Jump to content

अर्धुक/उषा

विकिस्रोत कडून

 ह्या वेळी सासरा स्वत:च आला. त्याची भाषा निर्वाणीची होती. "ही तुमची मुलगी. पुन्हा तिला तिकडे पाठवू नका. ती काही आता लहान नाही. किती दिवस आम्ही तिचं वागणं सहन करायचं? चार लोकांत खाली मान घालायची पाळी येते. वाटेल ते बोलते. तिला काही समजच नाही आणि येणारही नाही. ती अशी वेड्या डोक्याची आहे हे तुम्हाला माहीत असून तुम्ही आम्हाला फसवलंय. मी पोराचं पुन्हा लग्न करणार आहे. तुम्ही त्यात काही मोडता घातला तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही येवढं ध्यानात ठेवा."
 सावित्रीबाई बऱ्याच तरुणपणी विधवा झालेल्या. तीन मुलं पदरात. थोरली ही उषा. तिचं शाळेत काही डोकं चालेना. एक बरं स्थळ मिळालं नि तिचं लवकरच लग्न करून टाकलं. सासरच्यांनी कुणाबरोबर तरी तिला पाठवून द्यायची, आईनं परत घालवायची, त्यांच्यापुढे नाक घासायचं. हो, पोरगी जरा वांड आहे, पण तुम्ही जरा संभाळून घ्या. हळूहळू शिकेल, निवळेल. पण ती काही निवळली नाही. सासून काहीतरी काम सांगितलं की ऐकायची नाही. रागावली की उलट बोलायची, शिव्या द्यायची. नवऱ्याबरोबर नाठाळपणा करायची, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी भांडणं करायची. सासरची माणसं वैतागून गेली. आता काही मार्गच उरला नाही म्हणून कपाळाला हात लावून सावित्रीबाईनी तिला ठेवून घेतलं. तिला दोन-तीन घरची भांडीधुण्याची कामं लावून दिली. शिवाय तिची घरातही मदत व्हायची. हळूहळू तिच्या दुर्दैवाबद्दल खंत करायचं सावित्रीबाईंनी सोडून दिलं. फक्त त्यांना एकच काळजी होती. ही अशी अर्धवट, कुणी तरी हिचा फायदा घेतला नि ती पोटुशी राहिली तर काय करायचं?
 धाकटी दोन मुलं अरुण नि हेमा हुशार निघाली. शाळेत त्यांचे वर नंबर यायचे. ती खूप शिकून पुढे काहीतरी करून दाखवतील ह्या आशेने सावित्रीबाई त्यांना शिकवीत होत्या. आयुष्य जरा मार्गी लागत होतं तो हेमा एकाएकी तीव्र स्वरूपाच्या क्षयाने मरून गेली. जेमतेम महिनाभर आजारी होती. काही इलाजच चालला नाही. सावित्रीबाईंना हा धक्का सहन झाला नाही. त्यांनी हाय खाऊन अंथरुण धरलं. अरुण दिवसभर आईच्या उशाशी बसून रहायचा. शाळेत जायचा नाही, काही बोलायचा नाही. उषा एकटी अचल राहिली.शेजारीपाजारी म्हणायचे ती वेडसरच आहे, तिला उमजलंच नाही काय झालं ते. तिनं आई करीत असे तीही कामं आपल्या अंगावर घेतली. परत घरी आलं की घरातली सगळी कामं, स्वैपाक, आईसमोर बसुन तिला बळे चार घास खायला लावायचे. महिने गेले, शेवटी नाही म्हटलं तरी कालगतीमुळे सावित्रीबाई थोड्याशा सावरल्या. आपलं आयुष्य चालूच आहे आणि त्याचा ताबा आपण घेतला पाहिजे ह्याचं भान त्यांना आलं. त्या कामाला जायला लागल्या. एकदा बाहेरच्या माणसांशी संबंध यायला लागल्यावर हसू-बोलू लागल्या. अरुण मात्र काही केल्या मार्गावर येईना.
