अर्धुक/मार्गरेट
"आपल्या देशात सगळ्यांची अशीच लग्न होतात. तू काय एवढी जगावेगळी लागून गेलीयस?"
"पण निदान माझं शिक्षण संपेपर्यंत तरी थांबू द्या. नाहीतर एवढी धडपड करून मेडिकलला गेल्याचा काय फायदा?"
"लग्न झाल्यावर शिक्षण पुरं करता येत नाही? किती उदाहरणं दाखवू तुला?"
तशी तिची दुसऱ्या कुणाशी ओळख होती असं नव्हे आणि होऊनही काही फायदा नव्हता. तिचे आईवडील कट्टर सनातनी होते आणि त्यांना जावई केवळ ख्रिस्तीच नव्हे तर त्यांच्या विशिष्ट पंथातलाच हवा होता.
ह्याच सुमाराला अमेरिकेला गेलेल्या तिच्या एका लांब लांबच्या भावाचं तिला अचानक पत्र आलं. असंच इकडच्या तिकडच्या गप्पांचं. तिला आश्चर्य वाटलं कारण ते तीन-चारदा भेटलेले होते तरी त्यांच्यात काही खास सूत नव्हतं. तिनं त्याला उत्तर लिहिलं आणि मग त्यांची पत्रापत्री सुरू झाली. आपल्या आवडीनिवडी, मतं खूप जुळतात असं तिच्या ध्यानात आलं. एक दिवस त्यानं तिला लग्नाची मागणी घातली. तिचा होकार आल्यानंतर त्यानं तिला सांगितलं की तो परदेशी जाण्यापूर्वीच्या भेटीच्या वेळी, जेव्हा ती एक निरागस षोडषवर्षा होती, त्यानं ठरवलं होतं की तिच्याशी लग्न करायचं. पण इतरांनी ठरवून तिला आपल्या गळ्यात बांधायचं हे त्याला पटत नव्हतं. त्यानं ठरवलं होतं की ती पुरेशी मोठी होईपर्यंत, स्वत:चा स्वत: निर्णय घ्यायला समर्थ होईपर्यंत थांबायचं.
मार्गरिटनं लग्नाला होकार दिला तेव्हा तिच्या मनात होतं, लग्न करायचंच तर मग हा थोडा तरी माहीत असलेला, ज्याचे आपले विचार बरेच जुळतात असा माणूस नवरा म्हणून काय वाईट आहे? पण मग त्याने हा सगळा इतिहास सांगितल्यावर ती आतून कुठेतरी खूप सुखावली. तिनं त्याला लिहिलं, "पण मधेच मी दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केलं असतं म्हणजे?" "मी माझ्या हेरांकरवी तुझ्यावर नजर ठेवली होती ना." मग तिनं लिहिलं, "म्हणजे हे ठरवून झालेलं लग्नच झालं की. तू ठरवलेलं." त्याने उत्तर पाठवलं, "पण तुझ्या इच्छेविरुद्ध तुझ्यावर लादलेलं नव्हे."
मार्गरेटच्या आईवडलांना तो फारसा पसंत नव्हता. त्याचं वय तिच्यापेक्षा बरंच जास्त होतं आणि त्याचं कुटुंब त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाचं होतं. तरी पण निदान तो त्यांच्या 'जाती'चा तरी होता.
दीडेक वर्षाने तो हिंदुस्थानात परत येणार होता तेव्हा लग्न करायचं असं निश्चित झालं आणि दुर्दैवाने तो एकाएकी वारला. त्याच्या हृदयात एक क्वचितच आढळणारा दोष होता आणि हे कुणालाही माहीत नव्हतं. त्याला झटका येऊन हॉस्पिटलमधे नेलं तेव्हा नक्की काय झालं त्याचं निदान पुरेसं लवकर झालं नाही. झालं असतं तर तो कदाचित वाचला असता. मार्गरेटची प्रेमकथा सुरू होण्यापूर्वीच संपली. ह्या आघातातून सावरणं तिला कठीण गेलं. पण तिचा अभ्यास होता, काम होतं त्यात तिनं स्वत:ला शक्य तितकं गुंतवून घेतलं. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लिहून ठेवलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे कपडे, पुस्तकं, इतर थोडंफार सामान तिच्याकडे पाठवण्यात आलं. बरेच दिवस पार्सलं उघडून पहाण्याचंही धैर्य तिला झालं नाही. तिच्या हॉस्टेलमधल्या खोलीच्या कोपऱ्यात ती पडून होती. मग हळूहळू एकेक वस्तू बघत, हाताळत तिनं दु:खाला वाट करून दिली.
ती एम्.डी. होऊन एका मोठ्या हॉस्पिटलमधे नोकरीला लागली. खाजगी प्रॅक्टिसपेक्षा तिला ते बरं वाटलं. कन्सल्टंट म्हणून कामाची सुरुवात करायला बरेच पैसे लागले असते ते तिच्याकडे नव्हते. नोकरी म्हणजे पगार लगेच सुरू होतो. शिवाय अगदी घाण्याला जुंपल्यासारख काम करावं लागत नाही. एकदा घरी आलं की वाचन वगैरे करायला वेळ मिळतो. असा सगळा विचार करून तिनं नोकरी करायचा निर्णय घेतला.
तिच्या आईवडलांचा दबाव परत सुरू झाला. जन्मभर तू नुसती त्याच्या आठवणींवर का जगणार आहेस? जगायला काही आधार नको का? घरसंसार, मुलं-बाळं, नवरा ह्या सगळ्यांशिवाय तू एकटीनं आयुष्य कसं काढणार? मार्गरेटला लग्न करायचंच नव्हतं असं नाही. पण आपल्या इतक्या वयाच्या,स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या, आपल ज्ञान, कसब पणाला लावून कामाचं आव्हान समर्थपणे पेलणाऱ्या बाईने बघून सवरून लग्न करायचं ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. अनेक डॉक्टर होणाऱ्या बायका अशा तऱ्हेने लग्न करतात आणि सुखाचे संसार करतात हे तिनं पाहिलं होतं. पण तरी वरवर सुखी वाटणाऱ्या अशा लग्नांत सुद्धा तणाव असतात, बाईला खूप तडजोडी कराव्या लागतात हेही तिनं पाहिलं होतं. वाटेल त्या तडजोडी करायची तिची तयारी नव्हती. व्यवसायाच्या दृष्टीने ती एका चांगल्या वळणावर येऊन पोचली होती. एका उत्तम मानल्या गेलेल्या हॉस्पिटलमधे तिला नोकरी होती. हवं त्या पद्धतीने काम करायला मिळत होतं. चांगले सहकारी होते, त्यांच्याशी विचारांची, अनुभवांची देवघेव करताना खूप काही लाभत होतं. मग केवळ लग्न झालं नाही म्हणून काय अडत होतं?
पण हे सगळं स्वत:ला सांगून पटवून सुद्धा अशा वेळा येत की तिला वाटे, एवढंच असतं का आयुष्यात? मग कधीकधी हा एकटेपणा का अंगावर येतो? ज्याच्याजवळ अगदी खोल मनातल्या गोष्टी बोलता येतील असं हक्काचं माणूस असावं असं का वाटतं? हा माझा कमकुवतपणा आहे की ही जगाची रीत आहे?
कदाचित ती असे हेलकावे खात असल्यामुळे म्हणा, पण तिच्यात वरवरच्या ओळखीपेक्षा जास्त रस दाखवणारा भेटला तेव्हा त्याला प्रतिसाद देण्याची तिची मनस्थिती झालेली होती. ती काम करीत होती त्याच शहरात भरलेल्या एका मेडिकल कॉन्फरन्समधे तिच्या सेक्शनमधे तिला एक डॉक्टर भेटला. हिंदीच पण मलेशियात बरीच वर्ष राहिलेला. कॉन्फरन्सच्या तीनचार दिवसांत त्यांची बरीच ओळख झाली. सेशन्सच्या व्यतिरिक्त वेळात ती त्याला शहर दाखवायला जात होती, निरनिराळ्या रेस्टॉरंट्समधे खाऊ घालीत होती. त्यांच्या खूप गप्पा होत होत्या. त्यात एकमेकांच्या कुटुंबांची माहिती, आवडीनिवडी ह्यांची देवघेव झाली. आवडीनिवडी फारशा जुळत होत्या असं नाही, पण त्याला फार महत्त्व आहे असं तिला वाटलं नाही. त्याच्या सहवासात तिचा वेळ खूप मजेत जात होता, पण अजून तरी ह्या सहज झालेल्या मैत्रीचा प्रवास विशिष्ट दिशेने जावा अशी निकड वाटत नव्हती. परत जाताना त्यानं तिला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. मला माहीत आहे की मी अगदी थोड्या ओळखीवर हे म्हणतोय. तू विचार कर, तुला हवा तितका वेळ घे. मात्र माझ्या बाजूने माझा विचार अगदी ठाम आहे.
