Jump to content

तुकाराम गाथा/गाथा ३०१ ते ६००

विकिस्रोत कडून

<poem> ३०१

माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥१॥

कोणी सोडवी ना काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥२॥

तुका म्हणे किती सांगावें चांडाळा । नेणे जीवकळा कोण्या जीतो ॥३॥

३०२

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥

रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥

तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥

३०३

छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥

येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥

नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥

तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥

३०४

बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥

मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥

संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥

कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥३॥

तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥

३०५

अंगीं ज्वर तया नावडे साकर । जन तो इतर गोडी जाणे ॥१॥

एकाचिये तोंडीं पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ध्रु.॥

चारितां बळें येत असे दांतीं । मागोनियां घेती भाग्यवंत ॥२॥

तुका म्हणे नसे संचित हें बरें । तयासि दुसरें काय करी ॥३॥

३०६

धिग जीणें तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥

धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥

धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥२॥

धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥३॥

तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥

३०७

अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥

मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥

विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥२॥

अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥३॥

तुका म्हणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥४॥

३०८

अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥

नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाषांडिया ॥ध्रु.॥

जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥

तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥

३०९

एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥१॥

दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥

एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥

एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥३॥

एकां भक्ति पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥४॥

वर्म पोटीं एका । फळें दोन म्हणे तुका ॥५॥

३१०

काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥

आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥

देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥२॥

तुका म्हणे भावें । माझ्या मज समजावें ॥३॥

३११

भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥१॥

धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥

नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जावें आस ॥२॥

हें ना तें सें जालें । तुका म्हणे वांयां गेलें ॥३॥

३१२

एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥

ऐका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥

अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भिक्षतां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥२॥

सेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥

आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा महा मेरु ॥४॥

तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥

३१३

करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥

शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥

आपुलें देऊनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥२॥

देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥

तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडूं नये ॥४॥

३१४

इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥

अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥

अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥

तुका म्हणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥३॥

३१५

वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥१॥

विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥

जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥

तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥३॥

३१६

विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥

मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥

बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥२॥

तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥३॥

३१७

येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥१॥

वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥

येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥

तुका म्हणे वैष्णव जेन । माझे गण समुदाय ॥३॥

३१८

उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥

बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥

तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥

तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥३॥

३१९

बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥

काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥

दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥

तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥

३२०

बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥

भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥

विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥

सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥

गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥

तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥

३२१

दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥

आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥

देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥

तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ॥३॥

३२२

कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥

तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥

पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥

तुका म्हणे देवा । माझा करावा कुठावा ॥३॥

३२३

ठायींची ओळखी । येइल टाकुं टाका सुखीं ॥१॥

तुमचा जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥

ठेविला तो ठेवा । अभिळाषें बुडवावा ॥२॥

मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥३॥

३२४

तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥

रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥

नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥

तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥

३२५

गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥

वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥

कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥२॥

तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥

३२६

पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥

नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥

विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥

तुका म्हणे जपें । संतांचिया जाती पापें ॥३॥

३२७

देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥१॥

दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥

दाखविले परी नाहीं वर्जिजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥२॥

तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥३॥

३२८

शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥१॥

ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु जाले तट ॥ध्रु.॥

लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया धरी ॥२॥

तुका म्हणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥३॥

३२९

वैद वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥१॥

काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥

नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥२॥

जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥३॥

३३०

मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥१॥

नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥

चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥

झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥३॥

३३१

कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥

पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥

चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥२॥

मळिालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुलती । शूर उठावती । एका एक आगळे ॥३॥

नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥४॥

आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥५॥

मरण मुक वाराणसी । पितृॠण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोबाच्या ॥६॥

तुका म्हणे आतां । काय करणें आम्हां चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥७॥

३३२

जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥१॥

धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥

सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्विकार । होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥२॥

नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जयां । जे पंढरपूर देखती ॥३॥

उपजोनि संसारीं । एक वेळ पाहें पा पंढरी । महा दोषां कैची उरी । देवभक्त देखिलिया ॥४॥

ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे कळिकाळा ॥५॥

तें सुख वर्णावया गति । एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥६॥

तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । अधम जन्मांतरिचा । तया पंढरी नावडे ॥७॥

३३३

एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥१॥

बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥

दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥२॥

तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥३॥

३३४

म्हणवितों दास । मज एवढी च आस ॥१॥

परी ते अंगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ध्रु.॥

बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥२॥

तुका म्हणे बरा । दावूं जाणतों पसारा ॥३॥

३३५

पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥१॥

हें तों जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥

पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें ॥२॥

तुका म्हणे माथा । पायीं ठेवीं तुम्हां संतां ॥३॥

३३६

स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया सेवटीं । जालें लटिकें सकळ ॥१॥

वायां भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरि आहे ॥ध्रु.॥

सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥२॥

तुका म्हणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥३॥

३३७

आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठ‍ अतिवादी ॥१॥

याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥

काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्ष देतें ॥२॥

तुका म्हणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांटविलें ॥३॥

३३८

बाळपणीं हरि । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी ।

मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥१॥

बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । म्हणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें ।

जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥ध्रु.॥

मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं ।

विसरल्या घरें । तान्हीं पारठीं लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तान भूक नाहीं ॥२॥

एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे ।

लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥३॥

वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या ।

कुमर कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥४॥

वैरभाव नाहीं । आप पर कोणीं कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं ।

तुका म्हणे सुखी । केलीं आपणासारिखीं । स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥५॥

३३९

अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी ।

येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥

सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ ।

मन उतावळि जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ध्रु.॥

काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें ।

गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥२॥

नाडियेलें आशा मृगकांतिसोने । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें ।

उलंघिली आज्ञा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥३॥

नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये ।

उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥४॥

जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।

संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥५॥

३४०

वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥१॥

तरी च तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥

आणिकां गुणां पोटीं वाव । दावी भाव आपुला ॥२॥

तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥३॥

३४१

नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥१॥

पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥ध्रु.॥

लटिक्याचे पुरीं । वाहोनियां गेलों दुरी ॥२॥

तुका म्हणे नाव । आम्हां सांपडला भाव ॥३॥

३४२

अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥

आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥

देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥

देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥

हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥

तुका म्हणे होसी भावें चि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची॥५॥

३४३

काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥

ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥

कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥

तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥३॥

३४४

सेवितों रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥

विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तो चि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥

मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥

तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥

३४५

ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु ।

जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥

भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्ति भेदु।

भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥

मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।

लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥

अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।

वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥

मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास ।

साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥

३४६

भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥

त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥

सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥

भुक्तिमुक्तिची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥

३४७

जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥

तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥

मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥

ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥

दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥

तुका म्हणे सांगूं किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥

३४८

याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥१॥

नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥

गौरव यासाटीं । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥

तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥३॥

३४९

अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥१॥

जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥

याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥

तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥

३५०

कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥

वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥

कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥२॥

तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥३॥

३५१

आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥१॥

करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥

श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥२॥

तुका म्हणे ऐसा । सटवे चि ना पांचा दिसां ॥३॥

३५२

गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥१॥

व्याली कुर्हा डीचा दांडा । वर न घली च तोंडा ॥ध्रु.॥

उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥२॥

तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥३॥

३५३

पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥

विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ध्रु.॥

सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥२॥

तुका म्हणे दुरी । राखतां हे तों ची बरी ॥३॥

३५४

देव आड जाला । तो भोगिता मी उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥१॥

जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥

विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥२॥

अवघी एकाची च वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥३॥

प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥४॥

मंबाजी गोसावी यांनीं स्वामीस पीडा केली - अभंग ॥५॥

३५५

न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥१॥

भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ध्रु.॥

शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥२॥

तुका म्हणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ॥३॥

३५६

बरवें बरवें केलें विठोबा बरवें । पाहोनि आंत क्षमा अंगी कांटीवरी मारविलें ॥१॥

शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥२॥

तुका म्हणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतलें रे ॥३॥

३५७

पावलों पावलों । देवा पावलों रे ॥१॥

बरवें संचित होतें तैसें जालें रें । आतां काय बोलों रे ॥२॥

सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों रे । तुका म्हणे करूनि वेगळा केलों रे ॥३॥

