अ‍ॅलिस

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchआमची नवी प्रकाशने

रंगशाळा

कै. नरहर कुरुंदकर

एक होता फेंगाड्या

डॉ. अरुण गद्रे

वजलेख

डॉ. विद्या-सप्रे चौधरी

असं जगणं तोलाचं

डॉ. शेषराव मोहिते

संस्थापक

  रा. ज. देशमुख
  प्रकाशक 
  डॉ. सु. रा. देशमुख 
  देशमुख आणि कंपनी
  पब्लिशर्स प्रा. लि. 
  ४७३ सदाशिव पेठ,
  पुणे - ४११ ०३०
  © जाई निंबकर
  मुद्रक
  एस. एम. जंगम 
  जंगम कलामुद्रण 
  १९६ पाषाण, पुणे-८
  आवृत्ती पहिली
  १९९४
   मूल्य 
  पन्नास रुपये
 "ॲलिस' च्या रुपाने आज मराठी साहित्याला आम्ही एक नवा आकृतिबंध देत आहोत अशी आमची भावना.

 व्यक्तिमत्वाचा विकास दर्शविणारे साहित्य मराठीमध्ये दुर्मिळच. जाई निंबकरांनी मोठ्या सामर्थ्याने, थोडक्या शद्वात परंतु रेखिवपणे "अलिस" चा विकास दाखवला हेच "ॲलिस' चे सर्वात मोठे यश.

एस्
अ‍ॅलिस


जाई निंबकर
हॉस्पिटल


उज्ज्वला लौकिकार्थाने अ‍ॅलिस मेलेलीच आहे.पण वैद्यकशास्त्रानुसार अजून थोडी धुगधुगी उरली आहे. ती विझून जायची वाट पाहत आम्ही बसलोय. कुणी तरी मरण्याची वाट पाहत असं बसणं हे किती भयानक असतं.
 फ्रेनी माझ्याशेजारीच बसलीय. ती इथे का आलीय मला समजलंच नाही. काय चाललंय तिच्या मनात? ॲलिस आपल्या डोळ्यांसमोर मरताना पाहण्यात तिला काही समाधान लाभतंय? खरं म्हणजे ती ह्या सगळ्याच्या पलिकडे गेलेली असायला पाहिजे. जगरहाटीनुसार ती अ‍ॅलिसच्या आधीच जायची, रुस्तुम गेला तेव्हा. पण ती जगली, जगत्येय. कशासाठी माहीत नाही. आयुष्यातला केवढा तरी भाग ॲलिसचा द्वेष करण्यात, तिच्यावर मात करण्याच्या प्रयत्नात तिने घालवला. पण रुस्तुम मेल्यावर ह्या सगळ्यालाच अर्थ उरला नाही. कदाचित ते तिला शेवटी उमजलं असेल आणि तिचं इथे येणं म्हणजे एक मुकी क्षमायाचना असेल की काय कोण जाणे. फ्रेनीच्या बाबतीत मी कोणतेच आडाखे ठामपणे बांधू शकत नाही.
 कुणीतरी, अ‍ॅलिसबद्दल बोलता बोलताच असलं पाहिजे, म्हटलेला एकच शब्द मला ऐकू आला. "बिच्चारी." अ‍ॅलिस बिच्चारी ! वरच्यावर डोळ्यात भरून येणाऱ्या अणूंच्या दाटीत मला हसू आलं.

