक मूक संमती व सद्भाव केवळ एवढ्याच बळावर त्यांनी समाजाला या वंचित समुदायाकडे सदाशय वृत्तीने पाहण्याची आपणास दृष्टी दिली. आज महाराष्ट्रात वेश्या व त्यांची मुलं यांचा सांभाळ करणाच्या संस्थांचं जाळं उभं आहे, विजयाताई त्यांच्या जनक ठरल्या खऱ्या!
 वेश्यांना लाभलेल्या मातृत्वाचा त्यांनी सांभाळ केला. ते मातृत्व त्यांना मिरवता आलं पाहिजे, म्हणून त्यांना माणूस म्हणून समाजात प्रतिष्ठित, पुनर्वसित करण्याचा ओनामा त्यांनी घालून दिला. हे सारं त्या निगर्वी व निरपेक्षपणे करत राहिल्या. पांढरपेशा स्त्रीनं ज्या काळात वेश्या वस्तीत जाणं विटाळापेक्षा कमी नव्हतं, त्या काळात त्यांनी आगळ्या-वेगळ्या समाजकार्यास सोवळं बनवलं. घृणेस करुणेचं कोंदण देऊन त्यांनी स्त्री असून साहस दाखवलं. विजयाताईंच्या आयुष्यात एक दोन प्रसंग तर असे आले की, जिवावर बेतलं असतं, तर त्या तोंडही दाखवू शकल्या नसत्या; पण घरवाली घरंदाज निघाली आणि त्या सहीसलामत सुटल्या; पण सभ्य समाजानं त्यांना दगा दिला. किळसवाणं कार्य अंगीकृत मानण्यात नि निरंतर करण्यात त्यांचे वेगळेपण होतं. त्यांचे प्रत्येक पाऊल नवं साहस होतं. कोणी विकेट घ्यायला गेलं, तर त्या मोठ्या शिताफीनं दुसऱ्याची विकेट उडवायच्या; पण समाजकार्यकर्त्यांचा बुरखा घेऊन वावरणाच्या दरवेश्यांना त्यांनी काळाच्या भरवशावर सोडलं. विजयाताई जाऊन दशकही सरलं नाही. ते आपला कस ठेवू शकले नाहीत, यातच विजयाताई लवाटेंचा पुरुषार्थ नि पराक्रम सिद्ध होतो. आपण त्यांच्यासारखे होऊ शकलो नाही, यात त्यांचं अजिंक्यपण होतं.  वेश्या व त्यांची मुलं यांच्या आरोग्य, कुटुंब नियोजन, उपचार, समुपदेशन, संगोपन, शिक्षण या कार्यानंतर त्यांनी आपला मोर्चा एड्सग्रस्त बालकांच्या संरक्षण, संगोपन शिक्षणाकडे वळवला. त्यासाठी 'मानव्य' संस्थेची स्थापना केली. 'गोकुळ'सारखी बालवाडी सुरू करून नव्या कामाची मुहूर्तमेढ विजयाताई लवाटेंनी रोवली. आयुष्य अमृतमहोत्सव साजरं करत असताना त्या हार तुऱ्यात न गुंतता नव्या जोखीम, जबाबदारीत गुंतल्या, समाज ज्याला भ्यायचा ते करण्याकडे त्यांचा कल होता. त्या ज्या काळात वेश्या वस्तीत जात तो काळ नि ज्या काळात त्यांनी एड्सग्रस्तांचे कार्य सुरू केलं तो काळ दोन्ही वेळी समाजाची भूमिका बघ्याची व भाव अस्पृश्याचा होता. विजयाताईंचं मन या उपेक्षेनं अस्वस्थ असायचं. व त्या ते करायला सरसावायच्या. सर्वस्व पणाला लावत काम करणं, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणून त्यांनी जे केलं ते समाजाच्या लेखी व्यवच्छेदक ठरलं. शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक विकलांगता, वंचितता, उपेक्षितता यांना नेहमी साद घालत राहायच्या. कणव व करुणेच्या बळावर त्यांनी मनुष्य क्रौर्यास नामोहरम केलं. शासन, समाज, व्यक्ती, संस्था, संघटना, माध्यमं यांचा गोफ त्यांनी गुंफला. पण कधी त्यांचा अनुनय त्यांनी केला नाही. अधीन होण्यापेक्षा स्वाधीन मेहनत त्यांनी पत्करली. वेश्यांच्या मुलामुलींचे संगोपन, पुनर्वसन कार्य आरंभ करणाच्या त्या जनक समाज कार्यकर्त्या होत.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

सार्वजनिक पप्पा - अजीजभाई भयाणी

 तुम्ही जेव्हा कोणीच नसता, तेव्हा तुम्हाला जो मदतीचा हात देतो तो खरा माणूस! सारं जग अंधारून आलंय, आपलं कोणीच नाही, पाहावं कुणाकडे असं वाटत असताना, जो आपल्याकडे पाहून हसतो, आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवतो, खांद्यावर हात ठेवून, 'तू चालत राहा, मी आहे' म्हणतो, तो आपला! केवळ रक्तानं, पदरानं जोडलेली नाती सांगायला पुरेशी असतात; पण आयुष्याचा प्रवास त्यांच्या भरवशावर करता येत नाही. असा दिलासा एकालाच नाही... व्यक्ती, संस्था, संघटना, उपक्रम अशा साऱ्यांना अभय देणारे पंढरपूरचे अजिज भयाणी म्हणजे अजात समाजपुरुष!
 मी त्यांना गेली पन्नास वर्षं पाहात आलोय. पंढरपूरला 'वा. बा. नवरंगे बालकाश्रम' आहे. तिथे १९५५-५६ च्या दरम्यान एक दिवसाच्या अर्भकापासून ते १०० वर्षांच्या वृद्धांपर्यंत ३००-३५० मुलं, मुली, महिला होत्या. अनाथ, निराधार, कुमारीमाता, परित्यक्ता यांचं ते मोठे कुटुंबच होतं. १९५६ ला पंढरपूरच्या चंद्रभागेला महापूर आला. नदीकाठचं सारं जुनं गाव पाण्याखाली गेलं...अनाथ, निराधार झालेल्या पंढरपूरच्या रहिवाशांना या आश्रमानं आश्रय दिला. अजिज भयाणीचं दुकानही या वेळी पाण्यात होतं... आजवर आश्रमात न डोकावणारे कितीतरी या निमित्ताने आश्रमात आले होते. त्यात अजीजभाई होते... या निमित्तानं त्यांनी आश्रम पाहिला अन् त्यात त्यांना आपलं बालपण दिसलं...तिथल्या रडणाच्या मुलांच्या चेहऱ्यावर आपले विरलेले अश्रू दिसले!
 अजीजभाईंचे वडील हबीबभाई. ते मूळचे भावनगर गुजरातचे. वडिलोपार्जित व्यापारी. ते भारतभर फिरून स्टेशनरी, कटलरी, कॉस्मेटिक विकायचे. एकदा फिरत पंढरपूरला आले. तेव्हा इथं आषाढी वारी होती. तो काळ १९२८ चा असला तरी लाखावर वारकरी होते... एवढी गर्दी त्यांनी पहिल्यांदाच पाहिली... आणलेला माल हातोहात विकला जाईल म्हणून भरपूर माल मागवला; पण विक्री होऊनदेखील माल अंगावर पडला म्हणून वारी संपली तरी विकत राहिले... तोवर कार्तिक वारी तोंडावर आली म्हणून परत माल मागवला... परत 'ये रे माझ्या मागल्या!' परत चैत्रवारी असं करत वारीच्या चक्रात घुटमळून गेलेले हबीबभाई पंढरपूरकर केव्हा झाले हे त्यांचं त्यांनासुद्धा कळलं नाही. अगोदर फिरता व्यापार... मग रस्त्यावर... मग दुकान...घर करत पदरी तीन मुलं- अजिज, सलीम व दाऊद यांना घेऊन हबीबभाई व नूरबानो पंढरपूरच्या समाज जीवनाचं अभिन्न अंग बनले.
 आई चार वर्षांची असताना वारल्यानं अजीजभाईंचं शिक्षण, राहणं अनाथ मुलापेक्षा वेगळं नव्हतं...कधी आत्या...कधी काका...या प्रकारामुळे अजीजभाईंना आश्रमातली मुलं-मुली आपली वाटणं स्वाभाविक होतं...पूरग्रस्त विस्थापित...फाळणीने निर्वासित... धर्माने गुजराती मुसलमान... असं दुय्यम जिणं लाभलेल्या अजीजभाईंना सतत समाजातील उपेक्षितांबद्दल वाटत राहायचं. पूर ओसरला आणि नारळी पौर्णिमा आली...आश्रमानं आपल्याला तारल्याची कृतज्ञता ठेवून अजीजभाई राख्या घेऊन आश्रमात. केवळ मुलं आणि मुली म्हणून जगणारे या छोट्या कृतीनं भाऊ-बहीण झाले...पुढे दसरा आला, अजीजभाई सोनं घेऊन आले...'सोनं घ्या...सोन्यासारखं राहा' म्हणून त्यांनी अनाथ कुटुंबात माणुसकीची ऊब भरली... त्यांचं येणं परिसस्पर्शापेक्षा कमी नव्हतं. सतत रडत, कण्हत आयुष्य कंठणारे आश्रमवासी 'दिस आज सोनियाचा...'गुणगुणत आनंदी झाले. दिवाळी आली...अजीजभाई फटाके, फुलबाज्या, उटणं, वासाचं तेल, भाऊबीजेला ब्लाऊज पिसेस घेऊन दत्त! बरं यांचं वय त्या वेळी मोठं नव्हतं... अवघ्या विशीतला तरुण हा!
 हबीबभाईंना मुलांची लक्षणं ठीक दिसेना. मिळवायचं सोडून घालवणारा हा मुलगा त्यांनी गल्ल्यावरून उठवला अन् त्याला पिटाळत राहिले खरेदीसाठी मुंबई, सुरत, भावनगरला. तरी त्यांची उधळपट्टी ठरलेली...विचारलं की यांचं ठरलेलं उत्तर, "आपल्याला काही कमी आहे का? दिलं म्हणून काही कमी पडलं का? कोण उपाशी राहिलं का?" पुढे भाऊ दुकान सांभाळायला लागले. अजीजभाई मात्र उदार कर्ण! कुठं अन्नछत्र चालव, कुठं याला मदत दे. या संस्थेच्या कार्यक्रमाला जा. ते घरी नि व्यापारात गरजेपुरते असले तरी मिळवण्यात हिशेबी, खर्चात बेहिशेबी!  ऐन तारुण्यात त्यांनी पंढरपूरच्या नाथ चौकात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हे सिंधी, भक्ती गणपतीची! विचारलं की म्हणत, 'जलाराम काय आणि प्रभूराम काय? सर्व रामच ना? सारी माणसं सारखी, तसे देवही सारखे!' हे त्यांचे जीवन तत्त्वज्ञान आलं कुठून? तर जगण्यातून, लहानपणाच्या अनाथपणानं, पूर्वजांच्या निर्वासितपणामुळे आणि वडिलांच्या कष्टांनी त्यांना समाजभान दिलं. 'दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास' हा एकच घोष कानी घुमत ठेवणारे अजीजभाई... त्यांचं सारं जीवन म्हणजे आपल्या आयुष्यातील उणेपणाचं उदात्तीकरण!
 अजीजभाईंना आपला मुलगा आमीरला- इंग्रजी शाळेत पाठवायचं होतं; कारण सरळ होतं की परिस्थितीमुळे ते स्वत: आठवीच्या पुढे शिकले नव्हते...मुलानं शिकावं, मोठं व्हावं हे स्वप्न, पण घरात त्यावरून महाभारत घडलं. आता त्यांच्या लक्षात आलं की, आपली जगण्याची तऱ्हाच निराळी, तेव्हा स्वतंत्र राहणं बरं! आमीरला इंग्लिश शाळेत पाठवू न शकल्याचं शल्य या माणसानं कसं दूर करावं? तर पंढरपूरला इंग्लिश मिडियम स्कूलच सुरू केलं. कारण काय तर, आमीरसारखं दु:ख इतर मुलांच्या वाट्याला येऊ नये! नुकताच या शाळेने रौप्यमहोत्सव साजरा केला... दोन एकराचा परिसर, कोटीची इमारत...संगणक शिक्षण...त्यामुळे पंढरपूरच्या पालकांची व विद्यार्थ्यांची पहिली पसंती अजीजभाईंची शाळा. पण परत अजिजभाई तेथूनही पसार. 'तुमचं माझं जमत नाही, तुम्ही हे पाहा. मी दुसरं पाहतो', असं म्हणत.
 अजीजभाईंनी काहीही केलं तरी यश ठरलेलं! कारण ते निरपेक्ष, परसुखाय...परमानंदी असतं! स्वतंत्र झाले नि चहाचं दुकान सुरू केलं...ते फायद्यात. मग फुटवेअर... ते फायद्यात...मग शेती...प्रयोग केले, तरी फायद्यात! आसपास पाण्याचा थेंब नाही...यांच्या विहिरीला मात्र बारोमास पाझर! मी एकदा विचारलं, "हे कसं काय?" म्हणाले, "मी जे करतो तेच मुळी दुसऱ्यांसाठी असतं...मग काय कमी पडणार? विहीर दुसऱ्यांना पाणी देण्यासाठी खोदली तर पाणी लागणारच!"
 अजीजभाईंनी ५० वर्षांपूर्वी पंढरपूरजवळील गादेगाव रस्त्यावर शेती घेतली ती अनाथाश्रमातल्या मुलांना मामाच्या गावी जाता यावं म्हणून! हा अनाथाश्रमातल्या मुलांचा 'मामाचा गाव' आता निराश्रितांचे आनंदवन झालाय! वृद्धाश्रम, प्रभाहीरा बालगृह या सर्वांना दिवाळीत आठवण येते ती अजीजभाईंची! पन्नास वर्षांपूर्वी हुर्डा पार्टी करणारी अनाथाश्रमातील मुलं-मुली आता आजीआजोबा झाली. ती आपल्या जावई, सुना, नातवंडांसह आता या आनंदवनात येतात, तेव्हा अजीजभाई कायम डोळ्याला रुमाल लावून बसलेले असतात. एखाद्यानं आपल्याला सावली मिळावी म्हणून झाड लावावं अन् त्याखाली येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक पांथस्थानं पहुडावं, असा अजानवृक्ष झालेला हा मळा सर्वांच्याच लळ्याचा विषय झालेला आहे.
 अजीजभाईंची स्थिती सध्या 'मी उरलो नावापुरता' अशी झालीय. पंढरपूरमध्ये आता ठरूनच गेलंय...एक अलिखित ठरावच झालेला आहे... रोटरी क्लब, कला मंच, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्र सेवा दल, अपना घर, बालकाश्रम, शाळा, वाचनालय, काव्यवाचन, हस्ताक्षर स्पर्धा, व्याख्यानमाला...तुम्ही पंढरपुरात काही करा...पहिला दाता गृहीतच! तुमचं काम सुरू होऊ दे. न होऊ दे...अजीजभाईंचा मदतीचा हात ठरलेला! हा माणूस काय करत नाही? ज्येष्ठ नागरिक मंच चालवतो, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर योजतो, त्यांना बस, रेल्वे पास काढून देतो. ब्लड ग्रुप तपासून देतो... मधुमित्र मंडळही (डायबेटिस साह्य) आहेच.
 परवा मी फोन केला, "साने गुरुजी वस्तुसंग्रहालय करायचं आहे. साने गुरुजींच्या उपोषणाची माहिती हवीय." दुस-या दिवशी फोन, "तनपुरे महाराजांच्या मठात फोटो मिळाले, पांडूरंग डिंगरे यांचं पुस्तक मिळालं, 'गोफण' साप्ताहिकाचे नसले तरी साप्ताहिक 'हिंदू'चे अंक मिळतील. आणखी काय पाहिजे ते सांगा." यांचं वय पंचाहत्तर. मी साठीतला; पण उत्साह माझ्यापेक्षा त्यांचा अधिक! ही ऊर्जा येते कुठून? हा माणूस प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या हाकेला ओऽ कसा देतो? मुला-नातवांपेक्षा समाजाची चिंता करणारा हा माणूस! असा विचार करत होतो नि त्यांनी आणखी एक सोशल ड्रोन (सामाजिक सुरुंग) टाकला...
 "माझ्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत...मी आजवर जे केलं ते वरवरचं...मला कायमस्वरूपी...माझ्या पश्चात चालत राहील असं काही तरी करायचं आहे. मी चाळीस-पन्नास वर्ष समाज जीवनात घालवली. तितके लाख रुपये मी साठवलेत. त्यातून मला शिक्षण व आरोग्यासाठी चिरस्थायी काही करायचं आहे...तू सामाजिक कामात असतो...सुचव...मी ते करीन."
 या माणसाला दमा आहे. तासातासाला पंप घ्यावा लागतो. तरी या माणसाकडे बटन स्टार्ट स्कूटर नाही...आहे ती ढकल स्टार्ट, राहतं घर भाड्याचं आहे. जागा आहे. पण घर बांधायचं अजूनही लांबणीवर टाकलेलं. या माणसाला मी गेल्या पन्नास वर्षांत तीन शब्दांचं एक पूर्ण वाक्य बोलताना ऐकलेलं नाही. 'हम नहीं, काम बोलेगा' असाच सारा आविर्भाव. या माणसाचं मोठेपण त्यांच्या भोवतालच्या माणसांच्या मोहळात आहे. पोळ्यावर दगड मारला की, माशाचे थवे घरघरू लागतात. तसे अजीजभाईंच्या निरोपावर सारं पंढरपूर हलतं-डोलतं! खरं म्हणजे ते कोणत्याच संस्थेचे कुठलेच पदाधिकारी नाहीत. 'इदं न मम' याची खात्री म्हणजे अजीजभाई भयाणी! आता त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा वसा तिसऱ्या पिढीत पोहोचला असल्याने ते 'पंढरपूरचे पब्लिक पप्पा' झालेत.
 मुलगा आमीर, सून अश्रफ, नातू राहील, नात शार्मिन साऱ्यांमध्ये पप्पांचं हे पब्लिक ओपिनियन उतरलंय. आपण पूर्वजांच्या इस्टेटीचे वारस असतो. अजीजभाईंचं सारं कुटुंब त्यांचं सोशल गुडविल जपतं आहे. मला अजीजभाईंबद्दल जो अतीव आदर आहे तो एकाच कारणासाठी...पन्नास वर्षांत या माणसामध्ये वय सोडता बाकी कशातच बदल झाला नाही... तोच पांढरा शर्ट, विजार...तोच धर्म, जात निरपेक्ष व्यवहार, तीच सचोटी... तेच करणं आणि नामानिराळे राहणं, रोज उद्या काय करायचं, याचा विचार. समाजात असा एक माणूस असतो, म्हणून लक्षावधी चुका झाल्या तरी जग तरून राहतं...चालत राहतं...विधायक होत राहतं!

