Jump to content

गणेश चतुर्थी व्रत/विनायक चतुर्थी व्रत

विकिस्रोत कडून

<poem>


विनायकी चतुर्थी दिवशी करावयाची

श्री विनायकाची व्रतपूजा (सोपी)

प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.

स्नान करून धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्‍यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी. आचमन करून

केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः ।

असे म्हणत तीन पळ्या पाणी उजव्या तळहातावर घेऊन प्राशन करावे आणि

गोविंदाय नमः ।

असे म्हणत चौथी पळी पाणी हातावरून ताम्हणात सोडावे. ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती अगर सुपारी ताम्हणात ठेऊन स्नान घालावे. त्यानंतर पंचामृत स्नान घालावे. हा विधी दुर्वांनी मूर्तीवर अगर सुपारीवर असलेल्याच ठिकाणी पाणी व पंचामृत शिंपडून

स्नानं-पंचामृतस्नानं समर्पयामि

असे म्हणावे.

वस्त्र-वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि ।

असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा. गंध-तांबडे किंवा पांढरे गंध लावावे

चंदनं समर्पयामि

म्हणून नमस्कार करावा.

हरिद्रांच कुंकुमं समर्पयामि ।

हळद-कुंकू लावावे.

अक्षतां-विनायकाय नमः ।

अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।

म्हणून पिंजर लावलेल्या लाल अक्षता वाहाव्या.

फुले-पुष्पाणि समर्पयामि

म्हणून फुले अर्पण करावी. विनायकाला तुळस वाहूं नये, बेल चालतो.

दुर्वा-दुर्वांकुरान् समर्पयामि

म्हणत दुर्वा वाहाव्या. ।

धूपं-विनायकाय नमः ।

असे म्हणून सुगंधी उदबत्ती लावून देवाला

धूपं-समर्पयामी म्हणत ओवाळावे. दीप-निरंजनाची वात पेटवून

निरांजनदिप समर्पयामि

असं म्हणून ओवाळावे.

नैवेद्य-नैवेद्यार्थे स्वाद्यवेद्यं समर्पयामि

असें म्हणून गूळखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा व

नमस्करोमि

असें म्हणून नमस्कार करावा. प्रदक्षिणा व पुष्पांजलि-गंध, अक्षता व फुल हातात घेऊन देवाभोवती अगर आपल्याच भोवती १, ३ किंवा ५ प्रदक्षिणा घालून

प्रदक्षिणां समर्पयामि

म्हणावे व हातातील पुष्पांजलि

पुष्पांजलि समर्पयामि

असे म्हणून देवावर वाहावी. पूजा झाल्यावर खालील प्रार्थना म्हणावी -

विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत । पार्वतीप्रीव विघ्नेश मम विघ्नान्निवाराय ॥

नमो विष्णूस्वरूपाय, नमस्ते रुद्ररूपिणे । नमस्ते ब्रह्मरूपाय, नमोऽनन्तस्वरूपिणे ॥

नमस्कारान् समर्पयामि ।

नमस्कार करावा आपले मागणे देवाकडे मागावे. ॥ श्री विनायकार्पणमस्तु ॥

विसर्जन -

संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून आपल्या सवडीप्रमाणे पोथी मात्र अवश्य वाचावि रात्री नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्या.

भक्तकवि मिलिंदमाधवकृत

विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा व नामस्तोत्र

ॐ विनायका नमः । ॐ नमो श्रीगजवदना । गणराया गौरीनंदना । विघ्नेशा भवभयहरणा । नमन माझे साष्टांगी ॥१॥

नंतर नमिली श्रीसरस्वती । जगन्माता भगवती । ब्रह्मकुमारी वीणावती । विद्यादात्री विश्वाची ॥२॥

नमन तैसे गुरूवर्या । सुखनिधान सद्गुरुराया । स्मरूनी त्या पवित्र पायां । चित्तशुद्धी जाहली ॥३॥

थोर ऋषिमुनी संतजन । माता-पिता आणि बुधगण । करूनी तयांसी नमन । विनायकी माहात्म्य आरंभिले ॥४॥

