अन्वयार्थ – २/धिस् हॅपन्स् ओन्ली इन इंडिया!

विकिस्रोत कडून


धिस् हॅपन्स् ओन्ली इन इंडिया!


 नेका गांधी कोणत्या ना कोणत्या विचाराने भारून गेलेल्या असतात. पर्यावरण खात्याच्या मंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःची अशी एक प्रतिमा बनवली. प्रदूषण कमी व्हावे या दृष्टीने अनेक कारखान्यांवर टाच आणली. एखाददुसरा कारखाना प्रदूषण नियमांचा भंग केल्याबद्दल बंदही करावा लागला असेल. पण, बहुतेक प्रकरणे सामोपचाराने मिटलेली दिसतात.
 प्राणिदया हा, सध्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याच्या केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या मनेका गांधींचा विशेष आवडीचा विषय. प्राणिजीवनावर त्यांनी अभ्यासपूर्वक बरीच पुस्तके लिहिली आहेत. शाकाहाराचा त्या आग्रह धरू लागल्या आहेत. मध्यंतरी, 'दूध हे रक्तच असते' असे म्हणून त्यांनी दूध पिण्यावर आक्षेप घेतला होता.
 शेतकरी गोठ्यातील जनावरांना आणि वाडीवर राहणाऱ्या कुत्र्यामांजरांनाही जीव लावतात. पशुपालन म्हटले, की त्यात काही क्रूरता अपरिहार्य असते. दुभती जनावरे म्हातारी झाली म्हणजे त्यांना काढून टाकताना शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबात मोठी उदासीनता येते; सुतकाची कळा येते. कालपर्यंत आपल्या गोठ्यात असलेले मुके जनावर आज कोठे चालले असेल, त्याचे काय होत असेल या कल्पनेनेही शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या पोटात गलबलून जाते.
 मनेकाबाईंनी, कसाईखान्याकडे जाणारी जनावरे मैलच्या मैल चालवत नेली जातात याबद्दल तक्रार केली; शेतकरी मनाला ती पटली. जनावर कापण्यापूर्वी आणि कापताना त्याचे विनाकारण हाल करू नयेत अशी त्यांची भावना.
 दुधाचा धंदा करायचा म्हणजे त्यात संवर्धन आले, पालन आले आणि त्याबरोबर भाकड जनावरे काढून टाकणेही आले. घरातील चालतीबोलती माणसे जड होऊ लागली म्हणजे मनावर दगड ठेवून शेतकरी मुलगा त्यांना वारीसाठी
किंवा काशीयात्रेला पाठवतो. वर्षानुवर्षे आपल्या मुलांबाळांचे पोषण करणाऱ्या जनावरास काढून टाकणे ही मोठी दु:खद गोष्ट आहे. पण, पशुहत्येला विरोध करणारी मंडळी भाकड वयात जनावरांच्या होणाऱ्या खाण्यापिण्याच्या खर्चाचा बोजा काही उचलायला तयार होत नाहीत ही शेतकरी संघटनेची पशुहत्याविरोधकांबद्दलची तक्रार आहे.
 प्राणिदयेचा विषय फक्त गोठ्यातील जनावरांपुरता मर्यादित राहत नाही. सर्वाभूती आत्मा आहे, गाय तेहेतीस कोटी देवांचे निवासस्थान असेल; पण वाघासारख्या हिंस्र प्राण्यालाही जीव आहे. प्राणिदयेची व्याप्ती जंगली पशूपर्यंत गेली, त्यात हरणे, वाघ यांचाही समावेश झाला म्हणजे शेतकऱ्याच्या समोर अडचण उभी राहते. अशा प्राण्यांकरिता राखून ठेवलेल्या अभयारण्यांच्या आसपासच्या शेतकऱ्यांना या प्राण्यांचा मोठा उपद्रव होतो. हरणांचे कळप शेते फस्त नाही तरी उद्ध्वस्त करून जातात आणि वाघबिबटे शेतातील प्राण्यांवरही हल्ला करतात, माणसांना सतत भीतीच्या छायेखाली वावरावे लागते - वाघांच्या आणि त्यांच्याहीपेक्षा जास्त कायद्याच्या. शेतकरी कायद्याच्या यंत्रणेतून पळवाट काढून वाघांना विष घालून मारतो हे काही गुपित नाही.
