Jump to content

एकनाथी भागवत/अध्याय चौथा

विकिस्रोत कडून

<poem> एकनाथी भागवत - आरंभ ॥श्रीगणेशाय नमः ॥श्रीकृष्णाय नमः॥

ॐ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमनें जीवत्व जीवा । नुरविसी, तेथें देहभावा । कैसेनि रिघावा होईल ॥१॥ जीवें घेउनि जीवा । देहत्व मोडूनि देहभावा । याहीवरी करविसी सेवा । हें लाघव देवा नवल तुझें ॥२॥ जीव घेऊनि शंखासुरा । त्याच्या वागविसी कलेवरा । तो तूं रिघोनि मजभीतरा । माझिया शरीरा वागविसी ॥३॥ शंख मधुर ध्वनी गाजे । तो वाजवित्याचेनि वाचे । तेवीं म्यां जें जें बोलिजे । तें तें बोलणें साजे तुझेनि ॥४॥ आतां माझें 'शरीर' जें चळे । तें तुझेनि आंगिकें मेंळें । 'कर्में' निपजतीं सकळें । सत्ताबळें तुझेनि ॥५॥ माझे देहींचें जें 'मीपण' । तें तूंचि झालासी आपण । तुझेनि प्राणें 'प्राण' । माझाही जाण चळे देवा ॥६॥ 'दृष्टी' जें जें कांहीं देखे । तें तें तुझेनि ज्ञानउ न्मेखें । 'श्रवणीं' जें जें कांहीं ऐकें । तें तें नेटकें अवधान तुझें ॥७॥ 'रसना' जें जें कांहीं चाखे । तें तें तुझेनि स्वादमुखें । 'बुद्धि' जाणपणें तोखे । तेहीं अतिनिकें वेदकत्व तुझें ॥८॥ 'मन' मनपणें अतिचपळ । तेंही तुझेंचि आंगिक बळ । विवेका 'विवेकु' प्रबळ । अतिसोज्ज्वळ तुझेनि ॥९॥ 'वाचा' जें जें कांहीं वदे । तें वाचिकत्व तुझेनि शब्दें । 'बोधु' जेणें उद्बोधे । तो तुझेनि प्रबोधें प्रबोधु ॥१०॥ 'जागृती' जागे तुझेनि हरिखें । 'स्वप्न' स्वप्ना तुझेनि देखे । 'सुषुप्ती' सुखावे जेणें सुखें । पूर्ण संतोखें तुझेनि ॥११॥ मी जे जे 'विषय' भोगीं । तें भोक्तेपण तुझे अंगीं । तुझेनि निजसंयोगीं । मीपणें जगीं वर्तविशी मज ॥१२॥ माझें करूनि खांबसूत्र । तूं झालासी सूत्रधार । हालवूनियां निजसूत्र। कर्में विचित्र करविशी ॥१३॥ ऐशिया श्रीजनार्दना । जग चेतवित्या चिद्घरना । कृपाळुवा जगजीवना । नमन श्रीचरणा तुझेनि तुज ॥१४॥ यापरी मजमाजीं तूं चाळिता । चाळकत्वें करविसी ग्रंथा । तेथें मी एक कवित्वकर्ता । हे जाणावी तत्त्वतां स्थूळबुद्धी ॥१५॥ एका एकु जनार्दनीं । कीं जनार्दनु एकपणीं । इये पृथक् नामांचीं लेणीं । लेऊनि एकपणीं मिरविसी तूं ॥१६॥ जेवीं कनकाचें भूषण । कीं भूषणीं कनकसंपूर्ण । तेवीं एका आणि जनार्दन । एकत्वें जाण जनार्दनचि ॥१७॥ ऐशी ऐकोन विनवणी । सद्गुरु तुष्टला संतोषोनी । येथें भिन्न भिन्न सोसणी । न लगे निरुपणीं करणें तुज ॥१८॥ जेव्हां कापुरा आगी झगटे । तेव्हांचि कापुरत्व खुंटे । सच्छिष्यासी सद्गुरु भेटे । तेव्हांचि फिटे भिन्नभेदु ॥१९॥ जेणें फिटे भिन्नभेदु । तो श्रीभागवतीं निजबोधु । वसुदेवाप्रती नारदु । सांगत संवादु इतिहासाचा ॥२०॥ ज्या इतिहासाचा अर्थ । परिसतां प्रगटे परमार्थ । स्वानंदबोध हृदयांत । श्रवणें सदोदित श्रोते होती ॥२१॥ तंव श्रोते संतसमुदावो । म्हणती कैसा नवलावो । सद्गुरुस्तवनीं ब्रह्मभावो । साधिला आवो अभेदत्वें ॥२२॥ हे सद्गुरुची विनवणी । कीं ब्रह्मसुखाची खाणी । परिसतां सप्रेम बोलणीं । रिझली आयणी सज्जनांची ॥२३॥ या देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी । बोल नव्हती हे स्पर्शमणी । लागतां श्रवणीं पालटे जीव ॥२४॥ यापरी श्रीभागवतीं । अनुपम अगाध स्थिति । ते कथेची संगति । लावी सुनिश्चितीं अर्थावबोधें ॥२५॥ ऐकोनि संतांचें वचन । शिरीं वंदोनि त्यांचे चरण । पुढील कथानिरुपण । श्रोतीं सावधान परिसावें ॥२६॥ येथें तृतीय अध्यायाचे अंतीं । निरुपितां तांत्रिक भक्ति । भजावें आवडेल ते मूर्ति । रायासी तदर्थी प्रश्न स्फुरला ॥२७॥ देवो एकचि त्रिजगतीं । त्याच्या किती अवतारमूर्ति । जन्म कर्म अनेक व्यक्ती । हेंचि मुनीप्रति पुसतु ॥२८॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

राजोवाच ॥ यानि यानीह कर्माणि यैर्यैः स्वच्छन्दजन्मभिः । चक्रे करोति कर्ता वा हरिस्तानि ब्रुवन्तु नः ॥१॥

मुनीश्र्वरांचें अगाध ज्ञान । त्याहीवरी रसाळ निरुपण । तेणें रायाचें वेधलें मन । प्रश्नावरी प्रश्न यालागीं पुसे ॥२९॥ तो म्हणे देवधिदेवो हरि । स्वलीला कैसीं जन्में धरी । स्वेच्छा जीं जीं कर्में करी । ते अगाध थोरी मज सांगा ॥३०॥ म्हणती देवा नाहीं जन्म । तेथें कैंचें पुसशी कर्म । देवो अरूप अनाम । त्यासी जन्म कर्म असेना ॥३१॥ तो 'अजन्मा' परी जन्म धरी । 'अकर्मा' परी कर्में करी । 'विदेही' तो देहधारी । होऊनि संसारीं स्वधर्म पाळी ॥३२॥ त्याच्या अवतारांची स्थिति । कवण जन्म कवण व्यक्ति । किती अवतार किती मूर्ति । कृपेनें मजप्रती सांगा स्वामी ॥३३॥ जे कां अतीत अनागत । वर्तमान जे प्रस्तुत । ते अवतार समस्त । इत्थंभूत सांगावे ॥३४॥ हरिचरित्र अवतारगुण । प्रतिपादन करावयाचा प्रश्न । तो सांगावया जयंतीनंदन । स्वानंदें पूर्ण 'द्रुमिल' सांगे ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

द्रुमिल उवाच -यो वा अनन्तस्य गुणाननन्ताननुक्रमिष्यन् स तु बालबुद्धिः । रजांसि भूमेर्गणयेत्कथंचित्‍ कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः ॥२॥

