युगान्त/कुंती

विकिस्रोत कडून
(तीन - कुंती पासून पुनर्निर्देशित)




तीन



कुंती




१ -
 माणसाच्या आयुष्यात स्वतःच्या हातून घडलेल्या गोष्टी कमी असतात. पुष्कळदा विचार केला, तर वाऱ्याने इतस्ततः भरकटणाऱ्या पानाप्रमाणे आयुष्य वाटते. काही वेळेला आयुष्य सर्वस्वी दुसऱ्याच्या हातात होते, असे वाटते. महाभारतातल्या बायकांचे आयुष्य पराधीन होते. त्यांची सुख-दुःखे ज्यांच्यावर त्या अवलंबून, त्या पुरुषांच्या हाती. कर्ते-करविते पुरुष. त्यांनी करावे. बायकांनी भोगावे. गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, सगळ्यांची एकच तऱ्हा. पण त्या बायकांनी आयुष्यातल्या काही वेळा तरी वैभव व स्वास्थ ह्यांचा उपभोग घेतला. आंधळ्याशी लग्न झाले, तरी गांधारीला हस्तिनापुरात राजवैभवात राहता आले. नवऱ्याला राज्याभिषेक झाला नसला, तरी ती राणीसारखी राहिली. दुर्योधन राज्य करीत असताना राजमाता म्हणून मिरवली. द्रौपदीने दु:खे भोगली, पण तितकेच मोठे वैभवही भोगले, सुभद्रा कधी पट्टराणी झाली नाही; पण तिचे एकंदर आयुष्य स्वस्थपणे गेले. मुलगा मेला, तरी नातू गादीवर बसला, आणि शेवटी आपल्या व भावाच्या वंशाला तिने राज्यावर बसलेले पाहिले व संभाळले. कुंतीच्या बाबतीत मात्र सुख जवाएवढे तरी होते किंवा नाही, कोण जाणे! दुःखाचे पर्वत मात्र ती जन्मभर उरावर बाळगून होती. जेवढ्या पुरुषांशी तिचा संबंध आला, त्या सर्वांनी आपापल्या परींनी तिला दु:ख दिलेच.

 एके ठिकाणी ती वासुदेवाला म्हणते, "मी तुला कडेवर घेऊन चेंडू खेळत होते, एवढ्या लहानपणी चोरा-पोरी द्रव्य देऊन टाकावे, तसे माझ्या बापाने मला कुंतिभोजाला देऊन टाकले." उद्योगपर्वातला हा उतारा मागून घुसडलेला असण्याचा संभव आहे, कारण ती कृष्णाला कडेवर घेतले असे म्हणते, ते इतर पुराव्यांशी जुळत नाही. ती एक दुःखी, विचारी बाई होती, असे वाचताना वाटते. ती रडली-कढली, पण ती आपल्याला हीन-दीन समजत नव्हती. तिच्या दृष्टीने क्षत्रिय स्त्रीने जे मिळवायचे, ते तिने मिळवले होते. सुखी आरामशीर आयुष्याची क्षत्रिय स्त्रियांची अपेक्षाच नव्हती. असे तिच्या उद्गारांवरून वाटते व मनात विचार येतो... तिची कीव करणारी मी कोण? तिने उघड्या डोळ्यांनी, ताठ मानेने व बऱ्याचशा कृतकृत्यतेने आयुष्य घालवले. माझ्या सुखाच्या कल्पनेने मी तिचे सुख-दु:ख का जोखावे?

 कुंतीचा बाप शूरसेन हा राजा होता. कुंतिभोज हा त्याच्याच कुळातला दुसरा राजा होता. कुंतीबद्दलची सुरवातच पुढील श्लोकांनी झाली आहे.

पैतृष्वसेयाय स तामनपत्याय वीर्यवान् ।

अग्र्यमग्ने प्रतिज्ञाय स्वस्यापत्यस्य वीर्यवान् ।।

अग्रजातेति तां कन्यामग्र्यानुग्रहकाङ्क्षिणे ।

प्रददौ कुन्तिभोजाय सखा सख्ये महात्मने ।।

(१.१०४.२-३)

 (श्लोकाचा अन्वय : सः वीर्यवान् सखा स्वस्य अपत्यस्य अग्रे अग्य्रंं प्रतिज्ञाय, अग्रजाता इति तां कन्याम् अग्र्यानुग्रहकाङ्क्षिणे पैतृष्वसेयाय अनपत्याय महात्मने सख्ये कुन्तिभोजाय प्रददौ।
 येथे पहिल्या ओळीतील ‘ताम्' व दुसऱ्या ओळीतील ‘वीर्यवान्' ही पदे पादपूरणार्थ मानावी.

 अर्थ :- त्या शूर सुहृदाने (शूरसेनाने) आपल्या अपत्याच्या (जन्माच्या) अगोदरच पहिले (अपत्य देण्याचे) वचन देऊन, प्रथम जन्मलेली म्हणून ती मुलगी ब्राह्मणांचा अनुग्रह इच्छिणारा अपत्यहीन असा (आपला) आतेभाऊ जो थोर सखा कुंतिभोज त्याला देऊन टाकली.)

 कुंतीच्या जन्माआधीच तिचे भविष्य ठरून गेले होते. तिच्या आधी जर मुलगा झाला असता, तरच ते चुकले असते. माझे मूल तुला देईन, अशी शपथ घेतलेली. पहिला मुलगा असता तर शूरसेनाने तो खासच दिला नसता, कारण तो राज्याचा वारस झाला असता. पहिली मुलगीच झाली (कन्याम्), तेव्हा ती द्यायला काहीच प्रत्यवाय नव्हता. म्हणून ब्राह्मणांच्या अनुग्रहासाठी धडपडणाऱ्या कुंतिभोजाला- आपल्या आतेभावाला- ती दिली. मुलींचे जे नाना उपयोग, त्यांतीलच हा एक. लग्नाने तर ती परघरी जाईच, पण त्याच्या आधीही तिला एखाद्या मित्राला देणे, ब्राह्मणांच्या सेवेसाठी देणे ह्यात विशेष काहीच नव्हते. पुढेपुढे पुराणात दशरथाने आपल्या मुलीला अशीच आपला मित्र रोमपाद याला दिली, असे वर्णन आहे. ह्या प्रसंगालाच उद्देशून कुंती पुढे (उद्योगपर्वात) म्हणते की, 'द्रव्य चोरा-पोरी द्यावे, तशी माझ्या बापाने मला दिली.'