तो गेला ते मारिटच्या जीवनात वादळ उठवून. तिच्या मनात अनेक शंका होत्या. ती सावळी, बुटकी, स्थूलतेकडे झुकणारी होती. नाकीडोळीही फार सुंदर होती असं नव्हे. एखाद्या पुरुषाला पहाताक्षणी आकर्षित करून घेण्यासारखं तिच्यात काही नव्हतं. पत्रातून तिनं त्याला असं लिहिलं तेव्हा तो म्हणाला, माझ्या तरी रूपात असं काय आहे की एखादीने बघूनच माझ्या प्रेमात पडावं? आणि एखादा तिशीतला माणूस काही रूपाकडे बघून लग्न करीत नाही. तुझी बुद्धिमत्ता, व्यवसायातली गती हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मला बायको म्हणून एक नखरेल बाहुली नकोय, माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या आयुष्यातला सुखदु:खाचा वाटा उचलणारी प्रगल्भ स्त्री हवीय.
काही महिने त्यांचा पत्रव्यवहार चालला होता. शेवटी तिनं त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं, आयुष्यात कधीतरी धोके पत्करावेच लागतात. दैवयोगाने ही संधी मला पुन्हा एकवार मिळाली आहे ती घ्यायला काय हरकत आहे? व्यावसायिक दृष्टीने थोडी पीछेहाट होईल, पण एका माणसाला सगळीच मापं भरभरून कुठे मिळतात? तिकडे गेल्यावरही काम करायची संधी आहेच. परदेशात जाऊन रहाण्याचं आकर्षणही वाटत होतं. त्यानं पत्रात त्याच्या घराचं फार सुरेख वर्णन केलं होतं. छोटंसं बंगलीवजा घर, शहराबाहेर एका कॉलनीत. कॉलनीमागे दाट झाडी असलेला डोंगर आणि घरासमोर सुरेखशी बाग.
आईवडलांनीही परवानगी दिली. तो त्यांच्या पंथाचा नसला तरी निदान ख्रिश्चन होता. ती लांब परदेशात जात असली तरी मी काही वर्षांनी परत येणार आहे असं त्यांच्या जावयाने ध्वनित केलं होतं आणि व्यावसायिक नुकसानीबद्दल मार्गरेंट बोलली तेव्हा तिची आई म्हणाली, उगीच काहीतरी फाटे फोडीत बसू नको.
लग्न होऊन मलेशियाला गेल्यावर हनीमून वगैरे संपला आणि मार्गरेंटला पहिला धक्का बसला. तिथल्या कायद्याप्रमाणे परदेशी माणसाला तीन वर्षांच्या वास्तव्याशिवाय डॉक्टरी करायला परवानगी नव्हती.
"तीन वर्ष? तु ह्याबद्दल काहीच कसं बोलला नाहीस?"
"त्यात मुद्दाम सांगण्यासारखं काय होतं? प्रत्येक देशातच परकीय डॉक्टरांवर अशा तऱ्हेची बंधनं असतात. हिंदुस्थानात सुद्धा आहेत."
"तो प्रश्न नाहीये. आपण ह्या विषयावर जेव्हा जेव्हा बोललो किंवा लिहिलं तेव्हा मी इथे येऊन लगेच तुझ्याबरोबर काम करू शकेन असं तू भासवलंस."
"मी काहीही भासवलं नाही. तू मला अगदी अशा शब्दांत स्पष्टपणे कधी विचारलं होतंस का? मी धरून चाललो होतो की लग्न झाल्या झाल्या काही दिवस घरी राहून संसार करायला तुला आवडेल. तू अगदी असं बोलत्येयस की तू फक्त डॉक्टरी करण्यासाठी इथे आलीस. मग नोकरी पहायची होतीस. लग्न कशाला केलंस?"
"रॉबर्ट, मी संसार करायचा नाही असं म्हणतेय का? पण संसार चोवीस तास घरी बसूनच करावा लागतो का? तू लग्न झालं म्हणून काम सोडून नुसता घरी बसशील का? मग मी तसं करावं अशी अपेक्षा तू धरतोस?"
"मी घरी बसलो तर खायचं काय?"
तो मुद्दाम वेड पांघरीत होता तेव्हा तिनं तात्पुरता वाद सोडून दिला. पण काही कारण नसताना त्याने आपल्याशी प्रतारणा केली म्हणून ती खूप दुखावली गेली. त्याने असं का केलं ते मात्र तिला समजत नव्हतं. एखादी साधीसुधी घर-संसार ह्यातच सुख मानणारी बायको त्याला सहज मिळाली असती. मग तिच्या बुद्धिमत्तेची, व्यावसायिक यशाची तारीफ करीत मुद्दाम तिच्याशी त्यानं लग्न का केलं. कारणं दोनच असू शकत होती. एक म्हणजे त्याच्यात काहीतरी सहज न समजणारं व्यंग, उणेपणा होता. त्यामुळे त्याचं लग्न होत नव्हतं आणि तिच्यासारख्या प्रौढ अविवाहितेला त्यानं विनासायास जाळ्यात ओढलं होतं. दुसरं म्हणजे त्याला ती खरंच फार आवडली होती आणि खरं सांगितलं तर ती कदाचित त्याच्याशी लग्न करणार नाही अशी त्याला भीती वाटली. हे दुसरं कारण जरी खरं असलं तरी त्यामुळे तिचा अहंकार काही सुखावला नाही. त्याने केलेल्या फसवणुकीबद्दल तिच्या मनात अढी राहून गेली. तो मात्र, एकदा वादाचा मुद्दा तिनं तात्पुरता बाजूला सारल्यावर, तिच्याशी प्रेमानं वागत होता.
दोघांसाठी घर चालवायला कितीसा वेळ लागणार? त्यातून दिवसभर आणि पुष्कळदा रात्री उशीरपर्यंत ती एकटीच असे. वाचन, बागकाम असं करूनही वेळ जाता जात नसे. मग तिनं मूल होऊ द्यायचं ठरवलं. काम करण्याची वेळ येईपर्यंत ते पुरेसं मोठं तरी होईल. तिला दिवस गेल्यावर त्याला खूप आनंद झाला. तो तऱ्हेतऱ्हेने तिचे लाड करी. हळूहळू सुरुवातीची कटुता विसरून तीही संसारात, त्याच्या प्रेमात रमायला लागली. तिला मुलगा झाला आणि तिच्या आयुष्याला एकदम वेगळंच परिमाण लाभलं.आता तिचा दिवस कसा जायचा तिला कळतही नसे. एकदा रॉबर्ट म्हणाला, "बघ, माझंच बरोबर होतं की नाही? आता तू काम करता येत नाही म्हणून झुरत नाहीस ना? किती आनंदात असतेस!" तिला धक्का बसला. म्हणजे हीच ह्याची अपेक्षा होती. ती म्हणाली, "कितीही आनंदात असो. पण तीन वर्ष झाली की मी काम करण्याच्या परवान्यासाठी अर्ज करणार आहे हे ध्यानात ठेव."
"पण का? काय कमी आहे तुझ्या आयुष्यात?"
"रॉबर्ट, मी मागे एकदा विचारला होता तोच प्रश्न तुला पुन्हा विचारते. समजा मी काम करून पैसे मिळवीत असते तर तुला घरी राहून बाळाला संभाळणं, स्वैपाक करणं एवढंच करून पूर्ण समाधान मिळेल?"
