तिकुडचें पहिलें पत्र

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

प्रस्‍तावना


स्‍त्रियांकरितां कविताबद्ध काही बोधपर पुस्‍तकें लिहावीत ही प्रथम कल्‍पना मनांत येऊन ‘सासरची पाठवणी’ हें पुस्‍तक मूळ ‘केरळकोकिळ’ मसिक पुस्‍तकांतून छापण्याकरितां तयार केलें. आमचे परम मित्र कै. जनार्दन महादेव गुर्जर, मुंबई येथील प्रसिद्ध बुकसेलर, हे त्‍यावेळी ‘केरळकोकिळचे’ प्रोपरायटरहोते. त्‍यांना ही मूळ प्र. वाचून पहावयास सवड झाली नव्हती. म्‍हणून त्‍यांनी त्‍यांची प्रुफें खिशांत घालून ते गडबडीनें कोंकणच्या बोटींत जाऊन बसले व बोट चालू झाल्‍यावर रिकामपणीं ती ‘सासरच्या पाठवणी’चीं प्रुफें वाचून पाहिली. तेव्हां ती कविता पाहून त्‍यांचे मन इतकें प्रसन्न झाले कीं, त्‍यांनी त्‍याचवेळी पेन्सलीनें तेथूनच आम्‍हांला एक पत्र लिहिले आणि त्‍यांत असें म्‍हटले आहे की, ‘‘काय हो करूं? मी गरीब पडलों. हाच जर मी श्रीमान्‌ असतों तर ह्याच सासरच्या पाठवणीला एक गांव आपणांस इनाम करून दिला असता. खरोखर तिची योग्‍यताच तितकी आहे. तथापि व्यापारीदृष्‍टीनें जितका अधिक मोबदला मला देणें शक्‍य आहे तेवढा मी आपणांस मोठ्या आनंदानें देईन.’’ रा. गुर्जर हे मोठें रसिक व मार्मिक गृहस्‍थ होते. तेव्हां त्‍यांचा हा अभिप्राय गांव इनाम देण्यापेक्षांही अधिक योग्‍यतेचा आहे व त्‍यांच्या मंगल आशीर्वादाप्रमाणें तिचा खपही पण जारीनें होत आहे.

तसेंच कै. गणेश नारायण जोशी ‘विजय’ प्रेसचें मालक ह्यांनीही ‘सासरच्या पाठवणीच्या’ धर्तीवर दुसरें पुस्‍तक करून मागितलें. तें तयार करून त्‍यास दिल्‍यानंतर त्‍यांनी वाचून पाहिल्‍यावर असे उद्गार काढले कीं, ‘‘आमची व आमच्या मित्रमंडळींची अशी ठाम समजूत होती की, आपल्‍याला सासरच्या पाठवणीसारख्या कविता पुनरपि साधावयाच्याच नाहींत. फार तर काय, पण ‘सासरच्या पाठवणी’ इतके गोड व प्रेमळ नांव सुद्धां सुचणार नाहीं. कारण हा वेळ आहे. एखाद्या वेळीं एखादी गोष्‍ट साधून जाते. तशीच गोष्‍ट त्‍याच गृहस्‍थानें करूं म्‍हटलें तरी ती पुनः साधत नाहीं. परंतु आपलें ‘माहेरचें मूळ’ पाहून ती आमची कल्‍पना सर्वस्‍वी चुकीची ठरली. ‘माहेरचें मूळ’ हें नांव व आंतील विषय इतका प्रेमळ, मधूर व कोमल वठला आहे कीं त्‍यापुढें सासरची पाठवणी खरोखर फिकी वाटते. आपल्‍या गुणाचा मोबदला देण्यास कोण समर्थ आहे?’’ असें म्‍हणून त्‍यांनी ठरावापेक्षां अधिक पांच रुपये दिले. त्‍यानंतर ‘दंपत्‍यसुखाचा ओनामा’ झाला. त्‍यांती किती एक पद्यें एका थोर व मातृभक्त गृहस्‍थांस अत्‍यंत प्रिय व रमणीय वाटतात. नंतर रा. रा. फडनीस बुकसेलर ह्यांच्या सूचनेवरून त्‍यांसही ‘मुलीचा समाचार’ हें पुस्‍तक करून दिलें. ह्या चारही पुस्‍तकांतील पद्यें ज्‍या मुलीच्या शाळांत चालत नाहींत अशी शाळा नाहीं, व जिला एकही ह्यांतील पद्य येत नाहीं अशी मुलगीही पण सहसा आढळणार नाहीं. इतकीं ही पद्यें लोकप्रिय झालेली आहे. मुंबईमध्ये एक गुजराथी मनुष्‍य तर ही चारच पुस्‍तकें विकून आपला निर्वाह चालवितो. दुपारच्या वेळीं मुंबईत्‍ील प्रत्‍येक चाळींतून ह्याची आरोळी कानी पडतांना बहुतेकांनी ऐकलेंच असेल. असो.

