Jump to content

गजानन विजय/अध्याय १०

विकिस्रोत कडून

<poem> ॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया । सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥

देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं । माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥

माझ्या करें न झालें पुण्य । हें ठाउकें मजलागून । फाय काय तुला वदन । दावण्या मी योग्य नसे ॥३॥

ऐसी स्थिति आहे जरी । परि देवा कृपा करी । ओहळास गोदावरी । पोटीं आपल्या घेतसे ॥४॥

तैसें तुवां करावें । दुःख अवघें निवारावें । पातकाला न उरुं द्यावें । माझ्या ठायीं यत्किंचित्‌ ॥५॥

तूं आणिल्या मनांत । अवघेंच कांहीं घडून येत । रंकाचाही राव होत । तुझा लाधतां वशीला ॥६॥

असो एकदां पुण्यराशी । गेले उमरावतीसी । जाऊन उतरले सदनासी । आत्माराम भिकाजीच्या ॥७॥

हा आत्माराम भिकाजी-सुत । उमरावतीचा असे प्रांत । मोठा अधिकार हातांत । होता त्याच्या विबुध हो ॥८॥

कायस्थ प्रभू याची जात । हा संतांचा प्रेमी अमित । सदाचारसंपन्न गृहस्थ । गृहस्थाश्रमीं वर्ततसे ॥९॥

त्याच्या घरीं समर्थ गेले । ते त्यानें सांग पूजिले । मंगलस्नान घातिलें । उष्णोदकानें गजानना ॥१०॥

उटणीं नाना प्रकारचीं । अंगा लाविलीं साचीं । वृत्ति आनंदली त्याची । संतसहवासें तेधवां ॥११॥

कर्वतीकांठी उमरेडचा । धोतरजोडा नेसविला साचा । भालीं केशरी गंधाचा । भव्य तिलक लाविलासे ॥१२॥

कंठामाजीं पुष्पहार । नैवेद्याचे नाना प्रकार । दक्षिणेसी शंभर । रुपये त्यानें ठेविले ॥१३॥

धूप, दीप आरती झाली । पुष्पांजली समर्पिली । दर्शनालागीं दाटी झाली । उमरावतीच्या लोकांची ॥१४॥

प्रत्येका ऐसें वाटावें । समर्थ आपल्या घरीं न्यावें । यथासांग करावें । पूजन त्यांचें येणें रितीं ॥१५॥

इच्छा ऐसी बहुतां झाली । परी थोडक्याची मनीषा पुरली । सदनीं पाऊलें लागण्या भलीं । पुण्य पाहिजे बलवत्तर ॥१६॥

तें ज्यांच्यापासीं होतें । समर्थ गेले तेथें तेथें । कां कीं साधूस अवघें कळतें । अंतर्ज्ञानें करुन ॥१७॥

गणेश श्रीकृष्ण खापर्डे । उमरावतीचे गृहस्थ बडे । वकीलींत ज्यांच्यापुढें । ढीग रुपयांचे पडती कीं ॥१८॥

दादासाहेब यांप्रत । म्हणत होते वर्‍हाडांत । हा सज्जन भाविक अत्यंत । ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी ॥१९॥

त्यानें विनंति करितां खरी । महाराज गेले त्याच्या घरीं । तेथें ही झाली याचपरी । समर्थांची पूजा हो ! ॥२०॥

गणेश आप्पा म्हणूनी । होता लिंगायतवाणी । चंद्राबाई कामिनी । त्याची परम भाविक असे ॥२१॥

ती बोलली पतीला । हा साधु पाहिजे नेला । कसेंही करुन घराला । पाहा विनंति करुन ॥२२॥

आपुलें निष्पाप असल्या मन । याच्या आगमनें करुन । होईल आपलें पवित्र सदन । भाविकाचा देव असे ॥२३॥

गणेश आप्पा म्हणे तिला । वेड लागलें आहे तुला । हा सदनीं साधु न्यावयाला । वशिला पाहिजे बलवत्तर ॥२४॥

पाहा खापडर्यालागुनी । हा साधु न्यावया सदनीं । श्रम पडले ते आण ध्यानीं । उगा हट्ट धरुं नको ॥२५॥

