कर्तबगार स्त्रिया/जेन अदाम्स्
Appearance
हिनें गरिबांना अन् श्रीमंतांना एकत्र आणलें! |
जेन अदाम्स् : ५:
जेन अदाम्स या अमेरिकन स्त्रीचें चरित्र एखाद्या साधु पुरुषाला शोभण्यासारखेच झालें. हें साधुत्व समकालीन लोकांनीं तिला अर्पण केलें नाहीं. परंतु, भूतदया आणि शांति यांचें राज्य पृथ्वीवर जो जो जास्त होत जाईल, तों तों या राज्याचे मागचे मागचे संस्थापक कोण, याचा शोध लोक करूं लागतील; आणि मग जेन अदाम्स या स्त्रीच्या चरित्राला त्याचा खरा महिमा प्राप्त होईल. पुष्कळ तत्त्ववेत्ते, कर्ते आणि विचारी लोक योग्य काळाच्या आधीं जन्माला आलेले असतात. त्यांचीं ज्ञानें, कृत्ये किंवा विचार हीं समकालीन लोकांना नीटशीं आकलतां येत नाहीत. शें-दीडशे वर्षे गेलीं, म्हणजे त्यांचे मर्म लोकांना समजूं लागतें; आणि या लोकांचे नातू पणतू त्यांचा गौरव करूं लागतात. जेन अदाम्स या बाईचें जरी तंतोतंत असें झाले नसले, तरी सामान्यपणे पाहतां, त्या थोड्या आणखी उशिरा जन्मास आल्या असत्या तर बरे झालें असतें, असें वाटतें!
अमेरिकेच्या इलिनॉय परगाण्यांत सेदरव्हिली येथें एक बडा गिरणीवाला होता. हा क्वेकर पंथीय असून कांहींशा इतमामानें वागणारा असे. आपल्या धंद्यांत सचोटीनें वागावें; आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवून मनाला कसलाहि कहार करून घेऊं नये, असें त्याचें धोरण असें. त्यानें आपल्या घराला कुठें कुलूप सुद्धां लावलें नाहीं; इतका त्याचा गांवांतल्या लोकांवर विश्वास असे. याची बायको आधींच मरून गेली होती; आणि दोन वर्षांची छोटी जेन सारखी त्याच्या मागें मागें करीत असे. आई आणि बाप हीं दोन्हीं नातीं जेनच्या दृष्टीनें त्याच्या ठिकाणी एकवटलेली होती; आणि म्हणून प्रत्येक गोष्टींत बाबांच्या तोंडाकडे पहावें, आणि ते करतील तसें करावें, असा जेनचा स्वभावच बनला होता.
हा गिरणीवाला मोठा सच्चा माणूस असून वचनाचा धड असे. अर्थातच एकाद्या वेळीं जेन खोटें बोलून गेली, तर तिला चैन पडेनासें होई; आणि मग हलकेच बाबांच्या उशाशीं जाऊन ती त्यांच्या कानांत सांगे कीं, "मी मघाशीं खोटें सांगितलें. मला तुम्ही क्षमा करा." पोरीच्या मनाची ही थोरवी पाहून बापाला स्वाभाविकपणेंच मोठा आनंद होई. जेन ही कांहींशी लहानखुरी होती; आणि बाप तर मोठा उंचापुरा आणि पोसलेला असे. आदितवारीं देवळांत वगैरे जातांना बाबांच्या बरोबर आपण गेलों, तर 'येवढ्या धिप्पाड माणसाची ही कुलुंगी मुलगी' असें आपल्याला लोक म्हणतात, हें तिच्या लक्षांत आलें होतें. म्हणून चणीनें लहान असलेल्या आपल्या चुलत्याबरोबरच ती बाहेर जात असे.
तथापि, आपला बाप म्हणजे एक कोणीतरी मोठा माणूस आहे, हें तिला लहानपणापासून कळून चुकलें होतें. आब्राहम लिंकन वारला, तेव्हां हा आदामभाई अतिशय कष्टी झाला; आणि पुढे एकदां जेव्हां जोसेफ मॅझिनी वारला, तेव्हांहि तो असाच कष्टी होऊन बसला. आब्राहम लिंकन किंवा मॅझिनी हीं माणसें कोण, हें जेनला इतक्या लहानपणीं माहीत नव्हते; पण थोड्याशा वर्षांनीं त्यांचा महिमा तिला कळून आला. आपला बाप येवढ्या मोठ्या लोकांचा चाहता आणि अभिमानी होता, हें पाहून तिला फार आनंद वाटू लागला.
