अर्धुक/स्त्री-मुक्ती:एक चिंतन

विकिस्रोत कडून
ह्यापुस्तकातल्या बायका कधी ना कधी माझ्या ओळखीच्या झाल्या. काही माझ्या आयुष्याचा भाग बनून राहिल्या होत्या किंवा आहेत. काही बराच काळ माझ्या जाणिवेच्या परिघावर राहिल्या, तर काही थोडाच काळ माझ्या जीवनाला नुसता स्पर्श करून मग लांब गेल्या. त्यांच्या हकिगती लिहिताना काही संदर्भ मी बदलले आहेत, काही ठिकाणी मोकळ्या जागा ऐकीव माहितीवरून, क्वचित कल्पनेनं सुद्धा भरल्या आहेत. ह्या स्त्रियांची चरित्रं लिहिण्याचा माझा हेतू नाही. त्या सगळ्या खऱ्याच आहेत, पण त्यांच्या गोष्टी शंभर टक्के वास्तवाला धरून लिहिलेल्या नाहीत. इथे बारीक सारीक तपशील ही महत्त्वाची बाब नाही. महत्त्वाचं आहे आणि पूर्णपणे वास्तवाला धरून आहे ते म्हणजे केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून त्यांच्यापुढे उभ्या राहिलेल्या समस्या, संकटे आणि त्यांतून आपापल्या परिस्थिती आणि स्वभावानुसार त्यांनी काढलेले मार्ग.

 त्यांच्या समस्या ह्या मुख्यत्वाने पितृसत्ताक, पुरुषप्रधान कुटुंब आणि समाजव्यवस्थेतून, आणि त्यातील त्यांच्या दुय्यम स्थानामुळे उद्भवलेल्या आहेत. लग्न हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचे अटळ ध्येय असते आणि त्याचा परिणाम म्हणजे तिने आपल्या पूर्वायुष्याशी संपूर्ण फारकत घेऊन एका परक्या कुटुंबाचा घटक बनायचं. बाईची गौण भूमिका, तिला दिली जाणारी वागणूक आणि तिच्याबद्दलचा कुटुंबाचा आणि समाजाचा एकूणच दृष्टिकोन ह्या गृहीताशी निगडित आहे. मुलगी जन्मल्यापासून तिचं लग्न करून देणं हे आपलं परम कर्तव्य समजून आईबाप तिला दुसऱ्याची ठेव म्हणून वाढवतात. इथपासूनच तिचं त्या कुटुंबातलं गौण स्थान अधोरेखित होतं. तिला त्या कुटुंबात कोणतेही हक्क नसतात. एकदा सासरी गेली की ती माहेरच्या कुटुंबाचा घटक राहत नाही. सासरी पटलं नाही आणि ती माहेरी परत आली तर शक्यतो काहीतरी तडजोड करून तिची परत पाठवणी होते. मुलीला सासरी न नांदायला पुरेसं सबळ कारण आहे असं पटलं तर मध्यमवर्गीयांपेक्षा कष्टकरी वर्गातल्या आईबापांची तिला ठेवून घ्यायची जास्त तयारी असते असं मी पाहिलं आहे. कदाचित ह्याचं एक कारण असं असू शकेल की ती शेतमजुरी करून पोटाला मिळवू शकते तेव्हा तिचा कुटुंबाला भार होत नाही. आणखी एक कारण असं असू शकेल की अशा न नांदणाऱ्या आणि नांदवल्या न जाणाऱ्या मुलींची संख्या इतकी असते की तो कुटुंबाला कलंक वगैरे आहे असं समजलं जात नाही. तरी सुद्धा आईबापांच्या मागे भाऊ अशा बहिणीची जबाबदारी घेईल ह्याची काही शाश्वती नसते तेव्हा शेवटी ती एकटीच पडण्याची शक्यता असते. ह्यामुळे सासरी मिळणारी वागणूक असह्यच झाली तर बाई सासरचं घर सोडायला तयार होते, कारण तिथे तिला इतर कसला नसला तरी जीव जगवण्यापुरतं अन्न, लाज राखण्यापुरतं वस्त्र आणि डोक्यावर छप्पर एवढं मिळण्याचा तरी हक्क असतो. पण ह्याचा अर्थ ती तिथे फार सुखात जगते असा नाही.