 कुंतीचे नाव 'पृथा'. बहुतेक आडव्या अंगाची, म्हणून हे नाव असावे. कुंती-देशच्या भोजाची मुलगी म्हणून ‘कुंती' नाव पडले. भोजाने तिला घेतली, ती खाष्ट ऋषीची सेवा करण्यासाठी. तो ऋषी दुर्वास. पुराणे सांगतात की, तो अगदीच वाईट, अपुरे वस्त्र नेसत असे... कदाचित त्याच्या अंगाला घाणही येत असेल. ह्याखेरीज तो भयंकर कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध होता. ह्या सुवासा (ऋग्वेदः १०.७१.४) क्षत्रियकन्येने वर्षभर त्याची सेवा(?) केली. एकदाही त्याला राग येऊ दिला नाही. त्याने जाताना प्रसन्न होऊन पुत्रप्राप्त्यर्थ तिला मंत्र दिले. महाभारतात ह्या मंत्रांना व त्याच्या अनुष्ठानाला 'अभिचार' (अभिचाराभिसंयुक्तम्) असे विशेषण आहे. वेदामध्ये अभिचारमंत्र कुणाचा नाश करायचा असल्यास, कुणाचा पाडाव करायचा असल्यास किंवा वशीकरण करायचे असल्यास उपयोजले आहेत. ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा, त्या व्यक्तीला काही क्रिया करणे भाग पडेल, असे करण्याची शक्ती अभिचारमंत्रात आहे, अशी कल्पना होती. ह्या मंत्रांनी आवाहन केले, की कोणतेही देव कुंतीला वश होतील, असे हे मंत्र होते. पोरबुद्धीने कुंतीने सूर्याला बोलाविले. त्याने तिच्याशी संग केला व तिला ताबडतोब एक सुंदर मुलगा झाला. कुवारपणी मुलगा झाला, ह्या लाजेने कुंतीने त्याला जन्मतःच टाकून दिले. हाच मुलगा पुढे 'कर्ण' म्हणून प्रख्यात झाला.
 महाभारतात अद्भुत गोष्टी पुष्कळ आहेत. काहींची मानवी पातळीवर संगती लावता येते, काहींची लावता येत नाही. कुंतीला सूर्यापासून मुलगा झाला व त्याला जन्मतःच कवच व कुंडले होती, ही महाभारतातल्या अद्भुत गोष्टींपैकी एक आहे. हिची काही संगती लावता येईल का? कुंतीने ऋषीची सेवा केली. 'सेवा' म्हणजे काय? ह्या सेवेचेच दृश्य फल कर्ण होता का? तसे असेल, तर त्याचा सूर्याशी संबंध का लावला? त्याचप्रमाणे सहज (जन्मतःच शरीरावर असलेली) कवच-कुंडले म्हणजे काय? कुंतीने मुलाला टाकले, तेव्हा त्याच्याबरोबर द्रव्य ठेवले. तशीच कवच आणि कुंडले ठेवली की काय? कवच आणि कुंडले ही उच्च वर्णाची, विशेषतः क्षत्रियत्वाची निदर्शक होती का? टाकलेले मूल क्षत्रिय आहे, हे दाखवण्यासाठी कुंतीने कवच-कुंडले मुलाजवळ ठेवली का? असे कितीतरी प्रश्न मनात येतात. मुलगा सूत अधिरथाला सापडला. द्रव्याबरोबर सापडला म्हणून अधिरथाने त्याचे नाव 'वसुषेण' असे ठेवले. नावही 'सेन'... पदांतक म्हणून क्षत्रिय वळणाचे. त्यावरूनही वाटते की, कवच-कुंडले पाहून असे ठेवले असावे. एवढे खरे की, कर्णजन्म व कवच-कुंडले ह्यांची काही नैसर्गिक उपपत्ती लागत नाही. दुर्वास-ऋषींचा सूर्याशी काही संबंध पोहोचता, तरी अशी उपपत्ती लागली असती. पण महाभारतात तसे कुठे दिसत नाही. कुवारपणात झालेला हा मुलगा म्हणजे कुंतीने जन्मभर पोटात बाळगलेले एक दुःखच होते. एकदा टाकून दिल्यावर तिला तो जवळ करता येईना. मोठेपणी सर्व जन्मरहस्य सांगूनही तो आईचे हे कृत्य विसरू शकला नाही. आईला क्षमाही करू शकला नाही. ह्या मुलाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कुंती त्याला जन्माला घालण्याच्या पापाची व त्याला टाकून देण्याच्या अन्यायाची भरपाई क्षणाक्षणाला करीत होती.

 एका बापाने दत्तक दिली, त्यातून हे दुःख निर्माण झाले. दुसऱ्या बापाने लग्न लावले ते एका व्यंग असलेल्याशी. त्यातून उत्पन्न झालेली दुःखे, पहिल्या दुःखाच्या जोडीला जन्मभर तिच्या सोबतीला राहिली.

