Jump to content

इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र

विकिस्रोत कडून

इस्लामी संस्कृति
खंड पहिला
मुहंमद पैगंबर चरित्र



साने गुरुजी



प्रस्तावना
विनोबाजी भावे
उपराष्ट्रपती डॉ० झाकिर हुसेन






साधना प्रकाशन, पुणे




इस्लामी संस्कृति













महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळाकडून पुरस्कृत

इस्लामी संस्कृति
खंड पहिला
मुहंमद पैगंबर चरित्र



साने गुरुजी



प्रस्तावना
विनोबाजी भावे
उपराष्ट्रपती डॉ० झाकिर हुसेन






साधना प्रकाशन, पुणे









प्रथमावृत्ति
साने गुरुजी जयंति
डिसेंबर २४, १९६४
प्रकाशक
प्रभाकर सिद्ध
साधना प्रकाशन
४३०-३१ शनवार, पुणे
मुद्रक
वि. नी. पटवर्धन
साधना प्रेस
४३०-३१ शनवार, पुणे
© साधना ट्रस्ट
किंमत
चार रुपये
अनुक्रमणिका

निवेदन
प्रास्ताविक चार शब्द : विनोबाजी भावे
इंग्रजी प्रस्तावना व मराठी अनुवाद : उपराष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन
मानव समाजाच्या अभ्यासाचीं चार रूपें
इस्लामची जन्मभूमि
वेदुइनांचें मुक्तजीवन
अरबांच्या उदारतेचा प्रतिनिधि हातिम १६
अरबजीवनांतील काव्य १९
अरबस्थानांतील स्त्रीजीवन २३
अरबस्थानांतील परिस्थिति आणि लोकांचा स्वभावधर्म २७
त्रिखंडाशी संबंधित अरबभूमि ३०
मुहंमदांचा जन्म ३८
१० मुहंमदांचे पूर्वज ४१
११ मुहंमदांचे आरंभींचें जीवन ४५
१२ बिन गाजावाजाचीं पंधरा वर्षे ५०
१३ प्रकाश पर्वतावरील ईश्वरी संकेत ५२
१४ मुहंमदांचे पहिले अनुयायी ५७
१५ प्रचारांत प्रखरता ६१
१६ बाणेदार धर्मनिष्ठा ६७
१७ कसोटीचा काळ ७४
१८ आशानिराशांचे झोके ८०
१९ नवराष्ट्र निर्मितीचे प्रयत्न ९२
२० नवशासन तंत्र ९८
२१ रक्ताचे पाट वाहिले ! १०२
२२ ज्यूंशी झगडा १०६
२३ अपार उदारता ११३
२४ संकटांचा मुकाबला ११७
२५ विजयी वीराप्रमाणें पुन्हां मक्केत १२०
२६ धर्मप्रसार १२६
२७ मुहंमदांचें सफल जीवन १३२
२८ अखेरचा उपदेश १३६
२९ निरवानिरव १४०
३० क्षमामूर्ति मुहंमद १४५
३१ दिव्यभव्य जीवन १५१
निवेदन

'इस्लामी संस्कृति' या साने गुरुजींनी लिहिलेल्या ग्रंथाचा हा पहिला खंड. या खंडांत मुहंमद पैगंबरांचं जीवनच प्रामुख्याने आलेले आहे.
 साधना परिवारांतील एक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. मुइनुद्दीन हारिस यांच्या साह्यामुळे हा पहिला खंड आज प्रकाशांत येऊ शकला. यापुढील खंडांच्या प्रकाशनांतहि त्यांचं असेंच साह्य मिळेल. परंतु या संकल्पित ग्रंथाचा कांहीं भाग पुस्तक रूपांत लिहून झालेला आहे, तसाच कांहीं भाग टीपा टिपणांच्या रूपानें एकत्र केलेला आहे. महाराष्ट्रांतील तरुण अभ्यासकांना हे एक आव्हानच आहे.
 या ग्रंथप्रकाशनासाठी दोन हजार रुपयांचे अनुदान देऊन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति-मंडळाने जे साह्य केलें तें उल्लेखनीय आहे.
 पू. विनोबाजी व उपराष्ट्रपति डॉ. झाकिर हुसेन साहेब यांनी साने गुरुजींच्या या पुस्तकाबद्दल आपुलकीनं प्रास्ताविक चार शब्द लिहिले. त्याबद्दल त्यांच्या ऋणांत राहणेंच साधना प्रकाशनाला श्रेयस्कर वाटतें. या थोरांचे आशीर्वाद साधना संस्थेला असेच सतत मिळावेत व मिळवतां यावेत.
 'इस्लामी संस्कृति' या ग्रंथाचे पुढील खंड प्रकाशित करता आले तर साधनेला धन्य वाटेल.
 भारताला रवींद्रनाथ 'महामानवेर सागर' असे संबोधीत असत. विविधतेंतील ऐक्य अनुभवण्याची कुवत जनतेत असली तर विविधता वैभवाला कारणीभूत ठरते, नाहीं तर वैराग्नीत ती समाजाला लोटून देते. विविधतेंतून वैभव निर्माण करण्यासाठी भावजीवनाची जी बैठक तयार करावी लागते ती तयार करण्याचे एक साधन या दृष्टीनेच आपल्या अखेरच्या दिवसांत साने गुरुजींनीं आन्तर भारतीचा ध्यास घेतला होता. इस्लामी संस्कृतीच्या प्रकाशनाचा हा उपक्रम त्या दृष्टीनें उपकारक ठरेल अशी आशा आहे.
 साने गुरुजींचें अप्रकाशित व अनुपलब्ध असें सर्व साहित्य उपलब्ध व्हावें असा साधना प्रकाशनाचा संकल्प आहे. सर्वांच्या सहकार्यानेच तो सिद्धीस जाऊं शकेल. तसें सहकार्य सर्वांनीं द्यावें, ही प्रार्थना.

-प्रकाशक





प्रास्ताविक चार शब्द

साने गुरुजींच्या पैगंबर चरित्राला मी प्रस्तावनारूप चार शब्द लिहावे, अशी श्री. यदुनाथ थत्ते यांनी मागणी केली आणि मी सहजच ती मान्य केली. अलीकडे मी अशी गोष्ट सहसा स्वीकारीत नाहीं. पण गुरुजींची मुरवत तुटेना.
 गुरुजींनी हे चरित्र भाविकपणानें लिहिलें आहे, ज्या भाविकपणाची अपेक्षा एखाद्या निष्ठावंत मुसलमानाकडून करता येईल. 'सर्वधर्मी समानत्व' ही भावना गुरुजींच्या ठिकाणीं मुरलेली होती. त्यामुळे हे शक्य झालें.
 चरित्रग्रंथाच्या वाचकाच्या ठिकाणीं एक विवेक लागतो. आपल्याला थोरांच्या चरित्राचें अनुकरण करायचे नसतें, त्यांचे चारित्र्य घ्यायचें असतें- हा तो विवेक होय. आणि प्राचीन पुरुषांच्या चरित्राला तो विशेषच लागू असतो. कारण ते आपल्यापासून कालतः दूर असतात. म्हणून 'तुका म्हणे सार धरी.'
 इस्लामच्या निष्ठेत अवतारवाद येत नाहीं. केवढ्याहि मोठ्या पुरुषाला ईश्वराच्या जोडीला बसवणं योग्य नाहीं, असें इस्लामचें समंजस मत आहे.
 या उलट, सर्वच ईश्वरमय असल्यामुळे, 'यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ'. अशा सहृदय चित्तालाच ज्ञानप्रकाश लाभायचा, असा वैदिकांचा गूढ अभिप्राय आहे.

मग अशा वादांत आम्ही काय करावें? निदान मुहंमदांबाबत विचार करतांना इस्लामचें मत ग्राह्य समजावें.
 संबंध कुराण वाचून मुहंमदांच्या जीवनचरित्राविषयीं फारशी माहिती उपलब्ध व्हायची नाहीं. कृष्णचरित्राशिवाय भागवत, आणि खिस्तचरित्राशिवाय नवा करार असा हा प्रकार आहे! त्यांतील गोडी लक्षांत घेऊन वाचकानें प्रस्तुत चरित्र विवेकपूर्वक वाचावें.
 हिंदु आणि मुसलमान हजार वर्षांपासून भारतांत एकत्र राहत आहेत. तथापि एकमेकांच्या थोर पुरुषांविषयीं आणि धर्मग्रंथांविषयीं एकमेकांना, पुरेशी काय, फारशी माहिती नसते. ती असणें जरूरी आहे. कारण आम्हांला एकत्र नांदायचं आहे. आणि एकत्र नांदून, विविधतेंत एकता कशी राखतां येते, इतकेंच नव्हे, विविधतेनेंच एकता कशी खुलते, हे जगाला दाखवायचे आहे.
 या दृष्टीने प्रस्तुत पुस्तक विशेष स्वागतार्ह आहे.
 एवढ्या चार शब्दांत, यदुनाथस्तृप्यतु.

ब्रह्मविद्यामंदिर, पवनार
११-१०-६४
विनोबाचा जय जगत
 


 I am very happy to learn that the first part of the late Shri Sane Guruji's work on Islamic civilization is being published on the 24th of December, 1964, the author's birthday. The admirers of Shri Sane Guruji could not have celebrated the day in a better way. Shri Sane Guruji influenced many a young life as a devoted teacher, and as the founder of the Rashtra Seva Dal. He contributed in significant measure to the building up of a sound public opinion- the basis for all true democratic life- through his prolific pen and as the founder of the Sadhana and the Sadhana Prakashan. To help in bringing about a true mutual understanding between various elements of the variegated pattern of our national life was one of the dominating urges of Shri Sane Guruji's life. It was this, I guess, that made him write this book while he was an inmate of the Dhulia Jail in 1931 for the crime of working for the freedom of his people. The work is incomplete and was found among his papers after his unfortunate death in 1950.
 The manuscript was read by my valued friend Shri M. Harris and, on his advice, the first part is being published as a seperate volume. It deals with the life of the Prophet Muhammad. It is an exquisite example of sympathetic understanding and a genuine appreciation of a life that has meant such a great deal for humanity and a true appreciation of whose work and mission can be of immense help in the process of our own national integration. The author has in unusual measure succeeded in entering the spirit of his subject.
 There are, I understand, not many books on the life of the Prophet in Marathi and I am sure this one will be widely read and will make a distinct contribution towards a better understanding of Islam and the Prophet.
 I am glad to know that the late author's friends and admirers are continuing his great work and should like to congratulate them on the publication of this valuable book.


(ZAKIR HUSAIN)





भावनात्मक ऐक्याला उपकारक ग्रंथ

उपराष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांच्या इंग्रजींतील संदेशाचा मराठी अनुवाद

साने गुरुजींच्या इस्लामी संस्कृतीवरील ग्रंथाचा पहिला खंड २४ डिसेंबर १९६४ ला, लेखकाच्या जन्मदिवशीं, प्रसिद्ध होत आहे याबद्दल मला फार आनंद वाटत आहे. साने गुरुजींच्या चाहत्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी ठरविलेला हा कार्यक्रम अन्य कोणत्याहि कार्यक्रमापेक्षा अधिक औचित्यपूर्ण आहे. साने गुरुजी एक निष्ठावान शिक्षक म्हणून सुपरिचित आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या संस्थापकांत त्यांची गणना होते. असंख्य तरुणांचीं मनें त्यांनी घडवली.
 साने गुरुजींनी विपुल लेखन केले आणि साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांची संस्थापना केली. या साहित्यसाधनेतून, लोकशाही जीवनपद्धतीसाठी आवश्यक असणारें अधिष्ठान जें जागृत लोकमत, तें निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. आपल्या राष्ट्राच्या जीवनांतील वेगवेगळी वैशिष्टयें असणाऱ्या घटकांना एकमेकांची खरीखुरी ओळख पटावी व त्यांतून त्यांच्यांत स्नेह निर्माण व्हावा ही साने गुरुजींच्या मनांतील एक प्रबळ प्रेरणा होती. मला वाटतें या प्रेरणेमुळेच, स्वातंत्र्यसंग्रामांत भाग घेतल्याबद्दल धुळे तुरुंगांत १९३१ सालीं कारावास भोगत असतांना, त्यांनीं हें पुस्तक लिहिलें. हा त्यांचा ग्रंथ अपुरा आहे. १९५० साली झालेल्या त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या उर्वरित कागदपत्रांत हें हस्तलिखित होते.
 माझे सन्माननीय मित्र श्री. एम्. हारिस यांनी हें हस्तलिखित वाचलें आणि त्यांच्या सल्ल्यावरूनच या हस्तलिखिताचा पहिला भाग ग्रंथरूपाने प्रसिद्ध होत आहे. या भागांत मुहंमद पैगंबरांचं जीवनचरित्र आले आहे.
 पैगंबरांचें जीवन मानवजातीच्या दृष्टीनें अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या जीवित-कार्याचें व त्यांच्या संदेशाचे खरेखुरे महत्त्व पटले तर आपल्या देशांत भावनात्मक ऐक्य निर्माण होण्याच्या प्रक्रियेस मोठीच मदत होईल. या ग्रंथांत पैगंबरांच्या कार्याचं महत्त्व लेखकानें ज्या सहृदयतेनें व सहानुभूतीनें जाणलें आहे आणि ज्या सहज आणि उत्कट रीतीनें या कार्याचा गौरव केला आहे, ती रीत अपूर्व आहे. लेखन-विषयाच्या अंतरंगांत प्रवेश करण्यांत लेखकानें असामान्य यश संपादन केलें आहे.
 मराठींत महंमद पैगंबरांच्या जीवनावर फारशी पुस्तकें नाहींत. माझी खात्री आहे कीं, साने गुरुजींचा हा ग्रंथ अनेक मराठी वाचक वाचतील आणि या वाचनामुळे अनेकांना पैगंबरांचं व इस्लामचे आकलन अधिक चांगल्या रीतीनें होईल.
 साने गुरुजींच्या मित्रांनीं व चाहत्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवलें आहे याचा मला फार संतोष वाटतो. हा मौलिक ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.



या जगांत महान् विभूति जन्माला येतात, लोकोत्तर पुरुष जन्माला येतात. जगाच्या गाड्याला ते प्रचंड चालना देतात. एखादा बुद्ध, एखादा ख्रिस्त, एखादा मुहंमद येतो व कधींहि न संपणारी गति व प्रेरणा जगाला देतो. या ज्या महान् व्यक्ति असतात, त्यांनाहि सारेच स्वतःच्या इच्छेप्रमाणे करतां येतें असे नाहीं. तेहि कांहीं अंशीं परिस्थितिशरण असतात. स्वतःच्या इच्छांना त्यांनाहि मुरड घालावी लागते. त्यांच्या मूळच्या कल्पना समाजांत शिरतांना बदलत असतात. त्या जशाच्या तशा रहात नाहींत. बुद्ध धर्मातील, ख्रिस्ती धर्मातील किंवा इस्लामी धर्मातील कल्पना मूळ धर्मस्थापकांच्या मनांत जशा असतील तशाच राहिल्या असें नाहीं. त्या लोकोत्तर विभूतींचा प्रचंड परिणाम झाला यांत संशय नाही. परंतु समाजव्यापक असे जे इतर प्रवाह, त्यांच्याशी या लोकोत्तर विभूतींच्या विचारप्रवाहासहि समरस व्हावे लागलें. तेव्हांच त्यांचे विचार पुढे जाऊं शकले. एरव्ही ते पुढे सरकते ना. कधीं मूळच्या कल्पना अधिक विकसित व प्रगल्भ होत, कधीं त्या विकृतहि होत; परंतु असें होणे अपरिहार्यच असतें. संस्कृतीच्या विशिष्ट पायरीवर असणाऱ्या लोकांच्या सर्वसामान्य गरजांना अनुरूप असेंच स्वरूप या नव विचारांसहि घेणें प्राप्त होतं. म्हणून इतिहास हा नेहमीं बनत असतो, वाढत असतो. इतिहास म्हणजे एक अखंड गतीचा प्रवाह आहे. भौगोलिक व आर्थिक परिस्थितीमुळे नवनवीन कल्पना येतात. आर्थिक जीवनाचें तर फारच महत्त्व असतें. समाजाच्या आर्थिक स्थितीमध्ये संस्कृतीची, त्या त्या समाजांतील गुणादुर्गुणांची मुळे असतात. संस्कृतीचा व कलांचा अभ्यास करतांना आर्थिक रचनेचा अभ्यास अत्यावश्यक असतो. नवीन नवीन काळांत नवीन नवीन दृष्टि येते. पूर्वीच्या कल्पनांना निराळे अर्थ मिळतात, त्यांना नवीन रंग चढतात. जुन्या संस्थांत नवीन अर्थ दिसतो. त्यांचं नीट परीक्षण निरीक्षण होऊं लागतें. म्हणून कोणत्याहि व्यक्तीचें व्यक्तिमत्त्व, विभूतीचें विभूतिमत्त्व पाहतांना तिच्या सभोवतीची परिस्थिति पाहणें आवश्यक असतें. परिस्थितीच्या प्रभावळींतच त्या त्या व्यक्तीचें सम्यक् दर्शन आपण घेऊं शकतों. कोणी म्हणतात, परिस्थिति माणसाला बनवते. कोणी म्हणतात महापुरुष परिस्थितीला कलाटणी देतात. सत्य दोहोंच्यामध्ये आहे. परिस्थिति माणसाला बनविते व माणूसहि परिस्थितीला रंगरूप देत असतो. व्यक्ति व समाज एकमेकांवर परिणाम करीत असतात. समाजच नव्हे तर बाह्य भौगोलिक स्थितिहि व्यक्तीवर परिणाम करत असते. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे अनंत इच्छाशक्तींचे अन्योन्य परिणाम. इतिहास म्हणजे मानवी मन व बाह्य परिस्थिति यांचे अन्योन्य परिणाम होऊन सतत बनत जाणारा महान् प्रवाह. इतिहासाकडे पाहण्याची ही अत्यन्त शास्त्रीय दृष्टि आहे.
 समाज पायऱ्यापायऱ्यांनी वाढत आला आहे. सृष्टि एकदम कधीं उडी मारीत नाहीं. मार्क्सवादी म्हणतात कीं कधीं कधीं एकदम उड्या मारण्यांत येत असतात. परंतु या ज्या उड्या वाटतात, या ज्या बाह्यतः क्रांति किंवा उत्पात वाटतात, त्याहि उत्क्रान्तींतीलच एक प्रकारच्या पायऱ्या असें दुसरे म्हणतात. सर्वत्र सर्जन व विनाशन सदैव चालले आहे. हरघडी मोडतोड, अंतर्बाह्य चालली आहे. प्रत्येक क्षणाला जन्ममरण आहे. कांहीं तरी जातें, कांहीं नवीन येतें. क्रांति म्हणजे उत्क्रान्तीचें जरा विशाल व भव्य स्वरूप!
 सामान्यतः व्यक्तीच्या जीवनांत जे नियम तेच समाजाच्याहि. आपण पदोपदीं कांटेकोर विचार करून थोडेच वागत असतो. प्रत्येक क्षणीं साधकबाधक विचार करीत कोण बसतो? पुष्कळ वेळां विचार आपल्यावर लादला जातो. आपण खातों, पितों, झोपतों त्या वेळेस का मोठी विचारक्रिया चालू असते? परंतु जेव्हां एखादा प्रश्न उद्भवतो, तेव्हांच आपली बुद्धि जागते. आपला दैनंदिन सामान्य व्यवहार म्हणजे आपल्या ठरीव संवयींचा, आपल्या लहरींचा, वासना विकासांचा परिणाम असतो. बुद्धि दरक्षणीं येत नाहीं. बुद्धि देवता ही मागून येते. संवयींना बुद्धीनें सुसंस्कृतपणा आला असेल. परंतु तेयें बुद्धि असतेच असें नाहीं, बुद्धि नेहमी मागे राहाते, आणि संवय, आपले रागद्वेष आपल्या आवडीनावडी यांनाच अग्रस्थान असतें.
 जसें व्यक्तीचें तसेंच समाजाचेहि. समाजसुद्धां संवयी, रूढि, रागद्वेष यांनींच वागतो. म्हणून समाजांतील रूढि, आवडीनावडी, दंतकथा, भावना, वासनाविकार या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. बुद्धिवादाइतकीच त्यांच्या अभ्यासाचीहि जरूरी असते. समाजाचा इतिहास बुद्धीपेक्षांहि रूढि व दंतकथा यांनीं अधिक बनवला आहे. इतिहास पाहणाऱ्याने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतां कामा नये. शास्त्रज्ञाला सोनें किंवा खडू सारख्याच किंमतीची. विचाराच्या तत्त्वज्ञानाच्या उच्च स्वरूपांचा अभ्यास जसा महत्त्वाचा तद्वत् अंधविश्वास, चालीरीति, भोळसट कल्पना, लोकरूढि, दंतकथा यांचा अभ्यासहि महत्त्वाचा. मानवी जीवनावर या सर्वांचा कसकसा परिणाम होतो हे पाहिले पाहिजे.
 मानवी समाजाचा अभ्यास तीन रूपांत करायचा असतो.
 १. भौतिक, भौगोलिक, आर्थिक स्वरूपांत,
 २. भावनात्मक स्वरूपांत,
 ३. बौद्धिक स्वरूपांत.
 मानवी सुधारणेचा विचार करतांना बाह्य जीवन, कलात्मक जीवन, वैचारिक जीवन या तिहींचा विचार करावा लागतो. आणि उत्क्रान्तीच्या वा क्रांतीच्या दृष्टीनें करावा लागतो. चौथीहि एक गोष्ट असते. ती म्हणजे आध्यात्मिकता. आपल्या वरील त्रिविध जीवनाचे सार म्हणजे आपली आध्यात्मिकता. म्हणजे भौतिक, भावनात्मक व वैचारिक गोष्टींचा आपल्या मनावर होणारा परिणाम. कोणी म्हणतात की वैचारिक स्वरूपांत ही गोष्ट येऊन गेली. परंतु वैचारिक जीवनाच्याहि पलीकडे जाणारी आध्यात्मिकता असते.
 संस्कृतीचा भौगोलिक व आर्थिक परिस्थितीशी फार निकट संबंध असतो. आपलाच हेका धरणारे अंध लोक कांहीं म्हणोत, मनुष्य हा परिस्थितीचा प्राणी आहे, ही गोष्ट नाकरतां येणार नाहीं. मनुष्य आणखीहि कांहीं अधिक असतो. परंतु परिस्थितीचाहि तो असतो. शंभरांपैकी नव्वद लोक परिस्थिति- शरण असतात. एखाद्या विशिष्ट देशांतील संस्था कोणत्याहि असोत. त्या त्या संस्था त्या त्या देशांतील विशिष्ट परिस्थितीमुळेच संभवल्या असे दिसून येईल. मुहंमदांनीं जो धर्म दिला, जे नियम दिले, जी नीति दिली, ज्या संस्था दिल्या त्यांचें स्वरूप नीट समजण्यासाठी अरबस्थानची परिस्थिति पाहिली पाहिजे. अरबस्थानांतील परिस्थितीच्या प्रभावळीत मुंहंमदांस पाहूं या, म्हणजे त्यांचें कार्य नीट कळेल. कोणत्या मर्यादांत, कोणत्या लोकांत, कोणत्या प्रदेशांत, कोणत्या परिस्थितींत त्यांना काम करायचें होतें तें पाहूं या.

■ ■ ■


तें पहा अरबस्थान. ईजिप्त व असीरिया यांच्यामधला हा प्रदेश. एक चमत्कृतिमय प्रदेश. कोणालाहि शरण न जाणारा व कोणासहि फारसा माहीत नसलेला प्रदेश, सीझर व खुश्रू यांच्या फौजा जात-येत, तेव्हांच थोडासा परिचय या देशाचा होई. इराण, ईजिप्त, रोम, बायझंटाईन सर्वांनी हा प्रदेश जिंकण्यासाठी प्रयत्न केले. परंतु प्रयत्न अपेशी ठरले. आणि अलेक्झांडरहि आपली स्वप्ने मूर्त करण्यासाठी जगता तर त्यालाहि या देशांत जीवनांतील
पराजयाचा पहिला धडा कदाचित् शिकावा लागला असता! प्राचीन काळची हीं सारीं राज्ये, साम्राज्ये गडगडतांना अरब पहात होता. तो स्पर्धाक्षेत्रांत कधीं शिरला नाहीं, युद्धक्षेत्रांत उतरला नाहीं. खुश्रु व सीझरचीं सैन्यें येत-जात, लढत. परंतु कोणाचीहि बाजू घेऊन अरबानें आपला हात उचलला नाहीं.
 असा हा शांत, स्वस्थ अरेबिया. आपल्या मुक्या निःस्तब्ध गूढतेंतून आतां प्रकट होणार होता. एक हजार वर्षेपर्यंत परकीयांच्या दृष्टिला दृष्टि न देणारा हा विजनवासी, एकान्तप्रिय अरब साऱ्या जगाचे डोळे स्वतःकडे ओढून घेणार होता. स्वतःच्या प्रेरणेनें अरबस्थान स्वतःच्या जीवनावरील पडदा फाडून देणार होतें. हे शांत स्तब्ध लोक साऱ्या जगांतील राज्यें, साम्राज्ये स्वतःच्या पायांपाशीं आणावयास उभे राहिले. आपल्या किल्ल्यांतून ते बाहेर पडले.
 साराच अरेबिया अज्ञात होता असें नाहीं. नकाशांत जरा पहा. आशियाच्या उजव्या कानांतील हा सुंदर लोलक जरा पहा. दक्षिणेस हिंदी महासागर, पूर्वेस इराणचे आखात, पश्चिमेस तांबडा समुद्र व उत्तरेस सीरियाचा वैराण भाग. अरबस्थानाचे सामान्यतः दोन भाग पाडतां येतील. मधला भाग मध्य अरबस्थान. हा केवळ वालुकामय प्रदेश आहे. आणि या वालुकामय प्रदेशाभोंवतीं समुद्राच्या तिन्ही बाजूंनी असणारा भाग हा दुसरा भाग. तसे इतर पुष्कळ भाग आहेत. हवा, पाणी, सुपीकपणा लोकांच्या चालीरीती, एवढेच नव्हे तर तोंडवळे यांतहि फरक आहेत. अरबस्थानच्या उत्तरेचा डोंगराळ मुलूख यांत अलहीरा हा भाग येतो. याला गत्सान असेंहि म्हणत. या भागाला रोम व इराण यांचं प्रभुत्व बहुधा आलटूनपालटून पत्करावेच लागे. पश्चिमेकडचा भाग हा सर्वात महत्त्वाचा आहे. या भागाला हिजाज असें नांव आहे. या भागांतच मदिना हें प्रसिद्ध व पवित्र शहर आहे. त्याचें इस्लामपूर्व नांव यसरिब असें होतें. मक्का शहर याच भागांत, मक्केची यात्रा करणारे हाजी लोक ज्या बंदरांत उतरतात तें जिद्दा बंदरहि याच भागांत. मक्का, मदिना हीं शहरे समुद्रापासून आंत आहेत. तांबड्या समुद्राच्या पूर्व किनाऱ्याकडे पाहा. लाल दगडाचे सुळके रागाने जणुं समुद्रांत घुसत आहेत असें येथें दिसेल. परंतु लाल लाटांच्या माऱ्याला भिऊन हे पहाड मांगें मांगें जात आहेत. चला त्यांच्या पाठोपाठ. किनाऱ्याकडून या पहा एका पाठीमागून एक अशा डोंगरांच्या, टेकड्यांच्या रांगा आहेत. आणि या टेकड्यांच्या अधूनमधून एखादी हिरवळीची दरी आहे. त्या हिरवळीच्या जागीं अरबांची एखादी वसाहत असायची. तेथे अरब आपल्या शेळ्या मेंढ्यांना पाणी पाजत आहेत असें दिसे. पावसाच्या पाण्यानें बनणारे प्रवाह तेथे टिकत नसत. तप्त भूमींत लगेच शोषले जात. परंतु वाळूत घुसलेल्या या पाण्यांतून मध्येच एखादा झरा अखंड व अनंत असा वाहतांना आढळे. वाळवंटांतील भटक्ये लोक अशा वनस्थलीस जीव कीं प्राण मानीत. आजूबाजूस उजाड, भगभगीत, रखरखीत भाग आणि मध्येच परमेश्वराची ही वहाती करुणा झुळझुळ करीत असे. अशा या मधल्या जागा बघत, टेकड्या चढा व उतरा. सर्वत्र एकच प्रकार दिसेल. आणि येतां येतां शेवटच्या सर्वांत उंच अशा रांगेवर तुम्ही याल. तेथून पूर्वेकडे पहा. काय बरें दिसतें? तुम्हांला अनंत निःस्तब्ध असें वाळवंट दिसेल. अरबांशिवाय तेथे कोण राहील? कोण जगेल? एकीकडे टेकड्या व एकीकडे अनंत वाळवंट. यांच्या मधल्या या भागाला हेज, हिजाज असें म्हणतात. या शब्दाचा अर्थ मधली जागा असा आहे. इस्लामची जन्मभूमि ती ही. इस्लामी धर्माचें बाळ येथें पाळण्यांत घातलें गेलें. या वाळवंटांतून पुढे गेलें कीं नज्दचे डोंगर- पठार येतें. हिजाज व नज्द या भागांतील अरब जातीच मुहंमदांच्या पहिल्या प्रथम अनुयायी झाल्या. या भागास सोडून नैऋत्येकडे चला. त्या भागास यमन म्हणतात. यमनच्या पूर्वस हद्रामूत हा भाग आहे. पूर्व किनाऱ्यापर्यंत हा भाग गेला आहे. पूर्वेस आर्म्सच्या आखाताजवळ आर्म्स भाग. पश्चिमेकडे अगदीं दक्षिणेकडे यमन आहे, तसाच पूर्वेकडे अगदी दक्षिणेस अम्मान हा भाग आहे. पूर्व व पश्चिम यांच्यामधील भागांत एके ठिकाणीं अल्-हझ नांवाचे वाळवंट आहे व ते थेट पुढे बहरैनपर्यंत पसरलेले आहे. या वाळवंटांतूनहि मधूनमधून सुपीक भाग आहेत. वाळवंटांतील हीं आधारस्थानें, निवासस्थानें!

■ ■ ■





किनाऱ्याजवळचे भाग सोडून अरबस्थानच्या अंतर्गत भागांत आपण जाऊं या. वरती अनंत निळे निळें आकाश व खालीं अनंत प्रशांत वाळवंट, अत्यंत स्वच्छ व ताजी हवा. सांगतात कीं या भागांत मनाची विशिष्ट स्थिति होते. एकदम भावना उचंबळतात. बुद्धीला, मनाला एकदम चालना मिळते. अनंत शांति. तेथें तुमच्याशिवाय कोण आहे? तुमच्या पावलांशिवाय कोणाचीं पावलें ऐकूं येणार? मधून एखादा गरुड दिसेल, एखादें पहाडी जनावर, शेळीमेंढी दिसेल. केवळ असीम शांति व स्तब्धता. जणुं अपार परमेश्वराच्या सन्निध आहोंत असें वाटतें. मुक्या अनंततेजवळ आहोंत असें वाटतें. एक प्रकारचा अननुभूत आनंद हृदयांत उसळतो असें म्हणतात. वृत्ति उत्तेजित होतात. प्रतिभेला पल्लव फुटतात. बांधून ठेवलेल्या, कोंडलेल्या मनोवृत्ति एकदम मुक्त होतात. त्या उड्या मारूं पाहतात. शरीरांत व मनोबुद्धींत एक प्रकारची विद्युत् संचरते, बुद्धीस चालना, चोदना मिळते. अरबांच्या मनावर हे सारे परिणाम होत असतील. त्यांच्या प्रतिभाशाली व कल्पनामय मनांत किती भाव उसळत असतील! कसे थरारत असतील! या अप्रकट मुक्या भावना मुहंमदांच्या 'अल्लाहु अकबर' या धीरगंभीर वाणींतून प्रकट झाल्या व जगभर पुढे गेल्या.
 या अंतर्गत भागांत राहणाऱ्यांना बेदुइन (बद्दू) म्हणत. या बेदुइनांची निसर्गाशी सतत लढाई. कढत वारे सुटत, प्रचंड वादळें होत, वाळूचे डोंगर आकाशांत उडत व खालीं कोठें पडत. अशा परिस्थितीमुळे विशिष्ट गुण बेदुइनांच्या अंगी आले. शेती करणारा एकाच ठिकाणी राहतो. परंतु बेदुइनांना शेती कोठली? ते सदैव भटकत. या भटक्या बेदुइनांचेहि दोन प्रकार असतात. शेळ्या मेंढ्या वाढवणारे व उंट वाढवणारे. शेळ्या मेंढ्या चारणारे वाळवंटांत खूप आंत जाऊं शकत नाहींत, ते कुरणाच्या जवळ, पाण्याच्या आसपासच रहात. परंतु उंटवाले वाळवंटांत आंत संचार करीत. अरबी बेदुइन हे विशेषतः उंट पाळणारे होते. उंटांना डोंगरांवरचा गवतपाला पुरा पडत नाहीं. वाळवंटांतील झाडेंच त्यांचे खाद्य. तसेच खारें मचुळ पाणी त्याला अधिक मानवतें. हिंवाळ्याच्या दिवसांत अंगांत ऊब रहावी म्हणूनहि उंटाला वाळवंटांत भटकावें लागतें. वितांना उंटिणीला वाळवंटाची जमीन हवी. उंटिणीला जशा प्रसववेदना होतात तशा क्वचितच कोणा प्राण्याला होत असतील! उंटिणीला प्रसूतिकाळीं उबेची फार जरूर असते. म्हणून उंट वाढवणारे बेदुइन अंतर्गत भागांत राहतात. माणसांपासून दूर रहातात. तेहि कमी माणसाळलेले व स्वैर असे त्यामुळे होतात. किनाऱ्याजवळ किंवा सुपीक भागांत जे अरब रहात त्यांचे जीवन बेदुइन कमी मानी. वाळवंटांतील स्वच्छंदी स्वतंत्रतेचं जीवन त्याला प्रिय वाटे. आजकालच्या जीवनांत किती गडबड, सारी धांवपळ. ती धावपळ ज्ञानार्थ असो वा धनार्थ असो. शांति तिळभर नाहीं. अखंड जोजार सुरू. सारा संसार जणुं छातीवर येऊन बसतो, मानगुटीस बसतो. अशा वेळेस आपण त्या बेदुइनांचे मुक्त जीवन जरा मनांत कल्पूं या. बेदुइनाचें जीवन म्हणजे एखाद्या अल्लड मुलासारखें जीवन. स्वच्छंद, हेतुहीन, समाधानी, आनंदी, संपूर्ण जीवन. स्वतःच्या साध्या जीवनांत त्याला अपार समाधान असे, तो सुखी असे, कारण तो यथार्थपणे जगत असे. त्याला अधिकाची इच्छा नसे. त्याला केवळ एकच भीति असे. ती म्हणजे मरणोत्तर जीवनाची! हा विचार आपल्या मनांतून तो पार दवडी. जगांत कोणाचीहि त्याला भीति वाटत नसे. ना मानवाची, ना संकटाची. उद्यांचा विचार तो करीत नसे. जी जी परिस्थिति येईल तिचा पुरेपुर उपभोग घ्यायला तो तयार असे. संकट आले, सहन करी. सुख आले भोगी. आज या क्षणीं जें सुख आहे ते भोगूं दे. जीवनाचा पेला त्यांतील थेंबन् थेंब पिऊं दे. त्या सुखाच्या क्षणीं दुसरे विचार मनांत आणून तें सुख तो मलिन करीत नसे. बेदुइन कीर्तीचा व विजयाचा भुकेला असे. परंतु ही महत्त्वाकांक्षा त्याला सचिंत करीत नसे. दुःखचितांचे ढग त्यामुळे मनांत नसत जमत. त्याचें तें वाळवंटांतील जीवन, परंतु ते एक प्रकारें परिपूर्ण असे. उत्साही, संस्फूर्त व सामर्थ्यसंपन्न असें असे. त्याचें तें जीवन वासनाविकारांचे असे. परंतु त्यांतहि एक प्रकारची आनंदी व समाधानी वृत्ति त्याची असे. जीवन हे जगण्यालायक आहे अशी त्याची निःसंदिग्ध खात्री असे.
 अशा ह्या त्याच्या जीवनांतहि ध्येय असे. वाळवंटाचा तो अस्सल पुत्र. तो एखाद्या पुढे आलेल्या डोंगराच्या टोकाखाली छायेत पडून नसे रहात. तो शूर, साहसी, अतिथ्यशील असा असे. स्त्रियांच्या रक्षणार्थ सदैव सिद्ध असे. आपल्या जातिजमातीसाठी स्वतःचे सर्वस्व द्यावयास तो तयार असे. निराश्रितांस आश्रय द्यावयास, गरजवंतास साहाय्य करावयास तयार असे. त्याची वाणी मोठी गोड, वक्तृत्वपूर्ण व अस्खलित अशी असे.
 या अरबांची संस्कृति भटकी होणे अपरिहार्य होतें. लोकसंख्या वाढे, परंतु झरे थोडेच वाढत. भटकें जीवन त्यांच्यावर लादले जाई. निसर्गाशी झगडणाऱ्या या लोकांत कांहीं सामाजिक व कांहीं वैयक्तिक गुण आले. संकटांशीं सदैव झगडायचें असे. त्यामुळे त्यांच्यांत ऐक्य असे. मालमत्ता व प्राण नेहमींच धोक्यांत. नेहमीच असुरक्षितता. यामुळे ही एकजूट अवश्य असे. परिस्थितीशीं तोंड देण्यासाठी ऐक्यानें वागणे भाग पडे. परंतु हें एकटें त्या त्या जातिजमाती पुरतें असे. इतरांचा त्यांना विश्वास नसे. जो आपल्या जथ्यांत नाहीं त्याचा भरंवसा कसा धरावा? त्यांचा देशाभिमान म्हणजे विशिष्ट जातिजमातीचा अभिमान. त्यांच्या सामाजिक जीवनाचा आदि व अंत म्हणजे त्याचा जथा! परंतु या गोष्टीचा विकास होऊं लागला म्हणजे अनेक चमत्कार होतात. भाऊ भावाशी भांडतो, परंतु भावासाठीं इतर सर्वाशीहि भांडावयास तो उठतो. शेजाऱ्याजवळ भांडेल, परंतु शेजाऱ्यासाठीं साऱ्या जगाजवळहि भांडेल. यामुळे अरबांत एक प्रकारचें बळकट अभेद्य कवचहि होतें, ऐक्याचे कवच! भांडणांतहि ऐक्य होते. ते एकमेकांजवळ भांडत, एकमेकांसाठी प्राण द्यायलाहि सिद्ध असत! यामुळे न कळत देशाभिमान त्यांच्या अंगी आला. तो त्यांना माहीत नव्हता. मुहंमदांनी त्याची त्यांना जाणीव करून दिली. अरबाच्या वैयक्तिक जीवनांतहि सामुदायिक जीवनाला महत्त्व होते. आपल्या जातिजमातीशीं निष्ठावंत राहणें हें महान् ऐक्यबंधन असे. बेदुइनांचीं अनेक कुळें झालीं होतीं. अनेक कुळांच्या निरनिराळ्या जाति झाल्या होत्या. आपल्या कुळाचे व आपल्या जमातीचें बळ कमी होऊं नये म्हणून ते फार जपत. माझ्या कुटुंबांतील एखादा मारला गेला तर माझे बळ कमी होऊन शत्रूचें वाढणार नाही का? म्हणून बदला घेतलाच पाहिजे. बेरीज वजाबाकी सारी झाली पाहिजे! या वृत्तीमुळे वांशिक भांडणे, द्वेषमत्सर सदैव असत. हीं भांडणें थांबविणे कठिण जाई. कारण आपापल्या जातीचा व कुळाचा त्यांत अभिमान असे. कोणा एकाला इजा झाली, अपाय झाला तर सारी जमात सूड घ्यावयास उठे. जमातींतील कोणी एकानें अपराध केला असला तरी सारी जमात त्याची जबाबदारी घेई. एरव्हीं मित्रत्वाने राहणाऱ्या या जातिजमातींत कधी कुठे लहानशीं ठिणगी पडेल व वणवे पेटतील त्याचा नेम नसे. परंतु आप्तेष्ट होतां होईतों एकमेकांवर उठत नसत. जवळच्या नातलग कुळांपासून अपाय झाले तरी सोशित. "तेहि आमचेच भाऊ. चांगल्या मार्गावर येतील. सद्बुद्धि येईल. पूर्वी चांगले वागत तसे पुन्हां वागू लागतील" असें म्हणत. जातीसाठी दारिद्र्य पत्करणं, मरण पत्करणे, याचा अभिमान बाळगीत.
 त्यांच्या त्यांच्या जातिजमातीचा पुढारी असे. त्याचे म्हणणे सारे मानीत. परंतु हे संबंध मोकळे असत. त्यांत दास्याची यत्किंचितहि छटा नसे. एक तर अरब फार श्रीमंत नसत. एकानें मरावें व दुसऱ्यानें सुखांत लोळावे इतकी विषमता त्यांच्यांत नव्हती. त्यांच्यांतील श्रीमंत म्हटला म्हणजे त्याचा तंबू जरा नीटनेटका असे, पागोटें जरा नीटनेटके असे, त्याचा एखादा सुंदर उमदा घोडा असे. परंतु समाजावर आपली सत्ता लादील इतकी श्रीमंती कोणाची नसे. त्याच्यापासून समाजाला धोका नसे. पुढाऱ्यांत व त्यांच्यांत जो संबंध असे तो सन्मान्य असे. शेजाऱ्याजवळ, मित्राजवळ जितक्या मोकळेपणाने बोलावें तितक्या मोकळेपणानें तो आपल्या नेत्या जवळहि बोले. शेजाऱ्याची जशी भीति वाटत नसे तशी पुढाऱ्याचीहि. बेदुइनाची ही जी स्वतंत्र वृत्ति ती पस्थितिजन्य होती. एका कवीनें म्हटलें आहे-
 "स्वातंत्र्य हें पहाडांवर फुलतें. समुद्रावार फुलतें," आपण त्यांत वाळवंटेंहि घालू. वाळवंटांतहि ते फुलतें. अरबस्थानांत जीवनक्रमहि इतका तीव्र असे कीं प्रत्येक मनुष्य स्वतःचा विचार करी, स्वाभिमान- स्वतंत्रता हे गुण त्यामुळे वाढीस लागले. बेदुइन आपल्या मित्रांशी किंवा जमातीशी गोडीनें वागे. परंतु स्वेच्छेनें वागे. त्यांत बळजबरी, सक्ति नसे. तो एक प्रकारें स्वतंत्रतेचा व समानतेचा भोक्ता असे. जो नेता असे, तो गुणांमुळे असे. जो गुणानें व कर्तृत्वानें अधिक त्याला मान देत. वयालाहि ते आदरित. म्हाताऱ्यांच्या हातीं सूत्र देणे सोयीचें पडे. म्हाताऱ्यांविषयीं आदर असल्यामुळे तरुणांतील वैरें कमी होत, स्पर्धा, मत्सर थांबत. म्हाताऱ्यांस मान दिला जाई तो त्यांच्या अनुभवासाठी, त्याची उपयुक्तताहि असे म्हणून म्हातारा मोठा बुद्धिप्रधान असे, साधकबाधक प्रमाणे मांडी म्हणून नाहीं. अर्थात् वयाबरोबर पात्रताहि पाहिली जाई. तोच वडील माणूस पुढारी मानला जाई, जो न्यायासाठी, शौर्यधैर्यासाठी प्रसिद्ध असे. लोक त्याला पुढारी मानीत म्हणून तो पुढारी. कांहीं विशिष्ट मिरासदारीच्या हक्कांमुळे तो पुढारी बनत नसे. अगदीं मोठ्यांतील मोठ्या माणसालाहि अरबस्थानांत 'तूं'च म्हणत, आदरार्थी 'आपण' किंवा 'तुम्ही' असा प्रयोग नसे. पुढाऱ्यास नांवाने हाक मारीत.
 या पुढाऱ्याला सारी जमात मान देई. शेख शब्दाचा अर्थ वृद्ध व मुख्य असा आहे. जर पुढारी निवडणे कठीण झाले तर चिठ्ठ्या टाकीत. हा पुढारी म्हणजे जणुं राजा. परंतु स्वतःच्या जबाबदारीवर तो विशेष कांहीं करीत नसे. तो मित्रांचा सल्ला घेई. कुटुबांतील मंडळींस विचारी. जमातींतील लोकांची भेट-गांठ घेई. मगच निर्णय देई. त्याच्याबरोबर शरीरसंरक्षक नसे. उच्च व नीच दोघांजवळ तो बसेबोले.
 ती ती जातजमात आपल्या जातिजमातीचा अभिमान बाळगी. आपल्या जातीचं, कुळाचें नांव वाढावें असें प्रत्येकास वाटे. आपल्या जमातीच्या पराक्रमाचे पोवाडे सर्वत्र जावेत असे त्यांना वाटे. औदार्याने, शौर्यानं, अतिथ्यानें, वक्तृत्वाने माझी जात श्रेष्ठ अशी व्हावी, अशी प्रत्येक बेदुइनाला इच्छा असे. जातीचा जो मुख्य असे त्याच्या वैयक्तिक कीर्तीभोवती त्याच्या कुळाचीहि कीर्ति असे. अमक्या शूर व अतिथ्यशील कुळांतला असे म्हणत. बेदुइनांच्या सर्व सद्गुणांत स्वाभिमान राजा होता. या स्वाभिमानाच्या त्यांच्या सद्गुणांत अनेक गुणांचा अंतर्भाव असे. त्या अनेक गुणांमुळे स्वाभिमान ही वस्तु बने. शौर्य व आतिथ्य हे दोन सर्वांत महत्त्वाचे गुण.
 एक कवी म्हणतो- "अरब देईल तेव्हां पाऊस पाडील, हल्ला करील तेव्हां सिंहासारखी उडी घालील!"
 अरब योद्धा अपार शौर्याची मूर्ति असे. कित्येक दिवस तो खोगीरावर काढील, अंगांत जाड, जड चिलखत घालून शत्रूच्या पाठीवर राहील, आपल्या नातलगास मारणाऱ्याचा शोध करीत राहील. किंवा कधीं श्रीमंत व्यापाऱ्यांच्या कारवानांवर हल्ले करील. लूटमार हा त्याचा मुख्य धंदाच असे. त्याची जमीन त्याला अन्न देत नसे. खजूर हीच त्याची भाकरी. म्हणून घासदाणा लुटणें प्राप्त. निसर्गानें ही भामटेगिरी त्याला शिकविली! त्याच्या आर्थिक जीवनामुळे परस्पर विरोधी गुण कसे आले पहा. सदैव गरज असे म्हणून हांव व लोभ त्याच्या ठायी असत. हांव असणे हा गरिबाचा सहजधर्म आहे. हांव असली म्हणजे चढाई करणें हा गुणहि येतो. परंतु अरबांत हांवेबरोबर आतिथ्यहि आहे. गरीबीमुळे हांव आली आणि एकमेकांच्या कष्टमय जीवनाची जाणीव असल्यामुळे आदरातिथ्याची वृत्ति बळावली. तो आज संकटांत आहे. उद्यां मजवरहि तसा प्रसंग येईल. तो आश्रयार्थ आला आहे, उद्यां मला आश्रय मागावा लागेल. या जाणीवेनें बेदुइन आतिथ्यशील झाला. अशा निराधारास ते आधीं अन्न देत व मग स्वतः जेवत. त्याला कपडे देत, त्याच्या गरजा भागवत. धंद्यासाठी किंवा दुर्दैवामुळे ज्याला एका स्थानाहून दुसऱ्या स्थानीं जावें लागे अशा मित्रहीन माणसास अकारण ते आधार देत.
 अरब लुटालूट करी. परंतु लुटालुटींतहि त्यानें मर्यादाधर्म ठेवला होता. तो उगीच मारहाण करीत नसे. शक्यतो हिंसा टाळी, रक्तपात टाळी. "मी या व्यापाऱ्याचे ओझें फक्त कमी करतों" असे म्हणे! आणि ज्यांना लुटावयाचे तेथें स्त्री असेल तरी बेदुइन कितीहि आडदांड व उच्छृंखल असला तरी स्त्रियांशीं तो अदबीनें वागे. तो स्त्रीवर हात टाकीत नसे. तो म्हणेल, "तुमचं नेसूंचे लुगडें किंमतीचें आहे. ते मला हवें आहे तुम्ही दुसरें नेसा मी दूर जातो." आणि तो दूर जाऊन पाठ करून उभा राहील. इस्लामपूर्व अरबी कवितांतून या लढायांचीं, प्रसंगांचीं, वर्णने आहेत. समोरासमोर कसे लढलों, पाठलाग कसे केले, शत्रूहि कसा शूर होता सारें वर्णिलेलें असे. अशा युद्धांत दयेचा लेश नसे. द्वेषाची पराकाष्ठा असे. शत्रूपासून उदारतेची व दयेची अपेक्षा करणें लाजिरवाणें मानीत. स्वतःहि दया दाखवीत नसत. जखमी झालेल्यांसहि ठार करीत. त्यांची कुटुंबे गुलाम करीत.
 बेदुइन फार रागीट असे. जपानी मासे खाऊन फार चिडखोर बनले आहेत. जरा कांहीं झालें तरी त्यांना झोंबते. त्यांना कांहीं सहन होत नाहीं. बेदुइन उंटाचें मांस, खाऊन रागीट झाले. उंट कसा दिसतो? भेसूर, दुर्मुखलेला. बेदुइन स्वतःच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय कधीं रहात नसे. तसें तो न करील तर कायमची अपकीर्ति होईल. आणि बेदुइन रागावत. संतापतहि पटकन. त्यामुळे कोण कुणाचा कधीं अपमान करील त्याचा नेम नसे. आणि मग तीं वैरें पेटत. अरबांचा पूर्वतिहास म्हणजे वर्षानुवर्षे चाललेल्या वैराचा इतिहास, सूड, खून यांचा इतिहास.
 बेदुइन कुलाभिमानास फार जपे. आपला घोडा जातिवंत हवा, उंट चांगल्या रक्ताचा हवा, असें त्याला वाटे. त्याचप्रमाणे स्वतःच्या अंगांतील रक्ताचाहि तो अभिमानी असे. पूर्वजांची नांवें लक्षांत ठेवील. त्यांची सत्कृत्यं वर्णील. अशा कुळांतील मी, अशी प्रतिष्ठा मिरवील. माझ्या कुळाहून तुझे कूळ थोर असेल तर सिद्ध कर असें आव्हान देईल. अशा या आव्हानांतूनहि लढाया पेटत. या कुलाभिमानामुळे जसे द्वेषमत्सर पेटत, त्याप्रमाणे सद्गुणहि येत. बेदुइनची श्रेष्ठता संपत्तीमुळे नसे. तो आळसांत, विलासांत लोळे म्हणून नसे. वैयक्तिक गुणांवर त्याचा मोठेपणा असे. श्रेष्ठ कुळांत जन्मलो असें म्हणणाऱ्यावर जबाबदारीहि असते. आपल्या कुळाची कीर्तिपरंपरा चालवण्यासाठीं साऱ्या जगाशी लढण्याची त्याला हिंमत ठेवावी लागे. त्या बरोबरच तो आतिथ्यशील व उदार असे. जो कोणी आश्रयार्थ येईल, हांक मारील त्याला मदत करी. शत्रूचा हल्ला आला तर प्रथम आपल्या तंबूवर तो यावा, असा तो आपला तंबू उभारी. वाटसरू आला तर तोहि प्रथम आश्रयार्थ आपल्या तंबूंत यावा, असेंहि त्याला वाटे. रात्रीच्या वेळी आपल्या तंबूजवळ तो आगट्या पेटवून ठेवी. हेतु हा की वाळवंटांत भटकणाऱ्यांस मार्गदर्शन व्हावें, त्यानें आपल्याकडे यावें. "मी तुझ्या मानावर माझें संरक्षण सोपवीत आहे." असें जर आश्रयार्थ आलेला म्हणेल तर स्वतःच्या देहाचा मुडदा पडेपर्यंत त्याचा तो सांभाळ करील. अतिथीस आश्रय न देणें याहून दुसरें नीच कर्म नाहीं. अतिथीला क्वचितच कोणी फसवी आणि असें जो कोणी करी त्याच्या कुळाला कायमची काळोखी लागे.
 एक कवि म्हणतो- "त्या तंबूत आमचा मोठा पुढारी आहे. त्याचा शब्द रक्षणास पुरेसा आहे. थोर हृदयाचा तो आहे. रात्रीची वेळ असावी. वादळ असावें. कोणी तरी संकटांशी झगडत अशा वेळीं या तंबूजवळ येई. तो पुढारी आपला तंबू त्याच्या हवाली करी. होय, खरोखरच तो पुढारी उदार व थोर असे. पाठलाग करणारा शत्रू आला तरी ज्याला संरक्षण दिले त्याचें रक्त त्या पाठलाग करणाऱ्या शत्रूस मिळत नसे."
 पुढील मुस्लीम सम्राटांच्या अवनत व अधःपतित काळांतहि हे गुण कधीं कधीं दिसत. एकदां एका सुभेदाराने कांहीं कैद्यांची कत्तलीसाठी रवानगी चालवली होती. एका कैद्याने पाणी मागितलें, सुभेदाराने देववलें, तो कैदी पाणी पिऊन सुभेदाराला म्हणाला, "मी तुमचा अतिथी झालो. तुम्ही पाणी दिलें. अतिथीला का आतां मारणार?" त्या सुभेदाराने त्याला मुक्त केलें! अतिथ्यांत संरक्षणाची हमी गृहीतच असे. आणि वचनभ्रष्टता अरबास माहीत नव्हती. त्याने या बसा म्हटले की संरक्षण मिळालें! तो शब्द म्हणजे विश्वासाचा साहाय्याचा, संरक्षणाचा, अचल निष्ठेचा अमोल ठेवा असे.

■ ■ ■


अरबी आतिथ्यास सीमा नसे, जवळ असेल तें सारे पाहुण्यांसाठी ठेवायची अरबी नीति होती. आतिथ्यांत उणीव उरत असेल तर दूध देणारी उरलेली शेवटची उंटीणहि तो मारी व रसोयी करी. हातिमताईच्या गोष्टी जगप्रसिद्ध आहेत. ताई कुळांतील तो हातिम अति शूर अति उदार होता. तो कविहि होता. त्याचे जीवनच काव्य होतें. आतिथ्याचा तो आदर्श होता. एकदा मोठा दुष्काळ होता. हातिमहि अन्नान्नदशेला पांचला होता. एकदां सबंध दिवसांत त्याच्या कुटुंबांतील मुलांमाणसांच्या पोटांत कांहीं अन्न गेलें नव्हतें. रात्रीच्या वेळेस गोष्टी सांगून त्यानें मुलांना रमवलें, तीं बाळें झोंपीं गेलीं. गोष्टी सांगण्यांत अरबांची बरोबरी कोणी करूं शकणार नाहीं! मुलें निजल्यावर पत्नीनें सुद्धां भूक विसरून जावें म्हणून तिच्याशीं तो गोष्टी विनोद करीत होता. इतक्यांत तंबूजवळ कोणीतरी आलें.
 "कोण आहे?"
 "मी तुमचा शेजारी. मुलांना आज खायला कांहींहि मिळालें नाहीं. लांडग्यांप्रमाणें वखवखलीं आहेत. तुमच्याजवळ मदत मागायला आलों आहे."
 "तुझीं मुलें घेऊन ये." हातिम म्हणाला.
 तो मनुष्य गेला.
 बायकोनें विचारलें, "काय देणार, काय करणार?"
 "थांब, गडबड नको करूं." तो म्हणाला.
 "स्वतःचीं मुलें उपाशीं निजवलींत. दुसऱ्यांना काय देणार?"
 "बघ आतां."
 असे म्हणून हातिम आपला घोडा घेऊन आला. तो घोडा जातिवंत म्हणून नामांकित होता. अति चपल व अति सुंदर. त्या घोड्यावर हातिमचं अति प्रेम. स्वतःच्या मुलांबाळांसाठीं तो घोडा त्यानें मारला नाहीं. परंतु आतां त्यानें घोडा मारला. रस्सा तयार झाला. शेजारी, त्याची पत्नी, त्याचीं मुलें सारी जेवली.
 "आपल्या तळावरचे सारेच उपाशी आहेत. त्यांनाहि बोलवा." तो म्हणाला. इतरांनाहि बोलावलें. सकाळीं घोड्याचीं फक्त हाडे शिल्लक होतीं! हातिमनें सर्वांना जेऊं घातले. परंतु त्याने एक घांसहि घेतला नाहीं. अंगरख्यांत लपेटून तंबूच्या एका कोपऱ्यांत तो बसला होता.
 इस्लामपूर्व अरबांचा हातिम हा परमोच्च आदर्श होता. तो युद्धांत शूर होता. परंतु वैरानें औदार्याला तो नष्ट करीत नसे. दुसऱ्याचा प्राण न घेण्याची त्यानें शपथ घेतली होती. प्राणांतिक घाव त्यानें कधीं घातला नाहीं. तो अति विनयी असे तरी सदैव विजयी होई. तो पुष्कळ लुटून आणी व राजाप्रमाणें सर्वांस वांटून देई. औदार्यामुळे व स्वतःच्या वचनपालनामुळे त्याच्यावर कधीं संकटें येत. परंतु तो तत्त्वच्युत झाला नाहीं. कोणी कांहीं मागितलें तर नाहीं म्हणायचं नाहीं असा त्याचा नियम असे! एकदा एका द्वंद्वयुद्धांत प्रतिस्पर्ध्यास त्यानें निःशस्त्र केलें. तो वैरी म्हणाला, "हातिम, तुझा भाला मला दे." हातिमनें भाला फेंकला. स्वतः निःशस्त्र होऊन तो उभा राहिला. परंतु तो प्रतिस्पर्धीहि तसाच उदार व दिलदार होता म्हणून बरें नाहीं तर हातिम मरता. हातिमचे वणिक्-वृत्ति व्यवहारी मित्र त्याच्यावर रागावले. हातिम म्हणाला, "त्यानें देणगी मागितली. ती का मी नाकारूं?" जे कैदी गुलाम होत त्यांची खंडणी तो भरी व त्यांना मुक्त करी! एकदां हातिम प्रवासांत होता. खंडणी भरण्याची साधनें त्याच्याजवळ नव्हतीं. एका कैद्यानें 'मुक्त करा' प्रार्थना केली. त्या गुलामाच्या धन्याजवळ हातिम कैदी म्हणून राहिला, तो गुलाम मुक्त झाला! पुढे हृतिमच्या नातलगांनी खंडणी पाठविली व तो सुटला.
 आणि असा हा शूर, दिलदार, उदार हातिम कविहि होता. अरबी गुणांचा पेला त्याच्या जीवनांत कांठोकांठ भरला होता. त्याच्या काव्यांतहि त्याच्या जीवनाची उदात्तता दिसते. तारुण्यांत तो काव्याचा फार भोक्ता होता. कवींचें आदरातिथ्य करी. एकदां आजोबाने या उधळ्या नातवास उंट चारायला ठेवले. उंटांचे कळप चारीत हातिम बसला होता. आणि एक काफिला जात होता. त्यांत तीन कवि होते. ते अल् हिराच्या राजाकडे जात होते. हातिम त्या कवींना म्हणाला, "येथे थांबा, विश्रांति घ्या." त्याने प्रत्येकासाठीं एकेक उंट मारला. एकच उंट पुरे झाला असता, परंतु आतिथ्य व औदार्य दिसावें म्हणून तीन मारले! ते तिथे हातिमची त्याच्या कुळाची कीर्ति काव्यांत गाऊं लागले. तें स्तुतिस्तोत्र, ऐकून, कुळाच्या गौरवाचें तें महागान ऐकून हातिमला कृतार्थ वाटलें. त्यानें त्या प्रत्येकाला शंभर शंभर उंट दिले! आजोबा आले तों उंट नाहींत!
 "कोठें आहेत उंट?"
 "आजोबा, तुमच्या कुळाभोवती सदैव कीर्तिवलय चमकत रहावें म्हणून ते उंट मी दिले. आपल्या कुळाच्या मस्तकासाठी कीर्तीचा शाश्वत मुकुट घेऊन त्याचा मोबदला म्हणून ते उंट मीं दिले. कायम टिकणारा मुकुट! आपल्या कुळाचें तें गुणगान सर्व अरबस्थानभर जाईल. सर्वांच्या ओठांवर तीं गाणीं नाचतील!"