 लहानपणापासून कितीही संस्कार झालेले असले तरी स्वत:ची पार्श्वभूमी, रहाणी, सवयी सगळं विसरून एका संपूर्ण नवीन वातावरणाचा स्वीकार करायचा, स्वत:चं मन आणि व्यक्तिमत्व मारून अनेकदा शारीरिक व मानसिक छळ सहन करीत जगायचं हे कुठल्याच बाईला फारसं सुखावह असणं शक्य नाही. तिनं सहनशील असणं हे ह्या कुटुंबव्यवस्थेचं गृहीत आहे. माझी बायको फार समजूतदार आणि सहनशील होती म्हणून माझा संसार निभावला असं म्हणणारे किंवा मनोमन समजलेले पुष्कळ पुरुष असतात. पण ही सहनशीलता तिनं आणि तिनंच का दाखवायची, कोणत्या मर्यादेपर्यंत दाखवायची असे प्रश्र कुणी विचारीत नाही. एका मर्यादेपलिकडे तिनं सहन करायला नकार दिला तर ती आदर्श स्त्रीत्वाच्या कल्पनेला तडा देणारी, कुटुंबाचं स्वास्थ धुळीला मिळवणारी, कुटुंबसंस्थाच मोडकळीला आणणारी ठरते. हा मानसिक ढाचा जोवर कायम आहे तोवर स्त्रीला पुरुषप्रधान एकत्र कुटुंबव्यवस्थेत न्याय मिळण्याची शक्यता नाही.
 एकत्र राहण्याचा, त्यातूनही 'कायमचं' नातं जोडून एकत्र राहण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्वानाच तडजोडी कराव्या लागतात. बाईची कुचंबणा जी होते ती केवळ तडजोडी कराव्या लागल्यामुळे, काही बाबतीत स्वत:च्या इच्छेविरुद्ध वागावे लागल्यामुळे होते असं नाही. एका अत्यंत असमान नात्यात अन्याय्य पद्धतीने तडजोडी लादल्या गेल्यामुळे होते. एकत्र कुटुंबात ती हतबल असते कारण ही एक विरुद्ध अनेक अशी लढाई असते.
 विभक्त कुटुंबात नवरा-बायकोचं नातं जास्त समान असू शकतं. ती कौटुंबिक निर्णयप्रक्रियेत भाग घेऊ शकते आणि त्याला त्याच्या कुटुंबाच्या दबावक्षेत्राबाहेर असल्यामुळे काही तडजोडी स्वीकारायला कमीपणा वाटत नाही. तडजोडी दोन्ही बाजूंनी झाल्या म्हणजे दोघांनाही जास्त सह्य होतात, शिवाय त्या लादल्या न जाता दोन माणसांतलं नातं टिकवण्यासाठी स्वेच्छेनं केल्या जातात. पण नवरा-बायकोच्या संसारात सुद्धा त्यांचा दृष्टिकोन पारंपरिक भूमिका स्वीकारण्याचा असला तर बाईच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही. शारीरिक, मानसिक क्षमता पुरुषाइतकीच असूनही जर बाई कुचंबणा, मार सहन करीत राहिली तर ती आपल्या हक्कांपासून वंचितच राहणार.
 बाईच्या गौण भूमिकेचा मुख्य पाया म्हणजे तिचे आर्थिक परावलंबित्व. प्रचलित व्यवस्थेमधे कमाई करून कुटुंब पोसणे हे पुरुषाचे काम असते. बाई जरी मिळवती असली तरी ती प्रामुख्याने तिची जबाबदारी समजली जात नाही. ती मिळवती नसली तर ती घरी करते त्या कामाचं पैशात मोजमाप होत नाहीच, पण घरची जमीन असली आणि त्यावर ती उजाडल्यापासून मावळतीपर्यंत राबत असली तरी जमिनीची मालकी घरातल्या पुरुषांची असल्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न त्यांचेच असते. बाईला ना तिच्या कामाची मजुरी मिळते ना शेतमालाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशात वाटा. नोकरी करून पगार मिळवणारी बाई सुद्धा सर्व पगार बेहिशेबीपणाने कुटुंबावर खर्च करते. त्यातला काही स्वत:च्या भविष्याची तरतूद म्हणून बाजूला ठेवीत नाही. तेव्हा तिला नवऱ्यापासून फारकत घेण्याची पाळी आली तर ती अक्षरश: निष्कांचन अवस्थेत. बहुसंख्य बायका त्यांच्या मदतीसाठी केलेल्या कायद्यांचा आधार घेत नाहीत. त्यांनी घेऊ पाहिला तरी समाज त्यांना साथ देत नाही.
