Jump to content

कर्तबगार स्त्रिया/फ्रॅन्सिस विलर्ड

विकिस्रोत कडून

हिला देवाचें राज्य स्थापावयाचें होतें!


फ्रॅन्सिस विलर्ड : ८:


 फ्रॅन्सिस् इ. विलर्ड या स्त्रीचें चरित्र कांहींसें अद्भुतच म्हटले पाहिजे. वस्ती कोणीकडे, शिक्षण कशा प्रकारचें आणि पराक्रम कोणचा हें पाहिलें म्हणजे चरित्रांतला अद्भुतपणा लक्षांत येतो.
 आपल्याला हे माहीत आहे कीं, युरोपांतील गोऱ्या लोकांची वस्ती अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेशांत पहिल्यानें झाली. तेथून हे लोक पश्चिमेच्या रोखानें पसरत चालले. सामाजिक जीवनाचा जो बनाव बनलेला होता, तो ज्यांना मानवला ते त्यांत आपली सोय कशीना कशी करून घेत. परंतु, ज्यांना तो मानवत नसे, ते पश्चिम दिशेकडे तोंड करून चालू लागत. त्या दिशेला अफाट मुलुख रिकामा पडलेला होता. हिंमत असेल तर तिकडे जावें; चांगलीशीं जमीन पाहून ती 'आपली' म्हणून ठेवावी; या जमिनीवर राबावें, आणि मग पोटभर भाकरी खावी, असा शिरस्ताच पडून गेलेला होता.
 पण हें सारें सांगायला जरी सोपें असलें तरी करायला अतिशय अवघड असे. बायकापोरांना घेऊन, ज्या ठिकाणीं शासनसंस्थेचें कसलेंहि संरक्षण नाहीं, कदाचित् जेथें वन्य पशू अजूनहि बेदरकारपणें हिंडत असतील आणि ज्या जमिनीवरील जंगलाचा उन्माद केवळ भयप्रदच वाटावा तेथें जाऊन वस्ती करावी; आणि पोटाला मिळवावें, ही गोष्ट मोठी बिकट होती. शिक्षणाची सोय नाहीं; हवी ती वस्तु वेळेला मिळत नाहीं; कांहीं होऊं लागलें तर जेथें औषधपाण्याची कसली हि सोय नाहीं; टपालाची ने-आण जेथें कोणाच्या गांवींहि नाहीं; आणि कदाचित् जेथें जिवावर बेतण्याचे प्रसंग अनेकदां येण्याचा संभव, तेथें नवा प्रपंच थाटण्यासाठीं जाऊन रहाणें केवळ निर्भय मर्दांनाच साधण्यासारखे होतें.
 फॅन्सिसच्या बापावर असाच स्थलांतराचा प्रसंग आलेला होता. कारणें कोणतींहि घडलेलीं असोत—- न्यूयार्क परगाण्यांतील आपला वाणसौद्याचा धंदा त्याला किफायतीनें करतां येईना; किंवा त्याच्या हातांत तो राहीना— शेवटीं आतां येथें राहून आपलें जमत नाहीं, असें ढळढळीत दिसूं लागल्यावर त्यानें एके दिवशीं आपले सामानसुमान आवरले आणि गाडी भरून, त्यावर आपली मुलें- माणसें बसवून हा साहसी माणूस पश्चिम दिशेने निघाला.
 मुलांना कांहींच कळत नव्हतें. सामानाच्या ढिगावर बसून आपण गाडींतून चाललो आहों, याचीच फ्रेंन्सिस् आणि तिचीं भावंडे यांना मौज वाटत होती. गाडी म्हणायचे इतकेंच; पण तो गाडाच असला पाहिजे! जिकडे जिकडे हे साहसी लोक जाऊं म्हणतील, तिकडे तिकडे कोणी वाटा तयार करून ठेविल्या होत्या, असें थोडेच आहे? सपाटी पाहून पाहून आपल्याला हवें आहे त्या ठिकाणीं जाऊन पोहोंचणे, एवढेच काय तें त्यांना करतां येण्यासारखे होतें.