 एक दिवस उषा त्याला म्हणाली, "चल, भाकरी खाऊन घे. आज शाळेत जायचंय तुला."
 "मी कुठे जाणार नाहीये."
 "मी तुझ्या सरांना भेट्रन आलेय. ते म्हणाले, "तू बुडलेला अभ्यास भरून काढलास तर तुला परीक्षेला बसायला परवानगी मिळेल. म्हणजे तुझं वर्ष वाया जायचं नाही."
 "तुला कुणी सांगितलं होतं चोंबडेपणा करायला?"
 "ह्यात चोंबडेपणा काय झाला? तुझ्या भल्याचंच केलं की."
 "मी शाळेत जाणार नाहीये. एवढ्या सगळ्या दिवसांचा अभ्यास भरून काढणं शक्य नाही."
 "शाळेत जाणार नाही तर काय करणार आहेस? जन्मभर असा बसून रहाणार आहेस? सगळ्या जगात तुला एकट्यालाच दु:ख आहे आणि तेच तू कुरवाळत बसणार. आईनं नि मी राबायचं न तू आयतं बसून खायचं ह्याची लाज नाही वाटत तुला?"
 "उषे, माझी लाज काढू नको."
 "का नाही? आई येवढे कष्ट उपसते ते कशासाठी? त्याच्या बदल्यात आपलं शिक्षण पुरं करावं, निदान ते करायचं नसलं तर काहीतरी कामधंदा करून पोटाला मिळवावं असं नाही वाटत तुला?"
 शेवटी सावित्रीबाई म्हणाल्या, "गप बस उषा. त्याच्या मागे लागू नको विनाकारण."
 "हो, तू त्याचीच बाजू घेणार, माझं काय जातं? घरात बसवून ठेवून पोस त्याला जन्मभर." असं पुटपुटत उषा गप्प बसली. पण त्याला हातपाय न हलवता नुसतं बसलेलं पाहिलं की ती पुन्हा चिडायची नि त्याच्यावर ओरडायची. एकदा काय झालं म्हणून घरमालकीण आली तर तिच्यावर उषानं तोंड टाकलं. तिन सावित्रीबाईना खोली खाली करा म्हणून नोटिस दिली. सावित्रीबाईंनी पुष्कळ गयावया केली पण तिनं ऐकलं नाही. ती म्हणाली, "तुम्ही काहीही कबूल करून काही फायदा नाही. ती तुम्हाला जुमानणार आहे का? मी पुष्कळ दिवस दुर्लक्ष केलं पण आता फारच झालं. बाकीचे भाडेकरू तक्रार करायला लागले.
 सावित्रीबाईंना रडू कोसळलं. उषा म्हणाली, "रडू नको आई. मी दुसरी जागा बघते. सबंध गावात काय येवढी एकच खोली आहे का?"
 "तुला कसं काही कळत नाही ग? देवा, माझी चांगली गुणाची मुलगी होती ती गेली. तिच्याबदली हिला नेली असतीस तर काय झालं असतं? आता ही आग पदरात घेऊन मी कसे दिवस काढू?"
 उषा रडायला लागली. रडत रडत तिनं आईला मिठी मारली, पण आईनं तिला रागाने दूर लोटली. "माझ्या वाईटावरच आहेस तू. इतका त्रास दिलास आता मिठी मारायला कशाला येतेस?".
 उषानं खरोखरच दुसरी खोली पाहिली. सामान न्यायला छकडा आणला. मायलेकींनी सगळं सामान आवरलं, छकड्यात भरलं, नव्या ठिकाणी खाली केलं, पुन्हा सगळी लावालाव केली. अरुणने मदत करायला बोट सुद्धा उचललं नाही.
 उषा म्हणाली, "बघ आई कसा आहे तो आणि तू म्हणतेस मी त्याला का बोलते म्हणून."
 "तो कसा आहे ह्याच्यापेक्षा तू कसं वागतेस ह्याच्यावर ध्यान दे जरा. तिथून आपल्याला हाकलून दिलं ते तुझ्या तोंडामुळे. आता तरी जरा नीट वागायला शीक.नाहीतर पुन्हा जावं लागेल इथून. सारखं नवीन जागा शोधत कुठे हिंडायचं?"