शुक्लपक्षी चवथी तिथी । तीच विनायकी चतुर्थी । गणेशजन्माची स्मृति । म्हणून हे व्रत करावे ॥५॥

या दिवशी प्रत्येकाने । वागावे अति संयमाने । आणि काया-वाचा मनें । पवित्र असावे ॥६॥

कठोर शब्द उच्चारून । दुखवू नये कोणाचे मन । जिवंत देवांना लाथाडून । काय उपयोग व्रताचा ? ॥७॥

दीनदुबळ्यांवरी दया करी । त्याचाच देव होतो कैवारी । संकटें सर्व निवारी । आणि सुखरूप ठेवितो ॥८॥

प्रथम करावें गणपती पूजन । गुळखोबर्‍याचा नैवेद्य अर्पून । मनोभावें प्रार्थना करून । आशिर्वाद मागावा ॥९॥

पूजा प्रार्थना संपल्यावरी । भोजन करावें दुपारी । साध्या सात्विक आहारीं । मीठ वर्ज्य करावें ॥१०॥

गरम मसाले टाळावे । उत्तेजक जिन्नस नसावें । ऐंसें जेवण जेवावें । विनायकी व्रताला ॥११॥

ज्यांची इच्छा असेल त्यांनी । रात्री उपास करावा त्या दिनीं । आणि इतर सर्वांनी । विनायक चिंतन करावे ॥१२॥

आधीं चित्त स्थिर करावें । एक माळा (१०८) नाम स्तोत्र म्हणावें । आणि नंतर झोपी जावें । विनायकी व्रतदिनीं ॥१३॥

गणपतीची व्रतें अनेक । त्यांतीलच हें व्रत एक । त्याची ही कथा सुरेख । ऐका आतां सांगतों ॥१४॥

विनायकी चतुर्थी दिवशीं । आपणास फुरसत मिळेल तशी । वंदन करूनी विनायकासी । पोथी अवश्य वाचावी ॥१५॥

फार फार प्राचीन काळीं । एक विशेष गोष्ट घडली । जी पुराणी आहे वर्णिली । तीच देतो संक्षेपें ॥१६॥

एक होता पारधी शिकारी । बायको, मुलें - बाळें होती घरी । कसेंबसें तो पोट भरी । पशुपक्षी मारूनी ॥१७॥

भल्या पहाटे उठुनी । तीरकामठा हाती घेऊनी । हिंडे सार्‍या रानींवनीं । शिकार काही शोधाद्या ॥१८॥

पसरूनी ठेवी जाळें फांसे । त्यांत अडकती पक्षी ससे. । प्राणी त्यापेक्षां जे मोठेसे । मारी धनुष्यबाणानें ॥१९॥

काळवीट, हरिणे, चितळे । वनगाई, सांबर, चित्ताही मिळे । कधीं कधीं ढाण्या वाघ आढळे । तेव्हा फायदा होतसे ॥२०॥

कवडे, कबुतरे, तितर, मोर । असे रंगीबेरंगीं लहानथोर । पशुपक्षी मिळतां भरपूर । आनंद त्याला होतसे ॥२१॥

टाकुनी पशूंचीं आंतडीं । काढुनी घेई शिंगे कातडी । विकुनी ती बाजारी हरघडी । चरितार्थ तो चालवी ॥२२॥

नाना रंगी पक्ष्यांचीं । आणिक सुंदर मोराची । पिसें विकून, पैशांची । प्राप्ती त्याला होतसे ॥२३॥

कधी होई खूप कमाई । कधी कधी उपाशीच राही । आला दिवस कसाबसा जाई । ऐसें जीवन व्याधाचें ॥२४॥

एकदां निघाला नेहमीप्रमाणें । हिंडत गेला रानेंवनें । परंतु कर्मधर्मसंयोगानें । शिकार नाहीं मिळाली ॥२५॥

दिवस आला माथ्यावरी । भुकेचा डोंब उठला उदरी । तो शमवाया पाणीतरी । प्यावे आतां भरपूर ॥२६॥

