नवा शिपाई

विकिस्रोत कडून

नवा शिपाई


नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें, कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें ! ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा, तेचि पतित लीं ज आंखडिती प्रदेश साकल्याचा !

खादाड असे माझी भूक, चतकोरानें मला न सूख; कूपांतिल मी नच मंडूक;

मळयास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे ! कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !

जिकडे जावें तिकडे माझीं भांवडें आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत; कोठेंही जा---पायांखालीं तृणावृता भू दिसते; कोठेंही जा---डोईवरतें दिसतें नीलांबर तें !

सांवलींत गोजिरीं मुलें, उन्हांत दिसतो गोड फुलें, बघतां मन हर्षून डुलें;

तीं माझीं, मी त्यांचा,---एकच ओघ अम्हांतुनि वाहे ! नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें !

पूजितसें मी कवणाला ?--- तर मी पूजीं अपुल्याला, आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला; ‘ मी ’ हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक आणुनि तो, निजशिरीं ओढिती अनर्थ भलते देख !

लहान---मोठें मज न कळे, साधु---अधम हें द्वयहि गळे, दूर---जवळ हा भाव पळे;

सर्वच मोठे---साधु---जवळ, त्या सकलीं मी भरुनी राहें ! कोण मला वठणीला आणूं शकतों तें मी पाहें !

हलवा करितां तिळावर जसे कण चढती पाकाचे, अहंस्फूर्तिच्या केन्द्राभंवतें वेष्टन तेंवि जडाचें; आंत समचि निर्गुण तिलक, वरी सदृश सगुण तो पाक, परि अन्यां बोंचाया घरितो कांटे कीं प्रत्येंक !

अशी स्थिती ही असे जनीं ! कलह कसा जाइल मिटुनी ? चिंता वागे हीच मनीं.

शान्तीचें साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे !

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.