३५८

कां होती कां होती । देवा एवढी फजीती ॥१॥

मुळीं वर्म नसतों चुकलों । तो मी ऐसें चित्तीं ॥ध्रु.॥

होणार होऊनि गेलें । मिथ्या आतां खंती रे ॥२॥

तुका म्हणे पुरे आतां । दुर्जनाची संगती रे ॥३॥

३५९

सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥१॥

तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ध्रु.॥

कोणा लाज नेणां ऐसें । आणिकां शरण आम्ही जातां ॥२॥

तुका म्हणे सखया । माझ्या रखुमाईच्या कांता ॥३॥

॥५॥

३६०

पुत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥१॥

तैसें राहो माझें मन । गातां ऐकतां हरिगुण ॥ध्रु.॥

नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥२॥

तुका म्हणे पाहे । कासवीचें पिलें माये ॥३॥

३६१

ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥१॥

तान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥

कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥२॥

कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥३॥

तुका म्हणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥४॥

३६२

न व्हावें तें जालें देखियेले पाय । आतां फिरूं काय मागें देवा ॥१॥

बहु दिस होतों करीत हे आस । तें आलें सायासें फळ आजि ॥ध्रु.॥

कोठवरि जिणें संसाराच्या आशा । उगवो हा फांसा येथूनियां ॥२॥

बुडालीं तयांचा मूळ ना मारग । लागे तो लाग सांडूनियां ॥३॥

पुढें उलंघितां दुःखाचे डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥४॥

तुका म्हणे कास धरीन पीतांबरीं । तूं भवसागरीं तारूं देवा ॥५॥

३६३

वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं ॥१॥

तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥२॥

तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥

३६४

शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥

येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥

करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥

तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥३॥

३६५

म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥

माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥

करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥२॥

तुका म्हणे नाहीं काळापाशीं गोवा । स्थिति मति देवा वांचूनियां ॥३॥

३६६

वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥

नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ध्रु.॥

पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥२॥

तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥३॥

३६७

करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥१॥

आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥

पावोत आत्मिस्थति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥

तुका म्हणे छंद । आम्हां हरिच्या दासां निंद्य ॥३॥

॥ स्वामीस सद्गुरूची कृपा जाली ॥ - अभंग ४

३६८

सद्गुारायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥

सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥

भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥

कांहीं कळहे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा जाली ॥३॥

राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खुण मळिकेची ॥४॥

बाबाजी आपलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥५॥

माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥

३६९

माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥१॥

आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥

जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥२॥

जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं ॥३॥

तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥

३७०

घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि ॥१॥

लावूनियां हातें कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥

कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरें तीरीं उभा ॥२॥

खुंटले सायास अणिकि या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥३॥

तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥

३७१

माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालों आतां ॥१॥

तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥

ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥२॥

जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हें चि आतां नाही लाज तुम्हां ॥३॥

तुका म्हणे संतीं घातला हावाला । न सोडीं विठ्ठला पाय आतां ॥४॥

॥४॥

३७२

देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥१॥

ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥

देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥२॥

तुका म्हणे हरी । प्रर्हा दासि यत्न करी ॥३॥

३७३

भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥

ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥

पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोई तें तेव्हां गोड ॥२॥

तुका म्हणे बरे सांगतां चि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडे तों ॥३॥

३७४

संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥

तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥

कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥२॥

तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥३॥

३७५

एकली राणागोविंदा सवें । गेलें ठावें तें जालें ॥१॥

मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥

नव्हती देखिली म्यां वाट । म्हणोनि हा धीट संग केला ॥२॥

भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥३॥

सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवें ॥४॥

आहेव मी गर्भीणपणें । हें सांगणें कां लागे ॥५॥

तुका म्हणे सेवटा नेलें । संपादिलें उभयतां ॥६॥

३७६

होतें बहुत हें दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं ।

व्हावी भेटी ते जाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१॥

स्थिर स्थिर मज चि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।

येथें आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आलें तें दुसरें वारा वो ॥ध्रु.॥

मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी ।

नाहीं लौकिक स्मरला आवडी । आता येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥२॥

उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चिंतीनें निश्चिंती सावकाश ।

धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥३॥

३७७

स्वयें सुखाचे जाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव ।

अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥

आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।

एका मेघःशामें जलधर वोल । रसीं उतावळि हृदय सखोल वो ॥ध्रु.॥

एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं ।

अंध बहिर हे प्रेत लोकां चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥

स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर ।

परस्परें हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥३॥

भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ।

दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरि वो ॥४॥

तुका लाधला हें उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून ।

पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥५॥

३७८

आजि का वो तूं दिससी दुश्चिती । म्हणी एका मन लगे तुझ्या चित्तीं ।

दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरि चित्तीं वो ॥१॥

सर सर परती जालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड ।

व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं जाला खंड वो ॥धृ ॥

होतें तैसें तें उमटलें वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी ।

नाहीं मर्यादा निःसंग बावरी । मन हें गोविंदीं देह काम करी वो ॥२॥

नाहीं करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिलें खावें ।

नाहीं अचळ सावरावा ठावे । देखों उदासीन तुज देहभावें वो ॥३॥

कोठें नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवतीं बहुत ।

दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥४॥

करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासासुना ।

परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हणें ऐसें कळों यावें जना वो ॥५॥

३७९

भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट ।

चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तो चि नीट वो ॥१॥

चाळा लावियेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें ।

दावी बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ध्रु.॥

मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार ।

उगा राहे कां मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥२॥

धरिली खोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मशीं संगें ।

मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकी पडिलीं तुझीं सोंगें रें ॥३॥

सुख अंतरींचें बाहय ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी ।

तुज मज काय सोयरीक ऐसी । नंदानंदन या थोरपणें जासी रे ॥४॥

करी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचे बाह्य रंग जाना ।

मन मिनलें रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥५॥

३८०

आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें ।

गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥१॥

गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें नाहीं ।

अंगीं जडला मग उरलें तें काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ध्रु.॥

बहुत कामें मज नाहीं आराणूक । एक सारितां तों पुढें उभें एक ।

आजि मी टाकोनि आलें सकळिक । तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥२॥

चिंता करितां हरिली नारायणें । अंगसंगें मिनतां दोघेजणें ।

सुखें निर्भर जालियें त्याच्या गुणें । तुका म्हणे खुंटलें येणें जाणें वो ॥३॥

३८१

मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयें हाट ॥१॥

कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरूं देखें गोपाल ॥ध्रु.॥

काहां पग डारूं देख आनेरा । देखें तों सब वोहिन घेरा ॥२॥

हुं तों थकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥३॥

३८२

हरिबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी थाडी देखें राहा ॥१॥

क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥ध्रु.॥

कोई सखी हरी जावे बुलावन । बार हि डारूं उसपर तन ॥२॥

तुका प्रभु कब देखें पाऊं । पासीं आऊं फेर न जाऊं ॥३॥

३८३

भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥१॥

आगळ आवो देवजी कान्हा । मैं घरछोडी आहे म्हांना ॥ध्रु.॥

उन्हसुं कळना वेतो भला । खसम अहंकार दादुला ॥२॥

तुका प्रभु परवली हरी । छपी आहे हुं जगाथी न्यारी ॥३॥

३८४

नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करूं न साहती बहु होतो उबारा ।

मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा ॥१॥

सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।

उमटली अंगीं वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ॥ध्रु.॥

नये कळों नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत ।

एकाएकीं साक्षी येथें आपुलें चित्त । कोण्या काळें होइल नेणों भाग्य उदित वो ॥२॥

स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन ।

अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापें आलें जीवन ॥३॥

३८५

पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट ।

मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥

कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होतें वहिलें लपाला आतां खांदीं ।

कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ध्रु.॥

मागें बहुतांचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणें केला त्याग ।

पहिलें पाहातां तें हरपलें अंग । खुंटली वाट नाहींसें जालें जग वो ॥२॥

शोकें वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ।

केला उच्चार रे घडल्या दोषांचा । जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥३॥

३८६

काय उणें कां करिशील चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी ।

परपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥

माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे आघात ।

न पुरे अवसरु हें चि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि स्थिर चित्त ॥ध्रु.॥

बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी ।

करितां लाग न येसी च पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥२॥

तुज म्हणीयें मी न संगें अनंता । नको जाऊं या डोळियां परता ।

न लगे जोडी हे तुजविण आतां । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥३॥

३८७

घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली दुश्चित्ती ।

कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥१॥

बोले दूतिकेशीं राधा हें वचन । मशीं लाघव दाखवी नारायण ।

म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज पूर्ण वो ॥ध्रु.॥

धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । तैं पाचारिलें होउनि ये वो सीता ।

लाजिनली रूप न ये पालटितां । जाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥

सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो मज हृषीकेशी ।

तुळे घालितां न ये कनक वो रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥३॥

मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी ।

दिली वाट यमुने मायें खरी । तुम्हां आम्हां न कळे अद्यापवरी वो ॥४॥

जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून ।

राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथें भाव चि कारण वो ॥५॥

३८८

मिळोनि गौळणी देती यशोदे गार्हागणीं । दहिं दुध तुप लोणीं शिंकां नुरे कांहीं ।

मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥१॥

हरि सोंकला वो हरि सोंकला वो । सोंकला तो वारीं तुज लाज नाहीं तरी ।

आम्हां सांपडतां उरी तुज मज नाहीं ॥ध्रु.॥

तुज वाटतसे कोड यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागलें वो ।

आम्ही जाऊं तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगों भांडखोरी लाज वाटे आम्हां ॥२॥

मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तंव दसवंती म्हणे आणा शीक लावूं ।

थोर आणिला कांटाळा घरीं दारीं लोकपाळां । डेरा रिघोनी गुसळा तेथें लोणी खाय ॥३॥

मिळोनि सकळा दावें लावूनियां गळां । कैशा बांधिती उखळा येथें राहे उगा ।

बरा सांपडलासी हरी आजिच्यानें करिसिल चोरी । डोळे घालुनियां येरी येरीकडे हांसे ॥४॥

फांकल्या सकळा उपडूनियां उखळा । मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही ।

उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धांवे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥५॥

३८९

गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें ।

जाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥१॥

सर जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता । खेपा खुंटलिया ॥ध्रु.॥

आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी ।

आलों गेलों बहु वेळां नेणों गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥२॥

आम्ही येथें अधिकारी मागें केली तुम्ही चोरी । आतां कळलियावरी मागें केलें त्याचें ।

बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरूनी करी मात कांहीं ॥३॥

वांयां परनारी कैशा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं ।

जडला जिव्हारीं फांकों नेदी तया नारी । जेथें वर्म तें धरी जाऊं पाहे तियेचें ॥४॥

तया हाती सांपडल्या हाटीं पाटीं चुकाविल्या । कृष्णमळिणीं मिळाल्या त्याही न फिरती ।

तुका म्हणे खंती वांयां न धरावी चित्तीं । होतें तुमच्या संचितीं वोडवलें आजि ॥५॥

३९०

हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥

उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥

तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥

मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होइल रे ॥३॥

तुज लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं । मसी भीड नाहीं तुज माझी ॥४॥

वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥

३९१

सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गार्हा।णें देती कैसें ।

काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें।

दहिं दुध लोणी शिंकां नुरे चि कांहीं कवाड जैशाचें तैसें ।

चाळवूनि नाशिली कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे बाइये ॥१॥

आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी ।

मिळोनि सकळै जणी करूं वाखा सखीं तुज मज होईल तुटी गे बाइये ॥ध्रु.॥

नेणे आपपर लौकिक वेव्हार भलते ठायीं भलतें करी ।

पाळतुनि घरीं आम्ही नसतां तेथें आपण संचार करी ।

सोगया चुंबन देतो आलिंगन लोळे मेजाबाजावरी ।

शिंकीं कडा फोडी गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाइये ॥२॥

आतां याची चाड नाहीं आम्हां भीड सांपतां कोड पुरवूं मनिचें ।

सोसिलें बहु दिस नव्हता केला निस म्हणुनि एकुलतें तुमचें ।

चरण खांबीं जीवें बांधैन सरिसा जवें न चले कांहीं याचें ।

अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा भलतें हो या जिवाचें गे बाइये ॥३॥

घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां ।

निष्ठ‍ वाद झणीं बोलाल सकळा क्षोभ जाइल माझ्या बाळा ।

जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा ।

देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥४॥

३९२

विरहतापें फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें चि दुश्चिती ।

न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे कुळाहुनिया ती ॥१॥

खुंटलीसी जाली येथें अवघियांची गती । आपुलीं परावीं कोण नेणें भोंवती ।

त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपती । नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥ध्रु.॥

बाहेरी च धांवे रानां न धरी च घर । न कळे बंधना जाला तेणें संचार ।

विसरूनि गेली सासुरें की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥२॥

तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं येथें सर्वथा बळा ।

त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्वाळा । बहुतां मतें येथें तर्कवाद निराळा ॥३॥

३९३

ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें ।

कळों नेदी माया त्याचें त्यास ठाउकें । खेळतोंसें दावी लक्षलक्षापें मुकें ॥१॥

अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया त्या वाहाती संकल्प मना ।

काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेवोनियां राणा ॥ध्रु.॥

अवघियांचा जाणें जाला मेळासा हरी । मिळोनियां जावें तेथें तया भीतरी ।

कळों नेदी घरिच्या करी गोवूनी चोरी । हातोहातीं नेती परपरत्या दुरी ॥२॥

आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिलें पारिखें जन ।

एकाएकीं तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका म्हणे एका नारायणा वांचून ॥३॥

३९४

खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्न चि या नारी तेथें देखियेल्या ।

मांडिले विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥१॥

ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पायां पडतां रे न सोडी नेदी साउलां रे ॥ध्रु.॥

साड्या साउलीं पातळें गोंडे कसणिया चोळ्या । बुंथी घेउनी सकळा कळंबावरी पळे।

खांदी धरूनियां करीं दृष्टी घालोनि सामोरी । बैसे पाला वोढी वरी खदखदां हांसे ॥२॥

आनंदें कल्लोळ बाळा खेळती सकळ देती उलटिया चपळ । एकी एकीहूनि म्हैस वेल सुर काडी ।

एकी उगविती कोडीं । नाना परीच्या निकडी खेळ मांडियेला ॥३॥

एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तंव नारी । म्हणे नाहीं नेलें चोरी काय जाणों केव्हां ।

केला सकळी हाकारा तंव आलिया बाहेरा । आतां म्हणतील घरां जावें कैशा परी ॥४॥

तंव हांसे वनमाळी वरी पाहोनी सकळी । लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात ।

लाज राखावी गोपाळा आम्हांजणींची सकळां । काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥५॥

जोडोनियां कर या गे सकळी समोर । वांयां न बोलावें फार बडबड कांहीं ।

भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन । करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥६॥

एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे । म्हणे चला आतां सये जाऊं तयापाशीं ।

जोडोनियां हात कैशा राहिल्या निवांत । तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची ॥७॥

३९५

धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया कान्हें ।

एकली न येतें मी ऐसें काय जाणें । कोठें भरलें अवघड या राणें रे ॥१॥

सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरीं ।

सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगतां नाहीं उरी रे ॥ध्रु.॥

सखिया वेशिया होतिया । तुज फावलें रे फांकतां तयांसी ।

होतें अंतर तर सांपडतें कैसी । एकाएकीं अंगीं जडलासी रे ॥२॥

कैसी भागली हे करितां उत्तर । शक्ति मावळल्या आसुडितां कर ।

स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥३॥

३९६

गाई गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणिया मिळोनि जगजेटी ।

चेंडू चौगुणा खेळती वाळवंटीं । चला चला म्हणती पाहूं दृष्टी वो ॥१॥

ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी ।

मिस पाणियाचें करितील घरीं । बारा सोळा मिळोनि परस्परीं वो ॥ध्रु.॥

चिरें चोळिया त्या धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्णमूर्ती ।

कोणा नाठवे कोण कुळ याती । जालीं ताटस्त सकळ नेत्रपातीं वो ॥२॥

दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती नाइके जनमात ।

करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवील मनोरथ वो ॥३॥

३९७

कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥१॥

सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥

रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोंवतीं मी ते माझी ॥२॥

तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला । बोलीं च अबोला करूनियां ॥३॥

३९८

गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥

वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥

परते चि ना दृष्टी बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेलें मन ॥२॥

तुकयाच्या स्वामीसवें जाली भेटी । तेव्हां जाली तुटी मागिल्यांची ॥३॥

३९९

पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥१॥

बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवूं ॥ध्रु.॥

जीवा आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥२॥

जालें विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥३॥

४००

कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥

देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥

आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥२॥

तुका म्हणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥३॥

४०१

करूनी आइत सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे ।

न येचि देव येतील कामलहरी रे । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी रे ॥१॥

सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे ।

बोलतोसी तें अवघी तुझी माव रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ध्रु.॥

मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा जाली काय रे ।

मागुती रुद्रासि भेटी दिली तई रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि तरी रे ॥२॥

भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे ।

नष्टा क्रिया नाहीं मां तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडया कौसाल्या रे ॥३॥

४०२

तंव तो हरि म्हणे वो निजांगने वो । लाइ नीच कां देसील डोहणे वो ।

मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥१॥

पाहा मनीं विचारुनी आधि वो । सांडूनि देई भ्रांति करीं स्थिर बुद्धि वो ।

तंट केलें हें माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आझुनि तरी धरीं शुद्धि वो ॥ध्रु.॥

कोठें तरी दुनियांत वर्तलें वो । स्त्रियांनीं भ्रतारा दानां दिलें वो ।

कैसा भला मी नव्हे तें सोसिलें वो । रुसतेसी तूं उफराटें नवल जालें वो ॥२॥

काय सांग म्यां दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वें आणविलें हनुमंतासि वो ।

कष्टी केलें मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधु म्हणे खरें खोटें नव्हे यासि वो ॥३॥

४०३

तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो ।

तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो ॥१॥

सर हो परता परता हो आतां हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी ।

जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी ॥ध्रु.॥

भावें गेलें म्हुण न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा संग ।

तों तों केलें हें पाठमोरें जग । ऐसें काय जाणें हे तुझे रंग ॥२॥

काय करूं या नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें ।

नाहीं तरी कां नव्हती ठावीं वर्में । परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें ॥३॥

काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठ‍ ऐसा निर्गुण ।

आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण ॥४॥

इतुकियावरी म्हणे वैकुंठिंचा राणा । होऊन गेलें तें नये आणूं मना ।

आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा ॥५॥

४०४

कान्हो एकली रे एकली रे । तुजसवें चुकलें रे । भय वाटे वनीं मज अबळा धाकली रे ॥१॥

निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥

लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥२॥

पिकल्या बोरी जालें सामोरी । काय जाणें कोठें राहिला हरी ॥३॥

आड खुंट जालिया जाळी । काय जाणों कान्हें मांडिली रळी ॥४॥

तुका म्हणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी पायीं न मोडे कांटा ॥५॥