■ ■ ■



अरबांत शिक्षण फारसें नव्हतें. मध्य अरबस्थानांतील अरब तर अगदींच अडाणी, अशिक्षित असे. परंतु पोवाडे त्याला आवडत. त्याला वर्णनें आवडत. तो अलंकारिक बोले, बेदुइनांच्या भाषेत जोर असे. ओज व माधुर्य असे. एक प्रकारची अर्थपूर्णता व सुटसुटितपणा असे. साहित्य फारसे नव्हते तरी भाषा वक्तृत्वपूर्ण व समृद्ध होती. बेदुइन हा भावनोत्कट असल्यामुळे सुंदर व जोरदार शब्दांचा भोक्ता होता. त्याची साधी भाषा, परंतु ती फार काव्यमय बनली. सामाजिक व लढाऊ वृत्तीचें उत्कट प्रतिबिंब तिच्यांत होतें. भाषा विकसित झाली तरी लिखित वाङ्मय फारसें नव्हतें. ज्ञानाची अशी साधना अद्याप नव्हती. अरबी स्वभावाशी जुळत अशाच साहित्याच्या शाखा वाढल्या. काव्य अलंकार, वक्तृत्व यांची वाढ झाली. सुंदर शब्दांनी वेडे होणारे अरबांसारखे लोक पृथ्वीवर दुसरे नाहींत! ते शब्दब्रह्माचे, शब्दसौंदर्याचे उपासक होते. शब्दांच्या छटा छटा ते बघत. भाषा नाना अर्थ प्रसवणारी झाली. प्रभावी वक्तृत्वाला ही भाषा फार उपयोगी पडे. पराक्रमांचे पोवाडे गाता यावेत म्हणून काव्याचा अभ्यास सुरू झाला. काव्य म्हणजे प्रचाराचे एक साधन होतें. जीवनाचे व भावनांचेहि तत्द्वारा प्रकटीकरण. अरबी काव्यांत उदात्त, गहन- गूढ असें कांहीं नसे. जीवनाची-मरणाची, सोऽहं कोऽहंची मीमांसा नसे. आपलें कूळ, कुटुंब, जात यांच्या गौरवार्थ तें असे. त्यांच्या मनांत तात्त्विक संशय नव्हते. नसत्या कल्पना त्याला अद्याप सतावत नव्हत्या- तो निसर्गाचे संतान होता. वाळवंटाचें लेकरू होता. प्रगल्भ संस्कृतीचा तो पुत्र नव्हता. बुद्धीची फारशी वाढ झाली नव्हती. म्हणून गंभीर वाङ्मय त्याच्याजवळ नव्हतें. इतर कलांतहि फारशी प्रगति नव्हती. साहित्य नाहीं, चित्रकला नाहीं. शिल्पहि ओबडधोबड! वाळवंटांत दगडहि नाहींत, तर शिल्प तरी कोठून येणार? सुंदर मूर्ति तरी कोण घडवणार? कांहीं थोड्या फार मूर्ति असत. परंतु साधे दगडच तो पूजी. थोडेसें काव्य व संगीत याखेरीज फारसा कलाविलास त्याचा नव्हता.
 अरब हा काव्यासाठी वेडा होई. सर्व जगांत आपली भाषा उत्कृष्ट असें त्याला वाटे. वक्तृत्व व काव्य या परमेश्वराच्या सर्वात थोर, उत्कृष्ट देणग्या असें तो मानी. ज्या ज्या वेळेस मोठी मेजवानी होई, समारंभ असे, किंवा मोठा आनंद असे, त्या वेळेस तीन कारणें असत. जमातीच्या पुढाऱ्यास मुलगा किंवा घोडीस शिंगरू झाले म्हणजे, किंवा एखादा मोठा कवि जातींत प्रकट झाला तर. कवीचें आगमन म्हणजे आपल्या जमातींतील वीरांचें अमर यशोगान व वैऱ्यांचे अमर अपकीर्तिगान. तरवार व भाला यांच्यापेक्षां अधिक मोठा विजय कवीची वाणी मिळवी. ती विजयकीर्ति अरबस्तानभर जाई व एखादें मार्मिक कविवचन अरबास डोलवी, अरबस्थानांतील मोठमोठे वीर स्वतः कविहि असत. त्यांची काव्यशक्ति त्यांच्या मुकुटांतील मोलवान हिरा मानला जाई. कवि असणें हें खानदानपणाचें व दिलदारपणाचें लक्षण मानीत. खलिफा उमर म्हणे, "अरबांचे खरे राजे कवि व वक्ते हे होत. बेदुइनांचे सर्व सद्गुण ते आचरतात व काव्यांत अमर करतात."
 प्राचीन अरबकाव्य अरब जीवनांचें प्रतिबिंब आहे. या जगाच्या धांगड- धिंग्यांपासून अरब दूर असे. वाळवंटांत असे. तेथें लहान मुलांचें अकपट जीवन तो जगे. दिलेलें, देवानें व दैवाने दिलेलें सुख भोगी. तो तेथील निसर्गात रमे. वाळवंटाची हवा खाई, सुंदर, सतेज, निरोगी, ताजी हवा! वाऱ्याचें संगीत ऐके. त्याच्या काव्यांत सर्वत्र वाळवंटाचा वास दरवळून राहिलेला आहे. हें काव्य भावनाप्रधान, सरळ, उत्कट आहे. तेथें गूढगुंजन नाहीं. आत्मानात्म नाहीं. जीवनांतील या घटकेचा आनंद त्यांत आहे. या काव्यांत सृष्टीचं वर्णन आहे. सहजसुंदर, अकृत्रिम, मोकळे वर्णन! वाळवंटांतील देखावे, रात्रीच्या वेळी पहाडांतून, दऱ्याखोऱ्यांतून जावयाचे रोमांचकारी प्रसंग, जेथें भुतप्रेत पिशाच्चे राहतात तेथून जाणें, ओसाड वाळवंटांतील नीरव शांति, निःस्तब्ध भव्य भीषणता; आणि वखवखलेले लांडगे भेटणें; भर दुपारी वाळवंटांत येणारी ग्लानि; वाळूचें वादळ उठून गुदमरून जाण्याचे प्रसंग; मृगजळाचं सुंदर, पण फसवे देखावे; ताडाच्या झाडांची छाया; थंडगार शीतल विहिरीजवळचा आनंद; हें सारें अरब काव्यांत आहे. सृष्टिवर्णन आहे, तद्वत् लोकांचे जीवनहि आहे. धनगरांची शांत, स्वस्थ जीवनें, वीरांची रोमहर्षक कृत्यें, युद्धे, लुटालुटी, पाठलाग, सूड, मैत्री, प्रेम, प्रतिस्पर्धी जातिजमातींवरची विडंबनात्मक काव्यं स्वजातीयांची महिम्नस्तोत्रं, मृतांविषयींचीं शोकगीतें, असें हें प्राचीन अरब काव्य आहे. वस्तुस्थिति निदर्शक, अकृत्रिम आहे. बालसदृश वृत्तीच्या लोकांचे हे काव्य आहे. ज्यांच्या डोक्यांत जीवनाचीं गूढें अद्याप शिरलीं नाहींत अशा अकपट अल्लड वृत्तीच्या लोकांचें हें काव्य आहे. त्यांच्या भाषेत वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ नाहीं! अरब भूत व वर्तमान काळांत जगे, रमे. भविष्याची दखलगिरी त्याला नसे. या आत्तांच्या क्षणाला तो उत्कटतेनें पकडतो, पूर्णतया पकडतो. त्या क्षणाच्या पलीकडे पाहण्याचें त्याला भान नसे. उद्यां नशिबी काय असेल, याची त्याला काळजी नसे. भविष्याच्या चिंता वा सुंदर स्वप्नें तो मनांत खेळवीत बसत नाहीं. तो भूतकाळाकडे बघतो. वर्तमान काळांतील मौज भोगतो. संवेदना, भावना, कल्पना यांत तो श्रीमंत होता, चिंतन व विचार यांत गरीब होता. जीवनाचा फेसाळ पेला तो भरकन् पिई व रिता करी. त्याच्या भावना खोल व उत्कट असत. परंतु भूतकाळाकडे पाहून अज्ञात भविष्याकडे नजर फेकणाऱ्या विचारप्रधान युगाची त्याला अद्याप तादृश कल्पना नव्हती. हें अरब काव्य जीवना-पलीकडे उड्डाण करीत नाहीं. अर्थगंभीर नाहीं. परंतु तें तेजस्वी, जोरदार आहे. तें सजीव आहे, उदात्त आहे. खरें व उत्कट आहे. स्वच्छंद व भरपूर आहे.
 अकडा येथें सर्वांत मोठी यात्रा भरे. पवित्र मोहरम महिन्यांत ही यात्रा भरते. या वेळेस देवाचा तह असे. त्या महिन्यांत रक्तपात करायचा नाहीं, सूड घ्यायचा नाहीं. त्या महिन्यांत भांडणे विसरायचीं. सर्वांनीं त्या यात्रेत जमायचें तेथें साऱ्या जातिजमाती जमत. निरनिराळें कवि तेथे पोवाडे म्हणत, काव्यें गाऊन दाखवित. तीं काव्यें शत्रूवर टीका करणारीहि असत. परंतु बुरखे घेऊन बसत. एकमेकांस पाहून ती काव्यें ऐकतां ऐकतां स्फुरण चढायचे एखादे वेळी म्हणून बुरखे घेत ते प्रतिस्पर्धी. तरीहि कधीं प्रकरणें हातघाईवर येत. परंतु असें फार क्वचित् होई. ही यात्रा म्हणजे मोठी संस्था होती. अरबी वाङ्मयाचें तें संमेलन असे. लहान मोठे कवि तेथें येत. आपापली काव्यें म्हणत. सर्वांनाच कीर्ति नसे मिळत. परंतु मान सर्वांना मिळे. येथे कोणी अध्यक्ष नसे. तेथे व्याकरण, छंद यांच्या चर्चा होत. सूक्ष्म भेद नजरेस आणले जात. अरबस्थानांतील नाना भाषाभेदांतून येथे एक सर्वमान्य भाषा बने. कुराणी भाषा येथेंच तयार झाली. मुहंमदांच्या हातीं ती कमावलेली भाषा आली आणि त्यांनी जग जिंकलें!
 ही अकडा यात्रा केवळ साहित्य- संगीताचीच नसे. सर्व बेदुइनी सद्गुणांचा वार्षिक अहवाल जणुं तेथें घेतला जाई. तेथें अरब राष्ट्र स्वतःची जणूं परीक्षा देई. स्वतःचें, राष्ट्राचें आत्मपरीक्षण केलें जाई. जीवनांत व काव्यांत जें जें उदार व उत्तम त्याची तेथे चर्चा होई. अरबांतच नव्हे तर जगांत सर्वत्रच त्या त्या राष्ट्रांचे उदात्त आदर्श त्यांच्या काव्यांतूनच प्रकट झाले आहेत.
 या यात्रेत जीवनांतील कर्तव्यांची परमोच्च कल्पना मिळे. त्या कल्पनेचा येथे उच्चार होई, तिचं समर्थन केलें जाई. ही यात्रा म्हणजे रंगभूमि, व्यासपीठ, सभागृह, वर्तमानपत्र, सारें होतें! अरबांची जणूं राष्ट्रीय शाळा तेथे भरे, राष्ट्रीय विद्यापीठ उघडे, मुहंमदांनीं ही यात्रा पुढे अधार्मिक कवींच्या भीतीनें बंद केली. मुहंमदांनी एक नवीनच अरब राष्ट्र निर्मिलें. परंतु पूर्वीचे तें अरब राष्ट्र. तेथें मुहंमदांचे इस्लामी अरब पूर्वीच्या अरबांची जात घेऊं शकणार नाहीत!

■ ■ ■



अरबी भाषेतील म्हणींतून स्त्रियांविषयीं अनुदारता व निष्ठुरता दिसून येते. विवाहबंधनें नांवाला असत. वर म्हणे, "मी तुला मागणी घालतों." वधू म्हणे, "मी स्वतःला तुला देतें." आणि गांठ मारली जाई- परंतु ही गांठ सहजपणें सुटे. इस्लामपूर्व अरबस्थानांत बहुपतित्व होतें. स्त्रीनें तंबु सोडला कीं सुटला संबंध. पुन्हा पति निवडायला ती मोकळी असे. प्रत्यक्ष ती आपण होऊन पति निवडी वा आईबापांच्या द्वारां वाटेल तेव्हां ती सोडचिठ्ठीहि देई. मलबारच्या नायर लोकांत आताआतांपर्यंत अशीच चाल होती. नायर नारी अनेक पति करीत. मुलांना आपला बाप कोणता तें कळत नसे. तीं आईजवळ रहात. स्ट्रॅबो म्हणतो, "अरबांची सामाईक इस्टेट असे. सर्वांत वडील तो कुटुंबाचा मुख्य. सर्वांत मिळून एक पत्नी! तिच्याजवळ जो असे तो तंबूच्या बाहेर आपली काठी खूण म्हणून उभी करून ठेवी. ती काठी पाहून आंत कोणी येत नसे."
 अरबांत मातृप्रधान कुटुंबपद्धति जुनी होती. मुहंमदांनीं नवधर्म दिल्यावर ती पितृप्रधान झाली. इस्लामपूर्व अरबांत स्त्रिया म्हणजे मालमत्ता मानीत! पिता मेल्यावर मुलगा स्वतःच्या जन्मदात्या आईशिवाय इतर आयांशी लग्न लावी! सास्वाहि पत्नी होत. जोपर्यंत पत्नी माता झाली नाहीं तोंपर्यंत ती तुच्छ मानली जाई. ती पुत्रवती झाल्यावर महत्त्वाची होई, कारण ऐक्याचें बंधन आतां तिनें निर्मिलें. मनुष्य आपल्या पत्नीपेक्षां आपल्या मातेस अधिक मान देई. आईचा संबंध पत्नीच्या संबंधापेक्षां अधिक शाश्वत वाटे. जोपर्यंत पत्नी स्वेच्छेनें पत्नी म्हणून वागत आहे तोपर्यंत पति हा तिचा धनी असे. ती जणूं त्याची मिळकत दासी. तिनें त्याची आज्ञा पाळलीच पाहिजे. तिला ऐकायचें नसेल तर ती तसे करूं शकत असे. कारण कायदेकानू थोडेच होते? तिचें स्वातंत्र्य मर्यादित असे, परंतु ती त्याला सोडूं शकत असे. ते स्वातंत्र्य तिला असे. इतर देशांच्या मानानें तेथें अधिक स्वातंत्र्य होते. कारण मातृप्रधान कुटुंबसंस्था होती. कुटुंबाचें मूळ म्हणून मातेकडे पाहिलें जाई. पित्याकडे नाही.
 स्त्रियांचे काम काय? कोणतेंहि धार्मिक काम त्यांच्याकडे नसे. आर्थिक व प्रजोत्पत्तीचीं अशीं दोनच कामे त्यांची असत. पतीला घरगुती कामांत मदत करणें व मुले जन्मास आणणे ही दोन कामें; धार्मिक काम नसे. कारण आत्म्यावर विश्वास नसे. पुरुषांसहि आत्मा जेथें नाहीं, तेथे स्त्रियांना कोण देणार?
 नागर अरब व वाळवंटांतील बेदुइन या दोघांची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टि निराळी होती. बेदुइनांमध्ये स्त्रियांविषयींची दाक्षिण्यवृत्ति होती. तो उदारतेनें त्यांच्याकडे पाही, कवींच्या काव्यांत स्त्रियांविषयीं उदारता आहे, परंतु कवि हे जात्याच दिलदार व उदार असतात. इतरांपेक्षां सहृदय व संस्कारी असतात. परंतु बेदुइन हा आपल्या प्रेयसीला मालकीची वस्तु मानीत नसे, तर पूजनीय देवता मानी! अरक्षित कुमारिकांना वाळवंटी वीरांनीं कसें सभ्यतेनें व दाक्षिण्यानें वागविले याचीं काव्यांतून अनेक उदाहरणें आहेत. सुधारलेल्या लोकांत ध्येय व आचार यांत अंतर असतें. परंतु वाळवंटांतील अरबांचें तसें नसे. ध्येयानुरूप त्यांचा आचार असे. वाळवंटांतील अरब महिला निराळीच होती. तिचें जनानखानी जीवन नसे. ती मोकळी असे. ती अपरिचित पुरुष- पाहुण्यांचे स्वागत करी. कोणी संशय घेत नसे. ती स्वतःच्या चारित्र्यास प्राणाहून जपे. दुसरा कोणी वाली जवळ असावा असे तिला वाटत नसे. ती भित्री नसे. पुरुषांना जसें शौर्य-औदार्य, तसें स्त्रीला सतीत्व, पवित्र चारित्र्य! त्या काळांत व्यभिचार म्हणजे न धुतला जाणारा कलंक मानला जाई. पत्नी पतीला शौर्याचीं कृत्ये करायला प्रेरणा देई. विजयी होऊन तो येई व त्याची स्तुति करी. या स्तुतीचा अरब मोठा भोक्ता असे. अंताराची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. स्त्रियांच्या रक्षणार्थ जखमी झाला तरी तो उभा होता. "मी या खिंडीच्या दाराशीं भाला रोवून उभा राहतों. तुम्ही जा. सुरक्षित जागी जा." स्त्रिया गेल्या. आणि पाठलाग करणारे आले. भाला रोवून घोड्यावर हात ठेवून अंतारा उभा होता! शत्रू जवळ यायला धजेना, परंतु घोडा हलला. आणि त्याला टेकून उभा असलेला अंतारा खालीं पडला. त्याचे प्राण आधींच निघून गेले होते. घोड्याच्या आधारानें निष्प्राण शरीर उभे होते! रक्तस्त्रावानें कधींच तो मेला होता. शत्रु जवळ आले. अंताराने प्रेमानें जिवंतपणींच नाहीं तर मेल्यावरहि रस्ता धरून ठेवला हें त्यांनी ओळखले. इस्लामपूर्व अरबांत अशा अनेक कथा आहेत. खरा अरब एकदांच प्रेम करी. तो तिच्यावर आमरण प्रेम करी. ती त्याच्यावर करी. पुढें बहुपत्नीत्वाची चाल पडली. विशेषेकरून शहरांत ती सुरू झाली. बहुपत्नीत्व व बहुपतित्व दोन्ही प्रकार.
 प्राचीन अरब काव्याचे जे थोडे फार नमुने आहेत, त्यांतून भावनांची कोमलता आहे. अरब लोक लहान मुलींना वाळवंटांत जिवंत पुरुन मारीत! सदैव चालणाऱ्या लढायांनी पुरुषांची संख्या फार कमी होती. मुलींचं करायचे काय, हा प्रश्न असे. म्हणून अशा क्रूर रीतीनें ते संख्या कमी करीत. परंतु शहरांतील अरबच मुलींना अशा रीतीनें मारीत. बेदुइन या गोष्टी कमी करी. कधीं दारिद्र्यामुळेंहि त्याला असें करावें लागे. परंतु त्याला का प्रेम नसे? एक बाप आपल्या मुलीस म्हणतो:
 "माझी उमेयना नसती तर माझ्या जिवाला कसलीच काळजी वाटली नसती. मग मी कशाचीहि फिकीर नसती केली. या काळ्याकुट्ट अंधारांत भाकरीसाठीं मी धडपडत राहिलो नसतों. ही दगदग केली नसती. अजूनहि जगावें असें कां बरें मला वाटतें? कोणतें कारण, कोणता हेतु? मी गेलों तर मुलीचें कसें होईल? ती पोरकी होईल. नातलग निष्ठुर असतात. म्हणून मला जगावें असें वाटतें. तिला सोडून जाऊं नये असे वाटतें. मी भिकारी होईन का, साऱ्या संपत्तीचा नाश होईल का, असा विचार मनांत येतो व मी घाबरतों. कां बरें? कारण जवळ कांहींच नसेल तर माझ्या मुलीचें कसें होईल? तिचें रक्षण हा दरिद्री पिता कसें करूं शकेल? एखाद्या ताटांत मांस ठेवावें, मग त्याच्यावर सारे तुटून पडतात तसें तिच्यावर सारे तुटून पडतील! माझी मुलगी -लाडकी उमेयमा- माझ्यासाठी प्रार्थना करते, मला उदंड आयुष्य मिळावें म्हणून प्रार्थना करते. आणि मी कोणती प्रार्थना करतो? ती माझी लाडकी मुलगी मरावी अशी मी प्रार्थना करतों! ती मरावी म्हणून प्रार्थना? होय. तिच्या मरणाची प्रार्थना! कुमारिकेचा प्रेमळ व कृपाळू एकच मित्र आहे. तो म्हणजे मरण. तिला भेटायला येणाऱ्या मृत्यूहून अधिक सौम्य व मायाळू दुसरें कोण असेल? असा प्रेमळ पाहुणा दुसरा कोणता भेटेल? भाऊ तिला कठोरता दाखवतील. चुलते टोचून बोलतील. तिच्या कोमल हृदयाला एकाहि शब्दाचा धक्का बसूं नये अशी काळजी घेणें हें माझं सर्वात मुख्य कर्तव्य आहे."
 दुसरी एक कविता पहा:
 "संपत्ति जाऊन विपत्ति मला आली. मी वर होतों, आतां खाली घसरलो. दुर्दैवानं सारे सारे गेले. आतां अब्रू व मान यांचं धन तेवढें उरलें. दैवानें माझ्या आनंदाचे अश्रूंत परिवर्तन केलें. कितीदा तरी दैवानें जें जें मला दिलें तें तें पाहून मी हंसलों आहें. परंतु आज?
 "या मुली नसत्या तर? मग या अनंत पृथ्वीवर माझी भाकरी धुंडीत मी स्वैर फिरलो असतो. पृथ्वीची लांबी रुंदी कांही कमी नाहीं! परंतु मुली आहेत! आपली मुलें म्हणजे चालती बोलती जणुं आपलीं तीं हृदयेच असतात. त्यांतील एखाद्यालाहि जरी जरा कठोर वारा लागला तरी माझा डोळा झोपेला नाहीं म्हणू लागतो."
 अशा त्यांच्या भावना होत्या. असें हें काव्य आहे. जुनें अरबी काव्य

■ ■ ■



अन्तर्गत भागांतील अरबांत फारसें शिक्षण नव्हतें, व्यापारहि नव्हता. फारसें शेतीचंहि उत्पन्न नाहीं. शेतीचें जें कांहीं उत्पन्न येई तें त्यांनाहि पुरें पडत नसे. शेतीचा फारसा प्रचारहि नव्हता. शेती नाहीं, व्यापार नाहीं. त्यामुळे धनसंचयहि नाहीं. आणि म्हणून संस्कृतिहि नाहीं. कारण शेती, व्यापार, संपत्ति यांच्या पाठोपाठ संस्कृति येत असते. एकंदरीत बेदुइन हा फार मागासलेला होता. घोडे, उंट, गालिचे, तंबू, कांहीं हत्यारे हीच त्याची मालमत्ता. कुरणें, झाडें, सुपीक प्रदेश ह्यांच्यावर सर्वांची मालकी असे. खाजगी मालमत्तेची कल्पना फारशी पुढे गेलेली नव्हती. त्यांच्या मालमत्तेचं द्विविध स्वरूप असे. वैयक्तिक व सामुदायिक. जी कांहीं सामुदायिक अशी थोडीफार मालमत्ता असे तिचें शत्रूपासून रक्षण करण्यासाठीं ते सावध रहात. कारण त्यांत त्यांची स्वतःचीं हितें गुंतलेली असत. यामुळे एक प्रकारची विशेष सामुदायिक भावना त्यांच्यांत बळावली. सामुदायिक जीवनामुळे ते समुदायाकडे वळले. ती जरूरीच होती. सामुदायिक वृत्ति हा पुढे त्यांचा स्वभाव झाला.
 अरबांत एका प्रकारची दत्तक पद्धती होती. एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबांतील समजून घेत. तूं माझा आजपासून भाऊ किंवा तूं माझा मुलगा असें म्हणत व घेत. आणि तो जणुं तुमच्या रक्ताचा असा होई. त्याला इस्टेटीचा वारसाहि मिळे. कधीं कधीं सबंध जातीहि दुसऱ्या जातिजमातींत अशा घेतल्या जात! एखादें कुळ, जमात जर दुबळी झाली, त्यांच्यांत कमी लोक उरले, दारिद्र्य आले, संरक्षण कठिण झालं तर दुसऱ्या प्रबळ व मातबर जमातींत ते प्रवेश मागत. जी जमात सुप्रसिद्ध असे, जिचा लौकिक असे तिच्यांत जात. अशा प्रकारें व्यक्ति वा जमाती दुसऱ्यांत समाविष्ट होत.
 कोणत्याहि देशांतील लोकांना कांहीं तरी ऐक्यबंधन लागतें. त्या त्या देशाच्या परिस्थित्यनुरूप हें बंधन निरनिराळ्या स्वरूपाचें असतें. कोठें भूमीचें बंधन असतें, कोठें धर्माचें, कोठें वंशाचें- कुळाचें तर कोठे भाषेचें; कोठें आर्थिक तर कोठें अन्य एखादें. या बेदुइनांना कोणते बंधन? त्यांना ना जमीन ना एक धर्म. भाषेचें व जातीचें हेंच एक त्यांना बंधन होते. आपले कुळ, आपली जमात हेच बंधन. मामेभाचे, पुतण्ये, सगेसोयरे, भाऊ या सर्वामिळून एक जमात होई. स्त्रियांना महत्त्व असल्यामुळे मामाचे महत्त्व फार असे. भाऊ आपल्या बहिणीच्या पतीला मदत करायला सदैव सिद्ध असे. माहेरच्या, आजोळच्या मंडळींचा नेहमीं आधार असे.
 अरबांची सामाजिक संघटना अशी असे. एकाच कुळांतील अनेक शाखा मिळून एक फखिधि बने, अनेक फखिधि मिळून एक बनु बने, अनेक बनू मिळून एक इम्रा बने; अनेक इम्रा मिळून एक कबिला बने; अनेक कबिले मिळून एक शोब बने.
 अशी ही रचना होती. दोन फखिधि जरी एकाच बनूमधील असल्या तरी त्यांच्या अलग शाखा एकमेकांशी भांडत. फखिधीचीं दोन कुळें दुसऱ्या फखिधीच्या दोन कुळांशी भांडत. म्हण अशी होती की, "मी व माझा भाऊ माझ्या चुलतभावाविरुद्ध; मी व माझा चुलतभाऊ परक्याविरुद्ध!" अरबाला सदैव भांडण हवें असे. जर भांडण्यासाठी लढण्यासाठी परका नसेल तर भावाजवळ भांडूं लागतील. सामुदायिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी त्याला लढाऊ पेशा पत्करणें प्राप्त होतें. आणि खाण्यासाठी लूटमार करी. परंतु अरबाला रक्तपाताची हौस नव्हती. आपल्या जमातीच्या लोकांची संख्या कमी होईल या भीतीने तो लढे. सूड घेण्यास प्रवृत्त होई. रक्तपात उगीचच करायचा, त्यांत आनंद मानायचा अशी जी पहिली मोंगली वृत्ति होती ती अरबांत नव्हती. तो स्वसंरक्षणासाठी लढवय्या बनला. शेतभात- व्यापार नाहीं म्हणून लुटारू बनला. लढाऊ वृत्ति हा त्याचा स्वभावच बनला. "जर बाहेरचे कोणी लढण्यासाठीं नसतील तर आपसांत लढा." अशी एक अरबी म्हण आहे.
 अरबांत गुलामगिरीहि होती; जशी त्या काळांत सर्वत्रच होती. लढाईतील कैद्यांस गुलाम केलं जाई. गुलामांची खरेदीविक्री होई. गुलाम म्हणजे मिळकतीचा भाग! नवरीला आंदण म्हणून बरोबर गुलाम दिले जात. दासदासी दिल्या जात. खानदानी अरबांच्या घरांत गुलाम असावयाचेच. ते घरांतील चाकर. कांहीं गुलाम लष्करी सेवा चाकरीहि करीत. परंतु त्यांच्यावर फार विश्वास नसे. स्वतंत्र मनुष्याला जी शिक्षा देत त्याच्या निम्मे गुलामाला देत. युद्धोत्तर होणाऱ्या लुटीत त्याचा हिस्सा नसे. त्याचा हिस्सा त्याच्या धन्याला मिळे. गुलामांचा आणखी एक विशेष प्रकार होता. त्यांना 'किनु' असें म्हणत. तो शेती करी. तो शेताबरोबर विकला जाई! तो भूदास होता. जमीन विकत घेतांना तिच्यांतील झाडे विकत घेतलीं जात तद्वत् तिच्यावर काम करणारेहि ते जणुं जमिनीचा एक भाग, त्या जमिनीतील किडे! रोमन साम्राज्यांत असे भूदास फार होते. जुगारांतहि गमावून गुलाम होत. अरब गुलामकन्या वरीत, परंतु त्यांची मुले गुलामच! जर मुलें विशेष गुणांचीं दिसली तर तो त्यांना आपल्या कुटुंबांतील मानी. फार महत्त्वाच्या कारणासाठी गुलामांना धनी स्वातंत्र्य देई. परंतु तो धन्याच्या जमातीचा राहिला पाहिजे. तो धन्याचा पक्षकार बने. अशांना मौला म्हणत. नाहीं केवळ गुलाम, नाहीं संपूर्णपणे स्वतंत्र! मर्यादित स्वातंत्र्य त्याला असे. धनी व धन्याची जमात सोडून जायचे नाही एवढेच त्याला बंधन उरें. परंतु हा मौला शब्द आतां व्यापक अर्थी वापरतात. मित्र, शेजारी, पाहुणा, आप्त, प्रियकर सर्वांना हा शब्द लावतात.
 मौला गुलामांचे तीन प्रकार असत. १ गुलामाला त्याच्या चांगल्या वागणुकीसाठीं किंवा इतर कांहीं कारणांनी मुक्त करणें. २ कांहीं एक ठरीव रक्कम गुलाम देईल तेव्हां त्यास मुक्त करणें. ३ इसलामोत्तर काळांत ज्यू व ख्रिश्चन हेहि एकेश्वरी मताचे असल्यामुळे या धर्माच्या लोकांना सहानुभूतीने वागवावें असें पैगंबर म्हणत. या धर्माचे जे गुलाम असत त्यांना मौला नसत म्हणत, परंतु जिम्मी म्हणत.

■ ■ ■


मध्य अरबस्थानांतील अरबांपेक्षां किनाऱ्यावरचे अरब निराळे होते. समुद्र- किनाऱ्याला पाण्याचा भरपूर पुरवठा असे. पाऊस पडे. जमीन सुपीक होती. व्यापारी जीवनहि होते. दळणवळण दगदगीचें नव्हतें. वरती युफ्रातीस व तैग्रीस नद्यांच्या सुपीक भागांत संस्कृति फुलल्या. सीरिया व बाबिलोनचा तो भाग फार सुधारलेला होता. इराण व हिंदुस्थान, ईजिप्त व रोमन साम्राज्य यांच्याशी या भागाचा संबंध असे. परंतु अरबस्थानांतील समुद्रतटवर्ती प्रदेश वरील बाबिलोनी भागापेक्षाहि जरा अधिक भाग्यवान् होते. हा अरबी भाग हिंदुस्थान, इराण, आफ्रिका यांना सीरिया- बाबिलोनपेक्षांहि अधिक ओढी. हा अरबी किनाराहि संस्कृतींच्या भेटीचं स्थान होता. या अरब द्वीपकल्पाचें हें भाग्य होतें. हिंदुस्थानचेहि इतकें सौभाग्य नव्हतें. हिंदुस्थान युरोपपासून विभक्त होता. चीनशींहि प्रत्यक्ष संबंध नव्हता. राजकीय अनुभवाच्या दृष्टीनें अरबस्थानाला हिंदुस्थानपेक्षां अधिक संधि होती. लप्करी गोष्टीहि अधिक शिकायला मिळत. अरबस्थानच्या किनाऱ्यावरची संस्कृति ग्रीक, रोमन, ईजिप्शियन, इराणी व हिंदुस्थानी या सर्व संस्कृतींचें मिश्रण होती. अरबस्थान सुधारलेला नव्हता असे म्हणणे चूक आहे. किनाऱ्याचा अरबस्थान सुसंस्कृत व प्रगल्भ होता. श्रीमंत व धीमंत होता.
 अरबस्थानच्या उत्तरेकडच्या भागावर कॉन्स्टेंटिनोपलचा परिणाम होई. मेसापोटेमिया वगैरे भागावर इराण व रोमन साम्राज्य यांचा होई. दक्षिण अरबस्थानावर इराण व हिंदुस्थानचा होई. पश्चिम भागावर ईजित, नाईल, युरोप, हिंदुस्थान यांचा होई. अरबस्थानाला अशी ही सुंदर संधि होती. सहाव्या- सातव्या शतकांतील अत्यन्त सुधारलेल्या देशांशी संबंध येण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. हिंदुस्थान, युरोप व आफ्रिका या तिन्ही खंडांशीं अरबांचा संबंध येई व त्यामुळे न वाढणारी प्रगति वाढली. अरबांस व्यापाराची हौस होती. कारण विषम हवेमुळे शेती कठीण. कधी कडक हिंवाळा, कधीं कडक उन्हाळा. कधीं वर्षानुवर्ष अवर्षण पडे. तरीहि अरब शेती करीत. मेसापोटेमियांतील बागबगीचे, मळे त्यांनी पाहिले होते. शेतींत किफायतही चांगली होई. भटक्या बेदुइनी संस्कृतीपेक्षां ही कृषिप्रधान संस्कृति निराळी असणार. कृषिप्रधान प्रदेशांत स्थिर स्वरूपाच्या संस्था उदयास येतात. समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशांत नबाबशाही अस्तित्वांत आली. तेथील अरब व्यापारी बनले. हिंदुस्थान चीनपर्यंत जात. संपत्ति जमूं लागली. राजेशाहीच्या कल्पना सर्व देशांतून येथे येत. रोमन व इराणी साम्राज्यांतून कल्पना येत. परंतु मध्य अरबस्थानांतील बेदुइनांच्या लोकशाहीच्या, स्वातंत्र्याच्या कल्पनाहि येत व स्फूर्ति देत. या दोन्ही विचारांचा विरोध असे. यामुळे राजेशाही कल्पनांचे घोडे फार पुढे सरकलें नाहीं. समुद्रकाठच्या अरबांची वृत्ति जरा नबाबी होती. सुखप्रिय व सत्ताप्रिय होती. तेथे सरदारांची, खानदानांची सत्ता होती म्हणा ना. नाहीं धड एक राजा, नाहीं धड लोकशाही. वरिष्ठ वर्गाची, श्रीमंतांची सत्ता होती. गरीब बेदुइनांत लोकसत्ता होती. गरीब अरब शेती व व्यापार हे सान्मान्य धंदे मानीत नसत, लढणें व लुटणे यांना ते सन्मान्य मानीत. कारण यानें स्वातंत्र्य राहते. समुद्रकाठचे अरबहि लढाऊ वृत्तीचे होते. कारण अन्तर्गत अरबांपासून रक्षण करणे, तसेंच मेसापोटेमिया, पॅलेस्टाईन, रोमन साम्राज्य या सर्वांपासून रक्षण करणें जरूर असे. व्यापार व शेती करून जी धन- दौलत ते मिळवीत ती वाळवंटी अरबांनी लुटू नये म्हणून त्यांना शस्त्रास्त्रे ठेवावी लागत. वैयक्तिक व राजकीय दोन्ही कारणांमुळे त्यांची लढाऊ वृत्ति कायम राहिली. वाळवंटी अरब व समुद्रकांठीं अरब दोघेहि झुंजार होते. फरक इतकाच की, समुद्रकांठीं अधिक संस्कृति होती. अनेक देशांशी संबंध येई. त्यामुळे नाना विचार येत. कल्पना येत. ज्ञान येई. परंतु अद्याप ज्ञानासाठी म्हणून ज्ञानाची भक्ति नव्हती. शिकण्यासाठी म्हणून शिकणे सन्मानिले जात नसे. लढणें हें सर्वांच्या आधी. मग व्यापार, मग शेती. सर्वांत शेवटचे स्थान शिकण्याला!
 ही अरब संस्कृति सर्व ठिकाणच्या संबंधांपासून जन्मली म्हणून ती लौकर वाढली. प्रगति सत्वर झाली. लोक नीट घरें दारे करून राहूं लागले. हवा फार कडक व इतरहि अडचणी त्यामुळे घरे बंद असत. शिल्पशास्त्रांत फार प्रगति म्हणून झाली नाहीं. घरांत अंधार असे. तेथील नक्षी, कला कोण पाहणार? घरें विटांचीं असत. घरे आंत ओलसर व दमट ठेवीत. तशी जरूर असे. अधिक दमटपणा व कमी प्रकाश हें तत्त्व असे. संगीताची बरीच प्रगति झाली होती. शेती व व्यापाराने संपत्ति वाढली होती. नाना देशांतील लोक येत व नैतिक मूल्यमापनांतहि फरक होई. संगीत म्हणजे धन्यतम कला म्हणून नसे आदरिली जात. स्वच्छंदी व विलासी जीवनाचे साधन या नात्यानें संगीताकडे बघत. संगीत म्हणजे विकारांना उत्तेजन. संगीत म्हणजे चिंता काळजी दूर फेंकून सार्वजनिक रीत्या नाचतमाशांत दंग होणें. नाना वाद्ये व नाच अस्तित्वांत आले. जीवन संयमी व्हावयास धर्म नव्हता, नीतिशिक्षण नव्हते. आजच्या पॅरिस, व्हिएन्ना वगैरे शहरांतून, न्यूयॉर्क, शांघाय वगैरे शहरांतून जे जे सुखविलास आढळतात ते सारे मक्केत होते!
 मुहंमदापूर्वी अरब मोठे व्यापारी होते. यमनमधला माल अरबच सीरियांत नेते मुहंमदापूर्वी एक हजार वर्षे होऊन गेलेला एक ज्यू कवि अरब व्यापाराविषयी लिहितो:
 "हे सीरिया, अरब व्यापारी तुझे आहेत. ते मसाले, सोने, मौल्यवान् वस्तु तुला आणून देतात. कोकरें, मेंढ्या, शेळ्या नेतात. निळे कापड नेतात. नक्षीदार कापड नेतात."
 या व्यापारी जीववनाचे केन्द्र मक्का होतें. मक्केला सीरियांतून रेशमी व लोकरीचे कापड, गुलाबी कापड घेऊन व्यापारी येत. आणि वेलदोडे, चंदन लवंगा, सुगंधी वस्तु, खजूर, कांतडीं, धातु वगैरे माल जो आफ्रिकेंतून व हिंदुस्थानांतून येथे येई तो सीरियाकडे घेऊन जात. मक्केतील काबाजवळ मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या बैठका ज्यांत भरत असे दिवाणखाने होते. तेथे कवि प्रेमाचीं व शौर्याचीं गाणीं गात. ग्रीक व इराणी गुलामकन्या त्या व्यापाऱ्यांच्या मेजवान्यांतून आपल्या देशांतील संगीतानं रंग भरीत. अद्याप अभिजात अरब संगीत जन्मलें नव्हतें. उंटांना हांकलण्याचीं गाणीं हीच अद्याप अरबांचीं राष्ट्रीय गाणीं होती! कधीं अरब बुद्धिबळे खेळत. कधीं गप्पा मारीत बसत. व्यापाऱ्यांचे जणूं छोटेसे रिपब्लिकच होतें म्हणा ना. ज्या ज्या देशांशीं व्यापार चाले तेथील सुखभोग आले. परंतु अरब केवळ स्त्रैण व दुबळे नाहीं झाले. अद्याप पौरुष होतें. मर्दपणा होता.
 मदिरेचं व मदिराक्षींचे मक्का माहेरघर झाले. जे धर्माचें मुख्य स्थान तेंच विलासाचं. कारण धर्मामुळे तेथे पैसा येई. व्यापाराचाहि पैसा येई. पैशांपाठोपाठ व्यसनें येतातच. संगीताने तर मक्कावाल्यांस वेड लावले. मक्केत एक गंवडी होता. तो गोड गाणारा होता. तो काम करीत असला म्हणजे तरुण त्याच्याभोवती येत व म्हणत "गा रे गा." ते त्याला पैसे देत. सुंदर खाद्यपेयें आणून देत. तो गवंडी म्हणे, "आधीं मला माझ्या कामांत मदत करा. मग मी गाणं म्हणेन." आणि ते सारे तरुण कपडे काढून त्याला मदत करूं लागत! त्या गवंड्याच्याभोवती भराभरा दगड येऊन पडत. नंतर तो एका दगडावर उभा राही व गाऊं लागे. जवळच्या टेकडीवर भराभरा लोक ऐकायला जमत. लाल, पिवळ्या पोषाखांनी टेकडी रंगे. मक्केत गाणाऱ्यांचा मोठा मान! गाणाऱ्या कलावंतिणींना मोठमोठे खानदानी लोक प्रणाम करीत, आदराने वागवीत. एखादी प्रसिद्ध गाणारीण आली तर कोणी बडा अमीरउमराव तिचं स्वागत करी. त्या स्वागतांत सारें शहर सामील होई. मक्का सुखविलासाचें माहेर बनले. या नागर जीवनांत अरबांचे दुर्गुण प्रकट झाले, जुगार, मद्य, मदिराक्षी साऱ्या गोष्टी आल्या. वाळवंटांत बेदुइनांत द्यूत, दारू यांना जागा नव्हती. परंतु वीस-वीस हजार पौंड किंमतीचा माल आणणारे कारवान ज्या शहरांत वावरत तेथे या व्यसनांना जागा मिळाली. ग्रीक कन्यांच्या रागदारीने डोलत, मदिरेनें मस्त होत, अरब- मक्केतील अरब- आपल्या हातांतील फांसा फेंकी. द्यूत खेळू लागे आणि सर्वस्व गमावून गुलाम बने!
 आणि धर्माची स्थिति काय होती? भटक्या अरबांत एक प्रकारचा धर्म होता. खरोखरची आस्तिकता त्यांच्यांत होती कीं नाहीं ते सांगता येणार नाहीं. अस्पष्ट अशी कांहीं कल्पना त्यांना होती. परलोक आहे कीं नाहीं याविषयीं ते नक्की सांगू शकत नसत. काल्पनिक मननचिंतन करण्याची त्यांची वृत्ति नसे. तिकडे त्यांचा कल नसे. परलोकाच्या अमूर्त कल्पना, या गुंतागुंतीच्या अदृश्य गोष्टी यांचा विचार करायला त्याला विश्रांती! व वेळहि नव्हता. परमेश्वर एक आहे हें ज्ञान त्याला नव्हतें, तो अनेक देवतांना भजे, हे देव म्हणजे अर्धवट दैत्यच होते! भुतप्रेत, पिशाच्चे यांतून जरा उत्क्रान्त झालेले असे हे देव होते. मानवजातीचं कल्याण करणारे, कल्याणमय, कृपासिंधु देव अजून निर्मिले गेले नव्हते. हीं भुत-प्रेतं, हे जिन, हे गिऱ्हे अपाय करतील म्हणून अरब त्यांना भजे. भीतीमुळे देवपूजा होई. दुसरी एक पितृपूजा त्यांच्यांत होती. कांहीं जुन्या जाति-जमातींतून कांहीं चिन्हें असत. तीं चिन्हें वंशपरंपरा आलेली असत. या चिन्हांवरून कुळांना नांवें पडत. एखादें झाड, एखादी टेंकडी, एखादा प्राणी, एखादा साप अशीं तीं चिन्हें असत! या चिन्हांविषयीं अपार आदर व भीतिहि असे. या वस्तु पुढे प्रतीकें बनल्या. झाडे, खांब, निरनिराळ्या प्रकारचे दगड यांची, मृतात्म्यांची प्रतीकें समजून पूजा होऊं लागली. एकेश्वरी धर्म या बेदुइनांना माहीत नव्हता.
 किनाऱ्यालगतच्या सुखी, समृद्ध अरबांत कशा प्रकारचा धर्म होता? मक्का शहर केवळ व्यापारी केन्द्र नसून धर्मकेन्द्रहि होते. येथेच तें जगत्प्रसिद्ध पवित्रतम व प्राचीनतम काबा हें मंदिर होतें! हें मंदिर अरब जमातीचा पूर्वज अब्राहाम (इबराहीम) यानें प्रथम बांधले म्हणतात. कोणी म्हणतात, पहिला पूर्वज जो बाबा आदम त्यानें स्वर्गातील नमुन्याप्रमाणें तें बांधलें! पुढे मग अब्राहाम, इस्माइल यांनीं तें पुनःपुन्हां बांधलें. आदमच्या काळांत आकाशांतून पडलेला दगड तो याच मंदिरांत आहे आणि याच मंदिरांत ३६० दिवसांच्या ३६० देवता होत्या. एका दिवसाला एक देव! या ३६० मूर्तीच्यामध्ये मुख्य देव हुबल याची लाल पाषाणी मूर्ति होती. घगलसगगेतलिस यांच्या सोन्याच्या व चांदीच्या मूर्ति होत्या. अब्राहामाची मूर्ति व त्याच्या मुलाची मूर्तीहि येथे होती. येथेच जवळ ती झमझम विहीर होती. जिचा झरा वाळवंटांतून जोरानें बाहेर येत आहे. अरबांचे प्राण एकदां तहानेने व्याकुळ झाले होते तेव्हां हा झरा प्रभुकृपेनें वाहूं लागला!
 काबाच्या मंदिरामुळे मक्काच नव्हे तर तो सारा जिल्हाच पवित्र मानला जाई. त्या काळ्या पाषाणांचे चुंबन घेण्यासाठीं प्रतिवर्षी हजारों अरब येत. दिगंबर होऊन सात प्रदक्षिणा घालीत. दिगंबर का व्हायचें? जे कपडे अंगावर घालून पापें केलीं ते कपडे प्रदक्षिणेच्या वेळेस नकोत. हा दिगंबर जैन धर्माचा परिणाम असावा. जैन धर्म दक्षिणेस म्हैसूरच्या बाजून अधिक होता. अरबांस तो माहीत असावा. मक्केस बुद्धाच्याहि मूर्ति, पादुका होत्या असें म्हणतात. मक्केच्या पवित्र स्थानांत सर्व जातिजमातींच्या देवतांना स्थान असे. देव असत व देवताहि असत. देवदेवतांतहि एक प्रकारची लोकशाही जणुं होती! प्राचीन अरबांच्या धर्मांत सेमिटिक धर्माचं मिश्रण आहे. तसेंच खाल्डियन, फोनिशियन, कॅननाइट्स वगैरेंच्या धर्माचेहि मिश्रण आहे. हा एक प्रकारें अनेक भुताखेतांचा धर्म होता! जातिजातींचे धर्म शेजारी शेजारी येऊन काबाजवळ उभे राहिले. सूर्य, तारे, तीन चंद्रदेवता या मुख्य होत्या. शुक्लचंद्र, कृष्णचंद्र, व शुक्ल-कृष्णचंद्र अशा तीन स्थितिदर्शक तीन चंद्र देवता होत्या. अल-लात, मनात व अल-उझा हीं त्यांचीं नांवें! प्रथम अरब झाडे, दगड, पर्वत यांची पूजा करीत. पुढें मूर्ति करूं लागले. अब्राहामची मूर्ति म्हणजे एक दगडच होता. 'हा अब्राहाम' असे म्हणत. प्रत्यक्ष मूर्ति का रोमन ख्रिश्चन धर्मामुळे आल्या? का बुद्ध धर्माच्या संबंधामुळे आल्या? झाडे, पर्वत येथे प्रेतात्मे राहतात अशी कल्पना असे. या नाना देवदेवतांसमोर स्थंडिले असत. तेथें पशूंचं बलिदान होई. क्वचित् नरमेधहि होत! वंशपरंपरा चालणारे उपाध्यायवर्गहि होते. जणुं पंड्ये, बडवे. त्यांना मोठा मान मिळे. परंतु अद्याप त्यांची विशिष्ट जात अशी नव्हती बनली. बाहेर जाति- जमातींचे देव असत. परंतु शिवाय प्रत्येकाच्या घरांतहि खाजगी देवघर असे. जणुं कुलदैवत, कौटुंबिक देव. घरांतून बाहेर पडतांना व घरी परतल्यावर घरांतील देवाला नमस्कार करीत. अशा प्रकारची मुहंमदांपूर्वीची धर्मस्थिति होती. दगड, झरे, धबधबे, तळी, सरोवरें, पर्वत, साऱ्यांची पूजा असे. परंतु अरबांना थोडी एकेश्वरी कल्पना येऊं लागली होती. या सर्व देवदेवतांच्या मागें परमोच्च देव कोणी तरी असेल, अशा कल्पना होत्या. चंद्र व इतर देवता ह्या 'अल्ला-त-आला' च्या मुली. अल्ला-त-आला म्हणजे सर्वोच्च देव, परमेष्ठी. ज्यू व ख्रिश्चनांशीं संबंध आल्यामुळे ही एकेश्वरी कल्पना आली असेल. ख्रिश्चन व ज्यू धर्माचा फारच मोठा परिणाम अरबांवर झाला होता. अरबांना ज्यूंच्या चालीरीति, विधि, परंपरा सर्व नीट माहीत होतें असें कुराणावरून दिसतें. परंतु ज्यू धर्म संकुचित होता. राष्ट्रीय होता. ख्रिश्चन धर्महि असहिष्णु झाला होता. अरबस्थानच्या सीमेवर हे धर्म होते. खुद्द मक्केतहि ख्रिश्चन होते. गफार व नेजदान शहरांतून बिशप होते. चर्च होते. अरबांना जो ख्रिश्चन धर्म माहीत झाला तो हृदयाचा नव्हता, तर डोक्याचा होता! आणि हा डोक्याचा धर्म अरबांच्या डोक्यांत उतरेना. ख्रिश्चन धर्मात ख्रिस्ताच्या भौतिक व आध्यात्मिक मूर्त व अमूर्त स्वरूपांचे वाद त्या वेळेस चालले होते. अरबांना तें सारें गूढ वाटे.
 सर्वसामान्य अरब हा विशेषसा धार्मिक नव्हताच. तो किस्मतवादी होता, दैववादी होता! 'किस्मत्' असें गर्जे व तो लढाईत घुसे. नशिबाच्या हातांतील आपलीं जीवन! आहे काय नि नाहीं काय! कशाला करा फिकीर! वाटेल ते होवो! अशी बेछूट व साहसी वृत्ति त्याची होती. तो संशयवादी, अज्ञेयवादी, ऐहिकदृष्टि, भौतिक वृत्ति होता. कोणी देवदेवतांची परीक्षा घेत. नवस करीत. इच्छेप्रमाणें न झालें तर देवाला नष्टहि करीत! पुष्कळांचा परलोकावर विश्वास नव्हता. मेल्यावर पापपुण्याचा निवाडा होणार आहे, असे फारसे कोणी मानीत नसे. कोणी कोणी थडग्यांना उंट बांधून ठेवीत. उंटावर बसून प्रभूच्या न्यायमंदिराकडे प्रेतात्म्यास जातां यावें म्हणून! परंतु असें करणारे- मेल्यावर जन्म मानणारे- अपवादात्मकच होते.
 अरब हा कोणत्याच धर्माची फिकीर नव्हता करीत. जे कांहीं अधिक उन्नत व प्रगल्भ विचारांचे होते त्यांना ख्रिश्चनांच्या चर्चा त्याज्य वाटत. ज्यूंचा अहंकार तिरस्करणीय वाटे. परंतु त्यांना या दगडाधोंड्यांची, झाडामाडांची पूजाहि आवडत नसे. हा सारा मूर्खपणा आहे असे त्यांना वाटे. या समुद्रकांठच्या अरबांतच अनेक देवदेवतांविरुद्ध अप्रीति उत्पन्न झाली. हा धर्म त्यांना रुचेना, पटेना. ज्यू, ख्रिश्चन यांच्या एकेश्वरी विचाराने अरबांतहि वैचारिक जागृति उत्पन्न झाली होती, बुद्धींत खळबळ, हालचाल सुरू झाली होती. सुशिक्षित अरबांत चर्चा होत. वाद होत. कुरबुरी, कुरकुरी होऊं लागल्या. एकेश्वरी कल्पनांची बोलणी सुरू झाली. अस्तित्वांत असलेल्या श्रद्धेविषयीं कांहींना असमाधान वाटूं लागलें. या लोकांना हनीफ म्हणजे अज्ञेयवादी म्हणत. हिब्रू शब्द हनेफ असा आहे. त्याचा अर्थ नास्तिक. या हनीफांनीं मुहंमदांसाठीं मार्ग तयार करून ठेवला होता. भूमि नांगरली होती. प्रबळ इच्छाशक्तीची महान् विभूति पाहिजे होती. एक प्रकारची धार्मिक अस्वस्थता होती. हनीफांची नकारात्मक भूमिका होती. एक परमेश्वर सर्व सत्ताधीश आहे असें त्यांना वाटे. परंतु त्याची पूजा कशी करायची, त्याला हांक कशी मारायची याचेच वाद होत. हे हनीफ निश्चित मार्गदर्शन करू शकत नसत. बहुजन- समाजापासून हे विचार दूरच राहिले. मुहंमदांनीं या हनीफांच्या विचारांतच प्राण ओतला. या हनीफांचा एक पुढारी होता. त्याचे नांव झैद इब्न अम्र. मुहंमद त्याच्याकडे अनेकदां जात. दुसरा एक होता त्याचें नांव वरका होतें. मुहंमदांचा तो नातलग होता व शेजारी रहात असे. या एकेश्वरी मताच्या लोकांजवळ मुहंमद नेहमीं बोलत. ज्या महापुरुषानें नवधर्म देऊन, इस्लाम देऊन अरबस्थानचा नवा मनु सुरू केला, अरबस्थानचा कायापालट ज्याने केला त्याचे अग्रदूत हे हनीफ होते. त्यांनी धार्मिक उत्कटता सर्वत्र पसरून ठेवली होती. साऱ्या अनिश्चित अशा त्या वातावरणांत कोणी तरी मार्गदर्शक तारा येईल, अशी आशा फुलत होती. पूर्वी आद, समूद वगैरे जातींत देवानें प्रेषित पाठविले, पैगंबर पाठविले. आपल्यांतहि येईल, असें मुहंमदांपूर्वीच लोकांना वाटूं लागलें होतें. कांहीं तरी चमत्कार लौकरच होणार आहे, असें सर्वांस वाटत होतें. अवतार येणार, प्रेषित येणार! बायकांना वाटे आपणांस मुलगा व्हावा व आपण त्या पैगंबराची आई व्हावें! तो येणारा महापुरुष आपल्या पोटीं यावा, असें मातांना वाटत होतें.
 असा हा इस्लामपूर्व अरेबिया होता. असा अंतर्गत भागांतील बेदुइन व समुद्राजवळचा, सुपीक प्रदेशांतील अरब. या दोहोंत जरी फरक असला तरी दोघांतहि स्वभावसाम्य होतें. अरब मग तो अन्तर्गत भागांतील असो वा सुपीक प्रदेशांतील असो, तो स्वातंत्र्याचा उत्कट प्रेमी होता. तो शूर होता. निर्भय व उदार होता. तो दिलेले वचन पाळी, आतिथ्यांत दक्ष राही. तो वाळवंटाचे खरें बाळ होता. अशा भावनाप्रधान लोकांत, निर्भय करारी लोकांत, मुहंमद आले. आणि मुहंमदांनी त्यांच्या गुणांना आपसांतील रक्तपातांतून काढून महान् कार्याकडे वळवलें, जी अरबी शक्ति रक्तपातांत खर्च होत होती ती महान् ध्येयाकडे त्यांनी वळवली. अरबांना जगाचें मार्गदर्शक केलें. जगाची संस्कृतीची मशाल मुहंमदांनी अरबांच्या हातीं दिली. त्या थोर पैगंबरांचं चरित्र आतां आपण आधीं पाहूं या.