चंद्राबाई म्हणे नाथा । हें न पटे माझ्या चित्तां । सांगे माझी मनदेवता । सदनीं साधु येतील हो ॥२६॥

तुम्ही करा हो त्यांना नुसती । सदनीं येण्यास विनंति । गरीबावरी असते प्रीति । संतांची ती विशेष ॥२७॥

परि आप्पा बोलेना । छाती त्याची होईना । बोलावयासी निजसदना । श्रीगजानन साधुतें ॥२८॥

महाराज वदले अखेर । गणेश आप्पाचा धरुन कर। तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ॥२९॥

तुझ्या सदनीं वाटतें यावें । कांहीं वेळ बसावें । अरे चित्तीं असेल तें बोलावें । भीड न धरितां कवणाची ॥३०॥

ऐसें महाराज बोलतां । गणेश आप्पाचिया चित्ता । हर्ष झाला तत्त्वतां । तो न शब्दें बोलवे ॥३१॥

समर्थांस नेऊन सदनीं । पूजा केली उभयतांनीं । आपुला संसार त्यांचे चरणीं । अर्पण केला तात्काळ॥३२॥

असो ऐशा पूजा अमित । झाल्या उमरावतींत । त्या प्रत्येक पूजेप्रत । एक गृहस्थ हजर असे ॥३३॥

तो आत्माराम भिकाजीचा । नात्यानें हा होता भाचा । राहणार मुंबई शहरींचा । तारमास्तर असे कीं ॥३४॥

तो रजा घेऊन भला । उमरावतीस होता आला । भेटण्या आपुल्या मामाला । बाळाभाऊ नाम ज्याचें ॥३५॥

त्या बाळाभाऊकारण । समर्थांचें लागलें ध्यान । म्हणे ऐशा साधूचे चरण । सोडून कुठें जाऊं नये ॥३६॥

प्रपंच अवघा अशाश्वत । त्यांत कशाला गोवूं चित्त । केला आजपर्यंत । तोच आतां पुरे झाला ॥३७॥

कांहीं असो आजपून । मी न सोडी त्याचे चरण । अमृताला टाकून । विष प्याया कोणी जावें ? ॥३८॥

म्हणून प्रत्येक पूजेला । बाळाभाऊ हजर भला । होता बुध हो राहिला । दुसरें न कांहीं कारण ॥३९॥

असो कांहीं दिवसांनीं । शेगांवीं आले परतोनी । मळ्यासी न जातां जाणी । आले मंदिरीं मोठयाच्या ॥४०॥

त्या मंदिराच्या पूर्वेस । एक जागा होती ओस । गजानन पुण्य पुरुष । येऊन बसला ते ठायां ॥४१॥

बातमी महाराज आल्याची । कृष्णा पाटला कळली साची । त्यांनीं जागा मळ्याची । सोडिली हें समजलें ॥४२॥

म्हणून आला धांवत । त्या ओस जागेवरी सत्य । महाराजा करुन दंडवत । अधोवदन बैसला ॥४३॥

डोळ्यांतून वाहे पाणी । खंड त्याला नसे जाणी । वस्त्र टाकलें भिजवोनी । त्या अश्रूंनीं छातीचें ॥४४॥

तैं महाराज वदले पाटलाला । ऐसा कां रे रडसी भला ? । शोक कोणता तुला झाला ? । तें वेगें सांग मज ॥४५॥

पाटील बोले त्यावर । जोडोन आपले दोन्ही कर । महाराज मळ्याचा अव्हेर । कां हो आज केलांत हा ? ॥४६॥

ऐसा अक्षम्य कोणता । अपराध झाला सांगा आतां । माझ्याकडून ज्ञानवंता । मी लेकरुं आपुलें असे ॥४७॥

ही देशमुखाच्या बाजूची । जागा आहे बघा साची । एका माळ्याच्या मालकीची । येथें तुम्ही राहूं नका ॥४८॥

मळ्यांत मर्जी नसेल जरी । तरी चला राहात्या घरीं । तें खालीं करितों सत्वरीं । तुम्हांसाठीं दयाळा ॥४९॥

कां कीं तुम्हांवांचून । मला न कांहीं प्रिय आन । हें कळलें वर्तमान । अवघ्या पाटील मंडळीतें ॥५०॥

