अर्धुक/सीता

विकिस्रोत कडून
पोरगी बोलली ते आठवून आठवून सीतेच्या डोळ्यांना पुन्हा पुन्हा पाणी येत होतं. एकीकडे बाहीनं डोळे पुसत, नाक ओढत तिचं खुरपं चालूच होतं.

 नर्मदेनं हाक मारली होती, "सिते, ए सिते, बेल ऐकाय आली न्हाई का? भाकरी खायची का नाय?"
 "मला भूक न्हाई."
 विठोबानं पण हाळी दिली होती पण तिनं लक्षच दिलं नाही. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता पण ती जेवायला गेली नाही.
 असं वागावं पोरीनं? असलं वंगाळ बोलावं?
 आदल्या दिवशी तिनं मालकिणीला विचारलं होतं, "बाई ह्या प्लाटमंदी लई कांग्रेस झालंया. मला एकटीला कवा उरकायचं? नंदाला जोडीला आणू का? पाऊस लागल्यापासनं काम न्हाई तिला. बसूनच हाय घरी."
 नंदाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून तिला आणली तर तिनं हे असं केलं. प्लॉटमधल्या झाडांची छाटणी केली होती. त्याच्या बारक्या काटक्या जागेवरच पडल्या होत्या. खुरपण राहिली बाजूलाच नि नंदा काटक्या सर्पणाला घरी न्यायला गोळा करायला लागली.
 "नंदे, त्या काटक्यांना हात लावू नको."
 नंदानं लक्षच दिलं नाही तशी सीतेनं उठून तिच्या हातातला एक जुडगा हिसकून घेतला, "मुकाट काम कर. आज माज्या शब्दावर बाईंनी तुला कामावर ठिवलीय. तू परवानगी घेतल्याबगार कशाला हात लावलास तर उद्या बाई मला जाब इचारतील. मी इक्ती वर्स हितं काम करतीया पन कुणाचं हूं म्हणून घेतलं न्हाई."
 आईनं हातात कोंबलेलं खुरपं फेकून देऊन नंदा जागची उठली नि म्हणाली, "छिनाल रांडे, आई हायस का वैरीन? तुला माझं काय बी चांगलं बगवत न्हाई."
 ब्लाऊज थोडासा फाटला होता तो तिनं बोटं घालून आणखी फाडला आणि आईनं मला मारलं, कपडे फाडले, शिव्या दिल्या म्हणून आरडत ती नवरा शेजारच्या प्लॉटमधे दाऱ्यावर होता त्याच्याकडे गेली. त्यानं तिला उगी करून घरी पाठवलं.
 सीता विचार करीत होती, पोरांसाठी मी काई बी करायचं ठिवलं न्हाई, पण माज्या हाताला यशच का न्हाई?
 नवरा मेला तेव्हा ती जेमतेम विशीत होती. पदरात दोन मुलं. दुसऱ्या बाळंतपणाला ती आईकडे गेली होती. तिथं तिनं आपल्या मनानं ऑपरेशन करून घेतलं होतं. ते समजल्यावर तिच्या नवऱ्यानं तिला खूप मारलं होतं. पण त्यावेळी तसं केलं नसतंन तर एव्हाना आणखी दोन पोरं झाली असती.
 ती नि तिचा नवरा एका बागाईतदाराच्या वस्तीवर रहायची. नवरा मेल्यावर त्यानं तिला खोली खाली करायला सांगितली. कारण तिथे नवा गडी यायचा होता. सीतेला सासर-माहेरची बख्खळ माणसं होती. पण कुणाच्या तरी आधाराने रहायचं आणि त्यांचं मिंधेपण पत्करायचं हे तिला मानवलं नसतं. तिनं गावात एक खुराडेवजा खोली भाड्याने घेतली.