■ ■ ■



मानवसमाजांतील धर्माच्या प्रगतीची अखंडता सतत दिसून येते. मनुष्य प्रथम सृष्ट पदार्थांची पूजा करूं लागला. पुढे ईश्वराकडे वळला. ज्या पद्धतीनें ही उत्क्रान्ति झाली ती एकसारखी नाहीं होत गेली. मधूनमधून पुन्हां पिछेहाट होई. पुन्हां रस्ता बंद पडे. रान उगवें. पुन्हां ईश्वराचे नवे पाईक येत. संदेश-वाहक पैगंबर येत. ते परमेश्वरासंबंधींची कर्तव्यें पुन्हां सांगत. एकमेकांत कसें वागावें पुन्हां शिकवीत. त्या त्या काळांत अशा थोर विभूति होऊन गेल्या. प्रत्येक विभूति म्हणजे आध्यात्मिकतेची मूर्ति होती. तेजःकिरण फेंकणारी प्रकाशराशि होती. अधःपतित मानवसमाजाला वर नेण्यासाठीं ते येत. पतिताला उद्धारायला येत. अशुद्धाला शुद्ध करण्यासाठी येत. अंधारांत दिवा दाखवायला येत. अशा महापुरुषांपैकींच मुहंमद पैगंबर हे होत.
 मुहंमदांचे आगमन केवळ अरबस्थानापुरतें नव्हतें. तें सर्व जगासाठी होते. कारण त्या काळांत सर्वत्रच धार्मिक अवनति झाली होती. झरथुष्ट्र, मोझेस, ख्रिस्त यांनी पेटविलेल्या पवित्र ज्वाला विझून गेल्या होत्या. इराणांत श्रेष्ठकनिष्ठपणाचीं बंडे माजलीं होतीं. सद्धर्म लोपला होता. ख्रिश्चनधर्म आपसांतील मतभेदांनीं कत्तली करीत होता. शांति देणारा धर्म रक्तस्नात होत होता! हिंदुस्थानाकडेहि निराशाच होती. बुद्धांनी दिलेला नीतिधर्म पुन्हां नष्ट झाला. पुन्हां हिंदुधर्माने उचल केली. अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला. नाना देवतांची पुराणें रचिलीं जाऊं लागलीं. निरनिराळ्या देवतांचे उपासक आपसांत झगडत होते. शाक्तमतें पुढें येत होतीं. उपनिषदांतील थोर धर्म मूठभर लोकांजवळ होता. इतरांचा धर्म म्हणजे कर्मकांड! शिवाशिवी, श्रेष्ठकनिष्ठपणा यांना सीमा राहिली नाहीं. निर्गुण, निराकार ब्रह्म शून्य झालें. कर्मकांड वाटलें. सतराशें देवदेवतांचा बुजबुजाट झाला. उच्चनीचपणाला ऊत आला.
 आणि बुद्धधर्म हिंदुस्थानाबाहेर सर्वत्र होता. त्यांचे शुद्ध स्वरूप राहिलें नाहीं. बुद्धांचे अनेक अवतार झाले. नाना बुद्ध निर्माण झाले. त्या त्या देशांनी आपले रंग बुद्धधर्माला दिले. कारण निर्वाणात्मक अभावरूप बुद्धधर्म कोणास पटणार! बुद्धालाच त्यांनीं देव केलें! कोणी अमिताभ म्हणूं लागले. कोणी कांहीं.
 स्त्रियांची सर्वत्र शोचनीय स्थिति होती. गरिबांना मान नव्हता. सर्वत्र दुःख होते. अपमान होते. माणुसकीचा अभाव होता. खरा धर्म लोपला होता. अशा काळांत मुहंमद आले. त्यांचं येणें आकस्मिक नव्हतं. जगाच्या कोंडलेल्या बुद्धिशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले. मुहंमदांचें आगमन जगाच्या इतिहासाशी संबद्ध होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक शिथिलतेचा तो काळ होता. अशा परिस्थितीतून नवश्रद्धेचा जन्म होणें अपरिहार्य होतें. अशा चिखलांतून नवीन सहस्रदल सुंदर कमळ मुहंमदांच्या रूपानें फुललें. जगभर त्याचा गंध गेला. आर्तांस त्यांतील अनंत मकरंद मिळाला.
 कोठें जन्मला हा महापुरुष? अरबस्थानांत जन्मणाऱ्या पैंगंबरास दोन अनुकुलता हव्यात. अरबी धर्माच्या पुण्यक्षेत्री, परंपरागत स्थानीं जन्मलेला तो असावा आणि अरब रक्ताच्या थोर कुळांत तो जन्मलेला असावा. मुहंमदांना या दोन्ही अनुकूलता मिळाल्या. ते मक्केत जन्मले. काबाची पूजा करणारे श्रेष्ठ कुरेश त्यांच्या घराण्यांत जन्मले.
 मक्का शहर अरबस्थानचें केन्द्र होतें. धर्माचें व व्यापाराचें उत्तर दक्षिण दरींत तें वसलें होतें. पश्चिमेकडे उंच टेकड्या. पूर्वेकडेहि उंच दगड. मक्केच्या मध्यभागी काबाचें पवित्र मंदिर, मंदिराजवळच सार्वजनिक दिवाणखाना. घरें तटबंदी केलेली. रस्ते नीटनेटके व फरसबंदी. असें हें भरभराटलेलें, समृद्ध व बळवंत शहर होतें.
अशा या मक्केच्या गजबजलेल्या रस्त्यांतून एक शांतदांत मूर्ति हिंडतांना दिसे. विचारमग्न व गंभीर अशी ती मूर्ति दिसे. डोक्यावरील पागोट्यावरून एक रुमाल टाकलेला असे. त्याचे एक टोक उजवीकडून गळ्याखालून डाव्या खांद्यावर टाकलेलें असें, कोणाची ती मूर्ति? कोण ती व्यक्ति? कोण तो पुरुष? मध्यम उंचीचा, रुंद खांद्यांचा, दणकट मनगटाचा कोण तो पुरुष? काळेभोर दाट केस खांद्यावर आले आहेत. आणि डोकें कसें आहे पहा. भव्य विशाल डोकें! आदरणीय डोकें! तोंड जरा लांबट. पिंगट रंगाचें. तांबुस छटेचें. आणि भिवया बघा कशा सुंदर कमानदार आहेत. आणि दोन भुंवयांच्यामध्यें ती पहा एक ठसठशित शीर आहे. भावनोत्कट प्रसंगी ती थरारे. आणि डोळेहि काळेभोर, मोठे. ते डोळे कांहीं तरी शोधित आहेत, कोठे तरी पहात आहेत. अस्वस्थ आहेत ते डोळे! जाड व लांब पापण्यांमधून ते डोळे चमकत. नाकहि बांकदार व मोठे आहे. आणि दांत पहा किती स्वच्छ शुभ्र! दांतांची फारच काळजी घेतो वाटतें हा? आणि ती साऱ्या बाजूने असलेली सुरेख दाढी. किती रुबाबदार, सुंदर, सामर्थ्यसंपन्न चेहरा हा! कोणाचा हा? काय याचे नांव? कातडी मऊ आहे, स्वच्छ आहे. मुद्रा शुभ्र व लाल आहे. आणि हात पहा, रेशमासारखे, मखमलीसारखे मऊ आहेत. जणुं स्त्रीचे आहेत. पोषाख साधा. चाल द्रुतगतीची परंतु दृढ. जणुं वरून खाली येत आहे. देवाकडून मानवांकडे येत आहे. गंभीर मुखावरहि रस्त्यांत मुलें भेटतांच हास्य फुलतें आहे पहा. वाटेंत मुले भेटली तर त्यांच्या जवळ प्रेमाने बोलल्याशिवाय हा पुरुष रहात नसे. मुलांचा प्रेमी होता. कारण मुलांजवळ देवाचें राज्य असतें. अद्याप स्वर्गाच्या जवळ ती असतात. मुलांचेहि त्याच्यावर प्रेम होतं. तीं त्याच्याभोवती गोळा होत. आपल्या विचारांत मग्न होऊन जरी हा पुरुष जात असला तरी वाटेंत कोणी सलाम केला तर लगेच तो सलाम परत करी. मग तो सलाम अगदी हीन- दीनाचा का असेना.
 कोण होता तो? लोक त्याला अल्-अमीन म्हणत. आपण होऊन लोकांनी ही त्याला पदवी दिली होती. अल्-अमीन म्हणजे विश्वासार्ह. त्याचं जीवन इतकें आदर्शरूप, सचोटीचें, कष्टाचें, सन्मान्य असे होते, की सर्वांना त्याच्या विषयीं आदर व विश्वास वाटे. परंतु लोक असे कां पहात आहेत त्याच्याकडे? अल्-अमीनाकडे साशंकतेनें कां पहात आहेत? हा मनुष्य नवीन धर्म सांगूं लागला होता. लोक त्याला पागल म्हणूं लागले. समाजाचीं जुनीं बंधनें तो नष्ट करूं पहात होता. प्राचीन हक्क, जुने दुष्ट व भ्रष्ट रीतिरिवाज सोडा असें सांगत होता. हा हट्टी माथेफिरू क्रान्तिकारक आहे, असें आतां लोक म्हणत व तो जाऊं लागला म्हणजे संशयाने बघत.
 कोण होता तो? ते का मुहंमद पैगंबर? होय होय, तेच ते. शांतपणे रस्त्यांतून विचारमग्न होणारे व जाणारे. शिव्याशाप, निंदा सहन करीत जाणारे ते मुहंमद होते. कुरेशांच्या कुळांत, काबाच्या उपाध्यायांच्या कुळांत जन्मले होते.

■ ■ ■



पांचव्या शतकांत कुसय हा काबाचा मुख्य होता. त्यानें मक्केचा कारभार व्यवस्थित केला. निरनिराळ्या कुरेशांची घरें कशीं तरी, कोठें तरी विस्कळित बांधलेलीं होतीं. काबाचें मंदिर अति पवित्र म्हणून त्याच्या आसपास घरें बांधित नसत. परंतु कुसयनें काबाच्याजवळ वस्ती करायला त्यांना सांगितलें. काबाजवळ त्यानें जागा दिल्या. तेथें तटबंदी करून, मोहल्ले करून कुरेश राहूं लागले.
 कुसयने स्वतःसाठीं एक राजवाडा बांधला. त्याचा दरवाजा उघडतांच समोर मंदिराचें सभागृह असे. या राजवाड्याला दारु-न्नदवा असें म्हणत, म्हणजे कौन्सिल हॉल म्हणाना. येथेंच कुसयच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक प्रश्नांची चर्चा होई. चाळीसहून अधिक वयाचे लोकच या चर्चेत भाग घेत. कमी वय असणाऱ्यांस त्या सभेत जातां येत नसे. जेव्हां कधी कोणाजवळ लढायी व्हायची असे तेव्हां कुसय एका भाल्याला पांढरा रुमाल बांधी व तें जणुं निशाण कुरेशांच्या हातीं देई किंवा आपल्या मुलाच्या हस्ते कुरेश पुढाऱ्यांकडे पाठवी. या निशाणाला 'लिवा' म्हणत. असें निशाण आणीबाणीच्या वेळीं उभारण्याची पद्धत अरब साम्राज्याच्या समाप्तीपर्यंत होती. याला अकद-उल्-लिवा असें म्हणत.
 मक्केला जे गरीब यात्रेकरू येत त्यांच्यासाठी म्हणून कुसयनें एक 'गरीबकर' बसविला होता. त्याला 'रिफादा' म्हणत. नदवा, लिवा, रिफादा या जणुं तीन संस्था होत्या. हे तिन्ही अधिकार कुसयकडे होते. नदवा म्हणजे कौन्सिल बोलवून अध्यक्ष होणें. लिवा म्हणजे लष्करी हुकमत. रिफादा म्हणजे कर बसविण्याचा हक्क. कुसयने धार्मिक, नागरिक व राजकीय तिन्ही कर्मे स्वतःठायीं एकवटली. तो काबाची व्यवस्था ठेवी. यात्रेकरूंच्या अन्नपाण्याची व्यवस्था पाही. काबा मंदिराच्या किल्ल्या त्याच्याजवळ असत. म्हणजे तो धार्मिक मुख्य होता. नदवाचा म्हणजे कौन्सिलचा अध्यक्ष तोच. युद्ध करणें, कर घेणें याचीहि सत्ता त्याच्याचकडे. कुरेशांचा तो नायक झाला. कुरेशांचें नांव त्याने उज्ज्वल केलें. त्याच्या वेळेपासून इस्माईलच्या वंशजांत कुरेशांना अधिक मान मिळू लागला. कुसय म्हातारा होऊन इ. स. ४८० मध्ये मरण पावला. तो मेल्यावर त्याचा मुलगा अब्दुददार हा मुख्य झाला. तो मेल्यावर पुढे भांडणे झाली. भावाभावांच्या मुलांत भांडणे झाली. शेवटीं तडजोड झाली.
 सिकाया (म्हणजे यात्रेकरूंच्या पाण्याची व्यवस्था), व रिफादा हीं खातीं अब्दुददारचा भाऊ अब्दुलमनाफ याच्या मुलांकडे देण्यांत आली.
 हिजाब (म्हणजे काबाच्या मंदिराच्या किल्ल्या), नदवा व लिवा हीं खातीं अब्दुददारच्या मुलांकडे ठेवण्यांत आली.
 अब्दुल मनाफच्या मुलाचें नांव अब्दुसशम्स असें होतं. तो गरीब होता. त्यानें आपली खाती आपल्या भावाकडे दिली. या भावाचे नांव हाशिम. हाशिम सधन होता, वजनदार होता. हाशीमच्या हातांत रिफादा म्हणजे कर खातें होतें. तो येणाऱ्या यात्रेकरूंस अन्न देई. त्यांची व्यवस्था ठेवी. इतर मक्के वाल्यांप्रमाणं हाशिम व्यापारहि करूं लागला. हिंवाळ्यांत यमनला व उन्हाळ्यांत सीरियामध्यें नियमितपणें मक्केहून कारवान पाठविण्याची त्यानेंच पद्धत सुरू केली. सीरियांतील एका प्रवासांत हाशीम मरण पावला. इ. स. ५१० मध्ये ही गोष्ट झाली. त्याला एक मुलगा होता. त्याचें नाव शयबा परंतु हाशीमचें काम त्याचा धाकटा भाऊ मुत्तलिब याच्याकडे आले. मुत्तलिबला फार मान मिळे. त्याला अल-फैज म्हणजे उदार अशी पदवी होती. शयबा आईसह यसरिब येथे आजोळी होता. शयबाची आई सल्मा ही यसरिबची. यसरि म्हणजे मदिना. मुत्तलिब शयबाला नीट वागवी. लोक म्हणत शयबा म्हणजे मुत्तलिबचा जणुं गुलाम आहे. त्याला ते अब्दुल मुत्तलिब म्हणजे मुत्तलिबचा गुलाम असें म्हणत! पैगंबरांचे आजोबा अब्दुला मुत्तलिब या नांवानें इतिहासांत ओळखले जातात. मुत्तलिब इ. स. ५२० मध्ये मेला. आणि पैगंबरांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब हे मक्केच्या सार्वजनिक जीवनाचे सूत्रधार बनले.
 या वेळेस मक्केचे काम दहा जणांत वांटून दिले होतें. दहा खातीं दहा जणांकडे. अशी परंपरा पडली होती की या दहांत जो सर्वांत वयोवृद्ध असेल त्याला सर्वांनीं अधिक मान द्यायचा. तो पुढारी. त्याला रईस किंवा सय्यद म्हणत. मुहंमदांचे चुलते अब्बास हे या दहांतील प्रमुख होते. चारित्र्य व दानत यामुळे अब्दुल मुत्तलिब यांचंच प्रभुत्व होते.
 अब्दुल मुत्तलिब यांना संतति होत नव्हती. "मला संतति होऊ दे. एक मुलगा तुला देईन." असा त्यांनी काबाला नवस केला. आणि पुढें पुष्कळ संतति झाली. बारा मुलगे व सहा मुली. नवस फेडण्यासाठी आवडता मुलगा अब्दुल याचा बळि तो देणार होता. परंतु देवानें आवाज दिला शंभर उंट दे, म्हणजे पुरे! अब्दुल मुत्तलिबनें तसें केलें. तेव्हांपासून शंभर उंट म्हणजे खुनाची नुकसान भरपाई असें ठरलें!
 देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला जो हा अब्दुल्ला तोच पैगंबरांचा पिता. त्याचं अमीनाजवळ लग्न झालें. अमीनाहि यसरिबची होती. याच सुमारास म्हणजे इ. स. ५७० या वर्षी एक महत्त्वाची गोष्ट झाली. यमनच्या अबिसिनियन अधिकाऱ्यानें सना येथे एक चर्च बांधले. काबामुळे मक्केला असलेले पावित्र्य व वैभव नष्ट करावें असें त्याच्या मनांत होतें. कोणी मक्कावाल्यानें हें चर्च भ्रष्ट केलें. तेव्हां हबशी सुभेदार मोठें सैन्य घेऊन मक्केवर चालून आला. तो स्वतः प्रचंड हत्तीवर बसला होता. तो हत्ती पाहून अरब दबकले. त्यांनी हत्तीचा शक सुरू केला! हबशी जवळ आले. कुरेश बायाकामुलांसह पहाडांत पळाले. काबाच्या देवता आपला सांभाळ करतील म्हणाले. काय होतें तें ते दुरून पहात होते. भव्य उषा उजळली. अविसिनियन मक्केकडे निघाले. परंतु काय आश्चर्य! पक्ष्यांची प्रचंड सेना आली. आणि हे पक्षी दगडांचा वर्षाव करूं लागले. आणि नंतर आकाशांतील मोटा सुरू झाल्या. प्रचंड पर्जन्य! असा पाऊस कधीं पडला नाहीं. शेंकडों लोक दगडांनीं मेले. पाण्यानें मेलेले वाहून जाऊं लागले. समुद्रास मिळाले! हबशी व्हॉइसरॉय पळाला. तोहि घायाळ झाला होता. लौकरच मेला. याच वेळेस अरबस्थानांत प्रथम देवीची साथ आली. इतिहासकार म्हणतात चिमण्या व पाऊस ही दंतकथा असावी. कोणती तरी सांथ येऊन हे सैन्य नष्ट झालें असावें. मात्र कधीं कधीं मक्केच्या खोऱ्यांत अपरंपार पाऊस पडतो ही गोष्ट खरी.

■ ■ ■



या प्रसंगानंतर थोड्या दिवसांनी अब्दुल्ला यसरिबला सासुरवाडीस जात असतां वाटेंत मरण पावला. त्याचे वय फक्त पंचवीस वर्षांचं होतें. आणि त्याच्या दुःखी पत्नीनें पुढें लौकरच एका मुलाला जन्म दिला. तेच आपले पैगंबर मुहंमद, जो पुढे सर्व अनाथांचा मायबाप झाला तो जन्मताच पितृहीन होता! इ. स. ५७० च्या ऑगस्टची २९ वी तारीख. त्या दिवशी हा महापुरुष जन्मला. अबिसिनियन सैन्याच्या नाशानंतरचा तो पन्नासावा दिवस होता.
 अरब चालीप्रमाणे एका बेदुइन दाईनें दूध पाजून मुहंमदांस वाढविलें. पुढें तिनें अमीनाजवळ तें वाढलेलें लेकरू आणून दिले. अमीना मोठ्या प्रेमानें व काळजीनें देवाचा हा ठेवा वाढवू लागली. तिचं हृदय दुःखाने पोळलेले होतें. परंतु मुहंमदाच्या बालमूर्तीकडे पाही व शांत राही. परंतु तीहि लौकरच मरण पावली. मुहंमद लहानपणीच पोरके झाले! मुहंमदाचें वय सहा वर्षांचें. आईबापांच्या प्रेमाची पाखर जगांत कुठे मिळणार? तसें वात्सल्य कोण देणार? मुहंमदांच्या मनावर या गोष्टीचा फार परिणाम झाला. पोरक्या मुलांना फसवूं नका, त्यांना प्रेम द्या, असे कुराणांत अनेक उल्लेख आहेत. पोरक्या मुलांची कशी दीनवाणी स्थिति होत असेल, याचा त्यांना अनुभव आलेला होता. ती आठवण ते कधीं विसरले नाहींत.
 आजोबांनीं, अब्दुलमुत्तलिब यांनी मुहंमदांस आपल्याजवळ घेतलें. या नातवावर ते फार प्रेम करीत. देवाला बळी देऊ केलेल्या मुलाचा हा मुलगा. आणि देवानें मुलाला तर नेलें. त्याचा हा मुलगा राहिला. आजोबा त्याला क्षणभर विसंबत नसत. ऐंशी वर्षांचा वृद्ध आजोबा व सहासात वर्षांचा नातु. त्या दोघांत अति प्रेमळ व कोमल प्रीति होती. काबाजवळ एका ठराविक जागी आजोबा बसत. आणि जवळ नातु असायचा. खेळायचा, बोलायचा, प्रश्न विचारायचा. परंतु आजोबांचेहि प्रेम मुहंमदांस मिळावयाचें नव्हतें. सना येथील नवीन राजाचें अभिनंदन करण्यासाठी कुरेशांच्या वतीने वृद्ध अब्दुल मुत्तलिब गेले होते. ती प्रवासाची दगदग सहन झाली नाहीं. ते आजारी झाले. मरणार असें वाटलें. आजोबानी आपला मुलगा अबु तालिब यास बोलविलें व मरणशय्येवरून सांगितलें, "हा तुझ्या भावाचा पोरका मुलगा तुझ्या स्वाधीन मी करीत आहे. त्याला प्रेम दे." आणि इ. स. ५७९ च्या अखेर अब्दुल मुत्तलिब देह सोडून गेले. मुहंमदांचे वय नऊ वर्षांचे होतं.
 चुलते अबु तालिब यांच्या घरीं मुहंमद राहूं लागले. लहानपणापासूनच मुहंमद विचारी होते. ते नेहमीं विचारमग्न असत. डोळे मोठे काळेभोर. जणुं असारांतील सार शोधावयाला आले होते. सत्यशोधक, जिज्ञासु डोळे. कधीं हा मुलगा एकटाच टेकड्यांवर जाई व सृष्टिसौंदर्य पहात बसे. तेथे दमे, तल्लीन होई. स्वभाव मोठा सौम्य व गोड. दुसऱ्याच्या दुःखाने लगेच दुःखी होत, गहिंवरत. फार करुण, कोमल हृदय होतं ते. असा हा भावनोत्कट मुलगा सर्वांचा लाडका झाला. चुलत्या-पुतण्यांत अपार प्रेम जडलें. "जणुं देवदूतांनी येऊन त्यांची हृदयें उघडून आत प्रकाश भरला."
 उखाझ येथील मोहरमच्या पवित्र महिन्यांतील यात्रेत तो जाई. अरबांच्या शौर्याधैर्याची वर्णनं ऐके. ते पराक्रम ऐकून तो आनंदी होई. परंतु ते आपसांतील द्वेषमत्सर व सूड ऐकून सचिंत होई. यात्रेमध्यें ज्यू व ख्रिस्ती धर्मोपदेशकहि येत. त्यांचीं प्रवचनें तो लक्ष लावून ऐके. या यात्रेत सारें भलेंबुरें अरब जीवन तरुण मुहंमदांस पहायला मिळे. सुंदर अरबी भाषा येथेंच ते शिकले. जिचा कुराणांत पुढें अद्भुत प्रयोग झाला.
 परंतु उरवाझ येथील यात्रेचाहि भंग झाला. अरबांत एक यादवी युद्ध माजलें. राष्ट्रीय यात्रेच्या त्या पवित्र महिन्यांत युद्ध बंद ठेवण्याची, मानवी रक्त द्वेष- मत्सरानें न सांडण्याची सुंदर परंपरा होती. उरवाझ म्हणजे अरबांचे ऑलिंपिया. तेथें कवि, व्यापारी सारे येत. राष्ट्रीय मेळावा जमे. परंतु या युद्धाच्या वेळेस यात्रेच्या दिवसांतहि रक्तपात सुरूच राहिले! तें धार्मिक बंधन पाळलें गेलें नाहीं. यात्रा झुल्काद महिन्यांत भरे. परंतु यात्राहि रक्तपाताचें स्थान झाली! फिझार येथील लढायींत मुहंमदहि होते. त्यांनी आपल्या कुटुंबियांस लढाईत मदत केली. या युद्धाला अधार्मिक युद्ध असें म्हणतात. अपवित्र युद्ध असें म्हणतात. मुहंमदांवर या युद्धाचा फार परिणाम झाला. आपसांतील हीं कधीं न संपणारीं मरणान्तिक भांडणे पाहून त्याचे हृदय तडफडे. ते विचारमग्न होत.
 युद्धाचे दरम्यान एकदां चुलत्यांबरोबर ते सीरियांत व्यापारी काफिल्याबरोबर गेले. मुहंमदांच्या आजोबांनींच दरवर्षी यमन व सीरियांत मक्केहून कारवान पाठविण्याची पद्धत सुरू केली होती. ती अद्याप होती. या प्रवासांत मुहंमदांनीं सामाजिक दुःखं पाहिली, ऐकली. धार्मिक अधःपात सर्वत्र झालेला पाहिला. सीरियाच्या या प्रवासांतच वाटेंत एकेठिकाणीं त्यांना एक ख्रिश्चन साधु भेटला होता असें म्हणतात. या प्रवासांत मुहंमदांनी जें जें पाहिलें, ऐकिलें, अनुभविले त्याची स्मृति त्यांच्या हृदयांतून कधींहि गेली नाहीं.
 मुहंमदांच्या घराण्याला आतां गरिबी आली होती. हाशीम व आजोबा, अब्दुल मुत्तलिब यांच्या कर्णासारख्या औदार्यामुळे गरिबी आली होती. पूर्वीची श्रेष्ठ पदवी हळूहळू जाऊं लागली होती. यात्रेकरूंना अन्न देण्याचें काम शेवटीं त्यांनीं प्रतिस्पर्धी उमैय्या घराण्याकडे सोपविले. हे उमैय्या हाशीमांच्या घराण्याकडे अत्यन्त मत्सराने पहात असत.
 मुहंमदांना घरचें कामधाम करावे लागे. ते उंटांना चारायला नेत. शेळ्यामेंढ्या घेऊन जात. मुहंमद पुढें म्हणत असत, "ईश्वरानें मेंढपाळांतूनच पैगंबर पाठविले!" उंट व शेळ्यामेंढ्या चारतांना ते डोंगरांवर बसत. सृष्टिसौंदर्य पहात. पृथ्वीच्या व आकाशाच्या अनंत सौंदर्याची भक्ति कुराणांत पदोपदीं आहे. आकाशांत व धरेवर सर्वत्र पहाणारास परमेश्वराच्या खुणा आहेत, असें कुराण पदोपदीं सांगत आहे. परमेश्वराचें ज्ञान मुहंमदांस विश्वव्यापक प्रभूच्या सौंदर्यानेंच करून दिलें असावें. सृष्टि त्यांचा महान् गुरु होता. कुराण म्हणजे विश्वसौंदर्याचा वेद आहे. सृष्टीच्या भव्यतेचे तें उपनिषद् आहे. कुराणांतील भव्य सृष्टिवर्णनांची बीजें या वेळेसच, शेळ्यामेंढ्या, उंट चारतांनाच- मुहंमदांच्या हृदयभूमींत पेरली जात होतीं.
 मुहंमद आतां ऐन तारुण्यांत होते. विशीपंचविशीचं वय. या वेळेस ते पुन्हां सीरियांत कारवानाबरोबर गेले. कुरेश घराण्यांतील एक स्त्री खदिजा. तिच्या मालाचे उंट घेऊन मुहंमद गेले. खदिजा ही दूरची नातलग होती. खदिजा श्रीमंत होती. उदार होती. मुहंमद परत आले. मुहंमदांची कार्यनिष्ठा व प्रामाणिकपणा यांचा खदिजेवर परिणाम झाला. आणि खदिजेचें या काळ्याभोर डोळ्यांच्या तेजस्वी नेकीच्या तरुणावर प्रेम जडलें. ती म्हणाली, "मुहंमद, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तूं मला आवडतोस. तुझें माझें नातेंहि आहे. सारे लोक तुला मान देतात. तुझ्याबद्दल त्यांना आदर वाटतो. तूं प्रामाणिक आहेस. तुझें चारित्र्य निर्दोष व सुंदर आहे. स्वभाव गोड आहे. तुझी वाणी नेहमीं सत्यमय असते. खरेंच हो महंमद, यामुळे तूं मला आवडतोस." आणि त्यांचा विवाह झाला. खदिजेचें वय अधिक होतें. ती गतधवा होती. चाळीस वर्षांची होती. मुहंमद पंचवीस वर्षांचे. परंतु मुहंमदहि आनंदाने लग्नास उभे राहिले!
 हे लग्न अत्यन्त कल्याणप्रद व शुभमंगल असें झालें. दोघांचं एकमेकांवर फार प्रेम. खदिजेचें हृदय अत्यंत प्रेमळ होते. मुहंमदांविषयीं तिला अपार प्रेम वाटे. या लग्नानें मुहंमदांस शांति, विश्रांति मिळाली. कामाची दगदग राहिली नाहीं. पोटाची विवंचना उरली नाहीं. ज्या महान् कार्यासाठी त्यांचा जन्म होता त्याचा विचार करायला त्यांचे मन मोकळे झालें. प्रेमळ स्त्री हृदय त्यांना मिळालें. या अवघ्या जगांत त्यांच्या अवतारकार्यावर तिनेच प्रथम विश्वास ठेविला. निराशेत ती त्यांना शांतवी, आधार देई, धीर देई. ती आशेची ज्योत विझूं देत नसे. जेव्हां जगाचाच नव्हे तर स्वतः मुहंमदांचाहि स्वतःवर विश्वास बसेना तेव्हां तिनें विश्वास ठेवला! ज्यावेळेस मुहंमदांच्या डोळ्यांसमोर अंधारमय सारें होतें, तेव्हां तिनें श्रद्धेचा, आशेचा दीप प्रज्वलित ठेवला.
 खदिजेपासून मुहंमदांस सात मुले झाली. तीन मुलगे व चार मुली. परंतु सारे मुलगे बाल्यांतच मेले. मुहंमदांस मुलगा राहिला नाहीं. त्यांचे शत्रु त्यांचा उपहास करण्यासाठी 'अल्-अब्त्तर' म्हणजे निपुत्र्या असें त्यांना संबोधीत.
 लग्नानंतरचीं पंधरा वर्षे मक्केत आत्मचिंतनांत गेली. या पंधरा वर्षांची फारशी हकीगत नाहीं. ते फारसे बोलत नसत. परंतु जेव्हां बोलत तेव्हां जोर देऊन बोलत, ठासून बोलत, विचारपूर्वक, जाणून समजून बोलत. मुहंमद जें बोलत तें ऐकणारा कधीं विसरत नसे. त्यांच्या बोलण्याचा ऐकणारावर विलक्षण परिणाम होई. पुष्कळ वेळां ते अशान्त, सचिन्त, कष्टी असे असत. गळून गेलेले असे दिसत. निरुत्साही दिसत. परंतु एकदम कोठून तरी त्यांना स्फूर्ति येई. उत्साह संचरे. खिन्नता अस्तंगत होई. प्रसन्नता मुखावर पसरे. ते हंसूंबोलूं लागत.
 आणि लहान मुलें म्हणजे त्यांचा प्राण! ही भावी पिढी जणुं ते तयार करीत होते. रस्त्यांत मुलांना थांबवतील, त्यांच्या पाठीवरून हात फिरवतील. त्यांना लहान लहान गोष्टी सांगतील. त्यांच्या बरोबर दऱ्याखोऱ्यांतून, पहाडांतून भटकतील. त्यांच्याबरोबर खेळतील. ख्रिस्तहि लहान मुलांचा असाच शोकी होता. मुले म्हणजे देवाची प्रभा!
 या पंधरा वर्षांच्या काळांत अंतःपरीक्षण चाललें होतें. श्रद्धा व संशय यांची लढाई चालली होती. भावी कार्याची सिद्धता, तयारी होत होती. आध्यात्मिक ऐक्य अंतरंगी अनुभवीत होते.
 अब्दुल मुत्तलिब मेल्यापासून मक्केत एकजूट राहिली नव्हती. जे शहरचे खरे नागरिक त्यांना एकरक्तत्वामुळे संरक्षण असे. परंतु परकीयांचे जीवन मक्केंत सुरक्षित नसे. त्यांची मालमत्ता लुटली जाई. त्यांच्या बायकामुली पळविल्या जात. मुहंमदांस हा अन्याय पहावेना. 'हल्फ-उल्-फझूल' नांवाची त्यांनी एक संस्था स्थापिली. प्राचीन काळी अशी एक संस्था होती. तिच्यांत फझल, फझाल, मुफ्फझल, फुझेल असे चार लोक होते. त्यांच्या संघास फझल म्हणत. त्या प्राचीन संस्थेचे मुहंमदांनी पुनरुज्जीवन केलें. लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसानी इ. स. ५९५ मध्ये ही संस्था त्यांनीं स्थापिली. मुहंमद या संस्थेचे मुख्य होते. हाशिब व मुत्तलिब यांच्या घराण्यांतील सारे या संस्थेत सामील होते. या संस्थेच्या दबदब्यामुळे दुबळ्यांस व गरिबांस संरक्षण मिळे. या संस्थेने जरा धमकी देतांच काम होत असे. धटिंगणांच्या दुष्ट कृत्यांस आळा बसला. ही संस्था पुढें इस्लामच्या अर्ध्या शतकापर्यंत, सातव्या शतकाच्या अखेरपर्यंत होती.

■ ■ ■



सातव्या शतकाच्या आरंभी आणखी एक गोष्ट झाली. एका अरबानें बायझंटाईन सत्तेकडून कांहीं लांच खाल्ली. हिजाझ प्रांत रोमन सत्तेखाली देण्याची हा लांचखाऊ खटपट करीत होता. परंतु मुहंमदांनी पुढाकार घेऊन हा बेत हाणून पाडला.
 इ. स. ६०५ मध्ये काबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचें काम कुरेशांनीं योजिलें, परंतु आपसांत कांहीं तंटा निघाला. जीर्णोद्धार दूर राहून रक्तपात होणार असे दिसूं लागलें. परंतु मुहंमदांनी तडजोड केली. काबाचा दगड कोणी उचलायचा याचा वाद होता! मुहंमदांनीं एक रुमाल आणला. सर्वांनी टोंकें धरून उचला असें सांगितलं. अशा रीतीनें त्यांनी समयसूचकतेनें व शहाणपणानें रक्तपात टाळला.
 मुहंमद आतां सुखी होते. खदिजा श्रीमंत असल्यामुळे संसाराची विवंचना नव्हती. परंतु प्रेम करणारे चुलते अबु तालिब यांची गरिबी होती. त्यांचे उपकार मुहंमद कसे विसरतील? त्या उपकारांचं थोडें उतराई व्हावें असें त्यांच्या मनांत आलें. चुलत्यांचा एक मुलगा अली त्यांनीं आपल्या घरीं आणिला. त्याचे शिक्षण, संवर्धन, सारी जबाबदारी स्वतःवर घेतली. पुढे जेव्हां एकदां दुष्काळ आला तेव्हां दुसऱ्या एका अब्बास नांवाच्या चुलत्यांस मुहंमद म्हणाले, "अबु तालिबांचा एक मुलगा तुमच्याकडे घ्या. मीहि माझ्याकडे आणखी एक घेतों." अब्बास यांनीं जाफरला घेतलें. मुहंमदांनी अलीस स्वतःचा जणुं मुलगा मानलें. एक मुलगा अबु तालिबांजवळ राहिला. मुहंमदांचे सारे मुलगे मेले! पुत्रप्रेम कोठें करावें त्यांनीं? अलीच्या संवर्धनांत त्यांना पुत्र- वात्सल्याचा आनंद मिळे. पुढें मुहंमदांनी आपली सर्वात लहान कन्या फातिमा हिचे लग्न अलीजवळ केलें होतें. यामुळे प्रेमाचा व भक्तीचा संबंध अधिकच दृढावला. फातिमाचा जन्म इ. स. ६०३ मध्ये झाला होता.
 या सुमारास मक्केतील एका जमातीनें हारिसाचा मुलगा झैद याला मक्केत गुलाम करून आणिलें. खदिजेच्या एका आत्यानें त्याला विकत घेतलें होतें. त्यानें त्या गुलामाची खदिजेस भेट दिली. खदिजा पैगंबरांस म्हणाली, "ही मला मिळालेली भेट मी तुम्हांला देतें!" आणि मुहंमदांनी झैदला ताबडतोब मुक्त केलें.
 ही दया त्या काळांत अपूर्व होतीं. झैदचें हृदय कृतज्ञतेनें ओथंबून गेलें. तोहि मुहंमदांस सोडून जाईना. ज्याने मला स्वातंत्र्य दिलें त्याला सोडून मी कसा जाऊं? त्याचा बाप हारिसा त्याला नेण्यासाठी आला. पित्यानें परोपरीनें आग्रह केला. परंतु झैद गेला नाहीं.
 अशी ही बिनगाजावाजाची पंधरा वर्षे जात होती. स्वतःच्या प्रेमळ मुलग्यांच्या वियोगाचीं वर्षे, परंतु दुसऱ्यांच्या दुःखाविषयींच्या सहानुभूतीनें भरलेली वर्षे. हीं वर्षे जणुं उमेदवारीचीं होतीं. वरून शांत दिसणारे मुहंमद आंत अत्यन्त अशांत होते. त्यांच्यासमोर जीर्ण शीर्ण विदीर्ण असा अरेबिया होता. जातिजातींत भांडणें. पिढ्यानपिढ्या चालणारी वैरें. न संपणारे रक्तपात. नानाप्रकारच्या- मुलींना जिवंत पुरून टाकण्यासारख्या चाली. बायका किती कराव्या त्याला गणतिच नाहीं. नीतीचा धरबंध नाहीं. दारू, जुगार, सारी व्यसनें बोकाळलेली. सर्वत्र अज्ञान व दुष्टता. ईश्वराच्या नांवानें भांडणारे नाना पंथ. ही भांडणे हिजाझच्या दऱ्याखोऱ्यांपर्यंत येऊन पोचत. अरबी शहरें व गांवें ही सुद्धां धार्मिक भांडणांनीं पेटत. कांहींनी जुन्या धर्म-समजुती फेंकून दिल्या होत्या. प्रकाशार्थ त्यांची धडपड होती. त्यांची दोलायमान संशयी स्थिति होती. सर्वत्र अस्वस्थता व अशांतता होती. उत्कटता होती.
 अरबस्थानची ही विराट् अशांति मुहंमदांच्या हृदयांत प्रतिबिंबित झाली. मुहंमद गंभीरपणें विचार करू लागले. त्यांचा आत्मा उड्डाण करूं लागला. सृष्टीच्या गूढ रहस्यांत त्यांचा आत्मा डोकावूं लागला. अनंततेच्या दरींत पाहूं लागला. सत् काय, असत् काय? जीवन मरण काय? या विश्वाच्या गोंधळांतहि कांहीं व्यवस्था आहे का? मुहंमद शोधूं पहात होते. त्यांना तळमळ लागली. आणि देवाची वाणी त्यांच्या पवित्र उदात्त हृदयानें ऐकली. ती वाणी जगाला नवजीवन देती झाली.

■ ■ ■



पवित्र पर्वत हिरा हा मुहंमदांचा आवडता पर्वत. या पर्वतांतील एका गुहेंत मुहंमद प्रार्थना करीत, ध्यान करीत बसत. हा पर्वत उघडाबोडका आहे. आजूबाजूला दऱ्या आहेत. त्या वाळवंटांत एकटा तो पर्वत उभा आहे. जणुं पंचाग्नि-साधन करित आहे. ना झाडमाड, ना तिळभर छाया नाहीं जवळ झरा, ना विहीर. वाळवंटांतील प्रखर सूर्यतापांत पेटल्यासारखा हा पहाड होई. आणि मुहंमद त्या गुहेत असत. कधीं कधीं कुटुंबासह मुहंमद तेथें प्रार्थनेस जातं. बहुधा रमझान महिन्यांत ते जात. ते उपवास करीत. ध्यानमग्न असत. मुहंमदांची प्रकृति जरा नाजूक होती. अति भावनाप्रधान होती. फार संस्कारी स्वभाव होता. लहानपणीं त्यांना कधीं कधीं एकदम मूर्च्छा यायची. भावनांचा भर सहन होत नसे. या गुहेंतील एकान्त, ती भीषण शांति, ते उपवास, तें चिंतन व ध्यान यांचा एक विलक्षण परिणाम त्यांच्यावर होई. अनेक वर्षांचे संशय, अनेक वर्षांचे चिंतन यांनी त्यांचा स्वभाव फार हळवा केला होता. कांहीं तरी सत्य सांपडावें अशी धडपड होती. त्या सत्याच्या मांडीवर विश्वासाने डोकें- संतप्त डोके ठेवण्याची त्यांना इच्छा होती.
 या हिरा पहाडास हल्लीं प्रकाशपर्वत हें नांव आहे. वाळवंटांतील प्रखर सूर्यतापांत मी उभा आहे त्याप्रमाणे तुलाहि पुढें जनता आगीत घालील, त्या आगीत असें अचलपणें उभं रहावें लागेल, असें जणुं तो पहाड सुचवीत होता! मुहंमदांना आतां कांहीं सुचत नसे. त्यांना एकान्ताचे वेड लागलें. ती गुहा त्यांचें घर बनली. तेथेंच ते ध्यानमग्न रहात. सर्वव्यापी परमेश्वराशी एकरूप होत. मधून मधून त्यांना आवाज ऐकूं येत. भव्य दर्शनें घडत. आदेश, संदेश मिळत. आजूबाजूच्या साऱ्या निर्जीव वस्तु सहस्र जिभांनी जणुं बोलत आहेत असें त्यांना वाटे. "जा, ईश्वरी कार्य पुरें कर." असे जणुं तेथील ते दगडधोंडे, तेथील अणुरेणु, तेथील वारे त्यांना सांगत. सारी सृष्टि त्यांना पुकारीत होती. आत्म्याचे अमर काव्य होतें ते. अत्युच्च अद्वितीय महाकाव्य! जगांतील महान् विभूतींना असें हें आत्मगान ऐकायला मिळतें. चराचराशीं एकरूप झालेल्या आत्म्याचं गान! मुहंमदांस देवदूत दिसत. जणुं हळूहळू सत्याच्या दिव्य प्रकाशाचें तें आविष्करण होत होतें. ज्या सत्यानें पुढें मुहंमदांनीं साऱ्या जगाला न संपणारी प्रेरणा दिली तें सत्य हळूहळू प्रकट होत होते. पर्वताच्या एकान्तानें महापुरुषांना सदैव प्रकाश दिला आहे. ते महापुरुष पूर्वेकडचे असोत वा पश्चिमेकडचे.
 रात्रींच्या प्रशान्त वेळी; पहांटेच्या मंगल उषःकाली; गंभीर निःस्तब्ध एकान्ती, आसपास कोणीहि नाहीं अशा वेळेस पहांटेच्या वाऱ्याच्या मंद झुळुकांबरोबर मुहंमदांस आवाज ऐकूं येई, "तूंच तो मनुष्य. तूं देवाचा पैगंबर आहेस." कधीं कधीं प्रचंड लाटेसारखा घों करीत आवाज येई व त्यांना कंपायमान व रोमांचित करी. "तुझ्या प्रभूच्या नांवानें हांक मार, पुकार, घोषणा कर."
 मुहंमंद अगतिक होऊन म्हणत, "कसली करूं घोषणा?"
 "त्या ईश्वराच्या नांवानें घोषणा कर, ज्यानें तुला निर्मिलें. ज्याने मानवाला निर्मिलें. हांक मार. ईश्वर दयाळू आहे. अत्यन्त दयाळू आहे. मनुष्याला जें अज्ञात आहे तें तो ज्ञात करतो. तोच ज्ञानदाता आहे. तो तुला शिकवील. ऊठ. कर घोषणा."
 आणि मुहंमद थरारून उठे. "अल्ला हु अकबर!" घोषणा त्यांच्या मुखावाटे बाहेर पडे. आणि समोरचें अशांत वाळवंट ऐके. पहाड ऐकें. मुहंमदांस भव्य दर्शनें व्हायचीं. देवदूत दिसायचे. परमेश्वर व मर्त्य मानव यांच्यांत जा-ये करणारे देवदूत त्यांना दिसत. आणि ती एक धन्यतम रात्र आली. सर्व सृष्टीवर दैवी शांतीची पाखर घातलेली होती. तारे चमचम करीत होते. अपार शांति. मुहंमद विचारमग्न होते आणि एक अत्यन्त सामर्थ्यसंपन्न आवाज समुद्रगर्जनेप्रमाणें आला, "घोषणा कर, घोषणा कर." दोनदां स्पष्ट आवाज आला.
 "काय घोषणा करूं, कसली घोषणा करूं?"
 "देवाच्या नांवानें घोषणा कर."
 पुन्हां तिसऱ्यांदा आवाज आला, "घोषणा कर."
 पुन्हां मुहंमदांनी विचारलें "काय घोषवूं, काय पुकारूं?"
 आणि एकदम ईश्वरी ज्ञानाचें पुस्तक त्यांच्यासमोर उघडें केलें गेले! मुहंमदांच्या आत्म्यासमोर दैवी पुस्तक उघडें केलें गेलें. मुहंमदांस सारें ज्ञान करून देण्यांत आलें. जे ज्ञान मनुष्याला अगम्य असतें तें करून दिलें गेलें. इंद्रियातीत ज्ञान. जीवनाच्या संपूर्ण जाणीवेनें होणारे ज्ञान. ईश्वराशी एकरूप होऊन होणारें ज्ञान. मुहंमद त्या समाधींतून उठले. हृदयावर ते शब्द जणुं खोदल्यासारखे होते. ते थरथरत होते. शतभावनांनी कंपायमान होत होते. ते धांवत घरी आले. खदिजा तेथें होती.
 "खदिजे, खदिजे, काय आहे हें सारें, खरेंच काय?" असे म्हणून गळाल्यासारखा तो पडून राहिला. खदिजा त्यांच्याकडे पहात होती. पुन्हां मुहंमद म्हणाले, "खदिजे, लोक खरें मानोत वा न मानोत. मी शांतीचा संदेश देणारा तरी आहे किंवा सैतानाने- भुताने पछाडलेला पागल तरी आहे!"
 खदिजा प्रेमानें म्हणाली, "हे अबुल कासिम, परमेश्वराला माझी करुणा आहे. तो माझा रक्षणकर्ता. तो प्रभु वेडेवांकडें नाहीं हो कांहीं करणार. तूं कधींहि खोटें बोलत नाहींस. अपकारांचा बदला अपकाराने घेत नाहींस. तूं श्रद्धावान् आहेस. निर्दोष व पवित्र तुझें जीवन आहे. आप्तेष्ट, सखेसोयरे, सर्वांशी तू प्रेमाने वागतोस. सर्वांवर दया करतोस. तूं बाजारांतील गप्पाड्या नाहींस. काय झालें, काय पाहिलेंस? सारे सांग बरें मला. कांहीं भव्य भीषण का पाहिलेंस?"
 आणि मुहंमदांनी सारी हकीगत सांगितली. सारे ऐकून खदिजा म्हणाली, "ऊठ, ऊठ. आनंदाने नाच. तूं खरोखरच लोकांचा पैगंबर होणार. खात्रीनें. संशयच नाहीं. ज्याच्या हातांत या खदिजेचें जीवन आहे त्या प्रभुची शपथ. धीर धर. उत्साह धर." नंतर खदिजा उठली व त्या अज्ञेयवादी, ईश्वर एक असें म्हणणाऱ्या वरकाकडे ती गेली. वरका आतां वृद्ध झाला होता. अंध झाला होता. ज्यू, ख्रिश्चन यांचे धर्मग्रंथ त्याने अभ्यासिले होते. तिनें. त्याला सारें वर्तमान निवेदिलें. तो एकदम उचंबळू म्हणाला-

"कुददूसुन कुददूसुन! "

 "किती पवित्र गोष्ट, खरंच किती पवित्र!" हाच सर्वश्रेष्ठ पैगंबर. हाच नामूस अल-अकबर. देवाचा सर्व श्रेष्ठ देवदूत. मोझेसला तो दिसला. येशूकडेहि तोच आला. तोच मुहंमदाकडेहि आज आला, जा. मुहंमदास सांग कीं तूं आपल्या लोकांचा पैगंबर होणार. म्हणावें घाबरू नकोस. हृदय शांत कर. शूर, धीर बन."
 अरबस्थानच्या आसपास साम्राज्ये व राष्ट्रें धुळीस मिळत होतीं. सर्वत्र विनाश होत होता. खरा धर्म कोठेंच नव्हता. सर्वत्र चोथा व साली! धर्माचा गाभा कोठेंहि नव्हता. कोणी तरी तारक येणार, देवाचा संदेशवाहक येणार, अशी चारी दिशांतून उत्कट भावना हवेंत खेळून राहिली होती. वरका मुहंमदांस रस्त्यांत भेटले व म्हणाले, "माझें जीवन ज्याच्या हातीं त्याची शपथ घेऊन तुला सांगतों कीं ईश्वराने तुला या लोकांचा पैगंबर म्हणून पसंत केले आहे. त्यानें तुला संदेश दिला आहे. लोक तुला खोटे बोलणारा म्हणून म्हणतील. ते तुला छळतील. तुला हद्दपार करतील. तुझ्यावर शस्त्र धरतील. मी जर जगलों तर तुझ्यासाठी लढेन."
 आणि त्या वृद्धाला अधिक बोलवेना. मुहंमदांच्या मस्तकाचें, भालप्रदेशाचं त्याने अवघ्राण केलें, चुंबन घेतलें. आणि तो गेला. त्या शब्दांनीं मुहंमदांच्या प्रक्षुब्ध हृदयास धीर आला. शांति आली. पुन्हां तो आवाज कानी येईपर्यंत थांबण्याचे त्यानें ठरविलें. पुन्हां ती दैवी प्रेरणा मिळावी म्हणून तो थांबला. केवढ़ें मानसिक युद्ध चाललें असेल! महान् अंतरात्म्याच्या कुरुक्षेत्रावरची श्रद्धा संशय यांची लढाई. आशा, शंका, झगडे, गैरसमज, स्वतःचें देवी कार्य निश्चितपणे पटेपर्यंत किती मानसिक यातना!
 आणि पुन्हां ती वाणी घों करून आली. आशेची निःशंक वाणी! "जा सारे जग तुझ्या धर्मात येईल. जा. ऊठ विश्वास धर." अशी ती नभोवाणी पुन्हां मिळाली. तें प्रभूचें पुनराश्वासन मिळाल्यावर वाळवंटांतून लगबगीने तो घरी आला. त्याचें शरीर थकलें होतें. मन झगडून दमले होते. तो खदिजेजवळ आला. सर्वत्र त्याला प्रभूचें विराट अस्तित्व भासत होतें. तो थरथरत होता. गांगरला होता. तो खदिजेला म्हणाला, "खदिजे, खदिजे, सांभाळ मला धीर दे. वांचव!" मुहंमदाची तपस्या जगासाठी होती. ईश्वराशी एकरूपता या जगाला वाचवण्यासाठी त्यांना हवी होती. स्वतःसाठी केवळ नको होती.
 "ऊठ, जगाला सत्याची सूचना दे. प्रभूचं गौरवगान गा. त्याचे वैभव गा." असा स्पष्ट आदेश मिळाला. अतःपर शंका संभ्रम नाहीं. मुहंमद आतां उभे राहिले. अचल श्रद्धेनें व अपार विश्वासाने उभे राहिले. सारे छळ, यातना, हालअपेष्टा यांना न जुमानतां उभे राहिले. सत्यासाठी उभा राहिलेला हा महापुरुष असत्यासमोर अतःपर नमला नाहीं.
 हा सारा मनाचा खेळ होता का? मुंहमदांस जे देखावे दिसत, जे शब्द ऐकू येत, जे देवदूत दिसत ही सारी का प्रक्षुब्ध मनाची निर्मिति होती? हीं का केवळ स्वतःची स्वप्नें? सांगतां येणार नाही. मानसशास्त्राचा अभ्यास अर्वाचीन शास्त्रज्ञांना अद्याप करावयाचा आहे. इंद्रियातीत अशीहि एक ज्ञानप्राप्तीची शक्ति मनुष्याला आहे. तें ज्ञान खोटे असे कोण म्हणेल? ते अनुभव खोटे असें कोण म्हणेल? महापुरुष सांगतात की, आम्हांला असे असे अनुभव आले. ते प्रत्यक्षाच्याच गोष्टी बोलतात, करतात. तुम्हां आम्हांला जे प्रत्यक्ष नसतें तें त्यांना असतें. त्यांना तें पाहण्याचे डोळे असतात. जणुं निराळींच इंद्रियें मनाला फुटतात! कांहीं असो, ती आत्मवंचना खास नव्हती. "तो मी परमेश्वराचा दूत गॅब्रिअल. मी तुला परमेश्वराचा मंगल संदेश घेऊन आलों आहें. ऊठ. ईश्वराचा महिमा गा. उत्साही हो. पवित्र हो. शुद्ध हो. प्रत्युपकाराची, फळाची अपेक्षा ठेवून उपकार करूं नको. तू भलें कर. सर्वांचें मंगल कर. तुझ्या मंगल कार्याला फळ येईल. वाट पहा. ईश्वरावर श्रद्धा ठेवून धीरानें, उतावीळ न होतां वाट पहा." असे शब्द त्यांना ऐकूं येत. जणुं समोर दिसत. आणि संशय झडझडून टाकून आत्मविश्वासानें एका परमेश्वराचे, त्या अद्वितीयाचे महागान गावयास ते उभे राहिले.

