अन्वयार्थ – २/ससा लागे लांडग्यापाठी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchससा लागे लांडग्यापाठी


 मागील आठवड्यात वर्तमानपत्रांतले (३ मे २०००) महत्त्वाचे मथळे ओरडून सांगत होते की, शेअर बाजारातील किमती धाडकन कोसळल्या. वित्तमंत्र्यांनी अंदाजपत्रकात ज्या ज्या वस्तूंच्या किंमती वाढविल्या त्या सगळ्या कमी कराव्या याबद्दल लोकसभेत मोठा धिंगाणा होणार आहे अशी बातमीही ठळकपणे मिरवून गेली. पश्चिम भारतात सर्वत्र पाण्याच्या तुटवड्याने आणि दुष्काळाने रौद्र स्वरूप धारण केले आहे. २१व्या शतकाच्या गोष्टी हरघडी ऐकू येतात. नवीन सहस्रकात भारत कोणती देदीप्यमान शिखरे गाठू शकेल याविषयी बढाया मारल्या जातात. यंदाच्या दुष्काळाने या सगळ्या बढाईखोरांच्या थोबाडीत मारून हिंदुस्थान अजूनही गरीब देश आहे, पावसाने जरा डोळे वटारले तर मरणाची वेळ येऊन जीव कासावीस होतो हे स्पष्ट केले.
 या सगळ्या बातम्या मोठ्या महत्त्वाच्या; पण त्यांचा परिणाम फार काळ टिकणारा नाही. शेअर बाजारातील किमती चढतील उतरतील. लोकसभेत धिंगाणे चालू राहतील. पहिला पाऊस आला, की दुष्काळाच्या भयाणतेची आठवणसुद्धा कोणाला रहाणार नाही. एका घटनेचा परिणाम मात्र दीर्घ काळ टिकणारा आणि सगळ्या जगभर जाणवणारा असा होणार आहे. या घटनेसंबंधीची बातमी फारशी कोठे झळकली नाही. पत्रकार कुत्रा माणसाला चावल्याच्या बातम्या देत नाहीत; माणूस कुत्र्याला चावला तर काही जगावेगळे घडले म्हणून बातम्या छापतात. पण, त्यांनीसुद्धा या घटनेकडे दुर्लक्ष केले. घटना माणसाने कुत्र्याला चावण्याची नाही. विक्रमादित्य राजाला राजधानीसाठी जागा शोधता शोधता, एक ससा लांडग्याच्या मागे लागला आहे आणि लांडगा भेदरून पळत सुटला आहे असे दृश्य दिसले. आजची खरी महत्त्वाची घटना सशाने लांडग्याला हुसकावून लावावे अशा प्रकारची आहे, पाकिस्तानातील.
 साऱ्या देशांत कडव्या मुल्लांचा प्रभाव पहिल्यापासूनच मोठा जबरदस्त. त्यात अफगाणिस्तानमध्ये रशियन आक्रमणालाही थोपवून मागे सारणाऱ्या तालिबानच्या शौर्यगाथांनी सगळे वातावरण भारून गेले आहे. तालिबान जे जे करतील ते योग्य आणि श्रेष्ठ. तालिबानने बायकांना बुरखा घेण्याची सक्ती केली, त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली. मग काय? आधीच उल्हास, त्यातून फाल्गुन मास!
 कथा घडली ती लाहोरच्या विद्यापीठात. एक दिवस अचानक अस्सल अफगाणी ठगांचे सलवारखमीस पेहेनलेले आणि दाढी वाढविलेले जामियाँ-एइस्लामचे कार्यकर्ते जिकडे पहावे तिकडे दिसू लागले. कुलगुरू राहिले बाजूला; विद्यापीठ प्रशासनालाही कोणी विचारे ना. जामियाँ-ए-इस्लामचे कार्यकर्ते ठरवतील तोच नियम आणि तोच कायदा असे झाले. सर्व धर्ममार्तंडांचे मुख्य शौर्य काय ते बायकांवर बंधने घालण्यातच दिसते. लाहोरमध्येही तेच घडले. जामियाँए-इस्लामने फर्मान काढले की, विद्यापीठातील मुलीनी बुरखा घेतला पाहिजे, एवढेच नव्हे तर.केससद्धा मोकळे सोडता कामा नयेत. विद्यापीठाच्या आवारात तीस सार्वजनिक टेलिफोन केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर पाटी लागली - विद्यार्थिनींना टेलिफोन केंद्र वापरायची बंदी आहे. (जामियाँ-ए-इस्लामच्या हुकुमावरून) टेलिफोन केंद्र चालविणाऱ्या कोणाचीही हा हुकूम मोडण्याची हिंमत नव्हती. एकाने प्रयत्न केला. त्याच रात्री त्याच्या केंद्राची मोडतोड, नासधूस झाली. त्यानंतर कोणाचीच आपल्या केंद्रावर मुलींना प्रवेश देण्याची हिंमत झाली नाही. विद्यापीठाच्या आवारात कोणाही विद्यार्थिनीने पुरुष विद्यार्थ्याशी बोलता कामा नये असेही फर्मान सुटले. जामियाँ-ए-इस्लामचे कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन फिरू लागले. कोणा विद्यार्थिनीने केस मोकळे सोडलेले आहेत असे दिसले, की जामियाँ-ए-इस्लामचे वीर कात्रीने ते कापून विद्रूप करू लागले. हे दाढीवाले कार्यकर्ते दिसले, की मुली घाबरून जवळच्या खोलीचा आसरा घेऊन लपून राहू लागल्या.