 ती पोरांना घेऊन एकटीच रहाते, कष्ट करून त्यांना संभाळते, तिला कुणाच्या आधाराची गरज वाटत नाही ह्याचं तिच्या सासर-माहेरच्या लोकांना वैषम्य वाटायचं. मग ते तिच्याबद्दल वाटेल ते बोलायचे. कुणी म्हणे, चांगला तगडा जवान गडी व्हता, येकायेकीच कसा काय खलास झाला? हिनंच काय तरी करणी केली आसंल. कुणी म्हणे, हिला येकलीलाच ऱ्हाया पायजे त्याला कारन हाय. मंजी कसं हाय, की तिच्याकडं कोन आलं कोन ग्येलं याचा जाब इच्यारनारं कुनी न्हाई. ह्यावर दुसरं कुणी उत्तर देई, तर काय, दोन पोरांचं न आपलं पोट भरून इक्ती टाकटुकीत ऱ्हाते ती काय निस्ती सोताच्या कष्टावर?
  बाकी कुणाच्या बोलण्याकडे सीता लक्ष देत नसे पण तिची आई जेव्हा म्हणाली, "नवऱ्याला चिरडून टाकलंस नि आता झालीस मोकळी कसं बी वागायला," तेव्हा ते तिला जिव्हारी लागलं. ती उसळून म्हणाली, "तो काय किडामुंगी व्हता चिरडून टाकायला? आन तुला हकच कुटं हाय मला असं बोलायचा? तू नवऱ्याला सोडून दुसऱ्याचा हात धरून गेलीस. मला माजा बाप कंदी दिसला बी न्हाई. मी नाव लावलं त्येबी त्याचं न्हाई. का सोडलंस त्याला? कुटं हाय तो? जिता तरी हाय का?"
 ह्याला आईनं उत्तर दिलं नाही. सीता तान्ही असताना तिला नि तिच्याहून थोरल्या दोन भावांना घेऊन आई आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्याच्या मागे गेली होती. तो सुद्धा तिच्यापाशी अधनंमधनंच येऊन रहायचा. मोठी झाल्यावर सीतेन कधीतरी थोरल्या भावाकडून ही गोष्ट ऐकली होती आणि आपण ज्याचं नाव लावतो तो आपला बाप नव्हे हे तिला समजलं होतं.
 मुलगा जरा मोठा झाल्यावर त्याला चांगल्या शाळेत घालायला पाहिजे म्हणून ती माहेरच्या गावी येऊन राहिली. मोठं गाव आहे, तो बिघडण्याचा संभव जास्त, म्हणून ती त्याच्यावर कडक नजर ठेवायची. तो शाळेत कधी जातो, घरी कधी येतो, कुणाबरोबर फिरतो हाची सारखी चौकशी करायची. तो शाळेच्या वेळात कुणाबरोबर तरी व्हिडिओ बघायला जातो असं कुणी तरी तिला सांगितलं. त्यावर तिनं त्याला मरेस्तो मारलं होतं. तो रडत रडत म्हणाला, "सगळी तर पोरं बघतात. मग मी गेलो बघायला तर काय बिघडलं?' तिनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. "पन साळंच्या येळात कशाला? अब्ब्यास कराया नको? आन आज तू दुसऱ्या पोराच्या पैशावर हिडिओ बगितलास, उद्या तो म्हणला तू मला दाव मंजी तू पैसा कुटून आणणार? माज्या येकलीच्या कष्टावर समद्या चयनी कराया पैसा पुरणार हाय का तुला?"
 तिच्या धाकाने राजू थोडी वर्ष शाळा शिकला पण त्याला अभ्यासात फारसं डोकंही नव्हतं आणि त्याचं त्यात लक्षही नव्हतं. सीतेचा एक सावत्र भाऊ राजूपेक्षा चारपाच वर्षांनीच मोठा होता. तो पुण्यात ड्रायव्हरची नोकरी करायचा. रजेवर आला की त्याचा युनिफॉर्म, बूट, कापून सेट केलेले केस ह्या सगळ्याची राजूवर मोठी छाप पडायची. मामासारखी शहरात एखादी नोकरी, मोठा पगार, त्याच्यासारखी राहणी असं स्वप्न राजू पहात होता. पण सीतेच्या मनात त्यानं शहरात जावं असं मुळीच नव्हतं. तिथं तो कसल्या संगतीला लागेल, बहकेल अशी तिला भीती वाटायची. इथं माझ्या नजरेखाली आहे तोच बरा असं वाटायचं.