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

वन मॅन आर्मी : रमाकांत तांबोळी

 अहमदनगर व बारामतीची 'रिमांड होम्स', पंढरपूरचं 'बालकाश्रम', पुण्याची 'विद्यार्थी सहाय्यक समिती' व सह्याद्री हॉस्पिटल्सचं 'समवेदना', अहमदनगरचंच 'स्नेहालय' व मैत्रेय फाऊंडेशन या नि अशा अनेक छोट्या मोठ्या संस्था नि उपक्रमांची नावं सांगता येतील जिथं रमाकांत तांबोळी नावाचे सामाजिक कार्यकर्त्यांचा पिंड व पीळ असलेले अधिकारी, प्रशासन, समन्वयक, पर्यवेक्षक, अधीक्षक अशा नानाविध भूमिका वठविणारे एक सद्गृहस्थ गेले नि त्या संस्था, उपक्रमांचं सोनं झालं...त्यांचा कायापालट झाला. एक माणूस जेठा मारून उभा राहिला की, संस्था बदलते. यात त्या माणसाची बांधिलकी, समर्पण, कर्मनिष्ठा कारणीभूत असते. हा माणूस मुळातच कळवळ्या जातीचा. वरून कठोर आतून प्रेमळ, गैर वागलात, तर फाशी; सदाचार केलात, तर शाबासकी, प्रोत्साहन, साहाय्य ठरलेलं! त्याच्या स्पष्टवक्तेपणाचा कानाला त्रास होतो खरा; पण त्यात कडू औषधाचं रोगनिवारण तत्त्व ठासून भरलेलं असतं. आम्ही त्यांना 'दादा' म्हणायचो, पंढरपूर बालकाश्रमातले सर्व जण...दादांच्या औषधाचा गुण मात्र ठरलेला. त्यांचा एक डोस पोलिओ प्लसच्या डोसासारखं काम करतो...आयुष्यभर प्रभावी आणि परिणामकारी! रमाकांत तांबोळी म्हणजे 'वन मॅन आर्मी'... या आर्मीत भरती व्हावं लागत नाही. तुम्ही आपसूकच त्यांच्या सोशल आर्मीमध्ये सामील होता. या आर्मीचा स्वघोषित कमांडर पुकारा नाही करत...आदेश नाही देत...तो पोटात शिरतो नि तुमचं हृदय परिवर्तन करतो. त्यासाठी तो मधाळ वगैरे नाही बोलत...एलआयसी एजंटसारखं तो रोखठोक सांगतो... "हे सत्कार्य आहे, कामाला पैशाची गरज आहे नि तुमच्याकडे पैसे आहेत." 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' अशी त्यांची स्वत:ची अशी कार्यशैली आहे. बरं दादांची चिकाटी अशी की, 'आग्या वेताळ'...एकदा का तो तुमच्या पाठकुळीवर बसला की झडती घेऊनच मुक्ती. त्यामुळे माहीत असलेले लोक दादांचा शब्द प्रमाण मानतात नि ते मागेल ते साहाय्य करतात. ही असते या माणसाची सचोटी, पारदर्शिता नि प्रतिबद्धताही! त्यामुळे रमाकांत तांबोळी सध्याच्या संस्थेतून केव्हा बाहेर पडतात, यावर अनेक संस्था डोळा ठेवून वेटिंग करत असतात (खरं तर दबा धरून बसलेल्या असतात).
 या माणसाच्या कामाची सुरुवातच मुळी तपश्चर्येनं झाली. सेवादल, स्काऊटसारख्या संघटना कुमार, किशोर, युवकांना त्यांच्या घडणीच्या काळात त्यांना काही देतात. तसंच यांनाही त्यांनी दिलेलं. ती शिदोरी घेऊन त्यांनी समाजकार्य करायचं बालपणीच ठरवलेलं. पदवीधर झाले नि त्यांना एम.एस.डब्ल्यू. करायचं होतं. त्या वेळी एम.एस.डब्ल्यू. करू इच्छिणाऱ्यांना कार्यक्षेत्रीय पूर्वानुभवाची (फिल्ड एक्सपीरियन्स) अट होती म्हणून ते अहमदनगरच्या रिमांड होममध्ये कार्यानुभव म्हणून सेवा करायला गेले. तिथे डॅडी लोणकर नावाचे गृहस्थ तेव्हा ती संस्था पाहात. त्यांनी तांबोळीसारख्या पदवीधर युवकाला चपराशासारखं आठ दिवस व्हरांड्यातील बाकावर अकारण वाट पाहत तिष्ठत ठेवलं. यांनी पण ठरवलेलं...'लढल्याशिवाय हरणार नाही'. डॅडी हरले, दादांनी सलामीलाच युद्ध जिंकलं...एखादा अपवाद वगळता त्यांनी आयुष्याची सर्व युद्ध जिंकली ती आपल्या कर्मठशील चिकाटीनं.
 सन १९५७ मध्ये त्यांनी अहमदनगरच्या रिमांड होममध्ये उमेदवारी केली. त्या बळावर त्यांना बारामतीच्या रिमांड होमनं बोलावून घेतलं. तिथं दादांनी त्या रिमांड होमचा कायाकल्प केला. रजेच्या कालावधीत काम करायला गेले नि कायम झाले. असं क्वचित घडतं. दादा जाईपर्यंत ते रिमांड होम बारामती, दौंडच्या परीघात घुटमळत होतं. त्यांनी त्या संस्थेची कार्यकक्षा रुंदावून, इंदापूर, पुरंदर, फलटणच्या मुलांना लाभार्थी केलं. तिथल्या रिमांड होमला इमारत नव्हती. इमारत बांधली. स्वत:च्या इमारतीत रिमांड होम चालवणाऱ्या त्या काळच्या मोजक्या संस्थेत बारामतीची गणना होऊ लागली ती कुणा एका कुटुंबामुळेच नव्हे, तर एका अधिकाऱ्याच्या सेवाभावामुळे. त्या जोरावर ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये गेले व एम.एस.डब्ल्यू. झाले. 'ठरवाल ते तडीस न्या' हे त्यांच्या कामाचं ब्रीद वाक्य बनलं.
 डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या संशोधन संस्थेत काही काळ प्रकल्पाधिकारी म्हणून ते कार्यरत होते; पण माणसात रमणाऱ्या या माणसास कागद चिवडत बसण्यात रस नव्हता. त्यांनी पंढरपूर गाठलं...'हेचि माझे पंढरपूर'...त्यांना सूर गवसला. सन १९६५ ला त्यांनी पंढरपूरचं बालकाश्रम आपली सामाजिक प्रयोगशाळा बनवली. पंढरपूरचं वा. बा. नवरंगे बालकाश्रम हे महाराष्ट्रातलं दुसरं बालहत्या प्रतिबंधक गृह. महात्मा फुले यांच्या पुण्यातल्या गंज पेठेतल्या पहिल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची (१८६३) प्रेरणा घेऊन मुंबईच्या प्रार्थना समाजाने सन १८७५ ला ते सुरू केलं होतं. महर्षी कर्वे, पंडिता रमाबाईंच्याही अगोदर सुरू झालेलं हे बालकाश्रम रमाकांत तांबोळी येईपर्यंतच्या ९० वर्षांच्या वाटचालीपर्यंत विनाअनुदानच चालायचं. दादांनी हे पाहिलं. संस्था चालवणं आणि चांगली चालवणं यात अनुदानामुळे फरक पडतो, हे त्यांना अनुभवांती लक्षात आलं होतं. अनुदानाचा पहिला चेक तीन लाखांचा पाहून संस्था चालकांचे डोळे पांढरे व्हायची पाळी...आजवर ते मदत पेटीतील १०-१० पैशाच्या लोकाश्रयावर संस्था चालवायचे... राज्याश्रयामुळे संस्था राजस झाली. दादांनी पाहिलं...संस्था एकत्र कुटुंबासारखी चालते. पाळणाघर, रिमांड होम, बालगृह, वृद्धाश्रम, आधारगृह, शाळा, दवाखाना, बंदी स्त्रियांचं आधारालय, बालमंदिर... काय नव्हतं त्या संस्थेस? पण कुणाचा पायपोस कुणाला नव्हता. त्यांनी संस्थांचे विकेंद्रीकरण केलं. कर्मचारी नेमले. त्यांना पगार, अनुदान मिळवलं आणि दयेवर चालणाऱ्या संस्था त्यांनी स्वाधार केल्या. दादा म्हणजे अर्थव्यवहाराचे कौटिल्य आणि लोकव्यवहारातील चाणक्य! त्यांनी मुलींना चप्पल्स दिल्या, त्यांना नर्सिंगचं प्रशिक्षण दिलं नि स्वयंसिद्ध बनवलं. दादांच्या लेखी कधी आपपर भेद नसायचा; पण ते संकटग्रस्तांचे वकील होते. अडचणीत आलेल्याला आधार...मग तत्त्व, कायदा, नियम रद्द. मानव अधिकाराची अंमलबजावणी होण्यापूर्वी यांचं मानव कल्याण सुरू होतं. मुलांचं दत्तकीकरण, मुलींची लग्नं, परित्यक्तांना स्वावलंबी करणं ही कामं तर त्यांनी केलीच; पण संस्थेतील मुला-मुलींच्या प्रत्येक मंगल-अमंगल क्षणी ते 'बाप' म्हणून धावत गेले. पदरमोड करून लग्नं, मुंज, बारसं, वास्तुशांती, दिवस काही असो ते घरचे म्हणून दत्त! तुम्ही बोलवायला विसरलात अन् त्यांना नुसता कार्यक्रम कळला तरी हजर. मानपान, पद, प्रतिष्ठा या पलीकडे 'माणूस' म्हणून जगणं आणि जगवणं हे त्यांच्या जीवन व कार्याचं निराळेपण! नसलेल्यांचं निराळं जग उभारणारा हा विश्वामित्र! प्रतिसृष्टी निर्माण करण्याची त्यांची तपश्चर्या कोणतंच प्रलोभन रोखू शकली नाही. पण आणीबाणीनं डाव साधला. त्यांच्यावर बालंट आणलं; पण ते डगमगले नाहीत. तुरुंगवासानंतर हक्काची लढाई हरले... कायदा कधी कधी सत्याचं शिवधनुष्य पेलण्यास अपुरा पडतो...पण दादा पट्टीचे, हाडाचे कार्यकर्ते...पुनश्च हरिओम करत बैराग्याच्या वैरागी मनाने नवा डाव मांडायचा ठरवलं!
 'समवेदना' हे सह्याद्री हॉस्पिटल प्रा. लि. चे असे अपत्य की, जे तुमच्या आरोग्याची काळजी घेत दुसऱ्यांच्या आरोग्यास वरदान देते. म्हणजे असं की, तुम्ही ५००० रुपये भरायचे. तुम्हाला काही झालं तर सह्याद्रीचा हा आरोग्य डोंगर तुमच्या पाठीशी राहणारच; पण समजा तुम्हाला नाही काही झालं (होऊ नये हीच इच्छा) तर तुम्ही ज्याला काही झालंय अशा गरीब, निराधाराची शिफारस केली तर तोच डोंगर तसाच तुमच्यामागं उभा! गरिबांचं आरोग्यदायी कवचकुंडल ठरलेली ही योजना स्वत:च्या आयुष्यात कवडीचुंबक असलेल्या तांबोळी सरांनी यशस्वी करून दाखविली आणि रामराम ठोकला.
 नित्य मला नव्याचा सोस

 माझा पूर्वाश्रम ओस

 नसलेल्या जगाची आस

 हाच माझ्या जीवनाचा परिपोष!
 म्हणत रमाकांत तांबोळी सध्या आपल्या माहेरी, जन्मगावी लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या नादात स्नेहालयात डेरेदाखल आहेत. अवघे पाऊणशे वयोमान असलेला हा तरुण कार्यकर्ता गिरीश कुलकर्णी नावाच्या चाळिशीतल्या कार्यकर्त्यास सध्या घाम फोडतोय. माणसाचं जगणं नितळ असेल, तर ते कातळावरही नंदनवन फुलवण्याचं सामर्थ्य घेऊन येतं. स्नेहालय वेश्या, वेश्यांची मुलं यांच्यासाठी नगर, सोलापूर इथं अनेक उपक्रम करत. प्रतिबंधन, उपचार, संरक्षण, संगोपन, पुनर्वसन असा पाच पदरी गोफ गुंफत स्नेहालयाला एड्सग्रस्तांचं रुग्णालय उभारायचं होतं. रमाकांत तांबोळी यांनी ते मैत्रेय फाऊंडेशनच्या माध्यमातून सहज उभारून दाखविलं. 'अशक्य ते शक्य करिता सायास' हा रमाकांत तांबोळी यांच्या जीवन व कार्याचा अलिखित मंत्र, हा फॉर्म्युला ते मनुष्य संग्रहातून साकारतात. कार्यकांत रमाकांत म्हणजे 'नाही रे'चे आकांत! तो ऐकला की हा ओऽऽ देतो...हात पुढे करतो...गर्तेतून वर घेतो... चालता करतो अन् चालता होतो...परत नवं काम! पुढे कोणत्या संस्थेचा उद्धार ते काळालाच माहीत असलं, तरी हे मात्र निश्चित की, रमाकांत तांबोळी नावाचा माणूस घरकोंबडा होणे नाही. त्याच्या आर्मीला निवृत्ती नाही. म्हणून त्यांची आर्मी आपल्या आर्मीपेक्षा निराळी...साधना न करता नकाराचा प्रदेश जिंकत सकारात्मक जग निर्मिणारी ही 'वन मॅन आर्मी' म्हणून तर सदैव अजेय!

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

आय ऍम डुइंग माय जॉब : इव्हान लोमेक्स

 माणूस तोही एकविसाव्या शतकातला...त्याला 'मी' आणि 'माझं' चा शाप मिळालाय...संवेदना, परोपकार, समाजसेवा, निःस्वार्थी मदत सारे शब्द व्यवहाराच्या शब्दकोशातून रोज एक एक गायब होत आहेत. अशात एक बाई रस्त्यावर बेवारस जीवन जगणाऱ्या लुळ्या, पांगळ्या, अंध, वेडसर, बेवारस लोकांना आपल्या घरी ठेवते. त्यांना खाऊ-पिऊ न्हाऊ घालते. मलमपट्टी, औषधोपचार करत आणि समाजाच्या लेखी उपेक्षित स्त्री-पुरुष जीवांना 'माणूस' बनवते यावर माणुसकीचा पाझर आटलेल्या, वात्सल्यांचे दुवे तुटलेल्या या समाजात कुणाचा विश्वास राहात नाही... हे स्वाभाविकच म्हणायला हवं. मग असं निरपेक्षपणे बेवारसांची सेवा करणाऱ्या इव्हान लोमेक्सला लोक ती धर्मांतर करते...ती किडण्या विकते...ती वेश्याव्यवसाय करते, असे बिनबुडाचे आरोप करत बरळत राहतात. तथाकथित जागरूक पत्रकारही कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता रकाने भरायचा रतीब म्हणून सनसनाटी काहीबाही लिहितात, छापतात...पोलीस ते वाचतात ...आठ...आठ तास तिचा रिमांड घेतात...काहीच हाती येत नाही म्हणून मग सोडून देतात...
 मग इव्हान पुनश्च हरिओम म्हणत बेवारशी नामक जिवंत प्रेताची सेवा पूर्ववत निष्ठेने करत राहते.
 आता ती समाजाच्या लेखी 'बेवारस मदत' होते...आता पोलीसच तिच्या घरात रस्त्यावरील बेवारस जिवंत प्रेत कधी आणून सोडतात...कधी फोन करतात, कधी समाजातला जागरूक (?) माणूसही फोन करून मदरला सांगतो...मदर इव्हान जाते...निमूटपणे पदरमोड करून घेऊन येते. हे बेळगावात आता रोजचंच होऊन बसलंय.
 हे मला कळायला पण सात-आठ वर्षं उलटून गेली. जेव्हा मी तिच्याबद्दल जाणून घेतलं तेव्हा मला कळलेली तिची रामकहाणी विलक्षण अशीच होती... इव्हानचा जन्म तमिळ ख्रिश्चन कुटुंबात २८ नोव्हेंबर, १९४६ ला मदुराईत झाला. वडील इंग्रज सैन्यात होते. बदलीमुळे तिची व कुटुंबाची फरपट होत राहिली. आज इथं तर उद्या तिथं. वडील पुढे कॅप्टन झाले. बेळगावच्या मराठा लाइट इन्फंट्रीत बदली होऊन आले. इव्हानला वडिलांनी सिकंदराबाद, बेळगाव जाईल तिथं इंग्रजी शाळेत घातलं. वडील अकाली निवर्तले अन् इव्हानच्या कुटुंबाची वाताहात झाली.
 भाऊ बेळगावच्या हॉटेलमध्ये नोकरी करू लागला. इव्हान कशीबशी मॅट्रिक झाली. टायपिंग शिकली. बेळगावातच एका वकिलाची टायपिस्ट झाली. पाचशे रुपयांच्या तुटपुंज्या पगारात भाऊ व आईचा सांभाळ करू लागली. या साऱ्या धकाधकीत तिचं अकाली प्रौढ होणं स्वाभाविक होतं. आईचं करायचं म्हणून तिनं अविवाहित राहणं पसंत केलं.
 घरातल्या ख्रिश्चन संस्कारामुळे तिला येशू भेटला. तोच तिचा मित्र, सखा, मार्गदर्शक झाला. येशूमुळे तिला जीवनाचा मार्ग सापडला...'खरा देव गरजवंत माणसात दडलेला आहे...तुम्ही त्यांचे करा...तो तुमचा सांभाळ करील' या ओळीवर श्रद्धा ठेवून इव्हान जगत राहिली. चर्चच्या कर्मकांडात प्रार्थनेत वेळ घालवायला परिस्थितीमुळे तिला उसंत अशी मिळालीच नाही. 'भाव तोचि देव' म्हणत दिवस कंठत राहिली.
 पस्तिशी ओलांडत असताना एकदा भाऊ अचानक घरी आला तो इव्हानसाठी लग्नाचं प्रपोजल घेऊनच. 'माझ्या हॉटेलात एक कॅनेडियन गृहस्थ आलेत...वय वर्षे अवघे ६१...त्यांना जीवनसाथी हवीय...ताई तू विचार कर... गृहस्थ सज्जन आहेत.'
 'झट मंगनी पट शादी' होते. डॉ. रेमंड लोमेक्सशी विवाह हा इव्हानच्या जीवनात कायाकल्प घेऊन येतो. अचानक आलेल्या श्रीमंतीनं ती भांबावून जाते; पण हे काही दिवसच...परत येशूच तिला सावरतो. ती आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायचं ठरवते. गोव्यातील कळंगुट बीच हे विदेशी पर्यटकांचं आगर. तिथं भिकारी, बेवारशीही तितकेच. त्यांची सेवा करायची म्हणून ती नर्सिंगचे अनौपचारिक धडे एका हॉस्पिटलमध्ये घेते नि लागते कामाला.  दरम्यानला तिला दिवस जातात...डॉक्टरांचा विरोध असताना ती बाळाला जन्म देते...मला आई व्हायचंय म्हणून! मुलीला जन्म देते. तिचं नाव इडन ठेवते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इडन मतिमंद...मंगोल...आज वय वर्ष २५ पण अवघी चार फुटांची...आईभोवती पिंगा घालत, घुटमळत असते, तेव्हा इव्हानही मातृत्वाचं घेरदार नृत्य करत असते...तिला सोबत असते ऐंशी ओलांडलेली आजी...ग्रँडमा पामेला...हे सारं कमी म्हणून इव्हान कुणीतरी तिच्या दारात टाकलेल्या अनौरस रेणुकाचाही सांभाळ करत राहते, ते पोटच्या इडनप्रमाणेच...हे सारं येशूच्या प्रेरणेनं घडतं. अशी तिची अविचल श्रद्धा!
 वडिलांप्रमाणे डॉ. रेमंड लोमेक्स अचानक निवर्ततात...'हेचि माझे पंढरपूर' म्हणत ती गोव्याहून परत बेळगावी येते...सुटलेली नोकरी परत मिळत नाही... कशी तरी गुजराण करत असताना अचानक टपालातून तेवीस हजारांचा चेक येतो...ती असते डॉ. रेमंड लोमेक्स यांची ग्रॅच्युइटी...डॉ. रेमंड लोमेक्सनी वारस म्हणून इव्हानचं नाव नोंदलेलं होतं ...ती त्याची एकमेव वारस ठरली होती. इतके पैसे एकत्र बघण्याचा तिच्या आयुष्यातील तो पहिलाच प्रसंग!...आनंदानं ती गोड सांजा बनवते व बेळगावच्या रस्त्यावरील बेवारसांना वाटते...स्टँड, स्टेशन, कँप, कॉलेज रोड, किर्लोस्कर रोड, मिळेल तिथे वाटत फिरते...अंध, वेडे, मुके, रोगी, कुष्ठ साऱ्यात तिला येशू हसताना दिसतो, अन् ती येशूला हसत ठेवायचं ठरवून टाकते.
 आता रोज संध्याकाळी हे सगळे इव्हानची वाट पाहात राहतात... सांजा वाटताना तिच्या लक्षात येतं, कुणाला खोक पडली आहे...कुणाला बेडसोअर झालेत...कुणाला स्कूटरने धडक दिली आहे...कुणाच्या पाठीवर पोलिसांचा दंडुका पडलाय...तो विव्हळतो...कळवळतो आहे...कुणावर रात्री वेडी म्हणून कुणी तरी अज्ञातांनी बलात्कार केलाय... वस्त्रांचं भान नसलेली ती...रक्त वाहतंय...माणसांच्या बेटावर तिला अमानुषतेची नदी वाहताना दिसली अन् तिनं त्यांची मदर व्हायचं ठरवून एकेकाला घरी न्यायला सुरुवात केली.
 ती भाड्याच्या घरात एका आऊट हाउसमध्ये राहायची ...आता इव्हानला वेडं ठरवलं जाऊ लागलं...घर सोडायचा तगादा सुरू झाला, तसा तिनं कँपातल्या गणेशपुरमध्ये एक प्लॉट घेतला...ती बेवारशी लोकांसाठी आधारगृह बांधणार म्हटल्यावर कॉलनीचा विरोध होतो...तरी ती हिंमत हरत नाही ...याला भेट, त्याला भेट करत असताना तिची नि आमची गाठ पडते, ती आमच्या सहकारी डॉक्टर जया नातू यांच्यामुळे ...आम्ही इव्हानच्या मागे उभे राहतो. तिला एक मोठा 'मंगल पुरस्कार' देतो...जंगी सत्कार घडवून आणतो... वर्तमानपत्रात लेख लिहितो. दिवाळी-ख्रिसमसच्या दरम्यान निधी जमवतो...एक लाख रुपये बेळगावमध्ये समारंभपूर्वक देतो...पत्रकार परिषद होते...परत तेच प्रश्न, त्याच शंका. आम्ही फक्त एकच विचारतो, "तुम्ही काम पाहिलं का? अंधारात गोळ्या किती मारणार?" मग सगळे निरुत्तर होतात.
 इव्हान आता मदर इव्हान लोमेक्स झाली आहे...'डॉ. रेमंड लोमेक्स होम फॉर होमलेस' साकारलंय...तिथं १५-२० गरजू (आता ते बेवारशी नाहीत) सुखानं पाठ टेकतात. आता पोलिसांचा दंडुका नाही, अमानुष बलात्कार नाही...आहे ते हक्काचं घर, 'माणूस' म्हणून वागणारं, जगवणारं घर...मदर ही पदवी तिला कोण्या चर्चनं बहाल केली नाही...गरजवंतांची ती आहे आर्त पुकार! ती एक हाक आहे. जिला सतत ‘ओऽऽ' चं वरदान! आता मदर इव्हान लोमेक्स बेळगावची सेलिब्रिटी झालीय...स्टुडिओचं उद्घाटन, रोटरी कॉन्फरन्स, सायन्स कन्व्हेक्शन, शाळांचं स्नेहसंमेलन सर्वांत तिची उपस्थिती आता सर्वांना आवश्यकच नाहीतर अनिवार्य वाटते...मराठा लाइट इन्फंट्रीचे जवान आपलं मूठ-मूठ भर राशन वाचवतात...अन् इव्हानचं महिन्याचं राशन भरून जातात ...
 इव्हाननं या बांधवांना घर दिलंय...स्वतः मात्र अजून भाड्याच्या त्या आउट हाउसमध्येच आहे तशी राहते आहे...इव्हानचं निराळं जग मी पाहिलं आणि मला नवी जाग, नवी जाण आली. मी इव्हानला समजून घेतो, तेव्हा लक्षात येतं की, दुसऱ्याचं निरपेक्षपणे करणं, दुसऱ्याचं निरपेक्ष आतून बाहेरून एक होणे हे येरागबाळ्याचं काम नाही. कोडग्या, गोठलेल्या, निबर मनाच्या या समाजात एकविसाव्या शतकात म्हणून तर कोण दुसऱ्यासाठी करतं, यावर विश्वास राहात नाही. असं असलं तरी हे तितकंच खरं...समाज साकळलेला आहे खरा; पण अजून सारं संपलं- सरल्याचं भय नाही...नसतील झरे खळाळत वाहणारे; पण संवेदना- आपलेपणाचे उमाळे आहेत. उद्या त्यांचा समुद्र खचितच होईल!
 बेळगावी जातो तेव्हा माझा एक कार्यक्रम ठरलेला असतो...इव्हानला भेटायचं...माझे हात प्रत्येक वेळी भरलेले असतात असं नाही...मी भेटतो...तिला दिलासा मिळतो...उमेद मिळते...आपण एकटे नाही, याची जाणीव देणारी ती भेट...ती पण निरिच्छपणे जगत असते...म्हणत असते, आय ऍम डुइंग माय जॉब! फिनिश!!...
 मग मीही अधिक निरिच्छ, निरपेक्ष अन् खरं तर 'नॉन-एन्टिटीकडं जाणारा प्रवास करत राहतो...ती एका नव्या, निराळ्या जगाची निर्मितीच असते.'