 पांडूला राज्याभिषेक झाला. म्हणजे कुंती हस्तिनापूरची महाराणी झाली होती. पण सबंध महाभारतात ह्या राणीपणाचा उल्लेख फक्त तिच्याच तोंडून अगदी शेवटी आला आहे. पांडू राजा झाला, त्याने दिग्विजय केला, आणलेला करभार, रत्ने, नाणे, सर्व धृतराष्ट्राच्या स्वाधीन केले व तो हिमालयात गेला. त्याच्याबरोबर कुंती-माद्रीही गेल्या. हिमालयात त्या वैभवात राहिल्या असतीलही. पण हस्तिनापूरचे राणीपद कोठे व अरण्यवास कोठे? कुरूंना शिकारीचा षोक होता. ते रानात जात असत. बायका राजधानीतच राहात. त्यामुळेच तर शकुंतला-दुष्यंताला व सत्यवती-शंतनूला अडकवू शकल्या. पांडू तरुण वयात का गेला? आपण जिवंत असताना आपल्या राण्यांना दुसऱ्याकडून मुले उत्पादन करण्याचा प्रकार त्याला राजधानीत व्हावयास नको होता म्हणून? रानात सगळीच मुले 'देवदत्त' झाली. कदाचित राजधानीत ते साधले नसते. पांडूला रानात गेल्यावर शाप मिळाला. असे महाभारत म्हणते. क्षणभर ते खरे धरून चालले. तरी पांडू इतक्या तरुण वयात दोन्ही बायकांना घेऊन दिग्विजय झाल्याबरोबर रानात का गेला, हे कोडे राहतेच. पुत्रोत्पत्तीही ताबडतोब झाली असली पाहिजे. कारण आपल्यापासून संतती होणे शक्य नाही, हे माहीत झाल्यावर पांडूने कुंतीला नियोगाने पुत्र उत्पन्न करण्यास सांगितले. आपल्याला कुवारपणीच एक मुलगा झालेला आहे, ही गोष्ट या वेळी कुंतीला सांगता आली असती. त्या वेळच्या रूढीप्रमाणे (बीजक्षेत्र-न्यायाने) तो मुलगा आपलाच, असे पांडूला अगदी कायदेशीररीत्या म्हणता आले असते. पण आपल्याला कुवारपणी झालेल्या मुलाचे पुढे काय झाले, तो जिवंत तरी आहे की नाही, हेही कुंतीला माहीत नव्हते. अशा परिस्थितीत कुवारपणची कथा तिने पांडूला सांगितली नाही, यात काहीच नवल नाही.
 धृतराष्ट्राचे लग्न झालेले होते व त्याच्या आधी मुलगा होण्याची आवश्यकता पांडूला वाटली असली पाहिजे. सर्व हुकणारच होते; पण गांधारीला आधी गर्भ राहूनही तिचा मुलगा कुंतीच्या मुलामागून जन्मला, असे महाभारत सांगते.
 कुंतीला एकामागून एक तीन मुले झाली. माद्री राजाला म्हणाली, "लोक मला वांझ म्हणतील. माझ्यात काहीही दोष नाही. तुम्ही थोरलीला विचारून मलाही एक मंत्र देववता का?"
 राजाने कुंतीची याचना केली व कुंतीने एक मंत्र दिला. माद्रीने अश्विनांना पाचारण केले व तिला जुळी मुले झाली. मुले जरा मोठी झाल्यावर माद्रीने राजाला परत पुत्रप्राप्तीबद्दल विनंती केली. राजाने परत कुंतीजवळ याचना केली. कुंती रागाने जळत होती. "मी वेडी, मला कळले नाही की जुळे होईल म्हणून. आणखी एकदा तिला मंत्र दिला, तर ती काय करील कोण जाणे! तिचाच वरचष्मा व्हायचा सर्व प्रकारे. आता कुणालाच मुले नकोत. तिलाही नकोत व मलाही नकोत."
 माद्रीने पहिल्या झटक्यात दोन मिळवली नसती, तर कदाचित आणखीही पांडव जन्माला आले असते !
 बिचारी माद्री! सुरेख होती, तरुण होती. पण भीष्माने तिला पांडूची धाकटी पत्नी म्हणून विकत घेतली. राणीपद दूरच राहिले, पण थोरलीच्या मत्सराच्या ज्वाळेत ती जळत होती. एक दिवस न राहवून तिला एकांतात गाठून, ती ‘नको, नको,' म्हणत असता पांडूने तिच्याशी संग केला व तो ताबडतोब मेला! माद्रीचे रडणे ऐकताच कुंती आली. 'एकटीच ये, मुलांना आणू नकोस', हे शब्द ऐकून मुलांना लांब राहण्यास सांगून, ‘माझा घात झाला!' असे ओरडतच कुंती धावत आली. राजा व त्याच्या शेजारी माद्री पाहून तिचा मत्सर उफाळला. "मी त्याला इतके दिवस संभाळले, पण तू कसे ग जाणून-बुजून असे केलेस? त्याचे रक्षण करायचे सोडून तू एकांत साधून त्याला भुलवलेस. धन्य आहेस बाल्हीकी! माझ्यापेक्षा कितीतरी पटीने धन्य आहेस! संभोगाचा आनंद ज्या तोंडावर ओसंडून जात आहे. असे नवऱ्याचे तोंड तुला दिसले!" माद्री काय उत्तर देणार? "मी नको नको, म्हणत होते," हे ती कसेबसे बोलली. कुंतीने आणखी विष ओकले. "मी थोरली बायको आहे. मला जो मार्ग अनुसरायचा त्यापासून परावृत्त करू नकोस. ही चालले मी नवऱ्यामागून. ऊठ, त्याला सोड. ह्या मुलांचे रक्षण कर."
 ह्या एका क्षणात अल्लड माद्री मोठी झाली. एका क्षणात पुढले सबंध आयुष्य तिला दिसले का? आतापर्यंतचे विफल आयुष्य आणखीच हीनदीन होणार, याची तिला जाणीव झाली. सुटकेचा शेवटचा एकमेव मार्ग तिने पत्करला. माद्रीने उत्तर केले, "मीच नवऱ्यापाठीमागे जाते. माझ्यासाठीच त्याने जीव टाकला. माझेही मनोरथ पूर्ण झाले नाही. मोठी म्हणून अनुमती दे. तुझ्या मुलांशी मला समभाव ठेवता येणार नाही. तेही पाप माझ्या हातून व्हायला नको. कुंती, तूच माझ्या मुलांना पोटच्या पोरांप्रमाणे संभाळ. मी जाते.”
 माद्रीने राजाच्या चितेवर स्वतःला जाळून घेतले व कुंती मुलांना व अर्धवट जळलेल्या दोन प्रेतांना घेऊन ऋषींबरोबर हस्तिनापूरला गेली.
