Jump to content

युगान्त/पिता-पुत्र

विकिस्रोत कडून
(चार - पिता-पुत्र पासून पुनर्निर्देशित)





चार



पिता-पुत्र




 पोरक्या पांडवांचे रक्षण कुणी केले? कुंती जागरूक होती, पण त्यांना मारायच्या ज्या युक्त्या योजिल्या होत्या, त्यातून त्यांना कोणी निभावून नेले?- विदुराने.

 भीष्माने धृतराष्ट्राच्या आणि पांडूच्या मुलांना शिकवण्याची व्यवस्था केली, पण पांडवांच्या रक्षणासाठी खास प्रयत्न केले नाहीत. धार्तराष्ट्रांची व पांडवांची स्पर्धा होती हे त्याला उमजलेच नव्हते, असे तर नाही? तो काही करण्यास असमर्थ होता का? का तो उदासीन होता? जे कुळ निर्वंश व्हायला घातले होते, ते सावरले. एकही नव्हता तेथे दोघे आले. व दोघांचे एकशे-पाच झाले. त्या एकशे-पाचांतले काही गेले, तरी त्याला पर्वा नव्हती. कुरूचा वंश हस्तिनापरच्या गादीवर असला म्हणजे मिळवली. एवढ्यापुरताच का भीष्म जागरूक होता? तसे म्हणता येत नाही; पण एवढे मात्र खरे की, द्रौपदीच्या स्वयंवरापर्यंत भावाभावांच्या स्पर्धेची व धृतराष्ट्राच्या दष्ट हेतूंची त्याने मुळीच दखल घेतली नाही. त्याला त्याची वार्ताही नव्हती असे दिसते. पांडवांच्या हिताला बापाप्रमाणे जपला तो विदुर, पण विदुर स्वतःच इतका परतंत्र की
६२/युगान्त  महाभारतामध्ये व्यक्ती म्हणून विदुराचे एक विशेष असे स्थान व कार्य आहे. त्याशिवाय तो एका विशिष्ट वर्गातला होता. त्या सबंध वर्गाचेही एक विशेष कार्य ह्या कथेत आहे. त्याच्या वर्गाची दुःखे ती विदुराची होतीच आणि शिवाय त्याची स्वतःची अशीही दुःखे होती. विदुर 'क्षत्ता' होता. 'क्षत्ता', 'सूत' किंवा 'पारशव' अशी ह्या वर्गाची नावे होती. त्यांची स्पष्ट व्याख्या करणे कठीण आहे. कर्ण ह्या वर्गातला होता. एका क्षत्रिय-कुमारीचा (कुंतीचा) जन्मताच टाकून दिलेला आणि एका सूताने (अधिरथाने) पुत्रस्थानी मानलेला म्हणून तो 'सूत' होता, असे 'विराटपर्वा'वरून दिसते. म्हणजे पाळलेल्या कर्णाखेरीज अधिरथाला व राधेला इतरही मुले होती व ती सूतवर्गातीलच होती. कर्णाने स्वतः सूतांशीच शरीरसंबंध जोडलेला होता. त्याच्या सुना, जावई सूतच होते. प्रत्यक्ष पाहून सबंध युद्धाची माहिती देणारा संजय सूतच होता. धृतराष्ट्राला वैश्य स्त्रीपासून झालेला युयुत्सू धृतराष्ट्रपुत्र म्हणून माहीत होता, पण तोही क्षत्ता किंवा सूतच होता. अंबिका व अंबालिका ह्यांची कुणी-एक दासी व व्यास ह्यांपासून जन्मलेला विदुरही सूतच होता. विदुराची बायको "कन्या पारशवी" ही सूतवर्गातलीच होती. सुदेष्णेचा भाऊ, विराटाचा सेनापती कीचकही सूतच होता. नैमिषारण्यात ऋषींना महाभारतकथा सांगणारा उग्रश्रवा रोमहर्षणीही सूतच होता. सूत सारथी होते, अस्त्रजीवी होते, पुराण व राजवंश जाणणारे होते. सूत व मागध ह्यांचा उच्चार एका समासात केलेला आढळतो, पण मागधांचे स्थान सूतांच्या बरेच खालचे होते. सूत हे क्षत्रियांना फार जवळचे आप्त असे वाटत. याचे कारण असे दिसते की, क्षत्रियांना सूत हे बरेच वेळा सावत्र भाऊ असत (विदुर व युयुत्सू). मागध नुसते स्तुतिपाठक, तर सूत बरेच वेळा बरोबरीचे तर कधीकधी डोईजड (उदाहरणार्थ, कीचक) झालेले असत. ते आपल्या क्षत्रिय भावांना व पोशिंद्यांना उपदेश करू शकत (संजय, विदुर). त्यांच्या मसलतीत बरोबरीने 