तेही तेथें धांवून आले । महाराजा विनवूं लागले । निजसदना या या भले । हरी आणि नारायणा ॥५१॥

महाराज बोलले तयासी । मी जो या जागेसी । येऊन बसलों आज दिवशीं । तें तुमच्या हितास्तव ॥५२॥

तें पुढें येईल कळोन । आतां न करा भाषण । वाद दोघांचें निर्मूलन । करील हें विसरुं नका ॥५३॥

जितके जगीं जमेदार । तितके न करिती विचार । मागचा पुढचा साचार । हेंच उणें त्यांच्या ठायीं ॥५४॥

जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसीं । मी सोडितां तत् गृहासी । तो नाहीं रागावला ॥५५॥

तें कां हें त्यासी विचार । माझी कृपा तुमच्यावर । आहे ती न ढळणार । कोणत्याही कारणांनीं ॥५६॥

बंकटलालही आला तेथ । घालूं लागला समजूत । यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यांत । तुम्ही यांना नेऊं नका ॥५७॥

माझ्या घरुन जेव्हां आले । तेव्हां सांगा मीं काय केलें । आपण आहोंत त्यांचीं बाळें । ते सारखे अवघ्यांना ॥५८॥

सखाराम आसोलकार । आहे मनाचा उदार । तो जागा देण्यास इन्‌कार । करणार नाहीं वाटतें ॥५९॥

सखाराम देईल जागा । पुढचें करुं आपण बघा । म्हणजे अवघ्यांस यांत भागा । घेतां येईल सहजची ॥६०॥

समेट अवघ्यांचा होऊनी । मठ बांधिला त्या ठिकाणीं । परशराम सावजींनीं । मेहेनत घेतली विशेष ॥६१॥

समर्थांच्या बरोबर । निस्सीम भक्त होते चार । भास्कर, बाळाभाऊ, पितांबर । उमरावतीचा गणेश आप्पा ॥६२॥

रामचंद्र गुरव त्याचपरी । राहात होता बरोबरी । हे पांच पांडव श्रीहरी । गजानन शोभूं लागले ॥६३॥

वृत्ति बाळाभाऊची । अतिविरक्त झाली साची । पर्वा न त्यानें नौकरीची । केली यत्किंचित्‌ आपुल्या ॥६४॥

पत्रें येती वरच्यावरी । बाळाभाऊस येण्या घरीं । परी परिणाम अंतरीं । कांहींच त्याच्या होईना ॥६५॥

भास्कर म्हणे गुरुराया । हा सोकला पेढे खाया । म्हणून ना इच्छी जाया । आपल्यापासून कोणीकडे ॥६६॥

तुम्ही द्यावा यातें मार । म्हणजेच हा जवळ करील घर । रत्‍न चौदावें पाहिल्याबिगर । हा येथून हलणें नसे ॥६७॥

लकडीवांचून माकड । पाहा न होई कधीं धड । मोठमोठाले ते पहाड । भिऊं लागती वज्राला ॥६८॥

एकदां बळेंच घालवून । दिलें बाळाभाऊकारण । परी तो आला परतून । राजीनामा देवानिया ॥६९॥

बाळाभाऊ शेगांवासी । येतां भास्कर बोलला त्यासी । कां रे आम्हां त्रास देसी ? । येथें येऊन वरच्यावर ॥७०॥

ओढाळ बैल हिरव्यावर । पाहे पडाया निरंतर । त्यास जरी दिला मार । तरी तो येई तेथ पुनः ॥७१॥

तैसी लोचटा तुझी कृति । तंतोतंत निश्चिति । झाली जयाला विरक्ति । त्यानेंच येथें यावें रे ॥७२॥

हें अहंकाराचें भाषण । समर्था न खपलें जाण । त्यांनीं भास्कराचें अज्ञान । निवटाया कृत्य केलें ऐसें ॥७३॥

एका गृहस्थाच्या हातीं । भली थोरली छत्री होती । ती गजाननें घेऊनी हातीं । बाळास झोडूं लागले ॥७४॥

मारतां मारतां मोडली । बुध हो छत्री भली । मग एक मोठी घेतली । भरीव काठी वेळूची ॥७५॥

