एकनाथी भागवत/अध्याय विसावा

विकिस्रोत कडून

<poem>

एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुरु चित्समुद्रा । मुक्तमोतियांचा तुजमाजीं थारा । ज्ञानवैराग्यशुक्तिद्वारा । सभाग्य नरा तूं देशी ॥१॥ तुझी खोली अमर्याद । माजीं चिद्रत्नें अतिविविध । देखोनि निजप्रबोधचांद । भरतें अगाध तुज दाटे ॥२॥ उलथल्या स्वानंदभरत्यासी । गुरुआज्ञा-मर्यादा नुल्लंघिसी । तेथ निजभक्ति हें तारुं थोर । त्यासी वागवितां तूं कर्णधार । प्रेमाचें साचार चढविशी शीड ॥४॥ तेथ भक्त संत सज्ञान नर । स्वयें पावविशी परपार । त्यांची मागुती येरझार । सत्य साचार खुंटली ॥५॥ एक लावूनि कासेसी । भवसागरीं वागविशी । बुडण्याचें भय त्यासी । महाकल्पेंसीं बाधीना ॥६॥ एक बुडाले भक्तिसमरसीं । ते घातले शेषशयनापाशीं । एक बैसविले अढळतेसी । ते ब्रह्मादिकांसी न ढळती ॥७॥ तुझ्या सागरत्वाची परी । विजातीय तिळभरी । राहों नेदिसी भीतरीं । हे अगाध थोरी पैं तुझी ॥८॥ अत्यंतप्रळयीं जैं हा चढे । तैं ’संसार’ हें नांवहि बुडे । वैकुंठकैलासावरता वाढे । मागें पुढें हाचि हा ॥९॥ ऐशिया सद्गुरुसमुद्रोदकीं । एका एकपणें हरीत कीं । भीतरीं पडतां आवश्यकीं । अंगीकारी कीं जनार्दन ॥१०॥ तो जनार्दन स्वयें देखा । एकादशाची करी टीका । तेणें अभंगीं घालूनि एका । कवित्व लोकां ऐकवी ॥११॥ जनार्दना आवडे एक । तो मी एका भेटतांचि देख । निजात्मभावें पडिलें ऐक्य । आपुलें निजसुख भोगवी ॥१२॥ बोलवी निजसुखाची कथा । त्यासी आपणचि होय श्रोता । मग अर्थाच्या यथार्थतां । समाधानता देतसे ॥१३॥ यापरी गा जनार्दनें । एकादश मर्हााटा करणें । नव्हे माझे युक्तीचें बोलणें । हें स्वयें सज्ञानें जाणिजेल ॥१४॥ त्या एकादशाची गतकथा । एकोणिसावा संपतां । गुणदोषांची कांहीं वार्ता । उद्धवासी तत्त्वतां सांगीतली ॥१५॥ गुणदोष जो देखणें । तोचि महादोष जाणणें । गुणदोष स्वयें न देखणें । तो गुण म्यां श्रीकृष्णें मानिजे ॥१६॥ हें ऐकोनि देवाचें उत्तर । उद्धव चमत्कारला थोर । काय गुणदोषांचा विचार । घरोघर लोकीं केला ॥१७॥ तुम्हींच वेदमुखें आपण । प्रकटिलें गुणदोषलक्षण । तें तुमचें वेदवचन । केवीं अमान्य करावें ॥१८॥ ऐसें विधिनिषेधलक्षण । विचारितां तें वेदवचन । कां पां निषेधी श्रीकृष्ण । उद्धव तो प्रश्न स्वयें पुसे ॥१९॥ विसावे अध्यायीं निरुपण । सांगावया गुणदोषलक्षण । भक्ति ज्ञान कर्म जाण । तिन्ही अधिकार भिन्न सांगेल ॥२०॥ उद्धव म्हणे हे श्रीकृष्ण । तूं वेदरुपें आपण । बोलिलासी दोषगुण । तें परम प्रमाण आम्ही मानूं ॥२१॥ हा विधि हा निषेध । हें दाविताहे तुझा वेद । तो वेदानुवाद विशद । ऐक प्रसिद्ध सांगेन ॥२२॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

उद्धव उवाच-विधिश्च प्रतिषेधश्च, निगमो हीश्वरस्य ते । अवेक्षतेऽरविन्दाक्ष, गुणदोषं च कर्मणाम् ॥१॥

कमलनयना श्रीकृष्णा । विधिनिषेधलक्षणा । दाखवीतसे दोषगुणां । तुझी वेदाज्ञा प्रसिद्ध ॥२३॥ तुझिया वेदाचे वेदविधीं । गुणदोषीं जडली बुद्धी । ते मी सांगेन प्रसिद्धी । कृपानिधी अवधारीं ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

वर्णाश्रमविकल्पं च, प्रतिलोमानुलोमजम् । द्रव्यदेशवयःकालान्, स्वर्गं नरकमेव च ॥२॥

तुझी जे का वेदवाणी । उघडी गुणदोषांची खाणी । अधममध्यमोत्तम मांडणी । वर्णाश्रमपणीं भेद दावी ॥२५॥ द्रव्य विहित अविहित । हेंही वेद असे दावित । देश पुनित अपुनीत । काळही दावीत सुष्टुदुष्टत्वें ॥२६॥ पूर्ववयीं चित्त निश्चिंत । तारुण्यीं तेंचि कामासक्त । वार्धक्यीं तें अतिकुश्चित । तेवीं शुद्धीं उपजवित गुणदोष वेदु ॥२७॥ तुझाचि गा वेद देख । सूचिताहे स्वर्ग नरक । तेणें कर्माचें आवश्यक । साधक बाधक तो दावी ॥२८॥ वर्णाश्रमांमाजील गुज । प्रतिलोमानुलोमज । ऐसे नाना भेदें भोज । वेदेंचि सहज नाचविजे ॥२९॥ उत्तम वर्णाची जे नारी । हीन वर्णाचा गर्भ धरी । तेचि संतती संसारीं । अभिधान धरी ’प्रतिलोमज’ ॥३०॥ तेचि संतती प्रसिद्ध । सूत वैदेह मागध । ऐशिया नामाचें जें पद । तें जाण शुद्ध प्रतिलोमज ॥३१॥ हीन वर्णाची जे नारी । उत्तम पुरुषाचा गर्भ धरी । ते ’अनुलोमज’ संसारीं । शास्त्रकारीं बोलिजे ॥३२॥ अंबष्ट आणि मूर्धावसिक्त । पारशव आणि सात्वत । इत्यादि नांवें जे वर्तत । ते जाण समस्त अनुलोमज ॥३३॥ ऐसे नाना भेदप्रकार । अविधिविधींचा विचार । वेद प्रकाशितो साचार । गुणदोषां माहेर वेद तुझा ॥३४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

गुणदोषभिदादृष्टिमन्तरेन वचस्तव । निःश्रेयसं कथं नृणां, निषेधविधिलक्षणम् ॥३॥

हे गुण आणि हे दोष । उभयतां वैर लावी देख । तुझा वेद गा आवश्यक । होय प्रकाशक गुणदोषां ॥३५॥ वैर लावूनि वेदवाणी । वाढवी गुणदोषमांडणी । तेथ मोक्ष पाविजे प्राणी । वेदवचनीं घडे केवीं ॥३६॥ राऊळ बोलिलें आपण । जे न देखावे दोषगुण । तूंचि म्हणसी वेद प्रमाण । तैं दोषगुण देखावे ॥३७॥ एवं ऐकतां तुझें वचन । उभयतां आली नागवण । वेद प्रमाण कीं अप्रमाण । हें समूळ जाण कळेना ॥३८॥ तुझ्या वचना विश्वासावें । तैं गुणदोषां न देखावें । तुझें वेदवचन मानावें । तैं देखावें गुणदोषां ॥३९॥ ऐसे तुझेनि बोलें जाण । संशयीं पडले सज्ञान । मा इतर साधारण जन । त्यांची कथा कोण ये ठायीं ॥४०॥ (आशंका) माझें वचन वेदवचन । दोनी एकरुपें म्हणसी प्रमाण । तरी गुणदोषदर्शन । कां पां विलक्षण परस्परें ॥४१॥ माझें वेदाचें विधिविधान । नव्हतां वेदार्थाचें ज्ञान । म्हणशी मोक्ष न घडे जाण । वेद प्रमाण या हेतू ॥४२॥ त्या मोक्षामाजीं काय कठिण । सकळ कर्में सांडिता जाण । घरा मोक्ष ये आपण । सहजचि जाण न प्रार्थितां ॥४३॥ म्हणसी वेदार्थ न कळतां । कर्म करितां कां त्यागितां । कदा मोक्ष न ये हाता । जाण तत्त्वतां निश्चित ॥४४॥ भासला दोराचा सर्प थोर । तेथ जपतां नाना मंत्रभार । करितां वाजंत्र्यांचा गजर । मारितां तिळभर ढळेना ॥४५॥ तो सादरें निरीक्षितां जाण । होय त्या सर्पाचें निरसन । तेवीं निर्धारितां वेदवचन । भवभय जाण निरसे ॥४६॥ भवभयाची निर्मुक्तता । त्या नांव ’मोक्ष’ जाण तत्त्वतां । तो वेदार्थावीण हाता । न ये सर्वथा आणिकें ॥४७॥ वेदविधान न करितां । कर्म त्यागिलें उद्धततां । तेणें निजमोक्ष न ये हाता । परी पाखंडता अंगीं वाजे ॥४८॥ विधियुक्त जो कर्मत्यागु । करुनि संन्यास घेतल्या साङगु । तैं म्हणसी न पडे वेदपांगु । हाही व्यंगु विचारु ॥४९॥ श्रवणांग संन्यासग्रहण । तेथही असे विधिविधान । गुरुमुखें जें महावाक्य-श्रवण । तोही जाण वेदार्थ ॥५०॥ (आशंका) ॥ करितां देवांपितरांचें यजन । ते होऊनियां प्रसन्न । मोक्ष देतील आपण । हेंही वेदेंवीण घडेना ॥५१॥ स्वाहाकारें तृप्त सुर । स्वधाकारें तृप्त पितर । वेदविनियोगेंवीण देवपितर । प्रसन्नाकार कदा नव्हती ॥५२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

पितृदेवमनुष्याणां, वेदश्चक्षुस्तवेश्वर । श्रेयस्त्वनुपलब्धेऽर्थे, साध्यसाधनयोरपि ॥४॥ नाथिलेंचि चराचर । देव मनुष्य आणि पितर । वेदें प्रकाशूनि साचार । पूज्यत्वें थोर प्रतिपादी ॥५३॥ त्याहीमाजीं अतिविषम । उत्तम मध्यम आणि अधम । हा त्रिविध भेदसंभ्रम । वेद उपक्रम करुनि दावी ॥५४॥ यापरी गुणदोषलक्षण । तुवांचि वाढविलें आपण । या नांव म्हणसी मोक्षसाधन । तरी कां गुणदोष निवारिसी ॥५५॥ ऐशिया निरुपणघडामोडी । तुझेनि बोलें पडे आडी । तेणें गुणदोषांची परवडी । बाधा रोकडी अंगीं वाजे ॥५६॥ अवघा संसार काल्पनिक । तेथ एक स्वर्ग एक नरक । हा मोक्ष हा अतिबंधक । येणें वेदवादें लोक भ्रमविले तुवां ॥५७॥ पूर्वी पुरुषाचे पोटीं । नव्हती गुणदोषांची गोठी । तुझ्या वेदानुवादपरिपाठीं । गुणदोषीं दृष्टी दृढ झाली ॥५८॥ एवं तुझेनि बोलें जाण । लोकांसी आली नागवण । ’भोगावया’ नरक दारुण । भ्रामक जाण वेदोक्ति तुझी ॥५९॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

