त्यागातील वैभव

विकिस्रोत कडून

लक्ष्मीला आपले वैभव सर्व देवांगनांना दाखवावे, अशी इच्छा उत्पन्न झाली; परंतु ते केव्हा दाखवायचे? कोणता तरी प्रसंग पाहिजे होता. एखादा उत्सव-समारंभ योजिला पाहिजे होता. ती विचारात होती. “आज तू सचिंत का दिसतेस?" भगवान विष्णूंनी प्रश्न केला. “तुमचे पाय चेपून चेपून कंटाळले, लग्न झाल्यापासून तुमचे पाय चुरीत बसले आहे; परंतु पुरे म्हणाल तर शपथ! आधी मुळी बोलायलाच तुम्हाला वेळ होत नाही. सदैव विश्वाची चिंता. ज्याला स्वतःच्या पत्नीच्या सुखदुःखाची चिंता नाही, तो विश्वाची चिंता काय करणार?" लक्ष्मी रागावून म्हणाली. “परंतु माझे पाय चेप म्हणून मी कधीतरी सांगितले का? तूच माझ्याकडे आलीस, माझ्या गळ्यात माळ घालून पाय चेपीत बसलीस. तुझ्या स्वयंवरमंडपातसुद्धा मी आलो नव्हतो. मी विश्वाचा सेवक, विश्वाचे पालन करणारा. मला कोठून होणार वेळ? तुला हे समजत नव्हते का?" “समजत होते, परंतु गर्वाने पण करुन चुकले. त्रिभुवनातील झाडून सारे पुरुष माझ्या आशेने आले होते. स्वयंवरमंडपात किती गर्दी! मी दृष्टीस पडावे म्हणून माना उंच करुन बघत होते. प्रत्येकाला वाटत होते की ही लक्ष्मी स्वतःला मिळावी; परंतु माझ्यासाठी लाळ घोटीत येणाऱ्यांना मी कशी किंमत देऊ? जो अजिंक्य आहे, त्याला जिंकण्यात पुरुषार्थ आहे. ते तर सारे केव्हाच माझ्यासाठी वेडे झाले होते. माझ्यासाठी जो वेडा झालेला नाही, माझी ज्याला इच्छा नाही, त्याला मी माळ घालणार आहे, असा मी माझा पण जाहीर करताच सर्वांची तोंडे काळवंडली, सारे निराश झाले.

कोण असा आहे की, जो माझ्यासाठी वेडा झाला नाही, ते पाहण्यासाठी मी हातात माळ घेऊन निघाले. माझ्यासाठी वेडा न होणारा असा कोण वेडपट आहे? माझी इच्छा न करणारा असा कोण निरिच्छ आहे? लक्ष्मीहूनही थोर असे रत्न कोणाजवळ आहे, ते पाहावयास मी निघाले. तुम्ही दिसलात. विश्वाच्या चिंतेत दिसलात. तुम्ही त्रिभुवनाच्या कल्याण चिंतनात मग्न होता जगाचे कल्याण करणे ही लक्ष्मीहूनही थोर गोष्ट आहे, असे तुम्हाला वाटत होते. माझ्याकडे ढुंकूनही तुम्ही पाहिले नाही. माझा अहंकार दुखावला गेला. माझ्याकडे ढुंकून न पाहणाऱ्या या वेड्याला माझ्या पायाशी लोळण घेणारा बनवीन, अशा ईर्ष्येने मी तुम्हाला माळ घातली. एक दिवस तुम्ही माझे पाय चेपाल, अशा आशेने मी रात्रंदिवस तुमचे पाय चेपीत बसले. एक दिवस तुम्ही माझे दास व्हाल, या आशेने मी तुमची दासी झाले. तुम्हाला जिंकून घेण्यासाठी नम्र झाले; परंतु देवा, माझा अहंकार गेला. इतकी वर्ष मी तुमचे पाय धरुन बसले आहे, परंतु तुम्ही आहात तसेच आहात. कधी बाहेर हिंडायला गेले नाही. कधी मैत्रिणींना भेटले नाही. कधी नटले नाही. शृंगारसाज केला नाही. सारे जीवन जणू फुकट गेले! न पतीचे प्रेम, न सुखभोग, न काही." “लक्ष्मी, वेडी आहेस तू. माझे तुझ्यावर प्रेम आहे. प्रेम नसते तर ही तुझी सेवा मला भारभूत वाटली असती. बरे, ते जाऊ दे. तू उद्यापासून काही दिवस इकडेतिकडे जा. अलंकार घाल. सर्वत्र मिरव. पाहा त्यात आनंद वाटतो का?" “उगीच का दागदागिने घालून मिरवायचे? ते दाखवायचे तरी कोणाला?" “मला दाखव." “तुम्ही तर विरक्त." “मग कोणाला दाखवतेस?" “तेहेतीस कोटी देवांगना बोलवाव्यात, अप्सरा बोलवाव्यात. पार्वती, सावित्री यांनाही आमंत्रण द्यावे, असे मनात येते; परंतु प्रसंग हवा ना?" “अग, आता पृथ्वीवर वसंतपूजा सुरु आहेत. वसंतोत्सव सर्वत्र होत आहेत. हळदीकुंकवाचे समारंभ होत आहेत. तूही हळदीकुंकू समारंभ कर. या निमित्ताने साऱ्या देवांगना एकत्र जमा, सुखसंवाद करा. तू सर्वांच्या ओट्या भर. तू समुद्राची मुलगी. तुला काय तोटा! हिऱ्यामोत्यांच्या राशी आण. त्यांनी भर ओट्या. तूही अलंकारांनी नट. जरा गंमत करा. माझी ना नाही." “मग करु वसंतपूजा? करु हा हळदीकुंकू समारंभ?" “कर. मी जरा बाजूला जाऊन बसेन. तेहेतीस कोटी देवांगना येणार. गलबला व्हायचाच. बायकांची तोंडे. बंद झाली तर एकदम बंद होतात. मग एक शब्द नाही बोलणार. तोंडे सुरु झाली तर मग आवरणे कठीण! खरे ना?" “बायकाही शांत राहतात. मी सरस्वतीला बोलवीन. ती सुंदर गाणी म्हणेल. साऱ्या स्त्रिया स्तब्ध बसतील. उगीच स्त्रियांची निंदा नका करु. पुरुषांच्या सभांतून का गोंधळ नसतात? जाऊ दे. आताच भांडण नको. मग, ठरले हं!" “ठरले."