 रानचा वारा म्हटला तरी तो दरवेळीं मोठा हितकारकच असतो, किंवा वसाहतीची उघड्यावरील जागा नेहमीं निरोगीच असते, असें कसें म्हणतां येईल? शिवाय, रोगाचीं बीजें माणसें स्वतःच्या शरीराबरोबरहि घेऊन जातात. वस्तीचा थारेपालट करीत पश्चिमेकडे जातांना आपल्या घरांत क्षयाची बाधा शिरली आहे, असें विलर्डला दिसून आलें. फॅन्सिसची एक बहीण क्षयानें प्रत्यक्षच आजारी पडली. हवा मानवत नाहीं, हें पाहून आणखी पश्चिमेकडे जाण्याचें विलर्डने ठरवलें; आणि हाडे खिळखिळीं करणारी भ्रमन्ती पुन्हां पंधरा-तीन- वार केल्यानंतर ही मंडळी विस्कॉन्सिस परगाण्यांतील रॉक् नदीच्या कांठीं एका टेकाडावर येऊन पोहोंचलीं.
 सध्या हा सारा प्रदेश माणसांनी गजबजून गेलेला आहे, आणि आधुनिक संस्कृतीच्या खुणा तेथें पावलों पावलीं दिसून येतात; पण सुमारे शंभर वर्षापूर्वी हा मुलूख केवळ उजाड होता. ज्याचें मन निर्भय असेल, ज्याच्या दंड-मांड्यांत बळ असेल, ज्याची बायको हरतऱ्हेचे कष्ट उपसायला सिद्ध असेल, आणि ज्याचीं पोरें बलदंड आणि खेळकर असतील, त्यालाच इकडली वस्ती मानवण्यासारखी होती.
 जोशुआ विलर्ड ही आसामी अशाच प्रकारची होती. चार फाटी आणि दगड-धोंडे गोळा करून त्यानें येथें एक घर बांधलें, आणि भोवतालचा टापू हळू हळू नांगराखाली आणला. जमिनीनें उत्तम जाब दिला; आणि जोशुआचें अंबार कसदार धान्याने भरून जाऊं लागलें. पांचापैकीं तीन पोरें शिल्लक राहिलीं; दोन देवाघरीं निघून गेलीं. दम न सोडतां, प्रयत्नाच्या बळावर जोशुआनें ही रानटी भूमि वठणीवर आणली; आणि आपला सुखाचा संसार येथें उभा केला.
 एकदां भोवतालच्या भूमीचा परिचय चांगला झाल्यानंतर सभोवतालच्या वनस्पतींतून आणि झाडझाडोऱ्यांतून फिरत राहण्यांत कसलाहि धोका नाहीं; उलट फळ-फळावळ आणि भाजीपाला गोळा करतां येतो, असें दिसूं लागल्यावर या भूमी- संबंधानें विलर्ड मंडळींच्या मनांत ममत्व उत्पन्न झालें. यांच्यासारखेच आणखी कांहीं भटक्या मारीत पश्चिमेकडे निघालेले असत. विलर्ड नांवाचा गृहस्थ इकडे कोठेतरी येऊन राहिलेला आहे, ही वर्दी त्यांना लागलेली असली, तर ते मुक्कामाला विलर्डकडेच येत. त्याला सल्ला-मसलत विचारीत; जमीन कसा काय जाब देते हें प्रत्यक्ष पहात; आणि रानावनांत येऊन राहिलेल्या या मंडळींचा स्नेह संपादन करून पुढें जात.
 असल्या या घरांत आणि त्याच्या परिसरांत फ्रॅन्सिस हळू हळू वाढत होती. रानचे वारें प्यालेलें एकादें खट्याळ शिंगरूं जसें असावें, तशी ही पोर होती. आईनें म्हणावें कीं, 'घरांतले कांहीं काम कर'; पण हिनें मात्र आईचा डोळा चुकवून बोकडाच्या पाठीवर जेवणाचा डबा बांधून कोठेतरी रानांत झुकांडी द्यावी! भोंवतालचें सारें रान या पोरीनें तुडवून काढलें. विलकॉन्सिस परगाण्याच्या उत्तरेकडेच त्यांचें मकाण असल्यामुळे पुढें जातां जातां, या पोरीला समुद्राचा उंच घोष ऐकूं येऊं लागला. निळ्या पाण्याने भरलेला तो अफाट दरिया, त्याच्या राक्षसी लाटा. आणि त्याच्या कांठचें तें विस्तीर्ण वाळवंट, हीं पाहून फ्रॅन्सिस केवळ मुग्ध होऊन जाई. विस्तार, मोकळेपणा, दश दिशांचा निरभ्रपणा, सृष्टीच्या प्रकृतींतील उन्माद, यांचा विलक्षण परिणाम फ्रॅन्सिसच्या मनावर झाला. तथापि येवढ्यानें भागण्यासारखे नव्हतें.
