Jump to content

कर्तबगार स्त्रिया/मिसेस् फॉसेट्

विकिस्रोत कडून

ह्या अंधळ्याच्या बायकोनें स्त्रीजात डोळस बनविली!


मिसेस् फॉसेट : ३ :


 इंग्लंडांतील स्त्रियांचें बंधविमोचन व्हावयास हवें, ही ध्वजा मोठेपणीं हातीं घेतलेल्या या स्त्रीचा जन्म १८४७ साली इंग्लंडच्या सफोक परगाण्यांतील अंडेबर्ग येथे झाला. हें खेडेंगांव म्हणजे ज्याच्याकडे कुणी ढुंकूनहि पाहूं नये, असेंच होतें. कुग्राम, दरिद्री, आणि सर्वथा मागासलेले असलें हें खेडें इंग्लंडांतील एका पराक्रमी स्त्रीला जन्म देणार आहे, असें भाकित जर आधीं कुणीं केलें असतें, तर लोकांनी त्याला वेड्यांतच काढलें असतें. पण एक गोष्ट ध्यानांत हवी कीं, सगळा गांव जरी निजलेला असला, तरी न्यून् गॅरेट म्हणजे मिसेस् फॉसेट् यांचे वडील हे मात्र नेहमीं जागे राहिलेले असत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारला ते लंडनच्या धान्यबाजाराला जात आणि चांगल्या प्रकारचा उदीम करीत. भोवतालचे लोक म्हणत कीं, 'शेठजींना आळस म्हणून कधीं नाहींच. दर पंधरा दिवसांनीं यांची लंडनला खेप असायचीच.' त्यांच्या व्यापाराटापारांत कितपत माया त्यांना जमा करतां आली, हें आपल्याला माहीत नाहीं; पण एक गोष्ट मात्र खरी कीं, लंडनच्या खेपा सारख्या केल्यानें गॅरेट शेठजींना नागर जीवनाची आणि स्त्रीशिक्षणाची थोडीशी कल्पना आलेली होती. गांवचे लोक घोरत पडलेले असले, तरी यांनीं मात्र आपल्या कुटुंबांत, घरगुती पद्धतीनेंच कां होईना, पण शिक्षणाचा फैलाव चांगला केलेला होता.
 मिसेस फॉसेट् यांचें माहेरचें नांव मिलिसंट असें होतें. मिलिसंटच्या वडील बहिणींचें शिक्षण हा गांवांत एक मोठा वादाचा मुद्दा बनून राहिला होता. परंतु न्यूसन् हे स्त्रीशिक्षणाचे पक्षपाती बनलेले असल्यानें, विरोधाला न जुमानतां वडील मुलगी एलिझाबेथ हिचें दुय्यम शिक्षण पुरें करून तिला वैद्यकाचें शिक्षण देण्याचें त्यांनी ठरविलें. १८६५ च्या सुमारास सुद्धां मुलींना वैद्यकाचें शिक्षण देणें म्हणजे इंग्लंडांतील वैद्यकाचीं महाविद्यालयें पापच मानीत. कोणच्याहि कॉलेजांत अर्ज करावा, तर मुख्याधिकाऱ्यांनी कळवावें कीं, 'बायकांना आमच्या कॉलेजांत प्रवेश नाहीं.' परंतु, न्यूसन आणि एलिझाबेथ यांनीं एक खटलाच लढवायचें ठरवलें.
 वैद्यकाच्या कायद्यांत असें म्हटलें होतें कीं, 'अभ्यासाची सिद्धता झालेल्या सर्व माणसांना वैद्यकाच्या परीक्षेला बसण्याचा हक्क असावा.' न्यूसन गॅरेटनीं अर्ज केला कीं, " 'सर्व माणसांनीं' या शब्दांत स्त्रियांचाही समावेश झालाच पाहिजे; कारण स्त्रिया माणसेंच आहेत!" हे प्रकरण पुष्कळच गाजलें; आणि शेवटीं पंचांनीं आपला निकाल एलिझाबेथच्या बाजूनें दिला. एलिझाबेथ डॉक्टरीण झाली; आणि व्यवसाय करूं लागली. या लढ्याचा परिणाम मिलिसंट हिच्या मनावर फारच झाला.
 तिचें शिक्षण चालूच होतें; पण इंग्लंडांतही इतक्या अलिकडच्या काळांत सुद्धां स्त्रीशिक्षणाची व्यवस्था असावी तशी नव्हती; म्हणून न्यूसन् यांनीं घरच्या घरींच सर्व तऱ्हेचे शिक्षण मिलिसंट हिला दिलें. आणि मग सुशिक्षित स्त्रीच्या मनांत, स्त्रियांच्या हक्काचे जे प्रश्न उद्भवणें अगदी अटळ होते, ते या मिलिसंटच्या मनांत उद्भवूं लागले. इतक्यांत तिच्या जीविताला निराळेंच वळण लागण्याचा योग आला.