 कोणाची कीव करायची? कोणाचा तिरस्कार करायचा? सवती-सवती असणे हे त्या वेळच्या बहुसंख्य स्त्रियांचे नशीब. त्या सवतीपणातच वडीलपणा मिळवण्याची केविलवाणी धडपड! कौसल्या आणि कैकेयी, द्रौपदी व सुभद्रा, आणि नंतर एका सहस्त्रकामागून कालिदासाने रंगवलेली चित्रे... धारिणी, इरावती, मालविका. त्यामागून कित्येक शतकांनी शिवाजी महाराजांच्या राण्यांतील व त्यांच्या संततीमधील स्पर्धा! समाजातील स्थान नवरा व मुलगा ह्यांवर अवलंबून. म्हणून नवऱ्याची पहिली बायको व्हायचे, नाही तर आवडती बायको व्हायचे; मुलाला संपत्तीचा... राज्याचा... वाटा मिळवून द्यायचा, ही सारी धडपड. हे स्त्रियांचे नशीब. 'आपण एकमेकींना धीर देऊ या,' ही भावना कुठेच दिसत नाही.' ‘माझ्याकडे कशाला येतोस? ती सात्वतांची लेक आणली आहेस ना, तिच्याकडे जा,' असे रागाने अर्जुनाला बोलून सुभद्रा पाया पडायला आली, तेव्हा तिला उठवून "बाई, तुझा नवरा नेहमी विजयी होवो," असे म्हणून तिला भेटणारी द्रौपदी सवतीविषयी उदार नव्हती... नवऱ्याच्या मोठेपणाला जपणारी होती. हा नवा संबंध फार फलदायी आहे, हे तिला माहीत होते, म्हणून तिने हा उदारपणा स्वीकारला.
 कुंती फार कठीण होती. माद्रीविषयी तिला प्रेम वाटणे शक्यच नव्हते. पण तिने तिला संतान होण्यास मदत केली. ह्यावरून दिसते की, तिच्याजवळ न्यायबुद्धी होती. माद्रीला इतके कठीण बोलायला काही कारणही झाले होते. पांडू जिवंत राहता, तर आज-ना-उद्या हस्तिनापूरला जाऊन राज्य ताब्यात घेता आले असते, व मग तिचा थोरला मुलगा आपोआपच राज्याचा वारस झाला असता. कुंती राजाला सारा वेळ जपत होती, असे दिसते. ‘तुला सर्व माहीत असून एकांतात राजाला भेटलीसच का?' असा तिच्या ठपक्याचा अर्थ होता. अर्थात ह्या सर्व प्रकरणात राजाला बिचारा (दीन) म्हणायचे व माद्रीला दोष लावायचा, हे न्यायबुद्धीला धरून नव्हते. कुंतीचा तोल गेला होता.
 माद्रीला मरणाशिवाय वाटच नव्हती. तिच्या स्वत:च्या दृष्टीने नव्हती, पुढच्या कथेच्याही दृष्टीने नव्हती. हस्तिनापुरात सत्यवती, अंबालिका अशा आजेसासू व सासू विधवा होत्या. त्यात ही आणखी पुरुषांचा सहवास बाजूलाच. ते कधी तिला दिसलेही नसते. त्या मानाने हिमालयातील आयुष्य बरे होते. स्वतःला जाळून घेण्याखेरीज तिला मार्ग नव्हता. आपल्याकडे कमीपणा घेऊन, कुंतीला मोठेपणा देऊन, अंबेसारखा तळतळाट न करता सुकुमार माद्री मृत्यूच्या स्वाधीन झाली.
 कुंतीचे खडतर आयुष्य पुढे सुरू झाले. हस्तिनापुरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून नागरिक चर्चा करीत होते की, "ही मुले त्याचीच आहेत का? त्याची कुठली असायला? हो, त्याचीच बरे." ही चर्चा ऐकुन कुंतीला काय वाटले असेल? बरोबर ब्राह्मण व ऋषी होते. पांडू-माद्रीची प्रेते होती. भीष्माने सर्वांचा मान केला. राजाच्या वैभवानिशी पांडूचे व माद्रीचे अंत्यसंस्कार केले. "हस्तिनापूरच्या राजकुलात व सबंध नगरभर सुतक पाळले गेले. ह्यामुळे पांडूच्या मुलांच्या राजपुत्रत्वाला मान्यता मिळाली व चुलत-भावंडांबरोबर शिक्षणास आरंभ झाला. कुंतीने सुटकेचा नि:श्वास टाकला असणार.
 पण तो नि:श्वास ती टाकते, तो नवी संकटे उभी राहिली. पांडव राजपुत्र गणले गेले, तरी राज्याचे एकमेव वारस म्हणून त्यांचा उल्लेख झाला नाही. राज्याभिषेक न होताच धृतराष्ट्र राजा होऊन बसला. कुंतीची काही वर्षे- मुले जाणती होईपर्यंतची-सुखात नाही तरी बरी गेली असतील. पण तेव्हाही मुलांची जपणूक असणारच. मुले विद्या शिकायला लागली, तेव्हापासून कुरबुरीला सुरुवात झाली. कुंतीचा भीम दांडगेश्वर होता. तो आपल्या चुलतभावांच्या खोड्या काढी. ती झाडावर चढली, की झाड गदगदा हलवून त्यांना खाली पाडी. मारामारी तर होतच होती. त्यातच शस्त्रविद्या व अस्त्रविद्या-दोहोंतही पांडव आपल्या चुलत-भावांपेक्षा वरचढ ठरले. भीमाखेरीज इतरांचा, विशेषतः थोरल्याचा वागणूक, शहाणपणा ह्यांबद्दलचा लौकिक वाढला. ह्यातही कुंतीचे शिक्षण असले पाहिजे. धृतराष्ट्राचे शंभर व पांडूचे पाच असे राजपुत्र होत. धर्म वडील होता; एवढेच नव्हे, तर शहाणा, देखणा, सुवृत्त, विद्यासंपन्नही झाला. तेव्हा तोच राजा होणार, अशी खात्री वाटल्यामुळे त्यांना राजधानीतून बाहेर घालवून, लोकांच्या दृष्टीआड करायचे दुर्योधनाचे व धृतराष्ट्राचे बेत सुरू झाले व युक्तीने त्यांना व कुंतीला वारणावताला पाठवून दिले. त्यांना लाक्षागृहात जिवंत जाळायचा दुर्योधनाचा बेत विदुराच्या शहाणपणामुळे टळला. ह्याही प्रसंगी कुंतीचे असामान्य धैर्य प्रत्ययास येते. रोज ब्राह्मणभोजन घालायचे, असा नियम करून तिने पुरोचनाला पुरे गाफील ठेवले. पांडवांनी स्वतःच घराला आग लावली व त्या घरात आपल्याऐवजी दुष्ट पुरोचनाची व त्याबरोबरच एका निरपराध निषादी बाईची व तिच्या पाच मुलांची आहुती दिली. परत या प्रसंगाने प्रश्न पडतो, कृत्य दुष्ट नव्हे का?' कारस्थानी भावांच्या हातून सहीसलामत सुटायचे, हा पांडवांचा हेतू. तो हेतू कुणाला तरी बळी दिल्याशिवाय साध्य होण्यासारखा नव्हता, हे या अध्यायात स्पष्ट केले आहे. उघड युद्धात मरण्याची तयार होती, पण कपटाने मारवून घेणे ही नामुष्की होती. त्यातूनही महाभारतात इतर ठिकाणी दिसून येणारा आपपरभाव येथेही दिसून येतो. जी बाई दारू पिऊन आपल्या मुलांबरोबर धुंद होऊन रात्रीची तेथे निजली होती, ती एक निषादी होती. सध्याच्या आवृत्तीत एक श्लोक आहे. त्यात म्हटले आहे “यदृच्छया मृत्यूने बोलावणे धाडल्याप्रमाणे आलेली कोणी एक निषादी त्या दिवशी तेथे आली व पिऊन धुंद होऊन तेथेच निजली." दोन निरनिराळ्या आवृत्त्यांत असलेले व प्रक्षिप्त ठरल्यामुळे गाळलेले श्लोक खाली दिले आहेत. एकात आहे, ‘ती निषादी दुष्ट होती व पुरोचनाच्या विश्वासातली होती!' दुसऱ्या श्लोकात आहे, 'ती दुष्ट (पापा) होती व कुंतीला वरवर मैत्री दाखवीत होती (सखिमानिनी).
