Jump to content

एकनाथी भागवत/अध्याय बाविसावा

विकिस्रोत कडून

<poem> एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुरु खांबसूत्री । चौर्या॥यशीं लक्ष पुतळ्या यंत्रीं । नाचविशी निजतंत्रीं । प्राचीनदोरीस्वभावें ॥१॥ दोरी धरिली दिसों न देशी । परी पुतळ्या स्वयें नाचविशी । नवल लाघवी कैसा होशी । अलिप्ततेंसीं सर्वदा ॥२॥ तेथ जैशी ज्याची पूर्वगती । तें भूत नाचे तैशा रीतीं । ते नाचविती चेतनाशक्ती । तुझ्या हातीं वीणहस्तें ॥३॥ जेवीं कां अचेतन लोहातें । चुंबक खेळवी निजसामर्थ्यें । तेवीं तूं सकळ भूतांतें । निजसत्तें नाचविशी ॥४॥ ऐशीं सदा नाचतीं परतंत्र । तरी अभिमानाचें बळ थोर । सत्य मानोनि देहाकार । आम्ही स्वतंत्र म्हणविती ॥५॥ आम्ही सज्ञान अतिज्ञाते । आम्ही कर्मकुशल कर्मकर्ते । इतर मूर्खें समस्तें । ऐशा अभिमानातें वाढविती ॥६॥ एवं देहाभिमानाचेनि हातें । विसरोनि आपुल्या अकर्तृत्वातें । स्वयें पावले कर्मबंधातें । जेवीं स्वप्नावस्थे विषबाधा ॥७॥ स्वप्नीं अतिशय चढलें विख । आतां उतरलें निःशेख । तेवीं बंधमोक्ष देख । सत्यत्वें मूर्ख मानिती ॥८॥ हे तुझे खांबसूत्रींची कळा । मिथ्या सत्यत्वें दाविशी डोळां । हा अतिशयें अगाध सोहळा । तुझी अतर्क्य लीळा तर्केना ॥९॥ अचेतनीं चेतनधर्म । प्रत्यक्ष दाविशी तूं सुगम । हेंचि तुझें न कळे वर्म । करोनि कर्म अकर्ता ॥१०॥ अकर्ताचि तूं होशी कर्ता । कर्ता होत्साता अकर्ता । हे तुझी खांबसूत्रता । न कळे सर्वथा कोणातें ॥११॥ तुझी माया पाहों जातां । तोचि मायेनें ग्रासिला तत्त्वतां । असो तुजचि पाहों म्हणतां । तेही सत्त्वावस्था मायेची ॥१२॥ ऐसें तुझें खांबसूत्र । अकळ न कळे गा तुझें चरित्र । देखों नेदितां निजसूत्र । भूतें विचित्र नाचविशी ॥१३॥ तुझेनि जग होय जाये । परी म्यां केलें हें ठावें नोहे । ऐसा तुझा खेळ पाहें । कोणें काये लक्षावा ॥१४॥ यापरी खेळ वाढविशी । सवेंचि विकल्पोनि मोडिशी । विकार महत्तत्त्वीं सांठविशी । हेंही कर्तृत्व अंगासी न लगत गेलें ॥१५॥ याचें मुख्यत्वें मूळ लक्षण । तुझे कृपेवीण न कळे जाण । तुझी कृपा झालिया पूर्ण । जनीं जनार्दन प्रकटे पैं ॥१६॥ जनीं प्रगटल्या जनार्दन । तद्रुप होइजे आपण । हे मूळींची निजखूण । तेथ मीतूंपण रिगेना ॥१७॥ मीतूंपणेंवीण प्रसिद्ध । जनीं जनार्दन निजानंद । त्याचे कृपेस्तव विशद । श्रीभागवत शुद्ध वाखाणिलें ॥१८॥ तेथ एकविसाव्याचे अंतीं । वेद विक्रांड लक्ष्यार्थस्थिती । ब्रह्म एकचि निश्चितीं । अद्वयस्थिती अविनाशी ॥१९॥ हें वेदार्थसारनिरुपण । ऐकतां उद्धवा बाणली खूण । ब्रह्म एकाकी परिपूर्ण । दुजेनवीण संचलें ॥२०॥ वेदवाद्यें ब्रह्म एक । स्वानुभवें तैसेंचि देख । तरी ज्ञाते ऋषिजन लोक । केवीं तत्त्वें अनेक बोलती ॥२१॥ येचि आशंकेलागीं जाण । उद्धवें स्वयें मांडिला प्रश्न । परी पोटांतील भिन्न खूण । उगा श्रीकृष्णा न रहावा ॥२२॥ मी झालों जी ब्रह्मसंपन्न । हें ऐकतां माझें वचन । निजधामा निघेल श्रीकृष्ण । मग हें दर्शन मज कैंचें ॥२३॥ ऐशिया काकुळतीं जाण । संशयेवीण करी प्रश्न । ते आयकोनि श्रीकृष्ण । सुखसमाधान भोगित ॥२४॥ तंव कृष्णाचे मनीं आणिक । उद्धव मी दोघे एक । मिथ्या वियोगाचें दुःख । हें कळे तंव देख प्रश्न सांगों ॥२५॥ बाविसावे अध्यायीं देख । तत्त्वसंख्या सांगेल आवश्यक । प्रकृतिपुरुषविवेक । जन्ममरणद्योतक प्रकारु ॥२६॥ आत्मा एक कीं अनेक । आणि तत्त्वसंख्याविवेक । हें कळावया निष्टंक । उद्धव देख पूसत ॥२७॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

उद्धव उवाच-कति तत्त्वानि विश्वेश संख्यातान्यृषिभिः प्रभो । नवैकादश पञ्चत्रीण्यात्थ त्वमिह शुश्रुम ॥१॥

विश्वात्मका विश्वेश्वरा । विश्वधारका विश्वंभरा । विश्वसाक्षी विश्वाकारा । विश्वैकसुंदरा श्रीकृष्णा ॥२८॥ तुज विश्वात्मक म्हणतां । जड मलिन एकदेशिता । आली म्हणशी अज्ञानता । यालागीं प्रभुता उपपादी ॥२९॥ जड मलिन अज्ञानता । हे मायेस्तव होती तत्त्वतां । ते मायेचा तूं नियंता । हे अगाध प्रभुता पैं तुझी ॥३०॥ ऐशिया संबोधनद्वारा । विनवूनि स्वामी शारंगधरा । तत्त्वसंख्येच्या विचारा । निजनिर्धारा पुसत ॥३१॥ जे तपःसामर्थ्यें समर्थ थोर । अनागतद्रष्टे ऋषीश्वर । त्यांची तत्त्वसंख्या विचित्र । पृथक्‌पृथगाकारें बोलती ॥३२॥ तत्त्वसंख्या इत्यंभूत । एकुणिसाव्या अध्यायांत । तुम्हींच निरुपला तत्त्वार्थ । तोचि वृत्तांत सांगत ॥३३॥ (पूर्वश्लोकार्ध-"नवैकादशपंचत्रीनू" )

चौदावे श्लोकींच्या निरुपणीं । हे अठ्‌ठावीस तत्त्वगणनी । सांगितली शार्ङगपाणी । मजलागोनी निश्चित ॥३४॥ ये तत्त्वसंख्येचा विचार । प्रकृति पुरुष महदहंकार । पंच महाभूतें थोर । हा संख्याप्रकार नवांचा ॥३५॥ दाही इंद्रियें अकरावें मन । पंच विषय तीन्ही गुण । हें अठ्‌ठावीस संख्यागणन । स्वमुखें आपण निरुपिलें ॥३६॥ यापरी गा लक्ष्मीपती । हे मुख्यत्वें तुझी तत्त्वोक्ती । आतां ऋषीश्वरांच्या युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥३७॥ ते तूं ऐक गा निश्चित । तुज सांगेन तयाचा अर्थ । म्हणोनियां निरुपित । स्वयें मनोगत उद्धव ॥३८॥ म्हणे तत्त्वतां अवधारीं । मी सांगेन एक कुसरी । प्रकृतिपुरुषांमाझारीं । विचित परी सांगत ॥३९॥


एकनाथी भागवत - श्लोक २ व ३ रा

केचित्षडिंवशतिं प्राहुरपरे पंचविंशतिम् । सप्तैके नव षट्‌ केचिच्चत्वार्येकादशापरे ॥२॥

केचित्सप्तदश प्राहुः, षोडशैके त्रयोदश । एतावत्त्वं हि संख्यानामृषयो यद्विवक्षया ॥३॥

येथ तत्त्वसंख्या मतवाद । ऋषीश्वरांमाजीं विवाद । त्या विवादाचे शब्द । ऐक विशद सांगेन ॥४०॥ एक म्हणे तत्त्वें ’सव्वीस’ । दुजा म्हणे उगा बैस । बहु बोलावया नाहीं पैस । तत्त्वें ’पंचवीस’ नेमस्त ॥४१॥ तिजा म्हणे तुम्हीं येथ । कैसेनि वाढविलें स्वमत । तत्त्वें नेमस्तचि ’सात’ । कैंचीं बहुत बोलतां ॥४२॥ एक म्हणे हें अभिनव । बोलतां न लाजती मानव । वृथा बोलाची लवलव । तत्त्वें ’नव’ नेमस्त ॥४३॥ तंव हांसोनि बोले एक । सांपे सज्ञान झाले लोक । मिथ्या बहु तत्त्वजल्पक । ’तत्त्वषटूक’ नेमस्त ॥४४॥ एक म्हणती परते सरा । नेणा तत्त्वसंख्याविचारा । तत्त्वें नेमिलींच ’अकरा’ । बडबड सैरा न करावी ॥४५॥ दुजा म्हणे तत्त्वविचारा । नेणोनि धरिसी अहंकारा । पुसोनियां थोरथोरां । तत्त्वें ’सतरा’ नेमस्त ॥४६॥ एक म्हणे व्युत्पत्तिबळा । कां व्यर्थ पिटाल कपाळा । न कळे भगवंताची लीळा । तत्त्वें ’सोळा’ नेमस्त ॥४७॥ एक म्हणे या गर्वितां पोरां । कोण पुसे तत्त्वविचारा । तत्त्वें नेमस्तचि ’तेरा’ । निजनिर्धारा म्यां केलें ॥४८॥ एक म्हणे सांडा चातुरी । तत्त्वें नेमस्तचि ’चारी’ । दुजा म्हणे या कायशा कुसरी । तत्त्वें निर्धारीं ’दोनचि’ ॥४९॥ तिजा म्हणे वाचाट लोक । कोणें धरावें यांचें मुख । निजनिर्धारीं तत्त्व ’एक’ । एकाचा अनेक विस्तार ॥५०॥ एवं मतपरंपरा नाना मतीं । ऋषीश्वोरीं वेंचितां युक्ती । तुझ्या तत्त्ववादाची निश्चिती । कोणें इत्थंभूतीं मानावी ॥५१॥ गायन्ति पृथगायुष्मन्निदं नो वक्तुमर्हसि तूं निजात्मा परमेश्वर । तुज जाणावया ऋषीश्वर । वेंचूनि युक्तीचे संभार । तत्त्वविचार बोलती ॥५२॥ स्वामीनें सांगितलें तत्त्व एक । ऋषीश्वर बोलती अनेक । येचिविषयींचें निष्टंक । मज आवश्यक सांगावें ॥५३॥ एवं या तत्त्वनिश्चयासी । मज सांगावया योग्य होसी । ऐसा विनविला हृषीकेशी । तो उद्धवासी तुष्टला ॥५४॥ जीं जीं ऋषीश्वर बोलती । तीं तीं तत्त्वें सत्य होतीं । हें सर्वज्ञ ज्ञाते जाणती । तेचि अर्थी हरि बोले ॥५५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

श्रीभगवानुवाच-युक्तयः सन्ति सर्वत्र भाषन्ते ब्राह्मणा यथा । मायां मदीयामुद्गृह्य वदतां किंनु दुर्घटम् ॥४॥

ज्याचेनि मतें जैसें ज्ञान । तो तैसें करी तत्त्वव्याख्यान । या हेतू बोलती ब्राह्मण । तें सत्य जाण उद्धवा ॥५६॥ जरी अवघीं मतें प्रमाण । तरी कां करावें मतखंडण । उद्धवा तूं ऐसें न म्हण । ते मी निजखूण सांगेन ॥५७॥ अघटघटित माझी माया । जे हरिहरां न ये आया । जे नाथिलें वाढवूनियां । लोकत्रया भुलवीत ॥५८॥ ते माया धरोनियां हातें । ऋषीश्वर निजमतें । जो जो जें जें बोलेल जेथें । तें तें तेथें घडे सत्य ॥५९॥ केवळ दोराचा सर्पाकार । हा श्वेत कृष्ण कीं रक्तांबर । ज्यासी जैसा भ्रमाकार । त्यासी साचार तो तैसा ॥६०॥ तेवीं आत्मतत्त्व एकचि जाण । अविकारी निजनिर्गुण । तेथ नाना तत्त्वांचें व्याख्यान । बोलती ब्राह्मण मायायोगें ॥६१॥ त्या मायेच्या मायिका व्युत्पत्ती । नाना वाग्वाद स्वमतीं । त्याच वादाची वादस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥६२॥ ऐसें बोलोनि श्रीकृष्णनाथ । उद्धवाप्रति साङग निरुपित । तत्त्वविचारणा यथार्थ । स्वयें सांगत आपण ॥६३॥ हें पांचवे श्र्लोकींचें निरुपण । श्रीकृष्णउद्धवविवरण । सांगितलें तत्त्वव्याख्यान । उद्धवा जाण यथार्थ ॥६४॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

नैतदेवं यथात्थ त्वं, यदहं वच्मि तत्तथा । एवं विवदतां हेतुं, शक्तयो मे दुरत्ययाः ॥५॥

माझे मायेचें प्रबळ बळ । तेणें अभिमान अतिसबळ । वाढवूनि युक्तीचें वाग्जाळ । करिती कोल्हाळ वाग्वादी ॥६५॥ प्रबळ शास्त्रश्रवणाभिमान । तुझें वचन तें अप्रमाण । मी बोलतों हेंचि प्रमाण । पत्रावलंबन केलें असे ॥६६॥ सत्त्वरजादि गुणोत्पत्ती । माझे मायेच्या अनंत शक्ती । तेणें गुणक्षोभें विवादती । स्वमतव्याप्तीअभिमानें ॥६७॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

यासां व्यतिकरादासीद्विकल्पो वदतां पदम् । प्राप्ते शमदमेऽप्येति, वादस्तमनुशाम्यति ॥६॥

कां गुणक्षोभें अभिमान । विकल्प उपजवी गहन । विकल्पें युक्तीचें छळण । करी आपण अतिवादें ॥६८॥ सांडितां गुणक्षोभविलास । रजतमांचा होय र्हा८स । सत्त्ववृत्तीचा निजप्रकाश । अतिउल्हास शमदमांचा ॥६९॥ शमदमांचे निजवृत्ती । संकल्प-विकल्पेंसीं जाती । वाद अतिवाद उपरमती । जेवीं सूर्याप्रती आंधारें ॥७०॥ सर्वज्ञ ज्ञाते जे गा होती । ते नाना तत्त्वांच्या तत्त्वोक्ती । स्वयें विवंचूं जाणती । ऐक तुजप्रती सांगेन ॥७१॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

परस्परानुप्रवेशात्तत्त्वानां पुरुषर्षभ । पौर्वापर्यप्रसंख्यानं, यथा वक्तुर्विवक्षितम् ॥७॥

गुरुपाशीं शास्त्रपाठा । करुनि साधिली निजनिष्ठा । ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । प्रियवरिष्ठा प्रियोत्तमा ॥७२॥ तत्त्वगणनेचे जे जे लेख । एकाचें थोडें एकाचें अधिक । हा ’अनुप्रवेश’ वोळख । एकामाजीं एक उपजती ॥७३॥ तत्त्वांपासूनि तत्त्वें होतीं । कारणरुपें कार्याची स्थिती । अंतीं जेथील तेथें प्रवेशती । हे तत्त्वोपपत्ती उद्धवा ॥७४॥ पूर्वस्थिति जें तें कारण । त्यापासोनि उपजे तें कार्य जाण । हें कार्यकारणांचें लक्षण । तत्त्वविचक्षण बोलती ॥७५॥ येथ वक्त्यारचें जैसें मनोगत । तैशी तत्त्वसंख्या होत । कार्य-कारण एकत्व गणित । तत्त्वसंख्या तेथ थोडीच ॥७६॥ एकचि कार्य आणि कारण । गणितां आणिती भिन्न भिन्न । तेथ तत्त्वसंख्या अधिक जाण । होय गणन उद्धवा ॥७७॥ एवं कार्यकारणें भिन्नभिन्नें । तत्त्वसंख्या थोडी बहुत होणें । हीं तत्त्ववक्त्यां चीं लक्षणें । तुज सुलक्षणें सांगितलीं ॥७८॥ येचि विषयींची उपपत्ती । स्वयें सांगताहे श्रीपती । कार्यकारणनिजयुक्ती । उद्धवाप्रती निवाडे ॥७९॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

एकस्मिन्नपि दृश्यन्ते, प्रविष्टनीतराणि च । पूर्वस्मिन्वा परस्मिन्वा, तत्त्वे तत्त्वानि सर्वशः ॥८॥

आकाशापासूनि वायु झाला । तो गगनावेगळा नाहीं गेला । वायूपासूनि अग्नि झाला । तेथ प्रवेशु आला दोंहीचा ॥८०॥ अग्नीपासून आला जळरस । त्यामाजीं तिंहीचा रहिवास । जळापासून पृथ्वीचा प्रकाश । तीमाजीं प्रवेश चहूंचा ॥८१॥ तैसें कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण । जेवीं लेणें आणि सुवर्ण । वेगळेंपण एकत्वें ॥८२॥ जेवीं तंतु आणि पट । दोनी दिसती एकवट । तेवीं कार्यकारण सगट । दिसे स्पष्ट अभिन्न ॥८३॥ साकरेचीं नारळें केळीं । परी तीं साकरत्वा नाहीं मुकलीं । तेवीं कारणांचीं कार्यें झालीं । असतां संचलीं कारणत्वें ॥८४॥ जेवीं कां पृथ्वीचा मृत्पिंड । मृत्पिंडीं अनेक भांड । होतां गाडगीं उदंड । मृत्तिका अखंड सर्वांमाजीं ॥८५॥ तेवीं कारणीं कार्यविशेषु । कार्यासी कारणत्वें प्रकाशु । हा परस्परानुप्रवेशु । अनन्य बिलासु अखंडत्वें ॥८६॥ एक कार्य आणि कारण । होय भिन्न आणि अभिन्न । तेणें तत्त्वसंख्यालक्षण । घडे जाण न्यूनाधिक ॥८७॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

पौर्वापर्यमतोऽमीषां, प्रसङस्त्रयानमभीप्सताम् । यथा विविक्तं यद्वक्रं, गृह्णिमो युक्तिसम्भवात् ॥९॥