 मिलिसंट ही अजून पुरी वीस वर्षांचीही झाली नव्हती. तेव्हां हेन्री फॉसेट या तरुण गृहस्थाची व तिची ओळख झाली. हा गृहस्थ केंब्रिज येथें अर्थशास्त्राचा प्राध्यापक होता. हा सहा फूट तीन इंच उंच असून अंगाने चांगला धिप्पाड आणि पिळदार होता. त्याच्याकडे पाहतांच कोणाच्याही मनांत थोडासा आदर उत्पन्न झाल्याखेरीज रहात नसें. पण दुर्दैवानें त्याच्या ठिकाणीं एक वैगुण्य उत्पन्न झालें होतें. सुमारे पंचवीस एक वर्षांचा असतांना, बंदूक उडवण्याच्या कामी कांहीं अपघात होऊन त्याचे दोन्ही डोळे गेलेले होते. पण डोळे गेले असूनही या माणसाची चर्या आणि त्याचा रुबाब हीं लक्षांत भरण्यासारखी राहिलीं होतीं.
 डोंळे जातांच एकादा मनुष्य गळाठला असता, आणि दीनवाण बनून त्यानें जगाशीं संबंधही सोडला असता; पण हा फॉसेट् मोठा धीराचा माणूस होता. अंधळा होण्याच्या आधीं ज्या गोष्टी त्याला करतां येत असत. त्यांतील बऱ्याचशा त्यानें पुढें चालू ठेवल्या. पायांनीं सपासप चालणें, आणि बर्फावर स्केटिंग करणें याची त्याला फार हौस असे. अंधळा होऊनही या दोन्ही गोष्टी तो अगदीं डोळस माणसासारख्या करूं लागला. ज्या सडका त्याच्या ओळखीच्या होत्या, त्यांवर तर तो खुशाल सहलीला जाऊं लागला. पण जर कोणी मित्रानें एकाद्या नव्या सडकेचें अगदीं बारीक सारीक वर्णन त्याच्यापुढें केलें, तर तो तें वर्णन नीट ध्यानांत ठेवून या नव्या सडकेवर सुद्धां फिरायला जाई. घोड्यावर बसण्यांत तो मुळचा फार पटाईत होता. अंधत्व आल्यावरही त्यानें घोड्यावरची रपेट कधींच सोडली नाहीं. मासे पकडण्याचा त्याचा मूळचा छंद त्यानें पुढें तसाच चालू ठेवला. केंब्रिज येथें तो अर्थशास्त्राचा प्राध्यापक होता; आणि इंग्लंडच्या लोकसभेचाही तो एक प्रतिनिधि होता. अशा माणसाची आणि गॅरेट यांच्या मुलीची सहजासहजी गांठ पडली.
 मिलिसंट गॅरेट् हिच्याकडे या अंधाचें लक्ष विशेष गेलें होतें. मिलिसंट ही फार देखणी मुलगी होती. तिचे मनोधर्म कांहीं निराळेच होते. फॉसेटचे शरीर-वैभव तिला अतिशय आकर्षक वाटले, आणि असा उमदा माणूस जर दुर्दैवानें एकाद्या आपत्तींत सांपडलेला असला, तर त्याला साहाय्य करून आपण त्याचें जीवित सुखाचें करावें, असें या मुलीला वाटू लागलें.
 १८६७ मध्ये प्रो. हेन्री फॉसेट् आणि मिलिसंट गॅरेट् यांचा विवाह झाला. फॉसेट्च्या संगतींत तिला अर्थशास्त्राचें ज्ञान हळू हळू होऊं लागलें; आणि मग पुढें तर या विषयांत तिनें इतकी प्रगति केली, कीं या विषयावरचीं तिचीं पुस्तकें लोक प्रमाण मानूं लागले.
 मिलिसंटनें जेव्हां पुढें स्त्रियांची बाजू घेऊन देशांतील पुरुषांशीं खडा सामना सुरू केला, तेव्हां 'पुरुषांचा द्वेष करणारी,' 'पुरुष जातीची वैरी असलेली,' अशीं तिचीं वर्णनें वृत्तपत्रांत होऊं लागलीं. ती जर खरोखरच पुरुष जातीची वैरी असती, किंवा पुरुषांचा द्वेष तिच्या मनांत बाणलेला असता, तर तिनें असल्या अंध पुरुषाशीं कधींही लग्न लावलें नसतें. उलट एका अंध पुरुषाला प्रपंचबद्ध करून त्याचा संसार तिनें आपल्या नेकीनें सुखाचा केलेला असावा, यांत तिची पुरुष- जातीवरील प्रीति मात्र दिसून येते.
