अन्वयार्थ – २/नाथांच्या घरची उलटी खूण

विकिस्रोत कडून


नाथांच्या घरची उलटी खूण


 पल्या देशातून कोणत्या शेतीमालाची सर्वांत अधिक निर्यात होते? अर्थात्, बासमती तांदळाची. सगळ्या जगात बासमती भाताच्या सुगंधाने सर्वांना मोहून टाकले आहे. बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आहेत आणि नवनवीन जन्माला येत आहेत. या सर्वांची येत्या नवीन वर्षांत मोठी निराशा होण्याची धास्ती आहे. अमेरिकेच्या शेतकी खात्याने या विषयावर एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे. येत्या वर्षात तांदळाचे उत्पादन काहीसे घसरणार आहे; परंतु तांदळाचा जागतिक व्यापार मात्र २३० लाख टनांवर जाईल. भारताच्या गाजलेल्या बासमती तांदळाची निर्यात काहीशी घटणार आहे. बासमती निर्यात करणारे इतर देश, मुख्यतः पाकिस्तान, किमतीत भारताला मागे टाकतात. थोडक्यात, निर्यातीत अग्रेसर असलेला भारतीय बासमती तांदूळ काहीसा मागे हटणार आहे.
 माझ्याकडून हे वाक्य आलेले पाहिले, की खुलीकरणाचे सारे विरोधक, बघा, आम्ही सांगत नव्हतो, हे सारे जागतिक व्यापारामुळे आणि WTOमुळे होते? असा गिल्ला करतील. निव्वळ बासमती तांदळापुरतेच बोलायचे झाले तरी या गिल्ल्यात काही तथ्य असणार नाही. खुलीकरणाचे दरवाजे उघडले गेले नसते तर बासमतीची निर्यात इतकी कधी चढलीच नसती.
 निर्यातीच्या बाजारात काही गमतीजमती होऊ लागल्या आहेत. संशोधनाच्या शर्यतीत थोड्या अंतराने अमेरिकेने शर्यत जिंकली, त्यामुळे, उद्याच्या जगातील एका महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर अमेरिकेने, तात्पुरता का होईना, प्रभाव जमवला आहे. हे त्यांचे स्पर्धक, युरोपातील देश, त्यांना सहन कसे व्हावे? युरोपातील पर्यावरणवादी आणि मजूर चळवळी यांनी एकत्र आघाडी बांधली आहे. 'जनुकशास्त्राचा वापर करून तयार केलेला शेतीमाल खाण्यात आल्याने काय
भयानक परिणाम होतील काही सांगता येत नाही' अशी हाकाटी त्यांनी चालू केली आहे; 'असा शेतीमाल खाण्यात आल्याने नेमका कोणता अपाय होणार आहे, त्यातून आताच्या पिढीला धोका काय, पुढच्या पिढीला धोका होण्याचा काय संभव आहे?' यांबाबत निश्चित कोणीच बोलत नाहीत. 'सर्व प्राणिमात्रांच्या जीवनाचे जे रहस्य त्या जनुकांशीच माणसाने ढवळाढवळ चालू केली आहे. त्याचा परिणाम काय होईल कोणी सांगावे? ग्राहकांनी धोका काय म्हणून घ्यावा? जर्मनीत तीसपस्तीस वर्षांपूर्वी थैलिडोमाईड औषध सेवन केल्यामुळे हजारो बालके अपंग जन्मली. जैविक शास्त्रात ढवळाढवळ करून तयार केलेल्या पदार्थांच्या सेवनाने काय होईल कसे सांगावे?' असा साराच घबराट पसरविणाऱ्या अफवांचा सुळसुळाट! जनुकशास्त्राच्या शर्यतीत मागे पडलेल्या युरोपीय कंपन्यांची या साऱ्या चळवळीला काहीच मदत नसावी हे संभव नाही. मुख्यतः अमेरिकेतून येणाऱ्या साऱ्या जनुक-फेरबदल वस्तूंविरुद्ध एकाच घबराटीने मोठा प्रचार चालू झाला आहे. असे पदार्थ आपल्या देशात आणण्याची परवानगी नसावी अशी मागणी सुरू झाली आणि युरोपीय सरकारांनी त्यापुढे मान तुकवली आहे.
 योगायोग असा, की या अमेरिकाविरोधी आंदोलनाचा फायदा भारतातील तेल गाळणाऱ्या उद्योगधंद्याला मिळणार आहे. हिंदुस्थानात उत्पादित होणाऱ्या सोयाबीनमधील प्रथिनांचे प्रमाण जगात सर्वांत जास्त असते. त्यामुळे भारतात तयार होणाऱ्या सोयाबीनच्या पेंडीत प्रथिने जास्त असतात. जनावरांची खाद्ये तयार करण्याकरिता भारतातील सोयापेंडीला लोकप्रिय मागणी होती. गेल्या काही वर्षांत मात्र ही मागणी घसरू लागली. तेल गाळणारे उद्योगधंदे झपाट्याने बंद पडू लागले. तेल गिरण्यांवर मोठे आर्थिक अरिष्ट आले होते. आता सोया तेलगिरण्यांना पुन्हा एकदा चांगले दिवस येणार आहेत. भारतीय सोयापेंडीला झपाट्याने मागणी वाढणार आहे. कारण, एक, भारतात जैविक फेरबदलाचे सोया बियाणे आलेलेच नाही त्यामुळे जैविक फेरबदलाचा बट्टा अद्याप आपल्या पेंडीवर नाही. दुसरे, गायींच्या पागलपणाच्या आजाराने भयभीत झालेला युरोप आता, दुभत्या जनावरांच्या खाण्यात मांसाहारी पदार्थतर येत नाहीत ना याबद्दल मोठा सचेत झाला आहे. हिंदुस्थानातील पेंडीत मांस व हाडांचा चुरा इत्यादी पदार्थ नसणार याबद्दल सगळ्यांची खात्री आहे. म्हणून, भारतीय सोयापेंडीची युरोपमधील मागणी झपाट्याने वाढणार आहे. आपली कार्यक्षमता किती टिकेल आणि भारतीय निर्यातदार वाहतुकीच्या खर्चात किती कसोशीने कपात करू शकतील यावर ही बाजारपेठ किती भरभराटेल हे अवलंबून आहे.