४०५

क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥१॥

बहु दिसीं जाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥

कोवळें बोलतो मना आवरतें । डोळियाचें पातें ढापवेना ॥२॥

आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां गो पाठी वांयां पुलविली ॥३॥

तुमचें तें काय खोळंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥४॥

तुकयाचा धनी गोकुळनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥५॥

४०६

आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥१॥

कां गो कलित्यां कोल्हाल । तुम्ही भलत्या च सकल । वेचाल ते बोल । झुटे होती बोलिले ॥ध्रु.॥

याचे भेटी माझें मन । स्वरुपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥२॥

काज काम नको जालें । बीजें नावरे बोलिलें । याचिया भेदिलें । कामबाणीं अंतर ॥३॥

या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥४॥

आतां मोटी वार । माझी नका धरूं चार । तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥५॥

४०७

हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥

अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥ध्रु.॥

वाचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥२॥

तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥३॥

४०८

गौळणी आल्या वाज । म्हणती या गे राखों आज । सांपडवुनी माजघरांत धरुनी कोंडूं ।

उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥१॥

नित्य सोंकवला नेदी । सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ध्रु.॥

जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी । गडियां ठेवुनी बाहेरी पूर्वद्वारें शिरे ।

त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें । पाहे तंव देखियेलें नवनीत पुढें ॥२॥

उतरोनि सिंकें । पाहे चाखोनियां निकें । गोड तें चि एका एकें । हातीं लांबवितो ।

जाणे राखती तयांसि । तेथें अधिक चि नासी । माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥३॥

जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी । माजे कोंडूनी भीतरी । घरांत धरीयेला ।

कां रे नागविसी । माझे मुळीं लागलासी । आणवीन तुजपासीं । मागें खादलें तें ॥४॥

दोही संदी बाहे । धरूनि नेती माते पाहे । काय नासी केली आहे । घरामाजी येणें ।

तुका म्हणे मुख । त्याचें वाढों नेदी दुःख । दसवंती कवतुक। करुनी रंजविल्या ॥३॥

४०९

आलियें धांवति धांवति भेट होइल म्हुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥

आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥

लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥२॥

जळो आतां संसारु वो कई शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥३॥

४१०

आणीक काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥१॥

सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥

सदा घालिता हुंबरी । एक एकांचे न करी ॥२॥

तुका म्हणे घरीं माय । वेळोवेळां मारी ॥३॥

४११

बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥१॥

बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ध्रु.॥

माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥२॥

तुका म्हणी काई । किती म्हणों बाप आई ॥३॥

४१२

गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥

चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥

मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊं ॥२॥

मायबापा लाड दाखविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥३॥

निर्दाळिले दुष्ट भक्तां प्रतिपाळी । ऐसा म्हणों बळी आमुचा स्वामी ॥४॥

तुका म्हणे सरसी असों येणें वोघें । लागोनि संबंधें सर्वकाळ ॥५॥ डांका - अभंग ८

४१३

चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥

रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥ध्रु.॥

रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥

मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥३॥

डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥४॥

४१४

साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥१॥

माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥

तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी । चिवडुनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥२॥

आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥३॥

आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र फळे । नवस पुरविते विठाई ॥४॥

उगविलीं कोडीं । मागें कितेकांचीं बापुडीं । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥५॥

४१५

विनति घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥१॥

रंगा येई वो एकला रंग वोडवला । हरिनाम उठिला गजर केला हाकारा ॥ध्रु.॥

देवांचे दैवते । तुज नमिलें आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धांवति ॥२॥

न लवीं आतां वेळ । आइत सारिली सकळ । तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥३॥

४१६

माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥

या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥

पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी । हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥२॥

घेतला अहंकार । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥३॥

घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥४॥

तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥५॥

४१७

पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥

एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥

मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ । तुम्हीं केलें बळ । मग मी ठायीं न पडें ॥२॥

तुका म्हणें मुळीं । लागली ते आली कुळीं । वंदुनी सकळीं । जीवें भावों ओवाळा ॥३॥

४१८

अवघ्या जेष्ठादेवी । कोण पूजनाचा ठाव । धरितां चि भाव । कोठें नाहींसें जालें ॥१॥

दिसे सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें । तळीं गेलें देखें । वरी टोले न साहाती ॥ध्रु.॥

पट एका शिरीं । यथाविधीनें त्या येरी । बसकोळ्या घागरी । डेरे रांझण गाडगीं ॥२॥

तुका म्हणे माना । येथें कोणीं रुसावें ना । आपुलाल्या स्थानां । जेथें त्या चि शोभल्या ॥३॥

४१९

खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं ॥१॥

आतां करी कां रे हाकारा । सहस्र नामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥

सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥२॥

लाविलें कावरें । प्रल्हादा म्हैसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥३॥

वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें। आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥४॥

पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाविलीं ॥५॥

नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥६॥

कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥७॥

४२०

देवी देव जाला भोग सरला यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥१॥

हरिनाम देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥

शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥२॥

गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरीं आजि कोडीं उगविलीं ॥३॥

॥८॥

४२१

जाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥

मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥

नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥२॥

तुका म्हणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥३॥

४२२

अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥

मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥

आपुलाले तुम्ही पुसा । सोवा एव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय । जाणों विचार ॥२॥

तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥३॥

४२३

पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ।

खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥

दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥

हिंडतां गव्हानें गा । शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी ।

कीर्ति हे संतां मुखीं । तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥२॥

या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय । भीक नाहीं खंडणा ।

पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥३॥

काय मी चुकलों गा । मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं ।

मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥४॥

दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण । यावया येथवरी होतें । हें चि कारण ।

दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥५॥

४२४

देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों ।

पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ जालों ॥१॥

आतां माझी करीं चिंता । दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥

चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय जालें।

कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं । तुज धरूनि चित्तीं ॥२॥

भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा ।

लक्ष चौर्यां शी गांव । धरूनि राहिलों गा । हा चि वसता ठाव ॥३॥

भरवसा काय आतां । कोण आणि अवचिता । तैसी च जाली कीर्ति । तया मज बहुतां ।

म्हणउनि मारीं हाका । सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळू दाता ॥४॥

संचित सांडवलें । कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया । तुटली हे लागावळी ।

निष्काम जालों देवा । होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥५॥

४२५

देखत होतों आधीं । मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली । वरी आले पडळ ।

तिमिर कोंदलेंसें । वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥

आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा ।

अंजन लेववुनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धिपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥

होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना । मागें तोही सांडिला आधार ।

हा ना तोसा ठाव जाला । अवघा पडिला अंधार । फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥२॥

जोंवरि चळण गा । तोंवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा । इंद्रियें मावळलीं ।

आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला । तो चि देह नव्हे दुजा ॥३॥

गुंतलों या संसारें । कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध।

स्वहित न दिसेचि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥४॥

लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालों निराळा कैसा ।

पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा । पंढरीच्या निवासा ॥५॥

४२६

सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें ।

मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥

सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥

टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा ।

न मागें मी भीक आतां हा चि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥२॥

ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद ।

घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥३॥

शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागें येतील त्यांसीं ।

मागोनि आली वाट सिद्धिओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥

वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव ।

म्हणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हा चि संतीं मागें केला उपाव ॥५॥

४२७

आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता ।

घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥

धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु.॥

घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं ।

न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥

आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे ।

घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥३॥

बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा ।

मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥४॥

न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना ।

आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥५॥

४२८

भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी ।

न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥

विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ध्रु.॥

भक्तिमुक्ति तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।

सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येउनि सामोरा आतां ॥२॥

संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।

इंयें वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥३॥

तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा भाव धरूनि टेंका ।

जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥

नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू ।

घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥

वासुदेव - अभंग ६

४२९

मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी।

पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आम्हांवरी गा ॥१॥

म्हणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा ।

दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥

सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।

कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥२॥

पुढें भक्तिनें धरिलें हातीं । मागें ज्ञान वैराग्य धर्म येती ।

स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सद्धि आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥

केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय ।

धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥४॥

होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव ।

तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥५॥

४३०

गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका ।

डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥

राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं ।

सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ध्रु.॥

ऐसा अल्प मानवी देह । शत गणिलें अर्ध रात्र खाय ।

पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥२॥

क्षणभंगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा माया आशा ।

न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥

कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट ।

तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥४॥

विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां ।

दान इतुलें द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥५॥

४३१

गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून ।

जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥१॥

हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसें जना ।

चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा गा ॥ध्रु.॥

जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय ।

द्या परी मीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥२॥

देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त।

जालें एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥३॥

आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हें चि मागावयास ।

नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥

आतां मागुता येईल फेरा । हें तों घडे या नगरा ।

म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥५॥

४३२

राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥१॥

राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागर्यावघोषें गा ॥ध्रु.॥

गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥२॥

एक वेळा जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं । नीज घेउनि फिरती गा ॥३॥

सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥४॥

शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥

४३३

बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥१॥

वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान करा । जाब नेदा तरी जातों सामोरा गा ॥ध्रु.॥

हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें । गजर होतो बहु मोठ्यानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥२॥

मी वासुदेव तत्वता । कळों येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥३॥

काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं । तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥

ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥५॥

४३४

रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळ्या वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥१॥

जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्यावा भाव गा ॥ध्रु.॥

निज दासाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥२॥

अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवालागा ॥३॥

तुका म्हणे रे धन्य त्याचें जिणें । जींहीं घातलें वासुदेवा दान । त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणे गा ॥४॥

॥६॥

गांवगुंड - अभंग १

४३५

आम्ही जालों गांवगुंड । अवघ्या पुंड भूतांसी ॥१॥

दुसरें तें खेळों आलें । एका बोले तो मियां ॥ध्रु.॥

अवघियांचा येऊं लाग । नेदूं अंग शिवाया ॥२॥

तुका म्हणे खुंटूं नाद । जिंतूं वाद सर्तीनें ॥३॥

॥१॥

जोगी - अभंग १

४३६

जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥१॥

जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥

अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥

पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥३॥

बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥

नका घेऊं भार । धर्म तो चि सार ॥५॥

तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥६॥

॥१॥

सरवदा - अभंग १

४३७

एका गा ए भाई । सरवदा सांगतो काई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची ।

ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसद्धि जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥१॥

आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरें चि बोले तो जाय । नरकामध्यें अधोगती ।

हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ध्रु.॥

आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागें माझें म्हणोन । पडिलें खान तया घरीं ।

म्हणोन न म्हणा माझें कांहीं । निजीं निजा सुखें ठायीं । यत्न होईल तई । चोराठायीं विश्वास ॥२॥

आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधीं ।

पांचांनीं दिधली हातीं । म्हणोनि न मनावी निश्चिती । परपुरुषीं होय रती । सुखगती ते पावे ॥३॥

एकी परी । सरवदा सांगतो तें करीं । दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो तुका म्हणे आई ।

येथें नांव काई । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥४॥

॥१॥

मुंढा - अभंग ३

४३८

संबाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥१॥

प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ध्रु.॥

उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेकां खचलावत भार ॥२॥

कहे तुका चलो एका हम जिन्होंके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥३॥

४३९

सब संबाल भ्याने लौंढे खडा केऊं गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडी भंग ॥१॥

आपसकुं संबाल आपसकुं संबाल । मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करूँगा हाल ॥ध्रु.॥

आवलका तो पीछें नहीं मुदल बिसर जाय । फिरते नहीं लाज रंडी गधे गोते खाय ॥२॥

जिन्हो खातिर इतना होता सो नहीं तुझे बेफाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥३॥

निकल जावे चिकल जोरो मुंढे दिलदारी । जबानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥४॥

कहे तुका फिसल रुका मेरेको दान देख । पकड धका गांडगुडघी मार चलाऊं आलेख ॥५॥

४४०

आवल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ॥१॥

आल्ला एक तुं नबी एक तुं ॥ध्रु.॥

काटतें सिर पावों हात नहीं जीव उराये । आगले देखे पिछले बुझे । आपें हजुर आयें ॥२॥

सब सबरी नचाव म्याने । खडा आपनी सात । हात पावों रखते जबाब । नहीं आगली बात ॥३॥

सुनो भाई बजार नहीं । सब हि निरचे लाव । नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलाव ॥४॥

एक तार नहीं प्यार । जीवतनकी आस । कहे तुका सो हि मुंढा । राखलिये पायेनपास ॥५॥

॥३॥

डोई फोडा - अभंग १

४४१

तम भज्याय ते बुरा जिकीर ते करे । सीर काटे ऊर कुटे ताहां सब डरे ॥१॥

ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तु ही रे बाबा हमें तुम्हें नहीं ॥ध्रु.॥

दिदार देखो भुले नहीं किशे पछाने कोये । सचा नहीं पकडुं सके झुटा झुटे रोये ॥२॥

किसे कहे मेरा किन्हे सात लिया भास । नहीं मेलो मिले जीवना झुटा किया नास ॥३॥

सुनो भाई कैसा तो ही । होय तैसा होय । बाट खाना आल्ला कहना एकबारां तो ही ॥४॥

भला लिया भेक मुंढे । आपना नफा देख । कहे तुका सो ही संका । हाक आल्ला एक ॥५॥

॥१॥

मलंग - अभंग १

४४२

नजर करे सो ही जिंके बाबा दुरथी तमासा देख । लकडी फांसा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥१॥

काहे भुला एक देखत आंखो मार तडांगो बाजार ॥ध्रु.॥

दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥२॥

नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये । कहे तुका उस असाके संग फिरफिर गोदे खाये ॥३॥

॥१॥

दरवेस -अभंग १

४४३

अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥१॥

ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥२॥

जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥३॥

॥१॥

वैद्यगोळी - अभंग १

४४४

अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे । अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥१॥

मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥

सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥२॥

जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥३॥

सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥

मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥५॥

बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥६॥

॥१॥

गोंधळ - अभंग ३

४४५

राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली ।

माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि माझी । परब्रम्ह वेल्हाळा वो ॥१॥

राजस विठाबाई । माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी । लावी आपुलिये सोई वो ॥ध्रु.॥

सकुमार साजिरी । कैसीं पाउलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा ।

उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥२॥

निर्गुण निराकार । वेदां न कळे चि आकार वो । शेषादिक श्रमले ।

श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनि बाहे । भक्तां देत अभयकर वो ॥३॥

येउनि पंढरपुरा । अवतरली सारंगधरा वो । देखोनि भक्ति भाव ।

वोरसली अमृतधारा वो । देउनि प्रेमपान्हा । तुकया स्वामीनें किंकरा वो ॥४॥

४४६

सुदिन सुवेळ । तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे । दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥१॥

पंढरपुरनिवासे । तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा । मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥

मांडिला देव्हारा । तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला । नाभिकळस ठेविला वरी वो ॥२॥

बैसली देवता । पुढें वैष्णवाचें गाणें वो । उद्गारे गर्जती । कंठीं तुळसीचीं दर्शनें वो ॥३॥

स्वानंदाचे ताटीं । धूप दीप पंचारती वो । ओवाळिली माता । विठाबाई पंचभूतीं वो ॥४॥

तुझें तुज पावलें । माझा नवस पुरवीं आतां वो । तुका म्हणे राखें । आपुलिया शरणागता वो ॥५॥

४४७

सुंदर मुख साजिरें । कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा । केशर कस्तुरी मळवटीं वो ।

विशाळ व्यंकट नेत्र । वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची । चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥

अतिबरवंटा बाळा । आली सुलक्षणीं गोंधळा वो । राजस तेजोराशी । मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो ।

कोटि रविशशिप्रभा । लोपल्या सकळा वो । न कळे ब्रम्हादिकां । अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु.॥

सावळी सकुमार । गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ । सुढाळ पदक झळके वरी वो ।

कटीं क्षुद्र घंटिका । शब्द करिताती माधुरी वो । गर्जत चरणीं वाकी । अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥

अष्टांगें मंडित काय । वर्णावी रूपठेवणी वो । शोधिव सुंदर रसाची ओतिली । सुगंध लावण्यखाणी वो ।

सर्वकळासंपन्न । मंजुळ बोले हास्यवदनीं वो । बहु रूपें नटली । आदिशक्ति नारायणी वो ॥३॥

घटस्थापना केली । पंढरपुरमहानगरीं वो । अस्मानी मंडप दिला । तिन्ही ताळांवरी वो ।

आरंभिला गोंधळ इनें । चंद्रभागेतिरीं वो । आली भक्तिकाजा । कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥

तेहतिस कोटि देव । चौंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या । करिती पुष्पांचा वरुषाव वो ।

नारद तुंबर गायन । ब्रम्हानंद करिती गंधर्व वो। वंदी चरणरज तेथें । तुकयाचा बंधव वो ॥५॥

४४८

शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें ।

ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें । रे विठ्ठल ॥१॥

टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग ।

पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग । रे विठ्ठल ॥२॥

राख लावुनि अंग मळी । वाये ठोके मी एक बळी ।

वासने हातीं बांधवी नळी । त्यासि येउनि गाळी । रे विठ्ठल ॥३॥

कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख ।

करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकीं परी न पळे चि मूर्ख । रे विठ्ठल ॥४॥

सिकला फाक मारी हाका । रांडा पोरें मेळवी लोकां ।

विटंबी शरीर मागे रुका । केलें तें गेलें अवघें चि फुका । रे विठ्ठल ॥५॥

कळावें जनां मी एक बळी । उभा राहोनि मांडी फळी ।

फोडोनि गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनि आपण चि तळमळे । रे विठ्ठल ॥६॥

फुकट खेळें ठकलीं वांयां । धरुनि सोंग बोडक्या डोया ।

शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विटंबिली काया । रे विठ्ठल ॥७॥