वरच्या चार पुस्‍तकांच्या जोडीला आजचें हें ‘तिकुडचें पहिलें पत्र’ तयार झाले आहे. परंतु वरच्या पहिल्‍या चार पुस्‍तकांतील विषय व ह्या आजच्या पांचव्या पुस्‍तकांतील विषय मात्र फार भिन्न आहे. पहिल्‍यांतील विषय, लग्‍न, गृहस्‍थिति, व सासरची वागणूक इत्‍यादि गृहस्‍थाश्रमांतीलच होता. परंतु ह्या पुस्‍तकांतील विषय परदेशाच्या स्‍थितीसंबंधाचा आहे. तेव्हां तो लोकांस कसा काय पसंत पडतो पहावें. ह्यांत एक तरुण गृहस्‍थ आपल्‍या प्रियपत्‍नीला येथेंच ठेवून सांप्रत चालू असलेल्‍या युद्धाच्या मोहिमेवर गेला असल्‍याचें कल्‍पिलें आहे. तेव्हां त्‍याची पत्‍नीही तिकडील ऐकलेली संकटें, तिकडील रीतिरिवाज, अडचणी ज्‍या ज्‍या तिच्या ऐकिवांत होत्‍या त्‍या त्‍या आठवून ती विलाप करीत आहे व पति आपले युद्धाचें काम सांभाळून फावल्‍या वेळांत तिकडील परिस्‍थिती पाहून तिकडेही पुष्‍कळ गोष्‍टी घेण्यासारख्या व मुनष्‍याच्या उन्नतीस कारणीभूत होण्यासारख्या आहेत व त्‍या देशाविषयीं आमच्या ज्‍या ऐकिव कल्‍पना आहेत त्‍या केवळ भ्रामक आहेत; हा विषय पहिल्‍या या पत्रांत गोंवला आहे. हा सर्व लोकांस पसंत पडला तर दुसर्‍या पत्रांतही अनुक्रमानेंच तिकडील अनेक गोष्‍टींचा उलगडा होऊन त्‍या देशाविषयी आपल्‍या स्त्रियांस बरेच ज्ञान होईल अशी आशा आहे. विषय थोडासा भिन्न असल्‍यामुळें समजुतीकरितां ठिकठिकाणीं टीपा दिल्‍या आहे. हा विषयही आमच्या सर्व भगिनीवर्गास प्रिय होवो.

पुणें, १ नोव्हेंबर १९१७.

ग्रंथकर्ता.


श्लोक [मंदाक्रांता]


देवा देवा ! कुठूनि तरि तूं आणिशी ही लढाई ! । जाती सारे हुरळुनि तिची ऐकुनीया बढाई ॥ ‘‘शस्त्रें वस्त्रें सकल मिळुनी मोठमोठे पगार । दर्या माजी सुखकर हवा बर्फही थंडगार’’ ॥१॥ ‘‘लोकीं होतें प्रगट सहजीं आपुली राजनिष्‍ठा । शूरांमाजी करिति गणना देऊनीया प्रतिष्‍ठा ॥ धैर्ये शौर्यें चढूनि बळ तत्तेज अंगीं विराजे । योद्धे सारे सारे स्‍तवन करुनी मान देतात राजे’’ ॥२॥ ‘‘भालीं दैवें मरण लिहितां कोण कोठें पळेल । अंतःसद्मीं लपुनि बसुनी सांग कां तें टळेल ?॥ धारातीर्थीं पतन घडतां कोणता सांग तोटा । स्‍वर्गश्रीही मिळुनि घडतो कीर्तिचा लाभ मोठा ॥३॥ ‘‘ऐशीं स्‍वर्गासम बहु फळें दाटलीं एक जागीं। स्‍यांतें हातें ढकलिल बळें तोच लोकीं अभागीं ॥ मी तों मागें समजुनि असें काय घेईन पाय । भाग्‍यें हातीं सहज पडला सौख्यदाता उपाय’’ ॥४॥ ‘‘ऐशीं संधी नवस करुनी काय येई फिरून । जाणोनी दे अनुमति मला धैर्य चित्तीं धरून ॥’’ ऐशी माझी करूनि समजी हाय गेलांत नाथा । मी तों येथें झुरत पडलें कोण वाली अनाथा ॥५॥

विलायत कुठें कुठें शहर भव्य तें लंदन । अहर्निश जलामधें पळति अग्‍निचें स्‍यंदन ॥ दिसे भरूनि राहिला दशदिशा महासागर । तुफान उठतां गमे निवळ मृत्‍युचें आगर ॥६॥