 घरांत माणसें थोडीं आणि कामें फार; हीं कामें केलीं, तरच सर्वांना सुख लागणार होतें. कालवडी, शेरड्या, कोंबड्या भराभर वाढत चालल्या होत्या. त्यांची निगा राखणें, दाणागोटा गोळा करणें, निसणें, सडणें, अंबारें साफ करणें- हीं कामें एकटी आई किती करणार? रागे भर-भरून जोशुआ फ्रॅन्सिसला आणि तिच्या बहिणींना कामाला लावी.
 तिची आई मोठी शहाणी बाई होती. जोशुआशीं लग्न होण्यापूर्वी ती मास्तरीण होती. अर्थात् आपल्या मुलींना शिकवले पाहिजे, हा विचार तिच्या मनांत सदैव जात असे. वेळांत वेळ काढूत तिनें ह्या सर्वांना लिहिणें-वाचणें शिकवलें; आणि मग फ्रॅन्सिसच्या मनाचा ओढा पुस्तकांकडे लागला.
 मिळतील तीं तीं पुस्तकें जोशुआनें येणाऱ्या, जाणारांच्या हस्तें जमा केलेलीं होतीं. त्यांत बायबल हें अर्थातच मुख्य होतें. या धर्मपुस्तकाचें शिक्षण तो आपल्या मुलींना मोठ्या आग्रहानें आणि गंभीर बुद्धीनें देई. तहान लागली तर शेजारच्या झऱ्यावर जाऊं, आणि त्याच्या मधुर आणि शीतल जलानें आम्हीं आपली तृषा शांत करूं, पण कोणच्याहि मादक पेयाला दुरूनसुद्धां शिवणार नाहीं, अशी शपथ जोशुआनें आपल्या मुलींकडून घेवविली.
 तथापि त्यानें ही करडी धर्मबुद्धि त्यांच्या ठिकाणीं किती जरी बिंबवलेली असली, तरी हरतऱ्हेच्या वाचनाकडे मुलींचें लक्ष साहजिकच जाई. फ्रॅन्सिस आतां अठरा वर्षांची झाली होती. तिला कादंबरीवाचनाचा छंद फारच लागला. एके दिवशीं बाप रानांतून परत येऊन पाहतों, तो फ्रॅन्सिस एका कादंबरीत तोंड खुपसून बसलेली! बाप रागाने लाल झाला. मुलगी पहिल्यापासूनच थोडीशी फटकळ होती. ती त्याला म्हणाली:— 'बाबा, मी आतां अठरा वर्षांची झालें आहे. काय वाचावें अन् काय न वाचावें हें मला आतां चांगलें कळते.' असें म्हणत असतांना बापाकडे बघत ती मिष्किलपणें हंसत होती. बापाचा राग क्षणांत मावळला; आणि तो विनोदानें म्हणाला. "पोरी, तूं आतां प्रौढ झाली आहेस खरी; आईच्याच जातीची दिसतेस!"
 आपण प्रौढ स्त्री झालों, या विचारांत फॅसिस् अगदी दंग होऊन गेली. प्रौढ स्त्री बनणें म्हणजे एक मोठी मानाची पदवी पावणें होय, असें तिला वाटत असे. आईचा घरांतला अधिकार, व क्वचित् बापावरहि चालणारें तिचें वर्चस्व हीं पाहिल्यावर तिचें मत असें व्हावें हें बरोबर होतें. परंतु तिनें जरी घी पाहिलेलें असले, तरी अजून बडगा देखला नव्हता. एके दिवशीं तो तिच्या सहज नजरेस पडला.