– ★ –


फ्रेनी


 अ‍ॅलिस फक्त एक साहसिनी होती. त्यापेक्षा जास्त काही नाही. त्या काळात असे पुष्कळ इकडे आले. सुमार बुद्धी, बेताचा सामाजिक दर्जा, जेमतेम चरितार्थापुरता पैसा. फक्त त्यांच्यातल्या काहींच्यात आपल्या देशात आपल्याला फार काही मिळवण्याची संधी नाही हे उमजण्याची अक्कलही होती आणि ते मिळवण्याची महत्त्वाकांक्षाही होती. अशांना वसाहतींसारखं उत्तम ठिकाण दुसरं कुठलं ? आपल्यासारखे नशीब काढायला आलेले मूठभर देशबांधव आणि गोऱ्या कातडीला पूजनीय मानणारी नेटिव प्रजा. इथे काहीही घडू शकतं. आपण घडवू शकतो. फक्त देश सोडायची तयारी पाहिजे आणि जुगाऱ्याचा पिंड पाहिजे. बस्स. इतकंच.
 ही त्यातलीच एक. घरची गरिबी. मुलांच्या गोष्टीतली जाच करणारी सावत्र आई. आईच्या कलानं चालणारा बाप. सोळाव्या वर्षी ती शाळा सोडून नोकरी करायला लागली आणि दैवाच्या एका फटक्यात तिला कायमचं घर सोडून जायची संधी मिळाली. तिच्या डोळ्यांना म्हणे कसला तरी विकार झाला आणि तिची दृष्टी एकदम कमी व्हायला लागली. अनेक तपासण्यांनंतर शेवटी हे मानसिक ताणामुळे असावं असा निष्कर्ष काढला गेला. डॉक्टरांनी तिला हवापालट आणि विश्रांतीचा सल्ला दिला. ज्याची सेक्रेटरी म्हणून ती काम करीत होती त्याने तिला प्रवासखर्च आणि पगारी रजा द्यायचं कबूल केलं. माझी खात्री आहे की, तिनं आपल्या उदारपणाचा फायदा घेऊन हिंदुस्थानात जायचं ठरवावं हे त्याला सर्वस्वी अनपेक्षित असलं पाहिजे. पण एकदा पुढे केलेला मदतीचा हात त्याला मागे घेता येईना. तिनं फासे फार हुशारीने टाकले होते. ती हिंदुस्थानात आली ती परत न जाण्याच्या बेतानेच. देव जाणे तिचा आजार तरी कितपत खरा होता. मी तिला पाहतेय तेव्हापासून तिच्या डोळ्यांत कसलाच दोष नव्हता. चष्मा सुद्धा तिला पन्नाशीच्या सुमाराला लागला.
 बऱ्यापैकी रूप आणि चारचौघांत सफाईदारपणे बोलण्या-वागण्याची हातोटी ह्यांच्या जोरावर तिने मुंबईतल्या श्रीमंत समाजात मुसंडी मारली. एका ओळखीतून दुसरी, एका आमंत्रणातून दुसरं असं करीत प्रत्येक पार्टीत, समारंभात ती दिसायला लागली. तिच्यावर फिदा झालेले एकदोन तरुण ब्रिटिश अधिकारी होते. पण प्रेमात पडून ज्याच्या भविष्याची काही शाश्वती नाही अशा पुरुषाशी लग्न करणाऱ्यांतली ती नव्हती. तिनं पुरुषोत्तमदास बाठियाला आपल्या जाळ्यात पकडलं. पण तो तिच्यापेक्षा हुशार निघाला. तो एवढा मोठा उद्योगपती झाला ते काय भोळा भाबडा होता म्हणून ?त्यानं हिला आपल्याबरोबर मिरवलं, तिच्यावर पैसे उधळले आणि शेवटी तिला निरोप देऊन आपल्या तोलाच्या एका उद्योगपतीच्या मुलीशी रीतीप्रमाणे लग्न केलं.
 अ‍ॅलिस निडर होती हे मात्र कबूल करायला पाहिजे. दुसरी एखादी खचून गेली असती. तोंड लपवायला मायदेशी परतली असती. हिनं बाठियासारखा माणूस आपल्यासारखीशी लग्न करणार नाही हे वास्तव स्वीकारलं आणि मग एकामागून एक श्रीमंत बकरे शोधून त्यांची मैत्रीण म्हणून मिरवता मिरवता बरीच पुंजी गोळा केली.
 शेवटी जी गोष्ट घडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं ती घडली.अ‍ॅलिसनं रुस्तुमवर जाळं टाकलं. रुस्तुमनं तिच्यात काय पाहिलं ते मला कधीच कळलं नाही. त्याच्याइतका सुशिक्षित, सुसंस्कृत माणूस शोधून सापडणं कठीण. तो उत्तम कवी आणि कलाकार होता. त्याच्या मित्रांच्या वर्तुळात प्रसिद्ध लेखक, शास्त्रज्ञ, उद्योजक अशी माणसं होती. अशा माझ्या रुस्तुमने आपल्यापेक्षा वीस वर्षांनी लहान, अत्यंत सामान्य अ‍ॅलिसशी लग्न करावं हे जगातलं एक आश्चर्यच मानलं पाहिजे. पण पुरुष मूर्ख असतात. कितीही बुद्धिमान असले तरी एखाद्या सुंदर मुलीनं त्यांच्यावर भाळल्याचं नाटक केलं की विरघळून जातात.अ‍ॅलिसनं नाटक तर छान वठवलं.
 आधी आधी रुस्तुम तिला वरच्यावर जेवायला वगैरे बोलवायला लागला तेव्हा मी एकदा म्हटलं, "तिला कशाला तू बोलावतोस सारखा सारखा ?"
 "तिनं काय घोडं मारलंय तुझं? बिचारी एकटी आहे इथं, म्हणून बोलावतो."
 "अरे, पण तुम्हा कुणाला ऐकण्यात रस वाटेल असं एक वाक्य तरी बोलू शकते का ती ? अशिक्षित अडाणी आहे अगदी."
 रुस्तुम हसला. "तू अडाणी म्हणतेस, मी साधी सरळ म्हणतो. प्रत्येकानं साहित्य-कला-विज्ञान ह्यांच्याबद्दल विद्वत्तेचं प्रदर्शन करीत बोललं पाहिजे असं कुठंय ? मला बदल म्हणून तिचं साधं रोखठोक बोलणं आवडतं. उगाच आपल्यापाशी नाही त्याचं सोंग नाही आणीत ती."
 खरं म्हणजे ह्या त्याच्या बोलण्यावरनंच मला धोका कळायला हवा होता, पण मी आंधळी बनले होते कारण रुस्तुम तिच्यात गुंतण्याची यत्किंचितही शक्यता मला वाटली नव्हती. वाटायला पाहिजे होती, कारण रुस्तुम जरी गरीब नव्हता तरी तिच्यावर वाटेल तसे पैसे उधळण्याइतका श्रीमंतही नव्हता. तरी सुद्धा ती त्याच्या मागे लागली होती तेव्हा ह्यात काहीतरी काळंबेरं आहे असं मला कळायला हवं होतं. जेव्हा उमजलं तेव्हा सगळ्याच गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. ती त्याला जळूसारखी चिकटली ती कायमचीच.
 अजून कधी कधी मला वाटतं की, त्याच्या रागाची पर्वा न करता मी त्याला जागं करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. पण मला हेही माहीत आहे की त्यावेळी त्याला जागं व्हायचंच नव्हतं. तिच्यात काहीच वैगुण्य पहायला तो तयार नव्हता. ती किती सुंदर आहे ह्याचं सुद्धा तो तोंड भरून कौतुक करायचा. एकदा मी म्हटलं, "त्यात मूळ सौंदर्य किती आणि प्रसाधनांची किमया किती कोण जाणे." तर तो म्हणाला, "पण प्रसाधनांचावापर करून जास्तीत जास्त सुंदर कसं दिसायचं हे तरी तिला कळतं ना ? मला अशा कित्ती बायका माहीतायत की मारे रंगरंगोटी करून सुद्धा भीषण दिसतात." हा रुस्तुम एकेकाळी नटूनथटून तोंडाला रंग फासून आहोत त्यापेक्षा सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणाऱ्या बायकांबद्दल तुच्छता दाखवायचा !
 ती किती उदार आहे हेही तो बोलून दाखवायचा. एकदा आमची जरा अडचण असताना तिनं आपले चार दागिने मोडून पैसे उभे केले होते. दागिने तरी कुठले, तर मित्रांकडून उकळलेले.आणि शेवटी ती ह्या कुटुंबातलीच एक होती ना ? मग जे केलंन त्यात एवढं मोठं औदार्य कसलं ? आम्ही नाही आमच्याकडे होतं नव्हतं ते सगळं दिलं?
 ॲलिस काय होती न कुठे येऊन पोचली ! अन् हे सगळं आमच्या नावावर. नाहीतर कोण कुत्रं तिला विचारीत होतं ? तिच्यात असं काय होतं की, तिला इथल्या समाजात लाभलं ते स्थान लाभावं ? फक्त गोरा रंग. पण ह्या देशात तेवढंच बास आहे हे तिनं चटकन हेरलं होतं. इथं ती ज्या वर्तुळात वावरली तशा तऱ्हेच्या वर्तुळात तिच्या देशात तिला कुणी थारा दिला नसता. पण इथे ती कशी का असेना इंग्लिश मड्डम म्हटली म्हणजे जणू आकाशातनं अवतरली असं वाटतं लोकांना.
 ती केवळ संधीसाधू होती हे रुस्तुमला कधी कळलंच नाही शेवटपर्यंत की, त्याला ते कळलं होतं पण तिच्यावरच्या निष्ठेमुळे म्हणा किंवा आपले तिच्याबद्दलचे आडाखे चुकले हे कबूल करण्यात कमीपणा वाटल्यामुळे म्हणा, तो तिच्याबद्दल काही वाईट बोलायचा नाही. ती मात्र त्याच्याबद्दल असलं काही पथ्य पाळीत नसे. कुठेही काहीही बोलायची. तो एक कवी, चित्रकार आहे ह्याचं तिला काहीच कौतुक नव्हतं. तू काहीतरी काम कर, नोकरी कर असा ती सारखा त्याच्यामागे लकडा लावायची. नोकरीच्या धकाधकीत त्याची कला गुदमरून जाईल ह्याचं तिला काही सुतक नव्हतं.
 "ते तरी काम तो कुठं करतो ?" असं ती म्हणायची. "अधनंमधनं कॅन्व्हसवर चार ब्रश मारायचे ह्यानं काही कलाकार होत नाही. त्याचं एक तरी एक्झिबिशन झालंय का ?"
 मी म्हटलं, "प्रसिद्ध होणं म्हणजेच उत्तम कलाकार असणं असं आहे का ? कितीतरी चित्रकारांना त्यांच्या सबंध आयुष्यात प्रसिद्धी लाभली नाही. ते मेल्यावर कित्येक वर्षांनी लोकांना त्यांच्या कलेची किंमत कळली."
 "पण ती कळण्यासाठी त्यांच्यामागे त्यांनी काढलेली चित्रं तर ! होती ना?"
 इतका दुष्टपणा ! पण मी गप्प बसले. माझा भाऊ स्वतःच्या समर्थनाचा एक शब्दही काढीत नाही तोवर मी त्याच्या वतीने भांडून तरी काय होणार ? एकदा मी त्याला असं म्हटलं तर तो म्हणाला, "अगं तू कशाला तिचं बोलणं मनाला लावून घेतेस ? ती नुसती मस्करी करीत असते." ही कसली जीवघेणी मस्करी ?
 पुढे त्याचं पहिलं एक्झिबिशन झालं तेव्हा मात्र ती तिथे अगदी उत्सवमूर्ती म्हणून वावरत होती, येणाऱ्यांच्या पुढेपुढे करीत होती. जशी काही तीच त्याची स्फूर्तिदेवता होती.
 आपल्याला मूल व्हावं अशी रुस्तुमची फार इच्छा होती. ॲलिसला दिवस गेले तेव्हा त्याला फार आनंद झाला. ती मुलाची हौस आहे असं दाखवायची, पण खरं म्हणजे तिला मूल नको होतं. नाहीतर ती अशी वागली नसती. ती आपल्या कसल्याही सवयीत काडीचाही फरक करायला तयार नव्हती. "हॅ:, ह्या सगळ्या खुळ्या समजुती आहेत, असं करू नये न् हे खावं न् ते पिऊ नये. गर्भार बाईला अगदी नेहमीचं नॉर्मल आयुष्य जगता येतं."
 ती वाट्टेल ते खायची-प्यायची, उंच टाचांचे सँडल्स घालून झपाझपा चालायची, दडदड जिने चढायची नि उतरायची, पार्ट्यांना जाऊन उशीरपर्यंत जागरणं करायची. मी रुस्तुमला म्हटलं, "ती एक अवखळ आहे, पण तुला तरी वयाबरोबर काही शहाणपण आलंय की नाही? तू तिला काही सांगत का नाहीस?"
 "हे बघ, ती माझ्यापेक्षा लहान असली तरी कुक्कूबाळ नाहीये. तिला तिचं हित कळतं."
 "असं तुला वाटतं."
 "तुला नसलं वाटत तर तू बोल तिच्याशी."
 "तुला माहीताय ती माझं काही ऐकत नाही. ह्या बाबतीत तर नाहीच नाही. ती असा आव आणते की, मला मूल नाही म्हणून मी ह्या प्रांतात सर्वस्वी अडाणी आहे."
 तो मोठ्याने हसला." झालं तर मग. तू आपली गप्प बस. तिचं ती बघून घेईल."
 "तुम्ही दोघं असं वागता की, मूल होणं हा एक पोरखेळ आहे. आयुष्यात कशाचाच तुम्ही गंभीरपणे विचार करीत नाही, पण पुढे पस्तावाल, सांगून ठेवत्येय."
 "मग तू आम्हाला आय टोल्ड यू सो म्हण. "माझा भाऊ माझ्याशी इतका हृदयशून्यपणे वागेल असं मला स्वप्नातही खरं वाटलं नसतं.
 ह्या बाबतीत तरी आय टोल्ड यू सो असं म्हणायची पाळी यावी अशी काही माझी इच्छा नव्हती. रुस्तुमला मूल व्हावं असं मला मनापासून वाटत होतं. पण व्हायचं तेच झालं आणि केवळ आपल्या हट्टीपणापायी ॲलिसने ते मूल गमावलं. नंतर तिला कधी मूल झालंच नाही. त्याबद्दल तिनं फारशी खंत केली नाही, कारण मुळातच तिला मूल नको होतं. तिला जे स्वैर आयुष्य जगायचं होतं त्यात मुलाला जागाच नव्हती.
 ॲलिसचा गर्भपात झाल्यावर रुस्तुम खूप गंभीर, उदास असे. मग ती त्याची समजूत घालायची, "इतकं का तू मनाला लावून घतोस ? आपल्याला अजून पुष्कळ मुलं होतील. अजून माझं वय थोडंच गेलंय?"
 पण वर्षांमागून वर्ष गेली तरी ॲलिसला पुन्हा दिवस गेले नाहीत. मी रुस्तुमला हळूच एकदा सुचवून पाहिलं की, त्यांनी डॉक्टरी सल्ला घ्यावा. पण तो नुसता खिन्नपणे हसून म्हणाला, "जे माझ्या दैवात असेल ते होईल. ते डझनावारी डॉक्टर, तपासण्या, कृत्रिम पद्धतींचा उपयोग हे सगळं मला फार अघोरी वाटतं." त्याच्यासारख्या संवेदनशील माणसाला असं वाटावं हे साहजिकच होतं, पण तरी त्यानं ह्या बाबतीत काहीतरी प्रयत्न करून पहावा असं मला फार वाटत होतं. शेवटी मी सगळा अभिमान गुंडाळून ठवून ॲलिसशी बोलले तर ती म्हणाली, "प्रत्येक माणसाला मूल झालंच पाहिजे असं कुठाय ?" ही खास ॲलिसची स्टाइल. माझं बोलणंच खुंटलं. मग ती पुढे म्हणाली, "पारश्यांना तर नाहीच होत. उगीच का तुमची लोकसंख्या रोडावत चाललीय ?"