ज्याची लीलाशक्ति अपरिमित । ऐशा अनंत शक्ति ज्याच्या नखांत । यालागीं तो 'अनंत' म्हणत । त्याचे गुण समस्त गणवती कोणा ॥३६॥ त्या अनंताची गुणसमृद्धी । गणूं म्हणे तो बालबुद्धि । जेवीं कां आकाशाची वृद्धी । मुंगिये त्रिशुद्धी न करवी माप ॥३७॥ सागरींचें जळ संपूर्ण । केवीं गणूं शके लवण । तेवीं अनंताचे अनंत गुण । आकळी कवण निजसत्ता ॥३८॥ पर्जन्याचिया धारा । गणितां येतील नृपवरा । पृथ्वीचिया दूर्वांकुरां । सुखें महावीरा गणितां येती ॥३९॥ वारा अफाट धांवे । तोही गणितातें पावे । निमेषोन्मेषांचे यावे । त्यांसीही संभवे गणित राया ॥४०॥ पृथ्वीचिया परिमाणा । काळें काळें होय गणना । परी भगवंताचिया गुणां । वेदांसहि जाणा गणित नव्हे ॥४१॥ भगवंताचें नाम एक । घेतां वेद झाले मूक । त्याचे गुण गणितां सकळिक । शेषाचें मुख दुखंड झालें ॥४२॥ त्या अनंताचे अनंत गुण । येथ गणूं शके कवण । कांहीं एक संक्षेपें जाण । सांगेन लक्षण अवतारांचें ॥४३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

भूतैर्यदा पञ्चभिरात्मसृष्टैः पुरं विराजं विरचय्य तस्मिन् । स्वांशेन विष्टः पुरुषाभिधानमवाप नारायण आदिदेवः ॥३॥

अवतारांमाजीं प्रथमतां । 'पुरुषावतारांची' कथा । द्रुमिल झाला सांगता । ऐक तत्त्वतां महाराजा ॥४४॥ नारायणें आत्मशक्तीं । पंचमहाभूतें भूताकृती । सृजूनियां यथानिगुतीं । ब्रह्मांडाची स्थिति निर्माण केली ॥४५॥ 'विराजपुर' ब्रह्मांडा नाम । तेथ लीला प्रवेशे देवोत्तम । यालागीं 'पुरुष' हें नाम । पुरुषोत्तम स्वांशें पावे ॥४६॥ त्याचेनि अंशयोगें प्रकृति । झाली प्रजांतें प्रसवती । यालागीं 'पुरुष' नामस्थिति । जाण निश्चितीं पावला ॥४७॥ तो अकर्तात्मयोगयुक्तीं । जग चेतवी चिच्छक्तीं । ज्याचेनि जगा जगत्वें स्फूर्ति । त्याची गुणकीर्ति दों श्लोकीं सांगों ॥४८॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

यत्काय एष भुवनत्रयसन्निवेशो यस्येन्द्रियैस्तनुभृतामुभयेन्द्रियाणि । ज्ञानं स्वतः श्वसनतो बलमोजईहा सत्त्वादिभिः स्थितिलयोद्भव आदिकर्ता ॥४॥

त्रैलोक्य वसे जें कांहीं । तेंचि शरीर त्याचें पाहीं । ज्याचेनि योगें देही । ठायींच्या ठायीं वर्तती ॥४९॥ ब्रह्मादिक जे तनुधारी । त्यांच्या ज्ञानकर्मेंद्रियांची थोरी । ज्याचेनि इंद्रियेंकरीं । निजव्यापारीं वर्तती ॥५०॥ जो जगाचे नयनांचा नयन । जो जगाच्या घ्राणांचें घ्राण । जो जगाच्या श्रवणांचें श्रवण । रसनेची जाण रसना जो कां ॥५१॥ जो जगाच्या हातांचे हात । ज्याचे पाय जगाच्या पायांत । जो वाचेची वाचा निश्चित । एवं उभय इंद्रियांआंत इंद्रियें ज्याचीं ॥५२॥ जीवाच्या ठायीं जें कां ज्ञान । तेंही त्याचेनि ज्ञानें जाण । त्यासी ज्ञानदाता नाहीं आन । स्वयें ज्ञानघन स्वभावतांचि ॥५३॥ ज्याचेनि प्राणें जाण । जगाचा चळे प्राण । बळ तेज क्रियाचरण । जगासी संपूर्ण ज्याचेनि ॥५४॥ रजतमसत्त्वादिगुणयुक्त । उत्पत्तिस्थितिप्रळयान्त । मूळीं आदिकर्ता भगवंत । जाण तो निश्चित 'पुरुषावतार' ॥५५॥ सत्त्वादि त्रिगुणावस्था । उत्पत्तिस्थितिलयकर्ता । तेही गुणावतारकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

आदावभूच्छतधृती रजसाऽस्य सर्गे विष्णुः स्थितौ क्रतुपतिर्द्विजधर्मसेतुः । रुद्रोऽप्ययाय तमसा पुरुषः स आद्य । इत्युद्भवस्थितिलयाः सततं प्रजासु ॥५॥

तोचि आदिकल्पीं उत्पत्ती । रजोगुणें राजसा शक्तीं । स्वयें झाला शतधृती । 'ब्रह्मा' म्हणती जयातें ॥५७॥ एवं ब्रह्मरूपें उत्पत्ति । सृजिता झाला राजसा शक्तीं । तेथें प्रतिपाळावया स्वधर्मस्थिति । सत्त्वगुणें निश्चितीं 'श्रीविष्णु' जाहला ॥५८॥ तो द्विजधर्मप्रतिपाळणु । यज्ञभोक्ता श्रीविष्णु । देखतां धर्माचा अवगुणु । अवतरे नारायणु नानावतारीं ॥५९॥ तोचि ये सृष्टीचे प्रांतीं । तमोगुणें तामसा शक्तीं । स्वयें जाहला 'रुद्रमूर्ति'। सकळ कल्पांतीं निर्दाळितु ॥६०॥ जो शेताची पेरणी करी । तोचि राखे देखे सोकरी । तोचि वाळलियावरी । संवगणी करी सर्वांची ॥६१॥ तेवीं उत्पत्तिकाळीं तोचि ब्रह्मा । स्थितिकाळीं तोचि विष्णुनामा । प्रळयाकाळींही रुद्रपमा । ये पुरुषोत्तमा तेचि नामें ॥६२॥ यालागीं तो आदिकर्ता । श्रुतिशास्त्रीं दृढ वार्ता । दक्षकश्यपादिकां कर्तव्यता । त्यांसी समर्थता याचेनि ॥६३॥ यापरी विचारितां । हाचि एक सकळ कर्ता । यावांचून कर्तव्यता । अणुमात्रता नव्हे आना ॥६४॥ जो सृष्टीपूर्वीं स्वयंभ असे । जेणें उत्पत्तिस्थितिप्रळयो भासे । तोचि आदिकर्ता अनायासें । तोचि निजांशें पुरुषावतारु ॥६५॥ ऐक राया अतिविचित्र । जें परिसतां पुण्य पवित्र । तो नारायणाचा अवतार । ज्याचें चरित्र अलोलिक ॥६६॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

धर्मस्य दक्षदुहितर्यजनिष्ट मूर्त्यां नारायणो नरऋषिप्रवरः प्रशान्तः । नैष्कर्म्यलक्षणमुवाच चचार कर्म योऽद्यापि चास्त ऋषिवर्यनिषेविताङ्‌घ्रिः ॥६॥

जो अजन्मा नित्य त्रिभुवनीं । जो न जन्मोनि जन्मला योनीं । तेणें धर्माची धर्मपत्नीन । केली जननी दक्षकन्या 'मूर्ती' ॥६७॥ ते मूर्तिमातेच्या उदरीं । नर-नारायण अवतारी । एकचि दोंरूपेंकरीं । धर्माच्या घरीं अवतरले ॥६८॥ तेणें नारदादिकांसी जाण । निरूपिलें नैष्कर्म्यलक्षण । स्वयें आचरला आपण । तें कथन ऐक राया ॥६९॥ 'नारायण' म्हणसी कोणे देशीं । तो बदरिकाश्रमीं आश्रमवासी । नारद सनकादिक ऋषि । अद्यापि त्यापासीं सेवेसी असती ॥७०॥ त्यासी स्वस्वरूपाचें लक्ष । सहजीं असे प्रत्यक्ष । ते स्वरूपनिष्ठेचा पक्ष । अलक्ष्याचें लक्ष्य प्रबोधी स्वयें ॥७१॥ तया स्वरूपाचा निजबोध । स्वयें पावावया विशद । अद्यापवरी ऋषिवृंद । नित्य संवाद करिताति त्यासीं ॥७२॥ जें स्वरूप लक्षेना जनीं । तें विशद करूनि दे वचनीं । तेंचि अनुग्रहेंकरूनी । अनुभवा आणी तत्काळ ॥७३॥ ज्ञाते बहुसाल ऋषीश्वर । त्यांमाजीं नारायणअेवतार । तेथ वर्तलें जें चरित्र । अतिविचित्र ऐक राया ॥७४॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