लक्ष्मीने तयारी चालविली. ती आधी माहेरी गेली. विष्णूला माळ घातल्यापासून ती पित्याकडे गेली नव्हती. पित्याला अपार आनंद झाला. “किती दिवसांनी तू आलीस!" सागर म्हणाला. “पतीचे प्रेम जिंकून घेईन, मग कोठे ती जाईन, असे मी मनात ठरविले होते. म्हणून आले नाही." लक्ष्मी म्हणाली. “तू व चंद्र दोघे मला फार आवडता. चंद्र वर दिसताच माझे हृदय उचंबळते. सहस्त्रावधी हातांनी त्याला जवळ घेऊन नाचवावे, खेळवावे असे वाटते; परंतु तो दूरच राहतो. माझे हात पोचत नाहीत. आणि तो लबाड आहे. आपले संपूर्ण तोंड मला कधी दाखवत नाही. कधी हळूच जरा डोकावतो व अदृश्य होतो. कधी थोडेसे तोंड दाखवतो, जरा हसतो व पळतो. कधी जरा डोळे मिचकावतो व जातो निघून. महिन्यातून फक्त एक दिवस संपूर्ण दर्शन मला देतो. चंद्राचे स्पर्शन नाही तर निदान असे दर्शन तरी होते; परंतु तुझे दर्शनही नाही. रात्रंदिवस मी तुम्हाला हाका मारीत असतो. तुम्हाला भेटण्यासाठी अधीर होत असतो. आज आलीस. पती हे तुझे सर्वस्व! ही गोष्ट जरी खरी असली तरी पित्याचीही आठवण ठेवावी, हो बाळ! आणि तू किती वाळलीस! लग्नाच्या आधी कशी होतीस?" असे म्हणून सागराने सहस्त्रावधी प्रेमळ हातांनी मुलीला पोटाशी धरले. डोळ्यांतून गळणाऱ्या अश्रूंनी मुलीला स्नान घातले. “बाबा, आम्हाला आठवून तुमच्या हृदयाचे अगदी पाणी पाणी होऊन गेले असेल, नाही? परंतु काय करायचे? आताही मी आले आहे; परंतु लगेच जायचे आहे." “भेटलीस, पुरे झाले. कर्तव्यकर्म ज्याला त्याला आहे." “बाबा, तुमच्याजवळ एक गोष्ट मागायला आले आहे. लग्न झाल्या दिवसापासून मी कधी उत्सवसमारंभ केला नाही. आता मी मोठा उत्सव करणार आहे. सर्व देवांगनांना बोलावणार आहे. त्यांच्या ओट्या भरणार आहे. तुमची काही संपत्ती मला द्या. सर्व देवांगनांची हिरे-माणकांनी ओटी भरावी, मोत्यांच्या अक्षता कपाळी लावाव्यात, असे मनात आहे. माझी इच्छा तुमच्याशिवाय कोण पुरविणार? आणि सुंदर रंगाची पोवळीही हवी आहेत, त्यांची तोरणे करुन लावीन. जे जे सुंदर असे तुमच्याजवळ असेल, ते ते द्या." “बाळे, सारे देईन हो! तुला काही कमी पडू देणार नाही. तुझा गरुड पाठव. तो करील खेपा. तू किती नेणार? तुझा पिता रत्नाकर आहे. माझ्याजवळ मोत्यांची कोट्यावधी शेते आहेत. हिरेमाणकांच्या अनंत खाणी आहेत. पोवळ्यांची लागवड कमी केली होती; परंतु पुन्हा वाढवण्याचे ठरवीत आहे. तू कधी मागितलेच नाहीस. मुलांचे लाड पुरवावेत, त्यांच्या हौशी पुरवाव्यात, हाच आईबापांचा आनंद असतो."

लक्ष्मी पित्याजवळ दोन दिवस राहिली. नंतर निरोप घेऊन जावयास निघाली. पित्याने तिला अमोल अलंकार दिले. सूर्यकिरणांसारखी वस्त्रे दिली. पुत्रीला निरोप देताना त्याची विशाल छाती दुःखाने खालीवर होऊ लागली. त्याला अपार हुंदका आला, तो आवरेना. “बाबा, हे काय? असे रडू नका. मुली का घरी राह्यच्या असतात? त्या पतिगृही जाण्यातच त्यांची कृतार्थता! मी आता मधूनमधून येत जाईन." “मी तुझ्या पतिदेवांना एक प्रार्थना करणार आहे." “ती कोणती?" “ते रात्रंदिवस काम करतात. जराही विसावा घेत नाहीत. मी त्यांना सांगेन की चार महिने तरी माझ्याकडे येऊन राहत जा. संपूर्ण विश्रांती घेत जा. आठ महिने कष्ट करा. चार महिने विसावा घ्या." “परंतु ते ऐकतील का?" “त्यांना सांगेन की, माझी मुलगी तुमच्या पदरी पडली. मुलीच्या सौभाग्याची पित्याला चिंता असते. तुम्ही रात्रंदिवस अविश्रांत श्रम करुन प्रकृती बिघडून घ्याल. मग माझ्या मुलीच्या दुःखाला सीमा राहणार नाही. संसारात पडले म्हणजे जरा जपून वागावे लागते. मग केवळ आपलाच हेका चालवणे बरे नव्हे, असे त्यांना सांगेन. ते ऐकतील. हजारो हातांनी प्रणाम करुन त्यांना प्रार्थीन. बाळे, मग चार महिने येऊन राहशील? पावसाळ्यात चार महिने राहत जा. त्या चार महिन्यांत माझीही प्रकृती जरा बिघडते. पावसाळा असल्यामुळे बाळ चंद्र वर दिसत नाही. त्याला काळे काळे ढग आच्छादून टाकतात ते मला बघवत नाही. मी खवळतो, गर्जतो, प्रक्षुब्ध होतो. सारे विश्व ग्रासून टाकावे, असे मला वाटते. स्वतःची मर्यादा सोडावी, असाही वेडा विचार मनात येतो. बाळ, ते चार महिने मी कसे दवडीत असेन ते माझे मला माहीत. सारखा अस्वस्थ व अशांत असतो. सारखे सुस्कारे सोडीत असतो. धावत धावत जातो व दगडाधोंड्यावर डोके आपटू बघतो; परंतु शेवटचा धीर होत नाही. पुन्हा कष्टाने मागे येतो. लक्ष्मी, तूही तुझ्या पतीचे मन वळव. त्याला सांग की, बाबा वृद्ध झाले आहेत. पावसाळ्यात चार महिने त्यांना बरे नसते. त्यांच्याकडेच जाऊन राहू. ते ऐकतील. आणि माझ्याकडे राहूनही त्यांना विश्वाचा कारभार चालवता येईल; परंतु त्यांनी विसावा घेणेच बरे! मला आधार होईल व त्यांना विसावा होईल." “बाबा, त्यांना मी सांगेन. आता जाते. फार रडत जाऊ नका. उगीच आमची काळजी करु नका. तुमच्या आशीर्वादाने माझे व चंद्ररायाचे नीट चालले आहे. येते हं मी."