 एकदा माझा मावसभाऊ फारुख म्हणाला, "खरं म्हणजे रूस्तुम, निदान पाच-सहा तरी मुलं होऊ देणं हे पारशी तरुणांचं कर्तव्य आहे."
 "का?" ॲलिस म्हणाली.
 "नाहीतर मग पारशी रहाणारच नाहीत जगात."
 "त्याबद्दल कुणीही अश्रू ढाळणार नाही. आणि तुम्हाला इतकीच आच असली तर तुम्ही कुणाला पारशी धर्माचं मानायचं न् कुणाला समाजाबाहेर टाकायचं ह्याबद्दल असले मूर्खासारखे नियम का पाळता ?"
 तसं सगळं गमतीगमतीतच चाललं होतं. पण मूर्ख हा शब्द फारुखला झोंबला असावा. तो म्हणाला, "मग काय तुम्हा ख्रिश्चनांसारखं वाट्टेल त्या उपायांनी बाटवून लोकांना आमच्या धर्मात ओढावं असं तुला म्हणायचंय ? माफ कर. असले प्रकार करण्यापेक्षा पारशी जमात नाहीशी झाली तरी परवडलं असंच कुणीही खरा पारशी म्हणेल."
 मला वाटलं ॲलिस चिडेल पण ती हसली. म्हणाली, "वाः फारुख, बरोबर आहे तुझं. फक्त तुम्ही ख्रिश्चन म्हणू नकोस. मी स्वतःला ख्रिश्चन समजत नाही."
 ॲलिस एकूणच पारशी धर्माची, रीतीरिवाजांची टर उडवायची संधी कधी सोडीत नसे. झरीन तिच्या नवऱ्याच्या प्रकृतीसाठी मंगळवारचे उपास करते, सोली अमावास्येच्या दिवशी प्रवासाला निघत नाही ह्या गोष्टींचं तिला पोट दुखेस्तो हसू यायचं. ज्या संस्कृतीबद्दल आपल्याला काही माहीती नाही त्या संस्कृतीची अशी हेटाळणी करणं हे मी तरी सुसंस्कृतपणाचं लक्षण मानीत नाही.
 एकदा फारुखनं तिला विचारलं, "तू एका पारश्याशी कसं लग्न केलंस ग?"
 "मला वाटलं होतं तो वेगळा असेल म्हणून. पण तो तसलाच निघाला. पारशी कितीही शिकले सवरले ना, तरी ते त्यांचे निरर्थक सनातनी रीतीरिवाज, कर्मकांड सोडीत नाहीत."
 "त्यालाच संस्कृती म्हणतात, मुली."
 "संस्कृती ! हॅ: !"
 ती खोलीतून निघून गेल्यावर मी त्याला म्हटलं, "तू कशाला तिच्याशी वाद घालीत बसतोस ? ती एक भांडकुदळ आहे, पण तू तरी सोडून द्यायचंस."
 त्यानं आश्चर्यानं विचारलं, "का ? तिच्याशी वादावादी करायला मजा येते."
 म्हणजे फारुखलाही तिनं भुरळ घातलीय एवढं मला समजलं. पुरुष बायकांच्या बाबतीत मूर्ख असतात. बरंसं रूप, छानछोकीनं रहाणं, हसून खेळून चटपटीत संवाद फेकणं ह्यातच आकर्षक व्यक्तिमत्त्वाचं मर्म आहे असं त्यांना वाटतं. नाहीतर रुस्तुम तिच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेता ना.
 तिच्या स्वभावाचा एक फार तापदायक पैलू आमच्या फार उशिरा लक्षात आला. ती अती मत्सरी होती. अर्थात लग्न झाल्यावर बरीच वर्ष रुरतुम तिच्या भोवतीच रुंजी घालायचा तेव्हा तिच्या मत्सराला काही वाव नव्हता. पण पुढे पुढे एखाद्या बाईकडे नुसतं त्याने रसिक नजरेनं पाहिलं किंवा ती किती सुरेख आहे नाही ? असं सहजपणे म्हटलं तरी ती अकांडतांडव करायची. तो कलाकाराच्या नजरेनं सगळ्यातलं सौंदर्य बघतो ह्याची तिला जाणच नव्हती. एकदा ती म्हणाली, "फक्त तरुण सुंदर मुलींच्यातलं सौंदर्य बघायला कलाकाराची नजर लागत नाही !"
 पुढे ती एकटी रायरेश्वरला जाऊन राह्यला लागली, तेव्हा तिच्या डोक्यातलं हे खूळ जरा कमी झालं. माझी खात्री होती की तिनं तिथे कुणाशी तरी संधान बांधलंय. मी उज्ज्वलाला विचारलं तर तिनं काही पत्ता लागू दिला नाही. ही उजू एकेकाळी माझी छोटी मैत्रीण म्हणून आमच्याकडे अगदी घरातलीच असल्यासारखी येत जात असे. पण ॲलिस आल्यावर तीही मला दुरावली.
 मी विचार केला, असेना का ॲलिसचं एखादं लफडं. त्यामुळे तिनं बिचाऱ्या रुस्तुमला सतावायचं सोडलं तर बरंच झालं. पण रुस्तुम इतका नशीबवान नव्हता. तो काही दिवस कलेची जाण, रसग्रहण आणि समीक्षा शिकवण्यासाठी एक अभ्यासवर्ग घेत असे. त्या वर्गातली एक मुलगी अवंतिका. खूप हुशार होती. शिकवलेलं चटकन आत्मसात करायची. कधीकधी वर्गाव्यतिरिक्त सुद्धा ती आमच्या घरी यायची. रुस्तुमसुद्धा तिच्याशी गप्पा मारण्यात अगदी रंगून जायचा. ह्यात खरं म्हणजे ॲलिसला मत्सर वाटण्यासारखं काही नव्हतं. तिनं त्याच्या क्षेत्रात कधी रस घेतला नव्हता. मग दुसऱ्या कुणी घेतला आणि त्यामुळे रुस्तुमला तिच्याबद्दल आत्मीयता वाटली तर हिला त्याबद्दल वैषम्य वाटायचं काय कारण?
 काही दिवस अवंतिकेवरून तिच्यात आणि रुस्तुमच्यात काही कुरबूर चालली होती. मग एकदा ती कुठून तरी बाहेरून आली. ही दोघं चहा पीत गप्पा मारीत बसली होती. ॲलिस सरळ अवंतिकेच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. म्हणाली, "तू कशाला सारखी इथ येतेस ? तुला काय वाटलं तो खरंच तुझ्याशी लग्न करणार आह म्हणून ? मूर्ख पोरी, अगं हे असंच सांगून त्यानं आत्तापर्यंत पन्नासजणी झुलवल्यात. तू फार लहान आहेस. तुझ्या अजाणपणाचा, कोवळ्या वयाचा तो फायदा घेतोय हे कळण्याइतकी सुद्धा समज तुला आली नाही. जा चालती हो इथून. तुझा बाप काय, आजा शोभेल अशा माणसापायी तुझं आयुष्य बरबाद करू नकोस."
 हा कडकडाट ऐकून मी बाहेर आले. अवंतिका विचार गोरीमोरी होऊन रुस्तुमकडे न बघता निघून गेली. मी ॲलिसला म्हटलं, "का एवढा गहजब करत्येयस ? त्याच्या कलाजीवनात घेणारं कुणी त्याला भेटलं ........"
 "कलाजीवन ! फ्रेनी तू तरी अगदी हद्दच करतेस. ती बिचारी कोवळी पोरगी नि तू सारख्याच अजाण आहात अस समजायचं का ? तू एक डोळ्यांवर कातडं ओढून घेतलस तरी जगाला तुझा भाऊ काय आहे हे माहीत नाही असं तुला वाटत ?"
 "जग काय वाट्टेल ते म्हणेल. जगाला काय कुणाची तरी निंदानालस्ती करायला मजाच येते. पण जगाचं ऐकून आपल्याच नवऱ्याचे वाभाडे काढण्यात तुला काय मिळतं ?"
 "मी जगावर विश्वास ठेवीत नाही फ्रेनी. फक्त स्वतःच्या कानाडोळ्यांवर ठेवते. तू माझ्याशी येवढा वाद घालत्येयस तर रुस्तुमला विचार ना त्यानं त्या मुलीला मी तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणून सांगितलंय की नाही."
 "मी कुणाला काही विचारीत नाहीये."
 "का ? माझ्यावर विश्वास नाहीये ना तुझा ? मग त्यालाच विचार. रुस्तुम, बोल की. ऐकतोयस ना तू सगळं ? मग उत्तर दे ना."
 "इतक्या अपमानकारक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधलेला नाही." असं म्हणून रुस्तुम रागाने उठून गेला.
 मी ॲलिसला पुन्हा समजावायचा प्रयत्न केला. "असं संशयी असून चालत नाही, बाई. संशयावर कुठलंच नातं आधारलं जाऊ शकत नाही. नवराबायकोचं तर नाहीच नाही."
 "हा संशय नाहीये फ्रेनी. ही खात्री आहे."
 "कशाच्या आधारावर तू असं म्हणतेस?"
 "माझ्या ओळखीच्या एका बाईने मला सांगितलं. अवंतिका तिच्या ऐकण्यात असं म्हणाली की, रुस्तुमने तिला सांगितलंय की, तो माझ्याशी घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्न करणार आहे, कारण त्याला मूल हवंय. हे त्याच्या खरंच मनात आहे की नुसतं तिला झुलवण्यासाठी तो म्हणाला मला माहीत नाही, पण तू त्याला सांग की वाट्टेल ते झालं तरी मी त्याला घटस्फोट देणार नाही. मी माझे होते नव्हते तेवढे सगळे पैसे तुम्हाला खड्डयातून काढायला खर्च केलेत. शिवाय नोकरी करून वर्षानुवर्षं तुम्हाला पोसलंय. आता माझंही वय झालंय. तेव्हा घटस्फोट घेऊन घरदार सोडून मी काही कुठे जाणार नाही. माझा ह्या सगळ्यावर हक्क आहे. आणि रूस्तुमच्या काकांच्या इस्टेटीतले पैसे त्याला मिळालेत त्याच्यावर सुद्धा."
 माझं रुस्तुमवर प्रेम आहे म्हणून मी त्याला सोडणार नाही असं म्हणायचे कष्ट तिनं घेतले नाहीत. तिच्या लेखी लग्न म्हणजे नातं जोडणं नव्हतं, एक व्यवहार होता आणि ह्या व्यवहारात स्वतःचा शक्य तेवढा फायदा कसा करून घ्यायचा हे ती बघायची. रायरेश्वरच्या बंगल्याचंच घ्या.
 कधीकधी उन्हाळ्यात तिथला एक बंगला भाड्याने घेऊन आम्ही तिथे रहायला जात असू. ॲलिसला पहिल्यापासूनच हे ठिकाण आवडलं. मुंबईच्यापेक्षा तिथली उंचावरची थंड हवा तिला अर्थातच कशी जास्त मानवते ह्याचं रुस्तुम कौतुक करायचा. पुढे बंगल्याच्या मालकाने तो विकायला काढला. योगायोगाने त्याचवेळी रुस्तुमचा चुलता वारला. त्याच्या इस्टेटीतला वाटा रुस्तुमला मिळाला, आणि माझ्या सल्ल्याविरुद्ध रुस्तुमने त्यातले पैसे घालून बंगला विकत घेतला. केवळ ॲलिसच्या हट्टाखातर. खरं म्हणज मुंबईच्या फ्लॅटची बरीच डागडुजी, रंगरंगोटी करायला झाली होती, पण ती तशीच राहून गेली. ॲलिसने तिचं देणं वसूल करून घेतलं.
 अर्थात ते एवढ्यावर थांबलं नाही. रायरेश्वरच्या बंगल्याची आपल्या आवडीनुसार सजावट करण्यात तिनं आणखी हजारो रुपय उधळले. एखाद्या जुन्या इंग्रजी कादंबरीतल्या जमीनदारणीप्रमाणे ता शनिवार-रविवार मित्र-मैत्रिणींना तिकडे बोलावून त्यांची सरबराई करायची. मला तिथे जायलाही नको वाटायचं, पण रुस्तुमच्या आग्रहाखातर मी जायची. बंगला आपल्या एकटीच्याच मालकाचा आहे, आपण तिथल्या सर्वेसर्वा आहोत अशा थाटात ॲलिस वागायची ते मला सहन होईनासं झालं. आम्ही जणू इतर पाहुण्यांप्रमाणच उपरे आहोत असं वागवायची ती आम्हाला.
 नंतर सुदैवाने रुस्तुम रायरेश्वरला जायचा थांबला. त्याचा प्रकृतीही बरी नसे, आणि त्याने अनिच्छा दाखवली तर ॲलिसही त्याला आग्रह करीत नसे. माझ्या कानावर तिथे राहणाऱ्या एका इंग्लिश माणसाबद्दल जे आलं होतं ते रुस्तुमनेही ऐकलं होतं का काय मला माहीत नाही, पण तो मला कधी त्याबद्दल बोलला नाही. मीही त्याला विचारलं नाही. अवंतिकेबद्दल मात्र मी एकदा त्याला विचारलं होतं. तेव्हा तो नुसतं म्हणाला, "मी तिला असं काहा म्हणालो असेन ह्यावर तुझा विश्वास बसतो का ?"
 "अर्थातच नाही."
 "मग झालं तर. सोडून दे ती गोष्ट."
 "पण ॲलिसनं तरी ....."
 "सोडून दे म्हटलं ना ?"
 मग मी गप्पच बसले. जे वाटतंय ते बोलावं, एकमेकांची सुख-दुःखं वाटून घ्यावी इतकी जवळीक ॲलिस आल्यापासून आमच्यांत राहिलीच नव्हती. जणू लग्न केलंय म्हणजे तो आपल्या मालकीचा झाला, दुसऱ्या कुणाशी त्याचं नातं राहिलं नाही अशा ढंगाने ती नेहमी वागत आली.
 तिचं त्याच्यावर खरोखरच प्रेम असतं, त्याला तिनं सुख दिलं असतं, तर मी तिला हजार गुन्हे माफ केले असते. पण तिनं त्याच्याशी लग्न केलं ते केवळ समाजातल्या त्याच्या स्थानावर, पैशावर डोळा ठेवून. ह्या लग्नसंबंधातून तिला हवं ते सगळं मिळालं. रुस्तुमला मात्र तिनं काहीच दिलं नाही.
 काय गंमत आहे ! ही उज्ज्वला रुस्तुमच्या प्रेमात पडलीय असं एकदा मला वाटलं होतं. पण अशी काही भावना तिच्या मनात स्थिर होण्यापूर्वीच मी प्रकरणात हस्तक्षेप केला. एकतर ती वयाने फार लहान होती. दुसरं म्हणजे उच्चमध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली हा मुलगी आमच्यात सामावून जाऊ शकणार नाही असं मला वाटलं. आणि मग ही कोण कुठली आगापिछा नसलेली ॲलिस येऊन आमच्या राशीला लागली !
 उज्ज्वलाला ॲलिसबद्दल एवढं प्रेम का वाटायचं हे मला कधी उमजलं नाही. कदाचित उज्ज्वला साध्या सरळ स्वभावाची, कशाकडेच फारशा चिकित्सकपणे न बघणारी आहे म्हणून असेल. तिचे डोळे वरच्यावर भरून येतायत. पण माझा रुस्तुम गेला तेव्हा डोळ्यांतून पाणी न काढणाऱ्या ह्या बाईसाठी मी काही रडणार नाहीये.