 नवऱ्याचं घर सोडून जाण्यातला आणखी एक अडसर म्हणजे मुलं. सहसा मुलं सोडून जाण्याची बाईची तयारी नसते. त्याला मुलांशी असलेली शारीरिक आणि भावनिक जवळीक हे कारण असतंच, पण पारंपरिक दृष्ट्या मुलं संभाळणं हे बाईचं काम मानलं जातं हेही असतं. पूर्णवेळ नोकरी करून मुलांची जबाबदारी इतरांवर सोपवणाऱ्या बायका सुद्धा समाजमन अजून पचवू शकलेलं नाही. मग मुलांची जबाबदारी झटकून त्यांना सोडून जाणाऱ्या बायका तर खलनायिकांच्या स्वरूपातच समाज पाहतो. सासरचे लोक सहसा मुलांवरचा हक्क सोडीत नाहीत. समजा सोडला आणि सासर सोडणारी बाई मुलांना घेऊन जाऊ शकली तरी अशा तऱ्हेचं पाऊल उचलताना तिला फार विचार करावा लागतो. आधी माहेरचे लोक लग्न करून दिलेल्या मुलीला कायमचं परत स्वीकारायला तयार नसतात. त्यातून मुलांची आई असलेलीबद्दल तर विचारायलाच नको. अशा परिस्थितीत मुलांना संभाळणं आणि नोकरी करून त्यांना पोसणं अशी दुहेरी जबाबदारी पेलण्याची तिची कुवत नसली तर नवऱ्याचं घर सोडण्याचा विचार तिनं करण्यात अर्थ नसतो. क्वचितच एखादी संगीता मुलांना सोडून पळून जाते. पण बहुतेक बायका आयुष्याला हार जातात कारण लहानपणापासून कधी त्यांना आपल्या हक्कांसाठी लढायचं बळच मिळालेलं नसतं. नकुसासारख्यांना तर हक्कांसाठीच काय, साध्या अस्तित्वासाठी सुद्धा झगडण्याचं बळ परिस्थितीने दिलेलं नसतं.
 स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल बोलताना एक विधान वारंवार केलं जातं आणि ते म्हणजे स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात. सासरच्या कुटुंबात प्रवेश केल्यावर वर्षानुवर्षे टक्के टोणपे सहन केलेली सासूच नव्याने त्या घरात येणाऱ्या सुनेचा सर्वात जास्त छळ करते. सासरी छळ होतो म्हणून माहेरी पळून आलेल्या मुलीचं परत जाण्यासाठी मन वळवण्यात आई पुढाकार घेते. असं का ह्याचं उत्तर खरं म्हणजे फार सरळ आहे. अशा वागण्यामागची मानसिकता पुरुषप्रधान समाजाने निर्माण केलेली आहे. पुरुष हा समाजाचा आणि कुटुंबाचा मुख्य घटक असतो आणि स्त्रियांच्या अस्तित्वाला फक्त पुरुषांच्या संदर्भातच अर्थ असतो. नवरा कसाही असला तरी तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो, आपला स्वामी असतो, आपल्याला आर्थिक, शारीरिक, भावनिक सुरक्षितता आणि समाजमान्यताही तोच मिळवून देतो हे बायकांच्या मनात खोलवर रुजलेलं असतं. नवऱ्याच्या खालोखाल महत्त्व असलेला पुरुष म्हणजे मुलगा. तरुण होईपर्यंत तरी त्याचं लालन-पालन करण्याबरोबरच ती त्याच्यावर अधिकारही गाजवू शकते. ह्या आपल्या अधिकाराला आव्हान देणारी, त्याच्या प्रेमात वाटेकरी बनणारी सून आली म्हणजे तिच्याकडे सासुने शत्रूत्वाच्या नजरेनं पाहणे हे ओघानेच येते. स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात ह्याचा अर्थ एवढाच असतो की प्रचलित चौकट त्यांनी मनोमन स्वीकारलेली असते.