युगान्त / ६३ बसत (संजय). त्यांच्यातल्या सुरेख मुली ‘स्त्रीरत्नं दुष्कुलादपि' ह्या न्यायाने क्षत्रियांशी लग्न करू शकत (उदाहरणार्थ, सुदेष्णा), पण त्यांना क्षत्रियांच्या मुली लग्नाला मिळत नसत. दुर्योधनाने कर्णाला राजा बनवले, पण कर्णाशी संबंध केला नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. दुर्योधन कर्णाला मित्र म्हणवीत असे, पण दोघांमध्ये संपूर्ण बरोबरीचे नाते नव्हते, सेव्यसेवकभाव शेवटपर्यंत दिसून येतो. तशीच अवस्था इतर सूतांची होती. विदुराचीही होती. विदुर आणि त्याचे भाऊ एका बापापासून झालेले; पण पहिल्या दोघांच्या आया क्षत्रियकन्या व मेलेल्या राजाच्या बायका होत्या. ह्याची आई दासी होती व मेलेल्या राजाची बायको नव्हती. तसे नसते, तर विदुर राजाच झाला असता, असे महाभारतात स्पष्टच सांगितले आहे. यादवांच्या भीषण अंतानंतर इंद्रपस्थ वज्राला मिळाले, हस्तिनापूर परीक्षिताला मिळाले. पण धृतराष्ट्रपुत्र असूनही सूत म्हणून बिचाऱ्या युयुत्सूला मात्र काहीच मिळाले नाही.
 ह्या वर्गाची अवस्था हीच होती. क्षत्रियांना अतिशय जवळचे, क्षत्रियांच्या रक्ताचे, क्षत्रियांना निर्भीडपणे उपदेश करू शकणारे असे हे लोक क्षत्रियांची बरोबरी मात्र करू शकत नव्हते. ते व त्यांची संतती सिंहासनावर बसू शकत नव्हती. धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून त्याला राज्य मिळाले नाही. पांडू काही निर्व्यंग नव्हता. पण त्याला राज्य मिळाले. पण सर्व दृष्टींनी योग्य असूनही विदुर मात्र कोरडाच राहिला.
 सूतांची घरे राजांगणाच्या जवळच होती असे दिसते. विदुर काय, संजय काय आपापल्या घरी राजवाड्यापासून जरा दूर राहत होते असे दिसते. धृतराष्ट्राचे विदुरावर प्रेम होते. त्यातही एक प्रकारचा हुकमीपणा होता. वेळी-अवेळी गरज लागली, म्हणजे तो विदुराला बोलावणे पाठवी. त्याचप्रमाणे पांडवांकडे काही निरोप घेऊन वगैरे जावयाचे असले, तर विदुरालाच पाठवीत असे. एकदा रागारागाने त्याने विदुराला राजवाड्यातून घालवून दिले होते. पण
युगान्त / ६३ बसत (संजय). त्यांच्यातल्या सुरेख मुली ‘स्त्रीरत्नं दुष्कुलादपि' ह्या न्यायाने क्षत्रियांशी लग्न करू शकत (उदाहरणार्थ, सुदेष्णा), पण त्यांना क्षत्रियांच्या मुली लग्नाला मिळत नसत. दुर्योधनाने कर्णाला राजा बनवले, पण कर्णाशी संबंध केला नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. दुर्योधन कर्णाला मित्र म्हणवीत असे, पण दोघांमध्ये संपूर्ण बरोबरीचे नाते नव्हते, सेव्यसेवकभाव शेवटपर्यंत दिसून येतो. तशीच अवस्था इतर सूतांची होती. विदुराचीही होती. विदुर आणि त्याचे भाऊ एका बापापासून झालेले; पण पहिल्या दोघांच्या आया क्षत्रियकन्या व मेलेल्या राजाच्या बायका होत्या. ह्याची आई दासी होती व मेलेल्या राजाची बायको नव्हती. तसे नसते, तर विदुर राजाच झाला असता, असे महाभारतात स्पष्टच सांगितले आहे. यादवांच्या भीषण अंतानंतर इंद्रपस्थ वज्राला मिळाले, हस्तिनापूर परीक्षिताला मिळाले. पण धृतराष्ट्रपुत्र असूनही सूत म्हणून बिचा-या युयुत्सूला मात्र काहीच मिळाले नाही.

 ह्या वर्गाची अवस्था हीच होती. क्षत्रियांना अतिशय जवळचे, क्षत्रियांच्या रक्ताचे, क्षत्रियांना निर्भीडपणे उपदेश करू शकणारे असे हे लोक क्षत्रियांची बरोबरी मात्र करू शकत नव्हते. ते व त्यांची संतती सिंहासनावर बसू शकत नव्हती. धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून त्याला राज्य मिळाले नाही. पांडू काही निर्व्यंग नव्हता. पण त्याला राज्य मिळाले. पण सर्व दृष्टींनी योग्य असूनही विदुर मात्र कोरडाच राहिला.