तिनें मारणें सुरुं केलें । तें पाहतां लोक भ्याले । कांहीं कांहीं पळून गेले । सोडून त्या मठाला ॥७६॥

परी बाळाभाऊ तसाच पडला । समर्थांच्या पुढें भला । कैक म्हणती असेल मेला । तो या अशा मारानें ॥७७॥

भास्करही झाला चिंतातुर । बाळाभाऊचा पाहून मार । परी समर्थांच्या समोर । बोलण्या छाती होईना ॥७८॥

तीही काठी मोडली खरी । बाळाभाऊच्या पाठीवरी । मग तो कंटाळून अखेरीं । तुडवूं लागले तयाला ॥७९॥

जैसा का तो कुंभार । माती तुडवितो साचार । तैसाच केला प्रकार । महाराजांनीं तुडविण्याचा ॥८०॥

मठीं हा प्रकार चालला । शिष्यसमुदाय पळत सुटला । कोणी गेले बोलावण्याला । त्यांच्या आवडीच्या मंडळीस ॥८१॥

बंकटलाल कृष्णाजी । धांवूनी आले मठामाजीं । समर्थ हात धरण्या राजी । कोणी तयार होईना ॥८२॥

बंकटलाल म्हणे भीत भीत । समर्था हा आपुला भक्त । पुरें झालें याप्रत । आतां ऐसें तुडवणें ॥८३॥

ऐसें ऐकतां भाषण । समर्थ वदले हांसून । हें असंबद्ध भाषण । कां करितां कळेना ॥८४॥

मी न बाळासी मारिलें । नाहीं तयासी तुडविलें । निरखून पहा चांगलें । म्हणजे येईल कळोनी ॥८५॥

महाराज म्हणाले बाळासी । ऊठ वत्सा वेगेसी । या आलेल्या मंडळीसी । आंग तुझें दाखिव ॥८६॥

ऐसी आज्ञा होता भला । बाळाभाऊ उठून बसला । लोक त्याच्या अंगाला । पाहूं लागले निरखून ॥८७॥

तों वळाचें नांव नाहीं । कोठेंही न लागलें कांहीं । तो पहिल्यापरीच होता पाही । निमग्न आपुल्या आनंदांत ॥८८॥

त्यायोगें भास्कराला । बाळाभाऊचा अधिकार कळला । मग तोही ना पुन्हां बोलला । वेडेंवांकुडें बाळासी ॥८९॥

सोनें कसासी उतरतें । तेव्हांच त्याची किंमत कळते । आश्चर्य झालें समस्तांतें । तो प्रकार पाहून ॥९०॥

सुकलाल नामें आगरवाला । होता बाळापुराला । श्रोते त्याच्या आगराला । गाय एक द्वाड होती ॥९१॥

तिनें गांवांत फिरावें । मुलांमाणसां तुडवावें । सशक्तांसी हुंदाडावें । शिंगानें कीं आपुल्या ॥९२॥

वाटेल त्याच्या दुकानांत । गाईनें शिरावें अवचित । धान्याचिया टोपल्यांत । तोंड आपुलें खुपसावें ॥९३॥

वाटेल तितुकें यथेच्छ खावें । राहिलेलें नासावें । तेल तुपाचें लवंडावें । पिंप अंगाच्या धक्क्यानें ॥९४॥

घरीं बांधून ठेवितां । चर्‍हाटें तोडी हां हां म्हणतां । सांखळीसी आणिली लघुता । बांधतां त्या गाईनें ॥९५॥

ती गाय नोव्हे वाघीण । बाळापुराकारण । लोक गेले कंटाळून । त्रास सोसितां तियेचा ॥९६॥

गाभण मुळींच होईना । कास कधींच करीना । कोंडून ठेवितां राहीना । घरामाजीं कोठेंही ॥९७॥

लोक म्हणती सुकलालाला । दे या खाटकास गाईला । किंवा मारुन टाका तिला । तूंच गोळी घालून ॥९८॥

सुकलाल म्हणे लोकांसी । तुम्हीच मारुन टाका तिसी । वाटेल त्या प्रयत्‍नासी । करुन या विबुध हो ॥९९॥