■ ■ ■


मुहंमद एका ईश्वराचे पैगंबर म्हणून प्रचार करूं लागले. चाळिशी नुकतीच संपली होती. आणि आयुष्याचा उरलेला भाग आतां ईश्वरदत्त महान् कार्यासाठी ते अर्पण करूं लागले. आणि त्यांच्यावर प्रथम विश्वास कोणी ठेवला? त्यांच्या जवळच्या मंडळींनी. पैगंबरांच्या उत्कट तळमळीची व सत्याची याहून दुसरी कोणती निशाणी? जवळची मंडळी त्यांचा नवधर्म घेती झाली. त्यांना शंका वाटली नाहीं. हा ईश्वरी पुरुष आहे असें त्यांना वाटले. त्यांतहि सर्वांत आधीं खदिजा. ती पहिली अनुयायी, पैगंबरांस ईश्वरी ज्ञान झाले आहे! असें जर कोणी पहिल्याने विश्वासपूर्वक मानले असेल तर तें खदिजेनें. मूर्तिपूजा सोडून, त्या परम कारुणिक प्रभूची. मुहंमदांबरोबर प्रथम जर कोणी प्रार्थना म्हटली असेल तर ती खदिजेनें, मुहंमदांच्या दैवी जीवनकार्यावर तिनेंच प्रथम श्रद्धा ठेविली, इतकेंच नव्हे तर पुढील झगड्यांत तिनं त्यांना सदैव धीर दिला. जेव्हां तो कावराबावरा होऊन त्या रात्रीं तिच्याकडे आला व "खदिजे, खदिजे; पांघरूण घाल माझ्यावर, कपड्यांत लपेट मला." असें म्हणाला त्या वेळेस ईश्वराने खदिजेच्या रूपानेंच जणुं त्याला धीर दिला, शांति दिली. तीच त्याला म्हणाली, "ऊठ." तिनेच त्याचा बोजा हलका केला. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे म्हणाली. लोकांना वाटेल तें बडबडूं दे. लक्ष नको देऊं, असें म्हणाली. परमेश्वरानें ज्ञान दिले, खदिजेनें शांति व विश्वास दिला.
 पहिल्या पहिल्याने ज्यांचें महंमदांवर प्रेम होतें त्यांच्याशींच ते आपला आत्मा प्रकट करीत. आपला नवसंदेश देत. पूर्वजांच्या विकृत व अशुध्द आचारांपासून परावृत्त व्हा म्हणत. अब्राहामचा शुद्ध धर्म मी पुन्हां आणला आहे म्हणत. खदिजेनंतर अली त्यांचे अनुयायी झाले. पैगंबर मक्केच्या सभोवतालच्या एकान्तमय वाळवंटांत जात. तेथे खदिजा व अलि यांच्यासह ते प्रार्थना करीत. तिघांची कृतज्ञतापूर्वक एकत्र प्रार्थना. पहिली सामुदायिक प्रार्थना. एकदां तीं तिघें अशीं प्रार्थना करीत असतां चुलते अबु तालिब यांनीं पाहिलें. ते मुहंमदांस म्हणाले, "बेटा, हा कोणता धर्म तूं आचरीत आहेस?" मुहंमद म्हणाले, "ईश्वराचा. त्याच्या देवदूतांचा. त्याच्या पैगंबरांचा. आपल्या प्राचीन अब्राहामचा हा धर्म. लोकांना सत्यमार्गाकडे आणावें म्हणून परमेश्वरानें मला पाठविलें आहे. आणि काका, तुम्हीहि ईश्वराचे अति थोर सेवक आहांत. तुम्हांला ईश्वराचा सेवक म्हणून मी हांक मारावी हें उचित आहे. तुम्हीहि या सत्याचा स्वीकार करा. या सत्याच्या प्रसारासाठी साहाय्य करा." चुलते म्हणाले, "पूर्वजांचा धर्म मी सोडूं शकत नाहीं. परंतु त्या परमश्रेष्ठ परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतों कीं, जोंपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोणीहि तुला अपाय करणार नाहीं." नंतर तो वृध्द पुरुष आपल्या मुलाला विचारता झाला, "बेटा, तुझा धर्म कोणता?" अली म्हणाले, "तात, त्या एका ईश्वरावर व त्यांच्या या पैगंबरावर विश्वास ठेवतो. मी पैगंबरांबरोबर जातो." अबु तालिब म्हणाले, "मुहंमद योग्य तेच तुला सांगेल. जा बाळ, त्याच्या बरोबर जा. तो वाइटाकडे तुला कधींहि नेणार नाहीं. त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे तुला स्वातंत्र्य आहे."
 तिसरा अनुयायी झैद झाला. तो गुलाम ज्याला मुहंमदांनीं एकदम मुक्त केलें होतें. त्यानें हा नवधर्म घेतला. आणि चौथे अनुयायी कोण झाले? अबुबकर. ते मक्केंतील श्रीमान् व्यापारी होते. उदार, शहाणे, धोरणी, शांत, धीराचे, होते. मुहंमदांस 'अल-अमीन' म्हणत, तसें यांना 'अस-सिद्दीक' म्हणजे सच्चा असें म्हणत. मुहंमदांहून दोनच वर्षांनीं ते लहान होते. त्यांना अब्दुल काबा म्हणजे काबाचा सेवक असेंहि म्हणत. अशा वजनदार व थोर पुरुषानें हा नवधर्म एकदम स्वीकारला, या गोष्टीचा मोठा नैतिक परिणाम झाला. त्यांच्या पाठोपाठ आणखी पांच या नवधर्मात आले. अबुबकर पुढें खलिफा झाले. तसेंच पुढे खलिफा होणारे उस्मान हे मिळाले. उस्मान हा प्रतिस्पर्धी उमैय्या घराण्यांतील होता. दुसरा अब्दुर रहमान तिसर साद- ज्यानें पुढें इराण जिंकून घेतला. चौथा खदिजेचा नातलग झुबैर. आणि पांचवा तो शूर लढवय्या तल्हा. उस्माननें नवधर्म स्वीकारला हे ऐकून त्याचे चुलते संतापले.
 त्यांनीं उस्मानला बांधलें व विचारलें, "पूर्वजांच्या धर्मापेक्षां तुला का हा नवा धर्म पसंत आहे? जो नवा धर्म तूं घेत आहेस तो जोपर्यंत तूं सोडणार नाहींस, तोपर्यंत मी तुला सोडणार नाहीं." परंतु उस्मान उत्तरला, त्या परमेश्वराचीच शपथ घेऊन मी सांगतों कीं तो नवधर्म मी प्राण गेला तरी सोडणार नाहीं!"
 कांहीं अनुयायी कनिष्ठ व सामान्य जनतेतीलहि मिळाले. मक्केतील कांहीं निग्रो गुलाम या नवधर्माचा स्वीकार करते झाले. तो हबशी 'बिलाल' इस्लामी इतिहासांत प्रसिद्ध आहे. इस्लामी धर्माचा पहिला मुअज्जिन म्हणून बिलाल प्रसिद्ध आहे. पैगंबरांचा हा अत्यंत निष्ठावंत शिष्य होता. अभंग श्रद्धेचा धर्मात्मा होता. मुहंमद प्रेमानें म्हणत, "बिलाल म्हणजे अबिसिनियाचें सर्वोत्तम फळ आहे!"
 मुहंमदांच्या अत्यंत जवळचे आत मित्र त्यांचे पहिले अनुयायी. मुहंमदांची तळमळ, त्यांची दैवी स्फूर्ति, त्यांची पवित्र शिकवण, त्यांची उत्कटता यांचा हा पुरावा आहे. या जवळच्या सूज्ञ मंडळींस मुहंमदांच्या शिकवणींत वंचना दिसती, अश्रद्धा वा केवळ ऐहिकता दिसती तर मुहंमदांची सामाजिक सुधाणेची व नैतिक पुनरुज्जीवनाची सारी आशा मातीत मिळाली असती. या अनुयायांनी छळ सहन केलें. संकटे सोसली. शारीरिक वेदना व मानसिक दुःखें सहन केलीं. बहिष्कार, मरण यांनाहि तोंड दिलें. मुहंमदांच्या ठायीं त्यांना यत्किंचितहि काळें दिसतें तर अशी अडग श्रद्धा जन्मती का? ख्रिस्तावर त्याच्या भावांचा, जवळच्या मंडळींचा यत्किंचितहि विश्वास नव्हता. परंतु मुहंमद या बाबतींत दैववान् होते. मुहंमदांच्या अनुयायांची अचल श्रद्धा हीच त्यांच्या स्वीकृत कार्याविपयींच्या अत्यन्त प्रामाणिकपणाची खूण आहे.
 परंतु प्रचार फार झपाट्याने होईना. वडाचे झाड का एकदम वाढते? मूर्ति- पूजेपासून स्वबांधवांस परावृत्त करण्यासाठी तीन वर्षे मुहंमद शांतपणें, परंतु अविरतपणें खटपट करित होते. तीन वर्षांत तीस अनुयायी फक्त मिळाले! मूर्तिपूजा फार दृढमूल झालेली. या प्राचीन धर्मांत पुन्हां अन्य आकर्षणे होतीं. या नव्या विशुद्ध धर्मात तसें कांहीं एक नव्हतें. जुन्या मूर्तिपूजेत कुरेशांचा स्वार्थ होता. तो धर्म कायम राहण्यांत त्यांची प्रतिष्ठा होती. मुहंमदांना या मूर्तिपूजेविरुद्ध व तदंतर्गत वतनदारीविरुद्ध, दोहोंविरुद्ध लढावयाचे होते आणि म्हणून अनुयायी वाढतना. तीन वर्षांत तीस. महिन्याला एकहि पडला नाहीं! परंतु मुहंमदांचं हृदय खचलें नाहीं. परमेश्वरावर त्यांचा भरंवसा होता. कुराणांत पुनःपुन्हां म्हटलें आहे कीं, "ईश्वरावर श्रद्धा ठेवून वाट पहा." ते उद्गार याच कसोटीच्या काळांतील असतील.
 तीन वर्षेपर्यंत फारसा उघड विरोध त्यांना झाला नाहीं. कारण मुहंमदांनीहि उघड बंड पुकारलें नव्हतें. लोक त्यांना माथेफिरू, पागल म्हणत! भुतानें, सैतानानें पछाडले आहे असें म्हणत. मुहंमद जाहीरपणे अद्याप प्रचार नव्हते करीत. कोणा परकीयांशी बोललें तर एकदम त्याच्या मूर्तिपूजेवर हल्ला नसत चढवीत. शांतपणे व दृढतेने सांगत, "तो एक प्रभु ओळखा. त्याची, त्या एकाची पूजा करा." हा शांतिदूत कीं, वेडा? याच्या शब्दांत सत्य आहे का? लोकांस आश्चर्य वाटे.




इ. स. ६१५ पासून मुहंमद उघड प्रचार करूं लागले. मूर्तिपूजा सोडा असें जाहीरपणे सांगूं लागले. सफा टेंकडीवर त्यांनी एक सभा बोलाविली. त्या सभेंत मुंहमद मूर्तिपूजेविरुद्ध बोलले. मूर्तिपूजेनें त्या महान प्रभूचा अपराध होतो. ईश्वराच्या प्रेषिताचे शब्द न ऐकाल तर पस्तावाल, असें त्यांनी सांगितले. ज्यांनी ज्यांनीं आजपर्यंत देवाच्या पैगंबराचा संदेश ऐकला नाहीं त्यांची कशी दशा झाली, 'याचे त्यांनी जळजळित चित्र उभं केलें.' ही जुनी पूजापद्धति सोडा. प्रेमाचा, सत्याचा व विशुद्धतेचा नव धर्म घ्या, असे त्यांनी सांगितलें. कोणत्याहि अरबानें आजपर्यंत दिलें नाहीं तें मी तुम्हांला देतों, या जगींचें सुख व परलोकींचेंहि सुख! माझ्या या कार्यात कोण मदत कराल बोला." त्या सभेत एका अलीशिवाय कोणीहि उत्साह दाखविला नाहीं! अली म्हणाला, "देवाच्या पैगंबरा, मी तुम्हांला मदत करीन." हे ऐकून सारे मोठ्यानें खो खो हंसले. सर्वांनीं टर उडविली. टोमणे मारित ते निघून गेले.
 परंतु मुहंमदांचा जिवंत ज्वलंत प्रचार सुरू झाला. ती जळजळीत रसरशीत वाणी होती. "मी तुम्हांला सूचना द्यायला आलों आहे. मी प्रभूचा संदेशवाहक आहे. माझें ऐका. नाहीं तर भेसूर कठोर शिक्षा आहे तुम्हांला! जोपर्यंत, अल्लाशिवाय दुसरा देव नाहीं, अल्लाच एक सत्य असें तुम्ही म्हणणार नाहीं, तोंपर्यंत इह वा अन्यत्र तुम्हांला तरणोपाय नाहीं. ईश्वर हे न मानणाऱ्यांना पूर्वी शासन केलें. ज्यांनी नोहाचे ऐकलें नाहीं ते कसे पुरांत गेले ध्यानांत धरा. या प्रखर जळजळीत सूर्याची शपथ घेऊन मी सांगतो. रात्रींच्या त्या भव्य तारांकित आवरणाची शपथ घेऊन सांगतो. भव्य उषःकालाची शपथ घेऊन सांगतों. न ऐकाल तर पुढें विनाश आहे. कोणी वांचवणार नाहीं. तो शेवटचा दिवस येईल. सर्वांचा हिशोब होईल. नरकाची आग एकीकडे, एकीकडे अनंत निर्मळ सुखांचा स्वर्ग. काय पाहिजे बोला. सत्य धर्म ऐका."
 असा मुहंमदांचा प्रचार सुरू झाला. त्यांची ती तेजस्वी वाणी, जीवनाच्या श्रद्धेतून येणारी निःशंक सत्याची वाणी! श्रोते उचंबळत, रोमांचित होत. तीं ईश्वरी शासनाचीं भयंकर वर्णनं ऐकून श्रोत्यांचा थरकाप होई.
 कुरेश आतां घाबरले. या प्रकरणाचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे, असें त्यांना वाटू लागलें. मामला गंभीर होत चालला. मक्केतील मूर्ति फुटल्या तर या मंदिरांत कोण येईल? आणि मग कोठली प्रतिष्ठा, कोठले पैसे, उत्पन्ने? परंतु मुहंमदांस हात लावण्याचें त्यांना धैर्य नव्हतें. मुहंमद थोर घराण्यांतील होते. जरी गरीबी आली होती तरी त्यांच्या घराण्याविषयी पूज्यभाव सर्वांस वाटे. चुलते अबु तालिब यांना सारी मक्का पूज्य मानी. ते मुहंमदांचे पालक होते. मानलेले वडील होते. मुहंमदांवर हात टाकणे कठीण. आणि इतरांवर तरी कसा टाकावा? कारण रक्ताचा सूड ही भयानक गोष्टी होती. एकाचा खून झाला तर त्याची सारी जमात सूड घ्यायला उठे व प्रचंड यादवी माजे.
 मक्का शहरांत जे व्यापारी येत त्यांनाहि मुहंमद उपदेश करूं लागले. परंतु हें तर कुरेशांस मुळींच आवडेना. मक्केतील गोष्टी, हे नवीन क्रान्तिकारक विचार बाहेर जाऊं नयेत असें त्यांना वाटे. ते काय करीत, मक्केंत कोणी येत आहे कीं काय हें आधीं पहात. आणि मक्केच्या बाहेरच त्यांना गांठून म्हणत, "मक्केत एक वेडा पीर आहे. त्याचें नांव मुहंमद तो कांहीं तरी बोलतो. त्याचें ऐकू नका बरें." परंतु हे लोक आपापल्या गांवीं परत जातांना मक्केतील सारी हकीकत घेऊन जात. एक स्फूर्तिदाता महान् पैगंबर जन्मला आहे असें सांगत. त्याच्या प्राणांवर संकट आहे तरीहि जुना धर्म सोडा असें तो सांगत आहे असें म्हणत. सर्वत्र उत्सुकता वाढली.
 मुहंमदांचें निकट आप्तेष्ट त्यांना सोडतील असें कुरेशांस वाटत होतें. परंतु तें खोटें ठरलें. चुलते अबु तालिब पूर्वधर्म सोडायला तयार नव्हते, परंतु मुहंमदांचा हा अकारण छळ पाहून ते संतापत. ते आपल्या एका कवितेंत म्हणतात—
 "अनाथांचा त्राता, विधवांचा वाली, पोरक्या पोरांचा पिता, जो अल-अमीन आहे, जो दिला शब्द मोडीत नाहीं, कर्तव्यच्युत होत नाहीं, त्याचा कां बरें हे छळ करतात?"
 त्यांनी जाहीर केलें कीं, हाशिम व मुत्तलिब यांची मुले स्वतःच्या प्राणांनी मुहंमदांचं रक्षण करतील.
 याच वेळेस यसरिब येथील एका प्रमुख गृहस्थानें मक्कावाल्यांस लिहिलें: "यादवी नका करूं. नवीन मत ऐका. तुमच्यांतील एक सन्मान्य पुरुष नवधर्म देत आहे. त्याचा छळ नका करूं, मनुष्याचे हृदय एक परमेश्वरच वाचूं शकतो."
 या पत्राचा थोडा परिणाम झाला. प्रत्यक्ष छळण्याऐवजीं ते निंदेनें छळू लागले. शिव्या द्याव्या. वाटेल ते अभद्र बोलावें. कुरेशांनी मुहंमदांस काबा- मंदिरांत प्रार्थनेची बंदी केली. मुहंमद प्रार्थनेसाठीं जेथें जात तेथें पाठोपाठ विरोधकहि येत. ते प्रार्थना करूं लागले म्हणजे हे शेणमार करीत. गांवांतील गुंडांना व वात्रट पोरांना मुहंमद व त्यांचे अनुयायी यांच्या पाठीस लावीत. मुहंमदांच्या एका चुलत्यांची पत्नी उम्मेजमील ती ह्या छळण्यांत पुढाकार घेई. ती मुहंमदांच्या प्रार्थनेच्या जागीं कांटे पसरून ठेवी. या बाईला इस्लामी इतिहासांत 'हम्मालत उल-हतब' म्हणजे नरकाग्नीसाठीं मोळी नेणारी असें नांव पडले आहे. असा त्रास होई तरी मुहंमद शांतपणे कर्तव्य पार पाडीत होते. एकदां तर त्यांच्या प्राणांवरच पाळी आली होती. परंतु मुहंमदांच्या आत्मसंयमी सौम्य स्वभावामुळें दुष्ट शेवटी माघारे गेले.
 या छळानें नवधर्माचं सामर्थ्य वाढतच गेलें. हुतात्म्यांचे रक्त हेंच धर्माचं फोफावणारें बीं. अबदुल मुत्तलिब यांचा सर्वात धाकटा मुलगा हमजा हाहि मुहंमदांस मिळाला. मुहंमदांचा होत असलेला छळ, त्यांना मिळणारे शिव्याशाप, त्यांची होणारी निंदा, यामुळे तो त्यांना येऊन मिळाला. हमजा मोठा शूर होता. त्याच्या तरवारीची सर्वांना भीति वाटे. इस्लामसाठीच लढतांना तो पुढें मरण पावला!
 मुहंमदांची प्रखर वाणी सुरूच होती. अधिक लोक मिळू लागले. कुरेश घाबरूं लागले. मुहंमदांच्या नवधर्माची शिकवण लोकशाही स्वरूपाची होती. मुहंमदांच्या ईश्वरासमोर सारे सारखे होते. प्राचीन विशिष्ट भेद, ते श्रेष्ठकनिष्ठपणाचे प्रकार मुहंमद नष्ट करूं पहात होते. सनातनींस हें कसें सहन होणार? खऱ्या देवाची पूजा सुरू झाली तर या प्रतिष्ठितांची पूजा कोण करणार? सारे कुरेश संघटित होऊं लागले. ज्याने त्याने आपल्या घराला जपावें, आपल्या घरांत हे नवीन धर्मांचे जंतु येऊ देऊ नये असें ठरलें. ज्यांच्या ज्यांच्या घरांत कोणी नवधर्मी होते त्यांना त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी तुरुंगांत टाकले! त्यांची उपासमार सुरू झाली. त्यांना काठ्यांनी बदडलें. रमधा टेंकडी व बथा ही जागा या छळासाठीं प्रसिद्ध झाली! जे पुरुष नवधर्म घेत त्यांना प्रखर उन्हांत तप्त वाळूत उताणें निजवीत. उघडे करून निजवीत. छातीवर दगड ठेवीत. पिप्यास पाणी देत नसत. 'मूर्तिपूजा मान नाहींतर मर' असें म्हणत. या छळामुळे कांहींजण तात्पुरतें कबूल करीत, परंतु पुन्हां मूर्तिपूजा त्याज्य मानीत. पुष्कळजण या असह्य छळांतहि टिकत. बिलाल अशांपैकी होता! बिलाल निग्रो गुलाम होता. त्याने नवधर्म घेतला होता. त्याचा धनी उमय्या त्याला रोज बथा येथें नेई. मध्यान्हीं सूर्य आला असे. तेथें सूर्याकडे तोंड करून उघडा करून पाठीवर त्याला निजवण्यांत येई. छातीवर दगड ठेवीत व त्याला म्हणत, "नवीन धर्म, इस्लाम सोड नाहींतर मर!" त्या छातीवरच्या दगडावरहि हे शब्द लिहिलेले असत. बिलालचा जीव गुदमरे, तहानेनें तडफडे. परंतु तो तरीहि 'अहदन अहदन!' एक एक (ईश्वर एक आहे) असेच म्हणे. या छळानें तो शेवटी मरणोन्मुख झाला. अबू बकरनें त्याला त्याच्या धन्यापासून विकत घेतले व मुक्त केलें! गुलामांचा कुरेश छळ करीत, ज्या गुलामांनीं नवधर्म स्वीकारला होता. त्या अबू बकरनें छळल्या जाणाऱ्या अशा गुलामांना मुक्त केलें. कोणी कोणी छळामुळे जरी कचरले तरी मुहंमद त्यांच्यावर रागावत नसत. करुणेने म्हणत, "तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तुमचीं मनें माझीं आहेत हे मला माहीत आहे." कांहीं कांहींचा इतका छळ झाला की ते मेले! यासर व त्याची पत्नी शमिया यांना छळून मारण्यांत आलें. त्यांचा मुलगा अम्मार याचाहि अत्यंत छळ झाला. मुहंमद हे छळ पहात होते. त्यांच्या हृदयाची कालवाकालव होत होती. या छळांत दोन मेले. कांहीं शरण गेले.
 एकीकडे असे छळ चालले असतां दुसरीकडे मोठी मोठीं आमिषे दाखवून मुहंमदांस वश करून घेण्याचे प्रयत्न चालले होते. एके दिवशीं काबाच्या सभागृहापासून दूर अंतरावर मुहंमद बसले होते. त्यांच्या विरोधकांपैकीं जरा नेमस्त वृत्तीचे एक गृहस्थ त्यांच्याजवळ येत म्हणाले, "बेटा, तूं गुणानें थोर आहेस. मोठ्या घराण्यांतला आहेस. तूं आमच्या लोकांत भांडणे लावीत आहेस, भेद पाडीत आहेस, वितुष्टें लावीत आहेस. तूं आमच्या घरांतील आनंद, ऐक्य, सलोखा नष्ट केलास. तूं देवदेवतांचा उच्छेद मांडला आहेस. आमचे सर्व पूर्वज मूर्ख व पापी होते, अधार्मिक होते असा तूं शेरा मारीत आहेस. तुझ्यासमोर एक योजना ठेवायला मी आलों आहें. बघ तुला पटली तर."
 मुहंमद म्हणाले, "सांगा काय तें वलीदचे बाबा, सांगा, बोला."
 वलीदचे बाबा म्हणाले, "ऐक. माझ्या भावाच्या मुला ऐक. या नव धर्माचा मुख्य होऊन तुला का श्रीमंत व्हायचे आहे? तसे असेल तर आमच्यांतील सर्वांत श्रीमंत असेल, त्याच्याहूनहि तुला अधिक श्रीमंत होता येईल इतकी संपत्ति तुला आम्ही गोळा करून देतों. तुला मानसन्मान पाहिजे असेल तर तुला आमचा नायक आम्ही करतो. तूं म्हणशील तें प्रमाण. तुझ्या संमतीशिवाय आम्ही कांहीं करणार नाहीं. तुला राज्य पाहिजे असेल तर आम्हीं तुला आमचा राजा करतो. तुला भुतांनी पछाडलें असेल तर आम्हीं वैद्य बोलावतों व तुला बरें करायला लागतील तेवढे पैसे आम्ही त्यांना देऊ."
 पैगंबरांनी विचारलें, "वलीदचे बाबा, संपलें का आपले बोलणें?"
 "संपले."
 "तर मग माझें आतां ऐका."
 "सांग. ऐकतो."
 "त्या परम दयाळू परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतों कीं मी जें सांगत आहे ती त्या प्रभूचीच शिकवण आहे. प्रभूनें जें पुस्तक मला दिलें, दाखवलें तेंच मी सांगतों. ज्यांना समजूत आहे, समजशक्ति आहे अशांना शिकण्यासाठी हें पुस्तक आहे. या अरबी भाषेतील कुराणांत सज्जनांस आशा आहे, दुर्जनांस शिक्षा आहे. परंतु लोक न ऐकतांच जातात. म्हणतात, तूं जे सांगतोस त्याचा प्रकाश आमच्या हृदयांत पडत नाहीं. आमचे कान बधीर आहेत. तुझ्यांत व आमच्यांत आडपडदा आहे. तुला योग्य वाटत असेल तसा तूं वाग. आम्हांला योग्य वाटतें तसे आम्ही वागूं. म्हणतात की आमच्या सारखाच तूं! परंतु तुमचा ईश्वर एक आहे असें ज्ञान मला झालें आहे. म्हणून त्या एका परमेश्वराकडे तुम्ही सर्व चला. जें पूर्वीचें झालें त्याची क्षमा मागा. आणि जे मूर्तिपूजक ठरवलेले दान करणार नाहींत, ठरीव भाग गरिबांसाठी देणार नाहींत, परलोकावर जे विश्वास ठेवणार नाहींत, त्यांचं भलें होणार नाहीं. परंतु जे विश्वास ठेवतील, श्रद्धापूर्वक कर्तव्ये करतील, त्यांना अमर बक्षीस मिळेल."
 कुराणांतील सुरा म्हणून दाखवून ते म्हणाले, "आजोबा ऐकलेत का? आतां योग्य तें करा."
 एके दिवशीं अब्दुल्ला इब्न मसूद हा काबाच्या अंगणांत बसून धैर्याने कुराण पढूं लागला. जमलेल्या कुरेशांनी त्याला मारहाण केली. तोंडावर गुद्दे दिले तरी तो उठेना, निघून जाईना. दुसऱ्या दिवशींहि तो तसेंच करणार होता. परंतु मुहंमद म्हणाले, "काल धैर्य केलेत तेवढे पुरे. काल तुम्ही त्यांना बळजबरीनें कुराण ऐकवलेत, जे ऐकण्याचा ते द्वेष करीत तें त्यांच्या कानांत दवडलेत. पुरे, आतां पुन्हां नका जाऊं." मुहंमद शक्य तो जपून जात होते.

■ ■ ■





असे दिवस जात होते. छळ होत होते. आपल्या अनुयायांचा छळ पाहून मुहंमद अत्यन्त दुःखी झाले. ते म्हणाले, "कुरेशांच्या मनांत प्रभुकृपेनें बदल होईपर्यंत तुम्ही अबिसिनीयांत जावें. तेथील राजा धर्मात्मा आहे. ख्रिश्चन असला तरी उदार व न्यायी आहे. तेथे कोणावर अन्याय होत नाहीं. परमतसहिष्णु असा तो राजा आहे. आलेल्या पाहुण्यांचं तो स्वागत करतो. जा. त्याच्या राज्यांत जा."
 मुहंमदांच्या धर्मप्रचाराच्या पांचव्या वर्षी इ. स. ६१६ मध्ये ११ पुरुष व ४ बायका अशीं १५ माणसें गलबतांत बसून गेलीं! या गलबताला 'प्रथम अभिनिष्क्रमण' असें नांव इस्लामी इतिहासांत आहे. पुढील वर्षी आणखी ७२ पुरुष व १४ बायका गेल्या. एकंदर १०१ संख्या झाली. परंतु कुरेश चिडले, खबळले. आपल्या हातांतील बळी निसटले, छळ करण्याची साधने गेली म्हणून संतापले. कुरेशांनी हबशी राजाकडे वकील पाठविला व सांगितलें, "आमचे लोक परत द्या. आम्ही त्यांना ठार मारूं."
 राजानें दरबारांत वकिलास व त्या नवधर्मीयांस बोलाविलें. राजानें वकिलास विचारलें, "यांचा काय अपराध?"
 महाराज, यांनी स्वधर्म सोडला आहे व नवधर्म घेतला आहे "
 "तुम्ही स्वधर्म सोडून खरेंच का नवधर्म घेतलात?"
 "हो." ते लोक म्हणाले.
 "ज्या नव्या धर्मासाठी तुम्ही सनातन धर्म सोडलात, परंपरागत धर्म सोडलात, तो तुमचा नव धर्म आहे तरी काय?" राजानें विचारिलें.
 अबु तालिबचा मुलगा, अलीचा भाऊ जाफर म्हणाला, "राजा, आम्ही अज्ञानांत होतों. केवळ अडाणी जंगली होतों. आम्ही मूर्तीची पूजा करीत होतों. अपवित्र होतो. मृतमांस खात होतो. अभद्र बोलत होतों. माणुसकीची प्रत्येक भावना आम्ही पायांखालीं तुडवीत होतों. शेजारधर्म, अतिथिधर्म यांची कर्तव्यें मानीत नव्हतों. विधिनिषेध आम्हांला उरला नव्हता. सत्तेचा व सामर्थ्याचा फक्त कायदा आम्ही ओळखीत होतो. आणि अशा आम्हांत देवानें एक मनुष्य पैदा केला. त्याच्या जन्माची, त्याच्या सत्यवादीपणाची, सचोटीची, पावित्र्याची आम्हांला पूर्ण माहिती आहे. त्याने आम्हांला सांगितलं, 'ईश्वर एक आहे. त्या अद्वितीय परमेश्वराशीं दुसऱ्या देवदेवता मिसळूं नका. मूर्तिपूजा करूं नका. खरें बोला. दिलेला विश्वास पाळा. दया दाखवा. शेजाऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करा. स्त्रियांची कुटाळकी, कुचेष्टा करूं नका. अनाथ पोरकी मुले त्यांचें असेल तें लुबाडूं नका. दुर्गुणांपासून दूर रहा. पापापासून परावृत्त व्हा. आणि प्रार्थना नियमाने करीत जा. गरिबांसाठी ठराविक रक्कम देत जा. उपवास पाळा.' राजा अशी ही त्याची शिकवण. ती शिकवण आम्ही अंगिकारली आहे. एका ईश्वराची पूजा करा, अन्य त्याच्याशी जोडूं नका, ही त्याची आज्ञा आम्हांस मान्य आहे. आमची या पैगंबरावर श्रद्धा आहे. आम्ही ही शिकवण अंगीकारली म्हणून कुरेश आमच्याविरुद्ध उठले आहेत. पैगंबराविरुद्ध उठले आहेत. आमचा छळ त्यांनी मांडला. पूर्ववत् दगडांच्या, लांकडांच्या त्या मूर्ति पूजा, असें सांगू लागले. आम्ही ऐकलें नाही. अधिकच छळ सुरू झाला. आमचा उच्छेद जणुं त्यांनी मांडला. तेथें सुरक्षितता नाहीं असें पाहून तुझ्या राज्यांत आलो आहोत. तूं त्यांच्या छळापासून आम्हांस सांभाळशील, अशी आम्हांला आशा आहे." असें म्हणून कुराणांतील एक उतारा त्याने म्हटला. त्यांत ख्रिस्ताचा उल्लेख होता. तो ख्रिश्चन राजा व त्याचे बिशप गहिंवरले. राजा व बिशप रडले. राजाच्या दाढीवर अश्रु घळघळले.
 राजानें त्यांना आश्रय दिला. कुरेशांचा वकील हात हालवीत माघारा गेला. अनुयायी गेले. परंतु मुहंमद तेथेच निर्भयपणे होते. अपमान, निंदा, अत्याचार यांच्यामध्ये उभे होते. मधूनमधून मानसन्मानाचा, धनदौलतीचाहि मोह दाखविण्यांत येई. परंतु मुहंमदाचे तेच तेजस्वी उत्तर.

दंभ कीर्ति मान । सुखें टाकितो थुंकुन
जारे चाळवी बापुडीं । ज्यांना असे त्याची गोडी

हेंच त्याचे निःस्पृह उत्तर. ते म्हणाले, "धनाची, मानाची मला स्पृहा नाहीं. मला नको प्रतिष्ठा, नको राज्य. तुम्हांला शुभ संदेश देण्यासाठीं देवाने मला पाठविले आहे. माझ्या ईश्वराचेच शब्द मी तुम्हांला देत असतो. त्याचीच वाणी मी तुम्हांला सांगतो. याद राखा. मी आणलेला संदेश स्वीकाराल तर इहपरलोकीं परमेश्वर तुमच्यावर कृपा करील. माझा संदेश तुम्ही नाकारलात तरीहि मी शांत राहीन. धीर धरीन. तुमच्यांत व माझ्यांत ईश्वरच न्याय देईल."
 मुहंमदांचे असे हे शब्द ऐकून ते थट्टा करीत, हंसत व निघून जात. मुहंमदांची श्रध्दा दिवसेंदिवस अधिकच दृढावत होती. कोणी त्यांना म्हणत, "तूं खरोखर परमेश्वराचा प्रेपित असशील तर चमत्कार कर. रिकाम्या विहिरी वहायला लाव. स्वर्ग खालीं आण. पर्वत उचलून दाखव. सोन्याचें घर बांध. शिडीवरून स्वर्गात चढ. " ख्रिस्तालाहि त्याचे विरोधक असेंच म्हणायचे, "दाखव आकाशांतला तुझा बाप, आण आकाशांतील अग्नि खालीं." मुहंमदांचे खरे अनुयायी होते त्यांनी चमत्कारांची कधींहि मागणी केली नाहीं. ते जे पहिले अनुयायी झाले ते पंडित होते, व्यापारी होते, सैनिक वीर होते. त्यांनी मुहंमदांच्या शिकवणीतील नैतिक श्रेष्ठता पाहिली. आणि म्हणूनच एकाकी मुहंमदाभोंवतीं सर्वस्वाच्या तयारीने ते उभे राहिले. त्यांना चमत्कारांचीं जरूरी नव्हती. मुहंमदांच्या भोंवतीं मरण मिळो वा जीवन, ते उभे राहिले. सारे जग त्या काळांत चमत्कारांसाठी हपापलेलें असे, परंतु या चमत्कारप्रेमी विरोधकांस मुहंमद म्हणाले, "ईश्वरानें चमत्कार करण्यासाठी मला पाठविलें नाहीं, तुम्हांला शिकविण्यासाठीं मला पाठविले आहे. त्या माझ्या परमश्रेष्ठ प्रभूचा जयजयकार असो. तुम्हीं त्याची स्तुतिस्तोत्रे गा. मी पैगंबर असला तरी माणसाहून का अधिक आहें? देवदूत सहसा पृथ्वीवर येत नाहींत. नाहीतर ईश्वराने प्रत्यक्ष देवदूतच येथे पाठविले असते व त्यांनी उपदेश दिला असता. ईश्वरानें सारे खजिने माझ्या हाती दिले आहेत असें मी कधींहि म्हटले नाही. अदृश्य गोष्टी मी जाणतो किंवा मी देवदूत आहे असेंहि कधीं म्हटलें नाहीं. ईश्वराची कृपा असल्याशिवाय स्वतः माझी माझ्यावरहि श्रध्दा बसत नाहीं. मी मलाहि मदत करू शकत नाहीं."
 स्वतःभोंवतीं दिव्य तेजोवलय निर्माण व्हावें असें मुहंमदांस कधीं वाटलें नाहीं. ते नेहमी सांगत, "देवाच्या शब्दांचा मी संदेशवाहक. मी पाईक. तो मला बोलवतो, मी बोलतों. माझ्याद्वारां प्रभु आपला संदेश देत आहे." मुहंमद मानवांच्या पूजेविरुद्ध होता. ईश्वरासमोर अत्यंत नम्रपणें व सरळपणे ते उभे आहेत. अत्यंत साधेपणा त्यांच्या जीवनांत होता. अत्यंत भावनामय प्रसंगींहि अहंता त्यांना शिवत नसे. केवळ मधुर कृतज्ञता व नम्रता त्यांच्या हृदयांत भरलेली असे. मुहंमद एके ठिकाणी म्हणतात:
 "दयाळु परमकृपाळू परमेश्वराच्या नांवाचा जयजयकार असो. या पृथ्वीवर वा त्या स्वर्गात जें जें आहे तें तें सारें परमेश्वराची स्तुति करते. सारें चराचर त्या प्रभूचें स्तोत्र गात आहे. तो परमेश्वर पवित्र आहे. अत्यन्त शक्तिमान् आहे. सर्वज्ञ आहे. तो एक आहे, अद्वितीय आहे. स्वतःची सामक्षा दाखविण्यासाठी अज्ञानी अरबांत त्यानें पैगंबर पैदा केला आहे. अरबांना धर्मग्रंथ व ज्ञान देण्यासाठीं, विशुद्ध करण्यासाठीं त्यानें पैगंबर पाठविला आहे. अरब पूर्वी अज्ञानांत होते. परंतु ईश्वराची दया सर्वांठायी आहे. ती मुक्त आहे. इच्छा त्याची असेल तेथें तो आपली दया पाठवितो. ईश्वर परम दयाळु आहे. आणि त्या परमेश्वराचे चमत्कार या निसर्गात सर्वत्र भरून राहिले आहेत पहा, आसमंतांत पहा. हे आश्चर्यमय जगत् पहा. पहा हे चंद्र, सूर्य, तारे. अनंत निळ्या आकाशांत कसे नियमितपणें आपल्या गतीनें जात आहेत. या विश्वांतील व्यवस्था पहा, कायदा पहा, पद्धती पहा. सुकलेल्या धरित्रीला हिरवी गार करणाऱ्या या पावसाच्या सरी बघा. कसे मोत्यासारखे हे जीवनदायी थेंब. आणि प्रचंड महासागरावर डौलाने जाणारीं तीं गलबते पहा. मानवांचा फायद्याचा असा माल नेतात आणतात. आणि ही खजुराने लादलेली झाडें पहा. ती ताडगोळ्यांनी भरलेलीं ताडाची झाडे पहा. अशी ही महान् सृष्टि त्या तुमच्या दगडाधोंड्यांतील देवाने का निर्मिली? त्या लांकडी मूर्तींनी का निर्मिली? तुम्हांला चमत्कार हवे आहेत. जेथें पहाल तेथे चमत्कार! सारी सृष्टि ईश्वराच्या सामक्षांनी भरलेली आहे. हें शरीरच पहा. किती व्यवस्थित व सुंदर. आश्चर्यकारक गुंतागुंतीनं भरलेलें. परंतु कसें दिसतें. आणि दिवसरात्रीची ही अभंग शाश्वत जोडी पहा. जीवनमरणहि पहा. तुम्ही झोंपता व जागे होता हाहि चमत्कार नाहीं? ईश्वरानें जें विपुल दिलें आहे तें जमवावे अशी तुम्हांला इच्छा होते. भरलेले मेघ आणणारे वारे, ईश्वराच्या करुणेचे जणुं ते अग्रदूत- सृष्टीतील विविधतेमधील मेळ पहा, तींतील एकता पहा. मानवजातींत हि विविधता आहे व सदृशता, एकताहि आहे. फुले, फळे, हे प्राणी, मानव या सर्वांवरून, या चराचर सृष्टीवरून कोणी तरी एक सर्वश्रेष्ठ महान् परमेश्वर आहे असें नाहीं का दिसत?"
 असें मुहंमद सांगत, विचारित. चमत्कारांवर भर न देतां ते बुद्धीवर भर देतात. विचाराला चालना देतात. भोळसरपणावर जोर देणारे ते नव्हते. प्रज्ञेचा डोळा त्यांना प्रिय होता. बुद्धीचा महिमा ते जाणत. पैगंबरांनाहि सारी सृष्टि ईश्वराचे अस्तित्व पुकारणारी असें वाटे. सर्वत्र ईश्वरी चमत्कार ! सारी सृष्टि परमेश्वराचा महिमा जणुं मुक्यानें गात आहे.

जिव्हा प्रत्येक पानांत । ध्वनि प्रत्येक निर्झरीं
सर्वत्र घुमते वाणी । वाऱ्यावर धरेवरी
निरभ्र गगनीं आहे । महान् पूरामधें असे
सर्वत्र ईश्वरी वाणी । नावेक न विसांवते ॥

 अद्वितीय केवळ एक अशा ईश्वराचा हा आचार्य सृष्टीचाहि आचार्य आहे. त्या एकेश्वराचा हा पैगंबर सृष्टीचाहि पैगंबर आहे. विश्वांत सर्वव्यापी नियम आहे, व्यवस्था आहे, ऋतसत्य आहे, एक चिच्छक्ति सर्वत्र भासत आहे, एक संकल्पशक्ति, नियामक, विश्वशासक, विश्वमार्गदर्शक अशी आहे, असें पैगंबर सांगत आहेत. आणि सर्वांत मोठा चमत्कार कोणता? मुहंमद सांगतात "निसर्गाची, सदसद्विवेकबुद्धीचीं, भविष्यासंबंधीची जीं दैवी सत्यें संस्फूर्त वाणीनें सागितलीं गेलीं, ज्याचें हें कुराण बनले, त्या कुराणाहून अधिक मोठा चमत्कार कोणता?" मुहंमद विचारतात, "अरे अश्रद्धावंतांनो ! तुमच्या या सामान्य भाषेत जगांतील असे अद्वितीय पुस्तक प्रकट व्हावें, ज्यांतील लहानसा भागहि सोन्यानें मढवून ठेवलेल्या तुमच्या सर्व पद्यांना व गीतांना लाजवील, असें हें कुराण- त्या परमेश्वराच्या विश्वव्यापक करुणेची मंगल वार्ता देणारें, अहंकारी घमेंडनंदनांना, जुलमी जालिमांना धोक्याची सूचना देणारें, असें हें कुराण. त्याहून थोर चमत्कार कोणता?"
 परंतु मुहंमद कांहींहि सांगोत, कुरेशांचे शेपूट वांकडेच असे. मुहंमदांचं सारें सांगणें पालथ्या घड्यावरचं पाणी होई. ते परमेश्वराच्या खुणा पहात ना, ईश्वरी संदेश ऐकत ना. डोळे असून आंधळे व कान असून बहिरे ते झाले. पूर्वीच्या दुष्ट रूढी, वाईट रीतिरिवाज सोडायला ते तयार होत ना. ते मुहमदांचे कट्टे शत्रु बनले. ते म्हणाले, "एक तूं तरी मरशील, मातीत मिळशील. नाहीं तर आम्ही तरी मरूं, जमीनदोस्त होऊ. परंतु तुझा पिच्छा पुरविल्याशिवाय आम्ही राहणार नाहीं. तुझा अधार्मिक प्रचार बंद करायला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाहीं. ध्यानांत धर."
 असे दिवस जात होते. मक्केतील जीवन फार अशांत व भयाण झालें होतें. त्यांच्या अनुयायांचे जे छळ होत होते ते नाहीं कमी करतां येणार? नाहीं का हे विरोध मिटवतां येणार? एकेश्वरी धर्माचा परंपरागत धर्माशी समन्वय नाहीं का करतां येणार? मक्केतील ही भांडणें कमी होऊन गुण्यागोविंदानें नाहीं का राहतां येणार? असे का विचार पैगंबरांच्या मनांत या वेळेस खेळत होते? एके दिवशीं काबाजवळ तन्मय होऊन कुराणांतील त्रेपन्नाव्या सूरे नज़ममधील भाग मुहंमद म्हणत होते. "अल-लात, अलउजा, मनात् यांच्याविषयीं काय?" जवळच एक मूर्तिपूजक होता. तो मोठ्याने म्हणाला, "त्या परमेश्वराच्या कन्या. त्याहि ईश्वराजवळ भक्तांसाठी रदबदली करतील." जुन्या धर्मातील या तीन चंद्रदेवता. काबाच्या मंदिरांत यांच्या मूर्ति होत्या. अल्ला त-आला म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या त्या मुली असें मानीत. "या देवतांचं काय?" असें मुहंमद म्हणत आहेत तोच तो मूर्तिपूजक म्हणाला, "त्याहि देवकन्या. त्या खऱ्या आहेत." इतर लोकांस, आसपास जे होते त्यांना, वाटले की कुराणांतीलच हे शब्द आहेत. या देवतांना कुराण मान्यता देत आहे. कुरेश आनंदले. कोणी म्हणतात की मुहंमदांचा हा तडजोडीचा प्रयत्न असावा. त्या विचारांच्या तीव्रतेत असतांना "त्याहि देवता आहेत." असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. "त्या देवतांना मान द्या. ईश्वराजवळ तुमच्यासाठी क्षमेची रदबदली त्या करतील. म्हणून त्या परमेश्वरासमोर नमा, लवा. त्याची सेवा करा." आणि जमलेले तमाम सारे लोक लवले, प्रणाम करते झाले. सर्वांना बरें वाटलें. तडजोड जणुं झाली. मक्केचा द्वितीय धर्म झाला. परंतु मुहंमदांच्या चित्ताला चूकचूक लागली. नाहीं, या परमेश्वराच्या कन्या नाहींत. तो परमेश्वर कोणाचा मुलगा नाहीं, त्यालाहि मुलेंमुली नाहींत. असत्यावर मुहंमद कसे स्थिर होणार? सत्य असत्याशी तडजोड कशी करील? जें नाहींच तें आहे असें कसें म्हणावें? मुहंमदांनी पुन्हां या पूर्वविधानाचा निषेध केला व म्हणाले, "या देवता नाहींत. हीं तीन पोकळ नांवें आहेत. तुम्ही व तुमच्या पूर्वजांनीं तीं शोधून काढली."
 मुहंमदांच्या मनांत तडजोड करावी असें प्रथम असेलहि कदाचित्, परंतु असा विचार मनांत आला म्हणून का मुहंमद हिणकस ठरतात? ख्रिश्चन चरित्रकार मुहंमदांचा अधःपात, घसरले मुहंमद, घाबरले वगैरे... या गोष्टीसंबंधीं लिहितात. मुहंमद क्षणभर परम सत्यापासून जरा खाली आले तरी ते कां खाली आले? त्यांच्या अनुयायांचे अपार हाल होत होते. मूर्तिपूजेविरुद्ध मुहंमद झगडत होते. यश येत नव्हते. छळ पाहून त्यांचे दयार्द्र मन दुःखी होई. आणि म्हणून करावी थोडी तडजोड, असें आलेंहि असेल त्यांच्या मनांत. परंतु साऱ्या जीवनांत ही पहिली व अखेरीचीच तडजोड! याप्रसंगांनें मुहंमद हिणकस न दिसतां अधिकच उदात्त दिसतात. अनुयायांच्या छळानें क्षणभर कसे खालीं येतात, परंतु पुन्हां धैर्याने उभे राहून, "नाहीं, त्या देवता नाहींत. मला मोह पडला, सैतानानें मला क्षणभर भूल पाडली." असें ते जाहीर करते झाले. सत्यासत्याचा हा केवढा झगडा ! क्षणभर डोकावलेलें असत्य त्यांनी साफ उडवून दिलें. पुन्हां स्वतःला व स्वतःच्या अनुयायांना आगीत घालण्यासाठीं ते उभे राहिले. किती झालें तरी मुहंमद मर्त्य मनुष्यच होते. ते कांहीं ईश्वर नव्हते. ते स्वतःला साधा मर्त्य मानवच म्हणत. मुहंमदांचं जीवन मानवी आहे. आणि त्या छळामुळे क्षणभर झालेली जी ही चलबिचल तिच्याविषयीं पुढें ते कितीदा तरी बोलत. आपल्या प्रवचनांतून सांगत.

  



क्षणभर हुरळलेले कुरेश आतां अधिकच चेकाळले. मुहंमदांची स्वतःच्या दैवी प्रेरणेवर श्रद्धा होती. हळूहळू त्यांची शिकवण रुजत होती. सत्याचें बीज आज ना उद्यां अंकुरल्याशिवाय कसें राहील? वाळवंटांतील अरब व इतर व्यापारी मक्केच्या यात्रेस येत. पैगंबरांची वाणी ते ऐकत. पैगंबरांच्या आत्म्याचें निर्मळ व तेजस्वी असें प्रकटीकरण ऐकत. ती वाणी ऐकून ते थक्क होत. परत जातांना तो नव संदेश, तो नव प्रकाश घेऊन ते जात. नव जीवन घेऊन जात. शत्रूच्या उपहासानें, निंदाप्रचुर काव्यांनी मुहंमदांची शिकवण अधिकच सर्वांना माहित झाली. ही वाढती कीर्ति, हा वाढता प्रसार कुरेश कसा सहन करतील. "तुमच्या पुतण्याची ही वटवट बंद करा." असें चुलते अबु तालिब यांचेकडे येऊन कुरेश सांगत. मुंहंमदांचे मूर्तिपूजेवरील व खोट्या धर्मावरील हल्ले अधिकच तीव्र होऊं लागले. काबाच्या जागेत ते प्रवचने देत. तेथून त्यांना हांकलून देण्यांत आले. एके दिवशीं सारे कुरेश संतापून अबु तालिबांकडे आले व म्हणाले, "तुमच्या पिकल्या केसांना आम्ही मान देतो. तुमचें स्थानहि उच्च आहे. परंतु तुमच्याविषयीं असणाऱ्या आदरालाहि कांहीं सीमा आहे. आमच्या देवदेवतांची निंदा तुमच्या पुतण्यानें सतत चालविली आहे. किती दिवस हें आम्ही सहन करावें? आमच्या पूर्वजांचीहि तो नालस्ती करतो. ते मूर्ख होते असें म्हणतो. तुम्ही हैं बंद करवा. नाहींतर उघड त्याची बाजू घ्या. म्हणजे तुमच्याशीहि मग आम्हांला लढतां येईल. परंतु सध्यांच्या तुमच्या दुटप्पी धोरणानें आम्हांला कांहीं करतां येत नाहीं. एक तर त्याचे व्हा, नाहींतर आमचे व्हा. मग लढाई करूं. कोणाचं तरी एकाचें निर्मूलन होईल." असें म्हणून ते गेले. वृद्ध अबु तालिबांच्या मनाची स्थिति केविलवाणी झाली होती. आपल्या लोकांपासून वियुक्त होणें हेंहि कठिण आणि निर्दोष पुतण्याला मूर्तिपूजकांच्या हातीं सांपविणें हेंहि कठिण. काय करावें? वृद्धानें मुहंमदांस बोलाविलें, मुहंमद नम्रपणे परंतु निश्चयानें बसले. चुलते म्हणाले, "हें पहा मुहंमद, सोड हा नाद. तूं मलाहि वांचव व स्वतःलाहि वांचव बेटा, मला झेंपणार नाहीं इतका बोजा माझ्यावर नको घालू."
 मुहंमद अभंग निश्चयानें म्हणाले, "काका, माझ्या उजव्या हातावर सूर्य व डाव्या हातावर चंद्र ठेवून, मला स्वीकृत कार्यापासून ते परावृत्त करूं पाहतील तरीहि तें शक्य होणार नाहीं. मी मरेन, तेव्हांच माझे कार्य थांबेल!"
 आपल्या चुलत्यांना सोडावे लागेल या विचाराने हे शब्द बोलल्यावर त्यांचे हृदय भरून आले. ते एकदम उठले. भावना लपवण्यासाठी निघाले. परंतु वृद्ध चुलत्याने पुन्हां हांक मारली व ते म्हणाले, "मुहंमद, शांत मनानें जा. ज्यांत तुझ्या आत्म्यास आनंद आहे ते सांगत जा. ईश्वराची शपथ मी तुला कधींहि सोडणार नाहीं, त्यांच्या हातांत देणार नाही." आणि तदनंतर वृद्ध अबु तालिब यांनीं बनी हाशिम व बनी मुत्तलिब या घराण्यांतील सर्वांना बोलावून सांगितलें, "मुहंमदांची तुम्ही सारे बाजू घ्या. त्याच्या वतीने उभे रहा." सर्वांनीं ऐकलं व तदनुसार करण्याचे ठरविलें. फक्त अबु लहब विरुद्ध बाजूला गेला. 'आगीचा बाप' असें त्याला इस्लामी इतिहासांत टोपण नांव मिळाले आहे.
 चौथ्या वर्षी मुहंमद अल अरकमच्या घरी राहायला गेले. तें घर मध्यवर्ती होतं. यात्रेला येणारे जाणारे तेथे भेटत. या अल अरकमच्याच घरामागें एकदां कुराण ऐकत असतां मुसब इब्न उमायर हा मुस्लीम झाला होता. तो आपल्या आईचा व जमातीचा लाडका होता. परंतु तो मुस्लीम झालेला पाहून तें प्रेम गेलें! ते त्याचा छळ करूं लागले. तो अबिसिनियांत जाणाऱ्यांपैकीं एक होता. अल अरकमच्या घरीं मुहंमदास मुसबची आठवण येई.
 परंतु याच वेळेस मुहमदास एक मोठी जोड मिळाली ती म्हणजे उमरची. उमरचें नांव इस्लामी इतिहासांत अति विख्यात आहे. उमरचे वडील मुहंमदांच्या अनुयायांचे छळक म्हणून प्रसिध्द आहेत. स्वतः उमरहि मुहंमदांचे प्रथम कडे विरोधक होते.
त्याची बहीणहि मुहंमदांच्या धर्माची झाली होती. एके दिवशीं उमर हातांत नंगी समशेर घेऊन मुहंमदास ठार मारण्यासाठीं जात होता.
 "कोठें जातोस उमर!" एकानें विचारलें.
 "मी मुहंमदास शोधीत आहें. तो कुरेशांना मूर्ख म्हणतो. धर्माची निंदा करतो. आमच्या देवांची टिंगल करतो. ते अपकीर्तित करतो. आमच्यांत तो भांडणे लावीत आहे. भेद पाडीत आहे. त्याला ठार करतो." उमर म्हणाला.
 "तुझ्या घरांतल्यांचे आधीं शासन कर. त्यांना रस्त्यावर आण. त्यांना कर ठार."
 "माझ्या घरांत नवधर्मी कोण आहे!"
 "तुझी बहीण फातिमा व तिचा नवरा सैद हे मुस्लीम झाले आहेत."
 हे ऐकून उमर एकदम बहिणीकडे जायला निघाला.
 बहिणीच्या घरीं खब्बाब कुराण शिकवीत होता.
 उमर हातांतल्या नंग्या समशेरीसह एकदम घरांत घुसला व म्हणाला, "कसला आवाज मी ऐकला?"
 "कांहीं नाहीं उमर."
 "नाहीं कसा? कांहींतरी तुम्ही म्हणत होतात. तुम्ही मुंहमदांचे अनुयायी झाला आहांत नाहीं?" असें म्हणून सैदवर त्याने वार केला. फातिमा पतीला वांचवायला मध्यें पडली. तिलाहि लागलें. ती म्हणाली, "होय आम्ही मुस्लीम झालो. नवधर्म घेतला. एक ईश्वर व त्याचा पैगंबर यावर आमचा विश्वास आहे. तुझी इच्छा असेल तर कर आम्हाला ठार."
 जखमी बहिणीच्या तोंडावरचें रक्त पाहून उमरचें हृदय द्रवले. तो एकदम मृदु झाला. तो म्हणाला, "तुम्ही जो कागद वाचीत होता तो मला द्या. मला पाहूं दे." आणि बहिणीनें शेवटीं धीर करून तो कागद भावाच्या हातीं दिला. कुराणाचा विसावा सुरा तो होता. उमरनें ती दैवी वाणी, संस्फूर्त वाणी वाचली. वाचल्यावर तो म्हणाला, "खरेंच किती सुंदर, किती उदात्त ही वाणी !" पुनःपुन्हां त्यानें तो कागद वाचला. आणि म्हणाला, "मलाहि घ्या तुमच्या धर्मात मुहंमदाकडे मला न्या. तुमचा धर्म मी स्वीकारला, असे त्यांना सांगू दे."
 उमरनें मुहंमदांच्या हातांचं चुंबन घेतलें. नंतर तो म्हणाला, "मलाहि तुमच्या संघांत सामील करा." सर्वांना आनंद झाला. सर्वांनीं प्रार्थना केली व सर्वांनीं प्रभूचे आभार मानले.
 हा धर्म अतःपर अंधारांत राहिला नाहीं. मुहंमदांच्या भोंवतीं आतां केवळ खालच्या दर्जाचेच लोक नव्हते तर बुद्धिमान, शूर, उत्साही अशीं माणसें त्यांच्या झेंड्याखालीं होतीं. हमजा, अबूबकर, उमर अशीं मातबर व शूर माणसें त्यांच्या धर्मांत होती. अलि तर होताच. तो फार मोठ्या पदवीस चढत होता. उच्च वृत्तीचा होत होता. हमजा, तल्हा, उमर यांच्यासारखे तरवारबहादूर थोडेच असतील!
 हे नवधर्माचे लोक, हे मुस्लीम आतां उघडपणें उघड्यावर प्रार्थना करूं लागले. उमरनें नवधर्म स्वीकारतांच कुरेशांना अंगावर वीज पडल्यासारखें झाले! निर्णायक प्रहार करण्यासाठी ते संधि पहात होते. अबिसिनियांतील शिष्टमंडळहि हात हलवीत परत आलें होतें. प्रखर उपाय योजावे असें कुरेश म्हणू लागले. शेवटी इ. स. ६१६ मध्ये मुहमदांच्या मिशनच्या सातव्या वर्षी कुरेशांनी हाशिम व मुत्तलिब यांच्या घराण्यांवर बहिष्कार घातला. हाशिम व मुत्तलिब यांच्या घराण्यांशी कोणीहि रोटीबेटी व्यवहार करू नये, त्यांच्याशीं सौदा विक्री देवघेव करूं नये, असा करार लिहून काबामंदिरांत त्यांनी ठेवला.
 हाशिमी व मुत्तलिब मंडळी शहरभर विस्कळितपणे बसलेली होती. ते सारे अबु तालिबांच्या मोहल्ल्यांत रहायला आले. मक्केच्या पूर्वेस पर्वतांच्या अरुंद घळींत ही जागा होती. हा भाग भिंती व प्रचंड फत्तर यांमुळे शहरापासून जसा कांहीं अलग झालेला होता. या भागांत यायला व बाहेर पडायला एकच लहान दरवाजा होता. या घराण्यांतील अबुलहव तेवढा शत्रूकडे गेला.
 तीन वर्षे अशा बहिष्कृत स्थितींत गेलीं. धान्याचे संचय संपत आले. हाशिमी व मुत्तलिबी सारे मरणार का? भुकेलेल्या मुलांच्या आरोळ्या कानांवर येत. कांहीं दयाळू लोक चोरून धान्य वगैरे पाठवीत. मिशनच्या या सातव्या वर्षी मक्केत बाराशिवाय जास्त वजनदार लोक मुहंमदाकडे नव्हते ! मोठी कठीण वेळ होती. सर्व जगाला जवळ घेऊं पाहणारे मुहंमद बहिष्कृत होते. जो जगाला जवळ घेऊं पाहतो त्याला जग प्रथम दूर लोटतं, असाच या वक्रतुंड जगाचा इतिहास आहे!
 कुरेशांनाहि मनांत आतां लाज व शरम वाटूं लागली. कांहीं तरी पुन्हां तडजोड व्हावी वाटत होतें. एके दिवशीं वृद्ध अबु तालिब काबाच्या मंदिरांत गेले होते. तो तेथें लावलेला करार उधईनें खाऊन टाकला होता! अबु तालिबांनी तें पाहिलें, ते कुरेशांना म्हणाले, "तुमचा बहिष्कार देवालाहि आवडत नाहीं. तो पहा उधईनें खाल्लेला करार. किती निर्दय आहांत तुम्ही!" आणि कुरेशांच्या घराण्यांतील पांच प्रमुख लोक अबु तालिबांकडे गेले व म्हणाले, "चला आमच्या बरोबर. या कोंडलेल्या जागेतून बाहेर पडा. बहिष्कार संपला. इ. स. ६१९ मध्यें मिशनच्या दहाव्या वर्षी ही तडजोड झाली. हाशिम व मुत्तलिब घराणी पुन्हां घेण्यांत आली. सारे मक्कावाले एकत्र राहूं लागले.
 हीं जीं बहिष्काराची तीन वर्षे, त्या वर्षात फक्त यात्रेच्या वेळेस मुहंमद प्रचार करीत. यात्रेकरूंत कोणी श्रोता मिळतो का पहात. परंतु खुनशी अबु लहब पाठोपाठ असेच. तो ओरडून म्हणे, "याचे ऐकू नका. हा सैतान आहे. झूट आहे."
 मुहंमद म्हणत, "देवा, अहोरात्र मी माझ्या लोकांना सांगत आहे. टाहो फोडीत आहें. परंतु ते माझ्यापासून अधिकच दूर त्यामुळे जात आहेत. मी तुझा संदेश त्यांना सांगूं लागलों की ते कानांत बोटे घालतात. परंपरागत चुका चालू ठेवतात. अधर्म व अनाचार सुरू ठेवतात. ते तुझ्या धर्माला तुच्छ मानतात. प्रभो, नवधर्म घ्या म्हणून रात्रंदिवस त्यांना सांगतों; आणि त्यांना क्षमा कर म्हणून तुलाहि सदैव सांगतो."
 आणि मुहंमदांवर याच वेळेस अति महान् प्रहार झाला. दैवाचा दुष्ट घाव. अबु तालिब व खदिजा दोघे थोड्या अंतरानं मरण पावलीं! मुहंमदांना सोडून गेलीं, परलोकीं गेली. आतांपर्यंत मुहंमद व त्यांचे शत्रु यांच्यामध्ये वृद्ध व सन्मान्य अबु तालिब हेच पहाडाप्रमाणें खडे होते. त्यांनीच या पोरक्या मुलाला पाळलें, पोसलें, प्रेम दिलें. त्यांनी त्याला कधीं सोडलें नाहीं. आणि खदिजेचें मरण हा तर फारच दारुण आघात होता. ज्या वेळेस सर्वत्र शंका व संशय होते, मुहंमदाचाहि स्वतःवर विश्वास नव्हता, सर्वत्र अंधार व निराशा यांचें राज्य होते, अशा वेळेस तिच्या प्रेमानेच मुंहमदास आधार दिला. त्यांच्या आशेची व सांत्वनाची ती देवता होती. मरेपर्यंत खदिजेची प्रेमळ आठवण मुहंमदास होती. अतिहळुवार प्रेमानें ते तिचा उल्लेख करीत.
 या दोघांच्या मरणानं मुहंमद जसे उघडे पडले! त्यांना खूप वाईट वाटलें. इस्लामी इतिहासांत हें शोकाचं वर्ष. सुतकी वर्ष म्हणून प्रसिध्द आहे. अबु तालिब मेल्यावर विरोधकांचा रस्ता मोकळा झाला. आतांपर्यंत ते थोडी मर्यादा पाळीत होते. अतःपर मर्यादा पाळण्याची जरूरच उरली नाहीं. त्यांनीं हा इस्लामी धर्म- हा नवधर्म समूळ नष्ट करण्याचे ठरविलें.