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

निर्माल्य समाजाची निर्मला : मंगला शहा

 'अस्पृश्यता हा मानव जातीला लागलेला कलंक आहे', असे महात्मा गांधी म्हणत. ही गोष्ट विसाव्या शतकात ठीक होती. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. गावकुसाबाहेर राहणारं जग आता गावात आलंय; पण समाजमनातली अस्पृश्यता गेली असं नाही म्हणता येणार. अस्पृश्यता ही जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत या पलीकडची एक मानसिकता आहे. तिचा उगम माणसाच्या अहंकारात आहे. अहंकार उच्च- नीचता जन्माला घालतो. मी कोणी तरी आहे, या अस्तित्वभानाने सुरू झालेला हा माणसाचा प्रवास मी कोणीतरी 'विशेष' आहे, या अस्मितेपर्यंत येऊन पोहोचतो. अन् मग फक्त 'तू तू मी मी' असा भेदभाव जन्मतो. एकविसावं शतक मानव प्रतिष्ठेचं मानलं जात असलं, तरी तिकडे सीमाभागात बेळगावसारख्या शहरात इव्हान लोमेक्ससारखी समाजहृदयी रस्त्यावरच्या एड्सग्रस्तांना स्वत:च्या घरी सांभाळते. घरात अडचण होते म्हणून तिथल्या कॅम्पातल्या एका कॉलनीत त्यांच्यासाठी पदरमोड करून घर बांधू लागते, तेव्हा 'गावभरचा उकिरडा आमच्या...कॉलनीत नको' म्हणणारे मी जेव्हा पाहतो...किंवा पंढरपूरला एड्सग्रस्त माता व मुलांसाठी मंगला शहा गाताडे कॉलनीत आपल्या आई-वडिलांची स्मृती म्हणून 'प्रभाहिरा प्रतिष्ठान' मार्फत समाजमनात स्पृश्यतेची पालवी फुटावी या ध्यासानं घरकुल उभारण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यांनाही बेळगावचाच संवाद ऐकावा लागतो. मानव सभ्यता विकासाचा प्रवास अजून दूरचाच पल्ला आहे खरा! इथे, तिथं, सर्वत्र!  मंगलाताई मला १९८० साली प्रथम भेटल्या. मी पीएच.डी.झाल्यामुळे मला लहानाचं मोठं करणाऱ्या पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमानं आपल्या कार्य प्रवासाच्या शतकोत्तर काळातला पहिला डॉक्टरेट म्हणून माझा सत्कार ठेवला होता... त्यात पंढरपूरची अनेक समाजशील माणसं आली होती. त्यात मंगलाताई होत्या...बालकाश्रमात खाऊ वाट, मुलींशी खेळ, मुलांशी बोल अशी त्यांची चळवळ सुरू होती. हा पाझर त्यांनी साने गुरुजींच्या 'श्यामची आई'कडून घेतला होता. हे जरी खरं असलं तरी जन्मतः जागता उमाळा त्यांच्यात होताच! सामाजिक काम उसन्या शिदोरीनं कधीच होत नसतं...आत आत धुमारे सतत पेटत असावे लागतात. तेव्हाच कुठे ठिणग्या तग धरतात. सामाजिक कामाच्या या लुटूपुटूच्या लढाईनं त्यांचं समाधान होत नव्हतं. त्या अस्वस्थ काळात मला त्या प्रथम भेटल्या होत्या.
 मग सासू-सासऱ्यांना समजावून त्या स्वतंत्र झाल्या. या स्वातंत्र्याने त्यांना 'थेंबातही आभाळ असतं' हे खोटं असतं असं समजावलं. आपण मूलभूत स्वरूपाचं, जगावेगळं, निराळं केलं पाहिजे, अशा ओढीनं त्या कुष्ठ पीडितांसाठी काही करू लागल्या. पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर, गोपाळपूर, गाणगापूर अशा तीर्थस्थानी एक सोय असते...समाजास जे नको असतं त्याचं विसर्जन कुंड असतात ही तीर्थक्षेत्रं! या विसर्जन कुंडात 'निर्माल्य' अशा गोंडस नावाखाली सारी घाण टाकून समाज 'निर्मळ' (खरं तर नामानिराळा) होत असतो. त्याला नदीच्या प्रदूषणाची जशी पर्वा नसते तशी समाजप्रदूषणाचीही! हे लक्षात घेऊन त्या कुष्ठपीडितांच्या वस्तीत जाऊ लागल्या. काही देऊ लागल्या. देता देता त्यांच्या लक्षात आलं की, आपलं हे देणं त्यांची गरज भागवतं. हे जरी खरं असलं तरी ते त्यांना लाचार याचक बनवतं. उभारणीचे काही करावं म्हणून त्यांनी मग वाचनालय सुरू केलं...ते काम त्यांना वरवरचं, मलमपट्टीचं वाटत राहिल. हा काळ १९८५ चा होता.
 या दरम्यान अभ्यास, निरीक्षण, समाज प्रश्नांचं भान म्हणून त्यांनी मिळेल ती सामाजिक कामं पाहिली...प्रत्येक काम करावंसं वाटण्याचा तो भाबडा काळ होता. असंच एकदा त्या पुण्याला गेल्या. जाण्यापूर्वी त्यांनी विजयताई लवाटे यांच्या वेश्या नि त्यांच्या मुलांच्या संगोपन, पुनर्वसनाच्या कामाबद्दल ऐकलं, वाचलं होतं. अनेक अन्य कामांपेक्षा हे काम त्यांना निराळं नि आव्हानात्मक वाटलं... पुण्यातली बुधवार पेठ पाहात असताना त्या पेठेत त्यांना पंढरपूरच्या संत पेठेतील वेश्यावस्तीचं प्रतिबिंब दिसू लागलं...खुणावू लागलं. विजयाताईंनी काम सुरू केलं तेव्हा तो काळ एकदम प्रतिकूल होता...आता करणं सोपं होतं; कारण शासन, समाजास त्यांचं महत्त्व पटलं होतं. १९९५ च्या दरम्यान त्यांनी आपल्या डिंपल नावाच्या तरुण मुलीस घेऊन एड्स प्रतिबंध, एड्स जागृती, एड्स नियंत्रण असं प्रबोधनात्मक कार्य सुरू केलं. पंढरपूरची नावानं 'संत' असलेली पेठ 'असंत' होती. एक-दोन नव्हे, चांगल्या चारशे वेश्यांची वस्ती...सोलापूर, विजापूर, जत भागातून आलेल्या वेश्या...आख्ख्या महाराष्ट्राचे निर्माल्य पदरात घेत उदरभरण करायच्या...हे जेव्हा मंगलताई शहांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सांगोवांगीनं त्यांचं दैन्य सरणार नाही...नुसतं कंडोम देऊन कंडम समाज सुधारणार नाही. केवळ पथनाट्य करून त्यांचं जीवननाट्य बदलणार नाही.
 असं वाटत असतानाच एक घटना घडली. (अशा एकेक घटनांनीच सिद्धार्थ, महावीर, येशू आदींना 'धर्म' शिकवला.) पंढरपूर जवळच्या एका खेड्यात एचआयव्ही बाधित दोन मुली गोठ्यात ठेवल्याचं मंगलाताईंना कळलं. तसा त्यांचा संताप पराकोटीला पोहोचला. त्या घरच्या लोकांना काहीबाही सुनावत होत्या...बघता बघता बघ्यांची गर्दी वाढली...तसा मंगलाताईंना चेव आला...तेवढ्यात गर्दीतलं कोणी तरी म्हटलं..."ओ ताई, एवढं वाटतं, तर तुमच्या घरी घेऊन जा ना...मग कळेल या वासरांना गोठ्यात का टाकलं ते..." या संवादातला उपहास, कुत्सितपणा न कळण्याइतक्या मंगलाताई भोळ्या नव्हत्या...पण तो क्षण त्यांची सत्त्वपरीक्षा घेणारा होता. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या दोन मुली उराशी घेतल्या...आज ती संख्या ६० झाली आहे.
 मंगलाताईंनी १९७६-७७ च्या दरम्यान पत्र्याच्या एका शेडमध्ये एड्सग्रस्त मुली, मुलं नि महिलांच्या संगोपन व पुनर्वसनाचे काम सुरू केलं. तेव्हा लोक पैसे द्यायचे; पण संस्थेत यायचे टाळायचे...एड्सबद्दलच्या भीती व गैरसमजाचा तो काळ होता. शबाना आझमीनं एड्स निर्मूलन कार्याच्या एका जाहिरातीत एक एड्सग्रस्त मुलीला कुशीत घेतलं आणि समाज मन बदललं. ऐश्वर्या राय विश्वसुंदरी झाली नि तिनं एका जाहिरातीत नेत्रदानाचं महत्त्व 'तुम भी सुंदर दुनिया उनको (अंधो को) दिखा सकते हो...मेरी तरह!' सांगत सारं जग आपल्यासारखं केलं. अभिनेत्री नीना गुप्ताने अनाथ मुलगी दत्तक घेतली नि अनाथाश्रमातल्या मुलींचा वनवास संपला. तसं जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, प्रवीण दवणे, मंगलाताईंना भेटले...नि प्रभाहिरा प्रतिष्ठान पत्र्याच्या शेडमधून काँक्रिटच्या घरात आलं...तसा समाजही काँक्रिट झालाय.
 मंगलाताईंच्या संस्थेस 'एड्सग्रस्त बालगृह' म्हणून शासनमान्यता आहे. अनुदानही आहे, पण समाजमान्यता नाही. आजही पंढरपूर कर्मठच राहिल्याचा हा पुरावा! इथली मुलं शेजारच्या शाळेत घेतली जात नाहीत. खरं तर एका एवढ्याच कारणासाठी अशा शाळा, कॉलेजिसची मान्यता, अनुदान रद्द केली पाहिजे. डोकं किती ठिकाणी व रोज आपटायचं? (शेवटी डोकं, कपाळ, आपलंच फुटत राहणार) म्हणून त्यांनी जिल्हाधिका-यांच्या मदतीनं केंद्र शासनाच्या एका योजनेतून 'महात्मा फुले हंगामी केंद्र शाळा' सुरू केली. त्या शाळेस पहिली ते आठवीची मान्यता आहे. आठवी झालेल्या मुला-मुलींनी कुठं जायचं, हा प्रश्न आहेच. त्यासाठी मंगलताई एड्सबाधितांची शाळा स्वतंत्रपणे सुरू करण्याच्या खटपटीत आहेत. वेश्या, देवदासी, कुष्ठपीडित, एड्सग्रस्तांच्या मुला-मुलींची स्वतंत्र वसतिगृह, शाळा हा समाजावरचा कलंक म्हणून जोवर आपण त्याकडे पाहणार नाही, तोवर समाज प्रगल्भ होणार नाही. जपानमधील नॉर्मलायझेशन, अमेरिकेतील ऍफर्मेटिव्ह ऍक्शनच्या धर्तीवर अनाथ, उपेक्षित, अस्पृश्य, अपंग, अंध यांच्या विकासाचा एकत्रित, समन्वित कार्यक्रम, प्रकल्प, (होलीस्टिक प्रोजेक्ट) राबवणार नाही, तोवर आपला समाज दुभंगलेलाच राहणार.
 मंगलाताई शहांच्या मनात हे शल्य असलं तरी त्या थांबलेल्या नाहीत. 'प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा' गुणगुणत त्यांचे समाज प्रबोधन कार्य सुरू आहे. सोबत आपली कन्या डिंपलला घेऊन त्या काम करतात. त्यांचं स्वप्न आहे, एड्सबाधितांना सन्मानपूर्वक जगता येणारं जग निर्माण करायचं. त्या यथाशक्ती रोज उपक्रमांची भर घालत पुढे जात आहेत. पालवी प्रकल्पात त्या एचआयव्ही पॉझिटिव्ह व एड्सग्रस्त मुले, मुली व महिलांचे संगोपन, संस्कार, शिक्षण, पुनर्वसन करतात. प्रबोधन कार्याबरोबर नियंत्रण कार्य करतात. एड्सप्रतिबंधासाठी उपचार केंद्र आहे, शिक्षण वंचित बालकांसाठी शाळाही त्या चालवतात. महिन्याचा एक लाख रुपये खर्च असलेल्या पसाऱ्यात अवघे २५,००० रुपये मिळणारे अनुदान रोज युद्धाचा प्रसंग उभा करत राहते. वाडी-वस्तीत जाऊन संस्कार केंद्र, अंगणवाडी चालवायचाही त्यांचा प्रयत्न असतो; पण बळ अपुरं पडतं. तरी त्या हिंमत नाही हरत...
 गेल्या तीन दशकांच्या सततच्या कार्यानं त्यांचं असं जीवन तत्त्वज्ञान विकसित झालं आहे. सामाजिक काम म्हणजे देणं असा चॅरिटी शो त्यांना मान्य नाही. काही उभारणं म्हणजे करणं. मनुष्य संबंधांची वीण छोटे-छोटे गुंते, तिढे सोडवण्यातून घालता येते, असा त्यांचा विश्वास आहे. माणूस अन्न, वस्त्र, निवारा इ. साठी आसुसलेला असतो. ती त्याची मूळ गरज खरी; पण तेवढ्यानं त्यांचं जीवन ग्रहण सुटत नाही. 'दे दान सुटे गिरान' (ग्रहण) म्हणत प्रश्न सुटले असते तर...पण ते सोपं नसतं...माणसाला 'घर' हवं असतं. कोणतीही संस्था घर करणं म्हणजे समाज उभारणं, जोडणं, नाती निर्माण करणं महत्त्वाचं. ते त्या करतात. अनेक संस्थांमध्ये लाभार्थी, गरजू असतात...संस्थेत 'माणूस' असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. त्यासाठी मानसिकता बदलायला हवी. मागे काही वर्षांपूर्वी सोलापूरच्या ब्रह्मदेव माने प्रतिष्ठानने मला राजर्षी शाहू सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दिला. तेव्हा मंगलाताईंचा सत्कार करण्यात आला होता. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, 'सत्कार करून कार्य पुढे नाही जात. सत्कार्यात भागिदारी हवी' ते खरं होतंही आणि आहे.
 हिंदीतील प्रख्यात कवी रामनरेश त्रिपाठींची कविता 'अन्वेषण' (शोध) मी पूर्वी शिक्षक असताना शिकवत असे. त्यात कवी जगरहाटीविरूद्ध असणारं देवपण, सौंदर्य, इतिहास, भक्ती, दया, विरक्ती असं बरंच काही सांगतो. माणसं देव दगड, धोंडे, जंगल, बागेत शोधत असतात. तेव्हा तो गरिबांच्या झोपडीत विसावलेला असतो...असं उदाहरणासह सारं जीवन समजावतो... मंगलाताई शहांचे जीवन हे एक अर्थाने जगरहाटी, वहिवाटीविरूद्ध चालायची बिकट वाट आहे. ती त्यांनी अंतरीच्या उमाळ्याने स्वीकारली. त्यामुळे त्या कधी कुणाविरूद्ध तक्रार नाही करत. प्रश्न आहेत म्हणून तर आपण आहोत, असं त्या मानतात व जमेल तेवढे करत राहतात. त्या आस्तिक आहेत की नाही माहीत नाही; पण त्यांच्या बोलण्या-चालण्यात आस्थेचा प्रत्यय मी नेहमी अनुभवत आहे. त्यांचं सारं जीवन कार्य रामनरेश त्रिपाठींच्याच ओळीत सांगायचं तर-
 कठिनाइयों, दुखों का,

 इतिहास ही सुयश है |

 मुझको समर्थ कर तू,

 बस कष्ट के सहन में ||

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

मतिमंदांना 'माणूस' बनवणारा शिक्षक : पवन खेबूडकर

 माणूस स्वभोगाच्या वेदनेचे उदात्तीकरण म्हणून जेव्हा एखादे कार्य करतो, ते श्रेष्ठ असलं तरी त्यास स्वत्वाची एक डूब असते; पण आपण अनाथ, अपंग, मतिमंद, अंध, विधवा, परित्यक्ता नाही; पण तशा समाजासाठी जेव्हा एखादी व्यक्ती अथवा समूह, त्या त्या वर्ग कल्याण अथवा विकासाचे, संगोपन, शिक्षण, पुनर्वसनाचे कार्य करतात तेव्हा ते प्रथम सांगितलेल्या कार्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असते. परकाया प्रवेश, परदु:ख सहिष्णुता, सहवेदना, समवेदना संवेदनशीलतेशिवाय शक्य नसते. त्यासाठी स्वत:च्या पलीकडे पहाण्याची उदारता लागते. शिवाय दिसणाच्या जगाकडे विशिष्ट दृष्टी वा भावांनी पहाण्याची व्यापकता तुमच्या ठायी असायला लागते. माझे स्नेही पवन खेबूडकरांनी कोल्हापूर जिल्ह्यात १९८६ साली जिल्ह्यातील पहिली मतिमंद बालकांची शाळा सुरू केली ती माझ्या घराशेजारच्या एका छोट्या गॅरेजमध्ये. मी त्यावेळी अनाथ मुलांच्या संगोपन व पुनर्वसनाचे कार्य करायचो. तेव्हा मला या गोष्टीचं विलक्षण आश्चर्य वाटलं होतं. स्वतः मतिमंद नाही, घरी कोणी मतिमंद नाही तरी अशा मुलांबद्दलचा कळवळा आणि कळकळ का?
 हे मी समजून घेताना माझ्या लक्षात आलं की पवन २५ वर्षांचा तरुण पदवीधर. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चांगल्या पदावर कायम नोकरी. ती सोडून हे खूळ त्याच्या डोक्यात कसं भरलं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटायचं. माणसाचं जीवन कधी, कोणत्या घटनेनं बदललेलं सांगता येत नाही. अगदी मृत्यूच्या दाढेत असलेला मनुष्य...त्याचं येणारं मरण कधी चान्स बनतं, कधी चमत्कार, तर कधी कला नि करिश्मा अशा आशयाची एक सुंदर हिंदी लघुकथा आहे. या पार्श्वभूमीवर जी माणसं जगणंच कलात्मक बनवतात त्यामागे त्या माणसाचा जाणिवेचा सहावा कोपरा (सिक्स्थ सेंस) विलक्षण असणं कारण असतं. पवन खेबूडकर उत्तम अभिनेते आहेत. त्यांची 'राशोमान', 'ऑथेल्लो', 'किंग लिअर' ही नाटकं मी पाहिलीत...चेतना मतिमंद विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात, संस्थेच्या छोट्या मोठ्या समारंभात, दरवर्षी होणाऱ्या हेलन केलर जयंतीत या माणसांचं कलासक्त जीवन लक्षात येत राहिलेलं...तर एकदा ते 'राशोमान' नाटकाच्या प्रयोगासाठी म्हणून सोलापूरला गेले होते. तेव्हा त्यांची नाटक मंडळी सोलापूरच्या नव्या पेठेतील एका कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या 'जिव्हाळा' या मतिमंदांच्या शाळेत उतरली होती. आमचे मित्र अण्णा राजमाने ती चालवत. पवन खेबूडकरांनी ती शाळा पाहिली नि ते खूपच अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे एक सक्षम, सशक्त समाज मन असल्यानं मुलांसाठी काही करावं असं आत खोलवर सतत वाटत रहायचं...या शाळेनं त्यांना वाट दाखवली. पवन खेबूडकरांनी आपले मित्र अजित देशपांडे, डॉ. शरद नावरे, डॉ. शरद भुताडिया, डॉ. विजय कर्नाड, डॉ. सुनील पाटील, दिलीप बापट या आपल्या अनेक सहकाऱ्यांसह गेल्या २५ वर्षांत केलेले कार्य त्यांच्या जागत्या मनाचा पुरावा.
 पवननी अवघ्या २० मुलांनिशी सुरू केलेली चेतना अपंगमती विकास संस्था केवळ मतिमंदांची शाळा नाही. ते मतिमंदाविषयी समाजास भावसाक्षर करणारं कृतीकेंद्र आहे. ते समाजास समजावतं की मतिमंदत्व हा आजार किंवा रोग नाही. ते केवळ बौद्धिक अपंगत्व आहे. ते उपचारांनी दूर करता आलं नाही तरी कमी करता येतं. मतिमंदांना शिक्षण, प्रशिक्षण, उपचारांनी स्वावलंबी बनवता येतं. त्यासाठी समाज, पालक, शासनाची कृतिशील भागिदारी लागते. इथं या शाळेत दिलं जातं जीवन शिक्षण, जगण्याचं बळ देणारी ही शाळा औपचारिक शिक्षणाबरोबर (अंकज्ञान, अक्षरज्ञान) व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकसित करते. या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जो आटापिटा करते तो थक्क करून सोडणारा. ही शाळा या मुला-मुलींसाठी शाळेव्यतिरिक्त बाजार भरवते, उद्योग केंद्र, क्रीडा केंद्र, उपहार केंद्र चालवते. सहली, पालक मेळावे, प्रदर्शन भरवते. चित्रकला, शिल्पकला, नृत्य, हस्तकला शिकवते. मोठमोठी माणसं मुलांसमोर उभी करून आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा धीर व दिलासा देते. मतिमंद, मूकबधीर, अंधांच्या कितीतरी शाळा शासकीय अनुदानावर डोळा ठेवून स्वत:ची, कुटुंबीयांची उपजीविका बनविणाऱ्या संस्थांची महाराष्ट्रात कमतरता नाही. अशा पार्श्वभूमीवर 'चेतना'चे प्रेरणा कार्य प्रबोधन मला अधिक महत्त्वाचे वाटते.
 पालक म्हणून मी चेतनास जवळून अनुभवलं आहे. आमच्या बालकल्याण संकुलात पोलीस सोडलेली, टाकलेली, चुकलेली मुलं-मुली आणत. त्यात काही गतिमंद तर काही मतिमंद असत. त्यातली अनेक मुलं आई-वडिलांनी अज्ञानानी वेडी म्हणून टाकली, सोडलेली असायची. रवींद्र, कुमार, अजित, भारती, मंजुषा, मुन्नी अशी किती तरी मुलं-मुली संस्थेत पोलिसांनी वेडी म्हणून दाखल केली होती. त्यांना चेतनाचा स्पर्श झाला अन् ती माणूस झाली...माणसाळली. पैकी कुमार, रवींद्र भाऊ होते. खरे होते ते गतिमंद (स्लोलर्नर) पालक अडाणी. पोलिसांना चिरीमिरी देऊन त्यांना संस्थेत घातलं...१०-१२ वर्षांनी त्यांना सक्षम, स्वावलंबी, सज्ञान झालेलं पाहिलेल्या...पहिल्यांदा काखा वर करून संस्थेत घातलेल्या काका म्हणून नातं सांगणाऱ्या त्या गृहस्थांनी या मुलांचा ताबा मागितला...कायद्यानं देणं भाग होतं...दिलाही आम्ही. मी आजही तो दिवस विसरू शकत नाही जेव्हा मला कळालं की काकाला या मुलांच्या नावाची शेती हडपायची तर होतीच शिवाय त्यांना जन्मभर राबणारे दोन वेठबिगार हवे होते... मतिमंदांकडे समाज पहातो कसा याचा हा आरसा. पवन नि चेतना उपेक्षितांना असं माणूस बनवते त्यामुळे ते सलामास पात्र!
 पण अशा संस्थेकडे शासनानी किती कोडगेपणाने, कोरडेपणाने पहावं? त्याला काही सीमा...चेतना मतिमंद विद्यालय सन १९८८-८९ पासून कोल्हापूरच्या शेंडापार्क, या कुष्ठ पुनर्वसन व उपचार केंद्राच्या परिसरात कार्य करते. ही जागा भगवान सहाय नावाच्या एका संवेदनशील शासकीय अधिकाऱ्यानं शाळेस तात्पुरती दिली...तेव्हापासून ती जागा शासन चेतनास कायमची देतेच आहे. किती सरकारं आली...मंत्री गेले...'सरकारी काम सहा महिने थांब' म्हण खोटी ठरवणारी दिरंगाई ही संस्था झेलते आहे. 'प्रहार'चे प्रहारी नामदार नारायण राणे यांच्यामुळे शाळेस जागा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे...शासन हललंय, पण जागं नाही झालंय...नारायणरावांनी मनावर घेतलेल्या प्रश्नास अपयश नाही असा लोक इतिहास सांगतात...तो प्रवाद चेतना मतिमंद विद्यालय बाबतीत खरा ठरावा असं समाजास वाटतं.
 चेतना विद्यालयानं आपल्या चेलवी प्रकल्पासाठी म्हणून आरोग्य विभागाकडे पडून (अक्षरश:) असलेली चार हेक्टर जागा मागितली आहे. बाल मार्गदर्शन केंद्र, वाचा उपचार केंद्र, समुपदेशन केंद्र, जन्मोत्तर निदान केंद्र (अर्ली डिटेक्शन सेंटर) संस्कृती केंद्र, क्रीडांगण, शाळा, उद्योग विभाग, वसतिगृह इ. शाळेची अनेक स्वप्नं आहेत. समाज पैसे द्यायला तयार आहे. शासनास फक्त जागाच द्यायची आहे.
 चेतनास ही मदत का केली पाहिजे हे ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांनी आमचा विद्यार्थी व महाराष्ट्रातला सिने दिग्दर्शक, नाटककार अभिराम भडकमकर लिखित 'आम्ही असू लाडके' हा चित्रपट आवर्जून पहावा. मी व माझ्या कॉलेजच्या दोन हजार विद्यार्थ्यांनी तो पाहिला आहे. मतिमंद बालके त्यांचे भावविश्व, भविष्य पाहता ते समाज संधी व सुविधांचे 'पहिले हक्कदार' आहेत हे आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. सामाजिक न्यायाची खरी सुरुवात मित्रांनो जाती, धर्म, लिंग, भाषेपेक्षा किती तरी आधी माणसातील जन्मगत कमतरतेपासून सुरू होते हे आपण अभिनिवेशात विसरूनच गेलो आहोत. अनाथ, अंध, अपंग, मतिमंदांपासून सामाजिक नैसर्गिक न्याय सुरू व्हायला हवा...त्यांचीच अक्षम्य उपेक्षा याचं पवन खेबूडकरांना वाटणारं वैषम्य...शल्य हे समाजाचं खुपतं दु:ख व्हायला हवं!
 पवन खेबूडकर प्राचार्य म्हणून या मुलांचं जे करतात...विचार करतात, ते विदेशात असते तर एव्हाना जगातलं आदर्श शिक्षण केंद्र उभारलं असतं. मी १९९० साली युरोपात असताना पॅरिसमध्ये आठवडाभरापेक्षा जास्त दिवस होतो. त्या काळात तेथील एक चेतनासारखी मतिमंद शाळा पाहिली होती. नंतर १९९६ साली जपानमध्ये अशा शाळा पाहिल्या, परवा जानेवारीत थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशियामधील अशा संस्था पाहिल्या... 'चेतना'मध्ये जी जाणीव, धडपड, दृष्टी आहे ती तिथे नाही आढळली...भौतिकांनी मित्रांनो समृद्धी नाही येत. खरं वैभव असतं ते एखाद्या प्रश्नाविषयी तुमचा संवेदी सूचकांक किती? यावर.
 या कसोटीवर प्राचार्य पवन खेबूडकर व चेतना विद्यालयाचे अद्वैत मला नेहमीच उजवं वाटत आलंय. एखादी संस्था 'घर' वाटणं वा एखादी शाळा 'व्यक्ती विकास केंद्र' वाटणं ही सहज होणारी गोष्ट नसते! संस्थेचे समूह बळ असलं तरी एका व्यक्तीच्या संपूर्ण समर्पणाशिवाय तुमच्या हाती समाज वा माणूस बदलाच्या खुणा येत नसतात. प्राचार्य पवन खेबूडकर हे मितभाषी गृहस्थ होतं. त्यांच्यात मी एक गंभीर, अप्रसिद्ध समर्पित कार्यकर्ता पाहात आलो आहे. 'मी' हा शब्द त्यांच्याकडून कधीच ऐकल्याचं आठवत नाही. मला समाजकार्यातली ती मोठी डिग्री वाटत आली आहे. पंचवीस वर्षांच्या सातत्यपूर्ण कार्यानं माणसात अहंकार येतो (माझ्यात पण तो आला होता म्हणे!). आत्मभानास अहंकारानं हरवण्याचा समाजात लपंडाव सुरू असताना पवन ज्या संयमानं आपलं जीवन कार्य तळहातावर घेऊन रोज एक एक खिंड लढवतो...ती नक्कीच अनुकरणीय गोष्ट आहे. त्याच्या मोठेपणाची एकच खुण मी सांगेन. त्याच्या शाळेस अनेक पुरस्कार मिळाले...त्याला मात्र एकही नाही...'मी' नाही 'आम्ही' असं असिधारा व्रत स्वीकारण्यातूनच हे येऊ शकतं! 'नित्य संयमी तो एक योगी' असं योग्याचं सांगितलेलं लक्षण. हाच तो एक लक्ष्मण पुरुष! आपपराची लक्ष्मणरेषा ओळखलेला...पाळणारा...सांभाळणारा त्याचा स्वत:चा बायोडाटा नाही, व्हिजिटींग कार्ड नाही...आहे ते शाळेचं माहितीपत्र नि कागदपत्रे! शाळेत सर्वत्र शिक्षणाच्या खुणा भरलेल्या...प्रत्येक मुलांना दिशा, प्रेरणा देणारा ...कार्यक्रम एकही नाही. 'नो प्रोग्राम...फंक्शन (कार्य) ओन्ली' असा दिनक्रम असलेली शाळा...पवन पगार घेत असला तरी त्याचं कार्य पगारी नाही...समस्त पगारी शिक्षकांनी शिकावं असं समर्पण चेतनाची मुलं नित्य स्मितहास्य करणारी, चैतन्यशील, स्वावलंबी. हे असतं पवनच्या कार्याचं प्रतिबिंब व प्रमाणपत्रही! कार्य हेच ध्येय असलेल्या माणसास पुरस्कार, सन्मानपत्राचं वैयर्थ चांगलं समजतं. प्राचार्य पवन खेबूडकर व चेतना मतिमंद विद्यालय म्हणजे व्यक्तीला लाभलेलं समाजभूषण.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