 हस्तलिखितांच्या तपासणीमुळे व तुलनेमुळे (अर्थामुळे नव्हे,) प्रक्षिप्त ठरलेले हे श्लोक, जुने महाभारत व त्यात मागून घुसडलेले श्लोक ह्यांच्यातील फरक उत्तम दाखवतात. जणू ती निषादी दुष्ट होती, व मारण्यास योग्य होती, असा आभास मागाहूनचे श्लोक निर्माण करतात. मूळ श्लोक परिस्थितीला धरून आहे. अचानक ती आली... मृत्यूने बोलावल्याप्रमाणे आली व पांडवांना दुर्योधनाचा डाव पुरेपूर उलटवता आला. ही हकीकत स्वाभाविक वाटते. कदाचित त्या निषादीमुळे त्याच दिवशी पळून जाण्याचा बेत नक्की झाला असेल. पाच मुले व एक बाई अशी सहा कोळसे झालेली, ओळखू न येणारी शरीरे दुसऱ्या दिवशी नागरिकांना सापडली. त्याचबरोबर आणखी एकाचे म्हणजे पुरोचनाचे, त्यांच्या मारेकऱ्याचे शरीर सापडले. म्हणजे पांडव मेले असे सिद्ध झाले व त्यांना कोणाचा ससेमिरा पाठीमागे न लागता वर्षभर लपत-छपत राहता आले. निषादी मरणे ही कथानकाच्या सूत्रातील एक अवश्य बाब होती.
 घर आगीत जळण्यासारखे आहे हे कळूनही तेथे रहाच कशाला, हा मुद्दा भीमाने काढला होता. धर्माच्या उत्तरावरून कळते की, पांडवांनी जे केले, त्यावाचून दुसरे काहीही करणे त्यांना त्या परिस्थितीत शक्यच नव्हते. तो म्हणे, “जणू काही समजलेच नाही, अशा तऱ्हेनेच आपल्याला राहिले पाहिजे. आपल्याला काही शंका आहे असे पुरोचनाला कळले, तर तो दांडगाईने आपल्याला जाळील. आगीच्या भीतीने आपण दूर गेलो, तर दुर्योधन आपल्याला शस्त्रांनी मारवील. त्याला एक विशिष्ट स्थान प्राप्त झालेले आहे. आपणाला स्थानच नाही. त्याच्या बाजूला त्याला उचलून धरणारा पक्ष निर्माण झाला आहे. आपल्या बाजूचे कोणीच नाहीत. तो धनाढ्य आहे, आपण निद्रव्य. तो आपल्याला खात्रीने मारू शकेल. गुपचूप रहा. रोज मृगयेच्या निमित्ताने निसटून जायच्या वाटा माहीत करून घेऊ या. नक्षत्रांचा अभ्यास करून दिशा समजून घेऊ या व आता सुटकेसाठी बीळ खोदू या." पांडवांची दीन पराधीन स्थिती व कौरवांचा व धृतराष्ट्राचा दुष्टपणा येथे प्रत्ययास येतो.
 कुंती मुलांबरोबर राहिली. सावधपणे त्यांच्या कृतींना, मसलतींना सर्वस्वी हातभार लावीत राहिली. ज्या रात्री घर जाळले, त्या रात्री अंधारात झपाट्याने अंतर तोडताना बिचारीची त्रेधा झाली. नगर सोडून रानात पोहोचल्यावर वृक्षांच्या निबिडतेमुळे वर नक्षत्रेही पाहता येईनात. खाली झुडुपांमुळे चालताही येईना. तेव्हा भीमाने तिला खांद्यावर घेतले. शेवटी जवळपास जलचर पक्ष्यांचा आवाज ऐकून सर्वांना एका झाडाखाली बसून भीम पाणी आणायला गेला. तो परत येतो, तो ग्लानीमुळे सर्वांना झोप आली होती. भीम कुंतीबद्दल म्हणाला, “काय आश्चर्य आहे! मऊ बिछान्यावर पडून झोप न येणारी ही आज जमिनीवर गाढ झोपली आहे!" पण जमिनीवर झोपणे हे कुंतीचे दुःख नव्हतेच मुळी! स्वतःच्या स्थानाबद्दल, हक्काबद्दल अत्यंत जागरूक; क्षत्रियत्वाचा अती अभिमान असलेली अशी ती बाई होती. जीवन ही तिच्या मते लढाई होती. लढाईच्या वेळी ती विचलित होत नसे.
 पुढील प्रवासात हेच दिसून येते. हिडिंबेबरोबर भीमाने राहण्यास तिने मनःपूर्वक संमती दिली, व खडतर वनप्रवासात मैत्रीण जोडली. याच हिडिंबेचा मुलगा पुढे युद्धाच्या वेळी अतिशय आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडला. बकासुराचा वध करावयास तिने भीमाला गळ घातली. द्रौपदी पाचांची बायको करण्याचा निश्चयही तिचाच. पाचांचा न फुटणारा एकसंधपणा तिने सांधला. लग्नाआधी ते एका आईचे लौकिकाने होते, पण माद्रेयांना कुंतीपासून फोडण्याचा डाव दुर्योधनाने पुढे रचायच्या आधीच द्रौपदीमुळे पाचांनाही एकत्र बांधून त्या डावाचा पायाच कुंतीने नाहीसा केला.
 लग्नाने तिने पांडवांना जणू द्रौपदीच्या स्वाधीन केले, व ती बाजूला झाली. पण स्वस्थ बसून कौतुक पहायला अजूनही ती मोकळी झाली नव्हती. तिच्या थोरल्या मुलानेच तिच्यावर पराधीन जिणे लादले. या जिण्याची खंत तिला फार वाटली. द्युतात सर्वस्व हरून पांडव वनवासाला निघाल्यावर विदुराने सांगितले, "कुंती आता तुमच्याबरोबर येणे शक्य नाही. ती सुकुमार आहे; वृद्ध आहे. ती माझ्या घरी राहील." ह्या दुःखात तिला पांडूची व माद्रीची आठवण झाली. 'पांडू नशीबवान. त्याने मुले पाहिली, पण मुलांची ही अवस्था नाही पाहिली.' माद्रीच्या आठवणीत तिच्या स्वतःच्या आयुष्यातील वैफल्याची तीव्र जाणीव परत व्यक्त झाली. "धन्य माद्री! ती ज्ञानी होती. तिला सद्गती प्राप्त झाली 'रती, मती व गती' ह्या सगळ्यांतच तिने माझ्यावर ताण केली. धिक्कार असो माझ्या जीवितप्रियतेला. त्यामळेच आज मला हे क्लेश भोगावे लागत आहेत." (२.७.१८-२०)
