Jump to content

इत्ता..इत्ता..पाणी

विकिस्रोत कडून



मनोगत


 नवसाक्षरांनी आत्मसात केलेली साक्षरता टिकून राहावी, एवढेच नव्हे, तर नवसाक्षरांचीवाचनक्षमतावाढीस लागावी, वाचनामध्ये गती यावी, त्यामधून त्यांना नवनवीन विषयांची माहिती व्हावी व जीवनाकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी यावी, या उद्देशाने नवसाक्षरांसाठी छोटी छोटी पुस्तके विभागीय साधन केंद्रामार्फत प्रकाशित केली जातात.
 ही सर्व पुस्तके वाचकांना आवडतील अशी आशा आहे. पुस्तकांसंबंधी येणाऱ्या अभिप्रायांचे स्वागतच होईल.
 पुस्तकांच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग लाभला, त्या सर्वांची ही संस्था ऋणी आहे.

औरंगाबाद
संचालक
 

महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था,

औरंगाबाद.

३० सप्टेंबर १९९५
इत्ता.. इत्ता.. पाणी...

शैला लोहिया

 “हिरा पडली.. हिरीत पडली वंऽऽमाय! धावा ओऽऽ कोनी तरी धावाऽऽ" खालून बायांचा एकच कालवा उठला.
 आता धावणार तरी कोण? दुपारची वेळ. गावात बुढी माणसंच. तरणी माणसं गेलीत. मुंबईला नाहीतर नाशकाला. कुणी गवंडी कामावर गेलेत. तर कुणी उसाची तोडणी करायला गेलेत.
 जमिनीला हाताचा टेका देत रानबा लगबगीने उठला आणि दुडकत.. धावत उतारावरून विहिरीकडे जाऊ लागला. विहिरीवर पोचताच धाडकन उडी घेतली. एक डुबकी, दुसरी डुबकी. तरी हाती हिरा लागेना.. शेवटी तिसरी डुबकी घेतली आणि हिराचे केस हाती आले. रानबा घामेजून गेला. मिनतवारीने तिचे ओझे कडेला आणले. वरती बायांची रेटारेटी. आता वर कसे जायचे?. वर काही दणकट तरुण पोरी नि सुना. डोके चालवून दोर खाली टाकला. हिराला वर काढलं. पोट छाती दाबून पाणी काढले. तोंडातून पाणी. . कढी. भात बदा बदा बाहेर आले. छातीचा भाता मंद चालत होता. जणू थांबलाच आहे असा. डोळेही मिटलेले. सखुमायची सविता घाईने पुढे आली. हिराचे तोंडाशी तोंड नेऊन, आत हवा भरू लागली. छाती चोळू लागली. आईला बोलावले. हातपाय चोळायला सांगितले. दहा मिनिटे, दहा तासांसारखी नाही तर दहा युगांसारखी. लांबच लांब वाटलेली. पण हिराने डोळे उघडले नि जोराचा सुस्कारा दिला.

 हिराची सासू मंजुळा. तिने सविताला जवळ ओढले. पाठीवरून हात फिरवला. दोघींचे डोळे भरून आले. सविता सखुमायची धाकटी लेक. यंदा दहावी पास झाली. आता कालिजात जाते. या गावात चौथीपर्यंतच शाळा आहे. पण सखूने हट्टच धरला. सविताचे वडील सखाराम कांबळेनी तो मानला. ती लातुरास मामाकडे राहते. सविता गौरी- गणपतीसाठी येथे आलेली. दोन दिवसांसाठी. पण तिनेच हिराचा जीव राखला.
 हिराला बाजेवर घालून पोरी आणि बायांनी घरी पोचवले.
 या गावाचं नाव आहे कुरणवाडी. डोंगरात वसलेलं हे गाव. शंभर सालाखाली इथे भरपूर झाडे होती. हिरवीगार कुरणे होती. हरेक घरात गायीगुरांची चंगळ असे. दूध दुभते भरपूर. पण अशात सारेच बदलले. चाळीस पन्नास सालात कुरणवाडी ओसाडवाडी झाली. जी कुरणवाडी पंधरा घरांची तिथे आज दोनशे उंबरे झालेत.
 एका एका घरात. दहा बारा पंधरा चुलत-मालत भावंडे. आणि हरेकाची चूल वेगळी. एक वाडा पण आत दहा चुलींचा मांडा. आता दोनशे चुलींना लाकूडफाटा भरपूर लागणार. मोकळी जागा दिसली की बांधा खोली. दारे-खिडक्यांसाठी लाकूड हवेच. शिवाय हर दोन सालांनी दुष्काळाचे सावट. गदा आली झाडांवर. हा. . हा. . म्हणता झाडे तोडली गेली. हिरवे मखमली डोंगर. बुढे नि बोडखे दिसू लागले.
 झाडांची मुळे पावसाचे पाणी धरून ठेवतात. झाडेच राहिली नाहीत,मग जमिनीत पाणी कसे राहणार? हिरवळ कशी झुलणार? अखेर विहिरीचे पाणी आटले. विहिरी बुजून ओसाड झाल्या.