- ★ -

उज्ज्वला ॲलिसबद्दल मला सगळ्यात काही आवडलं असलं तर ते म्हणजे तिचा बिनधास्त स्वभाव. ती आयुष्य आपल्याला रुचेल तसं जगली आणि अमुक केलं तर कोण काय म्हणेल ह्याचा तिनं विचार केला नाही. कदाचित फ्रेनी म्हणाली तसं ती ह्या समाजाचा भागच नव्हती. त्यातून ह्या देशावर राज्य करणाऱ्यांच्या वंशाची, गोऱ्या कातडीची. मग इथले लोक काय म्हणतील ह्याची फिकीर करायचं तिला काय कारण होतं ? आणि केली नाही तर त्यात एवढी कौतुकाची बाब काय ? पण खरं म्हणजे ती पहिल्यापासून स्वतःला इथल्या समाजाचा घटक समजली. गोऱ्या कातडीचा दर्प तिच्या वागण्यातून मला कधीच जाणवला नाही.
 एकदा हा देश आपला मानल्यावर इथे आल्यापासूनच्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांत ती फक्त दोनदा इंग्लंडला जाऊन आली. ती सुद्धा पहिल्या वीस-पंचवीस वर्षांत. त्यानंतर ती गेली तर नाहीच, पण तो देश, तिचं घर, कुटुंबातली माणसं ह्यांच्याबद्दलच्या आठवणींचे उमाळे तिनं कधी काढले नाहीत. तिच्या भावाकडून दर वर्षी तिला ख्रिस्मस कार्ड यायचं. त्यात, तिच्याच शब्दात सांगायचं तर, तू कशी आहेस, आम्ही छान आहोत असा मजकूर, कुणाच्या तरी नवीन जन्मलेल्या बाळाचा फोटो, कुणी तरी मेल्याची बातमी असं काही असे. तिच्याकडून तसलंच कार्ड त्याला जायचं. एकदा ती म्हणाली, "आम्ही हे का करतो हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचं आहे. इतके दिवस दूर राहिल्यावर आमच्यात देवघेव करण्यासारखं काही राहिलं नाही. माझं इथलं आयुष्य तर त्याच्या अनुभवाच्या इतकं बाहेर आहे की त्याबद्दल त्याला लिहिणं निरर्थक आहे."
 मी म्हटलं, "पण त्याचं तिथलं आयुष्य तरी तुझ्या ओळखाच आहे ना ?"
 "हो, आहे ना !" आणि ती मोठ्याने हसली. "जे जगण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी इकडे पळून आले ते मला अनोळखी कसं असेल ? गेल्या वेळेला मी तिकडे होते ना, तेव्हा माझ्या मनात सारखं काय येत होतं सांग ? मी त्याच्या जागी नाही हे माझं केवढं नशीब."
 म्हणजे तसं तिच्या भावाचं काही वाईट चाललं होत अस नाही, पण त्याच्या वाट्याला आलेलं एकसुरी आयुष्य तिला जगायचं नव्हतं. काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यात घडावं असं तिला वाटत होतं, आणि ते लंडनमधे बसून घडण्याची सुतराम शक्यता नाही हे दिसत होतं. तेव्हा आपल्याला हवं असलेलं भविष्य आपणच घडवायचं तिनं ठरवलं.
 त्या काळात पुरुषांना तरी नशीब काढायला किंवा चाकोरीबाहेरचं कर्तृत्व दाखवायला एखाद्या ब्रिटिश वसाहतीत जाऊन राहणं हा एक राजमान्य मार्ग होता. बायकाही ह्या मार्गाने जायच्या पण त्या वेगळ्या कारणासाठी. वसाहतीत नोकऱ्या करणारे, व्यापारासाठी आलेले अनेक तरुण असत. त्यांच्यातल्या कुणाला तरी गटवून लग्न करण्याची शक्यता असे. पण ॲलिस त्या हेतूनं आली नव्हती. ती पहिल्यापासूनच इथल्या समाजात जास्त मिसळली. फ्रेनी अर्थात म्हणायची की, गोऱ्या लोकांपुढे गोंडा घोळणाऱ्या समाजात तिला जी किंमत होती ती गोऱ्या लोकांनी तिला कधीच दिली नसती. पण ॲलिसने एकदा मला सांगितलं होतं की, तिला हिंदुस्थानाविषयी, हिंदी लोकांविषयी जबरदस्त आकर्षण होतं. इथल्या स्वातंत्र्यलढ्यासाठी पैसे जमवायला केलेलं कुणाचं तरी भाषण ऐकून ती भारावून गेली होती. तेव्हापासून संधी आली तर हिंदुस्थानात जायचं असं तिनं पक्कं ठरवून टाकलं होतं. तिचे आणि ह्या देशाचे गेल्या जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असले पाहिजेत असं ती गंभीरपणे म्हणायची.
 तिला आणि रुस्तुमला प्रथमच एकत्र पाहिलं तेव्हा त्यांचं एकमेकांबद्दलचं आकर्षण मला लगेच जाणवलं. फ्रेनीला ते जाणवलं नाही म्हणून ती गाफील राहिली म्हणा, किंवा रुस्तुमच्या भावना तिचा अडथळा पार करून जाण्याइतक्या तीव्र होत्या म्हणा, रुस्तुमनं ॲलिसशी लग्न केलं तर खरं. त्यानं लग्न करावं की नाही हे जर फ्रेनीवर अवलंबून असतं तर तो कायम बिनलग्नाचा राहिला असता. पण तिच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं त्यापासून त्याला काय किवा ॲलिसला काय, कितपत सुख लाभलं कोण जाणे. कारण जणू लग्न केलं हा तिचा मोठा अपराध केला, तेव्हा नंतर त्याचं पारमार्जन करण्यासाठी प्रत्येक गोष्ट फ्रेनीच्या कलाने घ्यायची असंच रुस्तुम वागला. ॲलिस आणि फ्रेनी ह्यांच्यातल्या समरप्रसंगात तो अलिप्त तरी राहिला किंवा फ्रेनीच्या बाजूने तरी. ॲलिसच्या बाजूने, अगदी सुरुवातीची काही वर्ष सोडली तर कधीच उभा ठाकला नाही आणि तरीही ह्या लढाईत शेवटी फ्रेनीच जिंकली असं काही म्हणता येत नाही.
 खरं म्हणजे त्यांच्या घरात प्रथम फ्रेनीशीच माझी मैत्री झाली. आम्ही त्यांच्या शेजारच्या फ्लॅटमधे रहायला आल्यापासून मला त्याच्याबद्दल अखंड कुतुहल वाटत असे. त्यांच्या घराच्या सजावटीत विशेष अभिरुची होती. जुनं पिढीजात सुंदर कलाकुसरीचं काळसर तपकिरी शिसवीचं फर्निचर, खरेखुरे पर्शियन गालिचे, देशा-परदेशातून कुणी कुणी आणलेल्या कलात्मक वस्तू, भिंतीवर लावलेली चित्रं (त्यातली काही रुस्तुमची होती हे मला नंतर कळलं) सगळ्याच गोष्टींचं मला आकर्षण वाटे.
 आम्ही ज्या इमारतीत राहत होतो, तिच्या जागेवर पूर्वी फ्रेनीच्या कुटुंबाचं घर होतं. ते फ्रेनीचे वडील, त्यांचा भाऊ आणि बहीण ह्या तिघांच्या समाईक मालकीचं होतं. तिचे वडील वारल्यावर काही वर्षांनी घर विकायचं ठरलं. एक तर एवढ्या मोठ्या घराची आता गरज नव्हती. सुरुवातीला त्यांच्याबरोबर राहणारा चुलता आता हैदराबादला स्थायिक झाला होता. आत्या मरून गेली होती. आणि तिची एकुलती एक मुलगी लग्न करून गेली होती. तिचाही वडिलोपार्जित घरात वाटा होताच. घर आता इतकं जुनाट झालं होतं की त्याची डागडुजी करायची म्हणजे फ्रेनीच्या आईला दिवाळंच काढावं लागलं असतं. शिवाय घरावर हक्क सांगणारे दोघे दुरुस्तीच्या खर्चाचा वाटा उचलायला तयार नव्हते. शेवटी एका बिल्डरला घर विकून त्याचे पैसे घेण्याचं त्या दोघांनी मान्य केलं. फ्रेनीच्या आईला काही पैसे आणि एक फ्लॅट मिळाला. फ्लॅट तसा लहान होता असं नाही, पण त्यातली एक मोठी खोली म्हणजे रुस्तुमचा स्टुडिओ होता. एकदा मी फ्रेनीला विचारलं, "रुस्तुमचं लग्न झालं, त्याला मुलं झाली म्हणजे ही जागा तुम्हाला अपुरी नाही का पडणार ?" ती म्हणाली, "तो लग्न करील तेव्हा बघू." ह्यावेळी फ्रेनी अजून तिशीतच होती. शिवाय ती वयाने रुस्तुमपेक्षा लहान होती, पण तरी ती लग्न करून ह्या कुटुंबातनं बाहेर जाईल अशी शक्यताही माझ्या डोक्यात आली नव्हती.
 रुस्तुम चित्रकार आहे, कविता करतो ह्या गोष्टींनी मी खूप प्रभावित झाले होते. त्याच्या रूपाचा, वागण्याचा सगळ्याचाच मला मोह पडला होता. त्याच्या दोन-चार कविता दर्पण नावाच्या एका अत्यंत अप्रसिद्ध मासिकात छापून आल्या होत्या. त्या वाचायला नेऊन मी आपल्या वहीत उतरून घेतल्या होत्या, आणि मधूनमधून त्यांचं पारायण करीत असे. तो पेंटिंग करताना बघत बसायला मला आवडायचं. आराखड्यापासून चित्र तयार होईपर्यंतच्या सर्व क्रिया मला जादूभरल्या वाटायच्या. तो कधीतरी मला मॉडेल म्हणून घेईल किंवा निदान माझं एखादं लहानसं चित्र काढील असं स्वप्न मी बाळगून होते. त्याच्या चित्रांत एक तऱ्हेचं निळं-करडं गूढ वातावरण, धूसर आणि बिनचेहऱ्याची माणसं असत. एकदा मी त्याला विचारलं, "आपल्या डोळ्यांना दिसतं तसं तू का चितारीत नाहीस ?" तेव्हा खूप हसून तो मला म्हणाला, "माझ्या डोळ्यांना दिसतं तसंच मी काढतो." वयातल्या फरकाचा त्याला काही विधिनिषेध नव्हता, पण मला वाटतं मी लहान मुलगी ह्या सदरात मोडत असताना त्याची माझी गाठ पडल्यामुळे तो मला सदैव लहान मुलगीच समजत राहिला. मोठी झाल्यावर कधीकधी मी मुद्दाम नखरा करून त्याच्यासमोर जायची, पण तो नेहमीच्याच मोकळेपणाने "हॅलो ब्यूटिफुल" किंवा "कुणाच्या लग्नाला गेली होतीस ?" असं म्हणायचा. "अरे, हे सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ?" असा भाव त्याच्या आवाजातही नसे आणि चेहऱ्यावरही नसे. त्याच्यासमोर फक्त एक अतिपरिचित छोटी मुलगी असे. तिची तरुणी झालेली त्याच्या कधी लक्षातच आली नाही.
 प्रेमभंगाचं दुःख पचवता पचवता कधीतरी मी प्रेमाबाहेर पडले आणि मग ज्या त्याच्या रूपाने मला मोहवलं होतं ते..... गोरा रंग, उंच सडपातळ बांधा, धरधरीत नाक, पातळ जिवणी ..... मला बायकी वाटायला लागलं. त्याचं स्वतःच्या पोशाखात फारच रस घेणं, अति आदबशीर वागणं, एवढंच काय त्याचे साहेबी थाटाचे इंग्रजी उच्चार ह्या सगळ्यात मला काहीतरी खोटं, कृत्रिम दिसायला लागलं. त्यानं थोडंफार नाव मिळवलं तरी त्याची कला समीक्षकांनी विशेष उचलून धरली नाही, आणि त्यानं खरडलेल्या चार-दोन कविता छापणाऱ्या मासिकाचा संपादक त्याचा मित्र होता हे कळलं तेव्हा त्याही बाबतीत माझा भ्रमनिरास झाला. मग त्याच्याविषयीचं माझं स्वप्नरंजन आठवून मी किती मूर्ख होते असं मला वाटायला लागलं.
 आणि तरीही ह्या सगळ्याच्या पलिकडे एक रुस्तुम आहे ह्याची मला जाणीव होती. उमद्या स्वभावाचा. कुणाला न दुखवणारा. "समीक्षकांचं काही मनावर घ्यायचं नसतं. ते ठरवूनच एखाद्याला डोक्यावर घेतात, दुसऱ्याला खाली खेचतात," असं फ्रेनी म्हणाल्यावर गोडसं हसून तिला पाठीवर थोपटणारा पण तिच्याशी सहमती न दाखवणारा.
 एकदा कधीतरी रुस्तुमचं लग्न झाल्यानंतर माझी आई मला म्हणाली, "तुला माहीताय उज्ज्वल तुझी फ्रेनी मला एक दिवस भेटायला आली होती. म्हणाली, "तुमची मुलगी फार लहान आहे,अननुभवी आहे म्हणून मुद्दाम तुम्हाला सावध करायला आलेय. रुस्तुम तिच्याशी खूप मोकळेपणानं वागतो. पण तो सगळ्यांशीच तसं वागतो. विशेषत: बायकांशी. ती कधीही आली की, हॅलो ब्यूटिफुल म्हणून तिला हाक मारतो. ती काही म्हणाली की, अगदी लक्षपूर्वक ऐकतो. खरं म्हणजे असल्या गोष्टींना काही अर्थ नसतो, पण तुमची मुलगी जरा वेगळ्या वातावरणात वाढलेली आहे. तिनं अशा वागण्याचा चुकीचा अर्थ लावू नये." मी विचारलं, "मग तू काय म्हणालीस ?"
 "मला तिचा रागच आला होता. भोचक मेली. मी म्हटलं, माझी उज्ज्वल लहान असेल, पण शहाणी आहे. तिच्याबद्दल तुम्हा काही काळजी करू नका."
 मी नुसतीच हसले.
 आई 'तुझी फ्रेनी' म्हणाली ते बरोबर होतं. वयात फरक असला तरी तिची माझी चांगली मैत्री जमली होती. तिचा रोखठोक स्वभाव, प्रसंगी तिखट बोलणं मला आवडायचं. ती जराशी खत्रुड असली तरी मुळात दिलदार होती आणि कुणाशी मतभेद असले तरी ती मनात काही कडूपणा ठेवीत नसे. त्यामुळे तिच्या ॲलिसशी वागण्याचा मला जास्त धक्का बसला. नणंद-भावजय हे नातंच शत्रुत्वाचं असलं तरी फ्रेनीसारख्या शिकलेल्या, सुसंस्कृत बाईनं इतकं तोल सोडून वागावं हे मला खटकायला लागलं. ॲलिस अगदी सर्वगुणसंपन्न होती असं नव्हे. किंबहुना नव्हतीच. रूप, तारुण्य, उसळता स्वभाव एवढं सोडलं तर तसं खास तिच्यात काहीच नव्हतं. त्यामुळे तिच्यावर अखंड टीका करणं, तिच्याविषयी तिरकस बोलणं ह्यातून फ्रेनीचाच क्षुद्रपणा उघडा व्हायचा.
 ॲलिसचा गर्भपात झाला तेव्हा तिच्या बेदरकार वागण्यानं तिनंच तो ओढवून घेतला, कारण तिचा मूल नकोच होतं असा सूर फ्रेनीनं लावला.
 मी म्हटलं, "मूल नकोच असलं तर त्यासाठी गर्भपातापेक्षा कमी अघोरी उपाय असतात."
 "पण रुस्तुमला मूल हवंय हे तिला माहीताय. तेव्हा त्याच्यासाठी नाटक करायला नको का ? त्याला तिचा भोंदूपणा कसा दिसत नाही देव जाणे."
 मी आपलं गमतीनं म्हटलं, "अगं जाऊ दे. प्रेम आंधळं असतं ना?"
 पण फ्रेनी थट्टेच्या मूडमध्ये नव्हती. ती कडवटपणाने म्हणाली, "मूल हवं असण्याचंही नाटक करायचं, मग ते पडलं म्हणून डोळ्यांत पाणी आणून दुःख झाल्याचंही नाटक करायचं. एकूण रुस्तुमला आपल्यात जास्तजास्त गुरफटवून टाकायला बघायचं."
 मग मी सोडून दिलं.
 किंवा रायरेश्वरच्या घराची गोष्ट घ्या. ते रुस्तुमनं फ्रेनीच्या मर्जीविरुद्ध ॲलिसच्या हौसेखातर विकत घेतलं. पुन्हा ॲलिसने नव्याने त्याची सजावट करून घेतली. त्यात बराच पैसा खर्च झाला म्हणून फ्रेनी सारखी तडतड करायची. हे पैसे खरचल्यामुळे काही त्यांना भीक लागली नव्हती. त्याहीपेक्षा पैसे खर्च करायचा ॲलिसला पूर्ण हक्क होता.
 फ्रेनीची आई पैसे लावून पत्ते खेळायची. थोडेथोडके नव्हे, शंभर रुपये पॉइंट वगैरे. घरी हे माहीत नव्हतं. त्यांना वाटायचं ती आपली नुसती क्लबमधे जाऊन पत्ते खेळायची म्हणून. थोडंफार देणं झालं तर परस्पर भागवीत असावी. पण एकदा तिचं नशीब फिरलं. तिच्यावर पैसे चढत गेले. बरेच पैसे चढल्यावर तिनं मुकाट्याने ते देऊन टाकून खेळ सोडून द्यायचा, पण खऱ्या जुगाऱ्याला हे कधी जमत नाही. कधी ना कधी आपलं नशीब पालटेल आणि आपण मोठं घबाड जिंकू अशा दुर्दम्य आशेनं ती खेळत राहिली. शेवटी सगळं उघडकीला आलं, तेव्हा त्यांच्यावर आकाश कोसळलं. डिपॉझिट, शेअर्स वगैरेंमधील गुंतवणूक होती ती कर्जाने गिळूनच टाकली. ह्यावेळी ॲलिसनं तिचे स्वतःचे पैसे काही थोडे होते ते आणि सगळे दागिने देऊन घरदार विकण्याची किंवा गहाण टाकण्याची पाळी येऊ दिली नाही. शिवाय आता पोटाचा प्रश्न आला. ज्याच्याबरोबर तिच नाव एकेकाळी जोडलं जायचं अशा एकाने तिला आपल्या ऑफिसात टायपिस्ट सेक्रेटरीची नोकरी दिली. बरीच वर्षं ह्या तिघा बसून खायची सवय असलेल्या माणसांचा संसार ॲलिसने आपल्या हिमतीवर चालवला. त्याबद्दल फ्रेनीने कौतुकाचा शब्द कधी काढला नाहीच, उलट एवढं मात्र म्हणाली, "ही नोकरी ॲलिसला कशाच्या बदल्यात मिळाली हे कळायला काही फारशा कल्पनाशक्तीची गरज नाही."
 तर आता त्यांचं चांगलं चाललं असताना ॲलिसने आपल्या हौसेखातर पैसे खर्च केले तर फ्रेनीला त्याबद्दल कटकट करायचं काही कारण नव्हतं आणि ॲलिसच्या उधळपट्टीबद्दल तोंड वाजवणारी फ्रेनी आपल्या आईच्या उधळपट्टीबद्दल चकार शब्दही काढीत नसे. म्हातारीला खरेदीची फार हौस. कधीही बाहेर गेली की, एखादा सुंदर सँडल्सचा जोड, रेशमी स्कार्फ, लहानसा दागिना असं काहीतरी घेतल्याशिवाय परतायची नाही. चांगलं-चुंगलं खाण्याचा पण तिला नाद होता. तिचा रोज दुपारचा चहा, महागात महाग मिठाई नि पेस्ट्रीज खाल्ल्याशिवाय होत नसे. ह्याबद्दल ॲलिसची प्रतिक्रिया नमुनेदार होती. "माझी सासू म्हणजे एक ग्रेट बाई आहे. तिला जगण्यातली मजा कशी चाखायची हे छान कळलंय." असं म्हणत म्हातारीसाठी ताजमधून केक्स आणि चॉकोलेट्स घेऊन यायची. ती म्हणायची, "फ्रेनीनं आपल्या आईकडून हे शिकायला पाहिजे. जी माणसं स्वतः आनंदात जगतात ती इतरांबद्दल किरकिर करत बसत नाहीत. बिच्चारी फ्रेनी !" आपल्याला ॲलिस बिच्चारी समजते हे फ्रेनीला मुळीच रुचलं नसतं. ती ॲलिसला शत्रू समजायची आणि ॲलिसनं आपल्याला शत्रू समजावं अशीच तिची इच्छा होती.