 तेरा वर्षांच्या काळात तिला काय क्लेश झाले व तिने काय आशा उराशी बाळगल्या, हे उद्योगपर्वात प्रत्ययास येते. द्रौपदीने मुलांना माहेरी सोडून नवऱ्यासाठी एक प्रकारचा वनवास स्वीकारला होता. माहेरी न जाता विदुराकडे राहून आपल्या शत्रूचे वैभव रोज डोळ्यांनी पाहण्याचा वनवास कुंतीने पत्करला होता. कृष्ण जेव्हा शिष्टाईच्या वेळी तिला भेटण्यासाठी गेला तेव्हा ती ओक्साबोक्शी मोठ्याने रडली. लहापणापासून भोगलेल्या सगळ्या आपदांची पुन्हा उजळणी झाली. हस्तिनापुराहून जातेवेळी कृष्ण तिला परत भेटला, त्या वेळी कुंतीने मुलांसाठी निरोप सांगितला, त्यात कुंतीचे ह्या वेळचे शल्य, पुढली आशा आणि मनाचा कठीणपणा दिसून येतो. ह्या भाषणात एक वाक्य येते. दुसऱ्याही एक-दोन प्रसंगी जवळजवळ म्हणीवजा ह्या वाक्याचा वापर केलेला दिसतो. कुंती म्हणते, "लग्नामुळे मी एका डोहातून दुसऱ्या डोहात येऊन पडले." (हृदात् हृदमिव) तिच्या मताने एका चांगल्या ठिकाणाहून दुसऱ्या चांगल्या ठिकाणी पोहोचले. राजाची मुलगी होते, ती राजाची राणी झाले. "दुसऱ्यांनी माझ्या आश्रयास यावे, ती मी आज दुसऱ्यांच्या आश्रयास आलेली आहे." पांडूसारख्या दुर्बलाच्या पदरी बांधली, म्हणून आजच्या दृष्टीने तिची कीव येते. पण तिला तसे वाटले नाही. काही झाले, तरी तो राजा होता. तिला दुसऱ्यांकडून मुले धारण करण्याची मुभा होती. पांडू जिवंत राहून हस्तिनापुरास येता, तर ती थोरली राणी राहिली असती व भानगडी कटकटी न होता राजमाता झाली असती. अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत 'हृदात् हृदम्' अशी तिची परिस्थिती राहिली असती. पण तिच्या नवऱ्याने तिला पहिला दगा दिला व त्यातूनही धैर्याने बाहेर पडून राजमातेचे वैभव मिळते न मिळते, तो तिच्या मुलाने तिला दगा दिला. नवऱ्यापासून विषयसुख मिळाले नाही. एकदाच, शेवटचे का होईन माद्रीला ते मिळाले, म्हणून तिचा जळफळाट झाला. पण ती ते मिळायचे नाही, असे धरूनच चालली होती. ह्या भानगडीत नवरा मेल्यामुळे तिचे राणीपण व मुलाचे राजपद गेले, ही तिच्या दृष्टीने खरी वंचना होती. 'अग, मी त्याला किती जपत होते,' असे ती माद्रीला म्हणाली, त्याचाही अर्थ हाच होता.
 राज्य घालवून मुलांनी दगा दिला होताच. आता नवीन संकट उभे राहिले होते. ते हे की, हा थोरला मुलगा व त्याचे आज्ञाधारक भाऊ म्हणून इतर भावंडे तह करू पाहत होती. तो तह क्षत्रियवृत्तीला न साजेसा व अपमानकारक होईल, ही तिला भीती; म्हणून तिने कृष्णाबरोबर पुढील निरोप पाठविला. कृष्णाजवळ तिने सांगितले, "भीमाला व अर्जुनाला सांग, अपमान विसरू नका."
 कृष्णाला तिने निरोप दिला. अर्जुनाला, भीमाला सांगितले, 'अपमान विसरू नका,' पण मुख्य निरोप होता धर्माला. हा थोरला मुलगा, राज्याचा वारस, पण तो युयुत्सूही नव्हता व विजिगीषूही नव्हता. "कृष्णा, राजा युधिष्ठिर धर्मात्मा आहे. त्याला म्हणावे, बाबा, तुझा धर्म नष्ट होतो आहे. नको ते करू नकोस. मंद, अविद्वान, शब्दजंजाळात गुंतून राहणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणे तुझ्या बुद्धीला एकच धर्म दिसतो आहे. अरे, ब्रह्मदेवाने क्षत्रियाला उरापासून निर्माण केले, ते बाहुबल दाखवण्यासाठी, प्रजापालन करण्यासाठी. राजा जर धर्म विसरला, तर तो नरकात जातोच; पण सर्व प्रजेलाही नरकात लोटतो. बापाकडून आलेला भाग बुडाला आहे. बाहेर ओढून काढ. आपलासा कर. अरे, शत्रूला आनंद होतो तुझ्या वागण्याने. तुला जन्माला घालून मी लोकांच्या अन्नावर जगावे, यापेक्षा मोठे दुःख नाही रे! राजधर्माने वाग. स्वतःला व धाकट्या भावांना नरकात पाठवू नकोस." एवढ्यावर ती थांबली नाही. एक जुना इतिहास तिने मुलाला ऐकवला, 'विदुरा' किंवा 'विदुलापुत्रसंवाद' म्हणून तो प्रसिद्ध आहे. विदुला वा विदुरा म्हणजे ‘ज्ञानी'. तिचे वर्णन म्हणजे कुंतीचे (व द्रौपदीचे) स्वतःचे म्हणायचे. ती कशी होती? 'यशस्विनी', 'मन्यूमती' (राग येणारी, मानी), 'कुले जाता' (उत्तम कुळात जन्मलेली), 'क्षत्रधर्मरता' (क्षत्रधर्माचे पालन करणारी), 'दीर्घदर्शिनी' (लांबपर्यंत पाहून विचार ठरवणारी), 'विश्रुता राजसंसत्सु' (राजसभांमधून विख्यात असलेली), 'श्रुतवाक्या, बहुश्रुता' (पुष्कळ ऐकलेली) अशी; मुलगा कसा होता- सिंधुराजाने जिंकलेला, निजून राहिलेला, दुबळ्या मनाचा, निरानंद, धर्म माहीत नसलेला, शत्रूंना आनंद देणारा. अशा पुत्राची विदुलेने जी निर्भर्त्सना केली, ती कुंतीने धर्मराजाला समग्र ऐकवली. तीतला काही थोडाच भाग येथे देते. (उद्योगपर्व : अध्याय १३१ ते १३५)
 "तू प्रेतासारखा निजला आहेस कसा? अरे क्षुद्रा, पराजित स्थितीत निजू नकोस. ऊठ, वीर्याचा प्रभाव दाखव, नाही तर सद्गतीला जा. अरे क्लीबा, ऐहिक कीर्ती व पारलौकिक पुण्य सगळेच तू घालवले आहेस. पुत्राच्या नावाने माझ्या पोटी कलीच आला आहे. कोणाही राजाच्या घरात गाढवाप्रमाणे मोठ्याने ओरडणारा [वाचिवीर] पण कृतीत निर्बल असा पुरुष जन्माला येऊ नये. तुझे 'संजय' नाव ठेवले आहे, ते अन्वर्थ कर. तुझी बायको आणि मी ‘आश्रयणीय' (लोकांनी ज्यांच्या आश्रयार्थ यावे अशा) आहोत. तू आम्हांला आश्रित का बनवणार आहेस?"