वेश्यांचं शल्य जपणारे : डॉ. गिरीश कुलकर्णी

 ज्यांनी तारुण्याची सळसळ आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत अनुभवली असेल, त्यांना त्या अल्लड, गाढव वयातील (गद्धे पंचविशी) धमाल कधी भूतकाळात नेऊन सुखावते, तर कधी एखाद्या हळव्या कोपऱ्याची सल आजही अस्वस्थ करायला भाग पाडते, असं आठवल्यावाचून राहणार नाही...ते वयच वेडे असतं. लाथ मारीन तिथं पाणी काढीन...याची टोपी उडव...त्याची फिरकी घे... 'डोक्यात आलं की, शिंगावर घेतलं' असा तो 'झट सोच, पट कर' असा काळ!अशा काळात एकदा एक तरुणांचं टोळकं ठरवतं...आज आपला वर्ग मित्र आहे ना त्याच्या घरी...वस्तीवर जायचं... जवानी का जोश अनुभवायचा...हा काळ १९८७-८८ चा...ती वस्ती असते अर्थातच वेश्यांची...गल्ली शोधत ते मित्राचं घर हडकून काढतात. आज आम्ही ऐश करायला आलोय म्हणून फर्मावतात...मित्र खजील...मित्र असतील कॉलेजमध्ये ...त्यांनी घरात, गल्लीत गिऱ्हाईक म्हणून यावं, असं त्यानं कधी कल्पिलेलं नव्हतं...काय करू काय नको...त्याला काहीच सुचेना...मित्र म्हणून स्वागत करायचं की, जिवावर उठलेले म्हणून हुसकावून लावायचं...तो फक्त इतकंच म्हणाला, 'मित्रांनो, तुम्ही आलात यात तुमचा काहीच दोष नाही...असेलच तर वयाचा...पण मी तुम्हास एकच सुचवेन...इथल्या प्रत्येक बाई-मुलीच्या जागी तुम्ही तुमची आई-बहीण पाहा.' पुढे तो बोलू शकला नाही आणि अंधाराच्या गल्लीत चालता झाला...त्या मित्रात गिरीश कुलकर्णी होता...त्याचा अपवाद वगळता अन्य मित्रांनी त्या संवादानंतरही कोठीवाली शोधलीच...गिरीशला त्यानं, त्या वाक्यानं जे अस्वस्थ केलं...ती अश्वत्थाम्याची जखम घेऊन गिरीश आज २२ वर्षं उलटली तरी अहमदनगरच्या चित्रा, भगत, नांगरे, ममते इ. गल्लीतील वेश्या वस्तीतील...तिथल्या आई, बहिणी...त्यांची मुलं....साऱ्यांच जीवन उन्नत व्हावं म्हणून पायाला चाकं लावून सारं नगर डोक्यावर घेता एका ध्यासपर्वाने उसासे सोडतोय...वेश्या अन् त्यांची मुलं...त्यांना 'माणूस' म्हणून जगता यावं...जीवन काळ वाढावा...कलंकरहित सर्वसामान्यांचं प्रतिष्ठित जीवन सारं भाग्योदय बनावं म्हणून!
 एका मित्राच्या जिव्हारी संवादाची अव्यवहारी वाट चालत गिरीश कुलकर्णी यांनी अहमदनगरमध्ये वेश्या वस्तीतील मुला-मुलींसाठी वसतिगृह चालवत आज स्नेहज्योत, स्पृहाकेंद्र, चाइल्ड लाईन, स्नेहांकुर, दत्तकविधान इ. केंद्र मैत्रेय फाऊंडेशन, सेंटर फॉर होप, स्नेहालय संकुल, विद्यार्थी साहाय्य समिती, बालभवन, सक्रिय युवा केंद्र आणि परवा परवा सुरू झालेलं नगर रेडिओ हे एफ.एम.चॅनल ...सर्वांचा ध्यास एकच...ज्यांना समाजाने नाकारलं, ठोकरलं, फसवलं, हेटाळलं, नासवलं त्यांच्या उसवलेल्या आयुष्य जोडणीत एक सहानुभूतीचा मदतीचा टाका घालायचा...हे सर्व करत गिरीश कुलकर्णी कुठेच असत नाहीत...
  या सर्व संस्थांचं जाळं गिरीशनी पोटापाण्याचा उद्योग म्हणून सुरू केलं नाही. पोटापाण्यासाठी तो एम.ए.एम.फिल., पीएच.डी. आहे. नगरच्या सारडा महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचा प्रमुख असलेला प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी सर्व भारतात फक्त 'गिरीश कुलकर्णी' म्हणूनच ओळखला जातो, ही त्याच्या मोठेपणाची लहान खूण. तो निगर्वी कार्यकर्ता. सर्वांना घेऊन जाण्याचे विलक्षण कौशल्य. काम करताना आव नाही की आवेश नाही. 'मी तो भारवाही हमाल'...अशी निरिच्छ विनम्रता...हे येतं प्रश्नाला भिडण्यातून. तुम्हाला एकदा का जीवन जगणं कळालं की, मग तुम्हीच तुमचे गायक होता...सूर तुमचा फेर धरू लागतात...मग तुमची साधी गुणगुणही जीवन गाणं होत राहते...यासाठी माणसास घर, काळ, वेळ सारी वेळापत्रकं रद्द करून कामाच्या गारुडामागं धावावं वाटतं...तुम्ही धावत राहता...'मै चलता चला...काँरवां बनता गया...' मागं फिरून पाहताना खरंच वाटत नाही की, हे आपण केलं असं वाटावं इतका कामाचा मोठा डोंगर 'स्नेहालय'च्या माध्यमातून गिरीश कुलकर्णी यांनी उभारला नि तोही कार्याच्या रौप्य महोत्सवापूर्वी...हे केवळ ध्यास नि समर्पणातूनच शक्य होतं!
 स्नेहालयाच्या अनोख्या मानवसेवेची प्रत्यक्ष सुरुवातही अशी अवचितच झाली. १९९२ साली अहमदनगरच्या एम.आय.डी.सी.मधील स्नेहालयाच्या जागेत संस्थेच्या पहिल्या वास्तूचे बांधकाम सुरू होतं. मंगल नावाची महिला देहविक्रयाचा धंदा करायची. अशा व्यवसायातल्या बायकांना प्रचंड वैफल्यानं ग्रासलेलं असतं. त्यातूनच त्या व्यसनांना जवळ करतात. अगोदरच पाशवी वासनांमुळे हेळसांडलेल्या देहाला अनेक रोग पोखरू लागतात. या मंगलला दारू-गुटख्याचं व्यसन होतं. त्यातच ती एच.आय.व्ही.ग्रस्त असल्याचे निष्पन्न झालं आणि वैफल्यग्रस्त, निराश अवस्थेतच तिला मूलही झालं. तेही एच.आय.व्ही.बाधितच निपजलं. सागर नाव ठेवलं होतं त्याचं त्याच्या मावशीनं! दारूच्या नशेत ती आई इवल्या मुलाला मारू लागली. कुपोषण आणि त्वचा विकारांनी ग्रासलेल्या त्या छोट्याला तो मार असह्य झाला. आई तर इतकी हिंसक झालेली की, तिने दगडच उचलला त्याला मारायला. मग मात्र इतर बायकांना बघवले नाही. दोघी-तिघींनी सारी शक्ती एकवटून मंगलला पकडलं आणि दोघींनी सागरचा ताबा घेतला. सागर एव्हाना बेशुद्ध होऊन निपचित पडला होता. वेळ रात्रीची दीडची! सागरला घेऊन या बायका अशा वेळी कुठे जाणार होत्या? त्यांना एकच आधार 'गिरीश भाऊ'. ते अर्धमेलं पोर त्यांनी भाऊंच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवलं. आपण किती मोठं आव्हान पेलायला चाललोय, याची जाणीव गिरीशला झाली. तेव्हा तर अशा मुलांच्या संगोपनासाठी कोणत्या सुविधादेखील तिथं नव्हत्या; पण जो विश्वास, जी आशा आणि ज्या आधाराची अपेक्षा डोळ्यांत घेऊन या साऱ्याजणी आल्या होत्या त्यांचं काय कारण हे पटकन सुचेना. ही अवस्था पाहून एकजण म्हणाली, "चला ग बायांनो, मरू द्या ते पोरगं..." आणि मग निर्धार पक्का झाला. २०-२१ वर्षे वयाच्या गिरीशने ते जखमांनी, त्वचारोगानं भरलेलं अर्धमेलं मूल हातात घेतलं. चपला पायात सरकवल्या आणि थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठलं. उपचार सुरू झाले. तो वाचणार, असं डॉक्टरनं सांगितलं आणि त्या बायकांच्या डोक्यातील गिरीशबद्दलच्या विश्वासाचा, श्रद्धेचा भाव गिरीशच्या मनात कामाची उमेद वाढवून गेला.
 नगर एम.आय.डी.सी. च्या जागेत तेव्हा भूकंपविरोधक इमारतीचे बांधकाम सुरू केलं होतं. घुमटाकार छपराची ती इमारत अर्धवट अवस्थेतच होती. इस्पितळातून सागरला घेऊन बाहेर पडल्यानंतर सागरला थेट तेथेच आणलं. तिथे त्याची देखभाल होईल अशी सोय केली. बालसंगोपनाच्या संस्थेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच त्या इमारतीचे उद्घाटन झालं होतं. एड्सबाधित बालकांच्या संगोपनाचा प्रकल्प असा सुरू झाला. सरकारी मदतीशिवाय केवळ सामाजिक सहयोगातून सुरू असलेल्या भारतातील या पहिल्या निराधार एच.आय.व्ही. ग्रस्त बालकांसाठीच्या निवासी पुनर्वसन केंद्रात आज शेकडो मुले आपल्या उरलेल्या आयुष्यातील आनंदाचे कण कण साठवून घेताहेत. गिरीश कुलकर्णी म्हणतात, "त्यांना आयुष्य देणं आपल्या हातात नाही; पण त्यांना माणसासारखं मरण तरी मिळवून द्यायला हवं. आजही संस्थेत पाऊल ठेवलं की, ही मुलं आनंदानं गिरीशच्या अंगाखांद्यावर नाचत असतात. हे ज्यांनी पाहिलं त्यांना गिरीशच्या नसानसांत भरलेलं संवेदनेचं वारू लक्षात आल्यावाचून राहात नाही.
 स्नेहांकुर नावाने सुरू केलेल्या अनाथ मुलांच्या पुनर्वसन केंद्रातही हीच गत आहे. पोरं इथे खरंच 'अनाथ' वाटतच नाहीत. मागच्याच आठवड्यात त्यातील दोन पोरांना, त्यांच्या बायांना घेऊन, पुण्यातील नामवंत डॉक्टरांना दाखविण्यासाठी गिरीश कुलकर्णी स्वतः येऊन गेले. येथील तज्ज्ञांचे मत घेतल्यावर, सर्टिफिकेट घेतल्यावरच निर्धास्तपणे ते मूल वाढवणे आणि योग्य त्या दत्तक-पालकांच्या हाती सोपवणे जास्त महत्त्वाचे. इतकी काळजी अजूनही ते स्वतः घेतात. या कार्यात त्यांची पत्नी प्राजक्तासुद्धा तेवढ्याच ताकदीने उभी आहे. त्या दोघांचं स्वत:चं बाळ- त्याची मुलगी स्नेहांकुरमध्ये रमते, खेळते, लाड करून घेत असते.
 कुठलेही रचनात्मक काम संघर्षाची जोड दिल्याशिवाय टिकत नाही. तसेच ते व्यापक सामाजिक प्रभाव पाडू शकत नाही. स्नेहालयाने रचनेला संघर्षाची जोड आरंभापासूनच दिली आहे. वर्ष २००६ मध्ये नगरमध्ये उघडकीस आलेले व राज्यभर गाजलेल्या अल्पवयीन मुलींच्या वासनाकांड प्रकरणाचा निकाल २० सप्टेंबर २०१० रोजी लागला. अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नगर, धुळे व जळगाव जिल्ह्यातील राजकारणी, पोलीस, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक अशा नामवंतांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलींच्या वासनाकांडाचे हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, अनिल गावडे, चाईल्ड लाईनचे मिलिंद कुलकर्णी, हनिफ शेख, अंबादास चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याची दखल सर्व वृत्तपत्रांनीही घेतली. कुठल्याही पक्षाच्या दबावाला बळी न पडता, न्यायासाठी नेटाने लढणाऱ्या या व्यक्तीला व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कार्य करतच राहणाऱ्या त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना मनापासून प्रणाम आणि खूप खूप सदिच्छा देऊ यात. वाळू तस्करी प्रकरणात तर एक वेळ अशी आली, अत्याचारित आई आणि मुलीनेच गिरीशला सांगावा धाडला, भाऊ आमच्यापायी नका अडचणीत येऊ, आमच्यापेक्षा तुमची गरज इथे जास्त आहे, सांभाळून राहा!  गिरीश कुलकर्णी यांचं वेश्या पुनर्वसन, एच.आय.व्ही.बाधित बालकांचे संगोपन, अनौरस बालकांचे दत्तकविधानाद्वारे समाजीकरण अशी बहुविध कामं म्हणजे एका सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीचे अष्टदिशी उपाय होत. वेश्यांना एड्स होऊ नये म्हणून निरोधचा प्रचार करणं, वेश्या वस्तीतून त्यांची मुलं बाहेर काढणं, ज्यांना बाहेर काढणं शक्य नसतं त्यांना तिथंच पर्यायी सेवा पुरवणं..."तुम्ही हरू नका... आम्ही आहोत" म्हणत हिंमतनगर उभारणं या साच्यासाठी मुळात तुमच्या मनात एक स्वप्न असावं लागतं नि ते सत्यात उतरवण्याची रात्रंदिवस तळमळ असावी लागते...मग समाज तुमचा पाठीराखा होतो. गिरीशनी हे कामं सुरू केलं तेव्हा लोक पैसे द्यायचे; पण संस्थेचे सभासद नाही व्हायचे...परिणामी त्यांची संस्था पोरापोरांची होऊन गेली. कामं गंभीर होत राहायचं, पण कुणी गांभीर्यानं घ्यायचं नाही. मग गिरीशच्या हाकेला ओ देत हिरवे बाजारचे पोपटराव पोवार आले, राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे आले. सिनेनट सदाशिव अमरापूरकर...आणि परवा 'सत्यमेव जयते'तून आमीर खानही. मग त्यांच्या धडपडीला बळ आलं. पुढे त्याच्या कामातून उभारलेल्या पुनर्वसित वेश्यांनी अनेक सामाजिक कामांना बळ दिलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शनि शिंगणापूरला महिलांना प्रवेश द्यावा म्हणून जे आंदोलन केलं त्यात स्नेहालयाच्या भगिनी सहभागी झाल्या होत्या.
 गिरीशला हे कार्य करताना जे यश लाभलं त्याचं एक रहस्य आहे. तो मनात आणलं की कृतीत उतरवतो. 'आजचे आत्ताच' या तत्त्वामुळे तो कामाचा डोंगर उभारू शकला. आजवर त्यानं ३००० वेश्यांच्या मुला-मुलींना सन्मान्य नागरिक बनवलं, याचा नुसता ताळेबंद घेतला तरी आपल्या लक्षात येईल की, अर्जुनाच्या केवळ माश्याच्या डोळ्यांच्या वेधाच्या एकाग्रतेमुळेच अशक्य ते शक्य झाले होते.
 जे काम केलं त्याचं समाधान जरी गिरीश कुलकर्णीना असलं तरी या कामातील उणिवा, त्रुटींनी तो सतत अस्वस्थ असतो. भारत सरकार काय नि महाराष्ट्र काय...एड्सबाधितांच्या संगोपन, पुनर्वसनासाठी साहाय्य करतं...एड्समुक्त एड्स निगेटिव्हसाठी काही करत नाही...रोगग्रस्तांना साहाय्य, रोगमुक्तांना विजनवास हे गिरीशचं शल्य एका सामाजिक कार्यकर्त्यांची अस्वस्थता आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अपघातग्रस्तांना मदत देण्यात शासन धन्यता मानते...अपघात होऊ नये यावर नाही पैसा खर्च करत...नवा निरोगी समाज बनायचा, तर प्रतिबंधात्मक समाज कार्याची वीण विस्तारायला हवी असं त्याला वाटतं.  या कामात गिरीश कुलकर्णी यांना अशा लोकांनी साहाय्य केलं...जे समाजाच्या लेखी नगण्य...फसवे होते. मी तुम्हाला सांगतो रेड्यामुखी वेद गाण्याचे सामर्थ्य जे ज्ञानेश्वर दाखवतात ते असतात पट्टीचे समाज परिवर्तक...गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालयच्या माध्यमातून जी सेवा क्षितिज उभारली ती म्हणजे उपेक्षितांच्या वेदनांचे आर्त स्वर ऐकल्याने निर्माण झालेल्या विराण्या होत. मात्र ते ऐकायला तुमचे कान तानसेनाचेच हवेत.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

