कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/हिंदू-मुस्लिम संबंध

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हिंदू-मुस्लीम संबंध


 हिंदू-मुसलमानांच्या संबंधांचा विचार करताना गेल्या अनेक वर्षांतील चुकीच्या राजकारणाचा केवळ काथ्याकूट केल्याने आपण काही मार्ग काढू शकणार नाही, या निष्कर्षाप्रत आता मी येऊन पोहोचलो आहे. चुकीच्या गतराजकारणाचा विचारच केला जाऊ नये, असे मला प्रतिपादन करायचे नाही; परंतु या प्रश्नाकडे आता एका वेगळ्या मूलभूत चिकित्सेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाणे आवश्यक आहे. दुर्दैवाने या दृष्टीचा आपल्याकडे अभाव आहे.
 गतेतिहासाविषयी आपण बाळगत असलेले पूर्वग्रह हे संबंध स्थिर होणाऱ्या मार्गातील एक फार मोठी अडचण आहे. भारतातील आठशे ते हजार वर्षांचा मुसलमानी अंमल हा आपल्या (म्हणजे मुसलमानांच्या) वैभवाचा काळ असल्याचा मूर्ख समज मुसलमानांत प्रचलित आहे आणि या इतिहासाविषयी अनाकलनीय कटुता काही हिंदूंनी बाळगली आहे. हे इतिहासाचे पूर्वग्रह विसरले जाणे अत्यंत आवश्यक आहे. तेवढे ते सोपे नाही, हे मी जाणू शकतो. वर्तमानकाळ अंधकारमय असलेल्या आणि भविष्याबद्दल उदास साशंकता निर्माण झालेल्या काळात गतेतिहासाची शल्ये गोंजारीत बसण्याची मानवी प्रवृत्ती मी समजू शकतो; परंतु त्यातून आपण भविष्याला वळण लावू शकणार नाही, हेही तितकेच स्पष्ट आहे.

 इतिहासाचे पूर्वग्रह आपण विसरायला पाहिजेत', असे मी म्हटल्यानंतर पुण्याला एक हिंदुत्ववादी मित्र चिडले होते! ते म्हणाले, "मुसलमानांचे (इतिहासातील) अत्याचार आम्ही विसरूच शकत नाही."

 मी त्यांना म्हणालो, “हे अत्याचार झालेच असले; तर ते माझ्या पूर्वजांवर झाले आहेत, तुमच्या नव्हेत. आणि म्हणून मी आता (नावाने का होईना) तुमच्यासमोर मुसलमान म्हणून ओळखला जातो आणि तुम्ही मात्र हिंदूच आहात. माझ्या पूर्वजांवर झालेल्या अत्याचारांबद्दल आज या हिंदुत्ववादी मित्रांनी शोक करीत कशाला बसावे, हे मला कळलेले नाही."  अशाच टोकाचा दुसऱ्या प्रकारचा मूर्खपणा मुसलमान करीत असतात. "आम्ही भारतावर अमुक वर्षे राज्य केले" असे म्हणणाऱ्या मुसलमानाचा पूर्वज कदाचित आक्रमक मुसलमानांचा प्रतिकार करताना धारातीर्थी पतनही पावला असेल! कदाचित शूद्र म्हणून तो चातुर्वर्ण्याच्या नरकात तेव्हा पिचत राहिला असेल, कदाचित मुसलमान सत्ताधाऱ्यांनी त्याला 'हिंदू' असल्याबद्दल छळलेही असेल!