 मुलगा म्हणाला, "सर्व लोखंड गोळा करून तुझे क्रोधाविष्ट, अकरुण, वैरमय हृदय केलेले आहे. हा काय क्षत्रियाचार, की तू आपल्या एकुलत्या-एक पुत्राला असे बोलावेस? मी मेलो, तुझ्या दृष्टीआड झालो, तर पृथ्वीचे राज्य वा अलंकार वा भोग वा जीव तरी तुला हवासा वाटेल का?"
 आई म्हणाली, "बाबा, हीच वेळ आहे तुला बोलायची व डिवचायची. ज्या वात्सल्यात सामर्थ्य नाही, व जे सहेतुक नाही, ते गाढवीच्या प्रेमासारखेच. तू क्षत्रिय आहेस. जिंक तरी, किंवा मर तरी."
 मुलगा अगदी शेवटचा उपाय म्हणून म्हणाला, “अगं, मजजवळ काही द्रव्य नाही. मी लढू कशाच्या जोरावर? सैन्य कसे गोळा करू?"
 आई म्हणाली, “असे काही बोल. मजजवळ गुप्त धन आहे. तू लढायला तयार असलास, तर देते."
 मुलगा लढला, व त्याने गेलेले राज्य मिळवले.
 “...कृष्णा, हे आख्यान धर्माला सांग. अर्जुनाला सांग की, क्षत्रिय स्त्री ज्या आशेने मुलाला जन्म देते, ती फलप्रद करण्याचा काळ आला आहे. सर्वजण लढा व थोरल्या भावाला राजा करा. सुनेला सांग. ‘बाई, मोठ्या कुळातली आहेस."
 चाबकाने घोड्याला फटकारावे, तसे कुंतीने मुलाला लढायला उद्युक्त केले. भीमाला, अर्जुनाला, नकुल-सहदेवांना, सुनेला जे निरोप आहेत, ते म्हणजे ‘धर्मराजाला शरणागती पत्करू देऊ नका,' अशा सूचनाच आहेत. ह्या बाईचे हृदयदेखील ‘वज्रायसा'चे (पोलादाचे) होते, ह्यात शंका नाही.
 तिच्या ह्या शब्दांपेक्षाही कठीण शब्दांत कर्णाने तिला फटकारले. तिचा धिक्कार केला. कर्णाकडे ती गेली नसती, तरी चालते. पण दुर्योधनाचा डाव हाणून पाडून, फार दिवस सोसलेल्या अन्यायाचे व दुःखाचे तिला परिमार्जन करायचे होते, म्हणून हीही लाचारी तिने पत्करली. एखाद्या सामान्य स्त्रीप्रमाणे ती कर्णाकडे गेली. स्वतःचा एक विशिष्ट हेतू साधणे एवढाच तिचा उद्देश होता का? कर्ण कोण, हे सांगून तिने ‘पाच भावांत सहावा हो. लढाई खेळू नकोस. तुझे सूतपुत्रत्व जाऊन तू 'क्षत्रिय' पदवीला पोहोचशील,' असे आमिष दाखवले.
 कर्णाचे उत्तर चाबकाच्या फटकाऱ्यापेक्षाही तीव्र आहे. पहिल्या सलामीला तो ‘क्षत्रिये' हे उपरोधाने भरलेले संबोधन योजतो. "क्षत्रिये, तू म्हणतेस त्यावर माझा विश्वास आहे. माझे यश व किर्ती ह्यांचा सर्वस्वी नाश करायचे पाप आपण केलेत. क्षत्रिय म्हणून जन्मून क्षत्रियाचे संस्कार माझ्या जन्मानंतर झाले नाहीत. ह्यापेक्षा माझे जास्ती वाईट माझा कोण शत्रू करू शकणार आहे? त्या वेळी माझ्याबद्दल करुणा दाखवली नाहीस, आणि आता मला आव्हान देते आहेस? त्या वेळी आईप्रमाणे वागली नाहीस, आता आली आहेस, ती केवळ आप्पलपोटेपणामुळे. पूर्वी कधी मला कोणी भाऊ माहीत नव्हता, आता एकदम तो उपटला, तर लोक मला काय म्हणतील? ज्यांनी मला इहलोकातले सर्व दिले, त्या धृतराष्ट्रपुत्रांना मी आता सोडणे शक्य आहे का? एवढे मात्र तुला सांगतो की, तुला पाचच्या-पाच मुलगे राहतील. मी मेलो, तर पाच आहेतच; नाही तर मी अर्जुनाला मारून पाच राहतील.”
 कुंती दुःखाने त्याला म्हणाली, "बाबा, कौरव सर्व नष्ट होतील. तू म्हणतोस, तसे होऊ दे. दैवापुढे काय इलाज?"
 ह्या शब्दांवरून एकदा असे वाटते की, कौरवांच्याबरोबर कर्णाचा नाश होऊ नये, अशी भावना कुंतीची होती का? सर्वस्वी आप्पलपोटेपणाच होता का?
 कुंतीबद्दल तिरस्कार वाटावा असे तिने काही करावे, पण लगेच परत तीच कुंती वेगळ्या स्वरूपात आपल्यापुढे यावी, असे होते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर माद्रीला दोष देऊन तिचे वाभाडे काढणाऱ्या कुंतीबद्दल संताप येतो, पण तीच कुंती जन्मभर माद्रीच्या मुलांना पोटच्या मुलांप्रमाणे जपते. सहदेवावर तिची व सहदेवाची तिच्यावर विशेष माया होती. द्रौपदी तिघांची बायको करता आली असती, पण ती पाचांची व्हावी, हा हट्ट कुंतीचाच. पाचांत फूट पडू नये, एवढाच का तिचा हेतू असेल? तिच्या वेळोवेळच्या उद्गारांवरून असे दिसत नाही. तिने त्यांना ओटीत घेतले व शेवटपर्यंत आपले म्हणून अतिशय प्रेमाने वागविले. चुकूनही दुजाभाव दाखवला नाही.
 कर्णाच्याही बाबतीत तिचे वर्तन असेच दिसते. कुवारपणी झालेला मुलगा बाळगणे शक्यच नव्हते. मागाहून त्याला आपला म्हणता येईना. हा तिचा अन्याय कर्ण विसरू शकला नाही; तीही विसरली नाही.  सर्व युद्ध आटोपले होते. मेलेल्या वीरांच्या अंत्यसंस्कारांचे काम चालले होते. अशा वेळी कुंतीने धर्माला सांगितले, “कर्ण हा मला कुवारपणी झालेला मुलगा. तो तुझा थोरला भाऊ होता. क्षत्रियाला योग्य असे त्याचे संस्कार कर." जी गोष्ट कर्णाच्या जिवंतपणी झाली नाही, ती तो मेल्यावर करण्यात काय अर्थ; असा प्रश्न पडतो. पण त्याचे उत्तर सरळ आहे. 