 पाऊसकाळात पाऊस येई. डोंगर उतारावरून सरकन् . . भरकन् पळे. उतारावरून नदीकडे धावे. मग डोंगर आपले कोरडेच राहात. चार महिने थोडी-फार हिरवळ दिसे इतकेच! एरवी जिकडे तिकडे भकास डोंगर. दगड गोटे यांनी भरलेले. उन्हाने भाजताहेत. वाटसरूंना विसावा नाही झाडांचा. पाहावे तिकडे भकास.
 कुरणवाडीला पाणी लांबून आणावे लागे. भर पाऊसकाळातही पाणी आणायचे तर डोंगर उतरून खाली यायचे. वैनगंगेकाठची शिवा थोराताची विहीर गाठायची. डोकीवर दोन घागरी. कमरेवर कळशी. तोल सांवरीत डोंगर चढायचा. जीव घुसमटून जात असे. अंग घामेजून जाई. धाप लागे. कपाळावरचे कुंकू. ते भिजून नाकावर लाल ओघळ येत. दुरून पाहणाराला वाटे जणू जखमच वाहतेय!!
 अशा कुरणवाडीत तालेवाराची लेक कशी येणार?जिथे पोरी भरपूर,तिथलीच लेक इथे सून होऊन येई. पाऊसकाळ संपता संपता कुरणवाडी रिकामी होई. दोनतीन घरे यातून वगळायची. एक देशमुखाचे न दुसरे जगू मारवाड्याचे आणि तिसरे व्यतिपात, सणवार सांगत, दहा गावांत फिरणाऱ्या शंभूदेवाचे. बाकी घरातली तरुण माणसे गाव सोडून जात. रोजगारासाठी मुंबई-पुणे गाठीत. बरेच जण जोडीने साखर कारखाने गाठीत. काहीजण गवंडी कामासाठी मुंबईस जात. गावात उरत लेकुरवाळ्या बाया, पोरीसोरी आणि बुढे मायबाप.
 तर अशी ही कुरणवाडी. बायांना छळणारी. पाणी आणताना कावलेली सून, दर साली विहिरीत पडे. पाय घसरून. मग सारीजण बोलत. 'आसरांचा फेरा थोरातांच्या विहिरीकडे आला. भुकेजून आसरांनीच सुनेला उचलले. पण खरी कहाणी साठी गाठलेली भागूमाय सांगत असे "आसरा कुठून येणार गं? भरली घागर डोईवर घेऊन डोंगर चढायचा. साधी बाब नाही. माणसांना सांगा चार खेपा आणायला! मंग कळंल जीवाची परेशानी. बिचारी तरणी सून. कोणाजवळ मन मोकळं करणार? हिरीचा ठाव घेते नि दुख संपवते. दुसरं काय आहे हातात."
 एखादी सून विहिरीत पडून गेली की गावभर दुखणाई पसरे. आयाबाया आपसात बोलत. तुळतुळ करीत. आज हिची पाळी. उद्या तिची, तर परवा माझीही. उपाय सुचत नसे.

 आज हिरा वाचली. सखुमायची सविता होती म्हणून. सविताचे कौतुक करायचे ठरले. सायंकाळची जेवणी खाणी उरकली. गावची हरेक बाई, मुलगी हिराबाईच्या अंगणात गोळा झाली. हिराची सासू मंजुळा. तिने भगुणं भरून पाणी चुलीवर ठेवले चहासाठी. सवितासाठी चोळीचा खण पेटीतून काढून ठेवला. हे डोकं हिराचं. ती पण पाचवी पास आहे. गुणी पोर आहे. पण इथे चव कुणाला? सासूला बरीक कवतुक आहे. सविताला खण दिला. पाठीवरून हात फिरवला. सविता आनंदली. बोलू लागली
 "शहरात बाया एक होतात. रिकामे हंडे घेऊन सरकारी साहेबाकडं जातात. जोराजोरात मागणी करतात. मग सायबाला ऐकावंच लागतं. गावचा पुढारी. तोही मदत करतो. आपणही तसेच करू. पंचायत समितीत जाऊ. सभापतीला आपली अडचण सांगू. पलडागावची केशर देशमुखीण. तिला निवडून दिलंय आपण. तिला बरोबर नेऊ. किती दिवस हाल सोसायचे? लेकरू रडलं नाही तर माय दूध पाजत नाही. हे तर सरकार आहे!!" सविताचे बोलणे बायांना कळत होते. पटत होते.
 मग ठरले. सोमवारी तालुका गाठायचा. अहमदपूर गाठायचे. प्रत्येक बाईन यायलाच हवे असे ठरले.
 गावातली पुरुष माणसं.. तीही बुढी. बायांचा बेत ऐकून मनात हसली. बायांचं काय चालणार सरकारी सायबापुढे? बायांचं डोकं चुलीसमोर चालायचं. सरकारी ऑफिसात यांची डाळ कशी शिजणार?
 पण बायांनी मनावर घेतलं: बुधवारी तालुक्याचं गाव गाठलं. हिरा, सखुमाय, सविता अशा पाच-सातजणी केशर देशमुखिणीकडे गेल्या. तिची भेट घेतली. कुरणवाडीची जंजाळ कथा तिच्या कानावर घातली. हिरा बोलू लागली, "पुढारीण सासूबाई, तुमची हिरा वाचली. तिचं नशीब मोठं. सविता गावात होती. पण दरसाली गावातली नवी सून नायतर कायम माघारपणाला आलेली गरीब लेक विहिरीत मरतेच. काळुंकेची मथुरा, जगतापाची लेक भामा, वरपेमामांची शांता. किती नावं सांगू? विशी-बाविशीचं तरुण वय. पण जीवनात आनंदच नाही. गेल्या साली गयाकाकीची सून पद्मा मेली. दहा माणसांचं घर. एकली सून. पाणी भरता भरता थकून जाई. एक दिवस गेली ती आली नाही. शोध शोधलं. दुसरे दिवशी फुगून वर आली. घडा वरती पडलेला.
 आमी तुमाले मत दिलंया. तुमी चलावं लागतंय तालुक्याला. तुमी पुढं व्हा. आम्ही मागं येतो."
 केशरबाईने होकार दिला. तारीख ठरली. वार ठरला. येईल तो सोमवार नक्की केला.
 दोन दिवस बायांची भलतीच धांदल. बाई घराबाहेर जायची. मग भाकरी, धपाटे करून ठेवा. चटणी, लोणचे बाहेर काढून ठेवा, सारी तयारी तिनेच करायची. पहाटे शंभर-सव्वाशे बाई वाट चालू लागली. यलडा आले. केशरताई तयारच होती. तिथूनही पाऊणशे बाई निघाली.
 साडेदहा वाजलेले. अहमदपूरचा बाजार.. दोन अडीचशे बाया. दोन-दोनजणी हाती हात घेऊन. ओळीने चालताहेतः पुढे दोघी रिकामी, उलटी घागर डोईवर घेऊन. शहरातील माणसे चकित. जो. . तो बघतोय. मनात विचार. "या खेडवळ बाया जाणार कुठे आणि कशाला?"