 वडील बहिणीच्या शिक्षणक्रमांत पुरुषांनीं आणि प्रत्यक्ष सरकारने अडथळे आणलेले होते, याचें स्मरण तिला होतेंच होतें. नवऱ्याबरोबर अर्थशास्त्राची चर्चा करतां करता तिला हें कळून चुकलें कीं, स्त्रीला मतदानाचा हक्क प्राप्त झाल्याशिवाय तिच्या अंगांतील बुद्धिस्फुरणाचा पोष व्हायचा नाहीं; आणि तो झाला नाहीं, तर मानवी जीवनांत तिचें स्थान अगदीं खालच्या पायरीचें राहील. देशांत जर लोकशाही आहे, जर ती लोकमतावर आधारलेली आहे; आणि स्त्रिया जर 'लोक' शब्दांत अंतर्भूत होतात, तर त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला पाहिजे, असा आग्रह तिच्या बुद्धीला उत्पन्न झाला.
 पीटर टेलर आणि जॉन स्टुअर्ट मिल हे स्त्रियांचे कैवारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनीं भरविलेल्या एका सभेत फॉसेट्बाईचें पहिले भाषण झालें. 'स्त्रीला मतदानाचा हक्क असावा,' हा भाषणाचा विषय होता. बाईनें भाषणाचा थाट असा सुंदर ठेवला, कीं सभेला जमलेले लोक अगदीं खूष होऊन गेले. त्यांची चर्या, त्यांचे हावभाव आणि लोकांची समजूत पाडण्याची त्यांची सौम्य आणि मोहक शैली यांचा श्रोत्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. या भाषाणाच्या मागोमाग ब्रायटन येथे याच विषयावर त्यांनी पुन्हां एकदां भाषण केले. श्रोत्यांपैकी अनेकांना हे 'नवें खूळ' पसंत नव्हतें. परंतु फॉसेट्बाईची विषयाची मांडणी आणि त्यांनीं केलेला कोटिक्रम हीं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धां वांटू लागे कीं, बाईच्या बोलण्यांत पुष्कळच तथ्य आहे. परंतु, 'बायकाना मतदानाचा हक असावा' हेच या ऐकणाऱ्यांना बिलकुल पसंत नव्हतें. त्यांनीं आपली नापसंती एका निराळ्याच तऱ्हेनें व्यक्त केली. ते म्हणूं लागले कीं, 'बाईच्या या नव्या थेरामुळें मि. फॉसेट् हे लोकांत अप्रिय बनूं लागतील; आणि पार्लमेन्टमधील आपली जागा ते गमावून बसतील!' ही भीति दाखविली, म्हणजे हा अंध माणूस बायकोला आवरून धरील; आणि अशा रीतीनें या विषयाचा कांटा आपोआपच निघेल, असा त्यांचा अंदाज होता. पण अंधाचे मतही बायकोसारखेंच होतें. शिवाय त्याला लोकप्रियतेची किंमत असली, तरी स्त्रियांच्या हक्काची किंमत जास्त होती. अर्थात् या दहशतीचा कांहीं उपयोग झाला नाहीं. आपल्याला जें कृत्य न्यायाचें दिसतें, तें केलेच पाहिजे, असा आग्रह पतिपत्नींनीं धरला. आणि प्रथम प्रथम जरी कोणी विरोध केलेला असला, तरी शेवटी फॉसेट् बाईच्या प्रतिपादनाला इंग्लंडांत यश मिळालें.
 'स्त्रिया सार्वजनिक जीवनांत थोडी हालचाल करूं लागल्या, की यांना संसाराचीं कामें करावयास नकोत, चूल सैंपाकिणीच्या हवाली करावी; मूल दाईच्या करावें, आणि आपण 'टोळ, टोळ' करीत गांवभर हिंडावें, यांतच असल्या बायका भूषण मानतात," अशी त्यांची निंदा सुरू होई. फॉसेट् बाईना ही निंदा आरंभापासूनच सहन करावी लागली. खरी गोष्ट अशी होती कीं, प्रपंचातील आपल्या जबाबदाऱ्यांविषयीं त्यांच्या मनांत कधींही तिरस्कार उत्पन्न झाला नव्हता. इतकेंच नव्हे, तर आपल्या प्रापंचिक जीवनांत गोडी उत्पन्न व्हावी, म्हणून 'जें जें करतां येणें शक्य होतें, तें तें सारें फॉसेट्बाई करीत असत.