 सूतांची घरे राजांगणाच्या जवळच होती असे दिसते. विदुर काय, संजय काय आपापल्या घरी राजवाड्यापासून जरा दूर राहत होते असे दिसते. धृतराष्ट्राचे विदुरावर प्रेम होते. त्यातही एक प्रकारचा हुकमीपणा होता. वेळी-अवेळी गरज लागली, म्हणजे तो विदुराला बोलावणे पाठवी. त्याचप्रमाणे पांडवांकडे काही निरोप घेऊन वगैरे जावयाचे असले, तर विदुरालाच पाठवीत असे. एकदा रागारागाने त्याने विदुराला राजवाड्यातून घालवून दिले होते. पण 
युगान्त / ६१ बोलू लागला. कारण उघड होते. विदुराची परिस्थिती कौरवांच्या घरी होती, तशीच होती. तो कोणासाठी काहीच करू शकत नव्हता. पण पांडव आता स्वतंत्र झाले होते. त्यांच्या पाठीमागे पांचालांचे सामर्थ्य होते. आता गुपचप राहून कौरवांचे बेत मुकाट्याने हाणून पाडायचा प्रश्न नव्हता. आदिपर्वात परिस्थितीतला हा फरक फारच मार्मिकपणे दाखवला आहे. द्रौपदीला पांडवांनी मिळवली. दुर्योधन आणि त्याचे मित्र हात चोळीत पराभव खाऊन परत आले. हे कळल्याबरोबर विदुर धृतराष्ट्राकडे गेला, आणि त्याला म्हणाला, "कौरवांचे अभिनंदन असो!" पांडव काय किंवा दुर्योधनादी भाऊ काय, सगळे कुरूंचे वंशज, म्हणजे कौरव! पांडव लाक्षागृहात जळालेले, त्यामुळे धृतराष्ट्राला वाटले, द्रौपदीला मिळवून आपलाच मुलगा परत आला. आणि तोही मोठ्या आनंदाने "छान,छान" म्हणून "द्रौपदीला आणा", "अरे दुर्योधना, तिला भूषणे आणा," असे म्हणाला. मागाहून विदुराने त्याला खरी हकीकत सांगितली. लहानपणापासून धृतराष्ट्राने पांडवांना छळून शेवटी त्यांना जाळायची मसलत केली होती, त्या सर्वांचे ह्यावेळी विदुराने उट्टे काढले. धृतराष्ट्राने "तेही माझे मुलगेच आहेत; विदुरा, तेही माझे आवडतेच आहेत." असे म्हटल्यावर “बाबा, तुझ्या तोंडात साखर पडो. त्यांच्याविषयी तुझी बुद्धी अशीच कायमची राहो," असे विदुर म्हणाला. विदुर गेल्यावर दुर्योधन वगैरे परत येऊन पांडवांचा नाश कसा करावा, ह्याबद्दल धृतराष्ट्राकडे येऊन मसलत करू लागले. तेव्हा काळ-वेळ जाणून आता गुप्त खलबत करण्यात अर्थ नाही, हे ओळखून धृतराष्ट्राने भीष्म, द्रोण, विदुर यांना बोलावले.सर्वांनी त्याला पांडवांशी सख्य करण्याची विनंती केली. ह्याही वेळी विदुराचे भाषण अगदी तळमळीचे आहे. नंतर विदुराने स्वत: जाऊन पांडव, द्रौपदी व कुंती ह्यांना आणले आणि त्यांना राज्यार्ध म्हणून खांडवप्रस्थ दिले. ह्यानंतर मात्र विदुराने दरवेळी उघडपणे पांडवांची बाजू घेतली.
पश्चात्ताप पावून त्याला त्याने परत बोलावले, त्याची क्षमा मागितली, त्याला धाकटा भाऊ म्हणून मांडीवर बसवले, असे एक हृदयंगम वर्णन महाभारतात आहे. भाऊ तर खराच, पण अन्नवस्त्रांखेरीज कोठच्याही तऱ्हेचा हक्क नसलेला तो भाऊ होता. भीष्म कुलज्येष्ठ, पण पांडव-कौरवांच्या बाबतीत त्याची वृत्ती समान होती. भांडण होऊ नये म्हणून त्यानेही प्रयत्न केले, पण विदुराच्या मनाचा ओढा पांडवांकडे होता. पांडव अतिशय मोठे लढवय्ये, त्यांच्या हातून कौरवांचा नाश होईल, असे भीष्म वारंवार म्हणे. ही गोष्ट विदुरही जाणून होता. पण विदुराच्या बोलण्यात न्यायाची भाषा जास्ती येते. पांडवांच्या पोरकेपणाची कीवही त्यात आहे. असे का? स्वतः असहाय म्हणून हस्तिनापुराला आलेल्या पोरक्या पोरांच्याबद्दल त्याला कणव वाटत असे, असे तर नाही ना? आपल्याला राज्याचा अधिकारच नाही; पण ज्यांना तो आहे त्यांचा तरी जाऊ नये, अशी बुद्धी त्यामागे होती का?