 पंचायत समितीचा सभापती हरीभाऊ. चाटे आणि बी. डी. ओ. साहेब आनंदा जाधव. सारेच चकित झाले. सामोरे गेले. बायांना सावलीत बसवले. हरिभाऊ बोलू लागले.
 "बहिणींनो, भर उन्हात चालत आलात. कोनची अडचण आली? मला सांगायचं. सांगावा धाडायचा. मी सोता आलो असतो. मी तुमचा भाऊ पाठीशी हाय."
 ते ऐकताच केशरबाई खवळली. बोलू लागली, "भाऊ, खरं काय ते बोला. उगा नाटक नको. किती दिवसांपासून सांगतेय. डोंगरात प्यायाला पानी नाही. पानी भरलेले टँकर, टाक्या बैलगाडीवर घालून किती गावांना पाठवनार? ते पानी कुना कुनाला पुरनार? कुरणवाडीत दरसाली दोन तरी बाया मरतात. भरली घागर घेऊन डोंगर चढावा लागतो. हापसा करा नायतर जुनी हीर आहे. तिचा गाळ काढा. असा धावा कितीदा धरला मी? सांगाना खरं. आमी निवडून आलेल्या बहिणी. सहीसाठी आमची जागा. तेवढाच आमचा उपयोग. कंदीतरी आमचा बी इचार घ्यावा!"
 बोलता बोलता धाप लागली. हरिभाऊ पण हबकून गेले.
 बी. डी. ओ सायबांनी समजावले.
 "ताई,किती चांगलं बोललात. सभेतपण असं बोलत ज़ा. मग सभापतींना काम करावंच लागेल. बहिणींनी हेका धरावा. नि भावांनी तो पुरवावा.
 तुम्हा बहिणींची मागणी खरी आहे. या डोंगरातली सारीच गावे पाण्याविना भकास आहेत. विहिरीचे पाणी आटलेले. नवी विहीर खोदली तरी पाणी लागेल अशी आशा नाही. यात दैना बायांची होते. पाणी भरता भरता कंबर वाकून जाते. जीव थकून जातो. मी बी लहान गावातच वाढलोय." "होय साहेब. जीवनातला सारा आनंद नासून जातो." सखूबाई बोलू लागली.
 "सविता नसती, तर हिराची लाश हाती लागती. ही भागूबाय बघा, साठी जवळ आलीय. पण दिसते सत्तरीची. माजी चाळीसी आलीय. पन आमी बाया ऐन जवानीतच वाकून गेलोत. पानी नाही ते घर कसं? घराला घरपन देनारी बाईच. मग उचला घागर नि पळा हिरीला. धा-बारा मानसांचं घर. पंचवीसं घागर पानी लागतंच. आंगुळीपांगुळी, कपडे, भांडी, धुणं, जनावराला पानी हवं. ती तर मुकी लेकरंच! शिवाय सारवण,सणवार."
 "होय! होय! सगळं खरंय ताई. मुंबईचा पानीवाला साहेब येऊन गेला. सारा डोंगर पालथा घालून गेला. पण जमिनीच्या पोटातच पानी नाय, तेच कमी झालंया. काय भागूमाय?". सभापती बोलले.
 "होय रे पोरा. जवा लगीन होऊन सासरी आले, तवा कशी होती कुरणवाडी? जणू हिरवा शालू पांगुरलेली नवी नवरीच. झाडांची दाटीवाटी, आठ सालांची आसंल मी. थोडं थोडं आठवतंया. गावात घरं होती पंधरा, नायतर वीस. शहरंगावं वाढू लागली. अहमदपूर, परळी, आणखी कितीतरी. कुरणवाडीतून लाकडांची तोड सुरू झाली. भरभरून बैलगाड्या शहरदिशेने रवाना होत. दुष्काळाचा फेरा दर दोन सालांनी येई. पाहता पाहता कुरणवाडी बोडकी झाली. झाडं इकून लोकांनी पैका केला. झाडं लावाचा मातुर कोणाला सुचलं नाही. गडीमानसांचं शानपन हे असं. आमी तर काय बायाच! डोकं चालवाया शिकवलंच नाय."भागूमायला बोलता बोलता दम लागला.
 थोडावेळ सगळे कसे शांत शांत. कोणीच बोलेना. मन कातरलेले. डोळे ओलावलेले.
 "ताई, आता नका बोलून लाजवू. आमी पाण्याची सोय करतो. पण तुमचीही मदत हवी. एकीची नाही साऱ्या गावाची. गावातल्या बहिणींची. देणार मग?....."
 बी. डी. ओ. भाऊंनी विचारले.
 "हो. . हो. . देऊ की." जोरात आवाज उठला.
 "यंदा झाडं लावायची" बी. डी. ओ. भाऊ बोलले.
 "पन झाडाले पानी कोन आननार? ते कुठून आनायचं?" सखूमावशींनी विचारले.
 "ऐका, तेच तर सांगतोय. तुमचं गाव डोंगरातलं. जिथे तिथे चढ नि उतार. पाऊस पडतो. पाणी सरक़न् वाहून जातं. ते यंदापासून जागोजाग आडवूया." बी. डी. ओ. भाऊं बोलले. "आत्ता बया! पानी कसं आडवावं माय? ते तर पळनारच की!” बुढी भागुमाय बोलली.
 "हे. बघा आजी. खड्डा खणला की पाणी साठतंय की नाही? मग डोंगर उतारावर चौकोनी खड्डे खणायचे. खोल आणि रुंद. ओळींनी खणायचे. उतारापाशी दगडगोटे रचून पाणी अडवायचे. काय?" भाऊंनी विचारले.
 तशी हिरा बोलू लागली,
 "होय भाऊ. मी दोन सालाखाली आंबाजोगाईला गेले होते. माजा मामा साकुडचा. ते गाव बी डोंगरातच हाय. तिथे डोंगराला करदोडा घालावा तशी खोल नाली खणलीया. आन् कडेला झाडं लावलीया. · नालीत पाणी तुंबतं. झाडं उनात बी हिरवीगार दिसत्यात. दरड रचून उताराच्या घळी आडिवल्यात. नि डोंगरात लई झाडं लावलीत. लिंबारा.. चिंच.. बिबा.. कडुनिंब.. कितीतरी! गावात हरेक घरासमुर पपई, चिमकुरा, शेवगा नि तुळस दिसनारच. मोरीचं पानी झाडांमधून खेळवलंया. गेल्या चार सालात हिरीचं पानी बी वाडलंया असं समदे बोलतात खरं!!"