 आणि एक दिवस सशालाही आपल्यावरच्या जुलुमजबरदस्तीचा वीट आला. झाले असे :-
 एक विद्यार्थिनी एका पुरुष विद्यार्थ्यांकडून गणितातील एका प्रश्नाची अडचण सोडवून घेत होती. जामियाँ-ए-इस्लामच्या कार्यकत्यांनी ते पाहिले आणि त्या विद्यार्थ्याला त्यांनी बेदम बदडले. कितीएक विद्यार्थिनींचे केस कापले तरी चीड न आलेल्या विद्यार्थिनी या प्रकरणाने उसळून उठल्या. विद्यापीठाच्या पूर्ण आवारात मिरवणुकी काढून त्या घोषणा देऊ लागल्या. एका दिवसात आमची सारी भीती पळून गेली, एका विद्यार्थिनीने सांगितले, आता पाहा, जिकडे तिकडे बुरखा न घेता, आपल्या सर्व केसांचे सौंदर्य खुलविणाऱ्या केशरचना करून आनंदाने विद्यार्थिनी वावरताना दिसतात.
 आज ही घटना लहान दिसते; पण या 'ठिणगी'चा 'वणवा' होऊन जगभरच्या सर्व इस्लामी देशांत तो पसरला तर जगाचा इतिहास पालटण्यास सुरुवात होईल. भारतासारख्या देशातही या घटनेचा मोठा परिणाम होईल.
 हिंदुस्थानचे आजही दोन विभाग आहेत. उत्तरेत बिहार, ओरिसा इत्यादी राज्यांत गेले तर रस्त्यांवर महिला क्वचितच आढळतात. एखाददुसरी आढळलीच तर मळकेफाटके कपडे घालून, आपला चेहरा पदरात लपवून पायाच्या अंगठ्याकडे पाहत पाहत चालणारी अशी आढळते. तेच, दक्षिणेत केरळ, तामिळनाडू अशा राज्यांत गेले तर तिथे मुली केसांमध्ये सुवासिक फुलांचे गच्च गजरे माळून आनंदाने हसत खेळत, निमज्जाव सर्वत्र वावरताना दिसतात. पुरुष जितका मागासलेला, दरिद्री तितका तो आपल्या स्त्रीला आपल्याहीपेक्षा अधिक अवनत अवस्थेत ढकलण्याचा प्रयत्न करतो - धर्म कोणताही असो.
 लाहोर विद्यापीठातील प्रकरण पाकिस्तानसारख्या मुसलमान देशात घडले; पण ते हिंदुस्थानातही घडू शकते. व्हॅलेंटाईन दिनाचा उत्सव साजरा करणाऱ्या मुलांमुलींवर हल्ला करणारे विश्व हिंदू परिषदेचे गुंड आणि लाहोर विद्यापीठातील जामियाँ-ए-इस्लामचे पुंड यांच्यात तसा फरक काहीच नाही.
 लाहोरच्या घटनेत आणखी एक मोठा अर्थ लपलेला आहे. समान नागरी कायदा व्हावा अशी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांची मागणी आहे. हिंदू समाज स्त्रियांचा आदर करतो, त्यांना देवतेसमान वागवतो आणि मुसलमान समाजात मात्र त्यांच्यावर अन्यायाचे कडे कोसळत असतात. तस्मात्, समान नागरी कायदा करून मसलमान स्त्रियांनाही त्यांच्या हिंदू भगिनींच्या बरोबरीने हक्क मिळाले पाहिजेत असा समान नागरी कायद्याच्या पुरस्कर्त्यांचा आव असतो.
 प्रत्यक्षात असे दिसते, की समान नागरी कायद्याचा खटाटोप ज्यांच्याकरिता चालतो त्या मुसलमान स्त्रियाच या कायद्याला विरोध करतात. त्यांना स्वातंत्र्य नको आहे असे नाही; पण, समान नागरी कायद्याचा पुरस्कार हिंदुत्ववादी करू लागले, की उघडपणे त्यांच्या सुरात सूर मिसळणे मुसलमान स्त्रीला शक्य राहत नाही.
 लाहोरच्या घटनांनी एक सिद्ध केले, की मुसलमान स्त्रियाही माणसे आहेत, त्यांनाही स्वातंत्र्याची तहान आहे. आवश्यक तर त्या स्वतः उभ्या राहून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करू शकतात. हिंदुत्ववाद्यांच्या अभिनिवेशामुळे त्यांच्या मार्गात अडचणीच काय त्या उभ्या राहतात.
 विक्रमादित्याच्या राजधानीच्या जागी ससा लागे लांडग्यापाठी हा चमत्कार घडला, तोच चमत्कार लाहोर विद्यापीठाच्या आवारातही घडतो आहे.

दि. १६/५/२०००
■ ■