 'युरोप - २०००' प्रदर्शनाच्या शेतीविभागात भारतीय मसाल्यांच्या पदार्थांचा एक मोठा स्टॉल ठेवण्यात आला होता. भारतातील मसाल्याचे पदार्थ पूर्वापार प्रसिद्ध आहेत. इंग्लिश, फ्रेंच व्यापारी भारताकडे पहिल्यांदा आले ते मुख्यतः मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करण्यासाठीच. यातून मोठा इतिहास घडला. त्यातून मसाल्याचे पदार्थ पुरविणारे इतर देश पुढे आले आणि भारत मागे पडला. 'युरोप -२०००' प्रदर्शनात 'भारतातील पदार्थ रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर न करता पिकविण्यात आले आहेत' यावर मोठा भर देण्यात आला आहे. युरोपीय देशांतील आणि अगदी अमेरिकेतीलही ग्राहक, जैविक शेतीमाल वापरावा, त्यामुळे आरोग्यसंवर्धन चांगले होते या विचाराने भारले गेले आहेत. जैविक शेतीमालाची मागणी दरवर्षी दहा ते बारा टक्क्यांनी वाढते आहे आणि या मालासाठी पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यन्त अधिक किंमत देण्यास ग्राहकही आनंदाने तयार होतात. प्रदर्शनातील भारतीय मसाल्यांच्या दालनावर ग्राहकांच्या उड्या पडल्या. येत्या वर्षात मसाल्याच्या पदार्थांची निर्यातही वाढलेली दिसावी. जैविक शेतीचे प्रचारक श्री. श्रीपाद दाभोळकर जैविक प्रश्नावर बोलताना बाजारपेठेचा मोठा रागराग करतात. 'बाजारपेठेत जावेच कशाला? खिशात हात न घालता शेतीचे उत्पादन करावे, शुद्ध सात्त्विक पिकावर मस्त जगावे' असा त्यांचा धोशा असतो. जैविक शेतीची भरभराट जैविक मालाला मिळणाऱ्या वाढीव किमतीमुळे होईल या घटनेने दाभोळकरांना आनंद होईल का दुःख हे सांगणे कठीण आहे!
 भारतीय स्त्रियांची सोशिकता जगप्रसिद्ध आहे. 'एकच प्याला'तील सिंधु हा आदर्श. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बाया म्हणजे तर 'दीनवाण्या गायाच'. पहाटे झुंजूमुंजू होण्याच्या आधी उठायचे, दिवसभर चूल, मूल, गाय, गोठा, शेती यांची उस्तवारी करायची आणि मध्यरात्री जमिनीला पाठ लागली तर धन्य मानायचे असा या शेतकरी बायांचा दिनक्रम. या दिनक्रमाने शेतकरी मजूर स्त्रियांना एक मोठी देणगी दिली. संकरित वाणाचे बियाणे तयार करण्यासाठी फुलावर आलेल्या पिकात पुंकेसराचे स्त्रीबीजावर आरोपण करायचे असते. मोठे नाजूक काम; मेहनतीचे व कंटाळवाणेही. थोडी चूक झाली तरी सगळे कष्ट फुकट जातात. या असल्या रटाळ कामामध्ये भारतीय शेतमजूर स्त्री जगविलक्षण कौशल्य दाखवते. संकरित वाणांचे संशोधन परदेशी शास्त्रज्ञ करोत, त्या वाणांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात भारत अग्रेसर राहणार आहे.
 बाजारपेठ खुली झाली म्हणजे पिढ्यान्पिढ्या दोष समजले गेलेले एकदम
गुण ठरू लागतात. भारतात औषधी आणि सुगंधी वनस्पती विपुल आहेत. त्यांच्यातील औषधी आणि सुगंधी गुण डोंगराळ जंगली भागात जितके दिसून येतात तितके त्याच वनस्पतीच्या शास्त्रशुद्ध शेतीत आढळत नाहीत. दुर्गम प्रदेशात जाऊन वेचलेल्या असल्या वनस्पतींना मोठी मागणी येत आहे.
 सगळ्यात गंमत म्हणजे, वर्षानुवर्षे मोठे कष्ट करून शेतकरी ज्या तणांना नष्ट करण्याच्या खाटाटोपास लागलेला आहे ती हरळी, कुंदा, बावंच्या यांच्यासारखी तणे एकदम मूल्यवान द्रव्ये ठरत आहेत. 'आधुनिक शेतीशास्त्रात आपण मागे राहिलो, आता शास्त्रनिपुण विलायती शेतकऱ्यांसमोर आपण कसे काय टिकू शकणार?' असा भयगंड बाळगणाऱ्या या 'नाथांच्या उलट्या खुणां'त एक संदेश आहे. 'महापुरे झाडें जाती, तेथे लव्हाळी वाचती.' व्यवस्थेत खुलेपण असले, की कमजोरीचे मुद्देच बलाढ्य ताकद ठरू शकतात.

दि. २०/१२/२०००
■ ■