गुणदोषभिदादृष्टिर्निगमात्ते न हि स्वतः । निगमे नापवादश्च, भिदाया इति ह भ्रमः ॥५॥

एवं नानागुणदोषदृष्टीं । तुझेनि वेदें वाढविली सृष्टी । स्वतां पुरुषाचे पोटीं । गुणदोषदृष्टी असेना ॥६॥ तुझ्या वेदानुवादविस्तरें । गुणदोष झाले खरे । ते तुझेनिही बलात्कारें । चित्ताबाहेरें न निघती ॥६१॥ अनादि वेद प्रमाण । हें तुझें मुख्य वेदवचन । आतां न देखावे दोषगुण । हें नवें वचन मानेना ॥६२॥ पहिले प्रकाशिले दोषगुण । आतां निवारावया काय कारण । हें न कळतां संपूर्ण । भ्रमित मन होतसे ॥६३॥ या भ्रमाची भ्रमनिवृत्ती । कृपेनें करावि कृपामूर्ती । ऐकोनि उद्धवाची वचनोक्ती । काय श्रीपती बोलिला ॥६४॥ ऐकोनि उद्धवाची विनंती । योगत्रयाची उपपत्ती । अधिकारभेदें वेदार्थप्राप्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

श्रीभगवानुवाच-योगास्त्रयो मया प्रोक्ता, नृणां श्रेयो विधित्सया । ज्ञानं कर्म च भक्तिश्च, नोपायोऽन्योस्ति कुत्रचित् ॥६॥

तेथ मेघगंभीरा वाणी । गर्जोनि बोले शार्ङगपाणी । माझे परम कृपेवांचूनी । माझी वेदवाणी कळेना ॥६६॥ वेदशास्त्रार्थें अतिसंपन्न । जरी झाले अतिसज्ञान । परी माझ्या अनुग्रहेंवीण । माझा वेदार्थ जाण कळेना ॥६७॥ ब्रह्मा चहूं मुखीं वेद पढे । त्यासीही वेदार्थाचें चोखडें । वर्म नातुडेचि धडफुडें । मा इतर बापुडे ते किती ॥६८॥ ब्रह्मा वेदार्थ आकळिता । तैं शंखासुर वेद कां नेता । ब्रह्मा वेदार्थी लीन होता । तैं नाभिलाषिता सरस्वती ॥६९॥ माझा वेदाचा वेद्य निर्धार । तुज मी सांगेन साचार । ऐक उद्धवा सादर । वेदविचार तो ऐसा ॥७०॥ माझ्या वेदासी नाहीं बहु बंड । वृथा न बोले उदंड । ज्ञान-भक्ति-कर्मकांड । वेद त्रिकांड नेमस्त ॥७१॥ माझिया वेदांची वेदोक्ती । या तिंही योगांतें प्रतिपादिती । यावेगळी उपायस्थिती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥७२॥ कोण ते तिनी योग । कैसे अधिकाराचे भाग । तेही पुसशी जरी चांग । तरी ऐक साङग सांगेन ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

निर्विण्णानां ज्ञानयोगो, न्यासिनामिह कर्मसु । तेष्वनिर्विण्णचित्तानां, कर्मयोगस्तु कामिनाम् ॥७॥

जे कां ब्रह्मभुवनपर्यंत । साचार जीवींहूनि विरक्त । जे विधिपूर्वक संकल्पयुक्त । कर्म त्यागित संन्यासी ॥७४॥ ऐशिया अधिकार्यां कारणें । म्यां ’ज्ञानयोग’ प्रकट करणें । जेणें कां निजज्ञानसाधनें । माझी पावणें सायुज्यता ॥७५॥ आतां जे कां केवळ अविरक्त । विषयालागीं कामासक्त ।त्यांलागीं म्यां प्रस्तुत । ’कर्मयोग’ येथ प्रकाशिला ॥७६॥ उंच नीच अधिकारी देख । दोनी सांगितले सविशेख । आतां तिसरा अधिकारी अतिचोख । अलोलिक अवधारीं ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

यदृच्छया मत्कथादौ, जातश्रद्धस्तु यः पुमान् । न निर्विण्णो नातिसक्तो, भक्तियोगोऽस्य सिद्धिदः ॥८॥

हरिकथा अवघेचि ऐकती । परी माझी श्रद्धा नुपजे चित्तीं । कोणा एका अभिनवगती । श्रद्धाउत्पत्ती श्रवणेंचि होय ॥७८॥ आईक श्रद्धेचें लक्षण । जें जें करी कथाश्रवण । तें हृदयीं वाढे अनुसंधान । सप्रेम मनन उल्हासे ॥७९॥ नवल कथेची आवडी । दाटती हरिखाचिया कोडी । हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थी ॥८०॥ विषयांचें दोषदर्शन । मुख्यत्वें बाधक स्त्री आणि धन । आवरावीं रसना-शिश्र्न । हे आठवण अहर्निशीं ॥८१॥ घायीं आडकलें फळें । तें पानपेना उपचारबळें । तेवीं विषयदोष भोगमेळें । कदाकाळें शमेना ॥८२॥ येतां देखोनियां मरण । स्वयें होय कंपायमान । तेवीं विषयभोगदर्शन । देखोनि आपण चळीं कांपे ॥८३॥ एवं विषयीं दोषदर्शन । सर्वदा देखे आपण । परी त्यागालागीं जाण । सामर्थ्य पूर्ण आथीना ॥८४॥ सेवकीं राजा बंदीं धरिला । तया स्त्रीचंदनादि भोग दीधला । परी तो त्यासी विषप्राय जाहला । भोगीं उबगला अगत्यता ॥८५॥ एवं भोगितां त्या भोगासी । नित्य पाहे निजनिर्गमासी । तेवीं भोगितां हा विषयासी । अहर्निशीं अनुतापी ॥८६॥ यापरी जो नव्हे विषयासक्त । ना निधडा नव्हे विरक्त । त्यालागीं माझा भक्तिपंथ । मी बोलिलों निश्चित वेदवाक्यें ॥८७॥ येहींकरितां माझी भक्ती । माझ्या स्वरुपीं लागे प्रीती । सहजें होय विषयविरक्ती । एवं सिद्धिदाती भक्ति हे माझी ॥८८॥ मी वेदोक्त बोलिलों आपण । ते हे त्रिविध योग संपूर्ण । ज्ञान-कर्म-उपासन । वेदोक्त लक्षणविभाग ॥८९॥ तेथ कोण देखे दोषगुण । कोणासी दोंहीचें अदर्शन । मध्यम भागें वर्ते कोण । तेंही लक्षण अवधारीं ॥९०॥ जो आसक्त विषयांवरी । तो कर्ममार्गीचा अधिकारी । त्यासी गुणदोषांहातीं नाहीं उरी । हें सांगेल श्रीहरी पुढिले अध्यायीं ॥९१॥ जो कां विरक्त ज्ञानाधिकारी । तो गुणदोषांहूनि बाहेरी । तो पाहतां अवघे संसारीं । न देखे तिळभरी गुणदोष ॥९२॥ जग अवघें ब्रह्म पूर्ण । तेथ कैंचे दोषगुण । ऐसे कां जे ज्ञानसंपन्न । त्यां दोषदर्शन असेना ॥९३॥ अतिआसक्त ना विरक्त । ऐसे कां जे माझे भक्त । ते पूर्वी गुणदोष देखत । परी सांडित विवेकें ॥९४॥ भूतीं भूतात्मा मी परेश । तेथ देखों नये गुणदोष । ऐसे भजननिष्ठ राजहंस । ते गुणदोष सांडिती ॥९५॥ मी वेदार्थीं बोलिलों दोषगुण । ते दोषत्यागालागीं जाण । पराचे देखावे दोषगुण । हें वेदवचन असेना ॥९६॥ ऐसें करावें वेदार्थश्रवण । दोष त्यजूनि घ्यावा गुण । परी पुढिलांचे दोषगुण । सर्वथा आपण न देखावे ॥९७॥ जो ज्याचा गुणदोष पाहे । तो त्याचा पापविभागी होये । जो पुढिलांचे गुणदोष गाये । तो निरया जाये तेणें दोषें ॥९८॥ आतां कर्माचा अधिकारु । सांगताहे शारंगधरु । तो जाणोनियां विचारु । कर्मादरु करावा ॥९९॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

तवत्कर्माणि कुर्वीत, न निर्विद्येत यावता । मत्कथाश्रवणादौ वा, श्रद्धा यावन्न जायते ॥९॥

तंवचि करावा कर्मादर । जंव विरक्ति नुपजे साचार । ठाकल्या विरक्तीचें घर । स्वर्ग संसार मळप्राय ॥१००॥ हो कां वमिलिया मिष्टान्ना । परतोनि श्रद्धा न धरी रसना । तेवीं विषयभोगीं जाणा । साचार मना चिळशी उपजे ॥१॥ तेथ कर्माची परिपाठी । समूळ खुंटली गा गोठी । कां दैवयोगें उल्हासु पोटीं । माझ्या कथेचा उठी श्रवणादरु ॥२॥ करितां माझी कथा श्रवण । प्रेमें वोसंडे अंतःकरण । विसरे देहगेहांची आठवण । तेथें प्रत्यवाय जाण बाधीना ॥३॥ जैसें माझे कथेचें श्रवण । तैसेंचि माझें हृदयीं स्मरण । तेथें प्रत्यवाय न रिघे जाण । येथून बोळवण त्याची झाली ॥४॥ करितां मत्कथाश्रवण । लोपल्या कोटिकर्माचरण । प्रत्यवाय न बाधी जाण । हा प्रताप पूर्ण मत्कथेचा ॥५॥ (संमतिश्र्लोक) मत्कर्म कुर्वतां पुसां कर्मलोपो भवेद्यदि । तत्कर्म तेषां कुर्वन्ति तिस्त्रः कोट्यो महर्षयः । (अर्थ) माझी करितां सप्रेम भक्ती । भक्तांचीं नित्यकर्में जैं राहती । तेतीस कोटी ऋषिमहंतीं । संपूर्ण करिती कर्में त्यांचीं ॥६॥ एवढें मत्कथेचें महिमान । माझें करितां कीर्तन पूजन । तेथें प्रत्यवायाचें तोंड कोण । संमुख वदन दावूं न शके ॥७॥ हो कां पूर्ण विरक्त नर । कां माझे सेवेसी जो तत्पर । तेथ कर्म बापुडें किंकर । हें स्वयें श्रीधर बोलिला ॥८॥ कर्में करितां स्वधर्मस्थितीं । उद्धवा आहे माझी प्राप्ती । ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुती अवधारीं ॥९॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

स्वधर्मस्थो यजन्यज्ञैरनाशीः काम उद्धव । न याति स्वर्गनरकौ, यद्यन्यन्न समाचरेत् ॥१०॥

गृहस्थाश्रमीं स्वधर्मस्थिती । जरी विचरेना ’अन्यगती’ । तरी येथेंचि लाहे विरक्ती सुनिश्चितीं उद्धवा ॥११०॥ अन्यगतींचें विचरण । तें तूं म्हणशील कोण । ऐक त्याचेंही लक्षण समूळ खूण सांगेन ॥११॥ परद्रव्य-परदारा-रती । परापवादाची वदंती । ही नांव गा ’नारकी गती’ । जाण निश्चितीं उद्धवां ॥१२॥ दिविभोगाचेनि श्रवणें । ज्याच्या मनाचें बैसे धरणें । कर्में तदनुकूल करणें । तैं स्वर्गा भोगणें अलोट ॥१३॥ या जाण दोन्ही ’अन्यगती’ । यांतूनि काढूनियां वृत्ती । यज्ञादिकीं मज यजिती । तैं नैराश्यस्थिती नित्यनैमित्यें ॥१४॥ तैं न पडे स्वर्गीचें पेणें । न घडे नरकासी जाणें । येचि लोकीं विरक्त होणें । तेंचि बोलणें हरि बोले ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

अस्मिंल्लोके वर्तमानः, स्वधर्मस्थोऽनघः शुचिः । ज्ञान विशुद्धमाप्नोति, मद्भक्तिं वा यदृच्छया ॥११॥

असतां ये लोकीं वर्तमान । ऐसें करितां स्वधर्माचरण । होय पुण्यपापांचें निर्दळण । निर्मळत्वें जाण तो अतिपवित्र ॥१६॥ तेथ निरसोनि भवभान । प्रकाशे माझें शुद्ध ज्ञान । कां सप्रेम माझें भजन । ’पराभक्ति’ जाण तो लाहे ॥१७॥ जे भक्तीमाजीं मी आपण । सदा होय भक्ताअधीन । तेथ मोक्षासहित ज्ञान । येऊनि आपण पायां लागे ॥१८॥ ऐक ज्ञानाचा परिपाक । संसारा नांव ’महादुःख’ । मोक्ष तो म्हणे ’परमसुख’ । मद्भक्त देख दोनी न मनी ॥१९॥ सप्रेम करितां माझें भजन । नाठवे भवभयबंधन । तेथ मोक्षासी पुसे कोण । मद्भक्तां भक्तीचा पूर्ण उल्हास ॥१२०॥ ज्यातें म्हणती ’महादुःख’ । तें भक्तांसी भगवद्रूप देख । ज्यातें म्हणती ’परमसुख’ । तेंही आवश्यक भगवंत ॥२१॥ यापरी भक्त माझ्या भजनीं । विसरला सुखदुःखें दोनी । मी एकु भगवंतूवांचूनी । आन त्रिभुवनीं देखेना ॥२२॥ ऐशी माझी भक्ति पूर्ण । साधूनि आणितां न ये जाण । जैं मी भगवंत होय प्रसन्न । तैं यदृच्छा जाण हे भक्ति लाभे ॥२३॥ मी कैसेनि होय प्रसन्न । ऐसें कल्पील तुझें मन । तेथ नरदेह गा कारण । माझे प्रसन्नपण व्हावया ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

स्वर्गिणोऽप्येतमिच्छंति, लोकं निरयिणस्तथा । साधकं ज्ञानभक्तिम्यामुभयं तदसाधकम् ॥१२॥

ज्यांसी स्वर्गभोगाची अति गोडी । जिंहीं अमरत्वाची उभविली गुढी । जे पडले स्वर्गाचे बांदवडीं । ते वांछिती आवडीं नरदेहातें ॥२५॥ नरकयातना महाघोर । जिंहीं भोगिला भोग थोर । ते मनुष्यदेहातें नर । अतिसादर वांछिती ॥२६॥ नरदेह परम पावन । जो भक्तिज्ञानाचें आयतन । जेणें साधे ब्रह्मज्ञान । तो धन्य धन्य नरदेह ॥२७॥ जेणें नरदेहें जाण । निःशेष खुंटे जन्ममरण । जेणें जीव पावे समाधान । स्वानंदघन स्वयें होय ॥२८॥ ज्या नरदेहाचे संगतीं । होय अविद्येची निवृत्ती । लाभे भगवत्पदप्राप्ती । हे विख्यात ख्याती नरदेहीं ॥२९॥ ज्या नरदेहाची प्राप्ती । प्राणिमात्र वांछिती । प्राणी बापुडे ते किती । स्वयें प्रजापती नरदेह वांछी ॥१३०॥ ऐसें नरदेहाचें श्रेष्ठपण । येथ साधे भक्तिविज्ञान । परी भक्तिज्ञानास्तव जाण । मनुष्यपण साधेना ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

न नरः स्वर्गतिं कांक्षेन्नारकीं वा विचक्षणः । नेमं लोकं च कांक्षेत, देहावेशात्प्रमाद्यति ॥१३॥

झालिया नरदेहाची प्राप्ती । अधर्में होय नरकगती । कां संचितां पुण्यसंपत्ती । तेणें स्वर्गप्राप्ती अनिवार ॥३२॥ स्वर्गें होय पुनरावृत्ती । नरकीं घोर दुःखप्राप्ती । म्हणूनि सांडोनि दोंहीचीही प्रीती । नरदेहीं आसक्ती धरुं म्हणती ॥३३॥ मनुष्यदेहाची आवडी । तेचि देहबुद्धि रोकडी । जेथ कामक्रोधांची जोडी । प्रमाद कोडी क्षणक्षणां ॥३४॥ स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीती सांडूनि देख । साधावें गा आवश्यक । ज्ञान चोख कां निजभक्ती ॥३५॥ ज्ञान साधावयालागीं जाण । कष्टावें न लगे गा आपण । सप्रेम करितां माझें भजन । दवडितां ज्ञान घर रिघे ॥३६॥ गव्हांची राशी जोडल्या हातीं । सकळ पक्वान्नें त्याचीं होतीं । तेवीं आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानसंपत्ती घर रिघे ॥३७॥ द्रव्य झालिया आपुले हातीं । सकळ पदार्थ घरास येती । तेवीं जोडल्या माझी भक्ती । भुक्तिमुक्ति होती दासी ॥३८॥ म्हणती करितां भगवद्भक्ती । विघ्नें छळावया आड येती । तेथें मी सुदर्शन घेऊन हातीं । राखें अहोरातीं निजभक्तां ॥३९॥ पक्ष्याचेनि नामोच्चारें । म्यां वेश्या तारिली चमत्कारें । पाडूनि विघ्नांचें दातौरें । म्यां व्यभिचारें उद्धरिली ॥१४०॥ यालागीं नरदेह पावोन । जो करी माझें भजन । तोचि संसारीं धन्य धन्य । उद्धवा जाण त्रिशुद्धी ॥४१॥ भावें करितां माझे भक्तीसी । भाविका उद्धरीं मी हृषीकेशी । जे चढले ज्ञानाभिमानासी । ते म्यां यमासी निरविले ॥४२॥ साधितां माझी भक्ति कां ज्ञान । ज्यासी चढे ज्ञानाभिमान । तो म्यां आपुलेनि हातें जाण । दीधला आंदण महादोषां ॥४३॥ उद्धवा तूं ऐसें म्हणशी । ’ते कां दीधले यमहातेशी’ । तो जाचूनियां महादोषियांसी । ज्ञानाभिमानासी सांडवी ॥४४॥ यालागीं सांडूनि देहाभिमान । भावें करितां माझें भजन । पूर्वील साधु सज्ञान । नरदेहें जाण मज पावले ॥४५॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

एतद्विद्वान्पुरा मृत्योरभवाय घटेत सः । अप्रमत्त इदं ज्ञात्वा, मर्त्यमप्यर्थसिद्धिदम् ॥१४॥

केवळ अस्थि चर्म मूत्र मळ । पाहतां देहो अतिकश्मळ । परी ब्रह्म परिपूर्ण निश्चळ । हें निर्मळ फळ येणें साधे ॥४६॥ ऐसे नरदेहाचें कारण । जाणोनि पूर्वील सज्ञान । सांडोनियां देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥४७॥ देह निंद्य म्हणोनि सांडावा । तरी एवढा लाभ हारवावा । वंद्य म्हणोनि प्रतिपाळावा । तैं नेईल रौरवा निश्चित ॥४८॥ देह सांडावा ना मांडावा । येणें परमार्थचि साधावा । तें सावधान ऐक उद्धवा । गुप्त निजठेवा सांगेन ॥४९॥ जेणें देहें वाढे भवभावो । तेणेंचि देहेंकरीं पहा हो । होय संसाराचा अभावो । अहंभावो सांडितां ॥१५०॥ सांडावया देहाभिमान । पूर्वील साधु सज्ञान । होऊनि नित्य सावधान । ब्रह्मसंपन्न मद्रूपें ॥५१॥ नरदेहें ब्रह्मप्राप्ती । ऐसें मानूनि निश्चितीं । म्हणसी विषयभोगांचे अंतीं । ब्रह्मस्थिती साधीन ॥५२॥ ऐसें विश्वासतां आपण । रोकडी आली नागवण । देहासवें लागलें मरण । हरिहरां जाण टळेना ॥५३॥ एवं देहाचें अनिवार्य मरण । तें केव्हां येईल न कळे जाण । यालागीं पूर्वीच आपण । निजस्वार्थ जाण साधावा ॥५४॥ धरितां निजदेहाची गोडी । अवचितां आदळे यमधाडी । बुडे निजस्वार्थाची जोडी । तें निजनिवाडीं हरि सांगे ॥५५॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

छिद्यमानं यमैरेतैः, कृतनीडं वनस्पतिम् । खगः स्वकेतमुत्सृज्य, क्षेमं याति ह्यलम्पटः ॥१५॥

जेवीं कां वृक्षाचे अग्रीं नीड । पक्षी करुनि वसे अतिगूढ । तळीं त्याचि वृक्षाचें बूड । छेदिती सदृढ निर्दय नर ॥५६॥ तें देखोनि वृक्षच्छेदन । पक्ष्यें सांडोनि गृहाभिमान । पळाल्या पाविजे कल्याण । राहतां मरण अचूक ॥५७॥ त्या वृक्षाचिया ऐसें जाण । देहासवें लागलें मरण । तेथें जीवासी राहतां जाण । दुःख दारुण अनिवार ॥५८॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

अहोरात्रैश्छिद्यमानं, बुद्धावायुर्भयवपेथुः । मुक्तसङगः परं बुद्धवां, निरीह उपशाम्यति ॥१६॥

अहोरात्र आयुष्यभंग । कळिकाळाचा सवेग वेग । हां जाण नीच नवा रोग । अंगीं साङग लागला ॥५९॥ काळें काळ वयसा खातु । हा देखोनि आयुष्याचा घातु । जाणोनि नरदेहाचा पातु । होय अनासक्तु देहगेहां ॥१६०॥ जाणोनि देहाचें क्षणिकपण । त्यागावया देहाभिमान । साधावया भक्तिज्ञान । अतिसावधान जो होय ॥६१॥ न सांडितां देहाभिमान । अंगीं आदळे मरण । तेणें भयें कंपायमान । वैराग्य पूर्ण स्वयें धरी ॥६२॥ वैराग्ययुक्त करितां भक्ती । होय देहाभिमानाची निवृत्ती । तैं घर रिघे ज्ञानसंपत्ती । पायां लागती मुक्ती चारी ॥६३॥ ऐशी झालिया निजात्मप्राप्ती । सहजेंचि राहे प्रवृत्ती । निवृत्तीसी होय निवृत्ती । संसाराची शांती स्वयें होय ॥६४॥ ऐसे नरदेहा येऊनि देख । पुरुष पावले ’परमसुख’ । हें न साधिती जे मूर्ख । त्यांसी देवो देख निंदित ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं, प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् । मयानुकूलेन नभस्वतेरितं, पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥१७॥

चौर्याूयशीं लक्ष जीवयोनी । त्यांत मनुष्यदेहावांचूनी । अधिकारी ब्रह्मज्ञानीं । आन कोणी असेना ॥६६॥ जेणें देहें होय माझी प्राप्ती । यालागीं ’आद्य देहो’ यातें म्हणती । याची दुर्लभ गा अवाप्ती । भाग्यें पावती नरदेह ॥६७॥ ’सदृढ’ म्हणजे अव्यंग । ’अविकळ’ म्हणजे सकळ भाग । नव्हे बहिरे मुके अंध पंग । सर्वांगें साङग संपूर्ण ॥६८॥ भरतखंडीं नरदेहप्राप्ती । हे परम भाग्याची संपत्ती । तेथही विवेकु परमार्थी । त्याचा वशवर्ती मी परमात्मा ॥६९॥ मी परमात्मा जेथ वशवर्ती । तेथ सुरनरांचा केवा किती । परी हा देह न लभे पुढती । दुर्लभ प्राप्ती नरदेहा ॥१७०॥ जोखितां पुण्यपाप समान । तैं नरदेहाची प्राप्ती जाण । तें पुढती पावावया आपण । जोखूनि कर्माचरण कोणी न करी ॥७१॥ पुण्य झालिया अधिक । स्वर्ग भोगणें आवश्यक । पापाचें वाढल्या तुक । भोगावे नरक अनिवार ॥७२॥ ऐशी कर्माची गति गहन । एथ काकतालीयन्यायें जाण । अचवटें लाभे माणुसपण । भवाब्धितारण महातारुं ॥७३॥ ’सुलभ’ म्हणिजे अविकळ । ’सकल्प’ म्हणिजे विवेकशीळ । यासी वागविता केवळ । नावाडा अति कुशळ गुरु कर्णधार ॥७४॥ कानीं निजगुज उपदेशिता । यालागीं गुरु ’कर्णधार’ म्हणती तत्त्वतां । कानीं धरितांचि उद्धरी भक्तां । यालागीं सर्वथा गुरु कर्णधार ॥७५॥ भवाब्धीमाजीं नरदेह तारुं । तेथ सद्गुरु तोचि कर्णधारु । त्यासी अनुकूल वायु मी श्रीधरु । भवाब्धिपरपारु पावावया ॥७६॥ कैसा गुरु कर्णधार कुशळ । आवर्त खळाळ आंदोळ । चुकवूनि विकल्पाचे कल्लोळ । साम्यें पाणिढाळ सवेग काढी ॥७७॥ लावूनि विवेकाचें आवलें । तोडिती कर्माकर्मांचीं जळें । भजनशिडाचेनि बळें । नाव चाले सवेग ॥७८॥ कामक्रोधादि महामासे । तळपती घ्यावया आमिषें । त्या घालूनि शांतिचेनि पाशें । तारुं उल्हासें चालवी ॥७९॥ ठाकतां सारुप्यादि बंदरें । तारुवामाजीं अतिगजरें । लागलीं अनुहाताचीं तुरें । जयजयकारें गर्जती ॥१८०॥ नेतां सलोकतेचे पेंठे । तारुं उलथेल अवचटें । लावितां समीपतेचे वाटे । तारुं दाटे दोंही सवां ॥८१॥ करावें सरुपतेमाजीं स्थिरु । तंव तो दाटणीचा उतारु । ऐसा जाणोनियां निर्धारु । लोटिलें तारुं सायुज्यामाजीं ॥८२॥ ते धार्मिकाची धर्मपेंठ । नाहीं सुखसारा खटपट । वस्तु अवघीच चोखट । घ्यावी एकवट संवसाटी ॥८३॥ ऐसें दुर्लभ नरदेहाचें तारुं । जेथ मी श्रीगुरुरुपें कर्णधारु । येणें न तरेच जो संसारु । तो जाणावा नरु आत्महंता ॥८४॥ नरदेह वेंचिलें विषयांसाठीं । पुढें नरक भोगावया कल्पकोटी । तरी आपुलेनि हातें निजपोटीं । शस्त्र दाटी स्वयें जेवीं ॥८५॥ परपारा अवश्य आहे जाणें । तेणें नाव फोडूनि भाजिजे चणे । कां पांघरुणें जाळूनि तापणें । हिंवाभेणें सुज्ञांनीं ॥८६॥ तैसें येथ झालें गा साचार । थित्या नरदेहा नागवले नर । पुढां दुःखाचे डोंगर । अतिदुस्तर वोढवले ॥८७॥ सकळ योनीं विषयासक्ती । सर्वांसी आहे निश्चितीं । नरदेहीं तैशीच विषयस्थिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥८८॥ पावोनि श्रेष्ठ नरशरीर । जो नुतरेचि संसारपार । तो आत्महत्यारा नर । सत्य साचार उद्धवा ॥८९॥ कोटी ब्रह्महत्या-गोहत्यांसी । प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेंसीं । परी आत्महत्या घडे ज्यासी । प्रायश्चित्त त्यासी असेना ॥१९०॥ जो आत्महत्या करुनि निमाला । तो मरतांचि नरकासी गेला । प्रायश्चित्तासी कोण आहे उरला । मा शास्त्रार्थें बोला बोलावें ॥९१॥ अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेहीं भोगु भोगविला । हा थोर नाड जीवासी झाला । विसरोनि आपुला निजस्वार्थ ॥९२॥ लाहोनि उत्तम शरीर । व्यर्थ विषयासक्तीं नर । नरकीं बुडाले अपार । हें शार्ङगधर बोलिला ॥९३॥ असोत या मूर्खांचिया गोठी । ऐक उत्तमांची हातवटी । जे वेदार्थपरिपाठीं । निजहितदृष्टी सावध ॥९४॥ अतिविरक्त जे स्वभावें । तिंहीं काय कर्तव्य करावें । कोणा अर्थातें त्यजावें । तेंचि देवें सांगिजे ॥९५॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

यदारम्भेषु निर्विण्णो, विरक्तः संयतेन्द्रियः । अभ्यासेनात्मनो योगी, धारयेदचलं मनः ॥१८॥

जो कर्मारंभींच विरक्त । फळाशा नातळे ज्याचें चित्त । मज निजमोक्ष व्हावा येथ । हेंही पोटांत स्मरेना ॥९६॥ खडतर वैराग्याची दृष्टी । इंद्रियांसी विषयांची गोष्टी । करुंचि नेदी महाहटी । धारणा नेहटीं दृढ राखे ॥९७॥ करुनियां श्रवण मनन । माझ्या स्वरुपाचें अनुसंधान । अखंड करी निदिध्यासन । तिळभरी मन ढळों नेदी ॥९८॥ धरोनि धारणेचें बळ । स्वरुपीं मन अचंचळ । अणुभरी होऊं नेदी विकळ । राखे निश्चळ निजबोधें ॥९९॥ एकाकी मन पाहें । स्वरुपीं कैसें निश्चळ होये । त्या अभ्यासाचे उपाये । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ॥२००॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

धार्यमाणं मनो यर्हि, भ्राम्यदाश्वनवस्थितम् । अतेन्द्रितोऽनुरोधेन, मार्गेणात्मवशं नयेत् ॥१९॥

स्वरुपीं लावितां अनुसंधान । जरी निश्चळ नव्हे मन । न सांडी आपुला गुण । चंचळपण स्वभावें ॥१॥ साधक आळसें विकळे । कां आठवी विषयसोहळे । तैं स्वरुपींहूनि मन पळे । निज चंचळें स्वभावें ॥२॥ तेथें नेहटूनि आसन । स्वयें होऊनि सावधान । स्मरोनि सद्गुरुचे चरण । स्वरुपीं मन राखावें ॥३॥ नेदितां विषयदान । हटावलें क्षोभे मन । तरी न सांडोनि अनुसंधान । द्यावें अन्नपान विधानोक्त ॥४॥ (आशंका) ॥ ’सर्पा पाजिलें पीयूष । तेंचि परतोनि होय विष । तेवीं मनासी देतां विषयसुख । अधिक देख खवळेल’ ॥५॥ तरी ऐसें द्यावें विषयदान । जेणें आकळलें राहे मन । तेचि अर्थीचें निरुपण । स्वयें नारायण सांगत ॥६॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

मनोगतिं न विसृजेज्जितप्राणो जितेन्द्रियः । सत्त्वसंपन्नया बुद्ध्‌या, मन आत्मवशं नयेत् ॥२०॥

मोकळें न सोडून मन । न सोडूनि अनुसंधान । करावें अन्नपानशयन । हें विषयदान निजहिता ॥७॥ साधकें साधूनि आपण । जरी जिंतिले इंद्रियप्राण । तरी मोकळें सोडूं नये मन । स्वरुपीं नेहटून राखावें ॥८॥ जो मनासी विश्वासला । तो कामक्रोधीं नागवला । संकल्पविकल्पीं लुटिला । विसंचिला महामोहे ॥९॥ जाणोनि मनाचें महाबळ । त्यासी विवेक द्यावा मोकळ । तो हालों नेदी केवळ । करी निश्चळ निजांगें ॥२१०॥ मनाविवेकाचे उभयसंधीं । सत्त्वसंपन्न होय बुद्धी । ते विषयांचे कंद छेदी । तोडी उपाधी सविकार ॥११॥ मन जेथ जेथ पळोनि जाये । तेथ तेथ विवेक उभा राहे । मग सत्त्वबुद्धीचेनि साह्यें । मोडी पाये मनाचे ॥१२॥ ऐसें मनाचें खुंटलिया बळ । मग स्वरुपीं होय निश्चळ । जेवीं जळगार केवळ । ठाके गंगाजळ वस्तीसी ॥१३॥ यापरी स्वरुपीं मन । स्वयें पावे समाधान । तोचि योग परम पावन । समाधान जीवशिवां ॥१४॥ जीवपरमात्म्याची एकात्मता । तोच ’परमयोग’ तत्त्वतां । येचिविखींची कथा । अश्वदृष्टांता हरि सांगे ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

एष वै परमो योगो, मनसः संग्रहः स्मृतः । हृदययज्ञत्वमन्विच्छन्, दम्यस्येवार्वतो मुहुः ॥२१॥

जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी । मागें तरटांचा कर झणाणी । पुढें राखे नेहटुनी रागबागा ॥१६॥ तेथ जें जें पाऊल वोजा करी । तेथ मान दे जीजीकारीं । जेथ फुटोनि पडे बाहेरी । तेथ तरट मारी सवर्म ॥१७॥ जेथ हटावला न सांडी खोडी । ते ठायीं दे मोकळवाडी । परी निःशेष पीडी ना सोडी । ऐसा पडिपाडीं राखत ॥१८॥ दमनीं देखोनि अत्यादरु । स्वामीहृदय जाणे वारु । आणि वारुवाचें अभ्यंतरु । कळे साचारु स्वामीसी ॥१९॥ ऐसें उभयहृदय-ऐक्ययोगें । वारु न धरितां रागबागें । अडणें उडणें सांडी वेगें । मग नाचों लागे मोकळा ॥२२०॥ ऐसें वश्य केलिया अश्वातें । मग कर्त्याचिया मनोगतें । वारु नाचे काचेनि सुतें । यापरी मनातें दमावें ॥२१॥ मनोजयो कीजे आपण । तोचि ’परमयोग’ कारण । हेंचि मागिले श्लोकीं निरुपण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥२२॥ ’नृदेहमाद्यं’ या श्लोकाचे अंतीं । कर्मवैराग्यद्वारा मुक्ती । आतां सांगितली हे स्थिती । उत्तमगतीं अभ्यासें ॥२३॥ मुख्यतः सांख्ययोगें माझी प्राप्ती । तें मी सांगेन तुजप्रती । मिथ्या संसाराची स्फूर्ती । ब्रह्मसंविती साचार ॥२४॥ हें ज्ञानगहन निरुपण । तुज मी सांगेन गुह्य ज्ञान । जें असोनि त्रिगुणीं वर्तमान । अलिप्त जाण गुणकार्या ॥२५॥ ’तुज मी सांगेन गुह्य ज्ञान’ । हें ऐकोनि देवाचें वचन । उद्धव स्वयेंचि झाला कान । अतिसावधान श्रवणार्थी ॥२६॥ देखोनि उद्धवाचा अत्यादरु । आर्तचित्तचकोरचंद्रु । निजज्ञानगुणसमुद्रु । काय यादवेंद्रु बोलिला ॥२७॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

सांख्येन सर्वभावानां, प्रतिलोमानुलोमतः । भवाप्ययावनुध्यायेन्मनो यावत्प्रसीदति ॥२२॥

जें सृष्टीपूर्वीं अलिप्त । तेंचि सृष्टिउदयीं सृष्टिआंत । महत्तत्त्वादि देहपर्यंत । तत्त्वीं अनुगत तेचि वस्तु ॥२८॥ आणि सृष्टीच्या स्थितिविशेषीं । गुणकार्यातें तेंचि प्रकाशी । शेखीं गुणकार्यातें तेंचि ग्रासी । उरे अवशेषीं ते वस्तु ॥२९॥ नग न घडतां सोनेंचि साचें । नग घडवितां सोनेंपण न वचे । नग मोडितां सोन्याचे । घडामोडीचें भय नाहीं ॥२३०॥ मेघापूर्वी शुद्ध गगन । मेघा सबाह्य गगन जाण । मेघ विराल्या गगनीं गगन । अलिप्त जाण संचलें ॥३१॥ तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । वस्तु संचली अलिप्तस्थितीं । तेहीविखींची उपपत्ती । उद्धवा तुजप्रती सांगेन ॥३२॥ कुलाल जें जें भांडें घडित । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त । तेवीं जें जें तत्त्व उपजत । तें तें व्यापिजेत वस्तूनें ॥३३॥ सागरीं जे जे उपजे लहरी । तिसी जळचि सबाह्यांतरीं । तेवीं महत्तत्त्वादि देहवरी । सबाह्याभ्यंतरीं चिन्मात्र ॥३४॥ हो कां जो जो पदार्थ निफजे । तो आकाशें व्यापिजे सहजें । तेवीं जें जें तत्त्व उपजे । तें तें व्यापिजे चैतन्यें ॥३५॥ अनुलोभें पाहतां यापरी । वस्तूवेगळें तिळभरी । कांहीं न दिसे बाहेरी । निजनिर्धारीं विचारितां ॥३६॥ पृथ्वीपासूनि प्रकृतीवरी । लयो पाहतां प्रतिलोमेंकरीं । जेवीं जळगारा जळाभीतरीं । तेवीं लयो चिन्मात्रीं तत्त्वांचा ॥३७॥ प्रकृत्यादि तत्त्वें प्रबळलीं । विकारोनि लया गेलीं । वस्तु अलिप्तपणें संचली । नाहीं माखली अणुमात्र ॥३८॥ एवं उत्पत्तिस्थितिप्रळयांत । वस्तु अविनाशी अलिप्त । नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥३९॥ ऐशा वस्तूच्या ठायीं भवजल्प । तो जाण पां मिथ्या आरोप । जेवीं दोराअंगीं सर्प । वृथा भयकंप भ्रांतासी ॥२४०॥ सर्प दवडोनि दोर शुद्ध । करावा ऐसा नाहीं बाध । एकला एक परमानंद । ऐसें गोविंद बोलिला ॥४१॥ ऐशिये वस्तूच्या ठायीं जाण । मन विसरे मनपण । येणें साधनें पैं जाण । होय ब्रह्म पूर्ण साधकु ॥४२॥ हें परम अगाध साधन । ज्यासी नाटोपे गा जाण । त्याचें निश्चळ व्हावया मन । सुगम साधन देवो सांगे ॥४३॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

निर्विण्णस्य विरक्तस्य, पुरुषस्योक्तवेदिनः । मनस्त्यजति दौरात्म्यं, चिन्तितस्यानुचिन्तया ॥२३॥

जन्ममरणांचें महाआवर्त । भोगितां वैराग्यें अतिसंतप्त । अतएव विषयीं विरक्त । जैसें विषयुक्त परमान्न ॥४४॥ मघमघीत अमृतफळ । त्यावरी सर्पें घातली गरळ । तेवीं विषयमात्रीं सकळ । देखे केवळ महाबाधा ॥४५॥ ऐसेनि विवेकें विवेकवंत । श्रद्धापूर्वक गुरुभक्त । गुरुनें सांगितला जो अर्थ । तो हृदयांत विसरेना ॥४६॥ गुरुनें बोधिला जो अर्थ । तो सदा हृदयीं असे ध्यात । चित्तीं चिंतिलाचि जो अर्थ । तोचि असे चिंतित पुनःपुनः ॥४७॥ करितां प्रत्यग्‌वृत्तीं चिंतन । संकल्प विकल्प सांडी मन । त्यजोनियां देहाभिमान । ब्रह्मसंपन्न स्वयें होय ॥४८॥ झालिया ब्रह्मसंपन्न । स्वरुपीं लीन होय मन । हाही एक उपावो जाण । न ठाके तरी आन अवधारीं ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

यमादिभिर्योगपथैरान्वीक्षिक्या च विद्यया । ममार्चोपासनाभिर्वा, नान्यैर्योग्यं स्मरेन्मनः ॥२४॥

त्यजोनियां सकळ भोग । यमनियमेंसीं योगमार्ग । आसनस्थ होऊनि चांग । दे मुद्रा साङग ’आधारीं’ ॥२५०॥ तेव्हां अपान ऊर्ध्वमुखें वाढे । जों वरता ’स्वाधिष्ठाना’ चढे । प्राण प्राणायामें अडे । तो मागुता मुरडे नाभिस्थाना ॥५१॥ सम होतां प्राणापान । पिंडब्रह्मांडाचें शोधन । स्वयें वायु करी गा आपण । मलक्षालन शरीरीं ॥५२॥ कफ पित्त दोन्ही खाये । नाडींतें शोधीत जाये । जुने संचित मल पाहें । तेही लवलाहें निर्दळी ॥५३॥ नवल वायूचें प्रबळ बळ । पिंडब्रह्मांडींचे सकळ मळ । धोऊनि करी गा निर्मळ । पवित्रता केवळ महायोगें ॥५४॥ तेथें प्रगटे रोगाची परवडी । महाविघ्नांची पडे उडी । धांवती विकल्पाच्या कोडी । सिद्धींची रोकडी नागवण पावे ॥५५॥ इतुकीं अंगीं आदळतां जाण । साधक न सांडी जैं आंगवण । तैं सम होती प्राणापान । सत्य जाण उद्धवा ॥५६॥ प्राणापानांच्या मिळणीं । शक्ति चेतवे कुंडलिनी । ते प्राणापानांतें घेउनि । सुषुम्नास्थानीं प्रवेशे ॥५७॥ ते आद्यशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा महाघाट । तेथें षड्‌चक्रांचा कडकडाट । पूर्वीच सपाट पवनें केला ॥५८॥ कुंडलिनी चालतां वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या लाटा । बुजाल्या विकल्पांच्या वाटा । महाविघ्नांच्या झटा बाधूं न शकती ॥५९॥ साधितां उल्हाटशक्तीचे उलट । उघडे ब्रह्मरंघ्रींचें कपाट । तंव लोटले सहस्त्रदळाचे पाट । अतिचोखट चंद्रामृत ॥२६०॥ तें प्राशूनि कुंडलिनी बाळा । संतोषें सांडी गरळा । ते शरीरीं वोतली कळा । तेणें पालटला देहभाव ॥६१॥ शरीराकारें वोतिली कळा । तेणें देहो दिसे अतिसोज्जवळा । ना तो ब्रह्मरसाचा पुतळा । कीं उमलला कळा शांतिसुखाचा ॥६२॥ जीवाचें जीवन मुसावलें । कीं ब्रह्मविद्येसी फळ आलें । ना ते चैतन्या कोंब निघाले । तैसे शोभले अवयव ॥६३॥ त्या देहाचेनि लाघवें । जगाच्या डोळां सामावे । जीवामाजीं वावरों पावे । निजस्वभावें सबाह्य ॥६४॥ तो पवनाची करोनि पायरी । सुखें चाले गगनावरी । या नांव परम ’खेचरी’ । सिद्धेश्वरीं बोलिजे ॥६५॥ त्याचिया अंगींचिया दीप्ती । खद्योतप्राय गभस्ती । त्याचें चरणामृत वांछिती । अमरपति इंद्रचंद्र ॥६६॥ क्रमूनि औटपीठ गोल्हाट । भ्रमरगुंफादि शेवट । भेदूनि सोहंहंसाचें पीठ । परमात्मा प्रकट होऊनि ठाके ॥६७॥ हा योगाभ्यासें योग गहन । अवचटें कोणा साधे जाण । हा मार्ग गा अतिकठिण । स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥६८॥ हेंचि मानतें श्रीकृष्णनाथा । तरी आन साधन न सांगता । हा मूळश्लोकार्थ पाहातां । कळेल तत्त्वतां साधूंसी ॥६९॥ हा ऐकतां अतिगोड वाटे । परी करितां काळीज फाटे । तरी न साधेचि महाहटें । येथ ठकले लाठे सुरनर ॥२७०॥ असो हें अत्यंत कठिण । तुज मी सांगेन गा आन । ’आन्वीक्षिकी’ विद्या जाण । त्वंपदशोधनविवेकु ॥७१॥ तत्पदाहूनि वेगळा । पांचभौतिक तत्त्वांचा गोळा । चुकोनि व्यापका सकळा । कोठें निपजला एकदेशी ॥७२॥ अनादि मायाप्रवाहयोगें । तन्मात्राविषयसंगें । मनाचेनि संकल्पपांगें । वेगळें सवेगें मानलें ॥७३॥ मनें मानिला जो भेदु । त्यासी करावा अभेदबोधु । येचि अर्थीं स्वयें गोविंदु । विवेक विशदु दाखवी ॥७४॥ पांचभौतिक शरीर खरें । तेथ पृथ्वी प्रत्यक्ष जळीं विरे । पृथ्वीचा गंध जळीं भरे । तैं पृथ्वी सरे निःशेष ॥७५॥ त्या जळाचा जळरसु । शोधुनि जैं घे हुताशु । तैं जळाचा होय र्हा सु । विरे निजनिःशेषु तेजतत्त्वीं ॥७६॥ त्या तेजाचें कारणरुप । गिळी वायूचा पूर्ण प्रताप । तेव्हां तेजाचें मावळे स्वरुप । वायूची झडप लागतां ॥७७॥ त्या वायूचा स्पर्शगुण । नेतां गगनें हिरुन । तेव्हां वायूचें नुरे भान । राहे मुसावोन गगनचि ॥७८॥ केवळ गगना नुरे उरी । तें गुणकार्येंसीं रिघे अहंकारीं । अहंकारु रिघे मायेमाझारीं । माया परमेश्वरीं मिथ्या होय ॥७९॥ रात्रि आपुलिया प्रौढीं । आंधारातें वाढवी वाढी । तेथ नक्षत्रें खद्योत कोडी । मिरविती गाढीं निजतेजें ॥२८०॥ ते रात्रि येतां सूर्यापुढें । स्वकार्येंसीं सगळी उडे । पाहों जातां मागेंपुढें । कोणीकडे असेना ॥८१॥ तेवीं परमेश्वरीं माया । कार्यकारणेंसीं गेली वायां । मिथ्यात्वेंचि न ये आया । नुरेचि दिसावया मागमोसु ॥८२॥ मायाप्रतिबिंबित चैतन्या । आणी ’जीव’ या अभिधाना । ते माया गेलिया जाणा । होय जीवपणा र्हायसु ॥८३॥ बुडालें जीवशिवांचें भान । उडालें मनाचें मनपण । कोंदलें चैतन्यघन । परम समाधान साधकां ॥८४॥ करिताम त्वंपदाचें शोधन । होय तत्पदीं समाधान । हे ’आन्वीक्षिकी विद्या’ जाण । विवेकसंपन्न पावती ॥८५॥ न करितां योगसाधन । न लगे त्वंपदाचें शोधन । याहोनि सुलभ साधन । तुज मी आन सांगेन ॥८६॥ जेथ कष्ट करितां तरी थोडे । परी योगाचे सकळ फळ जोडे । त्वंपदशोधन त्यापुढें । होय बापुडें लाजोनि ॥८७॥ ते माझी गा निजभक्ति । माझ्या रामकृष्णादि ज्या मूर्ती । पूजितां त्या अतिप्रीतीं । मी श्रीपती संतोषें ॥८८॥ तेथें माझें श्रवण माझें कीर्तन । माझें नाम माझें स्मरण । माझें ध्यान माझें भजन । माझें चिंतन सर्वदा ॥८९॥ हृदयीं माझें सदा ध्यान । मुखीं माझें नाम माझें स्तवन । श्रवणीं माझी कथा माझें कीर्तन । करीं माझें पूजन सर्वदा ॥२९०॥ चरणीं प्रदक्षिणा यात्रागमन । अष्टांगीं सर्वदा माझें नमन । ऐसें अनन्य माझें भजन । विनटलेंपण मद्भक्तीं ॥९१॥ ऐसे विनटले जे माझे भजनीं । त्यांसी मी विकलों चक्रपाणी । त्यांवेगळें पढियंतें कोणी । आन त्रिभुवनीं मज नाहीं ॥९२॥ यापरी करितां माझें भजन । न लगे योगादिकांचें स्मरण । मी भक्तिवेगळा श्रीकृष्ण । नातुडें जाण उद्धवा ॥९३॥ अवचटें दैवगतीं येथ । योगियासी जैं घडे दुरित । तैं त्यासी न लगे कर्मप्रायश्चित्त । तेंचि सांगत श्रीकृष्ण ॥९४॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