 उषा काम करायची त्या एका घरी तिथल्या बाईंची बहीण त्यांच्याकडे आली होती. तिची मुलगी तिच्याकडे बाळंतपणाला यायची होती आणि तिला घरकामात मदतीला आणि बाळ-बाळंतिणीचं करायला कुणीतरी हवं होतं. उषाच्या मालकिणीनं तिला विचारलं, "जातेस का त्यांच्याबरोबर मुंबईला? त्यांच्याकडे रहायचं. जेवूनखाऊन पगार देतील. तीन-चार महिने त्यांची नड काढ, मग परत ये" उषा म्हणाली आईला विचारून सांगते.

 आईला बरंच वाटलं.घरातल्या कुरबुरीपासून थोडे दिवसतरीसुटका. जाताना उषा म्हणाली, "जाते आई, तब्बेतीची काळजी घे, काही लागलं तर कळव." तिच्या डोळ्यात पाणी आलं. आईला सोडून इतक्या लांब जाताना तिचा जीव कासावीस होत होता. सावित्रीबाई फक्त म्हणाल्या, "नीटपणे रहा. वेडंवाकडं बोलू नको. सांगतील ते काम मुकाट्याने कर, नाहीतर हाकलून देतील तुला."
 मुंबईत उषाचं चांगलं जमलं. समज जरा कमी आहे, पण मुलगी कामसू आहे, विश्वासू आहे असं म्हणून तिच्या मालकिणीने बाळंतपण करून मुलगी परत गेली तरी तिला ठेवून घेतली. उषा घरी नियमितपणे पैसे पाठवायची, अधूनमधून सुट्टीसाठी घरी यायची. अरुण शेवटी माणसात येऊन शाळेत जायला लागला हे पाहून तिला बरं वाटलं. शाळा पास होऊन अरुणने कॉलेजात नाव घातलं. तो पायजम्याऐवजी पँट-शर्ट घालायला लागला, सलूनमधून केस कापून घ्यायचा, मित्रांबरोबर फिरायचा. त्यांची सुस्थिती बन्याच अंशी उषाने पाठवलेल्या पैशांमुळे होती. पण आईनं कधी, 'आलीस? ये,' असं म्हणून उषाचं स्वागत केलं नाही. अरुणच्या कपाळाला तर बहिणीला पाहिलं की आठ्याच पडायच्या. ती अजागळासारखी रहायची,खेडवळासारखी मोठा आवाज काढून बोलायची, शिव्या द्यायची. एकदा तिनं रस्त्यात त्याला हाक मारली होती. त्याच्या बरोबर त्याचे मित्र होते. एकजण म्हणाला, "कोण पाखरू आहे रे?" अरुण आंबट तोंड करून म्हणाला, "बहीण आहे माझी."
 "काय लेका, काय वाटेल ते सांगतोस. आम्ही तुझ्या घरी येतो तेव्हा कधी दिसली नाही ती."
 "मुंबईला असते."
 घरी आल्यावर त्यानं तिला खूप दम दिला, "दुसऱ्या कुणासमोर मला ओळख देत जाऊ नकोस," म्हणून.
 "का?"
 "उलट विचारायचं काम नाही."
 "तुला लाज वाटते माझी?"
 "हो, हो वाटते"

 "मग आईची पण वाटत असेल."

 तो काही बोलला नाही, पण त्याला एकदम वाटलं, खरंच ही आईसारखी दिसते. तोच गोल चेहरा, तपकिरी डोळे, लहान चण आणि कपाळावर तशाच म्हाताऱ्या माणसासारख्या रेषा. तो आणि हेमा दिसायला वेगळेच होते. बापासारखे, त्याच्या मनात आलं. आईला विचारावंसं वाटलं पण त्यानं नाही विचारलं.
 उषा ज्यांच्याकडे काम करीत होती त्यांची दुसरीकडे बदली झाली. ती त्यांच्याबरोबर जायला तयार होती. पण इतक्या लांब परमलखात जायचं तिथे रहायला जागा कशी असेल, किती वर्ष तिथे रहावं लागेल हेही माहीत नसताना उगीच ह्या मुलीची जोखीम नको म्हणून त्यांनी तिला न्यायचं नाही असं ठरवलं.
 ती कायमची म्हणून घरी आली हे सावित्रीबाईंना आणि अरुणला मोठं संकटच वाटायला लागलं. ती नसताना आयुष्य कसं सुरळीत चाललं होतं. ती आल्यावर लगेच कुरबुरी, भांडणांना सुरुवात झाली. अरुणने आईला सांगितलं, "एक ती इथे राहील नाहीतर मी." शेवटी सावित्रीबाईंनी उषाला सांगितलं, "तु आपली दुसरीकडे खोली घेऊन रहा."
 "पण का?"  "तुला नीटपणे रहाता येत नाही. आम्हाला दोघांनाही त्याचा तापच होतो. काल तू त्या भीमाबाईशी भांडण केलंस."
 "मग, त्यांच्या बैलाच्या शेणाचा हा एवढा ढीग आहे.ते पावसानं भिजलंय तर त्याची कसली घाण मारते. सगळीच तक्रार करतात."
 "पण ती लगेच तुझं माझं करून भांडायला उठत नाहीत. तुझ्यापायी आम्हाला हाकलून देतील इथून."
 उषाच्या डोळ्यांत पाणी आलं. सावित्रीबाईंना तिची कीव आली पण तिच्या स्वभावाला औषध नव्हतं. मुख्य म्हणजे तिच्या तिथे असण्याचा अरुणला किती त्रास होत होता ते त्यांना दिसत होतं. आता कुठे तो रुळावर यायला लागला होता. अशात ताणतणाव सहन करणं त्याला धोक्याचं होऊ शकलं असतं.

