Jump to content

ना. गोखले चरित्र

विकिस्रोत कडून
महाराष्ट्र ग्रंथप्रसारक मंडळ ग्रंथमाला (नं. १)

ना. गोखले चरित्र.





लेखक
पाण्डुरङ्ग सदाशिव साने, एम्. ए.

प्रस्तावना लेखक
प्रो. दत्तो वामन पोतदार, न्यू पूना कॉलेज, पुणे.





कापडी प्रत किं. २॥ रु.]
[ साधी प्रत किं २ रु.
 








मुद्रक :- पूर्वार्ध - केशव रावजी गोंधळेकर, 'जगद्धितेच्छु' प्रेस
५०७ शनवार पेठ, पुणे.
उत्तरार्ध - शंकर नरहर जोशी 'चित्रशाळा' प्रेस पुणे.
फोटो व हस्ताक्षर - अनंत विनायक पटवर्धन - 'आर्यभूषण'
प्रेस किबेवाडा पुणे.

प्रकाशक :- विश्वनाथ गणेश ताम्हनकर,
१२ बुधवार पेठ, पुणे.

(सर्व मालकी हक्क प्रकाशकाकडे आहेत.)








ना. गोखल्यांचा तरुणांस संदेश.

'What we need to-day above everything else is a band of workers and spread of the gospel of unity and patriotism far and wide throughout the land. Our love of the motherland must grow so fervent and passionate that it will turn all sacrifice for India into a pure joy. What the situation requires is not new ideas, but sacrifice; not talk, but work-work early, work late- work when it is dawn and work when it is dark. No one knows what the future has in store for us, or how much fulfilment our own eyes may witness before they close. There is nothing in the world of ours which may not be achieved by men whose lives are inspired by patriotism, sustained by faith and ennobled by sacrifice. India expects that such men shall now come forward in sufficient numbers in her service.

 19 May, 1906.



प्रकाशकाचे चार शब्द.


 सांप्रतचा काळ ग्रंथकार, प्रकाशक व बुकसेलर या तिघांसही अत्यंत अडचणीचा असा भासत आहे. ग्रंथकार म्हणतात कॉ, आमची व्यर्थ उपासमार होत आहे; बुकसेलरांचीही हीच तक्रार आहे. यांचे परस्परसंबंध काय असावे हें अजून निश्चित झालेलें नाहीं. पण लवकरच हे संबंध परस्परांस हितकर असे होतील असा रंग दिसत आहे. आणि तसे झाल्याशिवाय मराठी वाङ्मयाची वाढ योग्य दिशेने होणार नाहीं. हे हितसंबंध ठरतांना कांहीं फिर्यादीअर्यादी होणें अपरिहार्यच आहे.
 पुस्तकावर छापलेल्या किंमतीपेक्षां कमी किंमतीस पुस्तकें विकण्याची इल्ली एक सुशिक्षित टूम निघाली आहे. या घातक प्रवृत्तीस आळा घालण्याचें काम प्रकाशकांचें आहे, व तसा प्रयत्न प्रकाशकांकडून लवकरच होणार आहे असें समजते. बुकसेलरांस सव्वासहा टक्के, दहा टक्के व कधीं कधीं शून्य कमिशनें देण्याचे प्रकार आमचे नजरेस आले आहेत तेही अनिष्ट होत.
 आम्हांस तर असे वाटतें की, ग्रंथकारांनी रोख किंमत घेऊन पुस्तक कायम हक्कानें विकण्यापेक्षां तें त्यांनीं प्रकाशकांस होणाऱ्या फायद्याचा कांहीं नियमित हिस्सा घेण्याचें ठरवून कायम प्रकाशनाच्या हक्कासह प्रकाशकांस द्यावें हें बरें. यामुळे उभयतांचे हितसंबंध निगडित होणार असून ग्रंथकारांचें विशेष नुकसान न होतां पुस्तकाच्या भरभराटीबरोबर त्यांचीही भरभराट होऊ शकेल. अमुक प्रकाशकानें येवढ्या थोड्या रकमेंत आमचें पुस्तक घेतले अशी निष्कारण व अनाठायीं तक्रार करण्याचें त्यांस कारणच उरणार नाहीं. रा. साने यांनाही आम्ही ही पद्धत सुचविली होती पण ती त्यांना पसंत पडली नाहीं. कोणीं कोणती पद्धत स्वीकारावयाची हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. पण एकदां एक गोष्ट मान्य केल्यानंतर त्या पद्धतीविरुद्ध तक्रार करणें हे केव्हांही इष्ट नव्हे. हे विचार आमच्यापुढे येण्याचे कारण निरनिराळ्या पुस्तकांना ग्रंथकारांनीं लिहिलेल्या प्रस्तावना होत, आम्ही तर असें म्हणतों कीं, प्रत्येक प्रकाशकानें पुस्तकाबद्दल ठरलेल्या अटी त्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीबरोबर प्रसिद्ध कराव्या म्हणजे मागाहून वकिलांची भर करण्याचें कारण पडणार नाहीं.
 सदर चरित्राला सुप्रसिद्ध वाङ्मयभक्त प्रो. दत्तो वामन पोतदार यांनी प्रस्तावना लिहून आम्हांस ऋणी केल्याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहों. या चरित्रांत घालण्यास लेख लिहून दिल्याबद्दल रानडे चरित्राचे लेखक श्रीयुत न. र. फाटक यांचे किती व कसे आभार मानावे हें आम्हांस कळत नाही. उत्तरोत्तर उपरिनिर्दिष्ट उभय वाङ्मयभक्तांनीं नवीन नवीन प्रकाशनकार्य अंगावर घेण्यास उत्तेजन देऊन आम्हांस ऋणी करावे अशी आमची त्यांस विनंति आहे. या चरित्रांत घातलेले सूचीपत्र इतिहासभक्त श्रीयुत आबा चांदोरकर यांनी तयार केले आहे. या पुस्तकाचीं मुद्रितें येथील 'टिळक राष्ट्रीय पाठशाळे'चे मुख्य अध्यापक खादीभक्त रा. रा. वा. वि. साठे, वाङ्मयविशारद, यांनी तपासली असून प्रत्येक पानाला हेडिंग देण्याचें श्रेयही त्यांनाच आहे. ह्या उभयतांचे आम्ही आभारी आहों. पुस्तकांत घातलेला नामदारांचा फोटो व हस्ताक्षर आर्यभूषणचे चालक श्रीयुत वामनरावजी पटवर्धन व व्यवस्थापक केशवरावजी बाळ यांनी आम्हांस दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानण्यास आम्हांला फार आनंद होत आहे. या चरित्राला योग्य तो आश्रय देऊन आम्हांस पुढील चरित्रे प्रसिद्ध करण्यास लोकांनी उत्तेजन द्यावे अशी विनंति करून आम्ही हे चार शब्द पुरे करतों.

विश्वनाथ गणेश ताम्हनकर.

ता. २७-२-२५.
प्रस्तावना.

ग्रंथ आणि ग्रंथकार
यांचा

अल्प परिचय.


कांहीं एक उत्कटेंविण । कीर्ति कदापि नव्हे जाण ॥

श्रीसमर्थ.


 कै. नामदार गोपाळ कृष्ण गोखले या थोर देशभक्ताचें मराठी चरित्र त्यांच्या दहाव्या श्राद्धतिथीच्या शुभप्रसंगी रा. ताम्हनकर हे प्रसिद्ध करीत आहेत ही अभिनंदनीय गोष्ट आहे. यापूर्वी गोखले यांची एक दोन बऱ्यापैकी चरित्रे मराठीत प्रसिद्ध झालेली आहेत सांप्रत माझे मित्र रा. नरहरि रघुनाथ फाटक बी. ए. रानडे-चरित्रकर्ते हे गोपाळरावजींचें विस्तृत चरित्र लिहीत आहेत आणि तें निदान पुढील श्राद्धदिनीं वाचकांचे हाती पडेल अशी आशा आहे. प्रस्तुत प्रसिद्ध होत असलेलें हें गोखलेचरित्र अगदीं त्रोटकही नाहीं आणि अगदी सविस्तरही नाहीं, तर मध्यम आहे; आणि या दृष्टीने पाहतां अशा मध्यम ग्रंथाची जरूरी सहज कळून येईल.
 गोखले यांचें असें मध्यम चरित्र आपण प्रसिद्ध करावें अशी रा. ताम्हनकर यांस विशेष इच्छा होती. जेव्हां रा. फाटक यांचा ग्रंथ यंदाच्या श्राद्धतिथीला प्रसिद्ध होत नाहीं असें कळलें तेव्हां ही त्यांची आतुरता वाढली. परंतु यावेळीं श्राद्धतिथीला उणापुरा एक महिना सुद्धा उरला नव्हता, एवढ्या अत्यल्प अवधींत चरित्र लिहून प्रसिद्ध कसें व्हावे ही अडचण होती. गोष्टींत गोष्ट निघतांना मी रा. पां. स. साने एम. ए. यांच्या एतद्विषयक हस्तलिखिताची माहिती रा. ताम्हनकर यांस दिली. मुंबई युनिव्हर्सिटीनें गोखले- चरित्रावर मराठीत निबंध लिहून पाठविणारास बक्षीस लाविलें आहे. आणि त्यासाठी दुसऱ्या एक दोन होतकरू लेखकांप्रमाणे रा. साने हेही प्रयत्न करीत होते असे मला ठाऊक होतें. ठराविक मुदतीत रा. साने यांजला आपले काम संपवितां आलें नाहीं, तेव्हां त्यांचा चरित्रप्रबंध त्यांजवळ पडूनच राहिला होता. पूर्वी कॉलेजांत मराठी शिकत असतां स्वभाषेत लेख लिहिण्याचे कामी रा. साने यांचा हात फार चांगला चालत असे, असा प्रत्यय मजला आलेला होता. आणि पुढें पुण्याच्या डेक्कन व्हरनॅक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीने लोकहितवादींचे मराठी चरित्र बक्षीस लावून मागितलें असतां रा. साने यांनी ते तयार करून मजला दाखवून सदरहू सोसायटीकडे धाडलें होतें. त्यावरून त्यांच्या लेखन- कौशल्याविषयींचा माझा अनुकूल ग्रह दृढतरच झाला. अखेर या लोकहितवादी चरित्राबद्दल त्यांस दुसऱ्या एका विद्वानाचे बरोबरीनें बाक्षिसाचा वांटा मिळाला. तेव्हां तें चरित्र छापविण्याविषयीं मीं त्यांस आग्रह केला होता. इतक्यांत त्यांनी गोखले- चरित्राकडे आपले लक्ष्य लावलें. रा. साने हे आमच्या न्यू पूना कॉलेजांतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सर्वमान्य झालेले होते. त्यांची बुद्धि कुशाग्र होती तसेच त्यांचे मन अत्यंत सुविनीत होतें. असा विद्यार्थी, मराठी भाषेसाठी विद्यापीठाने थोडीशी वाव कोपऱ्यांत दिली असतां मायभाषेवरील प्रेमानें तिच्या स्वागतार्थ पुढे आला याचें मजला त्यावेळी कौतुक वाटले व आज या चरित्रग्रंथाचा पुरस्कार करतांना प्रेम आणि अभिमान यांची त्या कौतुकांत भर पडली आहे. किंबहुना ग्रंथपरिचयाचे हे दोन शब्द लिहिण्याचे पत्करण्यास हा ओढाच सर्वांशी कारण झाला आहे.
 महाराष्ट्रांतील थोर पुरुषांची चरित्रे लिहिण्याकडे व वाचण्याकडे लोकांची प्रवृत्ति सांप्रत बरीच वळलेली दिसते. रा. नरसोपंत केळकर यांनी टिळकचरित्राचा एक सुंदर व मोठा खंड नुकताच प्रसिद्ध करून आपणावरील जबाबदारी निम्मी पार पाडली आहे. रा. फाटक यांनी रानडेचरित्रावर एक विस्तृत ग्रंथ प्रसिद्ध केला आहे, व द्वितीयावृत्तीच्या समयीं तो दुप्पट मोठा होईल असें दिसतें. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचें चटकदार चरित्र पूर्वीच त्यांचे बंधूंनी लिहिलेलें लोकप्रिय झाले आहे. आगरकर यांचें मात्र चांगलें सविस्तर चरित्र अद्यापि झालें नाहीं. परंतु तीहि उणीव एक तरुण पिढींतील विद्वान् लेखक भरून काढण्याचे विचारांत आहेत असें परवां ऐकण्यांत आलें. सार्वजनिक काकांचें चरित्रही एका साक्षेपी लेखकानें लिहून तयार केलेलें नुकतेच पहाण्यांत आलें आहे. नाना मोरोजी, जगन्नाथ शंकरशेट, शाहू छत्रपति ह्यांचीं चरित्रेंही आजवर छापून निघाली आहेत. महात्मा गांधी यांचीं निदान तीन मोठीं चरित्रे मराठींत झाली आहेत. बंडुनाना रानडे, नूलकर, विश्राम, कुंटेप्रभृतींची छोटी चरित्रे कै. वामनराव रानडे यांनीं लिहिलेली होती. त्यांतील एक चरित्र- पंचक हल्ली बहुतेक छापून झाले आहे. देव मामलेदार, केतकर, अण्णा किर्लोस्कर, भाऊराव कोल्हटकर, कीर्तने, राजाराम रामकृष्ण भागवत गुलाबराव महाराज, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुपंत छत्रे, बापू मेहेंदळे, अक्कलकोटस्वामी, इत्यादिकांचीही कांहीं फुटकळ व कांहीं विस्तृत चरित्रे मराठींत छापलेली आहेत. तेलंग, अण्णासाहेब पटवर्धन यांची चरित्रे लिहिण्याची उचल वर्षांतून त्यांची श्राद्धतिथी साजरी करतांना एकदां होते, परंतु तीं लिहिण्यास कोणी तरी उत्साहानें पुढे येईल असें वाटतें.
 वरील हकीकतीवरून दिसेल की, अर्वाचीन थोर पुरुषांच्या चरित्रांची भूक महाराष्ट्रांत दिवसेंदिवस वाढत आहे यांत संशय नाहीं. पूर्वीची चरित्रें अगदी फुटकळ असत. तेव्हां तितकी माहिती नसे व तत्कालीन पुढारी मंडळीचा व्यापही लहान असें असे सापेक्षतेनें वाटतें, हल्लीं कर्तृत्व वाढलें आहे, साधनें वाढली आहेत व जिज्ञासाही वाढली आहे. हीं सर्व सुचिन्हें आहेत व याचेंच एक प्रत्यंतर रा. साने यांनी आणून दिले आहे.
 थोर पुरुषांचीं चरित्रें हीं राष्ट्राची बहुमोल संपत्ति आहे. त्या भांडवलाचे बळावर राष्ट्र आपला भावी संसार चालवितांना हिंमतीने पुढे पाऊल टाकतात. तरुण मंडळीच्या बुद्धीस हीं चरित्रे म्हणजे एक प्रकारचा खुराकच असतो. तो त्यांस सतत पुरविणें अगत्याचे आहे. थोरांचे पाऊलावर पाऊल ठेवून त्यांचा मार्ग चोखाळणें हें जसें पवित्र कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गांचा, हेतूंचा, ध्येयांचा उलगडा करून ती लोकांपुढे ठेवणे ही देखील मोठी राष्ट्रसेवा आहे. कर्त्या पुरुषांची सांप्र दायगंगा अखंड वाहती ठेवण्यास या चरित्रांचा मोठा उपयोग होत असतो. गोपाळराव गोखले हे रानडे, दादाभाई यांच्या सांप्रदायांत मोडतात. ब्रिटिश साम्राज्याचे कक्षेत राहून आपल्या प्रिय भारतभूमीस सुखाचा स्वर्ग गांठतां येईल अशी या सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. शुद्ध स्वातंत्र्यवादाला या सांप्रदायांत अवकाश दिलेला नाहीं.
 गोपाळराव किंवा रानडे यांच्या चरित्राचे रहस्य यथावत् उलगडून सांगण्यास जर त्यांच्या वर वर्णिलेल्या सांप्रदायांतलाच कोणी एकनिष्ठ पाईक मिळेल तर तो त्यांचे जे चरित्र निर्माण करील त्यांत त्यांच्या अंतःकरणाचे सूक्ष्म पापुद्रे तो मोकळे करून दाखवील. अंतःकरणाच्या सामरस्यामुळे सांप्रदायिकाचे चरित्रांत भक्तिरस ओथंबलेला असतो. थोरल्या नेपोलियनचें धाकट्या नेपोलियननें काढलेलें चित्र या भावनेचें द्योतक समजतां येईल. गोपाळरावांनी रानडे यांचे चरित्र जर संकल्पाप्रमाणें लिहिलें असतें, तर एका सच्छिष्यानें आपल्या सद्गुरू काढिलेलें नामी चरित्रचित्र आपणांस पहाण्यास सांपडतें व त्यांत मक्तिमत्वाचा उद्रेक आपले नजरेंत उत्तम भरता. माधवरांवांचे जसे गोपाळराव तसे गोपाळरावांचे असल्यास कोण हें सांगणें अमळ कठिणच आहे. परंतु कोणी तसली मूर्ति कल्पिल्यास गोपाळरावांचे भक्तिरसपरिपूर्ण उज्वल व मधुर चरित्र आपणांस तिच्याकडून वाचावयास मिळेल. हीं सांप्रदायिक चरित्रे जरी एका दृष्टीने आंतील भक्तिरसामुळे मोठी रसाळ वठतात तथापि त्यांत गुणगौरवाचा अतिशय झालेला असतो आणि त्यामुळे चरित्रवस्तूचें हीनांग झांकले जाऊन यथार्थ बोध होत नाहीं, आणि अपूर्ण वस्तुदर्शनाने सत्यही लोपून आपली दिशाभूल होते. एकीकडे रसाळपणाचा उत्कर्ष होतो, तर दुसरीकडे चोखटपणास आपण आंचवतों. या जातीच्या चरित्रांचें पर्यवसान चरित्रवस्तूच्या देवीकरणांत (डीइफिकेशन) होतें.
 उलट फिशर रोझवरी सारख्या इंग्रजांनीं नेपोलियनची काढलेली चरित्रतसबीर घ्या. ती उत्कट भक्तिरसानें तितकी रंगलेली असणार नाहीं. अथवा जर्मनीचीं शकलें एकत्र सांधून प्रबल जर्मनराष्ट्र निर्माण करणारा महान् मुत्सद्दी जो बिस्मार्क ह्याचें एकाद्या इंग्रज किंवा फ्रेंच चरित्रकाराने लिहि लेले चरित्र घ्या. त्यांत विपरीत दर्शन व्हावयाचाच संभव विशेष. येथें चरित्रवस्तूविषयीं चरित्रकाराच्या मनांत भक्तिरस उचंबळत नसून भय किंवा अशाच अन्य अनिष्ट विकारांची छाप पडलेली दिसेल. प्रेमाची आर्द्रता येथे न आढळतां विरोधाची कठोरता आपणांस प्रत्ययाला येईल. सांप्रदायिक चरित्रकार जर गुणसागरांत बुडून वाचकांस बुडवूं पहात असेल तर विरोधी चरित्रकार दोषगर्तेत आपण उडी घेऊन वाचकांसहीं तींत लोटू पाहील. सांप्रदायिक चरित्रकार जर चरित्रविषयास देव बनवील तर विरोधी चरित्रकार त्यास दैत्य ठरवील. परमाणुएवढा गुण पाहिला तर त्याचा पहिला जर पर्वत करील, तर उलट दुसरा 'कुसळा' एवढा दोष असला, तर तो 'मुसळा' एवढा फुगवील. एकूण काय, पहिल्या पद्धतीत देवीकरणाचा तर दुसऱ्या पद्धतींत दानवीकरणाचा पण अतिरेकच दृष्टीस पडावयाचा.
 आतां भक्तीचा आणि विभक्तीचा असे हे दोन्ही चरित्रप्रकार एकांगी किंवा अतिरेकी म्हणून सोडून दिले तर सत्यदर्शनासाठी तिसराच पंथ स्वीकारावा लागतो. तो म्हटला म्हणजे त्रयस्थानें लिहलेलें चरित्र स्वीकारणें हा होय. त्रयस्थाची भूमिकाच वरील भक्तविभक्तांहून भिन्न असते. त्यामुळे तो अतिरेकदोषानें व्याप्त होण्याचा संभवच नसतो. गुण आणि दोष यांची नीट परीक्षा करून सावकाशपणानें व विकारवश न होतां तो आपला अभिप्राय प्रगट करतो. भक्तिप्रेमानें तो आंधळा बनत नाही किंवा रागद्वेषानें तो डोळे फाडीत नाहीं. प्रशांत दृष्टीनें आणि प्रसन्नमनानें तो गुण पाहतांच लोभून जातो व दोष दिसतांच डोळ्याला पदर लावतो. आपल्या वाचकांस त्रयस्थ हा गुणांच्या पर्वतांवरच रमवीत नाहीं अथवा दोषांच्या खाचांतच कुजवीत नाहीं, तर तो त्यांस पृथ्वीच्या सपाटीवरून चालवितो. याचाच अर्थ असा कीं देवीकरण अथवा दानवीकरण या दोन्ही अतिरेकी प्रकारापासून दूर राहून तो मानवीकरणाची साधी आणि सत्य भूमिका पत्करतो. तो चरित्रविषयांस देवकोटीत चढवीत नाहीं किंवा दानवकोटीत ढकलीत नाहीं; तर मानवकोटींतच ठेवतो. पण या योगानें त्याचें चरित्रचित्र जनदृष्टीनें तितकें परिणामकारक होत नाहीं. त्यांत भक्तीची दिव्यता आढळावयाची नाहीं किंवा विरोधाची क्रूरता दिसावयाची नाहीं. अर्थात हें असले त्रयस्थकृत चरित्र वाचून बाहू क्वचितच् फुरफुरतील किंवा हात क्वचितच् शिवशिवतील.
 ही त्रयस्थाची भूमिका घेणारा कोणी परदेशीय किंवा परधर्मीयच पाहिजे असे मात्र नाहीं. सांप्रदायिकांत किंवा विरोध्यांत सर्वच कांहीं सारखे अतिरेकी नसतात. पुष्कळ विचारी असतात; आणि जेव्हां जेव्हां आपण घटकाभर मन शांत करून राहतो किंवा तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे 'बैसोनी निवांत । शुद्ध करोनिया चित्त' असे असतो तेव्हां तेव्हां आपणहि एक प्रकारचे त्रयस्थच असतो. भक्तीचे किंवा विभक्तचि झटके सर्वासच येतात. परंतु वर वर्णिलेली शांतनिवांत स्थिति थोडेच अनुभवितात. तथापि सत्यदर्शनाचा अपार आनंद भोगावयाचा असल्यास ही त्रयस्थ भूमिका अत्यावश्य आहे. काल ही एक अशी शक्ति आहे की तिच्या साहाय्यानेंहि त्रयस्थपणाकडे माणसांचा व समाजांचा आपोआप कल झुकत जातो. काल लोटला की भक्तीचा पूर ओसरतो, व द्वेषाचे अंगार निवतात. त्यामुळे मागल्या पिढीतील व्यक्तीची किंवा वृत्तांची पुढील पिढीत चर्चा होत असतां एक प्रकारचा तटस्थपणा नकळत अंगीं येतो. काळ बराच लोटला की भक्तीचा गहिंवर उतरत असतो आणि द्वेषाचे व्रण बुजत आलेले असतात. त्यामुळे नवीन पिढींत जुन्या पिढी संबंधानें त्रयस्थपणाची छटा, आंत दडून कां होईना, पण असते. आणि काल जसा अधिक लोटेल तशी ती त्रयस्थपणाची कलाहि पण वाढत जाईल. ती इतकीं कीं फार पुढे पुढें कदाचित् विस्मरणाचे डोंगर आड येऊन एक निराळीच भूल समाजाला पडलेली कोठें कोठें दिसतें.
 येथवर आपण सांप्रदायिक, विरोधक आणि त्रयस्थ किंवा तटस्थ यांनीं लिहिलेलीं चरित्रें चरित्रविषयाला अनुक्रमें देव-दानव-मानव पदवीला कशीं पोचवितात व त्यांत देव-दानव कोटी ह्या अतिमानुष कोटींपेक्षां मानव कोटी ही आपणा मनुष्यांच्या प्रकृतीला जुळणारी असल्यामुळे ती सत्याला सर्वात अधिक जवळ कशी आहे इत्यादि मुद्यांचे दिग्दर्शन केलें.
 वरील प्रपंच करण्याचे प्रयोजन एवढेच कीं, रा. साने यांनी लिहिलेले प्रस्तुत चरित्र आपणांस या दृष्टीने पाहतां यावें. गोपाळरावांच्या चरित्रांत खळबळीचे व वादाचे अनेक प्रसंग आहेत. टिळक- गोखले वाद म्हणजे आधुनिक काळांतील एक भारतच होईल, आणि या वादांतील उभय पक्षांतील मुख्य प्रतिपक्षी दोघेहि जरी आज दिवंगत झाले आहेत तरी त्यांच्या भक्तानुयायांत या वादाची ही खणाखणी अद्यापि हि चांगलीच होते. टिळकचरित्रकार केळकर आणि रानडे चरित्रकार फाटक यांचा वाद ताजा आहे. 'टिळक-जीवनरहस्य'हि एका टिळक विरोधी लेखकाकरवीं प्रकट करण्यांत आलें आहे आणि कोणी तसलेच 'गोखले- जीवनरहस्य'हि लवकरच लिहिणार नाहीं म्हणून कशावरून? तेव्हां अशा स्थितींत त्रयस्थाच्या भूमिकेला म्हणावा तेवढा वाव अद्यापि झाला आहे असें म्हणतां येत नाहीं. अजून कांहीं काळ गेला पाहिजे.
 पण एक चमत्कार मात्र सांगण्याजोगा आहे. गोपाळराव आणि बळवंतराव या दोघां देशभक्तांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रेतयात्रा ज्या निघाल्या त्यांत दोघांनाहि राष्ट्रानें आपल्या हृदयांत केवढे उच्च स्थान दिले आहे याचा स्पष्ट पुरावा आपणांस आणि भावी पिढयांस मिळत आहे. आणि चमत्कारांतला चमत्कार असा की, राजनिष्ठ म्हणून गाजलेल्या मुंबईच्या नव्या राजधानीत राजद्रोही म्हणून शिक्षा झालेल्या टिळकांचा देह पडला आणि सरकारविरोधी म्हणून शापलेल्या पुण्याच्या जुन्या राजधानीत सी. आय. ई. म्हणून राजसन्मान मिळवलेल्या गोखल्यांचा अंत झाला! हा एक योगायोगच नव्हे तर काय? यावरून एवढे निर्विवाद होतें कीं, दोघेहि थोर लोकसेवक समाजानें वंद्य मानले आहेत. आतां तपशीलाच्या मुद्यांवर वादीप्रतिवादी केवढेही त्वेषाने तुटून पडून भांडोत! जनतेनें स्वयंस्फूर्तीनें शिक्कामोर्तब केलेली या दोघां वंद्य पुरुषांची थोरवी कोणासही हिरावून घेतां येणार नाहीं! त्या थोरवीच्या स्वरूपासंबंधानेही जरी मतभेद होईल तरी हे लहानमोठे मतभेदाचे मुद्दे जशी अधिक चर्चा होईल व आपण जरा पुढे जाऊं तसे स्पष्ट होतील. अद्यापि त्रयस्थास त्या संबंधानें निर्णायक बोलण्याची वेळ आलेली दिसत नाहीं. मात्र मागें सांगितल्याप्रमाणें या थोर पुरुषांच्या संबंधानें 'आठवणी', चरित्रे, चर्चा, अधिकाधिक प्रसिद्ध होत आहेत व त्यावरून तो काळ लवकरच येईल अशी आशा वाटते. देशप्रगतीच्या विविधांगांचे व मूलतत्त्वांचें सम्यग्ज्ञान व त्यांचा आचारात्मक अनुभव अजून आमच्या लोकांस चांगला आलेला नाहीं पण येत चाललेला आहे आणि म्हणूनच निर्णायक मत देण्यास अनुकूलसा काळही जवळ येत आहे असें वर सुचविण्यांत आलें आहे.
 रा. साने यांचें प्रस्तुत चरित्र हें वरील दिशेनें वारा वाहूं लागल्याचे एक चिन्ह आहे असे समजण्यास चिंता नाहीं. रा. साने हे टिळक-गोखल्यांचे पिढींत वाढले नसून अगदीं उदयोन्मुख पिढीतले एक होतकरू पदवीधर आहेत. टिळकांना व कदाचित् गोखल्यांना त्यांनीं त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीअखेरीला पाहिलें असेल. आज या थोर पुरुषांशीं समागम करून घेण्यास त्या पुरुषांची भाषणे, लेख व कृती व त्यांचेविषयीं इतरांनी व्यक्त केलेले विचार व प्रगट केलेली माहिती यांवरच अवलंबून राहून रा. साने यांस आपले मत लिहावयास पाहिजे. ही मर्यादा संभाळून निःपक्षपाती दृष्टीने रा. साने यांनीं आपलें बिकट काम केलें आहे. त्यांची त्रयस्थाची भूमिका आहे. आणि अद्यापि जरी या भूमिकेस पूर्णावकाश झालेला दिसत नाहीं तरी त्या बाजूची पाउलवाट झालेली आहे आणि रा. साने त्याच वाटेने आपली चाल चालले आहेत.
 वरील भूमिकाविशेषाचा मुद्दा सोडला तरीहि रा. साने यांचें प्रस्तुत चरित्र आपणांस प्रियच होईल. कारण रा. साने यांची भाषाशैली प्रसंशनीय आहे. तिच्यांत तारुण्याचा आवेश जसा चमकतो तसाच तारुण्यांतील निर्मळपणाही लकाकत आहे. इंग्रजी, मराठी व संस्कृत या तिन्ही वाङ्मयांशीं त्यांचा जो निकट परिचय आहे त्याचेही प्रतिबिंब ग्रंथांत जागजागी पडलेलें आपणांस दिसून आनंद होतो. देशप्रीति आणि देशसेवार्ति यांचे पाझर रा. साने यांच्या ग्रंथांत जागोजाग फुटलेले दिसतात त्यामुळें प्रस्तुत ग्रंथ फार मधुर झाला आहे.
 थोर पुरुषांच्या मुख्य दोन कोटि कल्पितां येतात. एक विचारस्रष्ट्यांची व दुसरी कार्यकर्त्यांची. श्रीकृष्ण, शंकराचार्य, कान्ट, स्पेन्सर, रूसो, बुद्ध, माझिनी, रामदास हे पहिल्या कोटींत येतील आणि अर्जुन, शिवाजी, नेपोलियन, वाशिंग्टन्, कव्हूर वगैरे दुसऱ्या कोटींत पडतील, विचारस्रष्ट्यांचा मागोवा घेत कार्यकर्ते जर गेले तर होणारे परिणाम फार विशाल व चिरस्थाई होतात व समाजाची प्रगति फार झपाटयानें व निश्चयानें होते. मानवी प्रगतीच्या दरबारांत विचारस्रष्टे आणि कार्यकर्ते या दोघांनाहि सर्वोच्च स्थानें दिली पाहिजेत हें जरी खरे आहे तरी त्यांतल्या त्यांत विचारस्रष्ट्यांचा मान उजव्या बाजूस बसण्याचा आणि कार्यकर्त्यांचा मान डाव्या बाजूस असण्याचा आहे, हा फरक ध्यानांत ठेविला पाहिजे.
 याप्रमाणे विचार केला तर नामदार गोपाळराव गोखले हे विचारस्रष्ट्यांच्या उच्च कोटींत बसवितां येत नाहींत. त्यांचे गुरु रानडे यांचे ठायीं पहिल्या कोटीची म्हणजे विचारी कोटीची कला निःसंशय होती. तशीच चमक सुप्रसिद्ध आंकडेशास्त्री व महापंडित कै. रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांचे ठिकाणीं होती. रानडे व जोशी या दोघांचाहि निकट सहवास गोपाळराव यांस लाभला होता व त्याचा त्यांनी भरपूर उपयोग करून घेऊन आपली लायकी वाढविली. कॉलेजांतले गोपाळरावांचें अध्यापन किंवा पुढे उदयकालांतील कौन्सिलांतील लोक सेवा हीं पाहतां त्यांत सूक्ष्म अभ्यास, दीर्घ दृष्टि, नेमस्तपणा, मुद्देसूदपणा, सफाईदारपणा, भारदस्तपणा आणि मधुरपणा इत्यादि पुष्कळ प्रशंसनीय गुण दिसले तरी विचारांची अभिनवता किंवा कल्पकता हें भरारीचे गुण आढळत नाहींत. आणि म्हणूनच गोखल्यांचे लिहिणें, बोलणें कधींहि 'आर्ष' (क्लासिक) कोटींत पडणार नाहीं. परवां (ता. १९/२/२५) डॉ. मेक्निकल् यांनींहि गोपाळरावांना 'ऋषि' कोटीत दाखल केलें नाहीं त्याचें मर्म हेंच होय. सीअर, द्रष्टा किंवा ऋषि ह्या कोटीची छटा रानड्यांत होती ती शिष्यांत उतरली नाहीं. शिष्याचा सर्व काळ 'धकाधकीच्या मामल्यांत'च गेला.
 या धकाधकीच्या मामल्यांत मात्र गोपाळरावांची कामगिरी स्पृहणीय झाली. त्यांच्या मोठेपणाचे बीज सर्व यांतच आहे. वयाच्या विशीच्या आंत पदवीधर होऊन वयाच्या पन्नाशीच्या आंत परकीय सरकाराच्या दरबारी प्रजापक्षाचा खंदा वीर म्हणून त्या सरकारची आदब संभाळून तडाखे देत देत त्याजकडूनहि 'धन्य धन्य' असें उद्गार वदविणें ही कामगिरी असामान्य कोटीतली आहे यांत संदेह नाहीं.
 ही अपूर्व कामगिरी गोपाळरावांनी ज्या गुणांचे जोरावर बजाविली ते गुण आपल्या अंगी बाणविण्याचा जर आमच्या देशांतील तरुण लोक प्रयत्न करतील तरच त्यांचें चरित्र लिहिल्याचे किंवा वाचल्याचे सार्थक झालें असें होणार आहे. गोपाळरावांचे हे गुण येथे थोडक्यांत वर्णितों:-
 (१) कष्टाळूपणा- सर्व थोरपणाचें मुख्य कारण कष्टाळूपणा हें होय. समर्थांनी जागोजागी सांगितले आहे की "रूप लावण्य अभ्यासितां नये । सहज गुणासि न चले उपायें । कांहीं तरी धरावी सोये । आगांतुक गुणांची ॥" द्रष्टेपणाचा डोळा जिनें फुटतो ती प्रतिभा, ही सहजगुणांतली आहे. तें 'ईश्वरी देणें' आहे. पण कष्ट, दीर्घोद्योग हा मनुष्याचें हातांतला आहे. उद्योग किंवा प्रयत्न हा प्रसंग सहजगुणापेक्षांहि कमावला तर प्रभावी ठरतो, इतकें याचे महत्त्व आहे. यासाठीच समर्थांनी म्हटले आहे 'कष्टेंवीण फळ नाहीं । कष्टेंवीण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥' हा कष्टाचा आगांतुक गुण गोपाळरावांनी उत्तम प्रकारें कमावून प्रतिभादि सहजगुणांची उणीव भरून काढिली. या गुणाचे बळावर त्यांनी कौन्सिलांतले आपले प्रतिपक्षी चीत केले. इंग्रजी भाषा उणी पडली तर आम्हां नेटिवांना हंसतात काय? फांकडे इंग्रजी बोलणारे म्हणून आपण लौकिक संपादणार अशी ईर्ष्या धरून त्यांनी कष्ट केले. आंकडेशास्त्रांतली माहिती कच्ची असली तर आमचा सरकारी सभासद उपहास करतात काय तर आंकडे पुस्तकांच्या समुद्रांत बुड्या मारमारून व तारवें हांकहांकून ते त्यांतील सराईत नावाडीच बनले. असे पडतील ते कष्ट त्यांनी केले. नसते केले तर फर्ग्युसन कॉलेजांतील शिदोरीवर अवलंबून एवढा पल्ला त्यांच्यानें खचित गांठवला जाता ना! पण कष्टाचे बळावर त्यांनी 'असाध्य तें साध्य' करून घेतलें.
 (२) 'नेमस्तपणा'- हाहि एक दुसरा महत्त्वाचा गुण गोपाळरावांचे अंगीं होता. आपल्या सर्व भावनांचे लगाम विवेकाचे हाती देऊन आपला जीवितरथ चालविण्याची सावधगिरी त्यांनी बाळगिली, त्यामुळें त्याचें आयुष्य इतकें यशस्वी झालें, प्रत्यक्ष व्यवहारांत काम करतांना कल्पनांना मुरड घालावी लागते. कल्पकता हा एक सहजगुण आहे व तो श्रेष्ठ आहे. भावना आणि कल्पना यांशिवाय हें जीवित निष्फल आणि निःसार होईल यांत संशय नाहीं. पण कल्पनेचा धर्मच असा आहे कीं, ती नेहेमी जोरजोरानें उशी घेते. जसा जातिवंत मस्त वारू असावा आणि तो चौफेर उधळला म्हणजे त्याची टाप अस्मानांत गेलेली भुईला पुनः केव्हां चिकटली तें दिसतच नाहीं तसेंच कल्पनेचें आहे, कल्पनेचें तारू एकदां भडकलें कीं कोठें जाईल याचा नेम नाहीं; उतरलें तर एकाद्या सुंदर बेटावर उतरेल नाहींपेक्षां खडकावर फुटेल किंवा रेतींत रुतेल! यासाठीं कल्पनेला नेहेमी बांधून चालविली पाहिजे. व्यवहाराच्या जड शृंखळा कल्पनेच्या पायांत घालून तिला नाचविली म्हणजे तिचा खेळ मनोहर होतो. या कल्पना गुणाचा उत्कर्ष गोपाळरावांत नव्हता. तथापि प्रत्येक मनुष्यमात्राला अंशमात्रानें सर्वच गुण थोडेफार वांटणीला आलेले असतात. आपल्या वांटणीला आलेल्या भावना उद्दाम होऊ न देतां गोपाळरावांनी त्यांना कार्यवश ठेवल्या म्हणून त्यांची नेमस्त अशी ख्याति झाली. राजकारणी पुरुषांना हा नेमस्तपणाचा समर्थांनी स्तविलेला गुण फार उपयोगी पडतो. या गुणाचें उच्च स्वरूप म्हणजे चतुरपणा व मुत्सद्दीपणा आणि याचें अधम स्वरूप म्हणजे नेभळटपणा व दीनपणा होय. गोपाळरावांनी नेमस्तपणाचे उच्च स्वरूप जगापुढे प्रकट केलें आणि यांत जरी एखाद्या काव्हूरशीं त्यांची बरोबरी कल्पिणे ही अतिशयोक्तीच ठरेल तरी एखाद्या बर्कच्या जोडीला त्यांस ठेवण्यास चिंता नाहीं.
 (३) श्रद्धा- श्रद्धा हा त्यांचा तिसरा गुण वर्णन करतां येईल. रानड्यांचे ठिकाणी श्रद्धा बळकट होती. आणि 'हॅपी आर दे' या बहुपठित उद्गारांत त्यांनी ज्या प्रॉमिस्डलँड ग्हणजे भावी स्वर्ग-संबंधींचा आशावाद प्रदर्शित केला आहे त्यांचाच अनुवाद गोखले यांनी काशी- काँग्रेसचे अध्यक्षपीठावरूनहि केला. यावरून श्रद्धेचें हें वारे गोपाळरावांनाही लागलेलें होतें. वयाच्या उत्तर काळांत गोपाळरावांच्या मनांत हा श्रद्धाळूपणा वाढत गेला असे चरित्रकारांनी सुचविले आहे. हें श्रद्धाबळ हेहि सर्व थोर पुरुषांच्या ठिकाणी वसत असलेले आढळून येते "योयच्छ्रद्धः स एव सः" हा भगवद्गीतेचा सिद्धान्त सत्य आहे आणि मनाला श्रद्धेनें कांही थोर वेड लावून जीवेंभावें झटल्याखेरीज महत्कार्य कधीच होत नाहीं. श्रद्धाबळ हें कांहीं गोपाळरावांचें प्रधानबळ नव्हे आणि म्हणून क्रान्तिदर्शित्वाचा लाभ त्यांस कधीं घडला नाहीं. रानड्यांना तो थोडासा घडला व आपल्या गुरूवरच श्रद्धा ठेवून त्यांजकडून मिळालेल्या श्रद्धेच्या ठेवीवरच गोपाळरावांनीं आपलें काम साधून घेतलें.
 (४) सौजन्य: – शिष्टपणाची वागणूक हा चौथा मोठा गुण गोपाळरावांनी संपादिला होता. लहानपणापासूनच तशी त्यांची प्रवृत्ति होती व पुढे तारुण्यांत, जेव्हां दृष्टि फांकते त्यावेळीही, त्यांनीं आपल्या मनाला आंवरून मर्यादेनें वागणूक केली. त्यामुळे अखेर पावेतों त्यांचे ठिकाणीं सज्जनपणा कायम राहिला. सार्वजनिक आयुष्यक्रमांत बरे वाईट पुष्कळ प्रसंग आले तथापि त्यांनीं निदान स्वतः तरी शिष्टाचाराचा अतिक्रम केलेला दाखवितां येणार नाहीं. मोठया पुढाऱ्यांचे क्षुद्र अनुयायी एकमेकांवर भोंकतात यांत आश्चर्य नाहीं पण त्यापासून खुद्द मोठ्यांनी दूर राहावें लागतें आणि ही मर्यादा गोपाळरावांनी पाळिली होती. त्यांचे गुरु माधवराव हे तर सौजन्यसागर म्हणूनच प्रसिद्ध होते.
 (५) निस्वार्थीपणा- पांचवा गुण गोपाळरावांचा निःस्वार्थीपणा हा सांगतां येण्यासारखा आहे. स्वतःकरितां व कुटुंबीयांकरितां कष्ट करणारी 'कुटुंबकाबाडी' उदंड पडली आहेत. पण देशहितासाठीं आपली काया झिजवून आणि माया खर्चून मागें कीर्ति उरविणारे गोपाळरावांसारखे विरळाच. फकिरी बाण्याचा निस्वार्थीपणा हा त्या गुणाचा कडेलोट होय. कडेलोटाचा मार्ग व्यावहारिकांचा नव्हे. व्यावहारिक हे नेमस्तपणाची मर्यादा संभाळूनच चालणार आणि तेंच धोरण गोपाळरावांनी आचरिलें.
 (६) देशप्रीति - वरील पांचांपेक्षांही हा सहावा गुण एक प्रकारें फार महत्त्वाचा होय. आपला देश सुखी व्हावा ही तळमळ पोटांत गोपाळरावांनी अहोरात्र वागविली होती. त्यांची शुद्ध व सोज्वळ देशप्रीति त्यांचे प्रतिपक्षी*[] यांसही निःसंशय मान्य करावी लागे, अशी प्रखर होती. सामान्य जनसमूहाला ती दिसण्याचे प्रसंग तितके येत नसत. तथापि त्यांचा आत्मा देशाच्या भावी हितासाठी तळमळत असे आणि तोच त्यांस आंतून निरंतर जागवीत असे. ही देशप्रीतीची आग आंत नसती तर त्यांचे हातून झाला हा उद्योग झाला नसता. त्यांनी चटकन् सरकारी अधिकाऱ्यांची कृपा संपादून एखादी लठ्ठ पगाराची नोकरी मिळवून आणि वर मोठेपणाही मिरविण्याची एखादी युक्ति पसंत केली असती! पण
 आपल्या देशाची स्थिति अत्यंत वाईट झालेली आहे व या गोष्टीचा वेळींच जर लोकांनीं कांहीं बंदोबस्त केला नाहीं तर आमचा रोग दुःसाध्य होईल अशी कळकळ ज्यांना मनापासून वाटत आहे अशांमध्ये ना. गोखले यांची गणना केली पाहिजे, देशस्थितीसंबंधानें इतर कोणाला जितके वाईट वाटत असेल व कांहीं तरी उपाय योजणें जरूर आहे याविषयीं इतर कोणाला जितकी काळजी वाटत असेल तितकेंच वाईट ना. गोखले यांना वाटत असून देशाबद्दल तितकीच काळजी तेही वाहात आहेत. कळकळीच्या कमीजास्तपणामुळे नवीन पक्ष व ना. गोखले यांच्या राजकाणांत भेद उत्पन्न झालेला नाहीं. हा भेद स्वभावाचा व विचारसरणीचा आहे" (केसरी- अग्रलेख ता. १२ फेब्रुवारी १९०७).
 असले भिकार मोह त्यांनीं आपल्या शुद्ध आत्म्यास कधीही होऊ दिले नाहीत तर देशहिताची शुद्ध, पवित्र आणि थोर चिंताच रात्रंदिवस वाहिली म्हणूनच ते येवढ्या महत्पदाला चढले.
 येणेप्रमाणें गोपाळरावांचे आंगच्या अनेक गुणांपैकी निवडक सहा- गुणांचें स्वरूप व महत्व येथवर वर्णन केलें, त्याची ही षड्गुणैश्वर्यसंपन्नता पाहून गोपाळरावांचा कोणालाहि हेवा वाटेल आणि जर त्यांचें अनुकरण करण्याचे कोणी मनांत आणील तरच हे गुण गोपाळरावांनी वाढीव लावल्याचं चीज झालें असें म्हणतां येईल. रा. साने यांनीं गोपाळरावांच्या आंगचे हे गुण फार रसाळपणानें व कळकळीनें वर्णन केले आहेत व त्याचा ठसा आपले मनावर वाचक उठवून घेऊन कृतार्थ होतील अशी आशा आहे.
 नामदार गोखले यांचे गुण आपण वर्णिले परंतु त्यांच्या प्रत्यक्ष कार्याविषर्थी थोडा विचार केल्याशिवाय ही प्रस्तावना पुरी करतां येत नाहीं. गोपाळराव गोखले यांच्या सर्व कार्यांत आमच्या मतें भारतसेवक समाजाची स्थापना ही सर्वात श्रेष्ठ कामगिरी होय. अशी संस्था अखिल भारतवर्षात दुसरी नाहीं. 'पोलिटिकल संन्यासी' निर्माण करावे म्हणून ही संघटना गोपाळरावांनीं केली. यासाठी संथपणे खपून व आपले सर्व वजन खर्चून त्यांनीं निधि जमविला आणि लायोला किंवा रामदास यांचेप्रमाणे आद्य सभासद म्हणून सर्व व्यवस्था स्वतः केली. राजकीय व आर्थिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट ग्रंथसंग्रह येथे करण्यास त्यानीं आरंभ केला होता. आणि ते जर सुदैवाने आणखी बरीच वर्षे जगते तर ही संस्था अत्यंत कार्यकारी करून तिचें नांव जगाचे इतिहासांत बहुत काळ राहील असा तिचा विकास त्यांनी केला असता. पुण्यासारख्या ठिकाणी इंपीरिअल लायब्ररी सारखें ग्रंथालय स्थापावे हा विचार गोखले यांस मानवला होता आणि आज पुण्यास विद्यापीठ स्थापण्याच्या मागणीस त्यांजकडून खात्रीने चांगलीच मदत झाली असती. त्यांच्या मागें त्यांची जी उपदिष्ट मंडळी हल्लीं आहे त्यांजवर हा बोजा आहे आणि त्यांनी भोवतालची परिस्थिति कशी झपाट्याने बदलत आहे व या वावटळीत आपण खरोखरच किती पुढे गेलों आहांत याचा नक्की अंदाज करून जर आपली हालचाल ठेविली नाहीं तर ते मागें पडतील व गोपाळरावांचे कार्य त्या मानानें अपूर्णच राहील. खुद्द गोपाळरावांचे सुद्धा असें झालें होतें कीं त्यांचे तोंड सरकाराकडे वळलेलें असे म्हणजे सोसायटी सोडल्यापासून पुढें तें प्रजापक्षातर्फे सरकाराशीं वकिली करण्यासाठीं सरकार दरबारींच बरेचसे राहिले, तरी पण त्यांचा आत्मा स्वलोकांत वावरत होता. आणि म्हणूनच त्यांनी भारत-सेवक-समाजाची स्थापना केली आणि म्हणूनच दहांपैकी नऊ हिस्से काम स्वदेशांतच केलें पाहिजे असे त्यांनीं बजावून सांगितलें. खुद्द लोकांकडे तोंड वळवून त्यांना आपले विचार गोपाळरावांनी क्वचित् वेळींच कळविले. हिंदुस्थानाविषयीं विलायतेंत त्यांनी जितकी व्याख्यानें दिलीं तितकीं हिंस्दुथानांत दिलीं नाहींत. येथे बरेंच बोलणें ते कौन्सिलांतून करीत. लोकमत तयार करण्याची अवघड कामगिरी त्यांस कितपत साधली असती हा प्रश्न मनोरंजक आहे. लोकमत तयार करण्याचे मुख्य साधन म्हणजे लोकभाषा. जोवर सुशिक्षित मंडळी ही मूकजनतेचें प्रतिनिधित्व बिनबोभाट करीत असे व तो त्यांचा हक्क श्रद्धाळूपणे इतर जनतेनें मानला होता तोंवर इंग्रजीतून चालणाऱ्या कांग्रेसादि सभा इंग्रजीतून पडणारे वक्तृत्वाचे पाऊस उपयोगी पडले. परंतु जशी जागृति झाली, जसा गोपाळरावांसारख्यांनीं प्राथमिक शिक्षणाचा टाहो फोडला आणि टिळकांसारख्यांनीं केसरीगर्जनांनी देश दणाणून सोडला तसा लोकभाषेचा व्यापार आनवार वाढला. आतां भविष्यकाळ एकट्या इंग्रजीचा नाहीं. इंग्रजीनें इंग्रज काबीज करावयाचा तर लोकभाषांनी लोक आंवळावयाची कामगिरी यापुढे करावी लागणार. गोपाळरावांनी लोकभाषेचें प्रभावी हत्यार जर वापरले असतें तर त्यांची स्थिति आज फार निराळी असती. साउथआफ्रिकेतून आल्यावर आणि कचित् पूर्वीही गोपाळरावांनी तो प्रयोग करून पाहिला होता आणि त्यांच्या नैसर्गिक सामर्थ्यामुळे जरी तो अयशस्वी होत नसे तरी इंग्रजी- इतका तो यशस्वी झाला असेंहि त्यांस वाटत नसावें. गोपाळरावांचे गुरु या प्रयोगांतही पंडित होते. परंतु हा प्रयोग जोराने चालविला असता म्हणजे श्रीशिवाजी उत्सवासारख्या लोकप्रिय परंतु नाजूक प्रकरणांची गोपाळरावांना अडचण उत्पन्न झाली असती! असो. गोपाळरावांचे काळीं नवयुगाचा उदय होत होता. तेथूनही बरीच मजल आपण आज पुढे चालून गेलो आहों. अशा वेळीं गोपाळरावांचा आपणांस अत्यंत उपयोग झाला असता परंतु आतां आपणां सर्वांवर- केवळ सांप्रदायिकांवरच नव्हे- तो भार आहे. रानडे, चिपळोणकर, आगरकर, टिळक, गोखले- प्रभृति लोकहिताचे 'जागली' आपणांत झाले. त्यांची आठवण ठेवून, त्यांचे गुण घेऊन व उपकार आठवून तोच भार आपण पुढिलांवर वाढवून सोपविला पाहिजे.
फाल्गुन शु. ५, १८४६, पुणे.   दत्तो वामन पोतदार.


विहंगावलोकन.

ले. (श्री. न. र. फाटक बी. ए.)

 ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचें निधन होऊन आज दहा वर्षे लोटली. या अवधींत आणखी कित्येक लोकाग्रणी दिवंगत झाले. त्यांतल्या एकाचें चरित्र-वाङ्मन महाराष्ट्रामध्यें बरेंच बाहेर पडलें, परंतु गोखल्यांचें विस्तृत व ज्यामध्ये त्यांच्या अनेकविध कतृत्वासंबंधीं संकलित माहिती दिलेली आहे असे एकही चरित्र आजवर प्रसिद्ध झालें नव्हतें. गोखल्यांची महाराष्ट्रीयांनी लिहिलेली इंग्रजी, मराठी दोन्ही मिळून चार संक्षिप्त चरित्रें उपलब्ध आहेत. त्यांमध्ये चरित्रनायकाच्या चरित्राची रूपरेषा पहावयास सांपडते. याच लहान लहान पुस्तकांनी इतके दिवस जिज्ञासूंचे समाधान केलें आहे. मराठीप्रमाणेच अन्य प्रांतांत व अन्य भाषांमध्ये गोखल्यांचीं बरीच चरित्रे आहेत. ज्या वर्षी गोखले इहलोक सोडून गेले त्या वर्षातच यांतल्या पुष्कळ चरित्र पुस्तकांचा अवतार झाला असून त्यांच्याच खपानुसार आवृत्या निघाल्याची उदाहरणे आहेत. परंतु त्यापेक्षां जास्त मोठ्या प्रमाणावर या बाबतीत झालेला पहिला प्रयत्न म्हणजे रा. साने यांनी लिहिलेलं प्रस्तुत चरित्र होय. रा. साने यांचे याविषयीं अभिनंदन करणें अवश्य आहेच, पण त्यापेक्षां जास्त अभिनंदनाला खरोखर या पुस्तकाचे प्रकाशक रा. ताम्हनकर हेच पात्र होत, असे एकदर परिस्थिति लक्षांत घेतल्यास प्रत्येकाला कबूल करावे लागेल. त्यांनी मनावर घेतलें नसतें तर हें चरित्र इतक्या लवकर प्रसिद्धीस येण्याचा संभव नव्हता.
 या चरित्रासंबंधांत पहिली ध्यानांत ठेवण्यासारखी गोष्ट ती ही कीं, आजवर इतकें विस्तृत चरित्र मराठीत झालेले नाहीं. टिळकांचीं लहान मोठीं बरींच चरित्रे असल्याने त्यांची बाजू समजण्याचें साधन लोकांपुढे आहे. गोखल्यांच्या चरित्राची बाजू मसजण्याचें साधन उपलब्ध नव्हते, ही उणीव कांही अंशी रा. साने यांनी भरून काढली आहे व त्याबद्दल सत्यान्वेषी तरुण पिढीकडून त्यांना निःसंशय धन्यवाद मिळतील. प्रयत्नशील पुरुष चिकाटीच्या उद्योगाने उत्कर्षाच्या किती उंचीवर जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण जर कोणतें असेल तर तें गोखले यांचेंच एक आहे. कोणी म्हणतात गोखल्यांच्या आंगीं असामान्य बुद्धिमत्ता नव्हती. कोणी दुसरें एकादें न्यून दाखवून त्यांची महति कमी करता आल्यास पहातात. पण हीं न्यूनेंच गोखल्यांच्या चारित्र्याचें महत्व सिद्ध करणारी आहेत हें निंदकांच्या ध्यानांत राहत नाहीं. सामान्य बुद्धिमत्तेचे गोखले केवळ अविश्रांत उद्योगाच्या जोरावर असामान्य बुद्धिमंतांना कर्तबगारीनें थक्क करूं लागले, ही गोष्ट स्फूर्तिदायक नाहीं असें कोण म्हणेल? निरलस यत्नाच्या बळाने सामान्यत्वाची सरहद्द ओलांडून ज्या पुरुषानें असामान्यत्वाच्या क्षेत्रांतलें अत्युच्च स्थान पादाक्रांत केलें, त्याचा कित्ता गिरवावा अशी प्रेरणा कोणाला होणार नाहीं? अलौकिक बुद्धिमत्ता, विख्यात कुळ, अपार धनसंचय ही सुद्धां मोठेपणाला नेऊन पोचविणारी साधने आहेत. परंतु तीं दैवायत्त असल्यामुळे ज्यांना तीं जन्मतः प्राप्त झाली असतील, त्याचें चरित्र अनुकरणाच्या दृष्टीनें आटोक्याबाहेरचें वाटल्यास नवल नाहीं. गोखल्यांचें चरित्राची मातब्बरी या दृष्टीनें विशेष आहे. देशहिताची तळमळ असल्यास सामान्य बुद्धि, दारिद्र्य वगैरे विघ्नें माणसाच्या कर्तृत्वाला बाधा करूं शकत नाहींत, हें गोखल्यांच्या चरित्राचें रहस्य आहे. त्या रहस्याचा तरुण जनतेच्या मनावर ठसा उत्पन्न करणारे जेवढे वाङ्मय उत्पन्न होईल तेवढे थोडेच ठरेल.
 गोखल्यांचें चरित्र १८६६ पासून १९१५ पर्यंतच्या म्हणजे ४९ वर्षांच्या कायमर्यादेत पसरलेलें होतें. परंतु हा काळ महाराष्ट्राच्या व भारतवर्षाच्या इतिहासांत अत्यंत महत्त्वाचा गणावा लागतो. याच काळांत महाराष्ट्राच्या राजकीय जीविताला वळण लागलें. ब्रिटिशांचे हिंदुस्तानांतले राज्यकर्तृत्त्व विजय आणि जिंकलेल्या प्रदेशांचा बंदोबस्त या दोन अवस्थांतून सुटून पुनर्घटनेच्या अवस्थेत १८६१ साली शिरलें. १८५७ च्या बंडानें इंग्रजी राज्यकर्तृत्त्वाची मिठी किती घट्ट बसली आहे, याचा साऱ्या दुनियेला अनुभव आला. पण त्याच वेळीं राज्यकर्त्यांनाही समजलें कीं, हिंदी लोकमताची विचारपूस करून आपलें प्रभुत्व गाजविण्याची वेळ आली आहे. १८६१ मध्यें कौन्सिले अस्ति त्वांत आणून इंग्रजांनीं पुनर्घटनेला प्रारंभ केला. यानंतर पांच वर्षांन गोखल्यांचा जन्म होऊन हिंदी लोकमत काँग्रेसच्या रूपाने एकवटून नवीन नवीन आकांक्षा व्यक्त करूं लागलें. त्याच वेळीं गोखले यांनी विद्यार्जन संपवून स्वार्थत्यागपूर्वक विद्यादान करावयास लावणाऱ्या सार्वजनिक कार्यांत आपले पाऊल टाकले. नंतर हळू हळू सुधारकाचे संपादक, सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक व सभेचे चिटणीस, प्रांतिक परिषदेचे चिटणीस, काँग्रेसचे एक प्रतिनिधि अशी निरनिराळ्या कार्यांच्या परंपरेनें त्यांनीं लोकसेवेचा मार्ग चोखाळण्यास आरंभ केला. वरच्यासारख्या बाहेरच्या स्वयंप्रेरणेने स्वीकारलेल्या कामांचा व्याप वाटत असतां त्यांनी ज्या शिक्षणसंस्थेला आयुष्याच्या सुरुवातीस सर्वस्व अर्पण करण्याची दीक्षा घेतली होती, त्या संस्थेच्या कामाचाही बोजा वाढत होता. हीं सर्व कामे त्यांनी एकमेकांचा विरोध होऊ न देतां सारख्याच उत्साहानें, आस्थेनें आणि कळकळीने चालविलीं. १८९७ साली त्यांची उमेदवारी संपून त्यांचे नांव होतकरू लोकनायक या नात्यानें मुख्य मुख्य पुढाऱ्यांबरोबर गोंवलें जाऊं लागलें. मध्यंतरीं वर्ष सवा वर्ष लोकापवादामुळें त्यांवें उज्वल कर्तृत्त्व अस्तप्राय दिसत होतें. परंतु ही स्थिति पालटून १८९९ नंतर त्यांची लोकसेवा डोळे दिपवून सोडण्यासारख्या प्रखरतेनें चमकू लागली व मग १९१५ पर्यंत तिच्या विलक्षण तेजस्वितेमुळे कोणत्याही अपवादाला डोके वर काढतां आलें नाहीं. असें गोखल्यांच्या चरित्राचें स्थूल स्वरूप आहे. त्यांनी आपली कर्तबगारी प्रामुख्याने एकट्या राजकीय विषयाला वाहिली असल्यानें सकृद्दर्शनीं त्यांचे चरित्र बिनगुंतागुंतीचे व एकतंत्री वाटते. पण त्यांच्या कार्याचें समग्र व यथोचित आकलन होण्यासाठी- पृथक्करण करूं लागलें कीं, त्याची बहुविधता ध्यानांत आल्याशिवाय रहात नाहीं. त्यांच्या कार्याची बहुविधता शेवटपर्यंत कायम होती. पण प्रत्येक महापुरुषाच्या पूर्ववयांतल्या कामगिरीला विशेष महत्त्व असतें, त्याच्या आयुष्यक्रमाला वळण लागून तें स्थिर होईपर्यंतच्या काळांतील कामगिरीचा इतिहास अधिक बोधप्रद समजला जातो. गोखल्यांच्या आयुष्यांतलीं, या दृष्टीनें पाहिल्यास, १८८७ ते १८९७ हीं दहा वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांचं राज कीय ध्येय याच वर्षांत निश्चित झालें. सदर काळांत त्यांची हिंदी राजकारणाच्या भिन्न भिन्न अंगांसंबंधीं जीं मतें बनलीं, त्यांचाच त्यांनी १९०० पासून पुढील पंधरा वर्षांत जोरानें पुरस्कार केला व त्यांतलीं कांहीं सफळ करून दाखविलीं. ते प्रोफेसर होते, सुधारकाचे व सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक होते, काँग्रेसमधले व प्रांतिक परिषदेतले एक वक्ते होते वगैरे सामान्य गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या आहेत; पण त्यांनी कोणती मतें प्रतिपादन केली, त्यांमध्ये व पुढच्या मतांमध्ये अंतर पडलें कां सादृश्य कायम होतें, इत्यादि मुद्दयांचा तपशीलवार उहापोह केल्याखेरीज त्यांच्या लोकसेवेचे वैशिष्ट्य लक्षांत येणें शक्य नाहीं. प्रस्तुत मुद्दयांचा अभ्यास करण्याचीं साधनें थोडीं दुर्मिळ आहेत व तीं मिळविण्याचा उद्योग न केल्यामुळें जो दोष स्वाभाविकपणें उत्पन्न होतो तो दोष या पुस्तकांत आहे.
 गोखल्यांचा उदय झाला तेव्हांच महाराष्ट्रांत टिळकांचा उदय झाला. परंतु दुर्दैवामुळे या दोघांमध्ये तीव्र मतविरोध उत्पन्न होऊन तो शेवट पर्यंत अखंड टिकला. या कारणामुळे एकाच्या चरित्राचा विचार करतांना दुसऱ्याच्या चरित्राचा विचार केल्याखेरीज गत्यंतर रहात नाहीं. त्यांपैकीं टिळक हे अत्यंत लोकप्रिय, अर्थात त्यांच्या बाजूनें कसलीही गोष्ट पुढें आली तरी तिचा चटकन् लोकांत आदर होतो. गोखल्यांना लोकप्रियता कधींच लाभली नाहीं. याचा परिणाम त्यांच्याविषयी लोकांत आढळणाऱ्या अनेक अवास्तव दुष्ट ग्रहांमध्ये दिसून येतो. गोखल्यांविषयी बारीकसारीक गैरसमज तर पुष्कळच आहेत, पण अर्वाचीन हिंदी राजकारणातले कित्येक प्रसिद्ध प्रसंग असे आहेत कीं, त्यांची पहाणी करतांना हटकून बुद्धिभेद होतो. १८९५ मधील पुण्याची काँग्रेसची बैठक व सार्वजनिक सभेतून झालेली रानडे पक्षाची हकालपट्टी १८९७ सालांतली गोखल्यांची माफी, १९०७ सालांतली सुरतेची काँग्रेस आणि १९१५ साली गोखले मृत्युशय्येवर असतांना माजलेला काँग्रेसच्या समेटाचा वाद, हीं बुद्धिभेद करणाऱ्या प्रसंगांची उदाहरणें आहेत. यांतली एक बाजू लोकांना थोडी फार माहीत आहे, व तीच प्रिय असल्यानें सामान्यतः दुसरी बाजू पहाण्याचा यत्न कोणी करीत नाहीं. गोखल्यांचें चरित्र लिहिणाराला ही दुसरी बाजू पहाणें अत्यंत अवश्यक आहे. रा. साने यांनी दोन्ही बाजू पाहून निर्णय देण्याचा यत्न केला आहे. परंतु एका बाजूच्या मताचा त्यांच्या मनावर अतिशय पगडा बसला आहे, म्हणून म्हणा अगर दुसरी बाजू पहाण्याची सगळी साधनें त्यांना प्राप्त झाली नाहीत म्हणून म्हणा, त्यांनीं नमूद केलेल्या निर्णयांत पक्षपाताचा भाग बराच आढळतो. असे पक्षपाताचे मासले येथे थोड्या विस्ताराने दाखल केल्यास अप्रस्तुत होणार नाहीं.
 ना. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी लिहिलेल्या गोखले- चरित्रांत एका ठिकाणी 'टिळकांना गोखल्यांचा मत्सर वाटत होता,' असें विधान आहे. हें विधान त्यांनी टिळकांच्या हयातीत केले होते. शिवाय त्यांचा व गोखल्यांचा निकट स्नेहसंबंध होता. या गोष्टी लक्षांत ठेवूनच त्यांच्या विधानाचा साधकबाधक विचार करावयास पाहिजे. सदर विधानावर रा. आठल्ये यांनीं आपल्या इंग्रजी टिळक-चरित्रांत प्रतिकूल टीका लिहून मत्सराच्या आरोपांतून टिळकांना दोषमुक्त केलें आहे. त्याचाच अनुवाद रा. साने यांनी केला आहे. परंतु थोड्या बारकाईने रा. आठल्ये यांच्या टीकेचा परामर्श घेतल्यास त्यांनी टिळकांच्या तरफदारीसाठी पत्करलेली तर्कपद्धति निर्दोष नसल्याचे दिसून येते. त्यांच्या टीकेचा भावार्थ असा कीं, १८८६-८७ सालांत टिळकांनीं गोखल्यांचा मत्सर करण्यासारखें गोखल्यांमध्ये कांहीं विशेष गुण नव्हते. टिळकांनी रानडे-तेलंगांविषयीं मत्सर बाळगला असता तर तें शोभणारें होतें. गोखल्यांना तेव्हां शाळेत धड शिकवितां देखील येत नव्हते; अशा व्यक्तीशी टिळकांची चुरस असणें संभवनीय नाहीं. ही विचारसरणी बऱ्याच चुकीच्या कल्पनांवर उभारली आहे. अगोदर गोखल्यांना या दिवसांत शिक्षकाचें काम नीट बजावतां येत नव्हतें, हीच कल्पना चुकीची आहे. त्यांनी मिळकत वाढविण्याकरितां न्यू इंग्लिश स्कुलांत शिक्षकाची नोकरी असतांना पब्लिक सर्व्हिसच्या परिक्षेचा वर्ग चालविला होता व त्या वर्गाच्या जोरावर त्यांना मनाजोगी किफायत होत असे, ही गोष्ट सर्वमान्य आहे. या गोष्टीमुळे त्यांनी अध्यापनकौशल्य किती जलद संपादन केलें याचा अंदाज करणें अशक्य नाहीं. याबरोबरच टिळकांची तेव्हांची स्थिति जमेस धरावी लागते. टिळकांची योग्यता तेव्हां सामान्य शिक्षकाहून जास्त नव्हती. सामान्य योग्यतेचीं माणसें एकमेकांचा मत्सर करतात हा सिद्धांत खरा असल्यास टिळकांनी गोखल्यांचा मत्सर करण्यासारखी परिस्थिति १८८६-८७ सालांत होती, असें वरच्या वृत्तांतावरून दिसून येईल. टिळक मत्सर करीत होते कां नव्हते हा या स्थळीं वादाचा मुद्दा नाहीं. कोणताही पक्ष ठामपणानें स्वीकारतांना दोन्ही बाजूंचे सूक्ष्म निरीक्षण कां अवश्य हें समजण्याकरितां एवढे विवेचन केलें आहे.
 १८९५ सालीं पुण्यास कांग्रेसची बैठक भरली त्यापूर्वी पुण्यास कांग्रेसचा मंडप सामाजिक सुधारणेच्या परिषदेला देण्यांत यावा की न यावा या संबंधांत सुधारणेच्या विरोधकांनी दंगल सुरू ठेवली होती. सुधारणेच्या शत्रुपक्षाचें प्रथम प्रच्छन्न व पुढे उघड धुरीणत्व टिळकांनी अगिकारलें होतें. याविषयी मागल्या टिळक-चरित्रांतून नानाविध समर्थन लोकांसमोर येऊन गेलें आहे. रा. साने यांनीही या समर्थनाच्या धोरणानें आपला मजकूर लिहिला आहे. तसे कराना त्यांनी टिळकांइतकीच गोखल्यांची बाजू पहावयास हवी होती. गोखल्यांची बाजू त्यावेळी सुधारक ज्ञानप्रकाश आणि मुंबईचीं गुजराथी व इंदुप्रकाश ही पत्रे यांमध्ये प्रसिद्ध होत असे. ती नजरेखाली घालून वरील धोरण रा. साने यांनी पत्करल्याचे प्रमाण त्यांच्या लिहिण्यांत नाहीं. त्यामुळे गोखल्यांच्या बाबतीत तर अन्याय झाला आहेच, पण आश्चर्य हें की कांहीं विधानांत, टिळकांनीं जें म्हटलें नाहीं, ते म्हटल्याचा आरोप केला आहे. सारांश, रा. साने यांना त्या प्रकरणाचा यथार्थ बोध होऊन त्यांनी टिळकांचे मंडन केलें असा निष्कर्ष काढतां येत नाहीं. १९१५ मध्ये गोखल्यांच्या मृत्यूपूर्वी सुमारे पंधरा दिवस जी खडाजंगी कांग्रेसच्या समेटाबाबत चालली होती तिची हकीगत देतांना रा. साने यांनी अन्यायदर्शक वाक्यें लिहून टाकलीं आहेत. त्यांचा झोक टिळकांचा वाद सत्यास धरून होता असे दाखविणारा आहे. गोखल्यांवर टीका करतांना टिळकांनी जे कित्येक सिद्धांत केवळ अनुमानाच्या जोरावर खरे मानले, तेच रा. साने यांनीही खरे धरले आहेत. उदाहरणार्थ, श्री. सुब्बाराव यांनी लिहून काढलेले टिळकांशीं झालेल्या संवादाचें टिपण गोखल्यांनी पाहिलें होतें कीं नव्हतें, हें एकच उदाहरण घ्या. आपणांस तें भूपेद्रबाबूंना पत्र लिहिण्याच्या वेळीं पहावयास सांपडलें नव्हतें, असें गोखल्यांनी स्पष्ट म्हटलें होतें. त्यांनी तें वाचलें होतें, असें छातीठोक सांगणारा विश्वसनीय साक्षीदार या वादांत कोणीच पुढे आलेला नसल्याने, गोखल्यांनीं तें टिपण पाहिलें होतें कां नव्हतें, याविषयीं शक्याशक्यतेच्या आनुमानिक आधाराने शुष्क तर्क काढून गोखल्यांना दोष लावणें केव्हांही उचित ठरणार नाहीं. परंतु रा. साने यांनी असल्याच तर्कांत शिरून गोखल्यांवर शिंतोडे उडविले आहेत.
 १९०८ साली टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा झाली तेव्हां गोखले विलायतेस होते. विलायतेस शिक्षेची बातमी पोचल्यावर तेथल्या कित्येक हिंदी रहिवाश्यांनी टिळकांसंबंधीं सहानुभूति व सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक सभा भरविली. गोखल्यांनाही पाचारण होतें, परंतु गोखले त्या सभेला गेले नाहींत, या गोष्टीवरून गोखल्यांना टिळकांविषयी कोरडी सहानुभूति देखील दाखविणें योग्य वाटलें नाहीं, अशा अर्थाचें एक विधान जातां जातां रा. साने यांनीं पुस्तकांत घातलें आहे. गोखल्यांच्या प्रस्तुत गैरहजरीवरून याहीपेक्षा जास्त भयंकर तर्क मागें लोक करीत होते. त्याचें प्रत्यंतर १९०८-९ सालांत गणेशोत्सवामध्ये गाइल्या गेलेल्या मेळ्यांच्या पदांमधून जिज्ञासूंना पहावयास सांपडेल. रा. साने यांनीं आपल्या तर्काची धांव भलत्याच थरापर्यंत जाऊं दिली नाहीं; पण गोखल्यांना सहानुभूति नव्हती, हा त्यांचा तर्कसुद्धां वस्तुस्थितीच्या अज्ञानाचा द्योतक आहे. वाटेल त्या सभेत जाऊन भाषणें करावयाचीं नाहींत, असा एक गोखल्यांचा नियम होता. शिवाय ज्या विषयासंबंधी आपण अगाऊ विचार केला नाहीं, त्या विषयावर केवळ लोकाग्रहास्तव ते भाषण करीत नसत. या दोन्ही नियमांबद्दल त्यांची नालस्ती झाल्याची उदाहरणें आहेत. विलायतच्या सभेंतली गैरहजेरी हें एक अशापैकींच उदाहरण आहे. रा. साने यांनी या बाबतीत जास्त माहिती मिळविली असती तर त्यांनीं जो निष्कर्ष सुचविला आहे तो खचित सुचविला नसता. गोखल्यांना टिळकांच्या संबंधांत सरकारनें चालविलेला अन्याय पाहून प्रत्येक वेळीं खेद होत असे व अन्याय दूर होण्यासाठी त्यांनी यथाशक्ति प्रयत्न केल्याची प्रमाणे आहेत. असल्या प्रयत्नांचे ज्ञान करून घेतल्याखेरीज टिळक आणि गोखले यांची तुलना निःपक्षपातपूर्वक होणें शक्य नाहीं.
 वरच्याप्रमाणें कांहीं ठळक दोष या पुस्तकांत असले तरी एकंदर पुस्तकाचा विचार केल्यास त्याबद्दल कोणालाही रा. साने यांची प्रशंसाच करावीशी वाटेल, गोखल्यांसंबंधीं ज्या गैरसमजुती लोकांत पसरलेल्या आहेत, त्यांपैकीं पुष्कळांची बाधा रा. साने यांनीं आपल्या विवेचनास होऊं दिलेली नाहीं. गोखल्यांकरितां १८९७ साली टिळक पुरावा जमवीत होते, असा एक समज आहे. या समजुतीला रा. साने यांनी आपल्या उहापोहांत मुळींच थारा दिलेला नाहीं. गोखल्यांनी माफी मागितली, याबद्दल पुष्कळांनीं विकारवश होऊन अकांडतांडव केल्याचे दाखले आहेत; परंतु रा. साने यांनीं गोखल्यांच्या माफीचा यथार्थ गौरव केला आहे. तुरुंगांत जाण्याला धैर्य लागतें, माफी मागणे म्हणजे निस्सीम धैर्याभावाचें लक्षण, असल्या समजुतीचें वर्चस्व कमी होऊन गोखल्यांच्या माफीविषयीं तरुण सुशिक्षितांची दृष्टि निवळत चालली, हें रा. साने यांच्या विवेचनसरणीवरून ध्यानांत येण्यास हरकत नाहीं. गोखल्यांच्या चरित्राचा जसजसा अधिकाधिक सांगोपांग अभ्यास होत जाईल, तसतसा त्यांच्या संबंधांतला गैरसमज निरसन पावेल, याचे एक उदाहरण म्हणजे रा. साने यांचें प्रस्तुत चरित्र होय. भाषेच्या दृष्टीने पाहिल्यासही त्यांचा हा प्रयत्न उत्कृष्ट वठला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. गोखले- टिळकांची तुलना नाहीं अशा भागांत त्यांनी केलेली गोखल्यांच्या कामगिरीचीं वर्णने वाचकांना निस्संशय रमणीय वाटतील. मराठी वाङ्मयांतील एक उणीव त्यांनीं यथसाधन व यथारुचि भरून काढली याबद्दल त्यांचे व प्रकाशकांचें पुनः एकवार अभिनंदन करून विहंगावलोकनाची रजा घेतों.