यदि कुर्यात् प्रमादेन, योगी कर्म विगर्हितम् । योगेनैव दहेदंहो, न्यायत्तत्र कदाचन ॥२५॥

भक्तासी निंद्य कर्म न घडे । त्यासी मी राखता मागें पुढें । हें आलें गा योग्याकडे । तेथही घडे प्रमादें ॥९५॥ प्रमादें घडलें जें पाप । त्याचा तीव्र अनुताप । जेवीं दावाग्नीं पोळल्या सर्प । तैसा संकप पापासी ॥९६॥ गोमाशी लागतां सिंहासी । तो जेवीं झाडी सर्वांगासी । तेवीं योगी देखोनि पापासी । जो अहर्निशीं अनुतापी ॥९७॥ तेणें होऊनि सावचित्त । योगबळें निजयोगयुक्त । पाप निर्दाळावें समस्त । हेंचि प्रायश्चित्त योगियासी ॥९८॥ हे सांडोनियां योगस्थिती । जैं लावूं धांवे शेणमाती । तैं नागवला गा निश्चितीं । नव्हेचि निष्कृती पापाची ॥९९॥ हृदयीं नाहीं अनुतापवृत्ती । वरिवरी गा शास्त्रोक्तीं । लावूं जातां शेणमाती । नव्हे निवृत्ती पापाची ॥३००॥ माझें क्षणार्ध अनुसंधान । कोटि कल्मषां करी दहन । तेथ इतरांचा केवा कोण । हें स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥१॥ ज्याचे अधिकारीं माझें ध्यान । सांडोनियां जाण । प्रायश्चित्त सांगतां आन । लागे दूषण सांगत्यासी ॥२॥ यालागीं मुख्यत्वें जाण । येथ अधिकारचि प्रमाण । येचिविखींचें निरुपण । श्रीनारायण सांगत ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा, सगुणः परिकीर्तितः । कर्मणां जात्यशुद्धानामनेन नियमः कृतः । गुणदोषविधानेन, सङगानां त्याजनेच्छया ॥२६॥

न प्रेरितां शास्त्रें श्रुतीं । विषयीं स्वाभिवक प्रवृत्ती । तिची करावया निवृत्ती । माझी वेदोक्ती प्रवर्तली ॥४॥ एकाएकीं विषयत्यजन । करावया अशक्त जन । त्यासी वेद दावी दोषगुण । त्यागावया जाण विषयांसी ॥५॥ हे माता हे सहोदर । येथ करुं नये व्यभिचार । हे वेद न बोलता अधिकार । तैं यथेष्टाचार विषयांचा ॥६॥ जेथवरी स्त्रीपुरुषव्यक्ती । तेथवरी कामासक्ती । मी नेमितों ना वेदोक्ती । तैं व्यभिचारप्राप्ती अनिवार ॥७॥ सकळ स्त्रिया सांडून । त्यजूनियां इतर वर्ण । सवर्ण स्त्री वरावी आपण । अष्टवर्षा जाण नेमस्त ॥८॥ तिचें वेदोक्त पाणिग्रहण । तेथ साक्षी अग्नि आणि ब्राह्मण । इतर स्त्रियांची वाहूनि आण । स्वदारागमन विध्युक्त ॥९॥ यापरी म्यां सकळ लोक । स्त्रीकामें अतिकामुक । स्वदारागमनें देख । केले एकमुख वेदोक्तीं ॥३१०॥ याचिपरी म्यां अन्नसंपर्क । वेदवादें नेमिले लोक । येरवीं वर्णसंकर देख । होता आवश्यक वेदेंवीण ॥११॥ तो चुकवावया वर्णसंकर । वर्णाश्रमांचा प्रकार । वेद बोलिला साचार । विषयसंचार त्यागावया ॥१२॥ विषयांची जे प्रवृत्ती । तेचि ’अविद्या’ बाधा निश्चितीं । जे विषयांची अतिनिवृत्ती । ती नांव ’मुक्ति’ उद्धवा ॥१३॥ करावया विषयनिवृत्ती । वेदें द्योतिली कर्मप्रवृत्ती । वर्णाश्रमाचारस्थिती । विषयासक्तीच्छेदक ॥१४॥ नित्य नैमित्तिक कर्मतंत्र । नाना गुणदोषप्रकार । वेदें द्योतिले स्वाधिकार । विरक्त नर व्हावया ॥१५॥ स्वकर्में होय चित्तशुद्धी । तेणें वैराग्य उपजे त्रिशुद्धी । वैराग्य विषयावस्था छेदी । गुणकार्यउपाधी रजतम हे ॥१६॥ तेव्हां उरे शुद्ध-सत्त्वगुण । तेथें प्रकटे गुरुभजन । गुरुभजनास्तव जाण । ज्ञान विज्ञान घर रिघे ॥१७॥ पूर्ण करितां भगवद्भक्ति । तैं गुरुभजनीं अधिकारप्राप्ती । सद्गुरुमहिमा सांगों किती । मी आज्ञावर्ती गुरुचा ॥१८॥ गुरु ज्यावरी अनुग्रहो करी । त्यासी मी भगवंत उद्धरीं । आदरें वाऊनियां शिरीं । निजऐश्वर्यावरी बैसवीं ॥१९॥ गुरु परमात्मा परेशु । ऐसा जयाचा विश्वासु । त्याचा अंकिला मी हृषीकेशु । जो जगदीशु जगाचा ॥३२०॥ जेथ मी अंकित झालों आपण । तेथ समाधीसीं ज्ञानविज्ञान । वोळंगे गुरुभक्ताचें अंगण । तेथ केवा कोण सिद्धींचा ॥२१॥ त्या गुरुचें करुनि हेळण । जो करी माझें भजन । तेणें विखेंसीं मिष्टान्न । मज भोजन घातलें ॥२२॥ तोंडीं घास डोईं टोला । ऐसा भजनार्थ तो झाला । तो जाण सर्वस्वें नागवला । वैरी आपला आपणचि ॥२३॥ येथवरी गुरुचें महिमान । माझेनि वेदें द्योतिलें जाण । करुनि विषयनिर्दळण । स्वाधिकारें जन तरावया ॥२४॥ यालागीं ज्यासी जो अधिकार । तो तेणें नुल्लंघावा अणुमात्र । हा वेदें केला निजनिर्धार । स्वकर्में नर तरावया ॥२५॥ तरी म्हणशी कर्मचि पावन । हेंही सर्वथा न घडे जाण । स्वाधिकारेंवीण कर्माचरण । तें अतिदारुण बाधक ॥२६॥ संन्यासी करी गृहस्थधर्म । तें त्यासी वोडवलें अकर्म । गृहस्थ करी करपात्रकर्म । तोचि अधर्म तयासी ॥२७॥ हितासी वोखद घेतां जाण । त्याचें चुकलिया अनुपान ॥ तेंचि अन्यथा होय आपण । पीडी दारुण मरणान्त ॥२८॥ तैसें अनधिकारें करितां कर्म । तेंचि बाधक होय परम । हें वेदें जाणोनियां वर्म । स्वधर्म सुगम नेमिले ॥२९॥ स्वाधिकारें स्वधर्मनिष्ठा । हाचि पुरुषाचा गुण मोठा । तेणें फिटे गुणकर्ममळकटा । प्रिय वैकुंठा तो होय ॥३३०॥ वेदें बोलिला जो गुण । तो अंगीकारावा आपण । वेदें ठेविलें ज्यासी दूषण । तें सर्वथा जाण त्यजावें ॥३१॥ हेंचि गुणदोषलक्षण । करितां वेदविवंचन । गुंतले गा अतिसज्ञान । माझे कृपेवीण वेदार्थ न कळे ॥३२॥ निषेधमुखेंकरितां त्यागु । वेद त्यागवी विषयसंगु । हें वर्म जाणोनि जो चांगु । तो होय निःसंगु महायोगी ॥३३॥ उद्धवा हें वेदतत्त्वसार । तुज म्यां सांगितलें साचार । ज्यालागीं शिणताति सुरनर । ऋषीश्वर तपस्वी ॥३४॥ परी माझे कृपेवीण सर्वथा । हें न ये कोणाचिये हाता । तें तुज म्यां सांगितलें आतां । तुझे हितार्था निजगुह्य ॥३५॥ मागें म्यां केलें निरुपण । गुणदोष देखणें तो दोष जाण । त्याचेंही विशद विवेचन । तुज मीं संपूर्ण सांगितलें ॥३६॥ पराचा देखावा दोषगुण । हें नाहीं नाहीं माझें वेदवचन । दोष त्यजोनियां आपण । घ्यावा गुण हा वेदार्थ ॥३७॥ त्यजोनि पराचे दोषगुण । स्वयें गुण घ्यावा आपण । हेंही माझे कृपेवीण । नव्हे जाण उद्धवा ॥३८॥ न देखोनि पराचे दोषगुण । स्वयें होइजे ब्रह्मसंपन्न । म्हणशी ऐशी कृपा परिपूर्ण । केवीं आपण लाहिजे ॥३९॥ तेचिविखींचें निरुपण । कृपेनें सांगताहे श्रीकृष्ण । माझे कृपेचें आयतन । उद्धवा जाण मद्भक्ती ॥३४०॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

जातश्रद्धो मत्कथासु, निर्विण्णः सर्वकर्मसु । वेद दुःखात्मकान् कामान्, परित्यागेऽप्यनीश्वरः ॥२७॥

माझे कथेचेनि श्रवणें । उठी संसाराचें धरणें । ऐसा विश्वासु धरिला ज्याणें । जीवेंप्राणें निश्चितीं ॥४१॥ म्हणे अर्धोदकीं प्राणांतीं । जैं हरिकथा आठवे चित्तीं । तैं उठे जन्ममरणपंक्ती । येथवरी भक्ती मत्कथेची ॥४२॥ ऐशिया भावार्थाचे स्थिती । अनिवार उपजे विरक्ती । नावडे कर्माची प्रवृत्ती । विषयासक्ती नावडे ॥४३॥ नावडे इतर कथावदंती । नावडे लौकिकाची प्रीती । परी निःशेष त्यागाप्रती । सामर्थ्यशक्ती ज्या नाहीं ॥४४॥ तेणें अनन्यभावें जाण । अत्यादरें करावें भजन । येचिविखींचें निरुपण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥४५॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

ततो भजेत मां प्रीतः, श्रद्धालुर्दृढनिश्चयः । जुषमाणश्च तान्कामान्दुःखोदर्कांश्च गर्हयन् ॥२८॥