 एक दिवस मामा राजूसाठी स्थळ घेऊन आला. लग्नाच्या विचाराने राजू हरखून गेला पण सीता म्हणाली, "कशाला इतक्यात? त्याला लय शिकायचं हाय अजून."  थोरला भाऊ म्हणाला, "येडी का खुळी तू? त्याला बाप न्हाई धाकात ठेवाया. त्यानं काय तरी येडंवाकडं करण्यापरीस लगीन लावून दे त्याचं.'
 "माजा राजा गुणी हाय. तो येडंवाकडं वागायचा न्हाई."
 "तो गुणी असून काय उपेग? त्याची आई वागते तसं तो वागणार?"
 "मी काय वाकडं वागले?"
 ते तुजं तू समजून घे."
 सीता इतर बायांसारखं खालमुंडीनं काम करायची नाही. सगळ्यांशी हसूनखेळून असायची. कुणाचीही मस्करी करायची. एकदा खुरपताना दिसलेले चिकूच्या झाडावरचे सुरवंट एका पत्र्याच्या तुकड्यावर तिनं जमा केले. "मुकादम, उसळीला सोरटं हवी का? लय चांगली लागत्यात म्हनं."
 एकदा एका झाडाच्या बुंध्याशी मातीत पोकळ घरटं करून बसलेली बेडकुळी तिला दिसली. तिनं ती हळूच एका फडक्यात धरून लालाच्या बनियनमधे टाकली. ती उड्या मारायला लागल्यावर लाला जो नाचायला लागला, सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली. हे असलं वागणं सगळ्यांच्या डोळ्यावर यायचं. लोक म्हणायचे, "दोन पोरांची आय हाय, तिनं असं वागायची कुटं रीत असते? बापय मान्सांशी इरभळ हसायचं, बोलायचं, त्यांच्या अंगचटीला जायचं?" एकदा विठोबा म्हणाला त्यानं तिला पेरूच्या बागेत मुकादमाला मुका देताना पाहिलं म्हणून. सीतेनं असं कधी कबूल केलं नाही, पण सगळ्यांचा विठोबाच्या सांगण्यावर विश्वास बसला एवढं मात्र खरं.
 सीतेनं भावाशी वाद घातला नाही. ती फक्त म्हणाली, "बघू." पण मग राजू आजारी पडला नि त्याला नको तो रोग झाल्याचं डॉक्टरनं सांगितलं तशी सीता हबकली. तिनं मुकाट्यानं आलेलं स्थळ पसंत केलं. तिच्या मनात पाल चुकचुकत होती. मुलगी शहरगावची होती. राजूपेक्षा जास्त शिकलेली होती. नोकरी करीत होती. पण राजूला फार आवडली.
 सून आली नि आठवडाभरात माघारी सुद्धा गेली. तिला म्हणे करमलं नाही. पब्लिक नळावरनं पाणी आणायचं, पब्लिक संडास वापरायचा असल्या गोष्टींची तिला म्हणे सवय नव्हती. ती गेल्यावर थोड्या दिवसांनी तिचा भाऊ आला. राजूला म्हणाला, "माझ्याबरोबर चल. आमचे मालक तुला नोकरी देतील." सीता म्हणाली, "कसली नोकरी?" अशीच अडलं पडलं काम करायचं, कुठे बाजार करायचा, कुठे काही. मालकांचं मोठं खटलं आहे, त्यात एक माणूस सहज खपून जाईल. पुढे त्याचं काम पसंत पडलं तर त्याला दुसरं काही करायला वाव मिळेल." सीता चिडून म्हणाली, "राजू येणार न्हाई. तुमी पोरीला मुकाट नांदाया पाठवा. घरजावई पायजेवता त लगना आंदी तस सांगायचं म्हणे तिकड यिऊन ऱ्हा. कशाला? तुमच्या मालकाचा घरगडीम्हणून राबाया?' पण राजूची बायको परत आली नाही आसपासचे लोक म्हणायला लागले. हिच्यापुढे कंची सून टिकणार हाय? सीता म्हणे. "आवं पन मी तिला वाईट वागवायला तिनं हितं ऱ्हायलं तर पायजे ना?" पण लोकांची तोंडं कोण धरणार?