 रायरेश्वरचं घर मालकीचं झाल्यापासून ॲलिस तिकडे बऱ्याच वेळा जायला लागली. कधी रुस्तुम, फ्रेनी असायचे पण बरेचदा ती एकटीच जायची. त्यांची एक जुनी फियाट होती ती एकटीच मुंबईहून रायरेश्वरला चालवीत न्यायची. क्वचित मी तिच्याबरोबर जायची. मला तिच्या घरात तिच्याबरोबर रहायला आवडायचं. तिनं घराभोवतालच्या जागेत फुलशेती केली, मधमाशांच्या पेट्या ठेवल्या. हळूहळू ह्या उद्योगांतून तिला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं. एकदा ती म्हणाली, "आता फ्रेनीला तक्रार करायला जागा उरली नाही. ह्या घराचा सगळा खर्च मी भागवते. तेव्हा आता किती खर्च होतोय ह्याची काळजी न करता तिला इथे येऊन चांगलं सुखात रहाता येईल." आणि ती खळखळून हसली. ती असा खट्याळपणा करायची, पण त्यात दुष्टपणा किंवा क्षुद्रपणा नसे. फ्रेनी आली की तिच्या आवडीचे पदार्थ करायचे, तिला हवं बघायचं हे ती मनापासून करायची. फ्रेनीला अर्थात ॲलिस आपल्याला आपल्याच घरात पाहुण्यासारखं वागवते ह्याचा राग यायचा.
 ॲलिसनं मला सांगितलं, "तुला माहीताय उजू, हे घर मला जितकं अगदी माझं वाटतं तितकं मुंबईचं घर कधीच वाटलं नाही. अर्थात फ्रेनीनं वाटू दिलं नाही हे तर खरंच. मी येण्यापूर्वीपासून ती त्या घराची मालकीण होती हे तिनं मला कधी विसरु दिलं नाही. घर ती चालवायची नि तिच्या पद्धतीनं चालवायची. त्यात माझ्यासाठी काही फेरबदल करण्यात येणार नाहीत, इथल्या पद्धतीप्रमाणे आहे त्याच्याशी मला जुळवून घ्यावं लागेल असं तिनं मला प्रथमच बजावलं होतं. तुझ्या सासूनं तुला असंच बजावलं होतं का ?"
 मी म्हटलं, "मी ते धरूनच चालले होते !"
 माझ्या लक्षात आलं की, रुस्तुमच्या आईएवेजी फ्रेनीच तिची सासू झाली होती.
 "मी हे घर घ्यायचा हट्ट केला, कारण मला ते माझं म्हणून हवं होतं. माझं न् रुस्तुमचं. मला वाटलं की, अधूनमधून तरी फ्रेनीच्या नजरेखालून निघून आम्ही सुरुवातीला होतो तसे पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ शकू. पण आम्ही दोघंच अशी इथे कधी राहिलोच नाही. तो म्हणे फ्रेनीला न बोलावता आपण गेलो तर ती दुखावली जाईल, तिला फार वाईट वाटेल. दरवेळी तो तिला बोलावतो आणि ती येते. मग आता मी त्यालाही यायचा आग्रह करणं सोडून दिलंय. काय उपयोग आहे ? कारण इथे आला तरी तो माझ्याबरोबर कुठे फिरायला येत नाही. फ्रेनी सांधेदुखीमुळे फारशी हिंडू शकत नाही, आणि तिला एकटीला सोडून आम्ही गेलो तर तिला वाईट वाटेल ना ! मग मी म्हणते मी आपली एकटी येईन. तुम्ही बसा मुंबईत एकमेकांची डोकी धरून."
 तिनं सोबतीसाठी म्हणून दोन कुत्री पाळली होती. विशेष जातिवंत वगैरे नाही, अशीतशीच. ती तिच्याबरोबर सगळीकडे जायची, अगदी बाजारात सुद्धा. कुत्र्यांना बरोबर घेऊन ती रायरेश्वरच्या सांदीकोपऱ्यात बिनदिक्कत भटकायची. एकदा जंगलात तिला एक अजगर दिसला होता, तर एकदा बिबळ्याच्या पावलांचे ठसे. ती म्हणाली की, बिबळ्या जवळपास कुठेतरी असला पाहिजे, कारण तिचे शूरवीर कुत्रे वाऱ्यावर त्याचा वास आला तशी पाठ फिरवून धूम पळत सुटले आणि थेट घरी येऊन पोचले. एकदा ती म्हणाली की, ती अशीच जंगलातनं येत असताना तिला हलकी कुजबूज ऐकू आली. तिनं इकडेतिकडे पाहिलं तर एका उंच झाडावर तिघं-चौघं माणसं बसून बोलत होती. तिला जे अर्धवट ऐकू आलं त्यावरून त्यांचा कुठेतरी दरोडा घालायचा बेत असावा.
 "मग तू काय केलंस?"
 "मी काय करते ? मला काही दिसलं नाही, ऐकू आलं नाही असं दाखवून मुकाट्याने पुढे गेले, पण त्या झाडापासून बरंच दूर जाईपर्यंत काही माझ्या जिवात जीव नव्हता."
 असं काहीतरी थरारक अनुभवायला मिळावं म्हणून मी रायरेश्वरला गेले की तिच्याबरोबर खूप भटकायची. पण एकदा एक भेकर सोडून मला काहीच दिसलं नाही.
 रायरेश्वरला ॲलिसला एक इंग्लिशमन भेटला. तिच्यासारखाच भारतात राहिलेला. एका श्रीमंत मित्राच्या कृपेनं त्याच्या बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये राहून त्याच्या बदल्यात बंगल्याची देखभाल करणं, बाग लावून तिची निगा राखणं इत्यादी कामं तो करीत असे.
 ॲलिसनं मला सांगितलं की, एकदा फ्रेनीची नि तिची त्याच्यावरून बरीच वादावादी झाली होती. रॉबर्टशी इतका संबंध ठेवणं बरं नाही असं फ्रेनी म्हणाली.
 ॲलिस हसतच सुटली. "इतका म्हणजे किती ?"
  "तू ठेवतेस तितका."
 "फ्रेनी, तुझं बोलणं इतकं हास्यास्पद आहे की, तुझ्याशी वाद घालण्यातही अर्थ नाही. मी पन्नाशीची आहे, तो साठीचा. आम्ही एकमेकांबरोबर चहा-जेवण घेतलं, फिरायला गेलो, गप्पा मारल्या तर त्यात गैर काय आहे हे मला कळू शकत नाही. तरी क्षणभर आपण धरून चालू की, तू सरळ न बोलता जे आडून सुचवतेयस ते खरं आहे. पण मग रुस्तुमचं काय ?"
 रुस्तुम म्हणाला, "ह्यात माझा कुठे संबंध येतो?"
 "रुस्तुम, मांजरानं डोळे मिटलेले असले तरी त्याचं दूध पिणं जगजाहीर असतं."
 "तू कशाबद्दल बोलत्येयस ?"
 "ते तुला चांगलं माहीत आहे. तेव्हा तूच फ्रेनीला समजावून सांग की, तिनं तुला न् मला एकाच मापानं मोजलं पाहिजे. तुला नाही असं वाटत ?"
 हा किस्सा सांगताना ॲलिस म्हणाली, "फ्रेनीनं माझ्याकडे अगदी खाऊ की गिळू असं बघितलं. पण करते काय ? आपलंच नाणं खोटं."
 "ॲलिस, तुला ह्याबद्दल काहीच वाटत नाही ? म्हणजे रुस्तुम आणि त्याच्या 'मैत्रिणी' ?"
 "फारसं नाही. प्रथम वाटत असे, पण मग मला कळून चुकलं की, ते सगळं वरवरचं होतं. एखादा पुरुष खूप आकर्षक असला की दिसेल त्या बाईला गळाला अडकवण्याचा मोह त्याला आवरत नाही. तो त्याच्या स्वभावाचा एक भागच बनून जातो. तसंच थोडंसं रुस्तुमचं झालंय. पण ह्या बायकांना त्याच्या जीवनात तशी काही किंमत नसते. नाही. मला वैषम्य वाटायचं ते ह्या बायकांचं नव्हे, पण तो फ्रेनीला स्वतःवर इतकी सत्ता गाजवू देतो ह्याचं. पारशी पुरुष अति मातृभक्त असतात असं म्हणतात आणि त्यांच्या आया त्यांच्यावरची आपली पकड ढिली पडू देत नाहीत. पण माझी सासू बिचारी सुस्वभावी होती. तिनं मला कधी दुष्टाव्यानं वागवलं नाही. खरं म्हणजे तिनं माझी कधी फारशी दखलच घेतली नाही. ती आपल्या स्वतःच्याच वेगळ्या जगात मश्गुल असे. चांगलं-चुंगल खाणं, उंची कपडे घालणं, क्लबमधे जाऊन पत्ते खेळणं हे सगळ बिनबोभाट मिळालं की, ती दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायला जात नसे. पण फ्रेनी वेगळ्याच मुशीतनं घडलीय. ती रुस्तुममध किती गुंतलीय ह्याची मला लग्नाच्या आधी कल्पना आली असती तर मी रुस्तुमच्या वाटेलाच गेले नसते. अगदी त्याच्या प्रेमात पडले होत तरी."
 रुस्तुम गेला तेव्हा ॲलिस रायरेश्वरला होती. फ्रेनीला भेटायला गेले तेव्हा फ्रेनी दुःखाने सैरभैर झाली होती. नातेवाईकांची गर्दी होती पण ॲलिस दिसली नाही. ती कुठेय म्हणून विचारल तेव्हा फ्रेनी तुटकपणे म्हणाली, "तिच्या घरी."
 "तिला कळवलंय ना?"
 "कशाला कळवायचं ? तिला त्याच्याबद्दल काही वाटत असतं तर त्याची प्रकृती अशी असताना ती त्याला सोडून गेलीच नसती."
 "पण फ्रेनी, काही झालं तरी ती त्याची बायको आहे. तो गेल्याचं तिला नुसतं कळवणार सुद्धा नाही तुम्ही ?"
 फ्रेनी काहीच बोलली नाही. ॲलिसला कळवायचा तिचा इरादा नव्हता हे उघड होतं. मग मीच ॲलिसला फोन केला. ॲलिस येईपर्यंत अंत्यविधी आटोपले होते. ती माझ्याकडे आली तेव्हा रात्र झाली होती. तिनं विचारलं, "मी आज तुझ्याकडे राहिले तर चालेल ?"
 "अर्थात."
 "फ्रेनीला भेटून आले. वाटलं होतं, आता तिला माझा द्वेष करायचं कारण उरलं नाही. पण तिचा दृष्टिकोन वेगळाच होता. मला म्हणाली, 'आपल्यातला रुस्तुम हा एकच धागा होता तो तुटला. आता तुला माझ्याशी संबंध ठेवायचं काही कारण नाही.' बास. गेल्या पावली बाहेर आले."
 ती एकदम रडायला लागली. "त्यांच्या त्या टॉवरमध्ये येऊच दिलं नसतं बहुतेक मला. पण त्याआधी एकदा रुस्तुमला पहायचं होतं. तेवढंही समाधान तिनं लाभू दिलं नाही."
 "रुस्तुम फार आजारी होता का?"
 "आजारी वगैरे काही नाही. त्याला हार्ट अटॅक येऊन गेल्याचं तुला माहीत होतं ना ? त्यातनं उठून तो आता खूपच ठीकठाक झाला होता. तसं पथ्यपाणी होतं. पण त्यावरूनच फ्रेनीचे आणि माझे खटके उडायला लागले. मी त्याला काहीही खायला-प्यायला दिलं की, ते कुपथ्याचं आहे असं ती म्हणायची. डाक्टरांनी थोडा थोडा व्यायाम करायचा सल्ला दिला होता तर, खोलीतल्या खोलीत त्यानं चालावं असं मी सुचवलं तर चक्क मी त्याला मारुन टाकायचा चंग बांधलाय असं म्हणायची. त्याच्यासाठी जे काय करायचं ते सगळं तिनं जातीनं केलं पाहिजे असं तिला वाटत होतं. साधं औषध काढून दिलं तर 'बघू ती बाटली. किती गोळ्या दिल्यास?' असं संशयानं विचारायची. शेवटी मला हे सगळं असह्य झालं. रुस्तुमलाही त्याचा त्रास होत होता. तेव्हा मी निघून जायचं ठरवलं. त्याला गुडबाय करताना मी त्याला सांगितलं, 'तू बघतोयस माझी कशी कोंडी होतेय ती. आत्ता ह्यावेळी मला फ्रेनीशी भांडायचं नाही आणि तूही तिला काही म्हणावंस अशी माझी अपेक्षा नाही. तेव्हा मी इथून जाणंच बरं. तुला डॉक्टरांनी प्रवासाची परवानगी दिली की, मी तुला रायरेश्वरला घेऊन जाणार आहे. मग तिथल्या हवेनं बघ तुझी प्रकृती कशी भराभर सुधारते ती.' पण उजू, आत कुठेतरी वाटत होतं की, ही शेवटचीच भेट. तो म्हणाला, 'रडू नको ॲलिस. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणापलिकडच्या असतात. मी तुला हवं ते कदाचित देऊ शकलो नसेन, पण एवढं मात्र लक्षात ठेव, मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केलंय आणि ही गोष्ट कशानेही पुसून जाणार नाही. म्हणजे त्यालाही कळलं असावं की आता आम्ही परत एकमेकांना भेटणार नाही. हे निरोपाचंच बोलणं होतं."
 रुस्तुम खरंच असं म्हणाला असेल की नाही ह्याची मला शंका वाटली. गेली काही वर्षं तरी त्यांच्यातले संबंध खूपच दुरावले होते. कोण जाणे, कदाचित मृत्यूची चाहूल लागल्यावर माणसं जास्त भावनाप्रधान बनत असतील किंवा तिच्या आठवणीत रुस्तुम हा असा ठेवायचा असला तर तशी तिला मुभा होतीच.
 मी विचारलं, "ॲलिस, रुस्तुम तुझ्याशी असं वागला, प्रत्येक वळणावर फ्रेनीनं तुझी अडवणूक केली नि ती त्यानं मुकाट्यानं करू दिली. तरी तू त्याला धरून का राहिलीस? तू स्वतंत्र होतीस, स्वतःचं पोट भरू शकत होतीस. बरं, त्याच्यापासून वेगळं होण्याचा तुला मोठा बाऊ वाटत असेल असं मला तरी वाटत नाही. मग का ?"
 ती थोडीशी हसली. "ते समजायला तुला रुस्तुम भेटण्यापूर्वीचं माझं आयुष्य माहीत असायला पाहिजे."
 "थोडंफार माहीताय मला."
 "इकडून तिकडून ऐकलं असलंस तर ते काय ह्याची मला कल्पना आहे. पण आता माझ्याकडून ऐक. मी इथे आले ती भाबडी, स्वप्नाळू, हिंदुस्थानाबद्दलच्या रोमँटिक कल्पना मनात बाळगलेली तरुण मुलगी होते. अज्ञातात उडी तर घेतली होती, पण इथे येऊन पोचल्यावर खूप भीती वाटायला लागली. माझ्या बॉसने दोन-तीन नावं दिली होती तेवढाच फक्त आधार होता, पण हळूहळू ओळखी होत गेल्या आणि मी रुळायला लागले. ब्रिटिशांपेक्षा सुद्धा इथल्या हिंदी लोकांनी मला किती चटकन आपल्यात सामावून घेतलं. अगदी थोड्याश्या ओळखीवर सुद्धा कितीजण मला घरी बोलवायचे, पाहुणचार करायचे, हरतऱ्हेनं मदत करायचे. मी परदेशीय आहे असं मला वाटेनासंच झालं, पण ह्या सगळ्याला एक मर्यादा असते हे मला समजलं नाही. मी एकाच्या प्रेमात पडले. माझ्याशी लग्न करण्याचा त्याचा कधीच इरादा नव्हता हे मी सोडून बाकी सगळ्यांना ठाऊक होतं. मला कळलं तेव्हा त्याचा धक्का मोठा होताच, पण चार लोकात माझं हसं झाल्याचा अपमान जास्त तीव्र होता. मी स्वतःशी खूणगाठ बांधून ठेवली, कुणाही पुरुषात गुंतायचं नाही. आणि मग रूस्तुमसाठी मला परत कोलांटी मारावी लागली. मी त्याला इतरांप्रमाणेच चार हात दूर ठेवीत होते. प्रथम त्याने मला लग्नाचं विचारलं तेव्हा मी ते चेष्टेवारीच घालवलं. पण त्याने माझा नकार मानलाच नाही. शेवटी त्याच्या चिकाटीपुढे मी स्वतःभोवती बांधलेल्या संरक्षक भिंती कोसळून पडल्या. नंतर काहीही झालं तरी हे मी विसरू शकत नाही. बाकीच्यांनी मला नुसतं वापरलं. रुस्तुमने माझा परकेपणा, इथे वेगळेपणानं उठून दिसणारं माझं रंग-रूप ह्यांच्याखाली असलेल्या माणसाची कदर केली. माझा हरवलेला आत्मविश्वास, आत्मसन्मान मला परत मिळवून दिला. त्याचं मोल कशातच करता येणार नाही."
 "त्यानं तुला आयुष्यभर दुःख दिल्यावर आता तरी त्याचं ऋण फिटलं असं समजायला हरकत नाही."
 "त्यानं मला आयुष्यभर दुःख दिलं असं नाही म्हणू शकत मी."
 "फ्रेनीनं दिलं म्हण. पण त्यानं ते नुसतं अलिप्तपणे पाहिलं ना?"
 "तो त्याबद्दल काही करू शकत नव्हता."
 "त्याला काही करायची इच्छा नव्हती असं म्हण."
 "तसं नाही मी म्हणू शकत. त्याला फ्रेनीबद्दल अशी काही जबाबदारी वाटत होती की, तो तिला दुखवू शकला नाही."
 "तुला दुखवायला मात्र तो मोकळा होता ?"
 "उजू, आयुष्य असं काळं-पांढरं नसतं. काही तडजोडी प्रत्येकाला कराव्याच लागतात. बरं, अगदी व्यावहारिक पातळीवर येऊन विचार केला, तरी रुस्तुमला सोडून देऊन मी काय करणार होते ? ह्या समाजात मी माझं स्वतंत्र स्थान निर्माण करू शकले नसते. तेव्हा रुस्तुमला चिकटून रहाण्यात माझा स्वार्थही होताच."
 ह्यानंतर ॲलिस परत रायरेश्वरला जाऊन राहिली ती काही वर्षांनंतर एकदम भेटली. तिच्या स्तनात एक गाठ आली होती. तो कॅन्सर ठरला आणि तिचं ऑपरेशन झालं. सुदैवानं रेडिएशन थेरपीचा तात्पुरता तरी उपयोग होऊन ती चांगली बरी झाली. मग एकदा तिनं मला सहकुटुंब रायरेश्वरला राहून जा म्हणून बोलावल होतं. निरोपाचं म्हणून की काय असं मला वाटून गेलं. पण ती मजेत दिसली. आपण फार दिवस जगणार नाही हे तिला कळलेलं असलं पाहिजे, पण त्यामुळे तिच्यात काही बदल झाला नव्हता. रायरेश्वरचं तिचं आयुष्य नेहमीसारखंच चाललं होतं. भटकाभटकी, बागेच्या कामावर देखरेख, बाजार करणं सगळं नेहमीइतकंच मनापासून. तिच्या बोलण्या-वागण्यावर खिन्नतेचं, कारुण्याचं सावट सुद्धा भासल नाही. नेविल शूटची एक कादंबरी मी वाचली होती. त्यात एका गावातले सगळे लोक, आपल्या दिनक्रमात जराही बदल न करता, ॲटॉमिक रेडिएशनमुळे येणाऱ्या मरणाला एक-एक करून सामोरे जातात असं कथासूत्र आहे. ॲलिस त्या कादंबरीतलं पात्र बनू शकली असती.
 आम्ही खूप गप्पा मारल्या. काय आणि कशाबद्दल बोललो ते सगळं आठवत नाही. आठवतं एवढंच की, मी विचारलं, "ॲलिस, तू अगदी तरुण असताना, भविष्यकाळाबद्दल सारासार विचार सुद्धा करण्याची कुवत नसण्याच्या वयात एक तडकाफडकी निर्णय घेऊन आपला देश सोडलास, त्याचा तुला कधी पश्चात्ताप झाला का ग?"
 "कधीच नाही."
 "मनात आणलं असतंस तर तुला परत जाता आलं असतं ?"
 ती मोठ्याने हसली. "म्हणजे माझा परतीचा मार्ग बंद झाला होता म्हणून मी असं म्हणतेय असं तुला म्हणायचंय ? मी परत जाऊ शकले असते. त्यात काही अडचण आली नसती, पण मी कधी तसा विचार केलाच नाही."
 खऱ्या अर्थाने तीच आमची शेवटची भेट.


- ★ -रॉबर्ट हॉस्पिटलच्या वेटिंग रूममधे मुलाच्या जन्माची प्रतीक्षा करणाऱ्या बापासारखा मी येरझारा घालतोय. पण ज्याची मी वाट पहातोय ते मूल म्हणजे मृत्यू आहे. ॲलिसचा मृत्यू. ती न परतीच्या प्रवासाला निघालेलीच आहे, फक्त डॉक्टरांनी तिच्यातली शेवटची धुगधुगी सुद्धा उरली नाही असा दाखला द्यायचीच खोटी आहे.
 मी इथे कशाला थांबलोय ? तिच्या अचेतन शरीराला शेवटचं पहाण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी ? नाही, त्याचा मला मोह नाही. मला फक्त एवढंच पहायचंय की, तिच्या शरीरावर तिच्या इच्छेप्रमाणे संस्कार होतात ना. तिच्या इच्छेनुसार तिला अग्नी देऊन नंतर तिची राख रायरेश्वरच्या दऱ्याखोऱ्यांत विस्कटायची. खरं म्हणजे ती मातीत पाय ठामपणे रोवून उभी राहणारी होती. म्हणूनच ह्या असल्या काही बाबतीतला तिचा हळवेपणा अनाकलनीय होता. तिचा मूर्ख नवरा, उदाहरणार्थ. त्याच्या बाबतीत ती हळवी नसती तर त्यांच्या लग्नात काही अर्थ उरला नाही असं पटल्यानंतर ती त्याला चिकटून राहिली नसती. अर्थात रुस्तुमशी लग्न करण्यात आपण चूक केली हे तिनं कधी कबूल केलं नाही कारण ती फार मानी होती. एकदा मी तिला रुस्तुमबद्दल विचारलं होतं.
 ती म्हणाली, "त्याला सोडून देऊन काय करू ?"
 "माझ्याशी लग्न कर."
 "तुझ्याशी लग्न ?" ती मोठ्याने हसली. ती एखादी घोडी खिंकाळल्यासारखी हसायची. "एवढा चेहरा पाडू नकोस. तसं तुझ्याविरुद्ध माझं काही नाही. पण तुझ्याशी लग्न ही कल्पनाच विनोदी आहे."
 "का ?" मी शांतपणे विचारलं.
 "तू जरासा विचार केलास तर तुला ते कळेल. तुझ्याशी लग्न करून मला काय मिळणार आहे ? तू आधी कुणाच्या तरी कृपेवर इथे रहातोस, तुटपुंज्या पेन्शनवर जगतोस. माझ्याकडे स्वतःचं असं काही नाही. जे आहे ते रुस्तुमची बायको म्हणून. आयुष्यातलं सगळं स्थैर्य, सुरक्षितता फेकून देऊन तुझ्याशी लग्न करायला माझं तुझ्यावर प्रेम तरी असायला हवं ना ?"
 "पण माझं तुझ्यावर आहे ना. तेवढं पुरे आहे मला."
 "मला नाहीये."
 मी आशा सोडली नव्हती. एकटेपणा भोगलेल्या माणसाला दुसऱ्याचा एकटेपणा चटकन समजतो. तिच्या स्वच्छंदी वृत्तीमागे, हसून खेळून वागण्यामागे एकाकीपणाची, रुस्तुम करीत असलेल्या अवहेलनेची सल होती ती मला लगेच जाणवली होती. मृगजळामागे लागण्यात उरलेलं आयुष्यही घालवण्याऐवजी आज ना उद्या मी जे देऊ केलं होतं ते ती स्वीकारील अशी माझी खात्री होती. पण ती फोल ठरली.
 आम्ही खूप अगोदर भेटायला हवं होतं. खरं म्हणजे आम्ही एकाच जातकुळीचे होतो आणि एकमेकांना लगेच ओळखलं असतं, जसं त्या दिवशी रायरेश्वरच्या बाजारात आमची जवळजवळ टक्कर झाली तेव्हा ओळखलं तसं. ती एक पिशवी खांद्याला, एक पिशवी आणि कुत्र्याचा पट्टा हातात अशी समोर न बघता चालली होती. माझ्यासमोर दोन वितींवर स्वतःला लगाम घालीत म्हणाली, "सॉरी." मग हसून म्हणाली, "तू रॉबर्ट ......."
 "आणि तू ॲलिस ......."
 मान होकारार्थी हलवून ती मोठ्याने हसली. "आपण कधीतरी भेटणार हे विधिलिखितच होतं. इथल्या लोकांच्या मते एका देशातले म्हणजे खरं आपली आधीपासूनच ओळख असायला हवी होती. आपली भेट सुद्धा झाली नाही असं म्हटलं की त्यांना फार आश्चर्य वाटतं."
 "अगदी माझाच अनुभव सांगितलास."
 तिनं मला तिच्याकडे चहाला नि गप्पा मारायला नेलं. तिच्या गाडीत बसायचं म्हणजे तिच्या कुत्र्यांचे उष्ण श्वास आणि लाळ मानेवर झेलीत बसावं लागतं आणि तिच्याबरोबर फिरायला जायचं म्हणजे एकदा तरी त्यांच्या पट्ट्यांत गुंतून धडपडावं लागतं हे मी लवकरच शिकलो.
 एकदा मी तिला विचारलं, "तू ह्या कुत्र्यांना शिकवीत का नाहीस? त्यांच्या बेशिस्त वागण्याचा तुला त्रास नाही होत ?"
 तिनं माझ्याकडे जरासं आश्चर्याने पाहिलं. "नाही. त्यात त्रास कसला ? त्यांना मी पिल्लं म्हणून आणलं तेव्हा मी त्यांच्यापाशी फार वेळ राहू शकत नव्हते आणि आता ती फार मोठी झालीत." अर्थात ती जातिवंत कुत्री नव्हती आणि कितपत शिकू शकली असती कुणास ठाऊक.
 सुरुवातीला आमची ओळख झाल्या-झाल्या ती स्वतःबद्दल बोलायला नाखूष असे. हळूहळू तुकड्यातुकड्यांनी, कधी एखाद्या प्रश्नाचं सरळ उत्तर मिळून, कधी सहज काढलेल्या एखाद्या उद्गारातून तिचं आयुष्य मला कळत गेलं. ती माझ्या पूर्वायुष्याबद्दल मात्र फारसं कुतूहल दाखवीत नसे. माझ्याकडे टेबलावर माझ्या बायकोचा फोटो होता तो मी तिला दाखवला, "ही माझी बायको."
ती "असं !" एवढंच म्हणाली. कदाचित तिला ती फारसा रस घेण्याजोगी वाटली नसेल. ज्युलिया काळी, स्थूलतेकडे झुकणारी होती. ती केसांचा चापून-चोपून अंबाडा घालायची. एक साधीशी साडी नेसायची. चांगले-चुंगले कपडे करण्यात, दागिन्यांनी मढण्यात तिला रस नव्हता. ॲलिस सुद्धा नखरेल होती असं नव्हे, पण तिच्यात एक नैसर्गिक डौल होता. तिचे साधेच वाटणारे कपडे, फ्रॉक असो किंवा पँट असो, स्टायलिश दिसायचे. कदाचित ती ते मुंबईतल्या एखाद्या महागड्या शिंप्याकडून शिवून घेत असेल. ह्या प्रांतातलं मला काही कळत नाही, पण माझ्या ज्युलियापेक्षा ती अगदी वेगळीच होती एवढं मात्र मला लगेचच कळलं. ज्युलिया शांत, सौम्य होती. ॲलिसच्या सहवासात उत्तेजना असे. ती येऊन गेली की, कोंडलेल्या वातावरणात एकदम वारा सुटल्यासारखं वाटायचं
 ती हिंदुस्थानात आली तेव्हा कशी दिसत होती ते मला पहायचं होतं. जीवनानंदाने पूर्ण भरलेल्या उमलत्या फुलासारखी ? तिच्या खूप मागे लागलो तेव्हा तिनं आपल्या तरुणपणचा एक फोटो आणून दिला, पण त्यात दिसणारी मुलगी ॲलिस नव्हती. ती एक दहा तरुण मुलींसारखी, कॅमेऱ्यानं बुजलेली, जिवणीवर फोटोसाठी आवश्यक असलेलं स्मित चिकटवलेली मुलगी होती. फोटो न्याहाळून झाल्यावर मी वर पाहिलं तो ती मिस्किलपणे हसत होती.
 "म्हणूनच मी इतके दिवस तुला दाखवीत नव्हते. मोठेपणी भेटलेल्या माणसांचे तरुणपणचे फोटो कधी बघू नये. लहानपणचे तर नाहीच नाही."
 मी काही न बोलता फोटो तिला परत दिला.
 तिला भटकायची फार हौस होती आणि माझ्या वयामुळे आणि लहानसहान दुखण्याखुपण्यांमुळे माझ्या चालण्यावर मर्यादा येत असल्या तरी ती कधीकधी मला ओढून आपल्याबरोबर न्यायची. मी रायरेश्वरावर खूप भटकलो आहे आणि हे पठार माझ्याइतकं दुसऱ्या कुणाला माहीत नाही असा मला अभिमान होता. पण तिनं मला अशी ठिकाणं दाखवली की, जिथे मी कधी गेलो नव्हतो. एकदा पठारावरून शंभरेक फूट धडपडत खाली उतरायला लावून तिनं मला झाडाझुडपांत बेमालूम लपलेली एक गुहा दाखवली.
 "तुला कशी सापडली ही ?"
 "एकदा मी तिकडून येताना इथे एक माणूस पाहिला. कड्याजवळ येऊन खाली डोकावले तर तो नाहीसा झाला होता. तो वर आला असता तर मी उभी होते तिथूनच त्याला यावं लागलं असतं. खाली गेला असता तर कुठल्या तरी पायवाटेवर दिसला असता. मी ह्या प्रकाराचा छडा लावायचा ठरवला. आपण आत्ता आलो तशीच मी खाली उतरले तर मला हे गुहेचं तोंड दिसलं. आत तो माणूस होता. तो एक साधू होता. ध्यानधारणेसाठी इथे येऊन बसतो म्हणाला."
 "मग आता कुठेय?"
 "गेला असेल बाहेर कुठे."
 मला त्या गुहेत मनुष्याच्या अस्तित्वाची किंवा वस्तीची काहीच खूण दिसली नाही. वटवाघळांचा वास मात्र येत होता. मी तिच्याकडे जरा रोखून पाहिलं पण तिच्या चेहऱ्यावर ती चेष्टा करतेय असा काही भाव दिसला नाही. त्यावेळी मी ते सोडून दिलं, पण पुढे दोन-तीनदा मला ह्या प्रसंगाची आठवण झाली. एकदा फिरायला जाताना जंगलात अजगर दिसला असं ती म्हणाली. एकदा बिबळ्या दिसला. पण लपून बसलेले दरोडेखोर दिसले असं जेव्हा ती म्हणाली, तेव्हा माझ्याच्याने राहवलं नाही.
 मी विचारलं, "तुला कसं कळलं ते दरोडेखोर आहेत म्हणून ?"
 "त्यांचं बोलणं ऐकलं मी. कुठेतरी दरोडा घालण्याबद्दल बोलत होते."
 "मग तुला पाहून ते पळून गेले ?"
 "पळून कुठले जाणार ? मला पाहिली असती तर मारून टाकली असती त्यांनी. ते एका उंच झाडावर बसले होते. मी लांबनंच त्यांना बघून माझी वाट बदलली."
 "झाडावर ?"
 "हो."
 "मी आत्तापर्यंत कधीच झाडावर लपून बसलेली माणसं बघितली नाहीत. दरोडेखोर तर नाहीच नाही. शिवाय तुला लांबनंच त्यांचं बोलणं ऐकायला आलं म्हणजे ते खूपच मोठमोठ्याने बोलत असले पाहिजेत."
 "तर काय."
 तिनं माझ्या चेष्टेच्या सुराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. तसं पाहिलं तर ती सांगायची त्या गोष्टींत तथ्य असण्याची छोटीशी शक्यता होती, पण माझा तिच्यावर विश्वास बसला नाही एवढं खरं. ती नुसती गंमत म्हणून असले बनाव करायची की आपल्या आयुष्यात खूप चमत्कारिक आणि थरारक घटना घडतात असं दाखवणं ही तिची मानसिक गरज बनली होती हे मला कळलं नाही. पण ह्या गोष्टींचा आमच्या संबंधात एक अडसर होऊन बसला एवढं खरं.
 रुस्तुम गेल्यावर मी प्रथमच ॲलिसला भेटलो, तेव्हा ती खूप खिन्न दिसली. तो मरताना आपण त्याच्या जवळ असायला हवं होतं असं तिला फार वाटत होतं. कधी नव्हे ते ती त्याच्याबद्दल बोलत होती, पण हरवल्यासारखी वाटत होती. तिच्यापासून दूर का होईना, पण तो होता. आता त्याचं अस्तित्वच संपल्यावर त्यांच्या आयुष्यात काही बदल होईल ही आशाच मालवली होती. अशी आशा तिच्या मनात अजून जिवंत होती याचं मला आश्चर्य वाटलं.
 तिच्या स्वभावानुसार तिला सावरायला फारसा वेळ लागला नाही. पूर्वीप्रमाणे आम्ही भेटत, गप्पा मारीत, वाद घालीत होतो. मला वाटलं होतं, रुस्तुम गेल्यावर ती कदाचित माझ्याबद्दल वेगळा विचार करू शकेल. पण आमच्या नात्यात काही बदल हवा असं तिनं दूरान्वयानेही सुचवलं नाही आणि मला तसं सुचवण्याचा धीर झाला नाही. कारण आहे ते नातंही उसवेल अशी मला भीती वाटली. तेव्हा ती देईल ते आणि तेवढंच मी विनातक्रार घेत राहिलो, आणि ती मागेल ते आणि तेवढंच देत राहिलो.
 तिला आधार हवासा वाटला तेव्हा तो तिनं माझ्याकडून मागितला नाही. ती एका बुवाच्या नादी लागलीय असं कुणीतरी मला सांगितलं तेव्हा मी ते हसण्यावारीच घालवलं. ती असल्या कुबड्या वापरणाऱ्यांतली नव्हती. मग एक दिवस तिच्या घरी गेलो तर ती वाघाच्या कातड्यावर बसून ध्यान करीत होती. मी सरळ आतच जाणार होतो पण तिच्या बाईनं सांगितलं की, ती मेडिटेशनमधे असली की तिला डिस्टर्ब करायची परवानगी नसते.
 ती बाहेर आल्यावर मी तिला म्हटलं, "मला वाटलं नव्हतं तुझा असल्या गोष्टींवर विश्वास आहे म्हणून."
 "असल्या गोष्टी म्हणजे काय रॉबर्ट ? रोज थोडा वेळ ध्यानस्थ बसल्याने मला मनःशांती मिळते. त्यात विश्वास असण्या-नसण्याचा प्रश्न कुठे येतो ?"
 "मनःशांती मिळण्यासाठी ध्यान करण्याची जरूर आहे असं जरी आपण धरून चाललं, तरी वाघाचं कातडं का ? साध्या सतरंजीवर बसून ध्यान करता येत नाही ?"
 "माझ्या गुरूने मला जे सांगितलंय ते मी करते. अनावश्यक प्रश्न विचारीत नाही."
 "बापरे, गुरू !"
 "मग ? ध्यान करणं ही काय उपजत येणारी गोष्ट आहे ? तुला येतं करता ?"
 "मला त्याची जरूर वाटत नाही."
 "तो प्रश्न नाहीये. येतं का तुला ? चित्त संपूर्ण एकाग्र करून ध्यान करता ? ते कुणाकडून तरी शिकून घ्यावं लागतं. त्यासाठी कुणीतरी गुरू शोधावा लागतो."
 "हा मामला फारच गुंतागुंतीचा व्हायला लागलाय."
 "मला त्यात काही गुंतागुंत दिसत नाही. सगळ्या गोष्टी अगदी सरळ आहेत."
 "तू अगदी गंभीरच झालीस."
 "ही गोष्ट माझ्या दृष्टीने गंभीरच आहे."
 काही दिवसांनी मी पुन्हा ह्या विषयाला हात घातला तो तिची क्षमा मागण्यासाठी.
 "मी त्या दिवशी असं बोलायला नको होतं. मला तुझ्या प्रकृतीविषयी माहीत नव्हतं. तू काही बोलली का नाहीस?"
 "माझ्या प्रकृतीचा काय संबंध होता आपल्या संभाषणाशी ? आपण माझ्या मेडिटेशनबद्दल बोलत होतो आणि तू त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होतीस. तुझं मत आता बदललंय का ?"
 "नाही, पण ....."
 "नाही ना ? मग हा विषय आता संपलाय."
 "तरी तुला कॅन्सर झालाय हे तू का बोलली नाहीस हा प्रश्न रहातोच."
 "तसा प्रसंग आला नाही म्हणून बोलले नाही. गळ्यात एक पाटी अडकवून हिंडायला पाहिजे का मला कॅन्सर झालाय म्हणून ?"
 तिनं दार धाडकन लावूनच घेतलं होतं. आपण लवकरच मरणार हे कळून चुकल्यावर तिचं चित्त विचलित झालं असलं पाहिजे. पण तिला कुणाचीच, माझीसुद्धा सहानुभूती नको होती. तिला काय शारीरिक, मानसिक दुःख होत असेल त्याच्यावर उतारा म्हणून तिनं वेगळाच मार्ग शोधला होता. अर्थात मी असं म्हटल असतं तर तिनं ते कबूल केलं नसतं. तिच्यात असं काही होतं की, जे धरून ठेवायला गेलं की, निसटून जायचं. ती कुणाला तरी गवसली होती का?
 ॲलिस माझ्या जीवनात फार उशिरा आली, आणि मला तिचा सहवास अधूनमधून तुकड्यातुकड्यांनी लाभला. तरीही तिच्यामुळे माझ्या आयुष्याचा पोतच बदलला. उरलेल्या आयुष्यात आता काही उलथापालथ न होता ते आहे असंच संथपणे चालू रहाणार असं धरून चाललो असताना एकदम त्यात ॲलिसने प्रवेश केला.
 आता ती कधीच दिसणार नाही. तिचं ते झपाझप चालणं, मिस्किल स्मित, खिंकाळतं हास्य, तिच्या अफलातून गप्पा हे सगळं नाहीसं होणार आहे. तिच्याशिवायचं जग एका नीरस, अंधाऱ्या, कुंद कोठडीसारखं होणार आहे.
 स्वतःची गरज निर्माण करून मग स्वतःला माझ्यापासून काढून घेण्याचा तिला काय हक्क होता ?

- ★ -

दिग्विजय रूसीची आणि माझी मैत्री कशी झाली, का झाली मला कधी कळलं नाही. अनाकलनीय घटना घडवून आणणारी एक वैश्विक यंत्रणा असली पाहिजे. मला आयुष्यात अनेकदा तिची प्रचीती आलेली आहे. तिच्या अखत्यारीत हे घडलं. मी रूसीचा भाऊ असतो तर बहुतेक मला चार लोकांसमोर हे भाऊपण कबूल करायला लाज वाटली असती. मला ज्यांबद्दल तुच्छता वाटे असे सगळे गुणधर्म त्याच्यात एकवटले होते. तो सडपातळ, गोरागोमटा, नाजूक होता. मुलगी असता तर सुंदर म्हटलं असतं. (म्हणून कदाचित पुढे तरुणपणात काही वर्तुळांतून आमच्या मैत्रीला एक वेगळाच रंग देण्याचा हास्यास्पद प्रयत्न झाला असावा). त्याला साहित्य, कला अशा विषयांत गोडी होती. खेळ किंवा ज्यांत थोडेफार कष्ट होतात असे गिर्यारोहण, ट्रेकिंगसारखे छंद ह्यांचं त्याला वावडं होतं. व्यावहारिक जगाच्या धकाधकीत त्याचा निभाव लागत नसे. शाळेतल्या गुंड पोरांनी सतावलं की, तो रडायला लागायचा. अशाच एका प्रसंगी त्याला कुणाच्या तरी तावडीतून सोडवताना आमची ओळख झाली.
 डोळे आणि नाक खिशातल्या शुभ्र रुमालाने पुसत तो म्हणाला, "पण मी त्यांचं काय केलंय ?"
 तो आहे ह्या स्वरूपात अस्तित्वात आहे एवढं कारण त्याला त्रास द्यायला पुरेस होतं हे त्याला कधी उमजलं नाही.
 "हे बघ रूसी, असल्या पोरांशी लढायचं बळ नसलं ना आपल्यात, तरी ते आहे असं दाखवायचं. खरे आतनं ते भेकड असतात. तू रडूबाईपणा सोडून जरा आक्रमक बनलास ना, की ते तुला वचकून राहतील."
 पण त्याला ते कधी जमलं नाही. मग हळूहळू तो माझ्या पंखाखाली आहे अशी बातमी पसरल्यावर पोरांनी त्याचा नाद सोडून दिला.
 आज हा सगळा भूतकाळात संचार करण्याचं कारण म्हणजे ॲलिसच्या मृत्यूची बातमी. ॲलिस रुस्तुमची बायको. तो तिच्याशी लग्न करायला निघाला तेव्हा मी म्हटलं होतं, "रूसी, जरा जपून हं"
 लहानपणापासून जगाशी झगडावं लागलेल्या माणसांच्या चेहऱ्यावर एक तऱ्हेचा बेरकीपणा, सावधपणा, हिशेबीपणा दिसतो. तो मला ॲलिसमधे दिसला होता. ती कुणाची बायको म्हणून रहाणाऱ्यांतली नव्हती अशी माझी खात्री होती. तिच्याबरोबर अनेकांची नावं जोडलेली ऐकली होती. रूसीबरोबर प्रथम ती भेटला तेव्हा चार दिवसांची मैत्रीण ह्या स्वरूपातच मी तिला स्वीकारलं. मग रूसी जेव्हा पुन्हापुन्हा फक्त तिच्याबरोबरच दिसायला लागला तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
 मी त्याला चेष्टेनं म्हटलं, "आपल्या देशातल्या बायकांना माहीत नसलेल्या काही युक्त्या वगैरे हिला ठाऊक आहेत का रे?"
 "मी तिच्याशी लग्न करणार आहे, डिगी."
 "डोकं ठिकाणावर आहे ना तुझं?"
 "चांगल्यापैकी."
 "ती काय लायकीची आहे, रूसी ! तू तिच्याकडे बायको म्हणून पाहू शकतोस ?"
 "तिची लायकी तुला काय रे माहीत ?"
 "इकडे तिकडे ऐकलेलं ..."
 "इकडे तिकडे ऐकलेलं सगळं खरं धरून चालतोस तू ? लोकांना काय, जरा मोकळेपणानं वागली एखादी बाई की, तिला वाईट चालीची ठरवून टाकतात."
 "पण बाठिया ......."
 "तिनं सगळं सांगितलंय मला त्याच्याबद्दल. त्यानं लग्नाचं वचन देऊन फसवलं तिला."
 "असं ती म्हणते."
 तो जरासं हसला. "आता मी तिच्याशी लग्न करणाराय म्हटलं म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवणं आलंच."
 "आणि त्यानंतरचे सगळे ?"
 "कोण सगळे ? नाव माहीताहेत तुला ? दे यादी. नुसत आपलं मोघम काहीतरी बोलतात लोक आणि तसंच म्हटलं तर माझ्याबद्दलही लोक बोलत असलेच पाहिजेत. मग तिच्या-माझ्यात काय फरक आहे ?" मग तो जरा गंभीरपणे म्हणाला, "डिगी, तुला वाटतं तशी ती नाहीये. ओळख व्हायच्या आधीच तू तिच्याबद्दल ठाम मत बनवून बसलायस. निदान मला माणसांची काहीतरी पारख आहे असा विश्वास ठेव. एखाद्या पोरीच्या नुसत्या रूपावर भाळून प्रेमात पडायला मी काही विशीतला भाबडा तरुण नाही."
 "अरे बाबा, चाळिशीतला माणूसच अक्कल गुंडाळून ठेवून असं करण्याचा जास्त धोका असतो."
 "हे बघ डिगी. मी काही जादा वाद करीत बसणार नाहीये. फक्त तू तिला पूर्वग्रह न ठेवता भेट एवढचं माझं म्हणणं आहे. गिव्ह हर अ चान्स."
 "जाऊ दे ना यार. तुला ती आवडलीय ना, मग झालं. माझं तिच्याबद्दल काय मत आहे ह्यानं काय फरक पडतो?"
 "पडतो. कारण तू माझा मित्र आहेस आणि तुझी आणि माझ्या बायकोची चांगली मैत्री असावी अशी माझी इच्छा आहे."
 हा रूसीचा रूसीपणा ! आपल्याशी संबंध असलेल्या तमाम लोकांनी एकमेकांशी मित्रत्वाने रहावं असं त्याला मनापासून वाटे. म्हणूनच फ्रेनी त्याच्या लग्नामुळे अपेक्षेबाहेर बिथरली आणि तिनं ॲलिसला कधीच स्वीकारलं नाही, ह्याचं त्याला खोलवर दुःख झालं आणि तरी त्यानं फ्रेनीचा कधी रागराग केला नाही. कारण सर्वांनी एकमेकांशी प्रेमानं वागलं पाहिजे ही त्याच्या स्वभावाची एक गरज होती. आणि रांघर्ष टाळू पहाणाऱ्या आणि कशाविरुद्धच ठामपणे उभं न राहणाऱ्यांचं जे होतं तेच त्याचं झालं. दोन्ही बाजूंनी थपडा खाव्या लागल्या.
 रूसीच्या बहिणीचं आणि माझं कधीच जमलं नाही. ती म्हणजे एक क्षुधित आत्मा होती आणि रूसीला खाऊन ती आपली भूक शमवण्याचा प्रयत्न करी. शेवटी कुणाच्या विरोधाला न जुमानता रूसीनं ॲलिसशी लग्न केलं तेव्हा फ्रेनीचं नाक खाली झालं ह्या एकाच कारणामुळे मला आनंद झाला.
 लग्नानंतरच्या पहिल्याच भेटीत ॲलिसनं मला विचारलं, "तू त्याला रूसी का म्हणतोस ?"
 खरं म्हणजे ह्याला काही खास कारण नव्हतं. त्याच नाव कळलं तेव्हा मी त्याचं नेहमी केलं जाणारं संक्षिप्त रूप वापरायला सुरुवात केली. त्याला त्याने काही आक्षेप घेतला नाही आणि नाव माझ्या तोंडात बसलं. पण तिनं जो रूसीला कुणी काय हे ठरवण्याचा तिलाच हक्क आहे असा सूर काढला, त्याला उत्तर म्हणून मी तिला हे साधं सरळ स्पष्टीकरण देणं शक्य नव्हत.
 मी म्हटलं, "म्हणू नये असा काही नियम आहे ?"
 मग अनपेक्षितपणे तिनं माझ्या शिडातली हवाच काढून घेतली. ती खळखळून हसली. "नाही, तसा काही नियम नाही. पण रूसी हे लहान मुलाला हाक मारल्यासारखं वाटत. तुला नाही वाटत ? रुस्तुम कसं भारदस्त वाटतं."
 "तो मला डिगी म्हणतो. माझ्या घरचे सगळे मला कटाक्षाने दिग्विजय म्हणतात."
 ती हसतहसत म्हणाली, "मग फिटंफाट झाली तर."
 ह्यानंतर आमची बऱ्यापैकी मैत्री जमली. तरीसुद्धा तिच्यात त्यानं काय एवढं पाहिलं हे मला कळलं नाही. सुंदर होती म्हणावं तर नाकीडोळी तिच्यापेक्षा नीटस बायका मी पुष्कळ पाहिल्या होत्या. ती बोलण्यात पटाईत होती. काही लोकांच्यात हजरजबाबीपणा असतो. त्याचा हुशारीशी तसा काही संबंध नसतो. तिच्या बाबतीतही हे नुसतं संभाषणकौशल्य होतं. तिच्या बोलण्यात काही विशेष लक्ष देऊन ऐकण्यारखं, विचार करण्यासारखं असे असं नाही, पण तरी तिच्याशी गप्पा मारायला मजा यायची. ती कुणाचा शब्द खाली पडू द्यायची नाही, म्हणून तिच्याशी संभाषण हे एक आव्हान असे. कधीकधी तिला न्याहाळताना माझ्या मनात यायचं, ह्या रंगवलेल्या चेहऱ्याच्या, चटपटीत बोलण्याच्या मागे काही हाती लागण्यासारखं आहे का, की जे रूसीला गवसलंय ?
 एक मात्र मला कबूल करावं लागलं. ॲलिसचं रूप, वाक्चातुर्य पुरुषांच्या सहवासात जास्त खुलत असे, आणि त्यांच्या नजरेतलं कौतुक, क्वचित आसक्ती सुद्धा टिपून त्याने ती खूष होत असे, तरी रूसी सोडून दुसऱ्या कुणा पुरुषाला ती शारीरिक जवळीक करू देत नसे. मी एकदा सहज तिच्या कमरेभोवती बाहू लपेटला तर तिने मला सरळसरळ न झिडकारता खुबीने पण ठामपणे आपली सुटका करून घेतली. माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न बघून ती म्हणाली, "मला त्या वाटेनं जायचं नाहीये डिगी."
 "पण मी तुला कुठल्या वाटेनं वगैरे नेत नव्हतो."
 तिनं नुसतंच माझ्याकडे पाहिलं आणि पुसटसं स्मित केलं. माझ्या विधानावर अविश्वास दाखवायचा होता की, सहज स्पर्शातून सुद्धा तोल ढळू शकतो म्हणून त्यापासून दूरच रहायचं तिनं ठरवलं होतं कुणास ठाऊक आणि तोल ढळण्याची भीती असली तर तो तिचा की माझा हेही मला कळलं नाही. एवढं मात्र झालं की, त्यावेळी मला अपमानित वाटलं तरी तिच्याबद्दल आदर वाटला. मी तिला इतर पुरुषांबरोबर पूर्वी पाहिलं होतं आणि रूसी काहीही म्हणो, ती त्यांना चार हात दूर ठेवीत होती हे पटण्यासारखं नव्हतं. बरं, त्यांच्यातल्या प्रत्येकजणानं तिला लग्नाचं वचन देऊन फसवलं किंवा ही तसा भाबडा समज करून घेऊन मग फसली हे खरं असण्याचीही शक्यता नव्हती. म्हणजे तिच्या वागण्याचा अर्थ एवढाच निघत होता की, रूसीशी लग्न केल्यापासून तिने स्वत:वर काही मर्यादा घालून घेतल्या होत्या आणि त्या ती कटाक्षाने पाळत होती. रूसीच्या दृष्टीने पहाता हेही काही कमी नव्हते.
 मी आधी लग्न ह्या प्रकाराच्या पहिल्यापासून विरुद्ध आहे. एका बेसावध क्षणी लग्न करायचं आणि आयुष्यभर संसारात गुंतून पडायचं ही कल्पना मला फार भीतीदायक वाटायची. ह्या बाबतीत रूसीचं न माझं जमायचं. बायकांशी मैत्री ठेवायची, त्यांच्याबरोबर खायचं-प्यायचं, मजा मारायची, पण त्यांना आपल्या जीवनाचा कायमचा भाग बनू द्यायचं नाही. म्हणूनच त्याने एकाएकी लग्नाच्या लफड्यात अडकायचं ठरवून आमच्या सुरळीत चाललेल्या आयुष्याला खो घातला तेव्हा मला राग आला.
 पण शेवटी मी त्याचं लग्न पचवलं. इतकंच नव्हे, तिच्यात त्यानं असं काय खास पाहिलं असा प्रश्न विचारता विचारता दाद देण्याजोगे पुष्कळ गुण मला दिसायला लागले. तेव्हा एक दिवस त्याला मी त्याच्या एका जुन्या मैत्रिणीबरोबर आमच्या नेहमीच्या एका अड्डयावर पाहिलं तेव्हा मला धक्का बसला.
 तो मला हात करून म्हणाला, "आमच्या टेबलाशीच या ना."
 "आमचं जेवण झालंय."
 "मग कॉफी घेत गप्पा मारायला या."
 "नको रे, मला एक तातडीची अपॉइंटमेंट आहे."
 माझ्या सखीच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करून मी तिला दुसरीकडे जेवायला घेऊन गेलो.
 नंतर एकदा भेटल्यावर त्यानं मला विचारलं, "तू असं का केलंस?"
 "हा प्रश्न मी तुला विचारणं जास्त योग्य होईल नाही का ?"
 "म्हणजे तुला काय म्हणायचंय ?"
 "ते तुला चांगलं माहीत आहे. उगाच वेड पांघरू नको. आता तुझं लग्न झालंय रूसी."
 "मी कुणाला दुखवीत नाहीये."
 "हे ॲलिसला विचारल्याशिवाय मी स्वीकारू शकत नाही."
 "तू सांगणारेस तिला ?"
 मी शांतपणे म्हटलं, "तिला सांगणं हे माझं काम नाही. मला तुला फक्त एवढंच विचारायचंय की, तू तिच्याशी लग्न केलंस तरी का? आणि आता केलंयस तर मग अशी बेइमानी का ?"
 रूसीनं माझ्याकडे खिन्नपणे पाहिलं. "तू इतका साचेबंद विचार का करतोस ?"
 "छान ! म्हणजे तसं काही कारण नसताना तिच्याशी लग्न करणं हे साचेबंद नाही, पण ह्या तूच निर्माण केलेल्या नात्याची चाड बाळगून इतर बायकांना फिरवणं सोडावंस अशी अपेक्षा करणं साचेबंद !"
 "सगळं इतकं सरळ नसतं डिगी. तुला माहीत आहे घरात काय परिस्थिती आहे ती. मला वाटलं होतं की, फ्रेनी हळूहळू निवळेल, पण त्याचं काही चिन्ह नाही. ॲलिस सुस्वभावी आहे, पण फ्रेनीचे हल्ले मुकाट्याने खालमानेनं ऐकून घेणाऱ्यातली नाही. मग सतत कुरबुरी, टेन्शन. हिनं तिच्याबद्दल तक्रारी सांगायच्या, तिनं हिच्याबद्दल. रणांगणच असतं. माझा विचार कुणीच करत नाही. असह्य झालं की, मी घरातनं बाहेरच पडतो. परवा असाच कुठेतरी भरकटत असताना ज्यूली भेटली. त मला पाह्यलंस त्या दिवशी कितीतरी दिवसांनी मी एक निवांत संध्याकाळ आनंदात घालवली. ताणतणाव नाहीत, फालतू अपेक्षा नाहीत, आरोप-प्रत्यारोप नाहीत. नुसता आला क्षण चवीनं उपभोगायचा. असंही जगता येतं हे मी विसरूनच गेलो होतो."
 आधी कदाचित दुःख, वैताग ह्यांच्यापोटी टाकलेलं पाऊल तो सहजपणे आणि वाढत्या आत्मविश्वासाने टाकायला लागला, तेव्हा घरातल्या वातावरणाची सबब पुढे करून दोन्ही जगात एकेक पाय ठेवून दोन्हीकडले फायदे उपटण्याचा त्याचा डाव होता असं मला वाटून गेलं. त्याची समस्या खरी असली तरी तिच्यावर एवढाच उतारा होता हे मला पटेना.
 हळूहळू आमचे मार्ग मुद्दाम न ठरवता भिन्न झाले. त्याच्या घरीही जायचं मी सोडून दिलं. ॲलिसचा गर्भपात झाल्याचं कळलं तेव्हा मात्र मी त्यांना भेटायला गेलो. ॲलिस घरी होती पण रुस्तुम नव्हता. तिला मी बऱ्याच दिवसांनी पहात होतो. पहिल्यापेक्षा कृश, जरा गंभीर वाटली. एकदम तिशीच्या बाईसारखी दिसत होती. मला खूप सुंदर भासली.
 "ये डिगी. आज खूप दिवसांनी आलास?"
 "तू कशी आहेस?"
 "ओ, म्हणजे तू माझ्या समाचाराला आला आहेस !" ती खळखळून हसली आणि मला प्रथम दिसलेला गंभीरपणा एकदम गळून गेला. "बिचारा डिगी ! मी अंथरुणावर पडून आजाऱ्यासारखा दिसत असते तर तुझ्या भेटीचं सार्थक झालं असतं ना ? पण मी अगदी ठीकठाक आहे."
 "काय झालं एकदम ?"
 "गर्भपाताचं नक्की कारण फारसं कुणाला कळत नाही डिगी. डॉक्टर आपले निरनिराळे तर्क करतात पण त्यात काही अर्थ नाही. मी आपलं म्हणते नशीब."
 "नशिबावर विश्वास आहे तुझा ?"
 "का नसावा ? नशिबावर विश्वास नसला तर मी का इंडियन ?"
 "तू इंडियन आहेस ?"
 "नाहीतर काय ?"
 "म्हणूनच तू नशिबी येईल ते विनातक्रार सहन करतेस का ?"
 "म्हणजे? कशाबद्दल बोलतोयस तू ?"
 ह्यानंतर मी रूसीला मुद्दाम भेटून म्हटलं, "तू ॲलिसवर मोठा अन्याय करतोयस असं नाही तुला वाटत ?"
 "शक्य आहे. पण त्याबद्दल मी काय करू शकतो ?"
 "इच्छा असली तर करू शकतोस. तू एकदा फ्रेनीशी सरळसरळ बोलत का नाहीस?"
 "आणखी काही विनोदी सूचना आहेत तुझ्याकडे ?"
 "भल्या माणसा, तू जिच्याशी लग्न केलंस तिचं तू काहीच लागत नाहीस का? ह्यात विनोदी काय आहे ?"
 "रागावू नकोस, डिगी. मी त्या अर्थाने नाही म्हटलं. पण फ्रेनीशी बोलण्याचा काहीएक उपयोग व्हायचा नाही. झालाच तर उलटा परिणाम होईल. ती ॲलिसला आणखीच त्रास देईल."
 "मग ह्यातून मार्ग काय? तुझ्यापुरता तू मार्ग शोधलास. तिचं काय?"
 "तिनंही माझा मार्ग स्वीकारावा."
 "रूसी, तूच हे बोलतोयस ? ॲलिसच्या प्रेमात पडून लग्न करणार म्हणून तू सांगितलंस, त्याला किती दिवस झाले ? एवढ्यात तू इतका बदललास?"
 "मी बदललो नाही. माझं अजूनही ॲलिसवर प्रेम आहे. पण आहे ह्या परिस्थितीत मी काय करणार ? फ्रेनीला घरातून हाकलून द्यावं असं तर तू म्हणत नाहीस ना ?"
 "नाही !"
 "मग काय ? ॲलिसनंच जरा समजूतदारपणा दाखवला, थोडी पड खाल्ली तर गोष्टी पुष्कळ सुधारतील."
 "म्हणजे तिनं एखाद्या पारंपरिक हिंदू सुनेसारखं वागावं."
 "थोडंसं तसंच. फ्रेनीचं समाधान होण्यापुरतं."
 "कमॉन रूसी. फ्रेनीचा खत्रुडपणा हा फक्त थोडाफार सासूपणा गाजवण्याच्या हौसेपोटी आहे असं वाटण्याइतका का तू दूधखुळा आहेस ? ॲलिसनं सुनेसारखं वागावं ही अपेक्षा चुकीची आहेच, पण जरी समजा ती अगदी फ्रेनीच्या आज्ञेत राहिली तरी त्यामुळे फ्रेनीचं समाधान होणं शक्य नाही."
 "झालं तर. म्हणजे तूही माझ्याच निष्कर्षाला येऊन पोचलास."
 स्वतःच्या चुकीची शिक्षा जन्मभर ॲलिसनं भोगावी ही त्याची अपेक्षा भयंकर होती. पण त्याबद्दल आपण काही करू शकत नाही ह्या त्याच्या पवित्र्यावर तो अचल होता.
 सुदैवाने ह्यानंतर माझ्या कंपनीने मला स्वित्झर्लंडला पाठवलं. रिटायर होईपर्यंत कधीमधी घरी येण्याव्यतिरिक्त मी तिकडेच होतो. परत आल्यावरही रूसीची कधी गाठ पडली नाही. मित्रमंडळींच्यातल्या कुणाकुणाकडून त्याच्याबद्दल बातमी कळत असे पण तेवढंच. तो मेल्याची बातमी वाचल्यावर मात्र थोडे दिवस जाऊ देऊन मी ॲलिसला भेटायला गेलो. फ्रेनीनं दार उघडलं आणि नुसतंच माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. साहजिकच होतं.
 "तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. मी रूसीचा मित्र डिगी."
 तरीही तिच्या चेहऱ्यावर मला ओळखल्याची काही खूण दिसली नाही, पण ती मागे सरकून म्हणाली, "या आत."
 "रूसीबद्दल वाचलं. आजारी होता का तो ?" खरं म्हणज पिकलं पान गळायला आजाराची जरूर असते असं नाही, पण काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं.
 "त्याला हार्ट अटॅक आला होता काही वर्षांपूर्वी. तसा तो चांगला सावरला होता त्यातनं. पण शेवटी काय? देवाची इच्छा!"
 तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ती खूपच थकलेली, खचलेली दिसत होती. मला तिची दया आली. मग आम्ही जुन्या काळच्या आठवणी काढून गप्पा मारल्या. जाताना मी विचारलं, "ॲलिस दिसत नाही घरी ?"
 "हे आता तिचं घर नाही." तिच्या आवाजात शुद्ध विखार होता.
 "मग ती कुठेय ?"
 "असेल पृथ्वीच्या पाठीवर कुठेही. मला काय माहीत ?"
 मला वाटलं ह्याचा अर्थ ॲलिस बहुतेक मायदेशी परत गेली असावी. म्हणजे शेवटी तिनं लढाईतून माघार घेतली तर !
 पुढे कुणाकडून तरी रायरेश्वरच्या घराबद्दल समजलं. ही तरतूद रूसीनं मुद्दाम तिच्यासाठी केली होती की काय हे कळायला मार्ग नव्हता. एकदा वाटलं, ॲलिस कशी आहे, काय करते ते बघायला तिला भेटून यावं. पण इतकी वर्ष न भेटलेल्या माणसाला इतक्या लांब प्रवास करून भेटायला जायचं, ते सुद्धा फक्त जिज्ञासेपोटी, एवढा उत्साह आणि बळ माझ्यात राहिलं नव्हतं. किंवा माझी जिज्ञासा तितकी तीव्र नव्हती म्हणा.