 कसली तरी एक निवडणूक चालूं झाली होती; विलर्ड मंडळी जरी रानावनांत येऊन राहिलेली होती, तरी मतांचा अधिकार त्यांना मिळालेला होता. निवडणुकीचा दिवस उजाडला; आणि फ्रॅन्सिसचा बाप व भाऊ मत देण्यासाठीं गाडींतून निघाले. हे दोघे मत देण्यासाठीं जात आहेत, आणि आपण मात्र घरीं बसलों आहोंत याचें फ्रॅन्सिसला मोठेंच वैषम्य वाटलें. अमेरिकेत मताचा अधिकार तेव्हां फक्त पुरुषांना होता; आणि बायका किती जरी शहाण्या असल्या, तरी त्यांना 'मत' नसे! अर्थातच फ्रॅन्सिस् सारख्या मानी मुलीला हा पंक्तिप्रपंच अतिशय अपमानकारक वाटू लागला. तिची बहीण तिला म्हणाली, 'ताई, तूं म्हणतेस तें खरें; पण असं कांहीं बोलूं लागलें, कीं 'पोरी माजल्यात आहेत' असें लोक म्हणूं लागतात. 'फ्रॅन्सिस् गुरगुरून उत्तरली, 'हो! हो! मी माजल्यें आहे, असंच त्यांना दाखवून देत्यें.'
 लवकरच बापानें तिला नॉर्थ वेस्टर्न वुइमेन्स् कॉलेजमध्यें घातलें. तेथें तिला सारें नवे जग दिसूं लागलें. ही खेड्यांतून आलेली; हिचा आवाज भसाडा असलेला, हिला नागर चालिरीतीची नरमाई माहीत नसलेली; बाकीच्या पोरी तिच्याकडे थोड्या उपहासानें पाहूं लागल्या. कोणी कोणी तर तिची टवाळीच करूं लागल्या. त्याबरोबर फ्रॅन्सिसनें एकदोघींना असे रट्टे लगावले, कीं बाकीच्या मुली चूप होऊन राहिल्या. आपल्या केसांचा रंग हा एक मोठा टीकेचा विषय बनत आहे असें पाहतांच तिनें एके दिवशीं केस कापून टाकले. कॉलेजांत तिच्यापुढें कोणाची मात्रा चालेनाशी झाली. शिक्षक मंडळी सुद्धां फारशी तिच्या वाटेस जात नसत. ही कोणाला काय बोलेल, याचा नेम नसल्यामुळे जो तो आपली अब्रू संभाळून असे. ती पुढे मोठी झाली. त्यामुळे तिच्या लहानपणच्या वांडपणाचें कौतुक करण्याची चाल पुढें पडली. जर कां ती चार-चौघींसारखीच निवटली असती तर, तिचे हे विद्यार्थिदशेतले चाळे मूर्खपणाचेच ठरले असते. एकदां तर ती दारें लावून वर्गात विड्याच ओढत बसलेली सापडली; पण लौकरच तिच्या ध्यानीं आलें कीं हा आडदांडपणा आणि हे चाळे सोडले पाहिजेत.
 चार-सहा महिन्यांत ती इतकी निवळली, कीं वर्गातली सगळ्यांत शहाणी मुलगी म्हणजे ही असे शिक्षक म्हणू लागले. तिला त्यांनीं कॉलेजच्या वृत्तपत्राची संपादिका नेमलें, वाक्सभेचे अध्यक्ष केले; आणि स्त्री-पुरुष विद्यार्थ्यांची जीं सामाजिक संमेलने भरत, तीं चालवण्याचें जबाबदारीचें काम त्यांनीं तिच्याकडे दिलें.
 होता होतां या साऱ्या चळवळींचा परिणाम इतका झाला, कीं ती नवज्वरानें आजारी पडली; आणि तिचा परीक्षेचा अभ्यास करणें तसेंच रेंगाळत पडलें. त्यांतच मध्यंतरी तिची बहिण क्षयानें वारली; आणि फ्रॅन्सिसचें शिक्षण शेवटीं संपुष्टांत आलें. तथापि पीटर्सबर्ग फिमेल कॉलेजमध्ये तिला शिक्षिकेची जागा मिळाली.