 इतिहासाच्या या वेगवेगळ्या अवस्थांतून होत गेलेल्या स्थित्यंतरांबद्दल आज आपण काय करणार आहोत? वास्तविक, आज मी मुसलमान असल्याबद्दल मला काही अभिमान वाटत नाही; त्याचबरोबर कसली खंत बाळगत बसण्याचेही मला काही कारण नाही. या स्थित्यंतराच्या अवस्था समजू शकणारी निरपेक्ष दृष्टी आता आपण सर्वांनीच धारण केली पाहिजे. ही दृष्टी न येण्याचे कारण या इतिहासातच आहे. सुमारे आठशे ते हजार वर्षांच्या मुसलमानांच्या राजवटीत भारतातील एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्के एवढी लोकसंख्या मुसलमान झाली. अखेरी-अखेरीला तर केंद्रीय प्रबळ मुस्लिमसत्ता खिळखिळी झालेलीही पाहण्याचे त्यांच्या नशिबी आले... या काळात हिंदूंची (मी वेगळ्या अर्थाने येथे 'हिंदूंची' हा शब्दप्रयोग वापरला आहे.) राज्येही स्थापन होऊ शकली.
 मुसलमानांचे धर्मांतराचे जे जगव्याळ चक्र तेव्हा फिरत होते, ते भारतात मध्यवर्ती प्रबळ इस्लामी सत्ता दुबळी होताच थांबले गेले; आणि हिंदूची (अथवा या देशातील बहुसंख्य जनता असलेल्यांची, असे आपण म्हणू) प्रबळ मध्यवर्ती सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वीच ब्रिटिशांनी भारतात पाय ठेवला. हिंदू-मुसलमानांच्या (सत्तांच्या) या ऐतिहासिक संघर्षाचा हा जो चमत्कारिक शेवट झाला, त्यामुळे दोन्ही जमातींतील काही गटांना वस्तुस्थितीचे आकलन झालेले नाही. ती वस्तुस्थिती हीच की, भारतातील मुस्लिम सत्ता हिंदू राज्यांनी दुबळी केली आणि पर्यायाने इस्लामीकरणाच्या प्रक्रियेला पायबंद घातला. हिंदू आणि मुसलमान या दोहोंनाही त्याचे नीटसे आकलन झालेले नाही.

 हा सारा प्रकार अप्रत्यक्षरीत्या झाला, हे याचे खरे कारण आहे. मुस्लिमसत्तेच्या वाढीचे चक्र (महाराष्ट्रातल्यासारख्या ठिकाणी) रोखले गेले; परंतु त्या सत्तेचा सरळ-सरळ पराभव झाला नाही.


भारताची फाळणी, स्थलांतरिताचा ताफा : १९४७
 


तसा पराभव होणे, हे दोन्ही समाजांच्या भावी निरोगी संबंधांच्या दृष्टीने योग्य ठरले असते. आणि म्हणून मुसलमानांच्या तथाकथित आक्रमणाला प्रतिप्रहार करण्याची व उलटी प्रक्रिया सुरू करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या हिंदूंची आणि ती प्रक्रिया पुढे चालविण्याची जणू ऐतिहासिक कामगिरीच आपल्यावर नियतीने सोपविली आहे असे मानणाऱ्या मुसलमानांची मानसिक प्रवृत्ती, हे या संघर्षाचे एक कारण आहे.
 येथे हे स्पष्ट केले पाहिजे की, या इतिहासाची खंत बाळगणाऱ्या हिंदूंची संख्या त्या इतिहासाचा वारसा चालविण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या मुसलमानांहून फारच कमी होती. याचे कारण दोन्ही धर्मांच्या मानसिक प्रवृत्तींत आपल्याला शोधावे लागेल. मोक्षाच्या कल्पनेने भारावलेल्या हिंदूमनाने चुकीच्या बंधनांच्या शृंखला स्वीकारल्या, त्याचबरोबर अशी खंत बाळगण्यापासून ते

मुक्तही होऊ शकले. अतिरिक्त व्यक्तिस्वातंत्र्याने समाजाचा विचार करण्याची पात्रता ते गमावून बसले; परंतु त्याचबरोबर विचार करण्याची परंपरा ते निर्माण करू शकले. विचार करण्याची आणि वेगळे विचार ऐकून घेण्याची हिंदूमनाला गेल्या हजारो वर्षांची सवय आहे. त्यामुळे तटस्थपणे कठोर आत्मपरीक्षण करण्याची मनोवृत्ती त्यांच्यात निर्माण होऊ शकली. या इतिहासाकडे पाठ फिरवली पाहिजे, हे त्यांतील बहुसंख्य समजू शकले.