- ★ -अवन्तिका एक लहानशी बातमी. "प्रसिद्ध चित्रकार रुस्तुम मोदी ह्यांच्या पत्नी ॲलिस ह्यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या." शेवटी नवऱ्याचं शेपूट धरून ह्या बाईने मरताना का होईना, वर्तमानपत्रात स्थान मिळवलं. तिच्या ह्या देशात येण्याचं सार्थक झालं.
 तिनं माझा अपमान करून मला घरातनं हाकलून दिलं, त्यानंतर मी पुन्हा तिकडे गेलेच नाही. वाटलं होतं कदाचित रुस्तुम भेटायला येईल. पण त्या दिवशी तिच्यासमोर तो काहीच बोलला नाही, तेव्हा खरं म्हणजे त्याची आशा नव्हतीच. तिच्या कडकडाटापुढे तो खाली मान घालून गप्प बसला, माझ्या डोळ्याला डोळा न देता, तेव्हा खरं म्हणजे ती बोलली ते बरोबर असलं पाहिजे अशी माझ्या मनाने कबुली दिली होती. तरीही मी काही दिवस त्याची वाट पहात राहिले. त्यानं अनेक बायकांना झुलवलं त्यातली मी एक हे मानणं जड जात होतं. कुणी इतकं दुतोंड असतं? आम्ही एकत्र असतानाचं त्याचं बोलणं, वागणं सगळंच नाटक होतं ? त्यानं मला अगदी खात्री दिली होती की, ॲलिसचं न् त्याचं मुळीच पटत नाही, तिलाही त्याच्याइतकीच वेगळं होण्याची इच्छा आहे, आणि प्रश्न फक्त थोडा वेळ थांबण्याचा आहे. मी म्हणाले, "कितीही थांबायला माझी तयारी आहे."
 "पण माझी नाही ना ! मला तेवढा वेळ कुठेय ?" मग तो म्हणाला, "अवन्ती, माझ्यासारख्या म्हाताऱ्या खोडावर तू खरंच प्रेम करू शकतेस ?"
 "प्रेमाचा वयाशी काही संबंध नसतो रुस्तुम. आणि तू 'म्हातारं खोड' कधीच होणं शक्य नाही."
 त्याचे सगळे आडाखेच चुकले होते आणि ते कबूल करण्याएवढं मनोधैर्य त्याच्यात नव्हतं?
 आज इतकी वर्षं झाली तरी ते मनोभंगाचं दुःख विसरता येत नाही. बाहेरचं जग, माझे आईबाप, आमच्या वयातली तफावत ह्यांचा कशाचाही विचार न करता मी स्वतःला त्या नात्यात झोकून दिलं होतं. तो मात्र हातचा ठेवून वागला ह्याचा अपमान तीव्र होता पण मी तो पचवला. पचवावाच लागला मला. ॲलिसने केलेल्या तमाशानंतर तो मला भेटायला आला नाही, स्वतःविषयी समर्थन देण्यासाठी सुद्धा, ह्यातच मला सगळं कळलं आणि तरीही त्यावेळी तरी मी ह्या प्रकाराबद्दल ॲलिसलाच दोष देत होते. ज्याचं आपल्यावर मुळा सुद्धा प्रेम नाही त्याला कायद्याच्या आधाराने धरून ठेवणं हे मला भयानक वाटत होतं. रुस्तुम दुबळा असेल. पण विश्वासघातकी नाही असं मी धरून चालले होते.
 नंतर काही वर्षांनी एकदम रुस्तुम मला पुन्हा भेटायला आला. खूपच म्हातारा वाटला एकदम. मनात म्हणाले, हा काही चार-पाच वर्षांत इतका म्हातारा झाला नाही.
 "रुस्तुम, तू? काही विशेष ?"
 "काही नाही, सहज भेटायला आलो."
 "बैस ना. कॉफी घेणार ?"
 "नको."
 "प्रकृती वगैरे ठीक आहे ना ?"
 "हो, उत्तम."
 थोडा वेळ तो नुसताच भिंत, खिडकी, गालिचा हे आलटून पालटून बघत राहिला.
 मग मी म्हटलं, "रुस्तुम, तू काही खास उद्देशाने आला आहेस हे नक्की. इतक्या वर्षांनंतर तू सहज भेटायला आलास ह्यावर विश्वास ठेवण्याइतकी काही मी आता दूधखुळी राहिले नाही. मग काय ते सरळसरळ सांगत का नाहीस?"
 "अवन्ती, तू मला पुन्हा तुझ्या आयुष्यात जागा देशील?"
 "म्हणजे नेमकं काय ?" मनात आलं होतं विचारावं, ॲलिस मेलीबिली की काय ? पण नाही विचारलं.
 "म्हणजे अधूनमधून भेटशील?"
 "तू मला भेटणं बंद केलंस, तेव्हा मी तुला भेटत जाऊ नको असं सांगितलं होतं ?"
 "तसं नव्हे, पण आता परिस्थिती बदलली आहे."
 अजूनही काय म्हणायचं ते तो स्पष्ट म्हणत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर क्षमायाचना, दुःख, निराशा ह्यांचं असं काही विचित्र मिश्रण होतं की, क्षणभर मला त्याची दया आली.
 मी म्हटलं, "रुस्तुम, काही काळापूर्वी मी तुला माझं सर्वस्व देऊ केलं होतं. आठवतं तुला ? आता तू माझ्याकडून नक्की काय मागतोयस त्याचा मला थांग लागत नाहीये, पण ते जे काही असेल ते देणं मला शक्य नाही."
 "तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आलंय ?"
 "तो तुझा प्रश्न नाही. असं विचारायला तुला लाज कशी नाही वाटत ?"
 "इतकी कठोर होऊ नकोस ग."
 "हा कठोरपणा नाहीये रुस्तुम मला तुझ्याबद्दल आता काहीही वाटत नाही. ना प्रेम, ना मैत्री. माझ्या आयुष्यात तुला थारा नाही. हे सत्य फक्त मी तुला सांगतेय. कशा तऱ्हेनं सांगू म्हणजे तुला पटेल ?"
 त्यानंतर मी फक्त त्याच्या मृत्यूची बातमी वाचली. वर्तमानपत्रात मृत्यूची बातमी येण्याइतपत नाव त्यानं मिळवलं होतं. त्याच्यासाठी माझ्या डोळ्यांत काही पाणी आलं नाही. त्याच्या रूपाने, व्यक्तिमत्त्वाने मोहून गेलेली मी आणि आजची मी वेगवेगळ्याच आहोत. आजही त्याच्या प्रेमात पडणं हा एक मूर्खपणा होता असं मला वाटत नाही. पण त्यावेळी मला रुस्तुम जसा वाटला तसा नव्हता एवढं मात्र खरं. तो उत्तम दर्जाचा चित्रकार नव्हता, कधीच होऊ शकला नसता. तो अष्टपैलू होता पण त्याचा कुठलाच पैलू अगदी लखलखीत, त्याला शिखरावर नेऊन पोचवायला समर्थ असा नव्हता. तो एका आपमतलबी आणि जहांबाज बायकोचा नवरा नव्हता. आमचं नातं ॲलिसखातर तोडल्या-तोडल्या तो मला भेटला असता आणि नंतर ॲलिसची शोधक नजर आपला वेध घेऊ शकणार नाही असं वाटल्यावर मग येऊन भेटला नसता, तर माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्याविषयीची हळुवार आठवण मी बाळगली असती.
 त्यानंतर ॲलिस मला एकदा योगायोगानं जहांगीर आर्ट गॅलरीत भेटली. आम्ही दोघींनी एकमेकींना लगेच ओळखलं. तिनं हसून हॅलो म्हटलं आणि माझी प्रतिक्रिया काय असावी ह्याचा निर्णय चटकन न झाल्यामुळे मी म्हटलं, "हॅलो, तू इथं ?"
 ती मोठ्याने हसली. "मला जवळच्या ऑफिसात कुणालातरी भेटायचंय. तो तासाभराने येणाराय म्हणून वेळ घालवायला इथ आले. बरं झालं तू भेटलीस. मला एकदा भेटायचं होतं तुला."
 मी भुवया खूप उंच चढवल्या पण त्याकडे दुर्लक्ष करून ती म्हणाली, "चल, कॉफी घ्यायला येतेस?"
 कॉफी पिता-पिता तिनं विचारलं, "लग्न झालंय ना तुझं?"
 "हो !"
 "असं वाटलं मला तुझ्याकडे बघून. मूलबील ?"
 "मुलगी आहे."
 "आनंदात आहेस ना?"
 हा कसला प्रश्न ? असं काहीतरी फालतू बोलण्यासाठी ती मला इथे घेऊन आली?
 मी काही बोलले नाही तेव्हा ती म्हणाली, "रागावू नको. आयुष्याचा शेवट दिसायला लागला की, माणसाला काही हिशोब मिटवावे लागतात. तुला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी तुला क्षमा केलीय."
 छातीत एकदम अडकलेल्या श्वासामुळे मी बोलू शकले नाही. तू कोण मला क्षमा करणार असं मी विचारण्यापूर्वीच गुडबाय म्हणून ती निघूनही गेली होती.

- ★ -
आठवण
उज्ज्वला


 आणखी थोडे दिवरा जगती तर ॲलिस एक्काहत्तर वर्षांची झाली असती. आज तिचा वाढदिवस आहे. मला आठवतंय मला खूप गंमत वाटायची ती मित्रमंडळींना बोलावून आपला वाढदिवस साजरा करायची त्याची. मुलं लहान असताना आई-वडलांनी त्यांचे वाढदिवस साजरे करायचे हे ठीक आहे, पण चांगल्या वाढलेल्या माणसानं आपणच आपला वाढदिवस साजरा करायचा हे मला जरा चमत्कारिक वाटायचं. पाहुणे फुलांचा गुच्छ नाहीतर चॉकलेटची पेटी किंवा वाईनची बाटली घेऊन यायचे आणि कुणाशी हस्तांदोलन करीत तर कुणाच्या पुढे गाल करीत ती त्यांच्या शुभेच्छा स्वीकारायची. उत्सवमूर्ती आणि यजमानीण अशी दुहेरी भूमिका ती मोठ्या कौशल्याने पार पाडायची.
 अलिकडे बऱ्याच वर्षांत असा योग आला नव्हता, पण आज मला त्या फार पूर्वीच्या वाढदिवसांची आठवण आली. पेले हातात घेऊन उभे असलेल्या पाहुण्यांच्यातून सुळसुळीत केस थोडेसे उडवीत चालणं, कुठे थांबून एखाद्याशी दोन शब्द बोलणं - तिचा आवाज मला ऐकू येतो, जरा वरच्या पट्टीतलाच होता -, कुठे एखाद्याने सांगितलेल्या विनोदी चुटक्याला मनापासून हसून दाद देणं, एखाद्याचा ग्लास रिकामा दिसला की, त्याला लुटुपुटीचं रागावून तो पुन्हा भरणं, सगळं अगदी स्पष्ट आठवतंय मला.
 आज ॲलिसबद्दल विचार केला की, मला आठवते ती ही ॲलिस. नंतरची मध्यमवयीन किंवा अगदी अलिकडची नव्हे. म्हातारी हा शब्द मनात आला होता, पण तो तिच्या बाबतीत लागू पडत नाही. म्हातारी म्हटल्यावर एक थकलेली, त्रासलेली, कदाचित जीवनाला कंटाळलेली मूर्ती डोळ्यांसमोर येते. ॲलिस नेहमी आनंदी, जगण्यात रस घेणारी, शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानं तरुण अशीच राहिली. अर्थात आजच्या काळानुसार ती म्हातारी नव्हतीच, शिवाय आजूबाजूला वावरणारी मुलं-नातवंडं हे वय ठरवण्याचं नेहमीचं परिमाण तिच्या बाबतीत अस्तित्वात नव्हतं. नातवंडं डोळ्यासमोर वाढताना दिसली की, नाही म्हटलं तरी म्हातारं वाटतं. कदाचित ही केवळ हिंदी लोकांची मानसिकता असेत. अमुक वयाचं झालं की, अमुक तऱ्हेचं वागणं अपेक्षित असत. चालणं-बोलणं ठाय लयीत, खालच्या पट्टीत. जगण्यात वाजवीपेक्षा जास्त रस घ्यायचा नाही, वाटला तरी दाखवायचा नाही. डोक्यावर रुपेरी केस बाळगणारीनं काय एखाद्या विनोदावर टाळी पिटून मोठ्याने हसायचं असतं ? तोंडाला रंग फासायचा असतो ? ढांगा टाकीत चालायचं असतं ? ॲलिस स्वतःला हिंदी म्हणवायची तरी असल्या मर्यादा तिनं कधी पाळल्या नाहीत.
 कधीकधी मला वाटतं, आपला देश सोडून ती इकडे आला. इथे आपल्या मानलेल्या माणसांसाठी तिनं खूप काही केलं. त्याच्या बदल्यात तिला काय मिळालं ? नवरा, मुलंबाळं ह्यांच्यात उभारीची वर्ष सुखानं व्यतीत करण्याचं बहुसंख्य बायकांचं स्वप्न सुद्धा तिच्या बाबतीत स्वप्नच ठरलं. की असले हिशेब तिनं कधी मांडलेच नव्हते आणि वाट्याला आलेलं आयुष्य ती सगळ्यांसारखं प्रवाहपतित होऊनच जगली?
 फार मागे एकदा माझं आणि आईचं ॲलिसबद्दल बोलणं चाललं होतं, तेव्हा आई म्हणाली होती, "तिच्याबद्दल तुला इतके प्रश्न का पडतात? बहुतेक माणसं साधी सरळ असतात. ती आपल्याला नीट कळली नाहीत की त्यांच्यात फार गुंतागुंत आहे असं वाटायला लागतं."
 कुणास ठाऊक, तसंही असेल.

- ★ -