 विदुर या शब्दाचा अर्थ ‘ज्ञानी' असा आहे; आणि संबंध महाभारतात विदुराचा ज्ञानीपणा जो दिसतो, तो पारमार्थिक आहे. ह्या जगात समभावाने आणि न्यायाने वर्तन असावे; लोभ धरू नये व आत्म्याचे चिरंतनत्व ओळखावे, असा त्याचा आग्रह होता. ज्याच्यापुढे हे ज्ञान त्याने ओतले, तो धृतराष्ट्र दृष्टीने आंधळा होता. स्वतः राज्याचा अधिकारी असूनही ते न मिळाल्यामुळे तो दुखावला होता व आपल्याला मिळाले नाही ते मुलांना तरी मिळावे ह्या ईर्ष्येने सद्सद्विवेक नाहीसा झालेला असा होता. पहिल्या पहिल्यांदा म्हणजे पांडव लहान असताना विदुराचे म्हणणे त्याने मनावरच घेतले नाही; आणि मागाहून ऐकले तेव्हा 'मी काय करणार? मुले आता माझ्या हातात राहिली नाहीत' असे म्हणून तो उपदेश डावलला. विदुराजवळ शहाणपण होते, पण सत्ता नव्हती. द्रौपदी-स्वयंवरानंतर त्याने एकदाच धृतराष्ट्राला हिणवले; त्यानंतर सर्व युद्ध झाल्यावर तो म्हणाला, "आता रडून काय उपयोग? पांडव द्यूत हरले, त्या वेळी एखाद्या लहान मुलासारखा विजयाने नाचलास. मी सांगत होतो की, "बाबा! हा विजय नाही, हा सत्यानाश आहे. तेव्हा तू ऐकले नाहीस. आता क्षत्रियासारखा वाग. शोक करू नकोस." ह्या शब्दांत हिणवण्याचा प्रयत्न दिसत नाही. जे आपण भोगतो, ते आपल्या कर्माचे फळ असते. तेव्हा आता ते धीराने भोगावे, असाच त्याचा सूर होता.
 विदुर स्वतःला काही मिळाले नाही, म्हणून कधी दुःख करताना दिसत नाही. तसा विचार केला, तर महाभारतातल्या इतर व्यक्तींच्या मानाने त्याचे आयुष्य सुखाचेच गेले. त्याचे लग्न झाले होते. तो स्वतःच्या घरी मनन, चिंतन, पूजन करीत राहिला होता. त्याला मुलेबाळे झाली होती. ज्ञानी म्हणून त्याचा लौकिक होता. पण तरीही त्याचे सर्व आयुष्य एक प्रकारे उदास व विषण्ण वाटते. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती-पुरुष असो, स्त्री असो, उच्च असो, नीच असो, कोठच्या-ना-कोठच्या तरी उलाढालीत गुंतलेली आढळते. धृतराष्ट्र आणि पांडू, गांधारी आणि कुंती, दुर्योधन व पांडव, द्रौपदी, सुभद्रा, उत्तर-उत्तरा व त्यांचे मुलगे आणि श्रीकृष्ण व इतर यादव ही मंडळी फार खळबळीचे व उत्कट असे जीवन जगत होती. त्यात चढ़ होते, उतार होते, प्रेम होते, द्वेष होता, आणि जी काही शांती होती, ती मरणानंतरही किंवा आयुष्याच्या शेवटी जाणून-बुजून मोठ्या प्रयासाने जीवनाचे आघात सहन करून दमल्यानंतर मिळवलेली. ही शांती खरी शांती वाटत नाही. त्यातही एक प्रकारचा अट्टाहास वाटतो. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती ह्यांचा वनवास किंवा पांडव आणि द्रौपदी यांचे महाप्रस्थान हे शांतिदायक किंवा शांतिकारकही वाटत नाही. जी गोष्ट या क्षत्रियांची, तीच त्यांना निकट असलेल्या सूतांची. नुसती लढाईची बातमी सांगणारा संजयसुद्धा भोवताली चाललेल्या झगड्यात अलिप्त राहू शकला नाही, हे वारंवार दिसते. द्रोण, अश्र्वत्थामा ह्यांच्यासारखीही माणसे मनाच्या व शरीराच्या