एका पठाणानें तिला । मारण्याचा यत्‍न केला । गोळी भरुन बंदुकीला । टपून बैसला होता हो ॥१००॥

तें कसें काय कोण जाणे । कळलें गाईकारणें । तिनें येऊन शिंगानें । पठाण पाडिला उताणा ॥१॥

मी परगांवा नेऊन । दिली होती सोडून । परी ती आली परतून । त्याला सांगा काय करुं ॥२॥

ऐसें ऐकतां लोक म्हणती । आतां याला एक युक्ति । गोविंदबुवाचा घोडा म्हणती । समर्थानें गरीब केला ॥३॥

तूंही या गाईला । घेऊन जा शेगांवाला । अर्पण करी समर्थाला । म्हणजे अवघें संपलें ॥४॥

साधूस गाय दिल्याचें । पुण्य तुला लाभेल साचें । आणि संकट आमुचें । टळेल बापा त्यायोगें ॥५॥

तें अवघ्यांस मानवलें । गाय नेण्याचें ठरविलें । तिला धरण्यासाठीं केले । प्रयत्‍न नानापरीचे ॥६॥

एकही यत्‍न नाहीं फळला । शेवटीं एक्या पटांगणाला । हरळकुंद्याचा ढीग केला । सरकी ठेवली शेजारीं ॥७॥

ती खायालागून । गाय आली धांवून । ती येतां फांस टाकून । धरिली दहावीस जणांनीं ॥८॥

साखळदंडानें बांधून पुरी । गाय घातली गाडीवरी । आणिली शेगांवा भीतरीं । गजाननासी द्यावया ॥९॥

जवळ शेगांव जसें जसें । येऊं लागलें तसें तसें । स्वभावांत पडलासे । त्या गाईच्या पालट ॥११०॥

समर्थांपुढें येतांक्षणीं । गाय झाली दीनवाणी । तिनें लोचनीं आणून पाणी । पाहिलें त्या पुण्यपुरुषा ॥११॥

महाराज म्हणाले अवघ्यांना । हा काय तुमचा मूर्खपणा । गाईस ऐशा यातना । देणें कांहीं बरें नव्हे ॥१२॥

चारही पाय बांधलेत । गळां साखळदंड लाविलेत । शिंगांचीही तीच गत । केली चर्‍हाटें काथ्याच्या ॥१३॥

ऐसा मोठा बंदोबस्त । शोभतसे वाघिणीप्रत । ही गाय बिचारी साक्षात् । तिला न ऐसें करणें बरें ॥१४॥

अरे खुळ्यांनो, ही गाय । अवघ्या जगाची आहे माय । तिला बांधिलें हाय हाय । केवढा कठीण प्रसंग आला ॥१५॥

तिला आतांच करा मुक्त । ती न हुंदाडी कोणाप्रत । परी लावण्या तिला हात । छाती कोणाची होईना ॥१६॥

जो तो पाहून मागें सरे । तेथ समर्थ आले त्वरें । आपुल्या त्या पुनीत करें । बंधनें तोडिलीं धेनूचीं ॥१७॥

बंधनें अवघीं तुटतां भलीं । गाय गाडीच्या खालीं आली । पुढले पाय टेकिती झाली । समर्थां वंदन करावया ॥१८॥

खालीं घालूनिया मान । प्रदक्षिणा त्या केल्या तीन । समर्थांचे दिव्य चरण । चाटूं लागली जिभेनें ॥१९॥

ऐसा प्रकार तेथें झाला । तो अवघ्यांनीं पाहिला । समर्थांच्या प्रभावाला । शेषही वर्णूं शकेना ॥१२०॥

समर्थ म्हणाले धेनूस । बाई कोणा न द्यावा त्रास । तूं या सोडून मठास । कोठेंही जाऊं नको ॥२१॥

ऐसा घडतां प्रकार । अवघ्यांनीं केला जयजयकार । उच्च स्वरानें त्रिवार । समर्थांच्या नांवाचा ॥२२॥

बाळापूरची मंडळी । बाळापुरा निघून गेली । गाय तेथेंच राहिली । शेगांवासी मठामध्यें ॥२३॥