 ह्या संपूर्णपणे स्त्रीविन्मुख समाजात रूढीविरुद्ध आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या स्त्रिया असतात हीच दखल घेण्याजोगी बाब आहे. परंतु असह्य परिस्थितीविरुद्धचा त्यांचा लढा व्यक्तिविशिष्टच राहतो. त्यापलिकडे जाऊन परिस्थितीला कारणीभूत असलेल्या रूढ कल्पना, चालीरीती, कुटुंबरचना ह्यांविरुध्द उभा राहत नाही. प्रत्येकजण आपली गोष्ट अपवादात्मक आहे, बाकीच्यांनी तसं वागण्याचं कारण नाही असंही सूचित करते.
 माहेरचा किंवा इतर कुणाचा आधार न घेता नवऱ्याला सोडून एकटी राहाणारी, बाईनं एकटं राहण्यातले धोके ओळखून उशाशी कुऱ्हाड आणि तिखटाची पूड घेऊन झोपणारी रुक्मिणी वटसावित्रीची पूजा करते. तिला विचारलं, "ही पूजा कशासाठी करतात माहिताय का तुला? हाच नवरा सात जन्म मिळावा म्हणून. तुला हवाय का हाच नवरा सात जन्म?" "नको बया, ह्याच जल्मी नको झालाया तर सात जल्म कशापाई?" पण म्हणून पूजा करायची, संक्रांतीचा वसा वसायची थांबणार नाही. एवढंच नव्हे तर तिची बहीण नवऱ्याकडे नांदत नाही आणि माहेरी येऊन राहिलीय तर ही तिच्यावर टीका करते. हिच्या मते बहिणीचा नवरा इतका काही वाईट माणूस नाही. ही म्हणते मी असते तर त्याच्यापाशी आनंदाने नांदले असते.
 आईबापांना दुसऱ्या कुणाचा आधार नाही म्हणून नवऱ्याला सोडून त्यांच्याजवळ येऊन राहणारी यमुना तिनं ज्याला नंतर नवरा मानला त्याला मुलगा देण्यासाठी स्वत:चा जीव आणि कुटुंबाचं आर्थिक-मानसिक स्वास्थ्य धोक्यात घालते. विधवा असून मुलांना घेऊन स्वत:च्या हिमतीवर एकटी राहाणारी आणि समाजाच्या टीकेचं लक्ष्य बनलेली सीता नवऱ्याबरोबर न नांदता वारंवार घरी पळून येऊन शेवटी दुसऱ्या एका माणसाबरोबर राहाणाऱ्या धाकट्या सावत्र बहिणीवर कडवट टीका करते. तिचं काय खुपत असेल, नवऱ्याघरचं सुरक्षित समाजमान्य आयुष्य सोडून, सगळ्यांच्या शिव्या खाऊन तिनं नवऱ्याला का सोडलं असेल ह्याचा विचार करण्याची तिला गरज भासत नाही.
