Jump to content

ऋषिपंचमीची कहाणी

विकिस्रोत कडून

एका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढं एके दिवशीं काय झालं? त्याची बायको शिवेनाशी झाली, विटाळ तसाच घरांत कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मीं बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म झाला. देवाची करणी! दोघंहि आपल्या मुलाच्या घरीं होतीं. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचर घेई.

एके दिवशीं त्याच्या घरीं श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, “आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा स्वयंपाक कर.” ती मोठी पतिव्रता होती. तिनं चार भाज्या, चार कोशिंबिरी केल्या. खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यांत काय चमत्कार झाला? खिरीचं भांडं उघडं होतं त्यांत सर्पानं आपलं गरळ टाकलं. हें त्या कुत्रीनं पाहिलं. मनांत विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली. पटकन खाऊन खिरींच्या पातल्याला शिवली.

ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं. नि कुत्रीच्या कंबरेंत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवूं घातलं. कुत्रीला कांहीं उष्टंमाष्टं देखील घातलं नाहीं. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हां ती आपल्या नवर्‍याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडूं लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, “मी उपाशी आहे. मला अन्न नाहीं, पाणी नाहीं, खिरीच्या पातेल्यांत सर्पानं गरळ टाकलं, तें माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवलें. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कोलीत माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करूं?”

बैलानं तिला उत्तर दिलं, “तूं आदल्या जन्मीं विटाळशीचा विटाळ घरांत कालविलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालों. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं, मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं.” हें भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनांत फार दुःखी झाला.

दुसरे दिवशीं सकाळीं उठला, घोर अरण्यांत गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, “तुं असा चिंताक्रांत कां आहेस?” मुलानं सांगितलं, “माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे, आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल? ह्या चिंतेत मी पडलों आहे. कृपा करून मला उपाय सांगा.” तेव्हां ऋषींनीं सांगितलं, “तूं ऋषिपंचमीचं व्रत कर. तें व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पक्षांतली पंचमी येते. त्या दिवशीं काय करावं?

ऐन दुपारच्या वेळीं नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आंवळकाठीं कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे, मग आंघोळ करावी, धुतलेलीं वस्त्रें नेसावीं. चांगल्या ठिकाणीं जावं. अरुंधतीसह सप्तऋषींचीं पूजा करावी. असं सात वर्ष करावं. शेवटीं उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहींसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं. नानाप्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनीं इच्छिलं कार्य होतं.”

मुलानं तें व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापांस दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहींसा झाला. आकाशांतून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानांत बसून स्वर्गाला गेलीं. मुलाचा हेतु पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.