 सीतेनं धाकट्या भावाला खोदखोदून विचारलं तेव्हा सगळी हकीगत कळली. त्याच्या मालकाच्या घरी एक लांबची नातलग विधवा आश्रितासारखी राहून स्वैपाक करायची. ही तिची मुलगी. तिचं थोडंफार शिक्षण करून आपल्या अनेक व्यापात कुठेतरी मालकानं तिला एका लहानशी नोकरी दिली होती. पहिल्यापास्नं राजूला लग्न करून तिकडेच न्यायचं असा बेत होता. पण उघड तसं सांगितलं असतं तर सीता तयार झाली नसती. मामाचं मत होतं की राजूनं पुण्याला जावं. त्याच्या जन्माचं कल्याण होईल. त्यानं स्वाभिमान सोडून कुणा बड्या माणसाकडे आश्रितासारखं रहायचं आणि तो फेकील त्या तुकड्यावर जगायचं हे सीतेला पटणं शक्यच नव्हतं. पण लग्राचं हे असं झालं म्हणून राजू हिरमुष्टा झालाय हे तिला दिसत होतं. शेवटी ती त्याला म्हणाली, "जायचं का तुला राजा? जा मामाबरोबर जायचं तर." त्याच्या मनात जायचं होतं पण तिच्यासमोर तसं म्हणायची काही त्याला हिम्मत झाली नाही. तो म्हणाला, " नाही जायचं मला. तिला माझ्याजवळ रहायचं असलं तर येईल इथं. नाहीतर गेली उडत." सीता आनंदानं म्हणाली, "आस्सं! शेवटी मानसाला त्याचं सोताचं काय हवं का नाय? का आपलं बायकूनं खुणावलं की गेलं तिच्यामागं! तिची काय येवढी मिजास हाय? असल्या छप्पन पोरी तुज्या पायावर आणून घालीन."
 नंदाच्या लग्नाची मात्र सीतेनं घाई केली. पोरगी शाणी होऊन वरीस झालं. आपण दीसभर कामाला जाणार. ती एकलीच दुसरीकडे खुरपणीला. तिच्यावर कुठवर ध्यान ठिवणार? त्यापरीस लगीन होऊन नवऱ्याच्या घरी गेलेली बरी तिला मिळालेला जावई तिच्या भावाबिवांना तितकासा पसंत नव्हता. पण तिनं विचार केला, काय वाईट आहे? कष्ट करून खाणारा आहे. आपण निराधार, विधवा. आपल्याला काय घर आहे का जमीन जुमला आहे का सरकारी नोकरी आहे म्हणून आपल्या पोरीला कुणी मालदार सांगून येणार आहे? संजयचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारलेले. त्याला मामा-मामीनं संभाळलं. तसे त्याचे चार चुलते, त्यांची मुलं अशी सगळी माणसं होती, पण ती त्याच्या बापाच्या वाटणीच्या जमिनीचा हिस्सा गिळून बसलेली. ती कशाला त्याच्याशी आवर्जुन संबंध ठेवणार? तेव्हा नंदा सासरी म्हणजे संजयच्या मामाच्या घरी गेली.