ऐसा विचार करूनी मनी । तलाव शोधत जावे म्हणुनी । व्याध निघाला मग तिथुनी । भर उन्हात भर दुपारी ॥२७॥

योगायोग खराच आगळा । एक दिव्य दृश्य दिसले त्याला । वनदेवीचा एक मेळा । पूजाविधीत रंगलेला ॥२८॥

व्याध तिथे झपझप गेला । हात जोडुनी उभा राहिला । वनदेवींनी विचारले त्याला । कुठला कोण आहेस तूं ? ॥२९॥

व्याधाने मग न डगमगता । सांगितली आपली सत्यकथा । वनदेवींना ती ऐकता । फार वाईट वाटले ॥३०॥

पाणी देऊनी त्या व्याधाला । म्हणाल्या दया नसे का तव ह्रदयाला ? । प्राणीहत्येचे पाप कशाला । पोटासाठी करिसी तूं ? ॥३१॥

ज्या मुक्या प्राण्यांना तूं मारिले । त्यांनी तुझे काय नुकसान केले ? । पापाचे मात्र डोंगर झाले । तुझ्या क्रूर कृत्यांनी ॥३२॥

तूं नाहीस लंगडा लुळा । अपंग किंवा आंधळा पांगळा । सुदैवाने मिळालें आहे तुला । धष्टपुष्ट शरीर हे ॥३३॥

अंग मोडून काही काम करावें । स्वकष्टानें द्रव्य मिळवावें । मिळालेल्यांत संतुष्ट असावें । आणि राहावें आनंदें ॥३४॥

जो पाप करी आचरणांत । आणि देवाला घाली दंडवत । अशा दांभिकाच्या पदरात । पुण्य कसें पडेल ?॥३५॥

श्रम तेथें येते संपत्ती । निरूद्योगाने येते विपत्ती । हे जाणे त्यालाच गणपती । सदा प्रसन्न होतसे ॥३६॥

व्याध म्हणाला खजिल होऊन । देवीनो आज मी झालो धन्य । तुमच्या उपदेशानुसार वागेन । अशी शपथ घेतों मी ॥३७॥

परंतु ही इथे थाटाची । पूजा करिता कोणाची ?। क्षमा करा विचारितो याची । मोठ्या उदार मनाने ॥३८॥

देवी म्हणाल्या जो कोणी कष्ट करतो । त्याला त्यात जो यश देतो । विघ्ने संकटे दूर करतो । आणि देतो सुखसमृद्धि ॥३९॥

असा देवाधिदेव विनायक । विश्वाधार मूळारंभ एक । त्याचीच नावे घेऊनी अनेक । पूजा आम्ही करितो ही ॥४०॥

आज विनायकी चतुर्थी । म्हणजेच विनायकी जयंती । आज त्याची पूजा करितां ती । सिद्धिदायक होतसे ॥४१॥

आजचे व्रत पाळावे । आणि कर्तव्य कर्म करावे । प्राणीमात्रांसी रक्षावे । परपीडा हे पाप असे ॥४२॥

व्रताची माहिती व महती । त्यांनी सांगितली व्याधाप्रती । तो व्याध ऐकुनी ती । फार संतुष्ट जाहला ॥४३॥

व्याधाने केले देवींना वंदन । आणि म्हणाला आजपासून । प्रत्येक विनायकी व्रत मी करीन । प्राणिहत्या सोड्ली ॥४४॥

गुप्त जाहल्या देवी तेवढ्यात । व्याध परतला आपल्या झोपडीत । राहू लागला खूप सुखांत । मेहनत मजुरी करूनिया ॥४५॥

त्याने अनेक वर्ष ते वरत केले । पुढे सृष्टिनियमाने निधन झाले । त्या व्रताच्या पुण्यसंचयाने । राजकुळी पुनर्जन्म लाभला ॥४६॥

पूर्वजन्मींची आठवण । विसरला नव्हता म्हणून । त्या जन्मीही केले व्रतपालन । तेणे सम्राट जाहला ॥४७॥

वैभवाने नाही उतला । सत्तेने नाही मातला । म्हणूनच विनायकाने त्याला । अखेर दिली सद्‌गती ॥४८॥