म्यां सांगितली तैशी जाण । तत्त्वसंख्या अधिकन्यून । व्हावया हेंचि कारण । वक्त्या ची ज्ञानविवक्षा ॥८८॥ जैसें ज्यासी असे ज्ञान । जैसा ईप्सित मताभिमान । तैसतैसें तत्त्वव्याख्यान । ऋषीश्वसर जाण बोलती ॥८९॥ जो बोले ज्या मतयुक्ती । तें तें घडे त्या मतसंमतीं । हें मी जाणें सर्वज्ञ श्रीपती । यालागीं त्या युक्ती मीही मानीं ॥९०॥ जें बोलिले ऋषिजन । सव्वीस तत्त्वें विवंचून । उद्धवा तुज मी सांगेन । सावधान अवधारीं ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

अनाद्यविद्यायुक्तस्य, पुरुषस्यात्मवेदनम् । स्वतो न सम्भवादन्यस्तत्त्वज्ञो ज्ञानदो भवेत् ॥१०॥

प्रकृतिपुरुषमहत्तत्त्व येथें । अहंकार आणि महाभूतें । इंद्रियें विषयसमेतें । यें तत्त्वें निश्चितें पंचवीस ॥९२॥ येथ पुरुषाहोनिया भिन्न । जीव वेगळा करुनि जाण । तत्त्वसंख्यालक्षण । केलीं संपूर्ण सव्वीस ॥९३॥ जीवाच्या भिन्नत्वाचें कारण । अनादि अविद्येस्तव जाण । घेऊनि ठेला देहाभिमान । कर्मबंधन दृढ झालें ॥९४॥ अहंकर्तेपणाचा खटाटोप । तेणें अंगीं आदळे पुण्यपाप । विसरला निजरुप । विषयलोलुप्य वाढवितां ॥९५॥ लागलें बद्धतेचें बंधन । न करवे कर्मपाशच्छेदन । त्याच्या उद्धारालागीं जाण । ज्ञानदाता सर्वज्ञ ईश्वर ॥९६॥ गुरुद्वारा पाविजे ज्ञान । तेथें ईश्वराचा आभार कोण । येथ ईश्वरकृपेवीण । सद्गुरु जाण भेटेना ॥९७॥ झालिया सद्गुरुप्राप्ती । ईश्वरकृपेवीण न घडे भक्ती । सद्गुरु तोचि ईश्वरमूर्ती । वेदशास्त्रार्थी संमत ॥९८॥ गुरु-ईश्वरां भिन्नपण । ऐसें देखे तो नागवला आपण । एवं ईश्वरानुग्रहें जाण । ज्ञानसंपन्न होय जीवु ॥९९॥ गुरुंनीं सांगितली ज्ञानस्थिती । ते ईश्वरकृपेवीण चित्तीं । ठसावेना साधकांप्रती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१००॥ जीव नियम्य ईश्वर नियंता । जीव अज्ञान ईश्वर ज्ञानदाता । जीव परिच्छिन्न एकदेशिता । ईश्वर सर्वथा सर्वगत ॥१॥ जीव हीन दीन अज्ञान । ईश्वर समर्थ सर्वज्ञ । जीवास दृढ कर्मबंधन । ईश्वर तो जाण निष्कर्म ॥२॥ एवं ईश्वरकृपें जाण । जीवासी प्राप्त होय ज्ञान । यालागीं ईश्वराहून । जीव भिन्न या हेतू ॥३॥ म्हणशी करितां कर्माचरण । जीवासी प्राप्त होईल ज्ञान । हें सर्वथा न घडे जाण । जडत्वपण कर्मासी ॥४॥ कमा जडत्व जाण । त्यासी बहुत अज्ञान । त्या कर्मासी अत्यंत बद्धपण । हें सज्ञान जाणती ॥५॥ कर्म स्वरुपें जड अचेतन । त्यासी चेतविता ईश्वर जाण । तें न करितां ईश्वरार्पण । ज्ञानदाता कोण कर्मासी ॥६॥ कर्मासी जडत्वें नाहीं सत्ता । कर्मक्रियेचा ईश्वर ज्ञाता । ईश्वरचि कर्मफळदाता । कर्मचेतविता ईश्वरु ॥७॥ ज्ञान तोचि ईश्वर । तेणें रचिला हा विस्तार । संहारितां तोचि निर्धार । सत्तामात्र ईश्वर जाणावा ॥८॥ जीवासी ज्ञानसायुज्यता । कां स्वर्गभोगफळदाता । अथवा इहलोकीं वर्तविता । जीवासी तत्त्वतां ईश्वरु ॥९॥ यापरी अवश्य जाण । जीव ईश्वर करितां भिन्न । तत्त्वें सव्वीस संपूर्ण । बोलिले ब्राह्मण या हेतू ॥११०॥ पंचवीस तत्त्वांची कथा । ते जीवेश्वरांची ऐक्यता । तेही सांगेन मी आतां । त्यांच्या मता संमत ॥११॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

पुरुषेश्वरयोरत्र, न वैलक्षण्यमण्वपि । तदन्यकल्पनाऽपार्था, ज्ञानं च प्रकृतेर्गुणः ॥११॥

जीवेश्वरांची ऐक्यता । सहजचि असे स्वभावतां । तेथ अणुमात्र भेदवार्ता । न रिघे सर्वथा निश्चित ॥१२॥ स्वभावें पाहतां दर्पण । एकाचें देखिजे दोन्हीपण । परी द्विधा नव्हेचि आपण । यापरी जाण जीवशिव ॥१३॥ अज्ञानप्रतिबिंब तें जीव । त्याचा द्रष्टा तो सदाशिव । तरी ऐक्यतेचें जें वैभव । तो निजस्वभाव मोडेना ॥१४॥ जेवीं दर्पणामाजीं आपण । तेवीं जीवरुपें शिवुचि जाण । दोनी चेतनत्वें समान । तेंही लक्षण अवधारीं ॥१५॥ जैशी चेष्टा कीजे आपण । तेचि प्रतिबिंबीं दिसे जाण । तेवीं ईश्वरसत्ता सचेतन । गमनागमन जीवासी ॥१६॥ जेणें स्वरुपें असे आपण । तद्रूप प्रतिबिंबीं दिसे जाण । तेवीं ईश्वरत्व संपूर्ण । असे अविच्छिन्न जीवामाजीं ॥१७॥ जैसा अग्नि राखां झांकोळिला । तरी अग्नि अग्निपणें असे संचला । तेवीं शिवासी जीवभावो आला । परी नाहीं मुकला निजत्वा ॥१८॥ आशंका ॥ "हो कां जीव शिव दोनी एक । तरी एक मलिन एक चोख । तैसे सदोख आणि निर्दोख । हे विशेख कां दिसती" ॥१९॥ थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । त्या प्रतिबिंबाअंगीं सर्वथा । थिल्लरींचे मळ पाहतां । दिसती तत्त्वतां लागलेसे ॥१२०॥ तेचि निर्वाळूनि पाहतां वेगीं । बिंबप्रतिबिंबनियोगीं । सर्वथा मळ न लगे अंगीं । उभयभागीं विशुद्ध ॥२१॥ आरशाअंगीं टिकले मळ । सुबद्ध बैसले बहुकाळ । ते प्रतिबिंबाअंगीं केवळ । दिसती प्रबळ जडलेसे ॥२२॥ तो मळ जैं पडे फेडावा । तैं आरिसा साहणे तोडावा । परी प्रतिबिंब केव्हां । साहणे धरावा हें बोलूं नये ॥२३॥ तेवीं सदोष आणि निर्दोष । केवळ अविद्याचि हे देख । जीव शिव उभयतां चोख । नित्य निर्दोख निजरुपें ॥२४॥ पाहतां शुद्धत्वें स्फटिक जैसा । जे रंगीं ठेवावा दिसे त्याऐसा । स्वयें अलिप्त जैसातैसा । जीव स्वभावतां तैसाचि ॥२५॥ जीव स्वयें चित्स्वरुप । जे गुणीं मिळे दिसे तद्रूप । परी गुणदोष पुण्यपाप । जीवासी अल्प लागेना ॥२६॥ प्रत्यक्ष प्रतिबिंबीं मिथ्यता । दिसे निजबिंबाचिया सत्ता । तेवीं जीवशिवांसी अभिन्नता । जाण तत्त्वतां निश्चित ॥२७॥ जीवशिवांचें एकमण । तेणें सव्विसांमाजीं जाण । एक तत्त्व होतां न्यून । शेष तेंचि पूर्ण पंचवीस ॥२८॥ आशंका ॥ "जीवशिवांचें एकपण । ऐसें जें जाणणें तें ’ज्ञान’ । तें एक तत्त्व येथें आन । त्यांमाजीं जाण उपजलें ॥२९॥ तें ज्ञानतत्त्व अंगीकारितां । पंचवीस सव्वीस तत्त्वकथा । दोनी मतें होती वृथा " । ऐसें सर्वथा न म्हणावें ॥१३०॥ येथ मूळींचें निरुपण । श्लोकाचे अंतींचा चरण । ज्ञान तें प्रकृतीचा गुण । त्यासी वेगळेपण असेना ॥३१॥ गुण कर्मांच्या खटपटा । प्रपंच अज्ञानें अतिलाठा । ज्ञान अज्ञानाचा सत्त्ववांटा । जेवीं कांटेनि कांटा फेडिजे ॥३२॥ शोधित जो सत्त्वगुण । त्या नांव बोलिजे मुख्य ’ज्ञान’ । तेंही गुणांमाजीं पडे जाण । वेगळेंपण नव्हेचि तत्त्व ॥३३॥ ज्ञान स्वतंत्र तत्त्व होतें । तरी नासतीं दोनी मतें । तें पडे गुणाआंतौतें । यालागीं दोनी मतें निर्दुष्ट ॥३४॥ तेचि त्रिगुणांची व्यवस्था । तुज मी सांगेन आतां । ऐक उद्धवा तत्त्वतां । गुण सर्वथा आविद्यक ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

प्रकृतिर्गुणसाम्यं वै, प्रकृतेर्नात्मनो गुणाः । सत्त्वं रजस्तम इति स्थित्युत्पत्त्यन्तहेतवः ॥१२॥

उत्पत्तिस्थितिनिर्दळण । हें त्रिगुणांचें कार्य पूर्ण । ’गुणसाम्य’ ते प्रकृति जाण । आत्मा ’निर्गुण’ गुणातीत ॥३६॥ म्हणशी परमात्मा गुणातीत । परी जीवात्मा गुणग्रस्त । हेही गा मिथ्या मात । ऐक वृत्तांत सांगेन ॥३७॥ चंद्र निश्चळ निजस्वभावें । तो चाले त्या अभ्रासवें । दिसे जेवीं सवेग धांवे । तेवीं गुणस्वभावें जीवात्मा ॥३८॥ घटामाजीं उदक भरितां । घटाकाश भिजेना सर्वथा । तेवीं जीवात्मा गुणीं वर्ततां । अलिप्तता गुणकर्मी ॥३९॥ जीव अहंकर्तेपणीं विख्यात । तो केवीं म्हणावा कर्मातीत । येचि अर्थी कृष्णनाथ । विशदार्थ सांगत ॥१४०॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

सत्त्वं ज्ञानं रजः कर्म, तमोऽज्ञानमिहोच्यते । गुणव्यतिकरः कालः, स्वभावः सूत्रमेव च ॥१३॥

सत्त्वगुणास्तव ’ज्ञान’ । रजोगुणें ’कर्म’ जाण । मोह आलस्ययुक्त गहन । तमीं ’अज्ञान’ नांदत ॥४१॥ सत्त्वादि जे तिन्ही गुण । केवळ प्रकृतीचे हे जाण । यांसी स्वतंत्रपण । नव्हेचि जाण या हेतू ॥४२॥ गुणक्षोभक ’काळ’ देख । तो पुरुषाचा अवलोक । पुरुष काळ हा नामविशेख । स्वरुपें एक हे दोन्ही ॥४३॥ स्वाभाविक मायेचें स्फुरण । प्रथम कार्य जें निर्माण । त्या नांव ’महत्तत्त्व’ जाण । ’सूत्र’ ’प्रधान’ ज्यासी म्हणती ॥४४॥ यालागीं प्रकृतीहूनि भिन्न । यासी न ये वेगळेंपण । हे प्रकृति कार्यकारणीं अभिन्न । तत्त्वविचक्षण मानिती ॥४५॥ अठ्ठावीस तत्त्वें पूर्वोक्त । हें भगवंताचें निज मत । तेंचि अडीचा श्लोकीं सांगत । संख्यातत्त्वार्थ निजबोधें ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ व १५ वा

पुरुषः प्रकृतिव्यक्तमहङकारो नभोऽनिलः । ज्योतिरापः क्षितिरिति, तत्त्वान्युक्तानि मे नव ॥१४॥

श्रोत्रं त्वग्दर्शनं घ्राणो, जिव्हेति ज्ञानशक्तयः । वाक्पाण्युपस्थपाय्वङ्‌घ्रिः, कर्माण्यंगोमयं मनः ॥१५॥

प्रकृति पुरुष महत्तत्त्व । महाभूतें अहंभावं । अठ्ठाविसांत हीं तत्त्वें नव । इतर वैभव तें ऐक ॥४७॥ मुख्य ’ज्ञानेंद्रियें’ पांच जाण । पांच ’कर्मेंद्रियें’ आन । ज्ञानेंद्रियें ज्ञानेंद्रियांआधीन । स्वतां गमन त्यां नाहीं ॥४८॥ आंधळें पायीं चालों जाणे । पांगुळ केवळ देखणें । अंधें पंगू खांदीं घेणें । परी बोलें वर्तणें देखण्याचेनि ॥४९॥ तेवीं ज्ञानेंद्रियां कर्मेंद्रियांसी । संगती घडली असे तैशी । यालागीं मुख्यत्वें ज्ञानेंद्रियांसी । हृषीकेशी बोलिला ॥१५०॥ उभय इंद्रियां चाळक । तें मनचि गा एकलें एक । येणेंचि अकरा इंद्रियें देख । यदुनायक सांगत ॥५१॥ इंद्रियविषयनिरुपण । स्वयें सांगताहे नारायण । मुख्यत्वें विषय पांच जाण । तयाचें साधन गत्यादिक ॥५२॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

शब्दः स्पर्शो रसो गन्धो, रुपं चेत्यर्थजातयः । गत्युक्त्युशत्सर्गाशिल्पानि, कर्मायतनसिद्धयः ॥१६॥

रसस्पर्शादि लक्षण । पांचही विषय हे जाण । गत्यादि क्रियाचरण । तें जाण साधन या विषयांचें ॥५३॥ दृष्टि रुपातें प्रकाशी । चरण धांवती तयापाशीं । हस्त उद्यत घ्यावयासी । रसस्पर्शसिद्धीसी विषयांचे ॥५४॥ एवं उभय इंद्रियीं जाण । विषय पांचचि प्रमाण । नव्हे अधिक तत्त्व गणन । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥५५॥ नव एकादश तत्त्वलक्षण । मागां दों श्लोकीं केलें निरुपण । येणें श्लोकें परम प्रमाण । विषय जाण पांचचि ॥५६॥ केवळ ज्ञानेंद्रियीं भोगु नव्हे । कर्मेंद्रियींही भोग न फावे । उभयसंयोगें भोग पावे । परी विषय आघवे पांचचि ॥५७॥ इंहीं पांच विषयीं आपण । व्यापिलें चतुर्दश भुवन । सुरासुर भुलविले जाण । यांचें गोडपण मारक ॥५८॥ जेवीं कां मैंद गोडपणें । संगतीं लागोनि जीव घेणें । तेवीं विषयसंगाचें साजणें । बांधोनि नेणें नरकासी ॥५९॥ नरकीं निरय भोगिती । तेथही न सोडी विषयासक्ती । या विषयांऐसा विश्वासघाती । आन त्रिजगतीं असेना ॥१६०॥ ते हे पंच विषय प्रमाण । पांचचि परी अतिदारुण । ब्रह्मादिक नाडले जाण । इतरांच कोण पडिपाडु ॥६१॥ विषयांचें जें गोडपण । तें विखाहूनि दारुण । विष एकदां आणी मरण । पुनः पुनः मारण विषयांचें ॥६२॥ पुढती जन्म पुढती मरण । हें विषयास्तव घडे जाण । संसाराचें सबळपण । विषयाधीन उद्धवा ॥६३॥ जेथ विषयांचा विषयत्यागु । तेथें उन्मळे भवरोगु । त्याचा आंदणा मी श्रीरंगु । ज्यासी विषयभोगु नावडे ॥६४॥ ते हे पंच विषय गा जाण । तुज म्यां केले निरुपण । आतां त्रिगुणांचें लक्षण । ऐक सावधान सांगतों ॥६५॥ उत्पत्तिस्थितिनिर्दळण । त्रिगुणांस्तव घडे जाण । यालागीं स्वयें श्रीकृष्ण । तिन्ही गुण अंगीकारी ॥६६॥ अंगीकारुनि तिन्ही गुण । अठ्ठावीस तत्त्वें केलीं पूर्ण । हें कृष्णसंमत लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥६७॥ त्रिगुणगुणेंवीण प्रकृती । सृष्टिसर्जनीं नाहीं शक्ती । गुणद्वारा उत्पत्तिस्थिती । संहारी अंतीं स्वकार्यें ॥६८॥ तेचि अर्थीचें निरुपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । कार्यकारणलक्षण । यथार्थ जाण विभाग ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

सर्गादौ प्रकृतिर्ह्यस्य कार्यकारणरुपिणी । सत्त्वादिभिर्गुणैर्धत्ते, पुरुषोऽव्यक्त ईक्षते ॥१७॥

प्रकृतीपासाव विकारमेळा । त्रिगुणांचिया गुणलीळा । सात कारणें, कार्यें सोळा । ऐक वेगळा विभाग ॥१७०॥ महदहंकारमहाभूतें । सातही ’कारणें’ निश्चितें । अकरा इंद्रियें विषययुक्तें । जाणावीं येथें ’कार्यें’ सोळा ॥७१॥ यापरी निजप्रकृती । रजोगुणातें धरोनि हातीं । कार्यकारणांचिया युक्तीं । करी उत्पत्ती सृष्टीची ॥७२॥ सृजिलिये सृष्टीसी जाण । सत्त्वगुणें करी पालन । तमोगुण निर्दळण । प्रकृति आपण स्वयें करी ॥७३॥ पुरुषें न करितां ’ईक्षण’ । उत्पत्ति स्थिति निर्दळण । प्रकृतीचेनि नव्हे जाण । तेंही उपलक्षण अवधारीं ॥७४॥ हात पाय न लावितां जाण । केवळ कूर्मीचें अवलोकन । करी पिलियांचें पालन । तैसें ईक्षण पुरुषाचें ॥७५॥ कां सूर्याचिया निजकिरणीं । जेवीं अग्नीतें स्त्रवे मणी । तेणें स्वधर्मकर्में ब्राह्मणीं । कीजे यज्ञाचरणीं महायागु ॥७६॥ तैसें हें जाण चिन्ह । येणें होय कार्य कारण । चाले स्वधर्मआचरण । यापरी जाण उद्धवा ॥७७॥ ऐसें चालतां प्रकृतिपर । ब्राह्मण करिती स्वाचार । तेणें वृद्धि कर्माचार । परापर उद्धवा ॥७८॥ तेवीं पुरुषाचें ईक्षण । प्रकृति लाहोनि आपण । उत्पत्तिस्थिति-निर्दळण । करावया पूर्ण सामर्थ्य पावे ॥७९॥ छायामंडपींचें विचित्र सैन्य । दिसावया दीपचि करण । तेवीं प्रकृतिकार्यासी जाण । केवळ ईक्षण पुरुषाचें ॥१८०॥ जगाचें आदिकारण । प्रकृति होय गा आपण । प्रकृति प्रकाशी पुरुष जाण । तो महाकारण या हेतु ॥८१॥ प्रकृति व्यक्त, पुरुष अव्यक्त । हे विकारी, तो विकाररहित । हे गुणमयी गुणभरित । तो गुणातीत निजांगें ॥८२॥ प्रकृति स्वभावें चंचळ । पुरुष अव्ययत्वें अचळ । प्रकृति बद्धत्वें शबळ । पुरुष केवळ बंधातीत ॥८३॥ प्रकृति स्वभावें सदा शून्य । पुरुष केवळ चैतन्यघन । प्रकृतीस होय अवसान । पुरुष तो जाण अनंत ॥८४॥ प्रकृति केवळ निरानंद । यालागीं तेथ विषयच्छंद । पुरुष पूर्ण परमानंद । विषयकंदच्छेदक ॥८५॥ प्रकृतिपुरुषांचें वेगळेंपण । तुज म्यां सांगितलें संपूर्ण । हेचि परमार्थाची निजखूण । पुरुष तो भिन्न प्रकृतीसी ॥८६॥ तेंचि जाणावया विशद । नाना मतांचे मतवाद । त्या मतांचा मतप्रबोध । तुज मी शुद्ध सांगेन ॥८७॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