त्या दिवसापासून । ठावे न तिला चर्‍हाट जाण । सुज्ञ धेनूचे अवघे गुण । तिच्या ठायीं पातले ॥२४॥

अजून त्या शेगांवातें । तिची संतती नांदते । जे कांहीं वदती ब्रह्मवेत्ते । तेंच येतें घडोन ॥२५॥

असो एक कारंज्याचा । लक्ष्मण घुडे नांवाचा । विप्र वाजसनीय शाखेचा । धनकनक संपन्न असे ॥२६॥

त्यासी रोग झाला पोटांत । उपाय केले अत्यंत । परि न आला गुण किंचित्‌ । खर्च सारा व्यर्थ गेला ॥२७॥

त्यानें समर्थांची कीर्ति । कर्णोपकर्णी ऐकिली होती । म्हणून सहपरिवारें सत्वर गती । आला शेगांवाकारणें ॥२८॥

रोगव्यथेनें चालवेना । श्रोते तया लक्ष्मणा । दोघांतिघांनीं उचलून जाणा । आणिले त्या मठांत ॥२९॥

करण्या नुसता नमस्कार । असमर्थ होतें शरीर । त्याच्या कुटुंबानें पदर । समर्थांपुढें पसरिला ॥१३०॥

आणि म्हणाली दयाघना ! । मी आपली धर्मकन्या । माझ्या पतीच्या यातना । हरण कराव्या आपण ॥३१॥

अमृताचें दर्शन । होतां कां यावें मरण । माझ्या कुंकवालागून । टिकवा हीच विनंती ॥३२॥

त्या वेळीं समर्थस्वारी । आंबा खात होती खरी । तोच फेकिला अंगावरी । त्या लक्ष्मणकांतेच्या ॥३३॥

जा दे हा पतीस खाया । व्याधि त्याची बरी व्हाया । तूं शोभसी त्यास जाया । पति-भक्ति-परायण ॥३४॥

यापुढें न कांहीं वदले । चिलीम ओढूं लागले । श्रीगजाननस्वामी भले । आपुल्या मठांत शेगांवीं ॥३५॥

भास्कर म्हणे ’अहो बाई । आतां न बसा ये ठाईं । आपल्या पतीस लवलाही । घेऊन जा कारंज्यातें ॥३६॥

प्रसाद आंब्याचा जो कां तुला । समर्थ-करीं प्राप्त झाला । तोच घाली खावयाला । आपुल्या पतीकारणें ॥३७॥

यानें तुझें होईल काम । गुण येईल अत्युत्तम । लक्ष्मणासी आराम । होईल आंबा खातांच’ ॥३८॥

बाई घेऊन आंब्याला । येती झाली कारंज्याला । प्रसाद खाऊं घातला । आंब्याचा आपल्या पतीस ॥३९॥

निजगृहीं जोडपें आलें । आप्त पुसूं लागले । शेगांवांत काय घडलें । तें सांगावें साकल्यें ॥१४०॥

बाईनें अवघें वर्तमान । कळविलें लोकांलागून । आंब्याचा तो प्रसाद म्हणून । दिला समर्थें मजलागीं ॥४१॥

आणि आज्ञा केली वरी । खाऊं घाला अत्यादरीं । आंबा प्रसाद निजकरीं । आपुल्या त्या पतीला ॥४२॥

त्याप्रमाणें मींही केलें । आज सकाळीं खाऊं घातलें। हें वैद्यांनीं जईं ऐकिलें । तईं त्या वाटलें वाईट ॥४३॥

अहो बाई तुम्ही काय । केलेंत हें हाय हाय । आंबा हेंच कुपथ्य होय । या पोटांतील रोगाला ॥४४॥

माधवनिदानीं हेंच कथिलें । सुश्रुतांनींही वर्णिलें । निघंटानें कथन केलें । शारंगधर म्हणे ऐसेंच ॥४५॥

तुम्ही तो प्रसाद दिलेला । पाहिजे होता भक्षण केला । पत्‍नीचें पुण्य पतीला । उपयोगीं पडतसे ॥४६॥

ऐसें वैद्य बोलले । आप्त अवघे घाबरले । जे ते टोचूं लागले । लक्ष्मणाच्या पत्‍नीस ॥४७॥