  





मुहंमद जरा कष्टी होते. मक्का सोडून अन्यत्र जावें असेंहि त्यांच्या मनांत येऊं लागलें. मक्केने माझा त्याग केला तरी इतरत्र का कोठें माझें स्वागत होणार नाहीं ? एके दिवशीं झैदला बरोबर घेऊन ते ताइफ या शहरी गेले. त्यांनी तेथील लोकांस नवधर्म सांगितला. परंतु ते लोक हा नवधर्म ऐकून संतापले. "परंपरेच्या विरुध्द सांगणारा हा कोण आला, हांकला त्याला. मारा दगड. अशा गर्जना झाल्या. त्यांनी झैद व मुहंमद यांना गांवाबाहेर घालवले. दुष्ट लोक तर संध्याकाळ होईपर्यंत त्यांच्या पाठोपाठ दगड मारीत जात होते. मुहंमद घायाळ झाले होते. रक्तबंबाळ झाले होते. ते थकले, गळून गेले. एका झाडाखालीं बसून प्रार्थना करूं लागले. आकाशाकडे हात पसरून ते म्हणाले, "प्रभो, मी दुबळा आहे म्हणून तक्रार करीत आहे. माझ्या इच्छांच्या पोकळपणामुळे मी प्रार्थना करीत आहे. लोकांच्या दृष्टीनें मी तुच्छ आहें. हे परम दयाळा, दुर्बळांच्या बळा, तूं माझा प्रभु, तूं आधार. तूं नको हो मला सोडूं. मला परकीयांचे भक्ष्य नको करूं. माझ्या शत्रूंच्या तावडींत मला नको हो देऊं तुझा माझ्यावर जर राग नसेल तर मी सुरक्षित आहे. तुझ्या मुखचंद्राचा प्रकाश हाच माझा आधार. तुझ्या मुखप्रकाशानें माझा सारा अंधार नष्ट होतो. या जगीं व परलोकीं शांति मिळते. तुझा क्रोध माझ्यावर न उतरो देवा, माझ्या अडचणी सोडव. तुझी इच्छा असेल त्याप्रमाणें या अडचणी निस्तर. तूंच माझी शक्ति. तूंच आधार. तुझ्याशिवाय ना आधार, ना बळ.

  प्रार्थनेनें शांति आली व ते उठले. मक्केस परत आले. वाटेंतील एका बागवानानें थोडीं द्राक्षं दिली. वाटेंत एके ठिकाणीं झोंपले असतां त्यांना एक स्वप्न पडले. 'लोकांनी सोडलें आहे. भुतें दिसत आहेत. परंतु सारी भुतें ईश्वराच्या पायां पडत आहेत.' असें तें स्वप्न पडलें. भुतें पळतील असे त्यांना वाटले. त्यांना धैर्य आलें. उत्साह आला. झैद म्हणाला "पुन्हां मक्केंत कशाला जायचे? त्या शत्रूंच्या हातांत पुन्हां कशाला?" मुहंमद म्हणाले, "ईश्वर आपल्या धर्माचे व पैगंबराचे रक्षण करील!"
 यात्रेच्या वेळेस जे लोक येतील त्यांच्यांत मुहंमद प्रचार करीत. ते गांवोगांवचे यात्रेकरू आपला संदेश दूरवर नेतील असें त्यांस वाटे. एकदां मुहंमद कांहीं लोकांना नवधर्म सांगत होते तो पलिकडे यसरिब शहरचे सहा इसम आपसांत कांहीं बोलत आहेत असें मुहंमदांस दिसले. मुहंमद त्यांनाहि म्हणाले, "या. बसा, ऐका." ते बसले.
 "कोण तुम्ही? कोठले?"
 "यसरिबचे. खजरज जमातीचे."
 "ज्यूंचे मित्र?"
 "हो."
 "जरा बसाल? मी बोलेन."
 ते बसले. मुहंमदांचा नवधर्म त्यांनीहि ऐकला. ती तळमळ, भावनोत्कटता, ती सत्यमय वाणी ऐकून त्या सहांवर मोठा परिणाम झाला.
 "आम्ही तुमच्या धर्माचे होतो. आणि यसरिबमध्ये सारखी भांडणे असतात. तुम्ही या आमच्यांत व सारे एक करा."
 "तुमच्याबरोबर येऊं?"
 "आधीं नका येऊ. आम्ही व बनू औस आधी एक होऊं. मग तुम्ही या."
 आणि ते मुहंमदांचे अनुयायी व भक्त होऊन परत गेले. हे सहा लोक यसरिबला परत गेल्यावर नवधर्माची वार्ता फैलावू लागले. त्यांनी आणलेली बातमी विजेसारखी पसरली. "अरबांत पैगंबर जन्मला आहे. तो नवधर्म देत आहे. एका ईश्वराकडे बोलावीत आहे. शेकडो वर्षे चाललेल्या भांडणांस तो आळा घालील. तो अरबांचे अभंग ऐक्य निर्मील" अशी भाषा सर्वत्र झाली.
 पुढच्या वर्षी या सहांबरोबर आणखी सहा आले. यसरिब येथे एकंदर तीन तट होते. अरबांत दोन जमाती होत्या. खजरज व औस अशीं त्यांची नांवें. तिसरा पक्ष ज्यूंचा. ज्यूंनाहि वाटत होतें कीं कोणीतरी आपल्यांत नव-धर्म-दाता येणार म्हणून. अरबांनाहि वाटत होतं. ज्यूंना वाटले की मुहंमदाच्या पैगंबरत्वाचा आपण अरबांना कबजात घेण्यासाठीं साधन म्हणून उपयोग करूं. येऊं देत मुहंमद येथें, ते म्हणाले. आणि अरबांच्या ज्या दोन मुख्य जमाती होत्या त्यांचे ते बारा प्रतिनिधि आले होते. एका घराण्याचे दहा व दुसऱ्या घराण्याचे दोन.
 पूर्वीच्या त्या ठरलेल्या जागी मुहंमद वाट पहात होते. त्या घळींत वाट पहात होते. तेथे ते यसरिबचे बारा प्रतिनिधि भेटले. मुहंमदाचे ते अनुयायी झाले. ते म्हणाले, "आम्ही एक ईश्वर मानू. त्याच्याशीं अन्य देवदेवता मिसळणार नाहीं. आम्ही चोरी करणार नाहीं. व्यभिचार करणार नाहीं. आम्ही आमच्या मुलींस मारणार नाहीं. परनिंदा करणार नाहीं. कोणाला उगीच नांव ठेवणार नाहीं. जें जें योग्य आहे त्या बाबतीत पैगंबरांची आज्ञा पाळू. सुखांत वा दुःखांत त्याच्याशीं निष्ठावंत राहूं." अशी त्यांनी शपथ घेतली. ज्या टेकडीवर ही शपथ घेतली, त्या टेंकडीचं नांव अकबा असें होतं. म्हणून अकबाची शपथ असे या शपथेला नांव आहे. या प्रतिज्ञेला 'स्त्रियांची प्रतिज्ञा' असेंहि म्हणतात. कारण पुढे जी दुसरी प्रतिज्ञा यसरिबच्या लोकांनी घेतली ती हातांत शस्त्र घेऊन केली होती. या वेळेस हातांत शस्त्र घेतले नव्हते, म्हणून स्त्रियांची प्रतिज्ञा म्हणतात.
 या वेळेस अबिसिनियांत गेलेला मुसब परत आला होता. तो या यसरिबच्या लोकांबरोबर गेला. नवधर्म शिकवण्यासाठी, कुराण सांगण्यासाठी गेला. एके दिवशीं मुसब कुराण सांगत होता. अद्याप पुष्कळ खजरज पुढारी नवधर्मी झाले नव्हते. असाच एक उसयद नांवाचा पुढारी कुराण शिकवणं चाललं असतां आला.
 "हे काय चालवलं आहेस येथे? दुबळ्यांना वळवू पाहतोस. हें बरें नाहीं. प्राण प्रिय असतील व हवे असतील तर निघून जा." तो मुसबला म्हणाला.
 "तुम्हीहि जरा खाली बसा. ऐका. तुम्हाला आवडतें कां पहा. आवडले तर घ्या" सौम्यपणे मुसब म्हणाला.
 उसयद भाला रोवून बसला. कुराण ऐकूं लागला. ऐकतां ऐकतां डोलूं लागला. आनंदाने उचंबळला.

"या तुमच्या धर्मात येण्यासाठी मी काय करूं ?" त्याने विचारले.
 "हातपाय धुवून या. शुचिर्भूत व्हा. आणि म्हणा की एका ईश्वराशिवाय दुसरा ईश्वर नाही. मुहंमद ईश्वराचे पैगंबर आहेत. ही शपथ वेतलीत की नवधर्मी, इस्लामी तुम्ही झालेत."
 त्यानें तसें तात्काळ केलें. नंतर तो म्हणाला, "तुम्ही सादचेंहि मन वळवा म्हणजे चांगले होईल."
 पुढे सादहि कुराण ऐकून इस्लामी झाला. कुराणाची विलक्षण मोहनी पडे. भाषेचं व विचारांचें, त्यांतील सामर्थ्याच्या प्रत्ययाचे अपूर्व आकर्षण ऐकणाराला वाटे.
 साद नंतर आपल्या जमातींत गेला व म्हणाला, "अबुल अशालाच्या संतानांनो, तुमचे माझे काय बरें नातें?"
 "तुम्ही आमचे नेते, सर्वांत शहाणे पुढारी. आमच्यांतील सर्वश्रेष्ठ, सुप्रसिद्ध असे तुम्ही." लोक म्हणाले.
 "तर मग मी शपथपूर्वक सांगतों की जोपर्यंत तुम्ही एक ईश्वर मानणार नाहीं, त्याच्या पैगंबरांस मानणार नाहीं, तोपर्यंत माझ्या जिवाला चैन पडणार नाहीं."
 "आम्ही सारे तसें करतो." लोक म्हणाले. आणि ते सारे इस्लामी झाले.
 खजरज सारे इस्लामी झाले. बनु औस जमात राहिली होती. त्यांचा नेता कवि अबु कयास हा होता. त्याला इब्नुल अस्लात असेंहि म्हणत. तो अद्याप विरोधी होता.
 आणि पुन्हां मक्केला, यात्रेला जाण्याची वेळ आली. मुहंमदांस यसरिबला बोलवायचं की नाही? अरब म्हणाले, "पैगंबर असोत वा नसोत, मुहंमद आमचा नातलग आहे. त्याची आई यसरिबची आहे. तो आमचा आहे. ज्यूंना निष्प्रभ करायला तो उपयोगी पडेल. आणि तो देवाचा पैगंबर असेल तर फारच छान. सोन्याहून पिवळे. हे ज्यू नेहमीं 'मेशिया येणार' मेशिया येणार, म्हणत असतात. तो आमच्यांत आला असें आम्ही अभिमानाने सांगू, मुहंमदांची शिकवण ज्यूसारखीच दिसते. एकेश्वरवादच आहे. म्हणून या नव धर्माचा व ज्यूधर्माचा समन्वयहि करतां येईल. भांडणे जातील. सारे सुखानें राहूं. एकेश्वरी मत आम्हांला अपरिचित नाहीं. येऊं दे मुहंमदाला. पैगंबर म्हणून, मेशिया म्हणून, आमच्यांत शांतिकर्ता म्हणून कोणत्याहि नांवें येवो."
 ज्यू व अरब सारे म्हणाले, "येऊ दे." यसरिबचें जीवन सारे फाटलें होतें. पक्षोपपक्षांच्या द्वेषमत्सरांनी विदीर्ण झाले होते. म्हणून पैगंबरांचं स्वागत करायला सारे उत्सुक होते.
 मुसब यसरिबचे पाऊणशे लोक घेऊन निघाला. त्यांमध्ये कांहीं चारपांच मूर्ति-पूजकहि होते. त्यांनीं अद्याप नवधर्म घेतला नव्हता. परंतु मुहंमदांस पहावयास व त्यांना आमंत्रण देण्यास तेहि आले होते.
 ती पहिली प्रतिज्ञा घेऊन व मुसबला घेऊन बारा लोक गेले व आतां पाऊणशे पुन्हां आले, या मधला काळ मोठा आणीबाणीचा गेला. मुहंमदाच्या मनांत या काळांत आशानिराशांचा भीषण झगडा चालला होता. त्या झगड्यांतून शेवटीं आशा डोकावे. मुहंमद म्हणत, "एक दिवस असा उजाडेल ज्या दिवशी सत्याचा प्रकाश पसरेल. मी जिवंत नसलो तरी पसरेल."
 मक्केत सर्वत्र धोका होता. वाघाच्या तोंडांत जणुं ते होते. आपल्या शूर व निष्ठावंत अनुयायांसह तेथे ते निर्भयपणे वावरत होते. ते धैर्य असामान्य होते. ती श्रध्दा अलोट होती. अद्वितीय होती. याच आंतरिक झगड्याच्या काळांत मुहंमदांस तें एक अपूर्व दर्शन घडलें. "आपण स्वर्गात गेलो आहोत. तेथे प्रभूचें भव्य मंदिर पहात आहोत." असे त्यांनी पाहिले. कुराणांतील सतराव्या सुऱ्यामध्ये हे वर्णन आले आहे.
 मुहंमद म्हणतात, "त्या प्रभूचा जयजयकार असो. त्या प्रभूने या आपल्या बंद्या सेवकाला त्या रात्रीं पृथ्वीच्या मंदिरांतून स्वर्गाच्या मंदिरांत नेले. तेथील दैवी खुणा पहाव्या म्हणून आम्ही त्याला नेलें. ज्या मंदिराची आम्ही देवदूत नेहमी स्तुति करतों त्या मंदिरांत पैगंबरास नेलें." कुराणांतील हे जे उल्लेख आहेत त्याभोवती सुंदर काव्यें जन्मलीं आहेत. किती तरी भव्य दिव्य दंतकथा गुंफिल्या गेल्या आहेत. स्टॅन्ले लेनपूल म्हणतो, "कांही असो. हें दर्शन, भव्य दर्शन जरी काव्यमय असले तरी ते अत्यंत अर्थपूर्ण आहे. त्यांत खोल अर्थ होता." कोणता बरें तो खोल अर्थ? तो अर्थ हा की निराशेतहि मुहंमद आशेच्या स्वर्गांत जणुं वावरत होते!
 आणि आशा घेऊन मुसब आला. ज्या टेकडीवर त्या बारा जणांनी पूर्वी ती पहिली शपथ घेतली होती, त्या टेकडीच्या पायथ्याशी ते सारे भक्त जमले. रात्रीची वेळ होती. पैगंबरांचे आवडते तारे चमकत होते. अपूर्व शांति होती. विरोधक झोपले होते. मुहंमद त्यांना म्हणाले, "तुम्ही मला व मक्केतील माझ्या अनुयायांना तुमच्या यसरिब शहरांत बोलवीत आहांत. परंतु यांत धोका आहे. मक्कावाले हल्ला करतील. संकटें येतील."
 परंतु ते सारे एका आवाजाने म्हणाले, "संकटांची कल्पना ठेवूनच आम्ही नवधर्म स्वीकारला आहे. हे प्रभूच्या प्रेषिता, सांग, कोणतीहि शपथ घ्यायला सांग. प्रभूसाठी व तुझ्यासाठी वाटेल ती शपथ आम्ही घेऊ."
 पैगंबरांनी कुरणांतील कांही भाग म्हटले. नंतर सर्वांसह त्यांनी नमाज केला त्यानंतर या नवधर्मावर प्रवचन दिलें. मग ती पूर्वी बारांनी जी प्रतिज्ञा घेतली होती तिचा पुनरुच्चार सर्वांनी केला. परंतु त्या प्रतिज्ञेत पुढील शब्द जोडले गेले, "मुहंमद व त्यांचे अनुयायी यांचं आम्ही रक्षण करूं. जसें आम्ही आमच्या बायकामुलांचे रक्षण करतों!"
 नंतर यसरिबच्या लोकांनी विचारले, "देवासाठी आम्ही मेलों तर आम्हांला कोणता मोबदला मिळेल?"
 "परलोकीं सुख" पैगंबर म्हणाले.
 "तुम्हांला चांगले दिवस आले तर तुम्ही आम्हांस सोडणार तर नाहीं ना? तुमच्या लोकांकडे परतणार नाहीं ना?"
 "नाहीं, कधींहि नाहीं. तुमचें रक्त तेच माझें. मी तुमचा, तुम्ही माझे."
 "तर मग द्या तुमचा हात." एक म्हातारा एकदम उठून म्हणाला.
 मुहंमदांनी हात पुढे केला. प्रत्येकाने तो आपल्या हातीं घेतला. प्रत्येकानें मुहंमदांच्या हातावर बेदूइनांच्या पद्धतीने हात ठेवून शपथ कायम केली.
 हे सर्व होते न होते तो पाळतीवर असलेल्या एका मक्कावाल्याचा आवाज आला. सारे घाबरले. परंतु पैगंबरांच्या धीर गंभीर वाणीने सर्वाना आश्वासन मिळाले. या पाऊणशेतील बारा जणांस पैगंबरांनी आपले प्रतिनिधि म्हणून केलें. 'नकीब' म्हणून नेमले. आणि म्हणाले, "मूसानें असेच बारा निवडले होते. तुम्ही बारा इतरांची जणुं ग्वाही. आणि मी सर्वांसाठी ग्वाही."
 यसरिबला परत जाण्यापूर्वी मुसबला आईला भेटावें असे वाटले. तो आईचा व आपल्या जमातीचा फार लाडका होता. परंतु नवधर्म घेतल्यापासून तो अप्रिय झाला होता. तो म्हणून अबिसिनियात गेला होता.
 तो आईकडे गेला.
 "अरे आज्ञाभंगका, मक्केत तुझी आई राहाते. त्या आईला आधीं कां नाही भेटलास ? मी तुला निरोप पाठवला होता की आधी मला भेट. परंतु तूं दुसरीकडे गेलास." आई म्हणाली
 "आई, पैगंबर देवाचे आहेत. म्हणून त्यांची आधी भेट. मग तुझी, इतरांची"
 "अजूनहि तूं धर्मच्युतच आहेस वाटतें?"
 "मी पैगंबरांचा आहे. इस्लामवर निष्ठा ठेवणारा आहे."
 "मुसब, तूं अबिसिनियांत गेलास. हल्ली यसरिबला राहतोस. किती कष्ट व दगदग! तूं घरीं सुखाचं राहणं सोडून असा वनवास का पत्करतोस? ते कष्ट का तुला बरे वाटतात?"
 "आई, हें काय सांगत आहेस? कां मला माझ्या खऱ्या धर्मापासून वळवू पहात आहेस? आणि येथें मला पकडण्याचा तर नाहींना तुमचा बेत? परंतु मी निर्धाराने सांगतों कीं, माझ्यावर हात टाकील त्याचा मुडदा पाडल्याशिवाय मी राहणार नाहीं."
 "जा नीघ, माझ्या समोरून कर तोंड काळे!"
 आणि प्रेमळ माता रडूं लागली. तिचे त्याच्यावर फार प्रेम होते. त्याचा वियोग तिला सहन होत नव्हता. मुसब सद्गदित होऊन म्हणाला, "आई, ऐकशील? मी तुला प्रेमाचा सल्ला देतो. ईश्वर एक आहे व मुहंमद त्याचा पैगंबर आहे, अशी शपथ घे. मग तूं-मी एकत्र राहू शकू."
 आई म्हणाली, "त्या चमचम करणाऱ्या ताऱ्यांची शपथ. मी तुझ्या धर्मात शिरण्याचा मूर्खपणा कधी करणार नाहीं. मी तुझ्यावर पाणी सोडले. आजपासून तुझा संबंध सोडला. मी माझ्या धर्माला चिकटून राहीन."
 मुसब निघून गेला.

回 回 回



मुहंमदांची व यसरिबच्या लोकांची जी गुप्त बैठक तिची वार्ता कुरेशांना कळली. साऱ्या मक्केत ती बातमी पसरली. कुरेश यसरिबवाल्यांकडे गेले व म्हणाले, "कोणी कोणी शपथ घेतली सांगा." परंतु कोणीच बोलेना. कुरेश रागावून परत गेले.
 यसरिबचे यात्रेकरू जायला निघाले.
 "मी येथले लोक हळूहळू तुमच्याकडे पाठवतों. सारे संपले म्हणजे शेवटीं मी येईन." मुहंमद निरोप देतांना म्हणाले.
 "पाठवा. या सारे."
 "जे पाठवीन त्यांचे रक्षण कराल ना?"
 "हो करूं. आम्ही कडवे वीर आहोत. युद्धाचीं बाळें आहोंत. चिलखती गडी आहोंत. शूर पूर्वजांत शोभेसे आम्ही त्यांचे वारसदार आहोत. निर्धास्त रहा."
 यसरिबचे लोक गेले. मुसब गेला. मक्केतील वातावरण अधिकच तीव्र झालें. जास्त काळजीपूर्वक पहारा, देखरेख सुरू झाली. कुरेशांचे हेर पाळतीवर असत.
 एके दिवशीं मक्केंतील आपल्या अनुयायांस मुहंमद म्हणाले, "तुम्ही सारे यसरिबला जा. तेथें देवानें तुम्हांला घर दिलें आहे. आधार दिला आहे. तेथें जा. येथे एखादे वेळेस सर्रास कत्तलहि होईल आपली. एकदम नका सारे जाऊं. दोन दोन तीन तीन कुटुंबे अशीं जाऊं देत."
 आणि मक्केतील इस्लाम घेतलेली कुटुंबं यसरिबला जाऊं लागली. इ. स. ६२२ मधली ही गोष्ट. दोन महिने अनुयायी जात होते. यसरिब मक्केपासून अडीचशे मैल लांब होतें. दगदगीचा कष्टाचा रस्ता. परंतु धन्य त्यांची निष्ठा. शंभर कुटुंब गेली. मोहल्लेच्या मोहल्ले ओस दिसूं लागले. रबियाचा मुलगा ओतबा म्हणाला, "प्रत्येक सुखी घर आज दुःखी होत आहे. गजबजलेल्या घरांतून आतां केवळ वारे भिरभिर करतील आणि हे सारे आपल्याच भावाच्या मुलामुळे. त्यानें आमच्यांत भेद पाडले, भांडणे निर्मिलीं."
 येशु ख्रिस्त एकदां म्हणाले, "होय मी शांति देण्यासाठीं नाहीं आलों. मी तरवार देण्यासाठी आलो. मुलगा बापाच्या विरुद्ध जाईल. मुलगी आईच्या विरुद्ध जाईल. सून सासूच्या विरुद्ध जाईल."
 पैगंबर असें स्वतः म्हणाले नाहीत. परंतु विरोधकांनी हेंच पैगंबर करीत आहेत असें म्हटलें! नवीन क्रान्तिकारक विचार जेव्हां जेव्हां येतो तेव्हां तेव्हां असाच देखावा दिसतो. नव्या जुन्याची ओढाताण असते.
 आणि सुहैब नांवाचा एक ग्रीक गुलाम होता. तो आतां श्रीमंत झाला होता. नवधर्म घेऊन तोहि यसरिबला जायला निघाला.
 "अरे, तू येथे आलास तेव्हां दीनदरिद्री होतास आणि आतां सारी संपत्ति बरोबर घेऊन निघालास वाटते?" त्याचा पहिला श्रीमंत व्यापारी धनी म्हणाला.
 "मी संपत्ति सोडली तर जाऊं द्याल ना?"
 "जाऊं देऊ."
 आणि सुहैब सारी संपत्ति सोडून, परंतु धर्माची शाश्वत संपत्ति घेऊन निघाला. मुहंमद म्हणाले, "फार फायदेशीर सौदा केला सुहैबनें! ग्रीस देशाची इस्लामला ही पहिली जोड मिळाली."
 मक्केंत केव्हां वादळ सुरू होईल नेम नव्हता. घरांना कुलुपें लागत होतीं. सारे गेले. अलि, अबुबकर व मुहंमद तिघेच आतां राहिले. मुहंमद निसटून जातील, अशी कुरेशांना भीति वाटली. कुरेशांची एक सभा भरली. इतरहि घराण्यांचे व जमातींचे मक्केतील प्रमुख लोक तेथे बोलावण्यांत आले होते. सभा जोरांत चालली. प्रक्षुब्ध होतें वातावरण. हा जीवनमरणाचा प्रश्न आहे असें म्हणू लागले.
 "मुहंमदांस येथून हाकलून द्यावे." कोणी म्हणाले.
 "त्याला मरेतों तुरुंगात ठेवावें." दुसरे म्हणाले.
 "त्याचा खून करावा." आणखी कांहींनी सुचवलें.
 अनेक सूचना येऊं लागल्या. एकाने खून केला तर त्याचे सारे कुटुंब व तो यांच्याबरोबर हाशिमांची व मुत्तलिबाची सूडाची लढायी सुरू होईल. तेव्हा एकट्यानें खून करणं हे बरें नाहीं. "मी युक्ति सुचवितों" अबुजहल म्हणाला.
 "अबुजहल म्हणजे अबुल हिकम-अकलेचा बाप. सांगा तुमची युक्ति सांगा." लोक म्हणाले.
 "निरनिराळ्या कुटुंबांतून मारेकरी घ्यावे. त्यांनी एकदम मुहंमदांच्या अंगांत तरवारी खुपसाव्या. म्हणजे खुनाची जबाबदारी त्या सर्वांवर येईल. मुहंमदांच्या नातलगांना या सर्वांच्या घराण्याशी मग सूडाची लढाई करावी लागेल. तशी ते करणार नाहीत. त्यांची हिम्मत होणार नाही."
 "वा! असेच करावें." सारे म्हणाले.
 अबुल हिकम याला अबू जहल हे नांव मुहंमदांनी दिले होतें. अबुजहल म्हणजे अज्ञानाचा बाप, ज्ञानाचा बाप नसून हा मनुष्य अज्ञानाचा बाप आहे, असे मुहंमद म्हणत. महाकवि सनाई म्हणतो,
 "अहमद-इ-मुर्सल निशिस्त कैरवा दारद खिरद."
 "दिल असीर-इ-सीरत-इ-बू जहले-इ-काफिर दाश्तन."
 तुमच्यामध्यें पैगंबर बसले असतां तुमची बुद्धि तुमच्या हृदयाला अश्रद्धाळु अबुजहलच्या गुणाचें गुलाम होऊ देणार नाहीं.
 असो. त्या रात्री मुहंमदांच्या घराभोवती मारेकरी निरनिराळ्या स्थानी बसले. मुहंमद पहाटे तरी बाहेर येतील, अशी त्यांना आशा होती. मधून- मधून ते खिडकींतून डोकावत. परंतु मुहंमद कधींच खिडकींतून पळून गेले होते! अली मुहंमदांच्या बिछान्यावर पडून राहिला होता. मुहंमदांनी आपले हिरवें वस्त्र त्यांच्या अंगावर घातले होते. मुहंमदच झोपले आहेत, असें मधूनमधून डोकावणाऱ्या त्या मारेकऱ्यांस वाटत होतं. मुहंमदं तेथून निसटले. ते अबुबकरच्या घरीं गेले. आणि दोघे मक्का सोडून रात्री बाहेर पडले. जन्मभूमि सोडून बाहेर पडले. सौर पर्वतावरील गुहेत दोघे कांहीं दिवस लपून राहिले. हा पर्वत मक्केच्या दक्षिणेस आहे. मुहंमद निसटले, हे जेव्हां कुरेशांना कळले तेव्हां त्यांच्या संतापास सीमा राहिली नाहीं. ते चवताळले. पाठलागासाठीं घोडेस्वार दौडले. मुहंमदांच्या डोक्यासाठी शंभर उंटांचे बक्षिस जाहीर करण्यांत आलें! एकदां तर पाठलाग करणारे गुहेच्या अगदी जवळ आले होते.
 "ते येणार. आपण सांपडणार. आपण दोघेच." असें अबुबकर घाबरून म्हणाले.
 "दोघे कां? आपण तिथे आहांत. तिसरा परमेश्वर आहे." मुहंमद शांत श्रद्धेनें म्हणाले.
 त्या गुहेच्या तोंडावर कोळ्याने जाळे विणले होते! पाठलाग करणारे म्हणाले, "या गुहेत नसणारच. गुहेत शिरते तर ते जाळे कसे टिकतें!" आणि ते गेले. प्रभूची जणुं कृपा. त्या गुहेत रोज अबुबकरांची मुलगी गुप्तपणें अन्न आणून देई. कुरेश पाठलाग करून थकले, कंटाळले. तीन दिवसांनी पाठलाग थांबला. तिसऱ्या दिवशी सायंकाळी हे दोघे गुहेतून बाहेर पडले. दोन उंट वाटेंत त्यांनी मिळविले. उंटावर बसून निघाले. रस्तोरस्ती बक्षिसाची लालूच असलेले मारेकरी दौडत होते. एकां तर एक घोडेस्वार पाठीस लागला.
 "संपले सारे!" अबुबकर म्हणाले.
 "भिऊं नकोस. ईश्वर राखील." मुहंमद म्हणाले.
 पाठलाग करणाऱ्याचा घोडा उधळला. घोडेस्वार पडला. तो चकित झाला. तो पैगंबरांजवळ आला व क्षमा मागता झाला. एका हाडाच्या तुकड्यावर क्षमा लिहून अबुबकर यांनी दिली. तो घोडेस्वार गेला. तीन दिवसांच्या प्रवासानंतर दोघे यसरिबच्या दक्षिणेस असलेल्या कुब्बा गांवीं येऊन पोचले. यसरिबच्या मनोऱ्यावरून एक ज्यू पहात होता. त्याला हे दोघे दिसले. कुराणाच्या सहाव्या सुऱ्यामध्ये विसावी कविता आहे. तींत पुढील मजकूर आहे :
 "ज्यांना पूर्वी बायबल मिळाले, देवाचें पुस्तक मिळाले ते मुहंमदांस ओळखतात. ज्याप्रमाणे ते स्वतःची मुलेबाळे ओळखतात."
 कुब्बा गांव फार रमणीय व समृद्ध होता. लोक सुखी व सधन होते. खाऊन- पिऊन बरे होते. या गांवीं मुहंमद व अबुबकर दोघांनीं कांहीं दिवस मुक्काम केला. येथे अलीहि त्यांना येऊन मिळाले. मुहंमद गेल्यावर मांगें अलींना बराच त्रास झाला. ते मक्केहून पायींच निघाले. दिवसा लपून रहात, रात्रभर चालत. शेवटीं येऊन मिळाले. कुब्बाचा प्रमुख "येथेंच रहा" असे मुहंमदांस म्हणाला. परंतु मुहंमदांसमोर कर्तव्य होतं. ते यसरिबला जाण्यास निघाले. बरोबर कितीतरी अनुयायी होते.
 त्या दिवशीं शुक्रवार होता. इ. स. ६२२ जुलैची २ तारीख होती. त्या दिवशीं मुहंमदांनी मक्का सोडली. या दिवसापासून मुहंमदी पंचांग सुरू होतें. यालाच हिजरी सन ही संज्ञा आहे.

回 回 回





यसरिब येथें आल्यापासून मुहंमदांच्या जीवनाची बारीकसारीक माहिती मिळू लागते. येथें आल्यापासूनचे त्यांचं जीवन जगासमोर उघडें आहे. अति महान्, लोकोत्तर विभूति ! आईबापांच्या प्रेमाला बाल्यांतच पारखा झालेला हा मुलगा. त्याचे लहानपण किती केविलवाणें! आणि पुढे कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्थेत ते आले. तें तारुण्यहि किती पवित्र व सत्यमय. पुढे जरा प्रौढपणा आल्यावर पहा. किती निष्ठा व प्रखरता. दीनदरिद्रांसाठी, अनाथां- दुबळ्यांसाठी किती कळवळा. दुसऱ्यांचे दुःख ऐकायला, दुसऱ्यांची हाक ऐकायला कान सदा टवकारलेले. प्राणिमात्रांकडे सहानुभूतीने पाहणारे त्यांचं हृदय. प्रेमाने पाहणारे त्यांचे मोठे डोळे. अत्यन्त विनम्र व विशुद्ध असें जीवन. मुहंमद जाऊं लागले म्हणजे बोट करून लोक म्हणत, "तो पहा अल अमीन चालला!" सच्चा, न्यायप्रिय, विश्वासू पुरुष. प्रामाणिक विश्वासु मित्र, प्रेमळ निष्ठावंत, पति. जीवनमरणाचीं गूढें उलगडूं पाहणारा ऋषि. मानवी कर्तव्यांचा विचार करणारा हा तत्त्वज्ञ. मानवी जीवनाचे गन्तव्य काय, याचे चिंतन करणारा योगी. असा हा महापुरुष नवराष्ट्र- निर्मितीच्या उद्योगास आरंभ करतो. साऱ्या जगाला सुधारू बघतो. पदोपदीं विघ्नें. परंतु हा महावीर डगमगत नाहीं. पदोपदीं पराजय. परंतु निराशा त्याला शिवत नाहीं. अदम्य आत्म्याने सदैव पुढे जाण्यासाठी धडपड करतो, जीवनाचे कार्य पुरे करण्यासाठी धडपडतो. शेवटीं त्याचं पावित्र्य व त्याची उदात्तता, ईश्वराच्या दयेवरची त्याची जिवंत श्रद्धा व त्याची तळमळ यांमुळे शेंकडों अनुयायी त्याला मिळतात. आणि शेवटीं त्या सर्वांना यसरिबमध्ये सुरक्षित पाठवीपर्यंत आपण मागें वाघाच्या तोंडी राहतो! आपण सर्वांच्या शेवटी त्या उदार आश्रय देणाऱ्या, स्वागत करणाऱ्या यसरिबला येतो. यसरिबला आल्यावर मुहंमद सर्वांचे पुढारी झाले. जणुं राजे झाले. मानवी हृदयाचे सम्राट बनले. सर्वांचे नेते बनले. ते सल्ला देणारे, तेच स्मृति देणारे, तेच न्यायाधीश, तेच सेनापति! परंतु गर्व तिळभरहि नाहीं. केवळ अगर्वता व नम्रता होऊन रहात. नवीन लोकसत्ता त्यांनी स्थापिली. ते स्वतः त्या सत्तेचे केंद्र होतं. स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे शिवणारा, कधीं कधीं उपाशी राहणारा हा धर्मसंस्थापक. पृथ्वीवरील सामर्थ्यवान् सम्राटांपेक्षांहि अधिक सामर्थ्यवान तो होता.
 मुहंमदांचं उदात्त उज्ज्वल स्वरूप जगाला दिसले. इतकी वर्षे खटपट व कष्ट करून आज त्यांचे ३०० च फक्त अनुयायी होते! परंतु या ३०० चे ३० कोटी पुढे होणार होते. अपरंपार पीक पुढे यायचें होतें. रोप वाढणार होतें. त्यांची उदात्तता, अढळ मैत्री, सहनशीलता, निस्सीम धैर्य, उत्कटता, तळमळ, उत्साह, स्फूर्ति, प्रेरणा, सत्याची लागणी हे सर्व गुण त्यांच्या बारीकसारीक गोष्टींतून प्रकट होत होते. मुहंमद हे वीर आहेत, महान् वीर आहेत, ही गोष्ट जगाला कळली. येथे लेचेपेचें मन नव्हतें. निश्चयाचा महामेरू अशी ही मूर्ति होती. त्यांच्यावर प्रेम न करणे, शक्यच नव्हतें. त्यांची आज्ञा न पाळणे शक्य होत नसे. हळूहळू यसरिबचे लोक त्यांच्या चरणीं नमले. त्यांच्या भोवती जमले. शरीर व मन मुहंमदांस अर्पिते झाले. आणि ही श्रद्धा साऱ्या अरबस्थानभर पेटत गेली. सारे अरबस्थान पुढे त्यांच्या चरणांशी आले. स्वतःचे कपडे शिवणाऱ्या या मुहंमदांपेक्षां मुकुटधारी सम्राटांना अधिक मान नव्हता. माणसांवर छाप पाडण्याची अद्भुत शक्ति मुहंमदांत होती. आणि ही जी छाप पडे ती कल्याणावह असे, मंगलावह असे.
 मक्केपासून मदिनेला यायला दहा दिवस लागत. मुहंमद आले त्या वेळेस यसरिबभोवती भिंती नव्हत्या. मुहंमदांनी शहराभोवती खंदक करवला. यसरिबच्या आसपास अमलकी लोक रहात असत. रोमन, ग्रीक व बाबिलोनच्या सदैव स्वाऱ्यांमुळे ज्यू उत्तरेकडून खाली आले. त्यांनीं अमलकींचा पराजय करून हिजाजच्या या उत्तर भागांत वस्ती केली. ज्यू आले व नीट तटबंदीच्या जागीं राहिले! तेथें राहून आसपासच्या अरबांवर ते प्रभुत्व स्थापित यसरिब शहरांतहि ज्यूंच्या दोन शाखा होत्या. पुढे या यसरिब शहरांत औस व खजरज या दोन अरब शाखा आल्या. त्यांनी ज्यूंचे वर्चस्व कमी करून त्यांना एकप्रकारे मांडलिक केलें. परंतु आपसांत लढाया, मारामाऱ्या सदैव चालतच. मुहंमदांनी मक्केत आपले जीवनकार्य जाहीर केलें, त्या सुमारासच यसरिबधील ही भांडणे तात्पुरती तरी मिटली होती.
 मुहंमद आल्यावर औस व खजरज या दोन्ही अरब जमाती भांडणे मिटवून एक होऊन नवधर्म स्वीकारून मुहंमदांच्या झेंड्याखाली उभ्या राहिल्या. या लोकांना अनसार म्हणजे साहाय्यक असें नांव मिळाले. इस्लामच्या कठीण प्रसंगीं साहाय्य केलें म्हणून अनसार, अनसारी. मक्केमधून घरदार सोडून जे मुहंमदांबरोबर यसरिबला आले त्यांना मुहाजिरीन म्हणजे निर्वासित लोक, परागंदा लोक असें नांव पडले. अनसार व मुहाजिरीन यांच्यांत खरा बंधुभाव उत्पन्न व्हावा म्हणून मुहंमदांनी नवीन परंपरा पाडल्या, नवीन संबंध निर्मिले. यसरिब शहराचें नांवहि त्यानीं बदललं. 'मेदीनत-उन्-नबी' म्हणजे पैगंबराचे शहर असें नांव दिलें. नबी म्हणजे पैगंबर. याचाच संक्षेप होऊन मदिना नांव झालें. आणि स्वतःच्या हातानी पहिली मशीद त्यांनी बांधिली. ते दगड आणीत होते. घाम गळत होता. ही पहिली मशीद जेथे बांधली गेली ती जागा दोघा भावांची होती. त्यांनी ती जागा बक्षीस दिली. परंतु हे दोघे भाऊ पोरके होते. मुहंमदांनी त्यांना जमिनीची किंमत दिली. इस्लामची ही पहिली मशीद! ती अत्यंत साधी होती. माती-विटांच्या भिंती. ताडाच्या पानांचे छप्पर. ज्यांना स्वतःचे घरदार नसेल अशांना रहाण्यासाठी मशिदीचा कांहीं भाग राखून ठेवलेला होता. येथे सारे अत्यंत साधेपणाने चाले. मुहंमद उभे राहून प्रार्थना करीत, उपदेश करीत. एका ताडाच्या झाडाला टेकून ते उभे रहात आणि हृदय उचंबळवणारें प्रवचन देत. श्रोते सर्वेन्द्रियांनी जणूं पीत. मुहंमद एके दिवशीं म्हणाले, "जो देवाच्या प्राण्यांवर प्रेम करणार नाहीं, स्वतःच्या मुलां-बाळांवर प्रेम करणार नाहीं, त्याच्यावर देवहि प्रेम करणार नाहीं. जो जो मुसलमान उघड्या माणसाला पांघुरवील, अवस्त्राला वस्त्र देईल, त्याला प्रभु स्वर्गात दिव्यांबरानी नटवील." एकदां भूतदयेविषयीं प्रवचन चाललें होतें आणि मुहंमद म्हणाले, "ईश्वरानें पृथ्वी निर्माण केली त्या वेळेस ती नवीन पृथ्वी भरभरत होती. त्यानें तिच्यावर ती हलूं नये म्हणून पर्वत ठेवले! तेव्हां देवदूतांनी ईश्वराला विचारिलें, 'तुझ्या सृष्टीत पर्वतांहून बळवान काय?'
 'लोखंड. कारण तें पर्वतांनाहि फोडते.'
 'आणि लोखंडांहून बळवान काय?'
 'अग्नि. कारण अग्नि लोखंडास वितळवतो.'
 'आणि अग्नीहून प्रबळ काय?'
 'पाणी. पाण्यानें अग्नि विझतो.'
 'पाण्याहून प्रबळ काय?'
 'वारा.'
 'आणि वाऱ्याहून?'
 'दान देणारा सज्जन! उजव्या हातानें दिलेले डाव्या हातालाहि जो कळू देत नाहीं असा दाता! तो सर्वाहून बळी.'
 मुहंमदांच्या भूतदयेच्या कल्पनेत सारे कांही येई. एकदां ते म्हणाले, "प्रत्येक सत्कर्म म्हणजें भूतदयाच आहे. तुम्ही आपल्या भावांसमोर प्रेमाने व प्रसन्नपणें हंसलांत तर तीहि भूतदयाच आहे. दुसऱ्यानें सत्कर्म करावें म्हणून कधी रागानें बोललात तरी तीहि भूतदयाच. दानाइतकीच अशा उपदेशरूप प्रवचनांची योग्यता आहे. रस्ता चुकलेल्यास रस्ता दाखविणें, आंधळ्यास मदत करणें, रस्त्यांतील दगडधोंडा, काटाकुटा दूर करणे, तहानलेल्यास पाणी देणं, भुकेल्यास अन्न देणें हीं सारीं भूतदयेचींच कम. या जगांत मनुष्य जें कांहीं भलें करील तेच परलोकीं बरोबर येईल. इहलोकींची सत्कर्मे हीच परलोकींची पुंजी. तेंच परलोकचें त्याचें धन. मनुष्य मरतो तेव्हां लोक विचारतात, 'त्याने किती मालमत्ता, किती धनदौलत मांगें ठेविली आहे?' परंतु देवदूत विचारतात, तूं आपल्यापूर्वी कोणती सत्कर्मे पुढे पाठविली आहेस?"
 असे सुंदर उपदेश चालत. एकदां एका शिष्याने विचारलें. "पैगंबर माझी आई मेली. तिच्या आत्म्याच्या शांत्यर्थ मी कोणतं दान देऊ? कोणतें दान उत्कृष्ट?"
 "पाणी. वाळवंटांत पाण्याची टंचाई. पाण्याचा दुष्काळ. तिच्या नांवानें विहीर खण व तहानलेल्यास पाणी मिळेल असें कर." मुहंमद म्हणाले.
 त्या शिष्यानें त्याप्रमाणें केलें. त्याने विहीर खणली व म्हणाला, "ही आईच्या स्मृतीसाठी. तिच्या आत्म्यास शांति मिळो!"
 आणि वाणीची भूतदया मुहंमद पुनःपुन्हां सांगत. "गोड, मृदु वाणी बोला. फुकाचें गोड बोलायला काय जाते? गोड, न खुपणारी वाणी म्हणजे मोठी अहिंसा आहे. वाणी गोड असण्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाहीं. परंतु किती तरी दुःख यामुळे कमी होईल."
 बसऱ्याचा एक रहिवासी अबुरियान एकदां पैगंबरांच्या दर्शनास आला. त्यानें विचारले, "मुहंमद वागण्याचा एखादा मोठा नियम सांग."
 "कोणाविषयी वाईट बोलूं नकोस." पैगंबर म्हणाले.
 अबुरियान लिहितो, "त्या दिवसापासून मी कोणालाहि मग तो स्वतंत्र असो वा गुलाम असो- टाकून बोललो नाही."
 इस्लामची शिकवण जीवन सुसंस्कृत, स्निग्ध, सौम्य व प्रेमळ करायला सांगत आहे. "घरांत येतांना सर्वांना नमस्कार करा. बाहेर जातांनाहि करा. मित्र व परिचित यांनी केलेला प्रणाम सप्रेम परत करावा. रस्त्यांत कोणी जाणारे त्यांनीहि सलाम केला तर त्यांना परत आपणहि करावा. घोड्यावर बसणारानें पायी चालणारास आधीं सलाम करावा. चालणाऱ्यानं बसणारास करावा. लहान समुदायानें मोठ्या समुदायास, लहानाने मोठ्यास."
 असा सुंदर धर्मप्रसार होत होता. जीवनाला नवीन वळणें मुहंमद देत होते. नवीन अचार विचार, सभ्य चालरीत, स्वच्छता, सारे देत होते. या वेळेस मदिनेंत तीन पक्ष होते.
 १ मुहाजिरीन व अन्सार यांचा
 २ मुनाफिकिनांचा
 ३ ज्यूंचा
 मुहाजिरीन व अन्सार यांची एकजूट होऊन त्यांची दिलजमाई झाली होती. मक्केहून आलेले व त्यांचे ज्यांनी मदिनेंत स्वागत केले त्यांचा हा पक्ष होता. या दोहांत भ्रातृभाव निर्माण झाला होता. ईश्वरासाठी व त्यांच्या पैगंबरासाठी जास्तीत जास्त करण्याची त्यांची सात्विक स्पर्धा चाले. श्रद्धावान् व त्यागी लोकांचा हा जथा होता. बलिदानार्थ सिद्ध झालेल्या वीरांचा हा संघ होता.

मुनाफिकीन म्हणजे असंतुष्ट दुसरा पक्ष असंतुष्टांचा होता. अर्धवट सहानुभूति दाखविणाऱ्यांचा, संधिसाधूंचा हा पक्ष त्यांचा नेता अब्दुल्ला इब्न-उबय हा होता. मदिनेचं आपण राजा व्हावे, अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. मुहंमदांच्या येण्यामुळे त्याचे सारे बेत फिसकटले. इस्लामचा स्वीकार करायलाही त्याला लोकांनीं भाग पाडलें. त्याने वरपांगी नवधर्माचा स्वीकार केला. परंतु तो व त्याचे लोक केव्हां उलटतील त्याचा नेम नव्हता. धोकेबाज व दगलबाज ते होते. त्यांच्यावर सदैव जागरूकपणे पाळत ठेवण्याची जरूर असे. परंतु मुहंमद आशेनें होते. हे सारे एक दिवस आपणांस मिळतील असे ते म्हणत. धीर धरून ते होते. पुढे हा अब्दुल्ला मरण पावला. त्यामुळे हा मुनाफिकीन पक्ष जरा हतबल झाला.
 तिसरा पक्ष ज्यूंचा. हा सर्वात मोठा धोका होता. या ज्यूंचे कुरेशांजवळ व्यापारधंद्याचे संबंध असत. तसेंच नवीन धर्म जो इस्लाम त्याला विरोध करणाऱ्या अनेक गटांशी व भागांशी त्यांचे संबंध होते. मुहंमदांच्या शिकवणीकडे प्रथम ते सहानुभूतीनें बघत. परंतु त्यांचा जो अवतारी पुरुष पुन्हां येणार होता तोच हा, असें मानायला ते तयार नव्हते. मुहंमद एक सामान्य धर्मोपदेशक आहेत. पैगंबर असलेच तरी खालच्या दर्जाचे आहेत, असे ते म्हणत. ज्या औस व खजरज या अरबी जमातींच्या आतिथ्यांमुळे मुहंमदाचे आसन स्थिर होत होतें त्या दोन्ही जमाती ज्यूंना प्रिय नव्हत्या. त्या पूर्वीच्या शत्रु होत्या. त्या वैरस्मृति नष्ट नव्हत्या झाल्या. मुहंमदांस आपल्या बाजूस घेऊन अरबांस जिंकावें, नवराज्य स्थापावें, असें ज्यूंच्या मनांत होतें. म्हणून प्रथम पैगंबराच्या स्वागत- सत्कार समारंभांत तेहि अर्धवट उत्साहानें सामील झाले होते. कांहीं दिवस जरा सबुरीने, शांतीनें ते राहिले. परंतु महिना झाला असेल नसेल तोच त्यांनी बंड सुरू केलें! ज्यूंची उपजतच बंडखोर वृत्ति. त्या वृत्तीमुळेच त्यांनी स्वतःचे पैगंबर क्रॉसवर चढविले!!

回 回 回





मदिनेंत आल्यावर मुहंमदांचे पहिले काम हें होतें कीं मदिनेमधील साऱ्या परस्परभिन्न जातिजमातींचें ऐक्य करून एक लोकसत्ताक राज्य बनविणें. त्यांचं एक संघराज्य करणें. त्यांनी हक्कांचीं एक सनद दिली. तींत मुसलमानांची एकमेकांविषयीं कर्तव्यें तसेंच मुसलमान व ज्यू यांचे अन्योन्य संबंध कसे असावेत यांविषयीं नीट खुलासा केलेला आहे. ज्यूनींहि हा करार मान्य केला होता. ह्या करारावरून मुहंमदांचें व्यापक व थोर मन, तशीच त्यांची व्यवहारी बुद्धिमत्ता ही दिसून येतात. मुहंमद हे लोकोत्तर बुद्धीचे महान् मुत्सद्दी होते. केवळ विध्वंसक, जुन्याची पाडापाड करणारे नव्हते, तर विधायक वृत्तिहि त्यांच्याजवळ होती. नवीन इमारत बांधणारे ते होते. जुनें नाहींसें करून नवनिर्मिति करणारे होते. अरबस्थानांत जो कांहीं मालमसाला मिळाला, ज्या नाना जाति- जमाती होत्या, त्यांनाच हाताशी धरून माणुसकीच्या विस्तृत व विशाल पायावर ते नवशासन तंत्र निर्मू पहात होते.

'विशाळा पावना बुद्धि । विशाळा सुखकारकी ॥'

 ही जी समर्थ रामदासांनी सांगितलेली बुद्धि तशी मुहंमदांची होती. ही जी हक्कांची सनद किंवा करार त्यांत आहे :
 "जो परम दयाळु परमेश्वर, त्याच्या नांवें ही सनद मुहंमद पैगंबर मुस्लिमास देत आहेत. मुस्लिम कोठलेहि असोत, कुरेश असोत वा मदिनेचे असोत, कोणत्याहि ठिकाणीं जन्मलेले असोत, ते सारे मिळून एक राष्ट्र होईल."
 असे लिहून नंतर मुस्लिमांनी एकमेकांशी कसे वागावें त्याचे नियम दिले आहेत. पुढे ही सनद सांगते :
 "शांति वा युद्ध कोणतीहि परिस्थिति असो, ती सर्व मुस्लिमांस समान बंधनकारक आहे. स्वतःच्या धर्माच्या शत्रूशीं परभारा तह वा लढाई कोणीहि करावयाची नाहीं. ज्यूहि आमच्या लोकसत्तेत सामील होत आहेत. तेव्हां त्यांचा अपमान आम्ही होऊं देणार नाहीं. त्यांना कोणी सतावणार नाहीं, याची आम्ही काळजी घेऊ. आमच्या मदतीवर व सदिच्छेवर आमच्या लोकांच्या इतकाच त्यांचाहि हक्क आहे. या यसरिबचे सर्व शाखांचे ज्यू व मुसलमान मिळून एक संयुक्त राष्ट्र होईल. ज्यूंना पूर्ण धर्मस्वातंत्र्य आहे. त्यांचे पक्षकार व मित्र यांनाहि स्वातंत्र्य आहे, संरक्षण आहे. मात्र जे गुन्हेगार ठरतील त्यांना अवश्य शासन केलें जाईल. सर्व शत्रूंविरुद्ध मदिनेचें रक्षण करण्याचे काम ज्यू मुसलमानांस मिळतील. हा करार पाळणारांस मदिनेचा अन्तर्भाग पवित्र राहील. मुसलमानांचे व ज्यूंचे जे संरक्षित लोक असतील, दोस्त असतील, तेहि सन्मान्य मानले जातील. जे खरे मुसलमान असतील ते अपराध करणाऱ्यांस, अशांति पसरवणाऱ्यांस, अन्याय्य वर्तन करणाऱ्यांस दूर ठेवतील. अगदीं जवळचा नातलग असला तरी त्याचीहि गय करणार नाहींत."
 यापुढें मदिनेचा अन्तर्गत कारभार कसा चालवायचा त्या संबंधी लिहून शेवटी म्हटले आहे कीं :
 "अतः पर जे कोणी हा करार मानतात ते आपली सारी भांडणे ईश्वराच्या आदेशानें त्यांचा निर्णय व्हावा म्हणून पैगंबरांकडे आणीत जातील."
 या कराराने मदिनेंतील भांडणांस मूठमाती मिळाली. आतांपर्यंत जो तो आपल्याच हातीं न्याय घेत असे. सूड घेत असे. अतःपर हें बंद झालें. नव-राष्ट्र निर्माण झालें. मुहंमद पहिले न्यायमूर्ति झाले. ते पैगंबर होते म्हणूनहि व लोकांचा नि त्यांचा तसा खरोखरच संबंध होता म्हणूनहि. ज्यूंच्या कांहीं शाखा मदिनेच्या आसपास रहात असत. त्यांचा या करारांत प्रथम अन्तर्भाव नव्हता. परंतु कांहीं दिवसांनी त्यांनींहि हा करार मान्य केला.
 प्रथम प्रथम ज्यूहि प्रार्थनेस येत, प्रवचन ऐकत. नंतर होणाऱ्या चर्चेत भाग घेत. प्रार्थनेच्या वेळेस प्रथम जेरुसलेमकडे सारे तोंडे करीत. ज्यूंची प्रीति मिळावी, ज्यूंना परकें वाहूं नये म्हणून मुहंमद किती जपत होते ! मोझेस, ख्रिस्त वगैरे पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांविषयीं मुहंमदांस अत्यन्त आदर वाटत असे म्हणून जेरुसलेमकडे तोंड करण्यांत त्यांना अवघड वाटलें नाहीं. त्यांनीहि एकेश्वरी धर्मच, निर्गुण निराकार परमेश्वराचाच धर्म दिला होता. ज्यूंनाहि तिकडे तोंड केलें म्हणजे समाधान वाटेल व पैगंबरांविषयी आपलेपणा वाटेल असे सर्वांस वाटत होतें. परंतु मुहंमदांनी कितीहि आपलेपणा व औदार्य दाखविलें तरी ज्यू प्रसन्न झाले नाहींत. अरबस्थानाचे ज्यूस्थान करण्याचें का त्यांच्या मनांत होते? मुहंमदाला आपल्या हातचें एक साधन बनवावें असें का त्यांना वाटत होतें? परंतु मुहंमद तर सत्ताधीश झाले. ज्यू जळफळूं लागले. आणि शेवटीं या नवधर्माच्या शत्रूंना ते मिळाले! मुहंमदांचा धर्म साधा होता. ज्यूंच्या धर्मातून जेवढे घेणें शक्य तेवढे त्यांनी घेतलें होतें. आणखी घेणें म्हणजे व्यापक धर्माला कमीपणा आला असता.
 ज्यूंचा विरोध वाढू लागला. ते सतावू लागले. कुराणांतील शब्दांचा, वाक्यांचा मुद्दाम वेडावांकडा चुकीचा उच्चार करीत व त्यामुळे सुंदर अर्थ विकृत होई. ज्यू मुहंमदांस मुद्दाम कठीण प्रश्न विचारीत. कुराणांतील ज्यूसंबंधींचा मजकूर चुकीचा आहे म्हणत. मुहंमद म्हणत, "मी नाहीं चुकलो. तुम्हीच तुमच्या पुस्तकांत बदल केला असेल. तुम्ही त्यांतला मजकूर दडपून टाकला असेल." नवधर्माचा उपहास करण्यासाठी ते स्वतःच्या धर्मासंबंधींहि खोटें बोलू लागले. ते मूर्तिपूजाच खरा धर्म आहे असें म्हणूं लागले. इस्लामची नालस्ती करूं लागले. कोणी जर "तुम्हांला इस्लाम आवडतो की, मूर्तिपूजा" असा प्रश्न केला तर खुशाल "मूर्तिपूजा" असे उत्तर देत. त्यांनी ज्यू कवि कवयित्र्या यांचेहि रान उठविलें. काव्यांतील इस्लामच्या नालस्तीला सीमाच राहिली नाहीं ! मुस्लिम स्त्रियांसंबंधींहि वाटेल तें अभद्र त्यांतून असे. पैगंबरांची, मुस्लिम भगिनींची नालस्ती व बेअब्रू करूनच ते राहिले नाहींत तर मदिनेच्या शासन- संस्थेशींहि त्यांनी द्रोह मांडला. मक्केच्या कुरेशांना मदिनेतील मुसलमानांचे बळ किती आहे वगैरे माहिती त्यांनी पुरविली. ज्यू व असंतुष्ट अब्दुल्ला-उबय याचा मुनाफिकीन पक्ष हे कुरेशांशी कारस्थानें करूं लागले. "मुहंमदांशी आम्ही केलेला करार वरपांगी आहे. तुम्ही मदिनेच्या दरवाजांत येतांच आम्ही तुम्हां मूर्तिपूजकांस मिळू!" असेंहि त्यांनी कळविलें. मदिनंत या राजद्रोह्यांचा, दगलबाजांचा सुळसुळाट झाला. मदिनेची सत्त्वपरीक्षा होती. बाहेरून हल्ला आला व आंतहि बंड झाले तर?
 मुहंमदांसमोर कठीण समस्या होती. पैगंबर या नात्यानें त्यांनी सारे अपमान, सर्व निंदा यांना पोटांत घेतलें. परंतु आपल्या लोकांच्या स्वातंत्र्याचे व जीविताचेहि ते आतां रखवालदार होते. ते केवळ आतां धर्मसंस्थापक नव्हते तर राज्याचे प्रमुख होते. आणि वेळहि कठीण होती. सर्वत्र युद्धाचें वातावरण होतें मदिना स्वतःच्या बचावासाठी तयार होत होती. अशा वेळेस लष्करी शिस्त लागते. गुळमुळीत धोरण सर्वनाशी ठरते. अशा वेळेस स्वजनद्रोह अक्षम्य असतो. त्या द्रोहाची उपेक्षा करून चालत नसतें. पैगंबर या नात्यानें मुहंमदांनीं ज्यूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष केलें असतें, केलेंहि. परंतु मदिनेचे रक्षक व शासक या नात्याने त्यांचें दुसरें कर्तव्य होतें. सहासात जणांना पकडण्यांत आले. त्यांतील कांहींना हद्दपार करण्यांत आले. कांहींनां देहान्त शासन मिळालें! मुहंमद मदिनेची अशी तयारी करीत आहेत तोंच कुरेशांचे सैन्य आल्याची बातमी आली.