प्लूटार्कनें लिहिलेली मोठ्या लोकांची चरित्रे बापानें जेनला वाचावयास दिली. चरित्र वाचावें, त्याचा सारांश सांगावा, आणि चार आणे बक्षीस घ्यावें, असे धोरण तिनें व बापानें ठेवलेलें होतें! कांहीं अंशीं बक्षिसाच्या लालचीने, पण मुख्यतः या चरित्रांतील ऐतिहासिक रस फार मधुर वाटल्यामुळे जेननें हीं चरित्रें तर वाचलीच; पण आणखीहि अनेक चरित्रांचें वाचन करतां करतां अमेरिकन स्वातंत्र्याची प्रस्थापना करणाऱ्या थोर पुरुषांच्या चरित्रांपर्यंत ती येऊन ठेपली. तथापि हीं सारीं चरित्रे वाचूनहि तिच्या मनाला राहून राहून असें वाटें कीं, आपले बाबा यांच्याहूनहि थोर आहेत. तिनें बापाचा आचार-विचार अगदीं जवळून पाहिलेला होता. तो विधिमंडळांत निवडून आलेला होता; आणि पैसे खाण्याचें धोरण त्याने ठेवलें असतें, तर वाटेल तेवढा गल्ला त्याला जमा करतां आला असता. परंतु, त्याच्या सचोटीची कदर एवढी मोठी असे, कीं लुबरे कामसाधू लोक त्याच्या नजिक येण्यासहि धजत नसत. अशा बापाच्या संगतींत घरीं वाढत असलेली जेन सतराव्या वर्षी रॉकफोर्ड कॉलेजांत प्रविष्ट झाली.
कॉलेजांत आल्यावर, तिच्या मनाचें क्षितिज अधिक रुंदावू लागावें हें अगदी स्वाभाविक होते. आतांपर्यंत बाबाच काय ते तिचें परब्रह्म होतें पण आतां तिला निराळीं ब्रह्में भेटू लागली. मानवी जीवनांत सामरस्याचे महत्त्व फार आहे व हैं ओळखणारा तत्त्ववेत्ता जो इमर्सन, त्याचें नांव आतां जेनला चांगले माहीत झाले; आणि याहिपेक्षां म्हणजे मानवाची सेवा करण्यांतच जीविताचें सारसर्वस्व आहे, हे ज्या येशू ख्रिस्ताने जगाला दोन हजार वर्षापूर्वी सांगितले, त्याच्या चरित्राची आणि उपदेशाची पारायणें या उच्च शिक्षणांत तिला करतां येऊ लागलीं. जेनच्या मनाचा पिंड आधींच औदार्याच्या कणांचा बनलेला होता. बापाच्या उदाहरणानें तिचें मन शुद्धतर झालेलें होतें. आतां या दोन थोर पुरुषांच्या चरित्रसमागमांत हा तिचा मनःपिंड अत्यंत सात्त्विक, शुद्ध जाणि तेजोमय बनला.
१८८९ मध्यें फिलॅडेल्फिया येथील बायकांच्या वैद्यक महाविद्यालयांत जेन प्रविष्ट झाली. एक वर्ष जातें न जातें, तोंच तिला एक चमत्कारिक दुखणें आलें. तिच्या पाठीचा कणा वाकूं लागला; आणि तिनें अंथरूण धरलें. डॉक्टरांनीं बरेच इलाज करून पाहिले, आणि शेवटीं सल्ला दिला कीं, 'या हवेंतून तुम्ही बाहेर पडा; वर्ष दीड वर्षपर्यंत युरोपची फेरी करून या.' डॉक्टरांच्या सल्ल्याला अनुसरून जेन युरोपला हवा पालटण्यासाठीं निघाली; आणि इंग्लंडांत येऊन दाखल झाली. इंग्लंडच्या राजधानीचें तें वैभव पाहून तिला मोठा आचंबा वाटला. शहरचे देखावे पाहण्यासाठी एका उघड्या गाडीत बसुन ती किती वेळ तरी हिंडत होती.
येतां येतां लंडनच्या पूर्व टोकाला ती आली. मात्र तेथील देखावा पाहून तिच्या मनांत जी उलथापालथ झाली, तिनें जेनच्या जीविताला कायमचे निराळें वळण लावलें. लंडनच्या या बाजूला गरीब लोकांची वस्ती फार, दारिद्र्यानें गांजलेले, भुकेलेले, पोटावर थापट्या मारीत हिंडणारे आणि चिंध्या पांघरलेले हजारों लोक तिला येथें दिसलें. जवळच एका तिट्ठ्यावर भाजीपाल्याचा लिलाव चालू होता. 'भाजीपाल्याचा' याचा अर्थ मात्र निराळा समजला पाहिजे. कोबीचा पाला, कांद्याचा पाला, नवलकोलाचा पाला, कीं जो इतर वस्तीतील लोकांनीं टाकून दिलेला असे, त्याचा लिलाव या ठिकाणीं चाललेला होता. शहराच्या निरनिराळ्या भाजी- बाजारांत भाज्यांचा जो गाळसाळ उरलेला असे, तोहि या लिलावांत दाखल झालेला होता. लिलाववाला 'एकवार, दोनवार' करीत होता; आणि तसला तो गळाठा घेण्यासाठीं सुद्धां त्या दरिद्री लोकांतले 'श्रीमंत दरिद्री' पुढे सरसावून येत होते. 'हे लोक या पाल्याचे करणार तरी काय, असें जेनला प्रथम वाटले; पण पोटाचा डबरा भरण्यासाठीं याहि वस्तूंचा गरीब लोक उपयोग करीत असले पाहिजेत, हे तिच्या चटकन् ध्यानांत आलें. मग निद्रित असलेले तिचें मानवी औदार्य क्षणांत खडबडून जागे झालें. मानवप्राण्याची ती दुस्थिति तिला बघवेना. आपण चांगले चांगले खाणारे आणि लेणारे लोक पातकी आहों, असें तिला वाटूं लागलें. आत्मारोपाचा आवंढा तिनें गिळला. या मुलीच्या मनाची बैठकच साफ बदलली. पुढें कांहीं दिवसपर्यंत ती लंडन शहरींच राहिली; पण शहरांतून फिरतां फिरतां आपण असल्या एखाद्या ठिकाणी जाऊन पुन्हा पोहचूं कीं काय, असा धसका तिला वाटू लागला. असला देखावा पुन्हां पाहणें नको, आपल्याला तो सहनच होणार नाहीं, असें तिच्या मनानें पक्के घेतलें. जर कां कोठें हाल, विपत्ति, दारिद्र्य, हीं दिसलींच, तर चट्कन् गाडींतून खालीं उतरे आणि दुःखितांचा थोडाबहुत तरी परामर्श घेऊन ती पुढे निघून जाई.
हिंडतां हिंडतां ती स्पेन देशांत आली. माद्रिद येथें असतांना 'बैलाची टक्कर' पाहण्यासाठीं ती गेली. तो भयानक देखावा पाहून ती अगदीं थिजूनच गेली. पहावयास आलेल्या सर्व लोकांनीं भोंवतींच्या उंच जागांवर बसावें, आणि मधल्या विस्तीर्ण हौद्यांत एका पिसाळलेल्या बैलाची आणि एका चपळ पहिलवानाची चाललेली झुंज पहावी, असा हा टकरीचा प्रकार असे. करमणुकीसाठीं मातबर लोक दुसऱ्या गरजू माणसांना कोणच्या संकटांत नेऊन घालतात, पुन्हां पुन्हां टाळ्या वाजवून त्याच कामांत त्यांना कसें गोवितात, आणि जर कां हे चपळ पहिलवान बैलांच्या हुंदाड्यानें मरण पावले, तर 'आज मोठीच मैफल उडाली' असें म्हणत घरी कसें परत येतात, हें पाहून मानवी दुष्टाव्याचे तिला फारच आश्चर्य वाटू लागलें.
माणसांची मनें कशी सुधारतील, तीं एकमेकांशी प्रेमानें केव्हां वागू लागतील, आणि हरतऱ्हेचे भेदभाव विसरून परस्परांच्या साहाय्याला कधीं धावूं लागतील, या चिंतेनें जेनचें मन कष्टी होऊं लागलें. पुष्कळदां असें होतें कीं, दुसऱ्यांच्या हालानें आपलें मन फार कष्टी होत आहे, यांतच माणसें समाधान मानतात; दुसऱ्यांच्या दुःखांचा प्रत्यक्ष परिहार करावा, हे त्यांना भावतच नाहीं. दुसऱ्याचें दुःख पाहून आपल्याला दुःख झालें म्हणजे आपली मानवता फार उंच दर्जाची ठरली, असें त्यांना वाटतें; आणि तीं येथेंच विराम पावतात. पण जे खरे थोर लोक आहेत, ते येथेंच थांबत नाहीत. दुःखितांच्या दुःखाचा परिहार प्रत्यक्ष कृतीनें केला नाहीं, तर आपली सहानुभूति, भूतदया हीं सारीं कमी कसाचीं ठरतात, हें त्यांनी ओळखलेलें असतें; आणि म्हणून ते कामाला लागतात. जेन अशा लोकांपैकीच एक होती. लोकांची मानवता उन्नत करावयास हवी, आणि त्यांचा बंधुभाव वाढवावयास हवा, हें झालें तरच जगांत शांति आणि सुख ही नांदतील असा मनाचा निश्चय करून ही तरुण स्त्री कामाला लागली.
युरोप-अमेरिकेचे इतिहास ज्यांनीं थोडेबहुत तरी वाचले आहेत, त्यांना हें माहीत आहे कीं, अमेरिकेतील लोकवस्ती युरोप व आफ्रिका येथील निरनिराळ्या लोकांची आवक होऊनच बनलेली आहे. प्रथम प्रथम इंग्लंड व हॉलंड येथील कांहीं लोक तिकडे गेले; मग फ्रान्समधले गेले. असें होता होता, ज्यांना स्वदेश नकोसा झाला होता, आणि जे स्वदेशाला नकोसें झालेले होते, असे शेकडों लोक आपपल्या देशांतून ऊठून अमेरिकेत जाऊन राहू लागले. जमीन सुपीक आणि वाटेल तेवढी फुकट मिळण्यासारखी, म्हणून ज्यांना कष्ट करण्याची धमक होती, ते सारे तिकडे जाऊं लागले. त्यांतच मजुरीसाठी आणलेल्या निग्रो लोकांची भर पडली.
अमेरिकेत जमा झालेले हे युरोपियन लोक एका भूमींत आले खरे; पण तेवढ्याने ते एक झाले नाहीत. आपण आयरिश आहों, आपण जर्मन आहों, आपण पोलिश आहों, अशी जाणीव प्रत्येक गटाला असे. हे गट मिळून जरी एकादें शहर बनत असले, तरी त्यांचे निरनिराळे मोहल्ले असत; आणि ते परस्परांशीं थोडेसें बाकूनच वागत. त्यांत पुन्हां कोणी प्रॉटेस्टंट, कोणी कॅथॉलिक, कोणी क्वेकर अशा पंथोपपंथांचे लोक असत. त्यामुळे बारीक बारीक गटांच्यासुद्धां चिरफळ्या झालेल्या होत्या. सुखासमाधानानें जमीन पिकवून खावी, असें न करतां हे लोक एकमेकांशीं हमरी- तुमरीवर येत. यांत आफ्रिकेंतून आलेल्या त्या काळ्या निग्रोंची काय रया रहात असेल, याची कल्पनाच केलेली बरी! असल्या लोकांनी गजबजलेलीं शहरे आणि गांवें अमेरिकेच्या पूर्वभागांत भराभर वाढत चालली होतीं. प्रत्येक गांवांत आणि शहरांत जातींचीं भांडणें अगदीं उतू जात असत. शिकॅगो शहरीं तर निरनिराळ्या जातींच्या लोकांचा एक शिकारखानाच बनला होता! वास्तविक पाहतां, काळे निग्रो सोडून दिले, तर युरोपांतील निरनिराळ्या देशांतून आलेले लोक एकाच खिस्ती धर्माचे, एकाच वर्णाचे, आणि जवळ जवळ एकाच संस्कृतीचे होते. त्यांच्या भाषा निराळ्या आणि त्यांचे देश निराळें इतकेंच काय तें. अशा लोकांनीं कां भांडावें, आणि हे असेच भांडत राहिले, तर अमेरिकेत लोकशाही कशी प्रस्थापित होईल, हा विचार जेनच्या मनांत अतिशय प्रबळ झाला. या सर्वांना एकत्र आणलें पाहिजे, त्यांच्यांतील साम्यें त्यांना दाखवून देऊन त्यांचा बंधुभाव जागृत केला पाहिजे, करावा. यासाठीं जेननें एकदम कामाला आरंभ केला. या कामाचा विस्तार होतां होतां अमेरिकेतील लोकशाही सध्यांचें रूप पावली.
युरोपांतून आलेल्या किंवा आफ्रिकेंतून आणलेल्या हलक्या प्रतीच्या लोकांचा उद्धार वरिष्ठ लोकांनी करावा, ही जेनच्या मनाची भूमिकाच नव्हती. तिला असें वाटे कीं, या प्रत्येक जातीच्या लोकांत कांहींना कांहीं तरी चांगले गुण असलेच पाहिजेत. कोणीहि लोक असे नसतात कीं, ज्यांच्यामध्यें कल्पना, भावना, उपजतबुद्धि, प्रवृत्ति यांचा यत्किंचितहि पोष झालेला नाहीं. जें करावयास हवें तें हें कीं, या पोसलेल्या गुणांची ओळख निरनिराळ्या जातींच्या लोकांना त्या त्या जातींतील जाणत्या लोकांनी करून द्यावयास हवी; परंतु अमेरिकेत त्या वेळीं घडत नव्हतें तें हें कीं या भिन्न भिन्न जातीच्या लोकांना परस्परांच्या मनोगुणांची माहिती व्हावी, आणि त्यामुळे त्यांनी एकमेकांशीं तुसडपणाने वागूं नये. जेननें असें ठरवलें कीं, यांची एकमेकांशी चांगली ओळख करून द्यावी. तिचें हें अवलोकन अगदी बरोबर होतें. आफ्रिकेंतून आलेले अगदींच अडाणी निग्रो लोक सोडले, तरी केवळ योग्य त्या परिचयाच्या अभाव इटॅलियन, ज्यू, जर्मन, फ्रेंच अशांसारखे लोकसुद्धां एकमेकांशीं सामरस्यानें वागत नसत. त्यांच्या मनाचा एक रांधाच होईना. हा करण्याची जर व्यवस्था झाली, तर अमेरिकन लोकांतील फुटीरपणा नाहींसा होईल, त्या सर्वांची मिळून एक सलग लोकशाही निर्माण होईल, हें जेनचें सामाजिक तत्त्वज्ञान अगदीं बरोबर होतें.
या तत्त्वज्ञानाला मूर्त रूप आणण्यासाठी, तिनें 'हल हाऊस' या नावाचे एक मंदिर उभे केलें. हें मंदिर मोठें सुंदर असुन त्याला अनेक दालनें होतीं; आणि तीं जरी श्रीमंती थाटानें श्रृंगारलेली नसली, तरी त्यांत सर्व प्रकारच्या सुखसोयी तिनें केलेल्या होत्या. नुसत्याच सुखसोयी असत्या, तर ती स्टेशनची एक वेटिंग रूम झाली असती. पण तिनें तेथें चांगलीं चांगलीं पुस्तकें ठेवलीं, निरनिराळ्या देखाव्यांची चित्रे भिंतीला लावली, नकाशे टांगले, टेबलांवर करमणुकीचीं साधनें ठेवली. एतावता, येथें जाऊन बसावें असें कोणालाहि वाटावें, इतपत आकर्षकता या मंदिराला तिनें प्राप्त करून दिली. तेथें जावें असें गरिबांनाहि वाटावें, श्रीमंतांनाहि वाटावें, स्त्रियांना वाटावें, पुरुषांनाहि वाटावें, आपापल्या ओळखीच्या वस्तू आणि संस्कृतीच्या खुणा पाहून सर्व जातींच्या लोकांना तेथें जावेसे वाटावें, अशी योजना या कल्पक स्त्रीनें केली; आणि मग वृत्तपत्रांतून घोषणा केली कीं, "या मंदिरांत सर्व लोकांनीं यावें; येथें कसलाहि भेदभाव नाहीं; येथे सर्वानाच आपापल्या संस्कृतीची ओळख पटेल; येथें सर्वांनीं यावें, खावें, प्यावें, गोष्टी बोलाव्या, एकमेकांना आपलीं सुखदुःखे सांगावीं, आणि स्नेहसंबंध जुळवावे."
पहिल्या- पहिल्यानें लोक थोडेसे बिचकलेच. त्यांना वाटलें कीं, यांत बाईचा कांहींतरी डाव असावा. गरिबांना वाटलें कीं, तेथें श्रीमंत येणार, तर आपण कसे जावें; आणि श्रीमंतांना वाटलें कीं तेथें जमलेल्या भिकाऱ्यांत आपण जाऊन कसें बसायचें? पण 'काय आहे तें बघू तर खरें' असें म्हणणारे कांहीं लोक निघालेच. जेननें त्यांचें चांगलें स्वागत केलें. खाद्यपेयांच्या, संभाषणांच्या, विश्रान्तीच्या तऱ्हा तिनें अशा ठेवल्या, कीं वादाला कोठें जागाच उत्पन्न होऊं नये; उलट परस्परांत असलेल्या चांगल्या गुणांचा व भावनांचा वापर होऊन त्यांना एकमेकांची संगति सुखाची वाटावी.
थोडेसे दिवस गेले; आणि या मंदिरांत येऊन गेलेले लोक भोवतालच्या लोकांना मंदिराचें स्वारस्य मनोभावें सांगू लागलें. अर्थताच मंदिरांत येणाऱ्या लोकांची संख्या भराभर वाढू लागली. पण हें मंदिर म्हणजे केवळ करमणुकीचें ठिकाण होऊं देतां कामा नये, असा जेनचा कटाक्ष होता. ती कॉलेजांत होती; तेव्हांपासूनच मनुष्यमात्राची सेवा हा तिच्या मनाचा धर्मच बनलेला होता; आणि युरोपांतील भ्रमन्तीनें तो दृढ झालेला होता. या सेवेचा उपक्रम या मंदिरांत बाईनें सुरू केला.
एकदां एक ग्रीक बाई घाबऱ्या घाबऱ्या मंदिरांत आली; आणि म्हणाली, 'रस्त्यांत माझें मूल चेंगरलें आहे, नवरा कामाला मेला आहे, आणि औषधाला माझ्यापाशीं कपर्दिकहि नाहीं. मी आतां काय करूं?' जेननें तत्काळ एका डॉक्टरला बोलावून आणलें. ताबडतोब औषधोपचार होऊन, त्या बाईचें मूल वांचलें. एकदां एक पंधरा सोळा वर्षाची इटॅलियन नवरी मुलगी या मंदिरांत धांवत आली आणि म्हणाली, नवऱ्याने दिलेली लग्नाची आंगठी माझ्या हातून गमावली; आणि म्हणून नवरा मला सारख्या शिव्या देत आहे.' जेननें त्या नवऱ्याला बोलावून आणलें. दोघांना बसवून घेऊन सौम्यपणानें त्यांना तिनें चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. अंगठीला लागणारें द्रव्य त्यांना दिलें, आणि ती त्या नवऱ्याला म्हणाली, 'आतां तरी तू हिला शिव्या देऊ नकोस.' नवरा-नवरी खूष होऊन जेनला दुवा देत मंदिरांतून बाहेर पडलीं! हळू हळू भोवतालच्या साऱ्या टापूंतील भांडणांचीं प्रकरणें तिच्याकडेच येऊं लागलीं; आणि मानवी मनाचे व्यापार नीट ओळखणाऱ्या या स्त्रीनें एका समजूतदार न्यायाधीशाची भूमिकाच आपल्याकडे घेतली. लोक म्हणत 'ही बाई श्रीमंत दिसते; पण गरिबांसारखीच अगदीं सरळ स्वभावाची आहे!'
लवकरच तिनें एक बालसंगोपन गृह काढलें. आसपासच्या टापूंतील बाया कामाला जात; तेव्हां त्यांच्या मुलांची फार आबाळ होत असे. या गृहांत आयांनीं आपली मुलें आणून सोडावीं, आणि कामावरून परत आल्यानंतर घरीं घेऊन जावीं, अशी व्यवस्था तिनें केली. मुलांची बडदास्त तिनें इतकी उत्तम ठेवली, कीं त्यांना परत घरी नेतांना, त्यांचीं सुहास्य वदनें पाहून आयांच्या मनाला आनंद वाटे. जेन म्हणे कीं, 'मी तुमची एक शेजारीण आहे; आणि म्हणून मी तुमच्या उपयोगी पडतें. याहून जास्त कांहीं नाहीं.' शेवटीं तिला 'भली शेजारीण' हेच नांव मिळालें; आणि 'शेजारधर्म म्हणजे सेवाधर्म' असा अर्थ लोकांच्या मनांत रूढ झाला.
चमत्कार असा कीं, शेजारधर्म, सेवाधर्म, परिचय- मंदिर या कल्पना शिकॅगो शहरांतून बाहेर पडून देशांतील इतर शहरांत भराभर पसरल्या. 'मित्रभावाचीं घरें' ठिकठिकाणीं स्थापन होऊं लागलीं. आतांपर्यंत एकमेकांपासून दूर रहात आलेले इटॅलियन, आयरिश, जर्मन हे सारे या मित्रेमंदिरांत एकत्र जमा होंऊं लागले; परस्परांना साहाय्य करूं लागले. अशा रीतीनें जेन अदाम्स हिच्या हस्तें एका नव्या सामाजिक तत्त्वज्ञानाचा उदयच झाला.
वंशीय सामरस्याचें हें मंदिर उभारण्याचे काम पुरे झाल्यावर, जेननें लहान मुलांना सुखी कसें करतां येईल, याकडे आपले लक्ष वळवलें. त्या काळांत लहान मुलांना कामाला लावण्याची पद्धति अमेरिकेत होती. एकीकडे आमचें राष्ट्र सुधारलेलें आहे, अशी फुशारकी मारायची, आणि दुसरीकडे सात सात वर्षांच्या कोंवळ्या पोरांना कारखान्यांत, वखारींत, कामाखालीं बेजार करावयाचें, अशी अमेरिकन नीति होती. कांहीं कांहीं ठिकाणीं सात वर्षांच्या मुलांना चवदा तास राबवून घेत असत. लेखकांनी या वर्णनाच्या कामी अतिशयोक्ति केली आहे असें धरून चाललें, तरी कष्टकरी मुलांना फार उपद्रव होत असे, हा सत्याचा सांका शिल्लकच रहातो. यंत्रादिकाचे धक्के लागून कित्येक मुले जन्माचीं अधू होत. जेन हिनें मातृपदाचा स्वीकार केव्हां केलाच नाहीं. पण या मुलांचे हाल पाहून स्रीजातीला सहज अशी जी वात्सल्यबुद्धि ती तिच्या ठिकाणीं उत्कटत्वानें प्रकट झाली; आणि नेहमींच्या मनोधर्माप्रमाणे ती एकदम कामाला लागली.
'लहान मुलांचे कष्ट' या विषयाचें तिनें संशोधनच सुरू केलें. होतां होता, तिच्यापाशीं इतकी आंखबंद माहिती जमा झाली, कीं या बाबतींतील तिचीं अनुमानें अचूक होऊं लागलीं; आणि तिनें केलेलीं विधानें प्रमाणभूत बनूं लागली. इलिनॉय परगाण्यांतील स्त्रियांच्या आणि कामकऱ्यांच्या संघटनांशी तिनें आपला संबंध जोडला; आणि त्यांच्या सहकार्यानें मोठी चळवळ करून १९०३ साली लहान मुलांना न राबवण्याच्या कामी सरकारांतून एक कायदा करून घेतला. या कायद्यानें तिनं काय साधलें, तें लक्षांत घेतलें, म्हणजे मूळचा सामाजिक रोग किती दुर्धर होता याची कल्पना येते. कायदा एवढाच झाला कीं, 'सोळा वर्षांपेक्षां लहान वयाच्या मुलांना सकाळीं साताच्या पूर्वी आणि संध्याकाळीं साताच्या नंतर काम सांगूं नये.' यावरून इतकेंच दिसून येतें कीं, सोळा वर्षांच्या खालच्या मुलांना हे लोक दिवसभर राबवीत असत! जेननें हा मोठाच विजय मिळवला. कारण या प्रश्नाकडे देशांतील विचारवंतांचें मन तिनें ओढून घेतलें; आणि अनेक परगण्यांत या कायद्याचें अनुकरण होऊं लागलें.
जेन येवढ्यावरच थांबली नाहीं. तिला वाटें कीं, देशांतील पोरें वांया जात आहेत. शेकडों पोरें रस्त्याच्या गटारांत खेळत असत. यांना जास्त स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणांत नेलें आणि खेळू दिलें, तर हीच पुढें फार चांगलीं माणसें होतील, असा कयास तिनें बांधला; आणि 'गांवांतील लहान मुलांचीं क्रीडांगणें' हा नवा उपक्रम तिनें सुरू केला. शिकॅगो शहरांत लवकरच कितीतरी क्रीडांगणे निघाली; आणि तेथें सर्व दर्जाचीं मुलें आनंदाने खेळू लागली. होतां होतां ही क्रीडांगणांची चळवळ सर्व अमेरिकेभर पसरली. ती म्हणे कीं, 'मुलें कोणाचीहि असू द्या. त्यांच्या ठिकाणीं देवानें चांगल्या भावनांचें आणि सामर्थ्याचें बीज खोचलेलेंच असतें. हीं बीजें वाढवणें, हाच खरा खरा थोर धर्म होय.' निरनिराळ्या जातीची हजारों मुलें तिच्या त्या मंदिरांच्या प्राकारांत जमूं लागली; आणि नवल हें कीं, तिनें लावलेल्या या नव्या वळणामुळे गटारांतून बाहेर आलेली शेकडोंच्या शेकडों मुलें समाजांत मानाचे धंदे करूं लागलीं. त्यांचें तें वैभव पाहून जेन वात्सल्याने गहिंवरून जाई. येथपर्यंत जेनला मोठेंच यश मिळत गेलें.