वृद्ध सेवक : शिवाजी पाटोळे

 तुमच्या वाट्यास उपेक्षित बाल्य आलं तर नंतर येणाच्या तारुण्याच्या जोरावर तुम्ही आपलं भविष्य उज्ज्वल करू शकता; पण जर का तुमच्या वाट्यास उपेक्षित वृद्धत्व आलं, तर मात्र वाहतं प्रेत म्हणून जगण्याची नामुष्की येते. म्हणून बाबा आमटेंनी वृद्धत्वास 'रेफ्रिजरेटर' म्हटलं होतं. नको असलेल्या वस्तूंना मृतप्राय जगवण्याचं साधन! वृद्धाश्रमात गेलं की, हे मला आठवत राहतं. १९९० च्या दरम्यान मी 'स्त्री आधारगृह' चालवायचो. तेव्हा अनेक वृद्ध स्त्रिया यायच्या. मी लहानपणी पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात होतो, तिथं रेस्क्यू होम होतं. त्यात ही परित्यक्ता, वृद्ध, वेड्या, मुक्या, सगळ्या स्त्रिया ओसरीवर पापड वाळत घातल्याप्रमाणे आपलं जगणं वातड करत पिचत पडलेल्या असायच्या. वेळ काढणं काय असतं, हे मी माझ्या मानलेल्या आईस तिच्या वृद्धावस्थेत घरी आणल्यावर पाहिलं आहे. तिचा छंद होता, वाण्याच्या दुकानातून आणलेल्या सामानाच्या दोऱ्याचा गुंता सोडवत बसण्याचा. आयुष्यात तुम्हाला पर्याय नाही देता आले की, एकतर तुम्हाला वेडं व्हावं लागतं, नाही तर अडगळ, जळमट म्हणून जगावं लागतं! असं जीवन ज्यांच्या वाट्यास येतं त्यांचं वेदनामय वर्तमान पदरात घ्यायचं अन् त्यांना आश्वासक भविष्य द्यायचं काम करणारा माझा बालमित्र शिवाजी पाटोळे आपल्या आई, बायको, मुलं, जावई, नातवंडांसह समाजाच्या कृतघ्नपणास अत्यंत कष्टाने, कृतज्ञता भावाने माणसाळतो आहे.
 शिवाजीचा 'मातोश्री वृद्धाश्रम' सुरू झाल्याचा प्रसंग मला आठवतो. कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात संस्थांमागून संस्था स्थापन करायचा आमचा सपाटा चालू असताना एक दिवस शिवाजी संकुलात आला नि "आपणही 'निराधार वृद्धाश्रम व अनाथ बाल शिक्षण संकुल' सुरू करतोय... तुमच्याकडे प्रवेश देऊ न शकणा-यांना माझ्याकडे पाठवा...मी सांभाळीन" म्हणून सांगून गेला. त्यानंतर काही दिवसातच आमच्याकडे एका उच्च अधिकाऱ्याने वय वर्षे ९६ असणारे आपले वडील सांभाळणार का, म्हणून विचारणा केली...मी शिवाजीकडे त्यांना दिलं अन् त्याचं काम सुरू झालं. ही १९९५ ची गोष्ट. अवघ्या दोन शेडवजा खोल्या. एका खोलीत त्या अधिकाऱ्याचे वृद्ध स्वातंत्र्यसैनिक असलेले वडील भागवत राहायचे...मी पाठवलेले...शेजारच्या खोलीत त्या शिवाजी सहकुटुंब राहून आपली दीड-दोन एकर शेती त्यांची सेवा सुश्रूषा करायचा. हा लेख लिहायचा म्हणून शिवाजीला भेटण्यास गेलो...त्या दीड दोन एकरांत आता पाय ठेवायला जागा नाही. वृद्ध निवास, भोजनालय, हॉस्पिटल, जिम्नॅशियम, ग्रंथालय, ध्यान मंदिर, अशा टोलेजंग इमारती...१३० वृद्ध आजी-आजोबांचं अन् शिवाजीच्या १७ जणांचं कुटुंब मिळून सुमारे 'दीडशे माणसांचं घर...'
 घर असल्यानं एकही नोकर नाही...आख्खं पाटोळे कुटुंब या साऱ्यांच सारं करतं...सारं म्हणजे सारं...शी-शू बिछाना बदलणं, धुणं, आंघोळ, मसाज, कपडे बदलणं, धुणं, उपचार, औषध, जेवण, गप्पा, हवं नको पाहणं...हे सारं मोफत...
 शिवाजी मागणारा गृहस्थ नाही...तो कष्टाचा पक्का...कठोर सेवाव्रती...मी सकाळी नऊला भेटायला गेलो, तर हा तीन मजली इमारत झाडत घामाघूम झालेला. सकाळी पाच ग्लास पाणी पिऊन याचा दिनक्रम सुरू होतो. मग सात वाजता सर्वांबरोबर (म्हणजे सर्व वृद्धांना देऊन) चहा, आठ वाजता नाश्ता, अकरा वाजता गरम, गरम ताजं सकस जेवण, सायंकाळी चारला चहा. परत रात्री आठला जेवण... सणवार असतातच. शिवाय फिरायची मुभा. आपला जीव गुंतलेली माणसं वजा जाता सारं आलबेल.
 शिवाजी सांगत होता...घरोघरी शिक्षण आलं...शिक्षणामागून पैसा आला. पैशानं माणसास अप्पलपोटी बनवलं...शिवाय माणसाला काम न करायचा कॅन्सर झाला...घरोघरी वृद्ध आजारी का? तर त्यांना पोटालाच घातलं जात नाही...का? तर शी-शू काढावी लागते. आपण हे लक्षात घ्यायला हवं की, म्हातारपण हे फिरून आलेलं बालपण असतं...दात नाही, कान नाही, डोळे नाही, ताकद नाही...मुलासारखं पराधीन...आई-वडील म्हातारे झाले की ते 'मूल' होतात...आपण त्यांचे पालक व्हायला लागतं...त्यांची खरी भूक सोबत, बोलणं, प्रेम, सहवासाची असते...नेमकं त्या वेळी माणसं त्यांना अडगळीची खोली, टी.व्ही. वर्तमानपत्र देतात नि नामानिराळे होतात.
 शिवाजीला वृद्धांचं असं करावंसं का वाटलं, यालाही एक पार्श्वभूमी आहे. शिवाजीचे आजी-आजोबा मुंबईचे गिरणी कामगार. आई-वडील गवंडी काम करायचे. शिवाजी पाच महिन्यांचा असताना वडिलांचं अपघाती निधन झालं. ते मल्ल, लाठी-काठी चालवायचे. तेव्हा शाहू महाराजांच्या आश्रयाने तालमी फुलत होत्या. वडील तुकाराम पाटोळे समाज कार्यकर्ते. यांनी स्वश्रमातून पाचगाव, नंगीवलीसारख्या तालमी बांधल्या आणि लोकार्पण केल्या. त्यांच्या अकाली निधनानंतर सहा मुलांचं कुटुंब घेऊन जगणं विधवा आईला शक्य नव्हतं. आधाराला नवऱ्याला डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाची ४०० रुपयांची पेन्शन व पाच एकर नापीक जमीन होती. गिरणीचं पडलेलं पीठ गोळा करून माउलीनं मुलं जगवली. गोळा केलेल्या पिठातून सातवी भाकरी केली. तर माउलीला घासभर खायला मिळायचं. कधी कधी समोरच्या आमच्या रिमांड होममध्ये उरलेल्या भाकरीचा काला (चिवडा) खायला मिळाला की, ही पोरं ढेकर द्यायची.
 रिमांड होमची मुलं, समोरच्या रेसकोर्सच्या शेतातले कैदी आणि पलीकडेच आर्य समाजाच्या वसतिगृहातले हरिजन विद्यार्थी या साऱ्यात शिवाजीचं बालपण तारुण्य फुलत होतं. डी.टी. मालक (अपराध), भालजी पेंढारकर यांसारखी मंडळी या सर्व अनाथ, निराधारांचं काहीबाही करत असलेलं शिवाजी पाहत असे. आपण असं काही करावं, असं वाटत असताना तो पेठेतल्या टोळक्यात कधी सामील झाला ते त्याचं त्यालाच समजलं नाही.

प्रॅक्टिस क्लबच्या फुटबॉल टीममधून तो खेळत कुस्तीत कमावेली रग जिरवत होता. पण ती जिरत नव्हती. मग पेठेतल्या मारामारीत तो पुढे असायचा. त्याच्या नावातच 'शिवाजी' असल्यानं त्यानं तलवारीनं कुणाला कंठस्नान जरी घातलं नसलं तरी अनेकांना जायबंद केलं होतं...मग तो एकदा जेरबंदही झाला अन् त्याचं आयुष्य बदललं...आपण लहानपणी जे व्हायचं नाही म्हणायचो, तेच झाल्याच्या पश्चात्तापानं त्याला वाल्मीकी करून टाकलं...तो एकदम अहिंसक, सत्शील, सभ्य झाला नि गुजराती हायस्कूलमध्ये शिपाई होऊन समाजाचा सरसेनापती व्हायचं स्वप्न पाहू लागला. आज ते स्वप्न एक समाज वास्तव बनून तुमच्या पुढे आहे.
 हा दिवस आपोआप आला नाही. शिवाजीनं त्यासाठी भरपूर खस्ता, टक्के-टोणपे खाल्ले. त्याचा मी साक्षीदार आहे. काही काळ शिवाजी आहार हॉटेलच्या मोरी कामावर होता. हॉटेलची मोरी असतो नरक...तुम्ही पाहिली नसेल तर भाग्यवान...हॉटेलचं सारं उष्टं धुवायचं ठिकाण...मोरीवर कप, बशा, प्लेटी, चमचे धुवायचं काम करणाऱ्या माणसास आठ तास पाण्यातच राहावं लागतं...हात पाय पाण्यानं अक्षरशः कुजतात...पांढरे होतात...चरबीसारखे...फटक नि गिळगिळीत...मोरीतून बाहेर आलं की तेव्हा पाच-सात रुपये हाती यायचे.
 आपल्या वाट्याला आलेला भोग इतरांच्या वाट्याला येऊ नये, असं एक दिवस त्याला वाटलं नि तो संत पदास पोहोचला. आपली पाच कोटी रुपयांची दोन एकर जमीन त्यानं वृद्धाश्रमास अर्पण केली... त्यावर एक दोन कोटीच्या चार पाच टोलेजंग इमारती त्यानं स्वत: प्लॅन, इस्टिमेट व एक्झिक्युशन करून उभारल्या. गवंड्याचा पोर असल्यानं त्याच्या इमारतीस आर्किटेक्ट नाही की इंजिनियर...समाज आश्रमात येणारे वृद्ध, त्यांचे नातेवाईक शिवाजीला मदत करतात...शिवाजी रोज एक वीट चढवत राहतो. आज दीडशे वृद्धांची सोय...उद्या ती तीनशे होणार...हा नुसता पसारा नाही. त्याला सेवेचं, कष्टाचं, समर्पणाचं अधिष्ठान आहे. शिवाजीची परीक्षा म्हणून मध्ये मी वृद्ध पाठवले...एक पै न घेता तो त्यांचा सांभाळ करतो.
 आता शिवाजी वृद्धांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यापलीकडे डे केअर सेंटर, विरंगुळा, टिफिन सर्व्हिस, ऑन कॉल केअर अशा जपानच्या धर्तीवरील संस्थाबाह्य सेवा देण्याची उमेद बाळगून आहे. हाताला काम देणारं बेसिक एज्युकेशन द्यायचा त्याचा विचार आहे. अवघा एस.एस.सी. झालेला शिवाजी दिसायला, वागायला, बोलायला वेंधळा, साधा दिसला तरी त्याचे विचार, आचार अनावर खरे...तुम्ही 'अहो' म्हणा. तो 'काहो' म्हणून प्रतिसाद देईल...'अरे' म्हणाल तर 'कारे' ची त्यांची तयारी असते...पण आताशा साठीकडे झुकलेला...स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेला शिवाजी हा रुग्ण सेवेतला...विशेषतः ज्येष्ठांच्या जीवनाचा अघोषित डॉक्टर झालाय...बेडसोअर, कफ, झोप, भूक इ. वृद्धांच्या साऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकारांवर त्याच्याकडे प्रत्येकास लागू पडेल असे उतारे आहेत म्हणून शिवाजीकडे गलितगात्र होऊन आलेला वृद्ध काठी न घेता ताठ होतो. वृद्धांचा वाकलेला कणा सरळ करणारा शिवाजी आता समाजाचाच कणा झाला.
 वृद्धाश्रम हे काही समाजभूषण नव्हे. एकविसाव्या शतकाचं प्रथम दशक सरत असताना लक्षात येतं की, समाजात सध्या वृद्धांची फौज ज्येष्ठ नागरिक संघामार्फत आपलं उत्तरायुष्य आनंदी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यासही आत्मकेंद्रित्वाची झालर आहे. सेवानिवृत्तांना समाजप्रवृत्त करायचं आव्हान वानप्रस्थांपुढे आहे. 'आपल्या प्रपंचाची कोंडी फोडून जो समाज प्रपंच आपला करतो तो वानप्रस्थ,' असं बाबा आमटे म्हणत. त्या दृष्टीनं ते 'उत्तरायण' चालवायचे. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूरसारख्या देशांनी वृद्धांचे स्वर्ग निर्माण केलेत. तिथला वृद्ध गलितगात्र नाही; कारण तो 'राष्ट्रीय संपत्ती' (नॅशनल ऍसेट) म्हणून सांभाळला जातो. त्याचं शहाणपण, अनुभव राष्ट्र प्रगतीसाठी वापरले जाते. आपल्याकडे वानप्रस्थ एक समृद्ध अडगळ म्हणून वळचणीत ठेवण्याची समाज व शासनाची जी वृत्ती आहे, त्याचं फलित वृद्धाश्रम होतं, असं जेव्हा शिवाजी पाटोळेना वाटते तेव्हा ती विचार करायची गोष्ट आहे, हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. समाजाची एक खिंड मी लढवीन, असा शिवाजीच्या आचरणातील आश्वासक, कृतिसंकल्प आपण पाहाल तेव्हा आपल्या निष्क्रिय जगण्याची, आत्मकेंद्री आयुष्याची शरम वाटल्याशिवाय राहत नाही.
 आपल्याला मुलांनी वृद्धाश्रमात टाकू नये, असं ज्यांना वाटतं त्यांनी गाडी आयुष्याच्या चढावर असताना स्लो मोशन चालवायचं कसब शिकायला हवं, तरच उतारही सुलभ होतो, हे शिवाजीचं सांगणं बरंच काही शिकवतं.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

बाल्य जपणारी फुलनदेवी : अनुराधा भोसले

 अनुराधा भोसले. वय वर्ष चाळीस. पूर्वी चाळिशी आली की, माणसाची दृष्टी अधू व्हायची अन् त्याला चाळिशी लागायची...चश्मा लागायचा; पण अनुराधाला चाळिशीत दूरदृष्टी लाभली ती सोशल शॉक्समुळे. पदरात कादंबरी व ग्रंथसारखी गोंडस मुलं असताना प्रेमविवाह केलेल्या नव-याला आपण 'नकोशी वाटणं' हे तिच्या लेखी न उमजणारं कोडं होतं. एक स्त्री म्हणून तिनं जे जगणं स्वीकारलं होतं ते स्वत:च्या...स्वार्थाच्या पलीकडचं विशाल जग होतं. ज्याचं कुणीच नाही त्यांचं कोणीतरी व्हायचं...आपण हरिजन कुटुंबात जन्मलो...वाढलो. ख्रिश्चन मिशनरी जीवनात आले नसते, तर माणूस जिणं आपणास लाभलं नसतं या विचारानं अनुराधानं माणूसपणाचं काम करायचं ठरवलं अन् ती एम.एस.डब्ल्यू. झाली. अनेक नोक-या केल्या. जळगाव जिल्हा परिषद, औरंगाबाद मिशन, बजाज ऑटो करत ती अरुण चव्हाणांच्या सांगलीच्या वेरळा विकास संस्थेत आली. तिथून तिनं अन्न, वस्त्र, निवाराचा हक्क मिळविणारी 'अवनी' गाठली. या साऱ्या प्रवासात ती सामाजिक काम करायची; पण ती नोकरी होती. पाट्याच टाकायचं काम करायची; त्यामुळे तिनं कुठलंही काम केलं तरी त्याला 'अनुराधा टच' असायचा... चाळिशीपर्यंचा हा तिचा प्रवास प्रवाहाबरोबर पोहणं होतं...तिचा घटस्फोट, तिला घरातून बाहेर काढणं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं यानं ती हैराण झाली. त्या दिवसात ग्रंथ झाला होता. तो अंगावर पीत होता नि या शॉकनं तिचं दूधच गेलं...ती सैरभैर झाली...काही सुचेना नि एक दिवस माझ्याकडे उतारा घ्यायला आली...मी तिच्या नवऱ्याला समजावलं; पण तो पुरुष होता...चाळिशीत त्याचा दुसरा वसंत ऐन फुलोऱ्यात होता...कळत होतं; पण वळत नव्हतं...एक दिवशी मी हात टेकले नि कादंबरीची क्षमा मागितली..."बेटा...मी आईबाबांना एकत्र नाही करू शकलो... मला क्षमा कर!" त्या क्षमेनं अनुराधाला समाजसेवक बनवलं. आजवर ती कर्मचारी होती...आता ती कार्यकर्ती झाली. सोशल शॉकनं झालेला तो एक कायाकल्प होता.
 तिची माझी ओळख १९९६-९७ च्या दरम्यानची. लोकसभा निवडणूक जाहीर झाली होती. ती आपल्या अवनी संस्थेतर्फे मतदार जागृतीचं काम करायची. त्यासाठी तिने एक पथनाट्य करायचं ठरवलं होतं. 'मतदार राजा जागा हो' आमच्या महावीर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग होता. त्याचं तिला साहाय्य हवं होतं. या पथनाट्यासाठी तिने जी मुलं निवडली होती ती माझ्या हिंदी विषयाची. नियमित येणारे माझे विद्यार्थी अनियमित होऊ लागले. शोध घेता लक्षात आलं की, ती या पथनाट्यात आहेत. अनुराधामुळे माझी मुलं बिघडली म्हणून मी तिच्याकडे तक्रार केली तशी ती म्हटली, "सर, मी तुमचंच काम करतेय. तुम्ही म्हणाल तर बंद करते. मुलं शिकतील; पण समाज अडाणीच राहील." तिच्या या बिनतोड युक्तिवादापुढे मी काय बोलणार होतो? मी मौन संमती देऊन रिकामा झालो.
 पुढे ती आमच्या अनेक कार्यात ती दिसू लागली... भाग घेऊ लागली. मोलकरीण संघटना, बालमजूरविरोधी चळवळ, नरेंद्र महाराजविरोधी आंदोलन, महायज्ञ विरोध, शिक्षण हक्क परिषद सर्वांत तिचा हिरिरीनं सहभाग व पुढाकार असायचा. ती कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीतली फुलनदेवीच झाली होती. मोर्चात घोषणा देणं, मोर्चात लोक जमवणं, बालमजूरविरोधी धाडी घालणं अशा धडाडीच्या कामात ती पदर खोचून उभी असायची. अशी ही आमची आधुनिक रणरागिणी ताराराणी अचानक गप्प, भूमिगत झाल्यानं आम्ही सर्व कार्यकर्ते अस्वस्थ होतो...चौकशी करता समजलं की नवऱ्यानं तिला बाहेर काढलंय आणि ती ग्रंथ आणि कादंबरी या आपल्या दोन लेकरांसह स्वत:च्याच हक्कासाठी संघर्ष करतेय...आणि म्हणून गायब! आम्ही सर्व जण तिच्या पाठीशी राहिलो तरी तीच तिच्या पायावर उभी राहिली आणि उभी आहे.
 तिची उमेद व उभारी समजून घेताना लक्षात आलं... ती मूळची हरेगावची. हे गाव श्रीरामपूर तालुक्यातलं. तिचं कुटुंब मागासवर्गीय. आजोबा मोलमजुरी करून पोट भरायचे. महार असले तरी ढोरकाम करायचे. ते ख्रिश्चन मिशनरींच्या संपर्कात आले. त्यांनी धर्मांतर केलं. ख्रिश्चन झाले तसे 'माणूस' झाले, असं त्यांचं सांगणं असायचं. अनुराधाचे वडील बाबूराव नबाजी अमोलिक, आई अण्णाबाई. अनुराधाचा जन्म १९७२ चा. हरेगावलाच तिचं प्राथमिक शिक्षण झालं. इ. ५ वी पासून ती मिशनच्या वसतिगृहात राहून शिकली. मिशनच्या साहाय्यामुळे ती कॉलेज व उच्च शिक्षण घेऊ शकली. मुंबईच्या निर्मल निकेतनमधून एम.एस.डब्ल्यू. झाली. जळगावच्या जिल्हा परिषदेच्या जलसंधारण योजनेत सल्लागार म्हणून काम करू लागली. जनसंघटन, जनसहभाग व जनविकास ही त्या कामाची त्रिसूत्री होती. ती तिला भावली. ती त्रिसूत्रीच तिच्या आयुष्याची शिदोरी ठरली. ती तिथं रुळली; पण जळगावात झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे आई-वडील अस्वस्थ झाले. आपल्या तरण्याताठ्या मुलीला त्यांनी नोकरी सोडायला लावली ती काळजीनं. अनुराधाला ते अमान्य होतं; पण ती आज्ञाधारक. मग मिशनच्याच मदतीनं ती औरंगाबादला गेली. तिथं मिशनचा वडार समाजोत्थान प्रकल्प होता. तिथं ती काम करू लागली. तिथं तिची भेट दीपक भोसले नावाच्या तरुण प्राध्यापकाशी झाली. ती त्याच्या प्रेमात पडली ते समानशील समाज कार्यकर्ता म्हणून. ही महार, तो चांभार, सासरी जाच. ही खालच्या जातीची म्हणून; पण तरी ती सहन करत राहिली. कादंबरी जन्मली. पुढे ग्रंथ झाला. ग्रंथला घेऊन ती घरी आली. तर नवऱ्याच्या वागण्यात आणखीच बदल दिसला...एक दिवस तर घर आवरताना तिच्या हाती प्रेमपत्रं आली तशी ती कोसळली ...जाब विचारला तर मारहाण ठरलेली...आणि एक दिवस तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. भारतीय समाज हा सत्चरित्र उपासक. इथं कुणाला उद्ध्वस्त करायचं, तर चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे...की काम फत्ते! अनुराधानं ठरवलं ...आपण समाज हक्काची लढाई करतो...व्यक्ती हक्काची का नाही? पोलीस ठाणे, कोर्टकचेऱ्या करून तिनं पोटगीसह घटस्फोट मिळविला व ती स्वतंत्र...स्वावलंबी झाली. तिनं मनात आणलं असतं तर सासरला जेरीला आणू शकली असती; पण तिनं एका क्षणी ठरवलं हक्क मिळवायचा; पण कुणाचं जीवन उद्ध्वस्त नाही करायचं. नवऱ्याच माप त्याच्या खिशात घालून ती मोकळी झाली.
 तिनं 'अवनी' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपलं घर वसवलं. आज तिथं तिच्या घरात ३५ मुलं-मुली आहेत. ते सर्व कधी काळी बालमजूर होते. कोण वीटभट्टीवर काम करायचा, कोण सेंट्रींगची काम करायची. नंदीवाले, डवरी, गोसावी, जोशी, मदारी अशा भटक्या कुटुंबातील बालमजूर मुलांना घेऊन अनुराधा राहते. अवनि बालगृह आहे. कोल्हापूरच्या राधानगरी रोडवरील जिवबानाना पार्कमध्ये. शासनमान्य संस्था; पण अनुदान नाही. अनुराधा ती लोकवर्गणीतून चालवते. इतके दिवस ती हे सर्व पै-पैसा जमवून करायची. एकदा महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी कोल्हापूरला आले होते. त्यांनी अनुराधाचं काम पाहिलं. ते त्यांना महात्मा गांधींचं खरं काम वाटलं. त्यांची एक संस्था आहे. गांधी पीस फाऊंडेशन. ते जगभर व्याख्याने देतात. त्यातून येणाऱ्या मानधनातून त्यांची संस्था चालते. आता त्यांचा मुलगा तुषारही या कामात आलाय. त्यांनी अनुराधाला मदतीचा हात दिला. तिचं काम स्थिरावलं. त्यामुळे आता अरुण गांधी व तुषार गांधीनीच कोल्हापूरला यायचं ठरवलंय. 'नई तालीम' या गांधींजींच्या मूलोद्योगी शिक्षण विषयक प्रकल्प ते येथे सुरू करणार आहे. अवनी त्याची मूलाधार संस्था राहणार आहे.
 अनुराधाचं जग आणि जगणंच निराळं. तिनं आजवर अनेक प्रकारची कामं केली. मतदार जागृतीच्या तिनं केलेल्या कामामुळे भ्रष्टाचारी निवडणूक शुद्धतेकडे झुकली. कोल्हापुरात पैसे वाटणं राजरोस होतं... ते आडपडदे झालं. (थांबायला अजून बरंच थांबायला हवं!) मग तिनं एड्स जनजागृतीचं काम केलं. तिच्या कामाचा भर जागृती व जनसंगठन, त्याद्वारे ती शासन यंत्रणेस अक्षरश: गदागदा हलवते... घसा फुटेपर्यंत शासनाच्या कानी कपाळी ओरडत राहते... अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सुनावते... हे तुमचं काम आहे... पगार त्यासाठी आहे... अनुदान त्यासाठी असतं... मग जाग येते. तिनं बालमजूर प्रतिबंधाचं काम सुरू केलं. एक नाही, दोन नाही, चांगली ५००० मुलं... बालमजूर तिनं शाळेत पिटाळली... कधी आई-वडिलांना समजावून... कधी शिक्षकांना हाताशी धरून, तर कधी शासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरून. आता तर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं तब्बल चौदा प्राथमिक शाळा केवळ बालमजुरांसाठी चालवल्यात आणि त्याही वीटभट्ट्यांच्या परिसरात. भीक नाही मागायची, हक्क मागायचा, असं ती स्थलांतरित कुटुंबांना, मुलांना समजावते. कामगार अधिकारी घेऊन छापे घालतात. होरपळणारं बाल्य, करपणारं बालपण हा तिच्या करुणेचा, क्रियामाणतेचा जिव्हाळ्याचा विषय... शासनाला त्यांचं काम समजावयाचे आणि करायला लावायचं... ऐकलं तर ठीक नाहीतर सरळ पोरं गोळा करते अन् शासनाच्या दारावर धडक मोर्चा काढते... आता जिल्हाधिकारी अनुराधा मोर्चा काढू नये म्हणून काळजी घेतात. दगडाला पाझर फुटतो, यावर तिचा विश्वास तेव्हा बसला जेव्हा ती 'त्या' सोशल शॉकनी कोसळली होती... तेव्हा तर तिनं आपल्या कामाच्या टेबलावर चांगला एक दगडगोटाच आणून ठेवला होता... प्रतीक म्हणून! या दगडाला आपण पाझर फोडायचा आहे, हे तिनं ठरवलेलं. आज मात्र टेबलावर तो दगड दिसत नाही!
 हे सगळं अनुराधा करू शकली ते प्रबळ इच्छाशक्ती व भक्कम लोकबळावर. प्रेमविवाह केला म्हणून तिचं घर, आई-वडील, नातलग दुरावले... लग्न तुटलं... नवरा गमावला. आता तिचं घर 'समाजघर' झालंय. ग्रंथ आणि कादंबरी ही तिची पोटची मुलं अवनीच्या अन्य ३५ मुलांपैकीच एक होत. हे सोपं नसतं... ग्रंथ परवा आईला म्हणाला... "आता मी मुलांतच झोपणार... तुझ्याकडे नाही." ऐकताना अनुराधाच्या एका डोळ्यात दु:खाश्रू तर दुस-यात आनंदाश्रू...आपपराचं द्वंद्व जगणारी अनुराधा...तिला आता तिचे असे कोणीच नाही...सारे जोडलेले...रक्ताचे कोणीच नाही...तिचं एक नवं तत्त्वज्ञान निर्माण झालंय...रक्त, जात, नातं सारं झूठ! खरं एकच माणूस माणूस जोडणं...माणूस माणूस जपणं! संघर्ष, त्यागात जे जीवन, जग आहे, ते स्वार्थमय भोगात नाही. नवरा नसणं, नातलग नसणं हे दु:ख असूच...होऊच शकत नाही. हतबलता म्हणजे दु:ख! आता मी तर भीष्म प्रतिज्ञाच केलीय...परिस्थितीशरण म्हणून जगायचं नाही. मीच जगातली सर्वांत सुखी. कारण माझं स्वत:चं जगणं असं राहीलंच नाही. मी आता म्हटली तर एकटी...समाजात अनेक एकट्या स्त्रिया राहतात. मला आता त्यांच्या हक्काची लढाई खेळायची आहे. अनुराधाची एक लढाई जिथे संपते तिथं दुसरी सुरू होते. त्यामुळे प्रत्येक वेळी मला वेगळी अनुराधा भेटते. तिच्या जागी असणारं, वसणारं नित्य अस्वस्थपण, बेचैनी हीच तिची जीवन ऊर्जा आहे, असे मला वाटत राहते. ३५ मुलांचं घर सांभाळायला महिन्याकाठी लागणारे ३६,००० रुपये तिची चिंता असते. गांधी पीस फाऊंडेशन ती मिटवत असले तरी त्यात ती समाधानी नाही. तिला घराबाहेरची अनेक बालमजूर मुलं-मुली खुणावत, बोलावत असतात. रस्त्यावरचं रोज उद्ध्वस्त होणारं बाल्य तिचं शल्य आहे. ते दूर व्हायचं तर आपण तिच्या हातात हात घालायला हवे. बालकांना सोनेरी भविष्य व उज्वल बाल्य देण्यासाठी San_verala @ sanchar.in क्लिक करा नि बालमजूर बालकांचे जीवन उजाळा.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