 मुस्लिम मनाला विचार करण्याचीच सवय नव्हती आणि नाही. 'किताबी मजहब' (Religion of Books) श्रेष्ठ असल्याच्या तथाकथित परंपरागत समजुतीत ते इतके गुरफटले गेले की, मुसलमानांचे जे-जे ते चांगले असाच त्यांचा समज होऊन बसला. हा समज अद्यापही कायम आहे. महंमद पैगंबराला फक्त सेमिटिक धर्मसंस्थापकांचीच माहिती होती. त्यामुळे त्याने 'त्या धर्मसंस्थापकांना पैगंबर माना', असे म्हटले. भारतातील धर्माची त्याला माहिती नव्हती, हे सर्व इतिहासकारांनी तर नमूद केलेच आहे; परंतु पैगंबराच्या काही चरित्रकारांनीदेखील मान्य केले आहे. उदा. : Ideal Prophet by Khaja Kamaloddin आणि योगायोगाने प्रत्यक्ष पराभव (भारतात) होऊ न शकल्यामुळे वैचारिक आवर्तने या समाजात निर्माण होऊ शकली नाहीत.
 आपल्याकडे राजकीय जागृतीचा काळ आला, तेव्हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात मुसलमान समाजाने प्रचंड प्रमाणात भाग घेतल्यामुळे तो भरडून निघाला होता. आधी आधुनिक शिक्षणाकडे त्याने पाठ फिरविली आणि मागाहून शिक्षण घेण्याची त्याला आवश्यकता वाटू लागली ती सर्व प्रकारच्या संधी हिंदू समाजाला लाभतील, या न्यूनगंडाच्या जाणिवेतून. आधुनिक शिक्षणाने मुसलमान समाजाचा हिंदू समाजाकडे पाहावयाचा मूलभूत दृष्टिकोन वास्तविक बदलायला हवा होता, परंतु तो बदलला नाही. एक प्रकारच्या घाईने घेतलेल्या शिक्षणाने निर्माण झालेली मुसलमानांची पहिली पिढी आधुनिक विचारांनी न भारावली जाता, नव्या लोकशाहीच्या (एक व्यक्ती : एक मत) जमान्यात कारभार हिंदूंच्या हातात जाणार, या विचाराने भयभीत झाली.
 वास्तविक, भयभीत होण्यासारखे काहीच नव्हते. किंबहुना, ती अगदी स्वाभाविक प्रक्रिया घडून येणार होती. एके काळी शासकाच्या मनोवृत्तीतून वागणूक देणाऱ्या मुसलमानांना हिंदूंच्याबरोबरच्या दर्जाची कल्पना मानवेनाशी झाली आणि मुसलमानांच्या राजकीय चळवळींची सुरवात ही अशी वेगळेपणाच्या मागण्यांची मुहूर्तमेढ ठरली. बहुसंख्यांक हिंदूंनी मुसलमानांच्या न्याय्य अधिकारांवर गदा आणली असती, असे समजण्यासारखी कोणतीही घटना घडलेली नव्हती. काँग्रेसच्या स्थापनेनंतर भारतातील सर्व जमातींना तिच्या आशा-आकांक्षांशी समरस करून घेण्याचे प्राथमिक प्रयोग काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होते.

 मुसलमान आधी या चळवळीबद्दल उदासीन होते आणि जेव्हा तिचे स्वरूप त्यांना जाणवले, तेव्हा त्यांनी आपल्या अधिकाराची भाषा सुरू केली. ही अधिकारांची मागणी करणारे मुस्लिम लीगचे नेतृत्व मुसलमानांत असलेल्या स्वत:च्या वेगळेपणाच्या जाणिवेचाच फायदा घेत होते. त्या आधीच्या मुसलमानांतील साऱ्या धार्मिक आणि राजकीय चळवळींची दिशा अशी या बंदिस्त मनाने ठरवून दिली होती. देवबंद येथील इस्लामी धर्मविचारांची चळवळही अशाच प्रकारच्या इस्लामच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून उगम पावली होती. ब्रिटिश सरकारविरुद्ध तिचा रोख होता, हे खरे; पण तिचा हेतू भारतात इस्लामी राज्य निर्माण करणे, हा होता. ब्रिटिशांनंतर ती हिंदूंविरुद्ध शस्त्र उगारणार, असाच याचा अर्थ होता.