व्यक्तादयो विकुर्वाणा, धातवः पुरुषेक्षया । लब्दवीर्याः सृजन्त्यण्डं संहताः प्रकृतेर्बलात् ॥१८॥

पुरुषेक्षण झालिया प्राप्त । महदहंकारादि पदार्थ । प्रकृतिबळें समस्त । एकत्र होत ब्रह्मांडें ॥८८॥ पुरुषावलोकें वीर्यप्राप्ती । लाहोनि ब्रह्मांडांतें धरिती । यालागीं यातें ’धातु’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८९॥ हें सामान्यतां निरुपण । तुज म्यां सांगितलें आपण । जे नाना मतवादी जाण । विशेष लक्षण बोलती ॥१९०॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

सप्तैव धातव इति, तत्रार्थाः पञ्च खादयः । ज्ञानमात्मोभयाधारस्ततो देहेन्द्रियासवः ॥१९॥

पंचवीस सव्वीस तत्त्वगणन । मागां सांगितलें निरुपण । आतां साता तत्त्वांचें लक्षण । ऐक सुलक्षण सांगेन ॥९१॥ महाभूतें जीव शिव । हा सातां तत्त्वांचा जाण भाव । प्राणेंद्रियसमुदाव । याचिपासाव पैं होत ॥९२॥ महाभूतें अचेतन । यांसी चेतविता जीव जाण । त्याचाही द्रष्टा परिपूर्ण । ईश्वर जाण सातवा ॥९३॥ माया महत्तत्त्व अहं जें येथ । हें सूक्ष्मकारणें निश्चित । यांपासोनि स्थूळ भूतें होत । कारणें कार्यांत सबाह्य ॥९४॥ मनइंद्रियादि जें कां येथें । तेंही यांत अंतर्भूतें । एवं जाण येणें मतें । पांच महाभूतें नेमिलीं ॥९५॥ यांसी चेतविता जीव । सर्वनियंता सदाशिव । एवं सप्ततत्त्वसमुदाव । तो हा उगव उद्धवा ॥९६॥ आतां सहा तत्त्वें ये पक्षीं जाण । तुज मी सांगेन निरुपण । जें बोलिले ऋषिजन । तें विवंचन अवधारीं ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक २० व २१ वा

षडित्यत्रापि भूतानि, पञ्च षष्ठः परः पुमान् । तैर्युक्ताआत्मसम्भूतैः, सष्टेववं समुपाविशत् ॥२०॥

चत्वार्येवेति तत्रापि, तेज आपोऽन्नमात्मनः । जातानि तैरिदं जातं, जन्मावयविनः खलु ॥२१॥

पाहें पां पंच महाभूतें । पुरुषें सृजिलिया येथें । स्वयें प्रवेशला तेथें । यालागीं त्यातें ’षट्‌’ म्हणती ॥९८॥ ज्यांचेनि मतें तत्त्वें चारी । तयांची ऐक नवलपरी । जो देखे प्रत्यक्षाकारीं । तोचि धरी तत्त्वार्थ ॥९९॥ प्रत्यक्ष देखिजेती नयनीं । अग्नि आप आणि अवनी । तींचि सत्यत्वें मानी । मतज्ञानी मतवादी ॥२००॥ या स्थूळातें चेतविता । तो आत्मा घेतला चौथा । या तिहींवीण साकारता । न घडे सर्वथा सृष्टीसी ॥१॥ नाम रुप क्रिया कारण । सृष्टीसी मुख्यत्वें यांचेनि जाण । यालागीं भूतें तीनचि प्रमाण । बोलतें लक्षण तें ऐसें ॥२॥ एवं भूतें तीन, आत्मा चौथा । हे चौं तत्त्वांची व्यवस्था । आतां सतरा तत्त्वांची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ व २३ वा

संख्याने सप्तदशके, भूतमात्रेन्द्रियाणि च । पञ्चपञ्चैकमनसा, आत्मा सप्तदशः स्मृतः ॥२२॥

तद्वत् षोडशसंख्याने आत्मैव मन उच्यते । भूतेन्द्रियाणि पञ्चैव मन आत्मा त्रयोदश ॥२३॥

पंच विषय पंच भूतें । पांच इंद्रियें घेतलीं येथें । मन आत्मा मेळवूनि तेथें । केलीं निश्चितें सतरा हीं ॥३॥ यापरी तूं गा जाण । सोळा तत्त्वांचें निरुपण । तेथेंचि त्रयोदशलक्षण । स्वयें नारायण सांगत ॥४॥ सतरा तत्त्वांचें निरुपण । तुज सांगीतलें संपूर्ण । त्यांत मन आत्मा एक जाण । तेंही लक्षण अवधारीं ॥५॥ जेवीं कां कथा सांगतां आपण । स्वभावें हात हाले जाण । तेवीं मनाचें चंचळपण । स्वभावें जाण होतसे ॥६॥ राजा सिंहासनीं बैसला । तो राजत्वें पूज्य झाला । वसंत खेळतां धांविन्नला । तरी काय मुकला राज्यपदा ॥७॥ जेवीं काळें क्षोभला अतिथोर । तरी तो बोलिजे सागर । कां निश्चळ राहिलिया नीर । तरी समुद्र समुद्रत्वें ॥८॥ तेवीं मनपणें अतिचंचळ । कां आत्मत्वें निजनिश्चळ । दोहींपरी अविकळ । जाण केवळ परमात्मा ॥९॥ यालागीं मनाचें जें मनपण । आत्मसाक्षात्कारेंवीण । कोणासी न कळेचि गा जाण । हें मुख्य लक्षण मनाचें ॥२१०॥ मनआत्म्यांचें उभयऐक्य । तेंचि सतरांमाजीं उणें एक । उरलीं तीं आवश्यक । सोळा हीं देख निजतत्त्वें ॥११॥ पांच इंद्रियें पंच महाभूतें । अकरावें मन ठेवूनि तेथें । जीव शिव दोनी घेऊनि येथें । केलीं निश्चितें तेराचि ॥१२॥ आणिकही नाना तत्त्वमतें । मागां पुशिलीं तुवां मातें । तींही सांगेन मी तूतें । सुनिश्चितें उद्धवा ॥१३॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ व २३ वा

संख्याने सप्तदशके, भूतमात्रेन्द्रियाणि च । पञ्चपञ्चैकमनसा, आत्मा सप्तदशः स्मृतः ॥२२॥

तद्वत् षोडशसंख्याने आत्मैव मन उच्यते । भूतेन्द्रियाणि पञ्चैव मन आत्मा त्रयोदश ॥२३॥

पंच विषय पंच भूतें । पांच इंद्रियें घेतलीं येथें । मन आत्मा मेळवूनि तेथें । केलीं निश्चितें सतरा हीं ॥३॥ यापरी तूं गा जाण । सोळा तत्त्वांचें निरुपण । तेथेंचि त्रयोदशलक्षण । स्वयें नारायण सांगत ॥४॥ सतरा तत्त्वांचें निरुपण । तुज सांगीतलें संपूर्ण । त्यांत मन आत्मा एक जाण । तेंही लक्षण अवधारीं ॥५॥ जेवीं कां कथा सांगतां आपण । स्वभावें हात हाले जाण । तेवीं मनाचें चंचळपण । स्वभावें जाण होतसे ॥६॥ राजा सिंहासनीं बैसला । तो राजत्वें पूज्य झाला । वसंत खेळतां धांविन्नला । तरी काय मुकला राज्यपदा ॥७॥ जेवीं काळें क्षोभला अतिथोर । तरी तो बोलिजे सागर । कां निश्चळ राहिलिया नीर । तरी समुद्र समुद्रत्वें ॥८॥ तेवीं मनपणें अतिचंचळ । कां आत्मत्वें निजनिश्चळ । दोहींपरी अविकळ । जाण केवळ परमात्मा ॥९॥ यालागीं मनाचें जें मनपण । आत्मसाक्षात्कारेंवीण । कोणासी न कळेचि गा जाण । हें मुख्य लक्षण मनाचें ॥२१०॥ मनआत्म्यांचें उभयऐक्य । तेंचि सतरांमाजीं उणें एक । उरलीं तीं आवश्यक । सोळा हीं देख निजतत्त्वें ॥११॥ पांच इंद्रियें पंच महाभूतें । अकरावें मन ठेवूनि तेथें । जीव शिव दोनी घेऊनि येथें । केलीं निश्चितें तेराचि ॥१२॥ आणिकही नाना तत्त्वमतें । मागां पुशिलीं तुवां मातें । तींही सांगेन मी तूतें । सुनिश्चितें उद्धवा ॥१३॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

एकादशत्वमात्माऽसौ महाभूतेन्द्रियाणि च । अष्टौ प्रकृतयश्चैव पुरुषश्च नवेत्यथ ॥२४॥

अकरा तत्त्वें बोलिलीं येथें । पांच इंद्रियें पंच महाभूतें । जीव शिव आणि मनातें । एकत्वें येथें गणिलीं देख ॥१४॥ दृति मृदु आणि पिंवळा । एकत्वें जेवीं चांपेकळा । सुवास सुस्वाद सुनीळा । एकत्र मेळा आम्रफळीं ॥१५॥ तेवीं जीव शिव आणि मन । तिन्ही एकरुपचि जाण । जेवीं हे ममणी संपूर्ण । हेमसूत्रीं सज्ञान ओंविती ॥१६॥ पंच इंद्रियें पंच महाभूतें । जीव शिव मन एकात्मते । एकादश तत्त्वें येथें । जाण निश्चितें या हेतू ॥१७॥ प्रकृति पुरुष महदहंकार । पंच महाभूतें अविकार । सकळ विकारसंभार । यामाजीं साचार अंतर्भूत ॥१८॥ एवं ऋषीश्वरांच्या व्युत्पत्ती । तत्त्वविवक्षा उपपत्ती । नव तत्त्वसंख्यायुक्ती । जाण या रीतीं उद्धवा ॥१९॥ एक बोलती निजज्ञानी । प्रकृति पुरुष तत्त्वें दोनी । आन पाहतां जनींवनीं । तिसरें नयनीं दिसेना ॥२२०॥ जे निश्चयें अतिनिष्टंक । ते म्हणती तत्त्व एक । एक तेंचि अनेक । अनेकीं एक निश्चित ॥२१॥ जेवीं सुवर्णाचें भूषण । भूषणीं स्वयें सुवर्ण । तेवीं अनेकीं एकपण । एकत्वें जाण निश्चित ॥२२॥ जेवीं उंसाची निजगोडी । गूळसाकरेच्या मोडी । तेचि दिसे चढोवढी । तेवीं तत्त्वपरवडी निजतत्त्वें ॥२३॥ त्या जाणावया निजतत्त्वातें । ऋषीश्वरांचीं बहुत मतें । मी स्वल्पचि बोलिलों येथें । येरवीं अगणितें ग्रंथांतरीं ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

इति नाना प्रसंख्यानं तत्त्वानामृषिभिः कृतम् । सर्वं न्याय्यं युक्तिमत्त्वाद्विदुषां किमशोभनम् ॥२५॥

येथ सर्वज्ञ ज्ञाते होती । ते नाना मतें तत्त्वयुक्ती । विवंचोनियां उपपत्ती । विभागूं जाणती यथार्थें ॥२५॥ निजतत्त्व जाणावया जाण । करितां तत्त्वविवंचन । सर्वथा न लगे दूषण । तत्त्वें अधिकन्यून बोलतां ॥२६॥ वस्तुतां विकारांच्या ठायीं । ज्ञात्यासी बोलावया विशेष नाहीं । विकार ते प्रकृतीच्या ठायीं । आत्मा शुद्ध पाहीं अविकारी ॥२७॥ प्रकृतीहूनि आत्मा भिन्न । यालागीं तो अविकारी जाण । विकार प्रकृतीमाजीं पूर्ण । हें मुख्य लक्षण तत्त्वांचें ॥२८॥ प्रकृतीहूनि वेगळेपण । पुरुषांचें जाणावया आपण । यालागीं उद्धवा जाण । तत्त्वविवंचन साधावें ॥२९॥ हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धव चमत्कारला जाण । प्रकृतिपुरुषांचें भिन्नपण । देवासी आपण पुसों पां ॥२३०॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

उद्धव उवाच - प्रकृतिः पुरुषश्चोभौ यद्यप्यात्माविलक्षणौ । अन्योन्यापाश्रयात्कृष्ण दृश्यते न भिदा तयोः । प्रकृतौ लक्ष्यते ह्यात्मा प्रकृतिश्च तथात्मनि ॥२६॥

प्रकृति पुरुष भिन्नभिन्न । येचि अर्थीं उद्धवें जाण । साडेतीन श्र्लोकीं अगाध प्रश्न । देवासी आपण पुसत ॥३१॥ प्रकृतीहूनि पुरुष भिन्न । हें ऐकोनि देवाचें वचन । प्रकृतिपुरुषांवेगळा श्रीकृष्ण । हा द्रष्टा संपूर्ण दोहींचा ॥३२॥ म्हणे ऐक श्रीकृष्णा श्रेष्ठा । हे प्रकृतिपुरुषांची चेष्टा । तूं वेगळेपणें देखणा द्रष्टा । सुरवरिष्ठा श्रीपती ।३३॥ प्रकृति पुरुष दोनी भिन्न । एक जड एक चेतन । हें मजही कळतसे जाण । परी वेगळेपण लक्षेना ॥३४॥ जैसा तप्तलोहाचा गोळ । दिसे अग्नीचि केवळ । तेवीं प्रकृतिपुरुषांचा मेळ । दिसे सबळ एकत्वें ॥३५॥ जेवीं बीज धरोनियां पोटेंसीं । निकणू कोंडा वाढे कणेंसीं । तेवीं प्रकृति जाण पुरुषेंसीं । अभिन्नतेसीं जडलीसे ॥३६॥ कां नारळ चोख धरोनि पोटीं । निरस कठिण वाढे नरोटी । तेवीं पुरुषयोगें प्रकृति लाठी । झाली सृष्टी अनिवार ॥३७॥ कणावेगळा कोंडा न वाढे । तेवीं पुरुषावेगळी प्रकृति नातुडे । हें प्रकृतिपुरुषांचें बिरडें । तुजवेगळें निवाडें निवडेना ॥३८॥ जेवीं कां शिंपीचे अंगीं । जडली रुपेपणाची झगी । तेवीं पुरुषाच्या संयोगीं । प्रकृति जगीं भासत ॥३९॥ तीक्ष्ण रविकरसंबंधीं । भासे मृगजळाची महानदी । तेवीं पुरुषाच्या संबंधीं । प्रकृति त्रिशुद्धी आभासे ॥२४०॥ जेवीं कां नभीं नीलिमा । वेगळी न दिसे सांडूनि व्योमा । तेवीं प्रकृति-पुरुषोत्तमां । वेगळीक आम्हां दिसेना ॥४१॥ मुख्य देहाचें जें देहपण । तेंचि प्रकृतीचें बाधकत्व जाण । या देहाहोनियां भिन्न । पुरुषाचें भान दिसेना ॥४२॥ अहंप्रत्ययें आत्मा म्हणती । तेही देहाकारें स्फुरे स्फूर्ती । देहावेगळी आत्मप्रतीती । न दिसे निश्चितीं गोविंदा ॥४३॥ डोळा सांडूनि दृष्टि उरे । वातीवेगळा दीप थारे । तैं देहावेगळा आत्मा स्फुरे । साचोकारें गोविंदा ॥४४॥ जिव्हेवीण रसस्वादू । श्रोत्रेंवीण ऐकवे शब्दू । तैं देहावेगळा आत्मबोधू । होय विशदू गोविंदा ॥४५॥ कांटेवीण फणस आतुडे । कां सोपटेंवीण ऊंस वाढे । तैं देहावेगळा आत्मा जोडे । वाडेंकोडें गोविंदा ॥४६॥ तुम्हींच सांगीतली निजात्मखूण । नरदेह ब्रह्मप्राप्तीचें कारण । शेखीं देहावेगळें आत्मदर्शन । केवीं आपण प्रतिपादां ॥४७॥ आणि आत्मावेगळी प्रकृती । सर्व प्रकारें न ये व्यक्ती । रुपावेगळी छाया केउती । कैशा रीतीं आभासे ॥४८॥ गोडीवेगळी साकर होये । परिमळावेगळा कापूर राहे । तैं आत्म्यावेगळी पाहें । प्रकृति लाहे अभिव्यक्ती ॥४९॥ गगनावेगळा घट राहे । तंतूवेगळा पट होये । तैं आत्म्यावेगळी पाहें । प्रकृति लाहे अभिव्यक्ती ॥२५०॥ गोडीवेगळा वाढें ऊंस । कणेंवीण जैं वाढे भूस । तैं आत्म्यावेगळी रुपस । माया सावकाश व्यक्तीसी ये ॥५१॥ प्रकृतिलक्षणीं आत्मा लक्षिजे । आत्मेनि प्रकृतीसी प्रकाशिजे । अनादि दोनी इये योग जे । वेगळा लाहिजे बोध केवीं ॥५२॥ प्रकृतीहुनि आत्मा भिन्न । सर्वथा आम्हां न दिसे जाण । येचि अर्थींची विनवण । उद्धव आपण करीतसे ॥५३॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

एवं मे पुण्डरीकाक्ष महान्तं संशयं हृदि । छेत्तुमर्हसि सर्वज्ञ वचोभिर्नयनैपुणैः ॥२७॥

कमलनाभा कमलानना । कमलालया कमलधारणा । कमलिनीवासस्थाना । कमलनयना श्रीकृष्णा ॥५४॥ प्रकृतिपुरुषयोग अवघड । योग्यां न कळे भिन्न निवाड । या संशयाचें अतिजाड । हृदयीं झाड वाढलें ॥५५॥ हृदयीं संदेहाचीं मूळें । प्रकृतिभूमीं विकल्पजळें । संशयवृक्ष तेणें बळें । वाढला अहंफळें सदा फळित ॥५६॥ ज्या वृक्षाचीं सदा फळें खातां । जीव न राहे सर्वथा । तेणें संशयाची अधिकता । उसंतू चित्ता पैं नाहीं ॥५७॥ ऐशिया वृक्षाचें छेदन । कृपेनें करावें आपण । सोडूनि ज्ञानतिखवाग्बाण । करीं निर्दळण निजांगें ॥५८॥ योगयागशास्त्रपाठें । करितां धर्मकर्मकचाटें । या वृक्षाचें पानही न तुटे । हें कठिणत्व मोठें गोविंदा ॥५९॥ या वृक्षाचें करितां छेदन । ब्रह्मा झाला संदेहापन्न । तुवां हंसगीत सांगोन । उद्धरिला जाण सुपुत्र ॥२६०॥ मुख्य ब्रह्म्याची ऐशी अवस्था । तेथ इतरांची कोण कथा । या वृक्षाचा छेदिता । तुजवीण सर्वथा आन नाहीं ॥६१॥ छेद करितां वरिवरी । वासना मुळ्या उरल्या उरी । फांफाईल चौगुण्यापरी । अतिशयें भारी बांबळे ॥६२॥ याचा समूळ मूळेंसीं कंदू । छेदिता छेदक तूं गोविंदू । तुजवेगळा संशयच्छेदू । भलता प्रबुद्धू करुं न शके ॥६३॥ म्हणशी संशय हृदयाच्या ठायीं । तेथ शस्त्रांचा रिगमू नाहीं । म्यां छेदावें कैसें कायी । ते अर्थीचे मी पाहीं सांगेन ॥६४॥ तुझें ज्ञानचक्र अलोलिक । तुझेनि शब्दतेजें अतितिख । समूळ संशयाचें छेदक । तुझें वचन एक गोविंदा ॥६५॥ ऐसें तुझें ज्ञानवचन । तुवां केलिया कृपावलोकन । समूळ संशयाचें निर्दळण । सहजेंचि जाण होताहे ॥६६॥ तरी तुवां श्रीमुकुंदा । फेडावी माझी संशयबाधा । तया उद्धवाचिया शब्दा । गोपीराद्धा सांगेन म्हणे ॥६७॥ असतां बहुसाल सज्ञान । सकळ संशयांचें निर्दळण । मीचि कर्ता हें काय कारण । तेंही लक्षण अवधारीं ॥६८॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

त्वत्तो ज्ञानं हि जीवानां प्रमोषस्तेऽत्र शक्तितः । त्वमेव ह्यात्ममायाया गतिं वेत्थ न चापरः ॥२८॥

अतर्क्य तुझी मायाशक्ती । त्या आवरुनि आनंदस्फूर्ती । दृढ लावूनि विषयासक्ती । तेणें जीव होती अज्ञान ॥६९॥ करितां विषयांचें ध्यान । जीव होय मनाअधीन । त्यास मन करी हीनदीन । अतिकृपण जड मूढ ॥२७०॥ ऐसे केवळ जीव जे अज्ञान । ते तुझ्या कृपाकटाक्षें जाण । झाले गा ज्ञानसंपन्न । हे कृपा पूर्ण पैं तुझी ॥७१॥ तुझी कृपा झालिया परिपूर्ण । करुनि मायेचें निर्दळण । जीव होती ब्रह्म पूर्ण । तुझेनि जाण श्रीकृष्णा ॥७२॥ म्हणशी माझे गांठीं जाण । नाहीं ज्ञान ना अज्ञान । तरी तूं ज्ञानदाता आपण । झालासी पूर्ण तें ऐक ॥७३॥ धातासवितासनत्कुमारांसी । नारदप्रर्हा दअंबरीषांसी । कालीं उपदेशिलें अर्जुनासी । ऐसा तूं होसी ज्ञानदाता ॥७४॥ म्हणसी बहुत असती सज्ञान । त्यांसी पुसोनि साधावें ज्ञान । तुजवेगळें मायेचें नियमन । त्यांचेनि जाण कदा नोहे ॥७५॥ मायेची उत्पत्तिस्थिती । मायानिर्दळणी गती । तूं एक जाणता त्रिजगतीं । यालागीं श्रीपती कृपा करीं ॥७६॥ यापरी उद्धवें विनंती । करुनि प्रार्थिला श्रीपती । तो प्रकृतिपुरुषविभाग युक्तीं । उद्धवाप्रती सांगेल ॥७७॥ जेवीं सूर्यापाशीं मृगजळ । कां गगनीं उपजे आभाळ । काचभूमिके दिसे जळ । तैशी प्रकृति सबळ पुरुषापाशीं ॥७८॥यापरी स्वयें श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुषनिरुपण । समूळ सांगताहे आपण । तो म्हणे सावधान उद्धवा ॥७९॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

श्रीभगवानुवाच- प्रकृतिः पुरुषश्चेति विकल्पः पुरुषर्षभ । एष वैकारिकः सर्गो गुणव्यतिकरात्मकः ॥२९॥

प्रकृति पुरुष हे दोनी । सदा अत्यंत वेगळेपणीं । जैसा दिवस आणि रजनी । एक लोपोनी एक प्रबळे ॥२८०॥ दिवस लोपतांचि जाण । अंधकारेंसीं परिपूर्ण । घेऊनियां ताराग्रहगण । रात्री आपण उल्हासे ॥८१॥ तेवीं लोपतां पुरुषाचें भान । घेऊनि कार्येंसीं कारणगुण । ज्ञानाज्ञानेंसीं परिपूर्ण । प्रकृति जाण थोरावे ॥८२॥ येथ मुख्यत्वें जो देहाकार । तेंचि प्रकृतीचें दुर्ग थोर । तेथें ठेविला ठाणेदार । देहअहंकार महायोद्धा ॥८३॥ जो जिवलग विश्वासाचा । प्रकृतीस विश्वास त्याचा । तो नेटका झुंझार दुर्गींचा । भरभारु तेथींचा तो वाहे ॥८४॥ तेथ अभिमानें आपण । प्रकृतीस निर्भय देऊनि जाण । घालूनि सामग्री विकारभरण । दुर्ग दारुण बळकाविलें ॥८५॥ ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । निजप्रकृतीचिया निष्ठा । देहदुर्गी अभिमान लाठा । जाहला वरिष्ठा या हेतू ॥८६॥ देहदुर्गीं गुण अहंकार । दुर्गसामग्रीविकार । अवघी प्रकृतीच साचार । तदाकार भासत ॥८७॥ गगनीं गंधर्वनगर जाण । माडया गोपुरें वन उपवन । तैशी प्रकृति आपण । नानाकारें जाण भासत ॥८८॥ जैशी मृगजळाची सरिता । दुरोनि दिसे प्रवाहतां । तेवीं प्रकृतीची सर्वथा । नानाकारता आभासे ॥८९॥ ऐसें प्रकृतिदुर्ग महाथोर । तेथें नाना सामग्रीविकार । जे जे घाली अहंकार । ते ऐक साचार सांगेन ॥२९०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

ममाङग माया गुणमय्यनेकधा विकल्पबुद्धिश्च गुणैर्विधत्ते । वैकारिकस्त्रिविधोऽध्यात्ममेकमथाधिदैवमधिभूतमन्यत् ॥३०॥

माझी माया गा आपण । सर्वांगें जाहली तिनी गुण । तेही अभिमानें आपण । निजसत्ता जाण आवरिले ॥९१॥ तेचि देहदुर्गाभंवतीं जाण । त्रिगुणांचें आगड पूर्ण । तेथें मांडूनि त्रिपुटीविंदाण । मारा दारुण अभिमान करी ॥९२॥ त्या दुर्गाचें दृढ रक्षण । मुख्यत्वें त्रिपुटीचि जाण । ते त्रिपुटीचें मूळ लक्षण । तुज मी आपण सांगेन ॥९३॥ अगा उद्धवा बुद्धिमंता । तुज मी सांगेन ऐक आतां । तेथ असती तिनी वाटा । दोनी अव्हाटा एकी नीट ॥९४॥ त्या मार्गीची उभारणी । सैन्य रचिलें दाही आरणीं । युद्धकार जो निर्वाणीं । तो तेथूनी निरीक्षी ॥९५॥ तेही मार्ग धरिले चौपाशीं । राखण बैसले तिनी वाटेशीं । तेथ रिघावया सायासीं । ज्ञानियासी काय काज ॥९६॥ आतां असो इतुली परी । देहदुर्गाची थोर भरोभरी । म्हणे ऐकें गा यया थोरी । उद्धवातें हरी सांगत ॥९७॥ कार्य कारण कर्तव्यता । कर्म क्रिया अहंकर्ता । ध्येय ध्यान विषयध्याता । दुर्ग सर्वथा दृढ केलें ॥९८॥ तेथ भोग्य भोग भोक्ता । कर्म कार्य आणि कर्ता । अभिमान जाहला वसता । प्रकृतिसंमतासंयोगें ॥९९॥ तेथ चोरद्वाराचिया लक्षीं । उघडूनि कामक्रोधखिडकी । घाला घालितां एकाएकीं । सकळ लोकीं कांपिजे ॥३००॥ त्यांचा घेऊनिया भेदरा । तापस पळाले सैरा । लंगोटी सांडिल्याही दिगंबरा । क्रोध थरथरा कांपवी ॥१॥ लोभयंत्राचे कडाडे । तमधूम दाटे चहुंकडे । महामोहाचें गडद पडे । मागेंपुढें दिसेना ॥२॥ दुर्गासभोंवतीं नवद्वारें । नवद्वारीं नवही यंत्रें । तेणें तेणें यंत्रद्वारें । विषय महामारें मारिती ॥३॥ देहाभिमानाचें चाळक । मुख्यत्वें मनचि एक । तें दुर्धर महामारक । दुर्गअटक तेणें केलें ॥४॥ माळ चढोनि अवचट । पारके रिघती घडघडाट । ते दशमद्वाराची वाट । देऊनि कपाट दृढ बुजिलें ॥५॥ यापरी स्वयें मन । दुर्ग पन्नासी आपण । त्यासी सबाह्य राखण । घरटी जाण स्वयें करी ॥६॥ धरोनि कामाचा हात । मन रिगे पारक्यांत । मुख्य धुरांसी लोळवीत । इतरांचा तेथ कोण पाडू ॥७॥ ऐसें मनाचें मारकपण । अनिवार अतिकठिण । त्रिविधतापें खोंचूनि जन । हुंबत जाण पाडिले ॥८॥ देवांपासूनि आधिदैविक । मानस ताप आध्यात्मिक । भूतांपासाव तो भौतिक । या नांव देख त्रिविध ताप ॥९॥ सत्त्वगुणें देख अंतःकरण । रजोगुणें इंद्रियें जाण । महाभूतें विषयभान । तमोगुणें जाण प्रसवत ॥३१०॥ त्रिविध विकारीं विकारबहुळ । ते हे प्रकृतीच येथें केवळ । हेचि दुर्गसामग्री प्रबळ । प्रपंच सबळ येणें जाहला ॥११॥ संकल्पमहापर्जन्योदकीं । वासनाजीवनें भरलीं टांकीं । तेणें जीवनें दुर्गाच्या लोकीं । संसारसुखदुःखीं विचरिजे ॥१२॥ दुर्गनवद्वारीं समस्तें । आधिदैव आणि आधिभूतें । अध्यात्म तें कोण येथें । ऐक निश्चितें सांगेन ॥१३॥ कोण द्वारीं कोण यंत्र । कोण चेतविता कैसें सूत्र । कैसा होतसे विषयमार । तोही निर्धार तूं ऐक ॥१४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

दृग्रूपमार्कं वपुरत्र रन्ध्रे परस्परं सिध्यति यः स्वतः खे । आत्मा यदेषामपरो य आद्यः स्वयाऽनुभूत्याऽखिलसिद्धसिद्धिः ॥३१॥

चक्षु इंद्रिय यंत्र थोर । तेथ कामिनीरुपाचा महामार । घायें भेदिती जिव्हार । पडले सुरनर कोट्यनुकोटी ॥१५॥ चक्षुगोल इंद्रिय शरीरीं । तेथ अधिदेव सूर्य अधिष्ठात्री । देखिल्या रुपाची धारणा धरी । तेंचि निजनिर्धारीं अध्यात्म ॥१६॥ नीलपीतरुपाभरण । दृष्टीं देखिजे दर्शन । तेंचि अधिभूत सत्य जाण । दृश्याचें भान दृष्टीसी ॥१७॥ सूर्य अधिदैव सिद्ध आहे । अधिभूत दृष्टी भरलें पाहें । शरीरीं चक्षुगोळही होये । परी अध्यात्मतेजेंवीण राहे अंधत्व ॥१८॥ अधिदैव अधिभूत असतां पाहीं । अध्यात्म तेज जंव दृष्टीसी नाहीं । तंव देखणें न घडे कांहीं । अंधत्व ते ठायीं ठसावोनि ठाके ॥१९॥ अध्यात्म अधिभूत दोनी आहे । जैं अधिदैव सूर्य अस्ता जाये । तैं दृष्टीचें देखणें ठाये । स्तब्धत्वें राहे तमामाजीं ॥३२०॥ ते काळीं दृष्टीसी पाहें । स्नेहसूत्र मेळवून लाहे । अग्नि जरी केला साह्ये । तरी प्रकाशू नोहे रवीऐसा ॥२१॥ तेथ चंद्रोदयो जरी जाहला । तो सूर्यसमान नाहीं आला । निशा निरसूनि दृष्टीं साह्य जाहला । यालागीं सूर्य बोलिला अधिदैव ॥२२॥ अध्यात्म अधिभूत असतां पाहीं । अधिदैव सूर्य जेथ नाहीं । तेथ दृष्टीचें न चले काहीं । तुज म्यां तेंही सांगीतलें ॥२३॥ अध्यात्म अधिदैव दोनी आहे । अधिभूतें दृश्यदर्शन राहे । तैं सत्य ब्रह्मज्ञान होये । जैं गुरुकृपा पाहे पूर्णांशें ॥२४॥ येथ जें दृश्याचें दर्शन । तेणें देहबुद्धि दृढ जाण । तें दृश्याचें पुशिल्या भान । होय देहेंशीं शून्य संसार ॥२५॥ अधिदैव अध्यात्म अधिभूत । त्रिपुटी बोलिजे हे येथ । तुज म्यां सांगीतली साद्यंत । जाण निश्चित विभाग ॥२६॥ येथूनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । कर्म कर्ता क्रियाचरण । ध्येय ध्यान ध्यातृत्व ॥२७॥ त्रिपुटी म्हणावयाचें कारण । परस्परें सापेक्षपण । तें अपेक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥२८॥ नानाकारें अतिविलास । येथ देखणी दृष्टी डोळस । तेही सूर्येंवीण वोस । हा अनुप्रवेश परस्परें ॥२९॥ सूर्य आहे डोळा नाहीं । तेथ पाहणें न चले पाहीं । हो कां डोळा आहे सूर्य नाहीं । तेथें दृष्टीचें कांहीं चालेना ॥३३०॥ सूर्य आणि दृष्टी दोनी आहे । परी दृश्य जैं नाहीं होये । तैं दोहींचें सामर्थ्य राहे । देखावें काये दृष्टीनें ॥३१॥ सूर्य प्रकाशी रुपासी । दृष्टीसी रिघोनियां स्वांशेंसीं । दाखवी नाना आकारांसी । परस्परानुप्रवेशीं बोलिजे सिद्धी ॥३२॥ इतुकें करोनियां सविता । नभोमंडळीं अलिप्तता । तेवीं जगदाकारें चेतविता । अलिप्त तत्त्वतां चिदात्मा ॥३३॥ जो जगामाजीं भरला राहे । जगाचा हृदयस्थही होये । जग जरी होये जाये । परी तो आहे जैसातैसा ॥३४॥ जेवीं आकाशअभ्यंतरीं । होतां घटाकाश सहस्त्रवरी । आकाश त्या घटाभीतरीं । प्रत्यक्षाकारीं भरलें दिसे ॥३५॥ ते घटचि होती जाती । परी आकाश सहजस्थिती । तेवीं उत्पत्तिस्थितिअंतीं । अलिप्त श्रीपती चिदात्मा ॥३६॥ तो आदीची अनादि आदि । तो बुद्धीची अनादि बुद्धी । तो सिद्धीची अनादि सिद्धी । जाण त्रिशुद्धी परमात्मा ॥३७॥ हा प्रकाशा प्रकाशक । अर्काचाही आदि अर्क । स्वयें त्रिपुटीचा द्योतक । अलिप्त एक परमात्मा ॥३८॥ हा विवेकाचाही विवेक । हा सुखाचा सुखदायक । बुद्धीचा जो बोधक । प्रकाशा प्रकाशक परमात्मा ॥३९॥ त्यासी जाणों जातां जाणपणें । वेदांसी जाहलें लाजिरवाणें । वेडावलीं स्मृतिपुराणें । न कळे शास्त्रपठणें भांडतां ॥३४०॥ देवो देवी आणि देवता । भोग्य भोग आणि भोक्ता । नाना त्रिपुटींची त्रिगुणता । जाण सर्वथा प्रकृतीचि हे ॥४१॥ हा आद्य अव्यक्त अतर्क्य । प्रकृतिपर परमात्मा एक । यासी जाणावया विवेक । न चले देख आणिकांचा ॥४२॥ याचेनि हा हृदयीं देखिजे । याचेनि हा इत्यंभूत जाणिजे । यातें धरोनि हा पाविजे । हेंही लाहिजे कृपें याचेनी ॥४३॥ हा स्वप्रकाश सहज निजें । यासी प्रकाशी ऐसें नाहीं दुजें । याचेनि प्रकाशें हा देखिजे । याचेनि होइजे याऐसें ॥४४॥ अधिदैव अध्यात्म अधिभूत । नेत्रद्वारा सांगितलें तेथ । तैसेंच अन्य इंद्रियीं व्यावृत्त । देव सांगत संकलितें ॥४५॥ एवं त्वगादि श्रवणादि चक्षुर्जिह्वादि नासादि च चित्तयुक्तम्‌ ॥३१॥ योऽसौ गुणक्षोभकृतो विकारः प्रधानमूलान्महतः प्रसूतः ॥ प्रधानापासाव महदादिद्वारा । नाना विकारांचा पसारा । गुणक्षोभें क्षोभूनि पुरा । उठिला उभारा त्रिपुटीरुपें ॥४६॥ जेवीं सूर्यें चक्षुरादि विंदान । तैसेंचि श्रोत्र त्वचा रसना घ्राण । हें ज्ञानेंद्रियपंचक जाण । याचें कर्म समान त्रिपुटीरुपें ॥४७॥ येथ कर्मेंद्रियें पांच आन । तीं ज्ञानेंद्रियां अधीन । हस्त पाद गुद शिश्न । वाचा जाण पांचवी ॥४८॥ त्यांसी ज्ञानेंद्रियें प्रेरिती । तैं कर्मेंद्रियें कर्मीं वर्तती । एवं उभयपंचकस्थिती । जाण निश्चितीं दशेंद्रियें ॥४९॥ चित्तचतुष्टयचमत्कार । मन बुद्धि चित्त अहंकार । हीं एकचि परी भिन्न प्रकार । जैसा व्यापार तैसें नांव ॥३५०॥ केवळ देहाकारें मीपण । तो सबळ अहंकार जाण । संकल्पविकल्प जे गहन । तेंचि मन उद्धवा ॥५१॥ गतभोगाचें जें चिंतन । तें चित्ताचें लक्षण । केवळ निश्चयात्मक जाण । बुद्धि संपूर्ण ती नांव ॥५२॥ हें गुणक्षोभाचें लक्षण । भोगसाधनें भोग्य जाण । त्याहूनि भोक्ता तो भिन्न । तेंही उपलक्षण अवधारीं ॥५३॥ त्वगिंद्रियीं विषयस्पर्शन । तेथें अधिदैव वायू जाण । त्याहूनि परमात्मा भिन्न । चित्स्वरुपें जाण अविकारी ॥५४॥ गंधविषयो घाणेंद्रियें । तेथ अधिदैव अश्विनौदेव होये । आत्मा त्याहूनि वेगळा पाहें । चित्स्वरुपें राहे अविकारी ॥५५॥ रसनेंद्रिय अतिगहन । रसविषयो तेथील जाण । वरुण अधिदैवत आपण । आत्मा स्वानंदपूर्ण रसातीत ॥५६॥ श्रवणेंद्रियीं विषयो शब्द । तेथ दिशा अधिदैव प्रसिद्ध । शब्दीं निजात्मा निःशब्द । चिदत्वें शुद्ध अविकारी ॥५७॥ चक्षुरिंद्रियलक्षण । पूर्वीं निरुपिलें जाण । हें ज्ञानेंद्रियविंदान । त्रिपुटी संपूर्ण ऐशा रीतीं ॥५८॥ चित्त इंद्रिय जें कां येथ । चिंतन विषयो त्यासी प्राप्त । वासुदेव अधिदैवत । आत्मा अलिप्त चित्तेंसीं ॥५९॥ मनेंद्रिय अतिचपळ । संकल्प विषयो त्याचा प्रबळ । तेथ अधिदैव चंद्र निर्मळ । आत्मा केवळ मनातीत ॥३६०॥ अहंकार इंद्रिय कठिण । तेथील विषयो मीपण । रुद्र अधिदैवत जाण । परमात्मा भिन्न अहंकारेंसीं ॥६१॥ बुद्धींद्रिय अतिसज्ञान । बोद्धव्य तेथींचा विषयो जाण । ब्रह्मा अधिदैवत आपण । आत्मा चिद्धन बुद्धयतीत ॥६२॥ चित्तचतुष्टय सकारण । त्रिपुटी सांगितली हे संपूर्ण जाण । आतां कर्मेंद्रियांचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥६३॥ वागिंद्रियीं वाच्य विषयो । अग्नि अधिदैवत तेथील पहा हो । तेथ सरस्वतीशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो महामौनें ॥६४॥ पाणींद्रियीं ग्रहण विषयो । इंद्र अधिदैवत तेथील पहा हो । तेथ क्रियाशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो अक्रियत्वें ॥६५॥ पादेंद्रियीं गति विषयो । तेथें उपेंद्र अधिदैवो । तेथें गमनशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो निश्चलत्वें ॥६६॥ गुदेंद्रियीं विसर्ग विषयो । निऋति आधिदैवत तेथील पहा हो । क्षरशक्तीचा तेथ निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो अक्षरत्वें ॥६७॥ शिश्नेंद्रियीं रति विषयो । प्रजापति तेथें अधिदैवो । आनंदशक्तीचा तेथें निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो परमानंदें ॥६८॥ ज्ञानकर्मेंद्रियें कर्माचरण । चित्तचतुष्टयाचें लक्षण । हें गुणक्षोभाचें कारण । समूळ जाण मायिक ॥६९॥ तेंचि गुणक्षोभाचें प्रधान मूळ । प्रकृतिविकारें होय स्थूळ । आत्मा अविकारी निर्मळ । अलिप्त केवळ प्रकृतीसी ॥३७०॥ जेवीं वृत्तिभूमीसमवेत । गृहीं गृहसामग्री समस्त । अभिमानें उपार्जी गृहस्थ । परी तो त्याअतीत आपण जैसा ॥७१॥ तेवीं त्रिगुणक्षोभें अभिमान । वाढवी नाना विकारवन । आत्मा वसंत तो भिन्न । तेंचि निरुपण हरि बोले ॥७२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

अहं त्रिवृन्मोहविकल्पहेतुर्वैकारिकस्तामस ऐन्द्रियश्च ॥३२॥ आत्मा परिज्ञानमयो विवादो ह्यस्तीति नास्तीति भिदाऽर्थनिष्ठः ।

अहंअध्यासें संसारप्राप्ती । जीवासी लागली निश्चितीं । त्या अहंकाराचे निवृत्तीं । भवनिर्मुक्ती जीवासी ॥७३॥ ऐसा बाधकत्वें दुर्धर । कैंचा उठिला अहंकार । हाही पुसों पाहसी विचार । ऐक साचार सांगेन ॥७४॥ स्वस्वरुपातें विसरुन । दृढ जें स्फुरे मीपण । तोचि अहंकार जाण । विकारें त्रिगुणक्षोभक ॥७५॥ जागृतीचा जो विसरु । तोचि स्वप्नसृष्टीचा विस्तारु । वस्तुविमुख जो अहंकारु । तोचि संसारु त्रिगुणात्मक ॥७६॥ विकारें क्षोभती तिन्ही गुण । हें विस्मरण मोहाचें लक्षण । तेणें विकारले तीन गुण । ते विभाग भिन्न अवधारीं ॥७७॥ मूळीं बोलिला वैकारिक । तो अहंकार जाण सात्त्विकू । तो चित्तचतुष्टयद्योतूक । होय प्रकाशकू अधिदैवें ॥७८॥ सत्त्वापासोनि उपजे मन । मनापासाव विकार गहन । यालागीं वैकारिक जाण । सत्त्वगुण बोलिजे ॥७९॥ ज्ञान कर्म उभय पंचक । हा इंद्रियांचा दशक । जाहला रजोगुण द्योतक । यालागीं ऐंद्रियक म्हणिपे त्यासी ॥३८०॥ तामस गुण जो कां येथें । आकाशादि पंचीकृतें । आवरणरुपें महाभूतें । विषयसमवेतें उपजवी ॥८१॥ महाभूतें विषयपंचक । झाला तमोगुण प्रकाशक । यालागीं भूतादि देख । यासी आवश्यक बोलिजे ॥८२॥ एवं त्रिगुणगुणविकारें । काम्यकर्मसंस्कारें । सबळ होऊनि अहंकारें । संसारीं संचरे नाना हेतु ॥८३॥ या प्रकृतिविकारांपासून । आत्मा अतिशयें भिन्न । जेवीं मृगजळातें भरुन । अलिप्त भानू नभामाजीं ॥८४॥ जैसा प्रकाशोनि सर्पाकार । सर्पासी नातळे स्वयें दोर । तेवीं प्रकाशोनि संसार । निःसंग निर्विकार निजात्मा ॥८५॥ जेवीं कृष्ण पीत रक्त श्वेत । स्फटिक ठेवितां तेथतेथ । जरी तदाकार भासत । तरी तो अलिप्त शुद्धत्वें ॥८६॥ तैसा गुणसंगें जीवात्मा बद्ध । दिसे तरी तो अतिशुद्ध । हा नेणोनियां निजबोध । करिती विवाद मतवादी ॥८७॥ एक म्हणती आत्मा देही । एक म्हणती तो विदेही । एक म्हणती आत्म्याच्या ठायीं । हे दोन्ही नाहीं सर्वथा ॥८८॥ एक म्हणती आत्मा सगुण । एक म्हणती तो गुणविहीन । एक म्हणती ते वेगळी खूण । सगुण निर्गुण परमात्मा ॥८९॥ एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादिती अभेद । एक म्हणती दोन्ही अबद्ध । आमुचें मत शुद्ध देहात्मवादू ॥३९०॥ एक म्हणती हें मिथ्याभूत । प्रत्यक्ष दिसताहे जो येथ । तो प्रपंच मानिती सत्य । हेंचि मत एकाचें ॥९१॥ ऐसे भेदवाद सकळ । विचारितां अज्ञानमूळ । आत्मा चिन्मात्र केवळ । भेदातें समूळ छेदक ॥९२॥ ’आत्मा परिज्ञानमय’ शुद्ध । हें श्लोकींचें मूळ पद । तेणें निरसे अज्ञानभेद । आत्मा शुद्ध बुद्ध चिदात्मा ॥९३॥ जेवीं सनक्षत्र रजनी । निवटीत प्रकटे तरणी । तेवीं सभेद कार्य निरसूनी । प्रकट चित्किरणीं चिद्भानू ॥९४॥ तेथ गुणेंसी माया उडे । भेदासहित वाद बुडे । मूळासह अज्ञान खुडे । चहूंकडे सच्चिदानंद ॥९५॥ आत्मा सच्चिदानंद पूर्ण । तेथ सकळ मिथ्या अज्ञान । तें अज्ञाननिरासीं साधन । विवेक सांख्यज्ञान व्यर्थ दिसे ॥९६॥ तेचि विषयींचें निरुपण । श्र्लोकार्धें सुलक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । साध्यसाधनविभाग ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

व्यर्थोऽपि नैवोपरमेत पुंसां मत्तः परावृत्तधियां स्वलोकात् ॥३३॥

मूळीं समूळ मिथ्या अज्ञान । अज्ञानजन्य विषयभान । तें देखोनि भुलले जन । पडिलें विस्मरण स्वस्वरुपीं ॥९८॥ मी परमात्मा हृदयस्थ सन्निधी । त्या मजपासोनि उपरमे बुद्धी । मग विषयासक्ति त्रिशुद्धी । आवडे उपाधि देह गेह दारा ॥९९॥ जें स्वस्वरुपाचें विस्मरण । तें वाढवी तीव्र विषयध्यान । तेणें जीवासी जन्ममरण । अनिवार जाण देहाभिमानें ॥४००॥ तो नासावया देहाभिमान । वैराग्ययुक्त ज्ञानध्यान । मीचि बोलिलों साधन । समूळ अज्ञानच्छेदक ॥१॥ जंववरी अंगीं देहाभिमान । तंव अवश्य पाहिजे साधन । निःशेष निरसल्या अज्ञान । वृथा साधन मीही मानीं ॥२॥ म्हणशी तें कोण पां अज्ञान । जें शुद्धासी लावी जीवपण । त्या जीवाअंगीं जन्ममरण । अनिवार जाण वाढवी ॥३॥ स्वस्वरुप विसरोनि जाण । देहीं स्फुरे जें मीपण । अत्यंत दृढतर अज्ञान । तो देहाभिमान उद्धवा ॥४॥ गौण नांव त्याचें अज्ञान । येर्हमवीं मुख्यत्वें देहाभिमान । हें ऐकोनि देवाचें वचन । दचकलें मन उद्धवाचें ॥५॥ तेचि अर्थींचा प्रश्न । देवासी पुसे आपण । कोण्या युक्तीं देहाभिमान । जन्ममरण भोगवी ॥६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

उद्धव उवाच-त्वत्तः परावृत्तधियः स्वकृतैः कर्मभिः प्रभो । उच्चावचान् यथा देहान् गृह्वन्ति विसृजन्ति च ॥३४॥

सर्वत्र सदा संमुख गगन । त्यासी कदा न घडे विमुखपण । तेवीं आत्मा सबाह्य परिपूर्ण । वृत्ति विमुख जाण होय कैसी ॥७॥ जैं जाळीं बांधवे गगन । तैं अक्रिया लागे कर्मबंधन । वंध्यागर्भ सटवे जाण । तैसें जन्ममरण मुक्तासी ॥८॥ आत्म्यावेगळें कांहीं । रितें तंव उरलें नाहीं । तरी ये देहींचा ते देहीं । गमनसिद्धी पाहीं कैसेनी ॥९॥ पृथ्वी रुसोनि वोसरां राहे । आकाश पळोनि पर्हांे जाये । तैं देहींचा देहांतरा पाहें । आत्मा लाहे संसरण ॥४१०॥ सात समुद्र गिळी मुंगी । ते आत्म उंचनीच योनी भोगी । हे अतर्क्य तर्केना मागी । भुलले योगी ये अर्थीं ॥११॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

तन्ममाख्याहि गोविन्द दुर्विभाव्यमनात्मभिः । नह्येतत्प्राशयो लोके विद्वांसः सन्ति वञ्चिताः ॥३५॥

अभिनव हे तुझी गती । सर्वथा न कळे श्रीपती । मायामोहित जे चित्तीं । त्यां तुझी स्थिती नेणवे ॥१२॥ तूं आत्मा अद्वितीय अविनाश । तेथ उत्पत्ति स्थिति विनाश । नाथिला दाविसी भवभास । हा अतर्क्य विलास तर्केना ॥१३॥ येथ वेदाची युक्ती ठेली । उपनिषदें वेडावलीं । पुराणें मुकीं झालीं । अतियत्नेंय लक्षिली न वचेचि मागी ॥१४॥ तुझे केवळ कृपेवीण । तुझें इत्यंभूत नव्हे ज्ञान । ऐसे जढ मूढ हरिकृपाहीन । त्यांसी भवबंधन तुटेना ॥१५॥ तुझे योगमायेची अतर्क्यता । ब्रह्मा भुलविला वत्सें नेतां । शिवू भुलविला मोहनी देखतां । इतरांची कथा ते कोण ॥१६॥ प्रपंचीं अथवा परमार्थी । तुझेनि चालती इंद्रियवृत्ती । यालागीं गोविंदनामाची ख्याती । त्रिजगतीं वाखाणिली ॥१७॥ सादर कृपापूर्वक आपण । माझा सांगावा अतर्क्य प्रश्न । देहीं देहांतरा संचरण । जीवास जन्ममरण तें कैसें ॥१८॥ ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । हांसिन्नला मधुसूदन । हें अवघें मायिक जाण । कल्पनाविंदान मनोमय ॥१९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

श्रीभगवानुवाच-मनः कर्ममयं नृणामिन्द्रियैः पंचभिर्युतम् । लोकाल्लोकं प्रयात्यन्य आत्मा तदनुवर्तते ॥३६॥

अकरा इंद्रियें पंच महाभूतें । हें सोळा कळांचें लिंगदेह येथें । मुख्यत्वें प्राधान्य मनाचें तेथें । नाना विषयांतें कल्पक ॥४२०॥ येथ लिंगदेह तेंचि मन । मनाआधीन इंद्रियें जाण । मनाचेनि देहासी गमन । तेथ देहाभिमान मनासवें ॥२१॥ मन ज्यातें सोडूनि जाये । तेथ अभिमान उभा न राहे । मनायोगें अभिमान पाहें । देहाचा वाहे खटाटोप ॥२२॥ जेथ विषयासक्त मन । करी शुभाशुभ कर्माचरण । तेव्हां होऊनि कर्माधीन । देही करी गमन देहांतरा ॥२३॥ आत्मा यासी अलिप्त भिन्न । परी देहासवें दावी गमन । हें अतिअतर्क्य विंदान । ऐक लक्षण तयाचें ॥२४॥ घट जेथ जेथ हिंडों वैसे । आकाश त्यासवें जात दिसे । परी ढळणें नाहीं आकाशें । आत्म्याचें तैसें गमन येथें ॥२५॥ घटामाजीं भरिजे अमृत । अथवा घालिजे खातमूत । आकाश दोहींसीं अलिप्त । तेवीं सुखदुःखातीत देहस्थ आत्मा ॥२६॥ घट घायें कीजे शतचूर । परी आकाशीं न निघे चीर । तेवीं नश्वरीं अनश्वर । जाण साचार निजात्मा ॥२७॥ घट फुटोनि जेथ नाशे । तेथ आकाश आकाशीं सहज असे । नवा घट जेथ उपजों बैसे । तों तेथ आकाशें व्यापिजे ॥२८॥ तेवीं देहाचें नश्वरपण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण । आत्म्यासी देहांतरगमन । जन्ममरण असेना ॥२९॥ देहीचें देहांतरगमन । वासनायोगें करी मन । तें मनोगमनाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥४३०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

ध्यायन्मनोऽनुविषयान् दृष्टान्वाऽनुश्रुतानथ । उद्यत्सीदत् कर्मतन्त्रं स्मृतिस्तदनुशाम्यति ॥३७॥

श्रुतदृष्टविषयांचें ध्यान । निरतंर वाढवी मन । तीव्र धारण दारुण । अन्य स्फुरण स्फुरेना ॥३१॥ आवडत्या विषयांचें ध्यान । अंतकाळीं ठसावे जाण । तेव्हां तदाकार होय मन । सर्वभावें आपण तन्निष्ठा ॥३२॥ तेव्हां भोगक्षयें जाण । मागल्या देहाचा अभिमान । सहजेंचि विसरे मन । पुढील ध्यान एकाग्रतां ॥३३॥ विषयवासनारुढ मन । निजकर्मतंत्रें जाण । देहांतरीं करी गमन । तेथ सप्राण संचरे ॥३४॥ मागील सांडिल्या देहातें । सर्वथा स्मरेना चित्तें । पुढें धरिलें आणिकातें । हेंही मनातें स्मरेना ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ व ३९ वा

विषयाभिनिवेशेन नात्मानं यत्स्मरेत्पुनः । जन्तोर्वै कस्यचिद्धेतोर्मृत्युरत्यन्तविस्मृतिः ॥३८॥

जन्म त्वात्मतया पुंसः सर्वभावेन भूरिद । विषयस्वीकृतिं प्राहुर्यथा स्वप्नमनोरथः ॥३९॥