धुळी माती कांहीं खेळों च नका । जवादी चंदन घ्यावा बुका ।

आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाची महिमा फजिती फुका । रे विठ्ठल ॥८॥

बहुत दुःखी जालियां खेळें । अंगीं बुद्धि नाहींत बळें ।

पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रवे उपस्थाच्या मुळें । रे विठ्ठल ॥९॥

काय सांगतो तें ऐका तुका । मोडा खेळ कांहीं अवगों च नका ।

चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका । रे विठ्ठल ॥१०॥

४४९

ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें म्हणउन ॥१॥

मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥

सांगतें गुण जीवीची खुण ऐक माझी मात । बैस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥२॥

बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥३॥

आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साहए चहूं अठरांच्या बळें ॥४॥

करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥५॥

कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥६॥

तुका म्हणे नांद सुखें धरीं आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राख बरा मान ॥७॥

कावडे - अभंग ५

४५०

आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक ।

ठेवुनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रसादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥१॥

माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी ।

पान्हेरीनें मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥२॥

जें या सीतळाहुनि सीतळ । पातळाहुनि जें पातळ ।

प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥३॥

जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान ।

धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥

काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव ।

शुद्ध सत्वीं राखोनि भाव । म्हणा महादेव हरिहर वाणी गर्जो द्या ॥५॥

पराविया नारी माउली समान । परधनीं बाटों नेदीं मन ।

जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया ॥६॥

शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा ।

सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतों ॥७॥

व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर ।

पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥८॥

संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ।

पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥

तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी ।

पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥१०॥

४५१

आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र ।

पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥

यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें ।

पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरि म्हणा रे ॥२॥

नव्हे हें कांहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें ।

नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वें हरि म्हणा रे ॥३॥

हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।

विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥४॥

तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।

या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥५॥

४५२

आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥

नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥

नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥३॥

नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥४॥

नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥५॥

परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसि ॥६॥

तुका म्हणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥

४५३

आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥

थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥

बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकार्याीस नये दारा ॥२॥

विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांसि फळी मांडोनियां ॥३॥

गांविंचिया देवा नाहीं दंडवत । ब्राम्हण अतीत घडे चि ना ॥४॥

सदा सर्वकाळ करितो चि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥५॥

खासेमध्यें धन पोटासि बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥६॥

तुका म्हणे नटे दावुनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥७॥

४५४

आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥

समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥

काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥

चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥

गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥

कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥

गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥

सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥

मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥

गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥

कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥

॥५॥

सौर्यान - अभंग ११

४५५

वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥

त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥

जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥२॥

वेगळ्या याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥३॥

सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वाय तुंबामूढासवें भक्ति नाचों भावा ॥४॥

म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु जालें सुख काम चुकलों या काजा ॥५॥

४५६

आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥

तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥

बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥२॥

तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥३॥

४५७

टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥

आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥

कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥

याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खंती ॥३॥

४५८

मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥

ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥

न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥२॥

देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥३॥

४५९

सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥

या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥

अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥२॥

तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळीचिया ठाया ॥३॥

४६०

सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं जालें सरती ॥१॥

चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥

हिंडोनि चौर्यांीशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥२॥

लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥३॥

जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥४॥

तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी जाली जीवे साटीं ॥५॥

४६१

सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥

गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥

ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥२॥

सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥३॥

लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥४॥

तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रचित सवें असों एकपणें ॥५॥

४६२

नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों । निर्लज्ज निष्काम जना वेगळे चि ठेलों ॥१॥

चाल रघुरामा न आपुल्या गांवा । तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ध्रु.॥

जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥२॥

बहुता पाठीं निरोप हाटीं पाठविला तुज । तुका म्हणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥३॥

४६३

नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥१॥

ते सौरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥ध्रु.॥

चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी । रुक्याची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥२॥

थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥३॥

आंत मांग बाहेर चांग । सौरी ती नव्हे तेग । तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥४॥

४६४

चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥

घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥१॥

घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥२॥

घर केलें दार केलें । दुकान केला मोटा । पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥३॥

दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा म्हणसी जोगी ।

तर सोळा सहस्र भोगी । तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥४॥

४६५

जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली ।

माझें माझें म्हणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥१॥

येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं । चाल रांडें टाकी रुका ।

नकों करूं बोल । गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥२॥

खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । म्हणती आम्ही बर्याे । साधु संत घरा आल्या । होती पाठमोर्या ॥३॥

वाचोनि पढोनि जाले शाहणे । म्हणती आम्ही संत । परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥४॥

टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधु । दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥५॥

कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार । वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥६॥

संत म्हणती केली निंदा । निंदा नव्हे भाई । तुका असे अनन्यें भावें शरण संतां पायीं ॥७॥

॥११॥

वाघा - अभंग १

४६६

अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा । अवचिता भरला वारा । या मल्लारी देवाचा ॥१॥

शुद्धसत्वाचा कवडा मोठा । बोधबिरडें बांधला गांठा । गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भक्तिच्या ॥२॥

हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें । ज्ञानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पांतीं ॥३॥

लक्ष चौर्यां शी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न जाला देव मल्लारी । सोहंभावीं राहिलों ॥४॥

या देवाचें भरतां वारें । अंगीं प्रेमाचें फेंपरें। गुरुगुरु करी वेडे चारें । पाहा तुकें भुंकविलें ॥५॥

॥१॥

लळित - अभंग ११

४६७

आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥

जालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥

रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥२॥

तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥३॥

४६८

तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥१॥

कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देई ॥ध्रु.॥

टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥२॥

प्रेम देउनि बहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥

४६९

वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥

कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥

डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उतावळि भाव सांडुनियां देहे ॥२॥

सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥३॥

तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥

४७०

तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥

काय गा विठोबा तुज म्हणावें । थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ध्रु.॥

संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥

तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥३॥

४७१

पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥

माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥

घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥

तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥

४७२

कथेची सामुग्री । देह अवसानावरी ॥१॥

नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥

आयुष्य करीं उणें । परी मज आवडो कीर्तन ॥२॥

तुका म्हणे हाणी । या वेगळी मना नाणीं ॥३॥

४७३

गळित जाली काया । हें चि लळित पंढरिराया ॥१॥

आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ध्रु.॥

वाइला कळस । तेथें स्थिरावला रस ॥२॥

तुका म्हणे गोड जालें । नारायणीं पोट धालें ॥३॥

४७४

रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥

कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी रखुमाई राही ॥ध्रु.॥

नाना उपचारीं । सिद्धि वोळगती कामारी ॥२॥

हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥३॥

४७५

हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥१॥

तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥ध्रु.॥

कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥२॥

तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी ते न ये ॥३॥

४७६

पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥१॥

परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥ध्रु.॥

नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥२॥

अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों ॥३॥

४७७

उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥१॥

देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय धनी ॥ध्रु.॥

एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥२॥

दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥३॥

॥११॥

आशीर्वाद - अभंग ५

४७८

जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥१॥

पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ध्रु.॥

विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥२॥

तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥३॥

४७९

आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥१॥

कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥

भक्तिभाग्यगांठी धन । त्या नमन जीवासी ॥२॥

तुका म्हणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥३॥

४८०

तया साटीं वेचूं वाणी । अइकों कानीं वारता ॥१॥

क्षेम माझे हरिजन । समाधान पुसतां त्यां ॥ध्रु.॥

परत्रींचे जे सांगाती । त्यांची याती न विचारीं ॥२॥

तुका म्हणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सरवीं तीं ॥३॥

४८१

अभय उत्तर संतीं केलें दान । जालें समाधान चित्त तेणें ॥१॥

आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥

आलें जें उचित देहविभागासी । तेणें पायांपासीं उभी असों ॥२॥

तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातों गीत ॥३॥

४८२

असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारूं ॥१॥

सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ध्रु.॥

विचारूनि ठाया ठाव । येथें भाव राहिला ॥२॥

आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥३॥

॥५॥

४८३

ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥

कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥

घेई ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥२॥

तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुका राखावा ॥३॥

४८४

आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥

लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥

जालिया अवसान । न संपडती चरण ॥२॥

तुकयाबंधु म्हणे थोडें । अवधि उरली आहे पुढें ॥३॥

४८५

नेणें गाऊं कांहीं धड बोलतां वचन । कायावाचामनेंसहित आलों शरण ॥१॥

करीं अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन ब्रिदें करावीं खरीं ॥ध्रु.॥

नेणें भक्तिभाव तुझा म्हणवितों दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥२॥

म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाये । आतां कोण दुजा ऐसा आम्हांसी आहे ॥३॥

४८६

तूं च मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥१॥

आणीक प्रमाण नाहीं दुसरें आतां । योगक्षेमभार तुझे घातला माथां ॥ध्रु.॥

तूं च क्रियाकर्म धर्म देव तूं कुळ । तूं च तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥२॥

म्हणे तुकयाबंधु करिता कार्यता देवा । तूं च भाव भक्ति पूजा पुनस्कार आघवा ॥३॥

४८७

करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥१॥

आलों दान मागायास । थोरी करूनियां आस ॥ध्रु.॥

चिंतन समयीं । सेवा आपुली च देई ॥२॥

तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावें देवा ॥३॥

४८८

गाऊं वाऊं टाळी रंगीं नाचों उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥१॥