 आधुनिक शिक्षणाने युक्त असलेले सारेच मुसलमान या विचाराचे प्रतिनिधित्व करीत नव्हते, हे खरे; परंतु जे करीत नव्हते, ते भौतिकवादाकडे आकर्षित होत होते. याचे कारण स्पष्ट आहे. धर्माचा त्याग केल्याखेरीज त्याला आधुनिकतेचा स्वीकारच करता येत नाही, अशी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली होती आणि आजही काही प्रमाणात अस्तित्वात आहे. सुशिक्षित मुसलमान हा एक तर परंपरागत धार्मिक विचारांतच गुरफटून राहतो किंवा त्याचा त्याग करून मोकळा होतो, या दोन एकांतिक टोकांकडे लंबकासारखा हेलकावे खात असतो. कारण धर्माचा आधुनिक अन्वयार्थ लावण्याची हिंमत तो करू शकत नाही. (धार्मिकतेचा आता नव्याने विचार केला पाहिजे, असे एका मुसलमान मित्राजवळ मी एकदा म्हणालो; तेव्हा त्याने मला ‘आहे त्याच्यापलीकडे विचार करायचा नाही, अशी कुराणाची आज्ञा असल्याचे उत्तर दिले!)
 हिंदू-मुसलमानांच्या संघर्षमय संबंधांचे हे एक कारण आहे. तथापि, त्याचबरोबर हिंदू धर्माच्या चातुर्वर्ण्याच्या पद्धतीने केलेला आघातही आपल्याला कमी लेखून चालणार नाही. धर्मांतर झालेल्याला बहिष्कृत केले गेल्याने, त्याच्याशी फटकून वागल्याने मुसलमानांच्या वृत्ती हिंदूविरोधी बनण्यास हातभार लागला आहे; कारण मुळात तो हिंदूच होता, बाहेरून येथे आला नव्हता. सांस्कृतिक दृष्ट्या हिंदूहून त्याचे काहीच वेगळे नव्हते. हा वेगळेपणा निर्माण करावयास धार्मिक श्रेष्ठतेच्या कल्पनेने मुसलमानांनी जसा जाणूनबुजून प्रयत्न केला, तसाच हिंदूंनी आपल्या चातुर्वर्ण्याच्या पद्धतीने अजाणता का होईना फटकून वागण्याने केला. त्यामुळेच इथल्या मुसलमानी मनाची जडण-घडण ही केवळ खास मुसलमानी राहिलेली नाही; चातुर्वर्ण्याच्या संदर्भातील ती हिंदूविरोधी बनली आहे. जीनांनी या साऱ्याचा फायदा घेतला!

 मुसलमानांतील लीगचे नेतृत्व आणि राष्ट्रवादी नेतृत्व यांच्यातील एका चमत्कारिक विरोधाभासाकडे कुणाचे फारसे लक्ष गेलेले नाही. मुस्लिम लीगचे नेते वृत्तीने आधुनिक, परंतु लोकशाहीविरोधी (किंबहुना दहशतवादी) होते; तर राष्ट्रवादी (मुस्लिम) नेतृत्व सनातन, परंपरागत परंतु लोकशाहीला मानणारे होते. आपल्या लोकशाहीविरोधी आकांक्षा साध्य करण्यासाठी लीगवाल्यांनी धर्माचे साधन वापरून सारा मुसलमान समाज आपल्यामागे संघटित केला आणि सनातन नेतृत्वाला हतबल केले. लीगच्या नेतृत्वाच्या कर्तबगारीपेक्षा या राष्ट्रवादी सनातन नेतृत्वातील उणीव याला अधिक कारणीभूत ठरली, कारण धर्माचे आधुनिक स्वरूप मुसलमान समाजासमोर हे नेतृत्व स्पष्ट करू शकले नाही.
