कांकड आरती

विकिस्रोत कडून

<poem> कांकड आरती 1

उठा उठा हो साधक । साधा आपुलालें हित।। गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत।।1।।

उठा उठा हो वेगेंसीं। चला जाऊं राऊळासी।। हरतिल पातकांच्या राशी। कांकड आरती पाहोनी ।।धृ।।

उठोनियां हो पाहाटें । पाहा विठ्ठल उभा विटे।। चरण तयाचे गोमटे। अमृतदृष्टीं अवलोका।।2।।

जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निजसुरा।। देगें निंबलोण करा। दृष्ट होईल तयासी।।3।।

पुढें वाजंत्री । ढोल दमामे गर्जती।। होत कांकड आरती । माझ्या पंढरीरायाची।।4।।

सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ।। केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ।।5।।

कांकड आरती 2

कांकड आरती परमात्मया रघुपती । जीवीं जीवा ओंवाळिन निजीं निजात्मज्योति ॥धृ॥

त्रिगुणकांकडा द्वैतघृतें तिंबिला । उजळली आत्मज्योति तेणें प्रकाश फांकला ॥१॥

काजळी ना दीप अवघें तेज डळमळ । अवनी ना अंबर अवघा निगूढ निश्चळ ॥२॥

उदय ना अस्त जेथें बोध प्रातःकाळी । रामी रामदास सहजीं सहज ओंवाळी ॥३॥

कांकड आरती 3

हाटाचे तातडी दामा शिंपी गेला | नैवेद्य पाठविला | नाम्यासंगे ||

नैवेद्य घेऊनि राऊळासि गेला | हाका मारी त्याला | 'विठ्या' 'विठ्या' ||

नाम्याने नैवेद्य कुंचीखाली झाकिला | आणुनी ठेविला | देवापुढे ||

नाही अमंगळ | नाही हो ओंगळ | केली मी आंघोळ | चंद्रभागे ||

ऊठ झडकरी जेवी लवकरी || माता माझी घरी वाट पाहे ||

नेणता म्हणोनी का रे जेविनासी | करीन प्राणासी घात माझ्या ||

पाषाणाची मूर्ती कापे थराथरा | जेवी भराभरा नाम्यासंगे ||

पाषाणाची मूर्ती नाम्यासंगे जेविली | जगी कीर्ती झाली जनी म्हणे ||

नामा म्हणे माझी वडिलांची ठेव | उभा आहे देव विटेवरी ||

कांकड आरती 4

भक्तीचिये पोटीं बोध-कंकडा ज्योती । पंचप्राण जीवेंभावे ओंवाळूं आरती ॥ १ ॥

ओंवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडूनि चरणी ठेविला माथा ॥ ध्रु. ॥

काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती । कोटी ब्रम्हहत्या मुख पाहतां जाती ॥ २ ॥

राई रखुमाबाई उभ्या दोन्ही दों बाहीं । मयूरपिच्छचामारें ढाळिती ठईंच्या ठाईं ॥ ३ ॥

विटेसहित पाय म्हणुनी भावे ओंवाळूं । कोटी रवी-शशी दिव्य उगवले हेळूं ॥ ४ ॥

तुका म्हणे दिप घेउनी उन्मनींत शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ ५ ॥

कांकड आरती 5


उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥१॥

संत साधु मुनि अवधे झालेती गोळा । सोडा शेजमुख आतां पाहूं द्या मुखकमळा ॥२॥

रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी । मन उतावेळ रुप पाहावया दृष्टीं ॥३॥

राई रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया । सेजें हालवुनी जागें करा देवराया ॥४॥

गरुड हनुमंत उभे पाहाती वाट । स्वर्गींचे सुरवर घेउनी आले बोभाट ॥५॥

झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।


कांकड आरती 6

श्रीगुरुदत्ता कांकड आरती ओवाळित आतां । तुजला ओवाळित आतां । भावें ओवाळित आतां । निद्रातीत जागृत असतां न येचि उठवितां ॥ध्रु०॥