परी झालें अघटित । लक्ष्मणाचें पोट सत्य । रेच होऊन अकस्मात । मऊ होऊन गेलें हो ॥४८॥

शौच्यावाटें व्याधि गेली । हळुंहळूं शक्ति आली । पहिल्या परीच होती झाली । प्रकृति लक्ष्मणाची ॥४९॥

निसर्गाच्या बाहेरी । वैद्यशास्त्र कांहीं न करी । तेथें उपयोगी पडे खरी । कृपा देवसंतांची ॥१५०॥

लक्ष्मण बरा झाल्यावर । आला शेगांवीं सत्वर । म्हणे महाराजा माझें घर । पाय लावून पवित्र करा ॥५१॥

मी आलों त्याचसाठीं । चला कारंज्यास ज्ञानजेठी । मला न करा हिंपुटी । नाहीं ऐसें म्हणूं नका ॥५२॥

आग्रह त्याचा विशेष पडला । महाराज गेले कारंज्याला । तेधवां होते संगतीला । शंकर-भाऊ पितांबर ॥५३॥

घरीं नेऊन पूजा केली । दक्षिणा ती निवेदिली । अवघी संपत्ति आपुली । आहे मी कोण देणार ? ॥५४॥

परी एका ताटांत । कांहीं रुपये ठेविले सत्य । महाराज बघून त्याप्रत । ऐशा रितीं बोलले ॥५५॥

म्हणशी माझें कांहीं न उरलें । मग हे रुपये कोठून आणिले ? । लक्ष्मणा ऐसे चाळे । दांभिकपणाचे करुं नको ॥५६॥

मला दिले तूं आपलें घर । आतां उघडीं अवघीं दारें । फेकून देई रस्त्यावर । अवघीं कुलपें येधवां ॥५७॥

लक्ष्मण कांहीं न बोलला । मौन धरुन बैसला । परी समर्थें आग्रह धरिला । खजिन्याचें दार उघडी ॥५८॥

भीत भीत मोकळें द्वार । केलें त्यानें अखेर । खजिन्याच्या उमर्‍यावर । स्वतः जाऊन बैसला ॥५९॥

आणि म्हणाला महाराज यावें । वाटेल तें घेऊन जावें । ऐसें बोलला जरी बरवें । परी अन्यभाव अंतरींचा ॥१६०॥

हें त्याचें दांभिकपण । समर्था आलें कळोन । बहुरुप्याचें राजेपण । कोठून टिके बाजारीं ? ॥६१॥

जैसें कडू वृंदावन । वरुन पाहतां दिसे छान । परी अंतरीं कडवटपण । पूर्ण त्याच्या भरलें असे ॥६२॥

सोडून त्याच्या घरासी । उपासी निघाले पुण्यरासी । दांभिकाच्या सदनासी । संत न होती तृप्त कदा ॥६३॥

तेथें त्याच्या घराची । वा धनदौलतीची । गरज समर्था नव्हती साची । ते वैराग्याचे सागर ॥६४॥

परी तो जें कांहीं बोलला । त्याचा सत्यपणा पाहिला । खोटेंपणाचा राग आला । म्हणून गेले उठोन ॥६५॥

जातां जातां बोलले । माझें माझें म्हणसी भलें । भोग आतां त्याचीं फळें । माझा उपाय त्यास नसे ॥६६॥

मी कृपा करावया । आलों होतों या ठायां । याहीपेक्षां दुप्पट द्याया । परी तें न तुझ्या प्रारब्धीं ॥६७॥

तेंच पुढें झालें सत्य । एका सहा महिन्यांत । अवघी लक्ष्मी झाली फस्त । त्या भिक्षेची वेळ आली ॥६८॥

म्हणून श्रोते परमार्थांत । खोटेपणा न खपे किंचित् । याचसाठीं हें चरित्र । समर्थें घडून आणिलें ॥६९॥

श्रीगजानन चिंतामणी । त्या गार काय शोभा आणी ? । वा सुवर्णालागुनी । भूषवावें का कथिलानें ? ॥१७०॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । श्रीगजाननविजय नामें ग्रंथ । सदा भाविक परिसोत । निज कल्याण व्हावया ॥१७०॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]