पडे झुकुनि बोटही घडिघडीस बाजूवरी । धका बसुनि माणसें सकल कावरीं बावरीं ॥ धडाधड उडोनिया पडति एकमेकावरी । सुटोनि कर लोळती कवण तैं कुणा सावरी ॥७॥


श्लोक [मंदक्रांता]

रों रों रों रों करुनि गगनीं वाहतो काय वारा । हा हा हा क्षणभरि नसे तेथ कोणा निवारा ॥ बोटीमाजी शिरूनि जल ही कैक लोंढें वहाती । डांबा खांबा धरूनि जन तैं संकटानें रहाती ॥८॥

धुंदी येते पसरूनि धुकें कोठचें सूर्यबिंब । वस्त्रें पात्रें भिजुनि भिजुनी होतसें सर्व चिंब ॥ चित्तीं चिंता प्रबळ न कळे सांज किंवा सकाळ । ग्रासायाला खवळुनि जणों पातला काय काळ ॥९॥


श्लोक [शार्दूलविक्रीडित]


ओली होउनियां किती सुरकुते अंगावरी कातडी । पित्तें मस्‍तकही फिरूनि तुटती ओकोनिया आंतडीं ॥

ऐशी संकटमालिका घडिघडी उत्‍पन्न होते नवी । वर्णायास्‍तव ती यथास्‍थित बरी मी काय आहे कवी? ॥१०॥ येते भोंवळ मस्‍तकांत न सुचे कांहीच खाणें पिणें । वाटे ओढुनि घेतलें व्यसन मी देवा ! नको हे जिणें ॥ कोठें सुंदर बालकें चिमुकलीं कोठें प्रिया लाडकी । हा हा मृत्‍यु गमे क्षणक्षण मला येतो तया आड कीं ॥११॥ तोंडें वासुनि नक वक्र गतिनें ग्रासावया धावती । मासे पर्वतसे अनेक जवळी येवोनिया पावती ॥ ऐशी क्रूर न दूर तीं चलचरें पाहोनि वाटे भय । मार्गामाजि असे प्रसंग पडती सारेच ते दुर्जय ॥१२॥ पक्ष्याच्याच समान मत्‍स्‍य उडुनी दिग्‍मंडळी राहती । शुंडा उंच करोनि तंतु टपुनी वेढावया पाहती ॥ मेघीं वीज कडाडुनी चमतके गर्जोनि केव्हां नभीं । काळाची जणुं ही ससज्‍ज सगळी सेनाच राहे उभी ॥१३॥


श्लोक [मंदक्रांता]

टार्पेडोचा तुम्‍हिच म्‍हणतां केवढा हो अघात । मोठ्या बोटी फुटुनि तुटुनी होतसे फार घात ॥ एकाएकीं वसुनि अचका सर्व अस्‍तास जाते । डोळ्याचेंही अवसर नसें हालावयास पातें ॥१४॥


श्लोक [मालिनी]


धड धड छाती होतसे सर्व काल । पळ न कळत केव्हां क्षुब्‍ध होईल काल ॥ निशिदिनि सकलांना शत्रुचा धाक वाटे । स्‍मरुनि सकल माझा भीतिने कंठ दाटे ॥१५॥


श्लोक [इंद्रवजा]

मार्गांत ऐशी उडते दशा ही । गेल्‍यास तेथें अपुलें न कांहीं ॥ भाषाहि नाहीं परकीय अन्न । पाणी हवा सर्वच भिन्न भिन्न ॥१६॥


श्लोक [भुजंगप्रयात]

दिसें साजरें सर्व तेथें दुरून । मिळेना परी चांगें स्‍वच्छ ऊन ॥ वरोनी सदा कोसळे बर्फराशी । दहादां पडे शीघ्र येतां घराशीं ॥१७॥


श्लोक [इंद्रवज्रा]

तांदूळ डाळ सर्वदाहि मिळे न नीट । माषान्न पाहुनि सदोदित येत वीट ॥ पक्वान्न वाढिति निरंतर एक एक । ऐशा विपत्ति कथितां मथितां अनेक ॥१८॥


श्लोक [शार्दूलविक्रीडित]

आंबे नारळ केळ एक न मिळे भक्षावयाला कदा । गोवारी उकडून येत पुढती किंवा बटाटे सदा ॥ लावावी मिरपूड मीठ वरती ऐशी जनांची रिती । होती येऊन हाल ज्‍या अडचणी त्‍या आज सांगू किती ॥१९॥ तैनातीस जिथें चुकूनि तुमच्या स्‍वप्नांत नाहीं गडी । घंटा वाजवितां सदैव तरुणी येते पुढें तांतडी ॥ दावी ती मग बॉल हाल गमती होतात ज्‍या ज्‍या नव्या ! । किंवा सुंदर वस्‍तुही पुरविती ज्‍या ज्‍या तुम्‍हाला हव्या ॥२०॥


श्लोक [मंदक्रांता]