विषयाभिनिवेशें मन । ज्या स्वरुपाचें करी ध्यान । तद्रूप होय आपण । पूर्वदेहाचें स्मरण विसरोनियां ॥३६॥ तेंचि विस्मरण कैसें । निजबालत्व प्रौढवयसें । निःशेख नाठवे मानसें । पूर्वदेह तैसें विसरोनि जाय ॥३७॥ ऐसें अत्यंत विस्मरण । त्या नांव देहाचें मरण । त्या विसरासवें जाण । चेतना सप्राण निघोनि जाये ॥३८॥ जेव्हां चेतना जाय सप्राण । तेव्हां देहासी ये प्रेतपण । त्या नांव उद्धवा मरण । जन्मकथन तें ऐक ॥३९॥ स्नेहें द्वेषें अथवा भयें । अंतकाळीं जें ध्यान राहे । पुरुष तद्रूपचि होये । जन्मही लाहे तैसेंचि ॥४४०॥ भरत करितां अनुष्ठान । अंतीं लागलें मृगाचें ध्यान । तो मृगचि झाला आपण । ध्यानानुरुपें मन जन्म पावे ॥४१॥ भयास्तव भृंगाचें ध्यान । कीटकी करितां जाण । ते तद्रुप होय आपण । ध्यानानुरुपें मन जन्म पावे ॥४२॥ द्वेषें ध्यातां श्रीकृष्णासी । तद्रूपता झाली पौण्ड्रकासी । जैसें दृढ ध्यान मानसीं । ते गति पुरुषासी त्रिशुद्धी ॥४३॥ वाढवूनियां संभ्रम । अंतकाळीं आवडे सप्रेम । जेथें ध्यान ठसावे मनोरम । तेंचि जन्म पुरुषासी ॥४४॥ मग तेणें ध्यानानुभवें । जैसा कांहीं आकारु संभवे । तेथ देहाभिमान पावे । ’हें मी आघवें’ म्हणोनी ॥४५॥ येथ मन आणि अभिमान । स्वरुप एक कार्यें भिन्न । हें चित्तचतुष्टयलक्षण । जाणती सज्ञान एकात्मता ॥४६॥ दैवयोगें त्या देहाचें । बरवें वोखटें घडे साचें । तैं अभिमान घेऊनि नाचे । जन्म पुरुषाचें या नांव ॥४७॥ परी हें देह नव्हे आन । हेंही स्मरेना तें मन । पूर्वील जो देहाभिमान । तोचि येथ जाण आरोपी ॥४८॥ येचि अर्थीचा दृष्टांत । स्वयें सांगताहे श्रीकृष्णनाथ । जेवीं स्वप्न आणि मनोरथ । विसरवित निजदेहा ॥४९॥ स्वगृहीं दरिद्री निद्रित । तो स्वप्नीं होय अमरनाथ । मग उर्वशीप्रमुख अप्सरांत । असे मिरवत ऐरावतीं ॥४५०॥ तें दरिद्रदेह माझें गेलें । हें अमरदेह प्राप्त झालें । ऐसें स्वप्नीं नाहीं आठवलें । तैसें जन्म झालें जनासी ॥५१॥ मजूर राउळींचें घृत नेतां । तो तुरुंगीं चढे मनोरथा । मन नाचूं लागे उल्हासतां । स्वकल्पिता कल्पना ॥५२॥ सबळ वारुचें उड्डाण । म्हणूनि उडूं जातां आपण । पडोनि घृतकुंभ होय भग्न । पुसती जन काय झालें ॥५३॥ बळें उडाला माझा घोडा । परी स्मरेना तो फुटला घडा । बंदीं पडला रोकडा । नेणे बापुडा मनोरथें ॥५४॥ येथवरी तीव्र जें विस्मरण । त्या नांव देहाचें मरण । अतिउद्यत जें मनाचें ध्यान । तेंचि जन्म प्राण्यासी ॥५५॥ एवं आत्म्यासी जन्ममरण । तें केवळ भ्रमाचें लक्षण । तेचि अर्थींचें निरुपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

स्वप्नं मनोरथं चेत्थं प्राक्तनं न स्मरत्यसौ । तत्र पूर्वमिवात्मानमपूर्वं चानुपश्यति ॥४०॥

स्वप्न देखत्या पुरुषासी । विसरोनि निजदेहासी । स्वप्नींच्या देहगेहांसी । साभिमानेंसीं वाढवी ॥५७॥ जागृतिदेहो राहिला तेथें । स्वप्नदेहो पावलों येथें । एवं पूर्व अपूर्व दोहींतें । न स्मरे चित्तें पुरुष जैसा ॥५८॥ जागृति आणि देखिलें स्वप्न । या दोहीं देहांसी देखता भिन्न । तेवीं जन्म आणि मरण । जीवासी जाण असेना ॥५९॥ एवं देहासी जन्म नाश । आत्मा नित्यमुक्त अविनाश । स्वप्नमनोरथविलास । तैसा बहुवस संसार ॥४६०॥ देहासी जन्म स्थिति मरण । यांसी मनचि गा कारण । मनःकल्पित संसार जाण । तेंचि श्रीकृष्ण सांगत ॥६१॥


एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा

इन्द्रियायनसृष्तयेदं त्रैविध्यं भाति वस्तुनि । बहिरन्तर्भिदाहेतुर्जनोऽसज्जनकृद्यथा ॥४१॥

मनें कल्पिली सकळ सृष्टी । मनःकृत इंद्रियकामाठी । मनें वाढविली त्रिपुटी । कर्मकसवटी विभाग ॥६२॥ अधिदेव अध्यात्म अधिभूत । हें त्रैविध्य मनःकृत । वस्तु अखंडचि तेथ । त्रिधा भासत कल्पना ॥६३॥ जैसें भांडें कुंभार करी । तेथ नभ दिसे तदाकारीं । गगन सर्वथा अविकारी । तें दिसे विकारी भांडयोगें ॥६४॥ तेवीं आत्मा अविकारी नित्य शुद्ध । तेथ मनःकल्पित त्रिविध । नानापरींच्या त्रिपुटी विविध । वाढविला भेद तो ऐक ॥६५॥ कार्य कर्म आणि कर्ता । ध्येय ध्यान आणि ध्याता । ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता । या मनःकल्पिता त्रिविध ॥६६॥ अहं कोहं सोहं भेद । त्वंपद तत्पद असिपद । सत् चित् आणि आनंद । हेही संबंध मायिक ॥६७॥ असंताचिये निवृत्ती । संतत्व प्रतिपादी वेदोक्ती । जडाचिये समाप्ती । चिदत्व बोलती वस्तूसी ॥६८॥ करितां दुःखाचा छेद । वस्तूसी म्हणती परमानंद । एवं सच्चिदानंद । जाण प्रसिद्ध मायिक ॥६९॥ असंत मिथ्या मायिक पाहीं । तैसें तत्त्व कोण ठेवी ठायीं । जडासीचि ठाव नाहीं । तेथ चिदत्व कायी संपादे ॥४७०॥ जेथ नाहीं दुःखसंबंध । तेथ कोण म्हणे आनंद । एवं वस्तूच्या ठायीं सच्चिदानंद । मायिक संबंध या हेतू ॥७१॥ जेथ जें भासे संसारभान । त्रिगुणत्रिपुटी विंदान । तें सर्व मायिक मनःकृत जाण । आत्मा तो भिन्न गुणातीत ॥७२॥ आत्मा नित्य मुक्त शुद्ध बुद्ध । तेथ भासे जो त्रिविध भेद । तो मनःकृत गुणसंबंध । जाण प्रसिद्ध मायिक ॥७३॥ पुरुष श्रोत्रिय सदाचार । त्यासी स्त्री करी व्यभिचार । तेणें दोषी म्हणती भ्रतार । तैसा भेदप्रकार आत्म्यासी ॥७४॥ जेवीं स्वप्नामाजीं नर । एकला होय संसार । तो निद्रायोगें चमत्कार । तैसा भेदप्रकार मायिक ब्रह्मीं ॥७५॥ जडाजड देहभेद । परिच्छिन्नत्वें जीवभेद । हा स्वप्नप्राय मायिक बोध । आत्मा नित्य शुद्ध अद्वितीय ॥७६॥ ऐसे मायाविभेदनिष्ठ जन । त्यांसी वैराग्यसिद्धयर्थ जाण । काळकृत जन्ममरण । तेंचि निरुपण हरि बोले ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

नित्यदा ह्यङग भूतानि भवन्ति न भवन्ति च । कालेनालक्ष्यवेगेन सूक्ष्मत्वात्तन्न दृश्यते ॥४२॥

म्हणे ऐक बापा उद्धवा । स्थावरजंगमादि देहभावा । काळाचिया काळप्रभावा । लागला नीच नवा जन्ममृत्यू ॥७८॥ अतिसूक्ष्म काळगतीसीं । काळ ग्रासीतसे जगासी । या अंगींच्या जन्ममृत्यूंसी । नेणवे जीवासी मायामोहें ॥७९॥ निजमाता बाळवयासी । प्रकटावयवीं लाडवी पुत्रासी । तेचि माता प्रौढवयसेंसी । होय त्या पुत्रासी सलज्ज ॥४८०॥ ते बाल्यावस्था काळें नेली । हे प्रौढवयसा नवी आली । यालागीं माता सलज्ज झाली । हे काळें केली घडामोडी ॥८१॥ ऐसा नित्य नाश नित्य जन्म । भूतांसी करी काळ सूक्ष्म । या जन्ममृत्यूंचें वर्म । नेणती संभ्रम भ्रांत प्राणी ॥८२॥ जो अवस्थाभाग काळें नेला । त्यासवें तो देहचि गेला । पुढें वयसा नवी पावला । तो काळें आणिला नवा देहो ॥८३॥ ऐसा संभव आणि असंभवो । नीच नवा काळकृत पहा वो । यालागीं त्रिविधविकारीं देहो । स्वयें स्वयमेवो देखिजे ॥८४॥ अतर्क्य काळाची काळगती । भूतें जन्ममृत्यु पावती । ते अलक्ष्य गतीचे अर्थी । दृष्टांत श्रीपति दावीत ॥८५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

यथाऽर्चिषां स्त्रोतसां च फलानां वा वनस्पतेः । तथैव सर्वभूतानां वयोऽवस्थादयः कृताः ॥४३॥

नित्य नूतन दीपज्वाळा । होतां जातां न दिसती डोळां । सवेग वाहतां जळकल्लोळा । यमुनाजळा न देखिजे ॥८६॥ फळ न सांडितां वृक्षदेंठ । कडवट तुरट आंबाट । तेचि गोड होय चोखट । ऐशी अतर्क्य अदृष्ट काळसत्ता ॥८७॥ तोचि काळ देहासरिया । नित्य नूतन लागला कैसा । बाल्य तारुण्य वृद्धवयसा । देहदशा पालटी ॥८८॥ मूढ कुशळ अशक्तता । अवस्था नाशीत ये अवस्था । तेथ ’मी तोचि’ हें तत्त्वतां । स्फुरे सर्वथा कैसेनी ॥८९॥ ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थीचें निरुपण । अखंड स्फूर्तीचें कारण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४९०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

सोऽयं दीपोऽर्चिषां यद्वत् स्त्रोतसां तदिदं जलम् । सोऽयं पुमानिति नृणां मृषा गीर्धीर्मृषायुषाम् ॥४४॥

दीपज्वाळा होती जाती । अग्नि जैसा पूर्वस्थिती । यालागीं तोचि दीपू म्हणती । ऐशा युक्ती उद्धवा ॥९१॥ प्रवाह वाहती कल्लोळ । परी अखंड एकचि जळ । यालागीं म्हणती सकळ । तेंचि जळ या हेतू ॥९२॥ तेवीं देहीं वयसा होती जाती । आत्मा अखंड अनुस्यूती । तोचि मी हे स्फुरे स्फूर्ती । या उपपत्ती उद्धवा ॥९३॥ म्हणसी मीपणें अहंकार रुढ । तोही अज्ञानत्वें जडमूढ । त्यासी प्रकाशक आत्मा दृढ । मीपणें अखंड वस्तुत्वें स्फुरे ॥९४॥ येथ देहासीचि जन्ममरण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण । येथ देहात्मबुद्धीचें जें मीपण । ते वाचा जाण अतिमिथ्या ॥९५॥ विषयांची विषयसिद्धी । देहीं जे कांहीं देहबुद्धी । तेही मिथ्या जाण त्रिशुद्धी । भवबंधीं स्थापक ॥९६॥ कर्मभूमीं नरदेहाऐसें । निधान लाधलें अनायासें । तेथींचेनिही आयुष्यें । जे विषयविलासें विगुंतले ॥९७॥ तो अमृत विकूनि कांजी प्याला । रत्नें देऊनि कोंडा घेतला । पर्वत फोडूनि टोळ धरिला । गज विकिला इटेसाठीं ॥९८॥ डोळे फोडोनि काजळ ल्याला । नाक कापूनि शिमगा खेळला । तैसा नरदेहा नाडला । नाश केला आयुष्याचा ॥९९॥ वेंचितां धन लक्षकोटी । आयुष्यक्षणाची नव्हे भेटी । तेंही वेंचिलें विषयासाठीं । हतायु करंटीं अतिमूढें ॥५००॥ मुख्य देहोचि काल्पनिक जाण । तेथील काल्पनिक अभिमान । तें हें देहबुद्धीचें मीपण । लावी दृढ बंधन जगासी ॥१॥ तें सांडितां देहाचें मीपण । कैंचें जन्म कैंचें मरण । तेव्हां संसारुचि नाहीं जाण । भवबंधन मग कैंचें ॥२॥ जैसा मिथ्या बागुलाचा भेवो । बाळक सत्य मानिला पहा हो । तैसा मृषा काल्पनिक देहो । सत्यत्वें पहा हो मानिला ॥३॥ मिथ्या देहो आणि देहबुद्धी । त्यासी पुढें कैसी जन्मसिद्धी । मिथ्याभूतासी नव्हे वृद्धी । तेविखींची विधि हरि बोले ॥४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

मा स्वस्य कर्मबीजेन जायते सोऽप्यंय पुमान्‌ । म्रियत वाऽमरो भ्रान्त्या यथाग्निर्दारुसंयुतः ॥४५॥

देहात्मवादें देहाभिमान । जनीं वासनाबीज गहन । तेणें स्वसंकल्पें आपण । मानी जन्ममरणं नसतेंचि ॥५॥ तेणें देहाभिमानें आपण । अहं कर्म कर्ता क्रियाचरण । निष्कर्मा कर्मबंधन । अमरा जन्ममरण आरोपी ॥६॥ थिल्लराचेनि जाहलेपणें । त्यांत सूर्याचें जन्म मानणें । थिल्लरनाशें सूर्याचें जिणें । नासलें म्हणे बाळक ॥७॥ तेवीं अजन्म्यासी जन्मकर्म । मानिती तो मायिक भ्रम । येचिविषयीं पुरुषोत्तम । दृष्टांत सुगम सांगत ॥८॥ जैसा अग्नि अजन्मा अव्यक्त । त्यासी काष्ठीं जन्मला म्हणत । दिसे काष्ठाकारें आकारवंत । काष्ठनाशें मानीत नाश त्यासी ॥९॥ येथ देहासीच जन्मनाश । आत्मा नित्य अविनाश । देहअवस्था नवविलास । स्वयें हृषीकेश सांगत ॥५१०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

निषेकगर्भजन्मानि बाल्यकौ मारयौवनम्‌ । वयोमध्यं जरा मृत्युरित्यवस्थास्तनोर्नव ॥४६॥

देहींच्या अवस्था त्या नव । ऐक तयांचाही स्वभाव । भिन्नविभागवैभव । यथागौरव सांगेन ॥११॥ पितृदेहीं पावोनि शुक्रत्व । तेथूनि जननीजठर प्राप्त । त्या नांव निषेक बोलिजेत । देहींची हे येथ प्रथमावस्था ॥१२॥ जननीजठरीं रुधिरयुक्त । मुसावोनि खोटी होत । क्षणक्षणां वृद्धि प्राप्त । गर्भ ते येथ दुजी अवस्था ॥१३॥ प्रसूतिवाताच्या आघातीं । उदराबाहेर उत्पत्ती । त्या नांव जन्म बोलती । जाण निश्चितीं तिजी अवस्था ॥१४॥ अतिशयें आवडे स्तनपान । मुख्यत्वें माताचि प्राधान्य । रुदनाचें बळ संपूर्ण । ते चौथी जाण बाल्यावस्था ॥१५॥ मळमूत्रीं लोळे अज्ञान । गूढेंद्रिय विवेकशून्य । गोड गोजिरें कलभाषण । पंचहायन बाल्यावस्था ॥१६॥ इंद्रियीं चेतना वाढत । परी पोटीं नाहीं विषयस्वार्थ । खेळावरी आसक्त चित्त । ते पांचवी येथ कुमारावस्था ॥१७॥ याउपरी तरुणपण । इंद्रियसामर्थ्य संपूर्ण । मी शहाणा मी सज्ञान । देहीं देहाभिमान मुसमुशी ॥१८॥ तेथ स्त्रीकाम आवडे चित्तीं । धनकामाची अतिप्रीती । देहगेहांची आसक्ती । नामरुपांची ख्याती लौकिकीं मिरवी ॥१९॥ श्रीमदें गर्वितमानस । स्त्रीपुत्रांचा अतिउल्हास । तृष्णा दुर्धर अतिसोस । कामक्रोधांचा बहुवस वळसा भोंवे ॥५२०॥ न साहे नोकिलेपण । ’तूं’ म्हणतां टाकी प्राण । ते सहावी अवस्था जाण । तरुणपण अनर्थ ॥२१॥ पंधरापासोनि पंचवीस । पूर्ण तरुणपणाचा पैस । तेथ नानाविकारी मानस । नांदवी सावकाश देहाभिमान ॥२२॥ चाळिसांपासोनि साठीवरी । देहीं उत्तरवयसा पुरी । झुरडी पडों लागे शरीरीं । इंद्रियशक्ति करी प्राशन काळ ॥२३॥ क्षीणपणाचा सुमुहूर्त । काळ आरंभ करी जेथ । ते हे उत्तरावस्था येथ । जाण निश्चित सातवी ॥२४॥ तिची हातधरणी जरा । कांपवीतसे सुभटां नरां । भोग न साहे शरीरा । इंद्रियव्यापाराहारासी ॥२५॥ अस्तव्यस्त केला शरीरवेश । दांताळी पाडिली वोस । भेणें पालटे केश । धाकें सीस कांपत ॥२६॥ शरीर जरा करी क्षीण । तरी विषयावस्था अतिगहन । चिंता अनिवार दारुण । तृष्णा अपूर्ण सर्वदा ॥२७॥ तेज सांडूनि जाय नयना । टाळी पडोनि ठाती काना । मुखीं लागे चोरपान्हा । तरी देहाभिमाना वाढवी ॥२८॥ जरा पावलिया निजसंधी । अनिवार येती आधिव्याधी । महामोहें व्यापिजे बुद्धी । विवेक त्रिशुद्धीं बुडाला ॥२९॥ पायां पडे वेंगडी । आधार टेंकण लांकुडी । वाचा लफलफी जडत्वें गाढी । हाले होंटाची जोडी उंदिरप्राय ॥५३०॥ डोळां चिपडीं तोंड भरे । नाकींची लोळी वोठीं उतरे । मुखीचें लाळेचिया धारें । थिबबिबिजे उरें चिकटोनी ॥३१॥ चुंबन मागेना तोंडाप्रती । ती थुंका म्हणोनि दूर पळती । उसंत नाहीं खोकल्याहातीं । श्वास कास उठती अनिवार ॥३२॥ शरीरीं थरकंप उठी । तरी देहाभिमान दृढ पोटीं । अवघ्यांतें म्हणे धाकुटीं । सांगे जुनाट गोष्टी मोठमोठया ॥३३॥ अधोवाताचें वावधान । अनिवार सुटे जाण । जीवें जितां विटंबन । हे जरा जाण आठवी अवस्था ॥३४॥ जेवीं सुईमागें दोरा जाण । तेवीं जरेसवें असे मरण । जरा शरीर पाडी क्षीण । तंव वाजे निशाण मृत्यूचें ॥३५॥ देहींच्या तुटल्या नाडी । वाचा हों लागे बोबडी । तरी देहाची धरी गोडी । अधिक आवडी स्त्रीपुत्रांची ॥३६॥ मजमागें हें अनाथें । कोण सांभाळील यांतें । पोटासी धरोनि त्यांतें । रडे बहुतें आक्रोशें ॥३७॥ द्रव्यलोभ अतिकठिण । अंतीं न वेंची आपण । दूरी करुनि इतर जन । सांगे उणखूण ठेव्याची ॥३८॥ नवल वासनाविंदान । विसरोन देहाचें स्मरण । सर्वस्वें जे धरिजे आठवण । तेंचि आपण दृढ होय ॥३९॥ या देहाची निःशेष आठवण । ते नाठवणें सवेंचि जाण । चेतनासहित जाय प्राण । या नांव मरण देहाचें ॥५४०॥ एवं गर्भादि मरणांता । या देहींच्या नव अवस्था । येथ आत्म्याची अलिप्तता । स्वभावतां देहासी ॥४१॥ देहअवस्था विकारवंता । आत्मा अलिप्त अविकारता । म्हणसी देहविकारा जडता । यासी विकारता घडे केवीं ॥४२॥ सूर्य थापटूनि जन । कदा नुठवी आपण । तो प्रकाशतांचि जाण । सहजें जन चेवती ॥४३॥ त्या जनाची कर्मकर्तव्यता । सूर्याअंगीं न लगे सर्वथा । तेवीं प्रकाशोनि विकारता । अलिप्त तत्त्वतां निजात्मा ॥४४॥ झालिया सूर्यकिरण प्राप्त । जेवीं अग्नि स्त्रवे सूर्यकांत । तेणें याग कां दाघ होत । त्या कर्मातीत सूर्य जैसा ॥४५॥ तेवीं चित्प्रकाशें मन । शुभाशुभ कर्में करी जाण । त्या मनोविकारा चिद्भान । अलिप्त जाण निजात्मा ॥४६॥ येथ मनःकृत विकार पूर्ण । मनःकृत कर्माकर्म जाण । मनःकृत जन्ममरण । स्वर्गनरकगमन मनःकृत ॥४७॥ मनःकृत लक्ष्यालक्ष्य । मनःकृत बंधमोक्ष । तेंचि निरुपण प्रत्यक्ष । श्रीकृष्ण अध्यक्ष सांगत ॥४८॥