 रानात नि घरात फुकटात राबायला मिळालेली मोलकरीण म्हणून आपल्याला वागवलं जातंय म्हटल्यावर नंदानं आईकडे तक्रार केली. आईनं समजूत घालून तिला परत घालवली. एकदोनदा असं झाल्यावर सीता जाऊन संजयच्या मामीला भेटून आली. तिला गोडीत सांगितलं की पोर लहान आहे, तिला संभाळून घ्या. ती कामाला नको म्हणायची नाही, पण असं राबवून घ्यायची कुठे रीत असते का? पण नंदाच्या मागचा जाच काही सुटला नाही. ती वैतागून आईकडे यायची, मग संजय तिला घेऊन जायचा. शेवटी कंटाळून सीतेनं तिच्याजवळ येऊन रहायला संजयचं मन वळवलं. तसं संजयलाही मामीचं मोठं प्रेम होतं असं नाही. आपल्या सासूनं कशाला ही ब्याद आपल्या गळ्यात घातली असंच तिला वाटायचं. तिला मूल नव्हतं पण संजयला काही तिनं पोटचा असल्यासारखं वागवलं नाही.
 सीता ज्या झोपडपट्टीत रहायची तिथेच तिनं आपल्या शेजारी मुलीला नि जावयाला छप्पर बांधून दिलं. ती जिथे काम करायची तिथला एक गडी सोडून गेला होता त्याच्या जागी संजयला काम मिळालं. नंदाला दिवस गेले. सगळं मनासारखं झालं.
 कामावर येताना नि जाताना सीता संजयच्या सायकलवर डबलसीट बसायची. पोरीला सकाळीसकाळी उठून धावपळ करायला नको म्हणून सीता त्याच्यासाठी भाकरी करून आणायची. भाकरी खाताना किंवा शेजारी काम करीत असले की त्यांच्या गप्पा, हास्यविनोद चालायचे. सीतेची आई एकदा तिला म्हणाली, "सिते, मला ठावं हाय तू माजं ऐकनार न्हाईस म्हणन, पर जावई मान्साशी इक्ती घसट बरी न्हवं. लोकं बोलत्यात " पण सीता म्हणाली, "आपल्या मनात पाप न्हाई तर आपण कशाला भ्यायचं कुणाला?"
 एक दिवस संजय तिला म्हणाला, "मामी, काल रात्री कुठं गेलता?"
 "कदमांच्यात. कंदीमंदी जात असते बसाय बोलायला."
 "मी आल्यापास्नं बगितलं न्हवतं तुमाला गेल्यालं"
 "तर काय. लई दिसात गेले न्हवते म्हणून बोलावलं व्हतं यिऊन जा म्हणून."
 "कुणी बोलावलं?"
 "मंजी? शांताबाईनं."
 "मी म्हटलं दुसऱ्याच कुणी."
 सीतेला ह्याचा अर्थच कळला नाही. पण मग तो दुसराच काही तरी विषय काढून बोलायला लागला तेव्हा तिनं ते तेवढ्यावर सोडलं.
 पुन्हा संजय एक दिवस म्हणाला, "काल कोण आलं व्हतं तुमच्याकडे?"
 "का वं? रामभाऊ व्हते."
 "असं कुठल्यातरी पुरुषमाणसानं आवशी तुमच्याकडे येणं बरं दिसत न्हाई."
 "तो कुठलातरी न्हाई. मला भैण मानली हाय त्यानं." संजय मोठ्याने हसला.
 "हसताय कशापाई? खरं तेच सांगतेय."
 "असल्या गोष्टीवर कुणाचा इस्वास बसत नसतो मामी. तुमी एकल्या बाईमाणूस. तुमाला येवडं कळू नाई?"
 "एकली कशी? राजा हाय की."
 "काल व्हता का?"
 "आंदी नव्हता. तालमीत गेलावता. मंग आलाच की."
 ह्यावर संजय काही बोलला नाही. चांगला शहाणासुरता, सरळ वागणारा माणूस एकदम असं का करायला लागला सीतेला कळेना. पण त्याबद्दल रागवावं तर दुसऱ्या दिवशी जणू काही वेगळं घडलंच नाही असं गोडीत वागायचा. जाऊ दे म्हणून ती सोडून द्यायची. एकदा ती रात्री कुठेतरी गेली होती. तर परत आल्यावर राजूने तिला सांगितले, दाजी येऊन विचारीत होते मामी कुठे गेल्यात, कुणाकडे गेल्यात म्हणून. ती तडकली. दुसऱ्या दिवशी तिनं संजयला विचारलं, "तुमी का लई चवकशा करता मी कुठं जाते म्हणून? मला कुणाची चोरी हाय का काय कुटंबी जायला?"