अनुक्रमणिका.
पूर्वार्ध.
पृष्ठ.
प्रकाशकाचे चार शब्द
ग्रंथ व ग्रंथकार यांचा परिचय (प्रस्तावना)
विहंगावलोकन (न. र. फाटक)
उपोद्घात
जन्म, बालपण आणि शिक्षण
अध्यापन - काल १९
राजकीय शिक्षणाचा काल ३१
राजकीय आयुष्यक्रम ३७
इंग्लंडची पहिली सफर ५६
१० माफी प्रकरण ६६
११ कौन्सिलांतील कामगिरी ७१
१२ वरिष्ठ कायदे कौन्सिलांत प्रवेश ८३
१३ बंगालची फाळणी व गोखल्यांची शिष्टाई १०२
१४ गोखल्यांचा देशभर व्याख्यानांचा दौरा १२९
१५ कौन्सिलांतील कामगिरी १३६
१६ भारत सेवक समाज १४२


उत्तरार्ध.
हस्ताक्षर
सुरत काँग्रेसनंतर
गोखल्यांची आफ्रिकेंतील कामगिरी १७
अखेर ३६
स्वभाव व गुणदोषमीमांसा ४२
धार्मिक व सामाजिक मतें ८२
गोखल्यांची कुंडली १०१
सूचि १०३- ११२
Appendix I १- १४
शुद्धिपत्र

[ पूर्वार्धातील कांहीं तारखा चुकल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे दुरुस्त करून घ्याव्या.

पृष्ठ   ओळ   अशुद्ध  शुद्ध
फोटो १ (तारखेची) १७८७ १७८८
" २ (तिथीची) १८६५ १८६६
१६ १८७० १८८०
" १८७० १८८०
२९ २७ १८९२ १८९५
३७ १७ १८८६ १८८९
८१ १८६१ १८९१
४ (उत्तरार्ध) मथळा दुसरी चवथी
कै. ना० गोखले
यांचें चरित्र.

उपोद्घात.

 "Hope, faith and chairty- these are the three graces we must all cultivate, and if we keep them ever in mind and hold steadily by them we may be sure that we may still regain our lost position and become a potent factor in the world's history."

M. G. RANADE.
1894. Madras.

 कोणतीही परिस्थिति फार वेळ टिकत नसते. काळ हा बहुरूपी आहे. तो क्षणांत उग्र रूप धारण करितो तर क्षणांत फुलाप्रमाणें हंसतो. कांहीं राष्ट्रे अवनतीच्या खोल दरीत लोटून देतो तर दुसरीं राष्ट्र उन्नतीच्या उत्तुंग शिखरांवर चढवितो. त्याचा हा नेहमींचा खेळ आहे. त्याची ही लीला अगम्य व अगाध आहे. त्याची स्वतःची एकरूपता असली तरी त्यास इतरांची पाहवत नाहीं. कोणतीही वस्तु एकाच स्थितीत ठेवणें हें त्याच्या जिवावर येते. लोकांस रडविणें वा खुलविणें, दोन्ही कामांत त्यास सारखाच आनंद वाटतो; दोन्ही कृत्यांत तो रमतो. परंतु काळ हा स्वतः निर्विकार असला, त्याला सुखदुःख वाटत नसले तरी राष्ट्रांची स्थिति तशी नाहीं. राष्ट्रें सुखदुःखातीत नसून तदधीनच असतात. जे राष्ट्र पद तल तुडविलें जातें तें दुःखाचे सुस्कारे सोडीत असतें, आपली खाली झालेली मान पुनः वर कधीं येईल, सध्यां ज्या हालअपेष्टा आपण निमुटपणें भोगीत आहों, जे अपमान गिळून बसत आहों, त्या सर्वांचें परिमार्जन होऊन आपली नैसर्गिक योग्यता कशी प्राप्त होईल या विचारांत जित राष्ट्र गुंग होऊन जाते. परंतु जेत्या राष्ट्राची गोष्ट निराळी असते. जित राष्ट्राला निर्जीव कसें करतां येईल, त्याची धुगधुगी साफ मारतां कशी येईल, त्याची वर खाली होणारी नांगी कशी मोडतां येईल, त्याचे विषारी दांत पाडून निर्विष सर्पाप्रमाणे गतमद होत्सातें आपल्या कह्यांत तें अखंड कसे राहील या प्रश्नाकडे जेत्या राष्ट्राचे मुत्सद्दी लक्ष लावून असतात. काळ हा कलिपुरुष आहे. अशा जितजेत्यांच्या लढाया लावण्यांत त्यास मौज वाटते; या कामांत तो तरबेज असतो. या लढायांत ज्याची धमक अधिक, धैर्य अप्रतिहत, स्वार्थत्याग दांडगा व इच्छा दुर्दमनीय, प्रयत्न अखंड, व न मरणारी आशा, त्यासच विजयश्री माळ घालते.
 हे जितजेत्यांचे सामने फार उद्बोधक असतात. प्रत्येक देशाचा इतिहास मुक्तरवाने हेंच सांगतो कीं, 'बाबारे, मी असाच तुडविला जात होतों, परंतु धीरानें आणि शौर्यानें धीर खचूं न देतां आम्हीं स्वातंत्र्याची पुनरपि प्राप्ति करून घेतली आहे.' अमेरिका, इटली, नेदर्लंड या सर्व राष्ट्रांचा इतिहास हीच गोष्ट शिकवितो. कित्येक राष्ट्रांनीं झगडून, रक्त शिंपडून, पवित्र स्वातंत्र्य, ईश्वरदत्त हक्क पैदा केले खरे, परंतु आपली पूर्वीची स्थिति पार विसरून दुसऱ्या गरीब राष्ट्रांवर जेव्हां हीं राष्ट्रे गुरगुरूं लागतात तेव्हां मन खिन्न होतें व आशा मरून जाते. ज्या जपाननें आपली सर्वांगीण उन्नति करून घेतली तेंच जपान आज कोरियांत धांगडधिंगा घालीत आहे. त्यास जर अमेरिकेनें मज्जाव केला तर त्यास वाईट वाटण्याचे काय कारण? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीं. आपणावर बेतल्याखेरीज दुसऱ्याची वेदना समजत नाहीं. आपला पाय विस्तवावर पडून भाजला म्हणजे ज्यास मी विस्तवावरून ओढीत आणीत होतो त्याचीही माझ्यासारखी दशा झाली असेल असें लक्षांत येतें. परंतु ही जाणीव सुज्ञ असेल त्यास होईल. ज्या अमेरिकेने इंग्लंडबरोबर युद्ध पुकारून अभंग चिकाटीनें स्वातंत्र्य मिळविलें, ज्याचें वॉशिंग्टन सारख्यांनी संगोपन केलें, लिंकन सारख्यांनीं वर्धन केलें तीच अमेरिका नीग्रोंवर जुलूम करिते आणि परकी देशांस मज्जाव करिते. ज्या इंग्लंडने स्वातंत्र्यासाठी विष्णुस्वरूप राजाची आहुति दिली तेंच इंग्लंड दुसऱ्या राष्ट्रावर सत्ता गाजवून दडपशाही व दंडेली चालवितें याची उपपत्ति काय? उपपत्ति हीच कीं, मनुष्यमात्र स्वार्थी आहे. थोडेफार महात्मे सोडून दिले तर प्रत्येकजण दुसऱ्यास लुबाडूं पाहणार, हीच वृत्ति जगाच्या इतिहासांत आपणांस दिसते. लुबाडणारा सवाई चोराकडून जेव्हां स्वतः लुबाडला जाऊं लागतो तेव्हां मग त्यास ब्रह्मज्ञानाची उकळी फुटते. तो मोठमोठीं गहन तत्त्वें सांगू लागतो. लुटला जाणारा लुटारूंस विरोध करूं लागतो, परंतु नागवला जाणारा जेव्हां असहाय्य व निःशस्त्र असतो तेव्हा खरी कसोटी असते. या असमान सामन्यांत लुटले जाणाऱ्यांचे जे पुढारी असतात त्यांच्या परीक्षेची वेळ असते. त्यांना निराळेच मार्ग आंखावे लागतात. शस्त्रास्त्रे बाजूस ठेवून आपली सर्वागीण उन्नति करून लुटारूस सांगावयाचें 'मी तुझ्या बरोबरीचा आहे; माझे हक्क मला मिळाले पाहिजेत.' ज्यांची आज हिंदुस्थानावर सत्ता आहे त्यांची विद्या, त्यांचे उद्योग हे आपण आपलेसे केले पाहिजेत. ज्यांस सर्व साधनें अनुकूल त्यांच्याबरोबर आपणांस झगडावयाचें आहे. आपल्यांतील शक्य त्या उणिवा आपण नाहींशा करण्याच्या प्रयत्नास लागणे हें, प्रथम कर्तव्य आहे. आपणांस कष्टप्रद स्थिति आली आहे तिचे नुसते वाईट वाटून काय बरें फायदा? आपण फार श्रीमंत होतों; आज दुबळे झालों आहों. सुख भोगून मग दरिद्र येणें फार वाईट. आमचा देश वैभवाच्या शिखरावर होता तो आज खोल दरींत आहे. ज्या आमच्या देशांत सतत सुबत्ता असावयाची, त्या आमच्या सुंदर देशास आज अर्धपोटीं रहावें लागतें अशी हलाखीची स्थिति आली आहे खरी. परंतु अंतरीं तळमळून फायदा नाहीं. डोळ्यांत अश्रु आणून आणि ढोपरांत मान घालून आलेली स्थिति थोडीच पालटणार आहे? रडावयास वेळ नाहीं. डोळ्यांतील अश्रु डोळ्यांतच आटू द्या. परिस्थितीचा विचार करून तिला बदलण्यासाठी, जेथें श्मशान आहे तेथे नंदनवन निर्माण करूं या आत्मप्रत्ययानें, कामास लागा. देशाची सध्यांची स्थिति ही सत्वपरीक्षा आहे. या सत्त्वपरीक्षेत सोज्ज्वलपणे आपण उत्तीर्ण झाले पाहिजे. श्रियाळशैव्यांचे आपण वंशज, ज्ञानेश्वर- नामदेवांचे वारसदार आहों. आपण डगमगून चालणार नाहीं, आणि उतावीळपणाने अहितकारक गोष्ट करतां कामा नये. वाइटांतून चांगले बाहेर पडतें. आपली परकीयांशीं गांठ पडली यांत परमेश्वरी सूत्र आहे; कांहीं तरी हेतु आहे. नवीन प्रकाश आपणांस मिळावा, नवीन दृष्टि आपणांस यावी म्हणून ही ईश्वरी घटना आहे. तो प्रकाश आपलासा करूं या. धीर सोडतां कामा नये. धीर कोण सोडतो? ज्याला कांहीं करावयाचें नसतें तो. आपण सर्व बाजूंनी उचल केली पाहिजे. सर्व बाजूंनीं खुंटया मारीत जाऊन जागा व्यापून टाकिली पाहिजे. हा धडा ज्यानें राष्ट्रास शिकविला, निराश झालेल्यांस आशेचा घोट पाजला— किरण दाखविला, विगलित व हतबल झालेल्यांस हात देऊन उठण्यास लाविलें, मृतांस चैतन्य दिलें, सचेतनांस स्फूर्ति दिली, स्फूर्तियुक्तांस कृति करावयास लाविलें, त्या न्या. रानड्यांचे देशावर किती उपकार आहेत तें सांगतां येत नाहीं. त्यांचेच उदाहरण हरहमेश डोळ्यांसमोर ठेवून, त्यांची शिकवणूक हृदयांत ठसवून, मुरवून, ज्यांनीं आपला सर्व जन्म मायभूमीच्या उद्धारासाठी खर्च केला, सुखाची कांस धरिली नाहीं, दुःखाची पर्वा केली नाहीं, जे स्तुतीनें मोहित झाले नाहींत, ज्यांनीं निंदेमुळें प्रारब्ध कार्य सोडून दिलें नाहीं, दुसऱ्याच्या अंतरास ढका न लावता, परंतु स्वकर्तव्य न सोडतां ज्यांनीं जनता- जनार्दनाची आमरण सेवा केली त्या चिरंजीव भारतसेवक गोपाळराव गोखल्यांची आयुष्य-कथा पुढील लेखांत निरूपण करावयाची आहे. या कथेला सर्वांच्या लिखाणांचा आधार घेतला आहे. मनोरंजन अंक, अभ्यंकर- चरित्र, फर्ग्युसन कॉलेज त्रैमासिक, वाच्छांनीं लिहिलेल्या आठवणी, केसरीतील लेख, गोखल्यांचे लेख व व्याख्याने या सर्वांचा आधार घेतला आहे. याशिवाय श्री. मोदी यांनी लिहिलेल्या सर. के. मेथा यांच्या चरित्रांतील माहिती, मॉडर्न रिव्ह्यू, इंडियन रिव्ह्यू यांचाही ठिकठिकाणीं उपयोग केला आहे. त्या सर्वांचा प्रस्तुत लेखक ऋणी आहे.



ना० गोखले यांचें चरित्र.

कुलवृत्तांत.

 रत्नागिरी जिल्ह्यांत चिपळूण तालुका आहे. तालुका चिपळूण, पेटा गुहागर या भागांत वेळणेश्वर नांवाचें एक लहानसे खेडे आहे. सर्व गोखळे मंडळचें मूळ ठिकाण होय. येथूनच सर्व महाराष्ट्रभर गोखले मंडळी पसरली. गोखले मंडळी महाराष्ट्राच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. 'रास्ते' घराणें मूळचें गोखले घराण्यापैकींच. त्यांच्या रास्त वर्तणुकीमुळे शाहू महाराज त्यांस 'रास्ते' म्हणूं लागले. पेशवाईच्या पडत्या काळांत अतुल पराक्रमानें तिचें रक्षण करणाऱ्या बापू गोखल्यांचे नांव कोणास माहीत नाहीं? या गोखले मंडळीची एक शाखा चिपळुणापासून दहा मैलांवर ताह्मनमळा म्हणून गांव आहे तेथे बाळाजी महादेव गोखले यांनी प्रथम आणिली. पूर्वी कोंकणांत पुष्कळ उद्योगी लोक स्वकष्टानें पडीत जमिनी मशागतीस आणीत. दगडधोंडा बाजूस काढून, जंगल वगैरे तोडून तेथे गांव वसवीत. मग त्यांस तेथील गांवाचे खोती वगैरेचे अधिकार मिळत. हे अधिकार ते मग प्राण गेला तरी सोडीत नसत, मानहानि ही कोंकणांतील माणसास कधींच सहन होत नसते. गोपाळरावांचे निपणजे बाळाजी महादेव यांनी आपला मूळचा गांव सोडून हा नवीन गांव वसविला आणि आपला नवीन संसार थाटला. त्यांचा मुलगा भास्कर आणि भास्कररावांचे चिरंजीव श्रीधरपंत, श्रीधरपंत हे गोपाळरावांचे आजोबा होत. यांस प्रथम- कुटुंबापासून अंताजीपंत आणि कृष्णराव हे दोन मुलगे झाले. कृष्णराव दोनचार महिन्यांचेच असतांना त्यांची मातुश्री निवर्तली आणि श्रीधरपंतांनी द्वितीय विवाह केला. या द्वितीय विवाहापासून त्यांस दोन मुलगे झाले. त्यांची नांवें अनुक्रमें जयरामपंत व माधवराव. अंताजीपंत आणि कृष्णराव हे लहानपणीच पोरके झाले होते. आईवेगळ्या लहान मुलांची किती आबाळ होते हें सर्वांस माहीतच आहे. हे दोघे भाऊ अगदीं एकचित्तानें रहात. अंताजीपंतांचे कृष्णरावांवर फार प्रेम असे. गोपाळरावांस त्यांच्याबद्दल अत्यंत पूज्यभाव वाटत असे.
 कृष्णरावांचा स्वभाव जात्या फार हूड होता. त्यांस गावांत वाघोबा असें म्हणत असत. त्यांचा विवाह त्या काळास अनुसरून लहानपणींच झाला होता. चिपळुणापासून जवळच असलेल्या कोतळूक गांवचे खोत भास्करपंत ओक यांची मुलगी वालूबाई हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. वालूबाईचें नांव सत्यभामाबाई असे सासरी ठेवण्यांत आलें होतें.
 कृष्णराव हे शिकण्यासाठी कोल्हापूरला गेले. कोल्हापुराला त्यांचे चुलते मामलतीच्या अधिकारावर होते. कृष्णराव कोल्हापुरास ज्या शाळेत शिकत होते त्याच शाळेत माधवराव रानडे हेही शिकत होते. कृष्णराव व माधवराव हे एकाच वर्गांत होते. हे माधवराव पुढें न्यायमूर्ति होऊन अखिल हिंदुस्थानच्या सर्वागीण उन्नतीचा मार्ग दाखवितील आणि ते आपल्या मुलाचे आध्यात्मिक आणि राजकीय गुरु होतील हे त्या वेळेस कृष्णरावांस कोणी सांगितलें असतें तर त्यांस काय वाटलें असतें? माधवरावांसही 'कृष्णरावांच्या मुलास तुम्ही राजकीय पुढारी होण्यास सर्वतोपरी पात्र कराल' असें जर कोणी सांगितलें असतें वर ते हंसले असते. कांहींही असले तरी हा योगायोग पाहून मनास आश्चर्य वाटतें खरें. कृष्णराव हे फारसे अभ्यासी नव्हते. घरची सांपत्तिक स्थितिही हलाखीची, यामुळे लवकरच त्यांस शाळेस रामराम ठोकावा लागला. व चुलत्याच्या वशिल्यानें त्यांस कागल संस्थानांत कारकुनीची जागा मिळाली.
 कारकुनाची जागा मिळाल्यावर कृष्णराव सहकुटुंब कागलासच राहूं लागले. त्यांची पत्नी फार सुशील व देवभोळी होती. असेल त्यांत सुखानें संसार करून देवांब्राह्मणांस संतुष्ट करण्यांत तिचें सदैव लक्ष असे. सर्वांशी मिळतें घेऊन वागण्याच्या तिच्या स्वभावामुळे घरांत सदैव शांततेचें साम्राज्य असे. तिची पतिभक्ति इतकी सोज्वळ होती कीं, ती पाहून कौतुक वाटतें व आदर दुणावतो. पतिनिधनानंतर दुःखा कुल अशा या साध्वीनें आपल्या पतीचें नेसावयाचें एक धोतर मरेपर्यंत आपणाजवळ ठेविलें होतें. कृष्णरावांस या पत्नीच्या सहवासानें सुख झाले. त्यांचीही नौकरी अत्यंत नेकीची. त्यांचा बाणेदारपणा पाहून त्यांच्या वरचे अधिकारी त्यांचे कौतुकच करीत. त्यांच्या गुणांमुळे त्यांची बढती झाली व ते फौजदार झाले. त्यांचा बहुतेक काळ कागल येथे संसार करण्यांत गेला.

जन्म, बालपण आणि शिक्षण.

शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी।

तुकाराम.

 रत्नागिरी जिल्हा हा अन्वर्थक आहे. खरोखरच त्याने अनेक रत्ने गेल्या शतकांत आपणांस दिली. न्या. रानडे, लो. टिळक, भारत—सेवक गोखले, गणित—विशारद प्रि. परांजपे, कर्मवीर कर्वे यांच्या सारखे सर्व महाराष्ट्रास किंबहुना हिंदुस्थानास ललामभूत झालेले थोर पुरुष आपणांस रत्नागिरीनेंच दिले. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी कोतळूक मुक्कामी झाला. सत्यभामाबाई या वेळेस माहेरीं बाळंतपणासाठी गेल्या होत्या. माहेरीं दोन तीन महिने झाल्यावर बाळबाळंतीण ताह्मनमळ्यास आली. तेथे दोन तीन महिने सत्यभामाबाई होत्या. कोंकणांतील निसर्गाच्या मांडीवर गोपाळ खेळत होता— लोळत होता. कोंकणच्या हवेचा शुद्धपणा त्याच्या रोमरोमांत भरत होता. कोंकणांतील डोंगरांची भव्यता त्याच्या अजाण हृदयावर परिणाम करीत होती. आई आपल्या तान्ह्या बाळासह लवकरच कागलास आपल्या पतीकडे आली.
 गोपाळाचा वडील भाऊ गोविंद. तो शाळेत जात असे. गोपाळही मोठा झाल्यावर शाळेत जाऊं लागला. त्याच्या बुद्धिमत्तेच्या गोष्टी ऐकिवात नाहींत. परंतु त्याच्या मनाची प्रामाणिकता तेव्हांही होती. एके दिवशीं गुरुजींनीं घराहून गणित करून आणण्यास सांगितलें होते. वर्गात फक्त गोपाळाचे गणित बरोबर! गुरुजींनीं त्यास शाबासकी दिली. परंतु काय? गोपाळ ओक्साबोक्शी रडूं लागला. आनंद व सुख होण्याऐवजी गोपाळाचे डोळे पाण्याने भरले? गुरुजी बुचकळ्यांत पडले आणि मुलें चकित झाली. "गोपाळ तूं कां रडतोस?" गुरुजींनीं विचारलें. 'माझें गणित बरोबर असले तरी तें मीं स्वतः सोडविलें नाहीं. मी तें दुसऱ्यांच्या मदतीनें केलें. मला पहिला नंबर नको.' गोपाळाच्या मताला सत्य प्यार वाटे. रानडे हेही याप्रमाणेच सत्यप्रिय होते. मनाचा हाच सूक्ष्म तराजू गोपाळाजवळ मरेपर्यंत होता. पुढे पुढे तर तो जास्तच सूक्ष्म झाला. दुसरी एक गोष्ट आहे ती खेळतांना झाली. आट्या- पाट्यांचा खेळ रंगांत आला होता. गोविंद व गोपाळ विरुद्ध होते. गोविंद गोपाळास म्हणतो, 'गोपाळ, मला सोडून दे. मला धरूं नको.' छे भाऊ, असें कसें म्हणतोस? मी पाहिजे तर खेळ सोडून जातो. परंतु खोटें करून माझ्या बाजूच्या गड्यांचें मी नुकसान करणार नाहीं. लहानपणींचा खरें बोलणारा गोपाळ मरेपर्यंत तसाच होता. 'जे गुण बाळा, ते जन्म काळा' म्हणतात तें यथार्थ आहे. या प्रकारें कागलास मनाची व शरीराची प्राथमिक तयारी- पहिला विकास चालू होता.
 गोपाळ दहा वर्षांचा होईपर्यंत कागलासच होता. त्याचे मराठी शिक्षण येथेंच झालें. मराठी शिक्षणानंतर त्यास वडील भावासह कोल्हापुरास इंग्रजी शिकण्यासाठी पाठविण्यांत आलें. 'गोविंद गोपाळ हे दोघे बंधु' एकमेकांवर फार प्रेम करीत. त्यांचा इंग्रजीचा अभ्यास जोराने चालला होता. या वेळेस लोकहितवादी किंवा रानडे यांच्या वेळी असणारा इंग्रजीविरुद्ध कटाक्ष नव्हता. आतां जगांत पुढें येण्यास इंग्रजीची फार जरूर होती. मुसलमानी अमदानीत ब्राह्मण जसे फारसी पंडित होऊन मोठमोठ्या सन्मान्य नौकऱ्या पटकावीत त्याप्रमाणे मोठ्या पगाराची जागा मिळण्यासाठीं आतां इंग्रजीशिवाय गत्यंतर नव्हतें. गोविंद गोपाळ सुट्टीत वगैरे घरी जात असत.
 याप्रमाणें दोघां भावांचें शिक्षण चाललें असतां अकस्मात् संकट ओढवलें, कोणालाही न चुकणारा, कधीं तरी येणारा मृत्यूचा हल्ला गोपाळरावांच्या वडिलांवर आला. मुलें अद्यापि शिकत होती. घरांत मिळवितें कोणी नाहीं अशा वेळी कुटुंबवत्सल माणसाची एकाएकी मृत्यूने उचलबांगडी करावी हे कठोर वाटतें. कर्ता माणूस मृत्युमुखीं पडला असतां घरांतील इतर मंडळीची जी दुःखप्रद व अनुकंपनीय स्थिति होते तीच या भावांची झाली. गोपाळाची आई अंताजीपंतांकडे गेली आणि गोपाळाच्या वडील भावास नौकरी शोधावी लागली. शिक्षणाची कायमची रजा गोविंदास घेणे भाग पडलें, परिस्थितीला तोंड देणें जरूर होतें आणि तें धैर्यानें व निःस्वार्थ बुद्धीनें गोविंदानें दिलेंही. चुलत्याकडे आई गेली होती, परंतु ती पुनः लवकरच परत आली. कागल संस्थानचे अधिकारी रावसाहेब विष्णु परशुराम वैद्य यांच्या मध्यस्थीनें गोविंदास कारकुनीची जागा मिळाली. या वेळेस गोविंदाचें वय अठरा वर्षांचें होतें आणि गोपाळ तेरा वर्षांचा होता. सेवाधर्माचा भुंगा गोविंदास लावून घेणें भाग पडलें, परंतु कुटुंबाच्या पोषणासाठीं व आपल्या भावाच्या शिक्षणासाठी त्यास तसे करणें प्राप्त होतें. आपले शिक्षण पुरें झालें नाहीं तरी आपल्या भावाचे शिक्षण पुरें व्हावें ही सदिच्छा त्यांच्या अंतरंगी वसत होती. या रोपट्यास आज पाणी घातलें तर त्याचा वृक्ष होऊन त्याच्या शीतल छायेंत आपणास बसावयास मिळेल आणि आपले पांग गोपाळ फेडील या भावी आशेनें आज गोपाळासाठी ते झीज सोशीत होते. परंतु हें कार्य करण्यांत गोविंदराव हे अनपेक्षित रीतीनें देशावर महदुकार करीत होते. हा वृक्ष त्यांनाच- सुखविणार नव्हता तर नोकरशाहीनें संतापविलेल्या आपल्या देशबांधवां सही शांतविणार होता. असो.
 गोपाळाच्या शिक्षणासाठीं ते दरमहा १० रुपये पाठवीत असत. कारकुनाचा पगार तो केवढा असणार आणि त्यांत संस्थान! परंतु गोविंदरावांनी आपल्या भावाची आबाळ होऊ दिली नाहीं. स्वतःच्या पोटास त्यांनी वेळ वखत चिमटा घेतला, परंतु गोपाळाचे अडूं दिलें नाहीं. गोपाळानेही आपल्या भावाच्या पैशाचे चीज केलें. उधळपट्टी ही त्याला माहीतच नव्हती. हल्ली आपण याच्या विपरीत देखावे किती तरी पाहतों. मुलाच्या भावी वैभवाच्या मनोराज्यांत दंग होऊन बाप मुलाला पैसे पाठवीत असतो. स्वतः ढोंपरपंचा नेसून हाडाची काडे करून मुलाच्या गरजा भागवितो, परंतु बापाकडे बेट्याचें लक्ष असतें काय? ऐट करावी, कपड्याच्या झोकांत असावें, सुंदरशी यष्टि हस्तक मलांत धारण करावी, आणि सिनेमा, नाटकगृहें यांस आपल्या पदधूलीनें पावन करावें हा याचा स्तुत्य कार्यक्रम असतो! कोटबुटांत पैसा उडतो आणि बापास व बेट्यास अंतीं कपाळास हात लावावा लागतो! गोपाळाची वागणूक चोख. सत्याचा अपलाप मरण आलें तरी गोपाळ करावयाचा नाहीं. या गुणाचा गोपाळास भावि आयुष्यांत उपयोग झाला. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून वेळ मारून नेतां आली असती असे प्रसंग पुढील जीवनक्रमांत त्याच्यावर आले. परंतु त्यानें सत्त्यालाच श्रेष्ठ मानलें, सत्याचेंच सिंहासन बसावयास पसंत केलें. आपला भाऊ आपणास किती दगदगीने मिळवून पैसे पाठवितो याची जाणीव त्याच्या कर्तव्योन्मुख मनांत सदैव जागृत असे. तो भावास दरमहा हिशोब पाठवीत असे.
 परंतु गरीबीनें दिवस काढीत असतांनाही त्यानें स्वाभिमान सोडला नाहीं. कोणाजवळ याचना केली नाहीं. कोणाची खुशामत केली नाहीं. स्वाभिमान त्याने कसा राखिला याची एक गोष्ट येथे देतों. गोपाळ खानावळीत जात असे. एकदां त्यानें सहज वाढप्याजवळ दहीं मागितलें, तो म्हणाला 'महिना आठ आणे जास्त द्यावे लागतील. उगीच नाहीं फुकट दहीं मिळत!' 'मला रोज दहीं वाढीत जा' असें गोपाळानें सांगितले. अर्थात् आठ आणे जास्त द्यावे लागणार ते कोठून आणावयाचे? ठरीव पैशांत तर उरकलें पाहिजे. स्वाभिमान आणि आपली मिळकत यांची संगति राहील अशी त्यानें युक्ति काढिली. खानावळींत खाडे पडावे म्हणून दर शनिवारी तो उपास करूं लागला. अशा प्रकारें आपला मान त्यानें राखून घेतला. गैरवाजवी खर्च चुकीमुळे जरी झाला तरी तो आपल्या भावास लिहावयास त्यास भीति वाटे. आपण अनाठायीं खर्च करतों हें पाहून आपला भाऊ काय बरें म्हणेल? तो तिकडे मोठ्या मिनतवारीनें दिवस काढीत असतां आपण असा खर्च कसा केला असें त्यास वाटे. अर्थातच तो अपव्यय कधीं करीतच नसे. परंतु एकदां एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्याच्या एका स्नेह्यानें त्यास तो नको नको म्हणत असतां नाटकास नेलें होता होईतों कोणाचें मन मोडावयाचें नाहीं हा गोपाळाचा स्वभाव. तो नाटकास गेला. त्याचे तिकीट त्याच्या मित्रानंच काढले. नाटक संपले; सर्व कांहीं झालें. पुढें कांहीं दिवसांनीं हा स्नेही गोपाळाकडे येऊन तिकिटाचे पैसे मागू लागला. गोपाळ चकित झाला. त्यास ही कल्पनाही नव्हती. आपण नको म्हणत असतां आपला स्नेही आपणास नाटकास नेत आहे त्या अर्थी तोच पैसे खर्च करील असें त्यास वाटलें होतें. परंतु तोच मित्र प्रत्यक्ष जेव्हां पैसे मागूं लागला तेव्हां स्वाभिमानी गोपाळाच्यानें नाहीं कसें म्हणवणार? त्यानें आठ आणे काढून दिले आणि पुनश्च असल्या फंदात पडावयाचें नाहीं असा कानास खडा लावून घेतला. परंतु हे आठ आणे भरून कसे काढावयाचे? एक सुंदर युक्ति त्याच्या कल्पक डोक्यास सुचली. रात्रींचा दिवा बंद करावयाचा व महिन्यास आठ आणे बत्तीचा खर्च होई तो म्युनसिपल दिव्यावर अभ्यास करून वांचवावयाचा, म्हणजे जास्त आठ आणे खर्ची पडणार नाहींत असें त्याने ठरविलें. गरीबीमुळे असे दिवस काढावे लागतात. रा. ब. सीताराम विश्वनाथ पटवर्धनांची अशीच गोष्ट सांगतात कीं, त्यांनीं म्युनिसिपालिटीच्या दिव्याजवळ अभ्यास केला. हा म्यु. दिव्याजवळ अभ्यास करणारा विद्यार्थी पुढे देशास उजेड दाखवील असें त्या वेळेस कोणास वाटले असेल काय? विशाल काळाच्या उदरांतील घडामोड कोणास समजणार? अभ्यासांत तर गोपाळाची कधींच कुरकुर नसे. गोपाळाची आई जरी शिकलेली नव्हती तरी तिची स्मरणशक्ति फार तीव्र असे. हा स्मरणशक्तिगुण गोपाळाच्या अंगांत पूर्णपणे उतरला होता. त्यामुळे त्याच्या लक्षांत फार रहात असे. मॅट्रिकच्या परीक्षेची वेळ आली आणि गोपाळ परीक्षेस मोठ्या उत्साहानें बसला. परीक्षा झाल्यावर सुट्टी असल्यामुळे गोपाळ घरी गेला.
 आनंदांत दिवस चालले होते. खेळण्यांत, हिंडण्यांत काळ सुखानें चालला होता. आपण परीक्षेत खात्रीनें पास होणार असा गोपाळास भरंवसा होता. त्याच्या एका मुंबईच्या मित्राने त्यास तार करीन असें सांगितलें होतें. निकालाचा दिवस उजाडला. आज गोपाळाचें मन खाली-वर होत होते. इतक्या दिवस केलेल्या श्रमाचें चीज होणार की नाहीं हा प्रश्न त्याच्या मनापुढे होता. ठरलेली वेळ झाली आणि तार आली नाहीं. गोपाळ उदासीन झाला. आपला भाऊ आपणास काय म्हणेल? आपण उनाडलों नाहीं आणि असें कां बरें झालें? सर्व श्रम वायां गेले. मन खट्टू होऊन गोपाळ एकटाच लांब दूर फिरावयास गेला. परंतु लवकरच त्यास वाटेंत तार आल्याचे आनंददायक वर्तमान कळलें, गोपाळाचा आनंद गगनांत मावेना. भावनावश माणसाला आनंदही जास्त होतो, दुःखही जास्त होते. आपल्या भावनांस ताब्यांत ठेवण्यास गोपाळ पुढें न्या. रानड्यांच्या उदाहरणानें शिकला. परीक्षा पास होण्याचा आनंद पास होणारेच जाणतात. वर्षाच्या श्रमांचा मोबदला एका क्षणांत मिळावयाचा असतो. केलेल्या श्रमांचें सार्थक होऊन जो आनंद- सात्विक आनंद भोगावयास मिळतो तो अमोल आहे. मनाला नवीन कार्य करण्यास हुरूप येतो. 'क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते' हेच खरें.
 मॅट्रिकची परीक्षा झाली त्यावेळी गोपाळ फक्त पंधरा वर्षांचा होता. त्यानें आपला धरलेला मार्ग तडीस न्यावा असें ठरलें आणि गोपाळ पुढील अभ्यासासाठी कोल्हापुरास राजाराम कॉलेजांत दाखल झाला. कॉलेजमधील आयुःक्रम आणि शाळेतील आयुःक्रम यांत जमीनअस्मानाचा फरक असतो. शाळेमध्ये गुरुजी मुलाची प्रत्यक्ष चौकशी करितात. विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे लक्ष देतात. प्रत्येकास समजलें न समजलें. विचारून सर्व स्पष्ट करितात. शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त मुलगा विशेष कांही पहात नाहीं आणि शिक्षकांची साधारण शिकवणूक संकुचितच असते. कॉलेजमध्ये विद्यार्थ्याच्या अंगावर सर्व जबाबदारी पडते. प्रोफेसर वर्गांत विषय विशद करून निघून जातात. तदनुरोधानें विद्यार्थ्यास विषय घरी तयार करावा लागतो. प्रोफेसरांची शिकविण्याची पद्धतिही व्यापक असते. कोणताही विषय सांगोपांग त्यांस शिकवावयाचा असतो. नाना प्रकारचे दृष्टान्त, नाना नवलकथा ते सांगतात. ते टीका करितात. चांगले व वाईट यांची फोड करितात. रोज निरनिराळ्या व्यक्ति, निरनिराळी पुस्तकें कानावरून जातात. आज नेपोलियनने मनास वेडें करावें तर दुसऱ्या वेळेस बायरननें चटका लावावा. आज इंग्लंडचा इतिहास आवडावा तर परवां इटलीच्या उद्धारकांचें कौतुक करावेसे वाटावें. (आ)पल्याही मनांत महत्त्वाकांक्षा डोकावू लागते. आज मोठे भीमासारखें व्हावेसें वाटतें. तर दुसऱ्या दिवशी शंकराचार्यासारखे तत्त्वज्ञ होण्याची स्फूर्ति होते. कधीं न्यूटन हृदयांत घुसतो तर कधीं रस्किन किंवा कार्लाइल डोळ्यांपुढून हलत नाहीं. हे संक्रमणाचे दिवस असतात. मनाचा आखाडा येथे असतो. त्यांत मन पुष्ट होत असतें. त्याप्रमाणेंच कॉलेजमधील मोकळे वातावरण, वादविवादोत्तेजक सभा, जिमखाना, लायब्ररी, वाचनालय यांची सर्व व्यवस्था मुलेंच करितात. मुलांमुलांच्या दाट व जन्माच्या ओळखी येथे पडतात. गोपाळरावांचे सहाध्यायी प्रो. विजापुरकर हे होते. हे गोखल्यांचे मित्र होते. गोखल्यांच्या गुप्त गोष्टी पुढें विजापुरकरांजवळ उघड होत असत. हा कॉलेजचा आयुष्यक्रम गोपाळास लाभला हें त्याचें व म्हणून आम्हां सर्वांचें भाग्य होय. नाही तर परिस्थितीमुळे मोठ्या होतकरू मंडळींसही जसे कारकुनीच्या रामरगाड्यांत भरडलें जावें लागतें तशीच स्थिति याही मोहऱ्याची झाली असती.
 गोपाळ हा कांहीं अलौकिक बुद्धीचा मनुष्य नव्हता, किंवा अगदीं 'ढ' ही नव्हता. या जगाच्या रंगणांत असेच पुरुष जास्त दिसतात. ज्यांच्या जवळ लोकोत्तर बुद्धिमत्ता असते ते घमेंडीत जातात प्राणि प्रयत्न करीतनासे होतात. उत्तम तलवार जवळ असून तिचा उपयोग न केल्यामुळे ती गंजून जाऊन निरुपयोगी मात्र होते. जे 'ढ' असतात ते म्हणतात आम्हीं प्रयत्न केला तरी विफळच होणार. मग कशास करा? परंतु जे मध्यम स्थितीचे असतात त्यांस आंतून भरंवसा वाटतो कीं, जर आपण हातपाय हलवले, जर आपण यत्नांची सीमा केली, तर यशःशिखर आपणांस गांठतां येईल. टिळकांनी न्यू पूना कॉलेजमध्ये १९१९ मध्ये हेच उद्गार काढले होते. मध्यम स्थितींतील माणूस यत्नवादी असतो. ठोठावले तर उघडेल ही धमक त्याला असते. तो हुरळून जात नाहीं किंवा होरपळून जात नाहीं. तर वस्तुस्थितीचें पर्यालोचन करून 'यत्नदेवो भव' हें सूत्र पुढें ठेवितो. गोपाळ या मध्यम वर्गातील होता. आपला पाठ नीट तयार करण्यांत जे कधीं कसूर करीत नाहींत, त्यांसच परीक्षेत यश येतें. गोपाळाचा अभ्यास तयार असे. त्याची पाठशक्ति दांडगी होती, आणि या पाठशक्तीचे अजब चमत्कार तो करून दाखवीत असे. त्यास अभ्यासास नेमलेलें इंग्लिश काव्य तोंडपाठ येत असे. त्याचे सहाध्यायी त्यास 'पाठ्या,' 'घोटया' असें म्हणून चिडवावयाचे; परंतु गोपाळास यामुळे संताप न येतां उलट 'इतरांस जें करितां येत नाहीं तें आपण करितों' असें वाटून त्यास समाधान वाटे. आपण इतरांच्याहून कमी आहों हा विचार त्यास खपत नसे, खेळांतही आपणास सर्व खेळ, क्रिकेट, पत्ते, बुद्धिबळें, सोंगट्या, गंजिफा, बिलियर्ड, सर्व कांहीं आलें पाहिजे असें त्यास वाटावयाचें आणि नुसतें मनांत वाटूनच तो थांबत नसे तर तदनुरूप प्रयत्नही करावयास लागावयाचा. हा त्याचा गुण अगदी मरेपर्यंत होता. बोटीवर खेळाची संवय करीत असतां त्यास एकाने विचारलें 'येवढे त्या खेळांत लक्ष देण्यासारखे काय आहे?' गोपाळ म्हणाला, "खेळांमध्ये सुद्धां आम्ही युरोपियनांची बरोबरी करूं शकतों हें आम्हीं दाखविलें पाहिजे. आमचा देश कशांतही मागें नाहीं, हें जगास दाखविलें पाहिजे, जो उत्तम क्रिकेट खेळून देशाची कीर्ति वाढवितो तोही देशभक्तच आहे." जी पुढे देशाविषयींची भावना होती ती प्रथम पिंडात्मक होती, स्वतःभोवती होती. आपणामध्येही कांहीं तरी पाणी आहे, करामत आहे, अगदीच कांहीं नादान, टाकाऊ आपण नाहीं हें दाखवावेंसें त्यास वाटे. यामुळे मुलांच्या थट्टेकडे त्याचें लक्षही नसे. मुलं 'घोक्या' म्हणाली तर जास्तच पेटून गोपाळ आणखी जोराजोराने पाठ करून यावयाचा. अशा रीतीनें कॉलेजांतील क्रम चालला होता.
 ज्या वेळेस गोपाळ कोल्हापुरास शिकत होता त्यावेळेस महाराष्ट्रांत जी धामधूम उडाली होती, जो धूमधडाका चालला होता त्याचा प्रतिध्वनि कोल्हापुरासही ऐकू आल्याविना कसा राहील? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेनें एक प्रकारवें नवचैतन्य मृत राष्ट्राच्या देहांत ओतण्यास आरंभ केला होता. रानड्यांचे कार्य जास्त व्यापकपणें परंतु धिमेपणानें चाललें होतें. शास्त्रीबोवांनी त्यावेळच्या कित्येक पुढाऱ्यांनी चालविलेले आत्मनिंदेचें कार्य बंद पाडलें आणि लोकांत तेज आणि आत्मविश्वास उत्पन्न केला. राष्ट्राचा तेजोभंग करून राष्ट्र मेलेले असलें तर तें कायमचें मरावें या आत्मनिंदेला आळा घालून आत्मविश्वास अंतरी जागवा आणि त्यास निश्चयाचें पाणी घाला असे शास्त्रीबोवांनीं आपल्या तेजोमयी लेखणीनें राष्ट्रास पटविलें. आत्मनिंदा करून आपणच आपले पाय खच्ची करून घेण्यांत, आपण पंगु आहों असा जप करण्यांत काय पुरुषार्थ आहे? हातपाय तुटल्यावर मनुष्य धांवणार कसा? पुढे घुसणार कसा? दुसरे आपले हातपाय तोडतील तर त्यांस अटकाव केला पाहिजे. निदान आपण तरी आपलाच घात करूं नये, आपल्याच पायावर स्वतःच्या हातून धोंडा पाडूं नये हें तत्त्व शास्त्रीबोवांनीं नवीन तरुणांस उपदेशिलें. आत्मस्तुति करणें जर वाईट तर आत्मनिंदाही वाईट. सर्व कांहीं प्रमाणांत असलें पाहिजे. परंतु शास्त्रीबोवा तत्त्वच उपदेशून राहिले नाहींत तर तत्त्वाप्रमाणें कृति करण्यासही ते लागले, रुपेरी शृंखलांत निगडित होऊन स्वजनहित उत्तम रीतीने पार पाडतां येणार नाहीं म्हणून ती तोडून हा नरसिंह रणांगणांत आला. पुण्यास नवीन शाळा उघडण्याचा त्यांनीं विचार केला. त्यांचा विचार ऐकून, आधींच त्यांच्या लेखांनी देशकार्यार्थ उयुक्त झालेले. टिळक आणि आगरकर त्यांस येऊन मिळाले. रानड्यांनीं त्यांस नामजोशांची सुंदर जोड दिली. आगरकर आणि टिळक यांचे कॉलेजमध्ये वादविवाद होत आणि ज्यावर त्यांचे मतैक्य झालें तो प्रश्न म्हणजे शिक्षण हा होय. लोकांस आधीं सुशिक्षित केलें पाहिजे आणि तें शिक्षण आपल्या हातांत पाहिजे, हा त्यांचा विचार ठाम झाला होता. आगरकर अठराविश्वे दारिद्र्यांत वाढलेले, स्वजनांनी टाकलेले आणि लोकांनी हेटाळलेले. रा. ब. महाजनींनी वर्गात कटु बोल उद्गारले, त्या वेळेस तुमच्याप्रमाणेंच एम्. ए. होईन असें स्वच्छ सांगून विकाटीने आणि धैर्यानें ते एम्. ए. झाले. तर्क, न्याय आणि नीतिशास्त्र हे त्यांचे विषय होते. देवाधर्मावरचा त्यांचा विश्वास उडाला असला तरी स्वजनहिताचा नवा मार्ग त्यांस दिसला होता. त्यांस वाढत्या पगाराची सरकारी नौकरी मिळाली असती, परंतु त्यांनीं आपल्या आईला लिहिले की 'आई' मी मोठी नौकरी करणार नाहीं. मी देशकार्यास वाहून घेणार आहें. असला लोकोत्तर स्वार्थत्याग लोकांस जागें केल्याशिवाय कसा राहील? लोकांची दृष्टि या तरुणाकडे गेली. त्यांस पुढें प्रख्यात संस्कृतज्ञ आपटे मिळाले. जास्त तरुण मिळत चालले. शाळा भरभराटत चालली. चिपळूणकर शाळाच काढून थांबले नाहीत तर त्यांनी केसरी आणि मराठा हीं दोन साप्ताहिकें पण सुरू केलीं. अलीकडच्या काळांत लोकांस परिस्थितीचें सम्यक् ज्ञान करून देण्यास वृत्तपत्रांशिवाय अन्य सुंदर साधन नाहीं. केसरीची गर्जना आणि मराठ्याचा हरहर महादेव घुमूं लागला. तरुणांचीं अंतःकरणें थरारून जाऊं लागली. या वेळेस केसरीचे संपादक आगरकर होते आणि मराठ्याचे टिळक होते. टीका करण्यास उभयतांही भीत नसत, गोरे अधिकारी किंवा काळे या दोघांचाही खरपूस समाचार घेण्यास ते कचरत नसत. १८७० पासून टिळकांचें कोल्हापूरकरांच्या राज्याकडे लक्ष होतें. १८७० मध्ये पहिले राजे निवर्तले. त्यांच्या दोन राण्या होत्या. वडील राणीस दत्तक देऊन कारभार सुरू झाला. परंतु या नवीन राजास नीट वागविण्यांत येत नाहीं अशी ओरड ऐकू येऊ लागली. त्यास सक्तीनें दारू वगैरे पाजतात आणि त्यास वेडा ठरवून नवीन दत्तक गादीवर बसवावयाचें कारभाऱ्यांच्या मनांत आहे, अशीही दाट वदंता महराष्ट्रांत उठली. १८८१ च्या २४ नोव्हेंबर रोजी रा. ब. गोपाळराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यास जाहीर सभा भरून निषेध व्यक्त करण्यांत आला. पुढे टिळक व आगरकर यांस तीन पत्रे उपलब्ध झाली. आणि कारभारी बर्वे यांच्यावर विष घालण्याचा आरोप त्यांनीं केसरी व मराठ्यांतून प्रसिद्ध केला. कारभारी बर्वे यांनी फिर्याद केली. हीं पत्रे नाना भिडे नांवाच्या गृहस्थानें आकसाने लिहिली होती असें सिद्ध झालें. टिळक आणि आगरकर यांची बाजू तेलंग आणि मेथा यांनीं मांडिली होती. टिळक व आगरकर यांनी माफी मागितली, परंतु बर्व्याचें समाधान तेवढ्यानें होईना. शेवटी १७ जुलै रोजीं त्यांस १०१ दिवसांची शिक्षा झाली. त्यांच्यावर दोष इतकाच ठेविला होता कीं, त्यांनी सदरहू पत्रे विचार न करितां छापिली. या संपादकद्वयास शिक्षा झालेली ऐकून प्रत्येकास सहानुभूति वाटली. सातारच्या वंशजासाठी ते झगडले, कारागृहांत गेले. त्यांस कांहीं स्वतःचा फायदा मिळवावयाचा नव्हता. त्यांचे ठिकठिकाणी अभिनंदन करण्यांत आलें आणि त्यांच्यासाठी फंड सुरू झाला. कोल्हापुरकरांचा या बाबतींत जास्तच जिव्हाळ्याचा संबंध. तेथील राजाची तरफदारी या स्वार्थत्यागी वीरांनी केली होती. राजाराम कॉलेजांतील विद्यार्थ्यांनीं फंडासाठी नाटक करावयाचें ठरविलें, गोपाळ गरीब असल्यामुळे त्यास स्वतः खिशांतून पैसा काढून देणें अशक्य होतें. त्यानें या नाहीं त्या हातानें मदत करावी म्हणून नाटकांत स्त्रीची भूमिका केली होती. ज्या टिळक-आगरकरांजवळ त्यास पुढे जावयाचें होतें, त्यांची ही अशी प्रस्तावना आहे.
 १८८२ चे अखेरीस गोपाळाची परीक्षा झाली आणि तो तीमध्ये यशस्वी झाला. कोल्हापुरास त्यावेळीं बी. ए. चा वर्ग नव्हता म्हणून गोपाळ डेक्कन कॉलेजमध्ये शिकण्यास गेला. परंतु लवकरच खुद्द कोल्हापुरास हा वर्ग निघाल्यामुळे दुसऱ्या टर्मला गोपाळ पुनः कोल्हापुरास आला. या वेळेस गोपाळच्या अभ्यासक्रमांत विख्यात एडमंड बर्कचें जगत्प्रसिद्ध 'फ्रेंच क्रांतीवरील विचार' हें पुस्तक नेमलेलें होते. बर्कची गंभीर आणि भारदस्त विचारसरणी व तदनुरूप सुंदर भाषा या रमणीय योगानें हें पुस्तक लोकोत्तर झालें आहे. या पुस्तकावर 'पेन'ने टीकाही केली आहे. राजकीय तत्त्वज्ञानावरचे हे ग्रंथ गोपाळास नीट अभ्यासावे लागले हें फार चांगले झाले. ज्याचा पुढील जन्म राजकीय झगड्यांत जावयाचा होता त्याला प्रथमतःच ही पुस्तकें शिकावी लागलीं हा एक योगायोगच म्हणावयाचा. नेहमींच्या पद्धतीप्रमाणें गोपाळानें यांतील उत्तमोत्तम उतारे पाठ केले, आणि आपल्या स्मृति-पटलावर कायमचे खोदून ठेविले. १८८३ मध्ये गोपाळ पहिली बी. ए. ची परीक्षा पास झाला. दुसऱ्या बी. ए. मध्यें तो ऐच्छिक विषय गणित घेणार होता, आणि यासाठीं त्यास मुंबईस जाणें इष्ट वाटलें. १८८४ च्या जानेवारीमध्यें तो मुंबईस दाखल झाला. या वर्षी त्याची शेवटची परीक्षा होती. हॅथॉन्वेंट हे एक नामांकित शिक्षक होते. येथे धोंडोपंत कर्वे हे त्याचे सहाध्यायी होते. गोपाळ हा हॅथॉन्वेंट साहेबांचा एक आवडता शिष्य होता येवढेच कळते. बी. ए. ची परीक्षा गोपाळराव दुसऱ्या वर्गात पास झाले. त्यांस आनंद झाला. संकल्प केल्याप्रमाणे आतांपर्यंतचा पल्ला निर्वेधपणें गांठला. यावेळी त्यांचे वय फक्त १८ वर्षाचें होतें. अजूनही आपण शिकावें असें त्यांस वाटण्याचे दिवस होते व त्यांस तसे वाटतही होतें. देशभक्तीचा उमाळा अद्याप आला नव्हता. व्यापक विचार हृदयाकाशांत डोकावूं लागले नव्हते. त्यांस क्वचित् वाटे कीं, विलायतेस जावें व आय्. सी. एस्. होऊन यावें, कारण त्यांचें अद्याप शिकण्याचे वय होतें. परंतु या गोष्टीस पैशाची जोड अवश्य पाहिजे, एंजिनिअर झालें तर? कां वकीलच व्हावें? असे अनेक विचार त्यांच्या मनांत घोळत होते, पण निश्चय होत नव्हता. अखेर ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊं लागले. परंतु इतक्यांत पुण्यास ज्यूरिस्प्रूडन्सचा वर्ग उघडण्यांत आला. तेव्हां कॉलेज सोडून देऊन ते या क्लासांत जाऊं लागले. आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनीं दरमहा ३५ रुपयांची नौकरी धरिली. याशिवाय त्यांचे दुसरे एक मित्र आणि ते दोघांनी मिळून पब्लिक सर्व्हिसचा एक क्लास काढिला. या क्लासामुळे त्यास ३०-३५ रुपये प्राप्ति होत असे. स्वतःसाठी पंधरा वीस रुपये खर्च करून बाकी उरलेले सर्व पैसे ते आपल्या भावाकडे पाठवीत. गोविंदरावांनी किती कष्ट करून आपली विद्या शेवटास नेली हें गोपाळराव जाणून असत. शिवाय वहिनीची प्रेमळ मूर्तिही त्यांच्या डोळ्यांसमोर उभी रहात असे. 'पुरे झाले तुझें शिकणें; आतां कोठें तरी नौकरी करून संसारास मदत करूं लाग' असें जर कधीं गोविंदराव बोलले तर ती माउली म्हणावयाची 'शिका हो भाऊजी तुम्ही; माझें किडुक मिडुक मोडून देईन. तुम्ही आपली शिकण्याची हौस पुरी करून घ्या.' आपल्या वहिनीला पुन्हा तिचे अलंकार मिळावे ही त्यांची इच्छा होती. या सदिच्छेनें जेवढे म्हणून पैसे उरत तेवढे ते वहिनीला पाठवून देत.
 गोपाळराव शाळेत इंग्रजी शिकवीत. पांचव्या इयत्तेला ग्रे कवीचें जगन्मान्य श्मशानगीत शिकवितांना 'किती सुंदर विचार, किती गंभीर भाषा' असे उद्वार ते काढावयाचे. पांचव्या इयत्तेतील मुलांना तें समजत नसे. ते मनापासून शिकवीत परंतु मुलांना तें कठिण वाटे. ते घरींही इंग्रजीचा जोरानें अभ्यास करीत. इंग्रजी भाषा आपलीशी करावी ही त्यांची महत्त्वाकांक्षा. कोठें उत्तम विचार, उत्तम वाक्य दिसलें कीं, गोपाळरावांनीं तें आत्मसात् केलेच. वर्तमानपत्रांचाही त्यांस नाद लागला. त्यांतील इंग्लिश उतारे ते पाठ करीत आणि पुढे पुढे त्यांनीं एकदां वाचलें कीं, त्यांच्या लक्षांत राही. टिळक-आगरकरांच्या सहवासानें ते केसरीत वर्तमानसार देत. पुढे १८८६-८७ साली मराठ्याच्या अंकांत ते लिहू लागले. त्यांचा स्वभावतःच इंग्रजीकडे ओढा असे. ते इंग्रजी उत्तम लिहीत, प्रथम प्रथम त्यांत शब्दावडंबर असे. 'General war in Europe' ही त्यांची लेखमाला लोकप्रिय झाली होती असें सांगतात.

अध्यापन-काल.