 मनेकाबाईंचा प्राणिदयेचा विषय कुतूहल निर्माण करी; आजवर त्यामुळे कधी खळबळ माजली नाही. गेल्या आठवड्यात बाईंनी फर्मान काढले. घोड्यांच्या शर्यतीत स्वार त्याचा घोडा वेगाने धावावा म्हणून चाबकाचा उपयोग करतो. एक फतवा काढून बाईंनी त्यावर बंदी घातली; चाबकाच्या ऐवजी हवेचे चाबूक, इतर देशांप्रमाणे येथेही वापरावेत असे सांगितले आणि एकच हलकल्लोळ माजला. घोड्यांच्या शर्यती हा अब्जावधीचा धंदा आहे. शर्यतींचे पागलही लाखोंच्या संख्येने आहेत. पुण्याच्या शर्यतीच्या दिवशी मुंबईकडून गाड्या भरभरून येतात, जातात आणि मुबईत शर्यत असली म्हणजेही उलट्या दिशेने भरगच्च भरून धावतात. शर्यतीत घोडे धावणारे कोणते, त्यांचे आईबाप कोण, त्यांचे खानदान काय; शर्यतीत धावण्याचा प्रत्येकाचा इतिहास काय याचा मोठा बारकाईने अभ्यास होतो. घोड्यांपेक्षाही जास्त अभ्यास घोडेस्वाराच्या कारकिर्दीचा केला जातो.
 घोडेस्वार आणि चाबूक हे शब्द एकमेकांशी जुळलेलेच आहेत. केवळ टाच मारून तुफान घोडदौड इतिहासातील राणा प्रतापसिंहासारख्या गाजलेल्या वीरांनाही शक्य झाली नसावी. घोडा आणि त्याचा मालक यांच्या वैयक्तिक प्रेमसंबंधांतील चाबूक हे एक साधनच समजले जाईल. वर्षानुवर्षे चाबूक वापरलेल्या घोडेस्वारांना
हवेच्या चाबकाने घोडा दौडवता येईल असा विश्वास वाटेना. कोट्यवधींच्या शर्यतींच्या धंद्यात मोठा आकांत उडाला. परदेशांतील रेसिंग व्यवसायातही या करुणेच्या भावनेने अनेकांची मने हलली.
 मनेकाबाईंनी शेतकरी शेतात नांगर चालवताना किंवा बैलगाडी हाकताना पाहिला नसावा. चाबूकच काय, अणकुचीदार पराणीचाही प्रयोग सर्रास केला जातो. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना बैलांवर चाबकाचा प्रयोग करू नये असा फतवा निघाला तर मोठी कठीण अवस्था येणार आहे. बैल न वापरता ट्रॅक्टरच वापरायचे म्हटले तर तेथेही अडचण! कारण शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे पर्यावरणात प्रदूषण माजते; पण पोटच्या पोरांना दाटावे, आईमाईवरून शिव्या घालाव्या या संस्कृतीत बैलाच्या पाठीवरील चाबकाचे फटकारे कोणाला फारसे रुतत नाहीत.
 योगायोग असा, की ज्या आठवड्यात मनेकाबाईंनी हवेच्या चाबकाचा फतवा काढला त्याच आठवड्यात तामिळनाडूमधील येरवाडीचे जळीत प्रकरण झाले. येरवाडी येथे एक दर्गा आहे. या दर्यात मिन्नत मागितल्याने अगदी ठार वेडेसुद्धा बरे होतात अशी पूर्वापारची श्रद्धा आहे. हिंदुस्थानात मानसिक रुग्णांच्या उपचारांची सोय जवळजवळ नाही. मनाचे संतुलन गेलेली माणसे आजारी आहेत असे कोणाला वाटतच नाही. तिन्ही त्रिकाळ चाऱ्ही ठाव हादडणारा माणूस आजारी असेलच कसा, अशीच सरसकट भावना आहे. कुटुंबातून त्याला काढून लावण्याचे अनेक मार्ग आहेत. गर्दीच्या ठिकाणी, यात्रेत त्यांना गुपचूप सोडून देतात. वेडेचार करीत, कोणी पोटाला घातले तर ते खात जगता येईल तितके दिवस ते जगतात. हाल हाल होतात. वेडे माणूस बाई असली म्हणजे मग तर काय अनन्वित छळ होत असेल याची कल्पनाही कठीण. यातील काही माणसे चमत्कारिक योगायोगांमुळे अवलिया मानले जातात आणि भक्तीचा विषयही बनतात.