पित्याचा आशीर्वाद घेऊन लक्ष्मी वैकुंठाला परत आली. एक मोठा प्रासाद उभारण्याचे काम सुरु झाले. त्वष्टा त्या कामावर देखरेख करीत होता. समुद्राच्या निर्मळ फेसापासून प्रासाद उभारण्याचे त्याने योजिले होते. शुभ्र स्वच्छ प्रासाद. मधून मधून हिरे, माणके, पाचू, इंद्रनील वगैरे रत्ने बसविण्यात आली होती. पोवळ्यांचे नयनमनोहर वेल ठायी ठायी सोडण्यात आले होते. शेषाने सर्पांच्या मस्तकावरचे कोट्यावधी तेजस्वी मणी पाठवून दिले. ते मणी सर्पाकार असे भिंतीतून बसविण्यात आले. कुबेर आपले सर्व भांडार घेऊन तेथे आला होता. त्या भांडारातून लागेल तो माल त्वष्टा नेत होता. त्याची यादी करुन ठेवण्यात आली. नंदनवनातील कल्पवृक्षांचे पल्लव आणून तेही मधून मधून लावण्यात आले होते. त्वष्ट्याने रत्ने व पुष्पे यांचाच जणू तो प्रासाद बनविला. “ताई, तुझ्या समारंभात मी कोणते काम करु?" चंद्राने हळूच येऊन विचारले. “भाऊराया, तू येऊन सौम्य, सुंदर प्रकाश पाड. तुझा प्रकाश सर्वांना आवडतो. तू उगवलास की सर्वांना आनंद होतो. ताईच्या हळदीकुंकू समारंभास शोभा आण." “मी नक्षत्रांच्या माळा पाठवू का? तू जपून वापरणार असशील तर पाठवीन." “हं, पाठव. प्रासादाच्या आत लावू. फार सुंदर दिसतील, नाही?" “ताई, वायुदेव व पर्जन्यदेव यांचीही फार इच्छा आहे की काही काम करावे म्हणून." “त्यांना कसे सांगायचे काम? तू माझा भाऊ म्हणून दिवाबत्तीचे काम तुला सांगितले. तुला सांगायला संकोच नाही." “ताई, थोरांकडचे काम करावे व कृतकृत्य व्हावे, असे सर्वांना वाटत असते. तुझा पती विश्वाची काळजी वाहतो. त्याची तू पत्नी. तुझे काम म्हणजे भगवान विष्णूचे काम. सांग, त्यांनाही काही काम सांग." “त्यांना काम करण्यात कृतार्थता वाटत असेल तर सांगते काम. आमचे बायकांचे काय? आम्ही सर्वांना राबवून घेऊ शकतो. कोणी नसले तरी एकट्या आम्ही रात्रंदिवस काम करु व प्रसंग पार पाडू. बरे, शंभर माणसे कामाला असली तरीही आम्हाला पुरी होत नाहीत. वायुदेवाला म्हणावे, हळदकुंकवाच्या दिवशी मंद, शीतल असा वाहत रहा. माझ्या बाबांच्या गावाहून येत रहा. म्हणजे थंडगार असा असशील. तसेच, बरोबर सुगंध आण म्हणावे आणि सारे रस्ते स्वच्छ ठेव. इवलासुद्धा केरकचरा त्या दिवशी नको. वाटेत दगडधोंडे, काटे काही नको. सारे म्हणावे उडवून टाक. कोट्यवधी बायका येणार. कोणाला वाहने असतील, कोणाची नसतील. रस्ता सुंदर ठेवणे आपले काम. आणि पर्जन्यदेवाला म्हणावे सारा रस्ता शिंपडून ठेव. चिखल नको मात्र होऊ देऊस. बेताचा झिम् झिम् सडा घाल. म्हणजे पायांनी धूळ उडणार नाही. सांग ही त्यांना कामे." “सांगेन. त्यांना आनंद होईल. जातो हं ताई!" असे म्हणून चंद्र गेला. लक्ष्मीचा आनंद गगनात मावेना. तो प्रासाद पाहून तिची दृष्टी सुखावली. अतिरम्य असा तो प्रासाद होता. त्याच्यावर चंद्राचे किरण पडून तो अधिकच मनोहर दिसला असता. गरुडाने सागराकडून रत्नांच्या राशी आणून ठेवल्या. शिवाय, सागराने हिरव्यानिळ्या रंगांची अनंत वस्त्रे पाठविली होती. सर्व रस्त्यांवरुन पायघड्या घालण्यासाठी ती दिंडे पाठवण्यात आली होती. “माझ्या बाबांना सारे सुचले. थोर आहेत माझे बाबा." ती म्हणाली. लक्ष्मीने गरुडाला सर्व देवांकडे जाऊन आमंत्रणे देण्यास सांगितले. “लक्ष्मीबाई, मी सर्वत्र जाईन. परंतु शंकराकडे जाणार नाही." गरुड म्हणाला. “का रे बाबा?" “तेथे तो व्रात्य नंदी आहे. त्याने एकदा मागे एका हुंकारासरशी मला नाकात ओढले. कोण माझी त्रेधा! शिवाय तेथे ती भुते-प्रेतेपिशाच्चे असतात. मला भीती वाटते." “शंकर तर भोळे. तेथे कशाची भीती?" “ते भोळे आहेत. परंतु त्यांच्या भोवतालची मंडळी भोळी नाहीत." “बरे, नको जाऊस. पार्वतीला आपोआप कळेलच की वैकुंठात हळदीकुंकू आहे म्हणून. तो नारद आहे ना, तो सारी बातमी नेईल. देवलोकीचे ते जिवंत वृत्तपत्र! आणि बोलावले तरी पार्वती येणारही नाही. साऱ्या देवांगना नटूनथटून येणार. पार्वतीला यायला लाज वाटेल. तिच्याजवळ ना धड वस्त्रे, ना एखादा दागिना. राहू दे. बाकी सर्वत्र तर जाऊन ये. ब्रह्मदेवाकडे जा. गणपतीकडे जा. कोणास वगळू नकोस. समजलास ना?" गरुड स्वर्गलोकी गेला. सर्व देवांच्या घरी त्याने निमंत्रण दिले. देवांच्या बायकांना आनंद झाला. आज त्यांना मिरवायला सापडणार होते. साऱ्या देवांगना आपापले अलंकार घासून-पुसून स्वच्छ करु लागल्या. तगवणीची राखीव लुगडी सर्वांनी बासनातून काढली. त्यांनी नीट वेण्याफण्या केल्या. कल्पवृक्षांची फुले त्यांनी केसातून गुंफिली. त्या अप्सराही नटल्या. इंद्राणीने सर्वांचे झाले का म्हणून चौकशी केली, सारी सिद्धता झाली. “आई! तुझ्याबरोबर मी येतो." जयंत म्हणाला. “तू का आता लहान? साऱ्या बायका