 परंतु अद्याप गोपाळारावांचे ध्येय निश्चित झालें नव्हतें. त्यांची ज्यूरिस्प्रूडन्सची परीक्षा उतरली. १८८६ सालीं ते व वासुदेवराव केळकर फक्त वर्गाच्या दिवशी मुंबईस जात; हजिरी पुण्यास राहूनच ते भरीत. आपण नामांकित, फर्डे इंग्लिश बोलणारा वकील व्हावे हीच त्यांच्या मनांतली इच्छा दिसते. परंतु देवाची इच्छा दुसरीच होती. त्याचे विचार कोणास आकळतां येतात? गोपाळरावांच्या हातून सर्व देशाची वकिली व्हावयाची होती. ते टिळक-आगरकरांच्या सहवासांत होते. विशेषतः आगरकरांच्या मध्ये आणि त्यांच्या मध्ये साम्य होतें. कष्टदशेतून, दारिद्र्याच्या पंकांतून आगरकररूपी सुंदर कमल देशास लाभलें होतें. गोपाळरावांची स्थितिही गरीबीचीच होती. आगरकरांनी पैशाचा व सरकारी मानमरातबाचा मार्ग झिडकारून जनसेवेस वाहून घेतलें या गोष्टीचा न कळत परिणाम गोपाळरावांच्या गुणग्राही अंतःकरणावर झाल्याशिवाय राहिला नसेल. आमरण गरीबांतच जन्म कंठून अध्यापक-वृत्तीनें पुरातन ऋषींप्रमाणे व्रताचरण करावयाचे हा आगरकरांचा उज्ज्वल मार्ग अनुसरण्याची अंधुक स्फूर्ति त्यांस झाली असेल. आगरकरांचें अकपट वर्तन, निर्व्याजमनोहर उदार स्वभाव, कुटिल विचारांची चीड, पतित व अज्ञानांधःकारांत पडलेल्यांचा उद्धार करण्याची तळमळ, मनाची धीरता, शिव्याशापांस न जुमानतां आपला दृढ निश्चय राखण्याचा बाणा या सर्व गुणांचा गोखल्यांच्या कोमल मनावर कांहींच परिणाम झाला नसेल कां? टिळक, आगरकर अत्यंत बुद्धिमान्– परंतु त्यांनीं आपलें बुद्धिवैभव देशास वाहिलें. तोच घडा आपण गिरवावा, असे विचार त्यांच्या मनांत येऊं लागले असतील; परंतु अद्याप गोपाळरावांस महत्त्वाकांक्षा होती. आपण पैसे मिळवावे, सुखाचा संसार करावा हीच वृत्ति अद्याप होती. मुंबईस त्यांचे मित्र पटवर्धन या वर्षी रहावयास गेले. तेथे कायमचा शिक्षक (हो)ण्याचा प्रश्न निघे, आणि You will drive in carriages while I shall walk on foot असें गोखले म्हणत. आपणही हाच सुखाचा रुळलेला मार्ग स्वीकारावा असें त्यांस वाटे. परंतु मवितव्यतेच्या मनांत तसें नव्हतें. समाजांत मानमान्यता मिळवावयाच्या गोपाळरावांच्या कल्पना बदलत चालल्या. सरकारी नौकरी करूनच मान्यता मिळत नाहीं; आज आगरकर, टिळक यांस समाजांत किती लोकोत्तर मान मिळत आहे; आपणासही तोच मान सोसायटीत राहून मिळवितां येईल, हा विचार त्यांच्या मनांत येऊ लागला. या विचाराबरोबर स्वार्थत्यागाची वृत्ति पण उद्भवूं लागली. आगरकर, टिळक यांनी किती स्वार्थत्याग केला असे विचार मनांत येत जात असतां सोसायटीच्या कांहीं चालकांनी गोखले यांस 'आतां आमच्याच मंडळीला मिळा' असें सांगितले. सोसायटीला आतां कॉलेज संपूर्ण अभ्यासक्रम शिकविणारे करावयाचे होतें. गोपाळरावांचा इंग्रजीचा अभ्यास- व्यासंग दांडगा होता. तेव्हां त्यांस पहिल्या वर्षाचे इंग्रजी शिकविण्यास देण्यांत येणार होते. गोखल्यांस मोठा प्रश्न पडला. आपला वडील भाऊ काय म्हणेल? जीव गेला तरी त्याचा शब्द आपण मोडणार नाहीं असा गोपाळरावांचा निश्चय. शेवटीं परभारें त्यांच्या भावाची परवानगी मिळाली आणि १८८६ च्या अखेरीस गोपाळराव सोसायटीचे तहाहयात सभासद झाले. आपणांस आगरकर, टिळक यांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा मान मिळाला याचें गोपाळरावांस सानंद कौतुक वाटे. संकुचित वातावरणातून ते आतां बाहेर पडले. स्वतःचे हित आतां मागें पडून संस्थेचे हित समोर आलें. स्वार्थत्यागाचा पहिला धडा त्यांनी गिरविला. बुद्धिमंत व उद्योगी गोपाळरावांच्या आयुष्याला निराळें वळण लागलें. कॉलेजांत ते अध्यापकाचे काम करूं लागले.
 आतां थोडें गोपाळरावांच्या घरगुती स्थितीकडे वळू या. गोपाळराव तेरा वर्षांचे असतांच त्यांचे वडील वारले होते. वडील वारल्यानंतर लग्नाची वगैरे जबाबदारी चुलते अंताजीपंत यांच्यावर पडली. वडील असतांनाच चुलत्यांनी विवाहाचा प्रश्न काढला होता. परंतु 'शिकतो आहे, येवढ्यांतच कशास घाई? अजून कांहीं वय गेलें नाहीं.' असे शब्द त्यांचे वडील बोलले. वडील निवर्तल्यावर अंताजीपंतांनी एक वर्षांतच १८८० साली गोपाळाचा विवाह केला. कारण, नाहीं तर मग रूढीप्रमाणें तीन वर्षे विवाह करतां आला नसता. गोपाळाचे वडील १८७९ मध्ये वारले, गोपाळरावांच्या घराण्यांतली मंडळी दीर्घायुषी होती, परंतु कृष्णराव त्या मानानें अल्पवयीच ठरले. गोपाळास हें लग्न अगदीं निरुपायाने करून घ्यावे लागले, वडिलांचा शब्द मोडावयाचा नाहीं यासाठींच ते लग्नास उभे राहिले, परंतु त्याचा परिणाम जसा व्हावयाचा तसाच अनिष्ट झाला. गोपाळरावांस ही लग्नाची गोष्ट कोणीं काढिली तर अगदी खपत नसे, ते वस्कन् अंगावर यावयाचे, त्यांनीं बायकोचें नांव टाकलें. तिने आपल्या गुणांनीं कदाचित् गोपाळरावांस प्रसन्न केलें असतें, परंतु त्यांतच तिला पंडुरोग झाला. आधींच मनाविरुद्ध झालेले लग्न आणि त्यांत बायको पंडुरोगी. गोपाळरावांनीं सावित्रीबाईचें नांव सोडून दिले याचे त्यांस पुढे फार वाईट वाटे व पश्चात्ताप होई. गोपाळराव पुण्यास कायम झाल्यावर आतां यांचें दुसरें तरी लग्न करून द्यावें असा गोविंदरावांच्या बायकोने प्रश्न काढला आणि गोपाळरावांचा द्वितीय विवाह १८८७ साली झाला. आतां ते बायको, आई व आणखी कांहीं मंडळीसह शनवारांत तांब्यांच्या बिऱ्हाडीं रहात असत. येथेंच टिळक आणि आगरकरही रहात असत. त्या वेळेस त्यांचें इतकं प्रेम होते! पुढे गोखले शनवारांतील भाटवडेकरांच्या वाड्यांत राहू लागले, कॉलेजमध्ये शिकवावें व घरचा संसार चालवावा असें चाललें होतें.
 गोपाळरावांचें कॉलेजांतील काम जोराने चालू झाले. त्यांस प्रीव्हियसचे इंग्लिश शिकवावयास दिलें. त्या वर्षी सौदेचें लोकप्रिय नेल्सनचे चरित्र अभ्यासासाठी होतें. नेल्सन हा दर्यावर्दी अधिकारी. या पुस्तकांत गलबतांच्या नानाप्रकारच्या भागांचें वर्णन आले आहे. देशावरच्या पुष्कळ विद्यार्थ्यांनी समुद्र पाहिलेला सुद्धां नसतो. त्यांस प्रचंड गलबतांची कल्पना नसते. गोपाळराव या गलबतांचें यथार्थ स्वरूप समजण्यासाठी स्वतः मुंबईस जाऊन ही माहिती मिळवून येत आणि मग विद्यार्थ्यास सांगत. कोणतेही काम अंगावर पडले म्हणजे तें कायावाचामनानें करणें हे आपले कर्तव्य आहे असें समजणारे लोक थोडेच असतात. कामाची वेठ मारणारेच पुष्कळ; परंतु गोपाळरावांचे हे ब्रीद नव्हतें. मुलांस ते मनापासून शिकवीत शिकविण्यासाठीं घरी तयारी करीत. त्यांचा सकाळचा ७॥ ते १०॥ हा वेळ घरी सिद्धता करण्यांत जात असे. आपली. जबाबदारी ओळखून काम करणारे असे मेहनती शिक्षक विरळा. परंतु उत्तम शिक्षक सर्वांसच होतां येत नाही. सर्व विषय सारख्याच मनोरंजकतेनें शिकविणें एकाद्यासच साधतें. गोपाळराव जरी इंग्रजी शिकवितांना पुष्कळ मेहनत घेत तरी मुलांच्या मनावर विषय उत्तम रीतीनें त्यांस ठसवितां येत नसे. आगरकर न्यायासारखाच बुद्धि आणि तर्कप्रधान विषय सुद्धां रसाळ करून सांगत. टिळकांना गणितांतील तत्त्वें विद्यार्थ्यास सहज पटतील अशा रीतीने सांगतां येत. तसे गोपाळरावांचे इंग्रजीविषयीं नव्हतें. ते सफाईदार व भरभर न अडखळतां बोलत. परंतु वाङ्मय शिकवितांना जी एक प्रकारची सहृदयता लागते ती व ग्रंथकाराचे मनोगताशी समरस होतां येण्याची कला हीं गोपाळरावांत नव्हती. केळकर हे इंग्रजीचे त्यावेळचे नामांकित शिक्षक. ते इंग्रजी विषय इतका उत्कृष्टपणें व सहजपणें विशद करीत की, मुलें डोलू लागत. एकाद्या दृष्टांतानेंच ग्रंथकाराचे हृद्गत ते मुलांस समजावून देत, व एकादी मार्मिक कोटि करून मुलांचीं मनें उचंबळवून सोडीत. विषयाशी शिक्षक तन्मय व्हावा लागतो, आणि मगच सहजोद्गार त्याच्या मुखावाटे बाहेर पडूं लागतात. प्रो. केळकरांसारखे शिक्षक खुद्द इंग्लिशांतही थोडेच मिळतील असा त्यांचा लौकिक होता. परंतु अवघड भागावरच केळकर वेळ दवडावयाचे; सोपा भाग आला कीं, तासास तीनतीनशे कवितेच्या ओळी व्हावयाच्या. गोखले असें कधीं करीत नसत. त्यांचे काम प्रमाणशुद्ध आणि नेमस्त. टंगळमंगळ कशांतही नाहीं. अगदी सोपा भाग आला तरी तोही विवरण करावयाचा. सर्वच भाग त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा. हें महत्त्वाचें वाक्य, खुणा करा वगैरे ते सांगावयाचे नाहीत. विद्यार्थ्यांना वाटावयाचें, सर्वच परीक्षेस करावयाचें कीं काय? परीक्षेसाठीं अमुक अमुक मुद्दाम वाचा असे आपणांस शिक्षक सांगतील तर बरें असें विद्यार्थ्यांस वाटत असतें, परंतु गोपाळरावांचे तसें नव्हतें. तसेंच जेथें जेथें संदर्भ असेल– विशेषतः ऐतिहासिक संदर्भ- तेथें तेथें तो स्पष्ट करावयाचा, यामुळे त्यांची शिकवणूक परीक्षेसाठी जास्त उपयोगाची नसे. तसेच वाङ्मयाबद्दल मनांत प्रेम किंवा भक्ति उत्पन्न करणें गोखल्यांस शक्य नसे. तें काम केळकरांनीच करावें; असो. १८८६-८७ मध्ये गोपाळरावांनी दुसरा एक उद्योग आरंभिला होता. शाळांमधून उपयोग व्हावा म्हणून ते अंकगणितावर एक इंग्रजी पुस्तक लिहीत होते. तें पुरें झाल्यावर त्या त्या विषयांतील पंडितांना त्यांनीं दाखविलें. टिळकांची गणितांत मति सूक्ष्म व दांडगी. त्यांनी हें पुस्तक छापवा असें उत्तेजन दिलें. गोखले फक्त २१ वर्षांचे होते. त्यांस आनंद झाला व तें पुस्तक प्रसिद्ध झालें. प्रथम तें पुस्तक रहाळकर आणि मंडळी यांच्याकडे दिलें होतें. पुढें तें मॅकमिलन् कंपनीकडे जाऊन या उपयुक्त पुस्तकाचा हिंदुस्थानभर प्रसार झाला. दरमहा १२५ रुपये या पुस्तकाबद्दल मॅकमिलन् कंपनीकडून त्यांस पुढे मिळत असत. हें एक त्यांस कायमचें उत्पन्न झालें. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मुलीस तें मिळतें. नुकतीच या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ति प्रो. नाईक यांच्याकडून मॅकमिलन् कंपनीनें प्रसिद्ध केली आहे.
 चांगल्या गोष्टीस लवकरच दृष्ट लागते. लहान मुलाला न्हाऊं माखूं घालून आई त्याच्या पाणीदार डोळ्यांस काजळ लावते. तो सुंदर दिसूं लागतो. आईला वाटतें, माझ्या सोनुल्यावर दृष्ट पडेल; आणि ती त्यास गालबोट लाविते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरभराटत चालली होती. चिपळूणकर जरी गेले तरी त्यांच्या पाठीमागें, टिळक, आगरकर, आपटे, गोळे, धारप, नामजोशी, गोखले, भानू-यांसारख्या विद्वानांनीं संस्था अल्पावकाशांतच नांवारूपास आणिली. संस्थेचें कॉलेज निघून तें आतां सर्व विषय शिकविण्यास समर्थ झालें होतें. संस्थेचें पैशाचें काम नामजोशी करीत होते. लोकांचा संस्थेवर लोभ जडला. पुण्यास संस्था भूषणभूत झाली. न्यू इंग्लिश स्कूलसारखी शाळा हिंदुस्थानांत अन्यत्र क्वचितच असेल असे शेरेबुकांत शाळा पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी लिहून ठेविलें. परंतु सर्व काळ सारखाच नसतो. या जोमाने वाढणाऱ्या रोप्याला कीड लागत चालली. दोन भांडीं एकत्र आलीं कीं त्यांचा आवाज व्हावयाचा. दोन फांद्या एकावर एक घासल्या तर त्यांतून अग्नि बाहेर पडावयाचा. चार माणसें एकत्र होऊन कांहीं दिवस गुण्या- गोविंदाने रहातांना दिसतात, परंतु अखेर स्फोट व्हावयाचा हें निदान आम्हां लोकांत तरी ठरलेलेच आहे. 'आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः' नाना प्रकारच्या कल्पना आम्ही पुढे मांडू- त्या पार पाडण्यासाठी कंबर बांधू, परंतु मध्येच कांहीं तरी विघ्नें उत्पन्न होऊन हे हेतु जागच्या जागी रहातात. या कल्पना बुडबुड्याप्रमाणें विरून जातात. तडीस पोचविणारा एकादाच आमच्यांत निघावयाचा असा लौकिक- दुर्लौकिक- आमचा फारां दिवसांचा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचें असेंच होणार अशी चिन्हें दिसूं लागली. वाढत्या चंद्रास आजच ग्रहण लागणार, फोफावणाऱ्या वृक्षास कीड लागणार असें वाटू लागले. प्रथम या संकटाचा उद्भव मतामतांच्या गलबल्यांत झाला. आगरकर व टिळक १८८२ च्या जुलै महिन्यांत कारागृहांत गेले. त्यांचा १०१ दिवस एकत्र सहवास झाला. 'मनुष्य पहावा बसून आणि जमीन पहावी कसून' अशी आपल्यामध्ये एक सुंदर म्हण आहे. आपण जेव्हां मनुष्याच्या जवळ पुष्कळ दिवस रहातों तेव्हांच त्याच्या स्वभावाचें सम्यक् व यथार्थ ज्ञान आपणांस होतें. वरवर होणारे ज्ञान, येतां जातां होणारा बोध हा निर्विकल्प असतो; परंतु आपण त्या मनुष्याच्या सहवासांत वाढूं लागलों कीं, त्याच्या सर्व मतांचें सविकल्पक ज्ञान आपणांस होऊं लागतें. आगरकर व टिळक यांचे कॉलेजमधील वादविवाद आतां तुरुंगाच्या दारांत सुरू झाले. शिक्षणाच्या झिरझिरीत वस्त्राखालीं क्षणभर झांकून गेलेलीं त्यांचीं परस्परविरोधि मतें येथें पुनः स्पष्ट बाहेर येऊ लागली आणि याचा परिणाम असा झाला कीं, ज्या वेळेस हे दोघे नरवीर कारागृहांतून मुक्त झाले त्या वेळेस एकमेकांविरुद्ध मनें होऊन बाहेर पडले.
 कॉलेजमध्ये मधली सुट्टी आली आणि अध्यापक वर्ग एकत्र जमला कीं, वादविवादास सुरुवात होऊन त्यास ऊत यावयाचा. प्रो. भानू यांनी टिळकांच्या आठवणीत याचे हुबेहुब वर्णन केलें आहे. ते म्हणतात 'पुष्कळ वेळां यांचे वाद केवळ 'जितं मया' यासाठीच होत. त्यांत तत्त्वशोधन असे क्वचितच होई' अशा रीतीनें कॉलेजमध्ये दोन पक्ष झाले. आगरकर पक्ष आणि टिळकपक्ष. गोखल्यांच्या मनाचा ओढा आगरकरांकडे असे.
 परंतु शेवटची फाटाफूट जी झाली ती केवळ मतभिन्नत्वामुळे झाली असें आम्हांस वाटत नाहीं. मतभिन्नत्व होतें तें कॉलेजमध्ये असल्या वेळेपासूनच होते, परंतु शिक्षण हे त्यांनी समान ध्येय ठरविलें होतें; आणि त्याच्यासाठी ते तळमळत होते; आजवर खटपट करीत होते. १८८८ च्या दसऱ्याला गोपाळराव आगरकरांनी सुधारक हें स्वतंत्र साप्ताहिक काढले. ज्याप्रमाणें आपले मराठे शिलेदार दसऱ्याच्या दिवशीं आपल्या शृंगारलेल्या घोड्यावर स्वार होऊन हातांत तरवारी घेऊन शत्रुखंडनार्थ मोठ्या ऐटीनें आणि उमेदीनें बाहेर पडत, त्याप्रमाणेंच हा नरवीर आपल्या सुंदर तेजस्वी आणि दृढ अशा विचारवारूवर आरूढ होऊन, आपली तेजस्वी लेखणी हीच झळकणारी असिलता हातांत सरसावून, समाजांत माजलेल्या रूढींचें, दुराचारांचे निर्मूलन करण्यास या दसऱ्याच्या शुभ प्रसंगी सज्ज झाला. मरेपर्यंत ते लढले, धीरानें लढले, सुधारकांत इंग्रजी भाग कांहीं वर्षे गोपाळराव गोखले लिहीत असत, यामुळे आगरकरांस मोठी मदत होई. सुधारकांतील मतांवर केसरीत प्रखर टीका होई आणि या टीकेवर सुधारक प्रतिटीका करी. हीं भांडणे कॉलेजमध्येही घुसत व भांडणे मिटतां मिटतां मारामार पडे. इतके झाले तरी टिळकांनी कॉलेज सोडण्याचें मनांत आणलें नाहीं. कॉलेजचें काम चाललेच होतें. या भांडणांमुळे कॉलेजच्या कामांत म्हणण्यासारखा व्यत्यय येत नसावा. नामजोशी द्रव्यनिधि गोळा करीतच होते. ते नेहमीं टिळकांच्या पक्षाचे असत. परंतु या वादांनीं नामजोशी यांनी आपले स्वीकृत कार्य कधीं सोडिलें नाहीं. पुष्कळ लोक टिळक कॉलेजमधून निघाले याचें कारण या वादविवादावर सोपवितात; परंतु हें मुख्य कारण नव्हे. मुख्य कारण म्हणजे पगारवाढ, इतर बाजूंनी पैसा मिळवावा की नाहीं वगैरेच मुद्दयांवर मतभेद झाले हें होय. आणि जेसुइट मतावर निघालेल्या या संस्थेने आपले ध्येय ढकलून दिलें हें पाहून टिळकांनी संबंध सोडला. टिळक तेवढे स्वार्थत्यागी आणि बाकी सर्व पैशासाठी हपापलेले, असें आम्ही म्हणत नाहीं. ते पैशासाठी हपापलेले नसतील. त्यांना त्या वेळेस कुटुंबाच्या केवळ खर्चासाठीं जास्त पैसे पाहिजे असतील. टिळक म्हणत कीं, असे नियम करूं नका, ज्यास जरूरी आहे त्यास त्याची स्थिति लक्षांत घेऊन द्या जास्त पगार. आगरकरांची अडचण लक्षांत घेऊन त्यांस जास्त पगार द्यावा असें टिळक म्हणत होते. परंतु आतां संस्थेची स्थिति चांगली आहे तर सर्वांचीच बढती व्हावी या मताचा टिळकांना तिटकारा आला. एका टीकाकाराने तर टिळकांस त्यांच्या वडिलांनी ३००० रुपये ठेविले होते, तेव्हां त्यांस आगरकरांसारख्या इतर विपन्न माणसांची जरूर काय समजणार असें लिहिलें आहे; परंतु ते कुत्सित आहे. टिळकांच्या घरी पुष्कळ पैसा असेल; तो दुसऱ्यास अडचणीच्या वेळी त्यांनी दिलाही असेल, परंतु म्हणून आपल्या नियमांत फरक करावा असें थोडेंच आहे. टिळक निघून जाण्यास हेंच मुख्य कारण असावें. कारण यांत इतर मतांस जागा नसून, ज्या हेतूनें ही शिक्षणसंस्था काढिली तिच्या मूलभूत तत्त्वांवरच गदा येत होती. टिळक हे तत्त्वाचे भुकेले असत, व्यक्तीचे नसत. व्यक्ति- मग ती कितीही थोर, विद्वान्, स्वार्थत्यागी असो- त्या व्यक्तीस आपल्या मतांसाठींच टिळकांना दुखवावें लागलें; यासाठींच त्यांस आमरण झगडावे लागलें. गोखले हे प्रोफेसर झाल्यामुळे टिळकांस त्यांचा हेवा वाटू लागला, गोखले हे आपले प्रतिस्पर्धी आहेत असें टिळकांना वाटलें आणि ते गोखल्यांचा हेवा करूं लागले, पुढें मागें हा आपल्यावर ताण करील आणि आपला लौकिक मागें पडेल असें टिळकांस भय पडलें असें प्रि. परांजपे आपल्या छोटेखानी इंग्रजी चरित्रांत लिहितात. "Mr. Tilak saw soon after Gokhale's admission to the society that here was a man likely to be his formidable rival" परंतु या लिहिण्यांत कांहीं अर्थ नाहीं. या वेळेस गोखले इंग्रजी शिकवीत असत तें सुद्धां त्यांस मुलांना मनोरंजक करून शिकवितां येत नसे. इतिहास व अर्थशास्त्र टिळक सोडून गेल्यावर ते शिकवूं लागले. आणि १८९७ नंतर त्या विषयावर ते अधिकारी या नात्यानें सांगत. परंतु आज १८८७ च्या सुमारास टिळकांस हेवा वाटण्यासारखें गोखल्यांजवळ कांहीं एक नव्हते. टिळकचरित्रकार रा. आठल्ये लिहितात:-
 "Mr. Tilak jealous! Mr. Tilak unable to work with his equals.— Mr. Tilak, who during eleven years of his life in the D. E. Society never once cared to obtain the post of a Principal, Head Master or Superintendent! And pray jealous of whom? Not of Ranade or Telang- his intellectual peers; but of Apte, Agarkar and Gokhale!! Mr. Paranjpye is here speaking of the Gokhale not of 1905 or 1908, not of 1897 even; the Gokhale of 1885 or 1887 was, according to his own biographers, regarded by his own friends and Mr. Tilak's opponents as nothing better than a clever student. Apte was a Sanskritist and nothing more; Mr. Tilak's versatile genius could beat Apte on his own ground. As regards Agarkar, his title to fame rests more on his great sacrifice, his championship of reform of every kind and his eloquent style, rather than on his genius and learning. In point of intellectual equipment, Mr. Tilak far surpassed all his colleagues; and if there was any jealousy at work, it must have been rather in the minds of those who accustomed to regard Mr. Tilak as an equal ever since the College days, could not now hear with equanimity his enormous superiority."
 हा लांबलचक उतारा देण्याचें कारण येवढेंच कीं, टिळकांस इतरांचा द्वेष वाटे, त्यांस आपल्याहून दुसरा अधिक चांगला प्रोफेसर होईल ही भीति वाटे हे आक्षेप अत्यंत दुष्ट व फोल आहेत, हे आमच्याप्रमाणेंच इतरांसही वाटतें हें दाखविणें; असो. टिळकांनी अखेर डिसेंबर १८९० मध्ये आपला कायमचा राजीनामा दिला आणि ज्या बाळसेदार बाळाला आपल्या अंगाखांद्यावर खेळविलें, ज्याच्यासाठी ११ वर्षे जिवापाड श्रम केले तें बालक इतरांच्या स्वाधीन करून, मोठ्या कष्टानें परंतु धीरानें आपल्या तत्त्वासाठीं ते बाहेर पडले. ते बाहेर पडले हेंच बरें झालें. कारण हा नरसिंह शाळेतच कोंडला गेला नाहीं हें देशाचें भाग्यच समजावयाचें. त्यांनीं आपल्या केसरीनें महाराष्ट्र खडबडविला आणि देशाबद्दलचे विचार सुप्तांतःकरणांत जागे केले. 'टिळकांनी पहा आपला आजन्म सेवेचा करार न मानतां कॉलेज सोडलें, उभारलेली संस्था ते टाकून गेले, आपल्या मागे संस्थेचे काय होईल याची त्यांस फिकीरही वाटली नाहीं.' असे उद्गार पुष्कळांच्या लेखणींतून आणि तोंडांतून ऐकूं येतात. परंतु तत्त्वाचा खून करून संस्था चालविण्यापेक्षां ती संस्था समजा, मेली तरी तिच्याबद्दलं टिळकांना तितकें वाईट वाटलें नसतें. स्वामिभक्तीसाठी पन्नेला स्वपुत्राचा बळी द्यावा लागला. तत्त्वनिष्ठेसाठी टिळकांस स्वतःचे गोजिरवाणें अपत्य टाकणें भाग पडले. ही कठोरता म्हणजे कर्तव्यनिष्ठुरता. कर्तव्य कठोर असते; फुलांवर निजणें नव्हे किंवा हत्तीवर झुलणें नव्हे. याशिवाय संस्थेचा संबंध तोडून जर संस्थेच्या चालकांनी त्यांस एकादा विषय शिकवा, आमची अडचण आहे असें म्हटलें असतें तर त्यांनीं कधीं नाकारलें नसतें. त्यांच्या आठवणीत अशी गोष्ट दिली आहे: "टिळकांनीं जेसुइट तत्त्वाचा पुरस्कार करून स्वतःच वर्तमानपत्र चालवून खूप पैसा मिळविला" असाही एक आक्षेप आहे. परंतु जेसुइट तत्त्व संस्थेला बंधक होते; संस्थेबाहेर नव्हते. संस्थेबाहेर जेसुइट राहीन असे टिळक म्हणत नव्हते तर संस्थेत राहिलों तर जेसुइटच राहीन आणि सर्वांनीं राहिले पाहिजे असे त्यांचे म्हणणे असे. संस्थेच्या बाहेर पडल्यावर त्यांच्यावर दुसऱ्या जबाबदाऱ्या, दुसरी कार्ये आली. आतां त्यांचा संस्थेशीं, तिच्या तत्त्वांशीं काय बरें संबंध होता? तेव्हां याही आक्षेपास जागा आहे असे आम्हांस वाटत नाहीं. असो.
 सोसायटींत आतां एकवाक्यता झाली. आतां सर्व सुधारकांचा मेळा जमला. काम सुरळीत चालूं लागलें. वादविवाद थांबले. शांतीचें राज्य झाले. परंतु गोपाळरावांवर आतां नवीन जबाबदारी येऊन पडली. टिळक सोडून गेल्यावर टिळकांची बाजू सांवरणारे नामजोशी पण सोडून गेले. नामजोशी यांस संस्थेचे 'फॉरिन् सेक्रेटरी' असें विनोदानें म्हणत असत. त्यांच्या अंगांत गुणही तसेच होते. ते अत्यंत खटपटी. सर्व जगांत त्यांच्या ओळखी. समयसूचकता, प्रसंगावधान, कोणाशीं कसें बोलावें व पैसे कसे काढून घ्यावे ही कला पूर्ण साधलेली- यामुळे संस्थेचें वर्गणी गोळा करण्याचे काम नामजोशांकडे असे. मनुष्यस्वभाव त्यांस फार चांगला कळे. त्यांच्या कामाचा धडाकाही तसाच असे. ते आपल्या पवित्र कार्यासाठी, सरदार, दरकदार, संस्थानिक यांच्याकडे जाण्यासही कचरावयाचे नाहीत. त्यांची छाती दांडगी, आवेश जबरा सर्वांपासून पैसा त्यांनी गोळा केला, परंतु ते गेल्यावर हें काम गोखल्यांच्या अंगावर पडलें. १८९२ साली आपटे स्वर्गवासी झाले. आगरकर त्यांच्या जागेवर गेले. टिळक गेल्यावर गणित, इतिहास व अर्थशास्त्र आणि इंग्रजी हे विषय गोखले शिकवीत. परंतु हें कॉलेजमधील वाढलेले काम संभाळून सुट्टी आली कीं खांकेस झोळी लावून गोपाळराव वर्गणी गोळा करण्यासाठी फिरत. पडेल तें काम नेटानें करावयाचें, माघार घ्यावयाची नाहीं हा त्यांचा स्वभाव, फंड जमविण्याचें काम किती कठिण असतें हें तें करणारासच समजते. नाना मतांच्या व नाना दृष्टींच्या लोकांची गांठ पडते. समजून घालावी लागते. हुजत घालावी लागते. शिक्षणासाठीं- या पवित्र कार्यासाठी मदत मागावयास गेलें तरी त्यांतही वाईट पाहणारे लोक नसतात असें नाहीं. वाइटाकडेच दृष्टि ठेवणारे लोक असतात. वाईट सांपडलेंच नाहीं तर ते शंका प्रदर्शित करतात. कोणी स्तुति करितो तर कोणी निंदा करितो. 'हे आले आतां देशाचा उद्धार करणारे! काय ध्वजा लावल्या आहेत हो यांनीं? अक्कल तर पहा यांची, यांची काय कुवत आहे देशास वर आणण्याची?' या प्रकारची निंदाप्रचुर परुषोत्तरे सहन करावी लागतात. कधीं गुलाब सुखवितो, तर कधीं कांटे दुखवितात. असले अनुभव जगाची नीट ओळख करून देतात. मनुष्यांशी कसे वागावें हें समजून येते. थोरांच्या ओळखी होतात. निरनिराळे विचारप्रवाह दिसतात. सर्व इलाखाभर त्यांनीं वणवण केली, आणि मिळेल तें तुळशीपत्र सोसायटीच्या चरणीं वाहिले. १८९२ मध्ये कॉलेजची नवी इमारत झाली; १८९५ मध्ये वसतिगृहे बांधण्यांत आली. परंतु वर्गणीरूपानें पुरेसा पैसा गोपाळरावांनी मिळविल्यामुळे संस्था कर्जबाजारी झाली नाहीं. ती स्वतःच्या पायांवर उभी राहिली. त्यांस कॉलेजमधील सर्व काम झेपेना. गणितासाठीं ते शिक्षक धुंडाळू लागले, आणि मुंबईस त्यांच्याबरोबरच बी. ए. झालेले धोंडोपंत कर्वे यांस त्यांनी सोसायटीत आणले. १८९५ मध्ये सोसायटीवर फार मोठी आपत्ति कोसळली. सोसायटीवरच नाहीं तर सर्व महाराष्ट्रावर कोसळली. प्रथम इंग्रजीचे प्रख्यात शिक्षक प्रो. केळकर हे मृत्युमुखी पडले आणि दुःखें येऊ लागली म्हणजे एकदम येतात हें दाखविण्यासाठींच जणूं काय प्रि. आगरकर यांसही काळाने उचलून नेलें, उदार हृदयाचा, निष्कलंक आचरणाचा, थोर मनाचा, जबरदस्त लेखणीचा, स्वजनहितासाठी तळमळणारा, दारिद्र्याची खिजगणती न करणारा असा महापुरुष- सत्पुरुष कोणाला चटका लावून जाणार नाहीं? कोणाच्या डोळ्यांतून टिपें गळणार नाहींत? कोणाचें हृदय फाटणार नाहीं? तत्त्वासाठी सर्व सहन करणारे बुद्धिप्रधान टिळक, पण तेही रडले. टिळक बुद्धिप्रधान, तर्ककठोर; आगरकर जरी बुद्धिप्रधान, तर्कप्रधान असले तरी त्यांच्या हृदयांत ओलावा जास्त दिसे, टिळकांच्या हृदयांत जर आपण डोकावूं लागलों तर प्रथम ज्ञानाचे- बुद्धीचे खडक लागावयाचे आणि त्यांच्यावर आपण आदळावयाचे. परंतु एकादा खंबीर गडी जर हे फत्तर फोडून खाली पाहील तर त्यास सात्त्विक व कोमल वृत्तींचा झुळझुळ झरा तेथे वाहत असलेला आढळेल. आगरकरांच्या अंतःकरणांत बुद्धीच्या दरींतून प्रेमगंगा वाहत होती किंवा प्रेमाच्या दरींतून बुद्धिगंगा वाहत होती; यामुळे दोन्ही गोष्टी आपणांस ताबडतोब दिसत. आगरकरांच्या मृत्यूनें टिळकांची बुद्धि फोडून त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेतला आणि ही हृदयपाताळांतील गंगा नयनांमध्ये दिसून आली. दोघे झगडले तरी तत्त्वासाठी झगडले. त्यांनी एकमेकांवर घुसून एकमेकांस जखमी केलें तरी तें स्वार्थासाठीं नव्हे तर स्वतःला प्राणाहून प्रिय वाटणाऱ्या विचारांच्या संरक्षणासाठी. त्यामुळें प्रेम हें थोडेंच सुकून जाणार? प्रेम आहे असें दाखविण्यासाठी सामान्य जनांना देवाण घेवाण करावी लागते. परंतु थोर माणसांचें तसें नसतें. दुसऱ्यावर प्रेम आहे असें त्यांस दाखवावयाचें नसतें; तें त्यांच्या अंतरीं मात्र असतें. रामतीर्थांनीं आपल्या एका पत्रांत लिहिलें आहे. "आपले म्हणणें असें असेल कीं, बाह्य व्यवहार- लोकोपचार यथास्थित रीतीनें न पाळल्यास त्यामुळे प्रेमांत कमतरता येते, तर हें म्हणणें मला बिलकुल पसंत पडत नाहीं." "बाह्य सन्मानांत किंवा व्यवहारांत कांहीं न्यूनता किंवा अपूर्णता रहात असली तर तेवढ्यानें आपणांवरून माझें मन उडालें आहे, अशा प्रकारचें अनुमान बांधूं नये." "प्रेम हा आंतरिक संबंध आहे, मग तो वरवर आपणांस न कां दिसेना." हेच उद्गार टिळक आणि आगरकर यांच्या बाबतींत आम्हांस आठवतात. इतर सर्वांपेक्षां टिळकांचेंच आगरकरांवर प्रेम होते, आणि तें खरें शुद्ध, सात्त्विक व निःस्वार्थी प्रेम होतें; असो.
 आगरकरांच्या मृत्यूने गोपाळराव गोखले फार खचले. परंतु कार्य तडीस नेणें हें पहिले कर्तव्य असल्यामुळे शोकावेग गिळून नवीन माणसें पडलेलें काम उचलावयास मिळविण्यासाठीं त्यांस खटपट करावी लागली. आगरकरांची जागा शेल्बीसाहेबांचे पट्टशिष्य गोविंद चिमणाजी भाटे यांस संस्थेत आणून त्यांनीं भरून काढली. वासुदेवराव केळकरांची जागा योग्य रीतीनें त्यांस लवकर भरून काढतां आली नाहीं. परंतु पुढें एक वर्षानें कराचीच्या कॉलेजांतील नाणावलेले प्रो. वैजनाथ काशीनाथ राजवाडे हे फर्ग्युसन कॉलेजास मिळाले. याप्रकारें चिपळूणकरांपासून प्राप्त झालेले लोण गोखल्यांनी पुढे चालू केलें. आतां ते फक्त इतिहास व अर्थशास्त्र या विषयांचेच प्रोफेसर राहिले. आणि या विषयांतच त्यांनी अलौकिक प्राविण्य संपादन केलें. तें त्यास कसें प्राप्त झालें हें आतां आपण पाहूं या.

राजकीय शिक्षणाचा काल.


 गोपाळरावांचा कॉलेजमधील व्याप जसा वाढत गेला तसा त्यांचा बाहेरील व्यापही वाढला. त्यांचा स्वभाव निरलस आणि कांही तरी नवीन शिकण्यासाठी उत्सुक असल्यामुळे संस्थेतील वादविवादांनी त्यांचं मन विषण्ण होत असे. ते उठून दुसरीकडे जात आणि कांहीं तरी वाचीत बसत. असें पुष्कळदा होत असे. आगरकरांविषयीं त्यांचा आदर दुणावत होता. त्यांचीं उभयतांची मतें जुळत. एकदां रानड्यांच्या जवळ सहज बोलतांना अकपट मन, सरळ हृदय, उल्हास व उत्साह, तरुणपणींचा जोम वगैरे गुण गोखल्यांत कसे आहेत याचे आगरकरांनी वर्णन केलें. न्या. रानड्यांस या तरुणास पाहण्याची इच्छा झाली. १८७० पासून १९०० पर्यंत महाराष्ट्रांत राजकीय, धार्मिक व सामाजिक चळवळ करणारे, आशेस पालवी फोडणारे, निराशेचा नायनाट करणारे न्या. रानडे हे प्रमुख होते. ते सरकारी नोकर असले तरी त्यांच्या कार्यात- लिहिण्यांत, बोलण्यांत, काँग्रेसला जाण्यांत व्यत्यय आला नाहीं. तरुणांचे ते वाटाडे झाले. त्यांना स्वतःस जो मार्ग पटला होता तो त्यांनी इतरांस दाखवून दिला. नोकरींत गुरफटून गेल्यामुळें रानड्यांस तितक्या धडाडीने व जोमाने कार्य करितां येत नसे. यासाठीं ते नवीन तरुण- मंडळीकडे दृष्टि ठेवीत. रामदास हे ज्याप्रमाणें 'चलाख आणि हुशार मुलगा दिसेल, त्याचे मन वळवून त्याला मजकडे पाठवा; त्याचा गोवा आम्ही उगवू' असें आपल्या शिष्यांस- मठाधिपतींस लिहीत- त्याप्रमाणेच रानडे हेही नवीन, जोमदार, स्वार्थत्यागी, प्रामाणिक व बुद्धिमान् तरुणांच्या शोधांत असत. आपल्यामागे देशास नेमस्तपणाचे वळण लावणारा कोणी तरी असावा असें त्यांस वाटे. आगरकरांना गोखल्यांविषयीं सांगितल्यानंतर त्यांनी ही गोष्ट लक्षांत ठेविली. एक दिवस त्यांनी आपले मित्र आबासाहेब साठे यांस गोपाळराव गोखल्यांची भेट घेण्यास सांगितले. आबासाहेबांनी भेट घेतली आणि ठरल्या दिवशीं त्यांची व रानड्यांची ओळख करून दिली. गुरूस शिष्य मिळाला. शिष्यास गुरु लाभला. 'आंतरः कोऽपि' हेतूची एकमेकांस ओळख झाली. शिष्य आनंदून घरीं गेला. गुरूचेंही मन प्रसन्न झाले. 'गोखल्यांचे पूर्ववयांतील गुरु आगरकर तर भर ज्वानींतले गुरु रानडे' रानड्यांच्या जवळ राजकारणाचे धडे घेण्यास शिष्यानें सुरुवात केली. पायरीपायरीनें गोखले शिकूं लागले. पहिल्या पहिल्यानें रानडे निरनिराळ्या उताऱ्यांचा त्यांस सारांश लिहून आणण्यास वगैरे सांगत. थोड्याच दिवसांनीं ते सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले. ते याबद्दल कांहीं एक वेतन घेत नसत. स्वार्थरहित बुद्धीनें त्यांनीं हें काम केलें. सार्वजनिक सभेचा त्या वेळीं सर्वत्र बोलबाला होता. सरकारांत तिच्या शब्दास मान असे, वजन असे. देशाचें म्हणणें, रयतेच्या तक्रारी, गाऱ्हाणीं, नीटपणे मुद्दे काढून सरकारापुढे मांडावयाचें काम सार्वजनिक सभा जितक्या जवाबदारपणें करी तसे इतरत्र होत नसे. हे काम अर्थात् रानड्यांचं असे. सर्व विषयांचा त्यांनीं सांगोपांग अभ्यास केलेला; विवेचक दृष्टि, समतोल मन, दुसऱ्याच्या अडचणी डोळ्यांआड न करू देण्याचा त्यांचा निश्चय, या सर्व गुणांच्या समन्वयामुळे त्यांच्या लिहिण्यास भारदस्तपणा आणि महत्त्व येई. याशिवाय सरकार अमुक एक कायदा करणार आहे अशी कुणकुण समजतांच ते तो साधक बाधक रीतीनेच चव्हाट्यावर आणीत, लोकमत तयार करीत आणि ते वेळीच सरकारच्या नजरेस आणीत. सरकारवरील टीका अशा स्वरूपाची असावयाची कीं, सरकारास ती कबूल करणें भाग पडे. मग सरकार आपली चूक कबूल करो वा न करो. नैतिक दृष्ट्या सरकारच्या वर्तनाचें समर्थन होऊ शकत नाहीं हेंच त्यांस मुख्यतः दाखवावयाचें असे. सभेच्या त्रैमासिकाचे संपादकत्व जरी गोखल्यांकडे आले तरी रानडेच बहुतेक मजकूर लिहीत. अद्याप गोपाळराव त्यांत लिहिण्यास धजत नसत. सभेचे चिटणीस झाल्यावर जास्त व्यापक प्रश्न त्यांच्यासमोर येऊ लागले; व त्यांचा मार्मिक अभ्यास त्यांस करावा लागे. असा अभ्यास चालला असतां एकदां रानड्यांनीं त्रैमासिकाकरितां एक लेख लिहिण्यास गोखल्यांस सांगितलें. गोपाळरावांनी नीट काळजी घेऊन लेख लिहिला आणि गुरूजवळ आणून दिला. लेख पाहून. 'चालेल; द्या छापावयास' असें माधवराव म्हणाले. रानड्यांच्या या होकारदर्शक शब्दांनीं गोपाळरावांस किती आनंद झाला असेल याची बरोबर कल्पना आपणांस येणार नाहीं. त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढले असेल. त्यांचे मन आनंदले असेल. रानड्यांसारख्या लोकोत्तर व विशाल बुद्धिमत्तेच्या लोकाग्रणीनें आपला लेख 'चालेल' असे म्हणावें, हें आपलें केवढें भाग्य असे गोखल्यांसारख्या गुरुभक्तिपरायण शिष्यास वाटले असण्याचा संभव आहे. रानड्यांची शिकवणूक खऱ्या गुरूची शिकवणूक होती. पारमार्थिक ज्ञान होऊन शिष्याचें कल्याण व्हावे अशी सद्गुरूची इच्छा असल्यामुळे तो शिष्याची मनोभूमिका जशी प्रथम साफ करितो, तेथील दुराग्रह व कोते विचार बाहेर काढून लावतो त्याप्रमाणेंच रानड्यांनीं केलें. गोपाळरावांचे अद्याप बाह्यलक्ष होतें. शिष्य प्रथम बहिर्दृष्टि असतो. सद्गुरु त्यास अंतर्मुख करितो. त्याप्रमाणे केवळ शब्दांवर भिस्त न ठेवतां अर्थाकडे ओढा पाहिजे हें रानड्यांनी गोखल्यांस शिकविलें. विचारांत गांभीर्य व सौंदर्य असावें; भाषेत नटवेगिरी नसावी, अंतःकरण उदात्त असावें; देहाची फार जोपासना नको, परंतु अंतःकरणासाठीं देहाची जरुरी आहे आणि देहरक्षणासाठी देहावर कपडे पाहिजेत. पण देहावर कपड्यांचे फार ओझे घातलें तर देह भागेल व अंतःकरण दडपून जाईल. त्याप्रमाणे भाषेवर फार अलंकार- उत्तम पोशाख आपण जर घातला तर अर्थाचा जीव घाबरा होतो. रानडे गोपाळरावांस सांगत कीं 'There must be vigour in thought, not in language.' पहिल्या पहिल्यानें गोपाळराव बोजड लिहीत. हळूहळू त्यांत सुधारणा होत गेली. त्याप्रमाणें कडक भाषा वापरण्याऐवजीं, भाषा मृदु ठेवून विचार कडक ठेवण्यास ते शिकू लागले, शब्द हें टरफल आहे; आंतला दाणा भरदार पाहिजे. शब्द हा शिंपला आहे; आंतील मोतीं घोसदार पाहिजे. टरफलाकडे आणि शिंपल्याकडे आपण लक्ष देत नाहीं; मोतीं आणि दाणा यांस जवळ करितों. हें तत्त्व रानड्यांनी गोपाळरावांस शिकविलें. त्याप्रमाणेंच जें कांहीं आपणांस लिहावयाचें वा बोलावयाचें तें मुद्देसूद, सत्याला धरून लिहावयाचें आणि जबाबदारीनें काम पार पडावयाचें. ज्या गोष्टीवर बोलावयाचे त्या गोष्टीची खडान्खडा माहिती करून घेऊन मग जीभ सैल सोडावयाची. रामकृष्ण परमहंस कलकत्त्यांतील धर्मोपदेशकांस म्हणत "तुम्हीं परमेश्वर पाहिला आहे कां? त्याचा संदेश तुम्हांस मिळाला आहे कां? तसे नसेल तर हा उपदेश करण्यास तुम्ही नालायक आहां." 'तुम्ही राजकारणाचा अभ्यास, मनन, निदिध्यास केला आहे कां? जमाबंदीचा विचार केला आहे कां? देशांतील रेल्वे, पाटबंधारे, दुष्काळाचीं कामें यांची साग्र माहिती करून घेतली आहे कां? जर असेल तर लिहा, तरच बोला' असेंच रानड्याचेही सांगणें असे. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' म्हणजे केवळ 'मुखमस्तीतिवक्तव्यंम्' होय. तोंड आहे तर बडबडा. परंतु या बडबडीच्या पाठीमागें बुद्धि व विचार यांचा जोर नसेल तर ती बडबड म्हणजे बुडबुडा आहे- क्षणिक आहे. लोकांस, सुज्ञांस तें पटणार नाहीं व रुचणार नाहीं. याच्या उलट सर्व शस्त्रास्त्रांनी सिद्ध होऊन तुम्ही लिहाल, बोलाल तर लोकांस आणि सरकारासही तें निमुटपणे ऐकलें पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, लॉर्ड बीकन्सफील्ड म्हणत असे कीं, The only way to acquire mastery of public affairs is to study blue-books. गोखल्यांस निरनिराळीं- ग्रीनबुझें, रेडबुकें, ब्ल्यूबुकें, सर्व सरकारी कामांचे रिपोर्ट, आजपर्यंतच्या सर्व कायद्यांची माहिती, मासिकेँ, वृत्तपत्रे, सभांच्या बैठकींच्या हकीगती सर्वांचें सार काढण्यास रानडे सांगत आणि गोपाळरावांनीं तें लिहून आणले म्हणजे तें जर पसंत पडण्यासारखें असेल तर 'चालेल, बरें आहे' असे म्हणत, नाहीं तर 'ठेवा तेथें' असें म्हणत. ते फार स्तुति करावयाचे नाहींत, टीकाही करावयाचे नाहींत. मागून स्वतः त्यांत ते योग्य तो फेरफार करीत किंवा कधीं सर्वच निराळे लिहीत. 'राजनीतीचें परिशीलन खडतर तपश्चर्येप्रमाणें गोखल्यांनीं रानड्यांच्या सेवेंत राहून केलें. माधवरावांच्या बुद्धीचें सर्वांगीणत्व, व्यापकत्व, कुशाग्रत्व, गोखल्यांच्या बुद्धींत कदाचित् नसेल; पण तिचें सर्वस्व एका प्रवाहांत आणिल्यामुळे व तिला अल्प अल्प नाना शाखांत वळू न दिल्यामुळें, तिचा लोट अनिवार होऊन तिनें गोखल्यांस प्रथम प्रांतिक, मग अखिल भारतीय व अखेर ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत धुरीणाच्या पदास पोंचविलें आणि शिष्य गुरूपेक्षांही कांकणभर सरस ठरला. या दिव्य अशा भावि यशासाठी आज ते मन लावून आपल्या गुरूजवळ सर्व प्रश्नांचा अभ्यास करीत होते. टांकीचे घाव सोसल्याविना देवकळा येत नाहीं; एकदम शिखर गांठणें शक्य नसतें; चढत गेलें पाहिजे. आज परिश्रम केले, खस्ता खाल्या तर त्याचा रमणीय परिपाक पुढे दिसेल; परंतु आज कांहींच न केलें तर पुढे काय मिळणार? रानड्यांबरोबर ते आतां सर्व देशाच्या भवितव्यतेबद्दल खल करूं लागले. १८८५ सालीं प. वा. ह्यूम साहेब यांच्या पुरस्कारानें राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. ह्यूम साहेबांनी पाहिलें कीं देशांत असंतोष माजत आहे. नवीन सुशिक्षितांमध्यें असमाधान आणि चालू परिस्थितीबद्दल त्वेष उसळत आहे. सरकारविषयीं संताप आणि दिवसेंदिवस वाढते दारिद्र्य या दोहोंच्या दलदलीतून कोणकोणते रोग फैलावतील याचा अंदाज ह्यूम साहेबांनी केला आणि वेळीच सावध होऊन भावि रोगांच्या चिन्हावर आजच आपण उपाय शोधूं या असे देशाची नाडीपरीक्षा करणाऱ्या अन्य भिषग्वर्यांना त्यांनी कळकळीने सांगितलें. नवीन तरुणांपुढे देशास सुस्थिति जेणेंकरून प्राप्त होईल असा मार्ग आपण ठेवू या असें या उदार मनाच्या पुरुषाचें मत पडलें. 'वसुधैव कुटुंबकम्' असे महात्मे प्रत्येक देशांत असतात. त्यांतलेच ह्यूम, बेडरबर्न वगैरे महात्मे होत. देशांतील सुशिक्षितांचें लक्ष एका विवक्षित प्रश्नावर खिळविण्याचे श्रेय यांनाच आहे. हतबल राष्ट्राला हाताशी धरून ते आपलेच आहे असें समजून, त्याच्यासाठीं खटपट करणें यास किती थोर मन लागेल बरें? ह्यूम साहेबांनी प्रथम १८८३ च्या मार्चच्या पहिल्या तारखेस कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यास उद्देशून एक जाहीरपत्रक काढलें होतें. बंगाली तरुणांना कर्तव्याची जाणीव करून देणारा तो जळजळीत उपदेश होता. संघटना करा, यत्न करा ही सूत्रे त्यांत ग्रथित केली होतीं. हा उपदेश, हें आव्हान, स्फूर्तिदायक आहे. पुढे या, मागें जाऊं नका असे त्यांत मुक्तकंठानें सांगितले आहे. तो उपदेश खालीलप्रमाणें आहे.
 "If you the picked men, the most highly educated of the nation cannot, scorning personal ease and selfish objects, make a resolute struggle to secure greater freedom for yourselves and your country, a more impartial administration, a larger share in the administration of your own affairs, then we your friends are wrong and your adversaries right, then are Lord Ripon's noble aspirations for your good fruitless and visionary, then at present at any rate, all hopes of progress are at an end, and India truly neither lacks nor deserves any better government than what she enjoys at present."
 परंतु हा जाहीरनामा बंगालपुरता होता. विवक्षित प्रांतास आतां प्रयत्न करावयास सांगण्याऐवजी सार्वराष्ट्रीय प्रयत्न व्हावा असें ह्यूम यांस वाटू लागले आणि शेवटी १८८५ ला राष्ट्रीय सभा स्थापन झाली. रानडे सरकारी नोकर असल्यामुळे त्यांस प्रत्यक्ष कार्यात भाग घेतां येत नसे. परंतु ते सर्व बैठकीस विषयनियामक मंडळींत नेहमीं जातीनें हजर असत, आणि जेथें त्यांस कांहीं चुकत आहे असे वाटे तेथे ते सांगत असत. आपला सल्ला ते वारंवार देत, आणि त्यांच्या खोल व गंभीर उपदेशाचा पुष्कळ फायदा होई.

राजकीय आयुष्यक्रम.

 रानड्यांच्या पाठशाळेत गेल्यावर गोखल्यांस हे नवीन धडे शिकावे लागले. राष्ट्रीय सभेची त्यांस ओळख झाली. नवीन बैठकीस कोणते प्रश्न सोडवावे लागतील त्यांचा रानड्यांबरोबर त्यांस विचारविनिमय करावा लागे. १८८५ सालापर्यंत गोखल्यांना सार्वजनिक काम म्हणजे काय व कशाशी खातात हे माहीत नव्हतें. १८८५ साली पुण्यांत असतांना सुद्धां त्यांस रानडे कोण हें माहीत नव्हतें. हिराबागेतील सभेच्या वेळीं रानड्यांस तिकीट नाहीं म्हणून त्यांनी अडविलें होतें. तेच गोखले १८८६ सालच्या काँग्रेसमधील पुष्कळ कामाचा बोजा अंगावर घेते झाले. ही बैठक मुंबईस झाली व फार महत्त्वाची अशी झाली. रानड्यांच्या सहवासांत असल्यामुळे या सभेचे बरेचसे काम गोखल्यांस करावे लागले. या सभेस प्रख्यात प. वा. चार्लस ब्रॅड्लॉ हे आले होते. ब्रॅड्लॉ साहेब हे उदारमतवादी होते. त्यांचे भाषण फार स्फूर्तिदायक झाले. त्यांतील एक दोन वाक्यें येथे दिल्याशिवाय राहवत नाहीं.
 "Those who first enterprised them, were called seditious and sometimes sent to jail as criminals, but the speech and thought live on. No imprisonment can crush a truth, it may hinder it for a moment, it may delay it for an hour but it gets an electric elasticity inside the dungeon walls and it grows and moves the whole world when it comes out."
 जे देशासाठी प्रथम झगडतात त्यांस सरकार द्रोही ठरवील तर ठरवो; परंतु त्यांचे कार्य शेवटी यशस्वी होतेंच. हा दिव्य संदेश त्यांनी येथील लोकांस सांगितला. असेच स्फूर्तिदायक उद्गार पुढे टिळकांस शिक्षा झाली तेव्हां त्यांनीं काढिले. अशा प्रकारें राष्ट्रीय सभेच्या प्रांगणांत १८८९ सालीं गोखल्यांचा प्रवेश झाला. १८९० साली त्यांनीं अर्थशास्त्राचा अभ्यास जोराने सुरू केला. अर्थशास्त्रांत आंकडेशास्त्र फार महत्त्वाचे असतें. महाराष्ट्रांत रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी हे एक नांवाजलेले आंकडेशास्त्रज्ञ होते. रानड्यांची व त्यांची मैत्री होती. रानड्यांनी त्यांस लिहिलें कीं, गोखले यांस या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे. तुम्ही त्यांस मदत करा. १८९० फेब्रुवारी१६ च्या पत्रांत रानडे जोशी यांस लिहितात :-
 "During the last six months that he has been working with me, I have formed a very high opinion of his great powers and abilities, his readiness to do his best under all circumstances. He is essentially an honest-intellectually as well as morally- student, and, I am sure, you will find in him a worthy collaborartor."
 रानड्यांच्या सहवासांत केवळ राजनीतीचे ज्ञान, अर्थशास्त्राचें अध्ययन, देशाविषयीं विचार करण्याची नवीन पद्धति येवढेच त्यांस मिळालें असें नाहीं तर सर्व गोष्टींस, सर्व गुणांस शिरोभूत जें शील त्याचेंही स्वरूप त्यांस कळलें. रानड्यांसारखा आत्मनिरीक्षण करणारा दुसरा पुढारी म्हणजे महात्मा गांधी. दुसरा आपणांस उगीच नांवें ठेवणार नाहीं; तो ज्या अर्थी आपल्यास नांवें ठेवतो आहे त्या अर्थी आपल्यामध्येच उणिवा असल्या पाहिजेत; त्यांचा आपण तलास केला पाहिजे आणि त्या नाहींशा करणें हें आपले प्रथम कर्तव्य होय. दुसऱ्यानें नांवें ठेविलीं म्हणून त्याच्यावर जळफळून उपयोग नाहीं. रानडे हे एकनाथाप्रमाणे खरोखर शांतिसागर होते. गोखले हे स्वभावतः उतावळे, भावनावश, संतापी असे होते. त्यांस लवकर राग येत असे. आपलें म्हणणें दुसऱ्यानें ऐकिलें नाहीं म्हणजे त्यांस संताप यावयाचा. टीकेनें तर ते मृतप्राय व्हावयाचे. कठोर टीका सहन करणारें त्यांचे मन नव्हतें. तें करपून जात असे. परंतु रानड्यांचें मूर्तिमंत शांतीचें स्वरूप पाहून गोपाळरावांचा स्वभाव पालटत चालला. रानडे हे आपली स्तुति कधीं पहावयाचे नाहींत तर ज्यांत आपली निंदा, टवाळकी हेटाळणी असेल तें आधीं पहावयाचे. मर्मी झोंबणारी टीका असली तरी आपला गुरु किती गंभीर असतो हे गोखल्यांनी अनेक वेळां पाहिलें. अपमान झाले तरी ते मनांत गिळून पुनः शांत समुद्रासारखा दिसणारा रानड्यांचा चेहरा गोखल्यांच्या हळुवार व गुणग्राही मनावर परिणाम केल्याविना असा राहील? गोपाळरावही टीकेस न भितां आपले कार्य चालू ठेवण्यास शिकूं लागले. रानड्यांनी 'आपणांसारिखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ तयांलागीं ।' हें खरें करून दाखविलें. रानड्यांसारखा योग्य वाटाड्या मिळाल्यामुळे गोपाळराव पुढे सरकले. योग्य मार्गदर्शक नसल्यामुळें किती जणांच्या श्रमांचें, बुद्धीचें, उत्साहाचें व तारुण्यांतील 'आम्ही कांहीं तरी करून दाखवूं' या जोमाचें, मातेरें झालें असेल? समुद्राच्या तळाशीं कित्येक मोतीं रुतलेलीं असतील, परंतु पाणबुड्याने कांहीं मोतीं वर काढून राजास अर्पण केली म्हणजे तीच तेवढीं राजाच्या वक्षःस्थलावर रुळू लागतात त्याप्रमाणें देशांतील उमलतीं फुलें जमा करून त्यांना लागलेली कीड नाहींशी करून तीं टवटवीत फुले देशमातेच्या केंसांत गुंफणारा कोणी तरी चतुर मालाकार लागतो. या मालाकाराच्या अभावी किती तरी फुलें सुकली असतील, किडीने खाल्ली असतील! परंतु गोपाळरावांचें भाग्य थोर म्हणून हृदयांतील सुप्त विचार जागे करणारा गुरु त्यांस मिळाला! तुमच्या मध्यें- तुमच्या अंतःकरणाच्या व डोक्याच्या खाणींत अनेक रत्ने आहेत, ही कल्पना आणून देणारा गुरु गोखल्यांस लाभला. आपण मनांत आणूं तर हीं रत्ने देशास अर्पण करूं असें गोखल्यांस वाटलें. परंतु सर्वांचेंच असे थोर नशीब नसतें. देवाच्या लाडक्या मुलांसच सद्गुरु प्राप्त होण्याइतकें भाग्य लाभतें; असो.
 १८९० मध्ये राष्ट्रीय सभा कलकत्त्यास भरली होती. या सभेमध्यें गोखल्यांनी एक लहानच पण चटकदार आणि मुद्देसूद भाषण केलें. प्राप्तीचा कर ज्या परिस्थितींत निर्माण करण्यांत आला होता, ती परि स्थिति इतउत्तर नसल्यामुळे हा कर रद्द व्हावा, यावर गोपाळराव बोलले होते. हें भाषण सर्वांस आवडले. गोखले अद्याप लहान- २४ वर्षांचे होते. राजकारणाच्या क्षितिजावर हा नवीन तेजोमय तारा उदय पावत आहे- हा पुढे मोठा मुत्सद्दी होईल असे उद्गार त्यांच्यासंबंधी ऐकण्यांत येऊ लागले. गोपाळरावांसही धन्यता वाटली. हळूहळू गोपाळराव देशाच्या कारभारांत लक्ष घालूं लागले. १८९१ च्या नागपूरच्या सभेतही त्यांनी भाषण केलें. जें काय आपणांस बोलावयाचे असेल तें आधीं समर्पक लिहून काढून मगच ते बोलत. जबाबदारपणे काम करण्यास प्रथम अशीच शिस्त लावून घ्यावी लागते. गोपाळरावांस ही शिस्त उत्तम लागली आणि ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली. भाषा कशी असावी, विचार कसे असावे याचाही रानड्यांजवळ त्यांनी अभ्यास केलाच होता.
 आयर्लंड वगैरे देशांनी आपआपल्या पुनरुज्जीवनार्थ अंगीकारिलेले मार्ग हिंदुस्थानांत शक्य नाहीत- अडवणूक येथें चालणार नाहीं. करतांच येणार नाहीं. देशांत नाना प्रकारचे, नाना पंथांचे, नाना धर्माचे, नाना मतांचे व नाना संस्कृतींचे लोक आहेत. आपला देश म्हणजे लहानसें खंड आहे. आयर्लंडसारख्या चिमुकल्या एकजिनसी निर्भेळ राष्ट्रांत जे शक्य होत नाहीं तें या अफाट देशांत सुतरां अशक्य आहे असें रानड्यांचे मत होतें. आपल्या लोकांस अद्याप नवीन राज्यपद्धति समजलीही नाहीं. परिस्थितीचं ज्ञान नाहीं. ज्यांच्याशीं आपणांस झगडावयाचे ते प्रबळांतील प्रबळ राष्ट्र. एक चतुर्थांश जग आज त्यांच्या सत्तेखालीं. तेव्हां बंडाचे, अत्याचाराचे मार्ग मनांत आणूं तरी ते आत्मघातकीच ठरणार. या सरकारशीं त्याच्याच शस्त्रांनी लढले पाहिजे. त्याच्याच पद्धतीनें आंकडे मांडून, परिस्थिति समजावून देऊन, लोकांस सुशिक्षित करून, जागे करून, त्यांस वळण देऊन, त्यांचें मत सरकारास पटवून देऊन, सरकारला त्याची चूक दाखवावयाची आणि ही चूक सुधारा असे सर्व जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकारास सुचवावयाचें. आपण विचार करीत करीत, स्वतःची सुधारणा करीत करीत, लोकांस शिक्षण देत देत, सरकारजवळ मागावयाचें आणि मागत असतां सुधारणा चालू ठेवावयाची. लोकांस एकदम क्षुब्ध करून काय होणार? लोकांत जोम आहे, धैर्य, धाडस, पराक्रम आहे- ठीक आहे तर. आपण मृत नाहीं. आतां काम इतकेंच की हा जो जोम आहे त्यास योग्य मार्गास लावावयाचें. नाहीं तर हा जोर उतूं जाईल आणि निरुपयोगी होईल. लोकांत भावना पाहिजेत परंतु त्या भावनांस वळण लावले पाहिजे. त्या भावनांस वळण न देतां पेटविणें म्हणजे सर्वत्र आगडोंब उडून सर्व सुखाची राखरांगोळी करणें होय असे रानड्यांनी शिकविलें. ही शिकवण गोखल्यांनीं आपलीशी केली आणि हेंच धोरण त्यांनीं कायम ठेविलें. रास्त मार्गानें झगडणें, पूर्वापार व दूरवरचा विचार करून झगडणें हेंच श्रेयस्कर ठरते. आपल्या गुरूनें जो मार्ग दाखविला त्याच रुळलेल्या मार्गानें गोखले गेले आणि आपल्या सर्व शक्ति त्यांनीं खर्च केल्या. नेमस्तपणा हें त्यांच्या निशाणावरील वाक्य होतें. 'हळूहळू शिकवावें' हें समर्थाचे सूत्र त्यांनी जास्त आचरणांत आणले. घिसाडघाई नको, जे करावयाचें तें विचारानें मागेंपुढे पाहून करा हा रानड्यांचा उपदेश गोखले विसरले नाहीत. १८९२ मध्ये पहिले राजकीय हक्क हिंदुस्थानास मिळाले, आणि कौन्सिलमध्यें फार अल्प म्हणजे जवळ जवळ नाहींच अशी सुधारणा झाली. १० जुलै १८९२ रोजी आनंदोद्भव नाटकगृहांत दादाभाई यांस मानपत्रे देण्यासाठीं सभा भरली होती. सभेस रा. ब. गोपाळराव देशमुख, के. एल्. नूलकर वगैरे मंडळी जमली होती. गोखले यांनी मानपत्रे वाचून दाखविलीं; नंतर ती विलायतेत दादाभाईकडे पाठविण्यांत आली.
 १८९३ मध्ये डिग्बीसाहेब पुण्यास आले होते. त्यांसही मानपत्र दिलें तें गोखले यांनी वाचून दाखविले.
 दादाभाईच्या खटपटीनें ब्रिटिश पार्लमेंटांत मि. हर्बर्ट पाल यांनी २ जून १८९३ मध्ये असा ठराव मांडला की- "That all open competitive examinations heretofore held in England alone for appointment to the civil services of India shall henceforth be held simultaneously both in India, and England, such examinations in both countries being identical in their nature and all who compete, being finally classified in one list according to merit." या ठरावास ग्लॅडस्टन यांनी पुष्टि दिली. सभासद थोडेच हजर होते. ८४ विरुद्ध ७६ मतें पडून ठराव पास झाला. दादाभाईचा आनंद गगनांत मावेना परंतु या जाहीरनाम्यामुळे अँग्लोइंडियनांनी एकच कोल्हेकुई उठविली. परंतु या ठरावास पुष्टि देण्यासाठीं एतद्देशीयांच्या सभा भरल्या आणि ठराव पास झाले. १५ जुलै १८९३ रोजी मुंबईस प्रेमजी कावसजी इन्स्टियूटमध्यें जाहीर सभा भरली होती. फेरोजशहा हे अध्यक्ष होते. या समयीं गोखलेही मुंबईस गेले होते आणि त्यांनी तेथे भाषणही केलें, सोसायटी- मधलीं कामें संभाळून गोखले बाहेरची कामेही करूं लागले. १८९४ साली ते रानड्यांबरोबर मद्रासला गेले होते. काँग्रेसमध्यें गोखल्यांनी भाषण केलें होतें. टिळकांनी ही त्याच विषयावर भाषण करून गोखल्यांच्या म्हणण्यास पुष्टि दिली. ज्या प्रश्नावर टिळक आणि गोखले काँग्रेसमध्ये एकमेकांच्या विरुद्ध नव्हते असा हा अलौकिक प्रसंग होता. परंतु पुढें असा प्रसंग कधींही आला नाहीं. दोघांचे मार्ग निरनिराळे झाले आणि दोघांस एकमेकांविरुद्ध झगडावें लागलें. १८९४ सालींच रानड्यांचा अपमान करणाऱ्या गोऱ्या साहेबाची गोष्ट घडून आली. एका अधिकाऱ्याने रानड्यांचें सामान डब्यांतून बाहेर फेंकून दिलें. त्यास पुढें समजून आलें कीं, आपण ज्याचें सामान फेंकले तो राणीसरकारच्या न्यायमंदिरांतील न्यायाधीश आहे. पुणे स्टेशनवर हा साहेब रानड्यांकडे माफी मागण्यासाठी येत होता. रानड्यांनी हे पाहताक्षणीच आपले तोंड वळविलें आणि हा प्रसंग येऊ दिला नाहीं. गोखल्यांनी या वागणुकीचे मर्म रानड्यांस विचारिलें. रानडे गंभीरपणानें व शांत मनानें म्हणाले "युरोपियन अंमलदाराने अपमान केला तर आपण रागावतो; पण आपण स्वजनांतल्या कांहीं वर्गांशी ब्राह्मण्याच्या तोऱ्यांत किती उर्मटपणानें व अपमानकारक रीतीनें वागतों याचा विचार करीत नाहीं." गोपाळराव या उत्तरानें चकित झाले. नेहमी आत्मनिरीक्षण करावयाचें हा रानड्यांचा दैवी गुण किती लोकांच्या मनांत असेल? लोकांस नांवें ठेवितांना आपले वर्तन धुतल्या तांदळासारखे आहे असे कितीजणांस छातीवर हात ठेवून सांगतां येईल? येशूनें सांगितलें 'जो निष्पाप असेल, त्यानेंच त्या बाईला दगड मारावा.' एकही हात वर झाला नाहीं; एकाही माणसास दगड मारण्याचें धैर्य झालें नाहीं. बायबलांतील या गोष्टीप्रमाणेंच आपणां सर्वांची स्थिति आहे. लोकोत्तर दानत फारच थोड्यांत सांपडावयाची, मानापमानाचे गाठोडें बाजूस ठेवणारा एकादाच. 'आपणास चिमोटा घेतला । तेणें कासावीस झाला । आपणावरून दुसऱ्याला । राखीत जावें' हा समर्थांचा अमोल उपदेश वाचणारे असतील, परंतु आचरणांत आणणारे किती हरीचे लाल सांपडतील? अशा गुरूच्या सहवासानें गोखल्यांस किती तरी धडे शिकतां आले असतील. त्यांचा स्वभाव रागीट असे. सांगितलेले काम वेळच्यावेळी झालें नाहीं म्हणजे ते संतापावयाचे. परंतु पुढे पुढे जरी ते संतापले तरी नोकरास बोलावून त्यास पुनः सांगत 'मी बोललों; वाईट केलें. परंतु तूं मनांत वाईट वाटू देऊं नकोस.' त्यांच्या डोळ्यापुढे अशावेळीं रानड्यांचे उदाहरण असे. आपल्या पतित व अस्पृश्य मानलेल्या लोकांचा उद्धार करण्याची स्फूर्ति अशाच उदाहरणांवरून त्यांस होई. आणि मी अस्पृश्यांसाठी अखंड प्रयत्न करीन अशी अट भारतसेवक समाजांतील सभासदांस मान्य करावी लागे. सर्व लोकांसाठीं गोखल्यांचें अंतःकरण हळहळे यास कारण रानडेच होत. रानड्यांस ह्यूम साहेबांसारखे काँग्रेसचे जनक 'महादेव' (मोठा देव) मानीत यास केवळ त्यांची विद्वत्ता व कुशाग्रबुद्धीच कारण नसून त्यांचे 'दया, क्षमा, शांति' हे लोकोत्तर गुणच विशेष कारणीभूत झाले असतील. रानड्यांचीही थोरवी पाहिली म्हणजे त्यांच्या चरणांपाशीं बसून ज्यानें धडे घेतले त्याच्या भाग्याची कल्पना येते व आपणांस तर हेवा वाटतो. 'It is no exaggeration to say that younger men, who come in personal contact with him felt as in a holy presence, not only uttering 'nothing base' but afraid even of thinking unworthy thoughts, while in his company. The only other man, who had exercised a similar influence upon me in my experience is Mr. Dadabhai.' असे उद्गार गोखल्यांनी रानड्यांबद्दल, दादाभाईबद्दल आणि पुढे महात्मा गांधींची भेट झाल्यावर काढले ते उगाच नव्हत. खरोखरच त्या पवित्र वातावरणांत गेलें कीं, आपल्या कुत्सित कृपण विचारांचा मागमूस सुद्धां रहात नाहीं. आपण मुके बनतो आणि त्या थोर पुरुषांच्या चरणांकडे पहात राहतों.
 मनाची आणि बुद्धीची या प्रकारें उन्नति होत होती. आतां १८९५ साल उजाडलें, या वर्षी कामाचा बोजा संस्थेतही पुष्कळ पडला व बाहेरही कामानें आ पसरला होता. कामास गोपाळराव ना कधींच म्हणावयाचे नाहींत; शरीराकडे सुद्धां पहावयाचे नाहीत. हे काम रेटण्यास ते पुढे सरसावले.
 प्रथम ४ मे १८९५ साली बेळगांवास आठवी प्रांतिक परिषद भरली होती. या सभेत फेरोजशहा मेथा यांच्या अभिनंदनासाठी ठराव गोपाळरावांनीच मांडला. मेथा हे हिंदुस्थानांत गाजलेले, नांवाजलेले पुढारी. मुंबई म्युनिसिपालिटीचे ते जीव की प्राण. हिंदु लोकांस म्युनसिपल् कामे कशीं चोख व उत्तम रीतीने करितां येतात हे त्यांनी सरकारास दाखविलें, त्याप्रमाणेंच ते वरिष्ठ कायदे कौन्सिलांत व प्रांतिक कायदे कौन्सिलांत सडेतोडपणें आपले म्हणणे पुढे मांडीत. ते सरकारास वांकून नसत. या वर्षी विशेषतः त्यांनीं कलकत्ता येथील वरिष्ठ कायदे कौन्सिलांत हिंदूंची बाजू सांवरून धरिली, सिव्हिल सर्व्हंट हेच हिंदुस्थानचे राज्य करण्यास लायक अधिकारी आहेत असे सरकारी गोऱ्या सभासदांनी म्हणतांच फेरोजशहांनीं सिव्हिल सर्व्हंटांचे सर्व दोष चव्हाट्यावर मांडले, सर जेम्स वेस्टलंड यांच्या अंगाची तर आग उडाली, मेथा हे कौन्सिलमध्ये नवीन धोक्याचं वारें आणीत आहेत अशी त्यांनी तक्रार केली, परंतु असल्या 'गोमायुरुतां'ना 'केसरी' भीक घालीत नसतो. मेथा त्यांस उत्तर देण्याच्या भानगडीतच पडले नाहीत. कौन्सिले हीं कांहीं सरकारच्या होयबांसाठीं नाहींत हें ह्या सर बहादुरांस समजलें पाहिजे होते. कलकत्त्याच्या स्टेट्स्मनने मेथांच्या वर्तनाचा गौरव केला. कलकत्त्यास डब्ल्यू. सी. बानर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मेथांचं त्यांच्या धैर्याबद्दल अभिनंदन करण्यांत आलें. मद्रासकडच्या एका वर्तमानपत्रकर्त्यानं मेथांच्या भाषणाबद्दल म्हटले आहे की 'He returned argument for argument, invective for invective, banter for banter and ridicule for ridicule.' सर्व हिंदुस्थानांत मेथांचे अभिनंदन झाले. बेळगांवासही तें झाले. गोखल्यांचे लहानच पण सुंदर भाषण झाले. गोखल्यांस मेथांबद्दल फार आदर वाटे. ते अद्याप नवशिके होते. निरनिराळ्या राजकारणी पुरु षांची ते ओळख करून घेत होते; त्यांच्या पद्धति समजून घेत होते. मेथांच्या अचूक धोरणाची, निस्पृहतेची, बाणेदारपणाची, अप्रतिम कोटिक्रमानें प्रतिपक्ष्यास चीत करण्याच्या त्यांच्या कौशल्याची कोण तारीफ करणार नाहीं? ते राजकारणांत नेमस्त पक्षाचे होते. योग्य प्रसंगी सरकारास तडाखा द्यावयास ते माघार घेणार नाहीत अशी लोकांची समजूत होती. अशा पुरुषाचें अभिनंदन गोखल्यांनी गोड व मार्मिक शब्दांत केले. ते म्हणतात- 'To my mind it has always appeared that Mr. Mehta is to a great extent a happy combination of the independence and strength of character of Mr. Mandlik, the lucidity and culture of Mr. Telang and the originality and wide grasp of Mr. Ranade.' फेरोज शहांसारखा उत्कृष्ट वादविवादपटु कौन्सिलमध्यें त्यांच्यानंतर क्वचितच झाला; असो. गोपाळरावांचा प्रांतिक सभेशी संबंध १८८८ पासूनच आला होता. पहिल्या प्रांतिक सभेचे तेच सेक्रेटरी होते. हें काम त्यांनी चार वर्षे केले आणि पुढे ते वाच्छांबरोबर राष्ट्रीय सभेचे सेक्रेटरी झाले. १८९५ च्या राष्ट्रीय सभेचे ते एक सेक्रेटरी होते. वाच्छा हे जनरल सेक्रेटरी होते. स्थानिक सेक्रेटरी १८९५ मध्ये टिळक आणि गोखले होते. सभा त्या वर्षी पुण्यास भरावयाची होती. ही राष्ट्रीय सभा पुण्यास भरवून पुण्याचा लौकिक वाढवावा, सभा उत्कृष्ट रीतीनें पार पडावी असे रानड्यांना वाटत होते. परंतु भवितव्यतेच्या मनांत निराळेच विचार घोळत होते. पुण्यांत वादविवादानें, भांडणांनी एकच रणधुमाळी माजली आणि याच्या कारणाच्या शोधनार्थ आपणांस थोडें पाठीमागे गेलें पाहिजे.
 आजपर्यंत असें होत असे कीं, जेथें राष्ट्रीय सभा भरत असे त्याच ठिकाणीं सामाजिक परिषदही भरे. सामाजिक परिषदेसाठी निराळा मंडप वगैरे घालावा लागत नसे. यंदां पुण्यास राष्ट्रीय सभा भरावयाची होती, तेव्हां सामाजिक परिषदही राष्ट्रीय सभेच्या मंडपांतच भरणार असे बहुतेक निश्चित झालें होतें. राष्ट्रीय सभा म्हणजे सर्व राष्ट्राची सभा होय. सर्व राष्ट्राचे त्यांत मत पाहिजे; मूठभर लोकांची ही मजलस नाहीं हें सरकारास दाखविलें पाहिजे, हा यंदांचे स्थानिक सेक्रेटरी टिळक यांचा विचार होता, विशेषतः ज्या शहरी सभा भरवावयाची तेथील तरी सर्व लोकांची राष्ट्रीय सभेस सहानुभूति अवश्य पाहिजे असें त्यांचे मत होतें.
 पुण्याची स्थिति इतर शहरांहून फार निराळी. पुणे ही पेशव्यांची राजधानी. ब्राह्मण्याची पुणे ही आश्रयभूमि. जुन्या परंपरेचे, जुन्या चालीचे, जुन्या धर्मकल्पनांचे भोक्ते येथील बहुतेक लोक. या जुन्या परंपरेंतील लोकांचें असें मत पडलें कीं, जर सामाजिक परिषद् ही राष्ट्रीय सभेच्याच मंडपांत भरेल तर सर्व राष्ट्रीय सभावाले सामाजिक परिषदेच्या मताचेच आहेत असें जगजाहीर होईल. परंतु आम्हांस राजकीय अधिकार पाहिजे आहेत, आमची राजकीय सुधारणा झाली पाहिजे, धार्मिक सुधारणेंत लुडबुडण्याचें, जुन्या थोर पूर्वजांनीं घालून दिलेल्या धर्माचे बाबतींत अमुक सुधारणा करा, तमुक सुधारणा करा अशी हुल्लड उठविणारे आणि मनुयाज्ञवल्क्यांच्या पदवीस झोंबू पाहणारे जे लोक आहेत त्यांच्याशीं आम्हांस कांहीं एक कर्तव्य नाहीं; त्यांचा आमचा या विचारांत काडीचा संबंध नाहीं असें जगजाहीर करण्यासाठी दोन्ही सभा निरनिराळ्या ठिकाणीं भरवा असे या जुन्या पक्षाच्या लोकांचें म्हणणें पडलें, आम्ही राष्ट्रीय सभेच्या कार्यासाठी वर्गणी देऊ, सामाजिक परिषदेबद्दल आमची सहानुभूति यत्किंचितही नाहीं असे हा वर्ग स्पष्टपणे म्हणे. याच्या उलट दुसरा सुधारकी पक्ष असें म्हणूं लागला कीं, जर सामाजिक परिषद् राष्ट्रीय सभेच्या मंडपांत भरू देणार असाल तरच आम्ही वर्गणी देऊ, नाहीं तर साफ देणार नाहीं. खरे पाहिलें तर राष्ट्रीय सभा सामाजिक परिषदेपेक्षां महत्त्वाची. दोन्ही गोष्टी निरनिराळ्या होत्या म्हणूनच दोहोंचीं अधिवेशनें निरनिराळीं भरत. तेव्हां केवळ राष्ट्रीय सभेसाठींच असेल तर आम्ही वर्गणी देणार नाहीं असें म्हणणाऱ्यांवर टिळक यांनी काँग्रेसचे द्रोही असा आरोप ठेविला तो रास्तच होता. जेव्हां टिळकांनी सुधारकी व अतएव सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या या चमूचें हें मतकृपणत्व पाहिलें तेव्हां त्यांनी जुन्या मताच्या लोकांस उचलून धरिलें, वास्तविक वैयक्तिक दृष्टया टिळक भांडले नसते. सामाजिक परिषद् कोठेही भरवा; त्याबद्दल त्यांनी येवढा विरोध केला नसता. परंतु आपलेच म्हणणें धरून एका प्रामाणिक पक्षाला धुडकावून लावू पाह णारा हा जो सुधारकी मेळा त्याचा त्यांना फार राग आला. राष्ट्रीय सभेस सुधारक पाहिजेत तसे जुन्या परंपरेचे लोकही पाहिजेत. तिच्यासाठी सर्वांनी आधीं धांवून गेले पाहिजे, असें असतां सामाजिक परिषदेबद्दलचा कांगावा करून राष्ट्रीय सभेवर रुसणाऱ्या या सुधारणावाद्यांच्या सोंगावर टिळकांनी कोरडे ओढले. राष्ट्रीयसभा सर्व मतांच्या लोकांची आहे हें स्पष्ट झाले पाहिजे. परंतु काँग्रेसची सूत्रे सुधारक पक्षाच्या हातांत; रानडे, गोखले, मुंबईचे मेथा, वाच्छा वगैरे लोक सर्व सुधारक. आपलेच म्हणणें धरून बसणारे हे लोक. रानड्यांनी या वेळेस सावध होऊन राष्ट्रीय-सभेच्या मतैक्यासाठी हा प्रश्न सोडविण्यास लागलें पाहिजे होते. परंतु रानड्यांनी कांहीं एक केलें नाहीं. गोष्टी कोणत्या थरावर जातात याचीच ते वाट पहात बसले. टिळकांनी सेक्रेटरीशिपचा राजीनामा दिला. तेव्हां या विरुद्ध पक्षाच्या लोकांस संशय वाटला. टिळकपक्षाचे लोक काँग्रेसच्या मंडपास आगसुद्धां लावण्यास मागें पुढे पाहणार नाहींत अशी कंडी उठली, ती या लोकांनींच उठविली असली पाहिजे. गोखले पडले भोळे. त्यांना ही हूल खरी वाटली आणि उतावीळपणानें त्यांनीं वाच्छांस तार केली कीं, असें असें आहे तरी ताबडतोब या. जणूं वाच्छा येऊन शहानिशा करणार होते! वाच्छांस स्टेशनवर पुष्कळ मंडळी सामोरी गेली आणि वाच्छांस 'हे सर्व खोटें आहे; आपण कां येण्याची तसदी घेतली?' असे प्रश्न लोकांनी विचारले, वाच्छांस गोपाळरावांच्या उतावीळपणाची कल्पना आली.
 शेवटी हा मंडपाचा वाद नियोजित अध्यक्ष सुरेंद्रनाथ बानर्जी यांच्या कानांवर गेला. त्यांनी असे कळविलें कीं, जर पुण्याच्या लोकांचें एकमत होत नसेल तर आपण अध्यक्ष होण्यास तयार नाहीं, धोंडा बरोबर लागला. रानडे जागे झाले. जी गोष्ट आधीच झाली पाहिजे होती ती दिरंगाईवर व 'पाहूं या काय होतें तें' अशावर टाकण्यांत आली होती. परंतु सोनारानें परस्पर कान टोचले म्हणजे दुखत नाहींत, किंवा नाक दाबले म्हणजे तोंड उघडते तद्वत् झालें. सभा व सामाजिक परिषद वेगवेगळ्या ठिकाणीं भरण्याचें ठरलें, या सुधारक पक्षाने पोलिसांस सुद्धां वर्दी देऊन ठेविली होती कीं, कदाचित् आम्हांस मदत लागेल! जणूं टिळक बंडच करणार होते. परंतु सभा नीटपणें पार पडली आणि दंग्याधोप्याची भीति अवास्तव ठरली.
 पुष्कळ लोक टिळक क्षुल्लक गोष्टीसाठीं भांडले असा त्यांवर आरोप करितात. 'सामाजिक परिषदेसाठीं निराळी तयारी करावयाची म्हणजे पुनः आला नवीन खर्च; कांग्रेसचा मंडप मिळता तर त्यांतल्या त्यांत भागून गेलें असतें.' असाही या लोकांचा एक मुद्दा असतो. परंतु जनमतापेक्षां पैशाची जास्त मातब्बरी नाहीं, आणि ज्यांस सामाजिक सभा भरावावयाची होती त्यांस जर फार उमाळा होता तर त्यांनी त्यासाठी निराळी वर्गणी दिली पाहिजे होती. स्वार्थत्यागाशिवाय मत मात्र मिरवावयास पाहिजे. हें कसें चालेल? बहुजनसमाजास बरोबर घेऊन जाणें हें राष्ट्रीय सभेचे काम. ती राष्ट्रीय आहे, विवक्षित पंथाची नाहीं. सर्व लोकांस ज्यांची दरक्षणीं जरूर भासते अशा हक्कांसाठी राष्ट्रीय सभा आहे. हजारों वर्षे चालत आलेल्या धर्माचा विचार करणें हें लोकांस कसेसेच वाटे. 'आपल्या पायाखालीं कांहीं जळत आहे' असें लोकांस खरोखरच वाटत नसे. वाटत असतें तर त्यांनीं विझविण्याचा प्रयत्न केलाच असता. आपल्या डोक्यावर जे आज सरकारचें छत्र आहे त्यानें मात्र छाया होत नसून डोक्यावर आगच पाखडली जात आहे हें या जुन्या लोकांसही पटले होते आणि प्रत्यक्ष अनुभवास आलें होतें. या लोकांस राष्ट्रीय सभेतच फक्त यावयाचें होतें. त्यांस वगळून कसें चालणार? ही विचारसरणी रास्त आहे; न्याय्य आहे. सामाजिक सुधारणेचें स्तोम माजविणाऱ्यांस ती दिसणार नाहीं व दाखविली तरी पटणार नाहीं हें आम्ही जाणून आहों. टाइम्समध्ये ३ नोव्हेंबर १८९५ रोजी एक पत्र प्रसिद्ध झालें होतें. हा पत्रलेखक वरील मताचाच अनुवाद करितो. तो म्हणतो- "The congress eventually aims at being a congress of the people and the object cannot be achieved unless every year an effort is made to approach more and more the classes that have not taken hitherto much interest in the movement. One party wishes to draw to the congress as large a portion of the public as it possilby can irrespective of the question of social reform; the other does not wish to go much beyond the circle of the friends of reform " सुधारणावादी लोकांस जनतेस बरोबर घेऊन जावयास नको होतें. ते अलग वागत. डेमॉक्रसीचें महत्त्व त्यांस तात्त्विकदृष्ट्या कळे, परंतु तें त्यांस व्यवहारांत (पटत नसे) आणतां येत नसे. टिळक हे नेहमी लोकांस बरोबर घेऊन जावयाचे. बरोबर नेतांना त्यांस शिकवावयाचे व शिकवीत शिकवीत बरोबर न्यावयाचे. यास सवंग लोकप्रियता असे उपहासास्पद नांव कित्येकांनी दिले असले तरी तें वस्तुतः भूषणच आहे. हीच गोष्ट २० डिसेंबर रोजी- काँग्रेसच्या आधीं ५-६ दिवस- काँग्रेससाठीं शहरात प्रतिनिधि निवडावयासाठीं भरलेल्या सभेंत दिसून आली. सभेस जागा अगदी लहान योजून आयत्या वेळीं सभा जाहीर केली. परंतु ही युक्ति सफळ झाली नाहीं, तेथे जुन्या मताचे लोकांचा सर्व समाज लोटला व त्यांनी स्वतःस पसंत असा अध्यक्ष निवडला. हे सर्व पाहून गोखले व इतर १५ इसम सभा सोडून चालते झाले; हा थोडा कमकुवतपणाच होता. टिळकांवर जो लोकच्छंदानुवर्तित्वाचा आरोप करण्यांत येतो तसाच आरोप प्रख्यात पंडित हक्स्ले हा, विख्यात इंग्लिश राजकार्यधुरंधर जो ग्लॅडस्टन, त्याच्यावर करीत असे. तो म्हणे, "He is a man with the greatest intellect in Europe and yet he debases it by simply following majorities and the crowd." परंतु हें लक्षांत ठेवणें जरूर आहे की टिळक, ग्लॅडस्टन यांसारखे पुढारी लोक केवळ जनतेच्या मतांप्रमाणे चालत नसतात. ते त्यांस शिकवीत तर असतातच, परंतु हळूहळू त्यांच्या मनांत भरवीत त्यांच्याशीं मिळतं घेऊन, मिळतें घेतांनाही आपला उद्देश सिद्धीस जातो आहे हें पाहून हे लोक पाऊल टाकतात; फटिंगपणे वागणें म्हणजे लोकप्रिय होणें नव्हे.
 या वर्षीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक सभा रानडे पक्षाला सोडावी लागली ही होय. १८८९ पासून सार्वजनिक सभेत रानड्यांचें म्हणणें म्हणजे वेदवाक्य असें समजले जात असे. १८९५ साली टिळक हे बहुमतानें सार्वजनिक सभेचे पुढारी झाले. या गोष्टीनें जुन्या रानडे पक्षाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. गोखले हे नव्या-जुन्यांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न करूं लागले, परंतु तो दिलजमाईचा प्रयत्न नसून नवीन पक्षाचा अपमान करण्याचाच पर्याय होता. त्यांनी टिळकांना अशा तऱ्हेच्या अटी सांगितल्या कीं, त्या बहुमतवाल्यांस पसंत पडत्या ना. गोखल्यांस आपण अल्पसंख्याक आहों हें या वेळीं माहीत होतें. असें असूनही त्यांनी खालील अटी घालाव्या ही गोष्ट अनुचित वाटते. त्या अटी अशा- (१) सभेच्या कार्यकारी- मंडळींत दोन्ही पक्षांचे सारखे सभासद असावे. (२) अध्यक्ष आहे तोच म्हणजे जुन्या पक्षाचाच असावा. (३) दोन सेक्रेटरींच्या ठिकाणीं या वर्षापासून तीन असावे, आणि त्यांतील दोन जुन्या पक्षाचे आणि एक नवीन पक्षाचा असावा. टिळकांचें महत्त्व दृष्टीआड व्हावें एतदर्थ हा प्रयत्न होता. हा प्रयत्न अर्थातच निष्फळ झाला. आतां टिळकांचे मताधिक्य होणार हें पाहून त्यांच्या जवळ काम करावे लागणार या भीतीनें हे रानडे पक्षाचे लोक सभा सोडून जाण्यास तयार झाले! आणि टिळकांस आयत्या बिळावर नागोबा असें म्हणूं लागले! परंतु आजपर्यंत सार्वजनिक सभेत आपले मताधिक्य नव्हते म्हणून टिळक दुसऱ्या सभा काढण्याच्या भरीस पडले नाहीत. पार्लमेंटमध्ये आपले मताधिक्य होत नाहीं म्हणून कोणी नवीन पार्लमेंट स्थापीत नाहीं, आणि नवीन येणाऱ्या मंत्रिमंडळास कोणी आयत्या पिठावर रेघा ओढणारे असे अपमानास्पद दूषणही देत नाहीं. टिळकांस मिळतें घ्यावयास नको असें म्हणणारे व हा कांगावा करणारे जे नेमस्तपक्षीय लोक त्यांसच खरोखर माघार घेणें, आपलीं मतें बहुमतापुढे मागें घेणें, कधीं माहीत नव्हतें. नबाबशाही त्यांस पाहिजे असे. ती दुसरी नोकरशाहीच होती; लोकशाही नव्हती, ही गोष्ट काँग्रेसच्या वेळीं सिद्ध झाली आणि या वेळेसही सिद्ध झाली.
 जुनी सभा सोडून नवीन सभा स्थापण्यास आतां रानडेपक्षाचे लोक कारणे शोधूं लागले आणि ज्या नांवांनीं हिंदुस्थानच्या राजकीय चळवळींत खळबळ उडविली तीं नांवें जन्मास आली. टिळकपक्ष हा जहाल पक्ष आहे; आमचा पक्ष नेमस्त पक्ष आहे; दोघांचें जमणें अशक्य, म्हणून हा सवतासुभा आम्हांस काढणे भाग आहे असें या रानडे- पक्षाच्या लोकांनी जाहीर केलें. आजपर्यंत नेमस्तपक्षाचा वरचष्मा होता तेव्हां या अल्पसंख्याक पक्षानें आत्मघातकी, पक्षभेदाची चळवळ केली नाहीं. एका घरांत भांडणें असूं देत. जो मतानें अधिक त्याचें खरें ठरेल. परंतु निरनिराळीं घरे बांधून भांडणें म्हणजे सरकारास आपल्यांतील भिन्नता आणि विरोध दाखविण्यासारखें आहे. परंतु आपलेच शेवटास नेऊ पाहणारे जे हे नेमस्त बंधु त्यांनीं मात्र आतां निराळी सभा स्थापण्याचें ठरविलें, आणि १८९५ च्या नोव्हेंबर महिन्यांत डेक्कन सभा स्थापन केली. आपले महत्त्व कमी होणार असें दिसतां क्षणींच हें नवीन अपत्य निर्माण करणाऱ्या रानड्यांवर टिळकांनी 'हा म्हातारचळ कीं पोरखेळ?' हा अग्रलेख लिहून खरपूस टीका केली. नेहमी मिळते घ्यावयास खरोखर टिळकच तयार असत, परंतु ते बहुमत लाथाडीत नसत. आजपर्यंतच्या राष्ट्रीय सभा जरी नेमस्तांनींच भरविल्या तरी राष्ट्रीय सभेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत शिरकाव टिळकांनीच केला. ते असें नाहीं म्हणाले, की या मवाळ मताच्या काँग्रेसचा आपण पुरस्कार कां करावा. ते आपले मताधिक्य वाढविण्याची खटपट करीत होते. ही खटपट प्रत्येक पक्ष करितोच. काँग्रेस म्हणजे कांहीं मवाळांस मिळालेली सनद नव्हे. देशामध्यें ज्या वेळेस जें जनमत असेल- जें बहुमत असेल तें सरकारास स्पष्टपणे कळविण्यासाठी काँग्रेसचा जन्म आहे, परंतु बहुमताचा वास ज्यांस सहन होत नाहीं त्या आमच्या रानडेपक्षीयांनी दुसऱ्या पक्षाचे बहुमत झालें असें पाहतांच सवतासुभा स्थापावा आणि राजकारणांत नेमस्त आणि जहाल असे पक्ष पाडावे हें अनुचित होय. टिळक म्हणत "सामाजिक सुधारणेंत 'नेमस्त आणि जहाल' असे, पक्ष होऊ शकतील; परंतु हिंदुस्तानच्या राजकारणांत 'नेमस्त आणि जहाल' हें आपणांस समजत नाहीं. परकी सरकारच्या लोखंडी रुळाखालीं सर्व सारखेच चिरडले जातो आहों. या चरकांतून सर्वच चिपाडें होऊन बाहेर पडणार. टिळकपक्ष सरकारास- प्रचलित राज्यपद्धतीस- नामशेष करण्यासाठी झटणार आणि रानडेपक्ष त्याचा उदोउदो थोडाच करणार आहे? ध्येय जर एक आहे तर त्या ध्येयासाठीं बहुमतानें ज्या वेळेस जो मार्ग ठरेल तो हातीं धरावयाचा आणि कामाचा घौशा चालवावयाचा." टिळकपक्ष हा जहाल पक्ष आहे असें दाखविण्यासाठीं, त्यांनी १८९३ साली सुरू केलेला गणपत्युत्सव आणि १८९५ साली सुरू केलेला शिवाजी-उत्सव हीं दोन कारणें रानडे- पक्षीयांनी पुढे केली. परंतु या गोष्टींचा राष्ट्रीय सभेच्या कार्यक्रमाशीं कांहीं एक संबंध नव्हता. हे सामाजिक आणि धार्मिक प्रश्न आहेत. लोकांस एकत्र आणण्यास आणि त्यांच्या उत्सवप्रियतेसही पुष्ट करण्यास टिळकांनी हा गजाननोत्सव सुरू केला. राजकीय विघ्नांचे हरण होण्यासाठीं या विघ्नहर्त्याचा सार्वजनिक पूजामहोत्सव करण्याची त्यांनी रूढि पाडिली. तेहतीस कोटि देवता असतां हिंदु लोक स्वाभिमानरहित होऊन मुसलमानांच्या मोहरमांत भाग घेतात, त्यांच्या डोल्यांपुढे नारळ फोडतात, पाणी ओततात, नाकें घांसतात- हें काय? परकी धर्माबद्दल सहानुभूति मनांत बाळगा, परंतु स्वत्वाचा अभिमान सोडूं नका. मुसलमान तुमच्या गणपयुत्सवांत, विष्णुपूजेत भाग घेतो काय? कधींही नाहीं. तो जर तुमच्यांत मिसळत नाहीं तर तुमचें काय अडलें आहे त्यांच्यापुढे नाकदुऱ्या काढण्याचें? परस्परांनीं परस्परांबद्दल सहानुभूति, सलोखा, प्रेमा दाखविला तर रास्त आहे. परंतु एकानें नाक घांसावयाचें आणि दुसऱ्यानें तर्र असावयाचें हें आह्मांस सहन होत नाहीं. सत्त्व विसरणाऱ्या लोकांस स्वतःचा फाजील अभिमान बाळगणाऱ्या लोकांजवळ गोडीनें वागतां येणें शक्य नाहीं. शेळी आणि वाघ एका वनांत राहणें शक्य नाहीं; दोघे वाघ राहू शकतील. समान दर्जाचे लोक एकत्र राहतील, विषम दर्जाचे लोक संतोषानें- गुण्यागोविंदाने राहणें म्हणजे पाणी आणि विस्तव एकत्र राहण्याप्रमाणें आहे. सर्पाशीं दर्पानेंच वागले पाहिजे तर तो नमेल. आपण त्यास दूध पाजूं लागलों आणि आपल्या घरांत त्याला ठेविलें तर तो विषच वमणार आणि दंश करणार. मानवी स्वभाव असाच आहे. तेव्हां टिळकांनीं हिंदूंचें दौर्बल्य जाणून त्यांस मुसलमानांच्या दर्जाला आणण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांत अभिमान आहे; आपल्यांतही पाहिजे. 'उत्सवप्रियतेमुळे जर मोहरमांत तुम्ही भाग घेत असाल तर हा गजाननोत्सव मी सुरू करितों- चला या इकडे' असे टिळकांनी म्हटले म्हणजे टिळक वितुष्ट पाडणारे झाले काय?
 त्याप्रमाणेंच शिवाजी- उत्सवानें मुसलमानांस वाईट वाटेल हा दुसरा आक्षेप, वाईट वाटण्याचे कारण? शिवाजीनें मुसलमानांस सळो की पळो केलें. त्या गोष्टीच्या अनुकरणार्थ कांहीं आज आम्ही शिवाजी- उत्सव करीत नाहीं. तर जो धर्माभिमान, जो राष्ट्राभिमान, जें तेज, जें धैर्य, जें वीर्य, जें शौर्य, जो स्वार्थत्याग, जें युक्तिबल, शिवाजीनें व त्या वेळच्या लोकांनी दाखविलें तेच गुण आजही आपल्या अंगांत पाहिजेत. आपण शेळपट, नादान होत चाललो आहों याची जाणीव लोकांच्या मनांत टिळकांस उत्पन्न करावयाची होती. मुसलमानांस वाईट वाटण्याचें यांत कारण काय? मुसलमानांस आणि हिंदूंस सोंवळा असा नेल्सन, वेलिंग्टन, नेपोलियन यांपैकीं कोणाचा उत्सव आम्हीं सुरू केला पाहिजे होता कीं काय असें चिरोलसाहेबांस आमचें विचारणें आहे. जी विभूति लोकांस आपलीशी वाटेल, अवतारी वाटेल तीच त्यांच्यापुढें ठेवावी लागते. मुसलमानांनी सुद्धां शिवाजी- उत्सव करावयास हरकत नाहीं. त्याने त्यांच्या धर्मावर हल्ला केला नाहीं; त्यांच्या मशिदी पाडून मंदिरें उभारली नाहींत; परधर्मी म्हणून त्यांच्या मुंडक्यांची रास केली नाहीं; परधर्मांतील स्त्रियांशी विवाह केला नाहीं; परकी स्त्रिया जनानखान्यांत घातल्या नाहीत; तेव्हां असें उदाहरण त्यांच्या हिंदुस्तानांतील इतिहासांत क्वचित्च सांपडेल. शिवाजीचे गुण आपल्यांत आणण्यासाठी हा उत्सव आहे. आणि त्या गुणांची सदा सर्वकाळ जरुरी आहेच.
 परंतु टिळकांच्या या दोन उत्सवांनीं सरकारास वाटले की, यांत जातीजातींचें वैमनस्य वाढविण्याचें बीज आहे. त्याचीच री मवाळांनींही ओढली. मलबारी या गृहस्थांनी ईस्ट आणि वेस्ट या मासिकांत १८९७ मध्ये सद्यःस्थिति या विषयावर एक लेख लिहिला आहे. या उत्सवासंबंधी ते म्हणतात "His movement to revive the memory of Shivaji though deserving of sympathy from every generous heart so far as it aims at the unity of the Deccan, is historically an anachronism. आणि पुढे म्हणतात Mind has been liberated to a certain extent, not so the heart." पहिल्याच वर्षी मुंबईत दंगे झाले. मुसलमानांस हिंदूंनीं आपल्यासारखा दहा दिवसांचा उत्सव सुरू केला हें खपलें नाहीं. हिंदूंनी आपणांस वचकावें, त्यांनीं नरमून असावें ही त्यांची इच्छा. हिंदु तुमच्या मोहरमांत भाग घेतात तुम्ही गणपत्युत्सवांत घ्या- असें म्हणणें किती मुसलमानांस रुचलें असतें? हा उत्सव त्यांस वर्मी झोंबला आणि म्हणून त्यांनी दंगे केले. परंतु या दंग्यांचें कारण निरुपद्रवी विघ्नहर्त्या गणपतीचा उत्सव हें नसून, चढेल मुसलमानांचे फाजील धर्म-वेड हेंच होय हें डोळ्याआड करून चालणार नाहीं. हे दोन उत्सव आणि टिळकांचा सामाजिक बाबींतला परंपरेला होतां होईतों एकदम न टाकण्याचा दृढ निश्चय या तीन गोष्टीमुळे त्यांस या रानडेपक्षीय लोकांनी जहाल हें विशेषण दिले. आपल्यास सवतासुभा काढावयाचा तर काढावा, परंतु तो काढण्यासाठी आपले मताधिक्य नाहीं ही खरी गोष्ट जी सांगावयाची ती टाळून हा पक्ष जहाल आहे अशी टिमकी वाजवावयास या पक्षाने सुरुवात केली, आणि आपल्याच देशबांधवांस जहाल अशी नांवे ठेवून तो पक्ष सरकारच्या अवकृपेस जास्तच पात्र केला. नवीन सभा काढण्यास बळकट आधार कशाचाच नव्हता. ज्यांचें मताधिक्य आहे त्यांच्याबरोबर काम करण्यांत आपली मानखंडना आहे असे वाटल्यावरूनच ही निराळी सभा स्थापण्यांत आली आणि म्हणूनच टिळकांनी ती स्थापणाऱ्यांवर टीकेचे जळजळीत अस्त्र सोडलें. हा विस्तार करण्याचें कारण येवढेच की जो पक्ष मतानें मातबर असेल त्याच्याशी भांडून जर त्या पक्षाने आपली मतें स्वीकारली तर ठीकच; नाहीं तर जे मताधिक्याने ठरेल त्याचा टिळक प्रसार करीत. परंतु टिळक आग्रही आहेत असा टिळकांवर आरोप करणारे मात्र आपले अल्पसंख्याकत्व झाल्याबरोबर वेगळे होतात! टिळक मतासाठी, आपले मत दुसऱ्यास पटविण्यासाठी, मातबर लोकांशी झगडतील; आकाशपाताळ एक करितील; परंतु जर आपले म्हणणे मताधिक्याने पसंत ठरलें नाहीं तर उठून जाणार नाहीत; उलट जे ठरेल त्याचे लोण सर्व जनतेत पोंचवितील आणि दुसऱ्या प्रसंगी आपले मताधिक्य करण्याचा प्रयत्न करतील, परंतु सवते सुभे काढणे, वेगळे होणें हें नेमस्त मंडळींसच बाळकडूं आहे, टिळकांस नाहीं असें आम्ही स्पष्टपणे म्हणतो. गोखले आतां डेक्कन सभेचे सेक्रेटरी झाले. याच वर्षी गोपाळराव ग्रज्युएटांतर्फे बॉम्बे युनिव्हर्सिटीचे फेलो निवडून आले. मरेपर्यंत ते युनिव्हर्सिटीचे फेलो होते. कर्झनसाहेबांच्या युनिव्हर्सिटीच्या कायदेकानूनंतर त्यांस युनिव्ह र्सिटीनेंच फेलो नेमलें, एक वर्ष ते सिंडिकेटचेही सभासद होते, परंतु पुढे मात्र निवडून आले नाहींत. पुढे पुढें सीनेटच्या बैठकींसही त्यांस वेळेवर जातां येत नसे. कारण कामाचा बोजा त्यांच्यावर किती पडें हें त्यांचे त्यांनाच कळे. ते हजर असले म्हणजे मात्र वादविवादांत लक्षपूर्वक मन घालावयाचे. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. बी. ए. च्या परीक्षेस इतिहास हा विषय सक्तीचा असावा कीं नाहीं या प्रश्नावर जेव्हां भवति न भवति होत होती तेव्हां गोपाळरावांनी उत्कृष्ट भाषण केलें. हेंच त्यांचें शेवटचें भाषण होय. हिंदुस्तानांतील तरुणांस इतिहासाची फार अवश्यकता कशी आहे तें त्यांनीं स्पष्टपणे सांगितलें. हा विषय अवश्यक असावा असें त्याचें म्हणणें होते आणि त्याच वेळेस जर मतें घेतलीं असती तर गोपाळरावांचा जय झाला असता. कारण त्यांच्या भाषणानें खरोखरच मनावर परिणाम घडवून आणला असें तें भाषण ऐकणारे लोक सांगत. परंतु उपयोग झाला नाहीं. नवीन 'ऐच्छिक इतिहास' या विषयाचा अभ्यासक्रम जेव्हां आखण्यांत आला तेव्हां मात्र त्यांच्या मतास- म्हणण्यास मान देण्यांत आला. राजनीतिशास्त्राचा अभ्यास आणि अर्थशास्त्र हा विषय बी. ए. ला हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिति हा विषय एम्. ए. ला ठेविण्यांत त्यांनींच भीड खर्च केली. ते पुष्कळ वर्षे इतिहास व इंग्रजी यांचे परक्षिकही होते.
 १८९६ मध्यें कलकत्त्यास राष्ट्रीय सभा होती. रानडे व गोखले ही गुरुशिष्यांची जोडी तेथे गेली होती. गोखल्यांविषयीं रानडे यांस आतां बरीच अशा वाटू लागली होती. हा पुढे मोठा मनुष्य होईल, राष्ट्राचा नेता होईल असे भविष्यकाळचें स्वप्न त्यांच्या दृष्टीस दिसूं लागलें होतें. गोखल्यांची तेथे ओळख करून देतांना ते म्हणाले 'हा एक होतकरू तरुण असून हिंदुस्थानच्या पुढाऱ्यांत याची गणना होईल,' हे त्यांचे शब्द अक्षरशः खरे ठरले, म्हणजे या सुमारास रानड्यांस त्यांचे सर्व गुण, त्यांची योग्यता कळून आली असली पाहिजे; एरव्हीं नेहमीं जबाबदारपणे बोलणाऱ्या व अवास्तव स्तुति न करणाऱ्या रानड्यांच्या तोंडून असे उद्गार बाहेर पडले नसते. "स्तुति येति न मुखासि या असारा ज्या"– असार म्हणजे पोकळ स्तुति अशा थोर पुरुषांच्या तोंडून येत नसते. आज दहा वर्षे रानड्यांजवळ ते शिकत होते. मनानें बुद्धीनें, हृदयानें शिकत होते. वागावें कसें, लिहावें कसें, बोलावें कसें, शांत रहावे कसें- या सर्वांचे धडे त्यांनी घेतले. रानड्यांच्या तालमीत पूर्णपणे तयार झाले तेव्हां त्यांचे वय फक्त तीस वर्षांचें होतें. या होतकरू तरुणास पुढल्याच वर्षी आपल्या गुरूजवळ शिकलेल्या विद्येत परीक्षा देण्याची वेळ आली. परीक्षा घेणारा तिऱ्हाईत असला म्हणजे परीक्षा जास्त कसोशीनें होते. गोपाळरावांची परीक्षा इंग्लंडांत होणार होती. आणि त्या परीक्षेस जाण्याची ते तयारी करूं लागले.
इंग्लंडची पहिली सफर.