 उषा घर सोडून गेली तरी ती येताजाता आईकडे डोकावून जायची. आईला भेटलं की तिला बरं वाटायचं. पण बाई तू कुठे रहातेस असं आईनं तिला कधी विचारलं नाही. एक दिवस ती गेली तो आई अंथरुणावर पडलेली.

खूप ताप होता. हिनं रिक्शा करून आईला डॉक्टरकडे नेलं. त्यांच्या मनात जायचं नव्हतं पण ती म्हणाली, "खर्चाची तू काळजी करू नकोस मी देईन." डॉक्टरने सांगितलेली औषधं तिन लगेच आणून दिली.
  घरी आल्यावर ती म्हणाली, "अरुण गेला तेव्हा त्याला माहीत होतं ना तू आजारी आहेस म्हणून? मग हा पसारा आवरला असता तर काय इस्तरी बिघडली असती का त्याची?"
 "त्यानं आवरायची काय गरज होती?"
 "मग कोण करणार हे सगळं?"
 "मी केलं असतं उठत-बसत. तू उगीच जास्त बोलू नको. तुझा काय संबंध आहे?"
 पण मग उषाने केर काढला, पाणी भरून आणलं, भांडी घासली. भाकरी केली ते त्यांनी मुकाट्याने तिला करू दिलं. त्यांचा आजार बरेच दिवस चालला आणि उषाने येऊन घरकाम करून जायचं हे नित्याचंच झालं. ती जायची तेव्हा अरुण बहुतेक घरी नसे. क्वचित असला तरी तिला मदत करीत नसे. ती स्वैपाक करून जायची. पण आज तूही जेव हो इथे असं एकदाही मायलेकांच्या तोंडून बाहेर पडलं नाही. कदाचित पडत्या फळाची आज्ञा मानून ती रोजच त्यांच्याकडे जेवायला लागेल, मग रहायला सुद्धा येईल अशी त्यांना भीती वाटली असेल.
 हळूहळू सावित्रीबाईंच्या तब्बेतीला उतार पडला. त्या थोडं हिंडायफिरायला, चार घास खायला लागल्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं आता काही पथ्य नाही, त्यांना आवडेल ते खायला द्या. त्यांना चिक्कू फार आवडायचे म्हणून ते आणायला उषा मंडईत गेली. तिथे तिला गायकवाडीणबाई भेटल्या. तिची आई बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे काम करायची.
 त्यांनी विचारलं, "अग उषा, तुझ्या आईचा काय पत्ता आहे? बरेच दिवस झाले कामाला येत नाही."
 "आजारी होती, बाई."
 एकदा निरोप आला होता पण त्यालाही आत पुष्कळ दिवस झाले."

 "फार आजारी होती. आत्ताच कुठे उठलीय. हे काय तिच्यासाठीच थोडे चिक्कू घ्यायला आले होते."


"इथेच असते. मुंबईहून आल्याला पुष्कळ दिवस झाले."
"बरं झालं. तू होतीस म्हणून आईला मदत झाली. आईकडेच असतेस ना?"
"नाही, भाऊचं नि माझं पटत नाहीना, म्हणून आई तिथे रहायला नको म्हणते"
"मग रहातेस कुठे?"

"दत्तनगरमधे मामाकडे. बाहेर गाईसाठी छप्पर आहे, तिथे तो झोपायला जागा देतो मला."