हसतील." इंद्राणी म्हणाली. “आईला मूल कितीही वाढले तरी लहानच असते, असे तूच ना परवा बाबांना म्हणालीस?" “तू ऐकायचा नाहीस. हट्टी आहेस अगदी!" “जयंत, इकडे ये. जायचे नाही." इंद्राने रागाने सांगितले. “जा बाळ, मी तुला खाऊ आणीन. पोवळ्याच्या माळा आणीन. असा हट्ट नको करु. ते मारतील हो नाहीतर!" “तू आता त्याच्याशी बोलत नको बसू. निघा तुम्ही आणि वेळेवर या." “एक दिवस मेले जात आहोत जरा बाहेर, तर लगेच हुकूम, 'वेळेवर या.' आमचे आटपेल तेव्हा येऊ. समजले ना?" “चल जयंता, का हवे चौदावे रत्न?" इंद्राने मुलावर राग काढला. जयंत रडत रडत तेथे उभा राहिला. इंद्राने बकोटी धरुन त्याला ओढीत नेले. इंद्राणीने मागे वळून पाहिले. जयंताला बरोबर न्यावे असे तिला वाटत होते; परंतु इतर बायका हसतील म्हणून तिने त्याला बरोबर घेतले नाही. 'एवढा रडतो आहे तर घ्या त्याला बरोबर.' असेही इतर देवांगनांनी म्हटले नाही. शृंगारलेल्या ऐरावतावर सोन्याच्या अंबारीत बसून इंद्राणी चालली होती. बरोबर सर्व देवांगना होत्या. त्या निरनिराळ्या वाहनांवर बसून चालल्या होत्या. रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, मेनका वगैरे सौंदर्यलतिका सर्व अप्सरांसह निघालेल्या होत्या. नाना परीची वस्त्रे, नाना अलंकार. त्यांच्या लक्षावधी छटा चमकत होत्या. अप्सरा वाटेत गाणी गात होत्या. त्यामुळे अधिकच रंग चढला होता. सत्यलोकाहून आपल्या मैत्रिणींसह सावित्री निघाली. ब्रह्मदेव वेदाध्ययनात मग्न होते. “म्हटलं मी वैकुंठास जाते. अंगाखांद्यावर काय घालू?" सावित्रीने विचारले. ब्रह्मदेवाचे लक्ष नव्हते. तो पुराणपुरुष, तो वेदमूर्ती ज्ञानोपासनेत तुलीन होता. पुन्हा सृष्टी उत्पन्न करायची झाली तर काय फेरफार करावेत, याचे चिंतन करीत होता. 'धाता यथापूर्वमकल्पयत्' या वचनाची त्याला चीड आली होती. आता विधाता नवीन कल्पनेने नवीन विश्व सृजील, असे तो मनात म्हणत होता. सावित्री चिडली. “एवढं मेलं माणसानं विचारावं तरी बोलायला वेळ नाही. लग्न तरी केलंत कशाला? ऐकलंत का? मी वैकुंठास जात आहे." ती त्यांच्या कानात ओरडून म्हणाली. ब्रह्मदेवाने समाधी सोडली. स्त्रियांसमोर समाधी कशी टिकणार! “काय म्हणतेस? वैकुंठास जातेस?" “हो." “बरे. पित्याला माझा कृतानेक साष्टांग नमस्कार सांग." “प्रणाम सांगेन; परंतु कोणते वस्त्रे नेसू, कोणते अलंकार घालू?" “मला काय ठाऊक, तुझ्याजवळ कोणती वस्त्रे आहेत व कोणते अलंकार आहेत? जे आवडेल ते वस्त्र नेस. आवडतील ते अलंकार घाल." “लग्न झाल्यापासून एक दागिना केला असेल तर शपथ!" “लक्ष्मीआईने दिले होते ना थोडेसे!" “तेही त्यांच्या माहेरचे. आणि त्यांनी दिलेलेच दागिने घालून त्यांच्याकडे जाऊ वाटतं?" “मग नको घालूस." “मग का अशीच जाऊ?" “तुम्हा बायकांशी कसे वागावे समजत नाही." “मी ते दागिने घालते व ते शुभ्र वस्त्रे नेसते. हंसावर बसून जावे, असे माझ्या मनात आहे." “हंसाचा वेग सहन होईल का?" “त्याला जरा हळू उड्डाण करायला सांगा." “सांगेन, चल." “मला बसवा ना! जरा हात द्या. असे काय अगदी करता ते!" “तुम्ही बायका म्हणजे गाठोडी. बस पटकन. मार उडी. जेथे तेथे तुमचा हात धरायला हवा." “तुम्हीच ही सवय लावलीत. तुम्हीच आम्हाला अबला केलेत व पुन्हा असे बोलता. हिंडूफिरु देत नाही. घरात बसून आम्ही बनतो मातीचे गोळे. हं, धरा जरा हात." “तोल सांभाळ हो! हंसावर बसणे म्हणजे होडीत बसण्यासारखे आहे. तोल गेला तर पडशील." “परंतु या हंसाला जपून जायला सांगा." ब्रह्मदेवाने हंसाला सूचना दिली. सावित्री एकदाची हंसाच्या पाठीवर बसली. “मी बसू का पाठीमागे? मीही येतो." “तुम्ही असे कसे बाईल-वेडे! तरी बरे चार तोंडे झाली; आता का दहा व्हायला हवी आहेत? तेथे बायकांचे हळदीकुंकू. पुरुषांचे काय काम? म्हणे मी येऊ का? तेथे काही मी राहायला नाही जात. परत येणार आहे. चल रे हंसा. जरा जपून हो!" हंस निघाला. ब्रह्मदेव चारी तोंडे एका दिशेकडे करुन पाहू लागले. सावित्रीने मागे वळून पाहिले तो पती उभाच. तिने हाताने खूण केली की जा मागे. हंस दूर चालला. आता नुसती रुपेरी रेषा त्याची दिसत होती. ब्रह्मदेव आसनावर जाऊन बसले. पुन्हा अनंत विचारात विलीन झाले. “तू माझ्या मूषकावर बसून जा." गणपती सरस्वतीला म्हणाले. “तुमची नेहमी उठून थट्टा!" सरस्वती म्हणाली. “यात काय थट्टा? हा उंदीर टुणटुण उड्या मारीत जाईल. वैकुंठात तुम्हा बायकांचे प्रदर्शन व दुसरे सर्व वाहनांचे प्रदर्शन! हत्ती, बैल, हंस, गरुड, उंदीर जमू देत सारे पशु-पक्षी." “उंदीर ओंगळ आहे. त्याच्यावर तुम्हीच शोभता." “म्हणजे मी ओंगळ वाटते?" “ओंगळ नाही तर काय? नीटनेटके राहताच येत नाही. अघळपघळ सारे काम. उगीच का तो