'क्षत्रियाप्रमाणे माझे संस्कार केले नाहीस; माझे जन्मजात स्थान तू नाहीसे केलेस,' हा कर्णाचा आक्रोश होता. तिच्या व त्याच्या शेवटच्या भाषणात त्यावर कर्णाने भर दिला होता. योग्य क्रिया केली की पुरुष सद्गतीस जातो, हा तिचा दृढ समज होता. आपल्या हातून दुसरे काही झाले नाही; निदान हे तरी दिलेच पाहिजे, असे तिला वाटले असले पाहिजे. त्या क्षणी कुवारपणी घडलेल्या कृत्याला वाचा फोडण्याची काही लौकिक गरज नव्हती. युद्धाच्या आधी तशी गरज कुंतीला व कृष्णालासुद्धा भासली होती, व ती ते दिव्य करावयास तयार होती. पण आता तसेही नव्हते. कुंतीचे मन तिला खात होते म्हणा, तिची न्यायनिष्ठुर बुद्धी तिला स्वस्थ बसू देईना म्हणा. ह्या वेळी तिने सर्व सांगितले. लोक काय म्हणाले असतील, ते निराळेच. पण स्वतःच्या मुलाची निर्भत्सना तिला ऐकावी लागली. धर्माने म्हणे फार शोक केला, शेवटी सर्व भारतीय युद्धाचे टेपर तिच्यावर ठेवून तो मोकळा झाला. “तुझ्या गुपिताने आमचा घात झाला. पांचाल नाश पावले. कुरू नाश पावले. द्रौपदीचे मुलगे गेले. अभिमन्यू गमावला. सर्व ह्यामुळे झाले. कर्ण आमचा म्हणून पूर्वीच सांगितले असतेस तर युद्धच ओढवते ना. कर्ण आमच्या बाजूला असता, तर युद्धच झाले नसते."
 एवढेच बोलून तो राहिला नाही, तर ‘इतउत्तर स्त्रियांच्या पोटी काही गुपित राहायचे नाही', असा एक आचरट शाप सर्व स्त्रीजातीला देऊन तो मोकळा झाला.
 [शाप देण्याचा हा भाग प्रक्षिप्त असण्याचा बराच संभव आहे. कारण स्त्रीपर्वात कर्णाची उत्तरक्रिया धर्माने केली असे येते. पुढे शांतिपर्वात परत एकदा कर्णजन्माची कथा येते, व तेथे धर्माच्या तोंडी शाप घातला आहे.]
 कुंतीने शेवटी परत एकदा आपला निश्चयी स्वभाव दाखवला. राजधानीत धर्माच्या राजवाड्यात पंधरा वर्षे राहिल्यावर धृतराष्ट्राने अरण्यवास पत्करण्याचा निर्धार केला. धर्म, कुंती, कुंतीच्या सुना, अर्जुन सर्व धृतराष्ट्राला मान देत. पण भीम व त्याच्या चिथावणीने नकुल-सहदेव येता-जाता धृतराष्ट्राला व गांधारीला ऐकू जाईल असे घालून-पाडून बोलत असत. धृतराष्ट्र या प्रकाराची कागाळी करणे शक्य नव्हते. आता येथून जाणे बरे, असे धृतराष्ट्राने स्वत:साठी व गांधारीसाठी ठरविले. विदुर व संजयही बरोबर जाण्यास निघाले. कुंतीनेही त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरवले. "माझ्या हातून वडिलांची सेवा झाली नाही, आता होऊ दे. मी सासू (थोरली जाऊ गांधारी) व सासरा (थोरला दीर धृतराष्ट्र) ह्यांना संभाळीन," म्हणून ती चालू लागली. पांडवांचा आक्रोश ऐकून धृतराष्ट्राने गांधारीला सांगितले की, "वधूला (कुंतीला-सुनेला) म्हणावे, फार कष्टात दिवस काढलेस; आता चार दिवस मुलांजवळ वैभवाने रहा." पण कुंतीने ऐकले नाही. शेवटी धर्म डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, "पूर्वी विदुलेची गोष्ट वासुदेवाकरवी आम्हांला ऐकविलीस. तुझे म्हणणे मनावर घेऊन आम्ही राज्य जिंकले. आता तुझी क्षात्रवृत्ती कुठे गेली, की मिळवलेले राज्य, आम्ही मुले, सुना ह्या सर्वांना सोडून रानात चाललीस?" कुंती न ऐकता अश्रू ढाळीत चालतच राहिली आहे, हे पाहून भीम म्हणाला, "मुलांनी मिळवलेले राज्य भोगायचे सोडून कुठे चाललीस? असे जर होते, तर आमच्याकडून पृथ्वीचा क्षय होईल, असे युद्ध का खेळवलेस? माद्रीच्या ह्या दोन मुलांना आणि आम्हांला वनातून हस्तिनापुराला आणलेच कशाला?"
 मुले बडबडत होती. द्रौपदी अश्रू ढाळीत मागून येत होती, व ही काही न बोलता चालत होती. मुले काही केल्या पाठ सोडीत नाहीत, हे पाहून तिने अश्रू पुसले व ती म्हणाली, "पांडवा, तू म्हणालास ते सर्व खरे आहे. तुम्ही खचला होता, म्हणून मी तुम्हाला चाबूक मारून उठवले. द्यूतात राज्य गमावले होतेत. सुखाला पारखे झाला होता. ज्ञाती विचारीत नव्हत्या, तेव्हा मी तुम्हाला वरती काढले. पांडूची संतती नाहीशी होऊ नये, तुमचे यश नष्ट होऊ नये, म्हणून मी तुम्हांला फटकारले. ही माझी लाडकी सून परत अपमान न पावो, म्हणून मी तुम्हांला डिवचून जागे केले. बाबांनो, पांडूची बायको असताना मी राज्याचा उपभोग भरपूर घेतला आहे, बरे. दाने दिली, यज्ञ केले, सोमरस प्याले. माझ्यासाठी काही हवे होते, म्हणून नाही मी वासुदेवाबरोबर निरोप पाठविला. पुत्रांनी मिळवलेल्या राज्याच्या फलाची-वैभवाची-मला मुळीच इच्छा नाही. आता तप करून. सासू-सासऱ्यांची सेवा करून मला पुण्यप्रद अशा पतिलोकाला जाऊ द्या. तुम्ही परता."
 हे कुंतीचे शब्द ऐकून शरमलेले पांडव द्रौपदीला घेऊन परत फिरले. कुंतीने गांधारीचा हात आपल्या हातात घेतला होता. धृतराष्ट्राने गांधारीच्या खांद्यावर हात ठेवला होता व ती तिघे जण एका माळेत हस्तिनापूरच्या रस्त्यातून चालत होती.
 वनात गेल्यावरही कुंतीच त्यांची सेवा करीत होती व रोज ह्याचप्रमाणे ती त्यांना गंगेवर घेऊन जात होती. मुले एकदा येऊन भेटून गेली. परत सर्वजण रडली. वनात गेल्यापासून सर्वांआधी विदुर गेला. वनात एकंदर तीन वर्षे लोटल्यावर वणवा लागला असता आधीच होरपळलेल्या त्या तिघा जीवांची शरीरे आगीत होरपळून गेली. मरतानाही कुंती ताठ मानेने मेली. धृतराष्ट्राने संजयाला सुटून जायला सांगितले. वणवा पुढे येत असताना सर्वांनी जमिनीवर बसून श्वास रोधून प्राणायाम केला, व अशा अवस्थेत संजय पाहात असता ती अग्निसात झाली.

 सप्टेंबर, १९६६