एकनाथी भागवत - श्लोक ४७ वा

एका मनोरथमयीर्ह्यन्यस्योच्चावचास्तनूः । गुणसङगादुपादत्ते क्वचित्कश्चिज्जहाति च ॥४७॥

संसारविकाराचें भान । अभिमानयुक्त करी मन । स्वर्गनरक गमनागमन । देहाभिमान भोगवी ॥४९॥ आत्मा याहूनि सहजें भिन्न । चिन्मात्रैक चिद्धन । तेथ आतळों न शके मन । शुद्धीं अभिमान असेना ॥५५०॥ मन अभिमान प्रसवे माया । अभिमानें गुण आणिले आया । गुणीं मायिक केली काया । विकारसामग्रियासमवेत ॥५१॥ जैशी देहापाशीं छाया । तैशी स्वरुपीं मिथ्या माया । जेथ जन्ममरणेंसीं काया । रिघावया ठावो नाहीं ॥५२॥ आत्मा शुद्ध काया मलिन । काया जड आत्मा चिद्धन । अज अव्यय आत्मा परिपूर्ण । जन्ममरण देहासी ॥५३॥ तिनी गुण तिनी अवस्था । कार्य कर्म अहंकर्ता । हें देहाभिमानाचे माथां । आत्मा सर्वथा अलिप्त ॥५४॥ यापरी विकारांहून । आत्मा चिद्रूपें सहज भिन्न । म्हणशी जीवास देहाभिमान । तेंही कथन अवधारीं ॥५५॥ जीव अलिप्त मायागुणीं । ऐक सांगेन ते काहाणी । स्फटिक ठेविजे जैशा वर्णीं । तद्रूपपणीं तो भासे ॥५६॥ हो कां तद्रूपपणेंही दिसतां । स्फटिक अलिप्त निजशुद्धता । तेवीं सत्त्वादि गुणीं क्रीडतां । जीव तत्त्वतां अलिप्त ॥५७॥ स्फटिक काजळीं दिसे काळा । परी तो काळेपणावेगळा । तेवीं तमोगुणें जीवू मैळा । दिसोनि निराळा तमेंसीं ॥५८॥ स्फटिक आरक्तीं आरक्तकिळा । दिसोन आरक्ततेवेगळा ।तेवीं रजोगुणीं राजसलीळा । भोगूनि वेगळा जीवात्मा ॥५९॥ स्फटिक श्र्वेतवर्णीं दिसे श्र्वेत । परी तो श्र्वेतपणा अलिप्त । तेवीं सत्त्वीं दिसे ज्ञानवंत । गुणज्ञानातीत जीवात्मा ॥५६०॥ त्रिगुण गुणेंसीं अलिप्तता । दाविली जीवशिवांची तत्त्वतां । देहीं असोनि निःसंगता । ऐक आतां सांगेन ॥६१॥ जेवीं घटामाजील जीवन । घटीं चंद्रबिंब आणी जाण । तेवीं शुद्धासी जीवपण । देहाभिमान देहीं देखे ॥६२॥ घटनिश्चळत्वें बिंब निश्चळ । घटचंचलत्वें तें चंचळ । तेवीं देहाच्या अवस्था सकळ । मानी केवळ जीवात्मा ॥६३॥ घटीं कालविल्या अंजन । तरी तें काळें होय जीवन । परी बिंबप्रतिबिंबां जाण । काळेपण लागेना ॥६४॥ तेवीं देहाची सुखदुःखकथा । कां पापपुण्यादि जे वार्ता । नाहीं जीवशिवांच्या माथां । देह अहंता ते भोगी ॥६५॥ ये घटींचें जळ ते घटीं भरित । चंद्रबिंब असे त्याहीआंत । तेवीं या देहींचा त्या देहीं जात । जीवात्मा म्हणत या हेतू ॥६६॥ चंद्र गगनीं अलिप्त असे । तो मिथ्या प्रतिबिंबें घटीं भासे । तेवीं वस्तु वस्तुत्वें सावकाशें । जीवू हें पिसें देहात्मा ॥६७॥ त्रिगुणगुणीं गुणातीत । देही देहसंगा अलिप्त । जीव शिव दोनी येथ । तुज म्यां साद्यंत दाखविले ॥६८॥ हें नेणोनियां समस्त । देहात्मवादें जाहले भ्रांत । स्वर्गनरकादि आवर्त । योनी भोगवीत अभिमान ॥६९॥ द्विजदेह आरंभूनि येथ । परमेष्ठिदेहपर्यंत । स्वर्गसुख देहें समस्त । भोगवी निश्चित पुण्याभिमान ॥५७०॥ याहूनियां अधोमुख येथ । द्विजत्वाहूनि खालते जात । नाना दुःखयोनी भोगवित । जाण निश्चित पापाभिमान ॥७१॥ येथ पापपुण्यकर्माचरण । तें वाढविताहे जन्ममरण । यांत विरळा सभाग्य जाण । जन्ममरणच्छेदक ॥७२॥ ज्यांसी निष्काम पुण्याचिया कोडी । जिंहीं स्वधर्म जोडिला जोडी । ज्यांसी भूतदया गाढी । ज्यांची आवडी द्विजभजनीं ॥७३॥ जे अहिंसेसी अधिवास । ज्यांचें अद्वैतपर मानस । जे सारासारराजहंस । जन्ममरणांचा त्रास घेतला जिंहीं ॥७४॥ जे उपनिशदर्थचातक । जे जीवजनकाचे शोधक । जे निजात्मतत्त्वसाधक । जे विश्वासुक भावार्थी ॥७५॥ ज्यांसी संतचरणीं सद्भावो । जे गुरुवचनीं विकले पहा हो । त्यांसी देहीं विदेहभावो । मत्कृपें पहा हो पावती ॥७६॥ तेही निजबोधें देहाची बेडी । तोडूनि जन्ममरणाची कोडी । उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥ त्यांसी संसाराचे आवर्त । सर्वथा गेले न लगत । जेवीं बुडण्याचा संकेत । मृगजळाआंत असेना ॥७८॥ ऐसे प्राप्तपुरुष येथ । संसारीं नाहींत गा बहुत । हिंडतां अवघ्या जगांत । एकादा कदाचित देखिजे ॥७९॥ असो देखिल्याही त्यातें । कोण आहे ओळखतें । उद्धवा जाण निश्चितें । आत्मा येथें दिसेना ॥५८०॥ जरी निकट भेटला ज्ञाता । त्याचा देह देखिजे वर्ततां । परी भीतरील निजात्मता । न दिसे सर्वथा कोणासी ॥८१॥ आत्मा गेला आला म्हणती । शेखीं येणेंजाणें न देखती । तेच विषयींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥८२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४८ वा

आत्मनः पितृपुत्राभ्यामनुमेयौ भवाप्ययौ । न भवाप्ययवस्तूनामभिज्ञोऽद्वयलक्षणः ॥४८॥

म्हणती पित्याचा आत्मा गेला । यालागीं पितृदेह नासला । परी पैल तो आत्मा गेला । ऐसा नाहीं देखिला कोणींही ॥८३॥ म्हणती पुत्रजन्में आत्म्यासी जन्म । करितां पुत्राचें जातककर्म । देखिजे देहाचा संभ्रम । आत्मा दुर्गम दिसेना ॥८४॥ येथ आत्म्यासी येणेंजाणें । सर्वथा नाहीं पूर्णपणें । देहासीचि जन्ममरणें । येणेंजाणें दृष्टांतें ॥८५॥ प्रत्यक्ष देहासी जन्मनाश । आत्मा साक्षित्वें अविनाश । येचि अर्थी विशद विलास । स्वयें हृषीकेश सांगत ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४९ वा

तरोर्बीजविपाकाभ्यां यो विद्वान् जन्मसंयमौ । तरोर्विलक्षणो द्रष्टा एवं द्रष्टा तनोः पृथक् ॥४९॥

बीजपरिपाकें वाढले वृक्षीं । पर्वत त्या वृक्षाचा साक्षी । तो पर्वत वृक्षच्छेदनें नव्हे दुःखी । तेवीं द्रष्टा साक्षी देहाचा ॥८७॥ द्रष्टा साक्षी देहमात्रासी । ते देहधर्म न लगती द्रष्ट्यासी । तो देहीं असोनि विदेहवासी । भवबंध त्यासी स्पर्शेना ॥८८॥ हा अर्थ नेणोनि अविवेकी । अतिबद्ध जाहले ये लोकीं । तोचि अर्थ पांच श्लोकीं । श्रीकृष्ण स्वमुखीं सांगत ॥८९॥


एकनाथी भागवत - श्लोक ५० वा

प्रकृतेरेवमात्मानमविविच्याबुधः पुमान् । तत्त्वेन स्पर्शसंमूढः संसारं प्रतिपद्यते ॥५०॥

कर्माकर्मकर्तेपण । आत्म्यासी सर्वथा नाहीं जाण । येचि अर्थीचें निरुपण । मागां संपूर्ण सांगीतलें ॥५९०॥ आत्मा नातळे तिन्ही गुण । देही देहातीत जाण । प्रकृतीहून पुरुष भिन्न । हें निजात्मज्ञान जो नेणे ॥९१॥ तोचि संसाराचा आपण । घरजांवई झाला जाण । देहाभिमानासी संपूर्ण । एकात्मपण मांडिलें ॥९२॥ विषयभोग तोचि पुरुषार्थ । ऐसें मानूनियां निश्चित । शुभाशुभ कर्मी येथ । भोगवीत नाना योनी ॥९३॥ विषयभोग अभिमानें जाण । पुढती जन्म पुढती मरण । नाना योनीं आवर्तन । देहाभिमान भोगवी ॥९४॥ तें नाना योनीं गर्भदुःख । देहाभिमानें भोगिती मूर्ख । तेंचि नाना तत्त्वांचें रुपक । यदुनायक सांगत ॥९५॥


एकनाथी भागवत - श्लोक ५१ वा

सत्त्वसङगादृषीन् देवान् रजसा सुरमानुषान् । तमसा भूततिर्यक्त्वंव भ्रामितो याति कर्मभिः ॥५१॥

देहाभिमानाचिये स्थिती । त्रिगुण गुणांचीं कर्में होती । तेणें त्रिविध संसारप्राप्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥९६॥ न करितां कृष्णार्पण । सात्त्विक कर्म कीजे आपण । तेणें क्षोभें सत्त्वगुण । उत्तम देह जाण उपजवी ॥९७॥ सत्त्वाच्या अतिउत्कर्षगतीं । देवऋषि ब्रह्मऋषि होती । सत्त्वाच्या समसाम्यस्थितीं । कल्पायु जन्मती आजानुबाहो ॥९८॥ सत्त्वगुणें क्रियायुक्त । स्वर्गीं देव होती स्वर्गस्थ । भोगक्षयें अधःपात । या योनीं जनित सत्त्वगुणें ॥९९॥ आश्रयूनि राजस गुण । करितां राजस कर्माचरण । तेणें क्षोभला रजोगुण । योनि कोण उपजवी ॥६००॥ राजस कर्म ब्रह्मीं अर्पिती । ते दैत्यही भगवद्भक्त होती । जे रजउत्कर्षें भोग वांछिती । ते असुर होती महायोद्धे ॥१॥ रजोगुणें स्वकर्माचरण । तेणें कर्में जन्मती ब्राह्मण । रजतारतम्यें जाण । चारी वर्ण जन्मती ॥२॥ तामसाचे संगतीं जाण । करितां तमिष्ठ कर्माचरण । तेणें क्षोभला जो तमोगुण । तो नीच योनी दारुण उपजवी ॥३॥ भूत प्रेत पिशाचक । तिर्यग्योनि असंख्य । वृक्ष पर्वत पाषाण देख । या योनी अनेक भोगवी ॥४॥ आशंका ॥ कर्म त्रिगुणात्मक साचार । परी कर्मफळभोक्ता ईश्वर । हा वेदशास्त्रें विचार । केला निर्धार तुम्हींही ॥५॥ देहसाक्षित्वें आत्मा निराळा । ऐसा गतश्लोकीं केला निर्वाळा । जैं कर्मफळभोक्ता कर्मावेगळा । तैं कर्मफळा केवीं भोगी ॥६॥ ऐसें आशंकेचें अंतर । जाणोनियां शाङर्गधर । तोचि अथाचें उत्तर । विशद साचार सांगत ॥७॥


एकनाथी भागवत - श्लोक ५२ वा

नृत्यतो गायतः पश्यन् यथैवानुकरोति तान् । एवं बुद्धिगुणान्पश्यन्ननीहोऽप्यनुकार्यते ॥५२॥

कलाकुशल सभानायक । त्यापुढें रंग होता कौतुक । गात्या नाचत्याचे तालथाक । स्वयें देख अनुकरे ॥८॥ तेंचि अनुकार म्हणशी कैसें । प्रकृति केवळ जडांशें । जाणपण आत्म्यासी असे । येणें विन्यासें भोक्ता म्हणती ॥९॥ सभेसी बैसल्या निश्चळा । रंगींच्या अनुकरे थाकताळा । तेवीं प्रकृति पुरुष वेगळा । तो प्रकृतीची लीळा अनुकरे ॥६१०॥ आशंका ॥ प्रकृतिच्छंदें अनुकारता । गुणकर्मांचा फळभोक्ता । आत्मा झाला जैं तत्त्वतां । तैं नित्यमुक्तता भंगली ॥११॥ जो करी कर्मफळस्वादन । त्यासी लागे कर्मबंधन । कर्मास्तव जन्ममरण । आत्म्यासी जाण लागलें ॥१२॥ नित्यमुक्त अविकारी । या गोष्टी राहिल्या दूरी । आत्मा जाहला संसारी । गुणविकारीं अतिबद्ध ॥१३॥ उद्धवा तूं ऐसऐशी । आशंका झणीं धरिशी । आत्मा अलिप्त गुणकर्मांसी । दृष्टांतेंसीं हरि सांगे ॥१४॥


एकनाथी भागवत - श्लोक ५३ वा

यथाऽम्भसा प्रचलता तरवोऽपि चला इव । चक्षुषा भ्राम्यमाणेन दृश्यते भ्रमतीव भूः ॥५३॥

जेवीं गंगातीरींचा तरु । जळीं वाहतां देखे नरु । तेवीं मायागुणअनुकारु । भासे विकारु आत्मत्वीं ॥१५॥ ज्याचे डोळां भवंडी सबळ । तो भंवतां देखे भूमंडळ । तेवीं मायिक विकारमेळ । मिथ्या केवळ आत्म्यासी ॥१६॥ जो अश्वारुढ होऊनि पाहे । जळीं प्रवाहासंमुख राहे । तो देखे मी जळीं प्रवाहें । ऐसा मिथ्या होये अनुभवू ॥१७॥ तेवीं आत्मा नित्य निर्विकार । तेथ मायावी गुणसंभार । कल्पनायोगें साचार । मानिती नर मनोमय ॥१८॥ आब्रह्मस्तंबपर्यंत । नाना योनी विकारवंत । कर्म क्रिया फळभोग येथ । जाण निश्चित मनोजन्य ॥१९॥ ऐसें सांगतां हरि सांवळा । तेणें उल्हास उद्धवजीवाला । तया आनंदाच्या कल्लोळां । उद्धवचि लीला पोखित ॥६२०॥ निववावया उद्धवाचा ताप । स्वयें सांगे तो विश्वतोमुख । जेणें उद्धवां बहु हरिख । तेंचि श्रीकृष्ण देख सांगतसे ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक ५४ वा

यथा मनोरथधियो विषयानुभवो मृषा । स्वप्नदृष्टाश्च दाशार्ह तथा संसार आत्मनः ॥५४॥

आत्मा निजमुक्त अविकारी । तो संकल्पें कीजे विकारी । असंसारी परी संसारी । मनोविकारीं मानिजे ॥२२॥ ऐसें दुजयावीण कांहीं । कथा वार्ता सांगतां नाहीं । एक श्रोता दुसरा वक्त पाहीं । यालागीं येही उपाये ॥२३॥ जेवीं एकटा क्रमेना पंथ । मी राजा करी मनोरथ । परचक्र कल्पूनि तेथ । होय उद्यत युद्धासी ॥२४॥ तो युद्धआवेश कडकडाट । तेणें सत्राणें उडे उद्भट । अडखळूनि आदळे पोट । म्हणे मी घायवट पडिलों कीं ॥२५॥ मिथ्या भ्रमें पडला भुली । चालतां चालतां मृगजळीं । उतरावया पैलतीरीं । बुडी वहिली देतसे ॥२६॥ गंधर्वनगरीं प्रचंड । माडया सोपे उदंड । क्षणामाजीं विरस चंड । वितंड करी निर्वाळा ॥२७॥ तेवीं संसार हा काल्पनिक । तेथील सुख आणि दुःख । मिथ्या केवळ मायिक । जाण निष्टंक निजभक्तां ॥२८॥ दाशार्हवंशीं जन्मलासी । तूं उत्तम दशा पावलासी । यालागीं म्हणे हृषीकेशी । उद्धवासी दाशार्ह ॥२९॥ जेवीं का स्वप्नभोग जाण । स्वप्नीं सत्य मानी आपण । तेवीं संसार हा दीर्घ स्वप्न । मायिक जाण मिथ्यात्वें ॥६३०॥ जागा झालिया स्वप्न वृथा । निरहंकारीं संसार मिथ्या । हे ब्रह्मज्ञानाची मुख्य कथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥३१॥ संसार तो कल्पनामात्र । आत्मा निर्विकार चिन्मात्र । जेवीं मृगजळ भरी भास्कर । तेवीं संसार करी आत्मा ॥३२॥ उद्धवा तूं म्हणशी आतां । ऐकतां तुझे मुखींची कथा । संसार मिथ्या तत्त्वतां । तरी साधनावस्था कां सोसावी ॥३३॥ जेवीं वंध्यापुत्राचें लग्न । करावया कोणी न करी यत्नव । कां मृगजळीं बांधोनि धरण । पाट जाण कोणी काढीना ॥३४॥ तेवीं मिथ्या संसारबंधन । तेथ श्रवण मनन चिंतन । विवेक वैराग्य ज्ञान ध्यान । वृथा कां जन सोशिती ॥३५॥ उद्धवा बागुलाचें भय खोटें । परी बाळकासी सत्य वाटे । तेवीं मिथ्या संसारकचाट । जीवीं प्रकटे बद्धता ॥३६॥ तेचि अर्थीचा दृष्टांत । स्वयें श्रीकृष्ण सांगत । मिथ्या सांसारिक येथ । भ्रमें बाधीत भ्रांतासी ॥३७॥