आत्यंतिक दुःखदायी व्यापारांपासून बचावली नाहीत. ह्या सर्वांशी विरोधाने विदुराचे आयुष्य एक प्रकारे उठून दिसते; एक प्रकारे अजिबात विसरले जाते. तो दासीपुत्र म्हणून जन्माला आला व राज्याला मुकला. अगदी लहान वयातच त्याने आपले वैफल्य गिळून आयुष्याचा एक विशेष मार्ग आखला की काय, असे वाटते. महाभारतामध्ये एरवी सगळ्यांच्या पोटातील विचारांना वाचा फोडलेली आहे, पण विदुराच्या बाबतीत मात्र महाभारत काहीच सांगत नाही. का तो खरोखरच विदुर आणि ज्ञानी होता? का प्रत्यक्ष यमधर्माचा अवतार होता, म्हणून आयुष्याची खळबळ त्याला शिवलीच नाही? तो सर्वस्वी उदासीन होता, असेही म्हणता येत नाही. तो पांडवांचा कैवारी होता. क्रौर्याचा व अन्यायाचा त्याला तिटकारा होता. पण त्याने आपले स्थान सोडले नाही. लढाईच्या दिवशी दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभी असताना युयुत्सू उघडपणे जाऊन पांडवांना मिळाला. पांडवांना न्याय देण्याबद्दल धृतराष्ट्राशी सारखी कटकट करूनही विदुराने धृतराष्ट्राला सोडले नाही. धृतराष्ट्राची निर्भत्सनाही त्याने केली व धृतराष्ट्रावर प्रसंग ओढवला, तेव्हा त्याचे सांत्वनही त्यानेच केले.
 धृतराष्ट्र आणि पांडू यांचे जसे लहानपणी भीष्माने पालनपोषण केले तसेच विदुराचेही केले. विदुर हा मोठेपणी विदुरत्व पावला होता. सभांमध्ये, विशेषतः द्रौपदीहरणाच्या व कृष्णशिष्टाईच्यावेळी विदुराची व त्याचप्रमाणे भीष्माचीही भाषणे दिली आहेत. पण त्या दोघांचे एकमेकांशी संभाषण किंवा विचारविनिमय झालेला दिसत नाही. संभाषणाचा जो एक प्रसंग आदिपर्वाच्या १०३ या अध्यायात दिला आहे, तो उघड-उघड प्रक्षिप्त वाटतो. तो भाग असा : भीष्म विदुराला म्हणतो आहे, "सुबलाची मुलगी (गांधारी), मद्राची राजकन्या (माद्री) व यादवी (कुंती) अशा मुली आपल्याकडे सुना म्हणून आणाव्या, असे मला वाटते आहे. विदुरा, तुझे म्हणणे काय आहे?" विदुर म्हणतो आहे, "आपणच आमचे आई-वडील सर्व काही आहात; जे रुचेल ते करावे." ह्यापुढे गांधारी, कुंती व माद्री ह्यांबद्दलची हकीकत निरनिराळी आली आहे. म्हणजे हे पहिले आठ श्लोक सर्वस्वी निरर्थक आहेत. ह्या वेळी विदुराच्या दोघा थोरल्या भावांच्या लग्नाचा विचार चालला होता. विदुराचे लग्न व्हावयाचे होते. सर्वजण वीस वर्षांच्या आतलेच असणार. विदुर सगळ्यांत धाकटा. अशावेळी भीष्म विदुराचा सल्ला विचारणे शक्यच नाही. भीष्माने आपल्या थोरल्या दोघा पुतण्यांचे लग्न झाल्यावर देवक नावाच्या राजाची दासीपुत्री आणून तिचे विदुराशी लग्न लावले व त्याला चांगली मुले झाली, असे दोन-तीन श्लोक आहेत. त्यानंतर परत विदुराच्या बायका-मुलांचा महाभारतात कुठे उल्लेख नाही. 'महाभारतात घडलेल्या मानसिक व शारीरिक तुंबळ स्पर्धेपासून विदुराने स्वतःला अलिप्त ठेवले, एवढेच नव्हे, तर आपल्या कुटुंबालाही अलिप्त ठेवले असे दिसते. तरीही विदुर खोलपणे कुठे गोवला गेला होता की काय, अशी मनाला शंका येतेच.