 मार्गरेट वरवर पाहता दुर्दैवाची बळी ठरते, पण त्या दुर्दैवाला तिची मनोधारणा, तिचे निर्णय कारणीभूत ठरतात. दुसऱ्यांदा लग्नाचा निर्णय घेताना ती वयाने परिपक्व, व्यवसायात चांगली स्थिरस्थावर झालेली होती. तरीही तिनं अगदी थोड्या ओळखीवर लग्न करून नवऱ्याबरोबर जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर लवकरच त्याचं खरं स्वरूप तिच्यासमोर येऊनही ती त्याला धरून राहिली. तिच्या नवऱ्याच्या लग्नापासून आणि बायकोपासून ठाम अपेक्षा होत्या. तिच्या अपेक्षा काय आहेत ह्याचा विचार करण्याची त्याला गरज भासली नाही किंवा असं म्हणता येईल की आपल्याला हवंय त्यापेक्षा वेगळं काही तिला हवं असेल ह्याची तो कल्पनाच करू शकत नव्हता. आपल्या उर्मी दाबून ठेवून, मनाचा कोंडमारा सहन करीत ती जोवर हसतमुखाने जगत होती तोवर ती सुखी आहे अशी कल्पना त्याला करून घेता येत होती. तो दुष्ट होता असं नाही, फक्त तिच्या बाबतीत संवेदनशुन्य होता. ती त्याच्या मनाप्रमाणे वागली की तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करी. ऐहिक दृष्टीने तिला तो काही उणे पडू देत नव्हता. फक्त तिला बौद्धिक गरजाही आहेत ह्याची तो दखल घेत नव्हता. हे सगळं स्पष्ट झाल्यावर मार्गरेटने ते सहन करून का घेतलं? अगदी परदेशातही तिच्यासारख्या शिकलेल्या, समर्थ बाईला काहीच हालचाल करता आली नाही हे पटत नाही. कुठेतरी ह्या पद्धतीने का होईना, संसारसुख अनुभवण्याची तिला आस होती. बाईपणाची तिची कल्पना शेवटी अगतिकतेचीच होती. माझ्या ओळखीची एक ब्रिटिश बाई आहे. तिनं तरुणपणी एक कार्यक्षेत्र निवडून फार उत्तम काम केलं आणि त्या क्षेत्रात जगभर नाव मिळवलं. जवळ जवळ चाळिशीला पोचल्यावर तिनं लग्न केलं. तिला विचारलं लग्नानंतर काय करणार, तर ती म्हणाली, बघू, काही वर्ष तरी नुसता घरसंसार पाहणार. म्हणजे कुठेतरी खोल मनात बाईनं लग्न केलं की तिला नुसतं गृहिणी होऊन राहण्याचा हक्क प्राप्त होतो अशी कल्पना रुजलेली आहे. ती अगतिक नसेल, पण संस्कारांनी सीमित आहे.
 ह्या पुस्तकातल्या स्वत:च्या परिस्थितीविरुद्ध बंड करणाऱ्या बायका ह्याच संस्कारांनी जखडलेल्या आहेत. माझ्यावर, माझ्यासारख्या अनेकजणींवर अशी वेळ का येते? हा आपल्या कुटुंबपद्धतीचा अटळ परिणाम आहे का? असल्यास ती झुगारून देण्याची किंवा तिच्यात काही फेरबदल करण्याची गरज आहे का? असे प्रश्न त्या विचारीत नाहीत. नवरा बऱ्यापैकी सुस्वभावी असेल, सासू फारसा जाच करीत नसेल, तर परंपरेने ठरवलेली भूमिका त्या सुखासमाधानाने बजावतील. अगदी नवऱ्यापेक्षा शिक्षण, बुद्धी, कर्तबगारी ह्यांत तसूभरही कमी नसलेल्या स्त्रिया सुद्धा कुटुंबात दुय्यम भूमिका निभावण्यात काही गैर मानीत नाहीत. ह्याचाच अर्थ असा की बहुसंख्य स्त्रिया आजही प्रचलित कुटुंबव्यवस्था, त्यातली त्यांच्या वाट्याला येणारी भूमिका आणि ह्या व्यवस्थेचा पाया असणारी समाजमूल्ये स्वीकारतात.
 प्रचलित व्यवस्था बदलण्याची पुरुषांना आच नसते ह्यात काही आश्चर्य नाही कारण त्या व्यवस्थेचे बहुतांशाने त्यांना फायदेच होतात. स्त्रियांच्या दृष्टीने त्यात पुष्कळ गैरफायदे असले तरी त्यात लाभणारी सुरक्षितता त्यांना हवी आहे असे दिसते. त्यामुळे ह्या व्यवस्थेतल्या त्यांच्या भूमिकेच्या उदात्तीकरणाने सुखावत त्या ह्याच चौकटीत राहू इच्छितात. समस्या उभ्या राहिल्या तर त्या आपल्या पुरते त्यांचे निराकरण करतात, पण चौकट मोडून अज्ञातात उडी घेणे त्यांना मान्य नाही. ही मानसिकता जोवर कायम आहे तोवर प्रचलित कुटुंबव्यवस्थेमुळे उद्भवणाऱ्या स्त्रियांच्या समस्या कायमच राहाणार आहेत. जिद्द आणि अनुकूल परिस्थिती असलेल्या काही स्त्रिया त्यांच्यावर मात करतील, बाकीच्या निमूटपणे सहन करीत जगतील.

-जाई निंबकर