चंद्र मागे हसला?" “चंद्र हसला म्हणून तूही हसतेस वाटते? केलेस कशाला लग्न?" “विद्या आहे तुमच्याजवळ म्हणून! मी बाकीचे तुमचे स्वरुप विसरुन जाते व केवळ ज्ञानमय असे जे मंगल स्वरुप, त्याच्याकडे बघत राहते." “मग कशावर बसून जातेस?" “मोरावर. हातात वीणा घेईन व मोरावर बसेन." “मोरावर तू किती छान दिसतेस! त्या मोराच्या पिसाऱ्यात जसे हजारो डोळे असतात, तसे हजारो डोळे मला फुटावेत व त्यांनी तुझ्याकडे पाहत राहावे असे वाटते. ते असू दे, परंतु काही दागिने घालून जा. ती तत्त्वचिंतामणीची माळ घाल. ती प्रमेयरत्ने कानात घाल." सरस्वती मयूरावर बसून निघाली. वीणेच्या तारांचा झंकार झाला. गणपतीच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले. वैकुंठाला आज अपूर्व सोहळा. सर्वत्र सुगंध दरवळला होता. मंद शीतल वारा वाहत होता. सर्वत्र स्वच्छता व सौंदर्य यांचे साम्राज्य होते. त्रिभुवनातील सारी संपत्ती तेथे एकवटली होती. मंगलवाद्ये वाजत होती. देवी लक्ष्मी सर्वांचे स्वागत करीत होती. त्या अपूर्व प्रासादात निरनिराळ्या रंगांच्या फुलांची आसने बसण्यासाठी मांडण्यात आली होती. इंद्राणी शेवंतीच्या आसनावर बसली. सावित्री जाईजुईच्या आसनावर बसली. देवी सरस्वती दूर्वादलांनी वेष्टित अशा जपाकुसुमांच्या आसनावर बसली. सर्वांना आसने मिळाली. चंद्राचा रमणीय प्रकाश सर्वत्र पसरला होता. सर्व देवांगनांचे डोळे तेथील सौंदर्य व भाग्य पाहून दिपून गेले. “सरस्वतीदेवी, तुम्ही काही मंगलगीते म्हणा." लक्ष्मीने विनविले. “परंतु अजून माझ्या सासूबाई का नाही आल्या?" तिने विचारले. “सासूबाई म्हणजे कोण?" शचीदेवीने विचारले. “अग, कैलासावरची पार्वती!" सावित्री म्हणाली. “नाही आल्या तर नाही; तुम्ही म्हणा गाणे. उशीर होत आहे. घरी जायला उशीर झाला तर रागावतील." इंद्राणी म्हणाली. “इतका का दरारा आहे?" सावित्रीने विचारले. “ते काही विचारु नका. आणि जयंत पुन्हा रडत बसला असेल. म्हणा हो सरस्वतीदेवी." इंद्राणी म्हणाली. “सासूबाईंना अपमान वाटेल." सरस्वती म्हणाली. “स्मशानात राहणाऱ्यांना कसला मान नि कसला अपमान!" इंद्राणी म्हणाली. “स्वाभिमान सर्वांना आहे." सरस्वतीने शांतपणे उत्तर दिले. “आता वाद पुरे, सरस्वतीदेवी. एकीसाठी सर्वांचा खोळंबा नको. म्हणा हो गाणे." लक्ष्मी म्हणाली. सरस्वतीचे काही चालेना. शेवटी तिने वीणा वाजविली. सर्वत्र शांतता पसरली. गायन सुरु झाले. वाग्देवतेचे गायन. विश्वाचा सांभाळ करण्यासाठी भगवान शंकर हलाहल प्राशन करीत आहेत, विश्वाच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान करीत आहेत, अशा प्रसंगावरचे ते अमरगीत होते. सरस्वती ते गीत गाता गाता समरस झाली. शंकराच्या महिम्याचे ते गीत वैकुंठी चालले असता तिकडे कैलासावर काय चालले होते? पार्वतीच्या कानावर सर्व गोष्टी आल्या होत्या. सर्व देवांगनांना भेटावयास ती अधीर होती; पण बोलावणे नव्हते. बोलावल्याशिवाय कसे जायचे? पार्वती दुःखी होती. “मला वाटते तुम्ही जायला हरकत नाही." देवर्षी नारद म्हणाले. “नारदा, आम्हाला वाटते स्वाभिमान नाही?" पार्वती म्हणाली. “मी नाही का सर्वत्र जात? मला कोण बोलावते? आता मी तुमच्याकडे आलो. तुम्ही का बोलावले होतेत? मी निमंत्रणाशिवाय वाटेल तेथे जातो. माझा कधीही कोणी अपमान केला नाही. आमंत्रणाशिवाय न जाणे म्हणजे अहंकार! जे थोर असतात त्यांना आपपर नसते. भगवान शंकराच्या पत्नीने तरी असले क्षुद्र विचार मनात आणू नयेत. लक्ष्मी कदाचित आमंत्रण पाठवायला विसरली असेल, किंवा तो गरुड यायला भ्याला असेल, किंवा मुद्दाम आमंत्रण पाठविले नाही, असेही समजून चालू या; परंतु ती त्यांची चूक. आमंत्रण नसताही आपण मनाचा मोठेपणा दाखवून जावे व त्यांना लाजवावे, असे माझे मत आहे." नारद म्हणाले. “मलाही जावेसे वाटते." पार्वती म्हणाली. “तेथे अपमान होईल. मागे एकदा दक्षाकडे तुझा अपमान झाला व तू आगीत उडी घेतलीस. अपमान इवलाही तुला सहन होत नाही. आजही तेथे असेच काही झाले तर आणखी कुठे उडी घेशील? मग माझी पुन्हा तारांबळ." भगवान शंकर म्हणाले. “मी का पूर्वीसारखीच अजून रागीट आहे? त्या वेळेस घेतली उडी, आता नाही घेणार. मनुष्य का तसाच राहतो?" पार्वतीने विचारले. “स्वभाव बदलतो; परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जा. माझी ना नाही. आता नंदीवर बसून जा. पायी जायला उशीर होईल. जायचेच तर वेळेवर जावे." शंकर म्हणाले. “जो वेळेवर जात नाही तो मोठा! छोटे लोक वेळेच्या आधीपासूनच गर्दी करतात. मध्यम लोक साधारण वेळेच्या सुमारास येतात. बडे लोक वेळेनंतर येतात." नारद हसून म्हणाले. “असला मोठेपणा आम्हाला नको." शंकर म्हणाले. “मी पायीच जाते. ह्या