 "मग ठरलं तर. यंदा वरची बुजलेली विहीर गाळ काढून मोकळी करू. ती भरेतो टँकरने पाणी पाठवतो. पण तुम्ही झाडं लावायची तयारी करायची. यंदाचा पाऊसकाळ वाया जाऊ देऊ नका. कबूल?"
बी. डी. ओ. भाऊंनी सवाल केला.
 चाटे भाऊंनी पाजलेला चहा पिऊन.साऱ्याजणी मिळून मिसळून गावाकडे परतल्या.
 ही गोष्ट चार सालांखालची! आता सारेच बदलले. बायांचे महिला मंडळ जोरात काम करते. वनराई लावली आहे. जागोजाग पाणी अडवले आहे. विहिरीचे पाणी वाढलेय. यलडागाव नि कुरणवाडीला नळयोजना मंजूर झाली आहे. वैनगंगेत विहीर घेऊन ते पाणी डोंगरावर टाकीत साठविणार आहेत.
 हं, आणिक एक सांगायलाच हवे. हिराबाई आता गावची सरपंचीण आहे. हिरा पाय घसरून विहिरीत पडली. आणि गावची लाईनच बदलली.
 दर साली पाऊसकाळ येतो. गावची लहान पोरं-सोरं गाऊ लागतात.


... इत्ता इत्ता पानी
गोल गोल रानी
हिराबाईने केली किमया
गावात आलं पानी