धर्मराजाचे दुर्गास्तवन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> श्री गणेशाय नमः|

नगरी प्रवेशले पंडुनंदन| तो देखिले दुर्गास्थान| धर्मराजा करी स्तवन|जगदंबेचे तेधवा||१||

जय जय दुर्गे भुवनेश्वरी|यशोदागर्भसंभवकुमारी| इन्दिरारमणसहोदरी|नारायणी चंडीके अंबीके||२||

जय जय जगदंबे भवानी|मूळप्रकृती प्रणवरुपिणी| ब्रह्मानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३||

जय जय धराधरकुमारी|सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी| हेरंबजननी अंतरी|प्रवेशी तू अमुचिया||४||

भक्तहृदयारविंद्रभ्रमरी| तुझिया कृपावलोकने निर्धारी| अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्यरचना अद्भुत||५||

तुझिया आपंगते करून्|जन्मांधासी येती नयन्| पांगुळ धावे पवनाहून|करी गमन त्वरेने||६||

जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतीसम बोलका| तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७||

ब्रम्हानंदे आदि जननी|तव कृपेची नौका करुनी| दुस्तर भवसिंधु लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८||

जय जय आदि कुमारीके|जय जय मूळपीठनायिके| सकल सौभाग्यदायिके|जगदंबिके मूळप्रकृती||९||

जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी| समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०||

जय आनंदकासारमराळिके|पद्मनयन दुरितकानन पावके| त्रिविध ताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११||

शिवमानस कनक लतिके|जय चातुर्य चंपक कलिके| शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२||

तव मुखकमल शोभा देखोनी|इंदुबिंब गेले गळोनी| ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी नीजवीसी||१३||

जीव शीव दोन्ही बालके|अंबे तुवा नीर्मीली कौतुके| जीव तुझे स्वरुप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४||

शीव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्यमुक्त| स्वनंदपद हातासी येत्|कृपे तुझ्या जननीये||१५||

मेळवुनी पंचभूतांचा मेळ्|तुवा रचिला ब्रह्माडगोळ| इच्छा परतता तत्काळ|क्षणात निर्मूळ करीसी तू||१६||

अनंतबालसूर्य श्रेणी|तव प्रभेमाजी गेल्या विरोनी| सकल सौभाग्य शुभकल्याणी|रमा रमणे वरप्रदे||१७||

शंबरारि रिपुवल्लभे|त्रैलोक्यनगरारंभस्तंभे| आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृती||१८||

जय जय करुणामृतसरीते|निजभक्तपालके गुणभरीते| अनंत ब्रह्मांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९||

सच्चिदानंद प्रणवरुपिणी|चराचरजीव सकलव्यापिणी| सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०||

ऐकोनी धर्मराजाचे स्तवन्|दुर्गादेवी झाली प्रसन्न| म्हणे तव शत्रू संहारून्|रीज्यी स्थापीन धर्मा तू ते||२१||

तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदी जनाते| शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२||

तुवा जे केले स्तोत्रपठण्|हे जो करील पठण श्रवण| त्यासी सर्वदा रक्षीन्|अंतर्बाह्य निजांगे||२३||

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg