Jump to content

एकनाथी भागवत/अध्याय सतरावा

विकिस्रोत कडून

<poem>

एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णायनमः ॥

ॐ नमो श्रीसद्गु।रु महामेरु । सुक्ष्मस्वरूपें तूं गिरिवरु । चैतन्यस्वभावें अतिथोरु । तूं आधारु सर्वांचा ॥१॥ तुझ्या निजबोधाचीं शिखरें । वैकुंठकैलासादि अतिथोरें । तेथें ब्रह्माविष्णुमहारुद्रें । तुझेनि आधारें नांदिजे ॥२॥ तुझिया आधारस्थितीं । नांदती त्रैलोक्य-लोकपंक्ति । सकळ भूतांची उत्पत्ति स्थिती । निदान अंतीं तुजमाजीं ॥३॥ सुरासुर लहानथोर । एक सौम्य एक क्रूर । इयें भूतें धरूनि निर्विकार । स्वरूप साचार पैं तुझें ॥४॥ तेथ विवेकाचें आगर । सच्चिदानंदाचे रत्नााकर । तेथील लाधल्या कंकर । नीच ते थोर वेव्हारे होती ॥५॥ ज्याच्या औषधींचा चमत्कार । सेवितां करिती अजरामर । जेथ चिद्गंषगेचे निर्झर । निरंतर प्रवाहती ॥६॥ जो सुरनरांचा विश्राम । जो सकळ आश्रमांचा आश्रम । जो क्रियाकर्मांचें नैष्कर्म्य । जो निजधाम जीवाचे ॥७॥ जो भजनाची कुळवाडी । जो भक्तजीवनाची वाडी । जो आवडीची निजआवडी । जो गोडियेची गोडी निजात्मता ॥८॥ ऐसा सद्गु रु महामेरु । जो कठिणत्वेंवीण आधारु । ज्याचेनि अंगें संसारु । होय सुखकरु साधकां ॥९॥ त्या साधकांचें सामाधान । शिष्यांचा स्वानंदघन । आर्ता-चातकां निजजीवन । स्वामी जनार्दन तुष्टला ॥१०॥ तयाचा जो चरणप्रसादु । श्रीभागवतीं एकादशस्कंधु । पूर्वार्धाचा विनोदु । भाषाप्रबंधु वाखाणिला ॥११॥ तेथें उद्धवें पुशिल्या विभूती । त्या षोडशाध्यायीं श्रीपती । सांगितल्या यथानिगुतीं । भजनस्थितीलागोनी ॥१२॥ त्या विभूतींमाजीं निजवर्म । `भक्तांचें जें भजनकर्म । तें मी केवळ आत्माराम' । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥१३॥ तेथ आशंकेची व्युत्पत्ती । 'करितां कर्माची कर्मगती । कर्मठ जाहले नेणों किती । तरी कर्में मुक्ती घडे केवीं' ॥१४॥ कर्में करितां वाडेंकोडें । कर्मीं कर्मठता न चढे । कर्मांमाजीं मोक्ष आतुडे । हेंचि रोकडें पुसों पां ॥१५॥ स्वयें बोलिला श्रीपती । `सात्त्विकांची जे कर्मस्थिती । ते कर्मचि माझी विभूती' । हें सोळाव्याअंतीं निरूपिलें ॥१६॥ स्वयें आचरितां स्वकर्म । तें कर्मचि होय ब्रह्म । हेंचि कर्मक्रियेचें वर्म । देवासी सुगम पुसों पां ॥१७॥ ऐसा पोटिंचा आवांका । तेचि पुसावया आशंका । वर्णाश्रमांची स्वधर्मपीठिका । देवासी देखा पुसत ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

उद्धव उवाच- यस्त्वयाभिहितः पूर्वं धमस्त्वद्भ-त्तिलक्षणः । वर्णाश्रमाचारवतां सर्वेषां द्विपदामपि ॥१॥

उद्धव म्हणे गा भक्तपती । ऐकतां तुझ्या निजविभूति । मज ऐसें गमलें चित्तीं । स्वधर्मेंसीं भक्ती घडे कैसी ॥१९॥ तुवां कल्पादि वाडेंकोडें । स्वधर्मकर्में भक्ति जोडे । हें वर्णाश्रमनिजनिवाडें । निरूपण चोखडें निरूपिलें ॥२०॥ सर्वां मानवां परम गति । स्वधर्में घडे भगवद्भपक्ति । या निरूपणाची निगुती । तुवां निश्चितीं निरूपिली ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

यथाऽनुष्ठीयमानेन त्वयि भक्तिर्नृणां भवेत् । स्वधर्मेणाऽरविन्दाक्ष तत्समाख्यातुमर्हसि ॥२॥

ऐके कमलनयना अच्युता । जो कां स्वधर्म अनुष्ठितां । तुझी निजभक्ती स्वभावतां । प्राण्याच्या हाता जेणें लाभे ॥२२॥ ते कर्मकुशलतेची स्थिती । मजलागीं सांगावी सुनिश्चितीं । कमलनयना कमलापती । कृपामूर्ती माधवा ॥२३॥ तूं ऐसें म्हणशील श्रीपती । `म्यां कल्पाचे आधीं कवणाप्रती । सांगितली स्वधर्मस्थिती' । तरी ते विनंती अवधारीं ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

पुरा किल महाबाहो धर्मं परमकं प्रभो । यत्तेन हंसरूपेण ब्रह्मणेऽभ्यात्थ माधव ॥३॥

ज्याच्या बाहूचा प्रताप अद्भुात । विश्वमर्यादा धर्मसेत । राखों जाणे यथास्थित । त्यालागीं म्हणिपत `महाबाहो' ॥२५॥ स्वधर्मकर्माचा द्योतकु । अनादि वक्ता तूं एकु । वर्णाश्रमादि विवेकु । उपदेशकु तूं स्त्रष्ट्याचा ॥२६॥ पूर्वीं हंसरूपें सविस्तर । बोलिलासी स्वधर्माचा निर्धार । त्यांतील तुवां अध्यात्मसार । निवडूनि साचार मज सांगितलें ॥२७॥ तेथील स्वधर्माचें लक्षण । मज न कळेचि निरूपण । जें तूं हंसरूपे आपण । स्वधर्म जाण बोलिलासी ॥२८॥ तुझेनि मुखें यथोचितें । भक्तियुक्त आश्रमधर्मातें । सनत्कुमार जाहले श्रोते । तेंचि मातें सांगावें ॥२९॥ म्हणसी `सनत्कुमारद्वारा । धर्म विस्तारला परंपरा । तो विचारूनि करीं निर्धारा' । हें सारंगधरा घडेना ॥३०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

स इदानीं सुमहता कालेनामित्रकर्शन । न प्रायो भविता मर्त्यलोके प्रागनुशासितः ॥४॥

काम क्रोध लोभ अभिमान । हे भक्तांचे वैरी सहाजण । त्यांचें तूं करिशी निर्दळण । अरिमर्दन या हेतू ॥३१॥ भक्तांचें अरिनिर्दळण । तुजवांचोनि कर्ता आन । तिहीं लोकीं नाहीं जाण । अनन्यशरण यालागीं ॥३२॥ तुवां कल्पाचिये आदीसी । उपदेशिलें सनकादिकांसी । बहुकाळ जाहले त्या बोलासी । ते धर्म कोणापाशीं प्रायशां नाहीं ॥३३॥ प्रायशां ये कालीं नर । नाहीं स्वधर्मी तत्पर । शिश्नोदरीं अत्यादर । स्वधर्मविचार विसरोनी ॥३४॥ याथातथ्यें धर्मप्रतिष्ठा । करी ऐसा नाहीं उपदेष्टा । यालागीं जी वैकुंठा । स्वधर्मनिजनिष्ठा मज सांग ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ व ६ वा

वक्ता कर्ताऽविता नान्यो धर्मास्याच्युत ते भुवि । सभायामपि वैरिञ्च्यां यत्र मूर्तिधराः कलाः ॥५॥

कर्ताऽवित्रा प्रवक्त्रा च भवता मधुसूधन । त्यक्ते महीतले देव विनष्टं कः प्रवक्ष्यति ॥६॥

अलुप्तज्ञानें स्वधर्मवक्ता । ये भूलोकीं गा तत्त्वतां । तुजवांचोनि अच्युता । आणिक सर्वथा असेना ॥३६॥ एक शास्त्रमर्यादाव्युत्पत्ती । कर्मकलाप बोलों जाणती । परी कर्माची आचरती गती । तेही नेणती तत्त्वतां ॥३७॥ यालागीं गा भगवंता । धर्माचा कर्ता वक्ता । धर्म विस्तारूनि रक्षिता । आणिक सर्वथा असेना ॥३८॥ पहातां या लोकांच्या ठायीं । तुजऐरसा सर्वज्ञ नाहीं । ऐसें विचारितां लोकीं तिंही । तुजसमान नाहीं सांगता ॥३९॥ जरी सत्यलोक पाहणें । जेथें चारी वेद षड्दर्शनें । इतिहास स्मृति पुराणें । मूर्तिमंतपणें उभीं असतीं ॥४०॥ तेथें सनकादिकांचा प्रश्न । ब्रह्मयासी न सांगावे जाण । तुवां हंसरूपें येऊन । समाधान दीधलें ॥४१॥ ते ब्रह्मसभेचा ठायीं । तुजऐनसा वक्ता नाहीं । तो तूं भक्तानुग्रहें पाहीं । या लोकांच्या ठायीं मूर्तिमंत ब्रह्म ॥४२॥ तेणें तुवां सर्व कर्मधर्मसंस्था । करूनि दाविली तत्त्वतां । तो तूं निजधामा गेलिया आतां । स्वधर्मवक्ता मग कैंचा ॥४३॥ भक्तियुक्त स्वधर्मगती । सांगवया यथास्थिती । तुजवांचोनियां श्रीपती । आणिकासी शक्ति असेना ॥४४॥ तूं भक्तसाह्य जगज्जीवन । भक्तमदगजभंजन । यालागीं नांवें तुं `मधुसूदन' । ऐसें प्रार्थून बोलत ॥४५॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

तत्त्वं नः सर्वधर्मज्ञ धर्मस्त्वद्भ-क्तिलक्षणः । यथा यस्य विधीयेत तथा वर्णय मे प्रभो ॥७॥

तूं सर्वज्ञ ज्ञानमूर्ति । तरी मनुष्यांची कर्मगति । वर्णाश्रमांची धर्मस्थिती । यथानिगुतीं मज सांग ॥४६॥ वर्णबाह्याचें निजकर्म । तोही सांगावा विहित धर्म । उद्धवें प्रार्थिला पुरुषोत्तम । तेणें मेघश्याम तुष्टला ॥४७॥ सकळ जनांचा हितकर । उद्धवें प्रश्न केला सधर । तो ऐकोनि शुकयोगींद्र । आनंदनिर्भर तेणें प्रश्नें ॥४८॥ शुक्र म्हणे परीक्षितीसी । धन्य बुद्धी ते उद्धवासी । जेणें प्रार्थूनि हृषीकेशी । जाहला जगासी उपकारी ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

श्रीशुकउावाच- इत्थं स्वभृत्यमुख्येन पृष्टः स भगवान् हरिः । प्रीतः क्षेमाय मर्त्यानां धर्मानाह सनातनान् ॥८॥

शुक्र म्हणे गा परीक्षिती । सावधान होईं चित्तीं । धन्य उद्धवाची प्रश्नोक्ती । स्वधर्मे मुक्ती पुशिली ॥५०॥ जो भृत्यांमाजीं पढियंता । अत्यंत आवडे कृष्णनाथा । त्या वेगळें श्रीअनंता । क्षणही सर्वथा करमेना ॥५१॥ ज्यापाशीं गा निजगुज । सदा सांगे गरुडध्वज । ज्यावेगळें आप्तकाज । अधोक्षज बोलेना ॥५२॥ ज्याच्या वचनासी विलंबु । क्षण न करीच रमावल्लभु । जो ब्रह्मादिकां दुर्लभु । तो जाहला सुलभु उद्धवा ॥५३॥ यालागीं `भृत्यमुख्यात' । आली उद्धवाचे हाता । तेणें प्रार्थूनियां भगवंता । `स्वकर्में मुक्तता' पुशिली ॥५४॥ हो कां ज्याचेनि प्रश्नधर्मे । जग उद्धरिलें यथानुक्रमें । ज्यालागीं गा पुरुषोत्तमें । मोक्ष स्वधर्मे प्रकटिजे ॥५५॥ स्वधर्म करितां स्वभावतां । निजमोक्ष लाभे आयिता । एवढ्या उपकाराची कथा । उद्धवें तत्त्वतां पुशिली ॥५३॥ ऐकोनि चातकांचे वचन । गर्जोनि वर्षे जेवीं घन । कां वत्सहुंकारें जाण । ये हुंबरेन धेनु जैशी ॥५७॥ तेवीं ऐकोनि उद्धवाच्या बोला । श्रीकृष्ण निजबोधें गर्जिन्नला । अतिस्वानंदें संतोषला । काय बोलिला गोविंदु ॥५८॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

श्रीभगवानुवाच- धर्म एष तव प्रश्नो नैःश्रेयसकरो नृणाम् । वर्णाश्रमाचारवतां तमुद्धव निबोध मे ॥९॥

जेवीं कां पुत्र एकुलता । त्यासी कांहीं वंचीना माता । तेवीं उद्धव श्रीकृष्णनाथा । त्याचें वचन वृथा हों नेदी ॥५९॥ हरिखें म्हणे सारंगपाणी । धन्य धन्य उद्धवा तुझी वाणी । मोक्षमार्गींची निशाणी । हे जनालागोनी त्वां केली ॥६०॥ तुझ्या प्रश्नाचें प्रश्नोत्तर । वर्णाश्रमी जे कोणी नर । त्यांसी स्वधर्मचि मोक्षकर । ऐक साचार सांगेन ॥६१॥ कल्पादिपासोनि स्वधर्मसंस्था । पुरातनयुगवर्ती कथा । तुज मी सांगेन तत्त्वतां । ऐक आतां उद्धवा ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक १० व ११ वा

आदौ कृतयुगे वर्णो नृणा हंस इति श्रृतः । कृतकृत्याः प्रजा जात्या तस्मात्कृतयुगं विदुः ॥१०॥

वेदः प्रणव एवाग्रे धर्मोऽहं वृषरूपधृक् । उपासते तपोनिष्ठा हंसं मां मुक्तकिल्बिषाः ॥११॥

पूर्वील कृतयुगींचें लक्षण । तैं नव्हते गा चारी वर्ण । बहुशाखा वेदपठण । कर्माचरण तैं नाहीं ॥६३॥ तैं सकळ मनुष्यांसी जाण । `सोहंहंसा' चें अखंड ध्यान । यालागीं `हंस' हा एकचि वर्ण । सर्वांसही जाण ते काळीं ॥६४॥ तैं `प्रणवमात्रें' वेदपठण । वृषरूपें मी आपण । धर्म चतुष्पाद संपूर्ण । अधर्माचें जाण नांवही नाहीं ॥६५॥ ते काळीं श्रेष्ठ सत्त्वगुण । यालागीं सत्यवादी जन । अवघे धर्मपरायण । कपट तैं जाण जन्मलें नाहीं ॥६६॥ परद्रव्य आणि परदारा । यांच्या अभिलाषाचा थारा । स्पर्शला नाहीं जिव्हारा । ते काळींच्या नरां धर्मिष्ठां ॥६७॥ ते काळींच्या जना धर्मिष्ठां । `सोहंहंसा' ची आत्मनिष्ठा । हेंचि भजन मज वरिष्ठा । `तपोनिष्ठा' तया नांव ॥६८॥ तैं स्वर्गा जावें हे नाहीं कथा । नेणती नरकाची वार्ता । अधर्माची अवस्था । स्वप्नीहीं चित्ता स्पर्शेना ॥६९॥ यापर प्रजा समस्त । स्वधर्मस्वभावें कृतकृत्य । यालागीं जाण निश्चित । त्यातें बोलिजेत `कृतयुग' ॥७०॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

त्रेतामुखे महाभाग प्रणान्मे हृदयात्रयी । विद्या प्रादुरभुत्तस्या अहमासं त्रिवृन्मखः ॥१२॥

उद्धवा या कलियुगाच्या ठायीं । तुझ्या भाग्याची परम नवायी । कृतयुगींच्या प्रजांपरीस पाहीं । तुज माझ्याठायीं विश्वास ॥७१॥ त्रेतायुगीं प्रकटलें कर्म । जो वैराज मी पुरूषोत्तम । त्या माझेनि निःश्वासें त्रयीधर्म । वेदसंभृम वाढला ॥७२॥ तेथ त्रैविद्या विविध भेद । नाना मंत्र नाना छंद । ऋग्वेदादि तिन्हीं वेद । प्रकटले प्रसिद्ध निजशाखीं ॥७३॥ त्या वेदांपासाव त्रिविध मख । त्रिमेखलायुक्त मीचि देख । जेथ होत आध्वर्यव हौत्रिक । कर्मविशेख जे ठायीं ॥७४॥ ऐसें मद्‌रूप यज्ञकर्म । तेथिल्या अधिकाराचें वर्म । दों श्लोकीं पुरुषोत्तम । वर्णाश्रम सांगत ॥७५॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

विप्रक्षत्रियविट्शूद्रा मुखबाहूरुपादजाः । वैराचात्पुरुषाज्जाता य आत्माचारलक्षणाः ॥१३॥

वैराजपुरुषापासाव जाण । मुखीं उपजले `ब्राह्मण' । बाहूपासूनि `राजन्य' । ऊरु जन्मस्थान `वैश्यांचें' ॥७६॥ `शूद्र' चरणीं जन्मले जाण । यापरी जाहले चारी वर्ण । यांचें ऐक मुख्य लक्षण । स्वधर्माचरण सर्वांशीं ॥७७॥ चतुर्वर्णांची उत्पत्ती । वैराज पुरुषापासूनि या रीतीं । आतां आश्रमांची स्थिती । ऐक निश्चितीं सांगेन ॥७८॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

गृहाश्रमो जघनतो ब्रह्मचर्यं हृदो मम । वक्षःस्थानात् वने वासो न्यासः शीर्षणि संस्थित ॥१४॥

`गृहास्थाश्रमासी' जघनस्थान । `ब्रह्मचर्य' माझ्या हृदयीं जाण । `वानप्रस्थासी' मी आपण । वाढवीं महिमान वक्षः स्थळीं ॥७९॥ चतुर्थाश्रम जो `संन्यास' । त्याचा माझे शिरीं रहिवास । एवं वर्णाश्रमविलास । तुज सावकाश सांगितला ॥८०॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

वर्णानामाश्रमाणां च जन्मभूम्यनुसारिणीः । आसन्प्रकृतयो नॄणां नीचैर्नीचोत्तमोत्तमैः ॥१५॥

जैसें जन्म जेसें स्थान । त्या वर्णाश्रमा तैसे गुण । उत्तमीं उत्तमत्व जाण । नीचीं नीचपण सहजेंचि ॥८१॥ `सत्त्वप्राधान्ये' ब्राह्मण । `सत्त्वरजें' क्षत्रिय जाण । `रजतमें' वैश्यवर्ण । शूद्र ते जाण `तमोनिष्ठ' ॥८२॥ तेचि ब्राह्मणादि चारी वर्ण । त्यांचें प्रकृतींचे लक्षण । वेगळें वेगळेंचि पैं जाण । स्वयें नारायण सांगत ॥८३॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

शमो दमस्तपः शौचं सन्तोषः क्षान्तिरार्जवम् । मद्भदक्तिश्च दया सत्यं ब्रह्मप्रकृतयस्त्विमाः ॥१६॥

उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । ब्राह्मणप्रकृति दशलक्षण । तुज मी सांगेन निरूपण । तें सावधान अवधारीं ॥८४॥ मनादि ज्ञानेंद्रियवृत्ती । बाह्य दृष्टीं परिचारस्थिती । ते आवरूनि विवेकयुक्तीं । आत्मप्रतीति धरावी ॥८५॥ तेचि वृत्तीचें धरणें ऐंसें । कृष्णसर्पाचें मुख धरणें जैसें । तो वेढे उकली जंव आपैसें । तव धारणासौरसें नेहटावा ॥८६॥ तेवीं वैराग्यप्रतापवशें । गुरुवचनाचेनि विश्वासें । अंतरवृत्तीतें ऐसें । जंव ये आत्मासमरसें निजात्मता ॥८७॥ मुख्य करूनि गुरुवचन । तदर्थी बुद्धि निमग्न । तत्प्रवण होय मन । `शम' तो जाण या नांव ॥८८॥ ब्राह्मणप्रकृतिमाजीं जाण । हें स्वाभाविक निजलक्षण । या नांव गा शमगुण । ऐक निरूपण दमाचें ॥८९॥ विषयप्रवृत्ति प्रचंड । कर्मेंद्रियांचें बळ बंड । विधीनें त्यांचें ठेंवूनि तोंड । सैरा वितंड विचरों नेदी ॥९०॥ वेदविधीचेनि हातें । देहनिर्वाहापुरतें । खाणें जेवणें इंद्रियांतें । तो जाण येथें `दम' गुण ॥९१॥ तेथ शम तो जाण मुख्य राजा । दमादि इतर त्याच्या प्रजा । ते दोनी सांगितले वोजा । ऐक तिजा तपोनेमु ॥९२॥ शमें ज्ञानेंद्रियौपशमु । तेचि कर्मेंद्रियां मुख्य दमु । याहीवारी वेदोक्त कर्मु । तें ज्ञान परमु गौरवाचें ॥९३॥ शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्धभोगानुरूप । हृदयीं हरि चिंतणें सद्रूप । हें मुख्य तप तपांमाजीं ॥९४॥ जो वर्ततां स्वधर्मस्थितीं । हरितें विसंबेना निजवृत्ती । जो निजात्मनिश्चयो चित्तीं । अहोराती विवंचित ॥९५॥ जेवीं लोभिया वाहे धन । कां तरुणालागीं तरुणी जाण । तैसें निजत्मविवंचन । जयाचें मन सदा करी ॥९६॥ त्या नांव गा तपोनिष्ठ । हें तपांमाजी तप वरिष्ठ । ब्राह्मणपकृतीमाजीं श्रेष्ठ । `तप' तें उद्भ ट या नांव ॥९७॥ ऐक `शौचा' चा निचार । तो आहे द्विप्रकार । अंतरि ज्ञाननिर्धार । ब्राह्य आचार वेदोक्त ॥९८॥ बाह्य मळाचें क्षाळण । मृज्जलादि वेदविधान । आंतर मळाचें निर्दळण । आत्मज्ञान निजनिष्ठा ॥९९॥ शुद्ध शौचाचें निर्मळपण । मुख्यत्वें उद्धवा हेंचि जाण । आतां संतोषाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥१००॥ पुत्र जन्मल्या होय सुख । तो गेलिया सवेंचि दुःख । धन जोडलिया होय हरिख । सवेंचि शोक तन्नाशीं ॥१॥ ज्या सुखाची होतां भेटी । निःशेष मावळे दुःखकोटी । या नांव `सत्यसुख' सृष्टी । इतर चावटी ते मिथ्या ॥२॥ निरुपचार अंतरगती । मद्भा वें जे सुखप्राप्ती । जाहलिया संपत्ती विपत्ती । जे संतोषप्राप्ती समसाम्यें ॥३॥ येचि पदीं पाठांतर । `तितिक्षा' म्हणती थोरथोर । ऐक त्याचेंही अर्थांतर । पदार्थविचार तो ऐसा ॥४॥ शीत-उष्ण-मृदु-कठीण । अंगीं आदळातांही जाण । ज्याचें डंडळीना मन । भावना पूर्ण मद्भाीवें ॥५॥ संतोषतितिक्षा-व्याख्यान । हें पांचव्या पदाचें लक्षण । उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । ऐक निरूपण शांतीचें ॥६॥ माझा निर्धारितां निजबोध । अंतरीं निमाले कामक्रोध । त्यांसी केलियाही अपराध । न मनीं विरुद्ध पुढिलांचें ॥७॥ परी तेथींची नवलपरी । अपकार्याी होय उपकारी । विकार नाहीं ज्याचे अंतरीं । जाण ते खरी `निजशांति' ॥८॥ ऐशी सदा शांति संपुर्ण । तें ब्राह्मणाचें षष्ठ लक्षण । ऐक आर्जवाचें निरूपण । जीवींची खूण सांगेन ॥९॥ कुरूप जरी जाहली माता । तरी स्नेहासीं नाहीं कुरूपता । कां सुवर्णाचे नाग करितां । सोनें सर्वथा नव्हे सर्पु ॥११०॥ तेवीं कुटिलांसी कुटिलता । करावी म्हणोनि शिकवितां । कुटिलत्व नुपजे चित्ता । जाण तत्त्वतां तें `आर्जव' ॥११॥ गायीसी गोड व्याघ्रासी कडू । हा गंगाजळी नाहीं पवाडु । तेवीं आर्जवाचा पडिपाडु । विषमांही गोडु समसाम्यें ॥१२॥ या नांव जाण `आर्जव' । सातवें लक्षण अपूर्व । आतां निजभक्तीचा स्वभाव । देवाधिदेव सांगत ॥१३॥ वन उद्यान गंगादि जीवन । यांसी पृथ्वीचि जेवीं अधिष्ठान । तेवीं सकळ लक्षणां जन्मस्थान । माझी `भक्ति' जाण उद्धवा ॥१४॥ सकळ पिकांचिये प्राप्ती । आधारभूत जेवीं क्षिती । तेवीं सकळ लक्षणां उत्पत्ती । माझिये भक्तीमाझारीं ॥१५॥ ऐक ते भक्तीचा इत्यर्थ । सांडोनियां विषयस्वार्थ । जीवींहूनि मजलागीं भावार्थ । तोचि निजभक्त पैं माझा ॥१६॥ भक्त आणि करी धनार्जन । हेंचि भक्तिसी मुख्य विघ्न । धनलोभी तो अभक्त पूर्ण । सत्य जाण उद्धवा ॥१७॥ माझा भाव नाहीं जिव्हारीं । आहाचवाहाच माझी भक्ति करी । तो आंधळ्या गरुडाचे परी । उडे परी निर्धारीं स्थान नेणे ॥१८॥ माझा भावार्थ जेथ होये । तेथ मी जाती कुळ न पाहें । मी भावाचेनि लवलाहें । वश्य होयें निजभक्तां ॥१९॥ जेथ भावार्थे माझी आवडी । तेथ अवश्य माझी पडे उडी । जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्भ क्तीची ॥१२०॥ जें जें भेटे तोचि देवो । ऐसा भावार्थीं ज्याचा भावो । तो एक पढियंता मज पहा हो । त्याचेनि भावें जीवों आम्ही उद्धवा ॥२१॥ तोचि माझा जीवप्राण । त्यासी मी सर्वस्वें करीं निंबलोण । मी सर्वदा त्याआधीन । जेवीं व्याली धेनु वत्सासी ॥२२॥ एवं निःसीम भावार्थाची स्थिती । त्या नांव उद्धवा माझी `भक्ती' । यापरी भक्तीची व्युत्पत्ती । ऐक पां ख्याती दयेची ॥२३॥ बाळक देखोनि संकटीं । जेवीं न सांवरत माय उठी । तेवीं दीन देखोनि दृष्टीं । ज्याचे पोटीं दया द्रवे ॥२४॥ ऐशिया दयेच्या ठायीं जाण । आपुलें पारकें पुसे कोण । स्वजाति-विजातिलक्षण । पुसायाही पण धीर नाहीं ॥२५॥ महापूरीं बुडतयातें । कृपाळू जाती न पुसे तेथें । उडी घालूनि वांचवी त्यातें । `दया' निश्चितें ती नांव ॥२६॥ दीनाचिये दयेलागीं । जो रिघे जळत्या आगीं । त्याचे चरण मी वंदीं वेगीं । धन्य जगीं दयाळू ॥२७॥ ऐशिये दयेचेनि गुणें । मज अनंतालागीं तेणें । विकत घेतलें जीवें प्राणें । कीं जाहलों पोसणें मी त्याचें ॥२८॥ यालागीं दयाळुवाचे घरीं । मी सदा नाटिका काम करीं । जे दयावंताचे अवसरीं । तें माझे शिरीं सर्वदा ॥२९॥ जो जाणे दिनांचा विचार । दीनदयाळू जो साचार । उद्धवा तो माझें निजभांडार । सुखाचें सुखसार तो माझें ॥१३०॥ या नांव गा `दया' जाण । तें हें नववें लक्षण । आतां सत्याची उणखूण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥३१॥ सत्याचें सत्यत्व तें ऐसे । जागृतिस्वप्नसुषुप्तिवशें । ज्यासी असत्यता न स्पर्शे । निजभक्त ऐसें निडारिलें ॥३३॥ ऐसें सत्य परिपक्वल्या पोटीं । सत्य वाचा सत्य दृष्टी । निजसत्यत्वें सत्य सृष्टी । पडिली तटी असत्याची ॥३३॥ यावरी गा ` सत्यत्व ' जाण । त्या नांव दहावें लक्षण । हें ब्राह्मणाचें संपूर्ण । कर्माचरण स्वभावें ॥३४॥ ब्राह्मणप्रकृतीचे स्थितीं । या दशलक्षणांची उत्पत्ती । स्वाभाविक सहजगती । अकृत्रिम स्थिति उद्धवा ॥३५॥ येंहीं दश लक्षणीं संपूर्ण । वर्णवरिष्ठ वंद्य ब्राह्मण । आतां क्षात्रप्रकृतीचे गुण । ऐक निरूपण उद्धवा ॥३६॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

तेजो बलं धृतिः शौर्यं तितिक्षौदार्यमुद्यमः । स्थैर्यं ब्रह्मण्यतैश्वर्यं क्षत्रप्रकृतयस्त्विमाः ॥१७॥

ब्राह्मणप्रकृति दश लक्षण । तुज म्यां सांगितली सुलक्षण । आतां क्षात्रवृत्तीचे दश गुण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥३६॥ `तेज' म्हणजे प्रतापशक्ती । जैसा क्षितितळींचा गभस्ती । ज्याचिया प्रतापदीप्तीं । लोपले जाती महींद्र ॥३७॥ क्षात्रधर्मी प्रथम काज । तया नांव जाण `तेज' । आतां क्षात्रबळाची वोज । ऐक चोज सांगेन ॥३८॥ ज्याच्या शरीरबळाचें कोड । एकला लक्षावरी दे झड । जरी तुटला दुधड । तरी वैरियांचे तोंड विभांडी ॥३९॥ रिघतां रणामाझारीं । दुजयाचें साह्य न विचारी । जेवीं वनगजीं केसरी । तेवीं रिघोनि दळभारीं विभांडी वीर ॥१४०॥ आकाश दाटल्या निशाचरीं । भूमंडळ कोंदल्या असुरीं । ऐसे प्रबळ बळें आल्या वैरी । ज्याचे धृतीमाझारीं विस्मयो नुठी ॥४१॥ आकाश पडावया गडाडी । पृथ्वी उलथावया हडबडी । तरी ज्याचे धृतीची रोकडी । नव्हे वांकुडी रोमावळी ॥४२॥ वोडवलियाही कल्पांता । धाक रिघों नेणे ज्याच्या चित्ता । ऐसें निजधैर्य स्वभावतां । `धृति' तत्त्वतां ती नांव ॥४३॥ चौर्यािशीं दंडायुधें धरूं जाणती । शस्त्रास्त्र-धारणाशक्ती । स्वधर्में आवश्यकें करिती । या नांव `धृति' क्षत्रियांची ॥४४॥ शूरांचें शौर्य तें कैसें । शत्रूंचें निःशेष नांवचि पुसे । वैरी कोणी कोठेंचि नसे । करणें ऐसें तें शौर्य ॥४५॥ धर्मयुद्धाची शौर्यवृत्ती । जेणें विजयश्री चढे हातीं । दुश्चित्त निःशस्त्री न हाणिती । पळतया न मारिती महाशूर ॥४६॥ संमुख आलिया रणांगणीं । मागें पावो न ठेवीं रणीं । एकला विभांडी वीरक्षोणी । हे स्वधर्मकरणी निजशौर्यें ॥४७॥ मृत्यूएवढा महावैरी । जो निःशेष नाहीं करी । त्याच्या शौर्याची थोरी । सुरासुरी वानिजे ॥४८॥ एवं निजशौर्यनिर्धारा । निर्वैर करणें धरा । हा चौथा गुण खरा । जाण क्षात्रद्वारा क्षत्रियांचा ॥४९॥ शस्त्रांचे घाय वाजतां माथां । कां सपिच्छ बाण खडतरतां । रणांगणीं न सरे मागुता । हे `सहिष्णुता' क्षत्रियाची ॥१५०॥ आलिया गजदळाचे थाट । महावीरांचे घडघडाट । तो यावा साहे सुभट । `सहिष्णुता' चोखट ती नांव ॥५१॥ समुद्रलहरींच्या संपाता । कुलाचल न सरे परता । तेवीं परसैन्याच्या आघाता । न सरे मागुता रणांगणीं ॥५२॥ तेथ यशअरपयशांची व्यथा । हर्षशोकविषमता । बाधीना क्षत्रियांच्या चित्ता । सर्वसहिष्णुता या नांव ॥५३॥ या नांव ` तितिक्षा ' जाण । हें क्षत्रियांचें पांचवे लक्षण । ऐक औदार्याचा गुण । दातेपण क्षत्रियांचें ॥५४॥ क्षत्रियांचे प्रकृतीस जाण । द्रव्य तें तृणसमान । याचकांचें निवे मन । तंव देणें दान सर्वस्व ॥५५॥ देश काल सत्पात्र स्थान । तेथही देऊनि सन्मान । निर्विकल्पभावें गहन । देणें दान विध्युक्त ॥५६॥ चंद्र चकोरातें पाहीं । सदा देतां नुबगे कंहीं । तेवीं हा याचकाचे ठायीं । पराङ्मु खता नाहीं क्षत्रियासी ॥५७॥ ऐसें स्वाभाविक जें दान । हा क्षत्रियांचा प्रकृतिगुण । या नांव गा `उदारपण' । सहावें लक्षण क्षत्रियांचें ॥५८॥ परमार्थप्राप्तीउपायीं । स्वधर्मनिष्ठा क्षत्रियांठायीं । जो जो व्यवसावो करणें कांहीं । तो `उद्यम' पाहीं बोलिजे ॥५९॥ वेंचूनियां निजप्राण । गोब्राह्मणांचे संरक्षण । स्वधर्में प्रजापालन । प्रथ्वीरक्षण निरुपद्रव ॥१६०॥ या नांव गा `उद्यम' जाण । क्षत्रियांचे सातवें लक्षण । आतां स्वधर्मस्थैर्यगुण । तेहीं निरूपण अवधारीं ॥६१॥ गोब्राह्मणसंरक्षणता । स्वधर्मी प्रजापतिपाळता । ये ठायीं उबगु न ये चित्ता । या नांव `स्थिरता' क्षत्रियांची ॥६२॥ स्वधर्मीं जे स्थिरता । तें आठवें लक्षण तत्त्वतां । ब्राह्मणभक्तीची जे कथा । ऐक आतां सांगेन ॥६३॥ परमार्थप्राप्तीचें कारण । क्षत्रियासी मुख्यत्वें गुरु ब्राह्मण । त्या ब्राह्मणाचें ब्रह्मभावें भजन । सर्वस्वें जाण करावें ॥६४॥ ब्राह्मभावें ब्राह्मणभजन । विधियुक्त देवोनि सन्मान । अनुदिनीं ब्राह्मणपूजन । सद्भाधवें जाण जो करी ॥६५॥ जो मद्भा वें ब्राह्मणपूजा । सन्मानें सुखी करी द्विजा । उद्धवा तो आत्मा माझा । तेणें मज अधोक्षजा पूजिलें ॥६६॥ क्षत्रिय सन्मानें द्विज पूजिती । तेणें त्यांसी ऐश्वर्यप्राप्ती । ब्राह्मण ब्राह्मणां द्वेषिती । तेणें ते पावती दरिद्रदुःख ॥६७॥ ऐसें करितां ब्राह्मणभजन । मी परब्रह्म होय त्या अधीन । त्याच्या ऐश्वर्याचें चिन्ह । दहावें लक्षण तें ऐक ॥६८॥ न करितां ब्राह्मणभजन । अंगीं ऐश्वर्य न ये जाण । मी जाहलों षडगुणैश्वर्यसंपन्न । सदा द्विजचरण हृदयीं दृढ वाहतां ॥६९॥ ब्राह्मणभजनमार्गें । ब्रह्मसुख पायां लागे । ब्रह्मसायुज्य घर रिघे । तरी भक्त नेघे द्विजभजनें ॥१७०॥ ब्राह्मणभजनें स्वभावतां । माझी सत्ता ये त्याच्या हाता । तेव्हां त्याची आज्ञा वंदिती माथां । जाण तत्त्वतां सुरासुर ॥७१॥ त्याचे आज्ञेभेण । पडों न शके अवर्षण । न्यायतां प्रजापालन । धर्मसंरक्षण त्याचेनी ॥७२॥ येणेंच स्वधर्में अतिचोख । भरत पुरूरवा जनकादिक । महाऐश्वर्य पावले देख । अलोकिक द्विजभजनें ॥७३॥ एवं क्षत्रियांचें दशलक्षण । तुज म्यां केलें निरूपण । यांत मुख्यत्वें ब्राह्मणभजन श्रेयस्कर सर्वांसी ॥७४॥ वैश्याचे प्रकृतीस जाण । स्वाभाविक पंचलक्षण । ऐक त्याचेंही निरूपण । आचरण यथार्थे ॥७५॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

आस्तिक्यं दाननिष्ठा च अदम्भो ब्रह्मसेवनम् । अतुष्टिरर्थोपचयैर्वैश्यप्रकृतयस्त्विमाः ॥१८॥

वैश्याचे प्रकृतीसी जाण । अर्थतृष्णा अतिगहन । जाहलिया कोट्यानुकोटी धन । तृष्णा परिपूर्ण हों नेणे ॥७६॥ `आस्तिक्य' अर्थसंचयासी । द्वीपींहूनि द्वीपांतरासी । नाना वस्तु ने विश्वासेंसी । साधावया अर्थासी भावार्थी ॥७७॥ कां वेदशास्त्रीं अतिविश्वासी । हें मुख्यत्वें `आस्तिक्य' वैश्यासी । वेदें लिहिल्या स्वधर्मासी । नव्हे उदासी अणुमात्र ॥७८॥ वैश्याचें स्वधर्माचरण । नेमेंसीं द्यावें नित्यदान । प्राणान्त मांडल्या जाण । दानखंडण हों नेदी ॥७९॥ परलोकप्राप्तीचें कारण । `ब्राह्मणाची सेवा' जाण । ब्राह्मणआज्ञा परम प्रमाण । विशेष जाण गुरुसेवा ॥१८०॥ वेदशास्त्रार्थ प्रमाण । सद्गुशरु परब्रह्म जाण । तद्‌रूपें देखावे ब्राह्मण । सेवेसी प्राण अर्पावा ॥८१॥ मी मान्य होईन अतिश्रेष्ठां । कां लौकिकीं जोडावी प्रतिष्ठा । ऐशी जे दांभिक निष्ठा । वैश्या वरिष्ठा स्पर्शेना ॥८२॥ सांडूनियां धूर्तपण । निर्लोप `निर्दंभ' जाण । विप्रसेवेसी वोपिती प्राण । हें मुख्य लक्षण वैश्याचें ॥८३॥ येणेंचि परमार्थप्राप्ती । सत्य जाण वैश्ययाती । हे स्वाभाविक गा प्रकृती । जाण निश्चितीं वैश्याची ॥८४॥ आतां शूद्राचिया प्रकृती । त्रिविध कर्मांची पैं प्राप्ती । तेही सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥८५॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

शुश्रूषणं द्विजगवां देवानां चाप्यमायया । तत्र लब्धेन संतोषः शुद्रप्रकृतयस्त्विमाः ॥१९॥

स्वधर्म शूद्राचिये ज्ञाती । द्विजसेवा यथानिगुती । त्यांचेनि प्रसादें जीविकावृत्ती । निष्कपट स्थिति सेवेची ॥८६॥ करावें गृहस्थांचें गोरक्षण । चाराव्या जेथें तृणजीवन । श्वापदभय आलिया जाण । वेंचूनि प्राण रक्षाव्या ॥८७॥ गोरक्षणीं वेंचिल्या प्राण । त्यासी उत्तम गति जाहली जाण । ज्यासी गायींचा कळवळा गहन । त्यासी मी श्रीकृष्ण सदा साह्य ॥८८॥ द्विजसेवा गोरक्षण । दोनही वृत्ति न मिळतां जाण । तरी देवालयीं संमार्जन । जीविकार्थ जाण करावें ॥८९॥ निष्कपटभावें आपण । निर्मळ करावें हरिरंगण । तेथील प्राप्तीचेनि जाण । करावी पूर्ण जीविका ॥१९०॥ तेथ जे जे काळीं जे जे प्राप्ती । तेणें सुखें असावें निजवृत्तीं । हे स्वधर्मकर्मस्थिती । शूद्रप्रकृतिस्वभावें ॥९१॥ विप्रासी अग्निहोत्रादिक कर्म । शूद्र नमी द्विजोत्तम । तेथ दोंहींचा स्वधर्म । सहजें सम होतसे ॥९२॥ `गृहस्थाश्रमाचें' वर्तन । तिन्हीं आश्रमां आश्रयो आपण । अन्न वस्त्र देऊनि जाण । संरक्षण करावें ॥९३॥ `ब्रह्मचर्याश्रम' वर्तन । गुरुसेवा वेदाध्ययन । त्यासी द्यावन दान । अधिकार जाण असेना ॥९४॥ ब्रह्मचार्यानसी जें जें योजिलें । तें पाहिजे गुरूसी समर्पिलें । गुरूसी वंचूनि दान दिधलें । ते तेणें केले अधर्म ॥९५॥ `वानप्रस्थाश्रमी' जाण । मुख्यत्वें तप प्रधान । करावें अग्निशुश्रूषण । वेदोक्तलक्षण प्रकारें ॥९६॥ संन्यासी ब्रह्मचारी दीन । समयीं आश्रमा आल्या जाण । यथानुशक्त्या द्यावें अन्न । हें आश्रमरक्षण वानप्रस्था ॥९७॥ `संन्याशासी' अहिंसा प्रधान । ज्ञानपरिपाकें शांति संपूर्ण । अनोळखीं भिक्षाटण । हा मुख्य धर्म जाण चतुर्थाश्रमीं ॥९८॥ वर्णाश्रमांहूनि बाह्य जाण । केवळ अंत्यजादि जे जन । त्यांचे प्रकृतीचें जें लक्षण । स्वयें नारायण सांगत ॥९९॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

अशौचमनृतं स्तेयं नास्तिक्यं शुष्कविग्रहः । कामः क्रोधश्च तर्षश्च स्वभावोऽन्तवसायिनाम् ॥२०॥

ये श्लोकींचे अष्ट गुण । त्यागावया न मनी ज्याचें मन । तोही अंत्यजासमान । हें प्रकृतिलक्षण अतिनिंद्य ॥२००॥ ज्यासी स्नानसंध्या शौचाचार । स्वकर्म नावडे साचार । अंतरीं विकल्प अपार । जैसा विखार काळिया ॥१॥ `कनकफळ' हें नाम गोमटें । आंत माजिरें बाहेर कांटे । तैसें सबाह्य वोखटें । `अशौच' मोठें त्या नांव ॥२॥ शरीरीं श्वेत कुष्ठ निर्नासिक । तोंडाळ वोढाळ पतिनिंदक । ते स्त्रियेच्या ऐसें देख । अशौचक सबाह्य ॥३॥ यापरी गा `अशौचता' । ज्याचे अंगीं स्वभावतां । तो जाण पां तत्त्वतां । गुण प्रथमता अंत्यजाचा ॥४॥ `असत्यता' जे प्रकृतीपाशीं । अखंड बैसे अहर्निशीं । मातापितादि गुरूंसी । झकवणें त्यांसी मिथ्यात्वें ॥५॥ जेवीं कां शिमग्याच्या सणीं । `रामकृष्ण' न म्हणे कोणीं । उपस्थनामें गर्जे वाणी । संतोषोनी स्वानंदें ॥६॥ तेवीं जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । `असत्य' आवडे ज्याच्या चित्तीं । तो जाण पां निश्चितीं । अंत्यजप्रकृति स्वभावें ॥७॥ पडिलिया दृष्टी बुडीं । मायबापांचें ठेवणें काढी । नाना विश्वासपरवडी । बुडवी गांठोडी गुरूची ॥८॥ सधन सांपडल्या हाता । नाना युक्तीं अतिक्षुद्रता । नातरी बलात्कारें तत्त्वता । घ्यावें सर्वथा सर्वस्व ॥९॥ यापरी गा अधर्मतां । परद्रव्य यावया हाता । आसक्ति ज्याचिया चित्ता । जाण तत्त्वतां ते `चोरी' ॥२१०॥ स्वधर्मकर्मी स्वभावतां । विश्वास नाहीं ज्याच्या चित्ता । वेदशास्त्रपुराणार्थ । मिथ्या सर्वथा जो मानी ॥११॥ उद्धवा जाण तत्त्वतां । या नांव गा `नास्तिकता' । आस्तिक्यभावो स्वभावतां । अनुमात्रतां जेथ नाहीं ॥१२॥ गांठीं असतां लक्षकोडी । सदा नास्तिकता ज्याचे तोंडीं । घरींच्यासी आपदा लावी गाढी । ते प्रकृति रोकडी अंत्यजाची ॥१३॥ कार्येवीण कोरडी कळी । संबंधेंवीण वृथा सळी । अखंड करी दांतकसाळी । ते अंत्यजाची बळी निजवृत्ती ॥१४॥ ज्यासी सदा विरोध पोटीं । वरीवरी गोड मैंद गोठी । भीतरीं द्वेषाचा भडका उठी । जो क्रूरदृष्टि सर्वदा ॥१५॥ जन्मवरी केल्या उपकारकोटी । त्यासी एकाचि उत्तरासाठीं । अपकारु करावया पोटीं । छिद्रदृष्टी सदा ठेवी ॥१६॥ उपकार्यार अपकारस्थिती । अंत्यजही न करी प्राणांतीं । ऐशिया विरोधातें जे वाहती । `शुष्कविग्रहगती' त्या नांव ॥१७॥ जो सुहृदांमाजीं पाडी वैर । अपायीं घाली थोर थोर । अशौच नास्तिक्य घोर । जाणावा नर `अतिविग्रही' ॥१८॥ स्वार्थेंवीण परकार्य नाशी । `शुष्कविग्रही' म्हणिपे त्यासी । उद्धवा ऐशी प्रकृति ज्यासी । अंत्यजही त्यासी पैं भीती ॥१९॥ ऐक कामाची कथा । कनक आणि कांता । येविषयीं अतिलोभता । उपरमु चित्ता असेना ॥२२०॥ स्त्रीकामाचेनि नांवें । लिंगमात्रचि असावें । मग सेव्यासेव्य भावें । विचारूं जीवें स्मरेना ॥२१॥ तैसाचि जाण द्रव्यार्था । भलतैसें यावें हाता । न विचारी विहिता अविहिता । अतिकामता अर्थार्थीं ॥२२॥ अविहित कामस्थिती । हा स्वभाव ज्याचे वृत्ती । ते अंत्यजादि प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२३॥ पाहे पां कामिकांच्या पोटीं । सदा क्रोधाची आगटी । कामअ प्राप्ती ऐकतां गोष्ठी । भडका उठी प्रळयान्त ॥२४॥ ज्याचिये शरीरस्थिती । उसंतु नाही क्रोधाहातीं । सदा धुपधुपीत वृत्ती । ते जाण प्रकृती अतिनीच ॥२५॥ प्राप्तभोगें तृष्णा न बाणे । ऐकिल्याही भोगाकारणें । अखंड मनाचें बैसे धरणें । ते प्रकृति जाणे अतिनीच ॥२६॥ म्यां सांगितले जे आठही गुण । हे ज्याचे प्रकृतीस लक्षण । तो हो कां भलता वर्ण । परी अंत्यजपण त्यामाजीं ॥२७॥ अवगुण सांगितले समस्त । एक एक नरकदानीं विख्यात । मा आठही मिळाले जेथ । उगंड तेथ मग कैंचा ॥२८॥ त्यगावया निजस्थिती । या आठ अवगुणांची व्युत्पत्ती । म्यां सांगितली तुजप्रती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२९॥ या गुणांतें अंगीकारिती । ते नरकगामी गा निश्चितीं । या गुणांतें जे त्यागिती । ते पावती पद माझें ॥२३०॥ जेणें माझ्या पदाची प्राप्ती । सर्वां वर्णां उत्तम गती । ऐशिया गुणांची व्युत्पत्ती । सांगेन तुजप्रती उद्धवा ॥३१॥ सकल लक्षणांचें निजसार । जें गुह्यगुणांचें भांडार । जेणें पाविजे संसारपार । ऐक साचार उद्धवा ॥३२॥ जो सर्व वर्णांचा सहज धर्म । जेणें पाविजे परब्रह्म । जे नाशिती चित्तभ्रम । ते गुण उत्तम अवधारीं ॥३३॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

अहिंसा सत्यमस्तेयं अकामक्रोधलोभता । भूतप्रियहितेहा च धर्मोऽयं सार्ववर्णिकः ॥२१॥

हो कां उपायें जेणें तेणें । पुढिलासी जें सुख देणें । तें उपतिष्ठे मजकारणें । तो गुण म्यां श्रीकृष्णें वंदिजे ॥३४॥ तैसेंच परपीडा असुख । पुढिलांसी न देणें दुःख । तेणेंही मज होय सुख । जाण निष्टंक उद्धवा ॥३५॥ दुःख नेदूनि सुख देणें । या नांव `अहिंसा' म्हणणें । हा पहिला गुण जाणणें । ऐक लक्षणें सत्याचीं ॥३६॥ सत्य तें जाण पां ऐसें । ज्याचें मन वाचा असत्यदोषें । जागृतिस्वप्नसुषुप्तिवशें । स्पर्शलें नसे अणुमात्र ॥३७॥ निंदा आणि नरस्तवन । कदा मिथ्या न बोले वचन । वाचा अनसुट धरणें जाण । `सत्य' संपूर्ण या नांव ॥३८॥ हो कां अधर्माचिये जोडी । कोडी धरोनियां कवडी । जो रिघों नेदी दृष्टीबुडीं । फुटकी कवडी स्पर्शेना ॥३९॥ तेथेंही चोरी करणें । कां दृष्टी चुकवूनि वस्तु घेणें । अथवा न पुसतां नेणें । हें जीवेंप्राणें न संभवे ॥२४०॥ अन्यायोपार्जित धन । स्वप्नींही नातळे मन । हें `अचौर्याचें' लक्षण । तिसरा गुण उद्धवा ॥४१॥ स्वधर्में धन यावें हाता । हेहि नसे धनकामता । कामिनीकामाची नेणे वार्ता । परस्त्री ते माता नेमस्त ॥४२॥ हो कां स्वदाराभिगमन । तेथेंही आसक्त नसे मन । आश्रमधर्मार्थ जाण । प्रतिपालन स्त्रियेचें ॥४३॥ या नांव गा `अकामता' । उद्धवा जाण तत्त्वतां । हे चौथी लक्षणता । ऐक आतां अक्रोधु ॥४४॥ जेथ कामाचा आदरु नाहीं । तेथ क्रोधाचें न चले कांहीं । जेवीं आकाशाचे ठायीं । न रुपती पाहीं निजशस्त्रें ॥४५॥ जरी बीज जाहलें गोमटें । तरी भूमीविण अंकुर न फुटे । तैसें कामावांचूनि कोठें । क्रोध उद्भट न वाढे ॥४६॥ एवं कामाची जे बोळवण । तेचि क्रोधाचीही जाण । जैसें गरोदरीचें मरण । करी निर्दळपण गर्भाचें ॥४७॥ शिर तुटलिया पाठीं । हस्तपादादि क्रिया नुठी । काम निमालियापाठीं । निमाली गोष्टी क्रोधाची ॥४८॥ जेथ काम क्रोध नाहीं । तेथ लोभ उठी कोणे ठायीं । तळवटीं नसतां भुयी । वृक्ष कंहीं वाढेना ॥४९॥ शीस बोडिलें सकेशीं । तेथ राहूं न शके ऊ जैसी । तेवीं गेलिया कामक्रोधांसी । वस्ती लोभासी असेना ॥२५०॥ जेवीं कां भ्रताराचें मरण । घेऊनि जाय अहेवपण । तेवीं कामक्रोधेंवीण । लोभलक्षण असेना ॥५१॥ या नांव `निर्लोभता' । सत्य जाण सर्वथा । क्रोधलोभांतें वाढविता । जाण तत्त्वतां कामचि ॥५२॥ जेथ कामाचें अपूर्ण काज । तेथ क्रोधाचें खवळे तेज । जेव्हां कामाचें पूर्ण निज । तेव्हां नाचे भोज लोभाचें ॥५३॥ जेवीं दीपाची दीपकळा । ते सवें वागवी तेजकाजळां । तेवीं क्रोधलोभांचा सोहळा । कामाजवळा संतत ॥५४॥ जेवीं कां शारियाचें शीत । घामज्वरासमवेत । तेवीं क्रोधलोभयुक्त । जाण निश्चित कामचि ॥५५॥ जेथ कामाचा नाहीं पांगु । तेचि क्रोधलोभांचा त्यागु । हा समूळ उपावो चांगु । स्वयें श्रीरंगु बोलिला ॥५६॥ एवं कामत्यागें सर्वथा । त्यागु पावे क्रोधलोभता । भूतांसी प्रियत्वें जे हितता । ऐक तत्त्वतां सांगेन ॥५७॥ जैशी शक्ति आपणासी । तैसें प्रिय करावें भूतांसी । अगत्य विचंबु ज्याचा ज्यासी । तें तें त्यासी अर्पावें ॥५८॥ अन्न वस्त्रदान मान । पोटींच्या कळवळ्यानें जाण । करावें भूतीं प्रीयाचरण । हा स्वधर्म जाण सर्वांचा ॥५९॥ ऐसें प्रिय करावें भूतां । जें परिपाकीं ये त्याच्या हिता । जेणें प्रियें उपजे बाधकता । तें सर्वथा न करावें ॥६१॥ जो भूतप्रिय हितकारी । ऐसा जो पुरुष संसारीं । मी भगवंत त्याच्या घरीं । सर्व हित करीं सर्वदा ॥६२॥ त्याच्या अशुभांची होळी । भूतहितप्रियमेळीं । मी स्वयें करीं वनमाळी । तेचि काळीं तत्त्वतां ॥६३॥ जो सद्भांवें सत्य साचार । भूतांसी हितत्वें प्रियकर । त्यासी मी भूतात्मा श्रीधर । करीं संसार सुखरुप ॥६४॥ अहिंसादि सप्तलक्षण । हा सर्वांचा स्वधर्म जाण । सर्वाश्रम सर्व वर्ण । त्यांसी मुख्यत्वें जाण हा धर्म ॥६५॥ चतुर्वर्णस्वभावप्रकृती । वर्णबाह्यांची लक्षणस्थिती । सर्व वर्णांची स्वधर्मगती । ते म्यां तुजप्रती सांगितली ॥६६॥ यावरी आश्रमस्वधर्मता । तुज मी सांगेन आतां । उद्धवा ऐक गा तत्त्वतां । प्रथमतां ब्रह्मचर्य ॥६७॥ ब्रह्मचर्य द्विविध जाण । एकाचें `नैष्ठिक्य' संपूर्ण । एक तो `उपकुर्वाण' । ऐक लक्षण दोहींचें ॥६८॥ व्रतबंध वेदाध्ययन जाहल्यापाठीं । जो परमार्थीं ठेवूनि दृष्टी । गृहस्थाश्रमाची न करी गोठी । `नैष्टिक्य' परिपाठी त्या नांव ॥६९॥ वेदशास्त्र संपूर्ण पठन । गुरुदक्षिणा व्रतविसर्जन । करूनि करी पाणिग्रहण । `उपकुर्वाण' या नांव ॥२७०॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ ते २४

द्वितीयं प्राप्यानुपूर्व्याज्जन्मोपनयनं द्विजः । वसन्गुरुकुले दान्तो ब्रह्माधीयीत चाहुतः ॥२२॥

मेखलाऽजिनदण्डाक्ष ब्रह्मसूत्र कमण्डलून् । जटिलोऽधौतदद्वासोऽरक्तपीठः कुशान् द्धूत् ॥२३॥

स्नानभोजनहोमेषु जपोच्चारे च वाग्यतः । न च्छिंद्यान्नखरोमाणि कक्षोपस्थगतान्यपि ॥२४॥

गर्भाधान पुंसवन । जातकर्म अन्नप्राशन । हीं समस्त कर्में पूर्वीं जाण । केलीं संपूर्ण चौलान्त ॥७१॥ याउपरी उपनयन । गुरुद्वारा गायत्रीग्रहण । सावित्रजन्म हें संपूर्ण । `व्रतबंध' जाण या नांव ॥७२॥ एवं गायत्रीमंत्रें जाण । द्विजन्मे होती तीनी वर्ण । हा ब्रह्मचर्याश्रम संपूर्ण । व्रतधारण वेदार्थ ॥७३॥ तेथ वेदाध्ययन निर्धारीं । गुरुगृहीं वसे ब्रह्मचारी । त्याच्या व्रतनेमाची कुसरी । ऐक ते परी सांगेन ॥७४॥ मुंजी जानवें कृष्णाजिन । पळसाचें दंडग्रहण । कमंडलु वागवावा जाण । जळाचरण करावया ॥७५॥ न करावें मस्तकवपन । न करावें तैलाभ्यंगस्नान । न करावें दंतधावन । केशविंचरण न करावें ॥७६॥ न करावें नखनिकृंतन । न करावें रोमच्छेदन । बाहुमूलादिक जे जाण । गुह्य स्थान अतिव्याप्त ॥७७॥ रजकक्षाळित वस्त्रें जाण । त्याचें न करावें परिधन । प्रवाहीं करावें स्नान । प्रातर्मध्यान्ह दोंही काळीं ॥७८॥ आसनीं श्वेत पीठासन । श्वेत वस्त्रांचें धारण । रुद्राक्ष अथवा पद्मक्ष जाण । मालाग्रहण जपार्थ ॥७९॥ कुशादि दर्भ पवित्र । तिहीं युक्त असावे कर । ऐक मौनाचा विचार । तुज मी साचार सांगेन ॥२८०॥ मळमूत्र कां करितां स्नान । जप होम आणि भोजन । उभय संध्याकाळीं जाण । निश्चित मौन धरावें ॥८१॥ नाहीं अभ्यंग केशविंचरण । तेणें जटा वळल्या आपण । हें ब्रह्मचारियासी जाण । व्रतधारण नेमस्त ॥८२॥ इतुकेनि व्रतेंसीं जाण । सदा गुरुसेवेसी सावधान । गुरु कृपेनें सांगे अध्ययन । तेव्हां वेदपठन करावें ॥८३॥ मज पढों सांगावें आतां । हा आग्रह न करावा गुरुनाथा । त्याची आज्ञा वंदूनि माथां । निष्कपटता गुरुसेवा ॥८४॥ अध्ययन सांगेना लवलाह्या । तरी सांडूनि कुलाचार्या । पढों गेलिया आणिका ठाया । गुरु त्यागिलिया महादोष ॥८५॥ सेवा करावी अहर्निशीं । जेणें कृपा उपजे स्वामीसी । ते कृपेस्तव अध्ययनासी । अहर्निशीं सांगेल ॥८६॥ ठेवूनि गुरुचरणीं भावार्था । पढावें गा वेदशास्त्रार्था । आकळावें वेदतत्त्वार्था । परमार्थतां निजबुद्धी ॥८७॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

रेतो नावकिरेज्जातु ब्रह्मव्रतधरः स्वयम् । अवकीर्णेऽवगाह्याप्सु यतासुस्त्रिपदीं जपेत् ॥२५॥

या रीतीं ब्रह्मचारीं देख । वीर्यत्याग बुद्धिपूर्वक । करूं नये आवश्यक । व्रतविशेष ब्रह्मचर्य ॥८८॥ स्वप्नीं जाहल्या वीर्यपतन । शास्त्रोक्तविधीं करावें स्नान । मग प्रायश्चित्तार्थ जाण । गायत्रीस्मरण करावें ॥८९॥ ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्यासी । प्रयत्नेंा वीर्यत्यागु नाहीं त्यांसी । जो करी तो अतिदोषी । आश्रमधर्मासी बुडविलें ॥२९०॥ स्वप्नीं जाहलिया वीर्यपतन । करावें मृत्तिका सचैल स्नान । मग प्रायश्चित्तार्थ जाण । विहिताचरण जप किजे ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

अग्न्यर्काचार्यगोविप्रगुरुवृद्धसुरान् शुचिः । समाहित उपासीत सन्ध्ये च यतवाग्जपन् ॥२६॥

गायत्रीदात्या आचार्यपण । माता पिता तें गुरुस्थान । अग्निसूर्यादि सुरगण । गो ब्राह्मण आणि ज्येष्ठ ॥९२॥ यांचें करावया उपासना । बाह्य शुचि अंतरीं समाधान । गुरुचरणीं अनन्य शरण । आज्ञापालन पितरांचें ॥९३॥ अग्नीचे ठायीं हवन । इंद्रादि देवांचें स्तवन । ब्राह्मण तें पूज्यस्थान । अर्घ्यदान सूर्यासी ॥९४॥ ज्येंष्ठांसी साष्टांग नमन । गायीसी अंगकुरवाळण । सायंप्रातःसंध्येसी मौन । मध्यान्हीं जाण मौन नाहीं ॥९५॥ सद्गु्रूचा समर्थवादु । सर्वां वरिष्ठ सर्ववंद्यु । ज्याचा प्रताप प्रसिद्धु । स्वयें गोविंदु सांगत ॥९६॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

आचार्यं मां विजानीयान्नावमन्येत कर्हिचित् । न मर्त्यबुद्ध्यासूयेत सर्वदेवमयो गुरुः ॥२७॥

जो अंतर्यामी ईश्वरु । जो विश्वात्मा विश्वंभरु । जो अनंत अपरंपारु । तो मी श्रीगुरु शिष्याचा ॥९७॥ गुरुनामाची जे मातु । तो मी साचार भगवंतु । देखोनि भजनभावार्थु । पुरवीं मनोरथु शिष्याचा ॥९८॥ ज्या सद्गुभरूच्या अंगुष्ठीं । ब्रह्मादि देवांचिया कोटी । ज्याच्या नांवाची गोठी । वंद्य वैकुंठीं कैलासीं ॥९९॥ ज्याचें नांव ऐकतां कानीं । यम काळ कांपती दोनी । ब्रह्मा विष्णु रुद्र तिन्ही । हात जोडुनी तिष्ठती ॥३००॥ सकळ वेदांचें निजसार । तें सद्गुारुस्वरूप साचार । ऐसा शिष्यासी निर्धार । निरंतर असावा ॥१॥ त्यासी मनुष्यबुद्धीं आपण । कदा न करावें हेळण । गुरुनिंदा बोलतां जाण । आली नागवण सर्वार्थीं ॥२॥ सद्गुीरुनिंदेचा एकांतु । करूं आला परम आप्तु । तो त्यागावा जेवीं पतितु । हा नव्हे अर्थु तैं पळावें ॥३॥ सद्गुयरुनिंदेची वाणी । ऐकतां बोटें द्यावीं कानीं । सद्गुयरूसी भावें स्मरोनी । तें स्थानही त्याजोनी पळावें ॥४॥ त्या सद्गुारुनिंदेची स्वयें मातु । करिता बुडाला निजस्वार्थु । धुळीस मिळाला परमार्थु । आला अपघातु अंगासी ॥५॥ ऐशिया गुरूच्या ठायीं जाण । पत्र पुष्प अन्न धन । शिष्यें करूं नये वंचन । तें स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

सायं प्रातरुपानीय भैक्ष्यं तस्मै निवेदयेत् । यच्चान्यदप्यनुज्ञायमुपयुञ्जीत संयतः ॥२८॥

अन्नधनपुष्पी फळीं । सायंप्रातर्मध्यान्हकाळीं । भिक्षा मिळे ते गुरूजवळी । अर्पूनि कृतांजळी रहावें ॥७॥ तेथ गुरुआज्ञा जाहल्याही जाण । उदरापुरतें घ्यावें अन्न । अन्नावेगळें पदार्थभरण । घेवों न ये जाण ब्रह्मचार्या् ॥८॥ सायं प्रातः काळीं जाण । ब्रह्मचार्याा विहित भोजन । गुरुआज्ञा जें दिधलें अन्न । तेणें प्राणतर्पण करावें ॥९॥ तेथ न म्हणावें धडगोड । न करावें रसनाकोड । न वाढवावा विषय वाड । देहनिर्वाहीं चाड शिष्यासी ॥३१०॥ भोजनीं कांहीं ज मागावें जाण । यालागीं दृढ धरावें मौन । अधिक खादलिया अन्न । तें प्रतिबंधन गुरुसेवे ॥११॥ आहारीं अधिक घेतलिया अन्न । निद्रा आलस्य दाटी गहन । अत्यंत अल्प जें भोजन । तेणें विकळचळण देहाचें ॥१२॥ गुरुसेवेलागीं जाण । वृत्ती राखावी सावधान । यालागीं शिष्यासी भोजन । युक्ताहारपण सर्वदा ॥१३॥ गुरुसेवेलागीं जाण । शरीर राखावें सावधान । तें गुरुसेवेचें लक्षण । स्वयें जनार्दन सांगत ॥१४॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

शुश्रूषमाण आचार्यं सदोपासीत नीचवत् । यानशय्यासनस्थानैर्नातिदूरे कृताञ्जलिः ॥२९॥

सर्वदा अतिसादर । न पडतांही अंतर । गुरुसेवेसी निरंतर । अतितत्पर उल्हासें ॥१५॥ गुरु यानारूढ असतां । पुढें चालावें साटोपतां । पाठीसी यावें चरणीं चालतां । उपचारतासमवेत ॥१६॥ समयोचित जाणोन । द्यावें तांबुल जीवन । करावें चरणसंवाहन । घालावें आसन बैसती तेथें ॥१७॥ सद्गुंरु बैसल्या आसनीं । शिष्यें न बसावें नेहटूनी । दूरी नवजावें तेथूनी । नयनोन्मीलनीं रहावें ॥१८॥ अंजळीसंपुट जोडुनी । संमुख राहावें सावधानीं । गुरूची संज्ञा ज्यालागूनी । तें अविलंबनीं करावें ॥१९॥ गुरु शेजेवरी निजले असतां । जवळी नसावें तत्त्वतां । जेथूनि ऐकूं ये वचनार्था । तेथें निशीं अवस्था क्रमावी ॥३२०॥ मी एक सेवेनें संपन्न । ऐसा धरिलिया अभिमान । केले सेवेसी आंचरण । सर्वेंचि जाण होईल ॥२१॥ सेवकांमाजीं मी एक । केवळ रंकाचाही रंक । ऐसा भावो निष्टंक । सेवेसी देख धरावा ॥२२॥ तैसेंचि नीच काम करितां । लाज न धरावी सर्वथा । उबग न मानूनी चित्ता । उल्हासता गुरुभजनीं ॥२३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

एवंवृत्तो गुरुकुले वसेद्भोलगविवर्जितः । विद्या सामाप्यते यावद्‌बिभ्रद्‌व्रतमखण्डितम् ॥३०॥

सांडोनि सकळ भोगांतें । गुरुकुळीं राहोनि तेथें । गुरुसेवेचेनि व्रतें । प्रिय सर्वांतें तो जाहला ॥२४॥ एवं गुरुसेवायुक्त । धरोनियां अखंड व्रत । पावला वेदशास्त्र । पढणें समाप्त पैं जाहलें ॥२५॥ एवं विद्या जाहलिया समाप्त । उपकुर्वाण नैष्ठिक व्रत । स्वयें सांगावया अनंत । पुढिल श्लोकार्थ सांगतु ॥२६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

यद्यसौ छन्दसां लोकमारोक्ष्यन् ब्रह्मविष्टपम् । गुरवे विन्यसद्देहं स्वाध्यायार्थं बृहद्‌व्रतः ॥३१॥

जरी ब्रह्मचारी व्रतस्थ । येणेंचि आश्रमें निश्चित । सत्यलोक वैकुंठपर्थंत । वांछी वेदोक्त मत्प्राप्ती ॥२७॥ तेणें यावज्जन्म आपण । दृढ करावें गुरुभजन । निजदेहाचेंही जाण । करी समर्पण गुरुचरणीं ॥२८॥ सद्गुहरुभजनाची परवडी । नित्य नूतन आवडी । निजात्मभावें चोखडी । लागली गोडी गुरुचरणीं ॥२९॥ पूर्वील व्रतें धरी । तेंचि व्रत दृढ करी । होय नैष्ठिक ब्रह्मचारी । गुरुभजनावरी निर्धारु ॥३३०॥ न मनी सन्मानाचें कोड । न म्हणे विषय गोड । न धरी संसाराची चाड । व्रतीं दृढ व्रतस्थ ॥३१॥ ऐसा थोर व्रतें व्रतधर । तैसाचि गुरुभजनीं सादर । करी सद्गु्रूशीं विचार । वेदांतसार स्वाध्यायें ॥३२॥ `स्व' म्हणिजे आत्मा जाण । ते ठायीं नित्य अनुसंधान । तो `स्वाध्याय' म्हणती सज्ञान । ज्ञानविचक्षण निजद्रष्टे ॥३३॥ ऐशिया साधकासी जाण । सर्वत्र ब्रह्मभावन । हेंचि स्वमुखें मधुसूदन । स्वयें आपण सांगता ॥३४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

अग्नौ गुरावात्मनि च सर्वभूतेषु मां परम् । अपृथग्धीरुपासीत ब्रह्मवर्चस्व्यकल्मषः ॥३२॥

ब्रह्मचर्यव्रत धरणें । ब्रह्मवर्चस्व चढे तेणें । आणि सद्गुयरूचेनि भजनें । निष्पाप होणें निजवृत्तीं ॥३५॥ तेथें अग्निगुरु आपण । सर्व भूतांच्या ठायीं जाण । अभिन्न ब्रह्मभावन । अनुसंधान सर्वदा ॥३६॥ तेव्हां जें जें देखे दृश्यजात । तेथ ब्रह्मभावो अचुंबित । यापरी मातें उपासित । ब्रह्मयुक्त सद्भारवें ॥३७॥ नैष्ठिक ब्रह्मचर्याचा नेम । वानप्रस्थसंन्यासिया सम । तेथील आवश्यक जो धर्म । मुख्य वर्म त्यागाचें ॥३८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

स्त्रीणां निरीक्षणस्पर्शसंलापक्ष्वेलनादिकम् । प्राणिनो मिथुनीभूता न गृहस्थोऽग्रस्त्यजेत ॥३३॥

नैष्ठिक ब्रह्मचारी संन्यासी । वानप्रस्थ वनवासी । तिहीं न पहावें स्त्रियांसी । हा मुख्यत्वें त्यांसी स्वधर्म ॥३९॥ स्त्री देखतांचि दिठीं । सांडूनियां पर्णकुटी । पळावें गा उठाउठी । मा कराव्या गोठी घडे केवीं ॥३४०॥ स्वप्नींही स्त्रियेच्या स्पर्शासी । करूं नये या तिघांशीं । करितांचि मदनु त्यांसी । वीर्यपातासी उपजवी ॥४१॥ त्या स्त्रियांसी क्रीडाविनोद । करितां विध्वंसे स्वधर्मकंद । यालागीं स्त्रीगुणानुवाद । न करिती शुद्ध सज्ञान ॥४२॥ स्त्रियांचे हावभावदर्शन । एकांत गुह्य संभाषण । नाना विनोद अंगस्पर्शन । परिहासन मदनोक्ती ॥४३॥ एतुकेंही जेथ घडे । तेथ कामाचा घाला पडे । स्वधर्म समूळ बुडे । धैर्याचें उडे निजसत्त्व ॥४४॥ गृहस्थाचिये प्रवृत्ती । परस्त्रियेसी ऐसी गती । जाहलिया जाण निश्चितीं । अपावो अंतीं पावेल ॥४५॥ स्त्री ते अग्निकुंडासमान । पुरुष तो घृतकुंभ जाण । तेथ द्रवतां अंतःकरण । अर्ध क्षण लागेना ॥४६॥ घृत वेंचलियापाठीं । घटासी झालीं वर्षें साठी । तरी अग्नीशीं जाहल्या भेटी । द्रवता पोटीं तोही धरी ॥४७॥ तेवीं वार्धक्यावयसेंसीं । एकांत जाहलिया स्त्रियेंशीं । गोष्टीमात विनोदेसीं । कामाचा त्यासी घाला पडे ॥४८॥ त्यागावी कामिनीसंगती । हा मुख्य त्याग परमार्थीं । हेंचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥४९॥ पराशरऐससा महंत । मत्स्योदरीशीं जाहला रत । यालागीं स्त्रियेचा एकांत । अनर्थभूत पुरुषासी ॥३५०॥ मैथुनभूत जे प्राणी । पशुपक्षी आदिकरूनी । सादरें न पहावे नयनीं । पाहतां कडकडूनि काम खवळे ॥५१॥ मत्स्यमैथुन देखिल्यासाठीं । खवळल्या कामाच्या परिपाठी । सौभर ऋषीश्वरें तपकोटी । मैथुनासाठीं नाशिल्या ॥५२॥ यालागीं कामाचें दर्शन । कां कामाची आठवण । पुरुषासी बाधक जाण । कामस्मरण न करावें ॥५३॥ हृदयीं नव्हे कामसंचार । तैसा करावा सदाचार । भूतें पहावीं मदाकार । हा मुख्य प्रकार हरी बोले ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

शौचमाचमनं स्नानं संध्योपासनमार्जवम् । तीर्थसेवा जपोऽस्पृश्याभक्ष्यासंभाष्यवर्जनम् ॥३४॥

शौच आचमन स्नान । संध्या तर्पण उपासना । जपादिक अनुष्ठान । तीर्थसेवन विश्वासें ॥५५॥ अधर्म-अकर्मांचा विटाळु । हों न द्यावा अळुमाळु । आलियाही संकटकाळु । अभक्षणशीळु नव्हे भावो ॥५६॥ ज्यासी असे व्रतधारण । तेणें रजस्वलादि निंद्य जन । त्यांसी न करावें संभाषण । धरावें मौन निंदस्तवनीं ॥५७॥ सर्वांही आश्रमांसी जाण । स्वधर्मनियमाचें लक्षण । सांगेन म्हणे श्रीकृष्ण । ऐक सावधान उद्धवा ॥५८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

सर्वाश्रमप्रयुक्तोऽयं नियमः कुलनंदन । मद्भाशवः सर्वभूतेषु मनोवाक्कायसंयमः ॥३५॥

यदुवंशकुलनंदना । ऐक उद्धवा सज्ञाना । वर्णाश्रमस्वधर्मलक्षणा । सर्वांस जाणा हे एकी निष्ठा ॥५९॥ मनसा वाचा कर्मणा । नेमूनि आपआपणा । सर्वांभूतीं ब्रह्मभावना । अखंड धारणा राखावी ॥३६०॥ ऐसा मद्भाीव सार्वांभूतीं । दृढ ठसावल्या चित्तवृत्ती । ऐशा नैष्ठिक ब्रह्मचार्यावप्रती । मोक्षफलप्राप्ती हरि बोले ॥६१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

एवं बृहद्व्रतधरो ब्राह्मणोऽग्निरिव ज्वलन् । मद्भबक्तस्तीव्रतपसा दग्धकर्माशयोऽमलः ॥३६॥

यापरी जो ब्रह्मचारी । महाव्रतें व्रत धरी । मद्भा वना भूताकारीं । धारण धरी अनिश्रम ॥६२॥ यापरी करितां मद्भरजना । जळाल्या कर्मबीजेंसीं वासना । तेव्हां पूर्ण भक्ति माझी जाणा । वरी अंतःकरणा भक्तांच्या ॥६३॥ तेव्हां निरुपचार निजस्थिती । सहजचि घडे माझी भक्ति । तेथ ज्या ज्या देखे दृष्य व्यक्ती । मद्भाावप्रतीती चिद्‌रूपें ॥६४॥ ऐशी घडतां माझी भक्ती । आर्त जिज्ञासु अर्थार्थी । यांची उठवूनिया पंक्ती । चिन्मात्रैक चौथी भक्ती तो लाभे ॥६५॥ साचचि जे भक्तिच्या ठायीं । चारी मुक्ती लोळती पायीं । जो स्वानंद मद्भ्क्तांच्या देहीं । संपूर्ण पाहीं उल्हासे ॥६६॥ तेव्हां मज व्हावी मुक्तता । हेंही नाठवे त्याच्या चित्ता । हो कां `गेली माझी बद्धता' । हेंही सर्वथा स्मरेना ॥६७॥ एवं माझेनि भजनसुखें । विसरला सकळ सुखदुःखें । माझे भक्तिचेनि हरिखें । स्वानंदतोखें संतुष्ट ॥६८॥ ऐसा नैष्ठिक ब्रह्मचारी । मज पावला स्वधर्मेंकरीं । आतां उपकुर्वाणाची परी । ऐक दुसरी अवस्था ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

अथानंतरमावेक्ष्यन्यथा जिज्ञासितागमः । गुरवे दक्षिणां दत्वा स्त्नायाद्गुमर्वनुमोदितः ॥३७॥

संपूर्ण केलिया अध्ययन । जाहलिया वेदशास्त्रसंपन्न । तेणें गुरूसी आज्ञा पुसोन । व्रतविसर्जन सकामा ॥३७०॥ सकामनिष्कामतेचा भरु । देखोनि विवेकविचारु । तैशीच आज्ञा देती गुरु । जैसा अधिकारु शिष्याचा ॥७१॥ ज्यासी गृहश्रमाची आसक्ती । तेणें आपुल्या यथाशक्ती । दक्षिणा देऊनि गुरुप्रती । व्रतसमाप्ती करावी ॥७२॥ करावया समावर्तन । घेऊनि गुरूचें अनुमोदन । करावें मंगलस्नान । विसर्जन व्रतबंधा ॥७३॥ येथ अधिकाराचा भेदु । स्वयें सांगतो गोविंदु । तोचि श्लोकार्थे विशदु । वैराग्यसंबंधु अधिकारा ॥७४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

गृहं वनं वोपविशेत्प्रव्रदेद्वा द्विजोत्तमः । आश्रमादाश्रमं गच्छेत् नान्यथा मत्परश्चरेत् ॥३८॥

ज्यासी वैराग्य नाहीं सर्वथा । हृदयीं स्त्रीकामाची आस्था । तेणें द्वितीयाश्रमसंस्था । गार्हस्थ्या करावें ॥७५॥ स्त्रीकामु तरी नावडे । विवेक वैराग्य ज्यासी थोडें । तेणें वानप्रस्थाश्रमाकडे । निघावें रोकडें तत्काळ ॥७६॥ जो विवेकतेजें दीप्तिमंत । ज्यासी सदा वैराग्य धडधडित । जो सर्वार्थी दिसे विरक्त । त्यासीच निश्चित चतुर्थाश्रम ॥७७॥ मुख्यत्वें ज्यासी ब्राह्मणजन्म । तेचि बोलिजे द्विजोत्तम । त्यासीच बोलिला चतुर्थाश्रम । वैश्यक्षत्रियां नेम संन्यासी नाहीं ॥७८॥ क्षत्रीय संन्यास अंगीकारिती । तिंही रिघावें महापंथीं । दंड-कमंडलादिप्रवृत्ती । व्यवहारस्थिती त्यां नाहीं ॥७९॥ ब्राह्मणासी ब्रह्मचर्याच्या पोटीं । धडधडीत जैं वैराग्य उठी । तै संन्यासपरिपाठीं । उठाउठीं अंगीकारु ॥३८०॥ बैसतां भार्येच्या पाटीं । बहुल्यावरी वैराग्य उठी । त्यासी संन्यासग्रहणीं गोठी । अधिकारु श्रेष्ठीं बोलिला ॥८१॥ संन्यासग्रहणीं ज्याचें । वैराग्य दिसे अर्धकाचें । त्यासी संन्यासग्रहणाचें । योग्यत्व साचें असेना ॥८२॥ जैसा कां वोकिला वोक । ज्याचा त्यास नावडे देख । तैसें विषयभोगसुख । ज्यासी निःशेष नावडे ॥८३॥ त्यासी संन्यासीं अधिकारु । तोचि संन्यासी साचारु । ज्यासी विषयांचा विकारु । अणुमात्रु बाधेना ॥८४॥ प्रथम ब्रह्मचर्ययुक्त । वैराग्य न चढेचि हात । तरी हो‍ऊनि गृहस्थ । स्वधर्मयुक्त वर्तावें ॥८५॥ तेथें स्वधर्में विषय सेवितां । दृढ साधावी विरक्तता । तेथेंही वैराग्य न ये हाता । तरी वानप्रस्थाश्रमी व्हावें ॥८६॥ यापरी आश्रमादाश्रमा जातां । वैराग्यें संन्यासग्रहणता । परी अनाश्रमीं तत्त्वतां । नाहीं सर्वथा अधिकारु ॥८७॥ सांडूनि पूर्वाश्रमासी । जो गेला आश्रमांतरासी । तेथूनि पुढारां मार्ग त्यासी । परी मागें यावसायी विधि नाहीं ॥८८॥ कां मत्पर जो माझा भक्त । त्यासी आश्रमनेम नाहीं येथ । तो माझेनि भजनें कृतकृत्य । जाण निश्चित उद्धवा ॥८९॥ सद्भाझवें माझी भक्ति करितां । विवेकवैराग्य-योग्यता । पावोनि माझी पूर्ण सत्ता । सायुज्यता नेघती ॥३९०॥ ऐसे माझे भक्तोत्तम । त्यांसी न लगे आश्रमनेम । त्यांचा सर्वही मी स्वधर्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥९१॥ उद्धवा ऐक पां निश्चितीं । गृहस्थाची स्वधर्मस्थिती । समूळ सांगेन तुजप्रती । ऐसें श्रीपति बोलिला ॥९२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

गृहार्थी सदृशीं भार्यां उद्वहेदजुगुप्सिताम् । यवीयसीं तु वयसा यां सवर्णामनुक्रमात् ॥३९॥

करोनियां समावर्तन । व्रतबंधाचें विसर्जन । गुरुआज्ञा घेऊनि जाण । पाणिग्रहण करावें ॥९३॥ भार्या पर्णावी सवर्ण । इतर वर्जिले तिन्ही वर्ण । स्ववेद-स्वशाखेचे वर्ण । सगोत्रपण चुकवूनि ॥९४॥ जे उभय कुळीं विशुद्ध । जे दशलक्षणीं अनिंद्य । देतां मातापित्यांसी आल्हाद । तो श्लाघ्य संबंध पर्णावा ॥९५॥ जिची जन्मोत्तरी पाहतां । स्वयें वरापरीस अधिकता । कां समान वयें समता । या दोनी सर्वथा त्यागाव्या ॥९६॥ जन्मपत्र पाहतां दिठीं । वरुषें सातें पांचें धाकुटी । ते पर्णावी स्वधर्मदृष्टीं । भार्या गोमटी ती नांव ॥९७॥ नोवरी पाणिग्रहणयुक्त । आठांपासूनि दशवर्षांत । अधिक ते वृषली निश्चित । शास्त्रार्थप्रयोगें ॥९८॥ गर्भाष्टमाहूनि खालती । जिची वयसा असे निश्चितीं । तो नोवरी वराधिकारीं अप्राप्ती । ऐसें शास्त्रार्थीं बोलिलें ॥९९॥ ऐशा लक्षणांचा नाहीं बाधू । तैशी पर्णावी शुद्ध वधू । मग आश्रमधर्म अतिशुद्धू । शास्त्राविरुद्धु तो ऐक ॥४००॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

इज्याध्ययनदानानि सर्वेषां च द्विजन्मनाम् । प्रतिग्रहोऽध्यापनं च ब्राह्मणस्यैव याजनम् ॥४०॥

ब्राह्मणाचें षट्कर्म जाण । यजन आणि याजन । अध्ययन आणि अध्यापन । प्रतिग्रहो दान हें साही ॥१॥ हो कां द्विजन्मे तिन्ही वर्ण । त्यांत क्षत्रिय वैश्य दोघे जण । त्यांस तीं कर्मीं अधिकारपण । यजन-दान-अध्ययन ॥२॥ जे उत्तमजन्मे ब्राह्मण । त्यांसी षट्कर्मीं अधिकार जाण । तीनी परमार्थासी पूर्ण । जीविकावर्तन तीं कर्मीं ॥३॥ कोणें कर्में जीविकेसी । कोणें पाविजे परमार्थासी । त्या ब्राह्मणकर्मविभागासी । ऐक तुजपाशीं सांगेन ॥४॥ `यजन' तें यज्ञाचरण । `अध्ययन' तें वेदपठण । `दान' जें देणें आपण । हें त्रिकर्म जाण परमार्था ॥५॥ गुरुत्व घेऊनि आपणें । `याजन' तें याग करविणें । `अध्ययन' वेद पढवणें । स्वयें दान घेणें तो `प्रतिग्रहो' ॥६॥ जाहलिया सच्छिष्यसंपत्ती । इये तिहीं कर्मीं जीविकावृत्ती । गुरुत्वें गुरुपूजाप्राप्ती । तेणें जीविकास्थिति ब्राह्मणां ॥७॥ क्षत्रियवैश्यद्विजन्म्यांसी । गुरुत्व बोलिलें नाहीं यांसी । हीं तिन्हीं कर्में त्यांसी । निषेधतेसी यालागीं ॥८॥ आतां ब्राह्मणाचें लक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । `मुख्य' `मुख्यतम' `साधारण' । त्रिविध जाण उद्धवा ॥९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा

प्रतिग्रहं मन्यमानस्तपस्तेजोयशोनुदम् । अन्याभ्यामेव जीवेत शीलैर्वा दोषदृक् तयोः ॥४१॥

स्वधर्मनिष्ठ ब्राह्मणापाशीं । तप-तेज-धैर्य-यशोराशी । प्रतिग्रहो इतुकियांसी । मूळ नाशासी कारण ॥४१०॥ जो स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण । करी प्रतिग्रहो अंगीकरण । तो जाण पां `साधारण' । हें एक लक्षण द्विजाचें ॥११॥ जो प्रतिग्रह पराङ्मुसख ब्राह्मण । तेणें याजन अध्यापन जाण । स्वधर्मेकरूनि द्रव्यार्जन । जीविकावर्तन करावें ॥१२॥ धरोनि द्रव्याशा मानसीं । न करावें यागान्त कर्मासी । कां सांगोनि वेदाक्षरासी । द्रव्य त्यापाशीं इच्छूं नये ॥१३॥ करूनि वेदाक्षरदान । जो शिष्याचेंही न घे धन । ऐसा वैराग्यें परिपूर्ण । तो `शुद्ध ब्राह्मण' सर्वथा ॥१४॥ ऐक त्याचें जीविकावर्तन । `शिल' कां `उंछवृत्ती' जाण । ऐक त्याचेंही लक्षण । सकारण सांगेन ॥१५॥ शेत संवगूनि नेल्या जाण । ते शेतीं प्राप्त कणिसें कां कण । ते शिलवृत्ति संपूर्ण । ऐक लक्षण उंछवृत्तीचें ॥१६॥ स्वामी नसतां सांडले जाण । ऐसे हाटवाटीं पडिले कण । ते वेंचूनि घेणें आपण । जीविकावर्तन तयांवरी ॥१७॥ या नांव उंछवृत्ती । ब्राह्मणाची `अतिशुद्ध' स्थिती । तोही प्रकार उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

ब्राह्मणस्य हि देहाऽयं क्षुद्रकामाय नेष्यते । कृच्छाय तपसे चेह प्रेत्यानंतसुखाय च ॥४२॥

वर्णांमाजीं उत्तम वर्ण । त्या ब्राह्मणाचा देहो जाण । क्षुद्रकामार्थ निर्माण । देवें आपण नाहीं केला ॥१९॥ पशुपक्ष्यादि योनींच्या ठायीं । कामावांचूनि आन नाहीं । तेंचि जरी ब्राह्मणाचे देहीं । तैं विशेष कायी उत्तमत्वें ॥४२०॥ ब्राह्मणांचे देहीं जाण । करावें स्वधर्में अनुष्ठान । माझेनि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छादिकें ॥२१॥ मी हृदयीं धरोनि अनंत । जो पूर्णवैराग्ययुक्त । तपादि साधनीं सतत । सदा शिणत ब्राह्मण जे ॥२२॥ त्यांसी देहपाताच्या अंतीं । माझ्या अनंत सुखाची प्राप्ती । तेथ स्वर्गसुखादि संपत्ती । मावळती तत्काळ ॥२३॥ ज्या सुखाचे सुखस्थितीं । स्फुरेना संसारस्फूर्ती । जेथूनि नाहीं पुनरावृत्ती । ते सुखप्राप्ती त्या ब्राह्मणां ॥२४॥ कृच्छ्रादि साधनयुक्तीं । ब्राह्मणां ब्रह्मसुखप्राप्ती । त्याचि सुखाची सुखसंपत्ती । शिलोंछवृत्ती साधकां ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

शिलोञ्छवृत्त्या परितुष्टचित्तो धर्मं महान्तं विरजं जुषाणः । मय्यर्पितात्मा गृह एव तिष्ठन्नातिप्रसक्तः समुपैति शान्तिम् ॥४३॥

शिल अथवा उंछवृत्ती । करूनि संतुष्ट चित्तवृत्ती । विषयवैराग्यें मत्प्राप्ती । पूजिती अतिथी मद्भा वें ॥२६॥ अतिथि आलिया देख । प्राणांतींही नव्हे पराङ्मु।ख । नाठवे निज तहानभूक । समयीं आवश्यक दे अन्न ॥२७॥ तेथ अत्यादरेंसीं जाण । देऊनि अत्यंत सन्मान । यथानुशक्त्या देतां अन्न । मी जनार्दन संतुष्टें ॥२८॥ सांडूनियां अभिमान । सर्व जीवांसी सर्वदा लीन । या नांव `महद्धर्म' जाण । शुद्ध लक्षण हें धर्माचें ॥२९॥ ऐसें जें स्वधर्माचरण । तें कर्त्यासी अतिभूषण । ये धर्मीं न रिघे दूषण । `अतिशुद्धाचरण' या नांव ॥४३०॥ मजमाजीं रंगली चित्तवृत्ती । यालागीं विसरला गृहासक्ती । त्यासी गृहश्रमीं माझी प्राप्ती । सुखसंपत्ती निजबोधु ॥३१॥ निर्धनासी ऐशिया रीतीं । गृहश्रमीं माझी प्राप्ती । आतां सधनाचे प्राप्तीची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥३२॥ सधन होय जैं सज्ञान । तैं न करितां अतिसाधन । माझी प्राप्ती अतिसुगम जाण । ऐक लक्षण तयाचें ॥३३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

समुद्धरन्ति ये विप्रं सीदन्तं मत्परायणम् । तानुद्धरिष्ये नचिरादापद्भनयो नौरिवार्णवात् ॥४४॥

आधींच पूज्य ब्राह्मण । त्याहीवरी माझा भक्त जाण । माझे निजभजनें अतिसंपन्न । मद्भाीवें पूर्ण परिपक्व ॥३४॥ मागणें नाहीं सर्वथां । हा नेम माझिया निजभक्ता । त्यासी पीडिजे क्षुधादि व्याथा । ते निवारिता जो होय ॥३५॥ देऊनि अन्न जीवन । वस्त्र आदिकरूनि लवण । ऐसें वेंचूनियां निजधन । भक्तसंरक्षण जो करी ॥३६॥ नाहीं देणें निर्भर्त्सितां । देऊनि आभार न ठेवी माथां । सन्मानें अतिनम्रता । जो मद्भिक्तां संरक्षी ॥३७॥ जेवीं पोटांतले कळवळेंसी । माता गोड तें दे बाळकासी । तेवीं सांडोनि निजस्वार्थासी । माझ्या भक्तांसी जो रक्षी ॥३८॥ तैं मागें सांडूनि निजभक्ता । त्यासी मी वाहीं आपुले माथां । मग वैकुंठाही वरुता । त्याहीपरता पाववीं ॥३९॥ ज्यासी म्यां वाहिलें निजमाथां । त्यासी कोण्या अर्थाची दुर्लभता । जो संरक्षी माझ्या निजभक्तां । त्यासी उद्धरिता मी उद्धवा ॥४४०॥ माझे भक्तांचीं सांकडीं । जो कोणी निजांगें दवडी । त्यासी भवार्णवपरथडी । तत्काळ रोकडी मी पाववीं ॥४१॥ जेवीं कां जळसागरीं । नाव धनवंतातें तारी । तेवीं भक्तरक्षका संसारीं । मी उद्धरीं उद्धवा ॥४२॥ यापरी धनवंत जन । जो करी भक्तसंरक्षण । देवकीवसुदेवांची आण । त्याचें उद्धरण मी करीं ॥४३॥ सर्वांचे आपत्तीचें निवारण । राजेनि करावें आपण । त्या राजधर्माचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

सर्वाः समुद्धरेद्रा-जा पितेव व्यसनात्प्रजाः । आत्मानमात्मना धीरो यथा गजपतिर्गजान् ॥४५॥

सर्वांचें आपत्तींत रक्षण । रायें करावें आपण । दीन दुर्बळ ब्राह्मण । अयाचित जन शोधूनी ॥४५॥ व्यसनप्राप्त निजात्मजा । पिता संरक्षणीं निघे पैजा । तेवीं आपत्तीपासोनि प्रजा । संरक्षणीं राजा सादर ॥४६॥ करूनि प्रजांचें संरक्षण । आपुल्या आपत्तीसी आपण । स्वयें करावें निवारण । हा स्वधर्म जाण रायाचा ॥४७॥ चिखलीं रुतल्या भद्रजाती । स्वयें निघे आत्मशक्तीं । गजी गजशावे नेणों किती । काढी रुतीबाहेरी ॥४८॥ तेवीं राजा जो भूपती । तेणें प्रजा रक्षाव्या आपत्तीं । आपुलेही आपत्तीची निवृत्ती । निजात्मशक्तीं जो करी ॥४९॥ ऐशिया स्वधर्मस्थिती । सादरें वर्ते जो भूपती । त्याच्या स्वधर्माची फलप्राप्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥४५०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

एवंविधो नरपतिर्विमानेनार्कवर्चसा । विधूयेहाशुभं कृत्स्नं इंद्रेण सह मोदते ॥४६॥

यापरी जो कां नृपती । इहलोकींच्या राज्यप्राप्ती । अधर्म नाशोनि स्वधर्मस्थितीं । स्वर्ग प्राप्ती तो पावे ॥५१॥ `राज्याचे अंतीं नरक' । ऐसें बोलती ज्ञाते लोक । ते निरयगती नाशोनि देख । स्वधर्में परलोक पावले ॥५२॥ ते स्वर्गलोकीं गा जाण । अर्कप्रकाशासम विमान । तेथ आरूढोनि आपण । इंद्रसमान सुख भोगिती ॥५३॥ गृहस्थाश्रम अतिविषय । तेथें आचरतां स्वधर्म । वोडवे जैं कां दुर्गम । ते आपद्धर्म अवधारीं ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४७ वा

सीदन् वीप्रो वणिग्वृत्त्या पण्यैरेवापदं तरेत् । खड्गे न वाऽऽपदाक्रान्तो न श्ववृत्त्या कथंचन ॥४७॥

स्वधर्में पीडितां ब्राह्मणासी । तेणें करावें वणिग्वृत्तीसी । कां दुरावले क्षात्रधर्मासी । तेही सदोषी अतिदुष्ट ॥५५॥ ब्राह्मणासी हिंसाकर्म । तो जाण पां परम अधर्म । लागल्या अनुपपत्ती दुर्गम । तैं क्षात्रधर्म करावा ॥५६॥ करितां वाणिज्यकर्मास । तिळ सर्षप कार्पास । कां लवणादि रस तैजस । यांच्या महादोष विक्रयीं ॥५७॥ त्या सोडोनि सदोषां समस्तां । लागावें वाणिज्यपंथा । तांबूलपर्णें श्वेतवस्त्रता । हें विकितां निर्दुष्ट ॥५८॥ ऐशिया वाणिज्यस्थितीं । ज्याची ढळेना अनुपपत्ती । तेणें खड्गज घेऊनि हातीं । क्षात्रवृत्ती करावी ॥५९॥ तेथें चोरावीं ना अंगें । रणीं न सरावें मागें । स्वामिकार्याचेनि योगें । देहत्यागें उठावें ॥४६०॥ ऐशिया शुद्ध क्षात्रवृत्तीं । ब्राह्मणें कंठावी अनुपपत्ती । परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥६१॥ क्षत्रियांसी स्वधर्में अनुपपत्ती । लागल्या वर्तावें कोणे स्थिती । तें विशद करूनि श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४८ वा

वैश्यवृत्त्या तु राजन्यो जीवेन्मृगययाऽऽपदि । चरेद्वा विप्ररूपेण न श्ववृत्त्या कथंचन ॥४८॥

क्षत्रियासी लागल्या अनुपपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग्वृत्ती । कां पारधी करावी वनांतीं ॥तेणें अनुपपत्ती कंठावीं ॥६३॥ येणेंही न कंठे अनुपपत्ती । तरी भीक मागावी विप्रगतीं । परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥६४॥ स्वधर्में वैश्यासी अनुपपत्ती । लागल्या वर्तावें कोणे स्थितीं । ते विवंचना उद्धवाप्रती । कृष्ण कृपामूर्ति सांगत ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४९ वा

शूद्रवृत्तिं भजेद्वैश्यः शूद्रः कारुकटक्रियाम् । कृच्छ्रान्मुक्तो न गर्ह्येण वृत्तिं लिप्सेत कर्मणा ॥४९॥

वैश्यासी लागल्या अनुपपत्ती । तेणें धरावी शूद्रवृत्ती । निष्कपट सेवा यथास्थिती । तीं वर्णाप्रती करावी ॥६६॥ वैश्य पीडिल्याही अनुपपत्तीं । ब्राह्मण-क्षत्रियांची वृत्ती । सर्वथा धरूं नये हातीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥६७॥ वैश्यासी अतिअनुपपत्ती । मांडल्याही प्राणांतगती । तरी नीचसेवेची स्थिती । कोणेही अर्थीं न करावी ॥६८॥ शूद्रासी लागलिया अनुपपत्ती । तेणेंही न करावी श्ववृत्ती । धरूनि बुरुडक्रिया हातीं । जीविकावृत्ती करावी ॥६९॥ विकावीं दोर दावीं शिंकीं । पाटे वरवंटे टवळीं निकीं । कां काष्ठें वाहावीं मस्तकीं । जीवीकेविखीं उदरार्थ ॥४७०॥ आपत्काळाचिये गती । चतुर्वर्णांची जीविकास्थिती । म्यां सांगीतली तुजप्रती । परी सर्वथा श्ववृत्ती सांडावी ॥७१॥ एवं क्रमलिया अनुपपत्ती । म्यां सांगितल्या ज्या जीविकावृत्ती । तेथें देखिलियाही लाभप्राप्ती । सर्वथा हातीं न धराव्या ॥७२॥ आपत्काळींच्या आपद्वृपत्ती । अनुतापें क्रमिल्याअंतीं । सांडूनियां स्वधर्मस्थितीं । यथानिगुतीं रहावें ॥७३॥ गृहस्थाचें विहित कर्म । त्यांतीलही आवश्यक धर्म । तेथील ब्रह्मार्पणवर्म । स्वयें पुरुषोत्तम सांगत ॥७४॥


एकनाथी भागवत - श्लोक ५० वा

वेदाध्यायस्वधास्वाहाबल्यन्नाद्येर्यथोदयम् । देवर्षिपितृभूतानि मद्‌रूपाण्यन्वहं यजेत् ॥५०॥

स्वाध्याय `वेदाध्ययन' । वेदप्रोक्त ब्रह्मयज्ञ । `स्वधा' म्हणिजे पितृतर्पण । `स्वाहा' जाण देवतादिकां ॥७५॥ बळिदानादिकीं जाण । तृप्त होय `भूतगण' । `मनुष्यांसी' अन्नोदकदान । हे पंचयज्ञ जाण नित्यकर्म ॥७६॥ हेंचि ब्रह्मकर्म जाण । जेणें होय व्रह्मार्पण । त्या अर्पणाची निजखूण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥७७॥ मी एक कर्मकर्ता येथें । हें सांडोनियां निजचित्तें । भगवद्‌रूप भावितां भूतें । ब्रह्मार्पण तेथें होय कर्म ॥७८॥ सांडितां कर्माभिमान । कर्म होय ब्रह्मार्पण । हें संकल्पेंवीण जाण । अर्पिती खूण उद्धवा ॥७९॥ माझेनि हें कर्म जाहलें । तें म्यां कृष्णार्पणा केलें । येणें संकल्पाचेनि बोलें । अंगा आलें कर्तृत्व ॥४८०॥ जो म्हणे मी कर्मकर्ता । तो होय कर्मफळभोक्ता । मुख्य बाधक ते अहंता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥८१॥ ज्याच्या ठायीं अहंममता । त्याचे अंगीं नित्यबद्धता । जो निरभिमानी निर्ममता । नित्यमुक्तता त्यापाशीं ॥८२॥ यालागीं सांडूनि अभिमान । पंचमहायज्ञाचरण । गृहस्थें प्रत्यहीं करितां जाण । कर्म ब्रह्मार्पण सहजेंचि ॥८३॥ जैसेनि अर्पे भगवंता । ते गृहस्थाची नित्यकर्मता । तुज म्यां सांगितली तत्त्वतां । यज्ञादि कथा ते ऐक ॥८४॥ यज्ञ करावया अधिकारवंत । गांठी शुद्ध बारा सहस्त्र अर्थ । ज्यासी वेदीं ज्ञान यज्ञान्त । तेचि येथ अधिकारी ॥८५॥


एकनाथी भागवत - श्लोक ५१ वा

यदृच्छयोपपन्नेन शुक्लेनोपार्जितेन वा । धनेनापीडयन् भृत्यान् न्यायेनैवाऽहरेत् क्रतून् ॥५१॥

उदीमव्यापारे जोडिलें । का जें असत्प्रतिग्रहें आलें । नातरी परपीडा प्राप्त जाहलें । कां आडवूनि घेतलें जें द्रव्य ॥८६॥ द्रव्य देतां चरफडी । ते शिष्या घालून सांकडीं । ऐसा अर्थ जोडिला जोडी । ते अपरवडी द्रव्याची ॥८७॥ जें यदृच्छा सहज आलें । कां जें शुक्लवृत्तीं जोडिलें । जें सुखोपायें हाता आलें । तें द्रव्य विहिलें यज्ञार्थ ॥८८॥ पाडूनि कुटुंबासी लंघन । सर्व द्रव्य वेंचूनि जाण । करूं नये यज्ञाचरण । अधर्मपण तेणेंही ॥८९॥ कां जीविका जीवनवृत्ती । याग करूं नये निश्चितीं । लौकिकीं मुरवावया स्फीती । याग करिती ते मंद ॥४९०॥ न धरितां कर्माभिमान । शुद्ध द्रव्य जोडिल्या जाण । करावें यज्ञाचरण । हें स्वधर्मलक्षण गृहस्थाचें ॥९१॥ सांडूनिया विषयलिप्सा चित्तीं । त्यजूनि गृहाची गृहासक्ती । गृहस्थें धरावी निवृत्ती । हें स्वयें श्रीपति सांगत ॥९२॥


एकनाथी भागवत - श्लोक ५२ वा

कुटुंबेषु न सज्जेत न प्रमाद्येत्कुटुंब्यपि । विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥५२॥

जरी जाहली स्त्रीपुत्रगृहस्थिती । परी न धरावी त्यांची आसक्ती । सावध राखावी चित्तवृत्ती । परमात्मयुक्तिसाधनें ॥९३॥ सांडूनि कल्पना प्रमाद संग । चुकवून प्रमदांचें अंग । ईश्वरनिष्ठा अतिचांग । वृत्ति अभंग राखावी ॥९४॥ गृह-कुटुंब-विषयासक्ती । पाहतां विवेकाचिये स्थितीं । परिपाकें नश्वरप्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९५॥ जैसा इहलोकींचा परिपाक । तैसाचि जाण स्वर्गलोक । उभयतां नश्वर देख । केवळ मायिक मिथ्यात्वें ॥९६॥ स्त्री पुत्र आणि धन । हें नश्वर जैसे कां स्वप्न । येचिविषयीं निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक ५३ वा

पुत्रदाराप्तबन्धूनां सङ्गमः पान्थसङ्गमः । अनुदेहं वियन्त्येते स्वप्नो निद्रानुगो यथा ॥५३॥

जैसे वृक्षातळीं पांथिक । एकत्र मीनले क्षण एक । तैसे पुत्रदाराप्तलोक । सर्वही क्षणिक संगम ॥९८॥ उभय नदीप्रवाहेंसीं । काष्ठें मीनलीं संगमीं जैसीं । सोयरीं सर्व जाण तैसीं । हेलाव्यासरसीं फांकती ॥९९॥ जे योनीं जो जीव देहधारी । तेथें तेचि योनींचीं सोयरीं । ऐशीं अनंत जन्में संसारीं । तैं अमित सोयरीं जीवाचीं ॥५००॥ परी ये योनीचीं ते योन्यंतरीं । येरयेरां नोळखती सोयरीं । जैसी ये स्वप्नींची पदार्थपरी । त्या स्वप्नांतरीं रिघेना ॥१॥ यापरी हे समस्त । स्त्री पुत्र बंधु आप्त । मायामय कल्पित । जाणें निश्चित तो धन्य ॥२॥


एकनाथी भागवत - श्लोक ५४ वा

इत्थं परिमृशन्मुक्तो गृहेष्वतिथिवद्वसन् । न गृहैरनुबध्येत निर्ममो निरहङ्कृवतः ॥५४॥

ऐसेनि विवेकें विवेकवंता । कदा न बाधी मोहममता । अतिथीच्या परी सर्वथा । अनासक्तता गृहवासीं ॥३॥ एवं निर्मानमोहममता । जो उदासीन गृहावस्था । ज्यांसी निष्काम निर्लोभता । त्यासी अहंता बाधीना ॥४॥ निर्ममता निरभिमान । व्हावया मुख्य गुरुभजन । तेणें वैराग्य-विवेक-ज्ञान । सहजचि जाण गुरुभक्तां ॥५॥ ऐशिया वैराग्यविवेकस्थितीं । गृहीं वसतां गृहस्थाप्रती । प्राप्त होय निजमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६॥ आतां आश्रमांतराची गती । स्वयें सांगताहे लक्ष्मीपति । भक्ति विरक्ति निजशांती । आश्रमस्थितिविभाग ॥७॥


एकनाथी भागवत - श्लोक ५५ वा

कर्मभिगृहमेधीयैरिष्ट्वा मामेव भक्तिमान् । तिष्ठेद्वनं वोपविशेत् प्रजावान् वा परिव्रजेत् ॥५५॥

गृहीं असोनि आश्रमस्थितीं । ज्यासी मुख्यत्वें भगवद्भ-क्ती । त्यासी आश्रमांतरप्राप्ती । न लगे निश्चितीं मद्भवक्तां ॥८॥ तेंचि माझें कैसें भजन । स्वाहा स्वधा यज्ञदान । जें जें येथें अर्पे जाण । तें तें मदर्पण निश्चित ॥९॥ काळीं अकाळीं सर्वथा । भजनीं पालट नाहीं चित्ता । ऐशी ज्या गृहस्थाची अवस्था । तेणें असावें सर्वथा गृहाश्रमीं ॥५१०॥ ज्या कर्माची अतिआसक्ती । आणि विषयांची अनासक्ती । नाहीं ज्ञानयुक्त निजशांती । त्यासी वानप्रस्थीं । अधिकारु ॥११॥ ज्यासी विरक्ति शांति ज्ञानस्थिती । करतळामळक हस्तप्राप्ती । त्यासी संन्यासग्रहणस्थिती । जाण निश्चितीं अधिकार ॥१२॥ जाहलिया पुत्रसंतती । भार्या देऊनि पुत्राच्या हातीं । संन्यास करावा निश्चितीं । श्रुति ये अर्थीं संमत ॥१३॥ ज्यासी गृहस्थाश्रमीं नावडे भक्ती । अपार पोरांची संतती । जाहल्याही न धरी विरक्ती । जो वानप्रस्थीं रिघेना ॥१४॥ ज्याचा न फिटे विषयभ्रम । जो संन्यासी नव्हे निष्कर्म । त्याचें जाण निंद्य कर्म । स्वयें पुरुषोत्तम सांगत ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक ५६ वा

यस्त्वासक्तमतिर्गेहे पुत्रवित्तैषणातुरः । स्त्रैणः कृपणधीर्मूढो ममाहमिति बध्यते ॥५६॥

जो गृहासक्तीं सुभटु । तो ईषणात्रयीं वरीष्ठु । जो विषयांलागी लंपटु । अतिलोभिष्ठ धनेच्छा ॥१६॥ जो विकारांचा अंकिला । जो अहंममतेचा पोसणा जाहला । जो स्त्रियेसी जीवें विकिला । तो मूढतेच्या पडिला महादुर्गी ॥१७॥ जो आशेचिया वणवणा । सर्वांगांचा वोळगणा । यालागीं बद्धतेचा जाणा । जाहला आंदणा जीवेंभावें ॥१८॥ तेचि बद्धतेची गती । त्याच्या मूर्खत्वाची वदंती । स्वयें सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती उद्देशें ॥१९॥ अहो मे पितरौ वृद्धौ भार्या बालात्मजाऽत्मजाः । अनाथा मामृते दीनाः कथं जीवन्ति दुःखिताः ॥५७॥ माता पिता वृद्धें केवळें । भार्या धाकुटी तान्हीं बाळें । मज होतां यांवेगळें । तेणेंची काळें मरतील ॥५२०॥ ऐशिया नानावस्था । आपुल्याही मरणापरता । वाहे कुटुंबाची चिंता । ऐक आतां सांगेन ॥२१॥ एखादेनि अकाळकाळें । मजचि जैं मरण आलें । तैं काय करितील स्त्रिया बाळें । आंसुवें डोळे लोटती ॥२२॥ मात्यापित्यांची पडो वाट । स्त्रियेसी होईल हृदयस्फोट । बाळांचा शोषेल कंठ । पिटी ललाट तेणें दुःखें ॥२३॥ मज निमालियाअंतीं । हीं अतिदुःखी कैशीं जीती । ऐशी जीतांची करी खंती । मूढमति यालागीं ॥२४॥ गाढ मूढतेचें भरितें । अपार उथळलें जेथें । विवेकाचें तारूं तेथें । विपरीतार्थे बुडालें ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक ५७ व ५८ वा

एवं गृहाशयाक्षिप्त हृदयो मूढधीरयम् । अतृप्तस्ताननुध्यायन् मृतोऽन्धं विशते तमः ॥५७॥

इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे सप्तदशोऽऽध्यायः ॥५८॥

यापरी गृहासक्तीं आसक्त । सदा विषयीं अतृप्तचित्त । अखंड स्त्रीपोत्रांतें ध्यान । हृदयाआंत मोहित ॥२६॥ त्या मोहाचे मोहविधीं । मूढ जाहली हृदयबुद्धी । ऐसा निमाला जो त्रिशुद्धी । तो प्रवेशे अंधीं महातमीं ॥२७॥ ज्या तमाचेनि महबळें । ज्ञान हो‍ऊनि ठाके आंधळें । तैथ सूर्याचे फुटती डोळे । ते तमीं लोळे तो तामस ॥२८॥ ज्या तमापासूनि उपरती । हों नेणें गा कल्पांतीं । त्या अंध-तमातें पावती । मूढमति अतिमंद ॥२९॥ महामोहाचे परिपाटीं । नश्वर विषयासाठीं । चुकोनि अनंतसुखाची पुष्टी । दुःखकोटी भोगिती ॥५३०॥ यालागीं मनुष्यदेहीं जाण । करोनियां भगवद्भीजन । चुकवावें जन्ममरण । आपण आपण उद्धरावें ॥३१॥ जीवा जे जे योनीं जन्मगती । तेथ तेथ विषयासक्ति । तेचि मनुष्यदेहीं विषयस्थिती । तैं परमार्थप्राप्ती कोणे देहीं ॥३२॥ विशेषें उत्तमोत्तम । प्राप्त जाहल्या ब्राह्मणजन्म । ज्याचे नित्यकर्मीं परब्रह्म । अतिसुगम सहजचि ॥३३॥ ज्यासी वर्ततां अहोराती । संध्यावंदनविधानस्थिती । त्रिकाळ पापाची निवृत्ती । जाण निश्चितीं ब्राह्मणा ॥३४॥ सकळ साराची सारमूर्ति । तो गायत्रीमंत्र ज्याचे हातीं । वेद मुखाची वास पाहती । एवढी प्राप्ती ब्राह्मणा ॥३५॥ ब्राह्मणाचे हृदयीं जाण । वेदरूपें नारायण । स्वयें राहिला आपण । धन्य ब्राह्मण त्रिलोकीं ॥३६॥ ज्या ब्राह्मणासी सदा जाण । शिरीं वंदिती सुरगण । ज्या ब्राह्मणाचा श्रीचरण । स्वयें नारायण हृदयीं वाहे ॥३७॥ ज्याअंगीं एक रती । पाप न राहे संध्येहातीं । त्यालागीं ब्राह्मण पुण्यमूर्ती । स्वयें रमापती बोलिला ॥३८॥ ज्याची भगवंत करी वर्णना । `किंपुनर्ब्राह्मणाः पुण्याः' । त्या भगवद्गी तावचना । सत्यत्व जाणा या हेतू ॥३९॥ ब्राह्मण आणि भगद्भरक्त । तैं सकळ भाग्य आलें तेथ । त्यासी कोण अर्थ अप्राप्त । ज्याचे बोलांत हरि तिष्ठे ॥५४०॥ ते काष्ठपाषाणप्रतिमे पहा हो । प्रतिष्ठिती तेथ प्रकटे देवो । एवढा ब्राह्मणीं सद्भापवो । सहजान्वयो सामर्थ्य ॥४१॥ तो पावोनियां ब्राह्मणजन्म । जो करी क्षुद्र विषयकर्म । त्याचे हातींचा गेला पुरुषोत्तम । अंधतम तो पावे ॥४२॥ एका-जनार्दनाची विनंती । येऊनि मनुष्यदेहाप्रती । करोनियां भगद्भाक्ती । निजात्मप्राप्ती साधावी ॥५४३॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे ब्रह्मचर्यगृहस्थकर्मधर्मनिरूपणे एकाकारटीकायां सप्तदशोऽध्यायः ॥१७॥॥श्लोक ॥५८॥ओव्या ॥५४३॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]