विनायकी चतुर्थीची ही कथा । थोडक्यात सांगितली आता । संतोष वाटो विनायक भक्तां । म्हणे मिलिंदमाधव ॥४९॥

या पोथीचे करिता वाचन श्रवण । विनायक कृपेने होईल कल्याण । मनोरथ होतील सफल पूर्ण । श्रीविनायकाच्या प्रसादाने ॥५०॥

ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी । केवळ एखाद्याच व्रतदिनी । या पोथीच्या चार प्रती घेऊनी । गणेश मंदिरी वाटाव्या ॥५१॥

प्रसार व्हावा विनायक भक्तीचा । प्रचार व्हावा सद्‌विचारांचा । हाच उद्देश प्रती वाटण्याचा । कृपया ध्यानी घ्यावे हे ॥५२॥

विनायक भक्तीचा प्रभाव मोठा । नसतो सुखसमृद्धिचा तोटा । सर्व वैभवांचा होय पुरवठा । आनंदी आनंद होतसे ॥५३॥

नित्य केल्याने गणेशसेवा । मिळेल तुष्टी-पुष्टीचा ठेवा । ज्याचा त्याने अनुभव घ्यावा । या विनायकी व्रताचा ॥५४॥

असो. शके १९०८ वर्षी । चैत्र मासी शुक्लपक्षी । विनायकी चतुर्थीच्या शुभ दिवशी । पोथी पूर्ण झाली ही ॥५५॥ (ता. १३ एप्रिल १९८६)

ॐ शांतिः शांतिः शांतिः शुभं भवतु ॥ भक्तकवि मिलिंदमाधवकृत विनायकी चतुर्थी माहात्म्य संपूर्ण ॥

॥ श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र ॥

व्रतदिनी महर्षि गृत्सभदकृत । भविष्योत्तर पुराणोक्त । अष्टोत्तरशत नामस्तोत्र । रात्री एकदां म्हणावें ॥१॥

प्रथम ॐ अक्षर उच्चारावें । विनायकाचें एक नांव घ्यावें । नंतर नमः म्हणावें । मंत्र पूर्ण व्हावया ॥२॥

ऐसे करितां १०८ वेळां । संतोष होईल विनायकाला । प्रसन्न होईल तो तुम्हाला । देईल वरदान इच्छिलेलें ॥३॥

यांतली एकवीस नावे उच्चारूनी । श्रीगणपतीच्या चरणीं । दुर्वायुग्म वाहुनी । नमस्कार करावा ॥४॥