"मुलांना जन्म देणं, त्यांना संभाळणं, घरकाम करणं हे बाईचं काम आहे."
"असं कुणी ठरवलं?"
"निसर्गाने, पुरुष मूल जन्माला घालू शकतो?"
तिला कळून चुकलं की त्याच्या ह्या बाबतीतल्या कल्पना फार ठाम आहेत आणि त्या बदलणं फार अवघड होणार आहे. तिला अशीही भीती वाटायला लागली की आपल्याला काम करू द्यायचा त्याचा इरादाच नाही, कधीच नव्हता. कायदा काहीही असला तरी त्याची इच्छा आणि सहकार्य ह्यांशिवाय ती काम करू शकणार नव्हती. बरं,मायदेशी परत जाण्याबद्दलही तो काही वायदा करीत नव्हता. इथे भरपूर पैसे मिळतायत, तिकडे जाऊन बस्तान बसवायला वेळ लागणार.घाई काय आहे, आणखी थोडी वर्ष इकडेच काढू, असं तो म्हणे. ह्या कोंडीतून बाहेर पडायला एकच मार्ग होता, तो म्हणजे त्याला सोडून जायचं. पण आता एकटं परत जायचं म्हणजे मुलाचा प्रश्न होता. पुन्हा मुलावर त्याचा फार जीव होता. त्याला घेऊन तिला तो जाऊ देईल की नाही तिला शंकाच होती. बरं, मी परत जाते असं सांगितलं आणि तो एकदम बिथरला तर इथे परदेशात आपल्याला कुणाचा आधार नसताना काय होईल ह्याची भीती वाटत होती. समजा ती म्हणाली. मला जायचंय आणि त्यानं पैसे द्यायचं नाकारलं तर तीअडकून पडणारच, शिवाय तो चिडला तर नंतरचं सहजीवनही कलुषित होईल. तेव्हा सध्या तरी त्याच्या कलाने घेऊन आयुष्यक्रम सुरळीत चालू ठेवायचा, मग मुलगा थोडा मोठा झाल्यावर काय ती हालचाल करायची असं तिनं ठरवलं. दुसरं मूल मात्र होऊ द्यायचं नाही असा निर्णय तिनं रॉबर्टला न विचारताच घेऊन टाकला. समजा परत जायचं ठरवलंच तर पैशाची सोय होऊ शकेल का असं भावाला लिहून विचारायचं तिनं ठरवलं. एकदा हे निर्णय घेऊन टाकल्यावर तिच्या मनातलं वादळ तात्पुरतं शमलं. तसा नुसतं दु:ख करीत बसण्याचा तिचा स्वभाव नव्हता, तेव्हा एकदा संघर्ष लांबणीवर टाकायचं ठरवल्यावर ती समाधानाने रहायला लागली.
त्या वर्षीचा पावसाळा आला तो सुरुवातीलाच अतिवृष्टी घेऊन. मार्गरेटने केरळातला धुवाधार पाऊस अनुभवलेला असल्यामुळे तिला ह्या देशातल्या पावसाचं काही वाटत नसे, तरी पण हा पावसाळा काहीतरी विलक्षणच वाटला. काळ्या ढगांचा जणू शेकडो फूट जाडीचा थर माथ्यावर घट्ट बसला होता नि दिवस न् दिवस पाऊस कोसळत होता तरी तो विरळ होतोय असं वाटेना. सतत घराभोवती लपेटलेला पाण्याचा पडदा ती भयचकित नजरेनं पहात होती. कुठे बाहेर जाणं, खरेदी, कुणाकडे जेवायला जाणं सगळं बंदच होतं. संध्याकाळी फक्त जरा काळजीतच रॉबर्टची वाट बघत बसायचं. पावसाच्या पाचव्या दिवशी दिवेलागणीच्या सुमाराला एकाएकी प्रचंड आवाज झाला. कॉलनीच्या पिछाडीच्या डोंगराचा एक भला थोरला लचका अलग होऊन कॉलनीतल्या अनेक घरांवर कोसळला. मार्गरेटचा भविष्यकाळ वीस फूट उंचीच्या चिखलाच्या ढिगाऱ्यात लुप्त झाला.