बळियाचा बळी तो कैवारी आमुचा । भुक्तिमुक्तिदाता सकळां ही सिद्धींचा ॥ध्रु.॥

मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक अनिवार । कंटकाचा चुर शिर फोडूं काळाचें ॥२॥

म्हणे तुकयाबंधु नाहीं जीवाची चाड । आपुलिया तेथें काय आणिकांची भीड ॥३॥

४८९

सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥१॥

आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥ध्रु.॥

पैल चंद्रभागे तिरीं । कट धरूनियां करीं ॥२॥

तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥३॥

४९०

कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥१॥

उभा न पाचारितां दारीं । न संगतां काम करी ॥ध्रु.॥

भाव देखोनि निर्मळ । रजां वोडवी कपाळ ॥२॥

तुकयाबंधु म्हणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥३॥

४९१

केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥१॥

घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥

लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार कळों आला आम्हांसी ॥२॥

म्हणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥३॥

४९२

अगोचरी बोलिलों आज्ञेविण आगळें । परी तें आतां न संडावें राउळें ॥१॥

जाईल रोकडा बोल न पुसती आम्हां । तुझा तुझें म्हणविलें पाहा पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥

न व्हावा न वजावा न कळतां अन्याय । न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥२॥

म्हणे तुकयाबंधु हीन मी म्हणोनि लाजसी । वारा लागों पाहातोहे उंच्या झाडासी ॥३॥

४९३

जाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी अई ॥१॥

उठा पांडुरंगा उशीर जाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥

अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारूं मुळा ॥२॥

सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटीं वाळा विडिया विनोदा ॥३॥

तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥४॥

४९४

उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥

करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥

जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥२॥

तुका म्हणे काय पढियंतें तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःखें ॥३॥

४९५

करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥

अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥

असो नमो भाव आलों तुझिया ठाया । पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥२॥

तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥३॥

४९६

घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥

वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥

पैस धरुनी चला ठाकत ठायीं ठायीं । मौन्य धरुनी कांहीं नो बोलावें ॥२॥

तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥३॥

४९७

भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥

न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ध्रु.॥

करूनी मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥२॥

नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥३॥

करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥४॥

तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती ची ॥५॥

४९८

द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥१॥

टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥

येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आम्ही दातारा ॥२॥

प्रेम देउनियां बहुडा आतां दिला । तुका म्हणे आतां विठ्ठल बोला ॥३॥

४९९

बहुडविलें जन मन जालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥

पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ध्रु.॥

घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥२॥

तुका म्हणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥३॥

५००

नाच गाणें माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥१॥

तुम्हां निद्रा मज आज्ञा ते स्वभावें । उतरूनि जीवें जाईन लोण ॥ध्रु.॥

एकाएकीं बहु करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीनें ॥२॥

तुका म्हणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एका वेळा ॥३॥


५०१

सिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥

अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥

बहुतांनीं विनविलें बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥२॥

तुका म्हणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥३॥

५०२

उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥१॥

वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी ॥ध्रु.॥

केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥२॥

लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥३॥

५०३

पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥१॥

आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥

तुम्हांसि जागवूं आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्में दोष वाराया पीडा ॥२॥

तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । आम्हां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥३॥

५०४

शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥

भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥

संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥२॥

रंगलीं इंद्रियें सुरंग तांबूल । माथां तुळसीदळ समर्पिलें ॥३॥

एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥४॥

न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥५॥

५०५

उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥१॥

निउल जालें सेवका स्वामींचें । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ध्रु.॥

पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥२॥

अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥३॥

दसरा - अभंग १

५०६

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।

गर्जा जेजेकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥१॥

या हो या हो बाइयानो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं ।

ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आम्हां दैव आलें येथें घरिच्या घरीं ॥ध्रु.॥

अक्षय मुहूर्त औठामध्यें साधे तें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत जातें ।

म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी सांगातें ॥२॥

बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका गै करूं आइकाल ज्या कानीं ।

मग हें सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होईल काहाणी ॥३॥

ऐसियास वंचती त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार ।

मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळलें असों द्या मग पडतील विचार ॥४॥

जयासाटीं ब्रम्हादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणें देव जळीं जाले मासे ।

अद्धापगीं विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासें ॥५॥

५०७

ओवाळूं आरती पंढरीराया । सर्वभावें शरण आलों तुझिया पायां ॥१॥

सर्व व्यापून कैसें रूप आकळ । तो हा गौळ्या घरीं जाला कृष्ण बाळ ॥ध्रु.॥

स्वरूप गुणातीत जाला अवतारधारी । तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥२॥

भक्तिचिया काजा कैसा रूपासि आला । ब्रिदाचा तोडर चरणीं मिरविला ॥३॥

आरतें आरती ओवाळिली । वाखाणितां कीर्ति वाचा परतली ॥४॥

भावभक्तिबळें होसी कृपाळु देवा । तुका म्हणे पांडुरंगा तुझ्या न कळती मावा ॥५॥

५०८

करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥१॥

आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥ध्रु.॥

पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥

तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥

५०९

द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥१॥

आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ध्रु.॥

मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥२॥

तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाची जतन मग कैची ॥३॥

५१०

तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥

विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥

चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥

तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥३॥

५११

पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥१॥

शेष घेउनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥

जालों एकसवा । तुम्हां आडुनियां देवा ॥२॥

तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निश्चित ॥३॥

५१२

केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आम्हां पोटाची चिंता ॥१॥

बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवूं द्या वारा उब जाली शरीरा ॥ध्रु.॥

उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥२॥

तुझिये संगतीं येऊं करूं कोल्हाळ । तुका म्हणे बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥३॥

५१३

कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥१॥

पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ध्रु.॥

शेवटीचें दान । भागा आला नारायण ॥२॥

तुका म्हणे पोट । भरलें वारले बोभाट ॥३॥

५१४

आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुचि आई ॥१॥

देई गे विठाबाई प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ध्रु.॥

असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहे कृपादृष्टी आतां पंढरीराया ॥२॥

तुका म्हणे आम्ही तुझीं वेडीं वांकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥३॥

५१५

आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥

आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥

देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥२॥

राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥३॥

५१६

कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥

कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीची ॥ध्रु.॥

कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥

तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥

५१७

कृपा करावी भगवंतें । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥१॥

माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ध्रु.॥

व्हावा ब्रम्हज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥२॥

तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥३॥

५१८

जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥

गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवसा ॥ध्रु.॥

नका काढूं माझीं पेवें । तुम्हीं वरळा भूस खावें ॥२॥

भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥

सांगा जेवाया ब्राम्हण । तरी कापा माझी मान ॥४॥

वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥५॥

तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥६॥

नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥७॥

तुका म्हणे नीट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥८॥

५१९

कास घालोनी बळकट । झालों कळिकाळासी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥

या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥

कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥२॥

एकंदर शिका । पाठविला इहलोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥

५२०

आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताव्या ॥१॥

झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥

अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ॥२॥

पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जेजेकार आनंदें ॥३॥

५२१

बळियाचे अंकित । आम्ही जालों बळिवंत ॥१॥

लाता हाणोनि संसारा । केला षडूर्मीचा मारा ॥ध्रु.॥

जन धन तन । केलें तृणाही समान ॥२॥

तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥

५२२

मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥१॥

विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥

सोनें रूपें आम्हां मृत्तिके समान । माणिकें पाषाण खडे तैसे ॥२॥

तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हांपुढें ॥३॥

५२३

स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥

नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥

दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥

तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥

५२४

पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥

जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ॥ध्रु.॥

न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥२॥

तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥३॥

५२५

भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥

पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥२॥

तुका म्हणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देई ॥३॥

५२६

तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥

लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥२॥

काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हें चि ध्यान ॥३॥

५२७

पढियंतें आम्ही तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥१॥

पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥

जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आम्हां ॥२॥

दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥३॥

सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे देसी मागेन तें ॥४॥

म्हणउनि पुढें मांडियेली आळी । थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥५॥

५२८

कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥

पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥

न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥२॥

काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥३॥

काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥४॥

तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥५॥

५२९

कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥१॥

कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥

येणें काळें बुंथी घेतलीसे खोल । कां नये विटाळ होऊं माझा ॥२॥

लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥

५३०

उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥

देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥

आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन कायवेंचे॥२॥

तुका म्हणे तुम्हां साजे हें श्रीहरी । आम्ही निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥३॥

५३१

आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥१॥

पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥

ॠद्धिसिद्धि तुझें मुख्य भांडवल । हें तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥२॥

तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निश्चिंत सुख भोगू ॥३॥

५३२

न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥

लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु.॥

जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं तें ॥२॥

तुका म्हणे नको रागेजों विठ्ठला । उठीं देई मला भेटी आतां ॥३॥

५३३

कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥

तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥

माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥

तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥

५३४

काय सांगों तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥

बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥

आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥२॥

तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥३॥

५३५

देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥

तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥

मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥२॥

तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुश हें बापुडें सकळी काळ ॥३॥