नंदीचे व गरुडाचे तेथे भांडण व्हायचे एखादे. सोहळा बाजूलाच राह्यचा. मी भरभर जाईन." पार्वती म्हणाली. “वाटेत अडखळशील, पडशील." शंकर म्हणाले. “पडत नाही. रडत नाही. मी पर्वताची मुलगी. दगडधोंडे मला लागत नसतात. शिवाय, आज रस्ते साफ असतील. जाते मी." असे म्हणून पार्वती निघाली. तिच्या अंगाखांद्यावर दागिने नव्हते. नेसू उंची वस्त्रे नव्हते. पायी जात होती. आपणाला कोणी हसेल, असे तिच्या मनातही आले नाही. दागदागिन्यांची तिला आठवण झाली नाही. तिचा पती स्मशानात राहणारा, अंगाला भस्म फासणारा, कातडी पांघरणारा! पार्वतीजवळ कोठून येणार वस्त्रे नि अलंकार? वल्कलांचीच वस्त्रे नेसून ती जात होती. पिता हिमालय, त्याच्या घराच्या झाडांच्या सालींपासून ती वस्त्रे तयार केलेली होती. ती वल्कलेही माहेरची होती. शंकरांच्या विषाचा दाह शांत करणारे राम-नाम ओठांनी म्हणत पार्वती वेगाने जात होती. तिला वैकुंठ दिसले. तो नयनमनोहर प्रासाद दिसला. रम्य चंद्रकिरण दूरवर पसरले होते. रस्ता दिसत होता. स्वच्छ सुंदर रस्ता, सर्वत्र सुगंध दरवळला होता. सीमेवरची मंगल वाद्ये कानावर येत होती. प्रासादाच्या अंगणात पार्वती आली. तेथे सारे स्तब्ध होते. आत सरस्वतीदेवी गात होती. भगवान शंकरांचा महिमा गात होती. ते गीत ऐकून पार्वती तटस्थ झाली. तेथेच उभी राहिली. ते गाणे संपले. वीणेचा आवाज बंद झाला. शंकरांचा महिमा इतर देवांगनांना सहन नाही झाला. “असले नको गाणे, रडगाणे. गमतीचे म्हणा." “मला असलीच गाणी येतात. ही रडगाणी नाहीत. ही त्यागाची, पराक्रमाची गाणी आहेत. देवांगनांना असा थोर पराक्रम केव्हापासून रुचेनासा झाला?" सरस्वतीने टोमणा मारला. इतक्यात पार्वती आत आली. तिचे कोणी स्वागत करीना. या हो, बसा हो म्हणेना. शेवटी सरस्वती आपल्या आसनावरुन उठली. तिने सासूबाईंस वंदन केले व त्यांना आपल्या आसनावर बसविले. साऱ्या देवांगना हसू लागल्या. पार्वती शांतपणे बसली. परंतु ते हसणे सरस्वतीस सहन झाले नाही. “झालं काय तुम्हाला फिदीफिदी हसायला?" तिने विचारलं. “हसू नको तर काय रडू?" इंद्राणी म्हणाली. “नवऱ्याने काहीच दिले नाही वाटते अंगावर घालायला? नाकात नथ नाही, हातात पाटली नाही." “अहो, गळ्यात मणि-मंगळसूत्रही नाही." “असेल नवऱ्याजवळ तेव्हा ना? तो भुरी अंगाला फासतो. साप गळ्याभोवती गुंडाळतो. मेलेल्या पशूंची कातडी पांघरतो." अशा प्रकारे त्या देवपत्न्या बोलू लागल्या. पार्वतीकडे बघून हसू लागल्या. लक्ष्मी आता ओट्या भरीत होती. तिलाही हसू आवरेना. शेवटी ती म्हणाली “पार्वतीबाई, आज तरी पीतांबर-पैठणी परिधान करुन यावे की नाही? आज तरी शृंगारसाज करुन यावे की नाही? साऱ्या देवांगना नटूनथटून येणार आणि त्यांत तुम्ही असे यावे का? सारा मग विरस होतो. या देवपत्न्यांचा अपमान केल्यासारखे होते. अशा सुंदर स्त्रियांत आपण एखाद्या भिल्लीणीप्रमाणे रानवटाप्रमाणे यावे, याला काय म्हणावे? थोडा तरी विवेक हवा माणसाला. थोडे तरी देशकालवर्तमान पाहून माणसाने वागले पाहिजे. इतरांच्या आनंदात भर घालावी. दुसऱ्यांच्या आनंदात मिठाचा खडा घालू नये. सर्वांचा एकमेळ असता विसंवादी सूर उत्पन्न करु नये. तुम्हाला नसेल त्यांनी काही दिले तर यायचे नव्हते." “मला वाटले नव्हते की येथे अलंकारांचे प्रदर्शन आहे. मला वाटले की, सर्व देवांगना प्रेमाने परस्परांस भेटण्यासाठी जमणार आहेत, म्हणून मी आले. म्हणून मी पतिदेवांजवळ काही मागितलं नाही." पार्वती म्हणाली. “आणि मागितले असते तरी काय मिळाले असते?" उर्वशी म्हणाली. “नवरा तर जोगडा! हातात कपालपात्र मिरविणारा." “आणि माहेरी बापाजवळ दगड नि धोंडे!" “जंगलेही आहेत. झाडांच्या साली नेसाव्यात व पानांनी नटावे." “का अशा हसता? जगाच्या कल्याणासाठी हसत हलाहल प्राशन करणाऱ्या शंकरांना का हसता? त्यांच्या अंगाला विभूती असेल; परंतु त्या विभूतीच्या एकेका कणात सर्व विश्वाची संपत्ती आहे." सरस्वती म्हणाली. “हे खरे असेल तर जा, घेऊन ये संपत्ती." सर्व देवांगना म्हणाल्या. “जाते, घेऊन येते. मी येईपर्यंत थांबा मात्र!" सरस्वती म्हणाली. सती पार्वतीच्या डोळ्यांतून पाणी येत होते. तीच परत जायला निघाली; परंतु सरस्वती म्हणाली, "तुम्ही थांबा. मी जाऊन येते. या सर्व देवांगनांचा गर्व आज दूर होऊ दे. त्यागातील वैभव त्यांना दिसू दे. त्यांचे डोळे केवळ बहिर्मुख झाले आहेत. ते अंतर्मुख होऊ देत. बसा तुम्ही या आसनावर. मी आत्ता जाऊन येते." “सरस्वती, हंसावर बसून जा, म्हणजे लवकर येशील. पायी जाऊन केव्हा येणार? शिवाय त्या कैलासाची वाट दगडाळ व धोंडाळ. मी सावित्रीदेवीस विचारते!" लक्ष्मी म्हणाली. “नाहीतर आमच्या ऐरावतावर बसून जा." इंद्राणी