 १८९६ मध्ये इंग्लंडमध्ये कान्झर्वेटिव्ह पक्ष सत्तारूढ होता. ज्या खर्चाचा बोजा वास्तविक रीत्या इंग्लंडवर पडावयाचा तो हिंदुस्थानावर पडतो असा गवगवा होत होता. तेव्हां या प्रकरणाची चौकशी करण्याकरितां एक कमिशन नेमण्यांत आलें. हें कमिशन वेल्बी कमिशन म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानांतून या कमिशनपुढे साक्ष देण्यासाठीं वाच्छा हे जाणार होते. मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशनतर्फे व डेक्कन सभेचा सेक्रेटरी या नात्यानें गोपाळराव गोखले यांनी इंग्लंडांत साक्ष देण्यास जावयाचें असें ठरलें. वाच्छा हे कसलेले, नांवाजलेले आंकडेशास्त्रज्ञ होते. गोपाळरावांचा या अभ्यासाबद्दल लौकिक अद्याप झाला नव्हता. रानड्यांनी मात्र १८९० मध्येच जुन्नरहून लिहिलेल्या मागें दिलेल्या पत्रांत गणेशपंत जोशी यांस गोखले हे तुमच्याबरोबर अभ्यास करण्यास योग्य आहेत असें लिहिलें होतें. त्या गोष्टीस आज सहा वर्षे झाली होती. गोपाळरावांनी सांगोपांग अभ्यास केला होता. आतां तर त्यांनी तीन महिने जय्यत तयारी चालविली. मुंबईहून पुणे, पुण्याहून सोलापूर, तेथून पुनः मुंबई असे त्यांनी किती तरी खेटे घातले! रा. ब. गणेशपंत जोशांजवळून सर्व बारीकसारीक माहिती, टांचणे, टिपणें सर्व कांहीं तयार करून घेऊन ठरलेली वेळ येतांच गोपाळराव हिंदुस्थानची तरफदारी करण्याकरितां त्याच्या वतीने साक्ष देण्यासाठी इंग्लंडास चालले. बालसूर्य उदयाचलावर येऊं लागला. हिंदुस्तानचा किनारा दिसेनासा झाला. परिचित मित्रमंडळी दूर राहिली. प्रथम प्रथम गोपाळरावांस चैन पडेना. अफाट आकाश आणि अनंत सागर यांच्याकडे ते कित्येक वेळां पहात बसले असतील. समुद्राच्या लाटांप्रमाणेंच त्यांचें मन खालीं वर होत असेल. ज्या कार्यासाठी आपण जात आहों तें आपल्या हातून नीट तडीस जाईल कां? आपल्या गुरूच्या अपेक्षा आपल्या हातून सफल होतील काय? परकी समाजांत आपणास नीट वागतां येईल कां? इत्यादि विचारांनी त्यांच्या मनांत खळबळ उडविली असेल. कॅले येथे गोपाळरावांस केबिनमध्ये मोठा धक्का बसला आणि त्यांची छाती किंचित् दुखूं लागली. त्यांस वाटलें कीं, दोन दिवसांनी थांबेल; म्हणून त्यांनीं तिकडे दुर्लक्ष केलें. गोखले इंग्लंडमध्ये आल्यावर प्रथम वाच्छांकडेच राहिले. वाच्छा हे केंब्रिज लॉजमध्ये रहात होते. तेथेंच प. पूज्य दादाभाई रहात असत. दादाभाई हे कमिशनमधील एक सभासद होते. गोपाळराव आधींच अत्यंत भिडस्त आणि लाजाळू; त्यांतून ते आतां परक्या समाजांत आलेले! पंचहौद मिशनमधील चहा प्रकरणावर ज्या समाजांत प्रचंड वादविवाद झाले, त्या समाजांतील गोखले तेथे गोंधळून गेले. बायकां- पुरुषांमध्ये, पारशांमध्ये मिळून मिसळून वागण्याचा त्यांस अद्याप सराव नव्हता. त्यांना कसेंसेंच वाटे. इकडील राहणी अद्याप त्यांस नीटशी समजेना. पहिले दोन दिवस तर ते मोठया सावधगिरनिं वागत होते. न जाणों कोठें एकादा शिष्टाचार चुकावयाचा! गोपाळराव या गोष्टीस फार जपावयाचे; इतके कीं तें करणें हस्यास्पद व्हावयाचें. दोन दिवस झाले. तिसऱ्या दिवशीं त्यांचे छातींतील दुखणे जास्त झालें. ते दोन दिवस काळजी घेत होते; परंतु आतां वेदना सहन करवतना. दुःख असह्य झालें आणि गोपाळराव अस्वस्थ झाले. दादाभाईकडे समक्ष जाण्यास ते भीत. त्यांस आपण कसें सांगावें असें त्यांच्या गुरुजनांविषयी आदर ठेवणाऱ्या मनास वाटे. त्यांनी ही गोष्ट वाच्छांच्या कानावर घातली. त्यांची सहनशक्ति, आपले दुःख षट्कर्णी होऊ न देतां तें मुकाटपणें मनांत गिळून राहणें हें पाहून वाच्छा कळवळले. परक्या देशांत आलेले, जवळ ना स्नेही, ना मित्र, ना नात्यागोत्याचा आप्त! परंतु वाच्छा व दादाभाई तेथें होते. वाच्छांनी ही बातमी दादाभाईस सांगितली. त्यांनी ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरास निमंत्रण पाठविले आणि ते स्वतः गोपाळरावांचीं कळ कमी होण्याचे प्रथमोपचार करीत बसले. दादाभाईस आपली शुश्रूषा करावी लागत आहे हें पाहून गोपाळराव गोंधळले. दादाभाईंबद्दस त्यांस किती पूज्यभाव वाटे हें १८९३ मध्ये जेव्हां दादाभाई पुण्यास आले होते आणि त्या वेळेस त्यांचें जें थाटाचें स्वागत झाले होतें त्या प्रसंगी दिसून आलें होतें. दादाभाईच्या जवळ आपण असावें असें त्यांस त्या वेळी वाटे. परंतु ज्या गाडीतून मिरवणूक निघत होती त्या गाडीत जागा नव्हती. तेव्हां गोपाळराव घोडे हांकणाराजवळच जाऊन बसले आणि आपल्या मनींची इच्छा त्यांनीं सफळ करून घेतली; असो. डॉक्टर आला; छाती तपासण्यांत आली; दुखणे किती जोखमीचें आहे हे डॉक्टराने सांगितलें. थोडक्यांत चुकले नाहीं तर प्राणांवरच बेतावयाचें! औषधोपचार सुरू झाले. पहिले दोन तीन दिवस फारच काळजी वाटत होती. हळूहळू सुधारणा होत होती. कांहीं दिवस अंथरुणावर पडणेंच त्यांस भाग होते. कारण डॉक्टराने तसे सांगितलें होतें. ज्या घरांत ते रहात असत त्याच घरांत एक फार ममताळू पोक्त बाई होत्या. ज्या शेरिडननें हिंदुस्तानची करुण कहाणी पार्लमेंटांत सांगितली त्या शेरिडनच्याच वंशांतली ही बाई होती. तिचे नांव मिसेस कॉन्ग्रीव्ह. या बाईनें गोपाळरावांची बरदास्त फार उत्तम ठेविली. शुश्रूषा खरोखर स्त्रियांनीच करावी. गोखल्यांची जास्त उत्तम व्यवस्था घरीही झाली नसती. गोपाळराव प्रसन्न रहावे- त्यांचें मन चिंताग्रस्त नसावं यासाठीं कॉन्ग्रीव्ह बाई खटपट करी. ती त्यांच्याजवळ बोलत बसे. तिच्याबरोबर बोलण्याचालण्यानें गोखल्यांचा भिडस्तपणा जाऊन आतां नैसर्गिक चौकसपणा व मोकळेपणा त्यांच्या वागणुकींत आला. ते पंधरा दिवसांनीं हिंडूं फिरू लागले. ३१ मे १८९७ रोजी युनिव्हर्सिटीतर्फे बोटिंगच्या शर्यती होणार होत्या. त्या पाहण्यास गोखले, वाच्छा व दादाभाई त्रिवर्ग गेले होते. दादाभाईंनी जरी ४०-४२ वर्षे इंग्लंडमध्ये काढली तरी ते ही गोष्ट पहाण्यास कधीं गेले नव्हते. ही त्यांची विरक्तता पाहून गोपाळ रावांचा आदर दुणावला. गोपाळरावांवर आध्यात्मिक परिणाम घडविणाऱ्या तीन विभूतींपैकीं एक दादाभाई होते हें मागें एके ठिकाणीं आलेच आहे. बारीक सारीक गोष्टींकडेसुद्धां लहान मुलाप्रमाणे गोपाळरावांचे लक्ष असावयाचें. शिकवतांना सुद्धां ते कांहीं वगळावयाचे नाहींत. वाच्छा म्हणतात. 'Mr. Gokhale was a master of the minutest details.'
 इंग्लंडमधील प्रसिद्ध व्यक्तींस भेटण्याची त्यांची फार इच्छा, मोर्ले साहेबांचे ग्रंथ त्यांनी फार मननपूर्वक वाचले होते. या तत्त्वज्ञास भेटल्याशिवाय जाणें म्हणजे देवळांत जाऊन देव न पाहण्यासारखे त्यांस वाटलें असावें. त्यांस भेटून आपली धणी केव्हां तृप्त होईल, डोळ्यांचे पारणें कधीं फिटेल असे त्यांस झालें होतें. शेवटी एक दिवस ठरविण्यांत आला, आणि गोखले व मोर्ले यांची गांठ पडली. बर्कविषयीं, आयर्लंडच्या परिस्थितीविषयीं त्यांचे बोलणे झाले, मोकळेपणानें त्यांनी चर्चा केली. शाळेतील एकाद्या आनंदोत्सवाची बातमी घेऊन जसा विद्यार्थी घरीं धांवत येतो तसे गोखल्यांचे झाले. पुष्कळ वेळां ते खरोखरच मुलाप्रमाणें वागत. मुलाचा उत्साह, जिज्ञासा व अकपटपणा त्यांच्या ठिकाणी अजूनही होता व मरेपर्यंत राहिला. यानंतर आयरिश पक्षाचा जॉन रेडमंड याची ही त्यांनी भेट घेऊन 'होमरूल' ची इत्थंभूत माहिती करून घेतली. सर डब्ल्यू. वेडरबर्न यांच्या मध्यस्थीनें दुसऱ्या पुष्कळ हिंदुस्तानच्या हितचिंतकांस ते भेटून आले.
 जेथें कोठें मेजवानी किंवा खाना असेल तेथें गोखले आपली तांबडी गुलाबी पगडी घालून जावयाचे. पार्लमेंटमध्ये जाते वेळेसही आपलें राष्ट्रीय शिरोभूषणच ते ठेवीत. पाय विलायती झाले तरी डोके हिंदुस्तानी ठेवावयाचें! केंब्रिज लॉजमध्ये दुसऱ्या एक मिस् पायनी म्हणून बाई होत्या. त्यांनी गोपाळरावांचे नवीन नामकरण केलें. कॉन्ग्रीव्ह बाईनें गोपाळरावांची आजारीपणांत शुश्रूषा केल्यामुळे कॉन्ग्रीव्ह बाईचा पिंगट बच्चा- Brown Baby- असे त्या विनोदानें म्हणत. इंग्लंडमधील शिक्षण- पद्धति कशी काय असते हेंही गोपाळरावांस पहावयाचें होतें. केन साहेबांच्या खटपटीनें त्यांस हें सर्व समजून घेण्यास सांपडलें, प्रथम डल्विच् कॉलेजमध्ये ते गेले. तेथे अर्धा दिवस मोठ्या मजेत गेला. फराळ करतांना प्रिन्सिपालना प्रश्नांवर प्रश्न विचारून गोपाळराव भंडावून सोडीत. नंतर बेडफर्ड या मुलींच्या कॉलेजांत ते गेले. तेथें एक पार्शी बाई शिक्षकीण होत्या. मुलींच्या शिक्षणाबद्दल त्यांनी माहिती करून घेतली. केंब्रिज येथे या वेळेस परांजपे होते, त्यांस भेटण्यास गोखले अर्थातच विसरले नाहींत. सर वुइल्यम हन्टर या प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञासही ते भेटले.
 शिक्षणाच्या काँग्रेसमध्ये स्त्रियांच्या शाखेपुढे त्यांनी हिंदुस्तानांतील स्त्रीशिक्षण हा निबंध वाचला. या निबंधांतील पहिल्याच अधिकरणांतील एक वाक्य फार गोड व मार्मिक आहे. हिंदुस्तान पिकले फळ होतें आणि इतर राष्ट्र कच्चीं फळें होतीं. "Time, however, which brings ripeness to the raw fruit brings also decay to the ripe one and the country which was once the cradle and long the home of a noble religion, a noble philosophy, science and art of every kind, is at the present day steeped in ignorance and superstition and all the moral helplessness which comes of such darkness." नंतर शिक्षणाचा इतिहास सांगितला आहे; मिशनरींचे प्रयत्न वर्णिले आहेत; हिंदुस्तानांतील सध्यांच्या शिक्षणाचे शेकडा प्रमाण मुलांमुलींत किती आहे तें सर्व आंकडे देऊन दाखविले आहे. स्त्रीशिक्षणास हिंदुस्तानांत होणारा विरोध दिवसेंदिवस कसा कमी होत आहे आणि हिंदुस्तानांतील शिक्षण विशेष उपयुक्त अगर मताची वाढ करणारें नसून केवळ डोक्यांत कोंबले जाणारे कसे आहे हेंही त्यांनी विशद करून या निबंधांत दाखविलें आहे.
 अशा रीतीनें इंग्लंडमध्ये इतर कामे चालली होती. आतां ते दुसऱ्या एका मित्राकडे राहण्याची सोय झाल्यामुळे वाच्छांकडून निघून गेले. नंतर इंग्लंडमध्ये ज्या कामासाठीं ते मुख्यत्वेकरून आले होते तें काम आलें. तें काम त्यांनी उत्तम प्रकारें पार पाडलें. त्यांची उलट तपासणी कसून घेण्यांत आली, परंतु गोपाळराव कचरले नाहीत; डगमगले नाहीत. त्यांची तयारी पूर्ण असल्यामुळे त्यांची त्रेधा तिरपीटही उडाली नाहीं. सर्व प्रश्नांस त्यांनी समाधानकारक उत्तरे दिलीं. कोठें कोठें दादाभाई त्यांस सांवरून घेत. दादाभाई त्या कमिशनमध्ये असल्यामुळे गोखल्यांस धीर असे. त्यांचें विस्तृत वाचन, सर्व प्रश्नांचे केलेलें सूक्ष्म परिशीलन, बिनचूक माहिती, हिंदुस्तानच्या आजपर्यंतच्या घडामोडींची वित्तंबातमी या गोष्टी त्यांच्या लेखी साक्षीवरून आणि तोंडी जबानीवरून दिसून येतात. त्यांनीं आपल्या लेखी साक्षाचे तीन भाग केले होते.
 १ वसूल व जमाबंदी- या सर्व जमाबंदीवर ताबा कोणाचा व किती असतो.
 २ खर्च कोणत्या पद्धतीने आणि कसा करण्यांत येतो.
 ३ इंग्लंड आणि हिंदुस्तान यांच्यामधील खर्चाची वाटणी कशी करावयाची.
 गोपाळरावांनी सांगितलें कीं, हिंदुस्थानांतील बहुतेक सरकारी वसूल लष्कर, बड्या बड्या अंमलदारांचे मोठमोठे पगार आणि पेन्शनें यांतच खर्च होतो. अगदी अल्प भाग शिक्षण, आरोग्य, कालवे, शेतकी यांसाठीं खर्च होतो. ब्रिटिश व्यापारी आणि ब्रिटिश सावकार यांचेच हितसंबंध प्रथम पहिले जातात आणि ज्यांच्यापासून कर मिळतो त्यांच्या हिताची वास्तपुस्तही करण्यांत येत नाहीं. लढायांचे बेसुमार खर्च होतात आणि त्याचा बोजा गरीब बिचाऱ्या हिंदुस्तानावर पडतो. साम्राज्य वाढविण्याची हांव तुम्हांस, परंतु पैसा आणि प्राण मात्र जाणार हिंदुस्तानाचे! दुसऱ्याचा बळी देऊन आपली पोळी पिकविणें हें अत्यंत अनिष्ट व अहितकारक व अन्यायाचे आहे. आधींच शिक्षणादि कार्यासाठी पैसा पुरत नाहीं तो या गोष्टींमुळे मुळींच पुरणार नाहीं आणि निःसत्व व निष्कांचन होणाऱ्या रयतेवरील करांचे ओझें मात्र खर्चाची तोंडमिळवणी व्हावी म्हणून वाढतच जाणार!
 The frequent subordination of the interests of the Indian taxpayer to these other interests makes it all the more imperative that the machinery of constitutional control should provide adequate safeguards for a just and economical administration of the Indian expenditure; and yet, I fear, nowhere are the safeguards more illusory than in our case.
 गोपाळरावांच्या सुंदर व मुद्देसूद साक्षीनें त्यांची वाहवा झाली! हिंदुस्थानांतील त्यांच्या मित्रांचा आनंद गगनात मावेना!! रानड्यांसही समाधान झालें!!! नवीन पुढारी आपणांस लाभला असें जनतेस वाटू लागले. हा आपले पांग फेडील असे दुःखी कष्टी भूमातेस वाटलें असावें. अशा प्रकारें गोखले आनंदांत होते, त्यांचे मित्र त्यांच्या गळ्यांत यशाची माळ घालण्यास इकडे उत्सुक होते, परंतु विधिघटना होती वेगळीच!
 जगांत अशी गंमत आहे कीं, ज्या वेळेस दुःखाचा मागमूसही नसतो. सुखसमाधानांत लोक पोहत असतात, अशा वेळेस एकाएकीं सर्व स्थिति पालटून जाते. काळेकुट्ट ढग जमतात; आकाशांतील चंद्रमा लोपून जातो; सोसाट्याचा झंझावात वाहू लागतो; मेघांच्या गडगडाटानें कानठळ्या बसून जातात; विजेचा लखलखाट होतो आणि दरएक क्षणीं वाटते हा विजेचा गोळा कोठे तरी पडणार; या प्रचंड वादळाने गांवच्या- गांव उध्वस्त होणार; आणि असे उत्पात आपण अगदी शांत आणि प्रसन्न वातावरण असतांना पाहतों. तसेंच गोखल्यांच्या बाबतींत झालें. पायसांत मिठाचा खडा पडला. एकंदरीत दैवाला सर्व चांगले पहावत नाहीं हें खरें!
 गोपाळराव इंग्लंडमध्ये गेले, परंतु मागें इकडे पुण्यांत हलकल्लोळ माजला. नवीन रोगाची साथ आली. मुंबई, पुणे, नाशिक, धारवाड, बेळगांव या महाराष्ट्रांतील बहुतेक सर्व ठिकाणी ग्रांथिक संन्निपातानें- प्लेगने हलकल्लोळ माजविला. हजारों लोक मृत्युमुखी पडले. कुटुंबेच्या कुटुंबे बसली. लोक अगदी हवालदिल झाले. कधीं कोणाच्या प्राणांवर बेतेल याचा नेम नव्हता. सरकारने या नवीन रोगाचा वेळींच प्रतिरोध करावा या सद्धेतूनें, त्याचें उच्चाटण व्हावे म्हणून शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानें लस टोचण्याचा जालीम उपाय शोधून काढला. रोग नवीन आणि त्यावर पसंत केलेला उपायही नवीन लोकांस टोचून घेण्याची कल्पनाच सहन होईना. याशिवाय जो कोणी या रोगाने पछाडला असेल त्याच्या आईबापांचे, भावाबहिणीचें म्हणणें, केविलवाणें रडणें, आरडणें. यांपैकी कशासही न जुमानतां त्याची क्वारंटाईनमध्ये रवानगी होई. आणि तेथें तो रोगी बहुधा आपल्या नात्यागोत्यांचे कोणी जवळ नसतां दगावावयाचा हे ठरल्याप्रमाणेंच होतें. ज्या घरांत रोग आला असेल तीं घरें धुवून, कपडे वगैरे जाळावयाचे; लोक आजाऱ्याची बातमी देत नसत म्हणून घरांची झडती व्हावयाची; असा रोजचा कार्यक्रम होता. आणि ज्यांचीं मनें जात्याच असंस्कृत व निष्ठुर असतात. आणि घाव घालावयास जे उत्सुक असतात अशा गोऱ्या सोजिरांची या कामगिरीवर नेमणूक झाली होती. काम किती नाजूक आणि तें पार पाडणारे हे हडेलहप! हिंदु लोकांची मने जात्याच कोमल. दुसऱ्याच्या दुःखाने त्यांच्या हृदयाचें पाणी होतें. सांथीच्या रोगाने घरांतील माणूस आजारी पडला तर त्याची शुश्रूषा मनोभावानें जिवापाड मेहनत करून करावयाची हें त्यांस माहीत, या संसर्गजन्य रोगानें आपण पछाडले जाऊं असें त्यांच्या ध्यानीमनीही येत नाहीं. मरणोन्मुख माणसास मरता मरता तरी सुख व्हावे ही त्यांची इच्छा असते. दुधाचा थेंब, गंगेचें पाणी तरी त्याच्या पोटांत जाऊ दे असें त्यांस वाटत असतें. या सर्व मनोवृत्तींना फांटा देऊन, त्या कोमल मनाचें दुःख न पाहतां, आजारी माणसास उचलून क्वारंटाइनमध्ये नेऊन ठेवीत. घरांतील माणसें आरडून ओरडून नुसता कल्लोळ करीत, परंतु विचारतो कोण? आणि दया तरी कोणास येणार? बापलेक एकमेकांस दुरावले! मायलेकरांची ताटातूट झाली!! पति- पत्नींत दुजेपणा आला!!! सोजीर लोक घरांत घुसून देवाब्राह्मणांची नालस्तीही करीत. यामुळे पुण्यांतील लोकांत असंतोष माजून राहिला. लोकांची मनें क्रोधानें जळफळू लागली. तरुणांना त्येष आला. आणि याचा परिणाम म्हणजे रँड व आयर्स्ट यांचे खून झाले. ही बातमी विजेप्रमाणें सर्वत्र पसरली. इंग्लंडांतील वर्तमानपत्रे आणि हिंदुस्तानांतील अँग्लो- इंडियन पत्रे 'सूड सूड' म्हणून ओरडूं लागलीं. गोपाळराव या वेळेस इंग्लंडांत होते, त्यांच्या मित्रांचीं त्यांस खाजगी पत्रे गेलीं होतीं; त्यांस कांहीं वर्तमानपत्रांचे अंक मिळाले होते. त्यांच्या मित्रांनीं 'स्त्रियांची अब्रू घेण्यांत येते; त्यांच्यावर जुलूम होतो' वगैरे मजकूर पत्रांत लिहिला होता. इंग्लंडांतील लोकांस ही खरीखुरी माहिती कळविली तर त्यांचा गरीब हिंदूंवर झालेला रोष नोकरशाहीवरच वळेल असें गोखल्यांस वाटलें. ते ही सर्व पत्र वाच्छांस वाचून दाखवीत असत; त्यांच्या मित्रांस ही कुणकुण समजली. शेवटीं जून महिन्याच्या अखेरीस या बाबतीत काय करावें हें ठरविण्यासाठी पार्लमेंट-गृहाच्या लायब्ररीच्या खोलींत कांहीं मित्र जमा झाले. पहिल्या दोन बैठकी ज्या झाल्या त्यावेळीं वाच्छा हे हजर होते. परंतु ज्या बैठकींत ही बातमी प्रसिद्ध करावी असें ठरलें त्याच बैठकीस वाच्छांस हजर राहतां आलें नाहीं, आणि गोखले तर उतावीळ झाले होते. तिसऱ्या बैठकीत जे ठरलें तें त्यांनी वाच्छांस कळवून त्यांचा सल्ला घेतला असता तर भावि आपत्ति टळली असती, परंतु उतावळेपणाने त्यांनीं ती बातमी मँचेस्टर गार्डियन या वृत्तपत्रांत प्रसिद्ध केली. पत्रांवर भरंवसा किती ठेवावा, त्यांत ऐकीव गोष्टी किती असतील याचा सारासार विचार करून हे कृत्य झालें पाहिजे होतें. परंतु होणारासारखी बुद्धि झाली आणि गोखल्यांनीं सर्व मजकुरावर भिस्त ठेवून माहिती जाहीर केली. इंग्लंडमधील लोक स्त्रीस्वातंत्र्याचे कैवारी. त्यांच्यामध्ये स्त्रियांस सर्वत्र मान. त्यामुळे स्त्रियांची अब्रू सोजिरांनी घेतली हें वाचून त्यांच्या पायाची आग मस्तकास गेली. पार्लमेंटांत प्रश्नोत्तरे झाली आणि मुंबई सरकारास 'खुलासा करा' अशी तार करण्यांत आली. मुंबई सरकारने पुण्यातील सुमारें ५०० सद्गृहस्थांकडे पंचप्रश्नात्मक पत्रिका पाठविल्या आणि या पांच प्रश्नांसंबंधीं प्रत्यक्ष वा ऐकीव जी माहिती, जो पुरावा असेल तो सरकारला कळवावा असें लिहिण्यांत आलें. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की, एकही गृहस्थ पुढे झाला नाहीं. आणि पुढे येणार तरी कसा? आपलीच बेअब्रू, आपल्या तोंडानें हिंदी अंतःकरणास बोलवत नाहीं. मलबारी हे या विषयी म्हणतात, "No modest Hindu or Mahomedan lady will come forward to accuse the would be assailant of her modesty. To ask her or her male relatives for proof is something like addition of insult to injury." जेव्हां कोणी कांहीं सांगावयास धजेना तेव्हां अर्थातच निमित्तावर टेकलेल्या मुंबई सरकारने 'गोखल्यांचीं विधानें खोडसाळपणाचीं आहेत' अशी उलट तार केली. आतां मात्र गोखल्यांवर कठिण प्रसंग आला. आपल्या मित्रांनीं जें लिहिलें तें अगदीं खरें आहे अशी त्यांची मनोभावना त्यांस सांगत होती. परंतु मुंबई सरकारच्या आव्हानास 'ओ' देऊन कोणीच गृहस्थ पुढें कसा झाला नाहीं याचें त्यांस आश्चर्य वाटले, आपल्या लोकांत नीतिधैर्य नाहीं असें त्यांस वाटले असेल काय? इंग्लंडांतील पत्रांनीं गोखल्यांवर शिव्याशापांचा नुसता पाऊस पाडला. पार्लमेंटांत एका सभासदाने तर त्यांस Despicable perjurer म्हणजे खोटीं व निंद्य कुभांडें रचणारा असा आहेर अर्पण केला. 'सहसा विदधीत न क्रियाम- विवेकः परमापदां पदम्' हा अमोल उपदेश संतापाच्या व भावनांच्या भरांत दृष्टीआड झाला. आपल्या लोकांचीं दुःखें व जुलूम तेथील लोकांस कळावी या सद्धेतूनें त्यांनी सर्व केलें. आपली विधाने खरी असे त्यांस वाटत होतें, परंतु सज्जनांच्या अंतःकरणप्रवृत्तीला कोठें जगांत मान्यता मिळते? जे काय प्रत्यक्ष सिद्ध होईल त्याच्यावर जगाचा भरवसा. करावयास गेले एक आणि झाले भलतेच! इंग्लंडमध्ये सुरेख साक्ष दिली होती, परंतु तें यश पार नाहींसें झालें. परक्या देशांत परकी लोकांचे वाक्प्रहार त्यांस सोसणें भाग होतं. त्यांचे मन द्विधा झालें, अंतःकरण विदीर्ण झाले, ते हिंदुस्तानास यावयास निघाले. वाच्छांबरोबर युरोपला जाण्याचा आपला बेत त्यांनी रद्द केला. हिंदुस्तानांत जाऊन आपल्यास आपली विधाने खरी करून दाखवितां येतील काय हाच प्रश्न त्यांच्या अंतश्चक्षूंपुढे होता. बोटीवर त्यांस फार त्रास झाला. सिव्हिलियन् लोक 'हाच आमच्या शिपायांचे वाभाडे काढणारा' असे त्यांच्याकडे बोट दाखवून सांगूं लागले. एका सिव्हिल सर्वंटाने मात्र त्यांच्या दुखावलेल्या मनास धीर दिला. गोखल्यांची बोट एडनला आली. एडनला कांहीं मित्रांचीं त्यांस पत्रे मिळाली. हीं पत्रें ज्यांनी इंग्लंडमध्ये त्यांस पुण्यांतील हलकल्लोळाचीं पत्रे लिहिली होतीं त्याच सद्गृहस्थांचीं होतीं. आमचीं नांवें सरकारांत कळवूं नका आमच्या नांवांची परिस्फुटता- वाच्यता न होऊ देण्याची खबरदारी घ्या अशी विनंति या पत्रांत मोठ्या कळवळ्यानें केली होती. गोखल्यांनी सर्व जबाबदारी आपल्याच शिरावर घेण्याचें नाहीं तरी ठरविलें होतें. आपली एक मानखंडना झाली तेवढी पुरे- आपल्या बरोबर इतरांची नको हाच उदार विचार त्यांनी मनांत धरिला होता.
माफी - प्रकरण.

 मुंबई बंदरांत बोट आल्याबरोबर प्रथम त्यांस पोलिस कमिशनर भेटले. गोपाळरावांनीं सांगितलें कीं, मला आधीं घरीं जाऊं द्या; मी पुरावा मिळविण्याची खटपट करीन आणि मग काय तें जाहीर करीन. आतां मला कांहीं एक करितां येणार नाहीं. गोपाळराव घरी आले. सर्व मित्रांच्या त्यांनी भेटी घेतल्या. परंतु पुरावा कोणीच देईना. आतां काय करावयाचें? आपण तर सर्व युरोपियन राष्ट्रांत इंग्लंडच्या शिपायांची नाचक्की करून बसलों! आणि तें विधान सप्रमाण सिद्ध करितां तर येत नाहीं!! गोपाळरावांच्या मनाची काय स्थिति झाली असेल याची कल्पनाच करणें बरें. त्यांच्या जिवास रुखरूख लागली. मन खाऊं लागलें. आपल्या गुरूची त्यांनी सल्ला घेतली. कठिण प्रसंगांत गुरूशिवाय कोण मदत करणार? रानड्यांनीं त्यांस जाहीर माफी मागण्यास सांगितलें. गोखल्यांस ही गोष्ट कमीपणाची वाटली पण रानड्यांचें नीतिधैर्य थोर. त्यांनीं सांगितलें कीं, आपली चूक कबूल करणें यांत मनाचा मोठेपणा आहे; मानखंडना नाहीं. सज्जन जे आहेत ते तुमचें कौतुकच करितील. हेंच करणें रास्त व श्रेयस्कर आहे. गोखले हो ना करीत होते, परंतु शेवटीं गुरूच्या उपदेशाप्रमाणें वागण्याचे त्यांनी ठरविलें. रानड्यांचा शब्द ते कसा मोडतील? रानड्यांस आपल्या करणीनें जर संतोष होत असेल तर त्रिभुवनाच्या निंदेसही ते भिणारे नव्हते. इंग्लंडमधील माझी साक्ष जर तुम्हांस पसंत पडली असेल तर माझें सार्थक झालें असें रानड्यांस त्यांनी लिहिलें होतें. 'If you find time to go through the statements and feel satisfied, I shall have received the only reward I care.' तेव्हां ज्यांना ते सर्वस्व समजत असत, त्यांच्या सांगीप्रमाणे ते वागणार नाहीत तर कोणाच्या? पुढे एकदां बाबू मोतीलाल घोष यांनीं रानड्यांजवळ या माफीचा खुलासा विचारला तेव्हां त्यांनी सांगितळें की, गोखले तयार नव्हते, परंतु आपण त्यांचे मन वळविलें, मोतीलाल, 'A step in the steamer' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात: "He was willing to stick to his words, but was prevented from doing so by his Guru-Mr. Ranade whom he could not disobey. In the course of a conversation Mr. Ranade assured me that the entire responsibility for Gokhale's apology was his and Gokhale simply followed his advice." स्वतःच्या शब्दांस चिकटून राहण्याच्यां गोखल्यांच्या निश्चयास मोतीलाल ('Fairness') 'चांगुलपणा' म्हणतात. आम्हास तसे वाटत नाहीं. जी गोष्ट आपणास सिद्ध करितां येत नाहीं आणि ज्या गोष्टीमुळे दुसऱ्याची आपण निंदा केली, ती गोष्ट सपशेल परत घेऊन माफी मागणे हेंच न्याय्य होय. आपला शब्द जर खरा करून दाखवितां येत नाहीं तर त्यास चिकटून राहण्यांत मोठेपणा किंवा धैर्य नाहीं. अशा वेळीं आपला अपराध कबूल करण्यासच अलौकिक धैर्य लागतें आणि यासच आम्ही नीतिधैर्य म्हणतो. आपल्याच लोकांत मनोधैर्य कमी म्हणून गोपाळरावांवर हा नामुष्कीचा प्रसंग आला, जर आपल्या विधानासाठी त्यांनी पुरावा पुढे मांडला असता तर गोपाळरावांस आपले शब्द खरे करतां आले असते. पण त्यांच्या पत्रलेखकांनी त्यांस आगाऊच केविलवाणी विनंति केली होती. या भ्याड लोकांच्यामुळे गोपाळरावांस माफी मागावी लागली! जर लोक पुढे येत नाहींत, पुरावा देत नाहींत तर आपलीच विधाने जरी तीं ईश्वराच्या दृष्टीनें (कारण तोच फक्त सर्वसाक्षी आहे) खरी असली तरी जगामध्ये खरी ठरत नाहींत. आणि तीं खरीं न ठरल्यामुळे ज्यांच्यावर त्या विधानांनीं दोषारोप केले होते त्यांची माफी मागणे हाच राजमार्ग आहे. गोपाळरावांनीं हा मार्ग स्वीकारला याबद्दल त्यांचे जितकें कौतुक करावें, त्यांच्या धैर्याची जितकी तारीफ करावी तितकी थोडीच होईल.
 युरोपांत हा माफी मागण्याचा प्रघात सर्वमान्य आहे. गोखल्यांनी माफी मागितल्यामुळे सरकारचें समाधान झालें, इंग्लंडमधील पत्रांची तोंडें बंद झाली. तेथील मित्रमंडळींचीं गोखल्यांस सहानुभूतिपर आणि समाधानदर्शक पत्रे आली. या माफीचा त्यांस पुढे फार उपयोग झाला. जबाबदारपणें आणि विचारपूर्वक कोणतीही गोष्ट करण्याचा त्यांनीं धडा घेतला. अधिकारीवर्गास वाटलें कीं, हा पुरुष न्यायी आहे. उगीच कोणाची नालस्ती करणार नाहीं. जें खरें दिसेल तेंच करील, आपली अब्रू याच्या हातांत सुरक्षित राहील. इंग्लंडमधील लोकांसही वाटलें कीं, या माणसाची सत्याकडे दृष्टि आहे. सत्य कठोर असले तरी हा डगमगणार नाहीं. जी गोष्ट इंग्लंडमध्ये त्यांस सत्य वाटली ती जाहीर करण्यास ते भ्याले नाहींत. परंतु ती गोष्ट खोटी ठरली हें जेव्हां त्यांस दिसलें तेव्हां माफी मागण्याच्या सत्यात्मक मार्गापासूनही ते विमुख झाले नाहींत, ते पुनः जेव्हां इंग्लंडास गेले तेव्हां हा सत्यवक्ता आहे अशी लोकांची समजूत असल्यामुळे त्यांच्या शब्दास वजन प्राप्त होई व त्यांच्या शब्दाचा विचार होई. हा फायदा लहानसान नाहीं. वाइटांतून हे चांगले बाहेर पडलें, आणि जास्त सावधगिरी ते शिकले. परंतु इंग्लंडमध्यें, येथील अधिकारीवर्गात आणि कांहीं मित्रमंडळींत जरी त्यांची वाहवा झाली तरी पुष्कळ वर्तमानपत्रांनीं त्यांस भ्याड, भित्रा, वगैरे विशेषणे दिली. देशाचा अपमान करणारा अशी त्यांची निंद्य वर्णने करण्यांत आली. पुण्यांतील मेळ्यांमधून त्यांची टर उडविण्यांत आली! आपले लोक इतके कसे कृतघ्न असें गोपाळरावांस वाटे. त्यांनी इंग्लंडमध्ये बजावलेल्या कामगिरीचा गौरवपर उल्लेख एकानेही न करतां त्यांनी सत्यासाठीं जी गोष्ट केली त्यामुळे त्यांच्यावर येवढा गहजब केला! परंतु मुक्ताबाईनें ज्ञानेश्वरांस सांगितलेलें 'संत जेणें व्हावें । जगबोलणे सोसावें,' हेंच वचन लाखाचें आहे. गोखल्यांनी निमुटपणे सर्व सहन केलें. आपल्या गुरूची शांत व गंभीर मूर्ति त्यांच्या समोर होतीच. 'आपलेच दांत आणि आपलेच ओठ'- लोक निंदा करताहेत, करोत. ही स्वजननिंदा गोखल्यांनी थोर मनानें सहन केली. मात्र ते म्हणत 'Forgive I must, forget I can not' त्यांच्या अंतःकरणांत निंदेचे शब्द कायमचे बसले! टीकेसंबंधी त्यांचें मन जात्याच अत्यंत मृदु. इंग्लंडमध्यें असतांना एकादा शिष्टाचार आपल्या हातून चुकू नये म्हणून त्यांची कोण धडपड! असल्या साध्यासुध्या शब्दानेही विव्हल होणारे कोमल अंतःकरणाचे गोखले या प्रचंड शरसंपातानें किती घायाळ झाले असतील बरें? कण्वाश्रमींचा कुरंग जसा दावानळांत होरपळून निघाला तद्वत् त्यांची स्थिति झाली. टिळकांमध्यें आणि गोखल्यांमध्ये हा मोठा फरक होता. टिळक आणि आगरकर टीकेस कधीं भ्यावयाचे नाहीत. लंगड्या पायानें सुद्धां ते समरांगणांत नाचावयाचे, चमकावयाचे. टिळक हे तत्त्वज्ञ होते. तत्त्वज्ञानाने येणारा कठोरपणा त्यांच्यांत आला होता. टीकेकडे त्यांचें विशेष लक्ष नसे. ते टीका विसरून जात आणि त्यांस वाटे कीं, दुसराही टीका विसरून जाईल. दुसरा इतके दिवस टीका उराशी धरून कसा बसतो याचें त्यांस आश्चर्य वाटे. स्वतःस टीकेची खिजगणती नसल्यामुळे दुसरेही असेच असतील या समजुतीने ते टीका करीत. परंतु गोखल्यांची मनःस्थिति निराळी होती. टिळकांच्या मनोगिरीवर किती कां मुसळधार पाऊस पडेना? त्याचा एक कोपराही ढांसळावयाचा नाहीं. परंतु गोखल्यांचें अंतःकरण देशावरील मृदु आणि भुसभुशीत मातीप्रमाणे होते; पावसाचे चार थेंब पडले तरी ते आतपर्यंत जावयाचे. त्यांचें मन लोण्याप्रमाणें होतें. तें परदुःखाने वितळे तसेच टीकेनेही वितळे! टिळकांचें मन जरी परक्याच्या दुःखाने कळवळलें तरी टीकेनें- स्वतःच्या दुःखाने वा स्वतःवरच्या टीकेने कधीही वितळून जात नसे. अशा प्रसंगी ते वज्राप्रमाणें कठिण बने, सार्वजनिक काम करणारा असाच खंबीर लागतो. गोखल्यांनी देशाचं हित केलें, सार्वजनिक काम केली परंतु दुखावलेल्या मनानें केली. दुखावलेले मन पुनः साफ बरे झाले नाहीं. वाग्बाण निघून गेला तरी त्यानें केलेला व्रण राहतो म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं. १८९७ सालची काँग्रेस वऱ्हाडांत अमरावतीस भरावयाची होती. गोपाळरावांच्या इंग्लंडमधील कामगिरीचा गौरवपूर्वक उल्लेख करावयाचा तें तर बाजूसच राहिलं; उलट त्यांच्या माफीबद्दल निषेध करणारा ठराव पास करावा असे दुसऱ्याचें वाईटच पाहणाऱ्या कित्येक लोकांस वाटले. परंतु गोष्टी या थराला आल्या नाहीत. तेथे गोखल्यांचे अभिनंदनही झाले नाहीं किंवा निंदाप्रदर्शक ठरावही पास झाला नाहीं. अमरावतीच्या काँग्रेसहून परस येतांना गोपाळरावांस एका प्रसंगाने आपल्या गुरूची अंतःकरण-ओळख जास्तच झाली. माधवरावांच्या प्रकृतीमधले दैवी तेज पुष्कळांस दिसलें होतें. भांडारकर तर रानड्यांचें सांगणें म्हणजे दैवी संदेश असें समजत. रानडे पहाटेच्या वेळेस उठून 'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले' हा तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध आणि गोड अभंग आळवून आळवून म्हणत होते. अर्थाशीं त्यांची झालेली समरसता पाहून गोपाळरावांस काय बरें वाटलें असेल?
 १८९८ मध्यें गोपाळरावांनी माफीसंबंधानें आपल्यावर केल्या गेलेल्या आरोपास सविस्तर उत्तर प्रसिद्ध केलें, त्यांत त्यांनी शेवटीं खालील उद्गार काढले आहेत. "Several of my Indian friends have been equally kind foremost among them being the gentleman at whose feet I have now sat for these many years as a pupil."
 लोकांनी टीका केली तरी रंजले गांजलेल्यांच्या दुःखाचा परिहार करण्याचें स्तुत्य काम गोखल्यांनी टाकलें नाहीं. अजून प्लेग हटला नव्हता. त्यांनीं एक स्वयंसेवकांचे पथक उभारलें आणि लोकांस पुष्कळ. सहाय्य केलें, टोंचून घेण्याचा उपदेश केला व त्यांच्या भोळ्या समजुती नाहीशा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामगिरीचा गौरवपर उल्लेख सरकारी रिपोर्टात सर क्लीग यांनी केला होता.
 १८९९ मध्ये इनॉक्युलेशन संबंधी एक सरकारी कमिशन बसलें. हा उपाय धोक्याचा आहे किंवा काय, यानें दुसरींच दुखणीं जडतात असे लोक म्हणतात त्यांत किती तथ्य आहे, सांधेदुखी उत्पन्न होते की काय यांची चवकशी करण्याकरितां हें कमिशन नेमलें होतें. गोखल्यांची या कमिशनवर नेमणूक झाली होती. कारण त्यांच्यावर सरकारचा विश्वास बसला होता. निरनिराळ्या ठिकाणी चवकशी झाली. विशेषतेः धारवाड, बेळगांव येथे जास्त साक्षी घेण्यांत आल्या. सर्व सभासदांचे मत इनॉक्युलेशन हा उपाय चांगला आहे असेंच पडलें. गोखल्यांनी आपली स्वतंत्र पत्रिका जोडिली होती. तींत ते म्हणतात 'जरी कांहीं इसमांस या उपायानें अन्य रोग जडला असला, तरी टोचला जाणारा जो असेल त्याची वयोमर्यादा आणि त्याची शक्ति नीट लक्षांत घेऊन तज्ज्ञ माणसाकडून लस टोचविल्यास हा उपाय लोकांस भोवणार नाही व परिणाम चांगलाच होईल.'
कौन्सिलांतील कामगिरी.