回 回 回





वास्तविक मुहंमदांचा किती प्रेमळ स्वभाव! अपरंपार करुणेचे ते सिंधु होते. कोठेहि कोणी दुःखी दिसला तर ते द्रवत, त्यांचे डोळे भरून येत. अरब लोक मर्द, परंतु मुहंमद तर स्त्रीप्रमाणें रडत! एखादा अनुयायी मेला, मुलें मेली तर त्यांचे डोळे भरत. 'बायकी स्वभावाचा' असें त्यांचे शत्रु त्यांना म्हणत. अशा त्या कारुण्यमूर्तीला परिस्थितीमुळे हातीं शस्त्र धरावें लागलें! स्वतःच्या लोकांच्या संरक्षणासाठी, बाल्यावस्थेतील नवराष्ट्राच्या रक्षणासाठीं ते संघटित सेना उभारूं लागले. आपल्यावर एकदम हल्ला होऊं नये म्हणून पुढे जाऊन हल्ले करावे लागले. ते टेहळणी करणाऱ्या तुकड्या पुढे पाठवीत. कारण अरब रात्री किंवा अगदीं उजाडत अचानक हल्ले करतात.
 मक्कावाले मदिनेच्या जवळ मुसलमानांचीं फळझाडें तोडीत, लुटालूट करीत आले. शेळ्यांमंढ्यांचे कळप त्यांनी लांबविले. अबुजहल एक हजार लोक घेऊन मदिनेवर चालून आला. त्यांचा एक तांडा युद्धाची सामुग्री घेऊन येत होता. त्याचे रक्षण करणें व मदिनेंतील मुसलमानांचा नाश करणें, हें अबू जहलचें काम होतें. मदिनेवर अबू जहल येत आहे हें मुसलमानांस आधींच कळलें. म्हणून ते बाहेर बद्रची दरी होती तेथें जाऊन बसले. तीनशे तेरा निवडक लोक घेऊन मुहंमद तेथे तयार होते. अबु जहल येत होता. मुहंमदांनी आकाशाकडे हात केले व म्हटले, "प्रभो, तूं मदतीचे दिलेले आश्वासन विसरूं नकोस. तूं नाभीवाणी दिली आहेस. माझी ही धर्मभीरूंची, शूरांची सेना नाश न पावो. देवा, हा शूरांचा जथा जर नष्ट झाला, तर तुझी विशुद्ध पूजा कोण करील?"
 कुरेशांचं सैन्य आलें. त्या सैन्यांतून तिघे पुढे आले व म्हणाले, "तुमच्यांतून तीन निवडा. तिघांचा सामना होऊन लढायांचा उघड निकाल ठरवू." मुहंमदांकडील हमजा, अलि व ओबैदा यांनी हें द्वंद्वयुद्धाचं आव्हान स्वीकारलें. आणि ते तिघे विजयी झाले! परंतु कुरेश वचन पाळणारे थोडेच होते? त्यांनीं एकदम हल्ला चढवला. आणि खणाखणी सुरू झाली. हातघाईची लढाई. आपण हरणार असें मुहंमदांस वाटूं लागले. शत्रूचे तिप्पट सैन्य होतें. आणि एकाएकीं वादळ उठले. जणुं देवाची मदत आली. मुहंमदांनीं स्फूर्तिप्रद संदेश दिला. "हा पहा परमेश्वर आला. हे पहा वारे उठले." आणि ते तीनशे जणुं तीन हजार झाले! वाळूचे लोट उठले. जणुं देवदूत येऊन लढूं लागले. मक्कावाले हटले, माघार घेऊं लागले. त्यांचे पुष्कळ पुढारी मारले गेले. अबू जहल मारला गेला. पुष्कळ कैदी झाले. त्यांतील फक्त दोघांचा शिरच्छेद करण्यांत आला. अरबांच्या युद्धनीतीप्रमाणे ही शिक्षा झाली. इतर कैद्यांस माणुसकीनें वागविण्यांत आलें. मुहंमद आपल्या अनुयायांस म्हणाले, "आपत्तींत अपमान करूं नका. सहानुभूतीनें दयेने वागवा." हे कैदी ज्या मुसलमानांच्या स्वाधीन होते त्यांनीं मुहंमदांची आज्ञा पाळली. जेवतांनाहि त्या कैद्यांना ते आपल्याबरोबर घेत, आपले अन्न त्यांना देत. आपली भाकर त्यांना देऊन स्वतः नुसता खजूर खात. या कैद्यांपैकी एक जण पुढे म्हणाला, "धन्य या मदिनेवाल्या मुसलमानांची. ते पायी चालले व त्यांनी आम्हांस घोड्यावर बसवलें, त्यांनी आम्हांस गव्हाची रोटी दिली जरी त्यांना खजुरावर राहणे भाग पडे." मदिनेंत ज्यांच्याजवळ घरें-दारे होती अशांकडे हे कैदी वांटून दिले होते!
 जी लूट मिळाली तिच्या विभागणीविषयी भांडणें सुरू झाली! मुहंमदांनीं स्वतः सर्वांना सारखी वांटून दिली. आणि पुढें अशी भांडणे होऊ नयेत म्हणून कांहीं नियम घालून दिले. कुराणांत एक स्वतंत्र प्रकरणच आहे. अल-अनफाल म्हणजे लुटीविपयीं. "जो शासनसत्तेचा प्रमुख असेल तो वाटणी करील. लुटींतील पाचवा हिस्सा सार्वजनिक तिजोरीत जमा होईल. त्यांतून गरीब व गरजू यांना मदत दिली जाईल."
 या बद्रच्या लढाईचा नैतिक परिणाम मोठा झाला. परमेश्वराचा आपणांस पाठिंबा आहे असें मुस्लिमांस वाटू लागले. त्यांना उत्साह मिळाला. स्फूर्ति संचरली. कुराणामध्यें परमेश्वराच्या युद्धांत देवदूत कसे भाग घेतात, याची उदात्त, भव्य, काव्यमय वर्णने आहेत. येशु व इतर संत महात्मे मानतात त्याप्रमाणें मुहंमदहि परमेश्वर व मानवजात यांच्यामध्ये जा-ये करणारे देवदूत असतात असें मानीत असावेत. प्राचीनांचे जे देवदूत ते आजचे निसर्गनियम झाले आहेत! परंतु खरोखर देवदूत म्हणून कांही आहे का! देवालाच माहीत. मुहंमद 'असत्' चे हि एक तत्त्व मानीत. असत्तत्त्वाचे अस्तित्व मानीत.
 "हें तुमचें असत्, हा सैतान राहतो कोठें" असा एकानें एकदां पैगंबरास प्रश्न केला.
 "तुमच्या हृदयांत, मनुष्याच्या हृदयांत." मुहंमदांनी उत्तर दिलें. ख्रिस्ती धर्मात तो नरकाचा सम्राट् आहे. मुहंमद इतकें मूर्तत्व त्याला देत नाहीत. असत् चे अमूर्त तत्त्व ते मानीत असें दिसतें.
 त्या लढाईत शत्रुपक्षाकडचे जे पडले होते त्यांना एका मोठ्या खड्ड्यांत मूठमाती देण्यांत आली. स्वतः मुहंमद तेथे होते. एकेकाचें नांव घेऊन त्याला मूठमाती दिली जात होती. मुहंमद गंभीरपणे म्हणाले, "अरे तुम्ही सारे माझेच जातभाई होतात. मी खोटे बोलतों असें तुम्ही म्हणत असाल. कांहींचा माझ्यावर विश्वास होता. तुम्ही मला घराला परागंदा केलेत. परंतु दुसऱ्यांनी माझें स्वागत केलें. आणि आतां तुमची काय ही दशा झाली? देवाची अवकृपा झाली कीं असें व्हावयाचेंच."
 ज्या दोन कैद्यांचा शिरच्छेद झाला त्यांतील एकाचें नांव ओकबा असे होते. वधस्थळीं नेले जात असतां ओकबाने विचारले, "माझ्या मुलांबाळांस कोण?" त्या वेळेस मुहंमदांनी 'नरकाग्नि' असे उत्तर दिले, असे काही पाश्चिमात्य चरित्रकार म्हणतात व मुहंमद किती निर्दय होता ते रंगवतात. परंतु हा गैरसमज आहे. ओकबा ज्या जमातीचा होता ती जमात स्वतःला बनी उन-नाद म्हणजे अग्नीचे वंशज असे म्हणत. या नांवावरून ही दंतकथा शत्रूंनी निर्मिली असावी. मुहंमदाला मुलं किती प्रिय वाटत हें ज्यांना माहीत आहे, विशेषतः अनाथ पोरक्या मुलांविषयीं व गतधवांविषयीं कुराणांत जे शेंकडों सहृदय उल्लेख आहेत ते ज्यांनां माहीत आहेत, ते वरील गोष्ट सत्य मानणार नाहीत.
 'यतो धर्मस्ततो जयः' असे आपण म्हणत असतो. बद्रच्या लढाईनें तरी हें दाखविले. आपली बाजू सत्याची आहे असें मुहंमदांच्या अनुयानांना नक्की वाटले. या लढायीच्या वेळेस मुहंमदांची आवडती मुलगी रुकैय्या ही मरण पावली. अबिसिनियांतून परत आलेल्या उस्मानजवळ तिचा नुकताच विवाह लागला होता. पैगंबरास अश्रु गाळावयास वेळ नव्हता! कुरेश कैद्यांना त्यांनी मोकळें केले. हे कैदी मक्केला माघारी गेले. ते मुहंमदांची स्तुतीच गाऊं लागले. कुरेश पुढाऱ्यांना हे आवडले नाहीं. अबु सुफियान हा दोनशे लोक बरोबर घेऊन मारू किंवा मरूं अशा निश्चयाने निघाला. विजेसारखा तो आला. आसपासची मदिनेवाल्यांची फळझाडे तोडूं लागला. बाहेर येणारे जाणारे मारूं लागला. मदिनेवाले बेसावध होते. परंतु तेहि सूड घ्यायला बाहेर पडले. तेव्हां अबु सुफियानचे लोक खाण्याच्या पिशव्या टाकून पळून गेले. पिठाच्या थैल्यांची लढाई म्हणून ही प्रसिद्ध आहे. (सबीकांच्या पिशव्यांची लढाई : सबीक हा एक खाण्याचा पदार्थ आहे. अरब लोक हिरवे दाणे भाजतात. मग ते दळतात. त्यांत साखर वा खजूर मिसळून प्रवासांत खातात.) याच लढाईच्या वेळची ती सुंदर सहृदय सत्यकथा आहे. मुहंमद त्यांच्या तळापासून जरा दूर एकटेच एका झाडाखाली झोपले होते. इतक्यांत कसल्या तरी आवाजानें ते जागे झाले. समोर पहातात तो दरथुर उभा. दरथुर हा शत्रुपक्षाचा होता. मोठा वीर होता.
  "आतां तुला कोण वांचवील?" तो मुहंमदांस म्हणाला.
 "प्रभु" मुहंमद म्हणाले.
 वाळवंटांतील तो बेदूइन हे शांत सश्रद्ध उत्तर ऐकून चकित झाला! त्याच्या हातांतील तरवार गळून पडली. ती एकदम मुहंमदांनी उचलली.
 "दरथुर आतां तुला रे कोण बांचवील?" मुहंमदांनी विचारिलें.
 "अरेरे, कोणी नाहीं वांचवायला!" तो म्हणाला.
 "माझ्यापासून दयाळू होण्यास शीक." त्याची तरवार परत करून पैगंबर म्हणाले.
 त्या अरब वीराचे हृदय विरघळले. तो पुढे पैगंबरांचा अत्यंत निष्ठावंत अनुयायी झाला.

回 回 回





मक्केचे मूर्तिपूजक सूडासाठीं जळत होते. मोठ्या युद्धाची त्यांनी पुन्हा तयारी चालविली. त्यांनी इतरहि जातिजमाती बोलावल्या. तीन हजार सेना सिद्ध झाली. तो निर्दय व करारी अबु सुफियान मुख्य नेता झाला. सेना निघाली. मदिनेच्या ईशान्येस तळ देऊन बसली. एक टेंकडी व दरीच काय ती मध्ये होती. येथें तळ देऊन हे सैन्य मदिनेस सतावूं लागलें. शेतें, फळांच्या बागा सारे उध्वस्त करूं लागलें. शेवटीं मुहंमद एक हजार लोकांनिशीं बाहेर पडले. परंतु ऐन वेळीं ज्यूंच्या चिथावणीमुळे अब्दुल्ला इब्न उबयाचे तीनशे लोक फुटले. हे मुनाफिकीन होते. ते अलग झाले. लढायला येत ना. तरी मुहंमद कचरले नाहींत. रात्रीच्या वेळेस ते हळूच बाहेर पडले. ओहोद टेंकडी त्यांनी गांठली. रात्रभर टेंकडीवर राहून सकाळी प्रार्थना करून ते निघाले. अर्धचंद्राकार रचनेनें शत्रुसैन्य पुढें आलें. अबु सुफियान व त्यांच्या देवदेवतांच्या मूर्ति मध्यभागी होत्या. ओहोदची टेंकडी मदिनेपासून तीन मैलांवर होती. मुहंमदांनीं कांहीं तिरंदाजांस उंच जागीं मागे ठेवलें. जागचे हलूं नका सांगितलें. आणि निघाले. कुरेशांचा पहिला हल्ला पिटाळला गेला. हमजाची बहादुरी अपूर्व होती. परंतु तिरंदाज कर्तव्य विसरले. ते एकदम विजयच मिळाला असें समजून लुटालूट करायला निघाले! शत्रुपक्षाकडील खालिद बिन वलीद याच्या लक्षांत ही चूक आली. तो एकदम आपले घोडदळ जमवून मुहंमदांच्या पिछाडीवर तुटून पडला. मुसलमान मध्यें सांपडले. शूर हमजा या लढाईत पडला! आणखीहि मोठमोठे मोहरे प्राणांस मुकले. अली, उमर, अबुबकर सारे जखमी झाले. शत्रूंचा मुहंमदांवर डोळा होता. कांहीं एकनिष्ठ अनुयायांची मांदी मुहंमदांभोवती होती. मुहंमद जखमी झाले होते. रक्त गळत होतें. एक अनुयायी तें थांबवूं पहात होता. त्याच्या हाताचं तशा प्रसंगांतहि पैगंबरांनी प्रेमाने चुंचन घेतलें. किती प्रेमळ त्यांचे हृदय! आणि प्रेमळ हृदये त्यांच्या आसपास मरत होतीं. परंतु इतक्यांत अली आपल्या शूर अनुयायांसह मुहंमदांच्या बचावासाठीं धांवून आले. मुहंमदांसह ते ओहोद टेकडीवर परत आले. अलीने आपल्या ढालीतून पाणी आणले. त्याने प्रेमाने मुहंमदांचं तोंड धुतलें, जखमा धुतल्या आणि भर दुपारी सर्वांनीं प्रार्थना केली. कुरेश हि थकले होते. मदिनेवर चालून जाण्याचे किंवा टेकडीवर प्रार्थना करणाऱ्यांवर चढाई करण्याचे त्यांना धाडस झाले नाही. मुहंमदांकडील जे धर्मवीर मरून पडले होते, त्यांची प्रेतं छिन्नभिन्न करीत ते बसले. त्या वीरांच्या मृत देहांची ते विटंबना करीत होते. अबु सुफियानची पत्नी हिंद व इतर कुरेश स्त्रिया, ज्या लढायांत हुरूप व उत्साह द्यायला आल्या होत्या त्यांनीं क्रूरपणाची कमाल केली. त्या बायांनीं शूर व दिलदार हमजाचे काळीज कापून घेतलें! मृत वीरांचे कान कापून घेतले, नाके कापून घेतली. त्यांचे अलंकार करून त्यांनी कानांत गळ्यांत घातले. त्यांचीं कांकणें करून हातांत घातलीं. ही विटंबना पाहून शांतमूर्ति व क्षमामूर्ति मुहंमदहि सात्त्विक संतापाने लाल झाले. ते संतापाने म्हणाले, "अतःपर यांनाहि असेंच बागवू." परंतु पुन्हा शांत झाले व म्हणाले, "नको असे नको. अन्याय सहनशीलपणें सोसूं या. सहन करूं या. जो शांतीने सहन करील त्याचेच कल्याण होईल. बुरें सोसणाराचं भले होईल." मुहंमदांच्या या उद्गारांनी मुसलमानांस शत्रूशीं दिलदारपणें वागावयास शिकविलें आहे. शत्रूची विटंबना करणें, हालहाल करून मारणें ही गोष्ट मुस्लिम धर्मात संमत नाही. मुहंमदांस हें पसंत नव्हतें. पहिल्या महायुद्धांत शत्रूंच्या कैद्यांस सर्वात चांगल्या रीतीनें तुर्कस्थाननें वागविलें, असें साऱ्या राष्ट्रांनी कबूल केलें.
 या लढाईत अनिर्णितच सामना राहिला. कुरेशहि माघारे गेले. मुहंमद मदिनेंत परत आले. परंतु आपण हताश झालेलों नाहीं, निरुत्साह झालेलों नाहीं हें दाखविण्यासाठीं शत्रूचा पाठलाग करयासाठी त्यांनी एक टोळी पाठवली. अबु सुफियान त्वरा करून मक्केस पोचला. "लौकरच तुमचें निर्मूलन करण्यासाठी पुन्हा येऊ." असा त्याने निरोप पाठविला. तो निरोप ऐकून मुहंमद म्हणाले, "आमच्याबरोबर परमेश्वर आहे तेवढा पुरे. तोच खरा संरक्षक!"
 आसपासच्या टोळ्याहि मदिनेस आतां वरचेवर त्रास देऊ लागल्या. मुहंमदांनी ताबडतोब या गोष्टीचा बंदोबस्त केला. कांहीं जमाति 'आम्हांस उपदेश करायला कोणी पाठवा. आम्ही मुसलमान होऊं' असा निरोप पाठवीत. परंतु प्रचारक गेले की, त्यांची कत्तल करीत. एकदां असे सत्तर जण मारले गेले. नवधर्माची सत्त्वपरीक्षा प्रभूनें चालविली होती. बलिदानाचा पाया घातला जात होता. शुद्ध बी पेरले जात होतं.
 एकदां बनी आमिर जातीचे दोन निःशस्त्र लोक मुहंमदांपासून संरक्षण घेऊन जात होते. परंतु मुहंमदांच्या एका अनुयायाकडून चुकीनें ते शत्रुपक्षाचे समजून त्यांतील एक जण मारला गेला. मुहंमदांनी त्याच्या कुटुंबास नुकसानभरपाई देण्याचे ठरवलें. मदिनेत मुहंमद 'दियत' म्हणजे नुकसानभरपाईची रक्कम गोळा करूं लागले. ते ज्यूंजवळ हि मागायला गेले. परंतु ज्यू टाळाटाळी करूं लागले. इतकेंच नव्हे तर मुहंमदांस दगा करण्याची त्यांची लक्षणे दिसूं लागली. मदिनेंतील लोकसत्तेविरुद्ध ज्यू कारवाया करूं लागले. ते बाहेरच्या जातिजमातींनाहि चिथावणी देऊन उठवू लागले. पैगंबरांनी दोघांना मरणाची शिक्षा दिली. शहरांत दंगाधोपा होऊ नये, रक्तपात टाळावा, परंतु शासनहि व्हावे या हेतूनें या दोघांचा निमूटपणे अज्ञात माणसाकडून वध करण्यांत आला! त्या वेळेस कोर्ट, कचेऱ्या, कोर्ट मार्शल किंवा इतर शांततेच्या काळांतील सुव्यवस्था नव्हती. म्हणून मुहंमदांस असें करावें लागलें. ते फसवून खून नव्हते करवले. तर ती शिक्षा देण्यांत आली होती! बनी कैनुकाच्या लोकांस मदिनेतून हाकलून देण्यांत आले. त्याचे कारण असें झाले की एकदां एक मुस्लिम कुमारी बाजारांतून जात असतां एका ज्यूनें तिचा अपमान केला. एका जाणाऱ्या मुस्लिमानें मुलीची बाजू घेतली. तो ज्यू झटापटीत मारला गेला. इतर ज्यू धांवून आले. तो मुसलमानहि मारला गेला. तेथे लढाईच सुरू झाली. मुहंमद तेथे धांवून आले. त्यांनी सर्वांना शांत केलें. परंतु मदिनेचे वातावरण शांत कसे होणार? तेव्हां मुहंमदांनीं या ज्यूंना जायला सांगण्याचे ठरवले. बनी कैनुकाचे लोक हे कारागीर वर्गाचे होते. त्यांची शेतीभाती वगैरे नव्हती. तेव्हां त्यांना जा म्हणून सांगण्यांत कांहीं नुकसान नव्हते. परंतु ते मुहंमदांस म्हणाले, "अरे मुहंमदा, कुरेशांचा पराजय केलास म्हणून चढून जाऊं नकोस. कुरेशांना युद्धकला नीट माहीत नाहीं. आमच्याशी दोन हात करायची इच्छा आहे का? ये कर. आम्हीं मर्द आहोत. तुझी खुमखुमी जिरवूं." असें बोलून बनी कैनुकाच्या जमातीचे ज्यू आपल्या गढींत जमले व मुहंमदांची सत्ता झुगारते झाले. त्यांनी बंड उभारले. मुहंमदांनी त्यांच्या गढीला वेढा दिला. पंधरा दिवसांनी ते शरण आले. मुहंमद म्हणाले, "इस्लामी धर्म स्वीकारून या लोकसत्तेत सामील होणार असाल तर रहा. नाहीतर मदिना सोडून जा." ते गेले.
 आतां बनी उन-नुझैर या जमातीचे ज्यू राहिले होते. त्यांच्या मनांत शल्य टोचत होतें. मुहंमद जेव्हां 'दियत' मागायला गेले तेव्हां बरा सांपडला असें त्यांना वाटलें! मुहंमदांनी त्यांची हालचाल जाणली व स्वतःस व आपल्या अनुयायांस वांचविलें. मुहंमदांनी यांनाहि "मदिना सोडून जा. रहायचे असेल तर इस्लामी होऊन रहा." असा निरोप पाठवला. त्यांनीहि पूर्वीच्या ज्यूं-सारखेच घमेंडी उत्तर पाठविलें, ते आपल्या गढींत एक होऊन बंड करते झाले. मुनाफिकीनाची आपणांस मदत होईल, असा त्यांना भरंवसा होता. परंतु ती मदत मिळाली नाहीं. गढीला वेढा घालण्यांत आला. पंधरा दिवसांनी शरण आले. मुहंमद म्हणाले, "रहायचे असेल तर इस्लामी बनून, लोकसत्तेत सामील व्हा. नाही तर जा." ते जायला निघाले. "हत्यारांशिवाय बाकीचें सारें तुमचें घेऊन जा." असें मुहंमदांनी सागितले. जाण्यापूर्वी आपली घरेदारे मुसलमानांस उपयोगीं पडूं नयेत म्हणून तीं मोडूनतोडून मग ज्यू निघून गेले!
 मुहंमदांबरोबर मक्केची घरेदारे सोडून जे लोक आले होते त्यांना मदिनेतील मित्रांकडे वाटून देण्यांत आलें होतें. त्यांना घरदार कांही नव्हतें. परंतु या लोकांना ही ज्यूंची घरं द्यावीं असें मुहंमदाच्या मनांत आले. अनसार जरी या मुहाजिरीनस मदत करीत होते तरी त्यांची कुचंबणा होत होती. मुहंमद अनसारांस म्हणाले, "देऊं का ज्यूंचीं घरें, जमिनी व हत्यारें मक्केहून आले त्यांना?" अनसार आनंदाने म्हणाले, "द्या द्या. ज्यूंचें द्याच. परंतु तेवढ्यानें भागणार नाहीं म्हणून आमच्या मालमत्तेतीलहि त्यांना कांहीं द्या" मुहंमदांनी मुहाजिरीनांस व अनसारांतीलहि दोघां दरिद्रांस ज्यूंची घरेदारें, शेतीवाडी वाटून दिली. अतःपर अशी रूढीच पडली कीं, प्रत्यक्ष लढाईत न मिळालेली अशी शत्रूंची मालमत्ता राज्याच्या मालकीची समजावी. ह्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची तें राज्याचा प्रमुख ठरवील.
 अशा रीतीनें मदिनेंतून बहुतेक बंडखोर ज्यू गेले. परंतु थोडे ज्यू मागे राहिले होते. ते सूडाच्या इच्छेनें राहिले होते. आम्ही पूर्वीचा जुना करार पाळू." असें ते मुहंमदांस म्हणाले. म्हणून विषाचा पुनः पुन्हां कटु अनुभव आला तरीहि त्यांनी त्यांना राहूं दिले. परंतु आपल्या वळणावर ते गेले. त्यांची कुरेशांजवळ कारस्थानें सुरू झालीं. मक्कावाले स्वस्थ नव्हतेच. सर्व अरबस्थानांतील मूर्तिपूजक जातिजमाती मुहंमदांविरुद्ध उठविण्याची त्यांची खटपट चालली होती. कुरेशांचा व इतरांचा एक प्रबळ संघ स्थापला गेला. आणि दहा हजारांचं सैन्य मदिनेवर निघालें! अबु सुफियानच सेनापति होता. मदिनेपासून थोड्या अंतरावर हें प्रचंड सैन्य तळ देऊन तयारीने राहिलें. मदिनेंत तीन हजारांचेच सैन्य उभ राहूं शकले. शहरांतील असंतुष्ट मुनाफिकीनांच्या दगाबाजीची भीति होतीच. मदिनेभोंवतीं खंदक होता. तो आणखी खोल करण्यांत आला. ज्या बाजूस संरक्षण नव्हते त्या बाजूचा खंदक अधिकच खोल खणला गेला. तटबंदीच्या ठिकाणी बायकामुले ठेवण्यांत आली. मदिनेतील सैन्य बाहेर पडलें. शहराच्या बाहेर त्यांनी छावणी दिली. समोर खंदक होता. ज्यूंची बनी कुरेझा ही एक जमात मदिनेच्या नैऋत्येस रहात असे. ते तटस्थ राहतील, असा भरंवसा होता. ते कराराने मदत करण्यास बांधलेले होते. करार मोडा व मूर्तिपूजकांस मिळा, असा त्यांना कुरेशांचा निरोप आला. मुहंमदांस ही दगलबाजी कळली. त्यांनी बनी- नुझैरांकडे दोन जबाबदार लोकांबरोबर निरोप पाठविला की, "तुम्ही कर्तव्यास जागा." परंतु ज्यूंनीं उर्मट उत्तर दिले, "हा मुहंमद कोण? ज्याची आम्ही आज्ञा पाळावी असा हा कोण मुहंमद पैगंबर? त्याचा व आमचा कोणताहि करार झालेला नाहीं." ज्यूंना महिना शहराची सारी बातमी होती. ते ती शत्रूला पुरवतील, अशी भीति वाटत होती. शहरांतील मुनाफिकीनहि गडबड करूं लागले. मुसलमानांत संताप, प्रक्षोभ व अशांति वाढत होती. परंतु मुहंमद त्यांना शांत ठेवीत होते. कुराणांतील तेहतीसाव्या सुऱ्यांत या वेळच्या परिस्थितीचं फारच सुंदर वर्णन आहे. मुस्लीम सेना पुढे मैदानांत आली कीं, अचानक जाऊन मदिनेवर हल्ला करावा, असें बनी कुरेझा मनांत म्हणत होता. आंतहि असंतुष्ट लोक होतेच. परंतु मुहंमद खंदक ओलांडून पुढे जातना. मदिनेच्या भिंतीस पाठ लावून ते उभे होते. शेवटीं मूर्तिपूजकांचे ते दहा हजार सैन्य माशा मारून कंटाळूं लागलें. अनेक जातिजमातींचं तें कडबोळे होतें. त्यांच्यांत भांडणेंहि सुरू झालीं. मुस्लिमांनी त्यांच्यांत आणखी भेद पाडले. फाटाफुटी केल्या. ऐक्य नष्ट होऊं लागले. अन्नाचा तुटवडा पडूं लागला. घोडे मरूं लागले. शेवटीं या मैदानी सेनेनेंच खंदकांतून जाऊन चढाई करायची असें ठरविले. हल्ले होऊं लागले. परंतु प्रत्येक हल्ला हाणून पाडण्यांत आला. हे प्रचंड सैन्य पांगू लागले, नष्ट होऊं लागलें. संमिश्र फौजा वाऱ्यावर गेल्या. ईश्वराची मदत आली. प्रचंड वारे उठले. आणि मुसळधार पाऊस आला. तंबू उडून गेले. मैदानी सैन्याची फार दुर्दशा! एक दिवा टिकेना. हिलाल राहीना. अबु सुफियान व त्याचें सैन्य पळाले. या लढायीला खंदकाची लढायी असें म्हणतात.
 मुसलमान आनंदानें शहरांत आले. कांहीं शत्रूंकडील लोक ज्यू बनी कुरेझा यांच्या आश्रयाखाली रहायला गेले. परंतु बनी कुरेझा मदिनेच्या जवळ असणें धोक्याचं होतं. केलेले करार मोडून ते देशद्रोही झाले होते. मदिनेवर अचानक हल्ला करून सर्वांची कत्तल करण्याचे त्यांच्या मनांत होते. परंतु खंदकाच्या लढायीचा निराळाच परिणाम झाला. बनी कुरेझांकडे मुहंमदांनी पुनःपुन्हा जाब मागितला. पुनः पुन्हा त्यांनी उर्मट उत्तर पाठविले. शेवटी त्यांच्या वस्तीस मुसलमानांनी वेढा घातला. ते शरण आले.
 "तुमचा काय निकाल द्यावा, कोणती शिक्षा?" त्यांना विचारण्यांत आलें.
 "आम्हांला काय शिक्षा द्यावयाची तें औसांच्या जमातीचा पुढारी साद यानें ठरवावें. तो योग्य न्याय देईल." ते म्हणाले. हा साद मोठा शूर पुरुष होता. खंदकाच्या युद्धांत तो जखमी झालेला होता. ज्यूंच्या करारभंगानें तो संतापलेला होता. स्वतः मरणाच्या दारीं होता. त्यानें कोणता निकाल दिला ?
 "लढू शकणारे सारे ठार करावे. स्त्रिया व मुलें यानां गुलाम करावें!" सादच्या निर्णयाप्रमाणें शिक्षा दिली गेली.
 या गोष्टीमुळे युरोपियन ख्रिश्चन इतिहासकार मुहंमदांस रक्तार्थ तहानलेला वगैरे विशेषणें देत असतात. इंग्रज सेनापति वेलिंग्टन यानें स्पेनमधून त्या मोहिमेच्या वेळेस शेंकडों लोकांना रस्त्याच्या दुतर्फा कसें फांशी देऊन टाकलें, तें युरोपियन इतिहासकारांनीं ध्यानांत घ्यावें. हिंदुस्थानांतील सत्तावनच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळेस इंग्रजांनी ज्याचें ज्याचे नांव नानासाहेब होते त्याला त्याला फांशी दिले, हें या टीकाकारांनीं ध्यानांत घ्यावें. आजच्या युद्धांतहि कशा गोष्टी होत आहेत ते पहावें.
 ज्यूंचा अपराध मोठा होता. ऐन लढायीचे वेळेस त्यांनी द्रोह केला. करार- भंग करून दगाबाजी केली. कोणतें शासन द्यावे ? आजचीहि राष्ट्र अशा आणी- बाणीच्या वेळेस कोणती शिक्षा देतील ? सादनें निकाल दिला तो त्या काळांतील युद्धनीतीप्रमाणे दिला. आणि सादनें निकाल द्यावा, अशी ज्यूंची मागणी होती. ज्यूंनीं जिंकलें असतें तर त्यांनी तेच केलें असतें. ख्रिस्त्यांनी का आरंभी व नंतर थोड्या कत्तली केल्या? ख्रिश्चन नीतिशास्त्रज्ञ तर स्पष्ट सांगत व लिहीत कीं, "दुसऱ्या निर्मळ व निष्पाप जीवांस पापी पापप्रवृत्त करतात. अशा पाप्यांना व दुष्टांना जिवंत ठेवण्यापेक्षां शंभर वेळां नष्ट करणें बरें." परंतु मुस्लिम इतके निर्दय नाहींत. ते एवढेच म्हणतात, त्या वेळेस मुहंमद व त्यांचे अनुयायी यांच्यासमोर जगण्यामरण्याचा प्रश्न होता. बाल्यावस्थेतील अरब राष्ट्र जगतें ना. मुस्लिम धर्म टिकता ना. पुढे पसरता ना; व पुढे जी भव्य संस्कृति फुलली, पुढील अज्ञान काळांत मुस्लीम संस्कृतीनें जी ज्ञानाची मशाल पेटवली, नव-संस्कृतीला सर्वत्र चालना दिली, जीतून पुढील युरोपियन संस्कृति संभवती झाली तें सारें होतें ना."
 ख्रिश्चन नीतिशास्त्रज्ञ लिहितात तेवढें वाटतें बरोबर? ख्रिश्चन करतात तेवढें वाटतें रास्त? इंग्लंडमधील ऑलिव्हर क्रॉमवेलने आयरिश कॅथालिकांची कशी एकजात कत्तल केली! कोणी लांडगा मारला तर त्याला बक्षीस देत त्याप्रमाणें कॅथॉलिकांचं मुंडके आणलें तर त्याला कसें बक्षीस दिले जाई? आणि पुन्हा या सतराव्या शतकांतील गोष्टी. आणि क्रॉमवेल म्हणे अत्यंत धर्मभीरू होता! धर्मात्मेच फक्त त्याच्या सैन्यांत असत! रोज प्रार्थना करणारांनाच तो आपल्या सैन्यांत घेई! तोंडानं प्रार्थना म्हणत ते हल्ला करीत. आणि क्रॉमवेलच्या या क्रूरतेचं समर्थन करतांना तत्त्वज्ञ व इतिहासकार कार्लाईल लिहितो:
 "न्यायी ईश्वराचा मी शिपायी आहे, या भावनेनं जागृत असलेला वीरपुरुष मृत्यूप्रमाणें कठोर बनतो. नशिबाप्रमाणे, भवितव्यतेप्रमाणे, त्या अंतिम न्यायदिनाप्रमाणें कठोर बनतो. आणि देवाच्या शत्रूंवर देवाचा निकाल जणुं देत असतो."


 गुंबदे खज़रा (निळा घुमट).
 मुहंमद पैगंबरांच्या थडग्याच्या इमारतीचा बाहेरचा भाग.
 मुहंमदांच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानींच दफन केलें.
 हा भाग आतां मसजिद नबवीमध्यें सामील करण्यांत आला आहे.


 स्त्रिया व मुलें गुलाम केल्यावर त्यांची वांटणी झाली! कोणी इतिहासकार म्हणतात, "रैहान नावांची ज्यू स्त्री मुहंमदांसाठी ठेवली गेली होती!" परंतु या गोष्टीस पुरावा मिळत नाहीं. मुहंमदांच्या इतर सर्व स्त्रियांची हकीकत मिळते. परंतु ती मुहंमदांची स्त्री होती असा कोठेंहि उल्लेख येत नाहीं. तेव्हां ही एक कल्पित कथा असावी.

回 回 回





ज्यूंचा निकाल लागला. परंतु आसपासचे बेदुइन आतां सतावूं लागले. त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सुरू झालें. या सुमारासच सिनाई पर्वतावरील सेंट कॅथेराइन मठाला व सर्वच ख्रिश्चन लोकांना मुहंमदांनी जी सनद दिली ती सुप्रसिद्ध आहे. जगाच्या इतिहासांतील ती अपूर्व सहिष्णुता होती. विशेषतः सेमिटिक धर्मामध्ये तरी ही वस्तु निःसंशय अपूर्व होती. ख्रिश्चनांना त्यांच्या स्वतःच्या धर्माच्या राजांकडूनहि ज्या सवलती मिळाल्या नाहींत त्या मुहंमदांनी दिल्या. आणि "जो कोणी मुस्लिम मी दिलेल्या या आज्ञापत्राविरुद्ध वागेल तो धर्मच्युत समजला जावा. ईश्वरी आज्ञेचा भंग करणारा मानला जावा" असेंहि त्यांनीं जाहीर केलें. "ख्रिश्चनांचा सांभाळ करणें, त्यांच्या मंदिरांचें, चर्चेस् चे रक्षण करणें, त्यांच्या धर्मोपदेशकांचीं वसतिस्थानें रक्षिणें; सर्व अपायांपासून सांभाळणे, अन्याय्य कर न बसविणें, कोणत्याहि बिशपला वगैरे न काढणें, कोणाहि ख्रिश्चनास स्वधर्मत्याग करावयास भाग न पाडणे, मठांतून ख्रिश्चन साधूंस न हांकलणे, यात्रेपासून कोणाहि यात्रेकरूस न रोखणें, ख्रिस्ती धर्मीयांची घरें वा चर्च यांचा मशिदीसाठी उपयोग न करणें, मुस्लिमांशी ख्रिश्चन स्त्रियांनीं लग्ने केलीं तर त्या स्त्रियांना स्वतःचा धर्म पाळण्याची मुभा असणें, धर्माची सक्ति न करणें, ख्रिश्चनांस स्वतःचे मठ वा चर्च यांच्या दुरुस्तीसाठी मदत लागली तर ती देणे, त्यांच्या इतरहि धार्मिक गोष्टींस साहाय्य हवें असेल तर तें देणें, परंतु याचा अर्थ त्यांच्या धर्मात आपण सामील झालों असा कोणी करूं नये, त्यांच्या गरजेसाठी त्यांना आपण मदत दिली इतकाच याचा अर्थ. बाहेरच्या ख्रिश्चनांशी लढायी चालू असली तरी स्वतःच्या देशांतील ख्रिश्चनांस ते केवळ ख्रिश्चन आहेत म्हणून त्रास देऊं नये. जर कोणी त्यांना त्रास देईल तर तो पैगंबरांस कमीपणा आणील!"
 किती सुंदर ही हक्काची सनद मुहंमदांचा अंतरात्मा किती थोर होता. येशू ख्रिस्ताविषयीं त्यांना अत्यंत पूज्यबुद्धि वाटे. तसेच ते सर्व शेजाऱ्यांशीं गुण्या-गोविंदाने राहूं इच्छित होते. ख्रिश्चन धर्मात नाना चर्चा चाललेल्या होत्या व कत्तली होत होत्या. अशा वेळेस ते जर मुस्लिम राज्यांत राहावयास आले तर त्यांना केवढे आश्वासन!
 अपकारांची फेड अपकाराने करण्याची शक्ति असतांहि जो दया दाखवितो तोच खरा महात्मा. मुहंमद शासनाधिकारी या नात्यानें स्टेट चालवणारे, जनतेच्या मालमत्तेचे व जीविताचे, जनतेच्या स्वातंत्र्याचे वाली या नात्यानें न्याय देतांना अपराध्यास कठोरपणें शासनहि करीत. परंतु पैगंबर या नात्यानें, ईश्वराचे प्रेषित या नात्याने ते केवळ क्षमामूर्ति होते. मोठ्यांतल्या मोठ्या शत्रूसहि ते क्षमा करीत. न्याय व दया यांचे मधुर मिश्रण त्यांचे ठायीं होतें.

मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास ।
कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥

अशाच कोटींतील मुहंमद होते. किती उदाहरणे द्यावीं? एकदां वाळवंटांतील एक बेदुइन अरब कैदी मुहंमदांकडे आणण्यांत आला. पैगंबराच्या दयाळूपणाचा त्याच्यावर अत्यन्त परिणाम झाला. तो शत्रुत्व विसरून अत्यंत निष्ठावंत अनुयायी झाला. मुहंमदाचा भक्त होऊन तो गेला. तो मग आपल्या प्रान्तांतून मक्कावाल्यांस धान्य वगैरे पाठविनासा झाला. मक्केत धान्य मिळेना. मक्कावाल्यांची मोठी करुणस्थिति झाली. शेवटी त्यांनी मुहंमदांकडे अर्ज पाठविला. आणि मुहंमद द्रवले. जे मक्कावाले त्यांना पुनःपुन्हा मारण्यासाठीं उठत होते. त्यांना जगविण्यासाठी मुहंमद उभे राहिले. त्यांनी त्या निष्ठावंत अरबाला, थुमामला सांगितलें कीं, मक्कावाल्यांस लागेल ते देत जा. अपकारांची फेड ते प्रेमाने व क्षमेनें करते झाले. मुहंमदांनी पुढे जेव्हां मक्का घेतली त्या वेळेस हब्रार नांवाचा एक खुनी मुहंमदांसमोर आणण्यांत आला. एकदां मुहंमदांची एक मुलगी मक्केहून निसटून जात होती. ती उंटावर बसणार इतक्यांत हा कुरेश हब्रार तेथें आला. त्यानें त्या मुलीच्या अंगांत भाला खुपसला! ती गरोदर होती. ती जमिनीवर पडली व लगेच मेली. स्वतःच्या गरोदर मुलीचा निर्दय खून करणारा तो हब्रार विजयी मुहंमदांसमोर उभा करण्यांत आला. पैगंबरांस त्या प्रिय कन्येचं स्मरण झाले. हब्रार मुहंमदांच्या पाया पडला व क्षमा मागता झाला. मुहंमदांना तो पश्चात्ताप खरा वाटला. त्यांनीं क्षमा केली. कारण तो अपराध त्यांच्या वैयक्तिक बाबतींतला होता. त्या अपराधाचा शासनसंस्थेशी संबंध नव्हता. पैगंबर स्वतःच्या बाबतीतले सारे अपराध क्षमा करीत. शासनसंस्थेचा संबंध येई तेथे ते कठोर बनत. ते कठोर कर्तव्य त्यांना करावें लागे. एका ज्यू स्त्रीनं मुहंमदांस मारण्याचा प्रयत्न केला. तिलाहि त्यांनी क्षमा केली. अबु जहलचा मुलगा अक्रमा यानेंहि हाडवैर मुहंमदांजवळ केलें. परंतु तरीहि त्याला क्षमा केली गेली. पैगंबरांचे महानुभावित्व असीम होते. पैगंबर या नात्यानें त्यांनी सदैव क्षमाच केली; परंतु शास्ते या नात्याने त्यांना तत्कालीन परिस्थितीमुळे कठोर व्हावे लागले. ज्यूंनीहि पुनःपुन्हा त्यांना सतावले, फसवलें, दगलबाजी केली. नाहीं तर मुहंमद किती सौजन्याने वागूं पहात होते! तोंडहि प्रार्थनेच्या वेळेस जेरुसलेमकडे करीत!
 कांहीं ख्रिश्चनधमीं बेदुइनहि मदिनेस त्रास देऊं लागले. लुटालूट व रस्तेमार करीत. त्यांच्या बंदोबस्तासाठीं मुहंमदांनी जी तुकडी पाठविली, तिच्या प्रमुखास ते म्हणाले, "कोणाला फसवू नका. दगलबाजी कोणाशी करूं नका. दिला शब्द पाळा. लहान मुलांना तर तुम्ही हात नाहींच लावतां कामा." मुहंमदांची ही सुंदर आज्ञा, परंतु ज्यूंच्या धर्मस्थापकाने काय सांगितले होते? "जा आणि अमलकांवर हल्ला करा. सारे नष्ट करा. स्त्रिया, पुरुष, लहान अंगावरचं मूल, कोणी ठेवू नका. सारी मारा. गुरेढोरे मारा. वृद्ध, तरुण सारे मारा." मुहंमदांची उदारता खरोखरच अपार व अपूर्व होती. कधींहि तुकडी पाठवायची झाली तर ते सांगत, "दुबळ्यांना धक्का नका लावू. घरांतील निरपराधी लोकांस मारूं नका. स्त्रियांना वांचवा. अंगावर पिणारी मुलं त्यांची हत्त्या नका करूं. प्रतिकार न करणाऱ्यांची घरेदारे पाडूं नका. त्यांच्या उपजीविकेचीं साधने नष्ट नका करूं. फळझाडे तोडूं नका. ताडांची झाडे, तीहि नका तोडूं."
 पैगंबरांची ही शिकवण पुढील खलिफांसमोरहि असे. अबुबकर जो पुढें पहिला खलिफा झाला, त्याने यझीद बीन अबु सुफीयन याला जेव्हां बायझंटाइनांवर स्वारी करायला पाठविलें तेव्हां पुढील शिकवण दिली:
 "यझीद, स्वतःच्या लोकांना असंतुष्ट व अशान्त करूं नको. त्यांच्यावर कोणताहि जुल्म नको करूं. त्यांचाहि सल्ला घेत जा व योग्य तें करीत जा. मी सांगतों आहे याविरुद्ध जे वागतील त्यांना यश येणार नाहीं. शत्रूशीं गांठ पडल्यावर मर्दासारखे वागा. पाठ नका दाखवूं. आणि विजयी झालेत तर स्त्रिया, वृद्ध व मुले यांना मारूं नका. फळझाडे, ताडाची झाडे तोडूं नका. शेतें जाळू नका. गुरेढोरें मारूं नका. पोटासाठीं जरूर पडली तरच तीं मारा. शत्रूशी करार कराल तर तो पाळा. दिल्या शब्दाप्रमाणे वागा. धर्मप्रवृत्तीचे लोक मठांतून वगैरे असतात. एकान्तांत ईश्वराची सेवा, पूजा करतात. त्यांना त्रास देऊं नका. मारूं नका. मठ उध्वस्त करूं नका."
 किती संयमी हे आज्ञापत्र ! शांतीचा संदेश देणाऱ्या ख्रिस्ताच्या अनुयायांच्या लीला व ख्रिस्ती शासकांचीं आदेशपत्रे- आगलावीं आदेशपत्रे वाचलीं म्हणजे पैगंबर व त्यांचे अनुयायी यांचीं हीं त्या काळांतील शासनें किती उदात्त वाटतात! चीनमध्ये एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत सुधारलेले म्हणवणाऱ्या ख्रिश्चन राष्ट्रांनी कशा कत्तली केल्या, ग्रंथालये, कलालये कशीं जाळलीं तें वाचा आणि मग मुहंमदांकडे पहा. त्यांनी शिकवलेल्या उदार धर्माकडे पहा.

回 回 回





मुहंमद अशा रीतीनें शांति प्रस्थापित होते. लुटणाऱ्यांचा बंदोबस्त करीत होते. प्रेमानें, कठोरपणानें सर्वास जिंकित होते. मक्का सोडून त्यांना आतां सहा वर्षे झालीं होतीं. त्यांचे शब्द ऐकायला दूरदूरचे लोक येऊं लागले. त्यांचा सल्ला विचारायला येऊं लागले. रोजच्या जीवनांत कसें वागावें तें विचारण्यासाठीं येऊ लागले. मुहंमद नाना विषयांवर सांगत. त्यांतून इस्लामी धर्माच्या स्मृति तयार होऊं लागल्या. नीतिशास्त्र, कायदेशास्त्र तयार होऊं लागलें, मुहंमदांबरोबर जे मक्का सोडून आले होते, तीं आपली घरें, त्या टेकड्या सारे सोडून आले होते, त्यांना पुन्हां एकदां ती जन्मभूमि पहावी, असें वाटूं लागलें. मुहंमदांसहि मक्केची फिरून फिरून आठवण येत होती. तें परंपरेचें पवित्र मंदिर काबा पाहण्याच्या इच्छेनें सारे उत्कंठित झाले होते. काबा सर्व अरबस्थानचें होतें. कुरेश केवळ तेथले पंड्ये होते. काबाच्या दर्शनास शत्रुहि आला तरी कुरेश कायद्यानें त्याला बंदी करूं शकत नव्हते.
 आणि यात्रेचा महिना जवळ आला. मक्केस जाऊन पवित्र स्थानें पहाण्याचा आपला इरादा पैगंबरांनी जाहीर केला. सातशे मुसलमान निःशस्त्र असे निघाले. या सातशेत अन्सार, मुहाजिरीन सारे होते. परंतु कुरेशांचा वैराग्नि विझला नव्हता. ते मक्केपासून कांहीं अंतरावर सशस्त्र आडवे आले. परंतु नंतर मांगें हटत हटत मक्केत जाणारे सारे रस्ते रोखून बसले! मुहंमदांनी त्यांच्याकडे एक प्रतिनिधि पाठवला. परंतु कुरेशांनी त्याला नीट वागवलें नाहीं. मुहंमद व त्यांचे अनुयायी यांना काबा मंदिरांत आम्ही येऊ देणार नाहीं, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. मक्कावाले मुहंमदांच्या तळाभोवती घिरट्या घालीत होते. एखादा एकटाच आढळला तर त्याला ठार मारतां यावें म्हणून टपून बसत. कांहींनीं पैगंबरांवरहि दगड फेकले, बाण मारले. यांतील कांहीं पकडले गेले व मुहंमदांसमोर आणले गेले. पैगंबरांनी त्यांना क्षमा केली. नंतर कुरेशांकडे पैगंबरांनी उस्मानला पाठविलें. त्याला कुरेशांनी धरून पकडून ठेवलें! मुहंमदांस यादवी थांबवावयाची होती. त्यांनी कुरेशांना कळविलें, तुमच्या अटी काय त्या कळवाव्या. कांहीं करार करूं. शेवटीं एक करार झाला. दहा वर्षेपर्यंत दोघांनी आपसांत लढावयाचें नाहीं असें ठरलें. तसेंच कुरेशांपैकीं बिगरपरवाना कोणी मुहंमदांकडे आला तर त्यांनी त्याला पुन्हां कुरेशांच्या स्वाधीन करावें. परंतु मुसलमानांपैकी कोणी मक्केत मक्केवाल्यांकडे गेला तर त्याला मुहंमदांकडे परत पाठवायला कुरेश बांधलेले नाहीत. कोणत्याहि जातिजमातीस, मुहंमदांस वा कुरेशांस मिळण्याची मुभा असावी. या वेळेस मुसलमानांनी परत जावें. पुढील वर्षी काबादर्शनास यावें. तीन दिवस मक्केत रहावें. हत्यारांसह यावें. अशा अटी ठरल्या. कुरेशांकडचा एक दूत मुहंमदांकडे आला होता. पैगंबरांविषयीं सारे किती पूज्यभाव, भक्तिभाव दाखवतात तं पाहून तो चकित झाला! तो परतल्यावर कुरेशांस म्हणाला, "अनेक राजे-महाराजे यांचे दरबार मी पाहिले, परंतु कोणाहि राजामहाराजाला असा मान दिलेला मी पाहिला नाहीं. अशी आदरबुद्धि कोणाविषयीं दाखविलेली मला दिसली नाहीं."
 करार झाला. कुरेशांनी कराराप्रमाणे आपल्यांतील मुहंमदांकडे गेलेल्या कांही लोकांची ताबडतोब मागणी केली. मुहंमदांनी त्यांना पाठविले. कांहीं लोक असंतुष्ट झाले. परंतु मुहंमद दूरवर पाहणारे. नम्रतेनें ते जिंकू पहात होते. सरळता व उदारता दाखवून जिंकू पहात होते. मुहंमद अनुयायांसह मदिनेस परत आले.
 आपला नवीन धर्म, साधा, सरळ, उदार बंधुभावाचा धर्म, सर्व जगानें घ्यावा असें मुहंमदांस वाटू लागलं. त्यांनी अनेक राजेरजवाड्यांकडे दूत पाठविले. हा नवधर्मामृताचा पेला घ्या, असे त्यांनी सर्वांना लिहिलें. ग्रीकांचा सम्राट हिरेक्लिअस व इराणचा खुश्रू पर्विझ यांच्याकडेहि दूतपत्रे देऊन पाठविले. तें पत्र वाचून खुश्रू रागावला. हा कोण बरोबरीच्या नात्यानें लिहिणारा, असें म्हणून त्यानें पैगंबरांच्या पत्राचे तुकडे केले! तें ऐकून मुहंमद म्हणाले, "त्याच्या राज्याचे असेच तुकडे होतील!" आणि पुढें लौकरच ती भविष्यवाणी खरी ठरली. ग्रीक सम्राट हिरेक्लिअस यानें पैगंबरांच्या दूतास अधिक चांगल्या रीतीने वागविलें. पैगंबरांनी पाठविलेल्या दूताचें नांव अबु सुफियान.
 "तुमचे पैगंबर काय शिकवतात? " ग्रीक सम्राटाने विचारलें.
 "एका ईश्वराची पूजा करा. जुन्या मूर्तिपूजेस रजा द्या. गरिबांसाठी उत्पन्नाचा कांही भाग देत जा. सत्यानें रहा. पवित्र रहा. दुर्गुणांपासून दूर रहा. पापांपासून, घाणीपासून दूर रहा. असें पैगंबर शिकवतात." अबु सुफियाननें उत्तर दिलें.
 "त्यांचे अनुयायी वाढत आहेत का?"
 "हो वाढत आहेत. आणि जो एकदां त्यांचा होतो, तो पुन्हां त्यांना कधीं सोडित नाहीं."
 या हिरेक्लिअसचा एक मांडलिक राजा दमास्कसजवळ रहात असे. त्याच्याकडेहि इस्लामचा दूत गेला. परंतु त्याचा दुसऱ्या एका मातबराकडून खून झाला! यामुळेच पुढे इस्लामचं व ख्रिस्ती राष्ट्रांचे युद्ध सुरू झालें.
 ज्यूंचा पराजय झाला तरी आसपासच्या ठिकाणाहून ते त्रास देत असत. मदिनेपासून तीन चार दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर अत्यंत तटबंदीच्या बळकट ठिकाणीं बनी नझीर व कुरेझा या ज्यू जमाती राहूं लागल्या होत्या. तेथें मजबूत किल्लेकोट होते. या जागेस खैबर म्हणत. खैबर म्हणजे तटबंदीची जागा. खैबरचे ज्यू मुहंमदांवर जळफळत होते. पैगंबरांस खाऊं कीं चावूं करीत होते. या ज्यूंनीं वेदुद्दनांच्या एका जमातीशीं संयुक्त फळी करण्याचे ठरविलें. बेदुइनांचें शौर्य-धैयं मुसलमानांस माहित होतें. संयुक्त फळी होऊन बेदुइन व ज्यू यांचे संयुक्त सैन्य मदिनेवर चालून येण्यापूर्वीच मुसलमानांचे १४०० लोकांचे सैन्य खैबरवर चालून गेलें! ज्यूंना कोणाचीहि मदत आली नाहीं. किल्ल्यापाठीमागून किल्ला पडूं लागला. शेवटीं ज्यू शरण आले. ज्यूंना त्यांची शेतीवाडी, घरदार सारें ठेवलें गेलें. त्यांचं धार्मिक स्वातंत्र्यहि राखण्यांत आलें. परंतु अतःपर त्यांचें रक्षण मुस्लिम सत्ता करणार, यासाठी ज्यूंनीं कर द्यावे असें ठरलें. ज्यूंची जंगम मालमत्ता तेवढी घेण्यांत आली. ती मुसलमानांत वांटली गेली. घोडेस्वारास तीन भाग तर पायदळ शिपायास एक भाग याप्रमाणे सर्वांस भाग दिला गेला. याच वेळेस एका ज्यू स्त्रीनें मुहंमदांस विष चारण्याचा प्रयत्न केला होता. मुहंमदांचा एक अनुयायी मेलाच. परंतु मुहंमद वांचले. त्यांच्या शरीरावर विषाचा परिणाम झाला. या वेळेपासून त्यांची प्रकृति बिघडली. आणि नेहमी त्रास होत असे. मुहंमदांनीं या स्त्रीस क्षमा केली. तिच्या लोकांत तिला सुखरूप राहूं दिलें.