 जीना आधुनिक विचारांचे होते, म्हणून त्यांचा गौरव करता येणे शक्य नाही; कारण सत्तेच्या आपल्या आकांक्षांखातर त्यांनी ज्या शक्ती मोकाट सोडल्या, त्या गेली अठरा वर्षे झाली तरी आटोक्यात येऊ शकलेल्या नाहीत. मुसलमानांना जीनांनी प्रथम वेगळ्या राष्ट्रवादाची प्रेरणा दिली नाही, हे जितके खरे; तितकेच मुसलमानांतील या प्रेरणेला आपल्या हेतुखातर त्यांनी मोकाट सोडले, हे विसरता येणार नाही. जीनांच्या साऱ्या राजकारणाचे सूत्र हिटलरच्या राजकारणाशी फार जुळते आहे. अखेर हिटलर हा प्रामाणिकपणे जर्मन वंशाच्या श्रेष्ठतेवर विश्वास ठेवत होता आणि जीनांचा तसा (मुस्लिमश्रेष्ठतेवर) नव्हता, म्हणून जीनांचे कृत्य कमी गर्हणीय ठरत नाही. वेगळ्या राष्ट्रविस्ताराची जीनांची प्रेरणा मूलतः हिटलरच्या जर्मन राष्ट्राच्या विस्ताराच्या कल्पनेहून भिन्न नव्हती. शिवाय, हिंदूंच्या बहुसंख्यतेने मुसलमानांचे हित खरोखर धोक्यात येणार नाही, हे समजण्याइतके ते दूधखुळे नव्हते. जीना केवळ मुसलमानांच्या हिताचीच भाषा बोलत नव्हते, तर इस्लाम धोक्यात असल्याची आरोळी त्यांनी ठोकली होती. हिंदु धर्माचे स्वरूप पाहता, दुसऱ्या धर्मावर तो कुरघोडी करणे शक्यच नव्हते व नाही. कारण धार्मिक विस्तारालाच त्यात वाव नव्हता. धर्माच्या विस्ताराची कल्पना खरे म्हणजे इस्लाममध्ये होती (किंवा आहे) आणि म्हणून पाकिस्तान इस्लामी राज्य जाहीर केले गेल्यानंतर इतर धर्मीयांना दुय्यम नागरिकत्व लाभावे, यात मला आश्चर्य वाटले नाही. (भारतातील अल्पसंख्य आणि पाकिस्तानातील अल्पसंख्य यांच्या स्थितीत आपल्याला यामुळेच फरक दिसतो.)
 माझ्या मते, जीनांच्या विस्तारवादाच्या प्रेरणा याच मध्ययुगीन भारतातील इस्लामी राजवटीतून निर्माण झाल्या होत्या. भारतात इस्लामी सत्ताधाऱ्यांचे आगमन होण्यापूर्वी जशी तेव्हा वेगवेगळी राज्ये अस्तित्वात होती, तशी काहीशी परिस्थिती स्वातंत्र्यानंतर पुन्हा भारतात निर्माण होईल आणि आपण त्याचा फायदा

घेऊ शकू, असा जीनांचा कयास असावा, असे समजावयास आधार आहे. भारतात संस्थानांचे त्वरित विलीनीकरण झाल्याने जीनांच्या या आकांक्षांना तडे गेले. पाकिस्तानचे आजचे भारताविषयीचे वैर हे या भ्रमनिरासातूनही उद्भवलेले आहे.