 या वर्षाच्या अखेरीस ते मध्यभागातर्फे कौन्सिलमध्यें निवडून आले. त्यांच्या अभिनंदनार्थ पुण्यास हिराबागेंत समारंभ झाला होता. डॉ. भाण्डारकर आणि गंगाराम भाऊ म्हस्के यांनीं गोखल्यांची स्तुति व गौरव केला. समारंभास गोखल्यांचे गुरु रानडे हेही हजर होते. गोखले हे जात्याच विनयशील आणि नम्र. भाषणाच्या अखेरीस ते म्हणाले " न्या. मू. रानड्यांनी मला हाताशीं धरिलें. त्यांच्या चरणांशी बसून शिकण्याची संधि मला मिळाली; म्हणूनच आज मला ही स्थिति प्राप्त झाली आहे. केवढी ही गुरुभक्ति? अलीकडे अशा प्रकारचे गुरुशिष्यसंबंध फारसे आढळत नाहीत.
 १९०० पासून आपल्या मृत्यूपर्यंत गोपाळराव हे प्रांतिक नाहीं तर वरिष्ठ- कोणत्या ना कोणत्या तरी कौन्सिलचे सभासद होतेच. या वर्षीच्या पहिल्याच भाषणांत त्यांनी दुष्काळपीडितांची कष्टप्रद कथा निवेदन केली. सरकारचे त्यासंबंधीं कर्तव्य काय तेही सुचविलें. सर्व विधानें आंकडे देऊन सशास्त्र सिद्ध केली होती. अंमलदार कर कसा जुलुमानें वसूल करतात, ज्या अंमलदाराकडून कर वसूल केला जात नाहीं त्याला कसा दपटशा देण्यांत येतो हे खानदेश वगैरे जिल्ह्यांतील प्रत्यक्ष प्रमाणांनी त्यांनी सिद्ध केलें. या वर्षी सूट दिली तर ती पुढील वर्षी वसूल करण्यांत येते आणि अशा तऱ्हेने शेतकऱ्यांच्या माना या परंपरागत बाकीनें आंवळल्या जातात असे सांगून गोखले म्हणतात 'In the present situation of our peasantry, it is necessary to give many of them a fresh start in life, without placing the mill-stone of arrears round their necks. सरकारचें म्हणणें असें कीं, एक वर्ष जर दुष्काळाचें तर दुसरें सुबत्तेचें असले पाहिजे आणि दक्षिणेत पिकांची सरासरी काढून कर ठरविण्यांत आल्यामुळे सूट अगर तगाई देण्याची जरूरच नाहीं. या विधानांची विफलता आणि त्यांतील फोलपणा त्यांनी पटवून दिला. शेतकऱ्यानें कर्ज काढून कर देऊं नये या शब्दाची 'कर्जानें तो जर निरंतर बांधला जाणार असेल' अशी खानदेशच्या कलेक्टरांनी केलेली ओढाताण त्यांनी पुढे मांडली. सातारा जिल्ह्यांत तालुक्यांतील तलाठी वगैरे लोकांस बाकीसह वसूल जमा न केल्याबद्दल दंडही ठोठावण्यांत आले. या सर्व प्रकारांची चवकशी होऊन दुष्काळग्रस्त प्रजेस अल्प स्वल्प तरी सुख देऊन तिचा दुवा घ्यावा असे त्यांनी कळकळीनें विनविले.
 गोपाळरावांस इंग्लंडमध्ये गेल्यापासून वाटे की, दादाभाईप्रमाणे आपणही इंग्लंडमध्ये राहूनच काम करावें, पार्लमेंटचा सभासद व्हावें, देशहिताची चळवळ करावी; परंतु न्या. रानडे म्हणावयाचे 'तुम्ही तिकडे जाऊन इकडील कामे कोण करणार? येथे कौन्सिलमध्ये कोण झगडणार? सरकारचा नैतिक अधःपात कोण दाखवून देणार? लोकांस राजकीय विचार करावयास कोण शिकविणार? अस्पृश्यांचा उद्धार कोणी करावयाचा? दारूला आळा कसा घालावयाचा? शिक्षण कसे वाढावयाचे? मृत्युसंख्या वाढत आहे तिला आळा कसा पडावा? आरोग्य कसें सुधारेल? शेती कशी वाढेल? कर कसे कमी होतील? उद्योगधंद्यास हातभार कसा लावतां येईल? आपसांतील तंटेबखेडे मोडून एकी कशी घडवून आणतां येईल? प्रेम, सलोखा कसा वाढेल? कामांचे डोंगर इकडे पडले असतां इंग्लंडांत जाऊन काय करणार? पाया भरावयाचे काम आधीं करा. सध्यां येथेच राबावयाचे तुमचें काम आहे. तुमच्यासारखी सर्वस्व देणारी माणसे पाहिजे आहेत. आम्ही नोकरदार; आम्ही किती करणार? रानड्यांच्या या उपदेशाचा गोपाळरावांवर फार परिणाम होई. या कामासाठी यंदा त्यांस कौन्सिलमध्ये जाऊन काम करावे लागलें.
 अशा रीतीने कामास आरंभ होत आहे, आपला शिष्य कौन्सिलमध्यें झगडण्यास योग्य झाला असें पाहून न्या रानड्यांनी आपला देह १९०१ च्या जानेवारी महिन्याच्या १६ तारखेच्या उत्तररात्रीं खालीं ठेविला. रात्रंदिवस देशहिताची काळजी वाहणारा, धोरणी, विद्वच्छ्रेष्ठ, असा महापुरुष इहलोक सोडून निघून गेला. सर्व चळवळींना जन्म देणारे, सर्वास कार्यप्रवृत्त करणारे, टकिचा पाऊस पडत असतां हिमालयाप्रमाणें गंभीर राहणारे, कृतीनें व मनानें थोर असे सत्पुरुष ईश्वराकडे गेले, मार्ग दाखविणारा गेला. काळ्याभोर अंधारांत चंद्राप्रमाणे शीतल प्रकाश देणारा महात्मा मृत्युराहूच्या मुखांत पडला. सर्व देश हळहळला. कोण हळहळणार नाहीं? या मृत्यूने गोपाळरावांच्या मनाची स्थिति किती चमत्कारिक झाली असेल बरें? ज्याने नवीन दृष्टि दिली, नवीन सृष्टि दाखविली, संकटाच्या वेळीं सदुपदेशाची वृष्टि केली त्या पितृतुल्य गुरूच्या मृत्यूनें गोपाळराव क्षणभर स्तिमित झाले. परंतु क्षणभरच. रानड्यांनी रडावयास शिकविलें नाहीं तरी रडें गिळून काम करता करतां पडावयास शिकविलें. समर्थांच्या समाधीच्या समयीं त्यांचे शिष्य असेच मुळूमुळू रडावयास लागले, तेव्हां समर्थांनी काय सांगितले होतें? 'आजपर्यं शिकलांत तें रडण्यासाठींच कां? मी चाललो तरी माझा दासबोध आहे. त्यांत माझा आत्मा आहे. तो दासबोध समोर ठेवून वागा म्हणजे मी जवळ असण्यासारखेंच आहे. या समयी गोखल्यांसही रानड्यांचाच उपदेश आठवला असेल. जीवित म्हणजे कर्तव्य आहे. येथे रडावयास वेळ नाहीं. आपला शोकावेग त्यांनी आवरला, डोळे पुसले आणि गुरूचा उपदेश जो अंतरी सांठविलेला होता तदनुसार वागावयाचें ठरविलें.
 न्या. रानड्यांची स्मारके सर्वत्र उभारण्यांत आली, कोठे वाचनालय, कोठें ग्रंथालय; कोठें तसबीर; कोठें पुतळा; कांहींना कांहीं तरी या थोर पुरुषाचें स्मारक लोकांनीं केलें. आपल्या गुरुस आणि आपल्या गुरुभक्तीस साजेसें स्मारक गोपाळरावांनीं उभारावयाचे ठरविले. त्यांनीं वर्गणीसाठीं व्याख्यानें दिली. एक लाख रुपये गोळा केले या रकमेंतून पुण्यास सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीच्या अग्रभागीं, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जवळ स्मारकार्थ 'इंडस्ट्रिअल व एकॉनॉमिक इन्स्टियूट' स्थापण्यांत आली. या इमारतीचा उद्घाटन समारंभ १९१० मध्ये गव्हर्नरांच्या हस्ते झाला, येथें अर्थशास्त्रावरील निवडक पुस्तकांचा चांगला संचय आहे. प्रयोगशाळाहि साधारण चांगली आहे. परंतु एक लाख रुपयांत हीं कामें यशस्वी कशी होणार? फक्त अर्थशास्त्राचा व्यासंग व अभ्यास करणासाठीं हीं संस्था स्थापिली असती तर बरे झाले असतें. परंतु गोखल्यांच्या आशेस पारावार नव्हता. 'I know no limitations for the aspirations of my Countrymen' हें त्यांचे वाक्य. प्रयोगशाळेंत शोध लागून हिंदुस्थानची औद्योगिक उन्नति व्हावी, आपल्या देशाचा दर्जा वाढावा असें त्यांस वाटत होतें. परंतु अशा गोष्टींस कोट्यवधि रुपये लागतात. सरकारचा आश्रय लागतो. गोपाळरावांस वाटत होतें कीं, म्युनसिपालटीमधून आणि सरकारामधून आपल्या संस्थेस सहाय्य मिळेल; परंतु ही आशा व्यर्थ ठरली. एक लाख रुपये म्हणजे नुसता कात आहे. परंतु पुढेमागें संस्था भरभराटेल असें त्यांस वाटले असावें. 'उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथाः' हा नियम खरा आहे, परंतु आपण दरिद्री असलो तरी अल्पारंभ' करून मनांतील कल्पना लोकांपुढें निदान आज मांडून तरी ठेवावी या हेतूनें गोपाळरावांनीं हें स्मारक उभारलें.
 १९०१ मधील प्रांतिक कौन्सिलांची बैठक सुरू झाली. या वर्षी दोन महत्त्वाची बिलें पास झालीं. दोहोंमध्येही गोखल्यांनी चांगलाच भाग घेतला. डिस्ट्रिक्ट म्युनिसिपल बिल याच वेळीं पसार झालें. गोपाळराव म्युनिसिपालिटींत पुष्कळ दिवस सभासद होते. त्यांस या कामाची व त्यांतील वैगुण्याची चांगली कल्पना असल्यामुळे त्यांनीं या बिलावर मुद्देसूद व उपयुक्त टीका केली. या बिलाचे कौन्सिलमध्ये वाचन होण्यापूर्वी जिल्हाम्युनिसिपालिट्यांचा विचार करण्यासाठीं एक सिलेक्ट कमिटी नेमण्यांत आली होती. या कमिटीत गोपाळरावही एक सभासद होतं. चार्लस ऑलिव्हंट हे अध्यक्ष होते. या अध्यक्षांनीं पुष्कळ मिळतें घेऊन काम केलें. कमिटीचें काम संपून आतां नवीन बिल ऑलिव्हंट यांनी पुढे मांडलें होतें "या बिलाला उपसूचना आम्ही आणीत नाहीं, कारण मग कांहींच मिळणार नाहीं. तेव्हां कांहीं न मिळण्यापेक्षां थोडें मिळणें बरें. "Half a loaf is better than no bread" असें गोखल्यांनीं प्रथम सिलेक्ट कमिटीमध्ये ठरविलें परंतु, नवीन बिल जें पुढें आलें त्यांत अशा कांहीं गोष्टी होत्या की, त्यांस उपसूचना आणणें जरूर झालें. गोपाळरावांनी या नवीन बिलांतील पहिली गोष्ट नाकारली ती ही की, '१८८४ च्या कायद्याने सरकारला निंमे सभासद ज्या जातींच्या अल्पसंख्याक लोकांना प्रतिनिधित्व मिळालें नसेल- त्यांतून निवडण्याचा हक्क मिळालेलाच होता. आतां या नवीन बिलानें पुनः उरलेल्या निंम्या भागांतही जातवार प्रतिनिधि नेमून टाकावयाचे हें काय? 'माझें तें माझें आणि तुझें तेंही माझें' असें म्हणण्याप्रमाणें हें आहे. निंमे सभासद लोकांनीं निवडावे; त्यांत आणखी वेगळ्या स्वतंत्र जागा काढू नका असें गोखल्यांनी सुचविलें. ही पुच्छप्रगति त्याज्य आहे. मद्रास इलाख्यांत एकोणीस म्युनिसिपालिट्यांत तीन चतुर्थांश सभासद लोकनियुक्त असतांना, मुंबई सरकारने नक्राश्रु कां ढाळावे? येवढी कृपणता कशासाठी? इतर प्रांतांतून लोकनियुक्त सभासदांचे प्रमाण अधिक असतां मुंबई सरकार 'आम्ही म्युनिसिपालिटीच्या कामांत पुढारलेले आहों' अशी आणखी घमेंड मारतें! 'नोटिफाइड एरिया' या कलमामुळे आजूबाजूच्या खेडयांस हक्क न मिळतां पैशाचे ओझें मात्र त्यांच्या डोक्यावर बसेल. म्युनसिपालिटीकडे सोपविलेल्या कामांवर तर गोखल्यांनी चांगलेच तडाखे लगावले. म्युनिसिपालिटीवर कामें सोंपवून सरकार स्वतः मोकळे होऊ पहातें हा खासा न्याय! दुष्कळ आला, म्युनिसिपालिटीने मदत करण्यास पुढे सरकावें; सांथीचे रोग आले, म्युनिसिपालिटीनें कंबर बांधावी; असे म्हणूं लागलें तर जगांतली अत्यंत सधन अशी म्युनिसिपालिटीही मेटाकुटीस येईल. मग हिंदुस्तानांतील आज मरूं, उद्या मरूं असें करणाऱ्या म्युनिसिपालिट्यांची गोष्ट बाजूसच राहिली!' गोखल्यांच्या टीकेचा थोडाफार फायदा झाला आणि हें बिल पास झालें.
 दुसरें अत्यंत महत्त्वाचें बिल म्हणजे 'लँड रेव्हिन्यू कोडाच्या दुरुस्तीचें बिल.' सरकारास हें बिल घाईनें पास करावयाचें होतें. सावकारांपासून रयतेचे रक्षण करीत आहों, अशा बाहण्यानें सरकार मात्र जमिनींचें स्वामी होणार होतें. वाटेल तेव्हां सरकारलाच कबजा घेतां आला असता. सावकारास जमीन गहाण द्यावयाची नाहीं असें यानें ठरणार होतें. लोक या बिलाला फार विरोध करीत होते. लोकांस या बिलाचा विचार करावयास सवड द्या आणि लोकमत काय पडतें तें पहा आणि मग बिलाचें वाचन हाऊं द्या असें फेरोजशहांनी सांगितलें, या सूचनेस गोपाळरावांनी जोरदार भाषण करून संमति दिली. सरकारनें जर आपली सूचना मान्य केली नाहीं तर उठून जावयाचें मेथांनी ठरविलें होतें. गोखले प्रथम विरुद्ध होते, परंतु मेथांप्रमाणेंच त्यांनी करावयाचें. ठरविले. 'तुम्ही स्वतःस योग्य दिसेल तसे वागा' असें मेथांनी त्यांस कळविलें होतें. शेवटी मेथांचेच करणें त्यांस रास्त वाटलें. ठरल्याप्रमाणें ज्या वेळेस मेथांची ही तहकुबची साधी सूचना सुद्धां पास होईना तेव्हां सर भालचंद्र कृष्ण, गोकुळदास परेख, दाजी आबाजी, गोखले यांसह मेथा उठून गेले.
 या बिलाच्या वादविवादप्रसंगी मूर मॅकेंझी या सभासदांनीं एतद्देशीय सभासदांस रयतेची कांहीं माहिती नसते, फक्त सरकारी अधिकाऱ्यांसच असते अशी मुक्ताफळे काढिली. या उत्तरास ठोशास ठोसा देणाऱ्या फेरोजशहांनी चांगलेच खरमरीत उत्तर दिले होते. ते वाचण्यासारखें आहे. मेथांची तडफ व त्यांचा बाणेदारपणा या उत्तरांत मूर्तिमंत दिसतो. तें असे:-
 "An English official moves among the people (natives), isolated even when not unsympathetic, ignorant even when not uninquisitive, a stranger and a foreigner to the end of the chapter. My lord, I can therefore truly say, that it is I and my native colleagues who can claim to speak at first hand, and of our own personal and intuitive knowledge and experience of the feelings and thoughts of the Ryat, his prejudices, his habits of thought, his ways of life, his ambitions and his aspirations. In speaking on this bill, it is we who represent the real views of the agricultural masses, not the insular and isolated English official" पुष्कळ उत्तराउत्तरी झाल्यावर अखेर वर सांगितल्याप्रमाणें कांहीं तेजस्वी लोकप्रतिनिधि उठून गेले. कांही सभासद असे असतात की, कोणतेंही बिल सरकारने पुढे आणले की, 'theirs not to reason why, theirs but to vote and die'. हाच त्यांच मार्ग. परंतु कांहीं मानधन असे असतात कीं, त्यांस सरकारच्या किंवा सरकारच्या प्रत्येक कृत्याचें समर्थन करण्याचें आजन्म व्रत उचललेल्या वर्तमानपत्रांच्या संपादकांच्या स्तुतीची किंवा निंदेची पर्वा नसते, मेथा प्रभृतींच्या कौन्सिलमधून उठून जाण्याच्या कृत्याबद्दल टाइम्सकरांनीं 'नाटकी आविर्भाव' असे शब्द काढले. परंतु येथें नाटक नसून आंतडें जळत आहे याची या परभृतास कोठून कल्पना येणार? मायेवांचून रड नाही म्हणतात तें कांहीं खोटें नव्हे. टाइम्सकारांना जी गोष्ट खेळ वाटते तीतच आमचें मरण होतें. लोकप्रतिनिधींना जेथें बोलण्याची स्वतंत्रतासुद्धां मर्यादित असते तेथें सभेतून उठून जाण्याऐवजी मानाचा मार्ग दुसरा कोणता आहे? आपल्या उठून जाण्यानेंच त्यांस सरकारबद्दल तिरस्कार व स्वतःचा अभिमान दर्शवावयाचा असतो. टाइम्सकरांच्या थट्टेस कोण विचारतो? हा पहिलाच प्रसंग होता कीं ज्या वेळेस लोकप्रतिनीधि उठून गेले. त्यांच्या या बाणेदारपणाची देशांत वाहवा झाली. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यांत आलें. सरकारने मात्र लोकमताला सर्वस्वी धाब्यावर बसवून आपल्यास करावयाचें तें केलें. सत्तेपुढें शहाणपणाचे काय होय?
 हें १९०१ साल गोखल्यांच्या आयुष्यक्रमांत फार महत्त्वाचें वर्ष होय. या वर्षी प्रकृति नीट नसल्यामुळे फेरोजशहा हे आपल्या जागेचा राजीनामा देणार होते, यामुळे वरिष्ठ कायदे कौन्सिलातील त्यांची जागा रिकामी होणार होती. १९०२ पर्यंत त्यांच्या जागेची या वर्षीची मुदत होती. आणि या वर्षीची बैठक समाप्त झाल्यावर त्यांनी राजीनामा द्यावा असे पुष्कळांचे व गोपाळराव गोखल्यांचेही म्हणणें होतें; परंतु मेथांस तें पटले नाहीं. कलकत्त्यास ४।१।१९०१ ला कौन्सिलची बैठक होती. तीस फरोजशहांस हजर राहतां आलें नाहीं. परंतु त्यांनीं हजर राहावें असे गव्हर्नर जनरलचें आग्रहाचें म्हणणें होतें. तेव्हां ९ तारखेस ते कलकत्यास गेलें प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ही कामाची दगदग त्यांस झेपेना, तेव्हां ते जागेचा राजीनामा देऊन मोकळे झाले.
 वरिष्ट कौन्सिलांतील मेथांची जागा भरून काढावयाची होती. मुंबई- कौन्सिलच्या लोकनियुक्त सभासदांनी हा मनुष्य निवडावयाचा असे. गोखल्यांस वाटलें कीं, आपण या जागेसाठी उभे राहावें आणि जर आपली नेमणूक हे प्रतिनिधि करितील तर आपण जास्त उपयुक्त कार्य करून दाखवूं, वरिष्ठ कायदे कौन्सिलांत आपला शिरकाव व्हावा ही गोखल्यांची फार दिवसांची इच्छा. परंतु मेथांसारखा अनुभवी, धोरणी, धीरोदात्त आणि सरकारवर अचूक मारा करणारा वीर तेथें असतां आपण त्या जागेसाठीं उभे राहावें ही कल्पनाही त्यांच्या मनांत नव्हती. कायदे कौन्सिलांत जावयाचें म्हणजे आपली प्रतिष्ठा वाढावी, मानमरातब व्हावा, सरकारी मेजवान्यांस हजर राहतां यावें असें गोपाळरावांस स्वप्नांतही वाटले नसेल, तेथें जावयाचें यासाठींच, कीं जरी सरकारपुढे 'अरण्यरुदन' असले तरी तें करून लोकांचीं गाऱ्हाणीं वेशीवर टांगावयाची; सरकारला स्वकर्तव्याची जाणीव नीट शब्दांत करून द्यावयाची. सरकारच्या हातांत सत्ता असली तरी, लोकपक्षीय प्रतिनिधीनें सरकारचा अधःपात दाखविला म्हणजे उघड्या माथ्यानें तरी सरकारास मिरवितां येणार नाहीं आणि त्याचें मन तरी त्यास खात राहील खास, हाही कांहीं अगदीच टाकाऊ फायदा नव्हे. हें जबाबदारीचे काम मेथांनी आजपर्यंत उत्तम प्रकाराने पार पाडिलें होतें. त्यांची जागा आतां भरून काढावयाची होती. गोखल्यांस वाटलें कीं, आपण या जागेसाठीं उभे राहावें. मनांत खळबळ सुरू झाली आणि त्या भरांत त्यांनीं १५ जानेवारी १९०१ रोजी फेरोजशहांस पत्र लिहिलें. त्यांत ते खालील- प्रमाणे लिहितात:-
 'I was hoping that you would, even if you did not stand for a fresh election at any rate complete your present term which does not expire till the middle of 1902; that during that time I might show some useful work in the local Council so that when you retired, you might consider me as not quite the least deserving among those who are working for public good in this presidency, at a good respectful distance behind you.' - याचा सारांश असा आहे की, 'आपण आपली इच्छा नसली तरी निवडणूक संपेपर्यंत राजीनामा देऊं नये. तोपर्यंत मला प्रांतिक कौंसिलांत कांहीं तरी उपयुक्त कामकाज करून लायकी दाखवितां येईल. म्हणजे मग आपणांस मी अगदीं कच्चा शिष्य आहे असें वाटणार नाहीं.' गोखल्यांनी गेल्या वर्षी प्रांतिक सरकारच्या अंदाजपत्रकावर टीका करितांना दुष्काळांतही दयाळू सरकार कसें दुष्ट असतें हें सांगितले. यंदाही थोड्याच दिवसांनीं त्यांनीं वर सांगितलेल्या जिल्हा म्युनिसिपालिटी बिल आणि लँड रेव्हिन्यु कोडच्या दुरुस्तीचें बिल या दोन्ही प्रसंग चांगलीच कामगिरी बजाविली होती. फेरोजशहांस त्यांची लायकी शितावरून भाताची परीक्षा या नात्यानें करितां आलीच. या जागेसाठीं इब्राहिम रहिमतुल्ला आणि बम्मनजी पेटिट हे वतनदार गृहस्थ उभे राहणार होते; परंतु फेरोजशहांनीं त्यांची मनें वळवून त्यांस तसें न करण्याची विनंति केली, आणि अशा रीतीनें फेरोजशहा, टाइम्सचे संपादक मिस्टर बेनेट वगैरेंच्या सहाय्यानें गोखले हे या जागेसाठीं निवडून आले. ही निवडणूक एप्रिल १९०१ मध्ये झाली. गोखल्यांस समाधान झाले; आणि समाधानाबरोबर त्यांच्यावर जबाबदारीही येऊन पडली.
 वरिष्ट कायदेकौन्सिलांत किंवा प्रांतिक कायदेकौन्सिलांत जाण्यांत सरकारबरोबर जबाबदारपणें झगडून जनसेवा करावयाची हा जरी गोखल्यांचा हेतु असला तरी या हेतूच्या आंत दुसरा एक हेतु होता. मागें आम्हीं सांगितलेच आहे कीं, गोखल्यांस इंग्लंडमध्ये चळवळ करावी, काम करावें असें फार वाटे; परंतु १८९७ च्या प्रसंगामुळे त्यांचें मन दुखावलें होतें. इंग्लंडमध्ये त्यांचे नांव बद्दू झालें होतें आणि जरी त्यांनीं माफी मागितली होती तरी लोक 'हाच तो पूर्वीचा खोट्या कंडया उठविणारा' असे म्हणणार अशी त्यांस भीति वाटे. हा लोकांचा अंदेशा गैरसमज कायमचा जावा आणि आपण एकदां (मनाच्या प्रामाणिकपणें जरी घसरलों नसलो तरी एकंदरीत) घसरलों, पण तेव्हांपासून पुडें आपण जबाबदारपणेंच सरकारवर टीका केली असून सरकारचा व लोकांचा विश्वास संपादन केला आहे हें त्यांस इंग्लंडमधील लोकांस दाखवून त्यांचें मन साफ करावयाचें होतें. यामुळे त्यांस इंग्लंडांत जाऊन काम करता आलें असतें. फेरोजशहासं लिहिलेल्या वरील पत्रांत त्यांनी त्याप्रमाणें लिहिलें आहे, आणि १८९७ पासून आपल्या मनांत कसे कसे विचार घोळत आहेत याचे त्यांनी हृदयास पीळ पडेल अशा रीतीनें वर्णन केलें आहे.
 त्या पत्राचा सारांश असाः— १८९७ च्या वावटळीत माझ्या डोक्यावर तर टीकांचा वर्षाव झाला. परंतु इंग्लंडमधील हाउस ऑफ कॉमन्समध्यें मजविषयीं उच्चारलेले शब्द ज्या रात्रीं मीं वाचले त्या वेळेस तापलेल्या सळईप्रमाणे ते माझ्या अंतःकरणांत घुसले आणि मनाचा आगडोंब उडाला. त्याच वेळेस मी माझ्या मनाशीं अशी खूण गांठ बांधून ठेविली कीं, आपल्या करणीनें ज्या इंग्लंडमधील चळवळीस धक्का बसला आहे, तीच चळवळ सोसायटीमधील आजन्म सेवाव्रताची परिपूर्णता होतांच हातांत घ्यावयाची. या कामासाठीं वरिष्ठ कायदेकौन्सिलांत जर मी गेलो तर बरे होईल. कारण मी इंग्लंडला गेलो असतां माझ्याविरुद्ध काहूर माजेल खरें परंतु लॉर्ड सँढर्स्ट यांचा शब्द, आणि प्रांतिक व वरिष्ठ कौन्सिलांतील माझें सभासदत्व या गोष्टींमुळे हें काहूर आपोआप शमेल. माझ्या कौन्सिलमधील चळवळीने वेडरबर्न, ह्यूम, दादाभाई- ज्यांच्यावर माझ्या कृत्यांमुळे माना खालीं घालण्याचा प्रसंग आला- या सर्वांस आनंद होईल आणि म्हणून हे काम मी करणार आहे.
 या पत्रावरून कौन्सिलमध्ये जाण्याने आपल्या आवडीच्या देशकार्यास आपणास वाहून घेतां यावें हा पवित्र हेतु गोखल्यांच्या मनांत होता हें उघड होतें. आपल्यावरील कलंक नाहींसा होऊन, आपल्या निःपक्षपातपणें व जबाबदारपणें काम करण्याच्या पद्धतीने अँग्लो इंडियन व इंग्लंडमधील लोक यांचा आपल्यावर विश्वास बसेल; आपला शब्द ते शांतपणे ऐकतील; त्याचा विचार करितील; हुटहुट करणार नाहींत असें गोखल्यांस वाटत होतें.
 या पत्रांत दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती ही की, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बंधनांतून पार पडल्यावर आपले शेष आयुष्य देशसेवेत खर्च करावयाचे त्यांनी ठरविलें होतें. या गोष्टीस गोपाळरावांची घरची परिस्थितिही हातभार लाविती झाली. सोसायटीच्या कामाच्या ओझ्याखालीं आणि रानड्यांची शिकवणूक या गोष्टींमुळे त्यांस प्रपंचाकडे फारसें लक्ष देण्यास सवड नसे. त्यांच्या द्वितीय विवाहानंतर ते पुण्यास सहकुटुंब राहात असत हे मागें सांगितलेच आहे. बाहेरच्या व्यापामुळे घरीं मीठमिरचीपासून लक्ष जरी देण्यास त्यांस फावत नसले तरी ते उदासीन नसत. गोखल्यांचें मृदु हृदय ज्यास म्हणून माहीत आहे त्यास असें कधींही वाटणार नाहीं. १८६१ साली त्यांना पहिला मुलगा झाला. परंतु हे फूल जो चिंतेनें खंगलें नाहीं, काळजीनें काळवंडलें नाहीं तोंच काळानें परमेश्वरास नेऊन दिलें. कॉलरिज या प्रतिभावान् कवीनें असल्याच एका प्रसंगावर एकच श्लोक लिहिला आहे परंतु तो किती सुंदर व भावनापूर्ण आहे!

"Ere sin could blight or sorrow fade,
Death came with friendly care;
The opening bud to Heaven conveyed
And bade it blossom there."

 गोखल्यांच्या हृदयास चरका बसला. पुढे १८९३ मध्ये शके १८१५ भाद्रपद शु. प्रतिपदेस त्यांची वडील मुलगी काशीबाई हिचा जन्म झाला. या मुलीबद्दल ते फार काळजी बाळगीत. मूल हिंडते फिरतें होईपर्यंत जास्त जपावें लागतें. खोकला, आंकडी, डबा इत्यादि रोगांना मुले फार बळी पडतात. घरी आले रे आले की मुलगी कशी आहे याची ते चवकशी करावयाचे. सर्व नीट कुशल आहे असें समजलें कीं, त्यांचा जीव खालीं पडावयाचा. परंतु एकदां काशी वर्षांची होत आहे, बोबडे शब्द बोलूं लागून आईबापांस सुखवीत आहे, चालूं लागून दुडदुड धांवून सर्वांस आनंद देणार, तो तिला कठिण दुखणें आलें. तो मुदतीचा ताप होता. घरांतल्या सर्व मंडळीच्या तोंडचें पाणी पळालें. मुलगी हातीं कशी लागते याविषयी सर्व माणसे चिंतातुर झाली. परंतु देवाने खैर केली. ईश्वरानें कठिण प्रसंग येऊ दिला नाहीं. काशीबाई बरी झाली. ती बरी होईपर्यंत गोखल्यांचें चित्त ठिकाणावर नव्हतें. ते क्षणक्षणां माडीवरून खाली यावयाचे, पहावयाचे व सुस्कारा टाकून माघारी जावयाचे पहिले अपत्य गेलेलें आणि दुसऱ्या मुलीवर तोच प्रसंग आलेला. या विचाराने आईबापांच्या हृदयाचें कसें पाणी पाणी होते याची कल्पना इतरांस काय होणार? मुलगी बरी झाल्यावर गोपाळरावांचा आनंद गगनांत मावेना. त्यांची दुसरी मुलगी गोदूबाई ही पहिल्यापासूनच अशक्त होती. ती गोखले निवर्तल्यावर फार दिवस जगली नाहीं. गोखल्यांची आई याच सुमारास म्हणजे ९३-९४ च्या वेळी हा लोक सोडून गेली. या माउलीची पतिनिष्ठा आम्ही प्रथमारंभीं सांगितलीच आहे. तें आपल्या वडिलांचें धोतर गोपाळरावांनींही जपून ठेवले होते. आईविषयीं गोपाळरावांस फारच आदर व भक्ति वाटे. ज्या वाड्यांत आई निवर्तली त्या भाटवडेकरांच्या वाड्यांत गोखले जेव्हां जेव्हां जात, तेव्हां तेव्हां आपल्या आईच्या मृत्यूच्या खोलींत जाऊन ते साष्टांग नमस्कार घालीत. केवढी ही मातृभक्ति! अशी मातृभक्ति अलीकडे किती विवाहित तरुणांमध्ये असते? वडील माणसांबद्दल आदर त्यांच्या मनांत फार असे आणि अलीकडे दुर्मिळ होणारा हा गुण गोपाळरावांमध्ये मरेपर्यंत होता.
 १९०० मध्यें गोपाळरावांचें द्वितीय कुटुंब निवर्तलें. संसारांतील जबरदस्त ओढा नाहींसा झाला. तोडावयास कठिण अशी ग्रंथि आपोआप तुटली. संसारामधील माया आपण सोडूं म्हणतां सोडतां येत नाहीं. समर्थांचे 'चपलपण मनाचें मोडितां मोडवेना! कठिण स्वजन-माया तोडितां तोडवेना" हे शब्द किती सत्य आहेत! गोपाळरावांनीं मेथांस पत्र लिहिलें त्या वेळेस त्यांची पत्नी इहलोक सोडून गेली होती. त्यांचे गुरु रानडे मृत्युशय्येवर होते. अशा प्रसंगी गोपाळरावांच्या मनांत कोणते विचार खेळत होते! गोपालकृष्णाने यशोदेला ज्याप्रमाणें विश्वरूप- दर्शन घडविलें त्याप्रमाणे येथे या गोपाळकृष्णाला रानडे, आगरकर यांच्या सहवासानें विश्व दिसूं लागलें होतें. छोटा संसार डोळ्यांपुढे न येतां देशाचा संसार दिसूं लागला. आपलीच मुलें डोळ्यांसमोर न खेळतां देशांतील अजाण मुलें खेळू लागली. देशासाठीं शेष आयुष्य घालवावें, फकिरी पतकरावी असें ते मनांत म्हणूं लागले. फर्ग्युसन कॉलेजमधील मुदतही संपत आली होती. कॉलेजमधून तीस रुपयांचें पेन्शन मिळणार होतें आणि गणिताच्या पुस्तकाबद्दल त्यांस महिना १००-१२५ रुपये मिळत असत. या पैशावर त्यांचे व कुटुंबांतील मंडळीचे भागणार होतें. तेव्हां तीही कटकट नव्हती. मेथांच्या राजीनाम्यामुळे १८९७ पासून मनांत येणारे विचार बळावले. निःसंगत्वाची त्यांनी तयारी केली आणि लंबकाप्रमाणें आशानिराशांच्या लाटांवर मन हेलकावत असतां त्यांनी फेरोजशहांस पत्र लिहिलें.



वरिष्ठ कायदेकौन्सिलांत प्रवेश.

 पत्राचें काम झालें आणि गोपाळराव हे वरिष्ठ कायदेकौन्सिलांत निवडून आले. १९०२ पासून त्यांच्या वरिष्ठ कायदेकौन्सिलांतील कामास सुरुवात झाली. तें काम आमरण चाललें. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचा संबंध कमी कमी होत गेला. कॉलेजमधील त्यांचे शेवटचें व्याख्यान सप्टेंबर महिन्यांत झाले. विद्यार्थ्यास फार वाईट वाटलें. गोखल्यांस जरी इंग्रजी वगैरे इतर विषय मनोरंजकपणे शिकवितां येत नसले तरी त्यांचीं इतिहास, अर्थशास्त्र यांवरील व्याख्याने फार सरस वठत. इतिहास शिकवितांना ते नेहमीं तुलनात्मक पद्धतीने शिकवावयाचे. आयर्लंड वगैरे देशांची व हिंदुस्तानची तुलना करून त्यांत साम्य किती आहे आणि विरोध कोठें आहे हें अचूक पटवून द्यावयाचे. इंग्लंडच्या इतिहासाचा त्यांस फार अभिमान. आपल्याकडील इतिहास म्हणजे रक्तपात, खून, लुटालूट व आपसांतील भांडणे यांनी येथपासून तेथपर्यंत भरलेला. थोडेफार अपवाद सोडले तर जो तो आपल्या पोळीवर तूप ओढण्यास सवकलेला. लोकांच्या हक्कांचे समर्थन येथे झालेच नाहीं. आपणांस कांहीं हक्क आहेत याची लोकांसही जाणीव नाहीं. परंतु इंग्लंडकडे पहा! आपल्या हक्कांचे समर्थनासाठी हॅम्पडनसारखे लोक पुढे घुसतात; राजाची आहुति पडते. आपले धर्मरक्षण होत नाहीं म्हणून लोक परकी देशांत हजारों मैल लांब जाऊन वसाहत करतात, जंगले तोडतात, नवीन संसार थाटतात आणि मायभूमीनें नवीन नवीन कर बसविले तर 'No representation, no taxation' म्हणजे, 'ना हक्क, ना कर' असा रोख जबाब देऊन जबरी होऊं लागतांच, लष्करी शिक्षण नीट मिळाले नसले तरी सर्व लोक दंड थोपटून 'हा आपला मायदेश आहे' ही कल्पना बाजूस ठेवून, युद्धांस सिद्ध होतात! देवासाठीं नातीगोतीं दूर करावी, तसेंच आपल्या नैसर्गिक आणि रास्त हक्कांची पायमल्ली होत असतां, आपली विनाकारण गळचेपी होत असतां, कोणता स्वाभिमानी पुरुष स्वस्थ बसेल? इंग्लंडच्या इतिहासाचें गोखल्यांनीं फार मनन केलें होतें. त्याचप्रमाणें अर्थ शास्त्रावरही त्यांचा दांडगा व्यासंग, रानडे आणि ग. व्यं. जोशी यांच्याजवळ सर्व प्रश्नांचा त्यांनीं साधकबाधक रीतीनें ऊहापोह केलेला. या सर्व गोष्टींमुळे त्यांची शिकवणूक अधिकारी शिक्षकाप्रमाणें असे. त्यांच्या अस्खलित आणि सुंदर भाषापद्धतीनें मुलांस फार आनंद वाटे. असा योग्य शिक्षक आपल्यामधून जावा याची विद्यार्थ्यांस साहजिक खिन्नता व उद्विग्नता वाटली. परंतु खालच्या पायरीवरून ते वरच्या पायरीवर जात आहेत, हिंदुस्थानच्या कारभाराची दिशा कशी असावी याचें शिक्षण सरकारास देण्याकरितां आपले गुरुजी जात आहेत या विचारानें त्यांस आनंदही झाला. गोखल्यांनी सप्टेंबरमध्ये शेवटचें भाषण करून दोन वर्षांची फर्लो घेतली. १९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनीं त्यांस मानपत्र अर्पण केलें. त्यास उत्तर देतांना गोखल्यांचे गोड व मृदु मन भरून आलें. ज्या शिक्षण संस्थेत आगरकर, टिळक यांच्या थोर उदाहरणामुळें आपण शिरलों, टिळक सोडून गेले असतां आणि पुढे आगरकर, केळकरांसारखे मोहरे अकालीं निवर्तले असतां, जिची धुरा आपणावर घेतली, जिच्यासाठीं नाना कष्ट करून पैसा जमा केला, जिच्यासाठीं पैशानेही न मिळणारी अशीं नवीन विद्वान् माणसें गोळा केली, ज्या शिक्षण-संस्थेची सर्वतोपरी भरभराट व्हावी म्हणून आपल्या आयुष्यांतील ऐन उमेदीचीं, उत्साहाचीं, ज्या वेळेस लाथ मारूं तेथे पाणी काढू असा हिय्या असतो, मान मिळवूं, पैसा कमावूं, लोकांस चकित करूं अशी महत्त्वाकांक्षा असते, अशीं वर्षे निरपेक्षपणे तनमनधन खर्च करून वाहिलीं, जेथें आपले मित्र आणि आपले लाडके शिष्य होते तें सर्व सोडून आज त्यांस जावयाचें होतें. जुने बांधलेलें घर सोडून पुनः नवीन घर बांधण्यास जावयाचें होतें. कॉलेजमधील कामांत विशेष दगदग नव्हती; काळजी नव्हती. विद्यार्थी बरे, आपलीं पुस्तकें बरीं, आपले काम बरें. आतां ते लोकांपुढे जाणार होते. सरकारपुढे छातीवर स्वस्तिकाकार हात ठेवून झगडण्यासाठी ते जाणार होते. स्वतःच्या जबाबदारीचीं त्यांस जाणीव होती. त्यांनी आपल्या भाषणांत तुफान दर्यात होडी लोटणाऱ्या कोळ्याची गोष्ट सांगितली. क्षणांत पर्वतप्राय लाटांच्या 'आ' पसरलेल्या जबडयांत आपण गिळंकृत होणार असें त्यास वाटतें तर दुसऱ्या क्षणीं त्याची होडी लाटांवर, समुद्रांच्या वक्षःस्थलावर मोठ्या डौलानें डुलत असते. आपल्या कामगिरीत यश मिळणार कां अपयश पदरी पडणार या विचाराने त्यांचे मन खालींवर होत होते. परंतु आशानिराशा बाजूस ठेवून यश मिळो वा अपयश येवो; आपलें पवित्र कर्तव्य म्हणून मी जात आहे असे त्यांनी सांगितलें, आणि या जबाबदारीच्या कामांतून या दिव्यांतून ते यशस्वीपणानें अलौकिक यशाने बाहेर पडले. कौन्सिलमध्यें काम करावयाचें, लोकांमध्ये राजकीय चळवळ चालू करावयाची हें काम अत्यंत त्रासाचें आणि जिकिरीचें असतें. लोकांत तर मतामतांचा गलबला माजलेला; धर्माप्रमाणे समाजांतही नाना पंथ बोकाळलेले आणि एकमेकांवर टीका करण्यास अस्तन्या सारून सरसावलेले. 'जो तो बुद्धिच सांगतो', अशी जेथें स्थिति आहे तेथे आपले म्हणणे कितपत ऐकूं जाईल; जेथें सरकारी अधिकारीही कठोर आणि अधिकाराने मगरूर आणि फार शहाणे, तेथे आपण कसे वागले पाहिजे याची गोखल्यांस फार चिंता वाटत होती. परंतु आतां आपल्या मनांतील कार्यास वाहून घेतांना कोणाच्याही टीकेस भीक न घालण्याचे त्यांनी ठरविलें. टीकांचा पाऊस कोसळला, निंदांचा कडकडाट झाला तरी आपले कार्य बरें कीं आपण बरे असे त्यांनी मनांत पक्के ठसविलें. कशाचीही क्षिति न बाळगितां, जो मार्ग आपणांस हितप्रद, व कल्याणकर असा दिसतो आहे, जो आपल्या पूज्य व दूरदृष्टि गुरूनें चोखाळला आणि आपणास व जो पाहील त्यास दाखविला, त्या मार्गानं सदसद्विवेक बुद्धीस अनुसरून, लोभालोभ दूर ठेवून जाण्याचें आणि लोकांस नेण्याचें त्यांनी ठरविलें. स्वतःच्या ध्येयावर एकान्तिक निष्ठा ठेवून, कधीं उल्लसित मनानें तर कधीं पोळलेल्या मनानें, आपले काम १९०२ पासून मरेपर्यंत या थोर पुरुषानें केलें. तो इतिहास फार हृदयंगम- कधीं उद्विग्न करणारा तर कधीं थरारून सोडणारा असा आहे. त्या इतिहासाकडे आतां आपण वळलें पाहिजे, येथें जातां जातां एक गोष्ट सांगावयाची ती ही की, गोखले हे आतां आजपर्यंतच्या आपल्या चळवळींचं स्थान जें पुणें तें सोडून मुंबईस कायमचे रहाण्यास जाणार होते. मेथा वगैरेंचाही आग्रह होता. परंतु पुण्याच्या मित्रांची फार गळ पडली, आणि त्यांस पुणे म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष याच वर्षी निवडल्यामुळे मुंबईस जाण्याचा बेत कायमचा मागें पडला.
 या वेळेस हिंदुस्तानची सूत्रे लॉर्ड कर्झन साहेबांच्या हातांत होती. एका लेखकानें असें म्हटलें आहे कीं, जर लॉर्ड कर्झनमध्ये आहे त्याच्यापेक्षां कमी घमेंड असती तर ते फारच मोठे गृहस्थ झाले असते. मोठेपणाबरोबर थोरपणाही त्यांच्यामध्यें आहे असें जगास दिसलें असतें. हिंदुस्तानच्या व्हाइसरॉयपदावर केव्हां ना केव्हां तरी अधिष्ठित होईन अशी महत्त्वाकांक्षा बालपणापासून त्यांनीं धरिलेली. ती महत्त्वाकांक्षा सफल झाली होती. लहानपणचे मनोहर मनोरे खरोखरच उभारले गेले. कर्झनसाहेबांस धन्य वाटले असेल, तेहतीस कोटि लोकांचा मी अधिकारी, अनेक संस्थानिक माझ्याशी रुंझी घालावयास तयार हा वैभवशाली देखावा पाहून त्यांना आवेश चढला. मोठमोठे बेत त्यांनी केले होते. निरनिराळे बारा सुधारणाप्रकार त्यांनी जाहीर केले होते. हळूहळू ते पोटांतून बाहेर येत होते. आपण म्हणूं तें करूं आणि जे करूं तें शहाणपणाचें, दुसऱ्यास त्यांत सुधारणा सुचविण्याची किंवा ढवळाढवळ करण्याची योग्यता अगर अक्कल मुळींच नाहीं असें त्यांस स्वाभाविक वाटत असे आणि जें कांहीं करावयाचें तें सर्व देशांत व्यवस्था राहावी, घडी उसकटू नये म्हणून अशी त्यांची समजूत होती.
 अशा या अनाठायीं बाणेदारपणा बाळगणाऱ्या गृहस्थासमोर गोखल्यांस जावयाचे होते. कर्झनसाहेबांस 'आजपर्यंतच्या सर्व गव्हर्नर जनरलांमध्ये आपण वयाने लहान' आहों असा अभिमान वाटे. त्यांचें वय फक्त ४३ वर्षांचें होतें! गोखल्यांचे वयही फार नव्हतें. ते ३६ वर्षांचे म्हणजे कर्झनसाहेबांपेक्षां सात वर्षांनी लहान होते. कर्झन साहेबांत तडफदारपणा व तरतरीतपणा होता; आणि गोखल्यांच्या तोंडावरही विद्वत्तेचें तेज चमकत असे, पाणीदारपणा एकवटलेला दिसे. कर्झन अरेराव व ताठेबाज; तर गोखले मनमिळाऊ, नेमस्त परंतु योग्य प्रसंगीं भीड- भाड न ठेवणारे. कर्झनसाहेबांस एतद्देशीय म्हणजे गोऱ्यांच्या पदकमलावार रुंझी घालणारा असे वाटे; तर गोखले हे खरे भारतसेवक, आपल्या देशास समान दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अव्याहत झगडणारे. अशा या दोघां वीरांचा कौन्सिलमध्ये मोठा प्रेक्षणीय संग्राम होई.
 गोखल्यांची वरिष्ठ कौन्सिलांतील सर्वश्रेष्ठ व अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांची अंदाजपत्रकांवरील भाषणें. सरकारचें अंदाजपत्रक वाचण्यांत आलें कीं हा आंकडेबहाद्दर त्या पत्रकावर अशी कांहीं टीका करी कीं, सरकारास तोंड उघडतां येऊ नये. गोखल्यांचे अंदाजपत्रकावरील पहिले भाषण १९०२ मार्चमध्ये झाले. १८९० च्या सुमारास बजेटांत तूट येत असल्यामुळे कांहीं नवीन कर बसविण्यांत आलेले होते. मिठावर कर, प्राप्तीवर कर, जमिनीवरील साऱ्याची वाढ- या सर्व गोष्टी करण्यांत आल्या होत्या. परंतु अलीकडे दोनतीन वर्षे तूट न येतां दरवर्षी भरपूर शिल्लक पडत चालली होती. हिंदुस्तान- सरकार म्हणजे कोठेही न आढळणारें उधळें सरकार. अशा या सरकारजवळसुद्धां शिल्लक राहू लागते हें जगांतील सात आश्चर्याच्या जोडीचें आठवें आश्चर्य होय! हिंदुस्तानची भरभराट होत आहे, देश सधन होत चालला असून माझ्या कारकीर्दीत रामराज्य आहे असें कर्झनसाहेबांनीं सांगण्यास सुरुवात केलीच असेल! परंतु जगांत- प्रजेत काय चालले आहे याची सिमल्यास राहणाऱ्या शंभूस काय कल्पना असणार? लोक पिळवटून चालले आहेत, मिठासारख्या अत्यंत अवश्यक वस्तूवरही जबरदस्त कर बसवावे, सरकारजवळ पैसा उरत असला तरी कराचे ओझें यत्किंचितही कमी होऊ नये! खरोखरच भाग्य आम्हां हिंदुस्तानच्या लोकांचें!! सरकारास हिंदुस्तानांतील लोकांची पर्वाच नाहीं. बेगुमान व बेपर्वा बनून प्रजेला जळवा लावून पैसे उकळावयाचे आणि सिमल्यास देशसंपन्नतेचा नगारा बडवावयाचा! 'क्वचिद्वीणावादः क्वचिदपिच हाहेति रुदितम्' अशांतलीच ही स्थिति. जो पैसा घेण्यांत येतो त्याच्या शतांश तरी रयतेच्या खऱ्या कल्याणासाठीं खर्च करण्यांत येतो काय? शिक्षण, आरोग्य, शेतकी, उद्योगधंद्यास भांडवल- सर्वत्र नकारघंटाच घणघणत आहे. वाहवा रे माबाप सरकार! सरकारचीं जांवई- खाती लष्कर आणि सिव्हिल सरव्हंट यांच्या अवाढव्य खर्चांत किती पैसा गडप झाला तरी खळगा भरतो आहे कोठें? गोखल्यांनी या सर्व गोष्टी प्रमाणें देऊन सिद्ध केल्या. लोकांचे कर कमी झाले पाहिजेत, लोकांस जास्त मोठ्या पगाराच्या जागा देण्यांत आल्या पाहिजेत' शिक्षणाकडे कानाडोळा करूं नये, सरकारने सैन्य कमी करावें आणि जे राहील त्या सैन्याच्या खर्चापैकीं बराचसा बोजा इंग्लंडने सोसावा. १८८५ मध्ये ३०००० सैन्य वाढविलें. कशास तर म्हणे रशियाचा बागुलबोवा आहे म्हणून! रशियाचा बागुलबोवा दूरच राहिला परंतु या आधींच भिऊन गेलेल्या सरकारनें जें नवीन लष्कर ठेवलें त्याचा खर्च चालावा म्हणून मात्र कर वाढविण्यांत येतात! आणि रशियन पिशाच्चाची भीति नाहींशी झाली तरी हिंदुस्तानच्या रयतेच्या छाताडावर नंगा नाच घालणारें हें करांचें भूत- याला मात्र मूठमाती देण्यांत येत नाहीं! केवढी लोककल्याणाची तयारी! यासाठीच आह्मी या सरकारचें ऋणी असावयाचें काय? लोकांनी पोटास चिमोटा घेऊन दिलेले कर लष्करच्या लाडक्या लोकांच्या सुखसोयींसाठी खर्च व्हावे ना? कर्झनसाहेब मोठा उपदेशाचा आव आगून धीरगंभीर वाणीनें सांगतात, 'हिंदुस्तानानें संकुचित राष्ट्राभिमानाची दृष्टि अतःपर टाकून व्यापक साम्राज्याभिमानाची दृष्टि ठेवावी.' हे शब्द बोलतांना कर्झन शुद्धीवर होते कीं नाहीं कोण जाणे? किंवा हिंदुस्तानी लोकांस आपण गव्हर्नर जनरल असल्यामुळे सांगूं तें रुचेल व पटेल असे तरी त्यांस वाटलें असावें. हिंदुस्तानानें साम्राज्याभिमान कशासाठीं बाळगावयाचा? आफ्रिकेंत, कानडांत, आस्ट्रेलियांत सर्वत्र वसाहतींमध्ये हिंदु लोकांच्या होणाऱ्या अनंत यातनांसाठीं तर नव्हे? एतद्देशीय लोक म्हणजे पशुच असें समजण्याची उदारता हें वसाहतवाले दाखवतात म्हणून कीं काय? परंतु लांब कशाला, प्रत्यक्ष हिंदुस्तानांत लोकांच्या डोक्यावर सदैव दंडुका उगारलेला असतो, तेव्हां या परम भाग्यासाठीच आम्हीं साम्राज्याभिमान बाळगावयाचा ना? हिंदुस्तानास दूर अस्पृश्याप्रमाणे वागवीत असतां साम्राज्याचा अभिमान धरण्यास सांगणें म्हणजे दुःखावर डागण्या देणें आहे, जखमेवर मीठ चोळणे आहे. हिंदु लोकांस मन नाहीं, बुद्धि नाहीं, विचार नाहीं, भावना नाहीं, असेंच या कर्झनसाहेबांस वाटले असावें. लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकणे, पांडित्याचें प्रदर्शन करणें, आपण तुमच्यापेक्षां किती वर आहों, किती अप्राप्य आहों हें दाखविणें कर्झनसाहेबांचे पवित्र कर्तव्य असे. गोखल्यांनीं आंकडे देऊन सिद्ध केलें कीं, १३७० (एक हजार रुपयांपेक्षां जास्त पगाराच्या) जागांपैकी फक्त ९२ एतद्देशीय लोकांस देण्यांत आलेल्या आहेत. हा निःपक्षपातपणाचाच प्रकार आहे काय? तरी आमचे कर्झनसाहेब सांगतात 'छेः छेः आमच्या येथें पक्षपात नाहीं. सर्वांस सारखें वागविण्यांत येते. हिंदु लोकांस भरपूर जागा देण्यांत येतात; देण्यांत येत नाहींत असें म्हणणें खोडसाळपणाचें आहे. असे हृदयभेदक प्रकार पाहिले म्हणजे संताप येतो. परंतु सत्तेपुढे शहाणपणा नाहीं. आंकड्यांशी काय करावयाचें? मी सांगतों आहें ना की भरपूर जागा देण्यांत येतात म्हणून? हिंदु लोकांस खरेपणा माहीत आहे कोठें? माझें वाक्य ब्रह्मवाक्य आहे आणि इतर लोक जरी सत्य सत्य असें सांगत असले तरी ती माया आहे! हिंदु लोक म्हणजे खोटे बोलणारे असा एक शेरा त्यांनी दिलाच आहे. परंतु अमृत बझार पत्रिकेने वेळींच कोरियांतील आठवण देऊन त्यांचे दांत त्यांच्याच घशांत घातले हें बरें झालें, गोखल्यांचीं हीं अंदाजपत्रकावरील भाषणे लांब लांब असत. कारण ते म्हणतात "This is the only day in the year when the non-official members of the council find an opportunity to place before Government their views, such as they may be in regard to the more important questions connected with the administration of India." सरकारपुढे राज्यकारभारासंबंधी आपले जे विचार असतील ते मांडण्यास हीच एक वेळ असते यामुळे जेवढे सांगावयाचें असेल तें सर्व या वेळेस गोखले सांगून टाकीत. दरवर्षी सरकारचे तेच तेच दोष न कंटाळतां ते पुनः पुनः दाखवीत. सर्व चुकांचा पाढा पुनः वाचीत. आपण जेव्हां कानीं कपाळीं ओरडूं तेव्हां हैदोस घालणाऱ्या सरकारचे आपल्या म्हणण्याकडे अल्प स्वल्प तरी लक्ष जाईल हें गोखल्यांस पूर्णपणे समजलें होतें. यामुळे ते आपल्या कर्तव्यनिष्ठेत क्षणभरही कसूर करीत नसत. 'शिल्लक पडत चालली, कर कमी करा, लोकांस जास्त जागा द्या, शिक्षणाकडे जास्त खर्च करा, लष्कर कमी करा, शेतकऱ्यांची स्थिति सुधारा हीं सुत्रें मांडून त्यांच्यावर ते नीट व्यवस्थित भाष्य करावयाचे.
 दरवर्षीप्रमाणें १९०३ सालचें अंदाजपत्रकावरील भाषण झालें. परंतु या वर्षी महत्त्वाचे नवीन कायदे पास करावयाचे होते. ४ डिसेंबर १९०३ च्या बैठकीत 'ऑफिशिअल सीक्रेट्स ॲक्ट'वर- सरकारी गुपितांच्या कायद्यावर गोखल्यांनी सणसणीत टीका केली. १८८९ मध्ये हा कायदा सौम्य स्वरूपांत सिमल्यास पास झाला होता, कारण त्या वेळीं तेथें विरोध करण्यासच कोणी नव्हतें. कोणतेच हक्क त्या वेळेस मिळविण्यास लायक कायदेमंडळे नव्हती! हा 'सरकारी गुपितांचा कायदा' एतद्देशीयांसच निंद्य वाटला असे नव्हे तर इंग्लिशमनसारखें गोरें वर्तमानपत्र म्हणते :— "This bill is calculated to Russianize the Indian administration and it is inconceivable that such an enactment can be placed on the statute book even in India." या कायद्यानें हिंदुस्तानांत झारशाही सुरू होणार. कायदे पुस्तकाला या कायद्याचा विटाळही होऊ देऊ नये!' या वर्तमानपत्राचे जर हे शब्द तर आह्मां हिंदुस्तानवासीयांस या कायद्यावर टीका करण्यास कठोर असे शब्द तरी कोठें उरले? गोखल्यांसारख्या धिम्या, व शांत राहणाऱ्या माणसासही या बिलाचा संताप आला.
 The present bill proposes to make alterations of so astounding a nature in that Act (of 1889) that it is difficult to speak of them with that restraint which should characterise all utterances in this Chamber. 'या दिवाणखान्यांत मनास जिभेला जो लगाम घालावा लागतो, तो लगाम ओढून धरणें हें अशक्य झालें आहे' असे शब्द गोखल्यांनी काढले. आजपर्यंत लष्करी आणि आरमारी खात्यांमध्येच फक्त गुप्तपणा असे, आणि असे कायदे सर्वत्र असतात. परंतु दिवाणी खात्यांतही गुप्तता ठेवणें म्हणजे जगाविरहित वागणें होय. सर्व दिवाणी कारभारही लष्करी पद्धतीवर सरकार नेऊं पहात होतें. तालुक्यांतील तलाठ्यापासून तो गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलपर्यंत ज्या प्रश्नांची व्याप्ति असते त्या प्रश्नांसही लष्करी स्वरूप देणें म्हणजे अविचार व वेडेपणा यांचा कळस होय. या कायद्यांत आणखी एक विषारी दांत होता. जर कां सरकारचीं बिंगें वर्तमानपत्रकर्त्यांनी चव्हाट्या वर आणिली तर त्यांस प्रसंगोपात्त शिक्षा करण्याचा अधिकार या बिलानें सरकारास मिळणार होता. हिंदुस्तानांतील वर्तमानपत्रांच्या संपादकांवर या कायद्यानें केवढी आपत्ति कोसळत आहे याचें गोखल्यांनीं वर्णन केलें. इंग्लंडमध्यें सरकार जनहितास बाध घालणारे कोणतेही कृत्य करणार नाहीं असा लोकांस भरंवसा असतो. परंतु हिंदुस्तानसारख्या देशांत असे थोडेंच आहे? परंतु सत्तेपुढे सर्व उपाय हरतात. सरकारच्या कृत्यांस अल्प स्वरूप आळा घालूं पहाणाऱ्या वर्तमानपत्रकर्त्यांस अशा रीतीनें जखडून टाकणें म्हणजे शुद्ध राक्षसी जुलूम होय. वर्तमानपत्रकर्त्यास पकडण्यांत आल्यावर त्यास जामिनावरही खुलें करावयाचें नाहीं! एकदम गिरफदार आणि खटला!!
 गोपाळरावांच्या भाषणानंतर हे बिल नेहमींच्या पद्धतीप्रमाणे एका सिलेक्ट कमिटीकडे सोपविण्यांत आलें. त्यांत फेरफार करून तें पुनः ४ मार्च १९०४ मध्ये मांडण्यांत आले. त्यांतही गोखले, बोस, आणि नवाब सय्यद महंमद यांनी कांहीं महत्त्वाचे फेरफार सुचविले. पण साऱ्या सूचनांस वाटाण्याच्या अक्षता लावण्यांत आल्या. शेवटच्या वाचनासाठी बिल पुनः आलें. गोखल्यांनी परोपरीने सांगितलें कीं 'या बिलाला सर्वप्रांतीय सभासदांचा कसून विरोध आहे. अशा तऱ्हेचें एकमत आजपर्यंत कोणत्याही प्रश्नावर केंद्रीभूत झालें नव्हतें. अशा एकवटलेल्या मताला कःपदार्थ लेखणें म्हणजे अनुदारपणाची व बेपर्वाईची कमाल होय. अँग्लोइंडियन वर्तमानपत्रांनीही या बिलाची दया क्षमा केली नाहीं; त्यांनींही सडकून टीका केली. देशांतील सर्व समंजस व विचारी लोकांच्या विचारास काडीचाही मान न देतां आपलेच म्हणणे रास्त आहे असें समजून त्याचेच समर्थन करावयाचें यास काय म्हणावें तें आम्हांस समजत नाहीं, असें गोखल्यांनी म्हटलें. परंतु सरकारला किती जरी विरोध केला तरी जोपर्यंत कौन्सिलची रचना दोषयुक्त आहे, जोपर्यंत लोकनियुक्त प्रतिनिधींस लोकमत फक्त प्रगट करण्याचीच परवानगी- व तीही मर्यादित- दिलेली आहे तोपर्यंत सरकार सत्तेच्या जोरावर कोणतेही बिल पास करण्यास समर्थ आहे. लोकांस जे फेरफार कल्याणप्रद होतील तेच आम्ही करणार असा गव्हर्नर जनरल किंवा आमचें सरकार आव मात्र घालतें, परंतु प्रत्यक्ष प्रकार मात्र हरघडी विपरीत होतो. हिंदुस्तानच्या लोकांस स्वतःचें हिताहित कळत नाहीं. परमेश्वर सरकारच्या पवित्र व निष्कपट अंतःकरणांत या तेहतीस कोटि रयतेच्या हिताचा मंत्र देतो आणि तो मंत्र प्रजेच्या गळीं बांधावयाचाच! मुलाच्या थोबाडीत मारून जसा बाप त्यास स्वशब्दानुसार वागावयास लावतो तद्वत् आमचें वयस्क सरकार आम्हांसही बोंडल्यानें दूध पिणाऱ्या मुलाप्रमाणेंच समजतें!! याच वर्षी दुसरें एक महत्त्वाचें बिल पुढे आलें. तें म्हणजे युनिव्हर्सिटीच्या पुनर्घटनेसाठी एक कमिटी नेमण्याचें. हा ठराव १९०३ डिसेंबरच्या बैठकीत मांडला गेला. या ठरावाची कहाणी किंवा कुळकथा प्राचीन आहे. १९०० मध्ये कर्झनसाहेबांचे कलकत्त्याच्या युनिव्हर्सिटीत चॅन्सेलर या नात्यानें भाषण झाले. त्यांत त्यांनी अलीकडच्या पदवीधरांवर खूप टीका करून घेतली. असे पदवीधर ज्या विद्यापीठांतून निर्माण होतात त्या विद्यापीठांची पुनर्रचना करावी म्हणजे तीं सरकारच्या ताब्यांत असावी असा सूर त्यांनी काढला. यानंतर सिमल्यास शिक्षणविषयक विचार करण्यासाठी एक कॉन्फरन्स भरविण्यांत आलें. या कान्फरन्समध्ये सर्व सरकारी अधिकारी होते. नाहीं म्हणावयास एक अपवाद होता. मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमधील डॉ. मिलर हे गृहस्थ या कान्फरन्ससाठी निमंत्रित होते. परंतु ते सुद्धां गोरेच! एतद्देशीय लोकांनी खासगी प्रयत्नांनी चालविलेल्या कित्येक संस्था होत्या, परंतु कोणासही आमंत्रण नव्हतें! या कॉन्फरन्समध्ये वाटाघाट होऊन कमिशन नेमावयाचें ठरलें. या कमिशनचे सर थॉमस रॅले हे अध्यक्ष होते. या कमिशनमध्ये एकही एतद्देशीय गृहस्थ नव्हता. फक्त शेवटीं कलकत्त्याचे जज्ज गुरुदास बानर्जी हे नेमण्यांत आले होते. परंतु तेही सरकारचे नोकर. मिशनऱ्यांचे प्रतिनिधि डॉ. मॅकिकन हे होते. या सरकारी कमिशनमधील लोकांच्या नेमणुकीमुळे जनतेंत असमाधान उत्पन्न झालें. आम्हांस कांहीं अक्कल नाहीं काय? आम्ही केवळ कवडीमोल आहों? आमच्या प्रत्येक गोष्टीचा यांनी विचार करावा आणि त्या शिफारशी आमच्या बोडक्यावर ठेवाव्या हें काय? या कमिशनमुळे सरकारच्या मनांत कांहीं तरी काळेबेरें असावें अशी साहजिकच लोकांस शंका आली. या कमिशनला फेरोजशहा आणि चिमणलाल सेटलवाड यांनी लेखी जबाब पाठविले होते. उलट तपासणीतही त्यांनी जे लिहून दिलें होतें तेंच ठणठणीत पुनः सांगितलें. कमिशनचा रिपोर्ट १९०२ जूनमध्ये तयार झाला. या कमिशनच्या बहुतेक सूचना 'फी वाढवावी, परीक्षा पास होण्यासाठी लागणारें गुणकोष्टक वाढवावें, सिंडिकेटची व सीनेटची पुनर्घटना करावी, युनिव्हर्सिटीस जोडण्यांत येणाऱ्या निमसरकारी शाळांसाठी कडक नियम असावे' अशा प्रकारच्या होत्या. म्हणजे एकंदरीत अनेक कुसकट कल्पना व युक्त्या लढवून खासगी शिक्षणसंस्था खच्ची करण्याचा. हा शास्त्रशुद्ध व कायदेशीर प्रयत्न सरकारास करावयाचा होता.
 कमिशनच्या रिपोर्टाची एकेक प्रत प्रांतिक सरकारकडून युनिव्हर्सिटीकडे पाठविण्यांत आली. युनिव्हर्सिट्यांनी या रिपोर्टाचा विचार करण्याकरितां कमिशनें नेमली. मुंबई विद्यापीठाने जी कमिटी नेमिली त्यांत फेरोजशहा होते. त्यांनी सर्वांच्या म्हणण्याची एकवाक्यता केली. कमिटीमधील गोरे सभासदही मेथापक्षास वळले. गोखले या वेळेस कलकत्त्यास होते. मुंबईच्या कमिटीचें एकमत आणि तेंही मेथांप्रमाणें झालें असें जेव्हां त्यांनी ऐकिलें तेव्हां त्यांनीं मेथांस अभिनंदनपर पत्र लिहिलें.
 'That you should have got the European members of the (c)ommittee to join in all your criticisms and proposals, except one, is a remarkable triumph for us all and everybody must recognise that it has been achieved mainly owing to your great tact and influence and your powerful personality. It is felt here that if the Bombay Senate adopt their report as most probably will now be the case- the opposition to the commission's recommendations will be enormously strengthened. They have no hope here of getting their own Senate to condemn the report as ours has done or rather will shortly do and the difference in calibre and political grit between their leaders and ours is therefore at present being freely recognised here. You know how emotional these people are and how easily swayed.' या पत्रांत गोखल्यांनीं त्या वेळच्या बंगालच्या राजकीय पुढाऱ्यांच्या मध्ये व आपल्याकडील पुढाऱ्यांच्या मध्ये असणारा फरक दाखविला आहे आणि बंगाली लोकांच्या भावनाप्रधान स्वभावाचें जातां जातां दिग्दर्शन केलें आहे.
 परंतु अखेर सर्व विरोधांस धाब्यावर बसवून- युनिव्हर्सिटी सुधारणा करण्यासाठी कमिटी नेमण्याचें बिल २ नोव्हेंबर १९०३ मध्ये मांडण्यांत आलें. थॉमस रॅले साहेबांनी 'कोणत्याही संस्थेस असें वाटत नसतें कीं, आपणामध्ये दोष आहेत आणि ते सुधारले पाहिजेत,' ('No corporate body cares to admit that its constitution needs improvement.') असें सांगितलें. सरकार शिक्षणाची खच्ची करीत आहे अशी ओरड करणाऱ्यांवर कर्झनसाहेबांनी तोंडसुख घेतलें. सरकारच्या मनांत लवमात्र पापबुद्धि नाहीं, तुमच्या कल्याणाचे मार्गच तें आंखीत आहे असे त्यांनी सांगितलें. गोपाळरावांनी डिसेंबरच्या बैठकीत या बिलास कसून विरोध केला. मुंबईस मेथांचें जोरदार भाषण झाले. परंतु अरण्यरुदनाला कोण विचारतो? इंग्लिशमन पत्रानें सुद्धां अशी कबुली दिली कीं 'One of the main objects of the proposed reforms was that the direction of University education should thenceforward be under the domination of the Government through such a new constitution as may be established by legislation.' शेवटी १९०४ मध्ये कायदेशीरपणे युनिव्हर्सिट्यांवर नवीन कायदे लादण्यांत आले. युनिव्हर्सिटी सरकारची हस्तक बनली. युनिव्हर्सिटीच्या सीनेटमध्ये आपणांस कोण दिसणार- तर चॅन्सलर, सरकारनियुक्त सभासद, हायकोर्टाचे न्यायाधीश, बिशप, एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलाचे सभासद, शाळा-खात्याचे प्रांतिक अधिकारी व सरकारी आणि मिशनरी विद्यापीठांतील आचार्य लोकांच्या प्रतिनिधीचें नांवही नको!
 १९०४ च्या जुलै महिन्यांत गोखले काँग्रेसचे जॉइंट सेक्रेटरी असल्यामुळें मद्रासच्या बाजूस गेले. मद्रासला त्यांचें जंगी जाहीर स्वागत करण्यांत आलें. मुंबईच्या प्रांतिक कौन्सिलांत दुष्काळग्रस्त लोकांची त्यांनी सांगितलेली कष्टप्रद कथा, म्युनिसिपल कायद्यासंबंधीं त्यांनी केलेले विवेचन, वरिष्ट कायदे कौन्सिलांत सरकारी गुपितांचा कायदा, व युनिव्हर्सिटीसंबंधी कायदा यांच्यावर निर्भीडपणे टीका करून जी लोकपक्षाची सेवा त्यांनी केली होती ती, या सर्व गोष्टी लोकांच्या मनांत ताज्या होत्या. आपल्या हक्कांचे समर्थन करणारा, सरकारच्या कृष्णकारस्थानांतील विष आविष्कृत करणारा हा पुढारी जेव्हां मद्रासी लोकांनीं पाहिला तेव्हां त्यांस आनंदाचे भरते आलें. निरनिराळ्या वर्तमानपत्रकर्त्यांनी त्यांचे त्रोटक चरित्र दिलें. त्यांच्या स्वार्थत्यागाचा, विद्वत्तेचा वगैरे गौरव केला गेला. अँग्लो इंडियन वर्तमानपत्रेही मागें नव्हती. मद्रास टाइम्सनें लिहिलें, 'It is no easy task to stand Ranade's cross examination. Gokhale's contact with Ranade gave him an opportunity to imbibe in a large degree his master's prodigious industry, great breadth of vision, a true sobriety of judgment, a calm sweetness and reasonableness, a temper singularly free from prejudice and personal bias and a sincerity of conviction which those alone who knew him most could realise best.' त्यांच्या अंदाजपत्रकांवरील भाषणांनी तर नवीनच क्रांति घडवून आणली होती. विचारवंत लोकांत त्यांची फार स्तुति झाली. विद्यार्थ्यांनी त्यांस मानपत्रे दिली. निरलसता व निरपेक्षता ज्याच्या ठिकाण एकवटलीं आहेत, त्याचे कोण कौतुक करणार नाहीं? त्याचे गोडवे कोण गाणार नाहीं? सार्वजनिक संस्थांनी त्यांचा सत्कार केला. गोखल्यांच्या बिऱ्हाडीं भेटीस व मुलाखतीस येणाऱ्या गृहस्थांची मारे गर्दी असे, मित्रांनी त्यांस मेजवान्या दिल्या. अशा रीतीनें मुलाखती, संभाषणे यांत काळ चालला असतां मैलापुरास त्यांस एका पवित्र कार्यासाठी आमंत्रण देण्यांत आलें. तेथें रानडे यांच्या स्मारकासाठीं बांधण्यांत येणाऱ्या इमारतीच्या पायाचा दगड बसवावयाचा होता. रानड्यांबद्दलचा गोखल्यांच्या मनांत असणारा भक्तीचा जिव्हाळा जे जे गृहस्थ पहात त्यांस गोखल्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण पाहून मोठे समाधान होई. कृतज्ञतापूर्ण अंतःकरणानें गोखले मैलापुरास गेले, तेथील त्यांचे भाषण फार रसाळ, आणि प्रेमळ असें झालें.
 "He was one of those men who appear, from time to time in different countries and on different occasions, to serve as a light to guide the footsteps of our weak and erring humanity. He was a man with a mission in life- the preacher of a new gospel, one who imparted a new impulse to our thoughts and breathed a new hope into our hearts. A great and a massive intellect, a heart that overflowed with the love of his country, an earnest and dauntless spirit, an infinite capacity for work, patience inexhaustible and an humble faith in the purpose of Providence that nothing shook- and a man so equipped could worthily undertake the task of moulding the thoughts, hopes and aspirations of his countrymen. The grandeur and nobility of his soul impressed itself on all who came in any kind of contact with him; men were afraid to think unworthy thoughts before him; they felt themselves to be in an atmosphere of holiness of love and of service— they felt as though they were in the presence of a being of a higher order. Well, gentlemen, such men are among the chosen instruments of God to work out His beneficent purpose."
 वरील भक्तिपूर्ण उद्गारांवरून रानड्यांकडे गोपाळराव कोणत्या दृष्टीनें पहात असत हें दिसून येईल. या साध्या व सरळ भाषणांत गोखल्यांचें हृदय ओतलें आहे.
 १९०४ च्या बजेटवरील भाषणांत त्या वर्षी लष्कराकरितां वाढविण्यांत येणाऱ्या खर्चावर त्यांनी टीका केली. सेनापतिसाहेबांनी हिंदुस्तानांतील आंग्लपुत्रांना सैन्यांत दाखल होण्यास आग्रहानें सांगितले. परंतु हिंदु लोकांस मात्र मज्जाव? 'May not the government consider the desirability of permitting- aye, inviting-carefully selected classes from among the children of the soil to share in the responsibilities of national defence?' परंतु राष्ट्र दुर्बल करण्याचेंच ज्यांचें व्रत ते सरकारी अधिकारी या गोष्टीकडे लक्ष कसें देणार? सुशिक्षित लोकांस तर लष्कर म्हणजे वावडेंच. लष्करांत घ्यावयाचे झालेच तर ज्यांस देशाची अगर स्वाभिमानाची चाड नाहीं, ज्यांचीं मनें सुसंस्कृत नाहीत अशा, सरकार सांगेल त्याच्यावर गोळी झाडणाऱ्या आडमुठ्या लोकांस, सरकार लष्करांत घेणार.
 १९०४ सालच्या काँग्रेसचे गोखले हे जॉइंट सेक्रेटरी होते. या वर्षीची राष्ट्रीय सभा मद्रासला भरावयाची होती. या सभेत गोखल्यांनी हिंदुस्तानसरकारच्या खजिन्यांत सहा वर्षांत जी तीस कोट रुपये शिल्लक पडली, त्या शिलकेच्या उपयोगासंबंधीं ठराव मांडला, सरकारने लोकांपासून मिळविलेल्या या लुटीवर त्यांनी कौन्सिलमध्ये तर वेळोवेळीं तडाखे दिलेच होते. या पैशांतून निरनिराळ्या शास्त्रांचा सांगोपांग अभ्यास युनिव्हर्सिटीतून व्हावा म्हणून देणग्या द्याव्या असे त्यांनी लॉर्ड कर्झन साहेबांस सुचविलें होते. परंतु कर्झन साहेबांचा कुर्रा कोणास माहीत नाहीं? सरकारच्या ताब्यांत युनिव्हर्सिटी देण्याविरुद्ध जर ओरडतां तर मग सरकारच्या तिजोरीवर तरी लक्ष का असे हे विद्वान् लॉर्ड साहेब उद्गारतात. Lord Curzon said (refering to Gokhale's observation). "Exactly. But will the Hon. member tell me, why? There is plenty of money among his own people. Then why does he not look to them, why does he look to the Government for the money which is needed for instituting University Chairs?" जणूं काय सरकारने गलबते भरभरून कोळशाच्या माहेरघराहून पैसा आणला! लोकांजवळचा पैसा लुटून पुनः त्या पैशाचा उपयोग सरकारच्या नवीन नवीन जांवईखात्यांत करावयाचा आणि शिक्षण, आरोग्य, उद्योगधंदे यांसाठीं भांडवल मागितले तर लोक श्रीमंत आहेत हें उत्तर? दादाभाई, रानडे या सर्वांनीं आंकडेमोड करून जे सिद्ध केलें तें कर्झन साहेबांच्या ब्रह्मवाक्यापुढें कांहींच नाहीं काय? ज्या परिस्थितीत नवीन कायदे केले ती परिस्थिति पालटली तरी कायदे कांहीं चुकत नाहींत. गोपाळराव विचारतात, 'What right has the Government to retain taxation at the level to which it was forced up by successive additions, now that the need for such a high level has passed away?' या व्याख्यानांत गोपाळरावांनी असल्या आर्थिक प्रश्नांवर जबाबदारपणे बोलण्याचा आपणास थोडाफार अधिकार आहे असें सांगितले. या गोष्टींत अभिमान नव्हता तर यथार्थता होती. ते म्हणतात, 'Gentlemen, it was more than sixteen years ago that I first imbibed a love for the study of financial questions at the feet of my great master, Mr. Ranade, and since then, I may claim to have been a fairly close student of Indian finance.' आधींच बेजबाबदारपणें अधिकार गाजविणारे सरकार हातांत पैसा खुळखुळू लागतांच जास्तच बेजबाबदारपणें वागूं लागेल. & This plethora of money at the disposal of the Government makes an irresponsible administration still more irresponsible."
 या शिलकी पैशांमधून वरिष्ठ सरकार प्रांतिक सरकारास उधळपट्टी करावयास मदत करितें, कधीं कधीं शिष्टमंडळे पाठविण्यांत, तर कधीं अवाढव्य लष्करी खर्च वाढविण्यांत या पैशाचा दुरुपयोग होतो.
 "It enables the Viceroy to dispense in the style of a great oriental ruler, special aids to Local Governments out of his own abundance as acts of grace, to send expeditions under the name of political missions into the territories of helpless farmers and priests, to undertake large schemes of Army-reorganisations and to listen to the conceivings of his vast designs playing a great role in the heart of Central Asia." गोपाळरावांस समजत होतें कीं, जसें आपण कौन्सिलमध्यें कांहीं एक उपयोग न होण्यासाठीच बोललों तसेंच राष्ट्रीय सभेच्या ठरावाचेंही होईल. ते शेवटी म्हणतात, 'It may be that our protest will go unheeded ! I, for one, do not think it will. I have a feeling faith that it will produce its effect, if not now on a future occasion. And in any case, whether it is heeded or not— it is better to have protested and borne than not to have protested at all.'
 याच वर्षी गोपाळरावांस कौन्सिलमधील त्यांचे प्रतिस्पर्धी जे कर्झन साहेब त्यांच्याकडून सी. आय. ई. ही पदवी सन्मान पुरस्पर अर्पण करण्यांत आली. ज्याच्यावर १८९७ साली सर्व सरकारी अधिकारी तुटून पडले होते, त्यास त्याच सरकारी नोकरांच्या ह्मोरक्यानें ही सन्मानाची पदवी देणें हें जरा चमत्कारिकच दिसतें. गोखले हे सरकारची हांजी हांजी करीत होते काय? सरकारच्या प्रत्येक कृत्यास पाठिंबा देत होते काय? ते होयबाच होते काय? नाहीं; त्यांस सरकारास विरोध करणारा प्रतिनिधि अशी मानाची पदवी देण्यांत आली होती. 'Leader of his majesty's opposition.' या पदवीवरून ते सरकारला स्तुतिसुमनांजलि समर्पण करण्यांतच सर्वस्व समजत नसत उघड आहे. परंतु सरकारास विरोधासाठी विरोध करणें हें त्यांचें ब्रीद नव्हतें. जेव्हां त्यांस सरकारास विरोध करणारा असे कायदेकानू करणाऱ्या सरकारी सभासदानें संबोधिलें तेव्हां ते जरा रागानेंच म्हणाले: -
 "My Lord, we stand not here as an opposition, we come here as advisers to you, as councillors to you, as critics, and it may be occasionally as checks, but we are never the opposition for the sake of opposing the Government of the country." जरी सरकारास विरोध केला तरी सरकार थोडेंच वठणीवर येणार? सभासद फार तर बडबडणार. सत्ता थोडीच आहे त्यांस? गोपाळरावांनीं सरकारची योग्य तेव्हां सणसणीत कानउघाडणीच केली. चिरोल साहेब म्हणतात, 'He has often been, both in the Viceroy's Legislative Council and in that of his own presidency, a severe and even bitter critic of an alien Government." परंतु गोखल्यांची मुद्देसूद मांडणी, भारपस्तपणा, वगैरे गुणांनी कर्झन साहेबही प्रसन्न झाले, ते स्वतः पदवी देतांना गोखल्यांस लिहितात, 'The honour is offered to you in recognition of your abilities which are freely bestowed upon the service of your countrymen and of which I would ask no more than that they should continue to be so employed. I only wish that India produced more such public men." दुसऱ्यांस सदैव टपका देण्यासाठीच टवकारून बसलेल्या कर्झनकाकांस गोखल्यांमध्ये प्रामाणिकपणा, निरपेक्ष देशसेवा दिसावी हें गोखल्यांचें भाग्यच म्हणावयाचें! त्यांच्या कौन्सिलमधील सूचनांचाही जास्त जास्त विचार करण्यास व अल्प कृतीत आणण्यास सरकारने सुरुवात केली होती. १९०३ सालीं मिठाचा कर दरमण २॥ रुपये होता तो २ रुपये करण्यांत आला. १९०४ सालच्या म्हणजे याच वर्षाच्या बैठकीत, आणखी कमी करा असे त्यांनी सुचविले; परंतु ही गोष्ट १९०५ मध्ये घडून आली. १९०५ मध्ये दरमणी आणखी आठ आणे कमी करण्यांत आले. दुसरा एक कर म्हणजे प्राप्तीवरील. हा प्राप्तीचा कर ५०० रुपये मिळकतीवरही बसत असे. गोपाळरावांनी ही मर्यादा किमान पक्ष १००० ही ठरविली.
 या नवीन म्हणजे १९०५ सालच्या कौन्सिल बैठकीमधील महत्त्वाचें भाषण म्हणजे 'व्हॅलिडेशन ॲक्ट' वरील होय. आपल्या अधिकाऱ्यांची कायदेशीर रीतीनें इभ्रत सांभाळण्यासाठी हें कायद्याचे पिल्लूं निर्माण करण्यांत आलें. १९०४ मध्ये पास केलेल्या युनिव्हर्सिटी ॲक्टला पुस्ती- बळकटी देणारा हा ठराव होता. गोखल्यांनी आपल्या भाषणांत कार्यकारी कौन्सिलपेक्षां कायदेकौन्सिलला जास्त अधिकार असले पाहिजेत असें सांगितले. हिंदुस्तानांत सर्वच नवलाई! जगांत जो कोठें प्रकार नसेल तसला प्रकार येथें आढळावयाचा. एकादा नवीन कायदा करण्याची सरकारास लहर लागली कीं आणा एक बिल कायदे-कौन्सिलांत, सभासदांनी टीका केली तरी तिचे महत्त्व आपणांस माहीतच आहे. कार्यकारी कौन्सिल हें चाकर खरें, परंतु हिंदुस्तानांत हा चाकरच कायदे-कौन्सिलरूपी धन्याचा मालक, हुकुम फर्मावणारा झाला. वास्तविक पाहिलें म्हणजे कायदे-कौन्सिल जे ठराव पास करील त्यांची अंमलबजावणी या कार्यकारी कौन्सिलने करावयाची; परंतु येथें नांवें मात्र अशी आहेत; क्रिया नामानुरूप नाहीं, कार्यकारी कौन्सिलला जरूर भासली कीं, त्यांनी कायदे-कौसिलांत बिल आणण्यास फर्मावावयाचें आणि तें परिस्थितीला योग्य असें समजून सदैव पास व्हावयाचेंच. खरोखर ही परिस्थिति फार वाईट. परंतु करणार काय? गोखले म्हणतात,
 'My Lord, in all civilized countries there is a well- understood and well-defined distinction between the Legislature and the Executive Government and the Legislative is regarded as higher than the Executive. In India unfortunately this distinction for the most part is of only a nominal character; for, with the present constitution of the Councils the Executive Government can get what law they please passed by the Legislative without the slightest difficulty. I submit, however, that it is not desirable, it is not wise, that this fact should be forced on the attention of the public in so unpleasant a manner as on this occasion and I think the distinction becomes a farce if our legislature is to be thus at the back and call of the Executive Government and if it is to be called upon to exercise its powers of legislation to remedy defects not in existing laws, but in executive action taken under those laws."
 गोखल्यांना या कौन्सिलांना फार्स म्हणावे लागले यांतच या कौन्सिलांची रचना कशी आहे तें दिसतें. सरकार नाटक मात्र नीट करून दाखविते. ठराव आणावयाचा; गंभीरपणाचा भाव दाखवावयाचा; परिस्थितीचें भेसूर चित्र रेखाटावयाचे; लोकांचें कल्याण आहे हा मंत्र त्यांत असावयाचा आणि हें सर्व 'शांतिः शांतिः शांतिः' साठीं आहे असें म्हणून कायदा पास करून टाकावयाचा. सरकारचें नाटक गोखल्यांच्या वरील भाषणावरून त्यांस समजत असे असें दिसतें. पुनः पुनः सरकारास- मंद प्रकृतीच्या सरकारास जागे करण्यासाठीं कानीं कपाळीं ओरडावयाचें. परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्यापुढे ओरडून काय होणार! त्यास चिमटे घेतले पाहिजेत, असें म्हणणारा नवीन राष्ट्रीय पक्ष हिंदुस्तानांत पुढे येत होता.
 १९०५ साल म्हणजे गोखल्यांवर कामाचा डोंगर पाडणारें वर्ष होय. कौन्सिलच्या बैठकीचें दरवर्षाचें काम त्यांना करावे लागलेच, परंतु त्याबरोबर कित्येक नवीन कामें उत्पन्न झालीं होतीं. या वर्षी त्यांस पुणे म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष निवडण्यांत आलें. तेथेही त्यांनीं पुष्कळ सुधारणा केल्या. इंग्लंडांत चालू असलेलें जें इंडिया पत्र त्याला हिंदुस्तानांत वर्गणीदार मिळवून देण्याचे काम त्यांनीं आपल्या शिरावर घेतलें होते. रानडे यांच्या स्मारकासाठीं फंड गोळा करावयाचा होता. याच सुमारास म्हणजे १२ जून १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाज स्थापन केला. या समाजाचे जे पहिले सभासद होणार होते त्यांचा शपथविधि या दिवशीं झाला. या समाजाची घटना कशी असावी, कायदे, नियम कोणते असावे याची वाटाघाट पुढे दोन वर्षांनी करण्यांत आली. सध्यां मनांत जी कल्पना घोळत होती तिला त्यांनी थोडे मूर्त स्वरूप देण्याचा उपक्रम केला. परंतु या सर्व कामांपेक्षां एक जास्त जबाबदारीचें काम त्यांच्यावर सोपविण्यांत आलें. तें म्हणजे इंग्लंडमध्ये शिष्टमंडळांत जावयाचें.

बंगालची फाळणी व गोखल्यांची
विलायतेतील शिष्टाई.