इन्द्रो विशङकय मम धाम जिघृक्षतीति कामं न्ययुंक्त सगणं स बदर्युपाख्यम् । गत्वाऽप्सरोगणवसन्तसुमन्दवातैः स्त्रीप्रेक्षणेषुभिरविध्यदतन्महिज्ञः ॥७॥

ऐसा नारायणाचा प्रताप । देखोनि निष्ठा दृढ तप । तेणें इंद्रासी आला कंप । म्हणे स्वर्ग निष्पाप घेईल माझा ॥७५॥ त्याचें तप देखोनि परम । म्हणे गेलें गेलें स्वर्गधाम । इंद्रें कोपें प्रेरिला काम । अप्सरासंभ्रमसवेत ॥७६॥ कामसमवेत अप्सरा । सवें वसंतही दुसरा । क्रोधु अवघियां पुढारा । जो तापसांतें पुरा नागवी सदा ॥७७॥ तीर्थोतीर्थींच्या अनुष्ठाना । क्षमा नुपजे अंतःकरणा । कोपु येतांच जाणा । करी उगाणा तपाचा ॥७८॥ क्रोधु तापसांचा उघड वैरी । तापसां नागवी नानापरी । तोही नारायणावरी । अवघ्यां अग्रीं चालिला ॥७९॥ ऐशीं मिळोनि बिरुदायितें । आलीं बदरिकाश्रमा समस्तें । नारायणु तप करी जेथें । उठावलीं तेथें अतिआक्रमेंसीं ॥८०॥ वसंतें शृंगारिलें वन । कोकिळा कलरवें गायन । सुगंध शीतळ झुळके पवन । पराग संपूर्ण वरुषती सुमनें ॥८१॥ तेथ भ्रमरांचे झणत्कार । कामिनीगायन कामाकार । हावभाव कटाक्षविकार । कामसंचार चेतविती ॥८२॥ नव्हेचि कामिनीकामबाधा । पराक्रमु न चलेचि क्रोधा । तोही सांडोनियां बिरुदा । परतला नुसधा म्लानवदनें ॥८३॥ मग मदनें मांडोनियां ठाण । विंधी कामिनीकटाक्षबाण । तेणें घायें नारायण । अणुप्रमाण न डंडळेचि ॥८४॥ शस्रें तोडितां आकाशासी । आकाश स्वयें सावकाशी । तेवीं कामें छळितां नारायणासी । तो निजसंतोषीं निर्द्वंद्व ॥८५॥ आग्या निजतेजसत्ता । अग्नीतेज प्राशूं जातां । तोंड जळे चवी चाखितां । तेवीं कामिनीकामता नारायणदृष्टीं ॥८६॥ नेणतां नारायणमहिमे । धांवोनि घाला घातला कामें । तेव्हां अवघींच पराक्रमें । स्वनिंद्य धर्में लाजलीं ॥८७॥ तेथ अवघीं झालीं पराङ्मुंखें । पाठमोरीं निघालीं अधोमुखें । तेव्हां त्यांची गति निःशेखें । नारायण देखे खुंटिली ॥८८॥ इंद्रियनियंता नारायण । नेणोनि छळूं गेलीं आपण । त्यापुढोनि पुनरागमन । सर्वथा जाण करवेना ॥८९॥ मागें न निघवे निश्चितें । ऐसें जाणोनि समस्तें । थोर गजबजिलीं तेथें । भयचकितें व्याकुळें ॥९०॥ जाणोनि नारायणप्रताप । आतां कोपून देईल शाप । येणें धाकें म्लानरूप । अतिसकंप भयभीतें ॥९१॥ ऐशी देखोनि त्यांची स्थिति । कृपेनें तुष्टला कृपामूर्ति । अणुमात्र कोपु नये चित्तीं । अभिनव शांति नारायणाची ॥९२॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

विज्ञाय शक्रकृतमक्रममादिदेवः प्राह प्रहस्य गतविस्मय एजमानान् । मा भैष्ट भो मदन मारुत देववध्वो गृह्णीत नो बलिमशून्यमिमं कुरुध्वम् ॥८॥

इंद्रें केला अपराध । तरी नारायणासी न येचि क्रोध । बापु निजशांति अगाध । न मनी विरुद्ध कामादिकांचे ॥९३॥ न येचि कामादिकांवरी कोप । इंद्रासही नेदीच शाप । नारायणाच्या ठायीं अल्प । कदा विकल्प नुपजेचि ॥९४॥ अपकार्या्वरी जो कोपला । तो तत्काळ कोपें नागविला । अपकार्या् जेणें उपकार केला । तोचि दादुला परमार्थी ॥९५॥ अपकार्यांय उपकार करिती । त्याचे नांव गा परम शांति । ते शांतीची निजस्थिति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥९६॥ परमार्थाची मुख्यत्वें स्थिति । पाहिजे गा परम शांति । ते शांतीची उत्कट गति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥९७॥ भयभीत कामादिक । अप्सरागण साशंक । त्यातें अभयदानें सुख । देऊनियां देख नारायण बोले ॥९८॥ अहो कामवसंतादिक स्वामी । कृपा करूनि आलेति तुम्ही । तुमचेनि पदाभिगमीं । आश्रमभूमी पुनीत झाली ॥९९॥ तुमचें झालिया आगमन । अवश्य करावें आम्हीं पूजन । हेंचि आमुचें अनुष्ठान । कांहीं बळिदान अंगीकारा माझें ॥१००॥ अवो अप्सरा देवकांता । तुम्ही भेवों नका सर्वथा । येथ आलिया समस्तां । पूज्य सर्वथा तुम्ही मज ॥१॥ आश्रमा आलिया अतिथि । जे कोणी पूजा न करिती । त्यांची शून्य पुण्यसंपत्ति । आश्रमस्थिति शून्य होये ॥२॥ तुम्हीं नांगीकारितां पूजन । कांहीं न घेतां बळिदान । गेल्या हा आश्रम होईल शून्य । यालागीं कृपा करून पूजा घ्यावी ॥३॥ आश्रमा आलिया अतिथी । तो पूज्य सर्वांस सर्वार्थीं । अतिथि आश्रमीं जे पूजिती । ते आश्रमकीर्ति शिव वानी ॥४॥ व्याही रुसलिया पायां पडती । तेवीं विमुख जातां अतिथि । जे वंदोनियां सुखी करिती । ते सुख पावती स्वानंदें ॥५॥ व्याही रुसलिया कन्या न धाडी । अतिथि रुसलिया पुण्यकोडी । पूर्वापार जे कां जोडी । तेही रोकडी क्षयो पावे ॥६॥ वैकुंठीं ज्याची निजस्थिति । तो त्या आश्रमा ये नित्य वस्ती । जे आश्रमीं अतिथि । पूजिती प्रीतीं ब्रह्मात्मभावें ॥७॥ ऐसें बोलिला तयांप्रती । परी माझी हे अगाध शांति । हेही नारायणाचे चित्तीं । गर्वस्थिति असेना ॥८॥ ऐक राया अतिअपूर्व । असोनि निजशांतिअनुभव । ज्याच्या ठायीं नाहीं गर्व । तोचि देवाधिदेव निश्चयेंसीं ॥९॥ जो नित्य नाचवी सुरनरांसी । ज्या भेणें तप सांडिजे तापसीं । त्या अभय देवोनि कामक्रोधांसी । आपणापासीं राहविलीं ॥११०॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