घायलों का कायल : पी. डी. देशपांडे - करकरे

 तसं त्यांचं नाव प्रमोद देशपांडे, पण ते पी.डी. या नावानेच सर्वत्र ओळखले जातात. पी.डी. हे कोल्हापुरातलं बहुपेडी व्यक्तिमत्त्व. कोल्हापुरात भारतातील सर्वोत्कृष्ट अपंग वसतिगृह आहे. ते केवळ वसतिगृह नाही. अपंग सुविधा विकास व पुनर्वसन केंद्र म्हणूनही त्याचं महत्त्व आहे. हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड असं त्या संस्थेचं नाव. त्या संस्थेचे मुख्य कार्यकर्ते नसीमा हरजूक, रजनी करकरे या दोघी भगिनी अपंग. त्यांच्यामागचे शिलेदार सर्वश्री पी.डी., मनोहर देशभ्रतार, श्रीकांत केकडे आदी धडधाकट. 'तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' असा त्यांचा पवित्रा असतो. 'तुम लढो, हम कपडे संभालेंगे' सारखं कातडी बचाव इथं काही नसतं. सर्वस्व झोकून करायचा इथला रिवाज.
{{gap}यातले पी.डी. हरहुन्नरी, हिशेब, कला, संवेदना, अप्रसिद्धी, मितभाषी, पडद्यामागचे कलाकार, असं त्यांचं वैशिष्ट्य. सर्व करतात नि नामानिराळे राहतात. हे त्यांना जमतं कसं, याचं मला आश्चर्य वाटलं म्हणून मी शोध घ्यायचं ठरवलं तेव्हा लक्षात आलं की, हे बेणं काही औरच! अनवट, अनघड आणि अवघडही!
 पी.डी.चे वडील प्राथमिक शिक्षक, पी.डी. जात्याच हुशार. म्हणून दोन वर्षांत त्यांनी तीन इयत्ता पास केल्या. त्यामुळे प्रत्येक वर्गात सर्वांत लहान, पण यशात महान! टॅलन्ट सर्च ओ.के. स्कॉलरशिपला बसवलं की मिळालीच समजायची. पहिलीत असताना इन्स्पेक्टरनाही त्यांनी चारीमुंड्या चीत केलं. पहिलीचे प्रश्न ते विचारायलाच लागले, तर या महाराजांनी सांगून टाकलं...मला तिसरीचीपण उत्तरं येतात. त्याचं कारण गुरुजींचा मुलगा म्हणून यांचा सर्व शाळेत संचार असायचा!  लहानपणी एकदा ते पडले नि त्यांच्या जिभेचा शेंडा तुटला. त्यामुळे त्यांना आपल्यासारखं शेंडा असलेले लोक जिव्हारी बोलतात तसं बोलताच येत नाही! त्यामुळे अजातशत्रू! वामनमूर्ती पी.डी. मला कायम सुदृढ बाळाप्रमाणे निरागस दिसत आलेत आणि वागणंही तसंच निष्पाप, पी.डी.ना मी पहिल्यांदा पाहिलं नि मी त्यांच्या प्रेमात पडलो. कोल्हापुरात रेडिओस्टार गायिका आहेत. रजनी करकरे...महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून एक भक्तिगीत प्रसृत होत असतं...
 मागते देवा, ते मज दे |

 मला हवे ते,

 तुझ्याच जवळी,

 दान मला मागू दे ||
 ते मी ऐकलं नि रजनीताईंच्या प्रेमात पडलो होतो. हे दोघे पती-पत्नी आहेत, हे कळल्यावर मी तिसऱ्यांदा यांच्या प्रेमात पडलो. अजून त्यातून सुटका नाही! पी.डी. सुशिक्षित, नॅशनलाइज बँकेत मॅनेजरची भक्कम पगाराची पक्की नोकरी. घरंदाज खानदान. पूर्वज जमीनदार, घरचे सगळे समृद्ध, पी.डीं. नी मनात आणलं असतं तर कमावती, कामिनी कुलवधू ते मिळवू शकले असते; पण त्यांनी रजनी करकरे या अपंग गायिकेशी लग्न केलं. त्यांचं लग्न, सुखी संसार हीच मुळी एका निराळ्या जगाची नांदी होती. यात आपण काही भव्य-दिव्य, आदर्श करतो, असा पी.डीं. चा आविर्भात नव्हता की विचार. विचारच म्हणाल तर अपंगांबद्दलची सर्वत्र असणारी दया, सहानुभूती यांना छेद देणारी एक सहवेदना व संवेदना होती. या माणसानं लग्नाचा मुहूर्त निवडला तो स्वातंत्र्यदिन १९८४! स्वातंत्र्यदिन निवडायचंही कारण होतं. रजनीताईंचा जन्म १९४३ चा. १५ ऑगस्ट, १९४७ ला त्यांना पोलिओचा अटॅक आला. देश स्वतंत्र झाला; पण रजनीताई परतंत्र, पराधीन! पी.डीं.नी त्या दिवशी सप्तपदी घातली नि त्यांना स्वतंत्र, स्वावलंबी केलं! काही मित्र पी.डी.ना गमतीनं म्हणतात... "देशाचा स्वातंत्र्यदिन; पण तुमचा मात्र पारतंत्र्यदिन..." ती एक मध्यमवर्गीय जिव्हारी कुचेष्टा असते. ज्यांना आपल्या पावलापलीकडचं जग नसतं ते दुसऱ्यासाठी एक पाऊलही उचलत नसतात. अपंगांसाठी सात पावलं...सात योजनं दूर चालल्याचा पी.डीं.चा प्रवास थक्क करणारा. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नि वर्षांनी अमलात आणला. कारण ती एक विचारपूर्वक कृती होती.  मी तुम्हाला अनुभवाने सांगेन की, सुदृढ पुरुषानं भारतात अपंग मुलीशी लग्न केल्याचा इतिहास नाही. सुदृढ स्त्रियांनी अपंग पुरुषाशी लग्नाची उदाहरणं अनेक आहेत. आपला समाज पुरुषसत्ताक असतो. याचं हे ढळढळीत उदाहरण! अपंग मुलीशी लग्न...अपत्य होणार नाही. लैंगिक सुख लाभणार नाही. घरची (मुलीच्या) इस्टेट नाही...असेलच तर गोड गळा नि ३६ गुण...एवढंसं संचित 'जीवन' मानणारे पी.डी...हे येरागबाळ्याचे काम नाही. 'जिथे देवदूत जायला घाबरतात तिथे केवळ मूर्खच प्रवेश करू शकतात.' अशा आशयाचं एक इंग्रजी वाक्य आहे, त्यातल्या 'मूर्ख' शब्द पारंपरिक अर्थाने घेता येणार नाही... जांबाज माणसंच वाघाच्या जबड्यात हात घालतात...मी पी.डीं.ना एकदा याबद्दल छेडलं होतं... तेव्हा ते म्हटले होते की, 'प्लॅटॉनिक लव्ह' बद्दल मी वाचलं तेव्हा वाटलं की, कविकल्पना जगता आली पाहिजे म्हणून मी रजनीशी लग्न केलं... माझं तिचं प्रेम Romantic नव्हतं... ते एक 'Realistic life' होतं नि आहे... कल्पना नि जीवनातील जमीन अस्मानी अंतर पार करणारे पी.डी. व रजनीताई आपणापेक्षा अनेक अर्थाने निराळे!
 या दोघांनी हातात हात घालून अपंगांची स्वर्गनगरी उभारली आहे सिंधुदुर्गात. १२ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात १०० लाभार्थी अपंगांचे पुनर्वसन केंद्र म्हणजे स्वप्ननगरी! कोल्हापुरात तसंच आणखी १०० मुलांचं वसतिगृह. ५०० मुलांची शाळा. नावच त्यांचं समर्थ विद्यालय. शिवाय अपंग सुविधा निर्मित केंद्र. तिथं कुबड्या, जयपूर फूट, फर्निचर, वॉकर सर्व तयार होतं. शिवाय पतसंस्था, गॅस एजन्सीचा पसारा. दोन हात, पाय असलेले जे जे करतात (चांगलं) ते ते हात, पाय नसलेल्यांना अधू असलेल्यांना करता आलं पाहिजे, असा यांचा घाट. शेती, काजू केंद्र असेही उपक्रम! हे सारं दोघे अनुदानाशिवाय करतात! अनुदान संस्थांना नादान करतं, असं यांचं तत्त्वज्ञान! अपना हाथ (नसला तरी) जगन्नाथ होऊन जगायचा ध्यास!
 पी.डी. आणि रजनीताई हेल्पर्स संस्थेमार्फत अपंगांच्या शिक्षण, संगोपन, पुनर्वसनाचं काम विणकराच्या कौशल्याने करतात. विणकर धागा जोडतो; पण गाठ दिसू देत नाही. पी.डी. व रजनीताई साह्य करतात. पण साह्याच्या खुणा ठेवत नाहीत. हे त्यांचं अनुकरणीय वेगळेपण. कवी गुलजार, सुरेश भट यांचे पी.डी. फॅन आहेत. पी.डीं.नी गुलजारांच्या काही कवितांचे केलेले अनुवाद मी वाचलेत. वरील विणकामावरून आठवलं. पी.डीं.नी गुलजारांच्या कवितेच्या एका कडव्याचा अनुवाद असा होता मला ही तुझी युक्ती शिकव ना रे विणकरा

 वस्त्र विणताना धागा मधे संपला किंवा तुटला

 तर तू तो जोडून घेतोस.

 तुझे हे जोडकाम इतके बेमालूम

 की त्यातली न गाठ दिसते, न जोड

 मी एकदाच असे एक नाते विणायला घेतले होते,

 पण त्यातले सर्व जोड, गाठी,

 सगळ्यांना स्पष्ट दिसले रे विणकरा!
 पी.डी.च्या समाजसेवेची वीण पाहूनच गुलजारांना या ओळी सुचल्या असाव्यात. इतकं या ओळीचं नि पी.डीं.च्या वागण्यात साम्य! पी.डी. कविमनाचा कलंदर कलाकार. त्याचं एक उदाहरण सांगतो. लग्न झाल्यावर सर्व जण बायकोला बंधनात ठेवण्यासाठी अंगठी घालतात. पी.डीं. नी लग्न झाल्याची खूण म्हणून बायकोस सुर्वेंचा 'सनद' काव्यसंग्रह भेट देऊन रजनीस आपल्या जीवनाची दिशाच समजावली. लग्नाला त्यांनी रजा काढली नाही. निमंत्रित नाहीत. होमहवन नाही, आपण दोघं हातात हात घालून जीवन असेल तिथपर्यंत चालत राहू, असं ठरवलं नि चालत राहिले. रजनीताईंना कुबड्या घेतल्याशिवाय एक पाऊल पुढे टाकता येत नाही. रिक्षात बसणं अडचणीचं म्हणून पी.डीं.नी मारुती ओमनी घेतली. सारथ्य करणं, रजनीच्या कुबड्या सांभाळणं, रजनीला चहा देणं, तिला कमी हालचालींत तिचं तिला मिळावं, करता यावं, अशी सारी योजना करणारे पी.डी. पाहिले की आठवतात काही ओळी...त्यात शब्द बदलून म्हणावं वाटतं, 'घायल की गति कायल जाने!' मूळ ओळ आहे...घायल की गति घायल जाने...पी.डी. अपंग नसले, तरी अपंगांच्या वेदना, व्यथांचा परकाया प्रवेश करणारा हा कायल (योग्य) माणूस! समाजसेवेच्या क्षेत्रात दोन प्रकारची माणसं असतात. एक कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणारी, तर काही कायम भूमिगत. पी.डी. कायम भूमिगत...लाजाळूचं रोप...फूल...रजनीताईचं नि पी.डीं.चं अद्वैत जीवन इतकं की श्वानसंवेदी! कुत्र्याला धनी येणार ते आधीच उमगतं... रजनीताईंनाही पी.डी. येणार हे आधीच कळतं. हे कसं म्हणून विचारलं तर त्या म्हणाल्या, "मी आणि पी.डी. एकच असल्यामुळे मला ते कळतं. तुम्हाला का कळत नाही?... अंतर्मुख व्हा!"  पी.डी. चांगले कौन्सिलर आहेत. वसतिगृहातील मुला-मुलींचे पी.डी. काका म्हणजे अभयपद! जा, भेटा, बोला...प्रश्न संपला...मिटला समजा, पी.डी. चांगले शिक्षकही आहेत. ज्योती कॉम्प्युटर्स नावाच्या त्यांच्या संस्थेत ते शिकवतात. ते मॅनेजमेंट गुरुही आहेत. त्यांची "Seven Seas" नावाची पुस्तक मालिका हातोहात विकली गेली. इंग्रजी डाव्या हाताचा मळ. ड्राफ्टिंगमध्ये ताकद इतकी की, त्यांनी लिहिलेल्या देणगी पत्रांना नकार, अपयश माहीत नाही. अशक्य ते शक्य करिता सायासच्या ओळी पी.डी.वरूनच बेतल्या असाव्यात. राष्ट्रपती, पंतप्रधान, स्टीफन हॉकिंग कुणालाही भेटायचं असो...मिशन पी.डी.वर सोपवा...फत्ते झालं समजा.
 मी अंधश्रद्ध नाही; पण पी.डी. नावाचा माणूस तुम्हाला आपल्या काया, वाचा, मने मोहवून टाकतो...आपलंसं करतो तेव्हा वाटू लागतं, याचा हातगुण, पायगुण, तपासायलाच हवा...उत्खनन करताना लक्षात येतं की, त्यांच्या कामाच्या यशाचे रहस्य त्यांच्या कार्य समरसतेत आहे. मनस्वी, नि:स्वार्थी कार्य करा. यश येणारच. हा असतो पी.डी.च्या कार्याचा वसा आणि वारसा. निराळ्या जगातली माणसं म्हणजे केवळ अंध, अपंग, अनाथ नव्हेत. अलीकडे अपंगांना 'विशेष सक्षम' (Differently Abled) म्हटले जातं. पी.डी. ही विशेष सक्षम गृहस्थ होत. जे तुमच्या माझ्यात नाही, ते त्यांच्यात...म्हणून ते निराळे!
 आजचं स्वकेंद्रित, भ्रष्टाचारी जग पाहिलं की, पी.डीं. सारखी माणसं या जगात असतात, यावर विश्वास नाही बसत; पण अशी माणसं पाहिली, अनुभवली की, जगण्यावरची श्रद्धा वाढते. 'या जगण्यावर शतदा प्रेम करावे', असं वाटू लागतं. इव्हान लोमेक्स नावाच्या एका समाजसेविकेस आम्ही लाखाचा निधी द्यायचा ठरविला. पी.डीं.नी हजार रुपये भरून खातं सुरू केलं नि आपल्या मित्रांचे हजारो रुपये आणले. ते बँक मॅनेजर असताना त्यांची युनायटेड वेस्टर्न बँक त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवायची. शाखा डबघाईला आली, पी.डीं. ना पाठवा. नवी शाखा उघडायची आहे. पी.डी. ना पाठवा. एनपीए अकौंट आहे, (कर्ज वसूल होत नाही) पी.डी.वर सोपवा. पी.डी.कडे एक शस्त्र आहे. ते पोटात शिरतात, मधाळ बोलतात, रेड्यामुखी वेद, भले तरी देऊ कासेची लंगोटी, असं सारं ते करतात. माणूस पणाला लावायचा आहे...पी.डीं.ना पाठवा. परवा माझा एक मित्र म्हणाला... "कशाला पाहिजे क्रिकेट डिप्लोमसी...पीडींना पाकिस्तानात पाठवा...ते पाकिस्तानच भारतात मर्ज करतील..." पी.डी. म्हणजे हर मर्ज की दवा! कोट्यवधी रुपये अपंग कल्याणासाठी जमविणारा हा भगीरथ. इथं गंगाही नतमस्तक!!