म्हणाली. “ऐरावत नको. तेथे सिंह असतील, येतील अंगावर धावून." लक्ष्मीने सांगितले. “सरस्वतीच्या पतीचे शरीर पाहून सिंहांना आता हत्तीबद्दल प्रेम वाटू लागले असेल. निदान हिमालयातील सिंह तरी हत्तीवर हल्ला करणार नाहीत. तो गजाननांचा अपमान होईल." एक अप्सरा म्हणाली. "जरा जपून बोला. थट्टामस्करीलाही मर्यादा हवी." सरस्वती रागावून परंतु राग दाबून म्हणाली. “तुमचा गरुड का नाही देत, माझा हंस कशाला?" सावित्री लक्ष्मीस म्हणाली. “माझा गरुड दिला असता; परंतु त्या नंदीचे व त्याचे आहे विळ्याभोपळ्यासारखे! छत्तीसाचा आकडा. म्हणून हो तुमचा हंस द्या म्हटले. देता का?" लक्ष्मीने पुन्हा विचारले. “सरस्वतीला नीट बसता येईल का? तिला मोरावर बसायची सवय. मोर डुलत डुलत जाणारा. हंस जातो तीरासारखा, मनाच्या वेगासारखा. पहा बाई सरस्वती, नाहीतर एक करता एक व्हायचे. लंबोदर रागवायचे." सावित्री म्हणाली. “तुम्हाला द्यायचा असेल तर द्या. सतरा आढेवेढे कशाला? कोणाचा उपहास कशाला?" सरस्वती म्हणाली. “बरे, जा घेऊन तो हंस. जपून जा." सावित्रीने अनुज्ञा दिली. हंसावर बसून सरस्वती निघाली. हिमालयाची शिखरे खाली दिसू लागली. हंसाला मानस-सरोवर दिसले. त्याला तेथील कमळे खावी, पाणी प्यावे, असे वाटले. परंतु त्याने आपली इच्छा दाबली. मंडलाकार हळूहळू तो खाली आला. देवी सरस्वती मृत्युंजय शिवशंकरांचे महिम्नस्तोत्र गात कैलासावर उतरली. शंकर तांडवनृत्य करीत होते. शृंगीभृंगी वाद्ये वाजवीत होते. सरस्वतीला पाहताच शृंगीभृंगीची वाद्ये थांबली. वाद्ये थांबताच तांडवनृत्यही थांबले. शंकर भानावर आले. सरस्वतीने वंदन केले. “तू आलीस. ती कोठे आहे?" शंकरांनी विचारले. “त्यांनी मला पाठविले आहे." सरस्वती म्हणाली. “काय आहे निरोप?" “सासूबाईंनी दागदागिने मागितले आहेत. तेथे लक्ष्मीसहित सर्व देवांगना त्यांना हिणवीत आहेत. सासूबाईंचा त्यांनी अपमान केला. नाही नाही ते त्या उन्मत्त बायका बोलल्या. सासूबाईंचे डोळे भरुन आले. मी त्यांना म्हटले की, तुम्ही थांबा. मी घरी जाऊन दागदागिने घेऊन येते. मामंजी, असेल नसेल ते द्या. देवांगनांचा गर्व हरवा." “मजजवळ काय आहे?" “तुमच्याजवळ सारे आहे. मला माहीत आहे. त्रिभुवनातील सारी संपत्ती, सारे सामर्थ्य तुमच्याजवळ आहे. कारण तुम्ही त्रिभुवनाशी एकरुप झालेले आहात. त्रिभुवनाच्या कल्याणासाठी एकरुप झालेले आहात. देवा महादेवा, द्या. जे जवळ असेल ते द्या." “जटेचा एक केस देतो. चालेल?" “त्याचे काय करु?" “तो केस घेऊन कुबेराकडे जा व त्याला सांग की, या केसाच्या भारंभार दागिने दे." “कुबेर वैकुंठासच आला आहे." “मग तर बरेच झाले. तुला दुसरीकडे त्याला शोधीत जायला नको. तरी मी तिला सांगत होतो की, जाऊ नकोस. तुला हसतील आणि तू मग रडशील. असो. हा घे केस व जा." सरस्वतीने श्रद्धेने व विश्वासाने तो केस घेतला. मामंजीस प्रणाम करुन हंसावर बसून ती निघाली. वैकुंठात सर्वांची उत्कंठा वाढली होती. लक्ष्मी सर्वांच्या ओट्या भरीत होती. पार्वतीची अद्याप राहिली होती. “त्यांची सर्वांच्या मागून भरा, सर्वांच्या मागूनच नाहीतरी त्या आल्या." “आणि उरलीसुरली माणिक-मोती त्यांना द्या." “उरलेसुरले भिकाऱ्याला देतात." “मग का त्या श्रीमंत आहेत? नवऱ्याला दारिद्र्यामुळे तर विष खाण्याची पाळी आली. यांनीच त्यांना सतावले असेल. हे द्या, ते द्या म्हटले असेल. लागला नवरा विष प्यायला. म्हणे, जगाच्या कल्याणासाठी विष प्यायले! सारे देखावे! घरात असतील रोज उठून झगडे! निघाले जीव द्यायला. ते विष प्यायला कोणी हवेच होते. स्वारी उभी राहिली. फुकटाचे हुतात्मत्व मिळाले तर कोणाला नको असते? परंतु मरण्याची इच्छा होती कोठे? विष प्यायले ते पोटात जाऊ नये म्हणून खटपटी करु लागले. थंडावा मागू लागले. म्हणे, गंगा आणा, चंद्र आणा! सारे देखावे. सारे दंभाचे पसारे!" अशी बोलणी चालली होती. पार्वती पर्वताप्रमाणे शांत होती. कावळ्यांच्या कलकलाटात ती हंसीप्रमाणे गंभीर व निश्चल होती. तो सरस्वती आली. 