 आपली घरे जर खरी खरीं सुखाचीं निवासस्थान व्हावयास हवीं असली, तर स्त्रीचा दर्जा वाढावयास हवा; आणि लौकिक जीवनांत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचें स्थान प्राप्त व्हावयास हवें, असें मात्र त्यांचे मत बनले होते. स्त्रीया म्हणजे घरांतील एक कामाठीण आणि आपल्या मनाला चाहील त्याप्रमाणे पुरुषांनीं वागवून घेण्याची एक वस्तु, हा सध्यांचा स्त्रीचा दर्जा प्रपंचांत कधींही खरें सुख उत्पन्न करणार नाहीं; अशी स्त्री नवऱ्याला आणि मुलांना ममत्वानें सुखी करूं शकणार नाहीं. म्हणून, तिची सामाजिक पदवीच उंच व्हावयास हवी; आणि यासाठीं मतदानाचा हक्क तिला मिळालाच पाहिजे, असें या विदुषीचें मत लोकांच्या पुढें जोरजोरानें येऊं लागलें.
 ती स्वतः घरांत एरवींच्या प्रापंचिक स्त्रियांप्रमाणेंच वागे. नवऱ्याची बायको आणि मुलांची आई हीं नातीं ती कधींच विसरली नाहीं. त्यांतही नवरा आंधळा असलेला. वेड्या प्रेमाच्या पहिल्या झटक्यांत असल्या माणसाशीं लग्न केलेंही असेल; पण एकाद्या स्त्रीला पुढें पश्चात्ताप झाला असतां; आणि त्या नवऱ्याची अवहेलना ती करू लागली असती; त्याच्या जीविताचे तिनें केवळ पोतेरे करून टाकले असतें. परंतु, फासेट बाईनें नवरा आंधळा म्हणूनच पत्नीत्वाचे नातें अधिक मंजुळ आणि अधिक प्रेमळपणाचें करून टाकलें, त्याची सर्व तऱ्हेची निगा ती ठेवी; आणि लेखनाच्या कामांत त्याला हरतऱ्हेचे साहाय्य करी. उलटपक्षी, ज्या आपल्या प्रियकर पत्नीचें मुख त्यानें कधींही पाहिलें नव्हतें, तिच्यावर या प्रोफेसराची प्रीति केवळ अगाध होती.
 एकदां असें झाले कीं, रपेटीला गेल्या असतांना फॉसेटबाई घोड्यावरून पडल्या. त्यांना बरेच लागले. त्यांना घरी आणल्यावर पुष्कळच धावपळ झाली. बायको घोड्यावरून पडली आहे, आणि तिला लागले आहे, येवढें फॉसेटना कळलें होतें. पण कुठें लागलें आहे, किती लागलें आहे, हें त्यांना कसें कळणार? विचारून विचारून त्यांनीं सर्वांना गांगरवून टाकले. ते म्हणाले, 'हिला जास्त लागले असले पाहिजे. पण मी भिऊ नये, म्हणून तुम्ही माझ्यापासून तें चोरून ठेवत असला पाहिजे.' इतकें बोलून फॉसेट ढसढसा रडूं लागले.
 फासेट हे आपल्या मतदारांना नेहमीं सांगत कीं, "राजकारणाचें माझ्या बायकोचें ज्ञान माझ्यापेक्षां अधिक चांगले आहे. तिनें दिलेलें मत आणि केलेला निर्णय माझ्यापेक्षां समर्पक असतो." केवळ बायकोची स्तुति करावी, म्हणून प्रो. फॉसेट असे म्हणत असत असें नव्हें. त्यांच्या मित्रांच्याही हे ध्यानांत येऊन चुकले होतें कीं, बाईची निर्णयबुद्धि ही खरोखरच फार चलाख आहे.
 फॉसेट यांच्याकडे पोस्ट ऑफिसचे कांहीं काम होतें. अगोदर स्त्रियांचा दर्जा वाढला पाहिजे, हें त्यांचें मत होतेंच. पण बायकोच्या शहाणपणाचा प्रत्यय त्यांना नित्य येत असल्यामुळे पोस्ट खात्यांत बायकांच्या नेमणुका करण्याचा प्रघात त्यांनी पाडला. ही पद्धति भराभर बळावत गेली; आणि पोस्ट ऑफिसें, बँका इत्यादि ठिकाणी शेकडोंच्या शेकडो बेकार मुलींना कामें मिळू लागली. या कामी फॉसेट बाईनीं नवऱ्याला हरतऱ्हेची मदत केली. अशा प्रकारे दोघांचा संसार मोठ्या सुखानें चालला असतांना बाईवर दुःखाचा डोंगर कोसळला!
 १८८४ त प्रो. फॉसेट यांना प्लूरसीचे दुखणें झालें; आणि त्यांची फुफ्फुसें सुजूं लागलीं. त्यांची मोठी मेहुणी डॉक्टरीण झालेली होती. तीही औषध पाण्यासाठी आली; पण कसलाही उपयोग न होऊन हा जवान मनुष्य ऐन उमेदीत मरण पावला.
 प्रो. फॉसेट हे गरिबांचे कैवारी असत; आणि लहानसहान व्यवसायांतील माणसांची कड घेऊन ते नेहमीं भांडत असत. ते वारल्यानंतर बाईना अर्थातच सांत्वनपर शेकडों पत्रे आली. त्यांत चार सुतार, दोन गवंडी, एक घिसाडी, एक पोस्टमास्तर आणि एक कारकून यांचीं आलेली पत्रे फार कळवळून लिहिलेलीं होतीं. 'आमचा मित्र गेला,' 'सोयरा गेला,' कैवारी गेला,' 'आतां तुमचें कसें चालेल?' 'तुम्हाला कांहीं तारण आहे कां?' अशा मजकुरानें हीं पत्रे भरलेलीं होतीं. एकानें तर म्हटलें होतें कीं, "एडमंड बर्कच्या नंतर येवढा मोठा माणूस आमच्या देशांत झालाच नाहीं!" आपल्या नवऱ्यावर गरीब गुरीबांची इतकी भक्ति असलेली पाहून बाईचें दुःख अधिकच अनावर व्हावें, हें स्वाभाविक होतें. त्यांनी प्रसिद्धपणें सर्वांचे आभार मानले, आणि त्यांना कळवलें कीं, माझ्या योगक्षेमाची व्यवस्था फॉसेट यांनी बरी करून ठेवली आहे. माझी चिंता कोणी करूं नये. फॉसेट हे अतिशय काटकसरीने वागत; आणि म्हणून माझें साधारणपणें बरें चालावें, इतकी माया त्यांनीं ठेवली आहे."
 प्रो. फॉसेट यांच्यापासून बाईना एकच मुलगी झाली ही फिलिपा पुढें बुद्धीने अतिशय चलाख निघाली. तिचें बुद्धिवैभव पहाण्यास प्रो. फॉसेट जिवंत राहिले नाहीत याचें सर्वानाच वाईट वाटें. फिलिपा लहान होती, तेव्हांपासूनच स्त्रियांना वरिष्ठ तऱ्हेचें शिक्षण अवश्य मिळाले पाहिजे' ही चळवळ फॉसेटबाईंनी सुरू केली होती. किंबहुना 'केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या परीक्षांना मुलींना बसतां यावें,' अशी मागणी करण्यासाठी भरलेली पहिली सभा बाईच्याच घरांत भरली होती. फॉसेटबाईंच्या प्रयत्नांना फार त्वरेनें यश मिळं लागलें; आणि या परीक्षांना बसणाऱ्या मुलींच्या शिक्षणाची स्वतंत्र सोय बाईंनी केली. या सोईचा लाभ पहिल्याच वर्षी ऐंशी मुलींनी करून घेतला. याच्या पाठोपाठ त्यांनीं विद्यार्थिनींचे एक मोठें वसतिगृह केंब्रिजच्या जवळ बांधले. चळवळीला जोर चढत चालला; आणि १८७५ सालीं त्यांनीं न्यून् हॅम् कॉलेज या नांवाचें एक स्वतंत्र महाविद्यालयच सुरू केलें फॉसेट् बाईंची फिलिपा याच कॉलेजांत शिकूं लागली.
 आईच्या अंगांतील स्वावलंबनाचा गुण लेकीच्या ठिकाणीं पुरापुरा अवतरला होता. मुलींना इकडे तिकडे धाडायचे, म्हणजे सोबतीशिवाय धाडूं नये, अशी वहिवाट असे. फासेट्बाईंनीं ही वहिवाट मोडून टाकली; आणि फिलिपा सुद्धां निर्भयपणाने सगळीकडे हिंडूं लागली. क्लॅपहॅम हायस्कूलमध्ये तिला रोज जावें लागे. शाळा घरापासून बरीच लांब होती. 'शाळेंत जाणारी पोर' म्हणून तिची टवाळी करण्यासाठी कांहीं उडाणटप्पू लोक टपून बसलेले असत. अशांपैकी एकाने एकदां तिची कांहीं चमत्कारिक खोडी केली; त्याबरोबर या पोरीने त्याच्या नाकाडावर हातांतल्या छत्रीचे तडाखे असे फडफड दिले, की पुन्हां त्या माणसानें तोंडच वर करूं नये.
 स्त्रियांची योग्यता पुरुषांपेक्षां कमी नाहीं, हा घोष आईने चालवलाच होता; पण लेकीने शाळा-कालेजांतील आपल्या अभ्यासक्रमांत सर्वाना हें प्रत्यक्ष पटवून दिलें. बायकांनीं कोणचा व्यायाम करावा, आणि पुरुषांनी कोणचा करावा, याचा कांहीं एक विवेक केला पाहिजे; असा सर्वांचा समज होता. फॉसेट्बाईंना हें तत्त्व मान्य नव्हतें. फिलिपा हिनें व्यायामाच्या कामांत आईचेंच धोरण पुढें चालविलें. अर्थातच पुरातन संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांनीं तिच्याकडे पाहून नाके मुरडली असतील, हें कांहीं सांगावयास नको. फिलिपा हिचा शिक्षणक्रम संपत आला; आणि केंब्रिज येथील गणिताच्या सर्वश्रेष्ठ परीक्षेस ती बसली. १८९० सालच्या या परीक्षेत फिलिपा ही पहिली आली. सर्व पुरुष विद्यार्थ्यांना मागे टाकून या पोरीनें गणितासारख्या अवघड विषयांत पहिला क्रमांक मिळवलेला पाहून इंग्लंडच्या स्त्रियांच्या आनंदाला मात्र असें कांहीं विलक्षण भरतें आलें, कीं फिलिपा हिच्या विजयाचा डंका त्यांनीं महिनोन् महिनें अखंड चालू ठेवला.
 पण सर्वच पुरुष कांहीं इतके अनुदार नव्हते. अनेक तरुण लोकांनीं एक मोठी मिरवणूक काढली; आणि फॉसेट्च्या घरापाशीं आल्यानंतर 'फिलिपा सिनीयर रँगलर,' 'फिलिपा सिनीयर रँगलर,' म्हणून त्यांनीं गर्जना केल्या. आईला आणि लेकीला पराकाष्ठेचा आनंद झाला असेल, हें सांगावयास हवे काय? पण या आनंदानें त्यांची डोकीं मात्र भडकलीं नाहींत, आपण कोणी मुलखानिराळ्या स्त्रिया आहों, अशी समजूत त्यांनी करून घेतली नाहीं. आईनें आपल्यावर केवढे उपकार केले आहेत, हें फिलिपा हिला चांगले माहीत होतें. म्हणून फॉसेट्बाईनी चालवलेल्या स्त्रीशिक्षणाच्या पुरस्काराचें काम तिनेंही अधिक जोरानें चालू केलें.
 मागे सांगितलेच आहे कीं, प्रो. फॉसेट् यांच्या संगतीत बाईंना अर्थशास्त्राची गोडी लागली. आंधळे होते तरी फॉसेट् हे आपला प्रोफेसरीचा धंदा करीत. त्यांना वाचून दाखवण्याचे काम बाईना रोज करावें लागे. दोघांनीं चर्चा करावी; ती बाईंनी लिहून काढावी, असें होतां होतां, 'निबंध आणि व्याख्यानें' या नांवाचें एक पुस्तक बाईंनीं प्रसिद्ध केलें. १८७० त अर्थशास्रावरच त्यांनीं एक पुस्तक लिहिले. या अर्थशास्त्राच्या विचारांतूनच स्त्रियांच्या हक्कांचा प्रश्न बाईंच्या मनावर ठसूं लागला.
 मिसेस फॉसेट् म्हणूं लागल्या कीं, 'जे कायदेकानू आम्ही पाळावे अशी अपेक्षा सरकार ठेवतें, ते कायदे-कानू बनवण्याच्या कामांत जर आमचा हात आला, तरच ते पाळण्याला आम्हीं बांधलेल्या आहों. पुरुषांनी एकत्र जमावयाचें; आणि आम्हांला कळू न देतां कायदे पसार करून ते आमच्या माथीं मारावयाचे, ही गोष्ट अतःपरः चालावयाची नाहीं. पुरुषांप्रमाणेंच आम्हांलाही मतदानाचा हक्क हवा. तो मिळाला, म्हणजे आमच्या बाबतींत तुम्हीं कसले कायदे करतां, हें आम्हीं पाहून घेऊं.'
 फॉसेट्बाई पुढे जाऊन गर्जू लागल्या कीं, "नवरा-बायकोचें नातें कसें असावें; आमची वैवाहिक नीति कशी असावी; घटस्फोट व्हावे कीं नाहीत; घटस्फोटित स्त्रियांच्या मुलांची वासलात कशी लावावी, याचे सारे कायदे तुम्हीं पुरुष करतां; आणि ते पाळण्याची जबाबदारी आमच्यावर लादतां. कायदे करतांना, तुम्हीं पुरुषांच्या बाजूनें पक्षपात करतां; आम्हां स्त्रियांना अन्याय करतां. पत्नी कितीही चांगली असो, तिच्या बदमाश नवऱ्याला कायदा संभाळून धरतो; आणि सुशील पत्नीच्या जीविताचें पोतेरें करून सोडतो. सुशील घटस्फोटित आईचीं मुलें तुमचा कायदा अतिशय दुराचारी आणि नाठाळ बापाच्या हवाली करतो. बरें, आई आणि बाप दोघेही दुराचारीं असली, तर शिक्षेचा तडाखा स्त्रीला जितका बसतो तितका पुरुषाला बसत नाहीं. खरे पाहतां, शिक्षा सोसण्याचे सामर्थ्य पुरुषांना जितकें असतें, तितकें बायकांना असत नाहीं; पण असे असूनही आणि स्त्री-पुरुषांचा दोष सारखा असला तरी शिक्षेचा ससेमिरा तुम्हीं बायकांच्या मागें जास्त लावतां."
 १८७१ साली पार्लमेन्टमध्ये 'स्त्रियांना होणाऱ्या अन्यायाचें परिमार्जन' या नांवाचें एक विधेयक पुढें आलें होतें. या बिलावर बोलतांना इंग्लंडचा मुख्य प्रधान ग्लॅडस्टन हा म्हणाला की, 'आपल्या या घटस्फोटाच्या कायद्यानें स्त्रियांच्या विरुद्ध एक नवें आणि अघोरी वैषम्य उत्पन्न केलें आहे. या बिलाने पुरुषांचा पक्षपात केलेला आहे; वैवाहिक जीवनांत जर स्त्रीच्या हातून कांहीं प्रमाद घडला, तर आपला कायदा तिचा सारखा छळ करीत सुटतो; पण पुरुषाच्या हातून जर चूक झालेली असली, तर तो त्याला संभाळून धरतो.' इतकें बोलून ग्लॅडस्टने असा दावा मांडला कीं, 'आपल्या राजकारणावर स्त्रियांच्या मताचा दाब पडल्याशिवाय स्त्रियांचें हें गाऱ्हाणें कधींही मिटावयाचें नाहीं' याचा अर्थ असा कीं, फॉसेट्बाईनीं चालू केलेली ही चळवळ ग्लॅडस्टन सारख्या मुत्सद्याला पसंत पडूं लागली होती.
 याच प्रसंगी आणखी एक उपकारक गोष्ट घडून आली. बायकांना मतदानाचा हक्क असावा, हें अनेक पुरुषप्रतिनिधींना मान्य नव्हते. परंतु ते संभवितपणानें गप्प बसत. एक सभासद मात्र संतापानें अगदीं बेहोष होऊन गेला; आणि भर पार्लमेन्टांत बायकांच्या विरुद्ध भलभलतें बोलूं लागला. तें त्याचें भरमसाट भाषण ऐकून, या चळवळीला कांहींसें विरुद्ध असलेले लोक मतदानाचा हक्क देण्याच्या अंगालाच वळू लागले. ते म्हणाले, 'आम्हां पुरुषांच्या मनांत स्त्रियांच्याविषयीं जर हेंच पाप वागत असेल, तर स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणेंच अवश्यक आहे!'
 इंग्लंडांत सर्वच बाजूनी स्त्रियांची कुचंबणा होत असे. स्त्रिया कितीही हुषार असल्या, तरी सरकारी नोकरींत त्यांचा प्रवेश होणें मुश्कील असे; आणि चांगल्या चांगल्या वेतनाच्या जागा तर त्यांना मुळींच मिळत नसत. प्रत्यक्ष तिच्या वडील बहिणीची या बाबतींत काय दुरवस्था झाली होती, तें आपल्याला माहीतच आहे. १८८२ साली विवाहित स्त्रियांच्या जिनगीचा कायदा पार्लमेंटने पास केला; पण तोपर्यंत स्त्रीला स्वतः मिळवलेल्या धनावर सुद्धां कसलाही हक्क नसे. वारसा रूपानें तिला जें कांहीं मिळालें असेल, व तिनें स्वकष्टानें जें मिळविलें असेल, तें तें सारें नवऱ्याच्या मालकीचें होत असें. तिला भिकेला लावून नवऱ्याने तिचें हें सारें धन भोगावें, नासावें, विकावे, अशी वहिवाट होती. अर्थातच मिसेस फॉसेट् यांनीं अशी चळवळ सुरू केली कीं, बायकांना मतदानाचा हक्क मिळाल्याशिवाय त्यांच्या वर होत असलेला हे जुलूम कधींही नाहींसे होणार नाहीत.