एकनाथी भागवत - श्लोक ५५ वा

अर्थे ह्यविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते । ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥५५॥

विचारें पाहतां मिथ्या स्वप्न । तेथील विषयसेवन । सुखदुःखें बाधिती गहन । ऐक लक्षण तयाचें ॥३८॥ स्वप्नीं पुत्रलाभ राजसन्मान । तेणें सुखें ओसंडे आपण । कां झालिया धनहरण । तेणें दुखें दारुण आक्रंदे ॥३९॥ त्यासी जागें न करितां । स्वप्नसुखदुःखबाधकता । निवर्तेना सर्वथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥६४०॥ तेवीं विषयासक्त जन । ज्यांसी अखंड विषयध्यान । ज्यांचें विषयीं सदा मन । देहाभिमान गोंवीत ॥४१॥ तयांसी देखावया उपावो । जयां विषयासक्ति होय वावो । येचि अर्थींचा दृष्टांत पहा वो । स्वयें सांगे देवो उद्धवासी ॥४२॥ न करितां श्रवण मनन । न साधितां विवेकज्ञान । न धरितां वैराग्य पूर्ण । भवभय जाण तुटेना ॥४३॥ संसार मिथ्या तोंडें म्हणतां । न तुटे सुखदुःखभयव्यथा । जन्ममरणादि अवस्था । अहंममता सुटेना ॥४४॥ ऐसे जे अज्ञान जन । तिंहीं अवश्य करावें साधन । विवेकें वैराग्य धरितां पूर्ण । भवबंधन निवारे ॥४५॥ यालागीं उद्धवा जाण । सकळ साधनांचें कारण । जेणें हाता चढे ब्रह्मज्ञान । तें वैराग्य पूर्ण साधावें ॥४६॥ ऐक विरक्तीची मागी । जैशी धडधडीत आगी । तैसें वैराग्य व्हावें अंगीं । तैं प्राप्तीलागीं अधिकारु ॥४७॥ ऐसे मुमुक्षु जे पुरते । परम कृपेचेनि हातें । सद्गुरु थापटोनि ज्यांतें । करी अद्वैतें जागृत ॥४८॥ ज्यासी देहादिभेदपुष्टी । मिथ्या माया गुणत्रिपुटी । ब्रह्मानंदें कादली सृष्टी । स्वप्नवत्‌ दृष्टीं संसारु ॥४९॥ येव्हडी ही परम प्राप्ती । वैराग्यविवेकें चढे हातीं । तेंचि वैराग्य उद्धवाप्रती । स्वयें श्रीपती सांगत ॥६५०॥


एकनाथी भागवत - श्लोक ५६ वा

तस्मादुद्धव मा भुंक्ष्व विषयानसदिन्द्रियैः । आत्माग्रहणनिर्भातं पश्य वैकल्पिकं भ्रमम् ॥५६॥

विषयांची जे आसक्ती । ते बाधक परमार्थप्राप्ती । विषय सांडीं सांडीं निश्चितीं । परतोनि हातीं नातळें ॥५१॥ आसक्त वृत्ति इंद्रिययोग । अतिलोलुप्यें विषयभोग । तोचि मुख्यत्वें भवरोग । यालागीं त्याग करावा ॥५२॥ विखें रांधिलें परमान्न । तें ग्रासमात्र हरी प्राण । विष एकदां मारक जाण । विषय पुनःपुनः मारक ॥५३॥ म्हणसी प्रारब्धें भोग येती । ते त्यागिले केवीं जाती । विषयत्यागाची युक्ती । वैराग्यस्थिती घडे केवीं ॥५४॥ प्रारब्धें विषयभोग येती । ते साधका दुःखरुप होती । वणवां मृगें आहाळती । तैशी स्थिती भोगणें ॥५५॥ व्याघ्रमुखीं सांपडे गाये । तैशा भोगी चरफडीत जाये । ऐसेनि अनुतापें पाहें । वैराग्य होये अनिवार ॥५६॥ वैराग्य जाहलिया धडफुडें । सद्गुरुकृपा हाता चढे । तेणें गुरुक्रुपाउजियेडें । संसार उडे द्वंद्वेंसीं ॥५७॥ झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठसावे परब्रह्म । तेथ जन्ममरण कैंचें कर्म । भवभ्रम असेना ॥५८॥ तेथ वाती लावूनि पाहतां । संसार दिसेना मागुता । जेवीं निभ्रमें पाहों जातां । न लगे हाता रज्जुसर्प ॥५९॥ भवंडीचेनि वेगवशें । भिंगोरी नीट उभी दिसे । तेवीं भ्रमाचेनि आवेशें । संसार भासे सत्यत्वें ॥६६०॥ केवळ जो निबिड भ्रम । संसार हें त्याचें नाम । येर्हजवीं निखिल परब्रह्म । तेथ जन्मकर्म असेना ॥६१॥ ऐसें जरी झालें ब्रह्मज्ञान । तरी प्रारब्ध भोगावें गा जाण । जेवीं कुलाल भांडें ने आपण । परी चक्रभ्रमण राहेना ॥६२॥ वृक्ष समूळ उपडल्या जाण । उपडितां न वचे सार्द्रपण । तेवीं होतांचि ब्रह्मज्ञान । प्रारब्ध जाण सोडीना ॥६३॥ त्या प्रारब्धाचिये गती । विषयभोग जरी येती । तेथ उपावो न करावा निवृत्ती । निजशांती साहावें ॥६४॥ विषयभोग आलियाही जाण । निजशांति धरोनि संपूर्ण । सुखें वर्तती साधुजन । विवेकसंपन्न क्षमावंत ॥६५॥ हाता आलिया निजशांती । संसार बापुडा तो किती । तेचि शांतीची स्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥६६॥ जें निजशांतीचें कल्याण । जेणें जीव पावे समाधान । तें अतिगोड निरुपण । दों श्र्लोकीं श्रीकृष्ण सांगत ॥६७॥


एकनाथी भागवत - श्लोक ५७ वा

क्षिप्तोऽवमानितोऽसद्भिः प्रलब्धोऽसूयितोऽथवा । ताडितः सन्निबद्धो वा वृत्त्या वा परिहापितः ॥५७॥

देहाभिमानी तामस जन । अतिदुष्ट जे दुर्जन । तिंहीं साधूंसी करितां छळण । शांतीस्तव सज्जन क्रोधी नव्हती ॥६८॥ अल्पउपद्रवीं जाण । न येती क्रोधा सज्ञान । तैसें नव्हे अतिनिर्वाण । पीडा दारुण करितांही ॥६९॥ कायिक वाचिक मानसिक । त्रिविध पीडा देतां देख । साधु निजशांतीं नेटक । जाणोनि विवेक ते साहती ॥६७०॥ उजू बोलतां शुद्ध युक्ती । आक्षेपूनि हेडाविती । झिडकावूनियां निर्भर्त्सिती । अपमानिती सभेसी ॥७१॥ शब्दीं शब्दाचे करुनि छळ । म्हणती दुष्ट दुर्जन दुःशीळ । अपवित्र अमंगळ । नष्ट चांडाळ हा एक ॥७२॥ ऐशा दुर्जनांच्या दुष्टोक्ती । साधु साहे निजशांती । ते शांतीची उपपत्ती । विवेकस्थिती अवधारीं ॥७३॥ पराची जिव्हा वोठ हालती । माझ्या अंगीं ते न रुपती । यालागीं क्रोध न ये चित्तीं । निजशांती ढळेना ॥७४॥ सभेसी सन्मानें पूजितां । लोटूनि घातला खालता । हाणोनियां चरणघाता । नेला परता अपमानें ॥७५॥ सन्मानें जेथ पूजूं नेती । तेथ केवळ असे क्षिती । अपमानें जेथ लोटिती । तेथही क्षिती तेचि पैं ॥७६॥ येथ मान अपमान । कल्पना मनाची जाण । ऐसेनि विवेकें सज्जन । द्वेषीना जन निजशांती ॥७७॥ प्रलोभूनि नाना युक्ती । धनें ठकवूनियां निर्भर्त्सिती । धनलोभ केवळ अधःपाती । त्याची निवृत्ति जिंहीं केली ॥७८॥ त्यांसी निंदितांचि जाण । दोषी होइजे आपण । यालागीं क्रोधा न ये मन। शांति संपूर्ण ढळेना ॥७९॥ शुद्ध बोलती शास्त्रार्थ । अर्थ तितुका अनर्थ । त्या अनर्था जो करी निवृत्त । त्यातें द्वेषित ते मूर्ख ॥६८०॥ सद्गुणीं दोष आरोपिती । नानापरी निंदा करिती । तेणें हित मानिती चित्तीं । तारक निश्चितीं हे माझे ॥८१॥ मातेचे जे करतळ । ते वरिवरी क्षाळिती बाह्य मळ । हे जनक माझे केवळ । सबाह्य मळ सकळ जिव्हाग्रें धुती ॥८२॥ ऐशियांचें करितां छळण । हितास नाडिजे आपण । कोणाचे न बोले दोषगुण । तेणें शांति जाण थोरावे ॥८३॥ चाले जेणें जीविकास्थिती । धन्य धान्य क्षेत्र वृत्ती । छळें बळें हिरोनि नेती । तेणेंही चित्तीं क्षोभ नुपजे ॥८४॥ येथ लाभालाभ दैवाधीन । त्यासी देतेंघेतें तेंचि जाण । यालागीं द्वेषीना जन । शांतीचा गुण न सांडी ॥८५॥ वृत्ति घेऊनि उगे नसती । अन्यायी म्हणोनि बांधिती । एक तोंडावरी थुंकिती । एक माथां मुतती अतिदुष्ट ॥८६॥ एक ताडिती पाडिती । एक नानापरी गांजिती । तरी अंगींची ढळेना शांती । विवेक सांगाती सज्जना ॥८७॥ थुंका आणि जें मृत । तें देहाचिमाजीं उपजत । देहींचें देहास लागत । क्षोभ तेथ कोण मानी ॥८८॥ थुंका आणि जें मृत । जैसें देहीं उपजे देहाचें अपत्य । देहाचें देहावरी खेळत । दुःख तेथ कोणाचें ॥८९॥ धरितां मारितां म्हणे देख । देहो तितुका पांचभौतिक । मारिता मारिजता दोनी एक । कोणाचें दुःख कोणासी ॥६९०॥ ऐशी सविवेकें ज्यासी शांती । चारी मुक्ती त्याच्या दासी होती । त्याचा अंकिला मी श्रीपती । यावरी प्राप्ती ते कायी ॥९१॥ तेथ केवळ जो मोक्षार्थी । तेणें सर्वस्वें पाळावी शांती । ते दुःखसागरावर्ती । होय तारिती सुखरुप ॥९२॥ वैराग्य योग ज्ञान ध्यान । त्याचें फळ तें शांति जाण । ते शांति साधूनि संपूर्ण । आपणिया आपण उद्धरिती ॥९३॥ यालागीं उद्धवा जाण । साहोनि द्वंद्वांचें काठिण्य । शांति साधूनि संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण पावावें ॥९४॥ पूर्ण ब्रह्म पावल्यापाठीं । जन्ममरणाची खुंटे गोठी । परमानंदें पडे मिठी । भवभयाची तुटी तैं होय ॥९५॥ ऐकोनि श्रीकृष्णाचे बोला । उद्धव अत्यंत चाकाटला । द्वंद्वबाध जो ऐकिला । तो न वचे साहिला आम्हांसी ॥९६॥ ऐकिल्या नाहीं ये शांतीच्या गोष्टी । मा केवीं देखिजेल दृष्टीं । ऐशी शांति ज्याच्या पोटीं । तो पुरुष सृष्टीं नसेल ॥९७॥ मागें ऐकिली ना देखिली । ऐशी शांति त्वां कैंची काढिली । हे ऐकतां तुझी बोली । भयें दचकली बुद्धि माझी ॥९८॥ ऐशी शांति ज्यासी आहे । तो मागें झाला ना पुढें होये । देवो बोलिला निजनिर्वाहें । तें दुःसह होये आम्हांसी ॥९९॥ ज्या सांगीतलें द्वंद्वासी । तें अतिदुःसह योगियांसी । केवीं साहवे आम्हांसी । तेंचि देवासी पूसत ॥७००॥


एकनाथी भागवत - श्लोक ५८ व ५९ वा

उद्धव उवाच- यथैवमनुबुद्धयेयं वद नो वदतांवर । सुदुःसहमिमं मन्य आत्मन्यसदतिक्रमम्॥५८॥

विदुषामपि विश्वात्मन् प्रकृतिर्हि बलीयसी । ऋते त्वद्धर्मनिरताञ्छात्रांस्ते चरणालयान् ॥५९॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे भगवदुद्धवसंवादे द्वाविंशोऽध्यायः ॥२२॥ जे सांगों जाणती वेदशास्त्रार्था । ते वक्ते म्हणिपती तत्त्वतां । त्या वक्त्यां माजीं तुझी श्रेष्ठता । मुख्य वेदांचा वक्ता तूं होसी ॥१॥ शास्त्रें लाहोनि तुझी युक्ती । तुझी तुज प्रतिपादिती । ते परोक्षवादें थोंटावती । श्रुति ’नेति नेति’ परतल्या ॥२॥ त्या तुझे मुखींच्या ज्ञानोक्ती । कृपेनें ऐकोनि कृपामूर्ती । श्रवणाचें भाग्य वानूं किती । जे ऐकती ते धन्य ॥३॥ ऐसऐशिया अतियुक्तीं । उद्धवें प्रार्थिला श्रीपती । हात जोडूनि परम प्रीतीं । म्हणे विनंती अवधारीं ॥४॥ स्वामी बोलती अतिअगाध । हें बोलणें परम शुद्ध । माझे बुद्धीसी नव्हे बोध । पराचे अपराध कोण साहे ॥५॥ सोसावे पराचे अपराध । तेंही कठिणत्वें अतिविरुद्ध । हा दुःसह महाबोध । कैसेनी द्वंद्व साहवे ॥६॥ उत्तमें केलिया अपराधा । कोटींमाजीं साहे एकादा । परी नीचाची विरुद्ध बाधा । कोणीही कदा न साहे ॥७॥ ज्याचें न व्हावें दर्शन । ज्यासी करुं नये नमन । त्याचे मस्तकीं वाजतां चरण । साहेल कोण गोविंदा ॥८॥ ज्याचा निःशेष जाय प्राण । तोचि साहे हें कठिण । जो होय सचेतन । त्यासी सर्वथा जाण न साहवे ॥९॥ इतरांची कायसी कथा । सज्ञान जे कां तत्त्वतां । तेही अतिक्रमू न साहती अल्पतां । मा अपमानता कोण साहे ॥७१०॥ क्रोध जाहला कपिलमहामुनीसी । तेणें भस्म केलें सगरांसी । नारदें कुबेरपुत्रांसी । वृक्षत्वासी आणिलें ॥११॥ दुर्वासाची सांगतां गोठी । त्याची कथा आहे मोठी । कोप आला शृंगीचे पोटीं । मेल्या सर्पासाठीं शापिलें ॥१२॥ मुख्यत्वें शांति सनकादिकांसी । द्वारीं आडकाठी केली त्यांसी । वैकुंठीं क्षोभूनि आवेशीं । जयविजयांसी शापिलें ॥१३॥ सज्ञानाची ऐशी स्थिती । मा इतरांची कोण गणती । परापराधसहनशांती । दुर्लभ त्रिजगतीं गोविंदा ॥१४॥ प्रकृति निजगुणीं सबळ । ते अल्पें क्षोभवीं तत्काळ । साधु सज्जन केवळ । करी विकळ अशांती ॥१५॥ ज्यासी तुझी पूर्ण भक्ति घडे । ज्यासी तुझी पूर्ण कृपा जोडे । जो तुझे चरणीं अखंड जडे । त्यासी घडे हे शांती ॥१६॥ तूं विश्वात्मा त्रिजगतीं । चोरी न चले तुजप्रती । मज हीं द्वंद्वें न साहवती । तूंही श्रीपती जाणसी ॥१७॥ परम पावन निजशांती । अतिनिंद्य ते अशांती । ऐसें व्याख्यान जे ज्ञाते करिती । तेही न साहती द्वंद्वांतें ॥१८॥ द्वंद्वें दुःसह सर्वार्थी । तेथें माझा पाड किती । एवं द्वंद्वसहिष्णुतेची युक्ती । मज कृपामूर्ति सांगावी ॥१९॥ सकल साधनें वश्य होती । परी हे सहिष्णुता न ये चित्तीं । ते मी लाभें निजशांती । ऐशी कृपा निश्चितीं करावी ॥७२०॥ मी शांतीचें लाभें कल्याण । ऐशी कृपा करावी परिपूर्ण । म्हणोनि धरिले श्रीचरण । उद्धवें आपण निजभावें ॥२१॥ ऐकोनि उद्धवाची विनंती । संतोषला कृपामूर्ती । जेवीं चातकाचिया तृषार्ती । गर्जोनि त्रिजगती निववी मेघ ॥२२॥ तेवीं भक्तवचनासरिसा । उल्हासला कृष्ण कैसा । उद्धवाचिया निजमानसा । शांतीचा ठसा घालील ॥२३॥ उद्धवप्रश्नाचें प्रत्युत्तर । उदार सुंदर गुणगंभीर । उघडोनि शांतीचें भांडार । स्वयें शाङर्गधर सांगेल ॥२४॥ नवल सांगती ते टेव । युक्तिचातुर्यवैभव । निजशांतीस पडे खेंव । ऐसें अपूर्व सांगेल ॥२५॥ श्रीकृष्णमुखींच्या ज्ञानोक्ती । ऐकतां स्वयंभ प्रकटे शांती । ते ऐकावया उद्धव चित्तीं । जाहला निश्चितीं सावध ॥२६॥ जेवीं गजग्रहणाविखीं पंचानन । साटोप धरी आपण । तेवीं शांति साधावया जाण । सावधान उद्धव ॥२७॥ जळीं तळपतांचि मासा । कवडा झेलूनि ने आकाशा । तेवीं शांतिचिया आमिषा । उद्धव तैसा तळपत ॥२८॥ तें भिक्षुगीतनिरुपण । पुढिले अध्यायीं श्रीकृष्ण । निजशांति बाणे संपूर्ण । तेंचि लक्षण सांगेल ॥२९॥ ज्यांसी परमार्थाची चाड । तिंहीं सांडूनि साधनकवाड । शांतिसाधनीं श्रद्धा वाड । अतिदृढ राखावी ॥७३०॥ श्रीकृष्ण सांगेल शांति पूर्ण । उद्धव तया अर्थी सावधान । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥७३१॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां द्वाविंशतितमोऽध्यायः ॥२२॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]