१. ॐ विनायकाय नमः

२. ॐ विघ्नराजाय नमः

३. ॐ गौरीपुत्राय नमः

४. ॐ गणेश्वराय नमः

५. ॐ स्कंदाग्रजाय नमः

६. ॐ अव्ययाय नमः

७. ॐ पूताय नमः

८. ॐ दक्षाध्यक्षाय नमः

९. ॐ द्विजप्रियाय नमः

१०. ॐ अग्निगर्वच्छिदे नमः

११. ॐ इंद्रश्रीपदाय नमः

१२. ॐ वाणीबलप्रदाय नमः

१३. ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः

१४. ॐ सर्वतनयाय नमः

१५. ॐ शिवप्रियाय नमः

१६. ॐ सर्वात्मकाय नमः

१७. ॐ सृष्टिकर्त्रे नमः

१८. ॐ देवानीकाचिंताय नमः

१९. ॐ शिवाय नमः

२०. ॐ शुद्धाय नमः

२१. ॐ बुद्धिप्रियाय नमः

२२. ॐ शांताय नमः

२३. ॐ ब्रह्मचारिणे नमः

२४. ॐ गजाननाय नमः

२५. ॐ द्वेमातुराय नमः

२६. ॐ मुनिस्तुत्याय नमः

२७. ॐ भक्तविघ्नविनाशनाय नमः

२८. ॐ एकदंताय नमः

२९. ॐ चतुर्बाहवे नमः

३०. ॐ चतुराय नमः

३१. ॐ शक्तिसंयुताय नमः

३२. ॐ लंबोदराय नमः

३३. ॐ शूर्पकर्णाय नमः

३४. ॐ हेरंबाय नमः

३५. ॐ ब्रह्मवित्तमाय नमः

३६. ॐ कालाय नमः

३७. ॐ ग्रहपतये नमः

३८. ॐ कामिने नमः

३९. ॐ सोमसूर्याप्रियलोचनाय नमः

४०. ॐ पाशांकुशधराय नमः

४१. ॐ चंडाय नमः

४२. ॐ गुणातीताय नमः

४३. ॐ निरांजनाय नमः

४४. ॐ अकल्मषाय नमः

४५. ॐ स्वयंसिद्धाय नमः

४६. ॐ सिद्धार्चितपदांबुजाय नमः

४७. ॐ बीजपूरप्रियाय नमः

४८. ॐ अव्यक्ताय नमः

४९. ॐ वरदाय नमः

५०. ॐ शाश्वताय नमः

५१. ॐ कृतिने नमः

५२. ॐ विद्वत्प्रियाय नमः

५३. ॐ वीतभयाय नमः

५४. ॐ गदिने नमः

५५. ॐ चक्रिणे नमः

५६. ॐ इक्षुचापधृते नमः

५७. ॐ अब्जोत्पलकराय नमः

५८. ॐ क्षीशाय नमः

५९. ॐ श्रीपतिस्तुतिहर्षिताय नमः

६०. ॐ कुलाद्रिभृते नमः

६१. ॐ जटिने नमः

६२. ॐ चंद्रचूडाय नमः

६३. ॐ अमरेश्वराय नमः

६४. ॐ नागोपवीतिने नमः

६५. ॐ श्रीकंठाय नमः

६६. ॐ रामार्चितपदाय नमः

६७. ॐ व्रतिने नमः

६८. ॐ स्थूलकंठाय नमः

६९. ॐ त्रयीकर्त्रे नमः

७०. ॐ सामघोषप्रियाय नमः

७१. ॐ अग्रण्याय नमः

७२. ॐ पुरुषोत्तमाय नमः

७३. ॐ स्थूलतुंडाय नमः

७४. ॐ ग्रामण्ये नमः

७५. ॐ गणपाय नमः

७६. ॐ स्थिराय नमः

७७. ॐ वृद्धिदाय नमः

७८. ॐ सुभगाय नमः

७९. ॐ शूराय नमः

८०. ॐ वागीशाय नमः

८१. ॐ सिद्धिदायकाय नमः

८२. ॐ दुर्वाबिल्वप्रियाय नमः

८३. ॐ कांताय नमः

८४. ॐ श्रीपापहारिणे नमः

८५. ॐ कृतागमाय नमः

८६. ॐ समाहिताय नमः

८७. ॐ वक्रतुंडाय नमः

८८. ॐ श्रीपदाय नमः

८९. ॐ सौम्याय नमः

९०. ॐ भक्तकंक्षितदात्रे नमः

९१. ॐ अच्युताय नमः

९२. ॐ केवलाय नमः

९३. ॐ सिद्धिदाय नमः

९४. ॐ सच्चिदानंदविग्रहाय नमः

९५. ॐ ज्ञानिने नमः

९६. ॐ मायापुताय नमः

९७. ॐ दांताय नमः

९८. ॐ ब्रह्मिष्ठाय नमः

९९. ॐ भयवर्जिताय नमः

१००. ॐ प्रमत्तदैत्यभयदाय नमः

१०१. ॐ व्यक्तमूर्तये नमः

१०२. ॐ अमूर्तिकाय नमः

१०३. ॐ पार्वतीशंकरोत्संगखेलनोत्सवलालसाय नमः

१०४. ॐ समस्त जगदाधाराय नमः

१०५. ॐ मूषकवाहनाय नमः

१०६. ॐ ह्रष्टचित्ताय नमः

१०७. ॐ प्रसन्नात्मने नमः

१०८. ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः

इति विघ्नेश्वराष्टोत्तरशतदिव्यनामस्तोत्रं संपूर्णम् ॥


<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.