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

शोकार्थ अगस्ती : अशोक रोकडे

 मराठीतील प्रख्यात कथाकार आहेत व. पु. काळे. ते सुंदर कथाकथन करायचे. ते भावस्पर्शी असायचं. इतकं की एकदा का तुम्ही त्यांची कथा ऐकली की, ती तुमच्या काळजात कायमची कोरली जायची. अशीच एक कथा मी त्यांच्या तोंडून ऐकली होती. 'केव्हाही बोलवा' तिचं नाव. त्यांच्या 'इन्टिमेट' संग्रहात ती आहे. ती कथा वास्तवातून आली की, कल्पनेने मला माहीत नाही...त्यात काही स्वयंसेवक, सेवाभावी लोकांची संस्था आहे. 'केव्हाही बोलवा' हे त्यांच्या गटाचं, संस्थेचं नाव...त्यांचं एक व्हिजिटिंग कार्डही असतं...त्यावर संस्थेचे नाव, फोन नंबर असतात...तुम्ही फोन केला की, ते तुमच्या मदतीला धावून येतात... अट एकच...मदत करणाऱ्यांच नाव, पत्ता विचारायचं नाही...आभार, भेट, चहापान, मानधन नाही...तुमची गरज, संकट असतं तेव्हा ते तुमचे जिवाभावाचे आत्मीय असतात. तुमची गरज संपली की ते गायब होतात.
 व. पुं. च्या त्या कथेतले लोक कोल्हापुरात आहेत. त्यांची एक संस्था आहे... 'जीवन मुक्ती संस्था'. अशोक रोकडे नावाचा एक तरुण ती चालवतो. संस्था कामातून जन्मली. गाव, शहर, महानगर काहीही असो...प्रत्येक गावात निराधार, वेडे, भटके, बेवारशी लाकांची वस्ती असते. ते रस्त्याच्या कडेला, रेल्वे, एस.टी. स्टॅन्डच्या प्लॅटफॉर्मच्या कडेला, बसस्टॉपच्या वळचणीत, फ्लायओव्हर पुलांच्या खाली, रस्त्याच्या आडोशाला कोपऱ्यात राहून आपलं जीवन कंठत असतात. त्यांना आगापीछा...त्यांचं नाव नसतं. त्यांना वंश, जात, धर्म नसतो...समाजाच्या लेखी ते वेडे, लफंगे, बेवारशी...त्यात स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध, मुले सर्वच असतात...कोण सवस्त्र, कोण निर्वस्त्र...अर्धनग्न व कधी पूर्ण नागडेही...ते तसे झाले की, मग पोलिसांना जाग येते...समाजस्वास्थ्य या नावावर त्यांना अटक केली जाते...मग त्यांची रवानगी जवळच्या भिक्षेकरी गृहात किंवा मनोरुग्णालयात (मनोविकास केंद्रात केली जाते...मनोरुग्णालयाचे नामांतर झालं तसं भिक्षेकरी गृहाचेही व्हायला हवं ...मानव विकास केंद्र). ते मागून खातात. उकिरडे धुंडाळतात. हल्ली हॉटेलमध्ये खाणाऱ्यांची संख्या वाढते आहे... हॉटेलमध्ये जितकं खाल्लं जातं, त्यापेक्षा टाकलं अधिक जातं, हे किती लोकांना माहीत आहे. जे टाकलं जातं ते खरकटं बादल्या, बॅरल्स भरून टेकअवे ट्रक्समध्ये ओतलं जातं...काही उकिरड्यात फेकलं जातं...अशा ठिकाणी ही सारी माणसं (?) ते चिडवत, निवडत, खात बसलेली असतात...असं दृश्य पाहिलं की, मला हिंदी कवी 'नवीन' यांच्या ओळी त्रास देऊ लागतात...अस्वस्थ करतात...
 लपक चाटते जुठे पत्ते

 जिस दिन देखा मैंने नर को |

 उस दिन सोचा, क्यों न लगा दूँ ?

 आज आग मैं दुनिया भर को ||
 अशी लागलेली आग एक दिवस अशोक रोकडे यांना दिसली अन् जीवन मुक्तीचा जन्म झाला.
 त्याच्या जन्माची पण एक कहाणीच आहे. घरोघरी माणसं मरतात. तशी ही रस्त्यावरची बेवारशी माणसं पण मरतात. कधी रस्त्यावर, कधी रेल्वेच्या डब्यात, कधी कुठे...कधी कुठे...पोलिसांना त्याची वर्दी जाते...पोलीस ते प्रेत शासकीय जिल्हा रुग्णालयात नेतात. तिथं शवागर...प्रेतालय असतं...पाहिलंय तुम्ही? माणसास जगणं घृणास्पद करणाऱ्या या जगात मरणंही घृणास्पद, किळसवाणं असतं. कुजलेलं प्रेत उचललंय तुम्ही कधी? मी उचललंय ...एकदा नाही अनेकदा..त्याची सुरुवात अशोकनीच करून दिल्याचं आठवतं. प्रेताला जिथं हात लावाल उचलायला म्हणून तिथं तुमचा सारा हात आत कुजलेल्या मांसात घुसतो...चिखलात हात घातला की घुसतो तसा, वर दुर्गंधी, विद्रूपता इतकी की पहिल्यांदा हे करता, पाहता तेव्हा नाकातले केस जळतात...डोळ्यांतलं सौंदर्य संपतं...कानाच्या पाळ्या गरम होऊन ऐकायला येणं बंद व्हावं...सारी संवेदना शून्य करणारं ते प्रेत...पुरुष वा स्त्री जातीचं...माणसांचं प्रेत होणं काय असतं ते तिथं समजतं...उमजतं!  त्या शवागारात प्रेतं असतात बेवारसांची तशीच आत्महत्या, विषप्राशन, अपघात होणाऱ्यांची...व्हिसेरा राखून ठेवलेल्यांची...ज्यांचे शवविच्छेदन, पोस्टमार्टम करायचंय त्या सर्वांची...शवविच्छेदन पाहिलंय? ते करणारा पूर्ण शुद्धीत कधीच ते करू शकत नाही...तो आधी दोन घोट घेतो...मगच त्याला ते शक्य होतं... त्याला दारूबंदी माफ असावी!
 अशी जी बेवारस, प्रेतं असतात ती बंद किंवा उघड्या ढकलगाडीतून स्मशानात नेली जातात. धर्म माहीत असेल, तर कब्रस्तानातही! असंच एक बेवारशी प्रेत एकदा कोल्हापूरच्या स्मशानभूमीकडे ढकलत नेण्यात येत होतं... ते पोस्टमार्टम झालेलं होतं. वाटेत ते पडत पडत उरलेले अवयव स्मशानात पोहोचले. त्याचे दहन झालं. मनुष्य देहाची ही सर्रास होणारी विटंबना ६ लाख लोकवस्तीत कोल्हापुरात फक्त अशोकच्या हृदयाला भिडली...त्यानं यंत्रणेशी प्रतिवाद केला...भांडण काढलं...त्याची बातमी झाली...अन् अशोकने आपल्या नावाप्रमाणे हे जग शोकमुक्त करण्याचा विडा उचलला...पहिल्यांदा स्वतः केलं...मग हात मदतीला आले. मला आठवतं, आम्ही जीवन मुक्तीचे स्वयंसेवक हे काम पहिल्यांदा करत होतो तेव्हा आमच्याकडे संवेदनशील मनाशिवाय काही नव्हतं...होतं फक्त माणुसकीचं नातं...जगणं नाही सन्मानाचं करता येतं, तर मरणापासून तरी सुरुवात करू...जीवन मुक्त झालेल्या सन्मानाचं मरण देण्याच्या ध्यासातून जीवन मुक्ती संस्था उदयाला आली...मला आठवतं सुरुवातीच्या दिवसात जीवन मुक्तीकडे कफन (मरणवस्त्र) विकत घेण्याची पण ऐपत नव्हती...वर्दी आली की कुणी तरी घरातलं धडुतं (जुनी साडी, चादर, बेडशिट, कापड) घेऊन यायचं...कोण निलगिरीची बाटली घेऊन यायचा...दुर्गंधीवरचा तो आमचा उतारा होता...इत्र नहीं मूत्र सही...पूर्वी गोमूत्र शिंपडायचे...नंतर अत्तर आलं...अत्तर रोज कसं परवडणार? निलगिरी दुर्गंध नि रोगप्रतिबंधकही! मग आम्हाला दाता मिळाला...कफन देणारा... मग हँडग्लोव्हज् आले...मग स्ट्रेचर...गणवेश. आता तर स्मशानात बेवारस प्रेताला सन्मानाने सलामी देऊन अलविदा केलं जातं...इतर घरातली माणसं हा शाही समारंभ पाहतात तेव्हा त्यांना त्यांच्या वारसदार खानदानीपणाची आतल्या आतल्या टोचणी लागून जाते खरी...!
 या कामानं सुरू झालेलं जीवन मुक्ती संस्थेचे कार्य. आज ती संस्था काय करत नाही. हे शोधावं लागेल...केव्हाही, कशासाठीही, कुठेही बोलवा...जीवन मुक्ती तुम्हाला मुक्ती देते...कोल्हापुरात काहीही घडलं (अर्थात विपरीत)...मदत लागणारं...पहिला फोन ना पोलीस कंट्रोलला जातो ना अग्निशामक केंद्राला अन कधी कधी तर पोलिस कंट्रोल रुम, अग्निशामक दल, होमगार्डचे फोनही जीवन मुक्तीकडे डायव्हर्ट होतात ही वस्तुस्थिती आहे...कोकण रेल्वेला एकदा अपघात झाला...वर्दी पोलीस, रेल्वे पोलीस, जिल्हा प्रशासनाला गेली तशी जीवन मुक्तीलाही! जीवन मुक्तीचे स्वयंसेवक पोलिसांपूर्वी हजर...तेही चार तासांचा प्रवास करून...आता कोकण रेल्वे अगोदर जीवन मुक्तीला फोन करते मग रेल्वेला! घाटात अपघात होतो...एस.टी. दरीत कोसळलेली असते...दरीतून मदतीसाठी टाहो फुटलेला असतो...पोलीस येतात...अग्निशामक दल येतं...चर्चा...नियोजन, फोनाफोनी सुरू असते... मागून जीवन मुक्तीचे स्वयंसेवक येतात...चर्चा करत न बसता दरीत दोर सोडतात...बॅटरीच्या झोतात ज्यांना दिसेल त्याना उचलतात...मग नाही म्हणायला पोलीस, अग्निशामक जवान...जोर लगाऽऽ के हैयाऽऽ करतात ...नदीला पूर येतो... माणसं घरात, छपरावर...झाडावर अडकलेली असतात...जीवन मुक्तीच्या सैनिकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतलेले असतात...शासन साधनं (होड्या, लाईफ, जॅकेट्स, दोर इ.) पुरवतं....प्राण संकटात घालतात ते जीवन मुक्तीचे स्वयंसेवकच! धरणग्रस्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या मांडतात... दिवसा मागून दिवस जातात...शिधा संपतो...संघटना हतबल होते...जीवन मुक्ती लगेच अन्नछत्र सुरू करते...! पोलीस भरती, सैन्य भरती असते. अक्षरशः शेकडो बेरोजगार तरुण भाकरी बांधून भरतीसाठी येतात... दिवसाच्या तयारीने परतीच्या तिकिटाचे निव्वळ पैसे, खुर्दा घेऊन आलेले तरुण...रोज एक एक दिवस वाढत जातो...आज नोंदणी, उद्या फिजिकल, परवा मेडिकल करत त्यांचे अवसान आणि भांडवल दोन्ही संपलेलं असतं...जीवन मुक्ती तिथं उभी राहते....चहा, नाश्ता, भोजन, वजन कमी पडलेल्यांसाठी केळी (केळी खा...क्षणात वजन वाढवा!) काही मागा...देतो खरं सैन्यात, पोलिसात भरती व्हा! अशोकच्या डोक्यात त्यातून एक भन्नाट कल्पना उभारली. व्हाईट आर्मी! डोक्यावर पांढरी कॅप (काऊंटी) पांढरा टी शर्ट, ब्राऊन कॅमफ्लाज पँट...असा जथ्थ्या दिसला की, समजायचं व्हाईट आर्मी...शांतता, अहिंसा, शिस्त, समर्पण, निरपेक्ष, साहाय्य, सद्भाव, निधर्मियता...सारं घेऊन माणूस कल्याणाचे काम करण्यात आता मुलीही येऊन स्वतः दाखल होतात...कस्तुरबा अंध वसतिगृह, वृद्धाश्रम, बालकल्याण संकुल, हेल्पर्स, चेतना कोणाही वंचितांचं काम असो, जीवन मुक्ती तत्पर.
 जगातलं सारं दु:ख प्यायला निघालेला हा अगस्ती! ही प्यास त्याच्यात कशी जागली, याचा शोध घेताना लक्षात आलं की, अरे हा तर आपलाच...आमच्यापैकी... आपल्यापैकीच...समाजासाठी तुमचं काही देणंघेणं लागायचं असेल, तर त्याची एक शर्त असते...तुमच्यात सामान्यापेक्षा काही कमी असावं लागतं...उण्यातून बेरीज सुरू होते (बेरजेचं समाजकारण सोपं नसतं...राजकारणासारखे) अशोकचे वडील मूळ कर्नाटकातले. गरीब...निराधार. ते तिथल्या सर्टिफाइड स्कूलमध्ये वाढले...शिकले. शिकले म्हणजे शाळा नव्हे... शिवणकला! अठरावं लागलं...मोठे झाले...समाजशाळेत स्वत:च्या पायावर टाके घालत उभे राहिले...दर्जी काम करत कोल्हापुरात आले... टाके घालत टाकीचे घाव सोसत आज त्यांच्या हाताखाली २५ निराधार मुलं साधार होत आहेत ...आख्ख्या कोल्हापूरची मुलं जे गणवेश घालतात ते अशोकच्या बाबांच्या युनिफॉर्म कारखान्यात (शिवणशाळेत) तयार होतात. अशोकच्या बाबांची गोड तक्रार आहे...मी मिळवतो आणि हा उडवतो...घालवतो! म्हणून त्यांनी अशोकला स्वतंत्र धंदा काढून दिला...त्याची व्हाईट आर्मी बंद व्हावी म्हणून! मग त्यानं बापच बदलला...मला बाबा म्हणायला लागला! आता त्याचं बरं चाललंय...रोज नवी स्वप्नं पाहायचा त्याचा उद्योग तेजीत आहे. त्याला आता हवी आहे जागा...मैदान, बरॅक, आपली व्यवस्थापन साधनं-प्रशिक्षण केंद्र...सारं त्याला करायचं आहे...रोज एक एक दोन जोडत निघालेला अशोक रोकडे, त्याची जीवन मुक्ती संस्था, स्वयंसेवक, पोलीस, जिल्हा प्रशासन, समाज, देणगीदार सर्वांचा गोफ विणत समाजाची नवी शिवण तो शिवतो आहे...समाज, उसवू नये म्हणून...उद्ध्वस्त होऊ नये म्हणून...उतू नये, मातू नये म्हणून! प्रश्न आहे तो तुम्ही काय करणार आहात यात भागीदारी, दु:खात भागीदार, भागीरथ होता येतं तो माणूस!