 १९०४ सालच्या काँग्रेसच्या वेळीं वेडरबर्न साहेबांनी मोठ्या कळकळीनें सांगितलें होतें कीं, प्रत्येक प्रांतानें दोन दोन प्रतिनिधि किंवा एकेक तरी इंग्लंडमध्यें हिंदुस्तानची बाजू मांडण्यासाठी पाठवावा. १९०५ साल उजाडलें आणि हिंदुस्तानांतही नवीन युग निर्माण झालें. या नवीन युगाचें- नवीन क्रांतीचें सम्यक् स्वरूप लक्षांत येण्यासाठीं आपण जरा आजूबाजूसही पाहिलें पाहिजे.
 आशियांतील राष्ट्रांसंबंधी एकोणिसाव्या शतकांत युरोपांतील राष्ट्रांची अशी समजूत झाली होती की, आशियांतील राष्ट्रे म्हणजे निर्माल्यवत्. त्यांच्यावर गोऱ्या लोकांचेंच स्वामित्व राहणार. गोऱ्या राष्ट्रांची इभ्रत, त्यांचे शास्त्रीय ज्ञान, त्यांचे व्यापारांतील प्रभुत्व आणि या प्रभुत्वामुळें प्राप्त झालेली संपत्ति, या सर्व समन्वयामुळे युरोपांतील राष्ट्रांस स्वर्ग चार बोटें राहिला होता. मुसलमान लोकांच्या पूर्वीच्या स्वाऱ्यांचा युरोपांतील उन्मत्त राष्ट्रांस आतां विसर पडला होता. परंतु अशा वेळी त्यांच्या डोळ्यांत चरचरीत अंजन पडलें. आशियांतील ईशान्य दिशेस असणाऱ्या चिमुकल्या जपाननें आवाढव्य रशियाचा पराजय केला. त्याचे आरमार रसातळास नेलें. अलौकिक शौर्य, लोकोत्तर धैर्य, प्रचंड व अतुल स्वार्थत्याग, शास्त्रीय ज्ञान आणि विजय मिळविल्यानंतरही केलेले कौतुकास्पद व आदरणीय वर्तन यामुळें जपानकडे सर्व राष्ट्रांचे डोळे वळले. युरोपांतील पहिल्या प्रतीच्या राष्ट्रांत त्याचा समावेश झाला. बरोबरीचे तह करण्यासाठीं अहमहमिका सुरू झाली. युरोपांतील मदोन्मत्त हत्तीचा या सिंहाच्या छाव्यानें मद हरण केला. जपानची इभ्रत वाढली; आणि त्याबरोबरच आशियांतील राष्ट्रांचीही वाढली. आपण प्रयत्न करूं तर युरोपांतील राष्ट्रांची बरोबरीचशी काय परंतु त्यांच्यावरही ताण करून त्यांचा नूर उतरूं अशी धमक या विजयानें आशियांतील लोकांच्या मनांत उत्पन्न केली. आपणही माणसे आहों, थोरामोठ्यांचे वंशज आहों, मनांत आणूं, हातपाय हलवूं तर पाश्चात्यांस टक्कर देण्यास कमी पडणार नाहीं हा स्वाभिमान जागृत होऊं लागला. तुर्कस्तान, चीन, इराण या देशांत क्रांत्या घडून येऊ लागल्या. राष्ट्रीय पक्ष पुढे येत चालले; तरुणांचें रक्त सळसळूं लागले; स्वातंत्र्यवृत्तीचे वारे लोकांत, आशियांतील जगांत खेळूं लागलें. या चळवळींचा परिणाम हिंदुस्तानावरही झाल्याविना कसा राहील? मोर्ले साहेबांनी या वेळच्या परिस्थितीचें वर्णन केलें आहे तें पहा:-
 "It was among the students in parts of India that unrest especially prevailed. That class was rapidly being drawn into something like a spirit of revolt against the British Government, and the movement was unmistakably coming to a head, notably in Upper India. A feeling gained ground that the last twenty years had been a period of reaction, and in combative response the idea of complete independence of England began to appeal to youthful imagination This marked the line of cleavage between moderates and extremists in the native party of reform. It was no question of the terrible military mutiny of half a century ago repeating itself, the danger arose from a mutiny, not of sepoys about greased cartridges, but of educated men armed with modern ideas supplied from the noblest arsenals and proudest trophies of English literature and English oratory. Official persons of high station and responsibility assured the new Viceroy that the political change within the last dozen years was enormous, and though the mass of the people remained ignorant and unmoved, it would be a fatal mistake to suppose that the change was confined to the preachings of political agitators. The fairly educated Indians were thoroughly dissatisfied with the old order of things. The victories of Japan, the revolutionary movements in Turkey, China, Persia, did not pass unobserved. A new and ominous suspicion that England had come to a stop in her liberating mission made way."
 मोर्ले साहेबांची घमेंड पहा. ते म्हणतात कीं, इंग्लंड स्वातंत्र्यदानाच्या व्रतापासून च्युत होत चाललें असें हिंदुस्तानांतील लोकांस वाटू लागलें आहे. जणूं अद्यापपावेतों इंग्लंड आपलें व्रत चालवीतच होते! कॉलरिज या कवीनें १०० वर्षापूर्वी म्हटले आहे:-

"We have offended, oh! my countrymen!
We have offended very grievously,
And been most tyrannous. From east to west
A groan of accusation pierces Heaven!
The wretched plead against us, multitudes
Countless and vehement, the sons of God,
Our brethren like a cloud that travels on,

Steamed up from Cairo's Swamps of pestilence
Even so, my countrymen! have we gone forth
And borne to distant tribes slavery and pangs
And, deadlier far, our vices, whose deep taint
With slow perdition murders the whole man,
His body and his soul!"

 खरोखरच या इंग्लंडने आमचें शरीर आणि शरीरांत वास्तव्य करणारा मानस-हंस यांस कायमचें पंगू केलें आहे. या राष्ट्राने इतरांच्या स्वातंत्र्याचे कैवारी असे स्वतःस म्हणवून घेणें म्हणजे रावणाप्रमाणें आपल्याच हातानें 'शाबास माझी धृति' अशी पाठ थोपटून घेण्यासारखें आहे. नुकत्याच झालेल्या महायुद्धांत चिमुकल्या बेल्जमच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंड युद्धांत पडलें! काय पण शब्द! महात्मा गांधींनी तर स्पष्टच सांगितलें कीं, जर्मनी जितका दोषी तितकेच इंग्लंडही दोषी आहे. एडवर्ड कार्पेटरने हीच गोष्ट सिद्ध केली आहे. हॅरिसन या ग्रंथकाराने आपल्या नॅशनल प्रॉब्लेम्स या प्रकरणांतील लेखांत इंग्लंडच्या गेल्या शतकांतील धोरणावर हीच टीका केली आहे. तो 'Empire and Humanity' या निबंधांत स्पष्ट लिहितो. 'What race, which hemisphere, what latitude, has not seen the unsheathed sword of Britain?' आणि खरोखर, हेंच ब्रिटनचे यथार्थ वर्णन आहे. इतर राष्ट्रांतील चळवळी पाहून आणि स्वतःच्या देशांतील धांगडधिंगा पाहून नवीन सुशिक्षित लोकांस निराशा वाटू लागली. हिंदुस्तानांतील पैशानें अवाढव्य खर्चाची युद्धे उत्पन्न करावी हें इंग्लंडचें धोरण! अफगाण युद्धावर टीका करितांना हॅरिसन म्हणतो, "War wanton and cruel presents to our eyes the element of evil that it must throw back the task of administering our Indian Empire. A war which to every circumstance of injustice, bad faith and barbarity, adds the crushing load of exaction wrung from 200 millions of our fellow-subjects." व अशा लढायांत होणारा अवाढव्य खर्च हिंदुस्तानच्या बोडक्यावर! याशिवाय बढ्या अंमलदारांचे पगार व अत्यंत अप मानास्पद कायदे!! राज्यकारभारांत तर भाग नाहींच इंग्लंडने शंभर वर्षे राज्य केलें तरी हिंदुस्तानचें पाऊल पुढे पडत नाहीं; परंतु तेंच जपान पहा! पन्नास वर्षांत त्यानें युरोपांतील राष्ट्रांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा मान मिळविला. इंग्लंड बोलून चालून परकी. स्वतःच्या रंगाचे आयरिश लोकांस जर तर वगळतें तर हिंदुस्तान हें बोलून चालून काळ्यांचें राष्ट्र. आजपर्यंत शेंकडों अर्ज विनंत्या केल्या त्याचा यत्किंचितही परिणाम या कठोर सरकारावर झाला नाहीं. राणीच्या जाहीरनाम्यास आतां अशक्य सनद ठरवून टाकण्यांत आलें. जळफळणाऱ्या लोकांना तात्काळ शमविण्यासाठीं तो वरपांगी उपाय होता. कर्झनच्या कारकिर्दीत तर जास्तच दडपशाही माजली. सरकारी अंमलाची तांत गळ्याभोवती जास्तच घट्ट बसली. हिंदुस्तानांतील लोकांस एक बडी जागा देणें म्हणजे गोऱ्याची एक जागा कमी करणें नव्हे काय? आपल्या अंमलदारांस, इंजिनिअरांस, डॉक्टरांस, प्रोफेसरांस भरपूर पगाराच्या जागा देण्यासाठीच सरकारची सर्व चळवळ असावी असें लोकांस वाटू लागलें. इजिप्तमध्ये सुद्धां असाच धिंगाणा परोपकाराच्या पवित्र नांवाखालीं इंग्लंडने घातला. आपण चळवळ केली पाहिजे, ऐक्य-वृद्धि केली पाहिजे, ही जाणीव लोकांस प्रखरतेनें भासूं लागली. विशेषतः बंगालमध्ये ऐक्य जास्त सहजसाध्य होते. बंगालच्या मध्यभागी सर्व बंगाली लोकांची जूट होती. हे लोक सुशिक्षित, विद्वान, भावनाप्रधान असत. त्यांच्यामध्ये जोमदार माणसें पुढें येऊ लागलीं. उत्तम वर्तमानपत्रे निघू लागली. सरकारला हे लोकांमधील वाढतें ऐक्य पाहवेना. बंगालची फाळणी करण्याचें कर्झन साहेबांच्या मनांत आलें. बंगाल प्रांत फार मोठा आहे. तेव्हां त्याचा राज्यकारभार सुरळीत चालवावयासाठी आम्ही त्याचीं दोन छकलें करतों असें गव्हर्नर जनरलनें जाहीर केलें, राज्यकारभार नीट होत नसेल तर तो गव्हर्नरच्या हाताखालीं इलाखा करा असें सर हेन्री कॉटन यांनी सुचविलें. परंतु लोकांचें तुकडे पाडण्याचा ज्याचा उद्देश त्यास हें कसें पटणार? त्याशिवाय गव्हर्नर हा इंग्लंडमधून नेमला जातो; लेफ्टनंट गव्हर्नर तर गव्हर्नर जनरलचा अधिकारी असतो. तोच त्याची नेमणूक करतो. यामुळें गव्हर्नर नेमण्याची बुद्धि कर्झनास पटेना, प्रथम जेव्हां कर्झन साहेबांनी आपला हेतु जाहीर केला तेव्हां बंगालचा फक्त एक कातळाच काढावा. असें त्यांच्या मनांत होतें. लोकांनीं त्या वेळेस फार गिल्ला केला, सभा भरविल्या. यामुळें कांहीं दिवस सर्वत्र सामसूम होतें. सरकारने फाळणीचा प्रश्न सोडून दिला असें लोकांस वाटलें. पण आंत खलबतें चालली होतीं. पडद्याआड कारस्थानें जोरांत सुरू होतीं. आणि १९०५ च्या आगस्ट महिन्यांत फाळणीची योजना जाहीर करण्यांत आली. लोकांनी ही योजना लुप्त व्हावी म्हणून आकाश पाताळ एक केलें. पूर्वीच्या कातळ्याऐवजीं आतां बंगालचा निम्मा तुकडाच काढण्याचें सरकारनें ठरविलें, सिव्हिल सर्व्हंटांची पोळी पिकणार होती यामुळे त्यांनी या योजनेस मोठ्या आनंदानें संमति दिली. सिव्हिल सर्व्हंटांचे मत विचारलें, परंतु बंगालमधील ज्या जमीनदारांस गोडगोड थापा देऊन सरकारने वेळोवेळी मदत घेतली होती त्या जमीनदारांस या प्रसंगी सरकारनें विचारलें होतें कां? गरज सरो आणि वैद्य मरो. हा विभागणी कायदा रद्द व्हावा म्हणून पांचशेंवर सभा भरल्या. लोकांचीं मनें दुखवूं नका; जनमताला कस्पटासमान लेखणें अंती हितपरिणामक व्हावयाचें नाहीं. असे जबाबदार पुढाऱ्यांनीं पुनः पुनः बजाविलें. येवढेच काय परंतु ज्या फुल्लर साहेबांनी पुढे लोकांवर गहजब केला ते फुल्लर साहेब या विभागणीच्या विरुद्ध होतें. साठ हजार लोकांच्या सह्यांचा अर्ज हाउस ऑफ कामन्सकडे करण्यांत आला. पार्लमेंटमध्ये कांहीं प्रश्नोत्तरे झाली. परंतु शेवटीं काय? कर्झनसाहेबांनी आपलेच खरें केलें! पार्लमेंटच्या शेवटच्या निकालाशिवाय ही योजना अंमलात येणार नाहीं असें दुखावलेल्या लोकांच्या मनास वाटत होतें. निराश होऊनही ते आशा करीत होते. परंतु '१६ आक्टोबर १९०५ पासून हा कायदा, ही विभागणी अंमलांत आणिली जाईल' असें सप्टेंबरमध्ये जाहीर झालें. सरकारचा सर्व लोकांस संताप आला. सर्व मतांचे बंगाली लोक एक झाले. राष्ट्रीय वृत्ति वावरू लागली. हें बोलून चालून परकी सरकार! त्यास आमची काळजी कशी असणार? तेव्हां सरकारवर बहिष्कार घालण्याचें ठरलें, ब्रिटिश मालावर बहिष्कार घालण्याचें अमलांत येऊ लागलें. राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा निघूं लागल्या. तरुण लोक सामर्थ्य कमावूं लागले! लाठीचे खेळ सुरू झाले!! नवचैतन्याचा उदय झाला!!! सर्व देशांतील लोकांची मनें एकवटलीं हा कर्झन साहेबांनी आमच्या राष्ट्रावर एक गुप्त उपकारच केला.
 १९०४ मध्ये ठरल्याप्रमाणें प्रत्येक प्रांतानें आपआपले प्रतिनिधि चळवळीसाठी इंग्लंडांत पाठवावयाचे ठरलें होतें. कर्झन साहेबांच्या दुष्ट कृत्यांची व त्या कृत्यांचा कळस जो फाळणीचा कायदा त्याची विलायतेतील लोकांस नीट कल्पना देण्यासाठीं शिष्टमंडळ पाठविणें अधिकच जरूर झालें. ब्रिटिश मालावर बहिष्कार का घालण्यांत येत आहे, त्यांत सुडाची भावना नसून इंग्लंडला जागे करण्याचा हा एक उपाय आहे हें विलायतेंतील जनतेस- मजुरांच्या समुदायांस पटवून देणें अगत्याचें होतें. ३ मे, १९०५ रोजी मुंबईस जाहीर सभा भरून मुंबई इलाख्यातर्फे गोखल्यांस विलायतेस पाठविण्याचे ठरले. तेव्हां गोपाळराव हिंदुस्तानांतील काम बाजूस ठेवून विलायतेस चालले. विलायतेस त्यांच्याविरुद्ध उठलेलें काहूर आतां शमलें होतें. प्रत्यक्ष गव्हर्नर जनरलनें त्यांस गतवर्षी सी. आय. ई. ही बहुमानाची पदवी स्वदस्तुरचें पत्र लिहून दिली होती. तेव्हां त्यांच्या सद्धेतूविषयीं त्यांच्या प्रामाणिकपणाविषयीं व सत्य स्पष्टोक्तीविषयीं विलायतेंतील लोकांस अंदेशा बाळगिण्याचे कारण नव्हतें. आपणास विलायतेंत समाधानकारक व जबाबदारपणें काम करितां यावें याच एका हेतूनें गोखल्यांनी ही पदवी स्वीकारली होती. कौन्सिलांतील सर्व श्रेष्ठ असा लोकप्रतिनिधि विलायतेस जात होता. ज्याच्या सणसणीत परंतु रास्त टीकेनें कर्झनसाहेबांस संताप न येतां प्रसन्न केलें, असा नेमस्त परंतु योग्य ती खरडपट्टी काढण्यास न भिणारा लोकनायक आतां इंग्लंडला जात होता. त्यांच्या शब्दाला इंग्लंडांत मान मिळेल; त्यांचें तेथें वजन पडेल अशी आतां सर्वांची व स्वतः गोखल्यांचीही खात्री होती. आणि म्हणूनच ते आपल्या दुःखी देशाची दीन कहाणी विलायतेंतील निरनिराळ्या लोकांस ऐकविण्याकरितां निघून गेले.
 इंग्लंडांत गोखले गेले ते मोठ्या योग्य वेळीं गेले. इंग्लंडमध्यें नवीन निवडणुकी व्हावयाच्या होत्या. जुनें मंत्रिमंडळ जाऊन नवीन उदार-मताचें मंत्रिमंडळ अधिकारारूढ होणार होतें. बाल्फोर साहेबांच्या प्रतिगामी मंत्रिमंडळाची फार नाचक्की झाली होती. नवीन निवडणुकीनें उदारमतवाल्यांचें फारच मताधिक्य झालें होतें. अशा वेळीं हिंदुस्तानांतलीं दुःखेंही समर्पक व हृदयस्पर्शी भाषेत सांगणे फार हिताचें होतें.
 गोखल्यांनीं इंग्लंडमध्यें अविश्रांत चळवळ केली. हिंदुस्तानांतील साग्र हकीकत त्यांनी करुण रवानें गाइली. मँचेस्टर येथे ६ आक्टोबर १९०४ रोजी त्यांनीं हिंदुस्तानांतील असंतोष या विषयावर सुंदर व्याख्यान दिलें. हें व्याख्यान व्यापाराची मोठी पेठ जी मँचेस्टर तेथें होतें! मँचेस्टर आणि लिव्हरपूल यांस हिंदुस्तान म्हणजे बाजारपेठ, हिंदुस्तान त्यांच्या पोटास देत होता. परंतु हिंदुस्तानांत आतां या मालावर बहिष्कार पुकारण्यांत आला होता. गोखल्यांस त्यांचे मित्र सांगत होते कीं, तुम्ही तेथे व्याख्यान देण्यास जाऊं नका. तेथील लोकांची मनें हिंदुस्तानाविरुद्ध क्षुब्ध झाली आहेत. परंतु गोपाळारावांस कर्तव्य करावयाचें होतें, सर्वांची सहानुभूति त्यांस मिळावावयाची होती. त्यांनी बंगालची फाळणी करण्यांतील धोरण येथे उघड केलें. बंगाली लोक एके ठिकाणी असल्यामुळे त्यांचे सर्व देशांत व त्या प्रांतांत फार वर्चस्व आहे. बंगाली लोकांमधील ऐक्यवृत्ति, व त्यांच्या वाढत्या राष्ट्रीय आकांक्षा चिरडण्यासाठीं, बंगाली लोकांची संख्या दोन निरनिराळ्या प्रांतांत विभागून त्यांचें प्रत्येक प्रांतांत संख्याबल व त्यामुळे मतबल कमी करणें हा सरकारचा हेतु होता. बंगाली लोक हाडाचे गरीब, ते बुद्धीनें कोणास माघार न जाणारे, देशप्रेमाने ओथंबलेले. सरकारचे कृष्णकारस्थान कळतांच त्यांचे उघडूं लागणारे डोळे साफ उघडले. त्यांस त्वेष आला. आम्हां लोकांस या सरकारने एकाद्या किड्यामुंगीप्रमाणे मानून चिरडावें याची त्यांस चीड आली. स्वतःमधील दैन्य, स्वतःमधील दुर्बलता नाहींशी करण्याचा त्यांनी चंग बांधला. इंग्लंडमधील लोकही आपल्या न्याय्य आकांक्षा परिपूर्ण करण्यास पुढे येत नाहींत. त्यांनी पुढे यावें म्हणून बंगाली लोकांनी ब्रिटिश मालावर बहिष्कार पुकारला. या गोष्टीमुळे मँचेस्टर वगैरे शहरांतील लोकांस आम्हांस रागच आणावयाचा होता. गोखले सांगतात.-
 'I am not sorry that you are angry, because I want you to be angry, but I want you to turn your anger not against the helpless people who have been driven to the last possible measure that they could take in an extremity, but against those officials of yours who are responsible for the unhappy situation that has been brought about.'
 कर्झन साहेबांच्या एकंदर धोरणाचे त्यांनी खालील वाक्यांत यथार्थ स्वरूप दाखविलें आहे. 'Let us cripple them once and all, so that they shall be incapable ever of rising.' सरकार संशयपिशाच्चानें कसें भारलें गेलें आहे, हिंदुस्तानांतील लोक आज राजनिष्ठ दिसले तरी पुढें मांगें कदाचित् ते अराजनिष्ट होतील या भीतीनें त्यांस आतांच तारेच्या कुंपणांत अडकवून टाकणें बरें ही सरकारची सैतानी व सुलतानी वृत्ति कशी उघड होते याचे गोखल्यांनीं यथार्थ वर्णन केलें. मुलगा मोठा झाल्यावर आपणास नीट वागविणार नाहीं या भीतीने लहानपणींच मुलाचे हातपाय कापून टाकण्यासारखें हें सरकारचें कृत्य आहे. परंतु या कृत्यानें लोक पुढे अराजनिष्ठ होण्याच्या ऐवजीं आजच असंतोषाने धुमसू लागतील. पुढे मुलानें आपणास चांगले वागवावें अशी बापाची इच्छा असेल तर बापानें त्या मुलाचें खरें कल्याण केलें पाहिजे. त्याला उत्तम शिक्षण दिलें पाहिजे. त्यास पोटास मिळविण्यास शिकविलें पाहिजे. त्याप्रमाणेंच सरकारनेही, जर प्रजेची निष्ठा सरकारास पाहिजे असेल तर, प्रजेस सुशिक्षित केलें पाहिजे, तिचें खरें खरें कल्याण केलें पाहिजे, पोटापाण्यास प्रजेस मिळतें कीं नाहीं आणि पुढे मिळेल कीं नाहीं इकडे लक्ष पुरविलें पाहिजे. तरच प्रजा दुवा देते. सरकारची विश्वासवृत्ति डळमळली आहे; तरी वेळींच सावध होऊन हिंदुस्तानांतील चालत आलेल्या कारभारास योग्य अशी कलाटणी द्या असे गोखल्यांनीं सर्वत्र सुचविलें. त्यांनीं जेथें जेथें व्याख्यानें दिली तेथें तेथें त्यांनीं हिंदुस्तानचा चित्रपट मोठा हृदयद्रावक रंगविला. कर्झन साहेबांची कारकीर्द म्हणजे व्याख्यानाला विषयांची तूट नाहीच, परंतु त्याशिवायही हिंदुस्तानांतील वाढतें दारिद्र्य, शेतकऱ्यांची कंगाल स्थिति, वारंवार पडणारे दुष्काळ, अज्ञानांधकारांत लोळणाऱ्या शेकडा नव्याणव अगर- जास्तच- लोकांस नोकरींत मज्जाव, या सर्व वृत्तांतानें त्यांनी श्रोत्यांची मनें थरारून सोडली. आक्टोबर ९ रोजी त्यांनी लंडनमध्ये 'हिंदूंच्या दृष्टीनें हिंदुस्तानचा कारभार' या विषयावर व्याख्यान दिलें. या व्याख्यानांत हिंदुस्तानांतील सध्यां बेजबाबदारपणे चालणाऱ्या पद्धतीचें वर्णन करून लष्कराकडे होणारा अपरंपार खर्च शिक्षणाकडे, उद्योगधंद्याकडे खर्च केला तर किती चांगले होईल याचें त्यांनीं चित्र काढले. हिंदुस्तानांतील अनेक जातींमुळे लोकांस राज्यकारभार करितां येणार नाहीं या चिरंतन आरोपाचा त्यांनी या भाषणांत इनकार केला. वसाहतींच्या दर्जाचें स्वराज्य आपणांस पाहिजे, निदान ताबडतोब तरी कांहीं हक्क दिले पाहिजेत आणि ते हक्क कोणते हेंही त्यांनी उघड सांगितले. १५ नोव्हेंबर १९०५ रोजी सर हेन्री कॉटन यांच्या अध्यक्षतेखाली गोपाळरावांनी लंडन शहरी आणखी एक व्याख्यान दिलें. सुशिक्षित लोकांची सर्वत्र निराशा होत असल्यामुळे, देशांत असंतोष अधिकाधिक पसरणार असा भावि धोका जो होता तो त्यांनी दाखवून दिला. पन्नास दिवसांत गोपाळरावांनी पंचेचाळीस ठिकाणी भाषणे केलीं, कोठें निबंध वाचले, कोठें वर्तमानपत्रांत लेख लिहिले, कोठें मुलाखती दिल्या, कोठें नवीन पुढाऱ्यांशीं विचारविनिमय केला. त्यांनी स्वतःच्या देहाला विश्रांति अशी दिलीच नाहीं. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसून येऊं लागला. ते अशक्त आणि थकल्या भागल्यासारखे दिसूं लागले.
 गोपाळरावांवर या वर्षीच्या कामगिरीचे ओझें किती होते याची कल्पना वाचकांस आलीच असेल. परंतु आणखीही फार महत्त्वाची कामगिरी त्यांचे देशबंधु त्यांच्यावर लादीत होते. बनारस येथे भरणाऱ्या राष्ट्रीयसभेस गोपाळरावच अध्यक्ष पाहिजेत असे तेथील स्वागत कमिटीनें इतरांच्या मतानुसार ठरविलें. गोपाळरावांनी नापसंती दर्शविली. मी अद्याप लहान आहें, माझ्याहून लायक लोक पुष्कळ आहेत आणि माझी प्रकृति पण नादुरुस्त आहे असे त्यांनी कळविलें. परंतु छेः, गोखलेच अध्यक्ष पाहिजेत असे लोकांनी ठरविलें, आपल्या देशबांधवांचा आपल्यावरील लोभ पाहून गोपाळरावांस आनंदाचे भरतें आलें! १८९७ सालच्या काँग्रेसमध्यें गोखल्यांसंबंधी निंदाव्यंजक ठराव येण्याचे घाटत होतें. पण आठ वर्षांत केवढा फरक पडला! १९०५ मध्ये ते राष्ट्रीयसभेचे अध्यक्ष निवडले गेले. ते हिंदुस्तानांत येण्यास निघाले. परंतु इंग्लंडांतील भाषणांनी त्यांचा घसा दुखूं लागला होता. बोटीवर असतांना तो सुजला. यामुळे बोटीवर असतांच घशावर शस्त्रक्रिया करावी लागली. पुढे प्रकृति बरी होत चालली. ते मुंबईस आले, तेव्हां लोकांनी त्यांचा जयजयकार केला. त्यांच्या इंग्लंडमधील निःस्वार्थ व निरपेक्ष सेवेस तर मोलच नव्हतें. त्यांनीं प्रकृतीचीही काळजी केली नाहीं. देशासाठीं असा अविरत प्रयत्न करणारा सुपुत्र परत आपल्यांत आलेला पाहून कोणास धन्य वाटणार नाहीं? त्याच्या उदाहरणानें, पवित्र दर्शनानें, कोणास कर्तव्यस्फूर्ति होणार नाहीं? अशाच पवित्र व उदात्त प्रसंगांनी लोकांस कर्तव्यक्षम होतां येतें. पुण्यास जेथें त्यांनी शिक्षणविषयक कामगिरी केली, जेथे त्यांनी राजकारणाचे धडे घेतले, जेथें त्याचे सहकारी, मित्र, आणि राजकारणांतील प्रतिपक्षीही होते अशा पुण्यपावन पुण्यास त्यांचे फार थाटाचे स्वागत झालें. महाराष्ट्रास वंदनीय झालेले डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालीं त्यांस मानपत्र अर्पण करण्यांत आलें. या समारंभांत टिळकांनी प्रामुख्याने भाग घेतला होता. विलायतेत किंवा इतर देशांत अशा प्रकारच्या चळवळी केल्यामुळे कसे फायदे आहेत व या कामाची कशी जरुरी आहे हें त्यांनीं आपल्या भाषणांत दिदर्शित केलें.
 गोपाळरावांस विश्रांति घेण्यास सवड नव्हतीच. राष्ट्रीय सभेचे ते नियोजित अध्यक्ष होते. त्यांस आपले भाषण तयार करावयाचें होतें. ते कलकत्यास गेले. बंगालची परिस्थिति त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. तेथील पुढाऱ्यांशी विचारविनिमय केला. आणि तदनंतर आपले भाषण लिहून काढलें. भाषण लिहून काढल्यानंतर ते पुढाऱ्यांसह बनारसला गेले.
 बनारसला गोपाळरावांचें अलौकिक स्वागत झालें. गोपाळरावांच्या श्रमांचें फळ त्यांना मिळाले. ते या अध्यक्षपदासाठी हपापलेले नव्हते. परंतु देशाने त्यांच्या कामगिरीचा गौरव केला. काम करण्यानें मनुष्य खचत नसतो. परंतु काम करून सवरून जर दुसऱ्यानें त्या कामाचा उल्लेखही केला नाहीं तर मात्र मन खट्टू होते. मनाचा उत्साह मंदावतो. आईचीं चार कामे करावयास मुलास लाज वाटत नाहीं किंवा श्रमाची तो पर्वा करीत नाहीं; परंतु पाठीवर हात फिरवून आईनें 'दमलास हो बाळ, जरा बस आतां' असे शब्द काढले कीं, मुलाच्या लहानशा हृदयांत आनंदास पारावार रहात नाहीं. दुप्पट कार्य करण्यास त्यास हुशारी येते. उल्हास द्विगुणित होतो. तीच गोष्ट गोखल्यांसारख्या हळुवार मनाच्या लोकांची असते. आपल्या कामाची वाहवा होवो न होवो, तें लोकांस रुचो वा न रुचो, कार्य करीत रहावयाचे, अशा धमकीनें केवळ निःसंगतेनें काम करणारा एकादाच; जवळ जवळ नाहींच म्हटलें तरी चालेल, गोखले हे मुलाप्रमाणें होते. आपल्या कामगिरीचा गौरव झाला पाहून त्यांस गहिंवर आलेला होता. काशीसारख्या पुरातन काळापासून पवित्र झालेल्या नगरींत, जेथें विश्वंभराचें वास्तव्य, जेथें गंगेचा गंभीर प्रवाह, अशा पुण्यपावन ठिकाण, गोखल्यांसारखा तरुण, उत्साही व देहाची सुद्धां पर्वा न करितां देशकार्य करणारा पुढारी अध्यक्ष नेमण्यांत आला होता.
 परंतु यंदांच्या काँग्रेसचें काम फार बिकट होतें. राष्ट्रांत पूर्वीपासून दिसून येणारे मतभेद आतां अधिक स्पष्टपणे दिसूं लागले. बहिष्कार बंगाल प्रांतापुरता न ठेवतां सर्वराष्ट्रीय करावा, राजपुत्राच्या स्वागतावर बहिष्कार घालावा वगैरे प्रश्नांवर मोठीं रणें माजली. परंतु एकंदरीनें सर्व सुरळीत पार पडलें. गोखल्यांनीं फेरोजशहांस तारा केल्या, परंतु फेरोजशहा या सभेस हजर राहिले नाहींत. गोखल्यांस वाटत होतें कीं, या वेळेस फेरोजशहांसारखा वजनदार गृहस्थ आपणास सल्ला देण्यास असेल तर काम जास्त सुरळीत पार पडेल. परंतु तितकी विशेष भानगड झालीच नाहीं.
 गोखल्यांचे अध्यक्षपदावरून वाचण्यांत आलेले भाषण फारच सणसणीत होतें. आपल्या व्याख्यानाच्या आरंभी कर्झनशाहीची अवरंगजेबशाहीशी त्यांनी मार्मिक व यथार्थ तुलना केली. अवरंगजेब कर्तबगार होता, परंतु घमेंड व सर्वांचा संशय या दोन कारणांनी त्याची कारकीर्द सुखावह झाली नाहीं. खुद्द त्याच्या कारकिर्दीत बंडे वगैरे विशेष झालीं नाहींत, तरी त्याच्या पाठीमागें सर्वत्र बजबजपुरीच माजली. कर्झन गेले खरे परंतु त्यांच्यानंतर आलेल्या मिंटोसाहेबांच्या कारकिर्दीत अराजकतेला व्यक्त स्वरूप आलें. कर्झनच्या कारकिर्दीत मनांत बीजारोपण झालें, मिंटो साहेबांच्या कारकिर्दीत त्याचा रोपटा झाला. कर्झनचीं कृष्ण कृत्ये व त्यांचीं फळें यांची निस्तरानिस्तर मिंटो साहेबांस करावी लागली. लॉर्ड कर्झनच्या योग्य गुणांची गोपाळरावांनी तारीफ केली. परंतु त्या गुणांचें चीज झालें नाहीं. 'But the gods are jealous and amidst such lavish endowments, they withheld from him a sympathetic imagination without which no man can ever understand an alien people.' सुशिक्षितांचें मत बाजूला लोटणें मुत्सद्देगिरीचे होणार नाहीं असें म्हणणारे कर्झन त्याच मताची कायदेबाज पायमल्ली करण्यांत सर्वांवर ताण कसे करते झाले याचें त्यांनीं उत्कृष्ट चित्र रेखाटलें. कर्झन साहेबांनी मुंबईच्या चरम भाषणांत असे उद्गार काढिले कीं, मी शिक्षणांत जास्त पैसा खर्च केला. परंतु शिक्षणांत अडीच लक्ष रुपये जास्त खर्च करण्यास दिले तर लष्कराकडे पन्नास लक्षजास्त खर्च केले! युरोपियन लोकांसाठीं तर इतक्या नवीन जागा निर्माण केल्या की बोलून सोय नाहीं. आधींच नौकरीवर होते त्यांचे पगार वाढविले. आणि हें सर्व कां? तर 'He did not regard it as wisdom or statesmanship in the interests of India itself to do so (to do so means— offering political concessions to the people of India.)' नंतर बंगालच्या फाळणीकडे गोखले वळले. या बाबतीत सरकारशीं नित्य सहकार्य करणाऱ्यांचीं मतेंही सरकारने कशीं धुडकावली, सर्व जनतेचें मत कसें तृणवत् लेखलें हें सांगून गोपाळरावांस खालील उद्गार काढावे लागले:-
 'If men, whom any other country would delight to honour are to be thus made to realize the utter humiliation and helplessness of their position in their own, if the opinions of such men are to be brushed aside, if all Indians are to be treated as no better than dumb, driven cattle, then all I can say is "Good-bye to all hope of co-operating in any way with the bureaucracy in the interests of the people." शत संवत्सर राज्य चालवून जर हाच शेरा या राज्यपद्धतीवर मारावा लागतो तर ही राज्यपद्धति किती घातुक, किती दुष्ट असेल याची कल्पना करा.
 बंगालची विभागणी करण्याची तीन मुख्य कारण त्यांनी सांगितलीं. बंगालला फोडणें, आसामची भरभराट दाखविणें, आणि सिव्हिल सर्वंटांचा फायदा. खरें पाहिलें तर बिहार, ओरिसा, छोटानागपूर हे तीन प्रांत एकीकडे काढून त्यांचा निराळा प्रांत बनविला पाहिजे होता. परंतु तसें केल्यास सिव्हिल सर्व्हंटांचा घुस्सा होणार होता. या फाळणीमुळे साहेबांस किती गोष्टी साधावयाच्या होत्या पहा:-
 "This fair Province has been dismembered to destroy growing solidarity of the people, check their national aspirations and weaken their power of co-operating for national ends, to lessen the influence of their educated classes with their countrymen and reduce the political importance of Calcutta." १६ आक्टोबर १९०५ रोजी फक्त सरकारी सभासद हजर असतां हा कायदा पास करण्यांत आला, आणि तो दिवस बंगालमध्ये सुतकासारखा पाळण्यांत आला. परंतु या काळ्यांतूनही पांढरें बाहेर पडलें. या कडू कवंडलामध्येही एक अमृताची बी सांपडली.
 "For the first time since British rule began, all sections of the Indian community, without distinction of caste or creed have been moved by a common impulse and without the stimulus of external pressure, to act together in offering resistance to a common wrong.- The most astounding fact of the situation is that the public life of this country has received an accession of strength of great importance, and for this all India owes a deep debt of gratitude to Bengal."
 नंतर गोपाळराव स्वदेशी आणि बहिष्कार यांकडे वळले. त्यांनी सांगितलें कीं, ज्या प्रसंगी सर्व लोक एका झेंड्याखाली जमा होतात, अशा वेळीं बहिष्कार हा कायदेशीर आहे. स्वदेशीमधील पवित्र भावना आणि आर्थिक फायदाही त्यांनी स्पष्ट केला. नंतर आपले ध्येय काय असावे याची त्यांनीं मीमांसा केली. लोकांस जास्त जास्त हक्क दिल्याशिवाय ते हक्कांस लायक होत नाहीत. 'केल्यानें होत आहे रे, आधीं केलेच पाहिजे,' 'It is liberty alone which fits men for liberty, हें ग्लॅडस्टनचे सूत्र आहे. परंतु तुम्ही आधीं घरांत पोहावयास शिका म्हणजे मग आम्ही तुम्हांस सागरांत नेऊं अशा प्रकारचें आमच्या अधिकाऱ्यांचें म्हणणें असतें. हिंदुस्तानास दिलेल्या वचनांचा वेळोवेळी कसा भंग केला गेला हे जगजाहीरच आहे. गोड गोड थापा मारून वेळ मारून नेणें हें सरकारचें काम आणि तें त्यानें यथायोग्य केलें, नोकरशाही लोकांत मिसळण्यास पुढे येत नाहीं; लोकांनीं भीत भीत, नमून त्यांच्या पुढे वागले पाहिजे, अशी स्थिति आली आहे. ही स्थिति पालटली पाहिजे. आपणांस ताबडतोब कांहीं तरी हक्क मिळाले पाहिजेत. ते कोणचे असावेत या गोष्टीचेही त्यांनी स्पष्टीकरण केलें, जिल्हा-बोर्डांची त्यांनी फार जरुरी दाखविली. हिंदुस्तानचा बराचसा राज्यकारभार डिस्ट्रिक्ट अधिकाऱ्यांकडून हांकला जातो. त्यांस सल्ला देण्यास आणि पुढें त्यांच्यावर ताबा ठेवण्यास या जिल्हाबोर्डांचा फार उपयोग होईल असे रानड्यांस वाटत असे. ही महत्त्वाची सुधारणा गोपाळरावांनी लोकांपुढे मांडली. इंग्लंडमधील परिस्थितिही आपणांस अनुकूल आहे; स्टेट सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी हिंदुस्तानच्या भवितव्यतेविषयीं उदार धोरण बाळगणारे आहेत असें त्यांनी दाखविलें, विशेषतः मोर्ले साहेबांविषयीं गोखल्यांनी फारच आदर दाखविला. पण पुष्कळदां या जगांत जसें दिसतें तसें नसतें. मोर्ले तत्त्वज्ञ असले, राज्यकारभार बराचसा लोकांच्या हातांत पाहिजे असें बर्कच्या अध्ययनानें, व ग्लॅडस्टनच्या शिकवणुकीनें जरी त्यांचें मत बनले असले, तरी सेक्रेटरीच्या जागेवर येतांच, या जागेला चिकटलेले संकुचितपणा, मतकृपणता, अनुदारता हे दुर्गुण त्यांना येऊन चिकटले. हे दुर्गुण दूर लोटण्याचे त्यांस सामर्थ्य नव्हतें. बदललेल्या परिस्थितींत जो आपले स्वतःचे उदार विचार कायम ठेवून तदनुरूप कृति करण्याची खटपट करितो तोच महापुरुष होय. मोर्ले अर्थात् या कोटींतले नव्हते. ते पुस्तकी पंडित होते. त्यांना वांगी फक्त पुराणाचे वेळीं निषिद्ध होतीं. परंतु गोखले भोळे! त्यांना मोर्ले साहेबांविषयी फार आशा वाटत होती. आपल्या देशास हा कांहीं तरी भरभक्कम सुधारणा देईल असे गोपाळरावांस वाटत होते. त्यांचे हृदय खालींवर होत होतें:-
 "And as regards the new Secretary of State for India, what shall I say? Large numbers of educated men in this country feel towards Mr. Morley as towards a Master; and the heart hopes and yet it trembles, as it had never hoped or trembled before. He, the reverent student of Burke, the disciple of Mill, the friend and biographer of Gladstone,- will he courageously apply their principles and his own to the Government of this country, or will he too succumb to the influences of the Indian office around him, and thus cast a cruel blast on hopes, which his own writings have done so much to foster? We shall see."
 धैर्यानें ग्लॅडस्टन-बर्कचीं तत्त्वें येथील राज्यकारभारास लावण्यास मोर्ले कचरले. त्यांच्यावर सभोवारच्या प्रभावळीची छाया पडली. त्यांना शेजाऱ्यांचा, सहकाऱ्यांचा गुण लागला. या बाबतींत टिळक हेच जास्त धोरणी, व दूरदृष्टि ठरले. टिळकांस मनुष्यस्वभाव बरोबर माहीत. त्यांनीं 'तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी' हा सुंदर लेख लिहून मोर्ले साहेबांविषयीं अवास्तव कल्पना करण्यांत हंशील नाहीं, एकादा तुकडा फेंकील तोंडावर- त्याचीही खात्री देववत नाहीं असें जें प्रतिपादिलें तेंच पुढे खरें ठरलें.
 नंतर सरतेशेवटी रानड्यांच्या रसाळ, सुंदर व स्फूर्तिदायक शब्दांनी त्यांनी समारोप केला; आणि कितीही बिकट परिस्थिति आली तरी निराश न होण्यास त्यांनी सांगितलें. गोखल्यांचे भाषण फार जोरदार होतें. त्यांचे आशापूर्ण उत्साही मन त्यांत दिसत होतें. राजकारणांत लागणारी अचूक दृष्टि त्यांस नसली तरी एकंदर परिस्थितीचे समालोचन त्यांनी चांगले केलें. या भाषणावर टीका करितांना चिरोल साहेब लिहितात-
 'It must have been a proud moment for Mr. Tilak when the very man who had often fought so courageously against his inflamatory methods and reactionary tendencies in the Deccan, Mr. Gokhale, played into his hands and from the presidential chair at Benares got up to commend the boycott as a political weapon used for a definite political purpose.'
 परंतु गोखल्यांनी अध्यक्षपदावरून बहिष्कार न्याय्य आहे असें जाहीर केलें तें कां याची कांहींशी कारणमीमांसा जी चिरोल साहेबांनी लाविली आहे ती पहा. ते म्हणतात:-
 "Not even Mr. Gokhale with all his moral and intellectual force could stern the flowing tide of Tilak's popularity in the Deccan; and in order not to be swept under, he was perhaps often compelled like many other Moderates to go further than his own judgment could have approved." ही मीमांसा बरोबर आहे असें आम्हांस वाटत नाहीं. नवीन पक्षाच्या जोरकस प्रवाहांत आपण नाहीसे होऊन जाऊं नये, या हेतूसाठीं कांहीं गोपाळरावांनी बहिष्काराचे समर्थन केलें नाहीं. त्यांना खरोखरच बहिष्कार न्याय्य वाटत होता. फक्त त्याचा उपयोग जेव्हां सर्व राष्ट्रास आग लागली असेल, आणि सर्वांचें ऐक्य असेल तेव्हांच व्हावा, नाहीं तर तें अस्त्र विफल ठरेल असे त्यांचें म्हणणें होतें. असो. एकंदरीत बनारसची काँग्रेस आपल्या गोड व मृदु स्वभावानें गोखल्यांनी नीट पार पाडली हें त्यांस खरोखर भूषणावह झालें. अशा जोमाची व इतकी यशस्वी राष्ट्रीय सभा वीस वर्षांत झाली नव्हती. यंदांच्या काँग्रेसचा विशेष हा होता कीं, मुसलमानांच्या हिताविषयींही सभेनें जागरूकता दर्शविली. हिंदुस्तानांतून यात्रेकरितां बाहेर जाणाऱ्या मुसलमानांवर क्वॉरंटइनचा त्रास- नसती पीडा लादली होती. ही पीडा, हें गाऱ्हाणें दूर केलें जावें अशा अर्थाचा ठराव पास करण्यांत आला.
 १९०५ च्या अखेरीस लॉर्ड मिंटो हे गन्हर्नर जनरल झाले होते. कर्झन व किचनेर यांचा झगडा होऊन, हा तेजस्वी व घमंडानंदन गव्हरनर जनरल एकदांचा निघून गेला. सर्वांचा तळतळाट आपल्या डोक्यावर त्याने घेतला होता. त्याच्यावर लोक दांतओठ खात होते. त्यास शिव्याशाप देत होते. सर्वत्र असंतोषाच्या प्रचंड लाटा आदळत होत्या आणि सर्व देश हादरून गेला होता. हिंदुस्तानचा शनि कर्झन जरी निघून गेला तरी येथील संताप थोडाच शमणार? आग लावणारा जरी गेला, तरी आग थोडीच विझणार? सर्प पळाला तरी त्यानें मनमुराद विष हिंदुस्तानच्या हृदयांत ओतलेच होतें. सर्व देशं दुःखावेगानें कण्हत होता. यामुळे नवीन गव्हर्नर जनरलनें कसें धोरण ठेवावे याबद्दल गोपाळरावांनी त्यास कौन्सिलमध्ये सल्ला दिला. १९०६ मध्ये मिंटाच्या कारकिर्दीतील त्यांचे पहिले भाषण झाले. या व्याख्यानांत सर्व प्रांतांतील कर-जमिनीवरील कर- जे होते त्यांची माहिती सांगून हे कर कमी करण्यांत यावे, मिठावरील कर जास्त कमी व्हावा आणि जमिनीवरील आकारास कांहीं तरी एक मर्यादा घालावी असे त्यांनी सांगितले. ईजिप्तमध्यें जशा शेतकऱ्यांसाठी पतपेढ्या असतात, तशा आपल्या देशांत सरकारने स्थापन कराव्या कालव्यांची सुधारणा करावी; पाटबंधारे जास्त वाढवावे; शेतीमध्ये सुधारणा घडवून आणाव्या; धंदेशिक्षण आणि औद्योगिक शिक्षण यांवर पुष्कळ खर्च करून देशांत या ज्ञानाची वाढ होईल असें करावें; यासाठी अविरत प्रयत्न करणे सरकारचें कर्तव्य आहे; प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावें; आरोग्याची सोय करणें, चांगल्या पाण्याचा पुरवठा होण्याची व्यवस्था करणें इत्यादि शेकडो बाबींत सरकारने सुधारणा करण्यासाठी झटून प्रजेचा दुवा घ्यावा. सरतेशेवटीं गोखले म्हणतात, "My Lord, the whole East is today throbbing with a new impulse vibrating with a new passion— and it is not to be expected that India alone should continue unaffected by changes that are in the very air around us. We could not remain outside this influence even if we would We would not so remain even if we could. I trust the Government will read aright the significance of the profound and far-reaching change which is taking place in the public opinion of the country. A volume of new feeling is gathering which requires to be treated with care. New generations are rising up whose notions of the character and ideals of British rule are derived from their experience of the last few years, and whose minds are not restrained by the thought of the great work which England has on the whole accom plished in the past in this land. I fully believe that it is in the power of the Government to give a turn to this feeling which will make it a source of strength and not of weakness to the Empire. One thing, however, is clear. Such a result will not be achieved by any methods of repression. What the country needs at this moment above everything else is a Government, national in spirit, even though it may be foreign in personnel- a Government that will enable us to feel that our interests are the first consideration with it, and that our wishes and opinions are to it a matter of some account. My Lord, I have ventured to make these observations, because the present situation fills me with great anxiety. I can only raise my humble voice by way of warning, by way of appeal; the rest lies on the knees of the gods."
 या गोखल्यांच्या अर्थपूर्ण शद्वांचा मिटोंच्या मनावर योग्य तो परिणाम झाल्याविना राहिला नसेल असें आम्हांस वाटतें.
 कौन्सिलमधले काम आटोपून गोखले स्वतःच्या जबाबदारीवर पुनः तिसऱ्याने इंग्लंडला निघून गेले. मोर्लेमिंटोची कारकीर्द सुरू झाली होती. हिंदुस्तानास कांहीं तरी नवीन राजकीय हक्क मिळणार अशी दाट वदंता होती. गोखले १९०५ मध्ये जेव्हां इंग्लंडमध्ये होते तेव्हांच त्यांच्या मित्रांनीं त्यांस इंग्लंडमध्ये येण्यास सुचविले होते. त्या वेळेस त्यांनी सार्वजनिक अशीं भाषणे वगैरे केलीं नाहींत. त्यांचे काम आंतून- भेटी, मुलाखती यांच्या रूपानें- चाललें होतें.
 गोखले इंग्लंडला गेले परंतु इकडे हिंदुस्तानांत कोण हलकल्लोळ सुरू झाला! सर जे बॅम्फील्ड फुल्लर हे बंगालमध्ये दंडुकेशाही गाजवीत होते. दडपशाहीला ऊत आला होता. सरकार केवळ निष्ठुर बनलें होतें. या फुल्लर साहेबांच्या हाताखालचे अधिकारीही त्यांस शोभेसेच होते. इतक्यांत सर्वांचे लक्ष बारिसालकडे वेधलें. बारिसालमध्ये काय बरें चाललें होतें? बाबू अश्विनीकुमार दत्तांसारख्या लोकप्रिय पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखालीं तेथें बहिष्काराची चळवळ जोरांत चालू होती. या वाढत्या चळवळीचें अधिकाऱ्यांस वैषम्य वाटू लागणें साहजिक होते. लवकरच खुद्द वारिसाल येथें प्रांतिक सभा भरण्याचें घाटत होते. अविचारी लोक एक अडचण दूर करण्यासाठी दुसऱ्या हजार निर्माण करतात. सरकारचें तसेंच झालें. अत्यंत शांतपणें बारिसालच्या रस्त्यांतून पुढाऱ्यांची मिरवणूक चालू होती तरी पोलिसांनी पुढाऱ्यांचा अपमान केला. सन्मान्य लोकांवर काठीचा प्रयोग झाला. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेच्या हुकुमानें सुरेंद्रनाथांस गिरफदार करण्यांत आलें. मॅजिस्ट्रेटनें सुरेंद्रनाथांचा अपमान केला तेव्हां सुरेंद्रनाथांनी त्यांचाही केला. ताबडतोब सुरेंद्रनाथांस दंड ठोठावण्यांत आला. सभा बिगरपरवाना भरलेली असल्यामुळे, या सभेस हजर राहण्याबद्दल त्यांस दुसरा एक दंड ठोठावण्यांत आला. मॅजिस्ट्रेटनें दाखविलेला हा व्यक्तिद्वेष लोकांच्या मनांस जास्तच चिडविण्यास कारणीभूत झाला. परंतु येवढ्यानेंच काय झालें? इमर्सन साहेबांनी सभा उधळून लावली. हीं गाऱ्हाणीं फुल्लर साहेबांस दूर करितां आलीं असती. मागील आठवणी, व्रण बुजवितां आले असते. परंतु फुल्लरांनी फूस दिली. गुरखे आणि पोलीस शहरांवर सोडण्यांत आले. लोकांस दहशत घालणारी सरकारी अधिकाऱ्यांची भाषणे, कडक जाहीरनामे, शाळेतील विद्यार्थ्यांवर खटले यांचे सत्र सर्रहा सुरू झालें. हायकोर्टाच्या निकालांनीं, किंवा मोर्ले साहेबांच्या शिफारशींनी या गोष्टी कमी झाल्या नाहींत. परंतु इतक्यांत एकदम फुल्लर साहेबांनी राजीनामा दिला. या राजीनाम्याचा खुलासा मोर्लेसाहेबांनी आपल्या आठवणीत केला आहे. सिराजगंज येथील शाळांतील कांहीं विद्यार्थ्यांस बंडखोर वर्तणुकीबद्दल गुन्हेगार ठरविण्यांत आलें. ज्या शाळांत हीं मुलं होतीं त्या शाळांचा कलकत्ता युनिव्हर्सिटीशीं असलेला संबंध युनिव्हर्सिटीने तोडून टाकावा असें फुल्लर साहेबांनी युनिव्हर्सिटीला फर्मावले. या वेळेस हिंदुस्तान- सरकार मध्ये पडलें. युनिव्हर्सिटीचे नवीन कायदे होईपर्यंत थांबा असें हिंदुस्तान सरकारनें फुल्लरांस लिहिलें, परंतु फुल्लर फुगले. त्यांनी 'मी जसें लिहिलेले आहे तसे युनिव्हर्सिटीनें वागलेच पाहिजे, नाहीं तर माझा राजीनामा मंजूर करा,' अशी धमकी दिली. परंतु आश्चर्य हें कीं, त्यांचा राजीनामा ताबडतोब मंजूर करण्यांत आला. फुल्लर साहेब जेव्हां विलायतेंत मोर्ले यांच्या मुलाखतीस गेले तेव्हां ते म्हणाले, 'माझा राजीनामा मंजूर होईल असें माझ्या ध्यानीमनीही नव्हतें.' मोर्ले साहेबांनी पटकन् उत्तर दिलें, 'I don't believe it is for the good of prestige to back up every official whatever he does, right or wrong.' 'अधिकाऱ्याने कांहींही केलें तरी त्याची प्रतिष्ठा राहण्यासाठी त्याच्या प्रत्येक कृत्याचें समर्थन करणें इष्ट नाहीं.'
 फुल्लर साहेब हिंदुस्तानांत हलकल्लोळ करीत असतांना, गोखल्यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या विरुद्ध चळवळ केली. अशा अधिकाऱ्यास कामावरून दूर करा अशी त्यांनी आग्रहाची निकडीची विनंति केली. या फुल्लर साहेबांबद्दल मोर्ले लिहितात-
 "He was quite well-fitted for Government work of ordinary scope, but I fear, no more fitted to manage the state of things in E. Bengal than am I to drive an engine." 'माझी आगगाडीचा ड्रायव्हर होण्याची जितकी लायकी, तितकीच पूर्व बंगालचा कारभार पाहण्यासाठीं फुल्लरांची लायकी होती. सरकारचें साधारण काम मात्र त्यांस चांगले करतां आलें असतें.' स्वतः मोर्ले साहेबांचे जर हें मत तर हिंदुस्तानांतील लोकांचे या साहेबबहादुराराविषयीं काय मत झालें असेल?
 फुल्लर साहेबांचें जरी स्वदेशीं प्रयाण झाले तरी बंगालची फाळणी पुढें बादशहा हिंदुस्तानांत येईपर्यंत रद्द झाली नाहीं. ही रद्द न होण्याचें कारण स्वतः कर्झन साहेबांनी दिले आहे. किचनेबरोबरच्या झगड्यांत कर्झन नामोहरम झाले. मानधन कर्झन राजीनामा देऊन गेले, त्यांस थोडाबहुत तरी संतोष व्हावा म्हणून, जिच्यासाठी कर्झनांनीं रात्रीचा दिवस केला, सर्व राष्ट्राचा विरोधही जुमानला नाहीं, अशी बंगालची फाळणी रद्द करण्यांत आली नाहीं. कर्झन साहेब जून ३०, १९०८ रोजी इंग्लंडमध्ये म्हणाले कीं, "That measure had been thrown as a sap to soothe my wounded feelings rather than on grounds of political propriety or expediency." मोर्ले साहेब ही फाळणी रद्द करणार असें वाटत होते व अशी दाट वदंताही होती. परंतु कोठें माशी शिंकली कोण जाणे! ज्या गोष्टीमुळे अनर्थपरंपरा ओढवली ती गोष्ट दूर करणें या तत्त्वज्ञ मुत्सद्द्याच्या कां जिवावर आलें कोणास कळे? येवढें खरें कीं, हा व्रण आणखी पांचसहा वर्षे बुजावयाचा नव्हता.
 परंतु गोखल्यांचा इंग्लंडमध्ये जाण्यांत हा मुख्य हेतु नव्हता. उदारपक्षाच्या मंत्रिमंडळाकडून आणा अर्धा आणा राजकीय हक्क मिळाले तर पहावे यासाठीं ते गेले होते. या बाजूनें शक्य ती खटपट त्यांना करावयाची होती. त्यांनी पुष्कळ प्रमुख लोकांच्या भेटी घेतल्या. हिंदुस्तानांतील स्थिति कशी आहे, राज्यकारभार कशा धोरणाने चालतो, हे राज्यकारभाराचे यंत्र कसे अहितकारक आहे हे त्यांनी दाखवून दिले. मोर्ले साहेबांची पहिली मुलाखत त्यांनी गेल्या वर्षीच घेतली होती. नोव्हेंबरमध्ये ते मोर्लेसाहेबांस भेटून अर्धा तास त्यांचे संभाषण झाले होते. या भाषणाविषयी 'Immensely interesting,' असे मोर्ले लिहितात. या वर्षी त्यांची पहिली भेट मे च्या ७-८ तारखेस झाली. मोर्ले साहेबांस हिंदुस्तानविषयक प्रश्न सोडविण्यास गोखल्यांची पुष्कळ मदत झाली यांत शंका नाहीं. गोखले व मोर्ले यांच्या एकंदर पांच मुलाखती झाल्या. शेवटची मुलाखत १ आगष्ट रोजी झाली. मोर्ले साहेब मिंटो यांस लिहितात 'आपण गोखल्यांशी मिळते घेऊन त्यांची मर्जी राखिली पाहिजे, यांत आपला फार फायदा आहे. गोखल्यांची हाउस ऑफ कॉमन्समधील लोकांवर छाप पडली आहे, आणि माझ्या हिंदुस्तानविषयक भाषणाची त्यांनीं तरफदारी केली आहे.' ते पुढे लिहितात, 'He has a politician's head; appreciates executive responsibility, has an eye for the tactics of practical common sense.' गोखल्यांनी हिंदुस्तानास वसाहतीचें स्वराज्य प्राप्त करून घेणें हें आपले ध्येय आहे असें मोल यांस स्पष्टपणें सांगितलें. परंतु तत्त्वज्ञ मोर्लें काय म्हणतो पहा:— 'I eually made no secret of my conviction, that for many a day to come— long beyond the short span of time that may be left to us— this was a mere dream' वसाहतीचा दर्जा हिंदुस्तानास देणें म्हणजे मोर्ले यांस स्वप्न वाटत होतें. या वेळेस मंत्रिमंडळाने किंवा पार्लमेंटने जास्त सुधारणांचे हक्कही दिले असते. परंतु देणारें देते आणि कोठावळ्याचें पोट दुखतें! मोर्ले साहेबांस हिंदुस्तान योग्य दिसत नव्हता. त्यांस हिंदुस्तानास अल्प स्वल्प अधिकार देणेंच हिताचें वाटत होतें. मोर्ले साहेबांचा कंजूषपणा पाहिला म्हणजे छानदार लिहिणारा गडी मनानें किती कृपण व संकुचित असतो हे आढळून या बहुरूपी जगाची गंमत वाटते. आपल्या सुंदर व तत्त्वपूर्ण विचारांनीं जगास झुलविणाऱ्या कलमकुशाग्रणींचें हें कार्पण्य व व्यवहारांतील अनाठायीं कठोरता पाहून मन उद्विग्न होतं व या तकलुपी, वरपांगी लिहिणारांची कीव येते.
 मोर्ले साहेबांस हिंदुस्तानास थोडे हक्क देण्यास ही वेळ योग्य आहे असें स्पष्ट दिसत होतें. ते जरा ऐटीनें गोखल्यांस म्हणतात 'ज्याच्यावर मंत्रिमंडळाचा आणि कॉमन्स सभेचा विश्वास आहे असा सेक्रेटरी सुदैवानें तुम्हांस लाभला आहे. तुमचा व्हाइसरॉय हाही सुधारणा द्याव्या याच मताचा आहे. देशांतील इतर सरकारी अधिकारी व्हाइसरॉयच्या विरुद्ध जाणार नाहीत. परंतु या सुधारणा देण्याच्या बाबतीत येऊन जाऊन अडचण येईल, मोडता येईल तो तुमच्या देशांतील वेड्या व जहाल लोकांचा. मोर्लेसाहेब म्हणतात—
 Only one thing can spoil it. Perversity and unreason in your friends. If they keep up the ferment in E. Bengal that will only make it hard, or even impossible for Government to move a step. I ask you for no sort of engagement; you must of course be the judge of your own duty, and I am aware that you have your own difficulties. So be it. We are quite in earnest in our resolution to make an effective move. If your speakers or your newspapers set to work to belittle what we do, to clamour for the impossible, then all will go wrong.'
 मोर्ले यांची मुत्सद्देगिरी वरील उताऱ्यांत आहे. 'तुमच्या देशांतील अत्याचार बंद करा, नाहीतर कांहीं देत नाहीं.' अशी ही धमकी होती. गोखल्यांनीं कबूल केलें कीं, मी हिंदुस्तानांतील माझ्या मित्रांस लिहितों कीं, शांतता राखा. ही कामगिरी करीत असतांना गोपाळराव इतर कामेही करीत होते, त्यांच्या खटपटीने आणि वजनानें सभाबंदीचा कायदा रद्द करण्यांत आला; राष्ट्रीय गीतें आणि मिरवणुकी यांस येणारे अडथळे नाहींसे झाले. शाळांतून हांकलून दिलेल्या मुलांना पुनः शाळेत जाण्यास परवाना मिळाला.
 अशा प्रकारें मोर्ले साहेबांजवळ खलबतें व मुलाखती चालू असतां अन्य द्वारे देशसेवा करण्याचे आपले कर्तव्य स्वसुखनिरभिलाषी गोखले करीतच होते. लंडनमध्ये 'ईस्ट इंडिया असोसिएशन' म्हणून एक संस्था आहे. मिस मॅनिंग या सन्मान्य स्त्रीच्या देखरेखीखाली या संस्थेची वार्षिक सभा 'इम्पीरियल इन्स्टिट्यूट' मध्ये भरली होती. या सभेपुढे गोपाळरावांनी 'Self Government' स्वराज्य या विषयावर एक निबंध वाचला. हा निबंध फार उत्कृष्ट आहे. त्यांत ब्रिटिश राजसत्ता हिंदुस्तानांत आल्यापासून तिचें थोडक्यांत पर्यालोचन केलें आहे. नंतर निरनिराळ्या वेळी दिलेली वचनें, व जाहीरनामे यांची आठवण देऊन- 'Good Government could never be a substitute for Government by the people themselves,' हे इंग्लंडच्या प्रधानाचें महत्त्वाचे वाक्य त्यांस सांगितलें आहे. हिंदुस्तानांतील सर्व बड्या जागा गोऱ्यांनीं अडविल्या आहेत, जास्त आडवू पहात आहेत आणि तरुण, सुशिक्षित व लायक माणसांस चांगल्या जागा मिळत नाहीत; उद्योगधंदे बुडत चालले; दारिद्र्य वाढत चाललें; शिक्षणाच्या नांवानें तर आंवळ्यायेवढें पूज्य; असा सर्वत्र नन्नाचा पाढा हिंदुस्तानांत ऐकू येत होता. असें कां व्हावें? जपाननें आपली सर्वतोपरी भरभराट पांचपन्नास वर्षोत करून दाखविली आणि जगास थक्क केलें. हिंदुस्तानामध्यें हें निदान सुघारलेल्या राज्यकर्त्यांच्या शंभर वर्षांच्या कारकिर्दीत तरी झाले पाहिजे होतें, परंतु झालें नाहीं आणि आणखी शंभर वर्षे जरी गेली तरी होईल असें दिसत नाहीं. लोक सुशिक्षित होऊं द्यात मग आम्ही त्यांस जास्त जास्त शिक्षण मिळालें म्हणजे राज्यकारभारांतही घेऊ. परंतु हें शिक्षण मिळणार कधीं? आणि तें जर कधींच मिळणार नसेल तर राज्यकारभारांतही भाग कधींच मिळणार नाहीं हें उघड आहे. गोपाळराव म्हणाले, -आम्हांस कांहीं एकदम आजच स्वराज्य नको. परंतु आज कांहीं तरी जास्त हक्क दिल्याखेरीज गत्यंतर नाहीं. हे हक्क म्हणजे गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलांत, एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलमध्ये आणि स्टेटसेक्रेटरीच्याही कौन्सिलांत भरपूर सुधारणा करणें. त्याप्रमाणेंच जिल्हाधिकाऱ्यांस मदत व सल्ला देण्यास प्रांतानिहाय व जिल्हानिहाय बोर्डे असावीं. प्रथम दोन तीन वर्षे हीं केवळ सल्ला देणारी असावीं. परंतु पुढे त्या बोर्डांचा जिल्हाधिकाऱ्यांवर दाबही असावा. अशा प्रकारच्या सुधारणा अत्यंत जरुरीच्या म्हणून गोपाळरावांनी सुचविल्या. यानंतर थोड्या दिवसांनीं गोखले हिंदुस्तानांत परत आले.
 डिसेंबरमध्ये १९०६ ची अत्यंत संस्मरणीय काँग्रेस कलकत्त्यास भरावयाची होती. या वर्षी नवीन राष्ट्रीय पक्षाचे प्रणेते टिळक हेच अध्यक्ष व्हावयाला पाहिजे होते. टिळकांनी बनारसच्या काँग्रेसच्या वेळींच बहिष्कारावर निराळा ठराव व्हावा असा हट्ट धरला होता, आणि हा बहिष्कार सर्वप्रांतीय व्हावा असे त्यांचे रास्त म्हणणे होते. याच गोष्टीने बंगालला खरी सहानुभूति दाखवितां येणें शक्य होते. परंतु त्यावेळीं बहिष्काराचा निराळा ठराव पास झाला नाहीं. काँग्रेसमध्ये बहिष्कार या शब्दाला मान्यता मिळाली, आणि गोखल्यांना अध्यक्षस्थानावरून त्या शब्दास संमति दिली यावरच टिळक यांनीं त्या वेळेस संतोष मानिला. पुढच्या वर्षी आणखी पुढे जाऊं अशी त्यांनीं मनीं गांठ बांधून ठेविली. टिळकच अध्यक्ष पाहिजेत असा पालबाबूंनीं धौशा आरंभिला. मुंबईच्या फेरोजशहांस हें पसंत नव्हतें. आतां राष्ट्रीय सभेवर मोठी आपत्ति कोसळणार असें त्यांस वाटू लागलें. टिळकांस अध्यक्ष होऊं देतां कामा नये यासाठीं त्यांनीं निराळाच व्यूह रचला. मुंबईच्या सिंहाला बंगालच्या सुरेंद्राने सहाय्य देण्याचे ठरविलें. अँग्लोइंडियन पत्रेंही प्रागतिकांना गोंजारू लागली. या जहाल मंडळींना जर काँग्रेस अनुकूल झाली तर राष्ट्राचे तारूं भडकेल आणि त्याला नीट तारून नेणें अशक्य होईल अशी त्यांनी हाकाटी सुरू केली. याच पत्रांनी १९०५ मध्ये गोखल्यांसारख्यांसही गालिप्रदान करण्यास मागें पुढें पाहिलें नाहीं, कारण त्यांनीं बहिष्कार न्याय्य ठरविला होता. परंतु आतां राष्ट्रीय पक्ष प्रबळ होणार हें पाहून या अँग्लोइंडियनांस उकळी फुटली आणि प्रेमाचें भरतें आलें. परंतु 'अंतरींचा हेतु वेगळाचि' हें इंगितज्ञांसच समजून येतें. सुरेंद्रनाथांचे उजवे हात जे भूपेंद्रनाथ बसू त्यांनी दादाभाईस तार केली. 'राष्ट्रीय सभा मोठ्या आपत्तीत आहे. आपण तीस तारणार नाही का?' अशा अर्थाची ही तार होती. ही तार करतांना देशांतील इतर पुढाऱ्यांचा, स्वागत कमिटीचा, कोणाचाही सल्ला घेण्यांत आला नव्हता; देशावर येणाऱ्या आपत्तीमुळे या देशभक्तांस धीर धरवला नाहीं आणि दादाभाईस अध्यक्ष होण्यास त्यांनी बोलाविलें. दादाभाईंसारखा देशाच्यासाठी सर्व आयुष्य घालविणारा महर्षि अशा वेळीं नकार कसा देईल? त्यांनी अध्यक्ष होण्याचे कबूल केलें. दादाभाईंच्या अध्यक्षस्थानीं योजनेस विरोध कोण आणि कोणत्या तोंडानें करणार? परंतु हें एकंदर करणें कपट-नाटक होते असें म्हणण्यास आम्हांस यत्किंचितही दिक्कत वाटत नाहीं. हें देशांतील रास्त मतास पायांखाली तुडविण्यासारखे होतें. सरकारच्या कृष्णकारस्थानांसच कांहीं हंसावयास नको! परंतु करावयाचें काय? आपलेच दांत आणि आपलेच ओंठ! आजपर्यंत ज्या काँग्रेसमध्ये 'हम करे सो कायदा' असे वागलो त्याच काँग्रेसमध्ये आपणांस मान वांकवावी लागेल ही कल्पनाच या पुढाऱ्यांस सहन होत नव्हती. आजपर्यंत जसें चाललें तसेच पुढे चालावें असें यांचें पोक्त सांगणे असे. परंतु काळ बदलत आहे याकडे यांचे लक्षच नसे. १८८५ ते १९०६ या वीस वर्षात हिंदुस्तानांत किती तफावत पडली होती हें या पुढाऱ्यांनी जर पाहिलें असतें, आणि सरकारची वाढती बेपर्वाई जर निःपक्षपातपणें पाहिली असती तर काँग्रेसच्या धोरणांत फरक करणें त्यांसही इष्ट वाटलें असतें. परंतु एकाच वस्तूचें निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळें प्रतिबिंब पडतें, हा प्रकृतिभेद आहे; आणि 'स्वभावो दुरतिक्रमः' हा अबाधित नियम आहे; असो.
 राष्ट्रीय सभा भरली. नवीन पक्षाचें तेथें संख्याधिक्य होते. अध्यक्ष दादाभाई हे तर केवळ शांतिब्रह्म! त्यांनीं आपल्या पवित्र व स्फूर्तिदायक वाणीने स्वराज्याचा सोज्वळ मंत्र सांगितला हें पाहून इंग्लिश पत्रे जळफळूं लागलीं. इंग्लिशमन पत्र तर 'दादाभाईनीं आगीत तेलच ओतले' असे बहकूं लागलें! 'Being called upon to quench the flames of hatred towards the British Rule in India, he only used kerosine for that purpose." टिळक व पाल यांनीं राष्ट्रीय पक्षाची बैठक भरवून या काँग्रेसमध्यें स्वदेशी, बहिष्कार, व राष्ट्रीय शिक्षण हे तीन ठराव पसार करून घ्यावयाचें ठरविलें. यांपैकी तिसरा ठराव विशेष खडाजंगी न होतां पास झाला. परंतु खडाजंगी जी झाली ती उरलेल्या दोन मुद्दयांवर. सोंवळ्या मवाळांना हे ठराव सर्वराष्ट्रीय करणें अहितकारक वाटत होते. बंगालमधील बहिष्कार- चळवळ न्याय्य आहे असा ठराव पास झाला. या ठरावांत इतर प्रांतांनी बहिष्कार सुरू करावा असे नव्हते; अगर सुरू केला तर वाईट असेही नव्हतें. परंतु जें कृत्य बंगालमध्ये चांगले तेच इतर प्रांतांत तरी कसें वाईट ठरेल? बंगालमध्ये फाळणी हें एक जास्त कारण होतें. परंतु फाळणीखेरीज अशीं शेंकडों दुःखें दरएक प्रांतांत होतों कीं त्यांसाठी ही बहिष्कार-चळवळ उचलणें न्याय्य होतें. स्वदेशीचा ठराव विषयनियामक कमिटीत जेव्हां आणला गेला तेव्हां त्यांत, 'स्वार्थत्याग करूनही स्वदेशीच वापरणे इष्ट आहे' असे शब्द घाला असा टिळकांनी आग्रह धरिला. परंतु टिळकांची ही सूचना एकदम फेटाळण्यांत आली. टिळकांनीं मतें मोजा असा आग्रह धरला, परंतु त्यांचें म्हणणें मान्य करण्यांत आलें नाहीं. या एकाच गोष्टीवरून मताधिक्याने कोणतीही गोष्ट करण्याचे या सोवळ्या मंडळींच्या कसें जिवावर येतें तें स्पष्ट दिसतें. टिळक, पाल, अश्विनीकुमार दत्त वगैरे राष्ट्रीय पक्षाची प्रमुख मंडळीं उठून गेली आणि भर सभेत आपण ही सूचना पुढे मांडणार असे टिळकांनी अध्यक्षांस कळविलें. परंतु अध्यक्षांनी स्वतःच ही सूचना ठरावांत घालून दिली आणि तंटा विकोपास जाऊं दिला नाहीं. रास्त व न्याय्य गोष्टीसही नेमस्त कसे आढेवेढे घेत व अरेरावी करीत हें या गोष्टीवरून सूर्यप्रकाशाइतकें स्पष्ट होते.
 आम्हांस या बहिष्कारावरच्या ठरावाचे राहून राहून आश्चर्य वाटतें. स्वदेशी काय किंवा बहिष्कार काय सर्वराष्ट्रीय केल्याशिवाय त्यास जोर कसा यावा? एकाच प्रांतानें उचल करून कसें भागणार? सर्व शरीराचे अवयव जेव्हां आपआपलीं कामें बंद करतील तेव्हांच जीवराजा ताळ्यावर येईल परंतु एक हातच म्हणेल कीं, आपण कांहीं करणार नाहीं, आणि इतर सर्व अवयव मात्र निमूटपणें आपआपल कामे करूं लागतील तर शेवटी हातासच ताळ्यावर- मूळपदावर यावे लागेल. सर्वांनी जोराचा प्रतिकार केला पाहिजे. इतर प्रांतांच्या फुकाच्या- आणि मोठ्या मुष्किलीने मिळविलेल्या- शाब्दिक सहानुभूतीची किंमत कवडीइतकीही नाहीं असें आमचें प्रामाणिक मत आहे, मग इतरांस कसेंही वाटो. जेव्हां बहिष्कार सर्वराष्ट्रीय आहे असें राष्ट्रीय सभेत कांहीं मंडळी बोलूं लागली तेव्हां गोखल्यांस खालीं बसवेना. ते ताडकन् उभे राहिले आणि म्हणाले 'बहिष्कार हा सर्वराष्ट्रीय नाहीं. जो असें म्हणत असेल तो तें स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीवर म्हणत असला पाहिजे. काँग्रेसनें असें नमूद केलेलें नाहीं.' काँग्रेसनें या प्रश्नावर मूक वृत्ति स्वीकारली. बंगालमधील चळवळ न्याय्य आहे येवढेच कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेचें म्हणणें पडलें.
 यानंतरची १९०७ सालची सभा लजपतराय लाहोरला बोलावीत होते. परंतु नागपूर हें ठिकाण सोइस्कर पाहून तेच कायम करण्यांत आलें. आणि पुढील वर्षाचे अध्यक्ष राशबिहारी घोष हे असावे असें पुढारी मंडळीनें ठरवून आपसांत दिलजमाई केली. आपआपल्या प्रांतिक परिषदांतून कलकत्त्याचे ठराव हाणून पाडण्याचेंही त्यांनी ठरवून टाकले. १९०६ च्या राष्ट्रीय सभेंत राष्ट्रीय पक्षाचें बळ चांगलेच दिसून आले. पुढील वर्षी राष्ट्रीय पक्षाचें बळ कमी करून काँग्रेस आपल्याच हातांत ठेवावयाची व तदनुसार वर्षभर सारखे प्रयत्न करावयाचे असे प्रागतिक पक्षानें ठरवून टाकलें.
गोखल्यांचा देशभर व्याख्यानांचा दौरा.
 गोखल्यांनी जेव्हां हें नवीन पक्षाचें बळ पाहिलें तेव्हां कॉंग्रेसला सरकारची सहानुभूति मिळणार नाहीं अशी भीति त्यांस वाटू लागली. त्यांना मोर्ले साहेबांनी असे निक्षून सांगितलें होतें कीं जर हिंदुस्तानांतील लोक भलतीकडेच वाहवत जाऊन सरकारवर शिव्याशापांचा भडिमार चालू ठेवतील तर हिंदुस्तानास कोणतेही हक्क मिळणे शक्य नाहीं. लॉर्ड मिंटो यांचा पुतळा अनावृत करावयाच्या वेळेस लॉर्ड हार्डिज यांनीही याच प्रकारचे शब्द काढले. ते म्हणाले- "His task was rendered more difficult by a small body of the extremists, who hoped to wring concessions from the Government by acts of violence and crime. To a weaker man it might have appeared necessary on the appearance of the new agitation not only to meet it with repressive measures sufficient to ensure the preservation of public safety, but also to withhold all concessions, even those aspirations which he regarded as legitimate, for fear that he and his Government might be accused of yielding to threats and violence what they were unwilling to grant spontaneously.'
 गोखल्यांच्या मनांत हेच विचार आले. आपण हिंदुस्तानांतील लोकांची मनें क्षुब्ध होऊ देणार नाहीं अशी मोर्ले साहेबांस त्यांनी हमी दिली होती. आपल्या देशांतील सुशिक्षित तरुणांस ताळ्यावर आणावे; त्यांस सर्वत्र निराशा, घनदाट अंधकार असे जे भासत आहे, तो भास नाहींसा करून, आशेचे सोनेरी किरण त्यांस दाखवावे असे त्यांच्या मनानें घेतलें. त्याचप्रमाणे आपण स्वराज्य- वसाहतीचे स्वराज्य- मागत आहों, परंतु ते चालविण्याची खरी पात्रता आपल्या अंगी कितपत आहे; आपणांत तंटे, भांडणे किती आहेत; परस्परांवर विश्वास नाहीं, परस्परांवर श्रद्धा नाहीं, प्रेम नाहीं, लोभ नाहीं अशा स्थितीत परमेश्वरी घटनेने आपल्या हातांत सूत्रे आली, तरी सुयंत्रित व चांगला कारभार हांकण्यास आपण कितपत पात्र ठरूं याची मनोमय साक्ष तरुणांस त्यांना पटवून द्यावयाची होती. आधीं लायक व्हा; मग मागा हिरावून घ्या- वाटेल तें करा. परंतु जें राखण्यास आपण अद्याप समर्थ नाहीं, ते मागण्यांत तादृश फायदा नाहीं. हा उपदेश तरुणांस करण्यासाठी गोपाळरावांनी उत्तर हिंदुस्तानांत दौरा काढला. पंजाब आणि संयुक्तप्रांत यांतील मुख्य मुख्य शहरी त्यांनी फेब्रुवारी महिना व्याख्याने देण्यांत खर्च केला. अलाहाबाद, लखनौ, आग्रा, दिल्ली, लाहोर, अमृतसर वगैरे ठिकाणी त्यांनीं स्फूर्तिदायक व्याख्यानें दिलीं. देशाची सद्यःस्थिति, स्वदेशी, हिंदुमुसलमानांचे ऐक्य आणि सुशिक्षितांचें, व विद्यार्थ्यांचे कर्तव्य या चतुःसूत्रीवर त्यांचा भर होता.
 देशाच्या दुःस्थितीनें गोखल्यांचें अंतःकरण पिळवटून निघत नसेल काय? आपल्या मायभूमीस भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, क्षणक्षणीं, पदोपदी होणारा उपमर्द, यांनीं त्यांस संताप येत नसेल कां? देशांतील अठराविश्वे दारिद्र्य, अज्ञान, साफ बुडून गेलेले उद्योगधंदे, वाढती मृत्युसंख्या, एक कां दोन, हजारों गोष्टी त्यांच्या अंतःकरणास विंचवाच्या नांगीप्रमाणे दंश करीत असतील; परंतु ते निराश होत नव्हते. आणि इतरांनीही निराश होऊं नये असे त्यांचें सांगणें होतें, 'Indians should rise to the fullest height of their stature and be in their country what other people are in theirs.' ज्याप्रमाणे इतर देशांतील लोक मान वर काढून मोठ्या ऐटीनें वागतात तसेच आपलेही लोक व्हावे हीच त्यांचीही मनीषा होती. ही गोष्ट साध्य होण्यास आपणांस आपला कारभार चालविण्यास हक्क पाहिजेत हेही त्यांस मान्य होते. परंतु ते हक्क सांभाळण्यासाठी आपण प्रथम वळण लावून घेऊ या, समर्थ होऊ या, असें ते उपदेशीत होते. आपल्यामध्ये उत्साह, तेज, धैर्य आहे असे नवीन तरुणांवरून दिसतें. कारण हे गुण नसते तर ते अत्याचारासही प्रवृत्त होते ना. परंतु या पृथ्वीमोल गुणांना चांगल्या मार्गानि जाऊं द्या. ब्रिटिशांच्या सत्तेखाली आपण आलों ही एक तपश्चर्या आहे, आतां खडतर तपश्चर्या केली नाहीं तर या तपश्चर्येचें मिळणारें गोड फळ स्वराज्य तें कसे मिळेल? आणि मिळालें तरी कसें पचेल? ही तपश्चर्या अव्यंग व्हावी एतदर्थ तुम्ही आधीं ऐक्य संपादन करा. आपसांतील कलह एकमेकांशी मिळतें घेऊन मिटविण्यास आपण शिकले पाहिजे. आपण सर्व भाऊ भाऊ आहों, आपण प्रथम हिंदी आहों, आणि मग हिंदु, पारशी, मुसलमान, शीख, ख्रिश्चन आहों असें प्रत्येक सुजाण अंतःकरणास पटलें पाहिजे; आणि पटून या तत्त्वाचा परिपाक पदोपदीं वर्तणुकीत दिसला पाहिजे. न्याय आणि प्रीति आपली ब्रीदवचनें असावी. धर्म किंवा पंथ यांतच आपण गुरफटून जाऊं नये. जपानचे प्रख्यात आरमारी सेनापति टोगो हे धर्मानें ख्रिश्चन होते. त्यांस एकाने विचारलें, काय हो तुम्ही खिस्तानुयायी असून रशियाश कां लढतां? रशिया तर ख्रिस्तधर्मी आहे. हा थोर देशभक्त म्हणाला 'मी प्रथम जपानी आहे; नंतर ख्रिस्ती आहे.' 'I am a Japanese first and a Christian afterwards.' हे शब्द आपल्या देशांतील लोकांनी हृत्पटावर खोदून ठेवून, तदनुरूप वागण्याचा शक्य तो प्रयत्न केला पाहिजे. आपल्या प्रेमसिंधूंत सर्व हिंदुस्तानच्या जनतेस डुंबण्यास अवकाश पाहिजे. या गोष्टी आपणांस अशक्य वाटतात काय? कल्पना-साम्राज्यांत, रामाच्या राज्यांतच या गोष्टी सुसाध्य अशी आपली दृढ कल्पना झाली आहे काय? झाली असेल तर सर्वच ग्रंथ आटोपला म्हणावयाचा! हिंदुस्तानास जगाच्या संस्कृतींत एक महत्त्वाचे कार्य करावयाचें आहे, आणि त्यासाठीच तो जगला आहे; व जगणार आहे. तें कार्य कोणतें? तर जगाला प्रेम आणि सत्य यांचा धडा द्यावयाचा; आध्यात्मिक ज्ञान सर्वांस शिकवावयाचें. रामतीर्थ, विवेकानंद यांनी हेंच उच्च रवानें व उल्हासाने सांगितले. रानड्यांनी आपल्या व्याख्यानांतून हीच इच्छा पुनः पुनः प्रदर्शित केली आहे. आशा आणि श्रद्धा यांना अंतःकरणांत पट्टाभिषेक करा. आशा अमर असावी. निराशा आणि अडचणी या कोणाच्या मार्गात येत नाहींत? सर्वांच्याच मार्गांत येतात. अशाही वेळीं आपण आशापूर्ण राहून योग्य मार्गानें गेलें पाहिजे. परमेश्वरावर दृढ भरवसा ठेवून आपल्या पवित्र ध्येयासाठी झटले पाहिजे. समाजाची सर्वांगीण उन्नति व्हावी एतदर्थ आपणांमध्ये नैतिक बळ व शिस्त उत्पन्न करणें फार अगत्याचें आहे. गोपाळरावांचें प्रत्येक वेळीं सांगणे असें कीं, 'आपल्या लोकांमधून नैतिक सामर्थ्य कमी होत चालले आहे. ते मिळविल्याशिवाय अंगीकृत कार्यात जोम उत्पन्न करणें अशक्यप्रायच होय.' महात्मा गांधींची आज सुद्धां हीच सांगी आहे, की 'आपण अंतःकरणांतून परमात्म्याला- प्रेनाला आणि ऐक्याला- धुडकावून देऊन तेथे सैतानाला अधिष्टित केलें आहे.' म्हणून प्रत्येक देशभक्तानें, देशाच्या प्रत्येक कैवाऱ्यानें प्रथमतः लोकांत उच्च मनोवृत्तींचे बीजारोपण केलें पाहिजे. संकुचित भावना व क्षुद्र विचार यांची मगरमिठी आपणांस जर अद्याप सोडवितां येणार नाहीं तर आपला भाग्योदय कसा होणार? लोंकांस असा उपदेश करणें अपमानास्पद आहे असें कांहीं पुढाऱ्यांसही वाटतें. परंतु ही गोष्ट बोलून दाखविलीच पाहिजे, वरपांगी देशभक्तीचा भोंपळा फोडलाच पाहिजे, जे सूर्यप्रकाशाप्रमाणें स्पष्ट आहे तें बोलण्यास व तें नाहींसें करण्यास झटणें हें प्रत्येक सुजाण व देशप्रेमी माणसाचे कर्तव्यकर्म होय.
 आपण नवीन जगांत शिरत आहों. नवीन जगांत येतांना, नवीन कल्पना ग्रहण करितांना आपणांस किंमतही जबर द्यावी लागणार आहे. औद्योगिक, व्यापारविषयक, अथवा शैक्षणिक व्यापारविषयक कोणतीही चळवळ असो, आपल्या प्रत्येक चळवळींत शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्यानें चमकले पाहिजेत. हे गुण नसल्यामुळेच आपणांस अपयश येते. पुष्कळ वेळीं आपणांत सचोटी नाहीं असेंही दिसून येते. गोतेंत सांगितल्याप्रमाणें 'योगः कर्मसु कौशलम्'- योग्य तऱ्हेनें, कुशलतेनें आपले कार्य तडीस नेणें म्हणजेच योगाचरण करणें होय. परंतु ही गोष्ट अद्याप आपणांस साधत नाहीं. या गोष्टी व त्यांच्या जोडीला- आपणांस 'अधोधः' नेणाऱ्या- दुसऱ्या शेंकडों गोष्टी आहेत. डोळे उघडे ठेवावे, मन निर्विकार करून विचार करावा म्हणजे हीं कारणें दिसून येतील.
 आपणांवर विपत्ति कोसळत आहे यामुळे गोखले खचून जात नसत किंवा निराश होत नसत; निराश होणे त्यांना माहीतच नव्हते. आपण हालअपेष्टांतूनच पुढें गेलें पाहिजे. मोठ्या कष्टानें, श्रमानें जे आपण मिळवूं त्यालाच किंमत आहे. आपली मिळकत " Hallowed by sacrifice and Sanctified by suffering" अशी असावी. वसाहतींचा दर्जा प्राप्त करून घेणें हें आपले ध्येय आहे, आणि सर्व सनदशीर मार्गांनी आपण तें मिळविण्यासाठीं हें ध्येय गाठण्यासाठी झटले पाहिजे.
 वरीलप्रमाणें गोखल्यांनी आपल्या व्याख्यानांत ठिकठिकाणीं उपदेश केला. टिळकांनीही या वेळेस 'आपणांस वसाहतीचे स्वराज्य मिळवावयाचें आहे' असें लिहिलें होतें. अलाहाबादच्या व्याख्यानांत गोखल्यांनी या गोष्टीचा आनंदानें उल्लेख केला. याच व्याख्यानांत त्यांनी दुसऱ्याही कांहीं महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. युद्ध, परकी राष्ट्रांबरोबर युद्धविषयक संधान, बंड आणि अत्याचार या चार गोष्टी वगळून जें कांहीं आपण करूं तें सर्व सनदशीर आहे. सरकारास अर्ज व विनंत्या करणें या गोष्टीपासून तों थेट कर न देणें या गोष्टीपर्यंत सर्व कांहीं सनदशीर आहे. कर न देणें हें कायदेशीर आहे असें या व्याख्यानांत गोखल्यांनी स्पष्टच म्हटले आहे. परंतु त्यांचें एक म्हणणें असें कीं- 'Everything that was constitutional was not necessarily wise and expedient'- म्हणजे जें जें सनदशीर आहे तें तें सर्व शहाणपणाचे किंवा आज जरुरीचें आहे असें नाहीं, आम्हांस अमुक द्या असे सरकारला सांगण्यापेक्षां प्रथम या सर्व कल्पनांचा जनतेंत फैलावा केला पाहिजे. आपल्या मागें सर्व जनता उभी आहे असे सरकारास समजले पाहिजे म्हणजे मग आपल्या न्याय्य आकांक्षा सरकार अगदींच लाथाडील असें नाहीं.
 सरकारी शिक्षणसंस्थांवर बहिष्कार घालणे हेही घातुक आहे असें त्यांनी अलाहाबाद येथें स्पष्ट सांगितलें, "The building up of National Schools and Colleges all over the country out of private resources, on any scale worth speaking about, would take years and years of time and a tremendous amount of sacrifice on the part of the people and before anything substantial had been done, to talk of boycotting existing institutions was sheer madness." स्वार्थत्याग लोकोत्तर असला पाहिजे. लोकांत स्वार्थत्याग कितपत आहे हें अजमावण्यासाठी करबंदीचा जालीम उपाय सुरू करून पहा असे गोखल्यांनी या भाषणांत सुचविलें. कारण हा मार्ग सुचविल्यावर प्रत्येकावर जबाबदारी येईल आणि टाळाटाळीस वाव राहणार नाहीं. लोकांची तयारी जर दिसणार नाहीं तर इतर गोष्टींनी- शाळांवर बहिष्कार, कोर्टावर बहिष्कार, असल्या क्षुल्लक बहिष्कारांनी कांहीं एक होणार नाही. त्यांनी या आपल्या स्मरणीय व्याख्यानांत सरतेशेवटी मोठ्या कळकळीनें सांगितले, 'आपसांतील भेदभाव आतां विसरा व एक व्हा. क्षुल्लक गोष्टीसाठी रक्तपातावर जाऊं नका. जो स्वदेशीचें व्रत आचरतो, जो स्वार्थत्याग दाखवितो, जो देशाची राजकीय, औद्योगिक, सामाजिक कोणत्या तरी रीतीनें उन्नति व एकीकरण करण्याचा प्रयत्न करितो तो देशप्रेमी समजा- तो देशभक्त आहे असें समजा, 'Nation building is nowhere an easy task.' हें त्यांचें वाक्य किती अर्थगंभीर आहे! क्षणांत हिंदुस्तानचे नंदनवन बनवितां येईल काय? बोलल्याबरोबर चुटकीसरशी होण्यासारख्या या गोष्टी नव्हेत. व व्यक्तीला आपला उद्देश सिद्धीस नेण्यासाठीं जर कित्येक वर्षे लागतात, तर रा(ष्ट्र्)पुरुषास आपले उद्दिष्ट गाठण्यास किती काळ पाहिजे, किती पिढ्या गेल्या पाहिजेत? आज आपणांस सुखाचा घांस मिळणार नाहीं, परंतु आपल्या नातवंडांस- भावि पिढ्यांस आनंदाचा दिवस दिसावा यासाठी झगडा, प्रयत्न करा. या कामी सबंध आयुष्ये खर्च करावी लागतात. आपण म्हणजे खत आहों. या खतामुळे पुढे पीक येईल व आपणांस आपलीं मुलेबाळें दुवा देतील.
 या दौऱ्यांत एक महत्त्वाची गोष्ट गोपाळरावांस साध्य झाली. मुसलमानबंधूंची मनें त्यांनी काबीज केलीं. मुसलमानांच्या मनांत हिंदु पुढाऱ्यांविषयीं जी अढी बसली होती ती अढी गोखल्यांच्या भाषणानें बरीच नाहींशी झाली. गांठीचा पीळ उलगडत चालला. मन थोडे साफ झालें. सर्व देशाकडे आपलेपणाने पाहणारा महात्मा त्यांस दिसला. जुनीं भांडणे उकरून द्वेषाग्नि प्रज्वलित करणाऱ्यांपेक्षां नवीन ध्येयाकडे सर्वांची दृष्टि वेधणारा हा उदारमति त्यांनी डोळे भरून पाहिला. त्यांना कौतुक वाटलें व समाधान झाले. प्रत्येकजण प्रथम हिंदी आहे, आणि मग तो हिंदु, पारशी, मुसलमान आहे हें त्यांचे सोनेरी सूत्र त्यांच्या मनश्चक्षूंस सुखवूं लागलें. गोखल्यांच्या स्वतःच्या आचरणांत, उद्गारांत हें सर्व उतरलेलें होतें. अलीगडसारख्या शहरी त्यांचें जंगी स्वागत झालें. आपलेही हितसंबंध या पुढाऱ्याच्या दृष्टींतून वगळले जात नाहींत हें त्यांस पूर्णपणे पटलें, देशास जसा पाहिजे तसा हा नेता आहे असा त्यांनी मनांत कयास बांधला. पंथ, जाति यांच्या वर उड्डाण करणारा व केवळ भविष्यत् कालाकडेच नजर देऊन आपल्या गतीस वळण देणारा असा हा लोकधुरीण जेव्हां त्यांनी पाहिला तेव्हां त्यांच्या आनंदास भरतें आलें. हजारों लोक मिरवणुकींत सामील झाले. पंथभेद विसरून, गोपाळरावांच्या गाडीचे घोडे सोडून, या हिंदभूच्या सुपुत्राची गाडी त्यांनी ओढिली. भव्य व शोभिवंत कमानी उभारल्या होत्या; हत्ती झुलत होते. अशा प्रकारें थाटाचें स्वागत ज्यांस मुसलमान लोकांनी मनापासून दिलें असे गोखले हे पहिलेच हिंदी पुढारी होत. मानपत्रे, मुलाखती यांची गर्दी उसळली. गोपाळरावांस या सर्व मानमरातबाचा वीट आला असेल, परंतु त्यांचें तरुण मन, त्यांचें उत्साही हृदय या सर्व देखाव्यानें उचंबळलें यांत शंका नाहीं. आपण योग्य प्रयत्न केला, कच न खातां जर लोकांस नेटाने उपदेश केला, मार्ग दाखविला तर ते आपल्या पाठोपाठ येतील असें त्यांस वाटलें. स्वतःच्या बडेजावानें ते फुगले नाहींत; कीं चढेल झाले नाहीत. त्यांनी तर देशासाठी सर्वस्व सोडलें होतें. देशाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टी त्यांस सुचत नव्हत्या. त्याच गोष्टीचा त्यांस ध्यास लागला होता. व देशाचे तारूं अत्याचाराच्या खडकावर आपटू नये यासाठी त्यांनी हा दौरा काढला. त्यांत आपल्यास यश आले असें वाटून त्यांस क्षणभर बरें वाटलें.
कौन्सिलांतील कामगिरी.