 असें समजू नयें कीं, फॉसेट बाईंना या कामी साहाय्याला कोणींच नव्हतें. देशांतल्या बहुतेक साऱ्या सुशिक्षित स्त्रिया यांच्या बाजूच्याच होत्या; आणि जसजसा त्यांच्या वाणीचा प्रभाव अधिकाधिक पडत चालला, तसतशी खुद्द राजधानीच्या शहरांतही त्यांची छाप पडत चालली. लंडनमध्ये त्यांच्या व्याख्यानाला अफाट गर्दी होऊं लागली; आणि बायकांची सभा म्हणून बाजूला तोंड करून फिदिफिदी हंसण्याची प्रवृत्ति पूर्णपणें मावळून सर्व श्रोते बाईचीं व्याख्याने मोठ्या अदबीनें ऐकूं लागले.
 ब्रिस्टल येथें १८७१ साली त्यांचे एक मोठे दांडगे भाषण झाले. कोणी असा आक्षेप घेतला होता की, जर स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला, तर त्यांच्या ठिकाणचें मार्दव व संस्कृतीचा हळुवारपणा यांचा लोप होऊन जाईल; आणि स्त्री शब्दानें जें जें कांहीं ध्वनित होतें, तें तें सारें नष्ट होईल. या आक्षेपाला उत्तर देतांना बाईंनीं काढलेले उद्गार खरोखरच मननीय आहेत. त्या म्हणाल्या, 'जी गोष्ट मूलतःच लाजिरवाणी आणि बेअब्रूची नाहीं, तिचा अवलंब स्त्रीने केला, म्हणून स्त्रिया आपलें स्त्रीत्व गमावून बसतील, असें तुम्हीं सम जतां तरी कसें? स्त्रियांनीं आत्तांपर्यंत रणांगणाची हवा पाहिलेली आहे; आपल्या भोंवती रक्तामांसाचा सडा झालेला त्यांनीं पाहिला आहे; आणि मरत असलेल्या घायाळांच्या किंकाळ्या त्यांनीं कानांनी ऐकलेल्या आहेत. तसेंच अशा ठिकाण जाऊनही स्त्रियांनी घायाळ पुरुषांच्या प्रकृतीची वास्तपुस्त केली आहे. हीं कामें त्यांनीं केल्यामुळे त्यांच्या अंगांतील स्त्रीत्व कमी झाल्याचे वर्तमान तुम्हीं कधीं ऐकलें आहे काय?'
 असल्या प्रतिप्रश्नांनीं श्रोत्यांचीं मनें फॉसेट्बाई सहज हस्तगत करीत असल्या पाहिजेत, हे उघड आहे. त्यांची लोकप्रियता भराभर वाढू लागली. तथापि यशाचा उन्माद त्यांना केव्हांच आला नाहीं. प्रतिपक्षाचें म्हणणें काय आहे, त्याच्या अडचणी कोणच्या आहेत, याकडे त्या विधायक बुद्धीनें लक्ष देत; आणि आपल्या कुशल वाक्-पाटवानें त्या सर्वांचा निरास करीत. अर्थातच स्त्रियांच्या मतदानाच्या चळवळीला जोराची भरती येत चालली; आणि मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठीं त्यांनी १८९५ साली केलेल्या अर्जावर अडीच लक्ष स्त्रियांनीं सह्या केल्या.
 या सर्वाचा परिणाम काय झाला, हे आपल्याला माहीत आहे. आज इंग्लिश स्त्रीचें जीवित पुरुषांच्या जाचांतून बहुतांशीं मुक्त झालें आहे; आणि तिचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीला आलेला आहे. या यशाचे श्रेय सर्वथा फॉसेट्बाईचेंच नसले, तरी त्याचा फार मोठा वाटा इंग्लंडचा आजचा स्त्रीसमाज त्यांच्याच पदरांत टाकील, यांत कसलाही संदेह नाहीं. इंग्लंडांतील स्त्रियांचे बंधविमोचन डोळे भरून पाहून सुखी झालेली ही स्त्री १९२९ साली मरण पावली.

● ● ●