Jump to content

तृतीय रत्न

विकिस्रोत कडून
तृतीय रत्न

(नाटक)

सन १८५५

(प्रथम माळ्या कुणब्याचे मूल ते आपल्या आईच्या उदरात कोठे गर्भी वास करू लागल्याचा आरंभ होत आहे तोच ब्राह्मण जोशाची स्वारी येवून त्या गरीब बाईस मोठमोठ्या हुलथापी देऊन तिजला द्रव्यहीन कसकशी करितो याविषयी मी येथे लिहीन.)


स्थळ

(जोशी त्या गरोदर बाईचा नवरा घरी नसेल अशी संधी पहून प्रथम तिथ, वार, नक्षत्र, योग, करणाचा उच्चार करून तिच्या दारी उभा राहिला. इतक्यात घरच्या धनणीने याचा शब्द कानी पडताच थोडी कोरडी भिक्षा हातात घेऊन बाहेर ओसरीवर आली.)

जोशी : (थोडी भिक्षा पाहून मनात मोठा खट्टू झाला.) बाई, मज ब्राह्मणास भिक्षा घेऊन आलीस ती ही कां?

बाई : महाराज, काय? काय झाले? ही भिक्षा नव्हे काय? मी गरीब दुबळी, माझा नवरा तर सर्व चार रुपये दरमहा मिळवीत असतो.

जोशी : बाई ही भिक्षा नव्हे कोण म्हणेल? परंतु एवढ्या भिक्षेने माझे पोट कसे भरेल? आणि मी तुझे कल्याण कसें चिंतावें?

बाई : (मोठा कंटाळा पावून) जा बाबा, ब्राह्मणाची चिकाटीच मोठी! आम्ही तुमच्या पोटाची काळजी कोठवर करावी? तुम्ही एखादा रोजगार धंदा वा करा ना?

जोशी : (रोजगार धंधा करणे हे आमचे कपाळीच लिहिले आहे, यात त्वां काय जास्ती सांगितलेस असें मनांत म्हणून) ते खरें. पण, तुझ्या शेजारिणीसारखे तुझे कांहीं नुकसान झाले नाही व तुला पुढे बोलू देणार नाहीं बरे!

बाई : (थोडा विचार केल्यासारखे करून) त्या बाईचे मूल ते आपल्या नशिबाने मेलें.

जोशी : हॅं हॅं, नशिबाने मेले काय?

बाई : नशिबाने नाही तर कशाने ? तुम्हाला पुष्कळ दिली नाही म्हणून मेले काय ?

जोशी : थोडी का होईना, परंतु ती आमच्या संतोषाने असावी.

बाई : तिने तुमच्या संतोषाप्रमाणे दिले असते तर तुम्ही तिचे मूल वाचविले असते काय ?

जोशी : यात काय संशय आहे ?जर तिने मला संतोषविले असते तर खचितच मी त्या मुलावरील सर्व पिडा दूर केल्या असत्या आणि ती पुत्रवती झाली नसती काय ?

अपूर्ण


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.