 महाराष्ट्रात नरसोबाच्या वाडीला देवळात वेड्यांचा उपचार होतो म्हणजे खांबाला बांधून त्यांना निर्दयपणे झोडपले जाते. प्रत्यक्ष रुग्णांना या उपचारांचा किती उपयोग होतो ते सांगणे कठीण आहे. त्यात अनेकांचे प्राणही जातात; पण कोणी थोडेफार वेडेचाळे करू लागला तर नरसोबाच्या वाडीला नेण्याच्या धमकीने, कदाचित, तो आटोक्यात राहत असेल तेवढाच काय तो या उपचाराचा उपयोग.
 मनोरुग्णांतील अनेक लैगिक कोंडमारीत असतात. कामविश्वात चाबकाचे दैवत करणारे समाज अनेक पाश्चिमात्य देशांत भरपूर पसरले आहेत. त्यांच्या
साहित्यांत चाबकाच्या माऱ्यामुळे लैंगिक कोंडमारा कमी होतो असे आग्रहाने प्रतिपादन केले जाते. नरसोबाच्या वाडीच्या उपचारामागे कदाचित असेही काही शास्त्र असू शकेल.
 येरवाडीच्या दर्ग्यात मिन्नत मागण्यासाठी हजारोंनी गर्दी उसळते. सगळ्यांना तातडीने दर्शन शक्य नाही, काही दिवस मुक्काम करावा तरच नंबर लागतो. साहजिकच, तेथे वेडे आणि त्यांचे नातेवाईक यांच्या निवासाची सोय करण्याचा मोठा व्यवसाय तयार झाला. नातेवाईक खोल्यांत राहतात, वेड्यांची सोय वेगळी – गोठ्यांत, तबेल्यांत. नातेवाईक म्हणजे कामाची माणसे, ती नंबर लागेपर्यंत कशी काय थांबणार? एकदोन दिवसांत ती आपल्या कामी लागतात; वेड्यांना दर्यात नेऊन आणण्याची जवाबदारी, तीर्थक्षेत्रांतील भिक्षुकांप्रमाणे, वेड्यांच्या आसऱ्यांचे व्यवस्थापक घेतात. एकेका कोठीत शंभर शंभर वेडे ठेवतात. त्यांच्या खाण्यापिण्याची, शौचमार्जनाची व्यवस्था कोण करतो? हे पळून गेले नाही म्हणजे पुरे. तेवढ्यासाठी आणि त्यांनी दंगाधोपा करू नये म्हणून त्यांना साखळीने बांधून ठेवले जाते.
 शर्यतींच्या घोड्यांवर चाबकाचा प्रयोग होऊ नये असा फतवा निघाला त्याच्या तिसऱ्याच दिवशी येरवाडीतील वेड्यांच्या एका गोठ्याला आग लागली. साखळीने बांधलेले वेडे जागच्या जागी होरपळून मेले. येरवाडीत असे पाचपन्नास गोठे आहेत. साऱ्या देशभरात असे 'दर्गे' किती, 'वाड्या' किती आणि गोठे किती असतील याची खानेसुमारीच नाही.
 म्हाताऱ्या आईबापांना पोसता येत नाही म्हणून त्यांना उघड्या डोळ्यांनी काशीमरणाला पाठवावे, बोजा होतो म्हणून मनोरुग्णांना जनावरांसारखे बांधून घालावे हे ज्या देशात होते तेथेच घोडे आणि कुत्रे यांचे कौतुक मानवतावाद आणि भूतदया म्हणून वाखाणले जाते. धिस् हॅपन्स ओन्ली इन इंडिया!

दि. १८/८/२००१
■ ■