 विदुर पांडवांचा कैवारी असे म्हटले, पण सर्व पांडवांशी त्याचे संबंध सारखे नव्हते, त्याचा आणि धर्माचा अगदी निकटचा संबंध होता. वारणावताला जाताना त्याने पुढील संकटाची सूचना धर्माला दिली होती. कुंतीने धर्माला विचारले, "विदुर तुजजवळ काय बोलला, ते आम्हांला सांगतोस का?" तेव्हा विदुराने काय सूचना दिल्या, ते धर्माने सर्वांना सांगितले. कौरवांच्या राजसभेतून तो आला, म्हणजे दरवेळी त्याचे बोलणे धर्माशी होई. कृष्ण आणि अर्जुन, कर्ण आणि दुर्योधन ह्यांच्या मैत्रीप्रमाणे उघडउघड जगाला दिसेल अशी मैत्री, असा हा संबंध नव्हता. बरोबरीच्या मैत्रीचे ते नाते नव्हते. धर्मराज म्हणतो त्याप्रमाणे विदुराने बापाच्या नात्याने पांडवांचे रक्षण केले, पण इतर पांडवांपेक्षा धर्मच त्याला जास्त जवळचा होता. धर्मात आणि विदुरात काही विलक्षण साम्य आहे. विदुर नीतिज्ञ, धर्मज्ञ म्हणून 'विदुर' ह्या नावाने प्रसिद्ध, तर धर्म हा त्याच्या स्वतःच्या पिढीत विद्वान, विचारशील व धर्मज्ञ म्हणून प्रसिद्ध. त्याच्या शहाणपणाची परीक्षा अरण्यपर्वात यक्षप्रश्नाच्या वेळी झाली. परत महाप्रस्थानपर्वात झाली. पांडूचा, म्हणजे राज्याभिषेक झालेल्या राजाचा तो थोरला मुलगा. वंशपरंपरागत राज्य त्याला मिळावयाचे. पण त्यातही भानगडी व कटकटी निर्माण झाल्या, लहानपणीच शत्रूच्या घरी काही न बोलता दीनपणे त्याला रहावे लागले. आपण राज्याचे अधिकारी, ही गोष्ट क्षणमात्र विसरता येण्यासारखी नव्हती. किंबहुना, त्याच्या धाकट्या भावाने व आईने त्याला ही गोष्ट क्षणभरही विसरू दिली नसती, भीम, अर्जुन ह्यांच्यासारखा धर्म लढाऊ वृत्तीचा नव्हता. ब्राह्मण मंडळी जमवावी; त्यांच्याकडून यज्ञ करवावे, त्यांना दक्षिणा द्याव्या, लोकांचा दुवा घ्यावा, धार्मिक गोष्टींबद्दल ऊहापोह करावा, जुन्या राजांची चरित्रे ऐकावी, मजेत सोंगट्या खेळाव्या, हा त्याचा स्वभाव. वाट्याला आयुष्य आले, ते मात्र धकाधकीचे. जे काही मिळाले, तेही इतरांच्या पौरुषामुळे. अतिसुंदर बायको व द्रुपदासारखे बलाढ्य श्वशुर मिळाले, ते अर्जुनामुळे; दोन्ही वेळच्या वनवासामध्ये संरक्षण झाले, ते भीमाच्या बळाने; इंद्रप्रस्थाचे राज्य व मयसभेसारखी अप्रतिम सभा मिळाली, ती कृष्णार्जुनांच्यामुळे; शेवटचे युद्ध जिंकले, तेही भावांचा पराक्रम व कृष्णाची बुद्धी ह्यांच्या जोरावर! हे होत असतानाही, युद्धात एक-दोनदा भावांपुढे त्रागा करण्याचा प्रसंग उद्भवला. जे शेवटी हाती आले त्याची किंमतही इतकी जबर द्यावी लागली की, तोंड विजयाने उजळायच्याऐवजी विषादाच्या राखेने मात्र भरल्यासारखे वाटत होते. धर्माचे आयुष्यही पहिल्यापासून शेवटपर्यंत विषादाने भरलेले. ह्या बाबतीत तो विदुराच्या जवळचा वाटतो. मिळायची पात्रता असतानाही मिळाले नाही, म्हणून विदुराची विषण्णता; व अधिकारप्राप्य गोष्टी दुष्प्राप्य होऊन मिळाल्या, त्याही जबर किंमत देऊन, म्हणून धर्माची विफलता! विदुराच्या विफलतेला महाभारतात तोंड फोडलेले नाही. पण धर्माची विफलता वेळोवेळी त्याच्या तोंडून वदवली गेली आहे. धर्म एवढा विवेकी, पण शेवटच्या क्षणी द्रौपदी खाली पडून मेली, तेव्हा तिचे प्रेम अर्जुनावर जास्त होते, ह्या दीनवाण्या शब्दांनी त्याने आपले मुख्य शल्य प्रकट केलेच. एकदा असे वाटते की, द्यूत खेळायला बोलावले असताना आपले राज्य, आपली भावंडे, आपली बायकोसुद्धा जणू उन्मादात पणाला लावण्यात धर्माने परत एकदा आपली मनोव्यथाच प्रकट केली. जे स्वत:च्या श्रमाने मिळाले नाही, ते असे उधळण्यात धर्माने मोठा पुरुषार्थ केला का? की ते मला तुच्छ आहे, हे दाखवून दिले? धर्म सगळ्या वडील माणसांचा मान ठेवीत असे, पण विदुराबद्दल त्याला एक आतला जिव्हाळा होता असे वाटते.