इत्थं ब्रुवत्यभयदे नरदेव देवाः सव्रीडनम्रशिरसः सघृणं तमूचुः । नैतद्विभो त्वयि परेऽविकृते विचित्रं स्वारामधीरनिकरानतपादपद्मे ॥९॥

एवं अभय देत नारायण । स्वमुखें बोलिला आपण । तेणें कामादि अप्सरागण । लाजा विरोन अधोमुख झालीं ॥११॥ देखोनि निर्विकार पूर्ण क्षमा । श्रीनारायण हा परमात्मा । कळों सरलें वसंतादि कामा । त्याचाचि महिमा वर्णिती स्वयें ॥१२॥ ऐकें नरदेव चक्रवर्ती । विदेहा सार्वभौमा भूपती । त्या नारायणाची निजस्तुती । कामादि करिती सद्भावेंसीं ॥१३॥ जे सदा सर्वांतें छळिती । त्यांहीं देखिली पूर्ण शांति । तेचि शांतीची स्तुति करिती । नारायणाप्रती कामक्रोध ॥१४॥ जेणें संतोषे श्रीनारायण । त्यासी कृपा उपजे पूर्ण । ऐशिया परीचें स्तवन । मांडिलें संपूर्ण परमार्थबुद्धीं ॥१५॥ जयजय देवाधिदेवा । तुझिया अविकारभावा । पाहतां न देखों जी सर्वां । देवांमानवांमाझारीं ॥१६॥ मज कामाचेनि घायें । ब्रह्मा कन्येसी धरूं जाये । पराशरा केलें काये । भोगिली पाहें दिवा दुर्गंधा ॥१७॥ ज्यातें योगी वंदिती मुगुटीं । जो तापसांमाजी धूर्जटी । तो शिवु लागे मोहिनीपाठीं । फिटोनि लंगोटी वीर्य द्रवलें ॥१८॥ विष्णु वृंदेच्या श्मशानीं । धरणें बैसे विषयग्लानीं । अहल्येची काहणी । वेदीं पुराणीं वर्णिजे ॥१९॥ नारदु नायके माझी गोष्टी । त्यासी जन्मले पुत्र साठी । माझी साहों शके काठी । ऐसा बळिया सृष्टीं असेना ॥१२०॥ जो ब्रह्मचार्यां माजीं राजा । हनुमंतु मिरवी पैजा । तयास्तव मकरध्वजा । संगेंवीण वोजा जन्मविला म्यां ॥२१॥ कलंकिया केला चंद्र । भगांकित केला इंद्र । कपाटीं घातला षण्मुख वीर । जो लाडका कुमर महेशाचा ॥२२॥ मज मन्मथाचा यावा । न साहवे देवां दानवां । मा तेथ इतरां मानवां । कोण केवा साहावयासी ॥२३॥ मज जाळिलें महेशें । त्यासी म्या अनंगें केलें पिसें । नवल धारिष्ट तुझ्या ऐसें । पाहतां न दिसे तिहीं लोकीं ॥२४॥ त्या मज कामा न सरतें केलें । शांतीचें कल्याण पाहालें। हें तुवांचि एकें यश नेलें । स्वभावा जिंकलें निजशांतियोगें ॥२५॥ तो मी न सरता केला काम । क्रोधा आणिला उपशम । वासनेचा संभ्रम । नित्य निर्भ्रम त्वां केला ॥२६॥ हे नारायणा तुझी निष्ठा । न ये आणिकां तपोनिष्ठां । केला अनुभवाचा चोहटा । शांतीचा मोठा सुकाळु केला ॥२७॥ मागें तपस्वी वाखाणिले । म्हणती कामक्रोधां जिंकिलें । त्यांसीही आम्हीं पूर्ण छळिलें । ऐक तें भलें सांगेन ॥२८॥ कपिलाऐसा तेजोराशी । क्रोधें तत्काळ छळिलें त्यासी । शापु देतांचि सगरासी । तोही क्रोधासी वश्य झाला ॥२९॥ कोपु आला नारदासी । वृक्ष केलें नलकूबरांसी । गौतमें अहल्येसी । कोपें वनवासी शिळा केली ॥१३०॥ जो सर्वदा विघ्नातें आकळी । त्या विघ्नेशातें क्रोध छळी । तेणें अतिकोपें कोपानळीं । चंद्रासी तत्काळीं दिधला शाप ॥३१॥ कोपु आला दुर्वासासी । शाप दिधला अंबरीषासी । देवो आणिला गर्भवासासी । क्रोधें महाऋषी छळिले ऐसे ॥३२॥ जे दुजी सृष्टी करूं शकती । तेही कामक्रोधें झडपिजेती । सागरीं पडे इंद्रसंपत्ती । हे क्रोधाची ख्याति पुराणप्रसिद्ध ॥३३॥ इतरांची गोठी कायसी । क्रोधें छळिलें ईश्वरासी । तेणें दीक्षिता द्विजदक्षासी । शिरच्छेदासी करविता झाला ॥३४॥ जेथ मी कामु स्वयें वसें । तेथ क्रोध वसे सावकाशें । काम क्रोध असतचि नसे । नारायणा ऐसें तुवां केलें ॥३५॥ हें परमाद्भुत तुझें वीर्य । आणिकां एवढें नाहीं धैर्य । यालागीं तुझें परिचर्य । सदा मुनिवर्य सेविती चरण ॥३६॥ शांतीच्या चाडें देवाधिदेवा । जे नित्य करिती तुझी सेवा । ते कामक्रोधादिस्वभावा । स्मरतां तव नांवा जिंकिती सुखें ॥३७॥ जेथ सन्मानें काम पुरत । तेथ आदरें अनुग्रहो करित । काम सन्मानें जेथें अतृप्त । तेथें शाप देत अतिक्रोधें ॥३८॥ यालागीं शापानुग्रहसमर्थ । ते सर्वदा कामक्रोधयुक्त । परी नवल तुझें सत्त्वोचित । केले अंकित कामक्रोध ॥३९॥ मज गर्व नाहीं सर्वथा । हेही तुज नाहीं अहंता । छळवाद्यां द्यावी लघुता । अथवा उपेक्षता न करिसी ॥१४०॥ पृथ्वी दुःखी करिती नांगरीं । ते पिकोनि त्यांतें सुखी करी । तेवीं अपकार्यांि जो उपकारी । तो मोक्षाच्या शिरीं मुगुटु ॥४१॥ तुजमाजीं निर्विकार शांति । हें नवल नव्हे कृपामूर्ति । तुझ्या स्वरूपाची स्थिति । आजि निश्चितीं कळली आम्हां ॥४२॥ तूं निर्गुण निरुपम । मायातीत पूर्ण ब्रह्म । तुझें स्वभावें स्मरतां नाम । सकामाही काम स्पर्शों न शके ॥४३॥ जो नित्य स्मरे तुझें नाम । त्यासी मी कामचि करीं निष्काम । क्रोधचि करी क्रोधा शम । मोहो तो परम प्रबोध होय ॥४४॥ जे धीर वीर निजशांतीं । ज्यांसी परमानंदें नित्य तृप्ति । ऐशियांचिया अमित पंक्ति । पायां लागती तुझिया ॥४५॥ तुज करावया नमस्कारु । पुढें सरसे महासिद्धांचा संभारु । त्यांसही न लभे अवसरु । तूं परात्परु परमात्मा ॥४६॥ तुझिया सेवकांकडे । विघ्न रिघतां होय बापुडें । तें रिघावया तुजपुढें । कोण्या परिपाडें रिघेल ॥४७॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

त्वां सेवतां सुरकृता बहवोऽन्तरायाः स्वौको विलङ्घ्य परमं व्रजतां पदं ते । नान्यस्य बर्हिषि बलीन् ददतः स्वभागान् धत्ते पदं त्वमविता यदि विघ्नमूर्ध्नि ॥१०॥

तापसां बहु विघ्नअबपावो । आम्हीं करावा अंतरावो । हा आमुचा निजस्वभावो । नव्हे नवलावो नारायणा ॥४८॥ हृदयींचा गुप्त करोनि काम । बाह्य जप-तप-भक्तिसंभ्रम । ऐसे जे का शठ परम । विघ्नांचा आक्रम त्यांवरी चाले ॥४९॥ ते आमची विघ्नस्थिति । न चलें तुझिया भक्तांप्रती । तूं रक्षिता भक्तपति । तेथें विघ्नांची गति पराङ्‌मुख सदा ॥१५०॥ ‍माझिया निजभक्तांसी । विघ्नें कैंचीं म्हणसी त्यांसी । ऐक त्याही अभिप्रायासी । सांगेन तुजपासीं देवाधिदेवा ॥५१॥ पावावया निजपदातें । लाता हाणून स्वर्गभोगातें । जे नित्य निष्काम भजती तूंतें । नाना विघ्नें त्यांतें सुरवर रचिती ॥५२॥ उल्लंघूनियां आमुतें । हे पावती अच्युतपदातें । यालागीं सुरवर त्यातें । अतिविघ्नांतें प्रेरिती ॥५३॥ बळी नेदूनि आम्हांसी । हे जाऊं पाहती पूर्णपदासी । येणें क्षोभें इंद्रादिक त्यांपासीं । नाना विघ्नांसी मोकलिती ॥५४॥ या लागीं त्यांच्या भजनापासीं । विघ्नें छळूं धांवतीं आपैसीं । विघ्नीं अभिभव नव्हे त्यांसी । तू हृषीकेशी रक्षिता ॥५५॥ सांडूनि सकाम कल्पना । जे रतले तुझ्या चरणा । त्यांस आठही प्रहर जाणा । तूं नारायणा रक्षिसी ॥५६॥ भक्त विघ्नीं होती कासाविसी । धांव धांव म्हणती हृषीकेशी । तेव्हां तूं धांवण्या धांवसी । निष्ठुर नव्हसी नारायणा ॥५७॥ विघ्न न येतां भक्तांपासीं । आधींच भक्तसंरक्षणासी । तूं भक्तांचे चौंपासीं । अहर्निशीं संरक्षिता ॥५८॥ विघ्न छळूं धांवे सकोप । तंव विघ्नीं प्रगटे तुझें स्वरूप । यालागीं भक्तांसी अल्प । विघ्नप्रताप बाधूं न शके ॥५९॥ कामें छळावें हरिभक्तांसी । तंव हरि कामाचा हृदयवासी । तेव्हां विघ्नचि निर्विघ्न त्यांसी । भय भक्तांसी स्वप्नीं नाहीं ॥१६०॥ विघ्न उपजवी विरोधु । तंव विरोधा सबाह्य गोविंदु । मग विरोध तोचि महाबोधु । स्वानंदकंदु निजभक्तां ॥६१॥ ज्यासी तुझ्या चरणीं भावार्थु । त्यासी विघ्नीं प्रगटे परमार्थु । ऐसा भावबळें तूं समर्थु । साह्य सततु निजभक्तां ॥६२॥ यापरी समर्थ तूं संरक्षिता । ते जिणोनि विघ्नां समस्तां । पाय देऊनि इंद्रपदमाथां । पावती परमार्था तुझिया कृपें ॥६३॥ देवो संरक्षिता ज्यासी । विघ्नें छळूं धांवती त्यासी । मा सकामाची गती कायसी । विदेहा म्हणसी तें ऐक ॥६४॥ विषयकाम धरोनि मनीं । इंद्रादि देवां बळिपूजनीं । जे भजले यागयजनीं । देव त्यांलागोनी न करिती विघ्न ॥६५॥ इंद्र याज्ञिकांचा राजा । सकाम याज्ञिक देवांच्या प्रजा । यज्ञभाग अर्पिती वोजा । पावल्या बळिपूजा न करिती विघ्न ॥६६॥ म्हणसी कामादिक विटंबिती । ते निष्काम कदा नातळती । सहज कामा वश असती । सदा कर्में करिती सकाम ॥६७॥ जे मज कामासी वश होती । ते तप वेंचोनि भोग भोगिती । जे आतुडले क्रोधाच्या हातीं । ते वृथा नागवती तपासी ॥६८॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

क्षुत्तृट्‌त्रिकालगुणमारुतजैव्ह्यशैश्न्या-नस्मानपारजलधीनतितीर्य केचित् । क्रोधस्य यान्ति विफलस्य वशं पदे गोर्मज्जन्ति दुश्चरतपश्च वृथोत्सृजन्ति ॥११॥

प्राणायामें प्राणापानीं । निजप्राणातें आकळोनी । वात वर्ष शीत उष्ण साहोनी । जे अनुष्ठानीं गुंतले ॥६९॥ क्षुधे तृषेतें नेमूनी । जिव्हा शिश्न आकळोनी । मज कामातें जिंतिलें मानूनी । निष्कामाभिमानी उन्मत्त ॥१७०॥ अल्प अपमानाहातीं । जे क्रोधासी वश होती । ते शाप देऊनि तपसंपत्ती । व्यर्थ नागविती निजनिष्ठा ॥७१॥ सकामाच्या अनुष्ठाना । मज कामसंगें स्त्रक्‌चंदना । भोग भोगिती स्वर्गांगना । अमृतपाना प्राशिती ॥७२॥ त्या मज कामातें उपेक्षिती । आणि क्रोधासी वश होती । ते निजतपा नागवती । शापदीप्तिअनुवादें ॥७३॥ जे अपार सागर तरती । ते गोष्पदोदकीं बुडती । तेवीं मज कामातें जिणोनि जाती । तेही नागविजेति निजक्रोधें ॥७४॥ मज कामाची अपूर्ण कामवृत्ति । तेचि क्रोधाची दृढ स्थिति । काम क्रोध अभक्तां बाधिती । हरिभक्तांप्रती तें न चले ॥७५॥ तुझ्या भक्तांप्रती जाण । न चले कामक्रोधादि बंधन । तो तूं भक्तपति नारायण । तुज आमुचें कामपण केवीं बाधी ॥७६॥ नेणतां तुझा महिमा । आम्ही करूं आलों निजधर्मा । तुजपासीं नित्य निजक्षमा । पुरुषोत्तमा कृपाळुवा ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

इति प्रगृणतां तेषां स्त्रियोऽत्यद्भुतदर्शनाः । दर्शयामास शुश्रूषां स्वर्चिताः कुर्वतीर्विभुः ॥१२॥

अपकार्यां उपकार करिती । या नांव 'निर्विकार निजशांति' । तेचि शांतीची परिपाकस्थिति । विघ्नकर्त्याप्रती हरि दावी ॥७८॥ सांगोनियां आपुली स्थिती । कामादिक स्तुति करिती । तंव परमाश्चर्य देखती । स्त्रिया अत्यद्भुती अकस्मात ॥७९॥ स्वरूप वैभव अळंकार । श्रियेहूनियां सुंदर । सेवेलागीं अतितत्पर । सदा सादर सावधानें ॥१८०॥ नवल लाघव नारायणा । कैसें यां दाखविलें विंदाना । त्या स्त्रियांखालीं स्वर्गांगना । दिवा खद्योत जाण तैशा दिसती ॥८१॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

ते देवानुचरा दृष्ट्वा स्त्रियः श्रीरिव रूपिणीः । गन्धेन मुमुहुस्तासां रूपौदार्यहतश्रियः ॥१३॥

या स्त्रिया देखोनि दिठीं । कामु मूर्च्छित पडिला सृष्टीं । वसंत घटघटां लाळ घोंटी । क्रोधाची दृष्टी तटस्थ ठेली ॥८२॥ भ्रमर विसरले झणत्कार । कोकिळा विसरल्या पंचम स्वर । प्राण विसरला संचार । देवानुचर भुलले ॥८३॥ देखोनि त्यांचिया स्वरुपासी । अप्सरा दिसती जैशा दासी । अत्यंत लज्जा झाली त्यांसी । काळिमेसी उतरल्या ॥८४॥ त्यांचे अंगींचा सुगंध वातु । तेणें भुलला वसंतु । मलयानिल झाला भ्रांतु । त्यांचा अंगवातु लागतां ॥८५॥ नारायणाची विद्या कैसी । जे भुलवूं आले आपणासी । भुली पाडिली तयांसी । योगमायेसी दावूनि ॥८६॥ सुंदरत्वें रंभा तिलोत्तमा । जिया मंदरमथनीं जिंतिलिया रमा । रमेहूनियां उत्तमा । उत्तमोत्तमा अतिरुपें ॥८७॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

तानाह देवदेवेशः प्रणतान्प्रहसन्निव । आसामकेतमां वृङ्ध्व सवर्णां स्वर्गभूषणाम् ॥१४॥

तें अतिआश्चर्य देखोन । झाले कामादिक मूर्च्छापन्न । तयांप्रति नारायण । काय हांसोन बोलिला ॥८८॥ आम्हीं अवश्य पूजावें तुम्हांसी । कांहीं अर्पावें बलिदानासी । संतोषावया इंद्रासी । यांतील एकादी दासी अंगीकारा तुम्हीं ॥८९॥ यांचें सौंदर्य अतिथोर । म्हणाल होईल अपमानकर । तुम्हांसमान जे सुंदर । तिचा अंगीकार करावा तुम्हीं ॥१९०॥ म्हणाल यांत नाहीं हीन । अवघ्या सौंदर्यें संपूर्ण । कोणी न दिसे आम्हांसमान । केवीं आपण अंगीकारावी ॥९१॥ जरी नाहीं तुम्हांसमान । सकळ सौंदर्यें अतिसंपन्न । तरी एकीचें करावें वरण । होईल भूषण स्वर्गासी ॥९२॥ ऐसें नारायणाचें वचन । ऐकोनि हरिखलीं संपूर्ण । करूनियां साष्टांग नमन । मस्तकीं वचन वंदिलें ॥९३॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ व १६ वा

ओमित्यादेशमादाय नत्वा तं सुरवन्दिनः । उर्वशीमप्सरःश्रेष्ठां पुरस्कृत्य दिवं ययुः ॥१५॥

इन्द्रायानम्य सदसि श्रृण्वतां त्रिदिवौकसाम् । ऊचुर्नारायणबलं शक्रस्तत्रास विस्मितः ॥१६॥

ऐकोनि नारायणवचन । मस्तकांबुजीं करूनियां नमन । उर्वशी पुढां सून । कामादि गण निघाले वेगीं ॥९४॥ नारायणांचे ऊरुस्पर्शी । उभी होती नारायणापाशीं । तेंचि नांव झालें तिसी । म्हणती 'उर्वशी' स्वर्गांगना ॥९५॥ ते देवांचे देवदूत । स्वर्गा पावले समस्त । मग शक्राचे सभेआंत । सांगती अद्भुत नारयणशक्ति ॥९६॥ तिहीं नारायणाचें चरित्र । सांगितलें अतिपवित्र । तेणें अवघेचि सुरवर । झाले थोर विस्मित पैं ॥९७॥ इंद्रें देखोनि उर्वशी । तिसी भुलला अहर्निशीं । बाहेर यावें सभेसी । हें वर्षानुवर्षी नाठवे ॥९८॥ हे प्रथमावतारवार्ता । जे कां नारायणाची कथा । पुढील अवतार आतां । नृपनाथा अवधारीं ॥९९॥ ऐक राया अतिअपूर्व । छळवादियां पूजा सर्व । करून दाखवी स्वयमेव । 'पूर्णानुभव' या नांव ॥२००॥ (आशंका) ॥भावें करितां भगवद्भजन । यापरी इंद्र करी विघ्न । नारायण चैतन्यघन । तेणें विघ्नें संपूर्ण पराभविलीं ॥१॥ मा बाळ्याभोळ्यां करितां भक्ति । ऐशीं विघ्नें जैं छळूं येती । तैं कदा नव्हे भगवत्प्राप्ति । ऐसा विकल्प चित्तीं झणीं धरिशी ॥२॥ ब्रह्मादिकां सर्व भूतां । भ्रुकुटिमात्रें जो नियंता । त्या भगवंतातें भजतां । विघ्नें सर्वथा बाधूं न शकती ॥३॥ ज्याचेनि इंद्रा इंद्रपण । तो भावें भजतां श्रीनारायण । भक्तांसी विघ्न करी कोण । हरि रक्षण निजभक्तां ॥४॥ इंद्रमुख कामादिक । विघ्नें छळिती सकळ लोक । त्यांचाही नारायण चाळक । तो भक्तांसी देख स्पर्शों नेदी ॥५॥ विघ्नांसी भुलविलें जेणें संपूर्ण । तो नित्य स्मरतां नारायण । आपधाकें विघ्नें पळतीं जाण । भक्तसंरक्षण हरिनामें ॥६॥ करावया निजभक्तकैवार । देवो धरी नानावतार । त्याच्या अवतारांचें चरित्र । अतिविचित्र अवधारीं ॥७॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

हंसस्वरूप्यवददच्युत आत्मयोगं दत्तः कुमार ऋषभो भगवान् पिता नः । विष्णुः शिवाय जगतां कलयाऽवतीर्णस्तेनाहृता मधुभिदा श्रुतयो हयास्ये ॥१७॥

सनकादिक ब्रह्मनंदन । तिहीं पित्यासी केला प्रश्र्न । प्रश्नखंडणमिसें जाण । केलें ब्रह्मज्ञान 'हंसावतारें' ॥८॥ नित्य स्मरतां हरीचें नाम । महाविघ्नें होतीं भस्म । त्याचे अवतारसंभ्रम । उत्तमोत्तम अवधारीं ॥९॥ ज्याचेनि नामें पळे कृतांतु । ज्याचेनि नामें जन्ममरणां घातु । तो अवतारु 'श्रीदत्तु' । मूर्तिमंतु परब्रह्म ॥२१०॥ नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चितीं । ज्यासी स्वप्नीं नाहीं वीर्यच्युति । यालागीं 'कुमार' म्हणती । अवतारमूर्ति सनकादिक ॥११॥ आणि आमुचा जो कां पिता । 'ऋषभ' नारायण ज्ञाता । तोही अवतार नृपनाथा । जाण तत्त्वतां भगवन्मूर्ति ॥१२॥ इहीं नामीं-रूपीं संपूर्ण । अवतारीं अवतरे नारयण । जो जगाचा प्रतिपाळण । स्वांशें श्रीकृष्ण अवतरे ॥१३॥ तोचि स्वयें गा श्रीकृष्ण । मधुकैटभ निर्दाळून । नामें जो कां 'मधुसूदन' । तोचि अवतरून 'हयग्रीव' झाला ॥१४॥ तेणें शंख मर्दून पुढती । उद्धरिल्या बुडाल्या श्रुती । आणोनि दिधल्या ब्रह्ययाहातीं । जाण निश्चितीं वेदरक्षणा ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

गुप्तोऽप्यये मनुरिलौषधयश्च मात्स्ये क्रोडे हतो दितिज उद्धरताऽम्भसः क्ष्माम् । कौर्मे धृतोऽद्रिरमृतोन्मथने स्वपृष्ठे ग्राहात्प्रपन्नमिभराजममुञ्चदार्तम् ॥१८॥

तेणेंचि 'मत्स्यावतारें' । प्रलयकालांबुमहाभारें । मनूसगट रक्षिलें धरे । निजनिर्धारें औषधींसीं ॥१६॥ तेणेंचि 'कमठावतारा' । स्वपृष्ठीं धरूनि गिरिवरा । मंथोनिया क्षीरसागरा । अमृत सुरवरां अर्पिलें ॥१७॥ श्वेतवाराह महामूर्ति । धरेनें केली पूर्ण भक्ति । तिसी उद्धरोनि कृपामूर्ति । अभिनव शांति अर्पिली ॥१८॥ तेणें आर्तत्राणा तांतडी । वैकुंठींहून घालोनि उडी । 'गजाचें ग्राहबंधन तोडी' । उद्धरिलें आवडीं गजेंद्रातें ॥१९॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

संस्तुन्वतोऽब्धिपतितान् श्रमणानृषींश्च शक्रं च वृत्रवधतस्तमसि प्रविष्टम् । देवस्त्रियोऽसुरगृहे पिहिता अनाथा जघ्नेऽसुरेन्द्रमभयाय सतां नृसिंहे ॥१९॥

मार्कंडेयो एके वेळीं । बुडतां अकाळप्रळयजळीं । तेणें स्मरतां वनमाळी । तारी तत्काळीं 'वटपत्रशायी' ॥२२०॥ शाळिग्राम पूजितां ऋषीश्वरीं । नळ वानरु ते अवसरीं । देवपूजा टाकी सागरीं । चेष्टा वानरी स्वभावें ॥२१॥ तें देखोनि ऋषीश्वरीं । 'शिळा न बुडोत तुझ्या करीं' । ऐसा शाप ते अवसरीं । क्षोभेंकरीं दिधला ॥२२॥ तैं शाळिग्राम सागरोदरीं । तरतां देखिले ऋषीश्वरीं । काढावया रिघतां भीतरीं । लहरीकरीं निर्बुजले ॥२३॥ ते काळीं ऋषीश्वरीं । 'आर्तिहरण' स्तविला हरि । तेथ अवतरोनि श्रीहरि । ऋषीतें तारी पूजेसहित ॥२४॥ वृत्र वधिला वज्रघातें । ते ब्रह्महत्या इंद्रातें । तेणें दोषें तो अंधतमातें । जाण पां निश्चितें बुडत होता ॥२५॥ तेथ अवतरोनि श्रीअनंतें । चतुर्धा वांटूनि ते हत्येतें । शुध्द केलें इंद्रातें । कृपावंतें कृपाळुवें ॥२६॥ जिणोनियां अमरपुरें । हिरोनि देवांचीं अंतौरें । तीं कोंडोनियां समग्रें । मुरें महा असुरें एकंदर केलें ॥२७॥ तो मुरमर्दन श्रीहरि । यालागीं नांवें 'मुरारि' । देवस्त्रिया काढोनि बाहेरी । देवांच्या करीं अर्पिता झाला ॥२८॥ जो असुरांमाजीं चूडामणी । जो द्वेषियांमाजीं अग्रगणी । तो हरिनाम ऐकतां कानीं । अतिक्षोभें मनीं प्रज्वळों लागे ॥२९॥ जो पूर्ण क्रोधाचा उदधि । जो अविवेकाचा महानिधि । जो हरि स्मरे त्या पुत्रातें बाधी । गर्वमदीं उन्मत्त ॥२३०॥ तो हिरण्यकशिपु नखधारीं । स्वयें निवटी 'नरकेसरी' । जो निजभक्तांचा कैवारी । अभयकारी साधूंचा ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

देवासुरे युधि च दैत्यपतीन् सुरार्थे, हत्वाऽन्तरेषु भुवनान्यदधात्कलाभिः । भूत्वाऽथ वामन इमामहरद्बलेः क्ष्मां, याञ्चाछलेन समदाददितेः सुतेभ्यः ॥२०॥

समुद्रमंथनाच्या शेवटीं । क्षीरसागराचे तटीं । सुरां असुरां कळी मोठी । अमृतासाठीं मांडली ॥३२॥ तेव्हां अमृत विटे जें देखोनी । तो अवतारु घेतला मोहिनी । तेणें असुरां सुरापानी । अमृतदानी देवांसी ॥३३॥ तेथ चोरुनि घेतां अमृतग्रासा । निवटिला राहूचा घसा । त्याच्या कबंधावरी म्हाळसा । वास नेवासा स्वयें केला ॥३४॥ सुरसाह्य नारायणु । द्वारके कुश निर्दाळूनु । का लवणासुर मर्दूनु । अवतरे आपणु 'कुमार' रूपें ॥३५॥ ऐसा मन्वंतरामन्वंतरीं । निजभक्तकाजकैवारी । सुरकार्यार्थ श्रीहरि । नाना अवतारीं अवतरे स्वयें ॥३६॥ तो सुरसाह्य जगजीवन । स्वयें कुब्ज झाला 'वामन' । अंगें याचक होऊन । देवांचा अपमान उतरला जेणें ॥३७॥ दानें दाटुगा बळी । त्यासी देवांचेनि नव्हे कळी । मग त्रिविक्रमरूपें आकळी । याञ्चाछळें बळी छळिला जेणें ॥३८॥ तरी भावबळें बळी प्रबळु । तेणें देवो केला द्वारपाळु । विष्णु सत्त्व पाहे छळछळूं । शेखीं दासांचा दयाळु दास्य करी स्वयें ॥३९॥ यापरी बळीचा छळ । करूनि घेतलें दिङमंडळ । तेणें अमरगण सकळ । अर्पूनि तत्काळ सुखी केले ॥२४०॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

निःक्षत्रियामकृत गां च त्रिःसप्तकृत्वो रामस्तु हैहयकुलाप्ययभार्गवाग्निः । सोऽब्धिं बबन्ध दशवक्त्रमहन्सलङकं सीतापतिर्जयति लोकमलघ्नकीर्तिः ॥२१॥

तो देवाधिदेवोत्तमु । स्वयें झाला 'परशुरामु' । तेणें क्षत्रियांचा पराक्रमु । केला निर्धर्मु निजप्रतापें ॥४१॥ तो गोब्राम्हणकैवारी । सहस्त्रार्जुनातें संहारी । सहस्त्र भुजांची कांडोरीं करी । केली बोहरी दानवकुळा ॥४२॥ जमदग्नीचा कोपाग्नि । परशुरामतेजें प्रज्वळूनि । हैहयकुळ जाळूनि । आहाळिली अवनी क्षत्रियांची ॥४३॥ तेणें तीन सप्तकें वीररसु । देऊनि क्षत्रियमद बहुवसु । त्या रोगाचा केला नाशु । धरेचे ईशु धरामर केले ॥४४॥ जो अवतारांचें मूळ पीठ । जो वीरवृत्ति अतिउद्भट । तो अवतारांमाजीं श्रेष्ठ । अतिवरिष्ठ 'श्रीराम' ॥४५॥ पापें पळती रामनामें । नामांकित वंदिजे यमें । गणिकेचीं कर्माकर्में । श्रीरामनामें निर्दळिलीं ॥४६॥ नामें कळिकाळासी धाक । यमदूतां न मिळे भीक । रामनामगजरें देख । पळे निःशेख जन्ममरण ॥४७॥ जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी । जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥४८॥ ज्याचेनि शिळा तरती सागरीं । असुर मारिले वानरीं । जेणें सुवर्णाची नगरी । वोपिली पुरी शरणागतासी ॥४९॥ जो प्रतापाचा मरिगळा । जेणें सेतु बांधिला अवलीळा । चरणीं उध्दरिली शिळा । जो निजजिव्हाळा निजभक्तां ॥२५०॥ तो अवतार मूर्तिमंत । राया अद्यापि असे वर्तत । हा संवाद त्रेतायुगांत । द्रुमिल सांगत विदेहासी ॥५१॥ यालागीं श्रीराम राम । नित्य जपे जो हें नाम । तो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । कर्माकर्म-अतीत तो ॥५२॥ तें रामनाम अवचटें । भीतरीं रिघे कर्णपुटें । तैं कळिमळांचीं मळकटें । नामोद्धाटें नासती ॥५३॥ ऐशी रामनामाची ख्याती । जगदुद्धारें केली कीर्ती । धन्य धन्य जे परिसती । धन्य जे गाती रामचरित ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

भूमेर्भरावतरणाय यदुष्वजन्मा जातः करिष्यति सुरैरपि दुष्कराणि । वादैर्विमोहयति यज्ञकृतोऽतदर्हान् । शूद्रान् कलौ क्षितिभुजो न्यहनिष्यदन्ते ॥२२॥

आतां भावी अवतारवार्ता । तुज मी सांगेन नृपनाथा । श्रीकृष्णावतारकथा । परमाद्भुता विचित्र ॥५५॥ जो परेहून परात्परु । जो कां अजन्मा अक्षरु । जो श्रुतिशास्त्रां अगोचरु । तो पूर्णावतारु 'श्रीकृष्ण' ॥५६॥ जेथें नाममात्र रिघों न लाहे । जेथें रूपाची न लभे सोये । ज्या ब्रह्मत्व अंगीं न साहे । तो अवतार पाहें श्रीकृष्ण ॥५७॥ जो वर्णाश्रमांसी नातळे । ज्यासी ईश्वरत्वही वोंविळें । जो अज अव्यय स्वानंदमेळें । तो अवतारु स्वलीलें श्रीकृष्णनाथु ॥५८॥ ऐसा गुणधर्मकर्मातीतु । तो अवतारु श्रीकृष्णनाथु । प्रगटला यदुवंशाआंतु । स्वयें जगन्नाथु स्वइ।च्छें ॥५९॥ जैसें खळाळ कल्लोळ चंचळ । भासे परी तें केवळ जळ । काळी भरडी पांढरी चोळ । परी ते केवळ वसुधाचि ॥२६०॥ जे गोडी नाबदरासीं । तेचि वेगळी रवेयासी । तैसा अवतार यदुवंशीं । पूर्णांशेंसीं श्रीकृष्ण ॥६१॥ जैसा दीपु लावितां तत्क्षणीं । सवेंचि प्रगटे तेजाची खाणी । तैसा उपजतांचि बाळपणीं । अभिनव करणी स्वयें केली ॥६२॥ जें ब्रह्मादिक देवां नव्हे । तें बाळलीलास्वभावें । करूनि दाविलें आघवें । देवाधिदेवें श्रीकृष्णें ॥६३॥ वणवा गिळिला मुखें । पर्वत उचलिला नखें । पूतनेचें स्तन विखें । प्याला निजमुखें जीवासगट ॥६४॥ जेणें वत्सहरणमिसें । स्त्रष्टयासही लाविलें पिसें । जो वत्सवत्सपवेशें । झाला सावकाशें एकाकी एक ॥६५॥ अघ चिरिला जाभाडा । काळियाच्या कुटिल्या फडा । यमलोकीं घेऊनि झाडा । आणिला रोकडा गुरुपुत्र जेणें ॥६६॥ जे प्रजा पीडूनि कर घेती । जयां नावडे धर्मनीती । ऐसे राजे भारभूत क्षितीं । नेणों किती निर्दाळिले ॥६७॥ एकां सैन्यें एकां स्वांगें । एकां वधवी आन प्रयोगें । एकां गोत्रकलहप्रसंगें । अग्रपूजायोगें एकांसी ॥६८॥ अधर्मा लावील सीक । धर्माचें वाढवील बिक । हें अवतारकौतुक । राया तूं आवश्यक देखशील पुढां ॥६९॥ जैं जैं लोटेल अहोरात्र । तैं तैं करील नवें चरित्र । तया कृष्णसुखासी पात्र । भक्त पवित्र होतील ॥२७०॥ साधूंसी स्वानंदसोहळा । नित्य नवा होईल आगळा । ते श्रीकृष्णाची लीला । देखसी डोळां नृपनाथा ॥७१॥ तोचि बौद्धरूपें जाण । पुढां धरील दृढ मौन । तेव्हां कर्माकर्मविवंचन । सर्वथा जाण कळेना ॥७२॥ तो तटस्थपणें सदा । प्रवर्तवील महावादा । तेणें वादमिसें सदा । वाढवील मदा महामोहातें ॥७३॥ मोह उपजवील दुर्घट । एक कर्मीं करील कर्मठ । एक होतील कर्मभ्रष्ट । न कळे चोखट निजात्महित ॥७४॥ कैसें माजवील मत । वेद मिथ्या मानित । वेदविहिता नातळत । तो जाण निश्चित महामोहो ॥७५॥ मोहें केला सर्वांसी छळ । एकां ज्ञानाभिमान प्रबळ । ते कर्म निंदिती सकळ । त्यागिती केवळ जाड्य म्हणौनी ॥७६॥ ऐशिये वर्ततां मोहस्थिती । पूर्ण कळीची होय प्रवृत्ती । तेव्हां नीच ते राजे होती । प्रजा नागविती चोरप्राय ॥७७॥ शूद्राहूनि अतिकनिष्ठ । राजे होती परम श्रेष्ठ । वर्णावर्ण करिती भ्रष्ट । अतिपापिष्ठ अधर्मी ॥७८॥ अपराधेंवीण वितंड । भलेत्यांसी करिती दंड । मार्गस्थांचा करिती कोंड । करिती उदंड सर्वापहरण ॥७९॥ अबळांचें निजबळ राजा । तो राजाचि स्वयें नागवी प्रजा । ऐसा अधर्म उपजे क्षितिभुजां । तें गरुडध्वजा न साहवे ॥२८०॥ जेव्हां स्वधर्माचें जिणें । अधर्में निलाग गांजणें । यालागीं श्रीनारायणें । अवतार धरणें 'कल्की' नामा ॥८१॥ तो शस्त्रधारा प्रबळ । नष्ट राजे निर्दाळील सकळ । महामोहाचें मूळ । स्वयें समूळ उच्छेदील ॥८२॥ तेव्हां धर्माची पाहांट फुटे । सत्यासी सत्त्व चौपटे । तेव्हां वेदोक्त विधान प्रगटे । स्वधर्मराहाटें राहटती सर्व ॥८३॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

एवंविधानि कर्माणि जन्मानि च जगत्पतेः । भूरीणि भूरियशसो वर्णितानि महाभुज ॥२३॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे चतुर्थोऽध्यायः ॥४॥ जयाचीं गा अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में । अनंत चरित्रें अनंत कर्में । अनंतोत्तमें हरिकीर्ती ॥८४॥ अगाध भगवंताचा महिमा । त्याच्या पार नाहीं जन्मकर्मा । त्याचा अनुष्टुप् हा महिमा । तुज म्यां नरोत्तमा निरूपिला येथें ॥८५॥ ऐशीं अवतारचरित्रनामें । परिसतां विचित्र कर्में । राजा अत्यंत सप्रेमें । मनोधर्में निवला ॥८६॥ जे जे अवतारीं देवो सगुण । जाहला परी निर्गुणाचे गुण । प्रकट करीतचि आपण । कर्माचरण स्वयें दावी ॥८७॥ धन्य धन्य ते हरिगण । जे वर्णिती भगवद्गुण । ज्यांचेनि वचनें संपूर्ण । निवे अंतःकरण श्रोत्यांचें ॥८८॥ श्रोत्यांचें अवधान निवे । तेथ वक्ता स्वानंदसुख पावे । ग्रंथ वोसंडे स्वभावें । साहित्यगौरवें रसाळ ॥८९॥ जेवीं चंद्रकरें साचा । मुखबंध सुटे चकोरांचा । तेवीं एका जनार्दनाचा । संतकृपा वाचा फुटली त्यासी ॥२९०॥ जेवीं सूर्यकिरणस्पर्शें । कमळकळी स्वयें विकासे । तेवीं संतकृपासौरसें । ग्रंथु विकासे अर्थावबोधें ॥९१॥ तेचि कृपेनें तत्त्वतां । अर्थिलें श्रीभागवता । आतां पंचमाध्यायीं कथा । सावध श्रोतां अवधारिजे ॥९२॥ राजा प्रश्न करील गोड । जो परिसतां पुरेल कोड । साधकांची उपशमेल चाड । होय निवाड धर्माधर्माचा ॥९३॥ जेथ भजना भजनहातवटी । प्रश्नोत्तरें कथा गोमटी । अतिशयें रसाळ गोठी । जेणें सुटे गांठी अधर्माची ॥९४॥ तें उत्तमोत्तम निरूपण । भरीत संतांचे श्रवण । जनार्दनकृपा पूर्ण । एका जनार्दन सांगेल ॥९५॥ अंगीं वारियाचेन संचरणें । घुमारा घुमों लागे तेणें । तेवीं एकाजनार्दनें । कविता करणें निजांगें ॥२९६॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायंतसंवादे एकाकारटीकायां चतुर्थोऽध्यायः ॥४॥

श्रीकृष्णार्पणमस्तु (॥श्लोक २३॥ओंव्या॥२९६॥)


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]