माया वस्त्रांतुनि हे चिंधी सांपडली मजला । नरतनु सांपउली मजला । अवचित सांपडली मजला । वाया न जाऊं द्यावी म्हणुनी काकडा केला ॥१॥

विद्या अविद्या द्वैत उठतां त्रिपुटी उद्‌भवली । मायिक त्रिपुटी उद्‌भवली । सद्वस्तूचें स्मरणहि नसतां पीळ पडुनि गेली ॥२॥

मोहरुपें स्नेंहांत बुडवुनि ज्योती लावियली । स्वयंज्योती लावियली । परंज्योती लावियली । पाहुनि सद्‌गुरु बाबा राम म्हणे निशा सरली ॥३॥


कांकड आरती 7

पंचप्राण काकड आरती तत्त्वात्मक ज्योती । लावुनि तत्त्वात्मक ज्योती । ओवाळिला श्री त्रयमूर्तिं परमात्मा प्रीती ॥ध्रु०॥

ओवाळूं आरती माझ्या सद्‌गुरुनाथा । स्वामी श्रीगुरुनाथा । शरण मी आलो तुज । शरण मी आलो तुज । श्री पदीं ठेवियला माथा ॥१॥

कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमीं । राहे यतिवर तरुतळीं । तो हा माझा कुलस्वामी । ओवाळूं०॥२॥

द्वारीं चौघडा वाजे वाजंत्री वाजती । कर्णे वाजंत्री वाजती। नाना घोषें गर्जत । नाना वाद्यें गर्जत । भक्त स्वानंदें स्तविती ॥ओवाळूं ॥३॥

इंद्रादि सुरवर पन्नग दर्शनास येती। श्रीचे दर्शनास येती । नारद मुनिवर किंन्नर तुंबर आळविती ॥ओवाळूं॥४॥

पाहुनि सिंहासनीं आदि मूर्ति सांवळी । चिन्मय मूर्ति सांवळी । श्रीगुरुभक्त तन्मय । श्रीगुरुभक्त निर्भय श्रीपदीं ओवाळी ॥ओवाळूं॥५॥

कांकड आरती 8

काकड आरती स्वामी श्रीगुरुदत्ता । सद‌भावें ओवाळूं चिन्मयरुप अवधूता ॥ध्रु०॥

प्राणापान समान व्यान उदान मिलाले । सुषुम्णेचे मार्गें दर्शनासि पातले ॥१॥

सोऽहं शब्दध्वनि मिळोनि सर्वांनी केला । दशनादाचा घोष अखंडित चालिला ॥२॥

कुंडलिनीचा वेढा काढुनि काकडा केला । सत्रावीचें धृत घेउनी पूर्ण भिजवीला ॥३॥

सद्‌गुरु वाक्याचा चिन्मय प्रकाश पडला । निश्चय काकडा नेऊनि तेथें पेटविला ॥४॥

निरंजन ओवाळूं जातां तद्रूप झाला । सद्‌गुरुप्रसादें अहंभाव निमाला ॥५॥


कांकड आरती 9


काकडे आरती दत्ता तुजला ओवाळूं । प्रेमभावें तुझे चरण हृदयीं कवळूं ॥ध्रु०॥

माया अविद्या एकत्र वळुनी काकडा केला । स्वरुपानुस्मरणें स्नेहामाजी भिजवीला ॥१॥

विवेकज्ञानाग्नि ज्वाळेवरि सहसा पाजळिला । पेटुनियां झगझगीत उजेड हा पडला ॥२॥

द्वैत ध्वांता समूळ ग्रासुनि मनोन्मनी शोभा । फांकली तेव्हां पळत सुटे कामादिक शलभा ॥३॥

धावुनि आपोआप येती कामादिक शलभ । जळती ज्यांचा अंत योगियां दुर्लभ ॥४॥

काकडे आरती ऐशी उजलूं सोज्वळ ।

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.