एकनाथस्तव

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

श्रीभागवतवरानें केलें यश शुद्ध एकनाथानें;

एणें प्रमुदित झाला साधु, जसा बाळ सेविता थानें. ॥१॥


भूतदया संसारीं एकोपंतासि निरुपमा घडली;

जडली आंगासींच क्षांति सदा; शांति तों गळां पडली. ॥२॥


एकोबाची सेवा आवडली फ़ार केशवा देवा;

रोमांचिततनु झाल्या गंगा, कृष्णा, कलिंदजा, रेवा. ॥३॥


अत्यद्भुत यश हरिचें जेंवि, तसें एकनाथपंतांचें.

तेंतें साचें, जें जें वर्णितसे चरित वृंद, संतांचें. ॥४॥


भूताराधनयज्ञीं समदर्शी एक परम हा रमला.

द्रवुनि म्हणे, ‘ पित्रन्नें भोज्य, जगन्निंद्य, पर, महार मला. ’ ॥५॥


एकोपंत जनार्दनपंताचें भजनही असीम करी;

याची मति गुरुचरणीं, भक्ष्यीं घालि न मिठि असी मकरी. ॥६॥


कथिती एकोबाच्या चरणांची अद्भुताचि बा ! शुचिता.

रक्षी बाळ सतीचा, तत्तनुतें भस्म करुनि आशु चिता. ॥७॥


श्रीज्ञानेश्वर भेटए एकोबाला, तसाचि अत्रिज, गा !

हें किति ? दास्य करि प्रभु, ज्याहुनि आधार अन्य न त्रिजगा. ॥८॥


ग्रंथ श्रीभागवत, श्रीरामायण, करी सुविस्तर. ते

जरि न रचिता दयानिधि, केवळ जड जीव तरि कसे तरते ? ॥९॥


विश्वेश्वर अविमुक्तिं, विठ्ठल पंढरपुरीं, प्रतिष्ठानीं

प्रभु एकनाथ, वरिला सर्वमहितदैवतप्रतिष्ठानीं. ॥१०॥


संत म्हणति ‘ आठवती, ’ किति म्हणती, ‘ आठवे अळंदी न. ’

पाहुनि वृंदावन तें, तैसें हेंही, म्हणे, ‘ अळं ’ दीन. ॥११॥


ज्या पैठणांत षष्ठी, तो संसारी नव्हे कधीं कष्टी.

हे स्वस्थाना नेत्ये, रक्षुनि, अंधाबळा जसी यष्टी. ॥१२॥


भक्तांसि नाथ, जैसा विश्वाचा मायबाप हर, पावे;

साक्षात् भगवान् हा, कीं या भजतां सर्व ताप हरपावे. ॥१३॥


प्रभुभक्त प्रभुरूप स्पष्ट, म्हणुनि, एकनाथ हा भावे

स्तविला भक्तामयूरें; कीं एणें सर्व इष्ट लाभावें. ॥१४॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.