खर्चे पैसा हरघडि तिथें काय पाण्यापरीस । सारें तेथें विकत मिळतें फक्त नाहीं परीस ॥ जेथें तेथें प्रगट दिसतो एक उद्योग मात्र । त्‍याची सेवा करिल जन जो तोच सौख्यास पात्र ॥२१॥ जाळ्याला कधिंच न मिळें एक लांकूड कोठें । जेथें तेथें पडति दगडी कोळसे मोठमोठे ॥ त्‍यांचा आहे म्‍हणति सगळे धूर मोठा विषारी । कंठामाजी सुजुनि धमन्या रोग होतात भारी ॥२२॥


श्लोक [शार्दूलविक्रीडित]

जाडा ओव्हरकोट शर्ट किति तें ओझें शरीरावरी । खासा ऊलन सूट बूट चढवा थंडी निघेना तरी ॥ सोसेना म्‍हणती किती जन हवा गोमांसमद्याविणें । त्‍याला स्‍वर्ग म्‍हणोनि जे विहरतीं धिग्‌ धिग्‌ तयांचें जिणें ॥२३॥

श्लोक [भुजंगप्रयात]


असो सर्व हें जुंपलें घोर युद्ध । जनाला गमे मृत्‍युचें तोंड शुद्ध ॥ कशीं जाळितें नित्‍य चिंता मना ही कसें काय होईल हा नेम नाहीं ॥२४॥


श्लोक [मंदाक्रांता]

पत्राची तों सतत तुमच्या लागते कोण आस । पोचायाला मजशिं परि तें लागती मासमास ॥ पाहोनीया लिखित तुमचें होय आनंदपर्व । ऐकोनीया कुशल गमतें पावलें आज सर्व ॥२५॥


श्लोक [शिखरिणी]


करोनी नाथा मी स्‍मरण तुमचें नित्‍य झुरत । यशस्‍वी होवोनी कधिं तरि बरें याल परत ॥ जयश्रीनें युक्त त्‍वरित तुमचें दर्शन घडो । मुखीं सर्वत्रांच्या नरहरिकृपें साखर पडो ॥२६॥


श्लोक [मंदाक्रांता]


केव्हां नाथा ! मधुर तुमचें पत्र फोडीन हातें । मार्गीं वेड्यासम नयन मी लावुनीया पहातें ॥ जातां येतां हळु हळु उठे चालता शब्‍द पायीं । वाटे आला जणुं लगबगा डाकवाला शिपायी ॥२७॥ नाहीं कोणी म्‍हणुनि वसते खिन्न होवोनि चित्तीं । चिंताक्रांत भ्रमुनि मनही होतसे शून्य वत्ती ॥ घाई घाई अवचित बरा तोंच आला शिपायी । घ्‍या घ्‍या घ्‍या घ्‍या ह्मणत तुमचें पत्र हें अंबुताई ॥२८॥ आनंदाची लहर उसळे वाढला सौख्यसिंधू । एकाएकीं नयन भरले दाटुनी अश्रुबिंदू ॥ उत्‍कंठेनें भ्रम सकलही तत्‍क्षणीं दूर गेला । वाचायाला हळु हळु तिनें पत्र आरंभ केला ॥२९॥


श्लोक [पृथ्‍वीवृत्त]

‘‘अमूल्‍य गुण हे सखे ! तव पुनः पुनः पुन्हां आठवी । ह्मणोनि करुनी कृपा त्‍वरित उत्तरा पाठवी ॥ कसोनि कटि सिद्ध मी सतत युद्धउत्‍क्रांतिला । परंतु तव पत्र हें सदन एक विश्रांतिला ॥३०॥


श्लोक [शार्दूलविक्रीडित]

सूं सूं सूं करुनी शिरावरुनिया जातात गोळ्या किती । तोफांचा भडिमार फार भिववी त्‍याची न वाटे क्षिती ॥ गोळा लागुन हात पाय तुटतो त्‍याचीहि झाली सवे । जाळीतो सखये तुझा विरह जो मातें न तो सोसवे ॥३१॥


श्लोक [स्त्रग्‍धरा]

टाकीतों अग्‍निमाजी सरसरुनि उड्या झाडितो स्‍वैर फैर । मृत्‍यूला कोण लेखी धरूनि जळतसों शत्रुशीं नित्‍य वैर ॥ आशेचें दर्शनाच्या तव बळ सखये ! देत उत्तेजनाला । त्‍याच्यायोगें तुझ्या या वरि वरि समरीं ! येत फत्ते जनाला ॥३२॥


श्लोक [द्रुतविलंबित] यश किती मिळणार करें बळें । सुकृत सर्व तुझेंच सदा फळें ॥ करिं जरी तरवारहि मोडकी । तरिहि शेवट होईल गोड कीं ॥३३॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.