त्यागावया नाहीं सामर्थ्यशक्ती । त्यासी विषयभोग जेव्हां येती । ते भोगी ऐशिया रीतीं । जेवीं श्रृंगारिती सुळीं द्यावया ॥४६॥ त्यांसी केळें साखर चोखटी । दूधतूप लावितां ओंठीं । शूळ भरेल या भोगापाठीं । तो धाक पोटीं धुकधुकी ॥४७॥ तेवीं विषय भोगितां जाण । पुढें निरय अतिदारुण । मज कां विसरला नारायण । मधुसूदन माधव ॥४८॥ मी पडिलों विषयबंदिखानीं । वेगीं पावें गरुडा वळंघोनी । कृपाळुवा चक्रपाणी । मजलागोनी सोडवीं ॥४९॥ विषयमहाग्रहाचे तोंडीं । मी सांपडलों बडिशपिंडी । गजेंद्राचेपरी तांतडीं । घालीं उडी मजलागीं ॥३५०॥ धांव पाव गा गोविंदा । निवारीं माझी विषयबाधा । उपेक्षूं नको मुकुंदा । घेऊनि गदा धांव वेगीं ॥५१॥ तूं अडलियांचा सहाकारी । भक्तकाजकैवारी । मज बुडतां विषयसागरीं । वेगें उद्धरीं गोविंदा ॥५२॥ मी पडिलों विषयसागरीं । बुडविलों कामलोभलहरीं । क्रोधें विसंचिलों भारी । अभिमानसुसरीं गिळियेलों ॥५३॥ तूं दीनदयाळ श्रीहरी । हें आपुलें बिरुद साच करीं । मज दीनातें उद्धरीं । निजबोधकरीं धरोनियां ॥५४॥ हे विषयबाधा अतिगहन । कां पां न पवे जनार्दन । येणें अट्टाहासें जाण । करी स्मरण हरीचें ॥५५॥ न सुटे विषयवज्रमिठी । पडिलों कामदंष्ट्रांचिये पोटीं । कांहीं केलिया न सुटे मिठी । आतां जगजेठी धांव वेगीं ॥५६॥ ऐसा निजभक्तांचा धांवा । क्षणही मज न साहवे उद्धवा । माझी कृपा होय तेव्हां । पूर्ण स्वभावा अनुतापें ॥५७॥ उद्धवा जेथ अनुताप नाहीं । तेथ माझी कृपा नव्हे कहीं । कृपेचें वर्म हेंच पाहीं । जैं अनुताप देहीं अनिवार ॥५८॥ माझे कृपेवीण निश्चितीं । कदा नुपजे माझी भक्ती । माझी झालिया कृपाप्राप्ती । अनन्यभक्ती तो करी ॥५९॥ माझे कृपेचें लक्षण । प्राप्त विषय भोगितां जाण । न तुटे माझें अनन्य भजन । ’पूर्ण कृपा’ जाय या नांव ॥३६०॥ मग चढत्या वाढत्या प्रीतीं । नीच नवी करी माझी भक्ती । देह गेह स्त्री पुत्र संपत्ती । वेंची माझे प्रीतीं धनधान्य ॥६१॥ माझे भक्तीलागीं आपण । सर्वस्व वेंची हें नवल कोण । स्वयें वंचीना जीवप्राण । ऐसें अनन्यभजन सर्वदा ॥६२॥ माझ्या भजनाची अतिप्रीती । स्मरण न सांडी अहोरातीं । माझा विसर न पडे चित्तीं । त्याची फळप्राप्ती हरि सांगे ॥६३॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

प्रोक्तेन भक्तियोगेन, भजतो माऽसकृन्मुनेः । कामा हृदय्या नश्यन्ति, सर्वे मयि हृदि स्थिते ॥२९॥

माझी जे कां निजभक्ती । मागां सांगितली तुजप्रती । त्या हातवटिया मीं श्रीपती । यजिलों अतिप्रीतीं वारंवार ॥६४॥ पळपळ क्षणक्षण । माझें न विसरत स्मरण । करिती अनन्य भजन । मदर्पण तें मीचि ॥६५॥ दिवसदिवसां चढोवढी । अनिवार प्रीति वाढे गाढी । लागतां नीच नवी गोडी । भजे आवडीं पुनःपुनः ॥६६॥ केलीचि भक्ती करितां । उबगु न ये सर्वथा । अधिक हर्ष वाटे चित्ता । उल्हासता मद्भजनीं ॥६७॥ मज आकळूनि आपले मनीं । मनींहोनि प्रीति भजनीं । तेथ सकळ काम जाती नासोनी । जेवीं कां तरणीं खद्योत ॥६८॥ जेवीं कां केसरी देखोनी । मदगजां होय भंगणी । तेवीं काम जाती हृदयींहूनी । मी चक्रपाणी प्रकटल्या ॥६९॥ ’मी प्रकटलों’ ऐसें म्हणतां । लाज लागेल या वचनार्था । मजवीण ठावो नाहीं रिता । ’प्रकटलों’ आतां म्हणे कोण ॥३७०॥ उद्धवा जाण तत्त्वतां । मी सदा हृदयीं वसता । भक्तांची भ्रांती जातां । मी स्वभावतां प्रकटचि ॥७१॥ भक्तीं करुनि माझी भक्ती । नाशिली गा निजभ्रांती । तेथ स्वयंभ मी श्रीपती । सहजस्थितीं प्रकटचि ॥७२॥ मी हृदयीं प्रकटल्यापुढें । भक्तांसी अलभ्य लाभ जोडे । फिटे संसाराचें सांकडें । ऐक पां फाडोवाडें सांगेन ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः । क्षीयन्ते चास्य कर्माणि, मयि दृष्टेऽखिलात्मनि ॥३०॥

उद्धवा मी ज्यासी हृदयीं भेटें । तो मी हृदयामाजीं न संठें । सर्वात्मा सर्वरुपें प्रकटें । नव्हे धाकुटें स्वरुप माझें ॥७४॥ ऐसा मी प्रकटलियापाठीं । संसारुचि न पडे दिठीं । मावळे गुणेंसीं भेदत्रिपुटी । पळे उठाउठी भवभय ॥७५॥ लागतां सुर्याचे किरण । घृताचें नासे कठिणपण । तेवीं मी प्रकटल्या नारायण । न फोडितां जाण लिंगदेह नाशे ॥७६॥ धुई दाटली चहुंकडे । ते चंडवातें तत्काळ उडे । तेवीं माझ्या स्वप्रकाशापुढें । वासनेचें उपडे समूळ जाळ ॥७७॥ समूळ उपडितां वासनेसी । संशय निमे जीवेंभावेंसीं । तेथ क्षयो झाला कर्मासी । जेवीं रवीपाशीं आंधारें ॥७८॥ तेवीं गुण नासती स्वकार्येंसीं । अविद्या नासे अज्ञानेंसीं । जीव नासे शिवपणेंसीं । चिदचिद्‌ग्रंथीसीं अहंकारु ॥७९॥ तेथ सोहंहंसाची बोळवण । न करितांचि जाहली जाण । भेणें पळालें जन्ममरण । पडलें शून्य संसारा ॥३८०॥ यापरी भक्तियोगें गहन । माझें करुनियां भजन । भक्त पावले समाधान । ऐसेनि जाण निजभजनें ॥८१॥ एवं भक्ति-ज्ञान-कर्मयोग । या तिहीं योगांचा विभाग । तुज म्यां सांगितला साङग । हें वर्म चांग मत्प्राप्तीं ॥८२॥ येथ विशेषें माझी भक्ती । न पाहे साह्य सांगाती । नव्हे आणिकांची पंगिस्ती । साधी मत्प्राप्ती अंगोवांगीं ॥८३॥ न करितां माझें भजन । सर्वथा नुपजे माझें ज्ञान । कर्म न करितां मदर्पण । तेंचि जाण अकर्म ॥८४॥ यालागीं मुख्य जें निजज्ञान । तें अपेक्षी माझें भजन । तेथ कर्म बापुडें रंक जाण । भजनेंवीण सरेना ॥८५॥ एवं ज्ञान कर्में परमार्थी । माझे भक्तीस्तव होती सरतीं । ते भक्तीची निजख्याती निजख्याती । ऐक तुजप्रती सांगेन ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

तस्मान्मद्भक्तियुक्तस्य, योगिनो वै मदात्मनः । न ज्ञानं न च वैराग्यं, प्रायः श्रेयो भवेदिह ॥३१॥

करुं नेणे कर्माचरण । न साधितां वैराग्यज्ञान । भावें करितां माझें भजन । माझ्या स्वरुपीं मन ठेवूनी ॥८७॥ तेथ ज्ञानकर्मादिकें जाण । मुख्य वैराग्यही आपण । मद्भक्तीसी येती लोटांगण । चरणां शरण पैं येती ॥८८॥ शरण येणें हें कायशी गोठी । केवळ जन्मती भक्तीच्या पोटीं । मग लडेवाळें घालूनि मिठी । स्वानंदाची गोमटी मागती गोडी ॥८९॥ एवं भक्ति आपुले अंकीं जाण । करी ज्ञानादिकांचे लालन । परमानंद पाजूनि पूर्ण । करी पालन निजांगें ॥३९०॥ ते आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानादिकें कामारी होती । तेचिविखींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ व ३३ वा

यत्कर्मभिर्यत्तपसा, ज्ञानवैराग्यतश्च यत् । योगेन दानधर्मेण, श्रेयोभिरितरैरपि ॥३२॥

सर्वं मद्भक्तियोगेन, मद्भक्तो लभतेऽञ्जसा । स्वर्गापवर्गं मद्धाम, कथंचिद्यदि वाञ्छति ॥३३॥

जें पाविजे स्वधर्मकर्मादरें । जें पाविजे निर्बंध तपाचारें । जें सांख्यज्ञानविचारें । पाविजे निर्धारें जें वस्तु ॥९२॥ जें पाविजे विषयत्यागें । जें पाविजे अष्टांगयोगें । जें वातांवुपर्णाशनभोगें । जें दानप्रसंगें पाविजे ॥९३॥ जें साधें वेदाध्ययनें । जें साधें सत्यवचनें । जें साधे अनेकीं साधनें । तें मद्भजनें पाविजे ॥९४॥ हें न सोशितां साधनसांकडें । नुल्लंघितां गिरिकपाटकडे । हीं सकळ फळें येती दारापुढें । जैं माझी आतुडे निजभक्ती ॥९५॥ उद्धवा तूं म्हणसी जाण । ऐशी ते तुझी भक्ति कोण । ब्रह्मभावें जें गुरुभजन । ते भक्तीचा पूर्ण हा प्रतापु ॥९६॥ सद्गुरुभजनापरती । साधकांसी नाहीं प्राप्ती । मी भगवंत करीं गुरुभक्ती । इतरांचा किती पवाडु ॥९७॥ मीही सद्गुरुचेनि धर्में । पावलों एवढिये महिमे । त्या सद्गुरुचे गुरु गरिमे । कोणे उपमे उपमावें ॥९८॥ जे गुरुब्रह्म-अभेदभक्त । अवचटें अणुमात्र वांछित । तैं वैकुंठादि समस्त । मी त्यांसी देत स्वर्गापवर्ग ॥९९॥ हेंही बोलतां अत्यंत थोडें । मी त्यांच्या भजनसुरवाडें । भुललों गा वाडेंकोडें । त्यां मागेंपुढें सदा तिष्ठें ॥४००॥ मद्भक्त नैराश्यें अतिगाढे । ते मागतील हें कदा न घडे । तेंही लक्षण तुजपुढें । अतिनिवाडें सांगेन ॥१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

न किञ्चित्साधवो धीरा, भक्ता ह्येकान्तिनो मम । वाञ्छन्त्यपि मया दत्तं, कैवल्यमपुनर्भवम् ॥३४॥