 हा दौरा संपल्यानंतर त्यांस विसांवा घेण्यास फुरसत कोठें होती! कौन्सिलचे काम मार्च महिन्यांत सुरू झाले. या वर्षी मिठावरील कर एक रुपयापर्यंत कमी करण्यांत आला त्याबद्दल गोखल्यांनीं प्रथम समाधान दर्शविलें. मोर्ले साहेबांनी सुद्धां १९०६ साली इंग्लंडमध्ये केलेल्या अंदाजपत्रकावरील भाषणांत हा मिठावरील कर साफ कमी केला पाहिजे अशा तऱ्हेचे शब्द उच्चारले होते. ते म्हणतात, "I cannot regard, and I will not regard with satisfaction or even with patience, the continuance at a high scale of a tax on a prime necessity of life." ते पुढे म्हणतात, "I am glad to think that the very able and expert financial member of the Viceroy's council hopes to make further reductions in the duty, even though he cannot go so far as I should like to go, and sweep the thing away altogether." मोर्ले साहेबांच्या या भाषणाचा उल्लेख करून गोपाळरावांनींही मिठावरील कर पुढे मागें अजिबात नाहींसा होईल अशी आशा प्रदर्शित केली. परंतु मिठावरील कर जरी कमी झाला तरीही गरीब लोकांवर कराचे ओझें जास्त पडतेंच असें गोखल्यांनीं सांगितलें. फॉरेस्ट कायद्यामुळे गवताची काडी व लांकडाची काटकीही गरीब लोकांस मिळणे दुरापास्त होते. गुरांस चरावयास पुरेशीं कुरणें नाहीत. 'Under Forests they have been deprived of their immemorial right to free grazing and free fuel' - आपल्या निर्णय सिंधूत 'वनानि गिरयो नवस्तीर्थान्यासतनानि च । देवखाताश्च गर्ताश्च न स्वाम्यं तेषु विद्यते॥" असा नियम दिला आहे. परंतु बड्या अंमलदारांचे अवाढव्य पगार, लष्करचे लाड पुरविण्यासाठी होणारा अपरंपार खर्च वगैरे भरून काढण्यासाठीं, हें पवित्र प्रजानुरंजन- कार्य सिद्धीस, जावें एतदर्थ सध्यांच्या नीतिमान सरकाराने या सर्व ठिकाणी कर बसविले आहेत. यामुळे प्रत्येक गोष्टीची महर्घता वाढली. आणि यामुळें 'These classes consist almost entirely of a broken and exhausted peasantry, without heart and without resource, and sunk hopelessly in a morass of indebtedness.' रेल्वेसंबंधी कांहीं टीका करून मग ते आरोग्याकडे वळले. खजिन्यांतील शिलकेचें हें नववें वर्ष होतें. नऊ वर्षे सारखी शिल्लक पडत आहे, परंतु या शिलकेचा उपयोग बहुतेक रेल्वे वाढविण्याकडे करण्यांत आला. ही शिल्लक पडते याचें कारण "A surplus is so much more money taken from the people, either through miscalculation or in other ways, than was needed for the requirements of the Government, and as it is not possible to return this money to the taxpayers in a direct form, what the Government is bound to do with it is to apply it to purposes which are most calculated to benefit the mass of the people." ही शिल्लक लोकांच्या कल्याणार्थ कशी खर्च होईल इकडेच खरें पाहिलें तर सरकारचे लक्ष पाहिजे. रेल्वेच्या दळणवळणापेक्षां देशांतील आरोग्य वाढविणें हें सरकारचें सहस्रपट अधिक जवळचें व पवित्र कर्तव्य आहे. लाखों लोक प्लेग, कॉलरा, हिवताप यांनीं मरत असतां, तिकडे रेल्वे बांधून काय करणार? असा सवाल गोखल्यांनी विचारला. हिंदुस्तानांतील भयंकर मृत्युसंख्या पाहून सरकारच्या चित्तास कांहींच वाटू नये हें आश्चर्य होय. सरकार 'आम्ही राष्ट्रीय कर्ज वारतों' असें सांगतें. परंतु इतर देशांच्या मानानें हे कर्ज कांहीं फारसें नाहीं. गोखले म्हणतात, 'The further reduction of this small debt, is not a matter of urgency and can well wait, when the money devoted to it, may be far better employed in saving the lives of the people' स्थानिक संस्थांना आरोग्य सुधारणें अशक्यप्राय आहे हेही त्यांनी स्पष्ट सांगितले. जेव्हां जेव्हां शिल्लक उरेल तेव्हां तेव्हां ती प्रांतिक सरकारांत वांटावी आणि तिचा लोकांच्या आयुरारोग्यार्थ उपयोग होणें हें अत्यंत इष्ट व जरुरीचें आहे. रेल्वेसाठीं निराळें कर्ज काढावे परंतु ते कर्ज शेतकऱ्यांच्या पैशांतून वारणें म्हणजे महापाप होय. रेल्वे भरभराटत आहेत, त्यांच्या नफ्यामधून हळूहळू कर्ज वारावें किंवा व्याज भरावें. परंतु गोखले म्हणतात, 'It seems to me most unfair that the loans thus raised should be supplemented by the proceeds of taxation.'
 यानंतर रुप्याच्या नाण्यापासून- टांकसाळीपासून दरवर्षी होणारा पांच- सहा कोटींचा फायदा हा कशासाठीं खर्च व्हावयाचा तें सरकारने सांगितलें पाहिजे, असे सांगून गोखल्यांनी त्याच्या उपयोगाची दिशा दाखविली कीं, "The Government ought to adhere to the idea of the fund merely serving as a guarantee for the maintenance of a stable exchange.' सरकारनें पुढील साली तरी या बाबतीत आपला विचार सांगावा असे म्हणून ते दुसऱ्या प्रश्नाकडे वळले.
 अफूचें येणारें जें उत्पन्न आहे त्यासंबंधीं ते म्हणाले, 'I confess I have always felt a sense of deep humiliation at the thought of this revenue, derived as it is practically from the degradation and moral ruin of the people of China.' हिंदुस्ताननें जर हा व्यापार सोडला तर त्याचें जें नुकसान होईल त्याची भरपाई करण्यासाठी, हिंदुस्तानसरकारला ब्रिटिश खजिन्यांतून कांहीं रक्कम बहाल करण्यांत यावी असें जें कित्येक ठिकाणी ध्वनित करण्यांत येत होतें त्यासंबंधीं गोखल्यांनी आपले म्हणणे सांगितलें, की इंग्लंडकडून अशी मदत मिळणे हे अशक्याहून अशक्य. बरें समजा एक वेळ हें शक्य झालें, सूर्य पश्चिमेस उगवला, तरी आपणांस हा पैसा घेणें रास्त नाहीं. चीनवर अफूचा व्यापार लादण्यांत जरी इंग्लंडने तोफबाजी दाखविली, तरी या व्यापारापासून येणारे उत्पन्न फक्त हिंदुस्तानला मिळते. आणि यासाठीं हा अन्याय्य व पापमूलक पैसा कोणाकडून ही न घेतां आपण सोडून देण्यास तयार झालें पाहिजे. 'For that would be only another name for charity- when in the interests of humanity this wretched traffic has got to be abolished.' नंतर ते सैन्य कमी करावें या नेहमीच्या प्रश्नाकडे वळले. हिंदुस्तानांतील सैन्यासंबंधी लक्षांत घेण्यासारख्या चार गोष्टी असतात. शिपायाला शक्य तितका पैसा मिळावा, कारण त्या योगें तो तडफदार व उल्लसित राहतो. नंतर हिंदुस्तानांतील गोऱ्या लोकांची सुरक्षितता. या गोऱ्यांस आपले संरक्षण कसे आहे इकडे लक्ष देण्यास फावते परंतु त्यासाठी गरीब लोकांवर करांचे ओझें किती पडते आहे इकडे लक्ष देण्यास त्यांस सवड नसते. नंतर एतद्देशीयांचा प्रश्न. त्यांस पैसा द्यावा लागतो, परंतु ह्या पैशांतून होणाऱ्या सुखसोयी, हक्क वगैरे बाबतीत त्यांच्या तोंडाला पानेंच पुसली जातात. आणि यानंतर हिंदुस्तानसरकारची दृष्टि- हे चार प्रश्न आहेत.
 सैन्य व लष्कर यांसंबंधी उदार विचार परिस्थितीमुळे जे सुचावयास पाहिजेत ते सरकारास सुचत नसल्याने सुचविणें भाग होते. रशियाच्या स्वारीचा आतां मागमूसही उरला नसून जपानचा विजय, आणि चीन व इराण यांतील जागृति, या गोष्टींमुळे युरोपियनांस आपले पाय पूर्वीप्रमाणे जलदीनें पसरण्यास मिळणे शक्य राहिलेले नाही. १८ वे शतक आणि १९ वे शतक यांचा इतिहास जर तुलनात्मक दृष्टीने पाहिला तर असे दिसून येतें कीं, युरोपमधील जनता केवळ राजा आणि प्रधान यांच्या हाताखालीं वागणारी राहिली नाही. लढाई म्हणजे काय हें आतां जनतेस कळू लागलें आहे. यासाठी हिंदुस्तानांतील लष्कर कमी करून खर्च कमी करणें रास्त व प्रसंगोचित आहे. त्याचप्रमाणें लष्करचा कांहीं खर्च इंग्लंडने सोसला पाहिजे. लष्करमधला एतद्देशीय अधिकाऱ्यांचा दर्जा वाढविणें फार न्याय्य व जरूर आहे. याहून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू लोकांस पुनः शस्त्रे वापरण्याची परवानगी देणें. सर्व देशाला निःशस्त्र, निर्बल, निस्तेज करणे हे केवढें अघोर कृत्य आहे? सेनापतिसाहेबांनी 'गोखल्यांची मागणी दरवर्षी ऐकतो आहों' असें म्हटलें होतें. त्यास उद्देशून गोखले म्हणाले, 'But, my Lord, is it my fault that these things have to be pressed again and again on the attention of the Government? If His Excellency would like to hear less of these complaints the remedy lies to a certain extent in his own hands.'
 सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यासंबंधींच्या उदार धोरणास संमति, मान्यता दाखविली याबद्दल गोखल्यांनी सरकारचे आभार मानले. थोड्याच दिवसांत आपली इच्छा परिपूर्ण होवो अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. 'No real economic or social development of a people is possible without the education of the masses. Such education is the foundation and necessary antecedent of increased economic activity in all branches of national production, in agriculture, small industries, manufactures and commerce.'
 या प्रकारे अनेक प्रश्नांचा ऊहापोह करून गोपाळराव सद्यःस्थितीकडे वळले. ज्याप्रमाणे जातीजातींमध्ये एकमेकांत न मिसळण्याची प्रबळ प्रवृत्ति असते, त्याप्रमाणें हिंदुस्तानच्या जातिभेदावर कोरडे ओढणाऱ्या व टीका करणाऱ्या या गोऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतःची वेगळी जात बनविली आहे. त्यांच्या खुर्चीशेजारी कोणीं बसतां कामा नये. अधिकाराची जागा सदैव गोऱ्यांसच प्राप्त व्हावयाची. हे सिव्हिल सर्व्हेट- सनदी नोकर सांगतात की, आम्ही सद्यःस्थितीत सुखी आहों; व रयतेनेंही सुखी असावें. गव्हर्नर वा गव्हर्नर जनरलचे कान फुंकणारे हेच गृहस्थ असतात. यासाठी जी सुधारणा या सनदी नोकरांस नापसंत ती घडून येणें म्हणजे महाकर्म कठिण. कोणतीही मागणी असो, ती फेटाळून लावण्यास हे अस्तन्या सारून बसलेलेच, परंतु जनता खवळली आहे. अशा वेळीं कांहीं तरी सुधारणा द्याव्या असें सरकारास वाटतें आहे हें सुचिन्ह समजलें पाहिजे. परंतु सुधारणा पोंचट नसून भरीव- महत्त्वाच्या असाव्या असें सांगण्यापलीकडे गोखल्यांस काय करतां येणें शक्य होते? त्यांनी एक इशारा देऊन आपलें हें वार्षिक भाषण संपविलें. 'The situation is an anxious— almost critical one, and unless the highest statesmanship inspires the counsels of the Government, difficulties threaten to arise of which no man can foresee the end.'
 सैन्यांत हिंदु लोकांस अधिकार द्या, सर्वांस दरवाजे उघडे ठेवा वगैरे गोखल्यांच्या म्हणण्यास उत्तर देतांना लॉर्ड किचनेर साहेब जरा गरम होऊन बोलले. गोखल्यांच्या म्हणण्यास दर्भंग्याच्या महाराजांनी संमति दिली. व सांगितलें कीं हिंदी लोकांस, सुशिक्षितांस लष्करी शिक्षण दिलेच पाहिजे. परंतु गोखल्यांच्या या भाषणावर 'पायोनिअर' नें कुत्सित टीका केली. 'पायोनिअर' म्हणतो, 'Mr. Gokhale has not forgotten presumably a certain event known as the Indian mutiny. The creation of a citizen-army must be preceded by a guarantee of its loyalty and who is to guarantee the loyalty when the most eminent leaders of the people are men imbibed with the spirit of ill will and distrust as Mr. Gokhale? If this is the attitude of the men at the top what language is likely to be held by those lower down the ladder? The citizen-army would not be worth its rifles if it did not make immediate use of its power to turn against a conglomeration of abuses and oppression such as the Government is constantly portrayed by those who always claim to be speaking in the name of the entire people of India. Is the Government to pave the way itself for the catastrophe or shall it not rather wait until there are more evidences of sound sense and public spirit among the enlightened before commencing experiment?'
 या 'पायोनिअर'च्या पाणचट, चटोर व चारगट लिहिण्यास 'हिंदुस्तान रिव्ह्यू' नें थोडक्यांत पण मुद्देसूद उत्तर देऊन थप्पड लगाविली. 'हिंदुस्तान रिव्ह्यू' म्हणतो, 'But evidently Pioneer forgets that but for the splendid and deep loyalty of the princes and the people except perhaps in Oudh- as distinguished from the soldiers during the dark days of 1857, the map of India would have been differently coloured. It is well-known, although Pioneer chooses to forget it for the moment that the Mutiny of 1857 was not a national movement.' हिंदुस्तानांत राजपुत्र आला तो म्हणतो, 'We shall never forget the affectionate greetings of India and Burma.' जॉन ब्राइट म्हणत असे कीं, 'You may govern India if you like for the good of England, but the good of England must come through the channels of the good of India.' परंतु एकाद्यानें जरी असे उद्गार काढण्याचे नीति-धैर्य दाखविले तरी हिंदुस्तानवर जे अधिकारी येतात ते बहुधा हिंदुस्तानच्या हितास 'अब्रम्हण्यम्' समजणारेच असतात. इंग्लंडची तुंबडी भरली, गोऱ्यांचे गाल वर आले आणि लाल झाले कीं, पोटाची दामटी वळलेल्या हिंदुस्ताननें ढेकर दिलाच असे या बहादुरांना वाटतें! परमेश्वर हेंच चक्र उलटें फिरवील आणि याच चक्राला कधीं तरी उलटी कलाटणी मिळेल अशा विश्वासावर दृष्टि ठेवून अवनत राष्ट्रांनी पाय हलविले पाहिजेत. दुसरें काय?

भारत - सेवक समाज.

 या वर्षातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीच्या सभासदांचें प्रथम संमेलन- अधिवेशन पुणे येथें भरलें. ही संस्था- हा भारत सेवक समाज १९०५ साली जून महिन्यांत स्थापन करण्यांत आला होता. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत सर्व सभासद जमले आणि नियम, घटना वगैरे सर्व ठरविण्यांत आलें. सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीचं ध्येय, पूर्वी काँग्रेस स्थापण्याच्या आधी बंगाली तरुणांस उद्देशून ह्यूम साहेबांनी जें पत्रक काढलें होतें तदनुरूप बरेचसें होतें असें फेरोजशहांचे चरित्रकार मोदी हे म्हणतात. 'It may be mentioned— that the lines suggested by Mr. Hume were more or less adopted by Mr. G. K. Gokhale nearly three decades later in his Servants of India Society.'
 ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत वसाहतींचा दर्जा प्राप्त करून घेणें हें यांतील सभासदांचे ध्येय आहे. या ध्येयाच्या सिद्धीसाठीं वर्षेच्या वर्षे अविश्रांत परिश्रम झाले पाहिजेत, आणि देशाची संघटना केली पाहिजे. जे लोक या कार्यास येऊन मिळतील त्यांच्यावर संकटें कोसळतील, मोह आवरण घालूं पाहील; परंतु संकटांस टाळून व मोहास न भाळून आपले पवित्र कर्तव्य सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येक सभासदानें झटावयाचें. कुचराई करावयाची नाहीं.
 या सर्व गोष्टींची जाणीव हिंदुस्तानांतील लोकांस पटविली पाहिजे. ज्याप्रमाणे धर्मप्रसारार्थ सर्वसंगपरित्याग करून कामे करणारे लोक असतात, तद्वत् जनसेवा ही जनार्दनसेवाच आहे अशा उत्कट भावनेनें लोकांनीं आतां पुढे यावें. देशप्रेमापुढे इतर सर्व गोष्टी तुच्छ, कवडीमोल वाटल्या पाहिजेत. स्वार्थत्यागपूर्वक काम करा म्हणजे तें कार्य पवित्र आहे.
 एवंप्रकार उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवून निधड्या छातीने व परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून प्रत्येक देशहितचिंतकाने कामास आरंभ करावा, आणि आपल्या कामांत रमण्यांत सात्त्विक आनंद मानून सुखी व्हावें.
 सनदशीर मार्गाने चळवळ करून देशाची सर्वांगीण उन्नति करणें, व ती उन्नति करण्यासाठी देशांतील तरुणांस तयार करणें हें संस्थेचे ध्येय आहे. एतदर्थ खालील गोष्टी सभासदाने कराव्याः-
 (१) आपल्या स्वतःच्या उदाहरणानें लोकांत खरीखुरी देशभक्ति उत्पन्न करणें आणि तदर्थ त्यांस स्वार्थत्याग करण्यास शिकविणें.
 (२) लोकांस राजकीय शिक्षण देणें आणि समाजांत चळवळ करून लोकमत तयार करणें.
 (३) निरनिराळ्या जातीजातीतील विरोध काढून टाकून सलोखा व प्रेमभावना उत्पन्न करणें.
 (४) मागसलेल्या जातींत शिक्षाणाचा फैलाव करणें; औद्योगिक धंदे शिक्षणासंबंधी जास्त सुसंघटित प्रयत्न करणें.
 (५) अस्पृश्यांची सर्वतोपरी सुधारणा करणें.
 संस्थेचे हे पांच उद्देश आहेत.
 संस्थेची मुख्य कचेरी पुणे येथे असावयाची. तेथें रहावयास वसति— व अभ्यासासाठीं उत्तम पुस्तकालय असेल.
 (१) सोसायटीचा एक 'फर्स्ट मेंबर' म्हणजे मुख्य अधिकारी असावयाचा व तो जन्मपावेतों असावयाचा.
 (२) साधारण सभासद.
 (३) विद्यार्थी.
 समाजाचे हे तीन घटक होत. प्रत्येक विद्यार्थ्यास पांच वर्षे शिक्षण देण्यांत येईल.
 संस्थेचे सर्व नियम वगैरे फर्स्ट मेंबर आणि तीन साधारण सभासद यांच्या अनुमतीनें व सल्ल्याने होतील. बहुतेक सर्व सत्ता फर्स्ट मेंबरच्या हातांत राहील. तीन मेंबरांचें एक कौन्सिल असेल. या कौन्सिलने शिफारस केल्याशिवाय कोणालाही सभासद करून घेतां येणार नाहीं. प्रत्येक सभासदाने खालील शपथ घ्यावयाची असते:-
 १ माझ्या डोळ्यांपुढें सदैव देशाच्याच कल्याणाची गोष्ट प्रथम राहील; मजमध्यें जें कांहीं उत्कृष्ट आहे तें तें सर्व मी आपल्या देशाच्या सेवेस अर्पण करीन.
 २ देशाची सेवा करितांना स्वार्थलोलुपता मी मनांत येऊ देणार नाहीं.
 ३ सर्व हिंदी लोकांस मी भाऊ असें समजेन, आणि सर्वांच्या उन्नतीसाठी, पंथ व जात बाजूस ठेवून मी प्रयत्न करीन.
 ४ माझ्या किंवा माझ्या कुटुंबासाठीं सोसायटी जें कांहीं देईल त्यांतच मी आनंद मानीन. स्वतःसाठी याहून अधिक पैसा मिळविण्याच्या भरीस मी पडणार नाहीं.
 ५ मी आपले खासगी आचरण पवित्र ठेवीन.
 ६ मी कोणाबरोबर खासगी, व्यक्तिगत भांडणे भांडणार नाहीं.
 ७ सोसायटीचें ध्येय सदोदित मी डोळ्यांसमोर ठेवीन. शक्य तितक्या कळकळीनें व उत्कटतेनें मी सोसायटीच्या अभिवृध्यर्थ प्रयत्न करीन. सोसायटीच्या ध्येयाला प्रतिकूल असें मी कांहीं करणार नाहीं.
 १८९७ पासून गोपाळरावांच्या मनांत असा एकादा राजकीय पंथ निर्माण करावा असें घोळत होतें. त्या वेळचा त्यांचा विचार रामदासी पंथाप्रमाणे होता. बारा वर्षांची, बुद्धिमान् व पाणीदार मुले आपल्याजवळ ठेवावयाची; त्यांच्या पालकांपासून आम्ही मुलांस परत नेणार नाहीं असा करार करून घ्यावयाचा; नंतर या मुलांस सर्व प्रकारचें राजकीय शिक्षण द्यावयाचे; इंग्रजी शिकवावयाचें आणि आठ दहा वर्षे दृढ अध्ययन झाल्यावर निरनिराळ्या ठिकाणी कामे करण्यासाठी हे राजकीय संदेश- वाहक पाठवून देऊन एकीकरण करावयाचें; असा त्यांचा प्रथम मानस होता; या मुलांचा सर्व खर्च कसा चालावयाचा? याकरितां गोपाळरावांनी एक युक्ति योजिली होती. त्यांनी आपले संबंधी दत्तोपंत वेलणकर यांस पुण्यास बोलाविलें. दत्तोपंत हे गोखल्यांच्या बंधूंचे जांवई. त्यांनी दत्तोपंत यांस भांडवल देऊन कांहीं मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदा करा असे सांगितलें, आणि या धंद्याच्या फायद्यांतून या मुलांचा खर्च चालवावयाचे ठरविलें. गोपाळरावांची महत्त्वाकांक्षा जबर आणि ते आपल्या मनांत कल्पनाही मोठ्या मांडीत, परंतु हें शक्य कितपत आहे हें त्यांस मागाहून कळे. रानडे याचें मेमोरिअल करतांना प्रयोगशाळेसंबंधीं त्यांचे असेच मोठे विचार होते. परंतु त्यांतून काय निष्पन्न झालें? असो. पुढें गोपाळराव कौन्सिलमध्ये गेले. मोठ्या लोकांशीं वावरूं लागले. हळूहळू त्यांचे तेज फांकूं लागलें, त्यांचे विचार आतां बदलले. लहान मुलें घेण्याऐवजीं बी. ए. वगैरे झालेली, शिकलेली, तरुणबांड मंडळीच आपल्या पंथांत घ्यावी; त्यांस राजकीय शिक्षण दोन तीन वर्षे द्यावें; त्यांच्या निर्वाहाची तरतूद करून त्यांस देशसेवा हेंच एक कर्तव्य, ध्येय दाखवून द्यावें असें ठरलें आणि वरीलप्रमाणें नियम वगैरे झाले.
 हा भारत सेवक समाज निर्माण करितांना गोखल्यांच्या डोळ्यांपुढे युरोपांतील जेसुइट लोकांचे प्रयत्न बहुधा असावे. खरोखर या जेसुइट लोकांचा इतिहास फार स्फूर्तिदायक आहे. आपली घरेंदारें, आपला देश सोडून लांबलांबच्या देशांत सेंट झेव्हिअरसारखे लोक केवळ एकाच ध्येयाने प्रेरित होऊन- परक्या लोकांत, प्रतिकूल परिस्थितीस न जुमानतां जात; ज्यांची भाषा भिन्न, रीतिरिवाज भिन्न, त्यांस त्यांची भाषा शिकून उपदेश करणें, त्यांच्या भाषांची व्याकरणें लिहिणं, त्यांस सुशिक्षित करण्यासाठी शाळा उघडणें या गोष्टींची कोण मनुष्य प्रशंसा करणार नाहीं? मनुष्यमात्राचें कल्याण- आपआपल्या बुद्धीप्रमाणें व समजुतीनुसार करण्याची ही केवढी महनीय इच्छा? या सदिच्छेचें कौतुक कोण करणार नाहीं? मिशनरी लोक परक्याच्या प्रांतांत जाऊन जर इतकी खटपट करतात तर आपल्याच देशांत, ज्यांचीं मनें आपण जाणतों, ज्यांचे आचारविचार व स्वभाव आपणांस पूर्ण माहीत आहेत, जे आपल्याच धर्माचे व हाडामांसाचे, ज्यांचे व आपले हितसंबंध एकत्र निगडित झाले आहेत त्यांच्यामध्ये कार्य करण्याची स्फूर्ति आपणांस कां होऊं नये?
 या जेसुइट लोकांपेक्षां कदाचित् रामदासी पंथ गोपाळरावांच्या मनचक्षूंसमोर जास्त प्रामुख्यानें असावा. रामदासांचें सतराव्या शतकांतील कार्य पाहिलें कीं, मन चकित होतें. दळणवळणाचीं नीट साधनें नसतांना, व मुसलमानांचें वर्चस्व सर्वत्र स्थापित झालेलें असतांना त्यांनीं अकराशें मठ स्थापले. असा एकही देशाचा भाग सोडला नाहीं कीं जेथें मठ नाहीं. जें जें भरभराटीचें मुसलमानी शहर असेल तेथें तेथें समर्थांचे दोन मठ असावयाचेच. या मठांचे एकीकरण केलें, प्रत्येकास शिस्त लाविली, मठांतून ग्रंथालये उघडलीं, आणि एक प्रकारें सर्व प्रकारचें नवचैतन्य राष्ट्रांत खेळविलें, नसांनसांतून जीवनरस ओतला. जें समर्थ एकटे भिक्षेच्या बळावर कोणापाशीं विशेष याचना न करितां करूं शकले तें सध्याच्या सुशिक्षणाच्या वाढत्या काळांत, दळणवळणाची साधनें अनुकूल असतां कां करतां येऊं नये? करतां येईल, परंतु प्रयत्न झाले पाहिजेत. 'जो तो बुद्धीच सांगतो' हा मामला मोडून जे आपला नेता सांगेल तदनुसार वागणें हेंच अनुयायांचे काम असावें आणि अशा रीतीनें संघटित काम सूत्र-पद्धतीनें जर केलें तर होईल असे गोपाळरावांस वाटले असावे. एकएकट्यांनी प्रयत्न करणें आणि एकमेकांच्या प्रयत्नांची एक मेकांस ओळख नसणे या तऱ्हेने पाऊल पुढे पडावयाचें नाहीं. एकाच विचाराचे, एकाच ध्येयाचे, एकाच उच्च मनोवृत्तीनें भारून गेलेले लोक जर देशसेवेचें कंकण करी बांधितील तर देशाची बरीच सुधारणा हां हां म्हणतां होईल. सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील तयाचें'- चळवळींत व संघटनेतच सामर्थ्य असतें. 'वन्हि तो चेतवावा रे, चेतवितांचि चेततो'- एकदां काडी लावून द्या कीं काम झालें! देशांतील अज्ञानाला प्रत्येकाने काडी लावावी कीं ज्ञानाचा उजेड आलाच. 'यत्नें तो देव जाणावा' हें समर्थांचें अमोल उपदेशवचन आपण डोळ्यांआड करून भागणार नाहीं. आणि समर्थांनीं ज्या गोष्टीवर विशेष जोर दिला ती गोष्ट ही कीं, 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे'- जसें सांगाल तसें वागा. उच्चाराप्रमाणे आचार असेल तर तुमच्या सांगीचा जास्त परिणाम होईल. प्रतिज्ञापत्रकांत या गोष्टीचा समावेश आहे. आधुनिक पद्धतीचा रामदासी पंथ गोपाळरावांनी निर्माण केला. या तरुणांचा शिक्षणक्रमही मोठ्या मार्मिकतेनें आंखला होता. ज्या शिस्तींतून गोखले स्वतः गेले तीच शिस्त इतर कार्यकर्त्यांस लावणें त्यांस इष्ट व जरूर वाटलें पांच वर्षे विद्यार्थ्यानें- देशसेवकानें सर्व प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास करावा. आणि मग लेखणी व जिव्हा यांस चालना द्यावी. म्हणजे तो जें बोलेल त्याचा लोकांस विचार करावाच लागेल. कारण त्याचे लिहिणें व बोलणें भारदस्त व विचारार्हच असेल. बेझंट- बाई म्हणतात "For one thing, I would ask you specially to help this young society. It is because he demanded that everyone who came into it should study before he acted and should know before he spoke. Five years of silence be imposed on those who came to him before they might write or speak or try to guide their fellowmen and there he showed his wisdom and the secret of his power, for he never spoke save with knowledge behind speaking, and those who try to emulate his example must also learn before they begin to teach.' अशा रीतीनें तरुण सुशिक्षित करावयाचे. नंतर देशासाठीं, त्यांनीं सोसायटीच्या भिक्षा-झोळीतून जो घांस मिळेल त्यावर तृप्त राहून निरहंकार वृत्तीनें आणि निरपेक्षपणे काम करणें हें कठिण तर खरेंच, परंतु असें करण्यासाठीं जेव्हां हजारों तरुण पुढें येतील तेव्हांच थोडा तरी भाग्योदय जवळ आला असें म्हणतां येईल. स्वप्नांत सुद्धां देशाचे विचारच मनीं यावे, खेळावे, आणि कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यांत जागृतपणाचा वेळ जावा- यापेक्षां उच्चतम आयुष्यक्रम कोणता आहे? या कठिण कार्याला लोक वाहून घेतील कीं नाहीं अशी शंका चिरोलसाहेबांनी आपल्या पुस्तकांत प्रदर्शित केली आहे. लोक परमेश्वरप्राप्तीकरितां- पारलौकिक हितास्तव स्वार्थावर निखारा ठेवितील, घरदार सोडतील, मानापमानाचे गाठोडें गुंडाळतील; परंतु जेथें पारलौकिक हिताचा प्रश्न नाहीं; जनसेवेचें खडतर व्रत- ऐहिक कामच जेथें आहे तेथें लोक धांवणार नाहींत, असें हिंदी मनाबद्दल कोती समजूत करून घेणाऱ्या चिरोलसाहेबांस वाटलें. ते म्हणतातः-
 "Will 'the servants of India' find the same permanent Inspirations in the cult of an Indian Motherland, however highly spiritualized, that has no rewards to offer either in this world or in any other?"
 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' असें आमचेकडेही सांगतात. परोपकार करणें म्हणजे परमेश्वरासच संतुष्ट करणें हें हिंदवासी पूर्णपणे जाणतात. भारतसेवक समाजाच्या नियमावलीत 'God' हा शब्द कोठेही नसला, तरी ज्या ईश्वराच्या लेकरांसाठी, ज्यांच्या हितासाठीं हा संघ स्थापन झाला होता, त्या संघांत सामील होण्यानें आपल्या देशाचेंच नव्हे तर परमेश्वरानें नेमून दिलेलें, त्याला आवडेल असेंच काम आपण करीत आहों ही प्रत्येकाची भावना न होणे अपरिहार्य आहे. समष्टीच्या हितांत व्यष्टीचें हित विसरणें, समष्टीचें हित तेंच व्यष्टीचें हित असो वा नसो, व्यक्तीनें तेंच विशेषतः करावें असें आमचा धर्म शिकवितो. व्यष्टीचें हित व्यष्टीनें अंतरंगी सुधारत जाणे यांत आहे व तदनुसार नंतर इतरांस मार्ग दाखविणें म्हणजेच समष्टीचें हित. चिरोलसाहेबांस ही शंका कां आली हे आम्हांस समजत नाहीं. 'जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा ॥,' किंवा 'दया क्षमा शांति । तेथें देवाची वसती ॥' या व अशा प्रकारच्या शेंकडों उद्गारांवरून हिंदुधर्माचें उज्ज्वल स्वरूप हेंच दिसतें कीं, ईश्वर स्वर्गात विलसत नसून, तो प्रत्येकाच्या हृदयसिंहासनावर अधिष्ठित झालेला आहे. तेव्हां वरच्या अभंगांत दर्शविल्याप्रमाणें जो सर्वांस आपल्या कुटुंबाप्रमाणे लेखतो त्याच्या जवळ पारलौकिक प्रश्नच उरत नाहीं. परलोकांत जे मिळवावयाचें तें त्याच्या हृदयमंदिरांत येऊन बसलेलेच असतें, हिंदु लोकांस जनसेवा म्हणजे धार्मिक भावनामय परमेश्वरास आवडणारे कृत्यच वाटतें. भिकाऱ्याला दान करणें किंवा रस्त्यावरचा दगड दूर करणें या साध्या गोष्टीतही धार्मिक भावना आहे. जर साधारण मनुष्यालाही प्रत्येक गोष्ट धर्ममय वाटते तर जनसेवेसारखे लोकोत्तर नैष्ठिक व्रत ज्याने घेतले त्याला धार्मिक स्फूर्ति कां वाटू नये?
 गोखल्यांनी पैसे मागितले म्हणजे या संस्थेसाठी गोपाळरावांनी पैसे कसे मिळविले हें त्यांचे त्यांनाच माहीत. त्यांना फार श्रम झाले, अत्यंत दगदग झाली, परंतु पोटच्या पोरापेक्षांही संस्था त्यांना प्यारी. स्वतःचे स्मारकच त्यांनी जणूं उभारून ठेवलें. आपले कर्तृत्व, आपलीं ध्येयें, आपले जीवन सर्वस्व त्यांनी येथे ओतलें, गोखल्यांस मुंबईच्या धनिक लोकांचा पाठिंबा चांगलाच असे. पारशी समाजांतही त्यांचें वजन होतें. त्यांस नकार कोण दाखविणार? अशा प्रकारचा निःसंग भिकारी दारीं येणें म्हणजेच खरोखर भाग्य! गोखले पुष्कळदां स्वतःच वाटेल तो आंकडा घालून श्रीमंत शेटजींकडे पाठवीत व लगेच शेटजींकडून पैसे येत. तुम्ही पैशाचे काय करतां असें कोण विचारील? त्याशिवाय जोपर्यंत वरिष्ठ कायदे- कौन्सिल कलकत्यास होते, तोपर्यंत दर वर्षी कौन्सिलच्या बैठकीहून परत येतांना गोपाळराव धनसंपन्न बंगाली जमीनदारांकडून, व लक्षाधीशांकडून दहावीस हजार रुपये घेऊन यावयाचे. गोपाळराव जोपर्यंत हयात होते तोपर्यंत पुष्कळ बंगाली लोक दर वर्षी नियमानें पैसे पाठवीत असत. गोखल्यांच्या या भारत सेवक समाजासाठी इंग्लंडांतील एका गरीब बाईनें एक गिनी पाठवून दिली होती. राजवाडे यांच्या ग्रंथप्रकाशनासाठी चिपळूणच्या एका गरीब माणसाने असेच एकदां चार आणे दिले होते. गोपाळरावांस त्या गिनीचे फार कौतुक वाटले व ते म्हणाले 'This is real affection,' यांनाच कामाची माहिती खरी समजली. आतां संस्थेला कायमचें स्वरूप आलें आहे. निसर्गसौंदर्य, शुद्ध हवा, गांवापासून जरा दूर जागा, राजकीय स्वरूपाच्या ग्रंथांचा, रिपोर्टांचा, सर्व प्रकारच्या कागदपत्रांचा व उत्तमोत्तम ग्रंथांचा संग्रह व निरनिराळ्या वर्तमानपत्रांच्या फायली, मासिकें अशी येथे सर्व जय्यत तयारी आहे. काम करणाऱ्याला येथें पूर्ण वाव आहे. इच्छा व उद्योग यांची जोड मात्र लाभली पाहिजे. नाहीं तर जड पुस्तकांचा काय फायदा?
 गोपाळरावांच्या भारत सेवक समाजाचें हें पहिले अशिवेशन पार पडत असतां सर्व देशाला आग लागली होती. बाबू बिपिनचंद्र पाल हे मद्रासच्या समुद्र किनाऱ्यावर आपल्या जळजळीत व्याख्यानांनी तरुणांचीं मनें पेटवून देत होते. पालबाबूंचें अमोघ व अचूक परिणामकारी वक्तृत्व आणि तरुण लोकांचीं उत्साही व भावनापूर्ण मनें, मग काय विचारतां? वक्तृत्वाने केलेले असे परिणाम हिंदुस्तानच्या इतिहासांत अपूर्व होत. ज्या धोक्याची सूचना कौन्सिलमधील भाषणांत गोखल्यांनीं दिली होती, ती संकटें भराभर येऊ लागली. वक्तृत्वाचा गडगडाट आणि ओजस्वी तेजस्वी लेखणीचा चमचमाट, देशांतील स्थिति कशी आहे आणि वारा कोणत्या दिशेनें वहात आहे हे दाखवू लागला. कोठें ना कोठें सर्वत्र धामधूम चालू होती. खुद्द मुंबईमध्ये मुंबईच्या म्युनिसिपालिटीचे केवळ जीव कीं प्राण जे मेथा त्यांच्यावर अधिकारीवर्गाने कांहीं लोकांस खाकोटींत घेऊन गिल्ला चालविला होता. या गोष्टीचा निषेध करण्यासाठीं मुंबईस जंगी जाहीर सभा भरली होती. गोपाळराव तेथे अध्यक्ष झाले.
 या गडबडींत असतां गोपाळरावांवर एक अकल्पित कौटुंबिक आपत्ति कोसळली. त्यांचे वडील बंधु गोविंदराव- ज्यांनीं त्यांस वडिलांच्या मागें शिक्षणाची गोड फळें चाखविलीं, व वडील आहेत की नाहीत याची स्मृतिही होऊ दिली नाहीं, असे पितृतुत्य बंधु हा लोक सोडून २१ जून १९०७ रोजीं गेले. घरीं गरिबी होती तरी गोपाळास त्यांनीं कधीं उणें पडूं दिलें नव्हतें. असा उदार मनाचा, प्रेमळ भाऊ मरण पावल्यामुळे हळुवार मनाच्या गोपाळरावांस फार शोक झाला. त्यांच्या मनाला धक्का बसला. भावाच्या मुलांमाणसांस आतां गोपाळराव हेच आधार होते. देशांतील बिकट परिस्थितीमुळे त्यांस चार अश्रु ढाळण्यासही फुरसत नव्हती.
 पंजाबमध्ये असंतोषाच्या लाटा उसळत होत्या. कॉलनायझेशनचे बिल व लॅडॲक्विझिशन बिलांत दुरुस्ती करण्याचें बिल यांनी पंजाबांत फार खळबळ माजली. लोकांस संताप आला. सरकारने दडपशाहीचं सत्र सुरू केलें. लाला लजपतराय व अजितसिंग या दोन पुढाऱ्यांना अटक करण्यांत येऊन त्यांस शिक्षा झाली.
 पंजाबमध्यें जमीनमहसुलामध्ये वाढ करण्यांत आली. बारीदोआब कालव्याच्या पाण्याचे दर वाढविण्यांत आले. याच सुमारास कॉलनायझेशन बिल पंजाब सरकारनें पुढे आणलें. परंतु लॉर्ट मिंटो यांनी या बिलास संमति देण्याचें नाकारलें. कालव्याच्या पाण्याचे दर वाढले तेव्हां आम्ही कर देत नाहीं असें जमीनदार म्हणूं लागले आणि सरकारनेही माघार घेतली. पंजाबांत असंतोष पसरविण्यास मुख्यतः जबाबजार जर कोणी असेल तर सरकारच्या पुठ्ठ्यांतील 'सिव्हिल आणि मिलिटरी गॅझेट' हेंच होय. हिंदुस्तानांतील सुशिक्षितांस शेलक्या शिव्यांचा अहेर करण्यांत या गॅझेटानें खरोखरच आघाडी मारली. 'बडबड्ये पदवीधर' (Babbling B.A.s), हलकट जातीचे (Base-born), निंदास्पद सुशिक्षित वीर (An unhonoured nobility of the school), दास (Serfs), रडतराव, (Beggars on horseback), अंत्यज वर्ग (Servile classes), कलंकित जात (A class that carries a stigma)- एक कां दोन हजारों गालिप्रदानें गॅझेट रोज देत होता. सर डेन्सिल बेट्सन यांच्याकडे पंजाबी लोकांनीं याबद्दल दोनदां अर्ज केले. परंतु या लिखाणाबद्दल खेद प्रदर्शित करण्यापलीकडे त्यांनी जास्त काय करावें अशी तुमची अपेक्षा आहे असे त्यांनी नक्राश्रु ढाळले. परंतु हिंदी पत्रांच्या मुस्कटदाबीस मात्र पारावार राहिला नाहीं. 'इंडिया' पत्रांत एक पत्र छापण्याबद्दल त्याच्या संपादकास- पिण्डीदास यांस पांच वर्षांची सजा समर्पण करण्यांत आली. छापणारा 'दीनानाथ' यास दोन वर्षे तुरुंगवासाच्या सुखाचा आस्वाद घेण्यास माबाप व न्यायनिष्ठुर सरकारनें पाठवून देलें. 'पंजाबी' पत्रानें वेठीस मजूर लावण्याच्या दुष्ट कृत्यावर टीका केली. दोन लोक या वेठीसाठी मारले गेले हें लिहिण्याबद्दल सदरहू पत्राचे मालक 'लाला जसवंतराय' यांस एक हजार रुपये दंड व सहा महिन्यांची शिक्षा झाली. संपादक के. के. आठवले यांस दोनशे रुपये दंड व सहा महिने शिक्षा झाली. ही गोष्ट एप्रिल १६, १९०७ रोज झाली. परंतु ही धरपकड संपते न संपते तोंच रावळपिंडीस दंगे झाले. मे महिन्यांत ही खळबळ झाली. अजितसिंग यांनीं (Indian Patriot's Association) 'हिंदी देशभक्तांची सभा' स्थापिली होती. तिचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची गाऱ्हाणी दूर करणें हा होता. लायलपूर मुक्कामीं लालाजी मार्चच्या २२ तारखेस गेले होते. तेथे त्यांनी एक जोरदार भाषण करून 'अधिकारी हे जनतेला जबाबदार असले पाहिजेत.' (Officials are servants of the public) असे स्पष्ट बजाविलें. या गोष्टीमुळे सरकारचा अजितसिंग व लालाजी यांच्यावर डोळा राहिला. एप्रिल सात आणि एकवीस या दोन दिवशीं अजितसिंग आणि हंसराज सोहानी यांनी पुनः व्याख्यानें दिली. डेप्युटी कमिशनर यांनी अध्यक्ष आणि दोन वकील- यांस बोलावून आणले. सहा वकील मेच्या तीन तारखेपासून आक्टोबरच्या एक तारखेपर्यंत तुरुंगांत डांबून ठेवले. त्यांच्यापैकीं एकजण गतप्राण झाला. आणखी साठ लोक रावळपिण्डीस पकडले गेले. तिघां जणांस सात वर्षांची शिक्षा दिली. या खटल्यासाठी दिल्लीचे सेशन्स जन मार्टिनो यांस स्पेशल जज नेमलें होतें. मेच्या ९ तारखेस लालाजी व आजितसिंग यांच्यावर कोणताही आरोप शाबीत न करतां त्यांस एकदम हद्दपार करण्यांत आलें. मेच्या ११ तारखेस व्हाइसरॉयांनी पंजाबमध्ये सभाबंदीचा हुकूम फर्माविला. लालाजींचा अपराध न दाखवितांही शिक्षा सांगण्याबद्दल मोर्ले साहेबांनी १८१८ च्या रेग्युलशनकडे बोट दाखविलें. सभा भरवावयाची झाल्यास सात दिवस सरकारला आगाऊ कळविले पाहिजे, असे जाहीर झालें. मेच्या २७ तारखेस व्हाइसरॉयने शहाणपणानें कॉलनायझेशन बिलास शेवटचा नकार दर्शविला, ही गोष्ट अलाहिदा. पण एकंदरीत पंजाबात असंतोष माजून राहिला होता. एतद्देशीयांस न्याय कसा तो मिळतच नव्हता. लालाजीसारख्या दिलदार माणसास इद्दपार करणें व तेंही विनाचौकशी, हें पाहून 'गॅझेट' ला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तें लिहितें, 'Lala Lajpatroy simply becomes honest'. थोरो या प्रख्यात व थोर अमेरिकनानें एके ठिकाणी म्हटलें आहे की 'ज्या राज्यांत कोणीही अन्यायाने पकडला जातो, अशा राज्यांत सच्चा व सचोटीचा जो माणूस असतो त्यास राहण्यास कारागृह हेंच योग्य स्थान होय. (Under a Government which imprisons any unjustly the true place for a just man is also a prison) प्रत्येक चळवळींत ज्यानें पुढाकार घ्यावा, मग ती चळवळ, धार्मिक, शैक्षणिक राजकीय, सामाजिक, कसलीही असो, जो म्हणजे लाखांतही न मिळणारे माणिक, ज्याच्यावर आरोप करण्यास डोळ्यांत तेल घालून बसलें तरी तिळभर सुध्दा जागा सांपडावयाची नाहीं असा मनुष्य सरकारच्या डोळ्यांत साहजिकच खुपावयाचा! मॉडर्न रिव्यू म्हणतो, 'Every child must pray for his well-being and that of the cause and the country, and the sacred word 'a prisoner for country's sake' must shine about his name like a radiant aurora.' सरकारचा अशा लोकांवर दांत, परंतु स्वतःचीं कार्टी मात्र शेफारून ठेवलेली! नेव्हिन्सन म्हणतो 'But in none of the Indian papers have I seen more deliberate attempts to stir up race-hatred and incite to violence than in Anglo-Indian papers which suffer nothing. If the Indian Press is violent Anglo-Indian Press is almost invariably insolent and provocative.' ब्रिटिश सिंह एका पंजाखाली पंजाबला चिरडून टाकीत असतां, तिकडे दुसऱ्या पंजाने बंगालला चिरडीत होता. फाळणीपासूनच बंगालचें नशीब फिरलेलें! सरकार नेहमी मुसलमानांचाच पक्षपात करावयाचें. मुसलमानांसच जास्त जागा द्यावयाच्या. १५ मे १९०६ रोजी सरकारने एक सर्क्युलर काढलें कीं, मुसलमानांची ठरीव संख्या भरून निघेपर्यत हिंदूंस नौकरी द्यावयाची नाहीं. मुसलमानांचे पुढारी सरकारच्या कच्छपी लागून आत्महित करण्यास मुसलमानांस सांगत. सय्यद अहंमदांचे अभिमानाचे व ताठ्याचे उद्गार वाचा कीं मुसलमानी कावा कसा आहे तो लक्षांत येईल. ते म्हणतात:- 'My brother Musalmans, I again remind you that you have ruled nations, and have for centuries held different countries in your grasp. For seven hundred years in India you have had imperial sway. You know what it is to rule. Be not unjust to that nation which is ruling over you. You can appreciate these matters; but they cannot who have never held a country in their hands nor won a victory'. फाळणी ही मुसलमानांच्या पथ्यावरच पडली. त्यांचें नुकसान कांहींच नव्हतें. फाळणी- नंतर स्वदेशी आली. मुसलमान स्वदेशी स्वीकारीनात. त्यांच्यावर सार्वजनिक बहिष्कार टाकून त्यांस जिन्नस मिळू नये असे करण्यांत आलें शेवटी डाक्याचा नबाब सलीमउल्ला याच्या चिथावणीनं कोमिल्ला येथें दंगे झाले. त्यांत मुसलमानांनीं अनन्वित प्रकार केले. सरकारचीही त्यांस फूस होती. जखम पसरत चालली, अंतःकरण सळसळू लागलें, आणि आधींच बिथरलेला बंगाल बेताल झाला, बेभान झाला, भावनांनीं भारून गेला.
 लोकांचा इंग्रज सरकारवरचा विश्वास समूळ नाहींसा झाला होता. तेजस्वी लेखक आपल्या रसरशीत व स्फूर्तिदायक लेखांनी तरुणांची मनें वाटेल त्या स्वार्थत्यागास तयार करण्याचे काम करीत होते. स्वदेशीचें व्रत, व शक्तिदेवीची उपासना यांचा उपदेश जोराने होऊ लागला. खरोखर हें स्वदेशीचें व्रत महाराष्ट्रांत फार पूर्वीपासून सुरू झाले होते. लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत आपल्याकडील सुप्रसिद्ध देशसेवक विश्वनाथ नारायण मंडलीक हे एकदां कलकत्यास गेले होते. त्या वेळेस ज्या बंगाली गृहस्थाकडे ते उतरले होते, ते गृहस्थ त्यांची जाडीभरडीं धोतरे पाहून चकित झाले. त्यांच्या प्रश्नास मंडलिकांनी खालील उत्तर दिले:— 'I must wear these thick clothes, as my country's mills cannot yet produce any finer fabric." 'जोपर्यंत देशांत तलम कापड होणार नाहीं तोंपर्यंत मला असेंच जाडेभरडे कापड वापरावें लागणार आणि मी वापरीन.' परंतु बंगालमध्ये हें स्वदेशी व्रत बहिष्कारापासून सुरू झालें, आणि लोकांची भावनामय मनें या नवीन उपदेशानें भारून गेलीं. संध्या, नवशक्ति, युगांतर यांसारखीं वृत्तपत्र खरोखरच अपूर्व होती. नवशक्तीमध्ये अरविंद घोष पुष्कळ वेळां लिहीत असत. युगांतर हे सर्वांत जास्त लोकप्रिय होतें. १९०६ मध्ये वरेंद्रकुमार घोष आणि जगत्प्रसिद्ध विवेकानंदांचे एकच एक बंधु भूपेंद्रनाथ दत्त हे या पत्राचे संपादक होते. या वृत्तपत्रांतून एकच सूर वहात होता. सर्वांच्या लेखण्या एकाच प्रकारचें वाङ्मय निर्माण करीत होत्या. 'जशास तसें,' 'टोल्यास टोला' हा उपदेश यांतून केलेला होता. रामदासी बाणा या वृत्तपत्रांनी उचलला होता. त्यांची भाषा अनुपमेय होती; त्यांचे विचार हृदयभेदक व कार्यप्रवर्तक होते; शिथिल झालेल्या अंतःकरणांत अलोट सामर्थ्याचे पूर वाहविण्याचें त्यांत सामर्थ्य होते. हें स्वदेशीचे व्रत लहानथोरांच्या मनांत इतकें बिंबलें कीं, काय सांगावें? एका लहान मुलानें आईस विचारले, 'काय ग आई, हा डांस स्वदेशी आहे कां विलायती?' 'स्वदेशी हां बाळ.' 'हो कां? तर मग मी त्यास मारणार नाहीं!' असें बाळ बोलले. ज्यांनीं आपल्या प्रतिभावान् विचारांनी वातावरण एकरूप केलें त्यांची धन्य होय. त्यांचे लेख कशा प्रकारचे होते याचा नमुना पहा.
 "सध्यांच्या काळीं रास्तपणा रसातळास जात आहे आणि अन्याय बोकाळत आहे. मूठभर परकीय लोक कोट्यवधी लोकांस त्यांचें सर्वस्व हरण करून नागवीत आहेत. त्यांची नौकरी ह्मणजे तर मोठा चरक आहे, आणि या चरकांतून असंख्य लोकांची हाडे हरहमेश भरडली जात आहेत. दास्यपंकांत खितपत पडलेलें हें राष्ट्र! या राष्ट्राची नैतिक, बौद्धिक, शारीरिक, आर्थिक, स्वावलंबनात्मक, सर्व सद्गुणांची खच्ची करून, या राष्ट्राला कायमचें पंगू करावे किंवा शक्य तर नामशेषही करावें, यासाठी हे मूठभर लोक आटोकाट प्रयत्न करीत आहेत. भारतवासीयांनो! कच कां खातां? या अन्यायाविरुद्ध चालून जाऊन तुमच्यावर कोसळणाऱ्या आपत्तींना तुझी तोंड द्या. मित्रांनों अंतःकरणांत भीतीस यत्किंचितही थारा देऊ नका. परमेश्वराच्या लाडक्या भूमीत दिवसाढवळ्या चाललेला हा अन्याय परमेश्वराला पाहवणार नाहीं. तो स्वस्थ बसणार नाहीं. भगवंताने गीतेंत दिलेल्या वचनावर पूर्ण भरंवसा ठेवा, आणि त्याला आळवा. त्याच्या शक्तीची आराधना करा ह्मणजे या अन्यायाला पदतळी तुडविण्यासाठीं तो तुमच्यामध्यें अवतीर्ण होईल. भिऊं नका. मानवी अंतःकरणांत जेव्हां दैवी तेज चमकूं लागतें, तेव्हां त्यांच्या हातून अशक्य अशा गोष्टीही लीलेनें घडतात."
 या प्रकारचे उतारे भरभरून येऊ लागले. युगांतरासारखे वृत्तपत्र कधीं होणार नाहीं. त्यांतील भाषासरणी केवळ तेजोमयी होती. सरकारचा भाषांतरकार म्हणतो, 'I had never before read in Bengali, language so lofty, so pathetic, so stirring that it was impossible to convey it in an English garb.' त्याचा खप पन्नास हजारांच्या वर गेला.
 पंजाबचें कॉलनायझेशनचे बिल व पाण्यावर वाढलेला कर लोकांनी कसे मार्गे घ्यावयास लावले हें बंगाली लोकांनी पाहिलें. 'वन्दे मातरम्' पत्र म्हणते,
 "In Bengal we have agitated for two years; first, with repeated petitions, with countless protest meetings, with innumerable wails and entreaties from press and platform, but that could not help us; insult and ridicule were our only gain. Then we tried every lawful means of concrete protest, every kind of passive resistanse within the law to show that we were in earnest. Result; -nil. But in the Punjab they petitioned and protested only for a few weeks and then went in for Europeans, their persons, their property, everything connected with them. Result; -the water-tax postponed; the Colonisation Bill cancelled.' हें पाहून बंगाली तरुणांनी ठरविलें कीं, कांट्यांनें कांटा काढावयास धर्म आड येत नाहीं. "The law of the English is established on brute force, and if to liberate ourselves we too must use brute force; it is right that we should do so." इंग्लिशांचा कायदा पाशवी सामर्थ्यावर अधिष्टित आहे; यापासून स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी आपण पाशवी सामर्थ्याचा अवलंब केला तर तें न्याय्य आहे, असें तत्त्व प्रतिपादन करण्यांत येऊं लागलें. स्वातंत्र्य म्हणजे बडबड नव्हे. विनंति, अर्ज, सभा यांनी स्वातंत्र्य मिळत नसतें. रक्ताचा सडा शिंपडावा लागतो. शिर कमळांची माळा स्वातंत्र्य- देवीला अर्पग करावी लागते. या स्वातंत्र्यासाठीं मारतां मारतां मरावें आणि कीर्तिरुपानें उरावें किंवा कीर्तीचाही मोह न धरितां मरून जावें. महाराष्ट्रांतही हीच लाट उसळली. शत्रूशीं, जर तो कपटी असेल तर, कपट करण्यास कांहीं हरकत नाहीं; ही राजनीति आहे, आणि राजनीतीमध्ये पापपुण्याचा फारसा प्रश्न नसतो. त्यांतून या गोष्टी सर्व समाजासाठीं आहेत. आमच्या प्राचीन ग्रंथांतातही, याच उपदेशाचे धडे दिले आहेत. 'व्रजन्ति ते मूढधियः पराभवं । भवन्ति मायाविषु ये न मायिनः' असें भारवी किरातार्जुनीयांत सांगतों. आपणास स्वातंत्र्य पाहिजे असेल, देशास तारावयाचे असेल तर साळसूदपणा दूर सारून दण्डनीतीचाच अवलंब कसेही करून केला पाहिजे. इटलीमध्ये मॅझिनीसारख्या राष्ट्रसेवकांनीं गुप्त मंडळ्याच कायदेशीर ठरविल्या नाहीत काय? मॅझिनी नीतिज्ञ नव्हता असे कोण म्हणेल? दास्यमग्न राष्ट्राने असे उपाय स्वीकारणें पाप नव्हे हें क्रांतिकारक पक्षाचे राजकीय तत्त्वज्ञान महाराष्ट्रांतील तरुणांत पसरू लागले. परिस्थितींची बंघनें, शक्याशक्यता वगैरेचा भावनावश तरुणांस विसर पडत चालला. दूरदर्शीपणाचा शांतिवाद त्यांस रुचेना. या विलक्षण खळबळीनें निद्रावश देश हालूं लागला. अजगराप्रमाणें सुस्त पडलेल्या या देशाला त्याचे लचके तोडीत असतांनाही आजपर्यंत शुद्ध नव्हती ती शुद्ध त्यास आली. लोक डोळे चोळून पाहूं लागले; कान टवकारून ऐकूं लागले; त्यांस एकच सूर सर्वत्र ऐकू आला; एकच प्रसंग त्यास दिसला; सरकारची दडपशाही आणि तिचा प्रतिकार करण्यासाठी तयार होणारे तरुण. नेमस्त पक्ष तर या चळवळीनें हतबुद्ध झाला. कलकत्त्याची काँग्रेस संपली त्याच वेळेस पुढील साली बहिष्कार वगैरे ठराव हाणून पाडावयाचे असें त्यांनीं संगनमत केलें होतें; त्याप्रमाणें त्यांनीं खटाटोपही चालविला होता. निरनिराळ्या प्रांतिक सभांच्या हकीकती वाचल्या म्हणजे हें सर्व सुसंगतपणे लक्षांत येतें. सुरतेस प्रांतिक सभा भरली त्या वेळेस टिळकांस तेथें हजर राहतां आलें नाहीं, आणि मेथांनी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे दोन्ही ठराव मोठ्या शिताफीनें वगळले. वऱ्हाडच्या प्रांतिक सभेत 'वन्दे मातरम्' सारख्या पदावर रणें माजली. परंतु खापर्डे हे हजर असल्यामुळे नेमस्तांची डाळ फारशी शिजली नाहीं. अलाहाबादच्या प्रांतिक सभेत मदन मोहन मालवीयांनी दोनशें प्रतिनिधींस, सभेस अडचण येईल म्हणून परवानगी दिली नाहीं! संयुक्त- प्रांताच्या प्रकृतीस बहिष्कार मानवणार नाहीं अशी त्यांनी आधीपासूनच हाकाटी चालविली होती. कलकत्त्यास मोठ्या शर्थीनें टिळकांनी जे ठराव पास करून घेतले ते एवंप्रकारें येत्या राष्ट्रीय सभेत हाणून पाडण्यासाठीं हा सर्व खटाटोप होता, असें राष्ट्रीय पक्षानें जाहीर केलें.
 या वर्षीची राष्ट्रीय सभा खरें पाहिले म्हणजे नागपुरास भरावयाची. परंतु नागपुरास स्वागत कमिटीच्या बैठकीत जे अपरिहार्य व अश्लाघ्य प्रकार झाले ते पाहून येथें राष्ट्रीय सभा सुरक्षित भरूं शकणार नाहीं असें पुष्कळांस वाटलें. मुंबईस एक पुढाऱ्यांची सभा भरली. टिळकही या सभेस हजर होते. आणि राष्ट्रीय सभा सुरतेस भरावयाची असें जाहीर झालें.
 या मुंबईच्या काँग्रेस कमिटीच्या बैठकींत टिळक, खापर्डे यांनी राष्ट्रीय सभा सुरतेस नेण्याच्या योजनेस विरोध केला. नागपूरची अब्रू राखण्यासाठी आम्ही कोणत्याही अटींवर तडजोड करण्यास तयार आहों असें नागपूरच्या राष्ट्रीय पक्षाने कळविलें. कारण राष्ट्रीय पक्षास न कळवितां नागपूरच्या मवाळ पक्षानें स्वतंत्रपणें राष्ट्रीय सभेच्या कमिटीस तार केली होती की, 'येथें राष्ट्रीय सभा भरविणें अशक्य आहे.' परंतु राष्ट्रीय पक्षाचें कांहीं एक चाललें नाहीं व कमिटीत मताधिक्य नेमस्तांचं असल्यामुळें सुरत हीच जागा ठरली. नागपूरच्या स्वागत कमिटीनें टिळकांस अध्यक्ष नेमलें असतें परंतु आतां राशबिहारी घोष हे नियोजित अध्यक्ष असें जाहीर झालें.
 परंतु इतक्यांत इकडे बंगालमध्ये दडपशाहीस ऊत आला. मुसलमानांनी त्यांच्या स्वभावानुसार वेडे बनून अनन्वित दंगे केले. डाक्याचा नबाब सलिमउल्ला म्हणजे एक अपूर्व चीज होती. त्यानें मुसलमानांस चिथावून दिलें. कोमिल्ला येथें दंगे झाले. जे होऊ नयेत ते प्रकार घडले. बंगाली लोकांचीं भावनापूर्ण मनें बेहोष झाली. संताप सांठवेना, तो उतू जाऊं लागला. युगान्तराच्या संपादकांस शिक्षा झाली. संध्या पत्राचा संपादक आपली बाजूही न्यायसभेत पुढे मांडण्यास कबूल नव्हता. "He did not think that in carrying on the God-appointed mission of स्वराज्य he was in any way responsible to the alien rulers." "ईश्वरानें नेमून दिलेलें स्वराज्यमंत्रप्रसाराचे पवित्र कार्य मी करीत आहें. परकीय सत्ताधाऱ्यांची माझ्यावर काडीइतकीही सत्ता नाहीं." बाबू अरविंद घोष यांसही कैद करण्यांत आलें. अशा प्रकारें भराभर नानाप्रकारच्या उद्वेगकारक परंतु स्फूर्तिदायक गोष्टी दररोज कानीं येऊ लागल्या. शिक्षा देण्यांत सुद्धां सारासार विचारास थाराच नसे. ज्या- प्रमाणे इंग्लंडांत कांकडी चोरण्याबद्दल फांसावर लटकण्याची पाळी येई तशाच मासल्याची तऱ्हा येथे झाली. एके ठिकाणीं चार मुलांनीं वाण्याची चवदा आणे किंमतीची विलायती साखर नासली म्हणून तीन आणि चार महिन्यांच्या शिक्षा त्यांस दिल्या. परंतु ज्यांस अशा शिक्षा होतात ते लोकांस ललामभूत होतात. लोक त्यांस मिरवितात आणि सरकारचीच मानखंडना होते. परंतु निर्लज्ज सरकारास त्याचे काय होय? सरकारनें सभाबंदीचा कायदा १ नोव्हेंबर १९०७ रोजी पास केला. गोखले यांनी या कायद्यास कसून विरोध केला; राशबिहारीनींही विरोध केला, परंतु सरकार थोडीच भीक घालणार? कितीही विरोध करा, सरकारला हवें तें करण्यास सामर्थ्य आहे.
 लाला लजपतराय व अजितसिंग यांस सहा महिन्यांनी नोव्हेंबरच्या ११ तारखेस मुक्त करण्यांत आलें. लाला लजपतराय व गोखले हे मित्र होते. इंग्लंडांत १९०५ मध्ये जेव्हां गोखले मुंबई प्रांतातर्फे वळवळ करण्यास गेले होते त्या वेळीं पंजाबतर्फे लजपतराय गेले होते. त्या वेळेस एकमेकांची एकमेकांस मदत झाली होती. लालाजींस नाहक होणारा जाच नाहींसा व्हावा म्हणून गोखल्यांनी 'टाइम्स' मध्ये एक पत्र प्रसिद्ध केलें होतें. परंतु त्याचा तादृश उपयोग झाला नाहीं.
 लालाजींची सुटका झाल्यावर राष्ट्रीय सभेस निराळाच रंग चढूं लागला, सुरतचे राष्ट्रीय पक्षाचे लोक म्हणूं लागले 'आम्हांस लालाजी अध्यक्ष पाहिजेत. देशसेवेसाठीं त्यांस अंदमान पहावें लागलें तेव्हां आपण त्यांस राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षत्वाचा मान देऊन त्यांचा गौरव करणें व कृतज्ञता व्यक्त करणें हें आपले कर्तव्य होय.' लालाजींस मानमरातबाचा मातब्बरी नव्हती. परंतु निरपेक्ष सेवा करणारा जो असतो त्याच्यासाठीं वैभव चालून येतें. राष्ट्रीय पक्षाची ही मागणी नेमस्त मान्य करीनात. गोखल्यांनीं समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. शेवटीं 'लालाजी अध्यक्ष होण्यास तयार असतील तर तुम्ही खुशाल त्यांस अध्यक्ष करा' असें त्यांनी सांगितलें. राष्ट्रीय पक्ष पेंचांत सांपडला. जर मवाळ पक्षाचें आपणांस पाठबळ नसेल तर लालाजी अध्यक्ष होण्यास कसे तयार होतील? लालाजींस असें अपमानास्पद स्थान स्वीकारा असें सांगण्यास राष्ट्रीय पक्ष धजला नाहीं.
 सर्व प्रयत्न हरले तेव्हां राशबिहारी अध्यक्ष आहांस पसंत नाहींत असें राष्ट्रीय पक्ष म्हणूं लागला. याला एक कारणही त्यास सांपडलें. नियोजित अध्यक्ष राशबिहारी घोष यांनी नवीन राष्ट्रीय पक्षासंबंधी अनुदार उद्गार कौन्सिलमध्ये उच्चारले होते. राष्ट्रीय पक्ष झाला तरी तो देशासाठींच तळमळत होता. चुकत असला तरी स्वार्थासाठी झुरत नव्हता; तर मातृभूच्या उद्धारासाठीच आपसांत कितीही भांडणे झाली तरी आपणां दोघांसही चिरडण्यास जो शत्रूप्रमाणें टपला आहे, त्याच्या जवळ एकमेकांची नालस्ती करणें म्हणजे फार निंद्य गोष्ट होय असे आम्हांस वाटतें. या बाबतींत ना. गोखले हे जास्त थोर मनाचे होते, ते नेव्हिन्सन साहेबांजवळ टिळकपक्षाविषयी बोलतांना म्हणाले, 'But we are not likely to denounce a section of our own people in the face of the bureaucracy. For, after all, they have in view the same great object as ourselves'. राष्ट्रीय पक्षानें लालाजी अध्यक्ष व्हावे म्हणून सुचविलें. पण त्याचें म्हणणें गोखल्यांनीं सयुक्तिक पणे खोडून काढले. सर्व स्वागत कमिटीनें राशबिहारी यांस अध्यक्ष निवडलें असतां आतां लालाजींस अध्यक्ष करण्यानें पुष्कळ लोकांचीं मनें दुखवतील. लालाजींस आज जी सर्व राष्ट्राची सहानुभूति पाहिजे ती नाहींशी होईल. लालाजींस विनापराध हद्दपार केलें, याचा सरकारास जाब विचारतांना सर्वांनी लालाजींस पाठिंबा दिला पाहिजे असें गोखल्यांचें म्हणणें होतें. लालाजींस अध्यक्ष करण्यास गोखले भीत होते, असा त्यांच्यावर पुष्कळांनी आरोप केला आहे. परंतु गोखले इतके भ्याड खास नव्हते. ते लालाजींचे स्नेही होते. व त्यांच्या सुटकेसाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. लालाजींस गोखले जर सरकारच्या मोहबतीखातर भिते तर त्यांच्या सोडवणुकीसाठीं त्यांनी टाइम्समध्ये पत्र कां प्रसिद्ध केलें असतें? परंतु एका चरित्रकाराने म्हटल्याप्रमाणे 'People always are misunderstood. They are blameless, but their conduct is misrepresented. They are conscious of having felt precisely the reverse of what is attributed to them; and they wonder that they are not known better'. याप्रमाणें गोखल्यांच्या सध्देतूचाही विपर्यास करण्यांत आला.
 परंतु शेवटी लालाजींनी स्वतःच मनाच्या थोरपणानें 'मी अध्यक्ष होत नाहीं,' असे जाहीर केलें. या करण्यामुळे तर राष्ट्रीय पक्ष फारच चिरडीस गेला. कलकत्त्याचे पास झालेले स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वराज्य, वगैरे ठराव येथें नापास होणार, ते ठराव पत्रिकेत घातलेलेही नाहींत, अशी त्यानें खोटीच अवाई उठविली. खरे पाहिले तर कलकत्त्यास 'स्वराज्य' असा ठराव पास झालाच नव्हता. तो शब्द फक्त दादाभाईंच्या स्फूर्तिप्रद भाषणांत बाहेर आला. बहिष्कार हा सर्वराष्ट्रीय करून सर्व सरकारी संस्थांवर घालावयाचा असें जरी राष्ट्रीय पक्षास वाटत होतें तरी वस्तुतः तें तसें नव्हतें. कारण कलकत्त्यास गोखल्यांनी उठून हे म्हणजे मोडून काढलें होतें. जे ठराव कलकत्त्यास ज्या स्वरूपांत पास झाले तेच ठराव येथेही ठराव- पत्रिकेत घातले होते. कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेचा रिपोर्ट अद्याप प्रसिद्ध झाला नसल्यामुळे गोखल्यांस 'इंडिया' पत्रांतून त्या वेळचे ठराव आपल्या ठरावपत्रिकेत घालावे लागले. असे करतांना स्वदेशीच्या ठरावांत, दादाभाईंनी स्वतः टिळकांच्या सांगीवरून घातलेले 'धस सोसूनही स्वदेशी वापरणें' हे शब्द गाळले गेले. परंतु इंडिया पत्रांतील प्रसिद्ध झालेल्या ठरावांतसुद्धां हे शब्द नव्हते. शिवाय ही ठराव- पत्रिका म्हणजे कांहीं वज्रलेप नव्हे कीं, त्यांतील ठराव व त्यांची भाषा यांच्यावर रणें माजवावीं. आजपर्यंत असें अनेकदां झालें असेल कीं, पत्रिकेंत घातलेले ठराव विषयनियामक कमिटीत साफ बदलले; केव्हां नवीन शब्द घातले; केव्हां कांहीं ठराव गाळले. तेव्हां विषयनियामक कमिटीच्या आधीच गोखल्यांवर आग पाखडणें न्याय्य नव्हते. या ठरावपत्रिकाही वेळेवर छापून मिळाल्या नाहीत त्यास गोखले काय करणार? जेव्हा छापून झाल्या तेव्हां ताबडतोब त्यांनी एक प्रत टिळकांस दिली, एक लालाजींस दिली. यानंतर टिळक पक्षाचें असें म्हणणें पडलें कीं जर कलकत्याचे ठराव त्याच स्वरूपांत येथें पास होणार असतील तर अध्यक्षांच्या सूचनेस आम्ही विरोध करणार नाहीं; नाहीं तर आम्हांस अध्यक्ष पसंत नाहीत. परंतु सोळाशे सभासदांची हमी गोखले कशी बरे घेणार? असे विचारणें म्हणजे राष्ट्रीय सभा मोडण्यासारखेच होतें आणि अखेर तसेच झालें. गोखल्यांनी पुष्कळ सभासदांस बोलावून सांगितलें की ठराव मागे घेण्यांत आलेले नाहींत, विषय नियामक कमिटी काय ठरवील तें खरें, शेवटीं २७ वी तारीख उजाडली. अडीच वाजतां सभेच्या कामास सुरुवात झाली. स्वागताध्यक्षाचें भाषण झाल्यावर, अंबालाल सक्करलाल यांनी अध्यक्षांची सूचना पुढे मांडली. डॉ. घोष यांचें नांव उच्चारतांच 'नको नको,' असे उद्गार उठूं लागले. परंतु त्यांनी या हलकल्लोळांतून आपले भाषण कसेबसे संपविलें. नंतर सुरेंद्रनाथ दुजोरा देण्यासाठी उठले, त्यांचे पहिलेच वाक्य उच्चारलें जातें न जातें तोच, त्यांस खाली बसावयास लावण्यासाठीं कांहीं लोकांनी एकच गोंगाट सुरू केला. स्वागताध्यक्षानें पुनः पुनः शांत राहण्यासाठी लोकांस विनंति केली; परंतु कांहीं उपयोग झाला नाहीं. सुरेंद्रनाथांनी विचारिलें,'Have things come to such a pass?' त्यावर 'होय, होय,' अशी उत्तरे मिळाली. शेवटी अध्यक्षांनी 'जर तुम्ही शांत राहणार नाहीं, तर मी सभा बरखास्त करीन असें सांगितलें. सुरेंद्रनाथ बोलूं लागले. परंतु त्यांचा खडा स्वरही लोकांच्या गर्जनेत विलीन झाला. अध्यक्षांनी सभा बरखास्त केली.
 रात्री टिळक हे गोखले वगैरे मंडळींस भेटण्यासाठी जाणार होते परंतु गोखल्यांनीच त्यांनां झिडकारिलें असें खोटेंच प्रसृत करण्यांत आलें. गोखल्यांच्या जवळ टिळक यासंबंधीं बोलले नाहीत; त्यांनी तशी इच्छा दर्शविली नाहीं; किंवा चिठी वगैरेही कांहीं पाठविली नाहीं.
 दुसऱ्या दिवशीं एक वाजतां पुनः सभेस आरंभ झाला. टिळकांनीं, स्वागताध्यक्ष माळवी यांच्याजवळ एक चिठी दिली. परंतु ही चिठी सर्व काँग्रेस बंद ठेवा अशा अर्थाची आहे असें समजून माळवी यांनी बेकायदा ठरविली. सुरेंद्रनाथांचे भाषण झाले. पंडित मोतीलाल नेहरू यांचेही दुजोरा देण्यासाठी लहानसें भाषण झाले. नंतर मतें मागण्यासाठी हा ठराव माळवींनी पुढे मांडला. 'नकारघंटा' वाजूं लागली; परंतु ही घंटा 'होय, होय'च्या नगाऱ्यांत फिकी पडली. अध्यक्ष निवडले गेले असें माळवींनी जाहीर केलें. डॉ० घोष अध्यक्षस्थानी बसून आपले भाषण आरंभताहेत तोंच टिळक व्यासपीठावर चमकूं लागले. अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दल आपण कांहीं सूचना आणणार आहों, व आपण तशी आगाऊ लेखी खबर दिली होती, तेव्हां आपणास बोलूं द्या असे ते म्हणाले. स्वागताध्यक्ष म्हणाले, तुमची चिठी अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दल नसून, सर्व काँग्रेस थांबवावी अशी आहे. अध्यक्ष आतां निवडले गेले आहेत, त्यांच्या विषयीं आपणांस कांहींही बोलतां येणार नाहीं. टिळक म्हणाले, 'माझा हक्क आहे. मी अध्यक्षांच्या निवडणुकीसाठीही चिठीत लिहिलें आहे. अध्यक्षही 'आपण कायदेशीर वागत नाहीं; जाग्यावर जा.' असें टिळकांस सांगू लागले. परंतु लो. टिळक काय लेचेपेचे होते? धीराची मूर्ति; निश्चयाचे मेरुच ते. ते म्हणाले, 'माझें म्हणणें मी प्रतिनिधींसमोर मांडल्याखेरीज राहणार नाहीं.' झाले; एकच धुमाकूळ माजला. पुष्कळ लोक काठ्या, लाठया सरसावून हाणमार करूं लागले. टिळकांच्यावरही एक मनुष्य हल्ला करीत होता; परंतु गोखले मध्ये पडले. खुर्च्या फेंकल्या जाऊं लागल्या. इतक्यांत एक लाल जोडा फेरोजशहांस चाटून, सुरेंद्रनाथांस लागला. गोखले हा सर्व प्रकार पाहून रागाने नुसते थरथर कांपत होते. मेथा, गोखले वगैरे मंडळी मागील दरवाज्याने निघून गेली. टिळकांस त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सुरक्षित नेलें. शेवटी पोलिसांनी येऊन दंगल मोडली.
 या तारखेस सायंकाळीं पुष्कळसे पुढारी जमले, तेथें राष्ट्रीय पक्षाच्या पुष्कळ लोकांस हजर राहूं दिलें नाहीं; सुमारे ९०० प्रतिनिधींनी एक कमिटी नेमली आणि तिनें सर्व घटना, नियम वगैरे करून, एप्रिलमध्ये सभा बोलवावी, व सर्वांनीं ते पास करावे असें ठरविलें. अशा प्रकारें तेविसावी राष्ट्रीय सभा समाप्त झाली.
 या एकंदर प्रकारामुळे मनास फार वाईट वाटतें. टिळकांचा कांहीं राष्ट्रीय सभा उभळून लावावी असा उद्देश असेलसें दिसत नाहीं. 'मी सभा मोडली' असे टिळकांनी लिहून दिले तर आपण ऐक्याला- समेटाला तयार आहों, असें राष्ट्रीय पक्षास कळविण्यांत आलें, तेव्हां टिळकांनी स्वतःच्या शिरावर राष्ट्रकार्याकरितां ही जोखम घेतली, आणि सुरेंद्रनाथ, अश्विनीबाबु जवळ तसा लेखी कबुलीजबाब दिला. परंतु त्यांची कोणीं गांठही घेतली नाहीं असें मोतीलाल बाबू 'Step in the steamer' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगतात. नाना मतांच्या गलबल्यांत सत्य शोधून काढणे फार कठिण आहे, परंतु टिळकांसारखा माणूस केवळ सभा उधळून लावण्यासाठीं आलेला नसावा असें वाटतें. बंगालमधून 'Blow up' अशी आलेली तार वाचून पुष्कळजण तारे तोडतात. परंतु यावरून कांहीं टिळकांवर आरोप शाबीत होत नाहीं. बंगाल्यांमधील नवीन रक्ताचे- नवीन दमाचे लोक टिळकांच्याही पुढे गेले होते. टिळक स्पष्टपणे सांगत कीं, आपणांस साम्राज्यांत रहावयाचें आहे; येथे प्रयत्न करून इंग्लंडमध्येही शिष्टमंडळे पाठविली पाहिजेत; यश येण्यास केव्हांही वेळ लागणारच. नवीन क्रांतिकारकांचा विचार सभा उधळून लावण्याचा असेल. आणि टिळक त्यांस पूज्य वाटत असल्यामुळे त्यांचे विचार टिळकांवरही पुष्कळ लोक लादूं पाहतात, परंतु 'शिष्यापराधे गुरोर्दंडः' असा हा प्रकार होय.
 येवढे मात्र खरें कीं, टिळकांस काँग्रेसची गोगलगायी पद्धत पसंत नव्हती. चार दिवस जमून नुसते ठराव पास करून जावें आणि मग बॅरिस्टऱ्या, वकिल्या कराव्या याचा त्यांना तिटकारा येई. काँग्रेसच्या कामाचे लोण सर्व लोकांत जर पसरविलें असेल तर तें टिळकांसारख्यांनींच. त्यांनींच व्याख्यानांनीं व लेखांनी देशांत काय चाललें आहे याची लोकांस जाणीव करून दिली. अशा मनुष्याला काँग्रेसभंजक कसें म्हणावयाचें? काँग्रेसला लोक येतात, आरती करितात आणि घरोघर जातात याविषयी काँग्रेसचे जनक ह्यूमसाहेब काय म्हणतात ते पहा :- "You meet in congress, you glow with a momentary enthusiasm. You speak much and eloquently. But the congress closes and every man of you goes off straight way on his private business. Years ago, I called on you to be up and doing; years ago, I warned you that 'Nations by them selves are made; and have you heeded these counsels? You have, indeed, ever eagerly clamoured for and vainly clutched at the crown, but how many of you will touch the cross, even with your finger tips?' ह्यूमसाहेबांच्या या सणसणीत बोलांस मेथांनी मुंबईस उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अशीं वक्तृत्वपूर्ण व नटवेगिरीचीं उत्तरें देऊन थोडेंच भागाणार आहे! वस्तुस्थिति जगास दिसत होती, तेव्हां राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष देशासाठी तनमन झिजविणारे लालाजींसारखे होण्याऐवजी सर्वस्वावर निखारा ठेवण्यास तयार असलेल्या आपल्या राष्ट्रीय बंधूंची, भर कौन्सिलांत नालस्ती करणारा व्हावा हें पाहून टिळकांच्या पायाची आग मस्तकास कां न जावी? राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष जर राष्ट्रीय पक्षास निंदितो तर सरकारास या सर्व पक्षाच्या पुढाऱ्यांस एका दावणीस बांधून अंदमानास पाठवून देण्यास काय हरकत!
 अंबिकाचरण मुजुमदार आपल्या पुस्तकांतपोक्तपणें लिहितात :- 'It is hardly conceivable that a man of Bal Gangadhar Tilak's position and patriotism could have knowingly and willingly associated himself with any plan of action calculated to wreck the congress.' आम्हांस हें म्हणणें विचाराचें वाटतें.
 पुढे लवकरच अलहाबाद येथे एप्रिल महिन्यांच्या १८-१९ तारखेस सभा भरून, नवीन घटना, ध्येय वगैरे ठरविण्यांत आलें. मॉडर्न रिव्ह्यूनें या प्रकारच्या सभेस एकपक्षीय म्हटलें आहे व तें खरें आहे. कारण ही कांहीं अखिल राष्ट्राची सभा नव्हती. सुब्रह्मण्य अय्यर यांचें या वेळेस मॉडर्न रिव्ह्यूत पुनः प्रसिद्ध झालेले पत्र वाचण्यासारखें आहे. अशा रीतीने राष्ट्रीय पक्ष वगळला गेला. टिळक पुनः राष्ट्रीयपक्षाची जमवाजमव करते, पण त्यांस हे श्रम होऊ नयेत म्हणून सरकारने त्यांस सहा वर्षांची शिक्षा दिली! राजकारणाच्या दंगलींत रंगलेला महात्मा तत्त्वज्ञानाच्या गहन गांठीं सोडविण्यासाठी मंडालेच्या तुरुंगांत निघून गेला!! राष्ट्रीयपक्ष पोरका झाला!!!