 भारतातील हिंदू-मुस्लिम संबंधांचा या साऱ्या परिस्थितीतून विचार करायचा, तर तथाकथित मुस्लिम राष्ट्रवादी नेतृत्वाचे अपयश ठळकपणे नजरेत भरते. मुसलमान समाजाला हे नेतृत्व एके काळी वेगळ्या राष्ट्राच्या जाणिवेपासून परावृत्त करू शकले नाही, तर स्वातंत्रोत्तर काळात उर्वरित भारतातील मुसलमानांना बहुजन समाजाच्या आशा-आकांक्षांशी ते समरस करू शकले नाही. याचे कारण ते सनातनी, परंपरागत होते आणि आहेत, हेच होय. मुसलमानांच्या वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला ते विरोध करीत होते, एवढ्या अर्थाने ते नेतृत्व निश्चितच राष्ट्रवादी होते. याचा अर्थ, ते भारतीय राष्ट्रवादाची कल्पना मान्य करीत होते, एवढाच होतो; परंतु या नेतृत्वापाशी वेगळेपणाची जाणीव होतीच. ते मुसलमान म्हणूनच स्वत:चा विचार करीत होते. मुसलमान समाजाचा वेगळेपणा त्याला कायमच ठेवायचा होता. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्वकाळी जातीय मागणीला विरोध करीत असल्याचे दिसणारे हे नेतृत्व स्वातंत्र्योत्तर काळात स्वत:च जातीय बनल्याचे दृश्य आपल्याला दिसून आले. याचा परिणाम मुसलमान समाज त्या जुन्याच कल्पनांत गुरफटून राहण्यात झाला. त्याला जुन्या परंपरागत धार्मिक कल्पनेतून आता मुक्त केले पाहिजे.
 हे कार्य आपण कसे पार पाडणार आहोत?
 मुसलमानांना उपेक्षिततेने वागवणाऱ्या चातुर्वर्ण्याची चौकट आता खिळखिळी झाली आहे, परंतु मुस्लिम परंपरागत मनोवृत्तीला मात्र अद्याप धक्का लागलेला नाही. तिच्यावर आघात केले जाण्याची आता आवश्यकता आहे आणि ते परंपरागततेचा त्याग केलेल्या मुसलमानांनीच केले पाहिजे. मुस्लिम स्त्रियांची चळवळ हा असा आघात करण्याचा एक अल्प प्रयत्न! आपल्या खऱ्या अथवा काल्पनिक गाऱ्हाण्यांचा बागुलबुवा उभा न करता बहुजन समाजाच्या इच्छाआकांक्षांशी समरस होण्याची प्रवृत्ती मुसलमान समाजात निर्माण होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू समाजाने मुसलमानांना अनुदारतेने वागविले, असे मानायला काही आधार नाही. त्यांच्या विरुद्ध दंगे झाले असतील, तर ती त्यांनीच पाकिस्तानच्या प्राप्तीसाठी सुरू केलेल्या दंगलीच्याच चक्राची प्रतिक्रिया होय. दुखावलेल्या अंत:करणाने अलिप्ततावादाची जोपासना करून दंगे थांबणार नाहीत. हिंदू समाजाच्या मनात बसत असलेला अविश्वास कृतीने नष्ट केल्याने आणि त्यांचा विश्वास संपादन करूनच मुसलमानांना स्वत:चे रास्त स्थान प्राप्त करून घेता येईल.

 त्याचबरोबर सारा मुसलमान समाज हा १९४७ च्या मनोभूमिकेत वावरत असल्याचे गृहीत धरण्याचा मूर्खपणा करूनही आपण त्यांच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणू शकणार नाही. आज त्या समाजातही विचारमंथन सुरू झाले आहे. नेटकी, अचूक दिशा दाखविण्याचे सततचे प्रयत्न त्या समाजातील काही माणसे जिद्दीने करीत आहेत, त्यांची दखल घेतली गेली पाहिजे; नव्हे, त्यांना बहुजन समाजाने पाठिंबा दर्शविला पाहिजे. अखेर सर्वांबद्दल अविश्वास दर्शविल्याने आपण काहीच साध्य करू शकणार नाही.