ज्यासी नघेणेंपणाचा प्रबोधु । साचार झाला अतिविशदु । ऐसा निरपेक्ष जो शुद्धु । तो सत्य साधु मज मान्य ॥२॥ ज्याच्या ठायीं निरपेक्षता । धैर्य त्याचे चरण वंदी माथां । ज्याच्या ठायीं अधीरता । तेथ निरपेक्षता असेना ॥३॥ कोटिजन्में बोधु जोडे । तैं हे निरपेक्षता आतुडे । निरपेक्षतेवरुतें चढे । ऐसें नाहीं फुडें साधन ॥४॥ ऐशिये निरपेक्षताप्राप्तीं । माझ्या भजनीं अतिप्रीती । ती लाभे माझी चौथी भक्ती । जीसी ’एकांती’ म्हणे वेदु ॥५॥ ऐक एकान्तभक्तीची मातु । देवाभक्तांसी होय एकांतु । भक्त रिघे देवाआंतु । देव भक्तांतु सबाह्य ॥६॥ ऐसें अभेद माझें भजन । या नांव ’एकांतभक्ति’ जाण । मजवेगळें कांहीं भिन्न । न देखे आन जगामाजीं ॥७॥ त्यांसी चहूं पुरुषार्थेंसीं मुक्ती । मी स्वयें देताहें श्रीपती । ते दुरोनि दृष्टीं न पाहती । मा धरिती हातीं हें कदा न घडे ॥८॥ ते स्वमुखें कांहीं मागती । हें न घडे कदा कल्पांतीं । सांडूनि माझी एकांतभक्ती । कैवल्य न घेती ते निजभक्त ॥९॥ मोक्षही न घ्यावया कोण भावो । त्याचाही मथित अभिप्रावो । स्वयें सांगे देवाधिदेवो । अगम्य पहा हो श्रुतिशास्त्रां ॥४१०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

नैरपेक्ष्यं परं प्राहुर्निःश्रेयसमनल्पकम् । तस्मान्निराशिषो भक्तिर्निरपेक्षस्य मे भवेत् ॥३५॥

जो निरपेक्ष निर्विशेष । तो मज पूज्य महापुरुष । मोक्ष त्याचे दृष्टीं भूस । धन्य नैराश्य तिहीं लोकीं ॥११॥ ऐक निरपेक्षतेचा उत्कृष्ट । तेथ चारी पुरुषार्थ फळकट । वैकुंठकैलासादि श्रेष्ठ । ते पायवाट निरपेक्षा ॥१२॥ निरपेक्षापाशीं जाण । वोळंगे येती सुरगण । तेथ ऋद्धिसिद्धींचा पाड कोण । वोळंगे अंगण कळिकाळ ॥१३॥ स्वयें महादेव आपण । सर्वस्वें करी निंबलोण । श्रियेसहित मी आपण । अंकित जाण तयाचा ॥१४॥ निरपेक्ष जो माझा भक्त । तो मजसमान समर्थ । हेंही बोलणें अहाच येथ । तो मीचि निश्चित चिद्रूपें ॥१५॥ मी परमात्मा परमानंद । भक्त मद्भजनें शुद्ध स्वानंद । दोघे अभेदें स्वानंदकंद । सच्चिदानंद निजरुपें ॥१६॥ ऐसे मद्भावें भक्त संपन्न । ते न देखती दोषगुण । तेचिविखींचें निरुपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥१७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

न मय्येकान्तभक्तानां, गुणदोषोद्भवा गुणाः । साधूनां समचित्तानां, बुद्धेः परमुपेयुषाम् ॥३६॥

जो न देखे विषयभेदु । ज्यासी समत्वाचा निजबोधु । तोचि बोलिजे ’शुद्ध साधु’ । परमानंदु मद्भजनें ॥१८॥ मी एक परमात्मा सर्व भूतीं । न देखे द्वैताची प्रतीती । ऐशी ज्याची भजनस्थिती । ’एकांतभक्ती’ त्या नांव ॥१९॥ सदा समभावें एकाग्र । माझ्या भजनीं अतितत्पर । ते प्रकृतीचे परपार । पावले साचार मद्रूपीं ॥४२०॥ ऐसे मद्भावें भक्त परिपूर्ण । ते न देखती दोषगुण । उद्धवा म्यां हे निजखूण । पूर्वीं तुज जाण सांगितली ॥२१॥ साकरेची साली फेडणें । कीं कापुराचा कोंडा काढणें । रत्नेदीपाची काजळी फेडणें । तेवीं गुणदोष देखणें सृष्टीमाजीं ॥२२॥ ज्याचा घ्यावा अवगुण । मुख्य अवगुणी मी आपण । ज्याचा घ्यावा उत्तम गुण । तोही जाण मद्रूप ॥२३॥ यापरी भक्तजगजेठी । मद्रूपें देखे सकळ सृष्टी । त्यासी गुणदोषांची गोष्टी । न पडे दृष्टीं सर्वथा ॥२४॥ गुणदोष न देखावे जाण । हेंचि साधनीं मुख्य साधन । येचि अर्थीचें निरुपण । आदरें श्रीकृष्ण सांगत ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

एवमेतान्मयादिष्टाननुतिष्ठन्ति मे पथः । क्षेमं विन्दन्ति मत्स्थानं, यद्ब्रह्म परमं विदुः ॥३७॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कन्धे विंशतितमोऽध्यायः ॥२०॥

उद्धवा यापरी जाण । म्यां वेदवादें आपण । उपदेशिले गा जन । भक्तिज्ञानकर्मयोगें ॥२६॥ कर्मेंचि कर्में छेदिजेती । ऐशी ’कर्मयोगाची’ गती । स्वधर्मकर्में माझी प्राप्ती । ते म्यां तुजप्रती सांगितली ॥२७॥ नित्यानित्यविवंचन । करुनि अनित्यनिर्दळण । हें ’ज्ञानयोगाचें’ लक्षण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥२८॥ तैशीच करितां ’माझी भक्ती’ । सकळ फळें पायां लागती । भक्तांसी अनायासें माझी प्राप्ती । हेंही तुजप्रती सांगितलें ॥२९॥ अधिकारभेदेंसीं साङग । त्रिकांड त्रिविध वेदमार्ग । माझे प्राप्तीलागीं चांग । विशद विभाग म्यां केले ॥४३०॥ म्यां सांगितल्याऐसें जाण । जो वेदमार्गें करी अनुष्ठान । तो माझी प्राप्ती पावे संपूर्ण । सगुण निर्गुण यथारुची ॥३१॥ सगुणसाक्षात्कार जो येथ । तें पंचरात्रागम-मत । वैकुंठचि मुख्य म्हणत । हें मत निश्चित तयांचें ॥३२॥ सप्तावरणांबाहेरी । मायावरणाभीतरीं । वैकुंठ रचिलें श्रीहरीं । हें बोलिजे निर्धारीं वेदान्तीं ॥३३॥ तेथ आगमाचें मनोगत । माया ते ’भगवल्लीला’ म्हणत । स्वलीला वैकुंठ रची भगवंत । क्षयो तेथ असेना ॥३४॥ जेथ लीलाविग्रही मेघश्याम । स्वयें वसे पुरुषोत्तम । तेथ नाहीं गुण काळ कर्म । मायादि भ्रम रिघेना ॥३५॥ एवं जन्मक्षयातीत । वैकुंठ अक्षयी निज नित्य । तेथ पावले ते नित्यमुक्त । हें ’आगम-मत’ उद्धवा ॥३६॥ मंत्रें आराध्यदैवतें प्रसन्नें । हें वेदार्थियांचें बोलणें । तें म्यां तुजप्रती अनुसंधानें । बोलिलों जाणें उद्धवा ॥३७॥ भावाथभक्तीचें लक्षण । ते प्रसन्नतेची खूण । हें पूर्वीं केलें निरुपण । निरुतें जाण उद्धवा ॥३८॥ ये अर्थीं वेदांती म्हणत । अत्यंतप्रळयींचा जो आघात । तो वैकुंठकैलासादि समस्त । साकारवंत निर्दाळी ॥३९॥ ते काळींचें उर्वरित । केवळ जें गुणातीत । तें पूर्ण ब्रह्म सदोदित । जाण निश्चित उद्धवा ॥४४०॥ जेथ काळ ना कर्म । जेथ गुण ना धर्म । जेथ माया पावे उपरम । तें परब्रह्म उद्धवा ॥४१॥ माझें स्थान वैकुंठ जाण । तेथील प्राप्ति ’सायुज्य-सगुण’। ’पूर्ण-सायुज्यता’ संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण सदोदित ॥४२॥ पावावया पूर्ण परब्रह्म । साधकांसी कोणे मार्गीं क्षेम । वेदोक्त मद्भक्ति सुगम । उत्तमोत्तम हा मार्ग ॥४३॥ आणिके मार्गीं जातां जाण । कामलोभादि उठे विघ्न । कां बुडवी ज्ञानाभिमान । ये नागवण प्रत्यवायाची ॥४४॥ तैसें नाहीं भक्तिपंथीं । सवें नवविध सांगाती । चढता पाउलीं अतिविश्रांती । भजनयुक्ती मद्भावें ॥४५॥ येथील मुख्यत्वें साधन । गेलियाही जीवप्राण । कदा न देखावे दोषगुण । तैं ब्रह्म परिपूर्ण पाविजे ॥४६॥ जेथ नाहीं भयभ्रांती । जेथ नाहीं दिवसराती । जेथ नाहीं शिवशिवस्थिती । तें ब्रह्म पावती मद्भक्त ॥४७॥ जेथ नाहीं रुपनाम । जेथ नाहीं काळकर्म । जेथ नाहीं मरणजन्म । तें परब्रह्म पावती ॥४८॥ जेथ नाहीं ध्येयध्यान । जेथ नाहीं ज्ञेयज्ञान । जेथ नाहीं मीतूंपण । तें ब्रह्म परिपूर्ण पावती ॥४९॥ ज्यासी नाहीं मातापिता । जें नव्हे देवोदेवता । जें बहु ना एकुलता । तें ब्रह्म तत्त्वतां पावती ॥४५०॥ जेथ नाहीं वर्णाश्रम । जेथ नाहीं क्रियाकर्म । जेथ नाहीं मायाभ्रम । तें परब्रह्म पावती ॥५१॥ जें गुणागुणीं अतीत । जें लक्ष्यलक्षणारहित । जें स्वानंदें सदोदित । ते ब्रह्म प्राप्त मद्भक्तां ॥५२॥ पूर्णकृपेचा हेलावा । न संठेचि देवाधिदेवा । तो हा एकाद्शींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५३॥ जेथ ठावो नाहीं देहभावा । जेथ सामरस्य जीवशिवां । तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५४॥ जेथ उगाणा होय अहंभावा । जेथ शून्य पडे मायेच्या नांवा । तो हा एकदशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५५॥ जेथ देवभक्तांचा कालोवा । एकत्र होय आघवा । तो हा एकादशीं विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५६॥ कष्टीं स्वानंद स्वयें जोडावा । त्या स्वानंदाचा आइता ठेवा । तो हा एकादशीं विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५७॥ करोनि भेदाचा नागोवा । होय अभेदाचा रिगावा । तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५८॥ काढोनि भावार्थाचा भावो । सोलीव सोलिवांचा सोलावो । गाळुनी गाळिवांचा भक्तिभावो । उद्धवासी देवो देतसे ॥५९॥ यापरी श्रीकृष्णनाथ । होऊनियां स्वानंदभरित । विसाव्या अध्यायींची मात । हरिखें सांगत उद्धवा ॥४६०॥ आतां विसाव्याचा विसावा । स्वानंदसुखाचा हेलावा । तो मी सांगेन एकविसावा । ऐक उद्धवा सादर ॥६१॥ वेदीं शुद्धाशुद्धलक्षण । हें पुढिले अध्यायीं निरुपण । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥६२॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसंवादे एकाकार-टीकायां वेदत्रयीविभागयोगो नाम विंशतितमोऽध्यायः ॥२०॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥ (अध्याय ॥२०॥श्लोक॥३७॥ओंव्या॥४६२॥एकूण ग्रंथ ४९९)


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]