ना० गोखले यांचें चरित्र.

उत्तरार्ध.

सुरत- काँग्रेसनंतर.


 पूर्वार्धामध्ये गोखल्यांचे चरित्र सुरतच्या काँग्रेसपर्यंत आलें. तो प्रसंग अखिल हिंदुस्तानच्या राजकारणांत अत्यंत महत्त्वाचा होता. राष्ट्रीय व प्रागतिक या पक्षांतील भांडणे विकोपास जाऊन जोडेफेंकीपर्यंत पाळी आली. अशा रीतीनें काँग्रेस उधळून लावण्यांत आल्यानंतर काँग्रेसच्या अधिकाऱ्यांनी- हे प्रागतिक पक्षाचे होते- काँग्रेसच्या भोवती क्रीडचे कुंपण घालून राष्ट्रीय पक्षाला मज्जाव केला. त्यामुळे राष्ट्रीय सभा सर्वस्वी प्रागतिकांच्या हाती गेली. दोन्ही पक्षांच्या दृष्टीने हा प्रसंग फार महत्त्वाचा होता. एका पक्षाचे पुढारी लोकमान्य टिळक व दुसऱ्या पक्षांतील पुढारी नामदार गोखले या दोघांच्याही चरित्राला येथून वेगळे वळण लागले. एकाच्या कर्तबगारीला, देशसेवेला, राजकीय चरित्राला सहा वर्षे तुरुंगांत गाडून टाकल्यामुळे आधीच विस्तार पावत असलेल्या दुसऱ्याच्या राजकीय कर्तबगारीला पूर्ण अवसर मिळून तिच्या विस्ताराला मर्यादाच राहिली नाहीं.
 सुरतच्या भाऊबंदकीनंतरच्या उभ्या वर्षात गोखल्यांना एका क्षणाचीही फुरसत मिळाली नाहीं. मेथांच्या बाबतीत मुंबई कॉर्पोरेशनमध्ये झालेल्या प्रसंगी अध्यक्ष झाल्यावर ते कांहीं दिवस विश्रांति घेण्यासाठी महाबळेश्वरी जाणार होते. परंतु मैमनसिंगकडे गडबड उडाल्यामुळे त्यांस तिकडे जाणे भाग पडले. त्यानंतर काँग्रेससाठी त्यांना फार श्रम करावे लागले.
 मध्यंतरी सिमल्यास जाऊन त्यांस सभाबंदीच्या कायद्यास विरोध करावा लागला. १९०७ साल तर संपले. १९०८ साल उजाडलें. मार्च महिन्यांत ते कौन्सिलच्या कामाकरितां निघून गेले. अद्यापपर्यंत मोठे लष्कर ठेवण्यास रशियाची भीति हें कारण दाखविण्यांत येत असे. ती तर आतां निघून गेली होती. परंतु देशांत असंतोष माजला आहे, लोक नाना प्रकारच्या गोष्टी सांगताहेत, अशा वेळी सैन्य कमी करणे वेडेपणा आहे, असें आतां कांगावखोर व निमित्तावरच टेकलेल्या सरकारचें म्हणणें पडलें. यास गोखल्यांनी विरोध केला. शिक्षणाच्या बाबतीत सरकार अस्वलासारखें कसें सुस्त पडलें आहे, सरकारला अद्याप जाणीव कां होत नाहीं याचा खुलासा त्यांनी विचारला. संस्थानिकांनी सुद्धां आपआपल्या चिमुकल्या संस्थानांत शिक्षण सक्तीचे केलें आणि सरकारला लाजविले. परंतु सरकारास लाज असेल तर ना लाज वाटणार? इंग्लंडमधून येथे येतांना सर्व लाज 'समुद्रास्तृप्यन्तु' करून मग हे देव मुंबापुरीच्या किनाऱ्यावर उतरतात. त्याचप्रमाणे धंदेशिक्षण, कला- शिक्षण देण्यांत तर आमचे सरकार गोगलगाईच्या गतीने सुद्धां चालत नाहीं. तें स्थिर राहून पैसा कोठे आहे असें विचारते. गोखले म्हणत "My lord, I repeat the money is there or can be found without difficulty. Only the will has to be there and then we shall not be found merely discussing the difficulties of the problem." नंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणास आळा घालण्याचे उपाय सुचविण्यास व ते ताबडतोब अंमलात आणण्यास सांगितले. सरतेशेवटी देशांतील वाढत्या संतापाकडे ते वळले. सर्व सुशिक्षित लोक हळूहळू निराश होत जाऊन ब्रिटिश राज्यांतील व्यवस्था त्यांस मरणप्राय वाटेल. 'But sooner or later, mere order in bound to appear irksome to those who zealously cultivate the belief that there is no chance of better days for their country as long as existing arrangements continue.' मोर्ले साहेबांस न साजेशा त्यांच्या अंदाजपत्रकावरील भाषणाचा निराशेने गोखल्यांनी उल्लेख केला. इंग्लिशांवरील भक्ति, श्रद्धा, निष्ठा यांस मूठमाती देण्यांत येत आहे; असे असतां ज्या कांही सुधारणा द्यावयाच्या असतील त्या त्वरित द्या. त्या उदारभावाने द्या. लोकांस असे वाटू द्या की, 'The people must be enabled to feel that their interests are, if not the only considerstion, at any rate the main consideration that weighs with the Government and this oan only be brought about by a radical change in the spirit of administration.' यानंतर शेवटची सूचना त्यांनी दिली ती अशी :- 'My Lord, let not the words 'too late' be written on every one of the reforms. For while the Government stands considering- hesitating, receding, debating within itself "to grant or not to grant, that is the question"- opportunities rush past it which can never be recalled. And the moving finger writes and having writ, moves on!'
 याच वर्षी प्रेस ॲक्ट पास झाला. सर सत्येंद्र प्रसन्न सिंह यांनी हा कायदा पुढे मांडला. कारण ते 'लॉ मेंबर' होते. या ॲक्टला गोपाळरावांनी संमति दिली याचें पुष्कळांस आश्चर्य वाटलें व वाटेल. परंतु सरकारनें पुढें मांडलेला भरभक्कम पुरावा व सर्व वृत्तपत्रांतील ज्वलजहाल लेख वाचून गोखल्यांवर नैतिक जबाबदारी पडली आणि सरकारविरुद्ध असें लिहिणे केव्हांही अन्यायाचे आहे असे त्यांस वाटले. कोणत्या तोंडाने विरोध करूं असे त्यांस झाले. गोपाळरावांचे हे करणें मेथांस आवडले नहीं. जेव्हां गोपाळरावांनी आपण कशा परिस्थितीत संमति दिली हे सांगितल तेव्हां मेथा म्हणाले, तुम्ही कायद्याला रुकार किंवा नकार कांहींच द्यावयाचे नव्हते. तुम्ही स्वस्थ रहावयाचे. सरकारला तुमची फूस आहे असे जनतेस वाटतें. आणि आपल्या कृत्याचे समर्थन सरकार करितें. आपल्या संमतीचा फायदा सरकार घेते, परंतु आपल्या म्हणण्यास संमति देऊन सरकार कधीं भलेपणा घेते काय? आपण जर एकादें गाऱ्हाणे मांडले तर त्याचा कसा बोजवारा उडतो तें आपण पाहतोच. तेव्हां सरकारास आपले म्हणणे मनातून जरी न्याय्य वाटत असले तरी ते आपणांस निराश करते, त्याप्रमाणे आपणही सरकारास वागविले पाहिजे. गोखल्यांचे काम नैतिक रीत्या समर्थनीय असेल, परंतु राजकारणदृष्ट्या चुकीचे ठरले. या मख्या, खांचाखोंचा, टिळक, मेथा हेच जाणत. गोखले हे साधेसीधे. या साधेपणाचेच हें एक मासलेवाईक उदाहरण आहे.
 मवाळांच्या राष्ट्रीयसभेचे खरें म्हटले म्हणजे आतां अर्धराष्ट्रीय सभेचेकाम झाल्यानंतर गोपाळरावांस पुनः इंग्लंडमध्ये जावें लागलें. खुद्द लॉर्ड मिंटो यांनी गोपाळरावांस इंग्लंडमध्ये जाऊन मोर्ले साहेबांस सहाय्य करा असे सुचविले. हिंदुस्तानांतील असंतोषामुळे व अत्याचारांमुळे सुधारणा कदाचित् मिळणार नाहींत या विचाराने तो प्रसंग टाळण्यासाठी गोखले विलायतेस गेले. मोर्ले साहेबांपुढे हिंदुस्तानची बाजू शक्य तितक्या जोराने त्यांनी पुढे मांडली. हिंदुस्तानांतील लोकांचा ब्रिटिशांवरचा विश्वास उडत चालला आहे, अत्याचारांस ऊत येईल; तर वेळीच सावध राहून त्या लोकांचा उडणारा विश्वास पुनः संपादन करा. एकदां मन तुटले की ब्रह्मदेवासही सांधता येणे अशक्य आहे. एकमेकांची मनें पुनः कधीही संयुक्त होणार नाहींत अशा तऱ्हेंनें तोडूं नका. आणि मनें तोडावयाची नसतील तर हिंदुस्तानास अधिक हक्क राज्यकारभारांत देणें हेच रास्त व प्रसंगोचित आहे.
 गोखले इंग्लंडमध्ये असतां इकडे टिळकांस सहा वर्षे शिक्षा झाली. उतारवयांत झालेली ही भयंकर शिक्षा पाहून नेमस्त लोकांनाही खेद व उद्विग्नता हिंदुस्तानांत प्रगट केली. इंग्लंडमध्ये या शिक्षेबद्दल निषेधप्रदर्शक सभा भरविण्यांत यावयाची होती. गोखले त्या सभेस हजर राहिले नाहींत येवढंच नव्हे तर चकार शब्दही कोठे बोलले नाहीत. आपण टिळकांच्या शिक्षेविरुद्ध जर कांहीं बोललो तर आपल्या शिष्टाईस बाध येईल असे त्यांस वाटले असावे. टिळकपक्षाशी आपला संबंध नाहीं असे दाखवून दिले पाहिजे याच हेतूने गोखल्यांनी या वेळीं मौनवत स्वीकारले असें दिसतें. कांहीं असो; सहानुभूतीचा एक शब्दही गोखल्यांकडून टिळकांस मिळाला नाहीं हें खरें. टिळकांविषयी केवढी ही अनुदारता? देशासाठी आपण सुधारणा मागत आहों त्यांस आपणाकडून टिळकांविषयीं उदारता दर्शित झाली तर कदाचित खो बसेल, हा हेतु असो किंवा व्यक्तिगतच कांही वाटत असेल कोणास माहीत, पण गोखल्यांनी आपल्या दुसऱ्या देशसेवकाबद्दल उदारता दर्शविण्याची संधि गमावली असे म्हटल्याविना राहवत नाही. मोर्ले साहेबांस गोपाळरावांनी ज्या सूचना केल्या त्या खालीलप्रमाणे होत्या. कौन्सिलांत लोकनियुक्त प्रतिनिधींची वाढ करावी, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळांत एतद्देशीय प्रतिनिधि असावे, स्टेटसेक्रेटरीच्या कौंसिलमध्येही एक एतद्देशीय प्रतिनिधि असावा. या गोष्टी फार अगत्याच्या होत्या. या दोनही ठिकाणी एतद्देशीय निवडण्यांत येऊ लागले याचे बरेचसे श्रेय गोखल्यांस आहे. कारण मिंटो साहेब हे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी कौंसिलांत एतद्देशीय नेमण्यास फारसे अनुकूल नव्हते. मोर्ले, मिंटो साहेबांस लिहितात, जर आपण तेथील कार्यकारी मंडळांत एतद्देशीय प्रतिनिधि घेण्यास तयार नसाल तर मी स्टेटसेक्रेटरीच्या कौन्सिलांत नेमणारच. गोपाळरावांस स्वतःस इंग्लंडमधील ही आपली शेवटली खेप असे वाटत होते. पुनः आतां इंग्लंडमध्ये येण्याची मला जरुरी पडणार नाही असे ते बोलून दाखवीत होते. आतां आपले शेष आयुष्य आपल्या देशांतच लोकांच्या उन्नत्यर्थ अहर्निश यांत दवडावयाचे असा त्यांनी मनाशी पक्का निश्चय केला. ज्या वेळेस ते मोर्ले साहेबांस भेटण्यासाठी म्हणून डिसेंबरच्या प्रारंभी गेले तेव्हां हा आपला मनोदय त्यांनी मोर्ले साहेबांस कळविला. मोर्ले साहेबांनी त्यांच्यापुढे सर्व सुधारणांचा पाढा वाचला नाही. परंतु त्या कोणत्या स्वरूपाच्या असतील याचा तर्क बांधणे कठिण नव्हते. मोर्ले लिहितात :-
 "He thinks he will never come to England again; no more work to be done for India here, must work in his own country. This is the moment of crisis; if nothing comes of our attempt then the Extremists will have their way; confusion, danger and ruin will follow. On the whole his tone both attracted and impressed me." मोर्ले साहेबांनी मिंटोस एतद्देशीयांस विशेष जागा, बड्या पगाराच्या जागा देण्यास सुरुवात करा असे सुचविले. राज्यकारभारांत हक्क असण्यापेक्षां पगारी जागांकडेच लोकांचें लक्ष जास्त असते. तेव्हां या प्रयोगाने लोकांस आशाळभूत बनवा म्हणजे झाले. परंतु मोर्ले साहेबांचा हा सल्ला इकडे थोडाच रुचणार आहे! गोखल्यांच्या या वेळच्या इंग्लंडमधील कामगिरीचा सर्वांनी प्रशंसापर उल्लेख केला आहे. लॉर्ड रे साहेब, हार्डिज साहेब यांनी गोखल्यांची कामगिरी किती महत्त्वाची होती हें स्पष्ट सांगितले आहे. लॉर्ड हार्डिज म्हणतात "I have always understood that he took a quiet but active part in the conversations that led up to the reform of this and the other Indian Councils." विलायतेतील कामगिरी संपल्यानंतर गोखले मायभूमीस परत आले. १९०८ मध्यें हिंदुस्तानांतील मुजफरपुर वगैरे ठिकाणचे अत्याचार पाहून मिंटो म्हणतात. 'I am determined that no anarchical crimes will for an instant deter me from endeavouring to meet as best I can the political aspirations of honest reformers.' मिंटोच्या या उद्गारांनी गोखल्यांच्या जिवांत जीव आला. आणि आपणांस नक्की हक्क मिळणार असं त्यांस वाटू लागले.
 १९०९ च्या आरंभी त्यांस अमेरिकेत व्याख्याने देण्यासाठी मोठ्या मानाचें निमंत्रण आले होते. परंतु १९०८ च्या उत्तरार्धात ज्या सुधारणा जाहीर करण्यांत आल्या, त्यांचे नियम, कायदे वगैरे सर्व या वर्षी करावयाचें असल्यामुळे गोखल्यांस या विनंतीचा साभार स्वीकार करितां येईना. आपल्या देशांतील काम सोडून अन्यत्र बडेजावासाठी गोपाळराव जातील ही कल्पनाही होत नाही. १९०९ च्या फेब्रुवारी महिन्यांत, सुधारलेलें बिल पार्लमेंटपुढे मांडण्यांत आलें. अल्प वादविवाद होऊन १९०९ च्या मे महिन्यांत कायदा जाहीर करण्यांत आला. १९०६ च्या मे महिन्यांत मिंटो म्हणाले होते- 'The possibility of the development of administrative machinery in accordance with new conditions.' याचा विचार करण्यांत येईल. १९०७ मध्ये खर्डा तयार झाला; १९०८ मध्ये तो सुधारून नीट करण्यांत आला. १९०९ च्या मे महिन्यांत कायदा म्हणून पास झाला व तीन वर्षे या कायद्याचा बोलबाला होत होता. परंतु या कायद्याने जे दिलें तें हिंदुस्तानांतील नियम घटना वगैरेंनी बरेंचसें हिरावण्यांत आले. यामुळे त्यांत तथ्य असें विशेष राहिलें नाहीं. सुधारणा संकुचित करण्यांत आल्या. जणू हिंदुस्तानास हा घांस पचणार नाहीं असें सरकारास वाटलें! नेमस्त पुढाऱ्यांस, गोखल्यांस या गोष्टीचा फार संताप आला. परंतु संतापाव्यतिरिक्त दुसरें काय करणार? कदाचित हे नियम घालण्यास देशांतील वाढते अत्याचार कारण झाले असावे. बंगालमध्ये खून, दरवडे, बाँब यांचा सर्वत्र धूमधडाका चालला होता. महाराष्ट्रांत नाशिकसारख्या ठिकाणी कट उघडकीस आले. रोज नित्य अत्याचारांची बातमी असावयाची. सरकारच्या कच्छपी असणारे देशी अधिकारी, गोरे लोक, यांचे बळी कोठें कोठें पडू लागले. या परि स्थितींत गोपाळरावांनी मुंबई व पुणे येथे व्याख्याने दिली. अशा क्रांतिकारक वातावरणांत शांततेचा दीप दाखविणे किती कठिण असतें? भ्याड, सरकारशी हितगुज करणारे, देशद्रोही, अशा पदव्या बहाल होत असतात. गोखल्यांस या गोष्टींची पर्वा नव्हती. लोकांच्या बेफाम मनास न रुचणारा परंतु परिणामी पथ्यकर असा उपदेश करण्यास ते कचरले नाहीत. या अत्याचारांनी सरकारचा एक रोमही वांकडा होणार नाहीं. आपले उमदे, वीर्याचे, धैर्याचे शेकडों बांड, तरुण, मात्र प्राणांस मुकतील; फांसावर लटकविले जातील; काळ्यापाण्यावर पोचविण्यांत येतील. ज्या स्वार्थत्यागापासून यत्किंचितही फायदा नाही तो करण्यांत स्वार्थनिरपेक्षता दिसली, प्राणांची बेपर्वाई दिसली तरी मातृभूमीचा फायदा नाहीं. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहों असें त्यांनी सांगितले. आशावादी बनून प्रयत्न करा. सर्व लोकांत संघटना करा. आणि हे संघट्टन, ही एकी झाली, एका कार्यासाठी हजारों, लाखों लोक पुढे येऊ लागले की करबंदीसारखी जी पूर्ण सनदशीर चळवळ आहे ती हाती घ्या. परंतु आज एक अधिकारी मारा आणि त्याबदला स्वतःचे तीन चार इसम फांशीं, पांचसहा जन्मठेप काळ्यापाण्यावर, असे करून घेण्यांत काय फायदा आहे? या प्राणाहुतींनी निजलेले जागे होतील. या प्राणार्पणाने आळशी पुढे येतील. देशसेवेसाठी स्वार्थावर कसा बहिष्कार घालावा लागतो ते त्यांस समजेल. हा फायदा लहानसान नाहीं. आणि सर्वच वेळां फायदा काय हें पाहून चालत नाही. ज्या सरकारच्या राज्यांत जगण्यासारखं कांहीं नाहीं तेथे मेलेच पाहिजे. अशी वृत्ति या तरुण वीरांनी दुसऱ्यांत उत्पन्न केली खरी. परंतु त्यांचे हृदयद्रावक परिणाम ज्यांनी पाहिले व ऐकले ते कचरले. यापासून देशाची वास्तविक कांहीं प्रगति होईल कां? अफाट सामर्थ्याच्या सरकारविरुद्ध असहाय, एकाकी व निःशस्त्र, लोक कसे टिकणार? हा मार्ग भावनेस पटला, हृदयास रुचला तरी बुद्धीस पटत नाही. अन्य मार्गानी चला. खुनानें कां कोठें स्वराज्य मिळते? त्यासाठी मोठी बंडे करावी लागतात. बंड करण्यास शस्त्र कोठें आहेत? परकी सरकारासही आधी बोलावितां येत नाहीं. सारांश काय, लढाईचा मार्ग आपणांस बहुतेक बंद आहे. त्या मार्गाने आपल्या प्रचंड देशास जातां येणार नाहीं. लढाई पुनः सर्वत्र सुरू झाली तर सर कार जरा गांगरेल. समजा फक्त बंगालमध्ये सुरू झाली आणि इतर प्रांत स्वस्थ राहिले तर काय होईल? बंगालचा मात्र नायनाट होईल. तेव्हां सर्व देशांत एकच सूर निघावा, सर्वाच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असावें, एकच विचार मनांत खेळावा, हिंदुमुसलमान एकदिल व्हावे, मग आपणांस उठाव करितां येईल. तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा, संघटित व्हा, स्वार्थत्याग शिका आणि शिकवा. हे दिवस तयारीचे आहेत. अद्याप शेकडा सत्तर लोकांस देशांतील स्थितीची जाणीव देखील नाहीं. तेव्हां सर्वांस हलवून जागे करा. आणि हें कार्य झाले म्हणजे मग पुढे पाहतां येईल. लोकांच्या मनास रुचेल असं बोलणें गोपाळरावांस आवडत नसे. स्वतःच्या बुद्धीस जे पटेल तेंच ते सांगत. सध्या आपले बोल कटु वाटले, विषमय वाटले, तरी परिणामी तेच हितकर ठरतील असें त्यांस मनापासून वाटे. लोकांनी त्यांस माथेफिरू, सरकारलेला, असें म्हणण्यास कमी केलें नाहीं. परंतु गोपाळराव हे रानड्यांचे शिष्य होते. ते आपला संताप आवरण्याचा प्रयत्न करीत.
 १९१० साल आले; १९१० च्या जानेवारीत नवीन सुधारणांनुसार पहिले कौन्सिल भरले. या वर्षी एक नवीन प्रश्न पुढे आला. या सुमारास आफ्रिकन सरकार तेथे वसाहत करून राहणाऱ्या आशियांतील लोकांविरुद्ध अत्यंत जुलमी कायदेकानू करीत होतें, या नियमांची अंमलबजाबणीही सक्तीने सुरू करण्यांत येत होती. याला काय उपाय योजावा. हें गोखले ठरवीत होते. या सर्व दुःखाच्या मुळाशी असणारी मुदतबंदीच काढून टाकावी असें त्यांस वाटले आणि त्याप्रमाणे त्यांनी हा निंद्य व अपमानास्पद प्रकार बंद व्हावा म्हणून ठराव आणला. तो पास झाला. त्यांचा दुसरा महत्त्वाचा ठराव म्हणजे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे यासाठी होता. सरकारकडून या ठरावांतील तत्त्वास मान्यता मिळाली. परंतु अगदी नवीन योजना त्यांनी यंदा पुढे मांडली ती डिस्ट्रिक्ट कौन्सिले, जिल्हा कौन्सिले स्थापण्याची होय. ही कल्पना पूर्वी रानड्यांनी पुढे मांडली होती. परंतु सरकारने त्या गोष्टीचा त्या वेळी विचार केला नाहीच. आणि लोकांसही त्याचा विसर पडत चालला होता. १९०५ साली इंग्लंडमध्ये वाचलेल्या एका निबंधांत गोखल्यांनी या सुधारणेचं महत्त्व सांगितले होते. हे जिल्हाधिकारी लोकांशी अपरिचित असतात व त्यांस लोकांच्या मनोवृत्तीची जाणीव होत आहे तोच त्यांस अन्यत्र बदलण्यांत येते. या जिल्हाधिकाऱ्यांस जिल्ह्यांतील गाऱ्हाणी समजणें फार अगत्याचे आहे. जिल्ह्यांतील लोकमत कळावे, सल्ला मिळावा एतदर्थ ही कौन्सिले स्थापावयाची होती. खरोखर ही योजना फारच हितकारक होती. हिंदुस्तानांतील बहुतेक कारभार या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हांकला जातो. त्यांस सल्ला देणारे मंडळ जर असेल तर फारच चांगले होईल. तीन वर्षे ही कौन्सिले केवळ सल्लागार असावी. पुढे त्यांचा जिल्ह्याधिकाऱ्यांवर ताबाही असावा असे गोखल्यांनी म्हटले होते. अर्थातच ठराव नापास झाला. म्युनिसिपलिट्या व लोकलबोर्डे यांचीही सत्ता वाढवावी, त्यांस जास्त अधिकार देऊन त्यांची सांपत्तिक स्थिति सुधारावी अशी सरकारात त्यांनी विनंति केली. गोपाळरावांनी पुनः पुनः केलेल्या मागणीने शिक्षण व आरोग्य या दोन खात्यांवर जो खर्च झाला तितका पूर्वी कधींच झाला नव्हता. आक्टोबर १९१० मध्ये मिंटो हे स्वदेशी गेले. त्यांच्या जागी किचनेर हे येणार असे ऐकिवांत होते. परंतु हिंदुस्तानच्या सुदैवाने लॉर्ड हार्डिज हें गव्हर्नर जनरल झाले. १९११ च्या पहिल्याच बैठकीत, तात्पुरता केलेला सभाबंदीचा कायदा कायम करण्याविषयी बिल आलें. गोखल्यांनी व पुष्कळांनी विरोध केला. कारण परिस्थिति बदलली होती. परंतु मजा ही कीं, पुष्कळ लोकप्रतिनिधींनी कायदा रद्द करूं नये असें सांगितले.
 ५ जानेवारी १९११ रोजी राष्ट्रीय सभेतर्फे नेमस्तांचं एक शिष्टमंडळही गव्हर्नर जनरलच्या भेटीस गेले होते. ते म्हणाले:— "Reforms had given the Indian people a larger opportunity than they had before of being associated with ther Government in the administration of the country. Also reforms had done much to bring about a better understanding between the Government and the people." यानंतर सुधारणांसंबंधी बंधनकारक असे जे कायदे १९०९ मध्ये करण्यांत आले होते ते रद्द होतील अशी आशा त्यानं शेवटी प्रदर्शित केली होती.
 या साली त्यांनी युनिव्हर्सल रेसिस काँग्रेसपुढे एक सुंदर व विचारपरिप्लुत निबंध वाचला. पूर्व व पश्चिम संस्कृति व तदनुरोधाने एकमेकांस हल्लीच्या विचारांत व परिस्थितीत काय शिकण्यासारखे आहे यांचें मार्मिक विवेचन त्यांत त्यांनी केले. प्रत्येक राष्ट्राचा कांहीं विशेष असतो. आणि प्रत्येक राष्ट्रानें इतरांपासून शिकण्यासारखे पुष्कळ असतें; सर्वगुणसंपन्न आपणच आहों असा अहंकार अंगीं चिकटला की प्रगति खुंटून परागति होऊं लागली असें समजावें. 'नेणपण सोडू नये' असें समर्थ सांगतात त्यांतील इंगित हेंच आहे. आपल्यास शिकण्यासारखें जगांत बहुत आहे; आपण कांहीं गोष्टींत नेणते असूं ही कल्पना घातुक नसून फायदेशीरच आहे. आधुनिक जीवनसंग्रामांत आपला टिकाव लागावा असे आपणांस वाटत असेल तर शिस्त, तरबेजपणा, विश्वास, स्वावलंबन, शास्त्रीय ज्ञान आणि सहकार्य यांची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाहीं.
 या वर्षी कौन्सिलमध्ये शिक्षण सार्वत्रिक करावयाचें बिल त्यांनी पुनः पुढे मांडले; अर्थातच तें नापास झालें. परंतु त्यामुळे ते नाउमेद झाले नाहीत. दुप्पट जोर त्यांच्या अंगांत संचारला. ते प्रथम मद्रासच्या बाजूला गेले व ठिकठिकाणी विद्यार्थ्यांपुढे त्यांनी देशभक्तीने भरलेली, मुद्देसूद आणि समतोल विचारसरणीची व्याख्याने दिली. प्रत्यक्ष कांहीं तरी काम करूं लागा कामाचे डोंगर आहेत; सुखस्वप्ने नकोत, देशाच्या भावि वैभवांची वर्णनेही नकोत, सद्यःस्थिति व परिस्थिति यांचा सम्यक् विचार करून कार्यप्रवण व्हा; हेंच पुनः पुनः न कंटाळतां त्यांनी सांगितले.
 या वर्षीचे त्यांचें दुसरें महत्त्वाचें काम म्हणजे त्यांनी सर्व देशभर हिंडून 'शैक्षणिक संघ' सर्वत्र स्थापन केले हें होय. देशास शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. जनमन शिक्षित झाले पाहिजे. आपले पुढारी कशासाठी, कोणाजवळ भांडत आहेत, कां भांडत आहेत, याचा उलगडा त्यांस झाला पाहिजे. या सर्व गोष्टीस शिक्षणाशिवाय अन्य रामबाण उपाय नाहीं. हिंदुस्तानांत शेकडा एकही मनुष्य लिहूंवाचूं शकत नाहीं ही केवढी लांछनास्पद व नामुष्कीची गोष्ट! इतर देशांची स्थिति पाहून स्वतःकडे दृष्टि वळविली म्हणजे कोणाचें हृदय भडभडणार नाहीं? त्याबरोबरच संतापही येईल. जपानचें तेजस्वी उदाहरण सदैव त्यांच्या दृष्टीपुढे असे. पन्नास वर्षांत अलौकिक व अपूर्व तयारी करून जपान पहिल्या दर्जाचें राष्ट्र झाले, यांतील इंगित तेथे झालेला शिक्षण व धंदेशिक्षण यांचा फैलावा हेंच. तें शिक्षणही मातृभाषेत दिलें गेलें. मातृभाषेंतून शिक्षण दिल्याविना राष्ट्राची प्रगति झपाट्याने होणार नाहीं. जपानांतील लोक जसे स्वाभिमानी आणि राष्ट्रप्रेमी असतात तसे आपले लोक कां होऊं नयेत? परंतु जपान स्वतंत्र आहे. ते आपल्या प्रजेच्या हितार्थ मनांत आणील तर काय करणार नाहीं? याच्या उलट आपली पिशवी परक्यांच्या हातांत. लष्कराकडे जाणारा द्रव्याचा ओघ थांबेल तेव्हां शिक्षणाकडे पैसा देण्यास फावेल! परंतु निराश होतां कामा नये. कानीकपाळी पुनः पुनः ओरडणें हेंच सध्यांचे कर्तव्य आहे. देशभर शैक्षणिक संस्था काढून त्या संस्थांचे मत सरकारवर लादले पाहिजे. म्हणजे नैतिक जबाबदारीमधून आपण सुटलों. १९१२ साली हें बिल त्यांनी पुनः मांडले परंतु तें नापास झालें. या बिलावरील त्यांचें भाषण फारच उत्कृष्ट आहे. लॉर्ड हार्डिज म्हणतात, 'During my period of office the most important measure in which Mr. Gokhale was interested was the bill to make better provision for the extension of primary education. Though he failed in indnoing the Council to accept the bill all those who heard him will remember the extraordinary force and ability with which he pressed his views. ग्लॅडस्टन साहेबांनी आयरिश बिल जसें पुनःपुनः पुनःपुनः आणलें- 'प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति' याचा दाखला जगास दाखविला- तद्वत् गोपाळरावांनी याही बाबतीत केलें. गोपाळरावांचे जोराचे व नेटाने केलेले सर्व प्रयत्न विफल झाले. परंतु तरीही रॉबर्ट ब्रूसची गोष्ट त्यांस पूर्ण पटली होती. 'फिरून यत्न करून पहा' हे त्यांचं सूत्र होते. १९१२ सालची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉस्लेम लीगची लखनौ येथे भरलेली परिषद होय. ही बैठक २२ मार्च रोजी झाली. आतांपर्यंतचं मॉस्लम लीगचें कार्य अत्यंत संकुचित होतें. राष्ट्रीय सभेस विरोध करावयाचा किंवा हिंदु लोकांशी छत्तिसाचा आंकडा ठेवून सरकारच्या पुढ्यांत नाचावयाचें असें तिचे धोरण होते. मुसलमानांस हीं तत्त्वें सर सय्यद अहंमद यांनी उपदेशिलीं. तुमचे हितसंबंध ब्रिटिश राज्याशी निगडित आहेत. हिंदु तुम्हांस गिळंकृत करतील हें विसरूं नका, असा उपदेश या पुढाऱ्याने आमरण केला. अर्थातच 'फोडा आणि झोडा' या तत्त्वावर ज्यांचं राज्य चालतें त्यांनी या अहंमदाचे गोडवे गावे आणि ब्रिटिश सत्तेचा आधारस्तंभ असें त्यास गौरवपर म्हणावें यांत औचित्याचा भंग कसला? चिरोल साहेब म्हणतात, In our day the British connection has had no stouter and more convinced supporter than the late Sir Syed Ahmed, than whom no Mahomedan has deserved or enjoyed greater influence over his Indian Co-religionists.' राष्ट्रीय सभा दर वर्षी मुस्लिम संघाचा पाठिंबा मागत असे. परंतु छे; हिंदूंशी एकी? मग आम्ही हाडाचे मुसलमान कसचे? या सय्यद अहंमदानंतर आगाखान पुढे आले. त्यांनी मॉस्लेम लीग स्थापन केली. त्यांचे ध्येय थोडक्यांत असें होतें. "The ordered development of the country under the Imperial Crown." सरकार या मुसलमानांस गोंजारत होते. बंगालची फाळणी केल्यानें मुसलमानांचें कांहींच नुकसान होत नव्हतें. उलट त्यांचे हितसंबंधच दिसत होते. अर्थात् मुसलमान राष्ट्रीय चळवळीत सामील होत ना. त्यांस माल मिळू नये, समाजांत त्यांच्याशी मिसळू नये, अशी प्रवृत्ति बंगालमध्ये दिसूं लागली. तेव्हां मुसलमानांनी दंगे केले. सरकारने या बाबतीच अर्थातच पक्षपात दाखविला. पेशावरमध्येही दंगे झाले, निजामहैदराबादेसही आग पेटली. सर्व हिंदू एकदिल झाले असतां मुसलमानांनी हिंदूस व पुढे मुसलमानांसही चिरडणाऱ्या सभेस पाठिंबा द्यावा हें हिंदूस कसे सहन होणार? आमच्या देशांत आलां आणि पुनः आम्हांवर उठलेल्या अरेरावास तुम्ही सहाय्य करतां? या गोष्टीचा कोणास संताय येणार नाही? वेळ आली म्हणजे सरकार उभयतांस चिरडून टाकील. तोपर्यंत अल्पसंख्याकांची बाजू आपण घेत आहों असा बहाणा सरकार करील. परंतु मुसलमान बंधूस व त्यांच्या पुढाऱ्यांस हें पसंत पडत नव्हते. १९०७ मधील गोपाळरावांच्या दौऱ्याने त्यांची मने थोडीफार निवळली होती, परंतु पुन्हां दंगे झाले आणि ऐक्याची अंधुक किरणशलाकाही गोपाळरावांच्या मनांतून लोपली. या प्रश्नासंबंधी ते फार चिंताग्रस्त असत. जर कधी काळी हिंदुमुसलमानांचं ऐक्य होणार नसेल तर या देशाचे कसे व्हावे? समजा वसाहतीचा दर्जा मिळाला तरी या आपसांतील वितुष्टाने कारभार चालावा कसा? या देशभक्ताचें मन या चिंतेमुळे उदास व खिन्न होई. देशाची भवितव्यता त्यास चमत्कारिक दिसे, रानड्यांनी काढलेलें देशाच्या स्थितीचें भावि मनोरम चित्र चित्तास रमवितें- परंतु बुद्धीस हें शक्य दिसत नाहीं. सरोजिनीबाईनी आपल्या आठवणीत गोखल्यांच्या या मनःस्थितीचं सुंदर चित्र रेखाटले आहे. सरोजिनीची व गोपाळराव गोखल्यांची प्रथम भेट १९०६ मध्ये झाली. त्या वेळेस कलकत्यास सामाजिक परिषद भरली होती. त्यांत सरोजिनीचे उत्कृष्ट भाषण झाले. गोखल्यांनी त्यांस प्रशंसापर पत्र पाठविले. १९०७-११ पर्यंत मुंबई, पुणे, मद्रास, दिल्ली, वगैरे ठिकाणी त्यांच्या गांठी पडत असत. परंतु एकमेकांची जास्त ओळख १९१२ च्या आरंभी झालो. या वेळेस कलकत्त्यास सरोजिनीच्या वडिलांच्या घरीच गोपाळराव उतरले होते. एके दिवशी गोपाळराव खिन्न व उदास अंतःकरणाने बसले होते. इतक्यांत सरोजिनी बाई तेथे आला. आपल्या राष्ट्राचे पुढे काय होणार या विषयीं त्याच्या मनांत विचार घोळत होते. ते सरोजिनीस एकदम मोठ्या उत्सुकतेनें म्हणाले 'हिंदुस्तानाविषयी आपणांस काय वाटते?' 'माझी एकत्र इच्छा आहे' असे बाई बोलल्या. 'हिंदुस्तानचे लवकरच काय होईल?'- असे पुनः उतावळेपणाने त्यांनी विचारले. 'पांच वर्षात हिंदुमुसलमानांचं ऐक्य' होईल असे उद्गार सरोजिनीने काढले ते ऐकून विषण्ण व निराश असे स्मित गोपाळरावांनी केले आणि ते म्हणाले, 'You are a poet, but you hope too much. It will not come in your life-time or in mine. Keep your faith and work if you can.' प्रकृति नादुरुस्त झाल्यामुळे गोपाळराव पुण्यास आले. ते अशक्त झाले होते. जिना चढण्याचीही त्यांस ताकद नव्हती.
 १९१२ च्या मार्च महिन्यांत २२ तारखेस जी मॉस्लेमलीगची बैठक झाली तेथे सरोजिनीबाईस आमंत्रण होते. तेथे बाईंनी अत्यंत महत्त्वाचें जोरदार. व वकृत्वपरिपूर्ण असे भाषण केले. ऐक्याची देशास किती जरुरी आहे हें आपल्या रसाळ काव्यमय परंतु स्फूर्तिदायक वाणीने त्यांनी मुसलमानांम पटविलें, लखनौस हिंदूंबरोबर सहकार्य करण्याचा ठराव बहुमताने पास झाला. काम संपतांच सरोजिनीबाई एकदम थेट पुण्यपत्तनी आल्या. गोपाळरावांस आपण समक्ष झालेली हकीगत केव्हां सांगू असं त्यांस झाले होते.
 २६ मार्च रोजी नामदार परांजप्यांसह सरोजिनीबाई गोपाळरावांस भेटण्यासाठी भारत सेवक समाजाच्या सदनांत गेल्या. गोखले अशक्त झाले होते. तरी त्यांच्या उद्योगी स्वभावानुसार, हा लेख वाच, तें स्फुट पहा असें ते करीत. मुस्लीमलीगवरील टीका ते वाचीत होते. रिकामपण कसें तें त्यांस माहीतच नव्हते. इतक्यांत सरोजिनीबाईस पाहतांच 'आपले म्हणणे खरें होणार, आपली इच्छा सफळ होण्याच्या मार्गास लागली हेच कळविण्यास आलां ना इतक्या तांतडीने?' असें ते एकदम म्हणाले. भराभरा प्रश्नांचा भडिमार त्यांनी सुरू केला. सर्व वृत्त यथावत् जाणून घेतलं. गोपाळरावांच्या फटफटीत चेहऱ्यावर प्रसन्नतेची छटा दिसूं लागली. सरोजिनीबाई म्हणाल्या 'राष्ट्रीय सभेनेही मुस्लिम लीगकडे सहानुभूतीची दृष्टि ठेविली पाहिजे. मी मुसलमानांस तसें वचन दिले आहे. गोपाळराव म्हणाले 'माझ्या हातांत जेवढे आहे तेवढे करण्यास मी कमी करणार नाही.' नंतर बाई जाण्यास निघाल्या. 'पुनः दोनप्रहरी या' असे गोपाळराव बोलले.
 दुपारी सरोजिनीबाई एकट्याच गोखल्यांकडे आल्या. गोखले खाली होते. एकाद्या चंडोलाप्रमाणे ते आनंदी दिसले. त्यांची खिन्नता व उद्विग्नता लयास गेली होती. आशेचा किरण डोळ्यांसमोर पुनः चमकूं लागला. भराभरा जिन्याच्या पायऱ्या चढून ते सरोजिनीस वरती घेऊन चालले. 'तुम्ही फार अशक्त व आजारी आहां; या पायऱ्या तुम्ही कसे चढणार?' असें बाई कळकळीने म्हणाल्या. गोखले म्हणाले, 'You have put new hopes into me; I feel strong enough to face life and work again.'
 या उद्गारांवरून मुसलमानांचे व हिंदूचे ऐक्य हा प्रश्न त्यांस किती जिव्हाळ्याचा वाटत होता है दिसून येते. देशाच्या दुर्दैवाबद्दल ज्याचें हृदय अहोरात्र जळतें, ज्यास क्षणभरही शांति मिळत नाहीं, त्याच्या देशभक्तचिं मोल. आम्ही काय करणार? विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे :- 'स्वदेश- भक्तीसंबंधाची माझी ही व्याख्या ठरलेली आहे. कोणत्याही महाकृत्याचे मुळाशी तीन गोष्टी अवश्यक असतात. पहिली गोष्ट म्हणजे अंतःकरणाची तळमळ; बुद्धीत किंवा तर्कशक्तीत वास्तविक काय अर्थ आहे? बुद्धि किंवा तर्कशक्ति कांही पावलें जाते आणि पुढील मार्ग आक्रमण करतां न आल्यामुळे अडखळून पडते. स्फूर्तींचा झरा नेहमी अंतःकरणांतूनच वहात असतो. बुद्धीला उघडण्याला अशक्य असलेले दरवाजे प्रेमच उघडू शकते. विश्वाच्या बुडाशी असलेली रहस्ये उघडी होण्याचा दरवाजा, प्रेम उघडू. शकते. ह्यास्तव माझ्या भावि सुधारकांनो! माझ्या भावि स्वदेशभक्तांनों! तुमच्या अंतःकरणास स्वदेशाबद्दल तळमळ लागली आहे काय? देवांचे आणि ऋषींचे कोट्यवधि वंशज जवळजवळ पशूंच्या पंक्तीला जाऊन बसले आहेत, याबद्दल तुमचें अंतःकरण विदीर्ण होऊन जातें काय? देशांतील लक्षावधि लोक भुकेनें मरत आहेत; शेंकडों वर्षांपासून क्षुधापीडेमुळे तळमळत आहेत, हें पाहून तुमचें अंतःकरण कळवळून जातें कां? आकाशांतील एकाद्या कृष्णवर्ण मेघाप्रमाणे जिकडे तिकडे अज्ञानांधकार पसरला आहे. याबद्दल तुमचें अतःकरण तिळतिळ तुटतें कां? या चिंतेमुळे तुम्हांला झोप येईनाशी झाली आहे कां? तुम्हांला क्षणभरसुद्धां विश्रांति मिळेनाशी झाली आहे कां? ह्या शोचनीय स्थितीचा विचार तुमच्या रक्तांत भिनून जाऊन रक्तवाहिन्यांतून वाहू लागला आहे कां? हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर तुमच्या अंतःकरणांतील चिंतनाचे विचार समानगतीनें वाहू लागले आहेत का? या निदिध्यासामुळे तुम्ही जवळ जवळ वेडे बनलां आहां कां? आपल्या भोवती पसरलेले दुःख हृदयांत भिनून जाऊन आपले नांव, कीर्ति, बायकामुलें, संपत्ति, इतकेंच नव्हे तर आपली शरीरें यांच्याबद्दल तुम्हांला अजीबात विस्मरण झालं आहे का? अशी स्थिति होणें ही स्वदेशभक्तीची पहिली पायरी आहे.' गोखले ही पहिली पायरी चढून वर गेले होते. सरोजिनीच्या नवीन संदेशाने त्यांना नव चैतन्य प्राप्त झाले. नंतर कांही वेळाने ते सरोजिनीस म्हणाले Stand here with me, with the stars and hills for witness and in their presence consecrate your life and your talent, your song and your speech, your thought and your dream to the mother-land. O poet, see visions from the hill-tops and spread abroad the message of hope to the toilers in the valleys,' सायंसमय होऊन शेवटचा रक्तिमा आजूबाजूच्या टेकड्यांवर पसरला होता. तो कमी होऊं लागून तारे चमकूं लागले होते. अशा प्रशांत, गंभीर प्रसंगी दशदिशांस व तारकासमूहास साक्ष ठेवून गोपाळरावांनी सरोजिनीस आपले तनमनधन देशास अर्पण करण्यास सांगितले. सृष्टीच्या वैभवापासून प्राप्त होणारे दिव्य संदेश, दऱ्यांखोऱ्यांतून अंधारांतून अडखळत चाचपडत जाणाऱ्या कार्यकर्त्यास सांगण्यास त्यांनी सरोजिनीबाईंस विनति केली. पवित्र विचारांनी देशांतील तरुणांची मने सोज्ज्वल करण्यास त्यांनी सरोजिनीस सांगितले. राष्ट्रीय ध्येयें कवीशिवाय अन्य कोण शिकविणार? 'कविस्तु क्रान्तदर्शी' भविष्य काळांतील गोष्टी त्यास कल्पनाशक्तीने जवळ पाहतां येतात व तदनुरूप तो लोकांस मार्ग दाखवितो. ज्या वेळेस गोखले सरोजिनीस हें कर्तव्य शिकवीत होते तो देखावा किती हृदयस्पर्शी असला पाहिजे?
 मुसलमानांचा प्रश्न सुटेल अशी आशा त्यांच्या मनांत पुनः उद्भवली; वठलेल्या रोपट्यास पुनः अंकुर फुटले. त्यांची प्रकृति हळूहळू सुधारूं लागली. उत्साहाने व हुशारीने नवीन कामकाज ते पाहूं लागले.
 १९१२ मध्ये दोन महत्त्वाची कामं गोपाळरावांच्या अंगावर पडली. हीं कामे त्यांच्या अंतापर्यंत पुरली. आणि तरीही ती पुरी झाली नाहीतच. एक प्रश्न म्हणजे आफ्रिकेमध्ये हिंदु लोकांचा होणारा अमानुष आणि मनुष्यास काळिमा लावणारा छळ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन.
 १९१२ च्या जुलै महिन्यांत हें कमिशन बसले. या कमिशनचे अध्यक्ष लॉर्ड इस्लिंग्टन हे होते. एकंदर १२ सभासदांचं हे कमिशन होते. चौबळ, गोखले, अबदुल रहिम (मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश) असे तिघे एतद्देशीय होते. या कमिशनला विशेषतः तीन गोष्टींत चवकशी करावयाची होती.
 १ जे सनदी नोकर निवडले जातात, त्यांना शिकविण्याची पद्धत, आणि पसंतीसाठी कांहीं दिवस नौकरीवर नेमणं.
 २ नौकरीच्या अटी, पगार, रजा, पेन्शन वगैरे.
 ३ युरोपियनंतर लोकांन सनदी नौकरीत जाण्यास किती व कसकसे अडथळे आहेत; आणि या सनदी नौकरीच्या प्रांतिक आणि वरिष्ठ अशा दोन विभागण्या करण्यांत कांहीं फायदा आहे की नाहीं.
 हे प्रश्न व तत्संबंधी इतर प्रश्न, सूचना वगैरे कामे या कमिशनला करावयाची होती. या कामाला आरंभ होण्याच्या आधी गोखल्यांस आफ्रिकेत जावे लागले.