 आज मुसलमान समाजात विविध प्रवृत्ती अस्तित्वात आहेत. पाकिस्तानविषयीचा जिव्हाळा तर आहेच आहे. (तो केवळ आपण संतापून नष्ट होणार नाही. आपल्या कल्याणाकरिता पाकिस्तानची आवश्यकता आहे, असे मानणाऱ्या समाजाची पाकिस्ताननिष्ठा- ती कितीही चुकीची, राष्ट्रीय निष्ठेशी विघातक आणि संतापजनक असली तरी- समजून घेतली पाहिजे. ती नष्ट करायची असेल, तर पाकिस्तानबाबतीत वेगळे, खंबीरतेचे धोरण अमलात आणले पाहिजे. हिंदू देशबांधवच तुमचे हित आणि जीवित सांभाळतील, पाकिस्तान नव्हे; हे पाकिस्तानला प्रतितडाखे देऊनच आपण सिद्ध करू शकू, त्या समाजावर संताप काढून नव्हे!) सर्वसाधारणपणे- काँग्रेसच्या पाठीशी राहण्याकडे आज मुसलमान समाजाचा कल आहे. परंतु त्यांच्यातील एकसंध वृत्तीही संपलेली नाही. त्याचबरोबर तिचा आविष्कार होण्याचे त्या समाजाच्या एकसंधत्वाचे सामर्थ्य लयाला गेले आहे. एक प्रकारच्या पराभूत मनोवृत्तीत ती आज वावरत आहे. मुसलमान समाज अद्याप जातीयवादीच आहे. तथापि, आक्रमक जातीयवाद आणि बचावात्मक जातीयवाद यांच्यातील फरक आपण ओळखला पाहिजे. एखाद्या समाजाच्या चुकीच्या निष्ठा जेव्हा बचावात्मक पवित्रा धारण करतात, तेव्हा त्यांना आता तडे जात असल्याची विदारक जाणीव त्या समाजाला होऊ लागली असल्याचे हे लक्षण आहे. त्यांच्यातील भ्रमनिरास झालेल्या नव्या पिढीला आपण जवळ करायला हवे, कारण त्याखेरीज त्यांच्यात नव्या मनोवृत्तीचा उदय होऊच शकणार नाही.
 'अल्पसंख्याकांचे अधिकार' म्हणून जे काही मागण्यात येते, ते अतिशय अवास्तव आणि चुकीचे असते. अल्पसंख्याकांचे अधिकार तरी कोणते? माझ्या मते, अल्पसंख्याकांना धर्म (म्हणजे धर्माची अध्यात्माची जी बाजू आहे, तेवढ्यापुरता) पाळण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि तो अल्पसंख्याक असल्यामुळे त्याला कुठली संधी नाकारली जाता कामा नये; याखेरीज कोणत्याही वेगळ्या मागणीचा कधी विचार केला जाता कामा नये. कारण या मागण्या आपली अलिप्तता अथवा वेगळेपणा कायम टिकविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असतो.
 ज्या उदारमतवादी अल्पसंख्य मुसलमान समाजातून परंपरागत नेतृत्वाचा त्याग केला जाण्याची शक्यता होती, तो जीनांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताने साफ निकालात निघाला, ही हिंद-मुसलमान संबंधांतील एक मोठीच शोकांतिका आहे. भारतात त्याला महत्त्व उरले नाही आणि पाकिस्तानात तो देशद्रोही समजला गेला. या उदारमतवाद्यांच्या प्रवाहाचे संगोपन आपण पुन्हा करणे आवश्यक आहे. पाकिस्तानात ए. के. ब्रोही, जी. एम. सय्यद आदींच्या रूपाने तो अद्याप अस्तित्वात आहे. त्याचबरोबर फाळणीला विरोध करणाऱ्या पाकिस्तानातील गटांची झालेली ससेहोलपट आपण मुकाट्याने पाहत राहण्याचा भयानक गुन्हा केला आहे. सरहद्द गांधी, खान अब्दुल सयदखान, फझलुल हक आणि खिजर हयातखान तिवाना आदींची शोकांतिका ही खरी आपल्या नालायक नेतृत्वाच्या कर्तृत्वहीनतेची शोकांतिका होय. आता ती चूक सुधारली गेली पाहिजे. भारताचे विघटन करण्याचे