回 回 回





हिजरीचें सातवें वर्ष संपत आले. आदल्या वर्षी ठरल्याप्रमाणें मुहंमद मक्केला जावयास निघाले. या यात्रेला 'उमरतुलकझा'- धन्यतेची यात्रा असें नांव आहे. इ.स. ६२९ चा मार्च महिना होता. पैगंबरांच्या संगें दोन हजार अनुयायी होते. यात्रेचे सर्व विधि ते करणार होते. ही छोटी यात्रा होती. कुरेशांनी एक शब्दहि बोलायचा नाहीं असें ठरविलें होतें. कुरेश तीन दिवस शहर सोडून गेले. आसपासच्या डोंगरांवरून व टेकड्यांवरून ते सारे पहात होते. तो देखावा मोठा अपूर्व होता! जगाच्या इतिहासांतील तें अपूर्व हृदय होते. शहरांतील घरांत कोणी नव्हतें. शहरांतले बाहेर पडत होते व बाहेरचे शहरांत शिरत होते. आपली जुनी घरेदारे आलेले लोक पहात होते. त्यांनी यात्रेचे विधि केले. सर्वांनी नमाज केला. मक्केचे रहिवाशी बाहेर तंबूतून होते. मदिनेहून आलेल्या या मातृभक्तांकडे ते पहात होते. मुहंमद व त्यांचे अनुयायी यांनी काबाला प्रदक्षिणा घातल्या. अस्सफा व मर्वा यांचीहि यात्रा करण्यांत आली. या आलेल्या यात्रेकरूंत आपले मित्र, आप्तेष्ट वगैरे दिसतात का तें मक्केवाले वरून पहात होते. ज्या वेदनांनी इस्लामला जन्म दिला त्यांमुळे हा प्रसंग शक्य झाला. आणि तीन दिवस झाले. यात्रेकरू शांतपणे निघून गेले. मुहंमदांच्या या शांतिपूर्वक वचनपालनाचा फार परिणाम झाला. कुरेशांपैकीं पुष्कळच नवधर्माचे होऊं लागले. मुहंमदांची क्षमा, सत्यता, उदात्त स्वभाव यांमुळे मक्कावाले दिपले. मोठेमोठे प्रतिष्ठित विरोधकहि विरोध विसरून उपासक बनूं लागले.
 परंतु कुरेश व त्यांचे साथीदार यांनी दहा वर्षेपर्यंत शांतीनें रहावयाचे असा केलेला करार मोडला. मुहंमदांच्या संरक्षणाखाली असलेल्या बनी खुझाआ या जमातीवर त्यांनी हल्ला चढविला. पुष्कळ खुझाआंची त्यांनी कत्तल केली. ते मुहंमदांकडे गाऱ्हाणे घेऊन आले. न्याय द्या म्हणाले. तिकडे मक्केतहि अन्याय जोरजुलूम सुरू झाला होता. मक्कावाल्यांनीं हुदैबियाच्या कराराच्या त्या अटी मोडल्या. प्रमुख कुरेशांनीं खुझाआंच्या कत्तलींत भाग घेतला होता.
 मुहंमदांस या गोष्टीची क्षमा करणे अशक्य होते. एकदां सोक्षमोक्ष करायचे त्यांनीं ठरविलें. दहा हजारांची सेना घेऊन मुहंमद मक्केवर निघाले. कुरेशहि आले. झटापटी सुरू झाल्या. परंतु मक्कावाल्यांनीं फार विरोध केला नाहीं. पुष्कळ लोक कुरेशांच्या विरुद्ध झाले होते. पुष्कळांना या यादवीचा वीट आला होता. मुहंमदांचा जवळ जवळ बिनविरोधच मक्केत विजयप्रवेश झाला. ज्या मक्केतून ते निराधार व अगतिक होऊन निघून गेले होते त्या मक्केत आज विजयी महान् वीराप्रमाणें ते शिरले!
 आणि मक्का हातीं घेतल्यावर त्यांनीं का सूड घेतला? कत्तली केल्या? नाहीं. क्षमेचं उदात्त व अद्वितीय स्वरूप त्यांनी दाखविलें जें शहर मुहंमदांच्या व त्यांच्या अनुयायांच्या जिवावर उठलेले असे ते शहर आज त्यांच्या चरणीं नमलें होतें. ज्यांनी पूर्वी माणुसकीस काळिमा लावणारी निर्दय कृत्ये केली ते सारे मुहंमदांसमोर होते. परंतु या विजयाच्या क्षणीं मुहंमद सारे विसरून गेले. ते क्षमा करते झाले. सर्व मक्कावाल्यांस सार्वजनिक माफी जाहीर करण्यांत आली. फक्त चार जणांस शिक्षा देण्यांत आली. सारे सैन्य शांतपणे शहरांत शिरलें. लुटालूट नाहीं. कांहीं नाहीं. स्त्रीचा कोठें अपमान नाहीं. जगाच्या इतिहासांत असा विजयप्रवेश क्वचितच सांपडेल!
 मक्कावाल्यांस त्रास दिला गेला नाहीं. परंतु त्यांच्या त्या मूर्तीनां त्रास झाला. जुने मूर्तिपूजक आपल्या मूर्तीचा भंग शांतपणे पहात होते. त्या सर्व मूर्ति मुहंमदांनीं स्वतःच्या हातांनी फोडून टाकल्या! प्रत्येक मूर्तीसमोर मुंहमद उभे रहात व म्हणत "सत्य आले आहे. असत्य नष्ट होत आहे." असें म्हणत व मूर्ति फोडीत. अशा रीतीनें सर्व मूर्ति भंगून सारे जुने धर्मकांड रद्द करून जमलेल्या सर्वांना उद्देशून त्यांनी भाषण केलें. कुराणांतील ममानवांच्या ऐक्याचे मंत्र त्यांनी प्रथ म्हटले. नंतर भाषण झाले. भाषणानंतर कुरेशांना त्यांनी विचारिलें.
 "मी तुमच्याशी कसें वागावें असें तुम्हांस वाटतें?"
 "दयेनें व प्रेमानें. सहानुभूतीनें व अनुकंपेनें." ते म्हणाले. आणि मुहंमदांस "हे प्रेमळ व दयाळु भावा, हे प्रेमळ व मायाळू पुतण्या" अशा त्यांनीं हांका मारल्या. मुहंमदांस गहिंवर आला. ज्यांनी द्वेषमत्सराची आग पाखडली तेच आज मुहंमदांस प्रेमाने संबोधित होते. पैगंबरांच्या डोळ्यांतून अश्रु आले व ते म्हणाले, "जोसेफ आपल्या भावांस म्हणाला तसेंच मीहि म्हणतो. तुम्हांला मी नांवें ठेवित नाहीं. ईश्वर तुम्हांला क्षमा करील. तो अत्यंत दयालु आहे. कृपासागर आहे. रहिमवाला मेहेरबान आहे." (कुराण सुरा १२:३१).
 या क्षमेचा व दयेचा परिणाम अपरंपार झाला. भराभरा लोक येऊ लागले. नवधर्म घेते झाले. सफा टेकडीवर मुहंमद बसत. जे येत त्यांच्याजवळून मागें मदिनावाल्यांजवळून आरंभी जशी शपथ घेतली होती तशी घेत.
 "ईश्वर एक आहे, अद्वितीय आहे. त्याच्याशीं दुसरेंतिसरें मी मिसळणार नाहीं. व्यभिचार करणार नाहीं. बालहत्त्या करणार नाहीं. असत्य बोलणार नाहीं. स्त्रियांविषयीं अनुदार व असभ्य बोलणार नाहीं."
 पैगंबरांचं अंतःकरण उचंबळून येत होते. जीवनकार्य सफळ होत होतं. कुराणांत म्हटले आहे, "ईश्वराची मदत मिळेल. जय होईल. प्रभूच्या धर्मांत हजारों येऊ लागतील. त्या वेळेस ईश्वराची स्तुति कर. त्याची क्षमा माग. जे ईश्वराकडे वळतात. त्यांच्यावर त्याची करुणा वळते. त्याचं प्रेम वळतें." आणि मुहंमद ईश्वराची स्तुति करित होते.
 मुहंमदांचं जीवनकार्य पुरें होत होते. त्यांनी अरबस्थानांत सर्वत्र प्रचारक पाठविले. शांतीचे, सदिच्छेचे दूत पाठविले. ते सर्वांना सांगत, "आत्मरक्षणार्थच शस्त्र उचलीत जा." पूर्वीचा शत्रु खालिद बीन वलीद आतां इस्लामी धर्माचा कट्टा पुरस्कर्ता झाला होता. त्यानें कांहीं विरोधी बेदुइनांची कत्तल केली. मुहंमदांस हें कळलें तेव्हां त्यांना फार वाईट वाटले. ते म्हणाले, "प्रभो, खालिदनें केलें त्याचा दोष माझ्याकडे नाही हो. मी नव्हतें हो असें सांगितलें. मी निष्पाप, निरपराध आहे." आणि त्यांनी अलीला बनी जझीया जमातीकडे नुकसानभरपाई करण्यासाठी एकदम पाठविलें. अलींनीं, किती मारले गेले होते त्याची नीट चौकशी केली व दियत- नुकसानभरपाई दिली. नुकसानभरपाई केल्यावरहि आणलेल्या पैशांतील कांहीं रक्कम शिल्लक राहिली. तीहि मृतांच्या आप्तेष्ट मित्रांना त्यांनी वांटून दिली. अलींनी आपल्या सौम्य, स्निग्ध व उदार वर्तनाने सर्वांची हृदयें वश करून घेतली. सारे प्रसन्न झाले. सर्वांचे आशीर्वाद व धन्यवाद घेऊन अली परत आले. मुहंमदांनी त्यांचे कौतुक केलें.
 कांहीं बेदुइन जमातींनीं मुहंमदोविरुद्ध मोठी संघटना चालविली. परंतु मुंहंमद सावध होते. मक्केच्या ईशान्येस हुनैन घळीजवळ लढायी झाली. बेदुइनांचा पराजय झाला. ज्या तायेफ शहरांतून नऊ वर्षांपूर्वी दगडधोंडे मारून मुहंमदांस हांकलून देण्यांत आलें होतें त्या शहरांत शत्रु शिरले. परंतु शत्रूंचीं कुटुंबे मुहंमदांच्या हातीं होतीं. वेढा उठवून जेथं ह्रीं कुटुंबे होतीं तेथें मुहंमद आले. नंतर पकडलेल्यांतील कांहीं कैदी म्हणाले, "आमचीं बायकामाणसें मुलेबाळें आम्हांला परत द्या." मुहंमद आपल्या अनुयायांची मनोवृत्ति जाणत होते, अरब मनोवृत्ति जाणत होते. ते म्हणाले, "विजयाची सारीच फळें आम्ही कशीं गमवायची? खांहीं तरी तुम्ही दिलेच पाहिजे." ते कैदी म्हणाले, "बरें तर."
 दुसऱ्या दिवशीं मुहंमद आपल्या अनुयायांसह दुपारची प्रार्थना करीत होते. आणि त्या वेळेस कैद्यांचे कांहीं प्रतिनिधि आले व म्हणाले, "आमची मुहंमदांस प्रार्थना आहे कीं, त्यांनी आपल्या अनुयायांजवळ आमच्याविषयीं रदबदली करावी. मुसलमान अनुयायांसहि आमची प्रार्थना कीं त्यांनी पैगंबरांस दया करण्यास सांगावें."
 त्या प्रतिनिधीस मुहंमद एकदम म्हणाले, "माझ्या वांट्यास आलेले कैदी मी परत करतो. तसेंच अबदुल मुत्तलिबांच्या घराण्यांतील मंडळींच्या वांटणीस आलेले कैदी मी परत करतो."
 ती प्रार्थनेची पवित्र वेळ होती. मुहंमदांनीं आपल्या घराण्यांतील मंडळींच्या वांट्यास आलेले कैदी मुक्त करतांच इतरांसहि स्फूर्ति आली. प्रत्येकजण म्हणू लागला, "माझ्या वांटणीचे कैदी मी देतो." आणि सारे कैदी मुक्त झाले. स्त्रिया, मुले गुलाम होण्याऐवजीं मुक्त झाली! मुहंमदांनी सक्ति केली नाहीं. स्वतःच्या उदाहरणानें ते शिकवीत होते. सहा हजार माणसें त्या वेळेस मुक्त झाली!
 या करुणेनें, या अपरंपार औदार्याने बेदुइन विरघळले. ते सारे मित्र बनले. लढाईने जें झालें नाहीं ते त्या निरपेक्ष करुणेनें झालें. त्या सर्वांनी नवधर्म घेतला.
 लुटीतील भाग मक्केतील ज्यांनी नवधर्म घेतला होता त्यांना मुहंमद जरा अधिक देत. नवीन झाडाला अधिक पाणी घालावें लागतें, त्याची अधिक काळजी. परंतु मदिनेंतील अन्सार यामुळे जरा नाखुष होत. त्यांना हा पक्षपात वाटे. "वास्तविक निराधार मुहंमदांस मदिनेनें आधार दिला म्हणून अन्सार असें आम्हांला नांवहि पडलें. परंतु मुहंमदांचा मक्केवरच लोभ!" अन्सार नाखूष आहेत ही गोष्ट मुहंमदांच्या कानांवर गेली. त्यांनी सर्वांना जमा केले व म्हटलें, "अन्सार बंधूंनों, तुमचे बोलणें माझ्या कानांवर आले आहे. तुमच्या मदिना शहरांत मी आलों त्या वेळेस तुम्ही अज्ञानांत होता. ईश्वरानें तुम्हांस योग्य दिशा दाखविली. तुम्ही कष्ट भोगीत होता. प्रभूनें तुम्हांस सुखी केलें. तुमचीं आपसांत वैरें होतीं. परंतु ती गेलीं. आणि तुमचीं हृदयें बंधु प्रेमाने भरून आली. खरे आहे कीं नाहीं सांगा."
 "होय पैगंबर. तुम्ही म्हणतां हें खरें आहे. पैगंबरांची ही कृपा आहे. त्यांची ही उदारता आहे." ते म्हणाले.
 "कां, असें कां म्हणतां? असें कां बरें उत्तर देतां? असें उत्तर देण्याऐवजी तुम्ही असें म्हटलें पाहिजे होतें, 'आमच्या नगरीत तूं एक उपटसुंभ आलास. परंतु आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेविली. निराधार, अगतिक असा तूं आलास. आम्ही तुला आधार दिला. दरिद्री व परित्यक्त असा तूं आलास. आम्ही तुला घर दिले. अशान्त व दु:खी कष्टी असा आलास. आम्ही सांत्वन केलें." असें कां नाहीं म्हणत? अरे अन्सारांनो, तुम्ही असे म्हटलेत तर त्यांत का कांहीं गैर आहे, वावगे आहे? तें खरेंच आहे. मीहि साक्ष दिली असती कीं, तुमचें हें म्हणणे खरें आहे. परंतु असें उत्तर न देतां तुम्ही मघांचं उत्तर दिलं. हें पहा, अन्सार मित्रांनो, ऐहिक वस्तूंसाठी हृदयांत आसक्ति कशाला? ऐहिक वस्तूंसाठीं हृदयें अशान्त नका होऊ देऊ. उंट, गुरेढोरें, शेळ्या, मेंढ्या मिळू देत दुसऱ्यांना. तुमच्याबरोबर मदिनेंत मी येणार आहे. तुम्हांला मी पाहिजे का शेळ्यामेंढ्या? ज्या परमेश्वराच्या हातीं माझें जीवन आहे त्याची शपथ घेऊन मी सांगतों कीं, मी तुम्हांला कधींहि सोडणार नाहीं. सारें जग एका बाजूला गेलें व अन्सार दुसऱ्या बाजूला गेले तरी मी अन्सारांच्या बाजूने उभा राहीन. प्रभूची तुमच्यावर मेहेरबानगी असो. तुम्हांला, तुमच्या पुत्रपौत्रांना त्याचा आशीर्वाद असो. प्रभु तुम्हांला सदैव सुखांत ठेवो."
 पैगंबरांची वाणी ऐकून अन्सार रडले. त्यांच्या दाढीवरून अश्रुधारा घळघळल्या. ते सारे एका आवाजाने म्हणाले, "पैगंबर, आमच्या वांट्यानें आम्ही खूष आहोत." आणि ते सुखी व समाधानी झाले. या प्रसंगानंतर लौकरच मुहंमद अन्सारांसह मदिनेस परत गेले.

回 回 回





आतां हिजराचे नववें वर्ष सुरू झालें. जी अनेक शिष्टमंडळें पैगंबरांना भेटायला आलीं, जे अनेक वकील भेटायला आले, त्यांसाठीं हे वर्ष प्रसिद्ध आहे. अरबस्थानचा नवजन्म झाला होता. ढग गेले. धुकें गेलें. विचारांचा, नीतीचा, न्यायाचा, सद्धधर्माचा नवसूर्य स्वच्छ प्रकाश देत होता. रानवटपणाची रात्र संपली. अज्ञान संपलें. नवयुग आलें. मक्का घेतल्यामुळे अरबस्थानांतील मूर्तिपूजेचा अन्त झाला. मनात, लात, उझ्झा वगैरे देवदेवतांची पूजा करणारे, मक्का पडल्यावर निराश झाले. मक्का शरण गेल्याची वार्ता सर्वत्र गेली. त्या गोष्टीचा मोठाच नैतिक परिणाम झाला. वाळवंटांतील बेदुइनांचीं शिष्टमंडळे येऊं लागली. या येणाऱ्या पाहुण्यांची मदिनेंतील प्रमुख गृहस्थांकडे व्यवस्था करण्यांत येई. मुहंमद सर्वांना अत्यंत आदराने वागवीत. आलेले जायला निघाले कीं, त्यांना भरपूर वाटखर्ची देत. कांहीं भेट देत. नजराणे देत. त्या त्या जातिजमातींच्या हक्कांचे रक्षण ज्यांत आहे असा करार होई. नवधर्म शिकविण्यासाठीं मुहंमद प्रचारक देत. मुहंमदांचे शहाणपण, सौजन्य, आतिथ्य वगैरे गुणांमुळे येणारा प्रसन्न होई. तो नवधर्म घेई एवढेच नव्हे तर त्याचा प्रसारक बने.
 एकदां पैगंबरांकडे एक गृहस्थ आला व म्हणाला,
 "तुमच्यांतील अब्दुल मुत्तलिबाचा मुलगा कोण?"
 "मीच." मुहंमद म्हणाले.
 "कांहीं प्रश्न विचारूं?"
 "विचारा."
 "आम्हां लोकांत ईश्वरानें तुम्हांला पैगंबर म्हणून का पाठवले आहे?"
 "हो. ईश्वराने पाठवले."
 "त्या एका ईश्वराचीच फक्त पूजा करा. त्या एका ईश्वराशीं दुसरें जोडूं नका. पूर्वजांच्या मूर्ति सोडा. असा तुम्ही उपदेश केला का?"
 "हो. अल्लानें असें सांगितले आहे."
 यानंतर प्रार्थना, उपवास, यात्रा वगैरे सर्व गोष्टींविषयीं विचारल्यानंतर तो गृहस्थ म्हणाला, "मीहि तुमच्या धर्माचा होतो. शपथेवर सांगतों कीं, एका अल्लाशिवाय कोणी देव नाहीं. मुहंमद त्याचा पैगंबर आहे. मी सारे नियम पाळीन. जे निषिद्ध आहे ते टाळीन. जे तुम्ही सांगितलेत त्यांतील कांहीं गाळणार नाहीं, कांहीं त्यांत नवीन घालणार नाहीं."
 अशा रीतीनें प्रबळ व सुसंघटित अरब राष्ट्र निर्माण होत होतें. परंतु या वेळेस एक बाहेरचें संकट आले. एके काळी अरबस्थान जिंकुं असें रोमन सम्राट म्हणत असत. आतां बायझंटाईन सम्राट पुन्हां तींच स्वप्ने खेळवूं लागले. पर्शियावर विजय मिळवून हिरॅक्लिअस नुकताच आला होता. मुहंमदांनी वकील पाठविला होता. त्याचा खून झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठीं तीन हजार अरब फौज गेली. परंतु मांडलिक राजाचे कृत्य साम्राज्यसत्तेनें उचलून धरलें. मांडलिकाच्या सैन्यास मिळण्यासाठीं साम्राज्यसेनाहि आली. त्या लढाईत मूठभर अरबांनी बायझंटाईन सैन्य पिटाळून लाविलें होतं. तो अपमान हिरॅक्लिअस विसरला नव्हता. अरबस्थानावर प्रचंड चढायी करण्यासाठी मोठ्या सैन्याची जमवाजमव त्याने चालविली होती. याच वेळेस हिजाज व नज्द भागांत मोठा दुष्काळ पडला. खजुरीचेंहि पीक नव्हतें. गुरेढोरें मरत होती. अशा वेळेस घरें-दारें सोडून लढायीसाठी जावयास लोक तयार नव्हते. लढायीला योग्य अशी वेळहि नव्हती. उन्हाळा फार कडक होता. प्रवासाचे कष्ट फार पडले असते. बायझंटाईन सैन्याविषयहि अतिशयोक्तिपूर्ण गप्पा पसरल्या होत्या. पुष्कळांनी आम्हांस नका नेऊं असें सांगितले. जे अशक्त होते, अधिक दरिद्री होते, ज्यांनी घरदार सोडून जाणें बरें नव्हते त्यांचे अर्ज मंजूर करण्यांत आले. या लोकांना रडणारे 'अल-बक्काऊन' असें नांव पडलें आहे. या वेळेस मदिनेंतील तो चिर असंतुष्ट मुनाफिकीनांचा पक्ष त्यानेंहि असंतोष पसरविण्यास कमी केलें नाहीं. परंतु जे निष्ठावंत होते ते निघाले. त्यांच्यामुळे इतरांसहि स्फूर्ति आली. भ्याडहि झुंजार होऊन उठले. मोहिमेच्या खर्चासाठीं देणग्याहि देऊं लागले. अबुबकर यांनी जवळचें सारें दिलें. उस्मानने स्वतःच्या खर्चाने एक मोठी तुकडी तयार केली. दुसरेहि प्रमुख लोक असें करूं लागले. स्त्रियांनी जडजवाहीर दिले, दागदागिने दिले. "देशासाठी घ्या हें सारें." त्या म्हणाल्या. सैन्य निघाले. बरोबर स्वतः पैगंबर होते. या सैन्याला 'जैश-उल-उस्र' म्हणजे दुःखीकष्टी सैन्य असें नांव आहे. आपद्-ग्रस्त सैन्य! मदिनेचा कारभार पैगंबरांनी अलींवर सोपविला होता. मुहंमदांबरोबर अबदुल्ला इब्न उबय हाहि मुनाफिकीनांसह निघाला होता. परंतु वाटेंतून तो निमूटपणे मदिनेस परत आला. मदिनेत त्याने अशा कंड्या पिकविल्या कीं "पैगंबर पहा कसे आहेत ते. ही मोहीम धोक्याची होती. म्हणून त्यांनी अलींना मात्र बरोबर नेलें नाहीं." अलींना यामुळे वाईट वाटलें. ते सशस्त्र होऊन निघाले व पैगंबरांस गांठते झाले. पैगंबर त्याला म्हणाले, म्हणणारे कांही म्हणोत. तो नीच आरोप आहे. मी तुला खलिफा नेमले आहे. माझ्या ऐवजी नेमले आहे. जा. आपल्या जागी जा. माझ्या व तुझ्या लोकांवर माझा प्रतिनिधि म्हणून रहा. अली मूसाला जसा हारून तसा तूं मला हो. जा." आणि अली परत गेले. आपल्या पाठीमागून अलीनीं खलिफा व्हावें असें पैगंबरांचं मत होतें असें शिया जें म्हणतात ते याच प्रसंगावरून.
 सैन्य जात होतें. मदिना व दमास्कस यांच्या मध्यावर पोचलें होतें. तो कळले की शत्रु येत नाहीं. ते ग्रीकसम्राटांचे केवळ स्वप्न होतें. मुहंमदांनी सैन्यास परतण्याचा हुकूम दिला. तबूक येथे वीस दिवस त्यांनी मुक्काम केला. तेथें दाणा-पाणी भरपूर होते. मुहंमद येतात तो तायफ येथील शिष्टमंडळ आलें. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी पैगंबरांस दगडधोंडे मारून घालविलें होतें. त्यांच्या प्रमुखाचें नांव औरवा. पैगंबरांच्या उपदेशाचा त्याच्या मनावर फार परिणाम झाला होता. हुदैबियाच्या करारानंतर तीन दिवस मुहंमद मक्केंत आले होते त्या वेळेस तायेफ येथील जमातींचा कुरेशांकडे तो वकील होता. तो तायेफमधील लोकांना मूर्तिपूजेविरुद्ध सांगूं लागला. नवीन धर्माचा आशीर्वाद घेण्यास चला म्हणूं लागला. उपाध्यायांनीं व पुजाऱ्यांनी त्याला दगड मारले. आणि तो मरणोन्मुख होऊन पडला. मरतां मरतां म्हणाला, "पैंगबरांसाठीं मी माझें रक्त दिलें. जनतेच्या कल्याणासाठी मी माझें रक्त ईश्वराला देत आहें. बलिदान करण्याचा मान मला ईश्वराने दिला म्हणून त्याचे आभार !" शेवटी म्हणाला, "हुनैनच्या घळींत लढतांना जे मुसलमान मेले, त्यांच्या कबरांजवळच मलाहि पुरा."
 औरवाच्या जिवंतपणीच्या प्रवचनांचा परिणाम झाला नाहीं, परंतु या आसन्न-मरण प्रवचनाचा त्याच्या लोकांवर परिणाम झाला. त्यांनीं मुहंमदांकडे शिष्टमंडळ पाठविलें. वाळवंटांतील कधीं न संपणाऱ्या युद्धांचा त्यांनाहि कंटाळा आला असेल. शिष्टमंडळ आले व पैगंबरांस म्हणाले, "आम्हांस क्षमा करा व इस्लामच्या गोटांत घ्या." पुन्हां म्हणाले, "आमच्या मूर्ति मात्र कांहीं दिवस राहूं देत." प्रथम म्हणाले, "दोन वर्षे." नंतर म्हणाले, "एक वर्ष." पुन्हां म्हणाले, "सहा महिने, निशन एक महिना तरी."
 परंतु मुहंमद या गोष्टीवर कधींच तडजोड करायला तयार नसत. ते म्हणाले, "इस्लाम व या मूर्ति एक क्षणभरहि एकत्र राहू शकणार नाहींत."
 मग ते म्हणाले, "आम्हांला रोजच्या प्रार्थनेची तरी सक्ति नका करूं," पैगंबर म्हणाले, "प्रार्थनेशिवाय धर्म म्हणजे शून्य!"
 शेवटी त्यांनीं सारे कबूल केलें. फक्त स्वतःच्या हातांनी मूर्ति फोडणें त्यांनी नाकारलें. अब सुफियान व मुघीरा यांना ते काम देण्यांत आलें. तायेफमधील मायाबाया हायहाय म्हणत होत्या व मूर्ति फुटत होत्या!
 या वर्षी यमन, महर, ओमान, बहरैन, यमामा वगैरे ठिकाणचींहि शिष्टमंडळे आली. एक ताई नांवाची जमात अद्याप त्रास देत होती. प्रख्यात हातिम- ताईचा मुलगा 'अदि' तो त्यांचा पुढारी होता. अली त्यांच्यावर सैन्य घेऊन गले. अदि सीरियांत पळाला. इतरांना कैद करण्यांत आलें. त्यांत अदीची बहीणहि होती. सर्वांना सइस्लामी संस्कृति । १२९न्मानानें मदिना येथे आणण्यांत आलें. पैगंबरांनी सर्वांना स्वतंत्र केले. त्यांना देणग्या दिल्या. अदीची बहीण सीरियांत त्याच्याकडे पाठविण्यांत आली. तिनें आपल्या भावास मुहंमदांच्या उदात्त वर्तनाविषयीं सांगितले. अदीचं हृदय कृतज्ञतेने भरून आले. तो मुहंमदांच्या चरणांशी आला व इस्लामचा स्वीकार करता झाला.
 हातीमच्या मुलीचें नांव सुफाना असें होतें. ती पैगंबरांस म्हणाली : "हे परमेश्वराच्या प्रेषिता, माझा बाप आज जिवंत नाहीं. मला एकच भाऊ परंतु तोहि आज दऱ्याखोऱ्यांत पळून गेला आहे. मी स्वतः खंडणी भरून मुक्त होऊं शकत नाहीं. तूं उदार हृदयाचा आहेस. मला स्वतंत्र कर. माझा पिता विश्वविख्यात होता. तो आमच्या जमातीचा नेता होता, राजा होता. तो कैद्यांची खंडणी भरून त्यांना मुक्त करीत असे. तो स्त्रियांची अब्रू सांभाळी, त्यांची प्रतिष्ठा राखी. तो गरिबांना पोषी, दुःखितांना शांतवी. कोणी कांहीं मागितले तर त्याने कधीं नाहीं म्हटलें नाहीं. अशा त्या हातिमची मी मुलगी. सुफाना माझें नांव. मला तूं मुक्त नाहीं करणार? माझ्या लोकांस मुक्त नाहीं करणार? तुझ्या उदार हृदयाला मी प्रार्थिते उदार अशा तुझ्या आत्म्याला हांक मारून विनवितें."
 पैगंबर म्हणाले, "तुझ्या पित्याच्या अंगीं खऱ्या मुसलमानाचे गुण होते. मूर्तिपूजक असूनहि त्यावर ईश्वराची कृपा व्हावी म्हणून प्रार्थना करण्याची जर मला परवानगी मिळाली तर मी हातिमांच्यासाठी प्रार्थना करीन." नंतर सभोंवतींच्या मुसलमानांस उद्देशून ते म्हणाले, "हातिमांची मुलगी मुक्त आहे. तिचा बाप उदारांचा राणा होता. माणुसकीची मूर्ति होता. जे दयावंत असतात त्यांच्यावर प्रभु प्रेम करतो. ते देवाचे लाडके होतात. ईश्वर त्यांना बक्षीस देतो."
 सुफाना मुक्त झाली. सारेच मुक्त करण्यांत आले. मुहंमदांनी सर्वांना देणग्या दिल्या. ते सारे नवधर्म घेते झाले. सुफाना सीरियांत भावाकडे गेली व त्याला मुहंमदांचं औदार्य सांगती झाली. अदीचं हृदय कृतज्ञतेने भरून आलें. तो मदिनेला आला. मुहंमदांच्या चरणीं लागला. इस्लाम स्वीकारता झाला. सुफानाच्या या प्रसंगावर इराणी कविराज सादी याच्या बोस्ताँमध्यें सुंदर कविता आहेत. उदात्त असाच तो प्रसंग होता. जीवनांतील महान् काव्य त्या प्रसंगीं प्रकट झालें होतें.
 दुसरी एक मोझेना नांवाची जमात होती. या जमातीचा काब इब्न सुहेर हा प्रसिद्ध कवि होता. हा मुहंमदांचा व नवधर्माचा शत्रु होता. उपहास व टिंगल करी. परंतु त्याचा भाऊ मुस्लिम झाला होता. हा मुस्लिमभाऊ काबला नेहमी म्हणे, "तूंहि मुसलमान हो. वितुष्टें वाढवूं नको. काव्यशक्ति द्वेष पसरवण्यांत खर्चू नकोस. खऱ्या धर्माची निंदा नको करूस." एकदां काब गुप्तपणें मदिनेंत आला. ज्या मशिदींत पैगंबर प्रवचन करीत होते तेथें तो गेला. पैगंबरांच्या भोंवतीं भक्तिप्रेमानें श्रोते बसले होते, उपदेशामृत पीत होते. हेच ते पैगंबर असें काबने ओळखले. तो एकदम पुढे हसून म्हणाला : "पैगंबराच्या प्रेषिता, तुझा तिरस्कार करणारा कवि काब मुसलमान होऊन जर तुझ्यासमोर येऊन उभा राहिला तर तूं त्याला क्षमा करशील?"
 "हो करीन." पैगंबर म्हणाले.
 "तर मग मीच तो काब!"
 मुहंमदांच्या जवळचे लोक त्याच्या अंगावर एकदम धांवले. परंतु पैगंबरांनी सर्वांना शांत केले. ते म्हणाले, "मी त्याला क्षमा केली आहे. त्याच्या केसालाहि धक्का लागतां कामा नये." काबचे कविहृदय उचंबळले. त्याने विचारलें, "पैगंबर, मी एक कसीदा म्हणूं, पवित्र सुंदर काव्य म्हणूं?" पैगंबर कवींना उत्तेजन देत नसत. परंतु या वेळेस त्यांनी परवानगी दिली. काबने स्वतःची एक कविता म्हटली. अरबी भाषेतील ती उत्कृष्ट कविता आहे. तें एक प्रेमगीत होते.
 कवि आपली प्रियकरीण जी सुआद तिच्या वियोगाची दुःखकथा सांगत आहे. "माझी प्रिया मला सोडून गेली. माझें हृदय जळत आहे, झुरत आहे, मी दुःखी कष्टी आहें. अशान्त आहे. कशी आग शमवूं? कसें हृदय शान्त करूं? माझी लाडकी गोड सुआद कोठे आहे ती? तिच्या पाठोपाठ तिचा बंदा बनून मी रानोमाळ भटकत आहें. कोठे आहे ती? कसें अवर्णनीय तिचे सौंदर्य, किती मृदुमंजूळ वाणी, कसा गोड तिचा गळा! सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे तिचें हसणे, प्रसन्न व मोहक स्मित!" अशी कविता चाललेली असते आणि काब एकदम विषयान्तर करतो. तो पूर्वी सुआदसाठी वेडा होता. आतां मुहंमदांसाठी होतो. नवधर्माचा तो महान् कवि होतो. या महान् विषयांत शिरतो व उदात्त काव्य निर्मू लागतो. सारे तन्मय होतात. आणि काव्यांतील परमोच्च शिखर येतें :
 "जगाला प्रकाश देणारी महान् मशाल म्हणजे हे मुहंमद! जगांतील सारे पाप नष्ट करणारी प्रभूची तरवार म्हणजे हे मुहंमद!!"
 हे चरण म्हणतांच व ते ऐकतांच मुहंमद एकदम उठतात व आपला झगा काबच्या अंगावर घालतात! हा झगा काबच्या कुटुंबांत सांभाळण्यांत आला होता. पुढे मुआवियाने चाळीस दिरहमला तो विकत घेतला. पुढे तो झगा अब्बासींच्या हातीं गेला. शेवटीं तुर्की सुलतानांजवळ गेला. या झग्याला 'खिरका-इ शरीफ' पवित्र झगा असे म्हणत. अत्यंत आणीबाणीच्या वेळेस या झग्याचें राष्ट्रीय निशाण करीत. काबने जी कविता म्हटली तिचे नांव 'कसीदे बानत सुआद' असे आहे. कोणी 'कसीदत-उल-बुर्दा' म्हणजे झग्याचे काव्य असेंहि नांव देतात.

回 回 回





जातिजमाती इस्लामी होत होत्या. अरबस्थानांतील विरोध मावळत होते. नवराष्ट्र निर्माण झालें. रक्तपात, सूड, भांडणे बंद पडली. तो उत्साह, तें शौर्य आतां धर्माकडे वळली. अजून काबाच्या मंदिरांत जे मूर्तिपूजक होते त्यांच्याविरुद्ध पैगंबरांनी फर्मान काढले नव्हते. ते लोक जुने परंपरागत धर्मविधि अद्याप करीतच होते. परंतु अतःपर या जुन्या गोंधळास आळा घालण्याचें मुहंमदांनी ठरविलें. अद्याप जे नवधर्मात अंतःकरणपूर्वक सामील झाले नव्हते, त्यांची मनें पुन्हां मूर्तिपूजेकडे वळू नयेत म्हणून सारे जुने अवशेष, खाणाखुणा नष्ट करणें प्राप्त होतें. नवव्या वर्षाच्या यात्रेच्या वेळेस पैगंबरांनी अलीला मक्केत एक शासनपत्र वाचायला सांगितले. मूर्तिपूजेच्या मुळावर घाव घालणारे ते फर्मान होतें. मूर्तिपूजेसंबंधींच्या सर्व आचारांवर व विधींवर तो शेवटचा प्रहार होता. पुढें दिल्याप्रमाणें तें फर्मान होतें :
 "अतःपर कोणत्याहि मूर्तिपूजकास या यात्रेत येतां येणार नाहीं. तसेच काबाभोवती ज्या प्रदक्षिणा घालावयाच्या त्या दिगंबर होऊन घालतां कामा नयेत. पैगंबरांजवळ ज्यांचे ज्यांचे करार आहेत ते त्यांना मुदत संपेपर्यंत बंधनकारक आहेत. जे यात्रेकरू येतील त्यांनी चार महिन्यांच्या आंत आपापल्या प्रान्तीं परत जावें. त्या मुदतीनंतर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पैगंबरांवर नाहीं. अर्थात् ज्यांच्या संरक्षणासंबंधी इतर तह व करारनामे असतील त्यांची गोष्ट निराळी."
 या जाहीरनाम्यास 'जबाबदाराची घोषणा' असें नांव आहे. मूर्तिपूजक व हे नवधर्मी जर यात्रेत मिसळू दिले असते तर मुहंमदांचे कार्य पुढे नष्टहि झाले असतें. त्या परंपरागत रूढींचा पगडा पुन्हां बसला असता. ख्रिस्ती व ज्यू धर्मात शिरलेले प्रकार मुहंमदांनी पाहिले होते. त्या धर्मातून मूर्तिपूजेचीं स्वरूपें शिरली. मारामाऱ्या सुरू झाल्या. कत्तली सुरू झाल्या. रूढींचं साम्राज्य पुन्हां बळावलें. तसें होऊं नये म्हणून पैगंबरांनी वर सांगितलेली दूरदर्शी योजना केली. यात्रेकरू नवीन जाहीरनामा ऐकून गेले व उरलेसुरले मूर्तिपूजकहि लौकरच मुसलमान झाले.
 हिजरीचें दहावें वर्ष आले. या दहाव्या वर्षी यमन व हिजाझ या भागांतील उरलेसुरले मुस्लिम झाले. तसेंच हजरामूत व किन्दा वगैरे ठिकाणच्या जाति- जमातीहि मुसलमान झाल्या. अरबस्थानांतून अनेकांची शिष्टमंडळे येत होती. पुढारी येत होते. आपापली निष्ठा प्रकट करीत होते. मुहंमद सर्वत्र प्रचारक पाठवीत होते. एके दिवशी सकाळची प्रार्थना झाल्यावर मुहंमद म्हणाले, "आतां प्रचार हवा. कोणी इकडे जा, कोणी तिकडे जा. सर्वत्र जा. लांब जा, दूर जा. ख्रिस्ताच्या प्रचारकांप्रमाणे नका होऊ. ते जवळच्या लोकांतच प्रचार करते झाले. तुम्ही दूरहि जा. त्या त्या लोकांच्या भाषा शिका. सर्वां जवळ सौम्यतेने वागा. मानवजातीचें काम ज्याच्यावर सोपविलें गेलें तो जर मानवांची सेवा न करील तर ईश्वर स्वर्गाचे दरवाजे त्याला बंद करील! सर्वांजवळ प्रामाणिकपणाने वागा. कोणास फसवू नका. कठोर नका होऊं. लोकांना प्रेरणा द्या, नवोत्साह द्या. त्यांना धिक्कारू नका. ज्यांना पूर्वी ईश्वरी ग्रंथ मिळाले अशा ख्रिस्ती, ज्यू लोकांशीहि तुमच्या गांठी पडतात. ते विचारतील, 'स्वर्गाची किल्ली कशांत आहे?' त्यांना सांगा, 'स्वर्गाची कसोटी ईश्वरी सत्याच्या पालनांत व सत्कर्म करण्यांत आहे.'
 आणि प्रचारक जाऊं लागले. नवीन भाषा शिकूं लागले. एकदां दुसऱ्या लोकांची भाषा शिकून जेव्हां कांहीं प्रचारक आले तेव्हां पैगंबरांस फार आनंद झाला. ते म्हणाले, "अत्यंत थोर कर्तव्यांपैकीं हें एक कर्तव्य तुम्ही बजावलेत. ईश्वराला ज्या गोष्टींसाठीं पैगंबरांमुळे तुम्ही जबाबदार आहांत त्या गोष्टींतील दुसऱ्यांची भाषा शिकणें ही फारच मोठी गोष्ट आहे."
 पैगंबरांचं जीवनकार्य आतां संपले होते. रानटी लोकांतून नव संस्फूर्त असें संघटित राष्ट्र त्यांनीं निर्माण केले. त्यांना ईश्वरी ज्ञान देऊन कृतार्थ केलें, पवित्र केलें. त्यांना धर्मग्रंथ दिला. नाना देवांची उपासना करणारे, रक्तपातांत रंगणारे असे अरब होते. त्यांना 'तो सत्यमय व प्रेममय एक अद्वितीय परमेश्वर भजा' असें ते सांगते झाले. विभक्तांना त्यांनी एकत्र केलें. फाटलेल्या अरबांना जोडलें. बंधुभावाने बांधले. संघटित केले. अनादि काळापासून हें द्वीपकल्प अंधारांत गुडुप होतं. अध्यात्मिक जीवनाचे नांवहि नव्हते. ज्यूंच्या वा ख्रिस्त्यांच्या धर्माचा टिकाऊ परिणाम अरबांवर झाला नव्हता. रूढि, दुष्टता, दुर्गुण यांच्या घाणीत सारे बरबटलेले होते. व्यभिचार होता. लहान मुलींना पुरीत! मोठा मुलगा स्वतःच्या आईशिवाय बापाच्या ज्या इतर बायका असत त्यांना स्वतःच्या बायका करी. थोड्या वर्षांपूर्वी असा हा अरबस्थान होता. परंतु मुहंमदांनी केवढें स्थित्यन्तर केलें! जणुं स्वर्गातील देवदूत खालीं वावरायला आला. ज्यांचीं मनें अर्धवट जंगली होतीं, अशांची मनें भ्रातृभाव व प्रेम यांनीं भरून गेलीं. अरबस्थान नैतिक दृष्ट्याहि ओसाड वाळवंट होते. देवाच्या व माणुसकीच्या सर्व कायद्यांची तेथें पायमल्ली होत होती. परंतु मुहंमदांनी तेथे नैतिक नंदनवन फुलविलें. नीतीचे मळे फुलविले. प्रेमाची फुले फुलविलीं. मूर्तिपूजा व तदनुषंगिक इतर वाईट चाली यांचे निर्मूलन केलें. जो परात्पर प्रभु स्वतःच्या सामर्थ्यानें व प्रेमानें या विश्वाचें नियमन करितो त्या सत्य देवाची जाणीव अरबांना पूर्णपणे आली. मूर्तिपूजेचा संपूर्ण त्याग मुहंमदांनीच करून दाखविला. मुस्लिम धर्मात मूर्तिपूजा कोणत्याहि स्वरूपांत पुन्हां आली नाहीं आणि जी अरब जात केवळ मूर्तिपूजक होती त्यांना संपूर्णपणे केवळ एका ईश्वराला भजणारे मुहंमदांनीं केलें. ही खरोखर अद्भुत व अपूर्व अशी गोष्ट होती.
 पैगंबरांची वाणी अत्यन्त प्रभावी होती. ती दैवी संस्फूर्त वाणी वाटे. परमेश्वराचें अद्वितीयत्व इतक्या उत्कटपणें, तीव्रपणं क्वचितच् कोठें उपदेशिलें गेलें असेल उद्घोषिलें गेलें असेल, अरब अतःपर केवळ ऐहिक दृष्टीचे राहिले नाहींत मरणानंतर अधिक उच्चतर, शुद्धतर व दिव्यतर असें जीवन असतें. त्या मरणोत्तर जीवनासाठी या जीवनांत दया, चांगुलपणा, न्याय, सार्वत्रिक प्रेम जीवनांत दाखविली पाहिजेत, असें पैगंबरांनी शिकविलें. हा जो अमूर्त परमेश्वर तो अनाद्यनन्त आहे. तो विश्वाधार आहे. सर्वशक्तिमान्, प्रेमसिंधु व दयासागर आहे. ही जी नवजागृति आली त्याचं मुहंमद स्फूर्तिस्थान होते. ईश्वराच्या आदेशाने या नवचैतन्याचे ते आत्मा होते, प्राण होते ते! जणुं नव प्रेरणेचे अनंत निर्झर होते. या झऱ्यांतून अरबांच्या शाश्वत आशांचे प्रवाह वहात होते. आणि म्हणून मुहंमदांविषयीं अपार भक्तिभाव ते प्रकट करीत.
 सर्व अरबांची जणुं आतां एकच इच्छा झाली की, त्या परमेश्वराची सत्यानें व पावित्र्यानें सेवा करावी. प्रभूची आशा व इच्छा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून प्रकट करावी. या वीस वर्षांत पैगंबरांनी जें जें सांगितलें, जीं जीं वचने उच्चारिलीं, जें जें मार्गदर्शन केलें, जीं सत्यें दिलीं, तें सारें अरबांच्या हृदयांत जणुं कोरल्यासारखे झालें होतें. त्यांच्या जीवनाची ती श्रुतिस्मृति झाली होती. कायदा व नीति यांचे ऐक्य झालें. सदसद्विवेकबुद्धीसाठी आनंदानें बलिदानें करणारे दिसूं लागले. त्यागाची पराकाष्ठा करणारे शोभुं लागले. जगाला एवढी मोठी जागृति इतक्या तीव्रपणे व उत्कटपणे क्वचितच कोणी दिली असेल. मुहंमदांनीं आपल्या हयातीत आपलें कार्य पुरें केलें. बुद्धाचें काम अशोकानें पुरे केलें. ख्रिस्ताचें कॉन्स्टंटाईननें, झोरा आस्टरचें उरायसनें, इस्त्राएलांचें जोशुआनें. परंतु मुहंमदच एक असे झाले ज्यांनी स्वतःचे व पूर्वी होऊन गेलेल्यांचेहि कार्य पुरें केलें. जणुं सारे काम ईश्वरच करवीत होता, मुहंमद निमित्तमात्र होते, असें मुसलमानांनी म्हटले तर त्यांत काय आश्चर्य? ज्याला काल परवांपर्यंत फत्तर फेंकून मारीत होते, ज्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेंच नऊदहा वर्षांच्या अवधीत आपल्या लोकांना नैतिक अधःपाताच्या दरींतून पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम, सहस्रप्रणाम, त्या महापुरुषाला.

回 回 回





मुहंमदांचें जीवन म्हणजे उदात्ततेचा आदर्श आहे. उदात्त कर्मानीं खच्चून भरलेलें असें हे पुण्यश्लोक जीवन आहे. सुप्त लोकांत त्यांनीं चैतन्याची कळा संचरविली. परस्पर भांडणाऱ्यांस त्यांनी एक केलें. अमर जीवनाच्या आशेनें कर्तव्यकर्म करण्याची त्यांनी प्रेरणा दिली. मानवी हृदयावर इतस्ततः पडलेलें किरण केंद्रीभूत व पुंजीभूत करून त्यांनी प्रचंड प्रकाशाचा झोत निर्माण केला. आणि त्यांचा उत्साह कसा, आशा कशी अदम्य व अमर! थांबणें नाहीं. तडजोडीस वाव नाहीं. अप्रतिहत धैर्यानें हा महापुरुष सारे अडथळे झुगारून पुढेच जात राहिला. त्यांनी परिणामांची दरकार कधींच बाळगिली नाहीं. ईश्वरावर श्रद्धा ठेवून जात होते. एकाच ध्येयाचा त्यांना सदा निदिध्यास. स्वतःचा जणुं संपूर्ण विसर त्यांना पडला होता. ख्रिस्तानें निराकार प्रभूचा धर्म दिला. परंतु त्या धर्मात मेरीची मूर्तिपूजा शिरली. परंतु मूर्तिपूजेत चुस्त गढून गेलेल्या अरबांस या न पढलेल्या फकीराने इतक्या प्रखरतेने ईश्वराची एकता पटविली कीं ती वज्रलेप झाली. ज्यांनीं ज्यांनी म्हणून पैगंबरांची वाणी एकदां ऐकिली, त्यांच्या मनावर ईश्वराचें अद्वितीयत्व व मानवी बंधुभाव यांचा वज्रप्राय ठसा उमटल्याशिवाय रहात नसे.
 मुहंमद समानतेचे व लोकसत्तेचे भोक्ते होते. त्यांच्या लोकसत्तेच्या गर्जनेनें, राजेमहाराजे व धर्मोपदेशक गडबडून गेले. मानवी बुद्धीनें बंड करावें म्हणून तो इषारा होता. त्यावेळेस जुलमी संस्था व भांडकुदळ पंथ यांचा बुजबुजाट झाला होता. दुर्बोध चर्चात मानवी आत्मा गुदमरत होता. आणि मानवी शरीर वतनदारांच्या वर्चस्वाखाली तुडविले जात होतं. परंतु पैगंबर आले. त्यांनी हीं मिरासदारीचीं भिंताडें साफ पाडली. विशिष्ट हक्क त्यांनी नष्ट केले. स्वार्थी लोकांनीं ईश्वराकडे जावयाच्या रस्त्यावर जीं जाळीं विणून ठेविलीं होतीं तीं पैगंबरांनीं आपल्या जोरदार फुंकरीनें नष्ट केली. रस्ता साफ मोकळा झाला. "परमेश्वराजवळ तुम्ही सारे निर्धास्तपणे जा. तेथे सारे समान. तेथें कोणाला जादा अधिकार नाहींत. पैगंबर स्वतः पंडित नव्हते. परंतु ज्ञानविज्ञानाची महती त्यांनी गायिली आहे. मानवी इतिहास लेखणीनें लिहिला जातो. लेखणीनें मानवाचा निवाडा केला जातो. न्याय दिला जातो. मानवी कृत्यांची छाननी करणारें, ईश्वराच्या दृष्टीने छाननी करणारें साधन म्हणजे लेखणी. लेखणी म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय सारें फोल आहे. शिका, वाचा, पहा." असें मुहंमद सांगतात.
 ते बुद्धीवर फार जोर देत. आश्चर्ये, चमत्कार असल्या प्रकारांना ते कधींहि उत्तेजन देत नसत. भोळसरपणा व बावळटपणा त्यांना पसंत नव्हता. ईश्वरी शासनाविषयींची जी त्यांची कल्पना होती ती सर्वांना समान प्रवेश देणारी होती. पैगंबरांचा ईश्वर लोकशाहीचा भोक्ता आहे. तो कोणी हुकुमशहा नाहीं.
 मुहंमदाचे धार्मिक ध्येय व्यापक आहे. त्यांची मानवता साधी व सरळ आहे. या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे मुहंमदांचे पूर्वीच्या धर्माचार्यांपेक्षां विशिष्टत्व दिसतें. ते जणुं अर्वाचीन महर्षि आहेत, असें वाटतें. त्यांचे जीवनकार्य उघडें आहे, स्पस्ष्ट समोर जगाच्यापुढे आहे. त्यांत गूढता नाहीं. असष्टतंत तें लपेटलेलें नाहीं. त्यांच्या व्यक्तित्वाभोंवतीं पुराणं रचिलीं गेलीं नाहींत, दंतकथा गुंफिल्या गेल्या नाहींत.
 आणि अरबस्थानांतील जमातीपाठीमागून जमाती नवधर्माच्या स्वीकारार्थ जसजशा येऊ लागल्या तसें मुहंमदांस वाटू लागलें कीं आपले अवतारकार्यहि समाप्त होण्याची वेळ आली. मक्केची शेवटची यात्रा करून यावें असें त्यांचे मनांत आलें. इ. स. ६३२ च्या फेब्रुवारीच्या २३ तारखेस ते निघाले. त्यांच्या बरोबर लाख दीड लाख यात्रेकरू होते. 'हजत अल-बलाघ' म्हणजे मोठी यात्रा असें हिला नांव आहे. किंवा 'हज्जत-उल-इस्लाम'- इस्लामची यात्रा असे साधे नांवहि आहे. मीनाच्या दरीत यात्रेचे सारे विधि त्यांनी केले. हे विधि उरकण्यापूर्वी ७ मार्च रोजी जबल-उल-अरफात या टेकडीवरून हजारों मुसलमानांसमोर त्यांनी शेवटचे प्रवचन दिलें. मुहंमद एक वाक्य उच्चारित. ते वाक्य खालच्या लोकांत असलेला पुन्हां उच्चारी. त्यावेळेस ध्वनिक्षेपक नव्हते. सर्वांना ऐकूं जावें म्हणून जिवंत ध्वनिक्षेपक उभे केले होते. तें साधे सरळ प्रवचन होतें.
 "बंधूंनो, मी आज सांगतों तें ऐका. कारण आणखी एखादें वर्ष मला लाभेल असें वाटत नाहीं. या जागीं पुन्हां तुमच्यांत मी दिसेन, वावरेन, बोलेन असें वाटत नाहीं. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वांना पवित्र वाटतो, त्याप्रमाणें सर्वांचे जीवन व मालमत्ता पवित्र माना. तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याची वेळ येईपर्यंत असे प्रेमानें व बंधुभावानें वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश नका करूं. एके दिवशीं ईश्वराच्या न्यायासनासमोर उभे रहावयाचें आहे, हे कधींहि विसरू नका. त्या दिवसाची नेहमीं आठवण ठेवा. तेथें सर्व कृत्यांचा झाडा द्यावा लागेल.
 "मित्रांनो, पतीचे पत्नीवर कांही हक्क आहेत, तसेच पत्नीचेहि पतीवर आहेत. आपल्या बायकांना प्रेमानें व सहानुभूतीनें वागवा. कठोर नका होऊ. दयाळु रहा. तुम्ही ईश्वराच्या जामिनकीवर आपल्या पत्नींचा स्वीकार केलेला असतो. खरें ना? परमेश्वराच्या शब्दांनं त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात, ही गोष्ट विसरू नका.

"तसेंच तुमच्यावर कोणी विश्वास टाकला तर विश्वासघात करूं नका. दिला शब्द पाळा. पाप टाळा. सावकारी निषिद्ध आहे, व्याजबट्टा वर्ज्य आहे, हें ध्यानांत धरा. पैसे उसने घेणाऱ्याने घेतले तेवढे परत करावे. व्याज देऊ नये. मुद्दलाची फेड व्हावी. माझ्या मंडळींपासूनच याची अंमलबजावणी सुरू होईल. चुलते अब्बास ऋणकोपासून मुद्दल तेवढेच घेतील.
 "आणि प्राचीन काळापासून तुम्ही जाहिलियत मानीत आलेत. रक्ताचा सूड घेत आलेत. खुनाचा बदला घेत आलेत. परंतु आजपासून तें बंद होत आहे. ही गोष्ट निषिद्ध आहे. इस्लाममान्य नाहीं. आजपासून सारी सूडाची भांडणे रद्द झाली समजा. हारीसाचा मुलगा इब्न रबिया यांचा खून झाला. परंतु त्याचा सूड घेण्यांत येणार नाहीं. माझ्याच आप्तेष्टांपासून हा नवीन नियम सुरू करूं या. (इब्न रबिया लहान असतां दुसऱ्या जमातीच्या ताब्यात संरक्षणार्थ देण्यांत आला होता. परंतु हुझैल जातीनें त्याचा क्रूरपणे वध केला होता. मुहंमदांचा हा चुलतभाऊ होता.) इब्न रबियाच्या या उदाहरणानें आपण नवीन आरंभ करूं या.
 "आणि तुमचे गुलाम. त्यांना नीट वागवा. तुम्ही खाल तेंच त्यांनाहि खायला द्या. तुम्ही कपडे घालाल तसेच त्यांना द्या. अक्षम्य असा अपराध त्यांनी केला तरच त्यांना सोडा. लक्षांत ठेवा की कसेहि झाले तरी तेहि खुदाचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेनें नाहीं वागवतां कामा.
 "मित्रांनो, माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या. सारे मुसलमान एकमेकांचे भाऊ आहेत हें कधींहि विसरू नका. तुमचें सर्वांचें एक जणुं भ्रातृमंडळ, एक तुमचा महान् भ्रातृसंघ. जे दुसऱ्याचें आहे तें त्यानें स्वछेनें खुशीनें दिल्याशिवाय त्याला हात लावू नका. अन्यायापासून व अन्याय करणाऱ्यापासून दूर रहा, सावध रहा.
 "जे येथे आज हजर आहेत त्यांनी हें सारे गैरहजर असणाऱ्यांस सांगावें. येथें ऐकणाऱ्यापेक्षांहि ज्याला सांगितले जाईल तो कदाचित् तें अधिकच लक्षांत ठेवण्याचा संभव आहे."
 असें हें प्रवचन बराच वेळ चाललें होतें. साधें, सरळ, कळकळीचे, वक्तृत्वपूर्ण असें तें प्रवचन होतें. भावनाप्रधान श्रोत्यांचीं अंतःकरणें उचंबळत होतीं, थरारत होतीं. आणि प्रवचन संपल्यावर, पैगंबरांनी पुढील शब्दांनी शेवट केला :
 "प्रभो, मी माझा संदेश दिला. मी माझें कार्य पुरें केलें आहे."
 आणि सभा गर्जती झाली, "खरोखरच तुम्ही आपले कार्य पुरें केलें आहे." पैगंबर पुन्हां अखेर म्हणाले, "प्रभो, माझ्या कामाला तुझीच साक्ष दुसरें मी काय सांगू? हीच माझी प्रार्थना."
 ख्रिस्ताचें पर्वतावरील प्रवचन अधिक काव्यमय वाटते. मुहंमदांचें हे पर्वतोपनिषद् साधे आहे. त्यांत गूढ गहन कांहीं नाहीं. साध्या गोष्टी. परंतु रोजच्या जीवनांतील. घरीदारी कसें वागावें, संसारच सुंदर व सारमय कसा करावा, तें त्यांनी सांगितलें. सर्वसामान्य लोकांस नैतिक मार्गदर्शनार्थ स्पष्ट व सुबोध दिशा हवी असते. ती स्पष्ट दिशा या प्रवचनांत होती.