 संजय अगदी साळसूद चेहरा करून म्हणाला, "मी कुठं काय म्हणतोय? काल डोकावलो तर राजू एकलाच दिसला. म्हणून सहज म्हटलं मामी कुठं गेल्यात. तुमाला राग येत असंल तर नाय इच्यारणार पुना."
 "तसं न्हवं हो," म्हणून सीतेनं माघार घेतली.
 कामाच्या ठिकाणी तमाशा केल्यापासून नंदा तिच्याशी धडपणे बोलली नव्हती. तरी सीतानं जाऊन तिला विचारलं संजय अलिकडे असा का करतो म्हणून. नंदा फटकन म्हणाली, "ते तुलाच ठावं, तुमी बरोबरच काम करता न्हवं? मंग मला कशाला इचारतीस?" नवरा-बायकोचं काहीतरी बिनसलं असेल, आपण कशाला त्यात पडा म्हणून सीता गप्प राहिली.
 थोडे दिवस सुरळीत गेले. मग एक दिवस संजय कामावर नव्हता तर सुट्टी झाल्यावर घरी जाताना सीता दुसऱ्या कुणाच्या सायकलवर चालली होती. हा आडवा आला.
 ती म्हणाली, "गावाहून आला बी इतक्यात?"
 "दिसतोय ना आलेला? एक दिवस चालत घरी गेला असता तर तंगड्या तुटल्या असत्या व्हय तुमच्या? आन तू रे. कुणालाबी चार चौघांच्या देखता सायकलवर घेऊन जातोस. लाज न्हाई तुला?"
 तो पोरगा तडकला. "लाज कुणाची काढता?"
 संजय अस्तन्या सारायला लागला तशी सीता त्याच्या समोर उभी राहिली. "असं काय करता येड्यावाणी? तो माज्या राजाचा मित्र हाय, मला मुलासारका."
 "हां. माहीत हाय मला. मुलासारका. ए, जा फूट. पुना आसं दिसलं तर जित्ता सोडणार न्हाई तुला."
 सीता आता पुरती खवळली, "त्याला येडंवाकडं बोलायचं काम न्हाई."
 "न्हाई कसं? तुला म्हाताऱ्यापासून पोरापर्यंत कुणीबी चालतं. कुणी म्हनं भाऊ, कुणी म्हनं मुलगा. तू कसंबी वागणार पर हिकडं आबरू आमची जाती. हे असलं मी खपवून घेणार न्हाई, बजावतोय."
 सीता ओरडली, "कुणाची आबरू जाईल असं काय बी मी केल्यालं न्हाई. आन तू मला बजावणारा कोण रं? नवरा हायस का माजा?"<बर>  या डोळ्याला डोळा भिडवीत संजय म्हणाला, "तसंच समज."
 तो सायकलवर टांग टाकून निघून गेला. सीता घरी गेली ती धुमसतच. हाताशी एक काठी घेऊन ती न जेवताखाता संजयची वाट बघत बसून राहिली. तो उशिराच घरी आला. त्याची चाहूल लागली तशी ती उठून बाहेर गेली. त्याच्या मागोमागच त्याच्या घरात शिरली नि तिनं त्याला काठीचे तडाखे हाणायला सुरूवात केली. तिनं एकाएकी हल्ला केल्यामुळे तो इतका बावचळला की त्याला प्रतिकार करायचंही सुचलं नाही. बरं, सासूकडनं मार खाताना आरडाओरडा केला तर चार लोकांत शोभा व्हायची. तिचा राग शमला तोवर त्याची पाठ काळीनिळी झाली होती.
 तो पुटपुटला, "सासूनं जावायाला मारायचं असलं इपरीत कुटं घडतं का कंदी?"
 ती म्हणाली, "पुना तुमीमला येडंवाकडं बोलला त्येबी चार लोकांसमोर, तर म्या तुमाला जितं सोडणार न्हाई येवढं ध्यानात ठिवा."