पाकिस्तानने ठरवले, तरी ते घडवून आणणे तेवढे सोपे नाही. कारण नागप्रदेश अथवा मिझो जिल्हा हा भारताच्या एकूण क्षेत्रफळातील अत्यल्प भाग आहे. तथापि, पूर्व पाकिस्तान अथवा सरहद्द प्रांत म्हणजे तीन-चतुर्थांश पाकिस्तान आणि तेवढा सारा भाग आज असंतोषाने पेटलेला असूनही आपण मुकाट्याने ते पाहत बसलो आहोत. कसलीही अपेक्षा न बाळगता या विभागांतील चळवळींना सातत्याने मदत करीत राहणे आणि पाकिस्तानने प्रहार केल्यास जबरदस्त प्रतिप्रहार करणे, हेच पाकिस्तानबाबतीत धोरण ठेवले गेल्यास भारतपाक संबंध आणि पर्यायाने येथील हिंदू-मुसलमान संबंध स्थिर होण्यास साह्यभूत ठरेल. अखेर हे दोन्ही देश एकत्र येणार असतील, तर केवळ आपल्या लष्करी बळावर आपण आणू, असे समजणे हीदेखील आत्मवंचनाच ठरेल. याबाबतीत पाकिस्तानातदेखील आपल्याला सदिच्छा आणि नव्या प्रवृत्ती निर्माण कराव्या लागतील. हे आपल्याला काळाचे आणि इतिहासाचे आव्हान आहे, ते स्वीकारण्याची जिद्द आपण दाखविली पाहिजे. मुसलमानांनी परंपरागततेचा त्याग केल्याने या कार्याला गती मिळणार आहे. त्याबरोबर मुसलमानांविषयीच्या सार्वत्रिक संशयाला मूठमाती दिल्याने त्यातील अडचणी दूर होणार आहेत. ज्यांना ज्यांना हे कार्य प्रिय वाटते, त्या-त्या साऱ्यांनी एकत्र येऊन हे आव्हान पार पाडले पाहिजे. सध्याचा काळ त्याला अधिक अनुकूल आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.
 राज्यघटनेने आपला देश धर्मातीत केलेलाच आहे. या धर्मातीततेच्या आधारेच आपण पुढे पाऊल टाकू या. अल्पसंख्याक जमातींनी खरे म्हणजे धर्मातीततेचा प्रवाह अधिक बळकट केला पाहिजे, कारण त्यामुळे त्यांच्या हक्कांना आपोआपच न्याय्य संरक्षण लाभते. परंतु, मुसलमान लोक धर्मातीतपणाचा उदो-उदो करतात, तेव्हा ते धर्मातीत नसतात; धर्मातीततेचे फायदे फक्त त्यांना हवे असतात आणि जबाबदाऱ्या हिंदूंच्या माथ्यावर झटकून ते पुन्हा वेगळे राहू इच्छितात. हे यापुढे चालू देता कामा नये. आपण सर्वांनी समान अधिकार आणि समान जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. या दृष्टीने दोन्ही समाजांना जवळ आणण्याच्या कामी सर्वांसाठी समान नागरी कायदा क्रांतिकारक ठरेल. शासन जर असा कायदा करीत नसेल, तर शासनाला तो करावयास भाग पाडण्यात आले पाहिजे. मुसलमानांत आधुनिकतेची प्रवृत्ती निर्माण व्हावयास त्यामुळे फार साह्य होईल. वेगळ्या शाळा, वेगळी भाषा, वेगळा शिक्षणक्रम या साऱ्यांनाच आता तिलांजली दिली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान एकत्र येण्याआधी येथील हिंदू-मुसलमान समाज एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे हे विवेचन मी केले आहे, ते अपुरे आहे; परंतु लेखनमर्यादेनुसार पुरेसे आहे, असे वाटते. या सबंध प्रश्नाला अनेक अंगे आहेत. त्या दृष्टीने सर्वांगीण प्रयत्नांची आवश्यकता आहे. परंतु जे प्रयत्न करायचे ते चुकीचे असू नयेत, एवढा मात्र माझा आग्रह आहे. कारण चुकीच्या प्रयत्नांची फळे आपण सध्या भोगतो आहोत.

'वसंत' मासिक :
 
सप्टेंबर १९६६