回 回 回





प्रवचनानंतर यात्रेचे सर्व विधि करून पैंगंबर पुन्हां मदिनेस जाण्यासाठीं निघाले. मदिनेनें त्यांना आधार दिला होता. तेथेंच ते देह ठेवूं इच्छित होते. शेवटचे वर्ष होतें. प्रांतांची व्यवस्था लावण्यांत येत होती. मुस्लिम फेडरेशनमध्ये नवधर्म स्वीकारून ज्या जातिजमाती सामील झाल्या होत्या त्या सर्वांची नीट सुसंघटित व्यवस्था लावण्यांत आली. सीरिया व मेसापोटेमियामधील अरब लोकांत जरी इस्लाम अद्याप पसरला नव्हता तरी अरबस्थानांत बहुतेक सर्वत्र इस्लामच झाला होता. जनतेला इस्लामी धर्माची शिकवण देण्यासाठीं तसेंच न्यायदानार्थ व जकातीच्या (म्हणजे गरिबासाठीं जो कर असे तो) वसुलीसाठीं माणसें नेमून सर्वत्र पाठवावीं लागत. यमनमध्ये मुआझ इब्न जबाल याला पैगंबर पाठवीत होते. त्याला निरोप देतांना पैगंबरांनी विचारिलें, "एखाद्या विशिष्ट प्रसंगीं अडचण आली तर कसा वागशील?"
 "कुराणांत पाहीन."
 "परंतु कुराणांतहि त्या प्रसंगी कसे वागावें तें न आढळले तर?"
 "तुमचें चरित्र डोळयांसमोर आहे."
 "माझ्याहि चरित्रांत तसा प्रसंग नसेल आलेला तर?"
 "तर मग मी स्वतःची बुद्धि वापरीन."
 "शाबास! अशा प्रसंगी स्वतःच्या बुद्धीनें निर्णय दे."
 पैगंबर बुद्धीला मारणारे नव्हते. पुढे इस्लामी कायद्याची जी वाढ झाली त्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. पहिले प्रमाण कुराण. नंतर मुहंमदांचे जीवन, त्यांनी दिलेले निकाल, त्यांची वचने, मतें; आणि शेवटीं या दोहोंच्या प्रकाशांत स्वतःची बुद्धि-शास्त्रपूत निर्मळ बुद्धि वापरणें.
 अलीला पैगंबर यमामा प्रांतांत पाठवित होते. त्यावेळेस सांगते झाले, "हें पहा अली, न्याय मागण्यासाठी दोन पक्ष तुझ्या समोर येतील. यासाठी दोघांची बाजू नीट ऐकल्याशिवाय कधीं निकाल देऊं नकोस. समजलास ना?"
 एक गोष्ट राहिली होती. सीरियांत पाठविलेल्या दूताचा खून झाला होता म्हणून मागें सांगितलेच आहे. त्या खुनाची नुकसानभरपाई बायझंटाईनपासून घेण्यासाठीं सैन्य पाठवावयाचें ठरलें. कारण तो नवीन इस्लामी राष्ट्राचा अपमान होता. सैन्याची तयारीहि होत आली. परंतु त्या पूर्वीच्या विषाचा परिणाम एकदम अधिक जाणवूं लागला. पैगंबरांची प्रकृति अधिक बिघडली. फार दिवस ते वांचणार नाहींत असें दिसूं लागलें. म्हणून उसामाच्या नेतृत्वाखाली जाणारी ही मोहीम थांबविण्यांत आली.
 परंतु मुहंमद आजारी आहेत असे कळतांच सरहद्दीवरील प्रांतांतून पुन्हां पुंडाई सुरु झाली. कोणी लुटालुटीचा ईश्वरदत्त हक्क सांगू लागले. कोणी कोणी तर स्वतःस पैगंबरहि म्हणवूं लागले. हे पैगंबर आपापल्या जातिजमाती आपल्याकडे ओढूं लागले. यमनचा एक पुढारी फारच गडबड करूं लागला. तो श्रीमंत व धूर्त होता. जादूगार होता. कांही जादूचे चमत्कार करी. त्यानें आपल्याभोवती तेजोवलय निर्माण केलें. भोळेभाबडे लोक भोवती जमवून आसपासचा मुलुख तो जिंकूं लागला. त्याचे नांव उबय इब्न काब असें होतें. परंतु अल अस्वद या नांवानेंच तो प्रसिद्ध आहे.
 या वेळेस सहर हा यमनचा गव्हर्नर होता. सहरच्या बापाचं नांव अबाझान. हा पूर्वी इराणचा गव्हर्नर होता. अबाझानने पुढे इस्लामी धर्म स्वीकारला. अबाझानचे त्या प्रांतांत फार वजन होतं. त्याच्यामुळे यमनमधील अरबच नव्हे तर इराणीहि मुस्लिम झाले. अबाझान मरण पावल्यावर त्याचा मुलगा सहर याच्याकडेच पैगंबरांनी प्रांताधिपत्व ठेविलें होतें.
 अल अस्वदनें सहरला ठार केलें. त्याच्या पत्नीशी बळजबरीनें निका लावला. तिचे नांव मर्झबान होतें. मर्झबानने एका इराण्याच्या साहाय्यानें अल अस्वद दारूंत असतां त्याचा खून केला!
 तुलेह, मोसैलिमा हे आणखी दोघे तोतये पैगंबर उभे राहिले होते. अबु बकरने त्यांची बंडाळी मोडली. मोसैलिमानें तर मुहंमदांस संदेश धाडिला : "देवाचा पैगंबर मोसैलिमा याजकडून देवाचे पैगंबर मुहंमद यांस, सलाम. तुमच्या पैगंबरीमध्यें मी भागीदार आहे. आपणा दोघांत पैगंबरी सत्ता वाटली गेली पाहिजे. निम्मी पृथ्वी मला, निम्मी तुम्हा कुरेशांना. परंतु तुम्ही कुरेश बळकावणारे आहांत. तुमच्याजवळ न्याय नाहीं."
 मुहंमदांनी या पत्रास पुढील खणखणीत जबाब पाठविला :
 "कृपावंत मेहेरबान परमेश्वराच्या नांवें : पैगंबर मुहंमदाकडून मोसैलिमास : जे सत्यमार्गानं जातात त्यांना शांति असते. पृथ्वी ईश्वराच्या मालकीची. प्रभूची ज्याच्यावर कृपा होते त्याला तो ती देतो. ईश्वराला जे भिऊन वागतात त्यांचा भविष्यकाळ असतो. त्यांची भरभराट होईल."
 पैगंबर अशा रीतीनें कामकाज पहातच होते. परंतु आतां थकले. प्रकृति फारच बिघडली. अखेरचे दिवस आले. ते अत्यन्त शान्त व गंभीर झाले. त्यांच्या अंतःकरणांत 'निर्वाणपर शांति' उचंबळत होती. अशक्त झाले होते तरीहि सार्वजनिक प्रार्थना ते चालवीत. प्रार्थना म्हणजे त्यांचे अमृत होतें. मरणाच्या आधीं तीन दिवसपर्यंत हे काम ते करीत होते. शेवटचे तीन दिवसच हे काम त्यांनी केलें नाहीं. अबुबकर करीत.
 एके दिवशीं मध्यरात्रीं ते उठले. जेथें त्यांचे जुने दोस्त, जुने साथीदार मरून पडले होते, त्या कबरस्थानांत ते गेले. त्या कबरांना ते भेटले. त्या त्या कबरीजवळ बसून मुहंमद रडले. ते सारे प्रसंग, त्या लढाया त्यांना आठवलें. तें कृतज्ञतेचं, प्रेमाचें श्राद्ध होतें. ती पवित्र तिलांजलि होती. किती सहृदय प्रसंग! कसें कोमल व प्रेमळ मन! आपापल्या कबरीत शांतपणे विश्रांति घेणाऱ्या त्या मित्रांना परमेश्वराने अशीर्वाद द्यावा म्हणून पैगंबरांनी प्रार्थना केली आणि नंतर घरी परत आले.
 आजारीपणांत आयेषेच्या घरी ते रहात. कारण तें घर मशिदीच्या जवळ होतें. जोपर्यंत शक्ति होती. तोपर्यंत ते प्रार्थना चालवीत. परंतु झपाट्यानें शक्ति क्षीण होत होती. एके दिवशीं अली व अब्बासांचा मुलगा फजल यांच्या आधाराने ते प्रार्थनेला आले. यानंतर मशिदींत ते आले नाहींत. मशिदींतील शेवटचें आगमन! असें सांगतात कीं त्या दिवशी त्यांच्या मुद्रेवर अनिर्वचनीय असें मंद स्मित झळकत होतं. त्या दिवशी सभोंवतीचे सारे बोलले, "किती सुंदर आजचं तुमचें स्मित, किती प्रसन्न व प्रेमळ ही मुद्रा!" कुराणांतील प्रार्थना, स्तुति वगैरे सारें म्हणून झाले. आणि शांतपणे पैंगंबर म्हणाले, "मुस्लिमांनो, कोणाच्या बाबतीत माझ्याकडून कांहीं अन्याय झाला असेल तर सांगा. येथें त्याचे उत्तर द्यावयास मी उभा आहे. तसेच जर मी कोणाचें कांहीं देणें असेन तर माझें जें कांहीं कदाचित् असेल ते सारे तुमचेच आहे."
 एकजण उठून म्हणाला, "तुमच्या सांगण्यावरून मी एकदा कोणाला तरी तीन दिरहम दिले होते."
 पैगंबरांनी लगेच त्याचे तीन दिरहम दिले व म्हणाले, या जगांत मान खालीं घालावी लागली तरी हरकत नाहीं. परंतु परलोकीं प्रभूसमोर खाली मान नको!" सारें शांत झालें. पैगंबरांनी पुन्हां प्रार्थना केली. जे हजर होते, जे शत्रूच्या छळामुळे मारले गेले होते त्या सर्वोसाठी ईश्वराची कृपा त्यांनी भाकिली. पुन्हां एकदां सर्वांस सांगितले, "वेळच्या वेळेस प्रार्थना करीत जा. धार्मिक व्रत पाळा. बंधुभावानें वागा. शांतीनें रहा. सदिच्छा बाळगा. नंतर कुराणांतील (२८:८३) पुढील आयत त्यांनी म्हटली-
 "जे नम्र आहेत, जे अन्याय्य गोष्ट करीत नाहींत त्यांना परलोकीं प्रासाद मिळतील. जे पवित्र व धर्मशील आहेत त्यांना परिणामी सुख आहे." हा चरण म्हणून ते घरीं आले. तें शेवटचे प्रवचन, ती शेवटची सामुदायिक प्रार्थना.
 परमेश्वराजवळ जाण्याची घटका जवळ येत चालली. इ. स. ६३२. जूनची ८ वी तारीख होती. देह गळू लागला. सोमवार होता. पैगंबर स्वतःशीच प्रार्थना म्हणत होते. प्रार्थना मनांत म्हणत म्हणत प्राण गेले! थोर पैगंबरांच्या पवित्र आत्महंसाने परमेश्वराच्या पायांशीं कृतार्थ होण्यासाठी उड्डाण केलें. दुपारची ११ वाजण्याची ती वेळ होती.

回 回 回









अशा रीतीनें ही महान् जीवनयात्रा संपली. आरंभापासून अंतापर्यंत मानवाच्या व ईश्वराच्या सेवेसाठीं वाहिलेलें असें तें जीवन होतें. किती कसोटीचे प्रसंग, किती मोह! परंतु या सर्वं दिव्यांतून निष्कलंक नि अधिकच सतेज असे ते बाहेर पडले. अग्नीत घातलेल्या सुवर्णाप्रमाणें अधिकच झगझगीत दिसूं लागले. तो नम्र साधा धर्मोपदेशक अरबस्थानचा सर्व सत्ताधीश झाला. राष्ट्राच्या दैवाचा नियन्ता झाला. खुश्रु व सीझर अशांच्या तोलाचा झाला. परंतु अशी सत्ता हातीं आल्यावरहि तीच पूर्वीची नम्रता, तोच पूर्वीचा साधेपणा. तीच आत्म्याची उदात्तता, तीच हृदयाची विशुद्धता; तीच वर्तनांतील विरक्ति, तीच भावनांची कोमलता व सुसंस्कृतता. कर्तव्याविषयींच्या प्रखर दक्षतेमुळे त्यांना अल-अमीन पदवी मिळालेली होती. ते नेहमीं कठोर आत्मपरीक्षण करायचे. एकदां मक्केतील कांहीं श्रीमंत व वजनदार गृहस्थांजवळ ते धार्मिक चर्चा करीत होते. त्यांना नवधर्म समजून देत होते. आणि त्याच वेळेस सत्याचे संशोधन करणाऱ्या एका गरीब आंधळ्याजवळ न बोलतां ते तसेच निघून गेले. तो गरीब मनुष्य मुद्दाम मुहंमदांकडे आला होता. परंतु मुहंमद त्या मातबरांजवळच्या चर्चेनें प्रक्षुब्ध होऊन म्हणा तसेच तडक गेले! परंतु त्यांना त्या गोष्टीचा मागून पश्चात्ताप झाला. त्या गोष्टीचा पुनःपुन्हां ते उल्लेख करीत. माझें तें कृत्य ईश्वराला आवडलें नसेल असें म्हणत. कुराणांत या गोष्टीचा उल्लेख आहे. त्या सुऱ्याला 'पैगंबर रागावले' असें नांव आहे. त्या सुऱ्यांत पुढील भाग आहे :
 "पैगंबरांनीं कपाळास आंठ्या पाडल्या व ते निघून गेले. परंतु तो आंधळा गरीब आला होता. आपल्या पापांपासून तो मुक्त झाला नसता, धुतला गेला नसता, असें का तुला वाटलें? तुला काय माहीत तो झाला असता कीं नाहीं विशुद्धात्मा. दोन शब्द त्याच्याजवळ बोलतास तर त्याचे कल्याण झालें असतें. जो श्रीमंत होता त्याचें तूं उदारपणें स्वागत केलेंस. तो शुद्ध आहे कीं नाहीं, त्यानें आपले पाप धुतलें आहे कीं नाहीं तें तूं पाहिलें नाहींस. परंतु जो मनुष्य स्वतःच्या उद्धारासाठीं धडपडत आला, तुझ्यापुढे थरथरत उभा राहिला, त्या गरिबाची मात्र तूं उपेक्षा केलीस. अतःपर कधींहि तूं असें करता कामा नये."
 असें हे कठोर आत्मपरीक्षण सदैव चाले. अबुबकरांची मुलगी आयेषा व उमरची मुलगी हफ्सा या मुहंमदांच्या भार्या होत्या. परंतु झैनब नांवाची आणखी एक पत्नी होती. ती मुहंमदांस नेहमी मध द्यायची. पैगंबरांत मध फार आवडे. लहानपणीं शेळ्या मेंढ्या उंट चारतांना मुहंमद दऱ्याखोऱ्यांतून, टेकड्यांवर हिंडत. रानावनांतील मध खाण्याची त्यांना संवय लागली होती. झैनब प्रेमाने मध देई. आयेषा व हफ्सा यांना ईर्षा वाटे.
 "तुम्ही फार मध खातां. इतका काय मेला मध खावा! अतःपर मध खाणें सोडून द्या." असें त्या दोन्ही म्हणत. एके दिवशीं त्रासून मुहंमद म्हणाले, "आजपासून मधास बोट लावणार नाहीं!"
 परंतु मागून आपण चूक केली असे त्यांना वाटलें. मधासारखी सुंदर व हितकर वस्तु मी कां सोडावी? केवळ बायकांच्या आपसांतील स्पर्धेमुळे का मी हें करावें? ईश्वराने दिलेल्या गोड देणगीचा त्याग करावा? त्यांच्या मनास हे बरें वाटेना. कुराणांत त्या गोष्टीचा ते उल्लेख करतात व म्हणतात, "पैगंबर, जें देवानें खायला योग्य म्हणून दिले त्याचा तूं आपल्या बायकांना केवळ खूष करण्यासाठीं का त्याग करावा? ती वस्तु का निषिद्ध मानावीस, वर्ज्य करावीस?"
 त्यांनीं असत्याशी कधीं तडजोड केली नाहीं. ईश्वर एक आहे या तत्त्वाशीं ते कसलीहि तडजोड करायला तयार नसत.
 परंतु ही एक अत्यंत प्रखर सत्याची गोष्ट सोडली तर जीवनांत मिळते घेण्यासाठी ते तयार असत. समाजांतील भांडणें कमी व्हावीं अशी त्यांना फार इच्छा असे. ज्यू व ख्रिश्चन यांच्याजवळ त्यांनीं पुनःपुन्हां मिळतें घेतलें. विशेषतः ज्यूंजवळ. परंतु या ज्यूंनीं पुनःपुन्हां विश्वासघात केला. नवीन शासनसत्तेचा विश्वासघात केला. म्हणून मुहंमदांस कठोर व्हावें लागलें. कुराणांतील बरेचसे उल्लेख हे विशेषतः ज्यूंना उद्देशून आहेत. त्या त्या विश्वासघातामुळे, सात्त्विक संतापाने ते आलेले आहेत. परंतु मुहंमद क्षमामूर्ति होते. ते स्वतःचा धर्म सक्तीनें लादूं इच्छित नसत. आईबापांनी मुलांवर हि धर्माची सक्ति करूं नये म्हणत. आपण धर्माचा उपदेश करावा. फळ देणें ईश्वराहातीं. तो न्याय देईल. योग्य तें वाढवील. त्याची इच्छा असती तर सारे एका धर्माचे नाहीं का होणार? प्रत्येक देशांत त्याने ईश्वरी पुरुष निर्मिले, अपौरूषेय धर्मग्रंथ दिले. 'माझा धर्म मला, तुझा तुला, कशाला झगडा?' असे म्हणावें. आपलीं मतें शांतपणे बुद्धिपूर्वक मांडावीं. सक्ति नको." असें ते सांगत. पैगंबर सर्वांशी सलोख्याने राहूं इच्छित होते. पत्नी विधर्मी असली, ख्रिस्ती धर्माचीं असली तरी तिचा धर्म तिला पाळू द्यावा, असे त्यांनी सांगितले आहे. ज्यूंचे प्रेम संपादण्यासाठीं ते नमाजाच्या वेळेस प्रथम जेरूसलेमकडे तोंड करीत. परंतु पुढे ज्यूंचे दुष्ट व खुनशी वर्तन पाहिल्यावर पैगंबर आपल्या राष्ट्रीय स्थानाकडे, काबाकडे तोंड करूं लागले. शुक्रवार हा मुख्य दिवस झाला. ज्यूंचे उपवास सोडून नवीन रमजानचे उपवास सुरू झाले. काबाकडे तोंड करणें, काबाची सर्वांनी यात्रा करणें हीहि एक तडजोडच होती. जरी तेथील सर्व देवता भंगण्यांत आल्या, तरी तो एक पवित्र दगड प्रभूची आकाशांतून आलेली ती खूण त्यांनी ठेवली! काबाचें पावित्र्य ठेवलें, यांत कुरेशांजवळ थोडी तडजोड होती. तसेच या करण्यांत मुहंमदांची मुत्सद्देगिरी व दूरदृष्टि दिसते. एका दिशेकडे सर्वांचें तोंड. एक पवित्र स्थान सर्वांच्या समोर सर्व राष्ट्राचे यामुळे त्यांनीं महान् ऐक्य निर्मिलें. जगांतील सर्व मुस्लिमांचें ऐक्य केलें. ती थोर ऐक्यकारक गोष्ट होती.
 मुहंमद केवळ क्षमामूर्ति होते. स्वतःवर अपकार करणाऱ्यावर त्यांनी उपकारच केले. विष पाजणाऱ्यांसहि प्रेम दिलें. मारायला आलेल्यांस प्राणदान व दया शिकविली. आपल्या मुलीचा क्रूर खून करणाऱ्यासहि क्षमा केली. स्टेटच्या गंभीर प्रसंगी ते कठोर होत. परंतु वैयक्तिक जीवनांत कठोरता त्यांना माहित नव्हती. तें सर्वांशी प्रेमळपणाने वागत. त्यांच्या प्रेमळ वर्तनाच्या शेंकडों गोष्टी आहेत. त्यांचे कोमल संस्कारी मन त्या गोष्टींतून प्रकट होतं.
 अनस नांवाचा त्यांचा एक नोकर होता. त्याला कोणी बोलले तर त्यांना खपत नसे. तो अनस म्हणाला, "पैगंबरांजवळ मी दहा वर्षे होतो. परंतु रागाचा ऊफ् असा शब्दहि ते कधी मला बोलले नाहींत!" कुटुंबांतील मंडळींजवळहि ते अति प्रेमाने वागत. त्यांचे मुलगे सारे लहानपणीच मेले. त्यांना फार दुःख वाटे. एक मुलगा त्यांच्या मांडीवरच मरण पावला. एका लोहाराची बायको या मुलाला दूध पाजी. तिच्या धुराने भरलेल्या घरांत तें मरणोन्मुख बाळ मांडीवर घेऊन मुहंमद बसले होते. त्या बाळाच्या मरणानें मुहंमद रडले! मदिनेंत स्वतःच्या आईच्या कबरीजवळ मुहंमद रडत. निधनापूर्वी मुहंमद आपल्या बरोबरचे जे साथीदार मित्र मेले त्यांच्या कबरींना एके रात्रीं भेटून आले, तेथे अश्रुसिंचन करते झाले. हृदयाची अशी हळुवारता त्यांच्याजवळ होती. म्हणून 'बायक्या', 'स्त्रीस्वभावाचा' असे त्यांना म्हणत.
 मुलांचं त्यांना फार वेड. रस्त्यांत त्यांना थांबवीत. त्यांना प्रेमाने थापट मारीत, त्यांच्या मुखावरून प्रेमाने हात फिरवीत, त्यांना गोष्टी सांगत. त्यांच्या बरोबर फिरत. जणुं देवदूतांबरोबर फिरणें! पोरक्या मुलांविषयीं तर त्यांना अपार प्रेम वाटे. कारण ते स्वतः त्या मातृपितृविहीन स्थितींतून गेले होते.
 केलेला करार त्यांनीं कधीं मोडला नाहीं. दिलेला शब्द सदैव पाळला. त्यांनी कधीं कोणाला मारलें नाहीं. बोलण्यांत कधीं रागावलेच तर, "झाले तरी काय तुला! तुझें कपाळ चिखलानें भरो!" असे म्हणत. कोणी जर त्यांना म्हणालें, "अमक्याला शाप द्या, त्याचें निःसंतान होवो म्हणा." तर पैगंबर म्हणत, "मी मानवजातीस शाप देण्यासाठीं नाहीं आलों. दया व प्रेम देण्यासाठी देवाने मला पाठविलें आहे." कोणी आजारी असला तर त्याला भेटायला जात, धीर देत. वाटेंत प्रेतयात्रा दिसली की लगेच तींत सामील होत. मग गरिबाची असो की श्रीमंताची. ते समतेचे भोक्ते. त्यांनी एका गुलामाला मुक्त करून त्याचें लग्न एका खानदानी स्त्रीशी करून दिलें होतें. स्त्रियांची, गुलामांची स्थिति त्यांनी किती सुधारली. ते स्वतः सर्वांना स्वतंत्र करीत. उदाहरणानें शिकवीत. ते गरिबीत आनंद मानीत. श्रमाचे ते उपासक होते. ते स्वतः स्वतःचे नोकर होते. स्वतःचे कपडे शिवीत, जोडे शिवीत. घरांत चूलहि पेटवीत. दुसऱ्यांचीहि दुधें काढून देत. कोणतेहि काम त्यांना कमी वाटत नसे. एकदां त्यांच्याकडे एक पाहुणा आला होता. तो रात्रीं इतकें जेवला की सांगता सोय नाहीं. आणि मग रात्री त्याला जुलाब होऊं लागले. सारे आंथरुणातच त्यानें केलें. पहांटे गुपचूप लाजेने निघून गेला. मुहंमद सकाळीं पाहुण्याकडे येतात तो खोलींत पाहुणे नाहींत! खोलींत सारी घाण. मुहंमदांनी सारें जाणलें, ते सारे कपडे घेऊन झऱ्यावर ते धुवायला गेले. परंतु तो पाहुणा आपली तरवार न्यायची विसरला. तो परत आला. परंतु मुहंमद कोठें आहेत? तो पाहुणा गावांतील मंडळींसह पैगंबरांस शोधीत त्या झऱ्याकांठी आला. तो ते उदात्त दृश्य! मुहंमद कपडे धूत आहेत. मानवांचें पाप धुवायला आलेला महापुरुष तीं घाणेरडीं वस्त्रं धूत होता. पाहुणा लाजला!
 स्वावलंबनाचे ते भोक्ते. श्रमाने मिळवावें व खावें असें त्यांना वाटे. भीक मागणें त्यांना पसंत नसे. प्रत्येकाला पोटभर अन्न, अंगभर वस्त्र मिळालेंच पाहिजे. त्यासाठी मनुष्याने श्रमावें व समाजाने त्याला द्यावें. एकदां एक धट्टाकट्टा मनुष्य भीक मागत होता. पैगंबर म्हणाले, "तूं भीक कां मागतोस?"
 "माझ्याजवळ कांहीं नाहीं." तो म्हणाला.
 "हातांतील हा नक्षीदार कटोरा आहेना?"
 "त्याचे काय करूं?"
 "मी तो विकतों कोणाला तरी. आण इकडे."
 मुहंमदांनी तो कटोरा विकला. त्याच्या पैशाने त्या भिकाऱ्याला त्यांनी एक कुऱ्हाड घेऊन दिली व ते म्हणाले, "जा पहाडांत. लाकडे तोड. मोळी आण व वीक. पैसे येतील ते मजजवळ दे." तो भिकारी जंगलांत गेला. भली मोठी मोळी घेऊन आला. मुहंमदांनी ती विकली. जे पैसे आले त्यांतून त्याला खाण्यापुरते देऊन बाकीचे स्वतःजवळ त्यांनी ठेवले. एक महिना याप्रमाणे झालें. महिनाअखेर मुहंमद म्हणाले, "हे बघ तुझे शिल्लक पैसे. यांतून कपडे घे. आणि असाच श्रमानें जगत जा. समजलासना."
 ते श्रमोपासक होते. कर्मयोगी होते. कोणतेंहि काम त्यांना कमीपणाचे वाटत नसे. त्यांना गुरेढोरे चारणं फार आवडे. आणि गुरांवर तरी प्रेम किती! 'वेळच्या वेळीं पाणी पाजा. शक्तीबाहेर मुक्या प्राण्यांपासून काम घेऊं नका,' अशी त्यांची शिकवण आहे. अर्थात् मांसाशन त्यागाचा प्रयोग त्यांनी केला नाहीं. उंट, शेळ्या मेंढ्या हें देवाने दिलेले अन्न आहे असे ते म्हणत. अरबस्थान ओसाड भूमि. तेथें दाणापाणी नाहीं. तेथें दुसरें खाद्य कोणते? हिंदुस्थानासारख्या सुपीक भूमींतच मांसाशनत्यागाचा प्रयोग शक्य. तोहि संपूर्ण यशस्वी झाला नाहीं. बंगालमध्ये ब्राह्मणहि मासे खातात. एकदा पूज्य विनोबाजींस धुळे तुरुंगांत एकानें म्हटलें, "बंगाली लोक तर मासे खातात!" विनोबाजी म्हणाले, "बंगालची हवा अशी आहे की पोटांत कांहीं तरी माशासारखा पदार्थ गेल्या शिवाय लोक जिवंतच रहाणार नाहींत. सर्वत्र प्रचंड नद्या. गरीब लोकांना पाण्यांत जणुं रहावें लागतें. मलेरिया, डांस. अशा सर्द हवेंत अंगांत उष्णता रहाण्यासाठी मासे न खातील तर काय करतील. माशांऐवजी अमुक एक वनस्पत्याहार केला तर तोच परिणाम होईल, असें कोणी प्रयोगानें जोपर्यंत दाखवीत नाहीं आणि तो आहार सर्वांना, गोरगरिबांना परवडेल व मिळेल असे जोपर्यंत दाखवीत नाहीं, तोपर्यंत बंगाल्यास नावें नका ठेवू. त्यांना मासे खाऊं दे व भरपूर काम करूं दे. देशसेवा करूं दे." आणि एका प्रख्यात चिनी लेखकानें चीनच्या सर्वभक्षत्वाविषयीं लिहितांना म्हटले आहे, "चीनमधील अपरंपार लोकसंख्या, सदैव येणारे पूर, येणारे दुष्काळ, होणारी वादळें, नद्यांचे बदलणारे प्रवाह, हें सर्व ध्यानांत घ्या व मग चिनींच्या खाण्यावर टीका करा."
 पैगंबर शक्य ते सांगत. अशक्य ध्येये त्यांनी दिलीं नाहींत. यात्रेच्या वेळेस उंट मारतात. परंतु पैगंबरांनी स्वच्छ सांगितले आहे की उंटाचें रक्त देवाला मिळत नसतें. देव सत्कर्मे बघतो. मग त्यांनीं तीं चालू कां ठेविली? त्यामुळे गरिबांना जेवण मिळतें. पोटभर मेजवानी मिळते. पशूंच्या बलिदानानें स्वर्गप्राप्ति, प्रभुप्राप्ति त्यांनी कधीं सांगितली नाहीं. "हत्या करण्यापूर्वीहि देवाचें नांव घ्या. शस्त्र तीक्ष्ण असू दे. हाल करूं नका." असें मुहंमदांनी सांगितले आहे. भक्षणार्थ हिंसा 'मुभा' असे कुराणी धर्म मानतो.
 पशुपक्ष्यांविषयीं त्यांना प्रेम वाटे. एकाने घरट्यांतून पिलें चोरून आणिली. ती पक्षीण घिरट्या घालीत येत होती. तो गृहस्थ पिले घेऊन, मुहंमदाकडे आला. पैगंबर म्हणाले, "तीं पिले त्या चादरीवर ठेव." त्याने तसे केलें. ती पक्षीण प्रेमानें झळबूंन तेथे एकदम आली. पैगंबर म्हणाले, "पहा हें प्रेम. ईश्वराचें याहूनहि अधिक प्रेम सर्वांवर आहे. जा, हीं पिलें पुन्हां त्या घरट्यांत नेवून ठेव."
 असे हे प्रेमधर्मी मुहंमद होते. जे अनाथ, परित्यक्त असत ज्यांना कोणी नसे, जे दुःखी व रंजले गांजलेले असत ते मुहंमदांजवळ येत, दुःखें सांगत. मुहंमद त्यांच्याजवळ बसत, बोलत, चौकशी करीत. बायका आपल्या निर्दय पतींच्या तक्रारी घेऊन येत. अगदीं गरीब गुलामहि त्यांच्याकडे येत व त्यांचा हात धरून त्यांना आपल्या धन्याकडे नेत व म्हणत, "सांगा या आमच्या मालकांना दोन शब्द. आम्हांला नीट वागवायला सांगा. मुक्त करायला सांगा." गरीब झोंपड्यांतून ते जायचे. सर्वांची विचारपूस करायचे. सर्वांचे अश्रु पुसायचे, जवळ असेल तें द्यायचे.

回 回 回





त्यांच्या बायकांच्या लहान लहान झोपड्या अलग अलग अशा एका ओळीनं होत्या. या झोपड्या साध्या, ताडपत्र्यांनी आच्छादिलेल्या चिखला- मातीच्या अशा होत्या. मुहंमद स्वतः घर झाडीत. कधीं पाहुणे आले तर त्यांना आधीं जेवण देत. कोणी गरीब आला तर त्याला बरोबर जेवायला- बसवीत. ज्यांना घरदार नसे ते मुहंमदाच्या घराबाहेर एक बांक असे त्यावर बसलेले असावयाचे. किंवा जवळच्या मशिदींत असत. मुहंमदांच्या औदार्यावर ते जगत. त्या लोकांना 'बाकावरचे लोक' असें म्हणत. त्यांतील कांहींना सायंकाळीं आपल्याबरोबर जे असेल तें खायला बोलावीत. कांहींना आपल्या शिष्यांकडे पाठवीत. मोठे पाहुणे आले तर त्यांची सुखी व सधन शिष्यांकडे सोय करीत. मुहंमदांचा मुख्य आहार खजूर व पाणी हा असे. मिळाली तर बार्लींची भाकरी. त्यांची चैन म्हणजे दूध व मध. परंतु त्यांतहि संयम राखीत. अबु हुरेरा सांगतो कीं पुष्कळ वेळां पैगंबरांस उपाशी रहावें लागे. कधीं कधीं कित्येक दिवस घरांत चूल पेटलेली दिसत नसे. अशा वेळेस खजूर व पाणी यावरच रहात. मुस्लिम इतिहासकार लिहितात, "ईश्वरानें जगांतील खजिन्यांची किल्ली मुहंमदांसमोर ठेवली, परंतु त्यांनी ती नाकारली."
 विरक्त त्यागमय जीवन. गरिबीत आनंद मानणारें जीवन. दारिद्र हा माझा अभिमान आहे असे ते म्हणत. "देवा, मला गरीब ठेव." अशी प्रार्थना करीत. "मला गरीब राहू दे, गरीब मरूं दे, गरीबींत वाढू दे" म्हणत. एकदां एक मनुष्य पैगंबरास म्हणाला, "देवाची शपथ, माझें तुमच्यावर फार प्रेम आहे." पैगंबर म्हणाले, "जर माझ्यावर तुझें खरें प्रेम असेल, तर मग दारिद्र्याचें चिलखत तयार कर. दारिद्र्याने नट नदी समुद्राकडे धांवत जाते. तिच्यापेक्षांहि अधिक जलदीनें गरिबी त्याच्याकडे धांवत जाते जो माझ्यावर प्रेम करतो. गरीबांना तुझ्याकडे येऊं दे, म्हणजे तुला ईश्वराजवळ जातां येईल. तूं गरिबांना जवळ घेशील तर ईश्वर तुला जवळ घेईल." गरिबीनें रहावें, साधेपणानें रहावें अशीं त्यांची शेंकडों वचनें आहेत. "तुम्हीं गरीबांना व गरजवंतांना समाधान द्याल त्यांत माझे समाधान आले. ऐषआरामापासून, सुखासीन जीवनापासून दूर रहा. ईश्वराचे जे खास सेवक आहेत, जे खुदाई खिदमतगार आहेत त्यांना ऐषआरामी राहून सच्ची पूजा करतां येणार नाहीं." असे ते सांगत. एकदां पैगंबरांकडे पाहुणा आला तर त्यांना पीठ उसने आणावें लागलें! गरिबीचं व्रत त्यांनी अक्षरशः पाळले. ते गरिबांशी एकरूप झाले. ते मेले तेव्हां कांहीं हत्यारें, एक उंट व लहानशी जागा हीच काय ती त्यांची धनदौलत मागें होती. त्यांचे चिलखतहि एका सावकाराकडे गहाण होतें. तें सोडवायला पैसे नव्हते! मुहंमदांची मुलगी हझरत फतिमा हिला स्वतः दळावें लागे. हातांना तिच्या फोड येत. एकदां ती पैगंबरांना म्हणाली, "मला मदतीला एक गुलाम द्या." प्रेमळ पिता म्हणाला, "नोकरापेक्षां अल्लाचे नांव घेत जा तें अधिक बरें!" जनाबाईला दळतांना देवच मदत करी. जणुं दंडांत शक्ति येई.
 स्तुति त्यांना आवडत नसे. "मी परमेश्वराचा सेवक आहे, त्याचा दूत आहे. मीहि एक साधा मनुष्यच आहे." असें ते म्हणत. एकदां आयेषाने विचारलें, "प्रभूच्या कृपेशिवाय स्वर्गात कोणालाच जातां येत नाही का?"
 "नाहीं, नाहीं, नाहीं." त्रिवार म्हणाले.
 "तुमच्या गुणांमुळे तुम्हांलाहि प्रवेश नाहीं का मिळणार?"
 "नाहीं ईश्वराची कृपा झाल्याशिवाय माझाहि स्वर्गात प्रवेश नाहीं. तो मला कृपावस्त्रानें झांकील तरच मी स्वर्गात जाऊं शकेन."
 प्रार्थना हें त्यांचें जीवन होतं. ते म्हणत, "मी मर्त्य मनुष्य आहे. किती चुका झाल्या असतील! रोज हजार वेळां मला प्रार्थना करू दे. प्रभूची क्षमा मागू दे."
 अशी निस्सीम निरहंकारता त्यांच्या ठायीं होती.
 त्यांना निःसंशयपणे वाटे कीं आपण देवाचे संदेशवाहक आहों. त्यांना तसे अनुभव आले होते. किती त्यांचा मानसिक झगडा चालला होता. अशा झगड्यांतून ती श्रध्दा निर्माण झाली होती. म्हणून ते म्हणत कुराण देवाचें आहे. ती माझी वाणी नाहीं. माझ्याद्वारें तो बोलत आहे. कुराणांत कांहीं कांहीं ठिकाणीं खरेंच अपार स्फूर्ति वाटते. परंतु जेथें कायदेकानु आले आहेत, रोजच्या जीवनांत कसें वागावें याचे नियम आले आहेत, तेथेहि ते संस्फूर्त असत का? त्यांच्या कार्याचे क्षेत्र जसजसे वाढले तसतसे शिकवणीचें क्षेत्र व्यापक करावे लागले. ते पैगंबर होते, आतां राष्ट्रस्थापक झाले. राष्ट्रस्थापक या नात्याने त्यांना अनेक नीति-नियम कायदे द्यावे लागले. परंतु ते फसवणूक नव्हते करीत. ईश्वराची स्फूर्ति व प्रेरणाच मला विचार देते, असे त्यांना वाटत असे. ते स्वतः निःस्वार्थ होते. त्यामुळे आपण ईश्वराच्या हातांतील आहोत असे त्यांना वाटे. केवळ मुत्सद्देगिरीनें, लोकांनीं विश्वास ठेवावा म्हणून देवाने असा आदेश दिला, असे विचार वदविले, असें नव्हते ते करीत. असे दांभिक ते असते तर आज दीड हजार वर्षे त्यांचे जीवन स्फूर्ति देत राहिले नसतें.
 हा दांभिकपणाचा आरोप जसा मिथ्या आहे त्याप्रमाणेच रंगेलपणाचा. रंगेला रसूल, अशी चोपडीहि त्यांच्यावर लिहिली गेली. परधर्माचा अभ्यास करण्याची ही रीत नव्हे. रंगेल्यांच्या पाठीमागें कोट्यवधि लोक शेकडो वर्षे गेले नसते. दुसऱ्याच्या धर्माविषयी अभ्यास करतांना अत्यंत आपुलकीची भावना हवी.
 कुराणांत पैगंबरांनी चार बायका करण्याची परवानगी दिली आहे. परंतु शेवटी तर एकच बरी असेंहि मत दिले आहे. शिवाय सर्व बायकांना समतेनें नसेल वागवतां येणार तर अधिक बायका करूं नकोस, असेंहि त्यांनी सांगितले आहे. अरबस्थानांत किती बायका कराव्या याला सुमारच नसे. मुहंमदांनी त्याला बंधन घातलें. कांहीं मर्यादा घातली. तेथें एकदम एकपत्नीव्रत सांगते तर कोणी ऐकतेहि ना.
 टीकाकार व निंदक म्हणतात, "पैगंबरांनी इतरांना चारच बायका ठेवल्या. स्वतः मात्र किती तरी केल्या!" एक गोष्ट आधी लक्षांत ठेवली पाहिजे की कुराणांतील चार पत्नींची मर्यादा सांगणारे वचन त्यांच्या मुखावाटे बाहेर पडण्यापूर्वी त्यांचीं सारीं लग्ने झाली होतीं, त्या वचनानंतर नव्हत. ज्यांना त्यांनी चारच बायकांची परवानगी दिली, ते काडीमोड करूं शकत असत. आणि पुनः- पुन्हां अनेक लग्न करू शकत असत. मुहंमदांनी कधीं काडीमोड केली नाहीं. परंतु मुख्य गोष्ट आहे ती ही की मुहंमदांनी केलेली लग्ने ही विषयसुखार्थ नव्हतीं, विलासार्थ नव्हती. अनेक कारणांमुळे तीं त्यांना करावी लागली. त्या लग्नांचे इतिहास पहाल तर त्या लग्नांतून विलासिता न दिसतां मुहंमदांची त्यागता व उदात्तताच दिसेल. आणि पहिली पत्नी- ती थोर खदिजा, ती जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत पैगंबरांनी कधीहि लग्न केलें नाहीं. यावरून त्यांची दृष्टि दिसते. ते केवळ भोगी असते तर खदिजा मरण्यापूर्वीहि सुंदर बायको करते. खदिजा वृद्ध झाली होती. ती त्यांच्यापेक्षां वयानें मोठी होती. तरी तिच्याशी निष्ठावंत राहिले. खदिजा ६५ वर्षांची होऊन मरण पावली. तिच्या मरणानंतरची पैगंबरांची सारी लग्नें! सौदेजवळ त्यांनी लग्न केलें. ती एक विधवा होती. तिचा नवरा मुस्लिम झाला होता. तो अबिसीनियांत त्यांच्याबरोबर गेला होता. तो तिकडेच निर्वासित असतां मरण पावला. पत्नी निराधार. मुहंमद तिचा सांभाळ कसा करूं शकते? तिच्या पतीनें नवधर्मार्थ सर्वस्व दिलें होतें. ती अनाथ पत्नी परत आली, विधवा होऊन आली! पैगंबरांनी तिला पत्नी करून तिचा सांभाळ केला. जे पुढे खलिफा झाले, जे पैगंबरांना अगदी आरंभी मिळाले ते अबुबकर. त्यांना एक मुलगी होती. तिचें नांव आयेषा. ती केवळ ७ वर्षांची. परंतु अबुबकर यांची फार इच्छा कीं ती पैगंबरांस द्यावी. अरबांत पति मेल्यावर पुन्हां विवाह करतां येत असे. मुस्लिम धर्मात ती परवानगी आहे. पैगंबरांच्या पत्नींना मात्र पुनर्विवाहाची परवानगी नव्हती, आयेषाचा स्वीकार मुहंमदांना करावा लागला, कारण अबुबकर म्हणाले, "तुमच्याबद्दल मला जे कांहीं वाटतें त्याची खूण म्हणून ही कन्या घ्या." मुहंमदांनी तिचा स्वीकार केला. आणि पुढें जो दुसरा खलिफा झाला तो उमर. त्या उमरला एक मुलगी होती. तिचा पहिला नवरा बद्रच्या लढाईत पडला. तिच्या पुन्हां लग्नाविषयीं उमर बेफिकीर होता. ही मुलगी मोठी कडक होती. तिच्याजवळ विवाह कोण करणार? उमर आपल्या मुलीची काळजी घेत नाहीं असें लोक म्हणूं लागले, त्याला नांवें ठेवू लागले. तेव्हां उमर अबुबकर यांच्याकडे गेले व म्हणाले, "तुम्ही माझी मुलगी करा." परंतु अबुबकर यांनी नकार दिला. उमर उस्मानकडे गेला व त्याला प्रार्थना करता झाला. उस्माननेंहि ती गोष्ट नाकारली. उमरचा स्वभाव रागीट व मानी होता. तो रागावला. त्याला अपमान वाटला. तो रागानें लाल होऊन पैगंबरांकडे आला. पैगंबरांनी त्या मुलीशी लग्न लावलें व उमरला शांत केलें. अशीं हीं तीन लग्ने, आणि तें झैनबजवळचें लग्न. त्याचा इतिहास आहे. मुहंमदांचा आवडता प्रिय शिष्य झैद होता. तो गुलाम होता. मुहंमदांनीं त्याला मुक्त करून त्याचें झैनबशीं लग्न करून दिलें. झैनब खानदान घराण्यांतील. ती सुंदर होती. तिला हा विवाह सलत होता. पतिपत्नींचें पटेना. खटके उडत. एकदां मुहंमद झैदच्या घरी गेले होते. त्यावेळेस झैनबचें मुख अनाच्छादित होतें. तिचे सुंदर मुखकमल पाहून पैगंबर म्हणाले, "ईश्वराला धन्यवाद! मानवी हृदयांचा तो खरा सत्ताधीश." पैगंबरांच्या म्हणण्याचा अर्थ ज्या ईश्वरानें असें सौंदर्य निर्मिलें तो किती थोर व सुंदर असेल! मनुष्याच्या हृदयानें त्या सौंदर्यसागर ईश्वराला वरावें. मानवी हृदयांवर खरी सत्ता त्या सुंदरतम प्रभूची असावी. मुहंमद निघून गेले. झैनबला गर्व वाटला. ती झैदला म्हणे, "पैगंबरहि माझ्या सौंदर्याची स्तुति करतात. बघ." एके दिवशीं झैद त्रासून पैगंबरांकडे आला व म्हणाला, "काडीमोड करावी असें वाटतें."
 "कां, तिचा कांहीं विशेष अपराध आहे का?"
 "तसें नाहीं. परंतु तिच्याबरोबर राहणें कठिण."
 "असें नको करूं, जा. आपल्या पत्नीस सांभाळ. तिला नीट वागव. प्रभूला भी. कारण ईश्वरानें सांगितले आहे की आपल्या बायकांची काळजी घ्या, माझी भीति बाळगा." परंतु झैदनें ऐकलें नाहीं. शेवटी काडीमोड झाली, मुहंमदांस फार वाईट वाटले. श्रेष्ठकनिष्ठपणा जावा म्हणून हा विवाह मुद्दाम त्यांनी लाविला होता. त्यांनी हे लग्न जमविलेलें होतें. झैनब मुहमदांकडे आली व मला तुमची पत्नी करा असा हट्ट धरून बसली. मुहंमदांनी तिचें पाणिग्रहण केलें. झैनब केवळ सुंदर म्हणून मुहंमद वरिते तर झैदची निष्ठा राहती का? परंतु या लग्ननंतरहि झैदची भक्ति तशीच होती. मुहंमदांच्या शुद्ध वृत्तीचा हाच मोठा पुरावा आहे.
 एकदां बनी मुस्तलिक जमातीचा पाडाव करण्यासाठीं मुस्लिम सैन्य गेलें. लढाईनंतर अनेक कैदी आणिले गेले. त्यांत झुबेरिया एक स्त्री होती. मुहंमदांनी तिची मुक्तता केली. ती म्हणाली, "तुमचीच मला करा." मुहंमदांनी लग्न केलें. मुसलमानांनी हे ऐकले. बनी मुस्तलिक जमात पैगंबरांशी आतां संबद्ध झाल्यामुळे सर्वांनी आपापल्या जवळचे कैदी मुक्त केले. आणि ही जमात नवधर्म घेऊन मित्र झाली. मुहंमदांच्या या लग्नास सर्वांचे आशीर्वाद मिळाले. खैबरखिंडीजवळील ज्यूंवरील मोहिमेंत एक सफिया नांवाची ज्यू स्त्री होती. तिच्याजवळ मुहंमदांनी लग्न केले. माझ्या मनांत ज्यूविषयीं द्वेष नाहीं, हे जणुं त्यांनीं दाखविलें. मक्केत मुहंमदांनीं मैमुनाजवळ विवाह केला. या विवाहामुळे पूवींचे दोन विरोधी वीर इब्न अब्बास व खालिद बिन वलीद हे पैगंबरांच्या बाजूचे झाले. लढाईत पडलेल्यांच्या निराधार बायकांजवळहि त्यांनी अशीच तीन लग्ने केली होती. त्यांच्या पाठीमागचा हेतु विषयासक्ति नव्हता. कांहीं विवाह करुणाप्रेरित होते. कांहीं कर्तव्यासाठी. कांहीं त्या आरंभींच्या कठिण काळी मिळालेल्या मित्रांची मनें न दुखवावी म्हणून. कांहीं जातिजमातींतील वंशपरंपरा चाललेली भांडणं मिटविण्यासाठी. मुहंमदांच्या या अशा विवाहांनी अनेक जाति एक झाल्या. या विवाहांतून वैरें विझलीं, प्रेम वाढले. नवीन संघटित अरब राष्ट्र निर्माण झाले.
 कोणी म्हणतात कीं यांतील कांहीं लग्ने पुत्रेच्छेनेंहि केली गेली असतील. खदिजेपासून जे मुलगे झाले ते सारे लहानपणींच मेले. मुलगा वांचला नाहीं. त्यांना त्यांचे निंदक 'अल-अब्तर' शेपुट तुटलेला असें म्हणत. ज्याला पुत्र नाहीं तो दुर्दैवी मानला जाई. या हेतूनेंहि कांहीं विवाह केले असतील. मुहंमद हे मानवच होते. ते ईश्वर नव्हते. मी साधा मनुष्य आहे, तुमच्यासारखा, असेंच ते अगर्वतेनें म्हणत.
 मुहंमदांवर विलासीपणाचा आरोप माणुसकी असणारा माणुस करणार नाहीं, खदिजेविषयीं किती प्रेम! ती वृद्ध होऊन मेल्यावरहि तिची आठवण येतांच मुहंमद सद्गदित होत. तिची प्रेमळ आठवण त्यांना मरेपर्यंत होती. एकदां आयेषा खदिजेविषयीं कांहीं अपमानास्पद बोलतांच मुहंमदांना अपार दुःख झाले. ते म्हणाले, "जगांत माझ्यावर कोणाचा विश्वास नव्हता तेव्हां तिनें ठेवला. तिची स्मृति पवित्र आहे." लेनपूल लिहितो, "कबरेंत पडलेल्या वृद्ध पत्नीची अशी प्रेमळ स्मृति बाळगणे हे महानुभाव पुरुषाचें लक्षण आहे. विषयी किड्यांच्याजवळ अशी थोर वृत्ति आढळणार नाहीं."
 थोरांच्या लग्नांत महान् अर्थ असतात. जणुं ते पति बनून पालक होतात. सांभाळकर्ते होतात. तें तुम्हां आम्हांस जमणार नाहीं. विष भगवान् शंकरच पचवतील. सात वर्षांच्या मुलीजवळ निग्रही मुहंमदच लग्न लावू शकतील. तुम्ही आम्ही याचें अनुकरण करायचे नसतें. तसे करायला पैगंबरांनी सांगितलें नाहीं. सात वर्षांच्या या मुलीखेरीज बाकीच्या सर्व बायका विधवा होत्या. मुहंमदांनी सर्वांचा सांभाळ केला. या आपल्या भार्यांमार्फत स्त्रियांत ते धर्मप्रचारहि करीत. स्त्रियांत येरवीं विचार कसे जाणार?
 १९३२ सालीं धुळे तुरुंगांत आम्ही होतों. कोणी तरी पू. विनोबाजींस प्रश्न केला, "मुहंमदांनी किती लग्ने केलीं? सात वर्षाच्या मुलींजवळहि."
 विनोबाजी गंभीर झाले. डोळे चमकले.
 "थोरांच्या लग्नाचा पुष्कळ वेळां पालक होणें एवढाच अर्थ होतो. मुहंमदांना का तुम्ही भोगी समजता? ते असे असते तर दुनिया त्यांना जिंकता आली नसती. गिबन, कार्लाईल वगैरे महान् पंडितांनी त्यांची स्तुतिस्तोत्रं गायिलीं नसती. पैगंबर महापुरुष होते. थोर विभूति होते. त्यांचें चरित्र डोळ्यांसमोर आले तर माझी समाधी लागायची पाळी येते!"
 विनोबाजींचे ते कातर सकंप भावभक्तीनें भरलेले शब्द माझ्या कानांत घुमत आहेत. पैगंबरांच्या चरित्राने समाधि लागेल? होय, खरेंच लागेल! तें दिव्य, भव्य जीवन आहे, अलोट श्रद्धेचें, त्यागाचें, क्षमेचें, धैर्याचं संस्फूर्त जीवन आहे. प्रेमळ, निरहंकारी जीवन! गुलामानें जेवायला बोलावलें तरी जात. रस्त्यांत कोणी भेटला तर हातांत हात देत. आणि त्यानें आपला हात काढून घेतल्यावर आपला हात मांगें घेत. परंतु ते आपण होऊन प्रथम आपला हात आधीं मागें घेत नसत. त्यांचा हात अत्यंत उदार होता. त्यांची वाणी अति मधुर होती. त्यांच्याकडे जे जे पहात त्याचे हृदय पूज्यतेने भरून येई. जे जवळ येत ते प्रेम करूं लागत. लोक वर्णन करतांना म्हणत, "असा पूर्वी कधीं पाहिला नाहीं, पुढे असा दिसणार नाहीं!" किती विशुद्ध, प्रेमळ, परंतु शौर्यधैर्याने संपन्न! अशा विभूति- विषयीं पूज्यभावच नाहीं तर प्रेमहि वाटतें. वाटतं याच्या पायांहि पडावें व याच्या गळां मिठीहि मारावी. अरब लेखकांना, अब्दुल्लाच्या या मुलाच्या गुणांचें वर्णन करतांना धन्यता वाटते. हृदयाचे बुद्धीचे हे थोर गुण स्तवितांना परमकृतार्थता व अभिमानहि वाटतो.
 जे प्रतिष्ठित व मोठे असत त्यांच्याजवळ ते सभ्यतेनें वागत. गरिबांजवळ प्रेमानें वागत. आढ्यताखोराजवळ धीरोदात्तपणें वागत. सारेच अखेर त्यांना स्तवूं लागले. हृदयांतील त्यांची उदारता मुखावर फुललेली असे. त्यांना अक्षरज्ञान नव्हतें. परंतु निसर्गाचा महान् ग्रंथ त्यांनीं नीट अभ्यासिला होता. त्यांचें मन वाढतें होतें, विशाल होतें. विश्वात्ग्याजवळच्या समरसतेनें त्यांचा आत्मा जागृत व उदात्त झालेला होता. पंडित वा अज्ञानी दोघांवरहि त्यांचा प्रभाव पडे. आणि त्यांच्या तोंडावर एक प्रकारची भव्य दिव्यता दिसे. प्रतिभाशाली विभूतिमत्व जणुं त्यांच्या अंतर्बाह्य जीवनांतून स्रवत होतें.
 इतरांना ते संस्फूर्त करीत. विभूतिमत्वाचे हें लक्षण आहे. नम्रता व दयाळुपणा, सहनशीलता व स्वसुखनिरपेक्षता, औदार्य व निरहंकारवृत्ति त्यांच्या वर्तनांत भरलेली होती. सर्वांचे प्रेम ते आकर्षून घेत. जेवायला बसतांना ईश्वराचे आभार मानल्याशिवाय, त्याची कृपा भाकल्याशिवाय रहात नसत. आभार मानल्याशिवाय भोजन करून उठत नसत. दिवसा जेव्हां प्रार्थनेत मग्न नसतील तेव्हां पाहुण्यांच्या भेटी मुलाखती घेत. सार्वजनिक कामकाज बघत.
 फार झोंपत नसत. बहुतेक वेळ प्रार्थनेत दवडीत. प्रार्थना त्यांचा प्राण होता. झोंपेपेक्षां प्रार्थना बरी, असें ते नेहमी म्हणत. कट्ट्या शत्रूजवळहि त्यांचे वर्तन उदार व दिलदार असे. त्यांनीं सूड कधींच घेतला नाहीं. राष्ट्राच्या शत्रूंचे बाबतींत अति झाले म्हणजे ते कठोर होत. त्या प्रेमसिंधूला परिस्थितींमुळे कठोर व्हावें लागे. वास्तविक त्यांचे जीवन प्रार्थनामय होतं, प्रभुमय होतें. साधा आहार, झोपायला कठिण चटई, फाटके कपडे व तुटलेल्या वहाणा शिवणें! ते वैराग्य, ती अनासक्ति, ती क्षमा, ती ईश्वरार्पणता, तें हिमालयाचें धैर्य ती समुद्राची गंभीरता, ती निरपेक्ष दया, ती सरळता. कोठे पहाल हे गुण? समुद्राच्या तळाशी मोठीं मोतीं सांपडतात. महात्म्यांजवळच असे गुण आढळतात.
 त्यांचे मन अर्वाचीन होते. ते बुद्धिप्रधान होते, प्रगतिशील होते. नवीन कल्पना घेणारे व्यापक मन होते. संकुचितपणा त्यांना माहित नव्हता. मानवी जीवन म्हणजे उत्तरोत्तर विकासार्थ अमर धडपड! इन्किलाब झिन्दाबाद. ते नेहमी म्हणत, "सतत प्रयत्नांशिवाय मनुष्य जगूं शकणार नाहीं. प्रयत्न माझें काम, फळ प्रभु हातीं." कुराणांत एके ठिकाणीं सांगतात, "तुम्ही स्वतःची बदलण्याची धडपड सुरू करा. मग प्रभु धांवेल."
 मुहंमदांनी ज्या विश्वाची कल्पना दिली, तींत गोंधळ नाहीं. त्या विश्वांत व्यवस्था आहे. विश्वातीत व विश्वव्यापी चैतन्य या विश्वाचें नियमन करीत आहे. मुहंमद एकदां म्हणाले, "प्रत्येक वस्तु कालानुरूप आहे. काल एक वस्तु अनुरूप असेल ती उद्यां असेल असें नाहीं. ईश्वर शेवटी योग्य तेच करील." असें जरी ते म्हणत तरी त्यांनी मनुष्य-प्रयत्नाला वाव ठेवला आहे. आपण प्रयत्न करावे. देवाला जे प्रयत्न फुलवायचे, फळवायचे असतील ते फुलवील, फळवील. मानवाला इच्छास्वातंत्र्य, कर्मस्वातंत्र्य, प्रयत्नस्वातंत्र्य आहे. पैगंबरांची सहानुभूति सर्व भूतमात्रांसाठी. त्यांनी सर्व प्राणिमात्रांसाठीं प्रभूची करुणा भाकली. एका मानवाला वांचविणें म्हणजे सर्व मानव जातीला वांचविणें आहे असें ते म्हणत. समाजाचे एकीकरण करणारे ते होते. ते जोडणारे होते. अति उच्च, उदात्त असें तें मन होतें. तरीहि कौटुंबिक जीवनाचे पावित्र्य विसरत नसत. मानवाची सेवा म्हणजेच ईश्वरभक्तीचं परमोच्च कर्म असे त्यांना वाटे. निराळी भक्ति व पूजा आणखी कोठली? सेवा हीच भक्ति, आपापली कर्तव्ये सोडा, असे कधींहि त्यांनी सांगितलें नाहीं. त्यांची शिकवण सर्वसामान्य मनुष्याला झेपणारी आहे. त्यांचा मर्यादा-धर्म आहे. आपापली नियत कर्तव्ये करण्यांतच पुण्य आहे, धर्म आहे. पैगंबर सांगायचे, "मुलांबाळांची उपेक्षा नका करू. ती प्रभूची ठेव आहे. प्रेमानें व हळुवारपणानें मुलांचं संगोपन करा. मुलांनीहि आईबापांस मान द्यावा, प्रेम द्यावें. तुमच्या कर्तव्याच्या वर्तुळांत तुमचे कुटुंबीच फक्त नसावेत, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्र व ज्यांचे तोंड खालीं झालें आहे असे अनाथ, त्यांचाहि समावेश तुमच्या कर्तव्याच्या वर्तुळांत आहे हे विसरू नका."
 असे हे मुहंमद होते. त्यांच्याहून अधिक विशुद्ध, अधिक प्रतिभाशाली विभूति झाल्या असतील. परंतु जें ईश्वरी कार्य घेऊन मुहंमद आले, त्या कार्याची जितक्या एकरूपतेनें व जितक्या धैर्यशौर्याने व उदात्ततेनें त्यांनी पूर्णता केली, तसे क्वचितच कोणी केले असेल. ईश्वरी संदेश मला द्यावयाचा आहे, ही अखंड जाणीव ठेवून तदर्थ असें सर्व जीवन क्वचित् कोणी दिलें असेल. एका महान् सत्याला त्यांनी जीवनांत स्थान दिलें होतें. त्या सत्यांतून सर्व प्रेरणा घेत होते. तो त्यांचा आनंद तें सत्य म्हणजे ईश्वर एक आहे. हें सत्य त्यांच्याइतकें तीव्रतेनें कोणीहि दिलें नाहीं. त्यांचा अनंत उत्साह या सत्यार्थ होता, क्षुद्र गोष्टीसाठीं नव्हता. असे महापुरुष हे जगाचे, मानवजातीचें मोठें मीठ असतात. मानवजीवन ते सडूं देत नाहींत. स्वच्छ राखतात. मधूनमधून असें दैवी मीठे येत असतें.
 आणि त्यांचा अवतार संपला! पैगंबर मेले तेव्हां उमर म्हणाला, "कसे मेले? अशक्य!" अबुबकर म्हणाले, "मित्रांनो, ज्यांनी मुहंमदांची पूजा केली, त्यांनीं लक्षांत घ्यावें कीं मुहंमद मरण पावले. परंतु ज्यांनी ईश्वराची पूजा केली त्यांचा ईश्वर सदैव आहे, तो कधीं मरत नाहीं!"
 मुहंमद गेले. परंतु तो एक परमेश्वर सदैव आहे. मुहंमद विसरलेत तरी देव विसरू नका. आणि देवाची स्मृति देणारा, त्याला तरी कोण कसा विसरेल? खरें ना?

回 回 回