 हे सर्व लक्षात घेतले म्हणजे विदुराचे आणि धर्माचे पिता-पुत्रांचे तर नाते नव्हते ना, अशी शंका मनात डोकावते. ह्या शंकेला पोषक असे महाभारतात पुष्कळच आहे. महाभारतात कोणाचेही कसलेच गौप्य लपवलेले नाही. कुंतीला कुवारपणी झालेला मुलगासुद्धा त्यात आला आहे. मग कुंतीला विदुरापासून धर्म झाला, ही गोष्ट का लपवून ठेवली असावी? कदाचित ही गोष्ट झालीच नसावी. सर्व कुंतीपुत्र हे निरनिराळ्या देवतांपासून झालेले दाखवले आहेत. पांडू जिवंत असताना ही सर्व मुले झाली असल्यामुळे व पांडूने ती आपली स्वतःची असे मान्य केल्यामळे बीजक्षेत्रन्यायामुळे ती पांडूचीच होतात. त्यांत एखादे मूल विदुरापासून झाले असते, त्याला कुठलाही कमीपणा आला असता असे वाटत नाही. एक शंका मनात येते. धृतराष्ट्राचा मुलगा हा क्षत्रिय राजकन्येपासून झालेला होता व स्वतः धृतराष्ट्रही एका राजघराण्यातील सर्वांत वडील राजपुत्र होता. ह्याउलट कुंती जरी राजकन्या असली, तरी विदुर हा सूत होता. सूतापासून झालेला मुलगा म्हणून वडील असूनही धर्माचा हक्क दुर्योधनापुढे कमी ठरला असता का असा एक प्रश्न उरतो. त्याला काही महाभारतात उत्तर नाही. आदिपर्वात ज्या वेळेला, कोणातरी देवतेला बोलावून पुत्र उत्पन्न करायचा असा बेत ठरतो, त्या वेळेला नेमकी यमधर्माचीच आठवण व्हावी, हे मोठे चमत्कारिक वाटते.
 ह्या पहिल्या मुलाचे नाव 'युधिष्ठिर'. त्याचे 'धर्म' नाव पडले त्याला कारणे पुष्कळ आहेत. यमधर्माचा मुलगा म्हणून त्याचे नाव 'धर्मज', अतिशय धार्मिक वृत्तीचा, म्हणूनही त्याचे नाव 'धर्म', ह्याखेरीज विदुराचा असल्यामुळेही त्याला 'धर्म' नाव पडण्याचा चांगला संभव होता. विदुर म्हणजे शापित यमधर्मच होता. (अणिमांडव्य ऋषीची गोष्ट पहा.) विदुर हा कुंतीचा धाकटा दीर, या नात्याने नियोगाला सर्वस्वी योग्य असा होता. धर्माच्या आज्ञेप्रमाणे झालेले मूल म्हणूनही युधिष्ठिराला 'धर्म' नाव पडण्याचा संभव होता. ह्यावरून धर्म विदुराचा मुलगा असावा, असे वाटते.
 दुसऱ्याही ठिकाणी दोन प्रसंग असे आहेत की, त्याने या तर्काला पुष्टी येते. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर ह्यांनी अरण्यवास स्वीकारला. धर्म व इतर पांडव त्यांना भेटायला वनामध्ये जात असत. अशा एका वेळी विदुर दिसला नाही, म्हणून धर्माने त्याची चौकशी केली. धृतराष्ट्राने सांगितले, "विदुर घोर तप करतो आहे. तो काही खात-पित नाही. कधीकधी अरण्यात इकडे-तिकडे भटकताना तो लोकांना दिसतो." धृतराष्ट्र हे सांगत असतानाच अस्थिपंजर मात्र उरलेला, सर्व अंग धुळीने माखलेला उघडा-नागडा असा विदुर लांबून जातो आहे, असे लोक म्हणाले. हे ऐकून धर्म "विदुरा, थांब. अरे मी तुझा आवडता युधिष्ठिर." असे ओरडत-ओरडत त्याच्यामागून धावला. असे एका-पाठोपाठ धावत असताना एके ठिकाणी अगदी दाट अरण्यात एकांत स्थळी विदुर एका झाडाला टेकून उभा राहिला. "मी युधिष्ठिर," असे म्हणून परत एकदा धर्माने आपली ओळख दिली. तेव्हा विदुर पापणी न हलविता, आपली दृष्टी राजाच्या दृष्टीत मिसळून त्याच्या गात्रागात्रात योगबलाने शिरला. आपले प्राण, इंद्रिये, तेज सर्व काही विदुराने राजाला दिले.