तिला वाटें कीं, सर्वांनीं सुखासमाधानानें वागावें; एकमेकांची मनोगतें समजावून घेऊन, त्यांनीं परस्परांशीं जमवून घ्यावें; आणि एकमेकांच्या अडीअडचणींचा परिहार करावा. हे व्हावयाचें, तर देशांत शांति नांदली पाहिजे; आणि ती नांदावयाची, तर जसें माणसां-माणसांनी एकमेकांत, तसें राष्ट्रा-राष्ट्रांनी परस्परांत समंजसपणानें आणि सलोख्यानें वागावें. युद्ध म्हटले, की तिच्या अंगावर कांटा उभा राही. पण दुर्देव असें कीं, १९१४ सालीं पहिलें महायुद्ध सुरूं झालें. जगांतील वारे कसे वहात आहेत हें तिनें पाहिलेंच होतें. म्हणून ती सर्व राष्ट्रांना व विशेषतः अमेरिकेला असें सांगू लागली कीं, 'तुम्ही वर्दळींवर येऊं नका; मतभेद तडजोडीनें मिटवा. हातांत शस्त्रे घेऊं नका; आणि बायका-मुलांच्या जीविताचा उन्हाळा करूं नका." युद्धाच्या गर्जनांनीं भांबावलेले लोक म्हणूं लागले कीं, 'ही बाई जर्मनीच्या बाजूची आहे; जर्मनांनी पुंडाई करावी, आणि आम्हीं मात्र गप्प बसावें, असें हिला वाटतें.' तिनें प्रत्युत्तर केलें कीं, 'जर्मनांनींही पुंडाई करूं नये, व तुम्हींहि शस्त्रे धारण करू नये.' तथापि युद्धाचा डंका येवढ्या जोरानें वाजू लागला, कीं तिच्या शांतिपाठाच्या मंजुळ गाण्याचे स्वर कोणाला ऐकूंहि जाईनात. पण तिनें आपला हट्ट सोडला नाहीं. शांतीचें निशाण हातीं धरून ती एकटी बाजूला उभी राहिली; आणि म्हणाली, 'माझी ही घोषणा तुम्हांला इतक्यांत पटावयाची नाहीं.' भ्रान्त बनलेल्या लोकांनीं तिला हिडिस- फिडीस केलें, देशद्रोही म्हटलें, आणि जणूं कांहीं तिला वाळीत टाकले; पण ही साध्वी स्त्री आपल्या तत्त्वाला जागली; आणि विश्वशांतीची घोषणा करीत एकाकी उभी राहिली.
युद्ध संपलें; आणि शेकडों प्रपंच कसे उजाड झाले आहेत, हें लोकांना प्रत्यक्ष दिसूं लागलें. स्त्रियांच्या जीविताची तर दाणादाण झाली होती. या गोष्टीचा फायदा घेऊन तिनें 'अमेरिकन स्त्रियांचा शांतिपक्ष' जोरानें पुढें आणला. हा पक्ष पूर्वी होताच. पण आतां त्याला नवें बळ तिनें आणले. लवकरच इतर देशांतहि अशा तऱ्हेच्या संघटना उभ्या राहिल्या; आणि त्या सर्वांचें मिळून एक जाळें बनले, जेनचा महिमा एवढा मोठा, कीं या सार्वदेशीय संघटनेचें अध्यक्षपद जेनला देण्यांत आलें. अशा रीतीनें जेन एक जगप्रसिद्ध स्त्री बनली.
तिनें याच वेळीं लोकांना बजावलें कीं, 'लवकरच हुकुमशाह्या प्रस्थापित होतील; आणि शिरजोर हुकूमशहा तमाम लोकांच्या अन्नांत माती कालवतील.' तिचा शांतिघोष जगभर एवढा गाजला, कीं १९३१ सालीं निकोलस मूरे बटलर याला व जेनला मिळून शांतीचें नोबेल प्राइज मिळाले. या बक्षिसाचे मिळालेले सुमारे पाऊण लक्ष रुपये तिनें स्त्रियांच्या आंतरराष्ट्रीय संघाला देऊन टाकले; आणि देतांना सांगितलें कीं, 'देशोदेशींच्या अर्भकांना तुम्ही जवळ घ्या; आणि परस्परांची मनोगतें समजावून घेऊन विश्वांत शांति प्रस्थापित करा.'
१९३५ सालीं जेनच्या कुशींत एकाएकीं चमका निघू लागल्या. शस्त्रक्रिया केली पाहिजे, असें डॉक्टर म्हणू लागले. शस्त्रक्रिया झाली, तों आंतून एक मोठें थोरलें गळू निघालें. हे कॅन्सरचेंच दुखणें असले पाहिजे. चारच दिवसांनीं या जगद्विख्यात स्त्रीचा अन्त झाला. पन्नास हजार लोक तिच्या प्रेतयात्रेला गेले; आणि या शान्तिदेवीचें नांव घेऊन ते सारे ओक्साबोक्शी रडले!
● ● ●