देव्यपराधक्षमापनस्तोत्रम् ( अनुवाद पर्याय २)

विकिस्रोत कडून

देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्

न मन्त्रं नो यन्त्रं तदापि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदापि च न जाने स्तुतिकथाः ।
न जाने मुद्रास्ते तदापि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ॥ १ ॥

हे माते! मला मंत्र कळत नाही, यंत्र कळत नाही, तसेच तुझी स्तुती कशी करावी हे ही मला कळत नाही. तुझे आवाहन कसें करावें, ध्यान कसें करावें हेही मला समजत नाही. तुझी स्तुती करण्यास योग्य अशा कथाही मला माहीत नाहींत. मंत्र किंवा उपासना शास्त्रातील तुझ्या मुद्रा कोणत्या आणि त्या कशा कराव्यात हेही मला माहीत नाही. हे आई! तुझ्यापुढे विलाप कसा करावा हेही मला कळत नाही. पण आई! तुला अनुसरले असता, तुला शरण गेले असता सर्व क्लेशांचा, दुःखांचा, संकटांचा नाश होतो एवढें मात्र मला कळतें. ॥१॥

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् ।
तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥ २ ॥

हे आई ! तुझ्या पूजापद्धतीचे मला ज्ञान नसल्याने, तुझी पूजा करण्यास लागणारे द्रव्यही माझ्याजवळ पुरेसे नसल्याने आणि माझ्यात पुरेपूर आळस भरलेला असल्याने तुझी पूजा करणें मला शक्य झाले नाही आणि तुझ्या चरणाला मी अंतरलो; त्याबद्द्ल सर्वांचा उद्धार करणाऱया हे कल्याणमयी आई ! मला तू क्षमा कर. कारण कुपुत्र जन्माला येऊं शकेल पण आई मात्र कधी कुमाता होऊ शकत नाही. ॥ २ ॥

पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः ।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति ॥ ३॥

हे माते ! ह्या पृथ्वीवर सरळ वागणारे तुझे पुष्कळ पुत्र आहेत. पण त्या मध्ये मीच एक निराळा आणि चंचल वृत्तीचा असा तुझा मुलगा आहे. तरीपण हे कल्याणकारी आई ! माझा त्याग करणे तुला योग्य नाही, कारण कुपुत्र जन्माला येऊं शकेल पण आई मात्र कधी कुमाता होऊ शकत नाही. ॥ ३ ॥

जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया ।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥ ४ ॥

हे जगदम्बे माते, मी तुझी चरणसेवा केली नाही. किंवा तुला उद्देशून मी पुष्कळसे द्रव्यदानही केले नाही. तरीदेखील तू माझ्यावर अजोड प्रेम करतेस. ह्यावरून हेच सिद्ध होते की कुपुत्र जन्माला येऊं शकेल पण आई मात्र कधी कुमाता होऊ शकत नाही. ॥ ४ ॥

परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि ।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ॥ ५ ॥

हे गणेशमाते, मी अनेक देवांच्या निरनिराळ्या सेवा करण्यात व्यग्र होऊन (ते प्रसन्न न झाल्याने त्यांना) सोडून दिले. (असे करता करता) वयाची पंच्याऐंशी वर्षे उलटून गेली. हे माते, आताही जर तुझी कृपा झाली नाही, तर निराधार असा मी कोणाला बरे शरण जाऊ ? ॥ ५ ॥

श्र्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः ।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनःको जानीते जनानि जपनीयं जपविधौ ॥ ६ ॥

हे अपर्णामाते, तुझ्या मंत्राची अक्षरे कानी पडताच निरक्षरसुद्धा अतिशय मधूर वाणीचा वक्ता होतो. तसेच निर्धनसुद्धा कोट्याधीश होऊन निर्भयपणे वावरतो. (कानावर मंत्राक्षरे पडण्याचे जर एवढे फल तर) हे माते, त्या मंत्राचा जप करण्याचे फल केवढे असेल, हे कोणता मनुष्य जाणू शकेल बरे ! ॥ ६ ॥

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः ।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ॥ ७ ॥

आई भवानी ! ज्याला अंगाला लावायला चितेचे भस्म आहे, खायला विष आहे, नेसा पांघरायला दिशा हीच वस्त्रे आहेत, मस्तकावर जटांचा जंजाळ आहे, गळ्यामध्ये सर्पांची माळ आहे, जो पशुपती म्हणजे वृषभावर बसतो, हातात भिक्षापात्र म्हणून ज्याने मनुष्याची कवटी धारण केली आहे, जो भूतगणांचा स्वामी आहे अशा शंकराला सुद्धा जगदीश विश्वनाथ अशी श्रेष्ठ पदवी प्राप्त झाली ह्याचे कारण तू त्यांना हात दिलास. तुझ्याशी केलेल्या पाणीग्रहणाचे हे फळ आहे. ॥ ७ ॥

न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः ।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ॥ ८ ॥

हे चन्द्रमुखी माते, मला मोक्षाची इच्छा नाही. तशी प्रपंचातल्या वैभवाचीही इच्छा नाही. विज्ञान जाणुन घेण्याची इच्छा नाही किंवा सुखाचीही इच्छा नाही. तर माझी तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की, माझा (सारा) जन्म मृडानी, रुद्राणी, शिव, शिव, भवानी असा अजप करण्यातच व्यतित होवो. ॥ ८ ॥

नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः ।
श्यामे त्वव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ॥ ९ ॥

हे श्यामवर्णे, निरनिराळ्या उपचारांनी मी तुझी विधिपूर्वक पुजा केली नाही. उलट कठोर विचारांनी भरलेल्या शब्दांनी (इतरांना दुखवण्यासारखे) कोणते दुष्कृत्य केले नाही?(असे असूनही) हे माते,निराधार अशा माझ्यावर जर तू थोडीशी जरी कृपा करीत असशील, तर ते तुला म्हणूनच शोभण्यासारखे आहे. (कारण तू माझी आई आहेस.) ॥ ९ ॥

आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशि ।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ॥ १० ॥

हे आई दुर्गे ! हे दयासागर देवी ! संकटात बुडाल्यामुळे मी तुझे स्मरण करतो, हा माझा धूर्तपणा आहे, असे मानू नकोस.कारण तहान-भूकेने व्याकूळ झाल्यावरच (मुलांना) आईची आठवण येते. ॥ १० ॥

जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि ।
अपराधपरम्परावृत्तं न हि माता समुपेक्षते सुतम् ॥ ११ ॥

हे जगदम्बे, तुझी माझ्यावर परीपूर्ण कृपा आहे,यात आश्र्चर्य ते काय? मुलाने कितीही अपराध केले तरी आई काही मुलाचा त्याग करीत नाही ! ॥ ११ ॥

मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि ।
एवं ज्ञात्वा महादेवि यथा योग्यं तथा कुरु ॥ १२ ॥

हे महादेवी, माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि पापे नाहीशी करणारी तुझ्यासारखी कोणी नाही. हे ध्यानात घेऊन तुला जे योग्य वाटेल, ते कर. ॥ १२ ॥


॥ इति श्रीशंकराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.