'काय आणले, काय आणले', साऱ्याजणी उत्सुकतेने विचारु लागल्या. “सरस्वती, आणलेस का दागदागिने?" इंद्राणीने विचारले. “पाहू द्या तरी!" रंभा उत्कंठेने म्हणाली. “घालतील अंगावर, मग दिसतील." मेनका म्हणाली. “दिसत तर नाही कोठे?" उर्वशी म्हणाली. “मी भगवान शंकरांच्या जटेतील एक केस आणला आहे." सरस्वती म्हणाली. “जटेतील केस?" “अय्या!" “तो कशाला?" “पत्नीने केसाने गळा कापून घ्यावा म्हणून?" “सरस्वती, सारे काय ते सांग." लक्ष्मी म्हणाली. “भगवान शंकर म्हणाले की, 'या केसाच्या वजनाइतके कुबेराजवळून दागिने घ्यावेत.' सरस्वती म्हणाली. “केसाच्या वजनाइतके?" “इतके दागिने अंगावर घालवतील का?" “पार्वतीदेवी वाकून जातील इतक्या दागिन्यांच्या राशीखाली." “पर्वताच्या त्या कन्या आहेत. त्या वाकणार नाहीत." “बोलवा कुबेराला येथे तराजू घेऊन." लक्ष्मी म्हणाली. कुबेर तराजू घेऊन आला. तो गुंजा दोन गुंजा सोने घेऊन आला. साऱ्या हसू लागल्या. फक्त सरस्वती व पार्वती हसत नव्हत्या. कुबेराने एका पारड्यात तो केस ठेवला. दुसऱ्या पारड्यात एक गुंजभर सोने टाकले; परंतु केसाचे पारडे खालीच होते. त्याने आणखी एक गुंजभर सोने टाकले. तरी केसाचे पारडे खालीच. मग दोन मासे टाकले, तोळाभर टाकले. तरी केसाचे पारडे वर उठेना. पाच तोळे, दहा तोळे, शंभर तोळे सोने घातले गेले. तरी केसाचे पारडे खाली. कुबेराने आता मोठा तराजू आणला. त्यात तो भराभर आपली संपत्ती ओतीत होता. सर्व संपत्ती संपली, तरी त्या गुंतवळाचे वजन होईना. देवांगनांची तोंडे काळवंडली. त्यांच्या नागिणीप्रमाणे वळवळ करणाऱ्या जिभा लुळ्या पडल्या. लक्ष्मीने आपल्या माहेरची सर्व संपत्ती त्या पारड्यात घातली. तरी काही नाही. सर्व देवांगनांनी, अप्सरांनी आपले अलंकार त्या पारड्यात घातले, तरी त्या केसाची बरोबरी होईना. कुबेर तोल करुन करुन थकला. शेवटी तो म्हणाला, “या केसाच्या भारंभार माझ्याजवळ सोने नाही. मी भिकारी आहे. दुसरा कोणी मोठा कुबेर असेल, तर त्याच्याकडे हा केस घेऊन जा." सती पार्वतीचे मुख तेजाने फुलले. सरस्वती आनंदली. लक्ष्मी, इंद्राणी आदीकरुन सर्व देवांगना खट्टू झाल्या. आपले भाग्य मिरवण्याचा लक्ष्मीचा गर्व गळाला. सर्व देवांगनांचा गर्व नाहीसा झाला. त्या सर्वजणी सती पार्वतीच्या पाया पडल्या व म्हणाल्या, "हे सती पार्वती, हे जगदंबे, आम्ही अज्ञ मुली. आम्हाला क्षमा कर. तुझ्या पतीची तपश्चर्या थोर, त्याग अपार, वैराग्य अनंत. ते दिसतात भिकारी, परंतु सर्वांहून ते श्रीमंत आहेत. जग सुखाने नांदावे म्हणून जो भिकारी झाला, सर्वांचे संसार सुखाचे व्हावेत यासाठी ज्याने फकीरी पत्करली, तोच खरोखर सर्वांहून थोर, सर्वांहून श्रीमंत! ही बाहेरची श्रीमंती काय चाटायची? आज आमचे डोळे उघडले. खरी श्रीमंती कशात आहे ते कळले. आज आम्हाला खरी दृष्टी आली. दृष्टीवरची पटले उडाली. दृष्टी निर्मळ झाली. आम्ही वाटेल तसे बोललो. देवी, तुझा अपमान केला, परंतु हलाहल पिणाऱ्या पतीची तू पत्नी, हलाहलाहूनही तीव्र असे अपमानाचे, निंदेचे, उपहासाचे विष तू प्यायलीस. थोर पतीला तू शोभतेस. जगातील विष तुम्ही पिता व जगाला मंगल देता. धन्य आहे तुमचा जोडा. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम!"

लक्ष्मीने सती पार्वतीची भक्तिप्रेमाने ओटी भरली. सरस्वतीचीही ओटी भरली. “सरस्वती, पुन्हा एकदा ते गीत गा. भगवान शंकरांच्या महिम्याचे एखादे गीत गा. आम्हाला ऐकू दे व पावन होऊ दे." सर्व देवांगना म्हणाल्या. सरस्वतीने वीणा छेडली. सर्वत्र स्तब्धता पसरली. सती पार्वतीने डोळे मिटले. एक दिव्य गीत सुरु झाले. 'प्रणाम प्रणाम धन्य धन्य देवा, शंकराचे नाम' असे ते दिव्य गान देवी सरस्वतीने म्हटले. सर्वांची एकतानता झाली. देवा शंकरांना प्रणाम प्रणाम असे सर्वांचे ओठ म्हणू लागले. एका उच्च वातावरणात सर्वांची मने गेली. ते गीत संपल्यावर काही वेळ अगाध स्तब्धता होती. मग त्या देवांगना उठल्या व एकमेकींस भेटल्या. एकत्वाचे वातावरण उत्पन्न झाले. सारे विरोध मावळले. क्षुद्रभाव विरले. पाषांणा पाझर फुटती रे। एकमेकां लोटांगणी येती रे।।

अशी सर्वांची स्थिती झाली. हृदये हृदयांना भेटली. मधले दागिने वितळून गेले. भावना ओसरल्यावर लक्ष्मीचा निरोप घेऊन सर्व देवांगना निघाल्या. पार्वती-सरस्वती निघाल्या. लक्ष्मी तेथे नम्रपणे निरोप देत उभी होती. आता तेथे कोणी नव्हते. भाऊ चंद्रही गेला. लक्ष्मी एकटीच तेथे अनंत आकाशाखाली नम्रपणे बसली होती. भगवान विष्णू शांतपणे हळूच तिकडून आले. “झाले का हळदीकुंकू?" त्यांनी मंजुळवाणीने विचारले. “झाले." “दागदागिने घालून झाले एकदा मिरवून?" “देवा, का आता टोचून बोलता? तुम्हाला सारा वृत्तांत कळला आहे. लक्ष्मीचा गर्व नाहीसा झाला आहे. पुन्हा आता मी मिरवू पाहणार नाही. त्या क्षुद्र इच्छा गेल्या. खरे भाग्य निराळेच असते. खरा दागिना वेगळाच असतो." “कोणते खरे भाग्य, कोणता खरा दागिना?" “विभूतीचे भाग्य, त्यागाचा दागिना. जगाची सेवा करता करता ज्याने सर्वस्वाचा त्याग केला, तोच खरा भाग्यवान! त्याच्या भाग्याला मोज ना माप, अंत ना पार. आज मला हे ज्ञान झाले. चला. पुन्हा तुमचे प्रेमाने व भक्तीने पाय चेपीत बसते. तुमचे पाय, तुमच्या पायांची धूळ, त्यातील एक कण म्हणजेच माझी हिरेमाणके. जेथे त्याग तेथे वैभव!"


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.