 हळू हळू तिची स्त्रीजीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. तिचें ज्ञान, तिची गंभीर वृत्ति, यांचा परिणाम विद्यार्थिनींवर इतका होत असे, कीं बाकीच्या शिक्षकांच्या पोटांत मत्सराग्नि भडकूं लागे. ते म्हणत, 'ही कांहीं आमच्यापेक्षां विद्वान नाहीं खास; पण ही साऱ्या पोरींना वेड लावतें; याचें कारण हिच्यापाशीं संमोहनास्त्र असावें.'
 शिक्षिकेचें काम कांही वर्षे केल्यावर फॅन्सिसला वाटूं लागलें कीं, 'आपण कुचंबत आहों, आपल्या मनाची वाढ व्हायला हवी असली, तर एकदां युरोपांतून जाऊन आलें पाहिजे.' इतक्यांत तिचा बाप वारला. हे दुःखहि विसरावें, आणि युरोपांतील स्त्री- जीवनाची हालहवाल पहावी, अशा दुहेरी हेतूनें ती १८६८ त युरोपांत गेली.
 युरोपियन शहरांतील सुंदर हवेल्या, उंच उंच प्रासाद, रमणीय उद्यानें, भव्य स्मारके, श्रीमंत आणि समृद्ध बाजारपेठा, हा सारा देखावा पाहून ती अगदीं दिपून गेली; आणि आपला देश या मानानें कांहींच नाहीं, असें तिला वाहूं लागले. तथापि, तेथील लोकांतील उच्च-नीच भाव, गरिबी आणि श्रीमंती यांचा शेजारधर्म, आणि गरिबांच्या जीविताची होत असलेली उपेक्षा, हीं पाहून तर तिचा जीव अगदीं गुदमरून गेला. तेव्हां या दृष्टीनें पाहतां आपला देश अधिक चांगला आहे, अधिक न्यायी आहे, असें तिला वाटूं लागलें; कारण सर्वांना सारखी संधि मिळावी, आणि नशिब काढण्याचा परवाना कोणालाच नाकारूं नयें, हें तत्त्व अमेरिकेनें आधींच पत्करलेलें होतें. मात्र, आपल्या देशांतहि बायकांना मत नाहीं, गरीब मजुरांची दाद कोणी घेत नाहीं, आणि दारूखालीं सारा समाज झिजून जात आहे, हें चित्र तिच्या डोळ्यापुढे सारखे उभे राहूं लागलें. येथेंच तिनें हा त्रिविध संकल्प सोडला:—
 दारूचें उच्चाटन केलें पाहिजे; स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला पाहिजे; आणि मजुरांची संघटना केली पाहिजे. हाच तो संकल्प होय.
 अमेरिकेत परत येतांच दारुबंदीची मोहीमच तिनें चालू केली. टेम्परन्स म्हणजे मितपान— कोणी म्हणतात कीं अमेरिकेची चळवळ मितपानाची- म्हणजे 'दारु फार पिऊं नये' अशा स्वरूपाची होती. पण तिला दारूचें उच्चाटणच करायचें होतें. फ्रॅन्सिस् ही प्रत्येक गुत्त्यापुढें अन् क्लबापुढे जाऊन गुडघे टेकून दारुड्यांची प्रार्थना करूं लागली. तिनें परमेश्वराचें आवाहन करावें, डोळ्यांत आसवें आणावीं, आणि 'आपल्या आया-बहिणींना पशूसारखे वागवू नका' असें म्हणावें. तिच्या मैत्रिणीहि याच पंथांत शिरल्या; आणि त्यांनीं पुरुषांना अगदीं लाज आणली. पुरुष खजिल होऊं लागले; आणि दारूची दुकानें भराभर बंद पडूं लागली. फ्रॅन्सिसची आई म्हणे, 'आपण गरीब आहों; पण तू पैसा मिळवण्याच्या नादी लागू नकोस. आम्ही आमचे घरांत कसेंतरी भागवूं; तू या पुरुषाच्या जातीला गुत्त्यांतून उठीव.' आईच्या प्रोत्साहनाने निभ्रान्त बनलेली फ्रॅन्सिस् म्हणजे पुरुषांच्या मद्यमोचनाची निशाणीच बनली.