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

सर्वत्र आमुच्याच खुणा : संगीता आणि भारत निकम

 ऑक्टोबर, २००६ असावा. मी प्राचार्य होऊन वर्ष उलटलेलं होतं. या काळात मी विद्यापीठ अनुदान आयोग; नवी दिल्लीच्या योजनेत महाविद्यालयातील अपंग विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी करत आणल्या होत्या. त्यात अंधांसाठी बोलका संगणक, ब्रेल टंकलेखक, सी.डी. प्लेअर्स, वॉकमन्स अशा सुविधा करत आणल्या होत्या. वर्षभराच्या या प्रयत्नांना यश येऊन आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक अंध विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात आले होते. ज्युनिअर व सीनिअर कॉलेजला मिळून ही संख्या पंधरावर येऊन पोहोचली होती. विद्यार्थी रोजच काही ना काही कारणांनी भेटत असत. त्या दिवशी सर्व अंध विद्यार्थी मिळून भेटायला आल्याची सूचना शिपायांनी दिली तसं मी त्यांना लगेच आत बोलावलं... "सर, १५ ऑक्टोबरला 'पांढरी काठी दिन' (अंध दिन) आहे. आम्ही शहरातील सर्व अंध मिळून तो साजरा करणार आहोत... महानगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर विद्यालयात... तुम्ही पाहुणे म्हणून यावं. अशी आमची सर्वांची इच्छा नि विनंती आहे... तुम्ही हो म्हणाल, तर आमच्या पुंड बाई, निकम सर तुम्हाला भेटायला येतील..." मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं... सरांना, बाईंना नका पाठवू... मी येतो म्हटलं नि जाऊन पोहोचलो.
 शाळेत पाहिलेलं दृश्य विलक्षण होतं... त्या कार्यक्रमांनी मला नवी दृष्टी दिली. आधी मला डोळे होते. या कार्यक्रमांनी मी डोळस झालो... आधी मला दिसायचं... आता मी पाहू लागलो... त्या कार्यक्रमाचं सारं अंध बांधव करत होते... रांगोळी, सजावट, पूर्वतयारी, ओळख, भाषण, हार-तुरे... चहापान, सांस्कृतिक, वाचन, फलक लेखन सारं अंधांनी केलेलं... काही आंशिक अंध, काही पूर्ण, कोण विद्यार्थी, कोण शिक्षक... मी सोडून सारे अंध... खरं तर एक अंध व सारे डोळस... कारण ते सारं ज्या आत्मविश्वासाने व डोळ्यांच्या मदतीशिवाय करत होते ते माझे डोळे उघडणारं होतं... निकम सरांनी प्रास्ताविक केलं... "आज आपण पांढरी काठी दिन कुणी आपली दया करावी म्हणून साजरा करत नाही... आज आपण स्वावलंबी होण्यासाठी एकत्र आलो आहोत... कुणी मदत केली तर स्वागतच... पण आता भीक नाही मागायची... मागायचाच तर हक्क मागायचा... कर्तव्याचे आवाहन करायचं." मग पुंड बाईंनी माझा परिचय करून दिला... कार्यक्रमाची पाहुण्यांच्या निवडीची भूमिका विशद केली... "सरांना आपण प्राचार्य म्हणून आमंत्रित केलं नाही... 'माणूस' म्हणून बोलावलंय." हे सारं मला ओरखडणारं, खडखडणारं होतं... कारण त्यांच्या प्रत्येक शब्द नि कृतीत समाज त्यांना नाकारतो कसा, उपेक्षित कसा करतो, याचा विश्वास होता... ते कोल्हापूर महापालिकेबद्दल मात्र भरभरून बोलत होते... अंधशाळेस जागा दिली... सिटीबस पास मोफत दिले. एकात्मिक विकास व सर्वशिक्षा अभियानात अंध विद्यार्थी, शिक्षक अभियान राबवलं असं बरंच!
 पांढरी काठी दिन होऊन सहा महिने उलटले असतील एक दिवस मला फोन आला... "मी भारत निकम सर... अंध शिक्षक... आपण पांढरी काठी दिनाला भेटलो आहोत... तुमच्याशी बोलायचं आहे... संगीता पुंड बाईही येणार आहेत... फक्त तुम्ही निवांत पाहिजे..." मग आम्ही भेटलो. दोघांनी आपलं मनोगत स्पष्ट केलं... त्या वेळी आम्ही कोल्हापुरात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह मंडळाचे काम सुरू केले होते... अशा विवाहांना प्रोत्साहन, साहाय्य करून जाती, धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीचा तो प्रयत्न होता. असे जाहीर विवाह करायचो... वृत्तपत्रे, वाहिन्या या कार्यक्रमांची प्रशंसा नि प्रसिद्धी करत. ते वाचून ऐकून भारत व संगीताने आपला विवाह आमच्या मंडळांनी करावा म्हणून विनंती केली... दोघे अंध होते, तरी स्वावलंबी होते. घरच्यांचा विरोध होता; "पण तुम्ही अनाथ होता म्हणून अनाथ कल्याणाचे कार्य करता... नसीमा हुरजूक अपंग म्हणून अपंग कल्याणाचे... आम्हाला त्या पावलावर पाऊल ठेवून पुढं कार्य करायचं आहे." मी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना हे सांगितलं, तसं सर्वांच्यात उत्साह संचारला. भरपूर तयारी, सुशोभन करून केलेल्या विवाहास शाहू स्मारक भवन पुरोगामी कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेलं होतं. साने गुरुजींची सत्यशोधक शपथ घेऊन महात्मा फुल्यांच्या पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला.  आज भारत आणि संगीताचा फुललेला संसार जेव्हा मी पाहतो...तुम्हीही पाहाल तेव्हा तुमच्या डोळसपणाची, तुमच्या धडधाकट असण्याची शरम वाटल्याशिवाय राहणार नाही, ज्या पार्श्वभूमीवर भारत व संगीता आज पाच पन्नास अंध मुला-मुलींना पदरमोड करून, अनुदानाशिवाय, स्वकष्टाने, स्वावलंबनाने सांभाळतात, शिकवतात हे सारं पाहिलं की, मी-मी म्हणणारे मौन होतात व निष्प्रभही! त्याचं कारण असतं भारत आणि संगीताचा इतिहास, संघर्ष, जिद्द, कार्य आणि बरंच काही.
 भारत मूळचा हातगावचा. हे गाव चाळीसगाव तालुक्यात नि जळगाव जिल्ह्यातलं. वडील दामू निकम शेतकरी. भारतचा जन्म १९ एप्रिल, १९७० चा. जन्मतः डोळस होता. तीन वर्षांचा असताना प्रखर तापाने त्याचे डोळे करपले... तो अंध झाला. वडील अशिक्षित, पण शहाणे होते. त्यांनी भरतला चाळीसगावच्या अंधशाळेत घातलं. अंध असला, तरी हुशार असलेल्या भारतने कधी नापास शेरा घेतला नाही... सातवी, दहावी, बारावी मजल दरमजल करत बी.ए., बी.एड., झाला. तोही अव्वल श्रेणीत. त्याला शिक्षकाची दृष्टी आली... समाजभान आलं... ते शिक्षणापेक्षा अनुभवांनी... लोकांच्या वागण्याबोलण्यातून प्रेरणा घेत घडत गेला... तो स्वत:च स्वत:चा शिक्षक झाला... त्याला वाटलं होतं की, समाज प्रगल्भ आहे... सुजाण आहे... अनुभव मात्र विपरित असायचे. मग त्यानं ठरवलं... भीक, दया नाही मागायची... झालं तेवढं पुरं... येथून पुढे हक्काची भाषा करायची... असा भारतमध्ये बदल घडण्याचंही कारण होतं... शिक्षण पात्रता, योग्यता असून सतत डावलणं जाणं, नाकारणं, उपेक्षा करणं, हटकणं अन् कधी कधी हेटाळणी... उपमर्द... अपमानही! मग त्यानं लेबर लॉ डिप्लोमा केला... कायद्याची कक्षा त्याच्या कवेत आली... एवढी योग्यता धारण करूनही त्याला नोकरी मिळाली ती टेलिफोन ऑपरेटर म्हणून... तीही टेंपररी, सिझनल! धुळ्याला शुगर फॅक्टरीत नोकरी करायची नि शनिवारी, रविवारी नाशिकला जाऊन तो राष्ट्रीय अंध कल्याण संस्था (नॅब), नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड (एनएफबी) चं कार्य करू लागला... कार्यकर्ता झाला... महाराष्ट्रभर फिरू लागला... जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सारी कार्यालयं तो सहकाऱ्यांना घेऊन पालथी घालू लागला... प्रथम विनंती, नंतर निवेदन, रजिस्टर्ड पत्र, स्मरणपत्र, माहिती अधिकारी, अंधांचे आरक्षण अशी पायरी चढत तो सहकाऱ्यांसह सर्वांसमक्ष अधिकारी, पदाधिकाऱ्यांना जाब विचारू लागला... सांख्यिकी माहिती मागू लागला तसं चित्र बदललं... महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात अंधांच्या सामूहिक प्रयत्नांना यशाची पालवी फुटू लागली. फेडरेशनच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकदा त्याला संगीतानं ऐकलं... (पाहणं शक्य नव्हतं) त्याची तडफ, जिद्द अनुभवली... भारत तिला समदु:खी, समानशील वाटला... तिनं त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायला सुरुवात केली... तिच्यातही तडफ आली ...अधिकारी, पदाधिकाऱ्यांकडे पाच-सहा जणांनी मिळून जायचं... अर्ज, विनंत्या, मिनतवाऱ्या सर्व करायचं... शेवटी संगीतानं बोलायचं असं ठरलेलं असायचं... संगीता वर्मावर बोट ठेवत बोलायची... काम फत्ते व्हायचं... अनेकांना दृष्टिलाभ जरी झाला नाहीतर अर्थलाभ ठरलेला... अगोदर इतरांना नोकऱ्या दिल्या मग भारत... संगीताने घेतल्या. याला म्हणायचं कार्य... कार्यकर्ता... असं द्रष्टे नेतृत्व भारतास लाभलं, तर अण्णा हजारेंना लोकपाल विधेयकास उपोषण करावं लागलं नसतं ना?
 संगीतात तडफ यायचंही कारण होतं. तिनं पंचवीस वर्षं आपल्या डोळ्यांनी सारं जग पाहिलं, अनुभवलं होतं... सुशिक्षित, धडधाकट संगीता आपल्या सुझुकीवरून जाताना ट्रकला धडकली... क्षणात सारं जग अंधारून गेलं... दृष्टी गेली तशी ती हबकली... तिनं बोलणं, फिरणं, भेटणं सोडलं नि स्वत:ला घरात कोंडून घेऊ लागली. सुदैवानं तिचे आई-वडील प्राथमिक शिक्षक... तिची मोठी बहीण सुनीता पोलिओग्रस्त... आई-वडिलांनी तिला सुनीताकडे बोट दाखवत निराशेच्या गुहेतून बाहेर काढलं... त्यालाही एक सकारात्मक पार्श्वभूमी होती. अपघात होण्यापूर्वी बी.ए., बी.एड्., एम.ए. झालेली संगीता... नोकरी मिळत नाही म्हणून अहमदनगरच्या राष्ट्रीय अंध कल्याण संस्थेत टंकलेखक म्हणून कार्य करायची... पगारापेक्षा अनुभव, समाजसेवा हे उद्दिष्ट होतं... अन् आता तर तीच अंध झालेली, नगरच्या नॅबचे ऍड. बी. एफ. चूडीवाल यांनी तिला धीर दिला... संधी दिली... तिनं ब्रेलमध्ये डी.एड. केलं. तिला श्रीरामपूरच्या विनाअनुदानित अंधशाळेत शिक्षिकेची नोकरी भेटली. पण संगीताला आत्मविश्वास असा येत नव्हता... वादळानं उभं डोलणारं झाड उन्मळावं तसं तिचं झालं होतं... याच काळात ती नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडमध्ये दाखल झाली. तिथं तिच्यासारखीच शुभदा तिला भेटली...संगीतानं तिचं स्वावलंबन हेरलं... ताडलं... Yes... I can... अन् मग तिचं सारं मळभ क्षणात दूर झालं... ती तेजस्विनी बनली... भारत भेटला... त्या परिसस्पर्शानं तिचं खरं सोनं झालं.
 कधी कोल्हापुरात याल तेव्हा राधानगरी रोडवरील साने गुरुजी वसाहतीशेजारी आहे राजोपाध्येनगर आहे. तिथं आहे एक महादेव मंदिर... थोडं पुढे आलात की एक बोर्ड वाचाल... कस्तुरबा गांधी अंध वसतिगृह... संगणक साक्षर असाल, तर घरबसल्या भारत-संगीताचा संसार पाहू शकाल... फक्त www.kasturbagandhi.org वर क्लिक करा की झालं... पण हे सहज घडलं नाही... आजही ते सहज घडत नाही... रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच स्थिती असते. लग्न करताना भारत-संगीताने ठरवलं होतं की, 'अंधांचं स्वराज्य' निर्माण करायचं... दोघांना नोकऱ्या होत्या... तुमच्यापैकी किती जणांना हे माहीत आहे? शासन अंधांच्या आरक्षणाचे जे ढोल-नगारे पिटते ते किती फोल आहेत... अंध शिक्षकांना सर्व शिक्षा अभियानात नोक-या दिल्या... त्या दोन प्रकारच्या. एक विशेष शिक्षक (रिसोर्स टीचर) व दुसरी फिरता शिक्षक (मोबाईल टीचर). एका शाळेत आठपेक्षा अधिक अंध विद्यार्थी असतील तर तिथं एक विशेष शिक्षक नेमला जातो. ज्या शाळांत ८ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नेमला जातो तो फिरता शिक्षक. त्या शिक्षकांनी ८ शाळांत (विद्यार्थी असतील तर आठ ठिकाणी जाऊन शिकवायचं. मेरा भारत महान!) या सर्वांत कडी म्हणजे आपल्या मायबाप सरकारने आपल्या सुपीक डोक्यातून अंध शिक्षकांसाठी नोकरीची नवी कॅटॅगरीच शोधून काढली आहे. शासकीय साऱ्या नोकऱ्या एकतर हंगामी (टेंपररी) असतात किंवा कायम (परमनंट). शासनाने अंध शिक्षकांसाठी एक नवी कॅटेगरी तयार केलीय. तिचं नाव आहे कायम हंगामी (परमनंट टेंपररी)...(यासाठी शासनाला वर्ल्ड कपच द्यायला हवा... किंवा गिनिज नोंद... किंवा आजवरच्या सर्व पंतप्रधानांना संयुक्त भारतरत्न!) भारत आणि संगीताला अशा नोकऱ्या असतात त्यांनी स्वत:ला (खरं तर स्वत:च्या जिद्दीला) गहाण टाकून दहा लाखाचं घर (बंगला बांधला... इक बंगला बने न्यारा... ऐकून) विकत घेतलं. बचतीचे अडीच लाख एकरकमी भरले... आता पाच हजार हप्ता जातो... हॉल, बेडरूम, स्वयंपाकघर, संडास, बाथरुम... वन बीएचके हाउस! आपल्यासारखं मनात आणलं असतं, तर त्यांना राजा-राणीचा संसार करणं शक्य होतं; पण नाही...आपण अंध म्हणून जे भोगलं ते नव्या अंध पिढीस नाही भोगू द्यायचं... एक दोन करत संगीता सोळा अंध मुला-मुलींचा सांभाळ करते. गेल्या वर्षी भारतच्या शाळेतली मुलं कमी झाली...तो 'परमनंट टेंपररीच' होता... नोकरी गेली. त्यानं जिद्द नाही सोडली. नेटवर एमकेसीएलची जाहिरात कळाली. अर्ज केला. नोकरी मिळाली. भारत आता शासकीय अंध निवासी शाळेचा प्राचार्य व अधीक्षक आहे. तिथं तो २५ अंध मुला-मुलींचा पालक, अधिकारी... हाताखाली १८ कर्मचारी असं मोठं कुटुंब तोही सांभाळतो... २३०० रुपयांनी नोकरी सुरू करणारा भारत २३,००० रुपये मिळवतो... संगीता १५,००० कमावते... दोघांचा खर्च तीन हजार दरमहा. ३५,००० खर्चात भारत संगीता २५ अंध मुला-मुलींचा सांभाळ करतात ते स्वत:च्या घरात. नाव वसतिगृह असलं तरी आहे घर... कॉलनीतल्या अनेक घरांपैकी एक. संख्या वाढली म्हणून शेजारीच मुलांसाठी नवी खोली घेतली आहे. संस्था रजिस्टर्ड आहे... कार्य आहे... कारण आहे पण राजकारण नाही... मायबाप शासन यांना ना जागा देणार, ना अनुदान. कारण ते राजकारणी नाहीत की शासकीय अधिकारी नाहीत.
 भारत-संगीतापुढे केशवसुतांच्या कविता आहेत... 'तुतारी', 'नवा शिपाई'... त्या गात म्हणत ते प्राणपणाने समाजकारणाची तुतारी फुकत आहेत. ते आहेत 'नवे शिपाई'...
 जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत,

 सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत,
 गुणगुणत ते रोज नव्या ठेचा खातात...चालत राहतात. कारण त्यांनी ही पण कविता शिकविली आहे.
 कायदा पाळा गतीचा,

 थांबला तो संपला!
 ते चालताहेत! आपण त्यांच्या हातात हात घालू! एक पाऊल त्यांच्यासाठी चालू! घासातला घास देऊ! घामातला एक थेंब त्यांच्यासाठी वाहू! खरे डोळस होऊ! समाजाचे असे सारे दृष्टिदोष दूर करू.

•••

निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf

भयमुक्त बाल्याचा किमयागार : संजय हळदीकर

 "भयशून्य चित्त जेथ, सदैव उन्नत माथा,

 मुक्त अशा स्वर्गातच होवो मम जागृत देश आता"
 कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या ओळी लिहिल्या, तेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता. भारताला स्वातंत्र्य मिळून, चौसष्ट वर्षे होत आली. हे वर्ष गुरुदेव रवींद्रनाथांच्या सुवर्ण जयंतीचं. इतक्या प्रवासानंतर तरी हा देश भयशून्य झाला का? मुक्त असा स्वर्ग इथे शक्य आहे का? हा देश जागृत झाला आहे का? रवींद्रनाथांच्या कविता वाचताना असे प्रश्न सारखे निर्माण होतात, तसेच ग्रेसच्या कविता वाचतानाही...'भय इथले संपत नाही...' हा भय-प्रदेश इथल्या मुलांच्याबाबतीत तरी खराच म्हणायचा!
 संजय हळदीकर नावाचे एक मूलतः नाट्यकर्मी असलेले गृहस्थ; पण गेली अनेक वर्षे महाराष्ट्र पालथा घालत आहेत... त्यांचा ध्यास एकच, मुलं! त्याचं बाल्य, त्यांचं भावविश्व...त्यांचं मन...त्यातली घालमेल...सारं जाणून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मुलं तरी कुठली? भल्या घरातली, सुजाण, सुखवस्तू पालकांची नाहीत. वाडी-वस्ती, आश्रमशाळा, सुधारगृहं, रिमांड होम, अनाथाश्रम, वसतिगृहात राहणारी! आई-वडील नसलेली, निराधार, टाकून सोडून दिलेली... भटके, विमुक्त, कुष्ठ, देवदासी, वेश्या, आई-बापांची, कैद्यांची...वंचित बालकांच्या किती परी सांगाव्यात? वंचित मुलं केवळ संस्थांत नाही असत, ती भरल्या घरातही असतात, ती जिथं, जशी असतात तिथं संजय हळदीकर जातात. अशी मुलं, संस्था त्यांना कटाक्षात कळतात. मग ते मुलांचं भावविश्व समजून घ्यायचा फॉर्म (प्रकार) निश्चित करतात. प्रथम संवाद, खेळ, गप्पा-गोष्टी, गाणी, मग कथाकथन...नकला...नृत्य! मग प्रश्नोत्तरं...कधी नाटक, कधी कविता, कधी चित्रं, कागद काम...साच्यांतून ते मुलांना खुलवतात...फुलवतात...बोलतं करतात. संजय हळदीकरांमध्ये मुलांत चैतन्यांची सळसळ निर्माण करणारा एक किमयागार दडला आहे.
 एकदा त्यांनी भीती आणि भिंतीच्या संबंधाचा शोध घ्यायचं ठरवलं. त्याचं कारणही तसंच होतं. त्यांनी मुंबई, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील रिमांड होमना भेटी दिल्या. संस्था मुलांची; पण इमारती तुरुंगाच्या. 'बच्चों का जेल' अशीच सारी स्थिती. त्यांनी पाहिलं, मुलं सारी भेदरलेली...निस्तेज, मूक, हाताची घडी तोंडावर बोट, एक साथ नमस्ते, एका छापाचे गणपती सर्व! प्रत्येक मूल स्वतंत्र हवं...इथं सारे एक...एकाला झाकावं, दुसऱ्याला काढावं तर तोच. त्यांना या साऱ्या संस्था भय-छावण्या वाटल्या. त्यांनी भीती आणि भिंतीचा अभ्यास करायचं ठरवलं. फॉर्म होता कविता. मुलांना कुणाकुणाची भीती वाटत होती? भूत, साप, पाल, झुरळंच नाहीतर आई, बाबा, शिक्षक, अभ्यास, संस्थेतले साहेब, कर्मचारी यांची पण त्यांना भीती होती. असे दिसून आले. मग त्यांनी मुलांकडून एक प्रश्नावलीच भरून घेतली. हेतू असा होता की, मुलांचं मन समजून घ्यायचं. उत्तरं धक्का देणारी होती. शिक्षकांपेक्षा टी.व्ही., मोबाईल, पुस्तकांचा प्रभाव मोठा. मुलींनी जुही चावलापेक्षा कल्पना चावलाला दिलेली पसंती नवी दिशा दाखविते. अभ्यास, परीक्षांचं भय, ओझं वागवणारी मुलं...स्वप्नातही त्यांचा पाठलाग सोडत नाहीत.
 हे सगळं अभ्यासून संजय हळदीकर या संस्थांत नाट्यशिबिरं, अभिनय शाळा भरवतात. संस्थेत नाटकाला आवश्यक असणारं काहीच नसतं (मुलांच्या संस्था असल्या तरी!) रंगमंच, वाद्यं, पोशाख, पडदे काही नसतं. मग हाती येते कोपऱ्यात असलेली केरसुणी (किंवा फुलासारखा झाडू) मुलं माणसाचे (खरंतर पालक, शिक्षकांचे) बाप असतात. त्यांच्या कल्पनांचं क्षितिज कोणीच गाठू शकत नाही. मुलांना त्या केरसुणीचा उपयोग करून मूक अभिनय करायला सांगितल्यावर मुलांच्या लेखी तो केरसुणी आणि झाडू काय काय नाही बनत?...आरसा, रिमोट, बॅट, तलवार, चाकू, पंखा, चवर, पाठ खाजवणं आणि बरंच काही. संजय हळदीकर मुलांच्या मनातल्या आपण उभ्या केलेल्या चीन-बर्लिनच्या भिंती पाडतात...भीती घालवतात आणि मुलं 'मुलं' होतात.  अशाच संस्थांत संजय हळदीकर परत काही वर्षांनी जातात. हेतू एकच, मुलांना जाणून घ्यायचं. संस्थेचा चक्रव्यूह भेदायचा...तिथल्या प्रशासनाचा कचाटा ढिला करायचा. बंद दरवाजे किलकिले करायचे नि मुलांच्या मनाची कवाडे उघडून ती स्वच्छ, मोकळी करायची. या वेळी ते विषय घेतात 'खिडकी.' फॉर्म निवडतात 'चित्र', मुलांना सांगितलं जातं... तुम्हाला कोंडून ठेवलं जातंय. वेळ काढायला काहीच साधन नसतं. असते ती फक्त खिडकी. त्या खिडकीतून बाहेर पाहताना तुमच्या मनात जे येतं ते चित्रात काढा...त्यांची चित्रं होणार होती त्यांच्या आयुष्याचे 'कवडसे'...मग त्याची प्रदर्शनं महाराष्ट्रभर भरवली गेली. दिसून काय आलं? मुलांचं जीवन अंधारलेलं असलं, तरी त्यांना प्रकाशाची आस आहे. बालपण होरपळलेलं, कुस्करलेलं असलं तरी त्यांना निसर्गाची हिरवाई साद घालते... ते निखळलेले तारे असले, तरी त्यांना ध्रुव बनायचे आहे.
 संजय हळदीकर या मुलांचे मेळावे भरवतात...मामाचा गाव, हुर्डा पार्टी, वंचितांचे स्नेहसंमेलन, नृत्यशाळा! काही वेळा संस्थेतल्या मुलांकडे दोनच रंग असतात...खडूचा पांढरा नि कोळशाचा काळा...दोनच रंगांनी मुलं चेहरे रंगवतात. कुठे आरसाही नसतो...मुलं पाण्यात...हौद, बादली, ताटात चेहरे न्याहाळतात... रंगवतात... कोण राक्षस, कोण भूत, कोण काय, तर कोण काय! चेहरा रंगवण्याच्या खेळानेच त्यांच्या चेहऱ्यावरची नेहमीची मलिनता, निराशा, एकलकोंडेपणा जातो. मुलं हरखतात...हसतात...तोंड, दात, जीभ, डोळे विचकत साधनहीन असून केवळ उपजत प्रतिभेने क्षणात साधन संपन्न होतात. नृत्य, गाण्यासाठी टमरेल, बादली, ताट, वाटी, माठ, त्यांचे ड्रम, तबला, ट्रँगल केव्हा बनतात ते कळत नाही. आपल्या शाळा, संस्था, म्हणजे मुलांना मूकनायक बनवणारे कारखाने झालेत. अशा पार्श्वभूमीवर संस्थांचे दैन्य दूर करणारा हा बृहस्पती...संजय हळदीकर मला मुलांच्या सुप्तगुणांना फुलविणारा जादूगार वाटत राहतो. मुलं नायक, नायिका (खलनायक नाही) कधीमधी विदूषक होतात. अन् संस्थेतील स्मशानशांतता विरून जाते कशी!
 मुलांचं जग निराळे...त्यातही वंचितांचं जग, वंचित मुलांचं आणखी निराळे...ज्यांना खरं म्हणजे काही नाही त्यांना सर्वकाही द्यायला हवं. आपण काहीच देत नाही. स्वातंत्र्याच्या चौसष्ठ वर्षांच्या प्रवासात मित्रांनो, आपल्या मायबाप सरकारने या मुलांना अन्न, वस्त्र, निवारा काय दिला...सरकारला मोक्ष मिळाला अशीच सारी स्थिती. आपल्या देशात गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, नैतिकता इ. अनेक कारणांनी वंचित मुलं निर्माण होतात. मुलं अंध, अपंग, अनाथ, अनौरस, भटकी, भिक्षेकरी, बालमजूर, बालगुन्हेगार असत नाहीत. मुलं खरंतर मुलंच असतात. मुलांना वंचित पालक, शिक्षक, समाज, सरकार बनवते घडवते ते आपल्या पारंपरिक दृष्टीइतकेच मर्यादित असते.
 मार्गारेट सँगर नावाच्या एक समाजसुधारक होत्या. पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी संततीनियमनाच्या क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्या मुलांच्या वकील होत्या. त्यांना असं वाटायचं की, मुलाला जन्म देण्याचा- न देण्याचा अधिकार स्त्रीला हवा. त्याचं कारण होतं...अवघं ५० वर्षं आयुष्य लाभलेल्या तिच्या आईला १८ बाळंतपणं सोसावी लागली. त्यातली सात मुलं बाळंतपणातच मेली. उरलेल्या ११ मुलांचा सांभाळ करतानाची आईची कसरत तिनं पाहिली होती. मुलं जन्मण्याचा अधिकार आईकडे नसल्यानं वंचितांची फौज तयार होते. मुलांना 'उद्या' हे उत्तर असत नाही. कारण त्याचं नाव 'आज' आहे म्हणणारा गॅब्रियल मिस्ट्रल हा वंचित बालकांचा तारणहार होता.
 संजय हळदीकरांचं कार्य म्हणजे वंचित बालकांना त्यांचं भावविश्व बहाल करण्याचं एकच आंदोलन होय. खलील जिब्रानसारखे ते 'मुलांना तुमचे प्रेम द्या; पण विचार नका देऊ' म्हणून सांगतात तेव्हा त्यांना हे पक्के माहीत असतं की, मुलांचं जीवन म्हणजे उद्याचं भविष्य. ते मागं नसतं जात...भूतकाळात नसतं रेंगाळत. तुमच्यासारखं मुलांना बनवण्याचा प्रयत्न करणारे पालक वर्तमानाला भूतकाळ बनवत असतात. संजय हळदीकरांचे सारे कार्य, प्रयत्न म्हणजे वंचितांना वांछित बनविण्याची धडपड! त्यांचा हा प्रयत्न एकाच वेळी शिक्षण, समाज, संस्कृती, संस्कार, कला यांचा गोफ गुंफत बाल्य भयमुक्त करण्याचा एक सकारात्मक खटाटोप होय. असे खटाटोप घरोघरी होतील, तर घर तुरुंग व्हायचे थांबतील अन् बाल्य भयमुक्त होईल.

•••

डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा

 १. खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ. २१0/रु. १८0 सहावी आवृत्ती
 २. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ. १३८/रु. १४0 तिसरी आवृत्ती
 ३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
 निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१00/रु.१00/दुसरी आवृत्ती
 ४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती
 ५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
 ६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२00/तिसरी आवृत्ती
 ७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
 ८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.१३0/रु.१७५/दुसरी
 ९. आवृत्ती निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.१४८/.२00/दुसरी आवृत्ती
 १०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/तिसरी सुधारित आवृत्ती
 ११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५0/दुसरी सुधारित आवृत्ती
 १२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
 साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६0/रु.१८0/प्रथम आवृत्ती
 १३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.१९४/रु.२00/दुसरी आवृत्ती
 १४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२00/दुसरी आवृत्ती
 १५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२00/तिसरी आवृत्ती  १६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती
 १७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२0१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
 १८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
 साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २00/दुसरी आवृत्ती
 १९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५0 /पहिली आवृत्ती
 २०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३00 /पहिली आवृत्ती
 २१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
 २२. वेचलेली फुले (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती
 २३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५0 /पहिली आवृत्ती
 २४. वाचावे असे काही (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती
 २५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
 २६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५0/पहिली आवृत्ती

 आगामी
 • भारतीय भाषा (समीक्षा)
 • भारतीय साहित्य (समीक्षा)
 • भारतीय लिपी (समीक्षा)
 • वाचन (सैद्धान्तिक)
 * वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन

•••