 मरणसमयीचे हे वर्तनही पिता-पुत्रांना योग्य असेच आहे. एका उपनिषदात मरायला टेकलेल्या पुरुषाने काय करावे, याचे वर्णन आहे. आपण जमिनीवर निजावे, पुत्राला आपल्या अंगावर घ्यावे; "मी माझी इंद्रिये तुला देतो," असे पित्याने म्हणावे. 'घेतो', असे पुत्राने म्हणावे. ह्याप्रमाणे शक्ती, ऐश्वर्य, बुद्धी सर्व काही पित्याने पुत्राला द्यावे व पुत्राने घ्यावे, असा एक विधी सांगितला आहे. महाभारतातील विदुर व धर्म यांच्या शेवटच्या भेटीत हीच क्रिया थोडक्यात वर्णिली आहे. पुढे दोन अध्यायांनंतर व्यास सगळ्यांना भेटायला आल्यावर तो विदुराबद्दल असे सांगतो, "पूर्वी विचित्रवीर्याच्या दासीच्या ठायी माझ्यामुळे साक्षात धर्म योगबलाने जन्माला आला आणि त्याने योगबलाने कुरुराज युधिष्ठिराला जन्म दिला. जो धर्म, तोच विदुर... जो विदुर, तोच पांडव! आणि हे धृतराष्ट्रा, ज्याप्रमाणे तुझा तो भाऊ तुझी चाकरी करीत होता, तसाच युधिष्ठिर धर्म तुझी करीत आहे." म्हणजे कुंतीने आपल्या धाकट्या दिरापासून धर्मराजाला उत्पन्न केले, ही गोष्ट सर्व युद्ध संपेपर्यंत गुप्त ठेवून त्याचा महाभारतात अशा ठिकाणी उच्चार केलेला आहे की, शेवटी विदुराचे व धर्माचे ऐक्य हे पिता-पुत्राचे ऐक्य होते, की दोघेही साक्षात यमधर्माचे मुलगे म्हणून होते, हा संदेह उरतोच. कुंतीला फक्त एकच मुलगा विदुरापासून झाला, इतर का नाही? असा विचार केला, तर नियोगाने एखाद्या पुरुषाशी संग केला तर तो फक्त एकदाच पुत्रप्राप्तीकरता करावा, अशी भावना असल्यामुळे विदुराचा व कुंतीचा संयोग परत झाला नाही व तिला दुसऱ्या पुरुषांना बोलवावे लागले असे वाटते. एवढे मात्र खरे की, ह्या शेवटच्या क्षणापर्यंत विदुराच्या आणि धर्माच्या नात्याचा व एकमेकांविषयी वाटणाऱ्या जिव्हाळ्याचा इतर बाबतीत अतिशय स्पष्टवक्ते असणाऱ्या महाभारतात कोठेही स्पष्ट उल्लेख नाही. विदुराचे व धर्माचे पिता-पुत्रांचे नाते असण्याची शक्यता आहे असे मानले, तर संबंध महाभारताच्या गोष्टीला एक निराळेच वळण लागते, अगदी निराळाच अर्थ प्राप्त होतो. धर्म हा विदुराचा औरस व पांडूचा क्षेत्रज मुलगा असेल, तर भारतीय युद्ध हे फक्त दोघा भावांच्या मुलांचे युद्ध न राहता तिन्ही भावांच्या मुलांतील युद्ध होते. पण तिहेरी लढाई होत नाही, याचे कारण एकजण दोघांचा मुलगा म्हणून! आपल्या क्षेत्रज मुलांचे बाप कोण, हे कोणासही कळू नये, म्हणून पांडू लांब हिमालयात गेला. त्याच्या मुलांचे बाप कोण, हे कोणाला कळले नाही. व्यासाप्रमाणे पितृत्व कधी उघड झाले नाही. विदुर मुलासाठी म्हणून कसल्याही कारस्थानात पडला नाही. शेवटपर्यंत तो उदासीन व अलिप्तच राहिला. मुलगा राजा झाल्यावरही राजाचा बाप म्हणून धृतराष्ट्राप्रमाणे त्याला मिरवता आले नाही. विदुराची खिन्नता धर्माच्याही वाट्याला आली. जे हक्काचे, ते सर्व मिळाले. पण इतक्या हानीने की सर्व मिळूनही शेवटपर्यंत नुसता उदासीनच नव्हे, तर अकृतार्थही राहिला.

 ऑक्टोबर, १९६५