 मागें सांगितलेंच आहे कीं, गरिबांच्या दारिद्र्याचाहि तिला उद्वेग वाटूं लागला होता. पण हें दारिद्र्य बहुतांशीं दारूमुळे उत्पन्न होत आहे, हे तिनें ओळखलेले असल्यामुळे तिनें पहिला सोटा बाटलीवरच मारला. पण आणखी विचार करतां करतां तिला दिसूं लागलें कीं, दारूमुळे लोक गरीब होत आहेत हें जितकें खरें, त्यापेक्षां गरिबीमुळ लोक दारू पीत आहेत, हें जास्त खरें आहे. गरिबीची जाणीव विसरावी म्हणून लोक दारू पितात, हे मत एकदां पत्करल्यावर मजुरांची गरिबी कारखानदारांच्या लोभामुळें उत्पन्न होतें, हेंहि तिच्या ध्यानांत आलें; आणि म्हणून मजुरांच्या संघटनेचें काम तिनें सुरू केलें. या संघटनेच्या कामांत तिनें विलक्षण यश मिळवलें. दहा लक्ष मजूर तिच्या संस्थेचे सभासद झाले. हे सर्व मजूर नाना पंथाचे आणि नाना जातींचे होते.
 याच वेळीं बायकांना मतदानाचा हक्क मिळावा, या प्रचाराचाहि धुमधडाका तिनें उडवून दिला. बायकांना मतदान मिळालें, म्हणजे पुरुष वठणीवर येतील, आणि सध्यांचींच घरें अधिक सुखी होतील, असा तिचा ठाम सिद्धांत होता.
 अमेरिकेंत आपली चळवळ चांगलीच फोफावली आहे हें पाहतांच, दारुबंदी, मजूर-संघटण, आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार या तीन मुद्यांवर तिनें एक मोठा जाहिरनामा काढला; आणि पन्नास भाषांत त्याचीं भाषांतरें करून पृथ्वीवरील सर्व सरकाराकडे तिनें तो पाठवून दिला. परमेश्वराचें न्यायाचें, सत्याचें आणि सद्गुणाचें राज्य सर्वत्र सुरू व्हावें, अशी आपली इच्छा असल्याचें तिनें त्यांत जाहीर केलें.
 तुर्की सरकारने आर्मेनियन लोकांची कत्तल चालविलेली आहे, हें वर्तमान प्रासद्ध होतांच निराश्रित आर्मेनियन्ससाठीं तिनें एक मोठा निधि उभा केला, कपडे गोळा केले, धान्य जमवलें; आणि औषध-पाण्याच्या बंग्या बरोबर देऊन तिनें आपले दूत आर्मेनियाकडे धाडले. आपल्या सरकारच्या मागे लागून तुर्की सरकारला जरब देण्याच्या कामांतहि तिनें यश संपादन केलें.
 पण आतां फ्रॅन्सिस् थकूं लागली. चळवळीचा धडाका चालू होता, तेव्हांसुद्धां ती कधीं पगार घेत नसे; आणि घेतला तर केवळ आमटी-भाकरीपुरता घेत असे. यामुळे तिच्या शरीरावर अतिश्रमाचा परिणाम त्वरेनें होऊं लागला; आणि तिनें अंथरूण धरलें. या आजारांतच तिनें तीन महिन्यांत बाराशे पानांचें आत्मचरित्र लिहून काढलें. थोडासा हवापालटहि तिनें केला; पण चांगल्या हवेलासुद्धां तिचें शरीर जाब देईना. होता होतां ती अगदीं क्षीण झाली; आणि शेवटी म्हणाली कीं, 'आतां दुसरें कांहीं तरी काम केलें पाहिजे; पण... पण तें दुसऱ्या जगांतच होईल!' इतकें बोलून एकाद्या झंझावाताप्रमाणें आपल्या देशांत लोकांच्या बऱ्यासाठीं घोंघावत फिरणारी ही पराक्रमी स्त्री परलोकच्या द्वारांत गतप्राण होऊन पडली!

● ● ●