५३६

आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करी वांयां ॥१॥

सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु.॥

तुका म्हणे वाचा वाईली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥३॥

५३७

बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥१॥

भोगीं त्याग जाला संगीं च असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥

तुका म्हणे नव्हें दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥३॥

५३८

अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥

जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥

तुका म्हणे रोग वैदाचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥३॥

५३९

संवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥

शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥

तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥३॥

५४०

देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥१॥

तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥२॥

तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥

५४१

काळें खादला हा अवघा आकार । उत्पित्तसंहारघडमोडी ॥१॥

वीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥

तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥३॥

५४२

आणीक काळें न चले उपाय । धरावे या पाय विठोबाचे ॥१॥

अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥

अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥२॥

काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥३॥

तुका म्हणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥४॥

५४३

कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥

अगा नारायणा निष्ठाय निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥

कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति कुंटे चि ना ॥२॥

तुका म्हणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥३॥

५४४

दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥

पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥

आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥२॥

चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें पुरें करूं धावें ॥३॥

तुका म्हणे तुज भक्तीचें कारण । करावया पूर्ण अवतार ॥४॥

५४५

वणूप महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥

ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥

नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥२॥

मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥३॥

तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥४॥

५४६

नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥१॥

देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥

नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥२॥

तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥३॥

तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगींतूनि ॥४॥

५४७

न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥

ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हें चि सांगे ॥ध्रु.॥

विटंबो शरीर होत कां विपित्त । परि राहो चित्तीं नारायण ॥२॥

तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तें चि हित ॥३॥

५४८

पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥

शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥

क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळि सत्ता नाहीं हातीं ॥२॥

कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥३॥

तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥४॥

५४९

जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥१॥

सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥

आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं न पाहावें ॥२॥

चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होउनी निश्चित एकविध ॥३॥

चला पाय हात हें चि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबाच्या ॥४॥

तुका म्हणे तुम्हां भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥५॥

५५०

करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥

जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥

जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥२॥

तुका म्हणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥३॥

५५१

म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥१॥

ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥ध्रु.॥

पर्जन्याचे काळीं वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ॥२॥

हिर्याय ऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन न भेटे तों ॥३॥

५५२

अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥

त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥

प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥२॥

तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥३॥

५५३

पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥

अर्थ परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥

देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥२॥

तुका म्हणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखा चि ॥३॥

५५४

भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥

भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥

होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥

तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥

५५५

जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥१॥

नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥

कुड्याची संगती । सदा भोजन पंगती ॥२॥

तुका म्हणे ब्रम्ह । साधी विरहित कर्म ॥३॥

५५६

कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥

नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥

नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥२॥

नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥३॥

तुका म्हणे नांवरूप नाहीं आम्हां । वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ॥४॥

लोहगावांस परचक्रवेढा पडला - अभंग ३

५५७

न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥१॥

काय तुम्ही येथें नसालसें जालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥

परचक्र कोठें हरिदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥

तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें जालें ॥३॥

५५८

काय म्यां मानावें हरिकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥

उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥

पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥२॥

तुका म्हणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥३॥

५५९

भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥१॥

आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥

भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥२॥

तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥३॥

॥३॥

५६०

फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥१॥

पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळालें ॥२॥

तुका म्हणे तैशा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥३॥

५६१

कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥

आतां माझा श्रोता वक्ता तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च मां ॥ध्रु.॥

कुशळ चतुर येथें न सरते । करितील रिते तर्क मतें ॥२॥

तुका म्हणे जालें पेणें एके घरीं । मज आणि हरी तुम्हां गांठी ॥३॥

५६२

आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥

न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥

वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥२॥

तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥३॥

५६३

दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥

विष्णुदास आम्ही न भ्यो कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥

उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥२॥

तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि ॥३॥

५६४

नटनाट्ये अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥

मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥

स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥

तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥

५६५

तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥

तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥

नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि घडी चांडाळ हे ॥२॥

कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥३॥

तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥४॥

स्वामींचे स्त्रीनें स्वामींस कठिण उत्तरें केलीं - अभंग ७

५६६

मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥१॥

चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥ध्रु.॥

कोणाची बाईल होऊनियां वोढूं । संवसारीं काढूं आपदा किती ॥२॥

काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥३॥

कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥४॥

तुका म्हणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंथे माथां ॥५॥

५६७

काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥१॥

किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरीं ॥ध्रु.॥

झवे आपुली आई काय माझें केलें । धड या विठ्ठलें संसाराचें ॥२॥

तुका म्हणे येती बाईले असडे । फुंदोनियां रडे हांसे कांहीं ॥३॥

५६८

गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥१॥

भरी लोकांची पांटोरी । मेला चोरटा खाणोरी ॥ध्रु.॥

खवळली पिसी । हाता झोंबे जैसी लांसी ॥२॥

तुका म्हणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥३॥

५६९

आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ॥१॥

डोचकें तिंबी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ध्रु.॥

आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥२॥

हातीं टाळ तोंड वासी । गाय देउळीं । देवापासीं ॥३॥

आतां आम्ही करूं काय । न वसे घरीं राणा जाय ॥४॥

तुका म्हणे आतां धीरी । आझुनि नाहीं जालें तरी ॥५॥

५७०

बरें जालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥१॥

आतां खाईन पोटभरी । ओल्या कोरड्या भाकरी ॥ध्रु.॥

किती तरी तोंड । याशीं वाजवूं मी रांड ॥२॥

तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥३॥

५७१

न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥१॥

उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ध्रु.॥

जिवंत चि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥२॥

संसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥३॥

तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥४॥

तुका म्हणे बरें जालें । घे गे बाइले लीहिलें ॥५॥

५७२

कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥

देवासाटीं जालें ब्रम्हांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥

मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाटीं ॥२॥

तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसें श्वान पाठीं लागे ॥३॥

॥७॥

५७३

भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥

करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥

काय करिल तया साकरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥२॥

तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥

५७४

इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥१॥

नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥

मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ॥२॥

तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्य ची ॥३॥

५७५

साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥

परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥

देवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥२॥

तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥३॥

५७६

आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥

मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥

कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥२॥

सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥३॥

आम्हां घाली पाठीकडे । पुढें कळिकाळाशीं भिडे ॥४॥

तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरीं नांवेमधीं ॥५॥

५७७

रवि रश्मीकळा । नये काढितां निराळा ॥१॥

तैसा आम्हां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥

गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥२॥

तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥३॥

५७८

थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥१॥

घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥

चित्त ठेवीं ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥२॥

आपलें तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥३॥

५७९

अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥१॥

म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥

ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥

तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥

५८०

शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥१॥

म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥

खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥

म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥३॥

५८१

गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥

आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥

उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥

हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥

५८२

परमेष्ठिपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥१॥

हें चि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥

इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥२॥

सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥३॥

पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥४॥

योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥५॥

मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥६॥

तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥७॥

५८३

मोहोर्या च्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥१॥

नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥

स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥२॥

तुका म्हणे खोडी । देवमणी न देती दडी ॥३॥

५८४

मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥

बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥

येथें न सरे चार । हीण आणीक वेव्हार ॥२॥

तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥३॥

५८५

भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥

धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥

बहुत बराडी । देवजवळी आवडी ॥२॥

तुका म्हणे हें रोकडें । लाभ अधिकारी चोखडे ॥३॥

५८६

गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥१॥

कठिण योगाहुनि क्षम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥

पावलें मरे सिवेपाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥२॥

तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥३॥

५८७

न संडी अवगुण । वर्में मानीतसे सिण ॥१॥

भोग देतां करिती काई । फुटतां यमदंडें डोई ॥ध्रु.॥

पापपुण्यझाडा । देतां तेथें मोटी पीडा ॥२॥

तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥

५८८

पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥१॥

अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥

आइता च पाक । संयोगाचा सकळिक ॥२॥

तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥३॥

५८९

दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥१॥

झाडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥

सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥२॥

तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥३॥

५९०

वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥

जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥

काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥२॥

तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥३॥

५९१

झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥१॥

तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥

परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥२॥

गार्हातण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥३॥

५९२

वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥

संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥.

संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥२॥

तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥३॥

५९३

येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥

घरीं देवाचे अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥.

नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥

तुका म्हणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥३॥

५९४.

करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥

देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥.

शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥

तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥

५९५.

ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥

करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥.

असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥२॥

वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥

५९६.

देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥

ते चि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ध्रु.॥.

वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥२॥

तुका म्हणे भुक । येणें न लगे आणीक ॥३॥

५९७.

नाम साराचें ही सार । शरणागत यमकिंकर ॥१॥

उतमातम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥.

नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ॥२॥

तुका म्हणे वणूप काय । तारक विठोबाचे पाय ॥३॥

५९८.

गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥

परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥.

मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥५॥

तुका म्हणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥३॥

५९९.

द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥

माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥.

कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥२॥

भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥३॥

तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥

६००.

मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धनअभिमान ॥१॥

ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥.

पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥२॥

विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.